Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच परिचारिका निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी येथील फुलेनगर भागात असलेल्या मायको दवाखान्यात महिलेची दवाखान्याबाहेर प्रसुती झाल्यानंतर प्रशासनाने दोषीवर कारवाई केली असून पाच परिचारिका व एक वैद्यकीय अधिकारी यांना निलंब‌ित करण्यात आले आहे. दोन सुरक्षारक्षकांनाही बडतर्फ करण्यात आले असल्याची माह‌िती आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.

सोमवारी झालेल्या घटनेनंतर वद्यकीय अधिकारी आरती चिरमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल तयार करण्यात आला. त्यावर चर्चा होऊन मंगळवारी दोषींवर कारवाई करण्यात आली. चिरमाडे यांनी डॉ. विजय डेकाटे यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, एक महिला प्रसुतीसाठी सकाळी ११.३० वाजता मायको दवाखान्यात आली. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या परिचारिका सरला रुपवते यांनी त‌िची तपासणी केली व जास्त पोट दुखल्यावर ये, असे सांगून महिलेला परत पाठवण्यात आले. त्यानंतर दुपारी २ वाजता ती महिला पुन्हा पोट दुखत असल्याने दवाखान्यात आली. त्यावेळी दवाखान्यात कोणताही कर्मचारी हजर नव्हता, तर या दवाखान्यात असलेले दोन सुरक्षारक्षक गच्चीवर पतंग उडवत होते. यावेळी ड्युटीवर असलेल्या परिचारिका सरला रुपवते व मनिषा शिंदे या आपली ड्युटी संपण्याच्या आधी व नंतर येणाऱ्या परिचारिका श्रीमती ठाकूर यांना पदभार न देता परस्पर निघून गेल्या. परिचारिका ठाकूर यासुध्दा दोन वाजता येण्याच्या ऐवजी सव्वातीनला दवाखान्यात आल्या. तसेच या ठिकाणी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणे हे आपल्या वरिष्ठांना न सांगता कामावर गैरहजर होते. हा सर्व प्रकार घडत असताना आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी दाखल झाले व दवाखान्याच्या बाहेरच असलेल्या एका रिक्षात दवाखान्यातील आया श्रीमती देसले यांच्या देखरेखीखाली प्रसुती करण्यात आली. झालेला प्रकार गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणे, परिचारिका बी. जी. कोठारी, परिचारिका ए. के. देशमुख, सरला रुपवते, मनीषा शिंदे, एम. एम. ठाकूर यांना निलंब‌ित करण्यात आले असून, दोन सुरक्षा रक्षकांना बडतर्फ करण्यात आले आहे.

तक्रारीची दखल नाही

या दवाखान्यात असे प्रकार वारंवार घडत असून, कितीही वेळा तक्रार केली तरीही परिस्थिती पहिल्यासारखीच होते, अशी तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार महापालिकेचे कर्मचारी कधीही या ठिकाणी नसतात. पेशंट आल्यावर त्याला खासगी दवाखान्यात जा, असा सल्ला देण्यात येतो. एकाच वेळी सर्व कर्मचारी दवाखान्यात नसणे हा धक्कादायक प्रकार असून, कर्मचारी कुठे गेले होते, याचा तपास करावा असी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांच्या हक्कांसाठी धरणे आंदोलन

$
0
0

धुळ्यात जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिक्षकांना विना अट निवड श्रेणी लागू करावी अशी मागणी असताना सरकार जाचक अटी लावून शिक्षकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आहे. याचा निषेध म्हणून धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने मंगळवारी (दि. २४) माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून संघटनेने शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना निवेदन दिले.

राज्य सरकारने शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करण्याबाबत प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करण्याचा आदेश दि. २३ ऑक्टोबरला जाहीर केला आहे. त्यानुसार २९ जूनपर्यंत प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीकरिता जे शिक्षक पात्र होत असतील अशा शिक्षकांना नवीन स्वरुपाचे प्रशिक्षण दिले जाईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र या निर्णयामुळे असंख्य शिक्षकांवर अन्याय होणार असून, उलट संघटनेने अनेक वर्षांपासून विनाअट निवडश्रेणी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. पण सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष करीत जाचक अटी लावून निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणीपासून शिक्षकांना वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी धुळे जिल्हा ग्रामीण माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील पवार, हेमंत ठाकरे, संजय पवार, सुनील पाटील, आर. बी. अमृतकर, प्रदीप भदाणे, जयवंत साळुंखे, बी. जे. मराठे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संयुक्त समिती ठेवणार भंगार बाजारावर लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनेक वर्षांपासून सातपूर-अंबड-लिंक रोडवर चर्चेत असलेल्या भंगार बाजार हटवल्यानंतर नाशिक महापालिका व पोलिस यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या ठिकाणी दररोज होणाऱ्या घडामोडींवर ही समिती देखरेख ठेवणार आहे.

भंगार बाजार प्रकरणी न्यायालयाने महापालिकेला खडे बोल सुनावल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून असलेला भंगार बाजार महापालिकेने उठवला. त्यावेळी महापालिका व पोलिस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. मात्र काही दिवस सरताच येथील व्यापाऱ्यांनी पुन्हा ठाण मांडले त्यावर महापालिकेने पुन्हा कारवाई केली. यावेळी १५० च्यावर ट्रक सामान जप्त करण्यात आले. शेकडो टन कचरा जमा करण्यात आला. पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून नाशिक महापालिकेच्या वतीने संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीत राजीव गांधी भवन येथील अतिक्रमण अधीक्षक, उपअभियंता बांधकाम विभाग सातपूर विभाग, कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग सातपूर, विभागीय स्वच्छता निरीक्षक सातपूर, स्वच्छता निरीक्षक सातपूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने रोज या भागाचे निरीक्षण करून आपला दैनंदिन अहवाल अतिरीक्त आयुक्त यांना सादर करायचा आहे. ज्यावेळी अतिक्रमण होईल त्यावेळी तातडीने कारवाई करायचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत. या ठिकाणची परिस्थिती पहाता या समितीबरोबर कायमस्वरुपी दोन पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नाशिक महापालिकेने पोलिस आयुक्तांकडे केली आहे. त्यानुसार या समितीबरोबर दोन पोलिस रहाणार आहेत. त्याच प्रमाणे गरज लागेल त्यानुसार सातपूर व अंबड येथील फौजफाटा देखील देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ नराधमाला द्या फाशी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीगावातील नऊ वर्षीय बालिक अत्याचार करणाऱ्या आरोपी रवींद्र बहोत याच्याविरूद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांसह देवळालीगावकवासीयांनी केली.

दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या परिसरात नागरिक, लोकप्रतिनिधी व पोलिस यांनी चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी मंचावर सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, महेंद्र चव्हाण, पो‌लिस उपनिरीक्षक संध्या तेली, अॅड. पद्मा थोरात, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, सरोज अहिरे, माजी महापौर नयना वालझाडे-घोलप आदी उपस्थित होते.

नगरसेविका सत्यभामा गाडेकर म्हणाल्या, की सामाजिक क्रांती व चळवळीला दिशा देणारे देवळालीगावातील परिस्थिती बदलत आहे. मुलींनी महिलांनी घराबाहेर पडताना मिरचीची पूड सोबत घ्यावी. छेड काढणाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांना दणका द्यावा. पोलिसांनीही टवाळखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सुलभ शौचालयात महिला कर्मचारी नेमावे, युवकांनी आपल्या माता बहिणींप्रती जबाबदारीने वागावे, त्यांनी दहशत निर्माण करण्याऐवजी सुसंस्कारी बनावे. गावातील गटबाजी बंद करून एकीने रहावे, कुस्ती मैदानाजवळ पोलिस चौकी उभाण्यात यावी, गावातील एकोपा जोपासणे, आपल्यातील प्रवृत्तीत बदल करत गावाचे नाव पुन्हा उज्ज्वल कसे होईल याकडे लक्ष द्यावे, अशा अनेक सूचना बैठकीदरम्यान नागरिकांनी मांडल्या.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक ढोकणे यांनी सांगितले, की पोलिसांच्या कामकाजात बदल झाला आहे. पोलिससंख्या अपुरी असून नागरिकांनी आपल्यातील पोलिस जागरूक करत तपासणी कामात सहकार्य करावे. मानवी हक्क आयोग आणि कायद्यात झालेल्या सुधारणा याबाबत महिलांना माहिती दिली.

पोलिसांच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. निर्भया पथकही दिमतीला देण्यात आले आहे. घडलेल्या प्रकरणावर प्रकाशझोत टाकताना त्यांनी आरोपीस अधिकाधिक कडक कारवाई करण्यासाठी नागरिकांनी निसंकोचपणे पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे सहाय्यक पोलिस आयुक्त ठाकूर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुलसी विवाहानंतरही प्रत‌ीक्षाच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विवाह तिथींसाठी तुलसी विवाहाची वाट पाहणाऱ्यांसाठी काहीशी निराशाजनक बातमी आहे. यंदा तुलसी विवाहापासून लग्नतिथी उपलब्ध नसल्याचे पंचांगात दिसून येत आहे. त्यामुळे तुलसी विवाहानंतर १८ दिवसांनी सनई चौघडे वाजणार आहेत.

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या देवशयनी एकादशीला महाविष्णु भगवान निद्रिस्त होत असल्याने या काळात कोणतेही शुभकार्य होत नाहीत. चार महिन्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीला अर्थात प्रबोधिनी एकादशीला देव जागे झाल्यानंतर शुभ कार्यासाठी मुहूर्त मिळतात. यंदा ३१ ऑक्टोबरला ही एकादशी आहे. याच दिवशी तुलसीविवाहदेखील असतो. परंतु यंदा तुलसीविवाहानंतरही विवाह मुहूर्तासाठी प्रतीक्षा करणाऱ्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात विवाहासाठी अनुकूल तिथी मिळणार आहेत.

१८ दिवस वेटिंग

देवशयनी एकादशीनंतर चार महिने कोणतेही शुभकार्य होत नाही. लग्न, गृहप्रवेश यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी शक्यतो टाळल्या जातात. तुलसीविवाहानंतर मात्र लग्नकार्यांना सुरूवात होते. परंतु यंदा तुलसीविवाहानंतर तब्बल १८ दिवसांनी विवाहाचा मुहूर्त असून त्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

यंदाच्या या आहेत तिथी

नोव्हेंबर महिन्यात १९ तारखेपासून विवाहासाठी मुहूर्त लाभणार आहेत. १९, २२, २३, २४, २८, २९ व ३० नोव्हेंबर रोजी विवाहमुहूर्त आहेत. त्यानंतर डिसेंबर महिन्यात ३, ४, १०, ११, १२ डिसेंबर रोजी लग्नाचे मुहूर्त आहेत.

नंतर थेट फेब्रुवारीचे मुहूर्त

१५ डिसेंबर ते १४ जानेवारी या काळात मलमास असल्याने पुन्हा कोणतेही शुभकार्य होणार नाही त्यामुळे या काळात लग्न, गृहप्रवेश वर्ज्य असून मकरसंक्रांतीला मलमास संपणार आहेत. असे असले तरीही जानेवारी महिन्यात लग्नासाठी कोणताही मुहूर्त नसल्याने फेब्रुवारी महिन्याची वाट पहावी लागणार आहे. डिसेंबर महिन्यानंतर एकदम फेब्रुवारी महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत.

मार्चमध्ये मुहूर्त लाभ

जवळपास १४ डिसेंबर ते १२ फेब्रुवारी या काळात कोणतेही मुहूर्त नसून १३ जानेवारी रोजी गुरूअस्त होत आहे. ७ फेब्रुवारी रोजी गुरूचा उदय होणार असला तरी बालयत्व दोष असल्याने विवाहासाठी मुहूर्त लाभणार नाहीत. तर फेब्रुवारी महिन्यात मार्च महिन्यात १३, १४, १५, १६, १७, १९, २०, २६, २७ व २८ रोजी लग्नासाठी मुहूर्त आहेत. मार्च महिन्यात मात्र फक्त १२ मार्च रोजी लग्नाचा एकच मुहूर्त लाभणार असल्याने त्यावर उड्या पडणार आहेत.

तुलसी विवाहानंतर लग्नांना सुरूवात होते परंतु यंदा ५ नोव्हेंबरपर्यंत अस्त आहे. त्यामुळे विवाहासारखे शुभकार्य होणार नाही. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात विवाहासाठी अनुकूल तिथी आहेत.

-अमोलशास्त्री किरपेकर, गुरूजी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ औषधांची बागांवर फवारणी

$
0
0

कैलास येवला, सटाणा

बागलाण तालुक्यातील द्राक्ष बाजारात येण्यास प्रारंभ झाला असला तरीही अनेक द्राक्ष बागांमधील तयार कोवळ्या पानांवर डावणीचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी शासनाने बंदी घातलेल्या कीटकनाशक औषधांचा फवारा मारण्याशिवाय द्राक्ष बागायतदारांना पर्याय नसल्याने जीव मुठीत घेवूनच संकटाचा सामना करावा लागत आहे.

सध्या बागलाण तालुक्यातील द्राक्ष बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागली आहेत. अनेक भागातील द्राक्षबागा सध्या फुलधारणा, फळधारणा अवस्थेत आहेत. या द्राक्षबागांना गत पंधरवाड्यात झालेल्या परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. द्राक्षबागांसह शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कोवळ्या पानांवर डावणीचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसाने व ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी करता आली नाही. यानंतर स्वच्छ वातावरणात किडीची तीव्रता वाढली आहे. परिणामी त्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी व डावणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र बंद करण्यात आलेली ती औषधे पर्याय नसल्याने वापरावी लागत आहेत.

द्राक्षबागांना नव्हे तर अन्य पिकांचे संरक्षणासाठी चारही बंद केलेली औषधे शेतकरी खरेदी करून फवारणी करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाने या औषधांवर बंदी घातली तरी देखील त्यास पर्याय नसल्याने बाजारात त्यांना मागणी आहे.

बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी कीटकनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी व निकष या संदर्भात चित्रफितीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना माहिती दिली आहे.

- डी. के. कापडणीस, तालुका कृषी अधिकारी, बागलाण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट फोनचा अतिवापर टाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट फोनसारख्या आधुनिक माध्यमांद्वारे सोशल मीडियाच्या आभासी जगात राहण्याचे व्यसन मानसिक तणाव निर्माण करू शकते, असा इशारा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या वतीने जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञांच्या सहकार्याने केलेल्या एका पाहणीत आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर तरुणाईच्या हातोहाती पोहचलेला स्मार्ट फोन अन् त्याचा होणारा प्रमाणाबाहेरील वापर हा थेट स्मृतीशी संबंधित समस्या निर्माण करू शकतो, असाही संशोधकांचा दावा आहे.

तंत्रज्ञानाचा विधायक आणि सिमीत वापर हा नेहमीच वरदान ठरला आहे. मात्र, याच तंत्रज्ञानाच्या असिमित वापराने या शक्तीला विद्‍ध्वंसाच्या दिशेनेच नेल्याची तज्ज्ञांची निरीक्षणे आहेत. ‘स्मार्ट फोन’ तरुणाईसाठी ‘स्टेटस सिम्बॉल’ बनला आहे. नाशिकसारखी थ्री टायर सिटीही तरुणाईच्या जीवनशैलीस अपवाद नाही. शहरातील मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या बहुतांशी प्रकरणांमध्ये ‘स्मार्ट फोन’मधील आभासी विश्वालाच वास्तव मानणारे तरुण आढळत असल्याचे तज्ज्ञांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. या तरुणांच्या समस्याही वास्तव आणि आभासी जग यातील अंतर न कळू शकल्याने निर्माण झाल्याचे दाहक सत्य काही केस स्टडी मधून ‘मटा’ला उलगडले.

दुर्धर आजारांचा धोका

मोबाइल फोनमधून निघणाऱ्या रेडिओ तरंगांच्या दुष्परिणामांमुळे अनेक दुर्धर आजारांनाही तरुणांना सामोरे जावे लागत असल्याचे तज्ज्ञांचे निष्कर्ष आहेत. तर काहींच्या स्मृतीकेंद्रावर याचा विपरित परिणाम दिसून येतो. काही संशोधनांमधील संदर्भांनुसार स्मार्टफोनच्या वाढत्या वापराने डिजिटल अम्नेशिया नावाच्या आजाराला रुग्णास सामोरे जावे लागते. परिणामी त्याच्या स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो.

मोबाइल काही किड्यांचे घर

एका रोचक पण गंभीर शोधामध्ये एक गोष्ट पुढे आली आहे. तुमच्या स्मार्ट फोनमध्ये वातावरणातील सूक्ष्मजंतू घर बनवतात. त्यांचे हे प्रमाण एका टॉयलेटमध्ये असलेल्या सूक्ष्मजंतूंच्या तुलनेत १० टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.

आपण हे करू शकतो
- मर्यादित वेळेसाठी स्मार्ट फोनचा उपयोग करा
- मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा
- वाचन, जेवण करताना मोबाइल दूर ठेवा
- नियमित व्यायामावर भर द्या
- व्हर्च्युअल मैत्रीपेक्षा वास्तवातील संपर्क वाढवा
- आवडत्या कामांमध्ये मनास गुंतवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खनिकर्म खात्यावर २० लाखांचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गौण खनिजांच्या उत्खननामुळे विद्रुप होणाऱ्या ठिकाणांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत २० लाखांचा जिल्हा खनिकर्म निधी जमा झाला आहे. निधीची भरीव तरतूद झाली की त्याचा वापर विल्होळी, सारुळ यासारख्या ठिकाणांचे रुपडे पालटण्यासाठी केला जाणार आहे.

गौण खनिजांच्या वारेमाप उत्खननामुळे अनेक ठिकाणे अक्षरश: विद्रुप झाली आहेत. महामार्गांवरून ये-जा करणाऱ्यांच्या नजरेत अशी ठिकाणे सहज भरतात. अशा विद्रुपीकरणामुळे त्या-त्या परिसराच्या सौंदर्यालाही मोठ्या प्रमाणात बाधा पोहोचते. अशा ठिकाणचे सौंदर्यीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने जिल्ह्यात खनिज विकास प्रतिष्ठानची स्थापन करण्याचे आदेश दिले होते. नाशिकमध्येही जिल्हा प्रशासनाने अशा प्रतिष्ठानाची स्थापना केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेतील एकूण निधीच्या दोन तृतीयांश निधी प्रत्यक्ष बाधित क्षेत्रात तर उर्वरित एक तृतीयांश निधी अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रात खर्च करावा, असे सरकारचे निर्देश आहेत. याखेरीज गौण खनिजातून मिळणाऱ्या महसूलातील काही भागही खर्च करावा लागणार आहे. जिल्ह्यात त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले असून त्यामध्ये २० लाखांचा निधी जमा झाल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यासाठी निधीचा वापर

परिसराचे सौंदर्यीकरण करतानाच बाधित भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा, भुजलाची पातळी उंचावण्यासाठी व्यवस्था, पर्यावरण संवर्धन व प्रदूषण नियंत्रणाची व्यवस्था करणे, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे, शिक्षणासाठी शाळेची इमारत बांधणी, तेथे दर्जेदार शिक्षणासाठी मनुष्यबळ नेमण्यासह प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी यासह सर्वच बाबींच्या व्यवस्थेसाठी असा निधी वापरण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माहेरवाशिणींना लागली घराची ओढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

दिवाळी आटोपल्यानंतर गावी येणारी-जाणारी मंडळींना आता आपापल्या घरी परतण्याचे वेध लागले आहे. मध्य रेल्वेच्या नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर माहेरावाशींसह कामगार वर्गाची लगबग वाढली आहे.

दिवाळीची सुटी संपल्याने बच्चे कंपनीपासून वृद्धापर्यंत आपापल्या गावी परतणारे वेध लागले आहे. शहरात कामानिमित्त अंबड, सातपूर, सिडको अशा भागात राहणाऱ्या नागरिकांची रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर वर्दळ दिसून येत आहे. सुटीमुळे कोणी मामाकडे तर कोणी पर्यटनासाठी पिकनिकला गेले होते. काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाल परीने विश्रांती घेतली होती. ऐन भाऊबीजेपासून कामावर पुन्हा रुजू झाल्याने बसप्रवाशांना दिलासा मिळाला आहे. घरी परतण्याची घाई असलेल्या अनेकांनी खासगी टॅक्सी व रिक्षा यांचा आधार मिळाला आहे.

हमालांची दिवाळी

रेल्वे स्टेशन परिसरात ओझे उचलून गुजराण करणाऱ्या हमालांची इतर दिवशी दिवसाला २०० ते ३०० रुपयांची कमाई मोठ्या कष्टाने होत असते; मात्र दिवाळीत प्रवाशांची गर्दी तसेच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बॅगा असल्याने हमालांना रोजगार उपलब्ध होऊ शकला. दिवाळीच्या काळात त्यांना हजार ते दोन हजारापर्यंतही उत्पन्न मिळाले. दिवळी खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी आर्थिक दिलास देणारी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरी मोबाइलची; तक्रारीत मात्र गहाळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांच्या नाकावर टिच्चून पैशांच्या बॅग, पर्स, पाकिट, मोबाइल चोरीचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. पण पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीऐवजी गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली जाते. तपास करण्याच्या कचाट्यातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी पोलिसांकडून गहाळ नोंदीचा हट्ट केला जातो का असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे.
गर्दीच्या ठिकाणचा मोबाइल त्यातही स्मार्ट फोन लंपास होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. मुळात अशा चोरीच्या घटना घडता कामा नये; पण चोरी झालीच तर पोलिसांकडून चोरीचा गुन्हे दाखल करून घेण्याऐवजी मोबाइल गहाळ झाल्याचा उल्लेख करण्यासाठी तक्रारदारावर दबाव टाकला जातो. नाइलाजास्तव किंवा पोलिसांच्या सांगण्यावरून तक्रारदारही मोबाइल चोरीऐवजी गहाळ झाल्याची तक्रार दाखल करतात. विशेष म्हणजे अशा नोंदीमध्ये वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करतात. त्यामुळे मोबाइल चोरीच होत नाही का? असा प्रश्नही सर्वसामन्य माणसाला पडतो.

पंचवटीत गोदावरी काठावरील रामसेतू पुलाजवळ राहुल गाडेकर हे खरेदी करीत असताना चोरट्यांनी त्यांचा मोबाइल हिसकावून पोबारा केला. या घटनेची माहिती देण्यासाठी पोलिस स्टेशनला गेलो असता मोबाइल चोरी होतच नाही, असा दावा पोलिसांनी केला. तक्रार गहाळ म्हणून घेतली जाईल, असेही पोलिसांनी गाडेकर यांना सांगितले. सिमकार्ड मिळविण्यासाठी गहाळची नोंदणी पुरेशी ठरते. त्यामुळे तक्रार दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पवित्रा पंचवटी पोलिसांनी घेतला.
रामकुंड परिसरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. याच गर्दीचा फायदा चोरट्यांकडून घेतला जातो. चोरीला गेलेला मोबाइल शोधण्यासाठी ट्रॅकर उपलब्ध आहे. शिवाय सोळा आकडी आयएमईआय नंबरद्वारही शोध घेणे शक्य आहे. पण त्याचा वापर फार थोड्या प्रमाणात किंवा मोठ्या गुन्हेगारी घटनांच्या शोधासाठीच पोलिसांकडून केला जातो.

चोरांचे टायमिंग ठरलेले
रामकुंड परिसरात चोरी करणाऱ्या वेगवेगळ्या भागातील विविध टोळ्या आहेत. त्यांनी कोणत्या वेळेत कोणत्या परिसरात म्हणजेच सकाळ, दुपार आणि सायंकाळी अशा वेगवेगळ्या वेळेत चोऱ्या करायचे इथपर्यंत ठरलेले आहे. याची माहिती असली तरी पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

रामसेतू पुलाजवळ माझा मोबाइल चोरी झाला. त्याची तक्रार देण्यासाठी पंचवटी पोलिस ठाण्यात गेलो. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी मला चोरीऐवजी गहाळ झाल्याची तक्रार करण्यास सांगितले. मी याबाबत वारंवार ‌विचारणा केली; पण त्यांनी माझ्याकडून मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार घेतली.
- राहुल गाडेकर, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरूंची नोंदणी होणार सुलभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्वच घरमालकांनी संबंधित पोलीस स्टेशनला भाडेकरूंची नोंद करावी यासाठी ही प्रक्रिया अधिक किफायतशीर आणि सुलभ करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी घेतला आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्हाला घरमालक आणि भाडेकरूची माहिती हवी असून त्यांना महागड्या स्टॅम्पवरील करारपत्राची सक्ती केली जाणार नाही, अशी ग्वाही सिंगल यांनी मंगळवारी दिली.
शहरात अनेक घरमालकांनी आपली घरे भाडेतत्वावर दिली आहेत. परंतु, तसे करताना संबंधित भाडेकरूंची माहिती घेण्याची तसदी अनेक घरमालकांनी दाखविलेली नाही. आपण आपली मालमत्ता कुणाकडे भाडेतत्वावर सुपूर्द करतो, त्याची पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची तर नाही ना? संबंधित भाडेकरूचा इतिहास काय? तो काय करतो? कोठून आला? याची माहिती घरमालकांनी घेणे आवश्यक आहे. परंतु, बहुतांश घरमालक भाडेकरूकडे विचारपूस न करताच केवळ अपेक्षित भाडे मिळतेय म्हणून आपले घर भाडेतत्वावर देतात. यातूनच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कळत नकळत आसरा दिला गेल्यास तो गुन्हा ठरतो. शहरात गुन्हेगारी प्रवत्ती घर भाडेतत्वावर घेऊन वास्तव्यास येत असल्याची पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी गंभीर दखल घेतली आहे. भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

भाडेकरूची पोलीस स्टेशनला नोंद करताना घरमालक आणि भाडेकरू यांमधील करारपत्राची झेरॉक्स जोडण्याची सक्ती पोलिसांकडून केली जाते. ११ महिन्यांसाठीचे भाडे कराराचे करारपत्र बनविण्यासाठी नागरिकांना स्टॅम्प पेपर खरेदीपासून वकिलांच्या शुल्कापर्यंत दीड-दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च घरमालकाने करावा की भाडेकरूने यावरून दोहोंमध्ये वाद उद्भवतो. त्यामुळे भाडेकरूंची नोंद करण्याबाबत उदासिनता असल्याची बाब महाराष्ट्र टाइम्सने पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत डॉ. सिंगल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचना केल्या जातील, अशी ग्वाही दिली आहे.

स्टॅम्प करारपत्राची सक्ती नाही

गुन्हेगारी रोखण्यास मदत व्हावी यासाठीच आम्हाला घरमालक आणि भाडेकरूची माहिती हवी आहे. त्यामुळे स्टॅम्प पेपरवरील करारपत्राची सक्ती घरमालक आणि भाडेकरूंना यापुढे केली जाणार नाही, असे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी स्पष्ट केले आहे. तशा सूचना मी पोलिस स्टेशन्सच्या अधिकाऱ्यांना देत आहे. नागरिकांनी भाडेकरूंच्या माहितीचा अर्ज पोलिस स्टेशनमध्ये येऊन भरून द्यावा. त्यासमवेत फोटो, ओळखपत्र व तत्सम कागदपत्रे जोडावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेच्या कारवर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या कारची काच फोडून संशयिताने एकास मारहाण केली. मुंबई नाका परिसरातील कालिका मंदीराजवळ हा प्रकार घडला.
वंदना उदय रकिबे (रा. सौभाग्यनगर, पंपिंग स्टेशन, गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. २३) दुपारी दोनच्या सुमारास रकिबे आपल्या स्विफ्ट कारमधून जात होत्या. त्यांच्यासमवेत आदित्य केशव सुर्वे (१४) हा भाचाही होता. संदीप हॉटेलसमोर वाहतूक कोंडी असल्याने कार थांबली होती. त्यावेळी मागून मोटारसायकलवरून आलेल्या संशयिताचा तोल जाऊन तो कारवर पडला. त्याने मोटारसायकल थांबवून कारच्या डाव्या बाजुची काच हाताने फोडली. त्यानंतर आदित्य यास मारहाण करून तो फरार झाला.

महागड्या साड्यांची चोरी

कॅनडा कॉर्नर येथील साडीच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तीन महिलांनी १० सिल्कच्या महागड्या साड्या चोरून नेल्या. घनश्‍याम रामवल्लभ भांगरिया (रा. चोपडा लॉन्स) यांनी फिर्याद दिली आहे. भांगरिया यांचे कॅनडा कॉर्नरवर तनिष्का सारिज् नावाचे दुकान आहे. शनिवारी ( दि. २१) सकाळी साडेअकराच्या सुमारास तीन महिला लग्नाच्या निमि‌त्त करीत साडी खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या. त्यांनी एक साडी खरेदी केली. मात्र, १० सिल्कच्या महागड्या साड्या कामगारांची नजर चुकवून चोरून नेल्याचे सरकारवाडा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अपघातात वृद्धा ठार

त्र्यंबकरोडवरील धामणकर चौकात भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेमध्ये ८० वर्षीय महिला ठार झाली. चंद्रभागा बद्रिनाथ चांडक (रा. आदिनाथ निवास, काकतकर हॉस्पिटलजवळ, टिळकवाडी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. शुभम राजेंद्र चांडक यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी (दि. २२) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास चंद्रभागा चांडक धामणकर चौकातील सिंचन भवनसमोर रस्त्यालगत उभ्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये चांडक गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सरकारवाडा पोलिसांनी सांगितले.

व्हॉट्सअॅपद्वारे महिलेची बदनामी

चांदवडकर लेन परिसरातील एका विवाहितेच्या छायाचित्रात बदल करून फेसबुकवरील बनावट अकाउंटवर वापरल्याचा तसेच ते छायाचित्र तिच्या पतीला पाठवून तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २५ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. संशयित करण श्रावण पवार (रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव) याने पीडित विवाहितेचे छायाचित्र वापरून फेसबुकवर आकाश वाघ या नावाने बनावट अकाउंट तयार केले. त्यावर ते छायाचित्र टाकले. ते छायाचित्र विवाहितेच्या पतीच्या फेसबुक, व्हॉट्सअॅपवर तसेच त्याचा मित्र सौरभ विसपुते याच्याही अकाउंटवर टाकले. त्यानंतर अश्‍लिल चॅटिंग करीत तिची बदनामी केली. सायबर पोलिस स्टेशनमध्ये संशयित पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथर्डी फाटा येथे घरफोडी

पाथर्डी फाटा परिसरातील एका इमारतीमधील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने २७ हजारांचे दागिने चोरून नेले. प्रशांत रमेशपुरी गोसावी (रा. अभिजित सोसायटी, वासन शोरुमशेजारी, पाथर्डीफाटा) यांनी फिर्याद दिली आहे.
दिवाळीनिमित्ताने गोसावी आपल्या कुटुंबीयांसह २० ते २२ तारखेदरम्यान बाहेरगावी गेले होते. याच दरम्यान चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची लक्ष्मी, नाणे, रोकड असा २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

जेलरोडला बुलेटची चोरी

जेलरोड परिसरातील इमारतीच्या पार्किंगमधून ७५ हजार रुपयांची बुलेट चोरीला गेली. सुभाष गोपाल घुगे (रा. चंद्रभागा सोसायटी, गंधर्वनगरी, जेलरोड) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी ( दि. २२) मध्यरात्री चोरट्याने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली क्‍लासिक बुलेट (एमएच १५ एफपी ५१७१) चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोल‌िसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिव्हील हॉस्प‌िटलच्या पार्किंगमधूनही ३० हजार रुपयांची मोटारसायकल चोरीस गेली आहे. शैलेश अशोक लिलके (रा. गाडेकर वाडी, ओझर) यांनी फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज धक्क्याने सुरगाण्यात मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

विजेच्या मीटरमधून घरात जोडणी करीत असताना शॉक लागल्याने सुरगाणा तालुक्यातील खोबळा येथील एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी घडली. पांडुरंग मनाजी गांगुर्डे (४२, रा. खोबळा) असे बळी गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गांगुर्डे हे लोखंडी पलंगावर उभे राहून मीटरमधून घरात वीज जोडणी करीत होते. यावेळी वीज प्रवाह असलेल्या वायरचा धक्का लागल्याने गांगुर्डे दूर फेकले गेले. त्यांचे भाऊ नारायण चौधरी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पांडुरंग यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. नारायण चौधरी यांनी दिलेल्या खबरीनुसार पोलिसांनी पंचनामा केला. पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकविम्याचे सुरक्षाकवच निखळले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

विभागातील तब्बल २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकानी पिक कर्जाची एक दमडीही न दिल्याने यंदाच्या खरिप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत अवघ्या ११.७० टक्के खातेदार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे आणि संकटकाळात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या हेतूने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पिकविमा योजनेची विभागात फरफट झाली आहे. पिककर्जाअभावी तब्बल ८८ टक्के शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभागाला राम-राम ठोकला आहे.

अवकाळी पाऊस, गारपीट, अवर्षण यासारख्या समस्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान होते. या संकटातून शेतकऱ्याला सोडविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पिकविमा योजना राबविण्यात येते. या योजनेत सहभागी शेतकऱ्यांच्या पिकांना पेरणीपासून तर पीक काढल्यानंतर चौदा दिवसांसाठी विम्याचे सुरक्षा कवच मिळते. या काळात शेतपिकाचे नुकसान झाल्यास उंबरठा उत्पादनानुसार संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक भरपाई दिली जाते. असे असले तरी विभागातील तब्बल ८८ शेतकऱ्यांनी या योजनेकडे गेल्या खरीप हंगामात सपशेल पाठ फिरविल्याने खरीप पिकांचे प्रधानमंत्री पिकविमा योजनेचे सुरक्षा कवच गळून पडले आहे.

योजनेत क्लिष्टता

प्रधानमंत्री पिकविमा योजना पिकांच्या सुरक्षेसाठी योग्य असली तरी या योजनेचा लाभार्थी निवडण्याचे निकष अत्यंत क्लिष्ट आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाले तरी उंबरठा उत्पन्नाच्या अत्यंत क्लिष्ट अटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती खूपच कमी रक्कम मिळते. शिवाय ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कित्येक महिने प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे पिककर्ज मिळाले नसले तरी स्वतःहून शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला नाही.

पिककापणीच्या आधारावर लाभ

गेल्या वर्षी विभागातील सात लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले होते. त्यामुळे खरीपातील ७ लाख ६५ हजार ६२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण कवच लाभले. एकूण ८५ कोटी ७४ लाख रुपये विम्याच्या हफ्त्यापोटी जमा झाले होते. २ हजार ४६० शेतकरी वैयक्तिक नुकसान भरपाई लाभार्थी ठरले. त्यांना एक कोटी ५५ लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. तर पिककापणी प्रयोगाच्या आधारे अंतिम नुकसान भरपाईचा लाभ ७७ हजार ४५२ शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यांना ५८ कोटी १९ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळाली होती.

पिकविमा योजनेतील खरीप हंगामात शेतकऱ्यांचा सहभाग

जिल्हा.......एकूण खातेदार.......सहभागी शेतकरी संख्या.......टक्के
नाशिक.......७,९७,६९७..............४,६४२..............०.५८
नंदुरबार.......१,४८,०००..............६,४७७..............४.३८
धुळे.......४,१५,५०२..................३९,०००.............९.३९
जळगाव.......५,५३,४०८.............९६,०९०............१७.३६
नगर.......११,८४,३८०..............२,१६,४४२...........१८.२७
एकूण.......३०,९८,९८७............३,६२,६५१...........११.७०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरंजनाचे ‘नाट्य’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाढत्या शहराची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी महाकवी कालिदास कलामंदिर पुन्हा नव्याने उभा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला; मात्र त्याचा परिणाम म्हणून व्यावसायिक नाटकांचा नाशिककरांना खो मिळत आहे. कालिदास कलामंदिर बंद झाल्यापासून शहरात एकही व्यावसायिक नाटक यशस्वी झाले नसल्याचे चित्र आहे.

नूतनीकरणाच्या कामामुळे वर्षभर महाकवी कालिदास कलामंदिर बंद राहणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी साडेनऊ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. चार महिन्यांपासून त्यासंदर्भातील तयारी महापालिकेने सुरू केली होती. काम सुरू झाल्यानंतर साधारण वर्षभर कालिदास कलामंदिर बंद राहणार आहे. परंतु, त्यामुळे व्यावसायिक नाटक एकदम बंद झाल्याने नाशिककरांची सांस्कृतिक उपासमार होत आहे. चार महिन्यात आतापर्यंत एकही व्यावसायिक नाटक नाशिकमध्ये झाले नसून दादासाहेब गायकवाड सभागृहात एक नाटक करण्याचा प्रयत्न झाला; मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही.

पर्याय असला तरीही

व्यावसायिक नाटक सुरू रहावे यासाठी विश्वास लॉन्स, परशुराम साईखेडकर नाट्यगृह असे पर्याय देण्यात आले. परंतु, याठिकाणी अद्याप एकही नाटक झालेले नाही. व्यावसायिक नाटक होईल अशी यंत्रणाच परशुराम साईखेडकर नाट्यगृहात उपलब्ध नसल्याने तेथे नाटक होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. विश्वास लॉन्स चारही बाजूने ओपन असल्याने नाटकाचा फिल येणार नाही अशी रंगकर्मींची ओरड असून नाट्य व्यवस्थापकही तेथे नाटक घेण्यास धजावत नाही. अद्याप याठिकाणी एकही नाटक झालेले नाही.

जबाबदारी महापालिकेची

कालिदास कलामंदिर नाट्यगृह वर्षभर किंवा त्याहून अधिक काळासाठी बंद राहणार याची महापालिकेला पूर्ण कल्पना असताना त्यांनी सांस्कृतिक गरजा भागविण्यासाठी दुसरी व्यवस्थाच करू नाही यापेक्षा दुर्दैवाची बाब ती कोणती असे मत एका ज्येष्ठ रंगकर्मीने नोंदविले आहे. चार महिन्यात एकही व्यावसायिक नाटक झालेले नाही, या चार महिन्यांची स्थिती पाहता याप्रकरणी महापालिकेनेच पुढाकार घेऊन एखादे सभागृह, अथवा नाट्यगृह पर्यायी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता होत आहे.

प्रेम नाटकावर की नाट्यगृहावर?

रसिकांनी नाटकावर प्रेम करावे, नाट्यगृहावर नाही असे मला वाटते. कालिदास वर्षभरासाठी बंद आहे तर दुसरीकडे कुठेच नाटकासाठी जायचे नाही, अशी नाशिककरांची मानसिकता झाली आहे, ती घातक आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृह आहे, विश्वास लॉन्स आहे; परंतु लोक तेथे यायला तयारच नाहीत. नाटक टिकले पाहीजे. लोकच आले नाही तर आम्ही खर्च तरी कसा काढणार? कालिदासची लोकांना इतकी सवय पडली आहे की रोज तीसपेक्षा जास्त फोन येतात, कालिदासला कोणते नाटक आहे म्हणून. ही मानसिकता बदलावी असे मनापासून वाटते.
- जयप्रकाश जातेगावकर, नाट्य व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलनाचे ‘उड्डाण’ दिल्लीत!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकची विमानसेवा १५ दिवसात सुरू करा, ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही पूर्ण न झाल्याने अखेर खासदार हेमंत गोडसे गुरुवारी (२६ ऑक्टोबर) राजधानी दिल्लीत आंदोलन करणार आहेत. केंद्राच्या उडान योजनेत असूनही विमानसेवा सुरू न झाल्याने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाबाहेर गोडसे निदर्शने करणार आहेत.

केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत एअर डेक्कन कंपनीच्यावतीने ३० सप्टेंबरपासून नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा सुरू केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. मात्र, ऑक्टोबरमध्ये सेवा सुरू झालेली नाही. मुंबई विमानतळावर विमानांची मोठ्या प्रमाणात ये-जा आहे. तेथील हवाई कोंडीमुळेच एअर स्लॉट उपलब्ध होत नाही, असे कारण मुंबई विमानतळाचे देखभाल करणाऱ्या जीव्हीके कंपनीने सांगितले आहे. प्रत्यक्षात गुजरातमधील पोरबंदर, कांडला आणि सूरत या तीन शहरांसाठी जीव्हीकेने मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नाशिक विमानसेवेसंबंधी गोडसे यांनी ऑक्टोबरच्या प्रारंभी हवाई वाहतूक मंत्री अशोक गणपती राजू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली. त्यांच्याशी विमानसेवेच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. नाशिकला स्लॉट नाही आणि गुजरातला कसे, असा प्रश्नही गोडसे यांनी उपस्थित केला. येत्या १५ दिवसात नाशिक विमानसेवेसाठी मुंबईत स्लॉट उपलब्ध करून द्या, अशी मागणी गोडसे यांनी दोन्ही मंत्र्यांकडे केली. तसे झाले नाही तर दिल्लीतील हवाई वाहतूक मंत्रालयाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा गोडसे यांनी दिला आहे. याचसंबंधीचे निवेदन गोडसे यांनी पंतप्रधान मोदी, हवाई वाहतूक सचिव यांनाही दिले होते. १५ दिवसांनंतरही विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध झाला नसल्याने अखेर गोडसे यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील हवाई वाहतूक मंत्रालयाबाहेर गुरुवारी दुपारी आंदोलन छेडण्यात येईल, असे गोडसे यांनी मंत्रालयाला कळविले आहे.

उडानची उडविणार खिल्ली

गुरुवारच्या आंदोलनासंदर्भात गोडसे यांनी उडान योजनेची खिल्ली उडविणारे बॅनर तयार केले आहे. तसेच, केंद्र सरकार मोठे की जीव्हीके ही खासगी कंपनी, अशी विचारणा यात करण्यात आली आहे. तसेच, सोशल मीड‌यिातही ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.

इतर संघटनांचाही सहभाग?

नाशिकला विमानसेवा मिळण्याची मोठी प्रतीक्षा आहे. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करुनही सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे शहरातील विविध संस्था-संघटनाही या आंदोलनात सहभागी होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वरला खळाळले झरे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गोदावरी, दारणा, कादवा आणि विणता नदीचे पाणी आलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात पक्षांचे तीर्थक्षेत्र असलेले अभयारण्य असल्याने दिवसेंदिवस पर्यटकांची रेलचेल धरण परिसरात पाहायला मिळत आहे. अभयारण्यात देश विदेशातील पक्ष्यांचे दर्शन घ्यायला येणाऱ्या पर्यटकांना आता धरण परिसरातील धबधबे आणि खळाळणारे झरे आकर्षित करीत आहे.

सध्या देश विदेशातील अनेक पक्षांचे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांचे आगमन झाले आहे. हे पक्षी पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी नागरिक, हौशी छायाचित्रकार अभयारण्यात येत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहूल लागली की पक्ष्यांचे थवेच्या थवे नांदूरच्या पाणथळ क्षेत्रावर येऊन विसावतात. धरणाच्या पाण्यावर मुक्तविहार करतात. यावेळी या पक्ष्यांच्या नयनमनोहारी जलक्रीडा पाहताना पक्षीमित्र व पक्षीप्रेमी पर्यटक भान हरपून जातात. यावर्षी काही वाईल्ड फोटोग्राफर यांनी परिसरात फिरून पर्यटकांना आकर्षित करतील आशा निसर्गरम्य स्थळांची छायाचित्रे टिपत आहेत. झरे आणि छोटे धबधबे असलेले हे सौंदर्यस्थळे डोळ्यांचे पारणे फेडतात.

खाणगाव थडी गावात नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या खाली व मध्यमेशवर मंदिराजवळ हे छोटे मोठे धबधबे खळाळत वाहत आहेत. खूप उंच नसल्यामुळे हे धबधबे अगदी सहज नजरेच्या टप्प्यात येत आहेत. या परिसरातील हे धबधबे वर्षभर वाहत असतात.


नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांचे फोटो काढताना या परिसराचे निरीक्षण करतांना नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात अनेक ठिकाणी फिरताना विविध सौंदर्यस्थळे पाहायला आणि कॅमेऱ्यात टिपायला मिळाली. परिसरात असणारे झरे व धबधबे खूपच लोभसवाणे आहे.-प्रशांत दौंड, वाइल्डलाइफ फोटोग्राफर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशक्ती चौकात आढळला मृतदेह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शिवशक्ती चौकातील अजिंक्य व्हील येथे एक व्यक्तीचा मृतदेह असल्याचे लक्षात आले. याबाबतची अंबड पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली आहे.

शिवशक्‍ती चौकातील अजिंक्य व्हीला येथे अत्यंत दुर्गंधी असल्याचा संदेश सोशल मीडियावर फिरत होता. याची माहिती मिळताच नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांचे पती राकेश ढोमसे यांनी त्यांच्या साथीदारांसह या परिसरात पाहणी केली. दुर्गंधी येत असलल्या ठिकाणी एक मृतदेह असल्याचे लक्षात आले. त्यानंतर याबाबतची माहिती तातडीने अंबड पोलीसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह पुरुषाचा आहे की महिलेचा हे ओळखणे सुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे आता मृतदेह कोणाचा व कोणी याठिकाणी टाकला याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहउपयुक्त सचिन गोर्हे यांनी पाहणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीतील इन्क्युबेटर ‘सिव्हिल’ला देणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलकडे अडीच वर्षांपासून वापराविना पडून असलेले दोन इन्क्युबेटर सिव्हिल हॉस्पिटलकडे लवकरच वर्ग केले जाण्याची शक्यता आहे.
इन्क्युबेटर सिव्हिलकडे वर्ग करण्यात यावेत, अशी सूचना आमदार जयंत जाधव यांनी केली आहे. देवळाली कॅम्पला देण्यात आलेले दोन्ही इन्क्युबेटर आमदार जाधव यांच्याच आमदार नि‌धीतून देण्यात आलेले आहेत. मात्र, त्याचा अद्याप वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांचा वापर ‘सिव्हिल’ला करता यावा यासाठी जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलला स्मरणपत्र दिलेले आहे.

कॅन्टोन्मेंटची झोळी फाटकी

‘दात्याने दिले मात्र आमचीच झोळी फाटकी’ अशी अवस्था कॅन्टोन्मेंट बोर्डाची झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात न आल्याने इन्क्युबेटरचा वापर होऊ शकलेला नाही. अनेक वर्षांपासून सुसज्ज आयसीयू विभाग व एक ‘एमडी फिजिशियन’ व एक ‘एमएस जनरल सर्जन’ यांची २४ तास गरज आहे. मात्र, ते उपलब्ध होऊ शकलेले नाही.

देवळाली कॅम्प हॉस्पिटलमध्ये आमदार निधीमधून देण्यात आलेले इन्क्युबेटर तज्ज्ञ डॉक्टर व इतर सुविधांअभावी पडून आहे. ते त्वरित सिव्हिल हॉस्पिटलकडे वर्ग करण्याबाबत बोर्डाच्या आगामी बैठकित निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. जयश्री नटेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुश्श.. खड्डे बुजविण्यास प्रारंभ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्यानंतर जिल्हाभरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसापासून सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील राज्य महामार्गाचे काम हे १० नोव्हेंबरपर्यंत तर प्रमुख जिल्हा मार्गाचे काम हे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

जिल्ह्यात ३४०० किलोमीटरचे रस्ते असून त्यात २ ते ३ टक्के खड्डे असल्याचे सांगितले जाते. पण, त्याची संख्या यापेक्षा अधिक आहे. या अगोदर या रस्त्यांवर खड्डे पडलेलेल होते. त्यात पावसाळ्यात अजून भर पडली आहे. या रस्त्यावरून गाडी चालवणेही अवघड झाल्यामुळे ठिकठिकाणाहून या रस्त्याबाबत ओरडही होत होती. काही ठिकाणी अपघातही झाले.

एकीकडे खड्डयांची संख्या वाढलेली असताना दुसरीकडे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणारे कंत्राटदारच संपावर गेले. त्यामुळे या खड्ड्यांचे काम रखडले होते. या दोन्ही मार्गासाठी डेडलाइनही सरकारने घालून दिली असली तरी मुदतीपूर्व हे काम करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. त्यासाठी काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डेमुक्त रस्त्यांसाठी जेटपॅचर यंत्राचा वापर सुरू केला आहे. या मशिनच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये रस्ता पूर्ववत केला जातो. तसेच काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने खड्डे बुजविले जात आहे.

दर्जेदार कामाची अपेक्षा

जिल्हा खड्डेमुक्त व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सरसावले असले तरी हे खड्डे बुजविण्याचे काम किती दिवस टिकते हे महत्त्वाचे आहे. काही रस्त्यांवर सर्वत्र ठिगळच दिसत असल्याने रस्त्यांचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील रस्त्यांकडे पूर्णत दुर्लक्ष झाल्यामुळे सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. संप आणि नंतर दिवाळी यामुळे काम थांबले होते. आता ते लवकर पूर्ण आणि दर्जेदार व्हावे ही सामान्य माणसांची अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. राज्य महामार्गाचे काम हे १० नोव्हेंबरपर्यंत तर प्रमुख जिल्हा मार्गाचे काम हे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
- रणजित हांडे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images