Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सावधान, स्वाइन फ्ल्यू बळावतोय!

$
0
0

मटा फोकस

संकलन ः अरविंद जाधव

--

सावधान, स्वाइन फ्ल्यू बळावतोय!

--

जीवघेण्या स्वाइन फ्ल्यूमुळे २००९ ते १८ ऑक्टोबर २०१७ या नऊ वर्षांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात २९२ बळी गेले आहेत. २०१७ मध्ये ही संख्या ८९ असून, नऊ वर्षांत सर्वाधिक बळी याच वर्षात गेल्याचे दिसते. स्वाइन फ्ल्यूचा फैलाव सहजतेने होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाइन फ्ल्यूला अटकाव करण्यासाठी नेमकी काय उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, यावर टाकलेला फोकस...

--

यंदा स्वाइन फ्ल्यूमुळे ८९ रुग्ण उपचारांदरम्यान दगावले आहेत. यात शहर, जिल्हा, तसेच परजिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे. २००९ मध्ये प्रथमच स्वाइन फ्ल्यू प्रकाशझोतात आला. साधा फ्ल्यू आणि स्वाइन फ्ल्यू यात फारसा फरक नसल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण होते. २००९मध्ये नाशिकमध्ये १२२ जणांना स्वाइन फ्ल्यूची बाधा झाली होती, तर २२ जणांचा बळी गेला होता. तापमानातील बदल आणि व्यक्तीची प्रतिकारक्षमता यावरच स्वाइन फ्ल्यूचा फैलाव आणि रुग्णाच्या मृत्यूची शक्यता अवलंबून असते. दुर्दैवाने यंदा तापमानामुळे स्वाइन फ्ल्यूच्या फैलवास पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. जिल्ह्यात २००९ ते २०१६ या कालावधीत सर्वाधिक मृत्यू २०१५ मध्ये झाले होते. यादरम्यान नाशिक शहर, तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन पार पडले होते. लाखो भाविकांच्या हजेरीमुळे त्या वर्षी स्वाइन फ्ल्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. तब्बल ५०८ नागरिकांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली होती, तर ८७ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र तशी परिस्थिती नसताना ८९ बळी गेले आहेत.

नाशिकमध्ये २०१७ मध्ये सुरुवातीपासूनच स्वाइन फ्ल्यूचा जोर कायम राहिला. त्यातच शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यंदा परतीचा पाऊसदेखील मुसळधार बरसला. ऑक्टोबर हीट फारशी जाणवलीच नाही. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. या वातावरणात एन१एच१ विषाणूंचा प्रसार जोरात झाला. लवकरच थंडीचे वातावरण तयार होईल. थंड वातावरणात स्वाइन फ्ल्यूचा फैलाव आणखी जोरदार होतो. या पार्श्वभूमीवर डिसेंबरपर्यंत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. यंदा स्वाइन फ्ल्यू रोखण्याचे आरोग्य विभागाचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. १४ ऑक्टोबरपर्यंत शहर, तसेच जिल्हा मिळून एकूण ८० हजार ८६२ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील चार हजार ५०५ संशयित रुग्णांना टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या देण्यात आल्या, तर ८४५ रुग्णांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील ७३१ रुग्णांला उपचारांनंतर सोडण्यात आले, तर ८७ जणांचा मृत्यू झाला.

----

साधा फ्ल्यू अन् स्वाइन फ्ल्यू

स्वाइन फ्ल्यू हा आजार इन्फ्ल्युएंझा एच१एन१ या विषाणूपासून होतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यामुळे आणि खोकल्यामुळे हा आजार हवेतून इतरत्र पसरतो. सर्वसाधारणपणे या आजाराचे स्वरूप सौम्य असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या आजाराला न घाबरता हा आजार पसरू नये, म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. कोणताही आजार वाढू नये आणि त्याचा संसर्ग इतरांना होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार सुरू करणे अत्यावश्यक आहे. सौम्य ताप असेल, तसेच खोकला, घशात खवखव होत असेल, डोकेदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत असेल, तरी स्वॅब अर्थात, थुंकीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावयाची गरज नाही. मात्र, अशा रुग्णाचा जनसंपर्क कमी करावा, तसेच घरातील इतर व्यक्तींशी जास्त संपर्क टाळावा. मागील नऊ वर्षांपासून अस्तित्वात आलेला स्वाइन फ्ल्यू आणि अनेक वर्षांपासून मानवाला लागण होणारा फ्ल्यू यात फारसे अंतर नाही. साध्या फ्ल्यूमध्ये आढळून येणारी सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, अंगदुखी ही सर्व लक्षणे स्वाइन फ्ल्यूमध्ये आढळून येतात. फ्ल्यूची ही सामान्य लक्षणे आढळून आल्यानंतरही उपचारास टाळाटाळ केली की स्वाइन फ्ल्यूची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते. एच१एन१ विषाणू एकदा शरीरात गेला आणि वेळीच उपचार झाला नाही, तर तो नंतर कोणत्याही उपचारास बधत नाही. मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती महत्त्वाची असते. स्वाइन फ्ल्यू कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. मात्र, त्याने वेळीच उपचार घेतले, तर तो साध्या फ्ल्यूप्रमाणे बराही होतो, असे सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. याबाबत बोलताना डॉ. जगदाळे यांनी सांगितले, की स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण रुग्णांपैकी १९ रुग्ण हे परजिल्ह्यांतील किंवा परराज्यांतील आहेत. असे रुग्ण उपचारांसाठी आले आणि उपचार करताना मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक १५ रुग्ण अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. जळगाव येथील दोन, धुळे येथील एक, तर मध्य प्रदेशमधील एका रुग्णाचाही त्यात समावेश आहे.

----

वेळेवर निदान, उपचार महत्त्वाचे

स्वाइन फ्ल्यूची लागण कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस होते. या आजारामुळे लहान मुले, तरुण, तसेच वृद्ध व्यक्तीही मृत्युमुखी पडले आहेत. एच१एन१ हा विषाणू पूर्वी फक्त थंडीच्या कालावधीत आढळून यायचा. आता तो कडक उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल आणि मेमध्येही अस्तित्वात असल्याचे आढळते. या विषाणूने आपली लाइफ सायकल ज्या पद्धतीने बदलली, त्याच पद्धतीने मानवी शरीराची प्रतिकार क्षमता वाढणे महत्त्वाचे आहे. फ्ल्यू हा जीवघेणा ठरू शकतो, ही मानसिकता आपल्याकडे आढळून येत नाही. त्यामुळे अनेकदा सहजतेने याकडे दुर्लक्ष होते. वास्तविक फ्ल्यू झाल्यानंतर स्वाइन फ्ल्यू होऊ शकतो, हे लक्षात घेऊन नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे अपेक्षित आहे. खासगी अथवा सरकारी सर्वच डॉक्टरांनी स्वाइन फ्ल्यूचे तत्परतेने निदान करणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. सुरेश जगदाळे यांनी स्पष्ट केले. स्वाइन फ्ल्यू झाल्यानंतर वेळेत उपचार झाले नाहीत, तर रुग्ण मृत्युमुखी पडण्याची शक्यता वाढते.

----

नागरिकांनी घशाला सूज असल्यास, सर्दी झाल्यास, तसेच जुलाबाचा त्रास होत असल्यास आजार अंगावर काढू नये. या आजारात रुग्णांच्या शरीराची प्रतिकारशक्ती महत्त्वाची ठरते. नागरिकांनी सामन्य फ्ल्यूची लक्षणे दिसून आल्याबरोबर वैद्यकीय उपचार घ्यावेत.

-डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

--

प्रतिबंधासाठी अशी घ्या दक्षता...

--

-स्वाइन फ्ल्यू रोखण्यासाठी सतत साबण-पाण्याने हात धुवावेत.

-फ्ल्यू अथवा स्वाइन फ्ल्यू संसर्गजन्य असल्याने गर्दीत जाणे टाळावे.

-स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांपासून शक्यतो दूर राहावे.

-खोकताना अथवा शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.

-भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.

-प्रतिकार शक्ती वाढविणारा आहार वाढवावा.

-हस्तांदोलन अथवा आलिंगन देणे टाळावे.

-साध्या फ्ल्यूची लक्षणे असल्यास अंगावर काढू नये.

-कमीत कमी लोकांशी संपर्क ठेवावा.

-घराबाहेर पडताना शक्यतो मास्क वापरावा.

-छोट्या आजारासाठीही अंदाजे औषधे घेऊ नयेत.

---

रुग्णस्थितीवर वर्षनिहाय दृष्टिक्षेप

--

वर्ष… संशयित रुग्ण… मृत्यू

२००९…१२२…२२

२०१०…२५४…३९

२०११…१६…१

२०१२…३७…२१

२०१३…३४…१९

२०१४…२२…१०

२०१५…५०८…८७

२०१६…१६…४

२०१७…५१०…८९

---

सरकारी-खासगी संस्थांतील स्थिती

--

संस्था...हॉस्पिटल... रुग्णांची संख्या...मृत्युमुखींची संख्या

१ सरकारी...सिव्हिल हॉस्पिटल...६१....२२

उपजिल्हा रुग्णालये...०...०

२ महापालिका... डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल...१८...०

खासगी हॉस्पिटल्स...४३७...६७

एकूण...................५१६....८९

---

रुग्णांची तालुकावार स्थिती

--

तालुका... रुग्णांची संख्या... मृत्युमुखींची संख्या

बागलाण...९...४

चांदवड...९...४

दिंडोरी...२२...४

कळवण...५...१

सिन्नर...२४...३

निफाड...३१...९

मालेगाव...६...०

देवळा...४...२

पेठ...२...०

येवला...४...१

नाशिक...१९...२

इगतपुरी...६...३

सुरगाणा...०...०

नांदगाव...४...०

त्र्यंबकेश्वर...०...०

एकूण...१४५...३३

---

शहरी भागातील रुग्णसंख्या

--

शहरी भाग... रुग्णांची संख्या...मृत्युमुखींची संख्या

नाशिक महापालिका क्षेत्र...२५७...३०

येवला नगरपालिका....२...०

नांदगाव नगरपालिका...०...०

सिन्नर नगरपालिका...७...१

इगतपुरी नगरपालिका...०...०

सटाणा नगरपालिका...४...१

मालेगाव महापालिका....६...२

मनमाड नगरपालिका...१...०

भगूर नगरपालिका...४...१

त्र्यंबकेश्वर नगरपालिका...०...०

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड...५...२

एकूण....२८६...३७

---

नाशिकमध्ये उपचार घेणारे परजिल्ह्यांतील रुग्ण

--

जिल्हा... रुग्णांची संख्या...मृत्युमुखींची संख्या

नंदुरबार...२...०

औरंगाबाद...१...०

धुळे...७...१

अहमदनगर...६४...१५

जळगाव...५...२

यवतमाळ...१...०

पुणे....२...०

गुजरात...१...०

मध्य प्रदेश...१...१

बुलडाणा...१...०

एकूण....८५...१९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा

$
0
0

वृत्तसंस्था, नवी दिल्ली / म. टा. वृत्तसेवा, धुळे

सर्जिकल हल्ल्यानंतर सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेले ३७, राष्ट्रीय रायफल्समधील भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना गुरुवारी ८९ दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेसह त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली असून चंदू यांच्या दोन वर्षांच्या निवृत्त वेतनात कपात करण्यात येणार आहे. मात्र, या शिक्षेवर शिक्कामोर्तब होणे अद्याप बाकी आहे. ते या शिक्षेविरुद्ध अपील करू शकतात. पाकिस्तानच्या ताब्यात चव्हाण सुमारे चार महिने राहिले होते.

भारताने २८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानवर सर्जिकल हल्ला केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २९ सप्टेंबरला चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीत गेले. ही बातमी समजताच चंदू यांच्या आजीला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी प्रयत्न करीत चंदू यांना ११४ दिवसांनंतर, २१ जानेवारी २०१७ रोजी मायदेशी आणण्यात यश मिळविले होते. त्यानंतर चव्हाण यांचे कोर्ट मार्शल करण्यात आले. त्यांच्याविरोधात चाललेल्या खटल्यात चव्हाण दोषी आढळले. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चव्हाण हे मूळ धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत असलेले बावीस वर्षीय चव्हाण २०१२मध्ये सैन्यात भरती झाले होते.
‘चंदूवर अन्याय करू नये’

धुळे : चंदू चव्हाण यांचे कोर्ट मार्शल होऊन त्यांना शिक्षा झाल्याचे वृत्त आजोबा चिंधा पाटील यांना समजताच त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘चंदूला आधीच पाकिस्तानात त्रास सहन करावा लागला. त्याला मिळालेली ही शिक्षा अन्यायकारक आहे. चंदू नजरचुकीने सीमा ओलांडून गेला, ही बाब समजून निर्णय बदलावा आणि चंदूवर अन्याय करू नये,’ अशी विनंती चंदू यांच्या आजोबांनी केली आहे. ‘चंदूच्या सुटकेसाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रयत्न केले होते. आता देशाचे रक्षण करणाऱ्या भूमिपुत्रासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न करावेत,’ अशी मागणी चंदू यांचे मामा आणि मामी यांनी केली आहे. सीमा ओलांडण्याच्या दोन महिने आधीच चंदू चव्हाण राष्ट्रीय रायफल्समध्ये भरती झाले होते. त्यांचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. तो सध्या ९ मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’मध्ये आता पुन्हा पीएच.डी.!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास नियमित पूर्णवेळ व अर्धवेळ नियमित पद्धतीने एम. फिल. आणि पीएच. डी. संशोधन शिक्षणक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मान्यता दिली आहे. या संदर्भात यूजीसीने नुकतेच विद्यापीठास पत्र पाठविले आहे. यूजीसीच्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना संशोधनपर उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, एम. फिल. आणि पीएच. डी. संशोधन शिक्षणक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असणार आहे. यूजीसीने निर्देशित केल्यानुसार एम. फिल. आणि पीएच. डी. शिक्षणक्रमांची संरचना आणि कार्यपद्धती विद्यापीठास बंधनकारक असणार आहे. यूजीसीच्या २०१६ च्या निर्देशानुसार विद्यापीठास हे दोन्ही संशोधन शिक्षणक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे निकष लागू करीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे २०१२ च्या शैक्षणिक वर्षापासून बंद पडलेली पीएच. डी. मध्यंतरी सुरू करण्यात आली होती. १९९३ ते २०१० या काळात मुक्त विद्यापीठाने अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डॉक्टरेट दिली. मात्र, गुणवत्ता नसल्याचे कारण पुढे करीत दूरशिक्षण परिषदेतर्फे मुक्त विद्यापीठाकडून पीएच.डी.चे अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यामुळे २०१० ते २०१२ या काळात पीएच.डी.साठी प्रवेश बंद होते. आता तब्बल पाच वर्षांनंतर २०१७ मध्ये ही पीएच.डी. पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

यूजीसीने ‘मुक्त’ची पीएच. डी. का बंद केली, याला सबळ कारण नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे होते. कारण जेव्हा यूजीसी एखादा निर्णय घेते, तेव्हा विद्यापीठाला आपले म्हणणे मांडण्याची संधी देते. मात्र, मुक्त विद्यापीठाकडून तसा स्पष्ट अहवाल यूजीसीने मागविला नव्हता. त्यामुळे त्यांची भूमिका संदिग्धच होती. २०१० या वर्षात तर मुक्त विद्यापीठामध्ये पैसे घेऊन, कॉपी केलेल्या प्रबंधिकांना मंजुरी देऊन एम. फिल. व पीएच. डी. या पवित्र पदव्या खिरापतीसारख्या वाटण्यात आल्या. ही गोष्ट त्या काळी ‘दूरशिक्षण’च्या लक्षात आल्याने त्यांनी या ‘मुक्त’हस्ते पदवीवाटपावर निर्बंध घातले. मात्र, यूजीसीने मध्यस्थी केल्याने विद्यापीठ व्यवस्थापनाने संशोधन सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता. यूजीसीने स्वत:च्या निकषानुसार पदवीसाठी संशोधनास प्रवेश देणार असल्याने विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, यूजीसीनेच काही काळानंतर पीएच.डी. बंद केली होती.

मुक्त विद्यापीठात जे विद्यार्थी या पदवीला प्रवेश घेतात, त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, हा मलिदा मिळविण्यासाठी संशोधनाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानेही ही पीएच.डी. बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र पुन्हा एकदा पीएच.डी.साठीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळी समाजाचा रविवारी चिंतन व स्नेहमेळावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिक जिल्हा माळी समाज नियोजन समितीतर्फे येत्या रविवारी (दि. २९) माळी समाज चिंतन आणि स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील द्वारका परिसरातील कन्नमवार पुलाजवळील माळी मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता हा मेळावा होणार आहे.

संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा समृद्ध वारसा माळी समाजास लाभला आहे. समाजात साक्षरतेचा प्रसार करण्यात आणि सामाजिक, राजकीय योगदानात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माळी समाजात एकजुटीची भावना, वैचारिक प्रगती व्हावी आणि समाज विधायक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सद्यःस्थितीला समाजव्यवस्थेमध्ये माळी समाजाचे स्थान, माळी समाजाचे स्वरूप, समाजबांधवांसाठी उपलब्ध असलेल्या प्रगतीच्या विविध वाटा, माळी समाजापुढील विविध क्षेत्रांतील आव्हाने, यांसारख्या विविध महत्त्वाच्या पैलूंवर उहापोह केला जाणार आहे. यातून समाजाच्या प्रगतीच्या नवनवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एक दिवस समाजासाठी, एक दिवस भविष्यासाठी एक दिवस अस्तित्वासाठी ही त्रिसूत्री समोर ठेवून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राज्यभरातील माळी समाज बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

--

व्याख्याने अन् चर्चासत्र

संघटितपणा आणि वैचारिक जागृतीमधून माळी समाजात सुसंवाद साधण्याच्या उद्देशाने होणाऱ्या या स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे ‘महात्मा फुले : माळी समाज- दशा व दिशा’ या विषयावर, ज्येष्ठ विचारवंत अॅड. संभाजी पगारे यांचे ‘माळी समाज संघटन काळाची गरज’ याविषयावर, तसेच ज्येष्ठ विचारवंत अॅड. संभाजीराव बोरुडे यांचे ‘माळी समाजापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह राजकीय मंडळी समाज विकासासंदर्भातील मुद्यांवर आयोजित चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. यानंतर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले रचित गीतांचा बहारदार संगीतमय अाविष्कार माळी समाजातील दिग्गज कलाकार सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीए कर्मचाऱ्यांचा लवकरच गृहप्रवेश!

$
0
0

नाशिक : महाराष्ट्र पोल‌िस अकादमीमधील मोडकळीस आलेली ब्रिट‌िशकालीन घरे लवकरच इतिहासजमा होणार आहेत. अकादमीमधील पोल‌िस कर्मचाऱ्यांसाठी नवीन इमारत बांधण्याची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा मूर्तरुपात येत असून, लवकरच येथील १६८ कर्मचारी कुटुंबासह नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश करणार आहेत.

११ फेब्रुवारी २०१४ रोजी महाराष्ट्र पोल‌िस अकादमीमध्ये झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्या १११ व्या दीक्षान्त संचलन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थ‌ित होते. पोल‌िस कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी अकादमीमधील कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थींसाठी विविध सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. यापैकी काही घोषणांची अंमलबाजवणी सुरू असून, काही प्रस्ताव अजूनही मंजुरीच्याच प्रतीक्षेत आहेत. अकादमीमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मिळून ३४१ पदे आहेत. यापैकी वर्ग तीन आणि चारचे अनेक कर्मचारी कुटुंब‌ियांसह अकादमीच्याच आवारात राहावयास आहेत. १९०६ मध्ये सुरू झालेल्या या अकादमीतील कर्मचाऱ्यांची घरे ब्रिट‌िशकालीन असून, शंभर वर्षांहून अधिक जुनी आहेत. ही घरे मुदतबाह्य झाली असून, त्यांना अवकळा आली आहे. तरीही गैरसोयींचा सामना करीत पोल‌िस कुटुंबे तेथेच राहात आहेत. येथे कर्मचाऱ्यांसाठी नवीन घरे बांधण्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार अकादमीच्याच आवारात एक ते सव्वा वर्षांपूर्वी नवीन इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. येथे सात मजली दोन इमारती उभारण्यात येत असून, वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठीच ही घरे असल्याची माहिती अकादमीमधील अधिकाऱ्यांनी दिली. या इमारतींसाठी सरकारने ४१ कोटी ७४ लाख ८० हजार ३४२ रुपयांचा न‌िधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र राज्य पोल‌िस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून हे काम करवून घेण्यात येत आहे. कामाची गुणवत्ता आणि दर्जाकडे एमपीएमधील अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. १६८ सदनिकांचे हे काम पुढील चार-सहा महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंब‌ियांना नवीन वास्तूमध्ये गृह प‍्रवेशाचे वेध लागले आहेत.

बंदीस्त सभागृह, वर्गखोल्या मंजुरीच्या प्रतीक्षेत

महाराष्ट्र पोल‌िस अकादमीमध्ये बंदीस्त सभागृह उभारण्यात येणार असल्याची घोषणादेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. हे सभागृह बनविण्याबाबतचा प्रस्ताव अकादमीकडून पाठविण्यात आला आहे. परंतु, हा प्रस्ताव लालफितीमध्ये अडकला असून, त्यास सरकारची अद्याप मान्यता मिळाली नसल्याची माहिती एमपीएमधील सूत्रांनी दिली. पोल‌िस उपनिरीक्षक ते पोल‌िस उपअधीक्षक पदांवरील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी महाराष्ट्र पोल‌िस अकादमी ही एकमेव संस्था आहे. येथे प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी अद्ययावत वर्ग खोल्या बांधण्यात येणार असल्याची घोषणादेखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. परंतु, हा विषयदेखील सद्यःस्थ‌ितीत प्रस्तावाच्याच पातळीवर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धडपड’तर्फे कलाकारांचा सन्मान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहरातील समाजसेवी संस्था धडपड मंचच्या वतीने यंदाच्या दीपावलीत आयोजित दारापुढे रांगोळी काढण्याच्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बुधवारी (दि. २५) दुपारी बक्षीस वितरण करण्यात आले. त्यांनी साकारलेल्या कलाकृतींना मंचातर्फे सन्मानित करण्यात आले. येवला व्यापारी बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगावच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे या होत्या.

आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असलेली व सण उत्सवात दारापुढे काढली जाणारी रांगोळी ही आपली जुनी परंपरागत कला आहे. रांगोळीमुळे वातावरण आनंदमय, मंगलमय व चैतन्यमय तर होते. याकडे लक्ष वेधत रांगोळी स्पर्धेद्वारे धडपड मंच महिलांना प्रेरणा देण्याचे काम करीत असल्याचे मत सुहासिनी कोयटे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी श्रीनिवास सोनी, ज्योत्स्ना पटेल, श्रीकांत खंदारे, जनकल्याण सेवा समिती अध्यक्ष नारायण शिंदे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रांगोळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे मुक्तकंठाने कौतुक केले. धडपड मंचच्या वतीने सलग १९ व्या वर्षी यंदाच्या दीपावली सणातील भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी येवला शहरात दारापुढे रांगोळी काढण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते.

संस्कार भारती, ठिपक्याची रांगोळी व विषयाचे बंधन नसलेली रांगोळी अशा तीन विभागात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण तब्बल १९२ स्पर्धक सहभागी झाले होते. सर्व सहभागी स्पर्धकांना धडपड मंचच्या वतीने आकर्षक भेटवस्तु देण्यात आली.

याशिवाय स्पर्धेतील तीनही विभागातील प्रथम दोन क्रमांकप्राप्त स्पर्धकांना शहरातील सोनी पैठणी व धडपड मंच यांच्या वतीने पैठणी,तर धडपड मंचतर्फे सर्व विजेत्यांना सुंदर उपयुक्त भेटवस्तु तसेच आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रभाकर झळके यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डासांचा ‘मुक्त’ विहार

$
0
0

मटा मालिका

उद्यानांचे तीनतेरा भाग ४

--

डासांचा ‘मुक्त’ विहार

नाशिक : शहरातील नादुरुस्त उद्यानांमुळे लहान मुलांना खेळण्यासाठीदेखील जागा राहिलेली नाही. तुटलेली खेळणी, उद्यानातच कचऱ्याचे साम्राज्य, वाढलेले गवत अशी परिस्थिती शहरातील अनेक उद्यानांमध्ये सातत्याने दिसून येत असली, तरी त्यावर पुरेसे काम केले जात नसल्याचे समोर येते. गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यान शहरातील इतर काही उद्यानांच्या तुलनेत अपवाद ठरत असले, तरी येथे वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे व अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे या उद्यानात येणाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

गंगापूररोडवर प्रमोद महाजन हे उद्यान सन २००४-०५ मध्ये निर्माण करण्यात आले. शहरातून या ठिकाणी येणे-जाणे सुकर असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी असते. नाशिककरांची येथे येण्यास वाढती पसंती असल्याने देखभालीतही हे उद्यान इतर उद्यानांच्या तुलनेत उजवे ठेवले गेले आहे. या उद्यानात घसरगुंडी, झोके आदी खेळणी, हत्ती, जिराफ, चित्ता, गेंडा अशा विविध प्राण्यांची सोळा शिल्पे बसविण्यात आली आहेत. उद्यानातील ८७ विविध प्रजातींची मोठी झाडे लावण्यात आली आहेत. ८७ विविध प्रजातींची मोठी झाडेही येथे लावण्यात आलेली असून, त्यांची देखभाल करण्यात आली आहे. मात्र, येथे तयार करण्यात आलेले लॉन्स गवताप्रमाणे फोफावत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे मत येथे आलेले नागरिक व्यक्त करीत आहेत. काही कालावधीपूर्वी उद्यानात एलईडी लाइट्स बसविण्यात आले होते. मात्र, सध्या उद्यानातील प्रकाशव्यवस्था पुरेशी नसल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारीही अनेकांकडून केल्या जात आहेत.

--

कारंजाची झालीय दुरवस्था

शहरातील ज्या-ज्या उद्यानांमध्ये कारंजे बसविण्यात आले होते, त्यातील जवळपास सर्वच उद्यानांमधील कारंजे हे एक तर बंद पडलेले आहेत किंवा नादुरुस्त अवस्थेत आहेत. देखभालीसाठी अपुऱ्या सोयींमुळे कारंज्यांची ही स्थिती झालेली आहे. प्रमोद महाजन उद्यानदेखील त्याला अपवाद नाही. येथील दोन्ही कारंजे नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे या उद्यानाला काहीशी अवकळा प्राप्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर्भात उपाययोजना करण्याची अपेक्षादेखील व्यक्त केली जात आहे.

--

उद्यानात आल्यावर डासांची एक मोठी समस्या जाणवते. यामुळे येथे सातत्याने स्वच्छता केली जाणे आवश्यक आहे. बाकी उद्यानाची देखभाल चांगल्या पद्धतीने केली आहे. मात्र, त्यात सातत्य असायला हवे.

-सुनंदा देसले

..

सुटी असल्यावर या उद्यानात आवर्जून येतो. येथे भरपूर खेळणी आहेत. मात्र, अजून वेगवेगळी खेळणी असावीत, असे वाटते. बंद कारंजेदेखील सुरू करण्याची गरज आहे.

-संकर्षण नाकील, विद्यार्थी

--

देखभालीअभावी कारंजे बंद आहेत. त्यातील काही फीचर्सची सातत्याने देखभाल करणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे ते नादुरुस्त असल्याचे दिसतात. उद्यानाच्या सुरक्षेसाठी येथे दोन सुरक्षारक्षक कार्यरत आहेत.

-राजेंद्र पांडे, उद्यान निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी ऑफिसेस चालणार सौर ऊर्जेवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत कंपनीने मंजूर केलेल्या कामांची तयारी अंतिम टप्प्यात असून, महत्त्वपूर्ण कामांच्या निविदा नोव्हेंबरमध्ये काढल्या जाणार आहेत. डिसेंबरपासून स्मार्ट सिटीतल्या महत्त्वाकांक्षी गोदा प्रोजेक्टलाही चालना दिली जाणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ प्रकाश थव‌िल यांनी दिली. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील महत्त्वाची कार्यालये, इमारती आणि रुग्णालयांमध्ये सोलर पॅनल सिस्ट‌िम्स बसवली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

स्मार्ट सिटीअंतर्गत आतापर्यंत अनेक प्रोजेक्टसना मान्यता देण्यात आली आहे. त्यांची अंमलबजावणी अंत‌िम टप्प्यात आहे. स्मार्ट रिंगरोड, गोदा प्रोजेक्ट, ब्युट‌िफिकेशन, सायकल ट्रॅक, फाऊंटन, होळकर पुलावर हायड्रोलिक दरवाजे, पूल, काल‌िदास कलामंद‌िर नूतनीकरण, नेहरू उद्यान यासारख्या प्रोजेक्टसचा समावेश आहे. काल‌िदास कला मंद‌िराचे काम सुरू असून, उर्वरित प्रोजेक्टच्या निविदा अंत‌िम टप्प्यात आहेत. नोव्हेंबरपासून निविदा काढल्या जाणार असून, डिसेंबरपर्यंत काम सुरू होणे अपेक्षित आहे. सोबतच महाकवी काल‌िदास कलामंद‌िर, महात्मा फुले कलादालन, ज्ञानेश्वर अभ्यासिका, पंचवटी विभागीय कार्यालय, डॉ. जाकीर हुसेन हॉस्प‌िटल, इंद‌िरा गांधी हॉस्प‌िटल्सवर सोलर पॅनल सिस्ट‌िम बसवली जाणार आहे. सध्या या कार्यालयांना महावितरणची वीज पुरवली जाते. परंतु, स्मार्ट सिटीअंतर्गत ही सगळी कार्यालये व इमारती या सोलरवर चालणार आहे. त्याच्या निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती थव‌िल यांनी दिली आहे.

गोदाप्रोजेक्ट डिसेंबरमध्ये

स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदीचे सुशोभिकरण आणि प्रदूषणमुक्तीसाठी ५१५ कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. या आराखड्याचे कामही डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या आराखड्यात गोदावरी नदीचे सौंदर्यिकरण केले जाणार असून, प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे या प्रोजेक्टमधील काही कामांच्या निविदाही अंतिम टप्प्यात असल्याचे थव‌िल यांनी सांग‌ितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

$
0
0

राज्य सरकारचे विभागीय आयुक्तांना आदेश

म. टा. प्रत‌नििधी, नाशिक

ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचे अहवाल तातडीने सादर करा, असे आदेश राज्य सरकारने विभागीय आयुक्तांना दिले आहेत. इतक्या उशिराने आदेश निघाल्यामुळे पंचनाम्यांमधून नुकसानीचे नेमके चित्र समोर येणार का? असा सवाल उपस्थ‌ति होऊ लागला आहे.

कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. त्यातच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त केली. राज्यभर या परतीच्या पावसाने शेतपिकांचे नुकसान केले असून, त्याचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. एकट्या नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील ६६२ गावांमधील ४८ हजार ९८४ शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या पिकांचे १२ हजार ८८८ हेक्टर तर बागायती क्षेत्रातील कांदा, ऊस व भाजीपाल्याचे २६३९.६४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. द्राक्षबागांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. १० हजार २७४ हेक्टरवरील द्राक्षांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर पाहणी पूर्ण केली आहे. परंतु, सरकारचे निर्देश नसल्यामुळे पीक पंचनामे करण्यात आले नाहीत. मात्र अवकाळी होऊन दोन आठवडे उलटल्यानंतर सरकारने पंचनाम्याचे आदेश दिल्याने उशिरा का होईना यंत्रणा कामाला लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला सराफाचे अपहरण?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या देवी चौकातील राहुल बंडोपंत शहाणे या तरुण सराफ व्यावसायिकाचे अपहरण झाल्याच्या संशयाने खळबळ उडाली आहे. हैदराबादचे पोलिस असल्याचे सांगून आज दुपारी साडेबाराच्या सुमारास या सराफाला नेण्यात आले. मात्र, हैदराबाद पोलिसांशी नाशिकरोड पोलिसांनी संपर्क साधला असता, त्यांनी असे कोणतेही पथक नाशिकला पाठवले नसल्याचे स्पष्ट केल्याने या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे.

राहुल बंडोपंत शहाणे (वय ३२, इंदुमती सोसायटी, जैन भवनसमोर, नाशिकरोड) यांचे देवी चौकात धनश्री ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दुकानात असताना त्यांना फोन आला. दुकानाबाहेर या, असे त्यांना सांगण्यात आले. आम्ही हैदराबादचे पोलिस असून, तुम्ही चोरीचे सोने विकत घेतल्याने आमच्याबरोबर यावे लागेल, असे सांगून शहाणे यांना जबरदस्तीने बोलेरो गाडीत बसविण्यात आले. गाडीत एकूण पाच जण होते. गाडीचा पूर्ण नंबर मिळाला नसला तरी ही गाडी ‘एमएच १७’ क्रमांकाची असल्याचे सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फूटेजआधारे तपास केला जात असून, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोडचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक रात्री उशिरा हैदराबादला रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, नाशिकरोड सराफ असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नाशिकरोडला सराफाला लुटण्याच्या दोन-तीन घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. सराफ दुकान फोडण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे सराफांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

संभ्रमाचे वातावरण

नाशिकरोडचे सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांना या कथित घटनेनंतर तासाभराने राहुल शहाणे यांच्या मोबाइलवरून फोन आला. आम्ही शहाणे यांना हैदराबादला चौकशीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावर ठाकूर यांनी त्यांना नाशिकरोड पोलिसांना नियमानुसार पूर्वसूचना देण्यास सांगितले. मात्र, आम्ही बरेच दूर गेलो असल्याचे सांगून या कथित पोलिसांनी असमर्थता दर्शवली. नंतर नाशिकरोड पोलिसांनी शहाणे यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल स्विचऑफ झाला. त्यानंतर ठाकूर यांनी हैदराबाद पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी असे कोणतेही पथक नाशिकला पाठवले नसल्याचे सांगितल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळे शहाणे यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तांत्रिक अडचणींमुळे रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार किंवा गुन्हा दाखल झाला नव्हता.

सराफांची धाव

ही घटना समजताच नाशिकरोड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद दंडे, राहुल महाले, विक्रम खरोटे, सुनील माळवे, राहुल म्हसे, कैलास शहाणे, गिरीश नवले, सागर कुलथे आदींसह पदाधिकारी नाशिकरोड पोलिस ठाण्यात जमा झाले. मोहन ठाकूर व पंढरीनाथ ढोकणे यांची भेट घेऊन त्वरित कार्यवाहीची व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री चर्चेअंती नाशिकरोड पोलिसांचे एक पथक व असोसिएशनचे काही पदाधिकाऱ्यांनी हैदराबाद येथे जाण्याचे निश्चित केले आहे. हैदराबाद पोलिसांनी शहाणे यांना खरोखरच चौकशीसाठी नेले असेल तर गुन्हा दाखल करता येणार नाही. मात्र, पोलिस तोतया असल्याचे निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन पोलिसांनी सराफ असोसिएशनला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुगुणी किवी फळाला पसंती

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

नाशिकनगरीला आता गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, या कालावधीत उपलब्ध होणाऱ्या फळांची आवकदेखील शहरातील फळांच्या बाजारपेठेत होताना दिसत आहे. अशाच एका बहुगुणी किवी या फळाची आवक व मागणी वाढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ३० रुपयांना छोटे फळ, ५० रुपयांना मोठे फळ, तर १२० रुपयांना छोट्या चार, तर मोठ्या तीन फळांचे छोटे बॉक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

किवी (अ‍ॅक्टिनिडिया डेलिसिओसा) हे फळ दिसायला चीकू सारखे असून, ‘हिटॅमिन सी’ने ते परिपूर्ण असल्याचे मानले जाते. याशिवाय त्यात ई जीवनसत्व, तसेच फॉलिक अॅसिड, पोटॅशियम आदींचे प्रमाणही भरपूर असते. शरीराला आवश्यक असणारी ‘अँटिऑक्सिडंट्स’देखील त्यात भरपूर प्रमाणात असतात. इटलीमध्ये केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे, की किवी या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्याने आयुष्य वाढते. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोतही मानले जाते. किवी फळात सर्व उपयुक्त तत्त्वे आहेत, ज्यांची शरीराला गरज असते. यात ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण अधिक असल्याने अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत मिळते. सोबतच डिप्रेशनची समस्याही दूर ठेवतो. हृदयरोगापासून दूर ठेवण्यासह ब्लड-शुगर नियंत्रणात राहण्यासही ते मदतकारक ठरते.

या फळाचा आतला भाग जितका गुणकारी आहे तितकेच त्याचे सालसुद्धा खूप गुणकारी आहेत. हे फळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयुक्त मानले जाते. एका किवी फळामध्ये दोन नारळांच्या पाण्याइतकी क्षमता असून, दिवसभर शरीरात स्फूर्ती कायम ठेवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्याच्या सेवनाने दिवसभरातील थकवा पळून जातो. कोलिंस, होर्स्का आणि हॉटेन या संस्थांनी केलेल्या संशोधानुसार किवी फळ ऑक्सिडेटिव्ह डॅमेज व कॅन्सरसारख्या आजारांमध्येही दिलासा देत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. याशिवाय शरीरातील रक्ताची कमतरताही हे बहुगुणी फळ पूर्ण करते.

--

भारतातही होतेय उत्पादन

किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. चीनमध्ये याला राष्ट्रीय फळ म्हणून संबोधले जाते. याला चायनीज गुजबेरी असेही म्हणत. समशीतोष्ण हवामानात या झाडाची वाढ चांगल्या तऱ्हेने होते. चीन आणि न्यूझीलँड या देशांप्रमाणे आता भारतातील हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्कीम, ओडिशा, उत्तर प्रदेश, मेघालयसह नीलगिरी पर्वतरांगांच्या प्रदेशात किवीचे उत्पादन घेतले जाते.

--

किवी हे फळ बहुगुणी असल्याने हृदयरोग, मधुमेह व डोळ्याच्या विकारांसाठी उपयुक्त आहे. रक्तदाब संतुलित करण्यातही याचा उपयोग होताना दिसतो.

-डॉ. बी. आर. पाटील, फॅमिली फिजिशियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णालयाचा वाद विकोपाला!

$
0
0

भाभानगरमधील महिला रुग्णालयाला विरोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्‍थीनंतरही भाभानगरमधील शंभर खाटांच्या ‌महिला रुग्णालयाच्या जागेचा वाद मिटलेला नाही. आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते यांच्यातील राजकीय वर्चस्ववादातून पुन्हा रुग्णालयाच्या जागेचा वाद उफाळून आला असून, गितेंनी थेट बंडाचा पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. भाभानगरमधील जागेसंदर्भात महासभेचा ठराव शासनाला गेला असतानाच उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यासह स्थानिकांनी या जागेला थेट विरोध केला आहे. सदरील जागेवर रुग्णालय होऊ देणार नाही, असा थेट पवित्राही घेतला आहे.

शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या जागेचा वाद गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. आता या वादाने राजकीय स्वरूप घेतले असून, रुग्णालयावरून गिते आणि फरांदे यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. आमदार फरांदे या रुग्णालय भाभानगरमध्येच होण्यासाठी आग्रही असून, गितेंचा मात्र त्याला तीव्र विरोध आहे. यावरून दोन वर्षे संघर्ष चालल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फरांदेच्या बाजूने कौल दिला होता. त्याबाबतचा ठराव करून तो शासनाला पाठविण्यात आला. त्यामुळे रुग्णालयाचा वाद शमला असल्याची चर्चा असतानाच गुरुवारी स्थानिक नागरिकांनी या रुग्णालयाच्या जागेला विरोध सुरू केला. त्यासाठी त्यांनी सह्यांची मोहीम राबवली असून, शुक्रवारी उपमहापौर गिते यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत धडक दिली. उपमहापौर व स्थानिकांनी आयुक्त, महापौर व विरोधी पक्षनेत्यांना निवेदन देऊन सदरील जागेला विरोध दर्शवला. सदरील जागा ही रुग्णालयासाठी योग्य नसल्याचे सांगत इथे रुग्णालय होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. महापालिकेने या ठिकाणी रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. उपमहापौर गितेंच्या नेतृत्वात स्थानिकांनी रामायणवर जाऊन महापौरांची भेट घेतली. स्थानिकांनी यावेळी रुग्णालयाला विरोध करीत मुख्यमंत्र्यांपर्यंत सदरील नागरिकांच्या भावना पोहोचविण्याची विनंती केली. तुमच्या मागणीचा विचार करू असे सांगून महापौर रंजना भानसी यांनी स्थानिकांना शांत केले.

गितेंचे बंडाचे निशाण?

रुग्णालयाच्या वादात पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांनी आमदार फरांदेंच्या बाजूने कौल दिल्याने वसंत गिते काहीसे नाराज झाले आहेत. गितेंनी याबाबत मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली असून, त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. परंतु, तरीही वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने गिते नाराज झाले आहेत. स्थानिक नागरिक हे रुग्णालयाच्या विरोधात आहेत. त्यामुळे गितेंना स्थानिकांच्या दबावानंतर थेट रस्त्यावर यावे लागणार आहे. त्याची झलक शुक्रवारी बघायला मिळाली असून, उपमहापौर प्रथमेश गितेंनी थेट आमदार फरांदेंच्या विरोधात प्रथमच जाहीर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही विषय न मिटल्याने आणि गिते आक्रमक झाल्याने त्यांच्याकडून बंडाचा झेंडा उभारला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापौरांची कोंडी

शंभर खाटांच्या रुग्णालयावरून भाजपच्याच आजी व माजी आमदारांमधील वादामुळे महापौर रंजना भानसी यांच्यासह भाजपचीही कोंडी झाली आहे. महापौर व पक्षावर दोघांकडून दबाव येत असल्याने व निर्णय होऊनही वाद उफाळल्याने पक्षाची बदनामी होत आहे. या वादाला पक्षातील काही स्थानिक नेत्यांकडून खतपाणी घातले जात असल्याची भावना गिते यांनी व्यक्त केल्याने पक्षाची गोची झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवा-सुविधांअभावी मांगीतुंगीची गेली रया

$
0
0

मटा फोकस

संकलन ः कैलास येवला

--

सेवा-सुविधांअभावी मांगीतुंगीची गेली रया

--

दिगंबर जैन धर्मीयांचे दक्षिण भारतातील समेध शिखर म्हणून परिचित असलेल्या सिद्धक्षेत्र श्री मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्तीचा पंचकल्याण व महामस्तकाभिषेक सोहळा उलटून वर्षपूर्ती झाली आहे. मात्र, अजूनही परिसरासह मांगीतुंगीचा विकास खुंटल्याची स्थिती आहे. देश-विदेशांतून येणाऱ्या भाविकांना पुरेशा सुविधा देण्यासाठी संस्थानकडून विशेष लक्ष देण्यात येत असले, तरीही अपुऱ्या सेवा-सुविधांमुळे बाहेरून येणारे पर्यटक, भाविकांकडून नाराजीची भावना व्यक्त होताना दिसून येत आहे. सोहळ्यावेळी आलेली रया गेल्याची स्थिती येथे उद्भवली अाहे. येथील स्थितीवर टाकलेला फोकस...

--

तेरा वर्षांची मेहनत

बागलाण तालुक्यातील श्री सिद्धक्षेत्र मांगीतुंगी या दिगबंर जैन धर्मीयांच्या पवित्र धार्मिकस्थळी जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव महाराज यांची १०८ फुटी पूर्णाकृती मूर्ती आहे. जगभरात एकाच पाषाणात अखंड मूर्ती असलेले एकमेव ठिकाण म्हणून या तीर्थस्थानाची ओळख आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील मांगी डोंगरावर १०८ फुटांची मूर्ती उभारण्यासाठी तब्बल तेरा वर्षे लागली. येथे भगवान महावीर यांचे मंदिर आहे. जैन धर्मात सिद्धक्षेत्राला अतिशय महत्त्व असते. या ठिकाणाहून असंख्य जैन मुनींनी आजवर तपश्चर्या करून मोक्षप्राप्ती केल्याने देशात मांगीतुंगी धार्मिकदृष्ट्या दुसऱ्या स्थानावर आहे. या ठिकाणी असलेल्या मांगी व तुंगी या दोन्ही डोंगरांवर हजारो वर्षांपूर्वीच्या भगवान महावीर यांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे देशभरातूनच नव्हे, तर देशाबाहेरूनदेखील मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

--

मंदिरे अन् मानस्तंभ

मांगीतुंगी पर्वतराजीच्या कुशीत अन् तुंगाडी नदीच्या किनारी भिलवाड हे आदिवासीबहुल गाव आहे. या गावातच श्री १००८ विश्वहितंकर सातीशय चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर, सहस्रकुट कमल, मानस्तंभ, मुनिसुव्रतनाथ, आदिनाथ आदी मंदिरे एकाच परिसरात विशाल पटांगणावर आहेत. भिलवाड गावात धर्मशाळेच्या पटांगणात मुख्य चार मंदिरे आहेत. पहिले जैन मंदिर भगवान पार्श्वनाथांचे आहे. या मंदिरातच विश्वहितंकर १००८ भगवान पार्श्वनाथांच्या काळ्या पाषाणातील अतिशय मूळ नायक मूर्तीसह इतर ७५ मूर्ती आहेत. दुसऱ्या मंदिरात भगवान आदिनाथ स्थापित आहेत. तिसरे मंदिर भगवान मुनी सुव्रतनाथांचे आहे. या मंदिरात ३१ फूट उंचीची भगवान सुव्रतनाथ यांची शनिग्रह निवारक मूर्ती आहे. भरत, बाहुबली, भगवान पद्सिद्ध, भगवान शांतिनाथ, तसेच इतर २४ तीर्थंकरांच्या खड्गासनातील मूर्ती येथे आहेत. १९९६ मध्ये सहस्रकुंट कमल मंदिर उभारले गेले. या मंदिरासमोरच १९५० मध्ये ४० फूट उंचीचा मानस्तंभ बांधलेला आहे. मात्र, अलीकडच्या काळाचा परिसराचा विकास खुंटल्याची स्थिती आहे.

--

ट्रस्टमधील कलहाचा फटका

भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्ती निर्माणापूर्वी येथील कारभार श्री मांगीतुंगीजी दिगबंर जैन सिद्धक्षेत्र कमिटी या एकाच ट्रस्टच्या माध्यमातून सुरू होता. मात्र, मूर्ती निर्माण करण्यासाठी नव्याने भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण कमिटीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीचे निर्माण होईपर्यंत अर्थात, १३ वर्षे सलोख्याने कारभार सुरू होता. मात्र, महामस्तकाभिषेक सोहळ्यापासूनच या दोन्ही ट्रस्टमध्ये अंतर्गत कलह, वादविवाद सुरू झाले. आर्थिक उत्पन्न वाढू लागल्याने साहजिकच दोन्ही ट्रस्टमध्ये हवेदावे सुरू झाल्याने परिसराचा विकास खुंटल्याचा आरोप पसिरातील ग्रामस्थ व भाविक करू लागले आहेत.

--

४० कोटी निधीनंतरही ओसाड

पवित्र तीर्थस्थानाच्या उत्सवाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने तब्बल ४० कोटी रुपयांचा निधी देऊन कायमस्वरूपी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरीही पंचकल्याण महामस्तकाभिषेक सोहळ्याप्रसंगी नटलेली ही नगरी आज मात्र ओसाड दिसू लागली आहे. मोकळ्या विस्तीर्ण पटांगणावर आता शेती, बागबगीचे दिसत असल्याने हीच ती नटलेली नगरी होती का, असा सवाल आज उपस्थित होत आहे.

--

प्रसादालयाची सुविधा

नवीन कमिटीने आपला स्वतंत्र कारभार राष्ट्रीय महामार्गापासून मांगीतुगी फाट्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील चार एकरच्या विस्तीर्ण जागेवरून सुरू केलेला आहे. या ठिकाणी येताच भाविकांना प्रवेशद्वारवरच नवग्रह शांती जिन मंदिराचे दर्शन होते. यामुळे अत्यंत प्रसन्न व मोहक वातावरण बघावयास मिळते. या ठिकाणी यात्री निवास, भक्त निवासाचे टोलेजंग काम सुरू केलेले आहे. ते पूर्णत्वास येईपर्यंत भाविक, यात्रेकरूंसाठी तात्पुरती पत्र्याची निवासस्थाने उभारलेली आहेत. शेकडो भाविक एकाच वेळी प्रसाद घेऊ शकतील, असे प्रसादालय या ठिकाणी उभारण्यात आले आहे. अवघ्या ५० रुपयांत पोटभर प्रसाद या ठिकाणी देण्यात येतो. त्यामुळे मूळ भिलवाड गावातील पूर्वीचे जैन मंदिर असलेल्या ट्रस्टवर साहजिकच याचा परिणाम झाला आहे.

--

वाहने बंद, लिफ्ट वापराविना

भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्तीपर्यंत जाण्यासाठी महास्तकाभिषेक समारंभापूर्वी थेट मूर्तीच्या पायथ्याजवळ जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा कच्चा रस्ता करण्यात आला होता. त्यामुळे बालगोपाळांसह अबालवृद्धदेखील कमिटीच्या वाहनांद्वारे तेथे जात होते. भाविक व पर्यटकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, महामस्तकाभिषेक सोहळ्यानंतर वन विभागाने आपल्या हद्दीतील राखीव वन असल्याकारणाने सदरचा रस्ता बंद केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे थेट जाणारी वाहने बंद झाली आहेत. परिणामी मूर्तीसह मांगीतुंगीच्या डोंगरावर दर्शनासाठी जैन भाविकांना जाण्यासाठी पायरी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहने बंद करण्यामागील कारणाचा शोध घेतला असता दोन्ही ट्रस्टने भाविकांसाठी स्वतंत्र वाहनांची सोय उपलब्ध केली होती. मात्र, एका ट्रस्टने विरोध दर्शविल्याने वाहन सेवा बंद केल्याचे सांगण्यात येते. ट्रस्टकडून या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार देत वन विभागाकडे बोट केले जात आहे. अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहने जास्त असताना तेथून कमिटीने तयार केलेल्या लिफ्टने दर्शनासाठी थेट नेण्यात येत होते. मात्र, सद्यस्थितीत वाहने जात नसल्याने येथील लिफ्टचा वापर करणेही दुरापास्त झाले आहे. परिणामी लिफ्ट असूनही तिचा उपयोग होताना दिसत नाही.

--

रोजगारसंधी अन् पाठपुरावा

मांगीतुंगीवर जाण्यासाठी तब्बल ४५०० पायऱ्या चढून वर जावे लागत असल्याने साहजिकच वेळेअभावी भाविक व पर्यटक कंटाळा करू लागले आहेत. यामुळे बहुतांश वयोवृद्ध भाविक डोलीचा वापर करून वर जात असतात. चार भाविक डोली तयार करून भाविकांना ऋषभदेवाच्या पायापर्यंत पोहोचवित आहेत. यामुळे स्थानिक आदिवासींना रोजगार मिळाला असला, तरीही कमिटीची वाहने सुरू असताना या डोली वाहकांनी बराच गोंधळ घातल्याने तेव्हाही कमिटीला नमते घ्यावे लागले होते. येथील महिलावर्गानेही परिसरातील फळविक्रीतून रोजगार शोधला आहे. सीझनप्रमाणे फळविक्रीतून त्या उदरनिर्वाह करीत असतात. या ठिकाणी रोजगाराला मोठा वाव असला, तरीही परिसराचा कायापालट झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास होणे शक्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामस्तकाभिषेक सोहळ्याप्रसंगी परिसर विकासासाठी तब्बल २५० कोटी रुपयांचा विकास कृती आराखडा घोषित केला आहे. परिसरात अनेक पर्यटनस्थळेदेखील आहेत. त्यात साल्हेर, मुल्हेर, श्री क्षेत्र अंतापूर, गुजारतमधील सापुतारा आदींचा समावेश आहे. त्यामुळे येथील पर्यटनाच्या दृष्टीने पाठपुरावा होणे गरजेचे आहे.

--

बससेवा, विजेचा अभाव

येथे भाविकांना येण्या-जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून बसेस उपलब्ध होत नसल्याचीही तक्रार आहे. ग्रामस्थांनासाठीही दोनच एसटी बसेस असून, दिवसभर खासगी वाहनानांनी ये-जा करावी लागत आहे. ताहाराबादसह दहा गावे वीज वितरण कंपनीने मांगीतुंगीसाठी जोडल्याने विजेचा गंभीर प्रश्न अनेक वेळा या ठिकाणी उपस्थित होत असतो. हा परिसर ग्रामीण भागात मोडत असल्याने भारनियमन कालावधीत १२-१२ तास वीज नसल्याने या ठिकाणी भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.

--

मांगीतुंगी देवस्थानासाठी जैन बांधवाकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या देण्यात येत असून, त्यांचा उपयोग देवस्थान परिसर विकासासाठी करावयास पाहिजे. मात्र, हा निधी इतरत्र देवस्थान विकासासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. परिणामी महामस्तकाभिषेक सोहळ्यानंतर अपेक्षित विकास खुंटला आहे.

-शिवाजी पवार, ग्रामस्थ, भिलवाड

--

येथील मूर्ती बघण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना थेट घेऊन जाणारी वाहनसेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे बहुतांश भाविकांना मनस्ताप होत आहे. यासाठी वन विभागाने तातडीने रस्ता पूर्ववत सुरू केल्यास भाविकांचा आनंद द्विगुणित होण्यास मदत होईल.

-राजेंद्र जैन, भाविक, कर्नाटक

--

मांगीतुंगी परिसरात भाविक, पर्यटकांची वर्दळ आहे. त्यामुळे लहान-मोठे व्यवसाय तग धरून आहेत. मूर्ती निर्माणानंतर भाविकांचा राबता वाढेल व परिसरातील आदिवासी बांधवाच्या उदरनिर्वाहाला मोठा हातभार लागेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. विकास नसल्याने मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकलेली नाही.

-किरण जाधव, स्थानिक व्यावसायिक

--

येथील दोन्ही ट्रस्टमधील वाद विकोपाला गेलेला आहे. वाद मिटविण्यासाठी लवकरच ग्रामस्थांच्या वतीने पुढाकार घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. वाद मिटल्यास निश्चितपणे देवस्थान व परिसर विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगारसंधीदेखील उपलब्ध होणार आहे.

-मुरलीधर पवार, सरपंच, भिलवाड

--

श्री मांगीतुंगीजी दिगबंर जैन सिद्धक्षेत्र कमिटीतर्फे पूर्वीचे भक्त निवास पाडण्यात आले आहेत. भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माणानंतर भाविकांचा राबता या परिसरात वाढल्याने यात्रेकरूंसाठी ६० भक्त निवास नव्याने बांधण्यात येत असून, ते अत्यंत सुसज्ज व अद्ययावत असणार आहेत.

-सूरजमल जैन, श्री मांगीतुंगीजी दिगबंर जैन सिद्धक्षेत्र कमिटी

--

भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण कमिटीतर्फे नव्याने चार एकर जागेत भव्य भक्त निवास, यात्री निवास उभारण्यात येत आहे. पार्किंगचे काम प्रगतिपथावर असून, या देवस्थान परिसरात भाविकांसाठी मिनी रिसॉर्ट निर्माण करण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे.

-विशालभाई जैन, व्यवस्थापक, भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण कमिटी

--

बागलाण मतदारसंघातील श्री सिद्धक्षेत्र मांगीतुंगी परिसरात तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन क्षेत्र विकास झाल्यास या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये निधी द्यावा याकरिता आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीपर्यंत वन विभागाने केलेल्या वाहनबंदीबाबत समन्वयातून मार्ग काढणार आहोत.

-दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू विक्रीला विरोध

$
0
0

सायखेड्यात नागरिकांचे उपोषण

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील भेंडाळी, करंजगाव, तळवाडे, महाजनपूर या गावात राजरोसपणे अवैध दारूविक्री सुरू आहे. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे धंदे सुरू असल्याने सायखेडा पोलिसांनी कठोर कारवाई करावी. तसेच दारू विक्रेत्यांना पाठीशी घालू नये, यासाठी गोदाकाठचे सर्व पदाधिकारी, महिला आणि नागरिकांनी गुरुवारी (दि. २६) पोलिस स्टेशनसमोर उपोषण केले. आमदार अनिल कदम यांच्या मध्यस्थीने आणि पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी दिलेल्या कठोर कारवाईच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे.

सायखेडा परिसरात अनेक वर्षांपासून अवैध दारूविक्री सुरू आहे. भेंडाळीचे सरपंच गोरख खालकर यांनी दिवाळीच्या दिवशी घरात जाऊन दारूचा साठा पकडला त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, असे यावेळी सांगण्यात आले. यासंदर्भात सायखेडा पोलिसांना निवेदन दिले, मात्र पोलिसांनी कार्यवाही केली असली तरी विक्रेते सरावलेले असल्याने धंदे बंद होत नसल्यामुळे सर्व गावातील आजी-माजी सरपंच, सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला यांनी गुरुवारी बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. अखेर कारवाईच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

तत्काळ कारवाईचे निर्देश

या उपोषणास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांनी अवैध दारूविक्रीमुळे आपले संसार उद्ध्वस्त झाल्याच्या व्यथा पोलिस निरीक्षक अंबादास मोरे व आमदार अनिल कदम यांच्यासमोर मांडल्या. त्यावर आमदार कदम यांच्या गोदाकाठच्या अवैध धंद्यासंदर्भात अंबादास मोरे यांना जाब विचारत फैलावर घेतले व तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी उपोषणास जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, पंचायत समिती सदस्य कमल राजोळे, सोनाली चारोस्कर, शंकर संगमनेरे, सोपानराव खालकर, करंजगावच्या सरपंच मनीषा राजोळे, तळवाडेच्या सरपंच लता सांगळे, महाजनपूरच्या सरपंच आशा फड, औरंगपूरच्या सरपंच गायत्रीताई शिंदे, भूसेचे सरपंच ज्ञानेश्वर पोटे, सायखेड्याचे शरद कुटे, अश्पाक शेख, माजी सरपंच खंडू बोडके, नंदू राजोळे, जितेंद्र शिंदे, दशरथ खालकर आदींसह गोदाकाठचे नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून करून मृतदेह टाकला पाण्याच्या टाकीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोड येथील मार्केट यार्डच्या पाण्याच्या टाकीत युवकाचा मृतदेह आढळल्याने पंचवटी परिसरात खळबळ उडाली. हा युवक आठ दिवसांपूर्वी हरवला असल्याची पंचवटी पोल‌िस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली होती. त्याची हत्या झाल्याचे शुक्रवारी (दि. २७) उघडकीस आले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून, अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.

दशरथ बाळू ठमके (वय २७, रा. फुलेनगर, पेठरोड) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. दशरथ ठमके हरवला असल्याची नोंद भाऊ संतोष ठमके याने शनिवारी (दि. २१ )रोजी पंचवटी पोल‌िस स्टेशनमध्ये केली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गणेश वसंत गरड (२१, रा. नागचौक, पंचवटी) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दशरथ ठमके याच्या पत्नीबरोबर गणेशचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच गणेशने दशरथचा खून केल्याचे कबूल केले व त्याचा मृतदेह पेठरोडवरील पाण्याच्या टाकीत टाकून दिला असल्याचे सांगितले.

यानुसार पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २७) पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डमधील डाळिंब विभागाच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली असता, ठमके याचा मृतदेह आढळला. या प्रकरणी गणेशचे साथीदार राहुल उर्फ भुऱ्या भाऊराव लीलके (१८), उमेश डॅनियल खंदारे (२२), शाम मधुकर बागूल (३१, सर्व राहणार अवधूत वाडी, पंचवटी) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळी पंचवटी पोल‌िस ठाण्याचे वरिष्ठ पोल‌िस निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोल‌िस निरीक्षक (गुन्हे) आनंद वाघ, सहायक पोल‌िस निरीक्षक महेश इंगोले यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे पोल‌िस कर्मचारी उपस्थित होते. पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

हत्या झालेला सराईत

दरम्यान, या घटनेत हत्या करण्यात आलेला दशरथ ठमके सराईत गुन्हेगार असून, पोल‌िस ठाण्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अनैतिक संबंधातून दशरथचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी पंचवटी पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी पंचवटी पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोल‌िस उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.

ती टाकी वापराच्या पाण्याची

दशरथ ठमके याचा मृतदेह ज्या पाण्याच्या टाकीत आढळला, त्या टाकीतील पाणी पिण्यासाठी वापराचे नव्हते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र मार्केटमधील या ५ लाख लिटर क्षमतेच्या टाकीतील पाणी टॉयलेट, बाथरूम आणि इतर स्वच्छतेसाठी वापरण्यात येते. पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टाकीची व्यवस्था आहे. तरीही स्वच्छतेसाठी का होईना, पण अशा दूष‌ित पाण्याचा वापर झाला असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जलकुंभांची सुरक्षा ऐरणीवर

शहर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी, याविषयी महापालिकेत ठराव करण्यात आलेला आहे. पाण्याच्या टाक्यांच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमावेत, याविषयीचा ठराव मंजूर झाल्यानंतरही अद्याप असे सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले नाहीत. पेठरोडला पाण्याच्या टाकीत मृतदेह टाकण्याची घटना घडल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नागरिकांच्या आरोग्यला धोका निर्माण करू शकतात, हे दिसून आले. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नियमबाह्य विषयांवरून मनसेची भाजपशी फारकत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भाजपबरोबर असलेल्या मनसेनेही जादा विषय व मागच्या दाराने मंजूर होणाऱ्या विषयांवरून सत्ताधाऱ्यांशी फारकत घेतली आहे. सत्ताधाऱ्यांकडून वारंवार येणारे जादा विषय व मागच्या दरवाजाने मंजूर केल्या जाणाऱ्या विषयांना मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी विरोध केला आहे. महत्त्वाच्या विकासकामांचे तसेच, महत्त्वपूर्ण विषयांचे प्रस्ताव महासभेत येण्यापूर्वी गटनेत्यांना देण्यात यावेत, अशी मागणी शेख यांनी महापौरांकडे केली आहे. तसेच, नियमबाह्य मंजूर केलेल्या विषयांना आपला विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून वारंवार महासभेत जादा विषय आणले जात आहेत. तसेच, महासभेत चर्चा न करताच मागच्या दाराने महत्त्वाच्या विषयांना मंजुरी दिली जात आहे. त्याला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने यापूर्वीच विरोध केला आहे. आता भाजपसोबत असलेली मनसेही विरोधात गेली आहे. २५७ कोटींच्या रस्ते कामांचे विषय मागच्या दाराने मंजूर केल्यानंतर मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी महापौरांना पत्र देऊन जादा विषय व मागच्या दाराने मंजूर होणाऱ्या विषयांवरून फारकत घेतली आहे. प्रस्तावातील रस्त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्वेच्छानिवृत्तीला विरोध

महापालिकेत अधिकाऱ्यांकडून स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दाखल केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीला आणि वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदलीला गटनेते शेख यांनी विरोध केला आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत तक्रारी असल्याने अशा अधिकाऱ्यांकडून स्वेच्छा निवृत्तीचे अर्ज दाखल केले जात आहेत. अशा अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देऊ नये तसेच, आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना बदलीही देऊ नये अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी प्रवासी वाहतूक सुसाट

$
0
0

मटा मालिका

ओझर बससेवेची दुर्दशा

भाग ३

-----

खासगी प्रवासी वाहतूक सुसाट



म. टा. वृत्तसेवा, ओझर

ओझर परिसरात परिवहन महामंडळाच्या एसटी बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे खासगी प्रवासी वाहतूक सुसाट झाली आहे. ओझर येथे बाहेरगावच्या बसेसला थांबा आहे, पण बरेच चालक स्थानकात बस नेत नाहीत. परिणामी एसटी महामंडळाचा तोटा होत असून, खासगी प्रवासी वाहतूक म्हणजेच काळी-पिवळी, टॅक्सीचालकांना फायदा होत आहे. त्यामुळे एसटीच्या बेशिस्त चालकांना शिस्त लावण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ओझर येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे कामदेखील अजूनही पूर्ण होऊ शकलेले नसून, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्ता अरुंद असल्याने बऱ्याचदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. महामार्गावर बसथांब्यासाठी गरजेचे असलेले निवाराशेडदेखील तयार केलेले नाही. त्यामुळे प्रवासीदेखील बऱ्याचदा रस्त्यावर उभे राहूनच बस थांबविण्याचा प्रयत्न करतात. पण, त्यामुळे मोठा अपघात होण्याचीदेखील भीती निर्माण होते.

--

थांब्यांवर प्रवासी, पण बसच नाही!

ओझर येथील सायखेडा चौफुली, ओझर गाव आणि टाउनशिप अशा विविध थांब्यांवर प्रवासी उभे असतात. शिवाय अनेक एसटी बसचालक स्थानकात बस आणत नाहीत. त्यामुळे महामार्गावर प्रवाशांची वर्दळ दिसून येते. बऱ्याचदा लांब पल्ल्याच्या बस न थांबताच निघून जातात. पण, ज्या बसेस थांबतात त्या रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. शिवाय बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याचीदेखील भीती निर्माण होते.

--

अपघातांची टांगती तलवार

महामार्गावरील अनेक चौफुल्या धोकादायक असून, मृत्यूच्या सापळा बनल्या आहेत. येथे रोज छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यात अनेकांना अपंगत्व आलेले आहे, तर अनेकांना जीवदेखील गमावावा लागला आहे. यापूर्वीही बसथांबा परिसरात अनेक अपघात झालेले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून ओझर येथे तात्पुरत्या स्वरूपात बसथांब्यांसह सोयीसाठी निवाराशेड उभारावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

--

वाहतूक कोंडी नित्याचीच

एसटी बसचालक अनेकदा बस स्थानकात आणत नाहीत. बाहेरगावी जाणाऱ्या बस महामार्गावरूनच परस्पर नेतात. नाईलाजाने प्रवासीही रस्त्यावरच बसची वाट पाहत थांबतात. त्यामुळे वर्दळ वाढते, शिवाय प्रवाशांच्या गर्दीच्या ठिकाणी खासगी वाहतूक करणारे थांबतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त लावावी. जेणेकरून प्रवाशांची गर्दी विरळ होईल व अडथळा होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

--

एसटी बसचालक व प्रवासी अशा दोन्ही घटकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पण, बऱ्याचदा चालक मनमानी करतात. शिवाय थेट रस्त्यावर उभे राहावे लागते. खासगी वाहनांशिवाय अन्य पर्याय नाही.

-किरण जाधव, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदाम स्वस्त; काजू महाग!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिवाळा आला की घराघरात डिंक व आळीवाचे लाडू करण्याची लगबग सुरू होते. थंडीची चाहूल लागल्याने शहरातील दुकाने सुकामेव्यांनी भरली असून खारीक, खोबरे, आळीव, डिंक, गोडांबी, गायीचे तुप, खसखस, जायफळ, वेलची, काजू-बदाम, अंजीर, आक्रोड यांची मागणी वाढू लागली आहे. यंदा आवक वाढल्याने बदाम स्वस्त झाले आहेत, तर ऐरवी कमी दर असलेले काजू महागले आहेत.

थंडीच्या आगमनाने खवैय्यांनी व खास तब्बेत बनविणाऱ्यांनी बाजारात खरेदीला सुरुवात केली आहे. घराघरात डिंकाचे लाडू, आ‌ळीवाचे लाडू, तिळाची चिक्की, शेगदाणा चिक्की, अंजीर बर्फी, गुळपोळी यांना लागणाऱ्या वस्तुंची खरेदी जोमाने सुरू आहे. डिंकाच्या लाडूसाठी लागणाऱ्या वस्तूत खारीक, खोबरे, डिंक, मेथी, गोडांबी, खसखस काजू-बदाम, पिस्ते गूळ याची खरेदी प्रामुख्याने होत आहे. यावर्षी वस्तूंच्या दरात वाढ झाली असली तरी लोकांमध्ये खरेदीचा उत्साह असल्याचे विक्रत्यांचे म्हणणे आहे. तिळाचा भाव ८० रुपये ते १४० रुपये किलो आहे. तिळाच्या चिक्कीसाठी गायीच्या तुपाचा जास्त प्रमाणात वापर होते. गायीचे तुप ५५० रुपये किलो भावाने विकले जात आहे. शेंगदाण्याची चिक्कीही घराघरात केली जात आहे. शेंगदाणा दरात गतवर्षापेक्षा वाढ झाली आहे.

गत वर्षापेक्षा यावर्षी बदाम स्वस्त झाले आहेत, तर काजू महागले आहेत. बदामाचे उत्पादन झास्त झाल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे भावात घसरण झाली आहे. भाव कमी असल्याने लोकांचा खरेदीची जोर चांगला आहे.

- विजय भिंगे, विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानी चौकात पन्नास डेंग्यूसदृश रुग्ण!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको प्रभाग सभापतींच्या घरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने परिसरात स्वच्छता मोहीम राबविली असली, तरी सध्या सिडकोतील चौकाचौकांत डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत असल्याचे दिसत आहे. तुळजाभवानी चौकात सुमारे पन्नास रुग्ण असल्याचे आढळून आले असल्याचा आरोप होत असून, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती उद््भवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिडकोतील आरोग्य विभाग चांगलाच वादात सापडला आहे. स्वच्छता सुरू असल्याचे सांगत केवळ जनतेच्या व नगरसेवकांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या अधिकाऱ्यांना आता तरी जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिडकोतील प्रभाग सभापतींच्या मुलीला डेंग्यू झाल्याचे समजल्यावर आरोग्य विभागाने काही भागात देखाव्यासाठी स्वच्छता मोहीम राबविली होती. त्यावेळी तर चक्‍क एका ठिकाणी मृतदेहच सापडला होता. एवढी अवघड परिस्थिती सिडको परिसरात असतानाही आरेाग्य विभागाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे. सिडकोत कोठेही धूर फवारणी होत नसल्याने सध्या सिडकोवासीयांचे आरोग्य धोक्यातच आले आहे. डेंग्यूसंदर्भात शिवसेनेच्या नगरसेवकांनी जनजागृती केल्यानंतर नागरिकांनी काही खबरदारी घेतली असली, तरी सत्ताधारी भाजप व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शुक्रवारी सिडकोतील तुळजाभवानी चौकात नगरसेविका कल्पना पांडे यांनी भेट दिली असता या ठिकाणी किमान पन्नास डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. सिडकोतील एका चौकात जर पन्नाच्या आसपास रुग्ण आहेत, तर संपूर्ण सिडकोत किती असतील, याचा प्रशासनाने विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

--

नालेसफाईकडे सर्रास कानाडोळा

सिडको भागात कोठेही नियमित साफसफाई होत नसून, सिडकोतील नाल्यांकडे कधी आरोग्य विभाग बघतच नसल्याचे नागरिकांनी सांगितले. बांधकाम विभागाकडून वर्षातून एकदाच नालेसफाई होत असून, आरोग्य विभागाकडून ना नालेसफाई होते ना पावसाळी गटारी साफ केल्या जातात. आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील नागरिकांचे आरेाग्य धोक्यात आले आहे. आता तरी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा दरावरून रास्ता रोको

$
0
0

कळवणला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे बसस्थानकासमोर आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, कळवण

भाजप सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी कळवण बसस्थानकासमोर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच, भाजप सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आंदोलनकर्त्यांनी दहन करीत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

तीन ते चार वर्षांपासून दुष्काळ व सततच्या नापिकीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे चालू वर्षी कांदे कमी असून, थोडेफार भाव मिळू लागले होते. कांद्याला ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळत होता. मात्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व्यापारीवर्गावर दबाव आणून कांदा बाजारभाव पाडण्याचे षडयंत्र प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये शेतकरीराजा भरडला जात आहे. ज्यावेळी कांदा ३०० ते ५०० रुपयांनी विकला जातो, त्यावेळी शासन कुठे जाते, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी यावेळी उप‌स्थित केला.

तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश पवार, छावाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार, दारूबंदी संघटनेचे जिल्हाध्यक्ष टिनू पगार, अमोल पगार, प्रवीण रौंदळ, अमित देवरे, दीपक वाघ, शिवसेना तालुकाध्यक्ष जितेंद्र वाघ, संभाजी पवार, सुनील पगार, रत्नाकर गांगुर्डे, संजय रौंदळ, बंडू पगार, ललित आहेर, पप्पू पवार, रामा पाटील, पंकज पाचपिंडे आदी शेतकरी उपस्थित होते.

खड्डे बुजविण्याची मागणी

कळवण तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याची पूर्णतः चाळण झाली असून, तत्काळ खड्डे बुजविण्याचे काम शासनाने हाती घ्यावे, अशी मागणीही mयावेळी करण्यात आली. तसेच, महावितरण कंपनीने वसुली थांबवावी, या मागणीसाठीही आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images