Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एचआयव्हीग्रस्तांनी साजरी केली दिवाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळावेत आणि लखलखत्या तेजोमय प्रकाशाप्रमाणे एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बालगोपाळांच्याही जीवनातही दिवाळीने भरभराट आणावी, अशा शुभेच्छा देत एचआयव्हीग्रस्तांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरा केली. यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी अनमोल अशी आठवण ठरली.

एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बालकांनी पालक आणि मान्यवरांसोबत दिवाळी साजरी करून या सणाचा आनंद द्विगुणीत केला. महिंद्रा आणि महिंद्रा व यश फाउंडेशन यांच्यातर्फे एचआयव्हीग्रस्तांसाठी ‘दिवाळी सेलिब्रेशन’चे आयोजन करण्यात आले.
गंजमाळ येथील रोटरी क्लब सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महिंद्रा आणि महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, महिंद्राचे अधिकारी सी. एन. बनर्जी, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथकाचे कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी व यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थ‌ित होते. एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या जिल्ह्यातील ४०० बालगोपाळ व त्यांच्या पालकांना यावेळी दिवाळी फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. पाटील यांनी प्रास्ताविक केले. एचआयव्हीग्रस्तांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आहेर यांनी दिली. त्यानंतर एचआयव्हीग्रस्तांनी अनेक मनोरंजक कार्यक्रमांचा आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फटाका असोसिएशनने जपली सामाजिक बांधिलकी

$
0
0

नाशिक : नाशिक फटाका असोसिएशन यांच्या वतीने दिवाळी पाडवा व भाऊबीजनिमित्त निरीक्षण गृहातील सुमारे शंभर विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ व महंत भक्तीचरणदास महाराज यांच्या हस्ते फटाके व मिठाई वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदुलाल शहा होते.

या प्रसंगी राजू भुजबळ म्हणाले, की नाशिक फटाका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत रिमांड होम येथे दिवाळी साजरी करत आदर्श निर्माण केला. तर असे उपक्रम दीपस्तंभाप्रमाणे अखंड तेवत रहावे, अशी भावना महंत भक्तीचरणदास महाराज यांनी व्यक्त केली. निरीक्षण गृहातील मुलींनी भाऊबीजेनिमित्त फटाका व्यावसायिकांना ओवाळले. या वेळी शंकर बर्वे, जयप्रकाश जातेगावकर, पंकज काळे, प्रशांत चंद्रात्रे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडून पार्किंगप्रबोधन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांचे प्रबोधन होऊन त्यातून त्यांनी काही बोध घ्यावा आणि त्यानुसार वर्तन करून कायद्याचे पालन करावे यासाठी पोलिसांतर्फे अनेक क्लृप्त्या योजल्या जातात. विशेषत: ट्रॅफिक संदर्भात या प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता असते. वाहतुकीचा बोजवारा उडालेला असताना दिवाळीच्या काळात पोलिसांनी अत्यंत चांगले प्रबोधन करून ट्रॅफिकला आळा घातल्याचे दृश्य पहावयास मिळाले.

सिटी सेंटर मॉल येथे नेहमीच अत्यंत वर्दळ असते. याठिकाणी चौफुली असल्याने ट्रॅफिकचा नेहमी बोजवारा उडतो. तसेच मॉल असल्याने मॉलच्या बाहेरच गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे येथे प्रचंड ट्रॅफिक जॅम होते. यावर तोडगा म्हणून नाशिक पोलिसांतर्फे काही बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर प्रबोधनकारक असे संदेश लिहिल्याने त्याचा जनमानसावर परिणाम होऊन ट्रॅफिकची समस्या काही दिवसांसाठी का होईना मार्गी लागल्याचे चिन्ह होते. मॉलच्या पार्किंगमध्येच वाहने पार्क करावी, वाहनाच्या डिक्कीत बॅग, टॉप, पर्स, पैसे, दागिने ठेऊ नयेत, रोडवर वाहने पार्क करू नयेत, केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, रोडमध्ये वाहन असल्यास व त्यामुळे अपघात घडल्यास वाहन मालकावर कारवाई करण्यात येईल, चेन स्नॅचिंग होऊ नये यासाठी मौल्यवान दागिन्यांचा काळजीपूर्वक वापर करावा, संशयित व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ फोन नंबरवर संपर्क साधावा अशा प्रकारच्या सूचना करणारी होर्डिंग्ज सिटिसेंटर मॉलच्या आजूबाजूला लावण्यात आल्याने त्याचा ट्रॅफिकवर चांगलाच परिणाम होऊन वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र होते. पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी काही नंबरदेखील या बॅनरवर देण्यात आले होते. नियंत्रण कक्ष, गंगापूर पोलिस ठाण्याचा क्रमांक देऊन या क्रमांकावर तक्रार करावी अशी सूचनाही करण्यात आली असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. हीच स्थिती कायम असावी अशी अनेक वाहनधारकांची इच्छा असल्याचेही चर्चेतून समोर आले.

गणेशोत्सवातही होर्डिंगचा परिणाम

गणेशोत्सव काळात वाहतूक शाखेतर्फे अनेक होर्डिंग्ज लावण्यात आलेले होते. त्यावर गणपतीचे चित्र असून व त्याच्या हातात हेल्मेट देऊन संदेश देण्यात आला होता की, ‘वत्सा मी भाग्यवान होतो म्हणून मला दुसरे डोके मिळाले. परंतु, तू मात्र हेल्मेट वापरले पाहिजे.’ अशा आशयाचे बॅनर जागोजागी लावल्यामुळे त्याचा परिणाम होऊन हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली होती. सण उत्सवाच्या काळात वाहतूक शाखा अशाप्रकारे काळजी घेत असल्याने त्याचे चांगले फायदे दिसून येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूचा उपद्रव कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यूच्या आजाराने उपद्रव काही कमी होऊ शकलेला नाही. ऑक्टोबर महिन्यात १२५ लोकांना बाधा झाल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. डेंग्यूबाबत महापालिकेने केलेल्या उपाययोजना फोल ठरत असून बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
जानेवारीपासून शहरात डेंग्यूच्या आजाराने शेकडो लोक बाधित झाले. त्यात अनेकांचा मृत्यूही झाला. महापालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना केल्या असल्याचा दावा केला असला तरीही दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात वेळेवर धूर फवारणी होत नसल्याने रुग्णांच्या संख्या वाढत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. १ जानेवारीपासून १ हजार ४३ रुग्णांची डेंग्यू संशयित म्हणून नोंदणी करण्यात आली. या रुगणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यातील ३९९ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. ऑक्टोबरच्या १ तारखेपासून ते २२ तारखेपर्यंत ३७२ रुग्णाची संशयित म्हणून नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १२५ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. पावसाळ्यात डासांची संख्या जास्त असल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते; मात्र आता पाऊस कमी झाल्याने रुग्णांची संख्या कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले असून त्यातून निर्माण हेणाऱ्या दुर्गंधीमुळेही आजार फैलावतो आहे. पावसाळ्यात उघड्या जागांवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. त्यामुळे डासांची संख्या जास्त होती. स्लम वस्तीत महापालिकेच्या कंत्राटदारांनी धूर फवारणी व्यवस्थित केली नसल्याचा आरोप काही नगरसेवकांनी महासभेत केला होता. हिवाळ्यात रोगाचे जंतू जास्त फैलावण्याचा संभव असतो. त्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बच्चे कंपनी तापाने त्रस्त

शहरात धूर फवारणी व्यवस्थित होत नसल्याने येत्या काही दिवसात लहान मुले आजारी पडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील खासगी दवाखाने फुल्ल झाले असून ताप, खोकला या आजारांनी लहान मुले त्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काही दिवसांपासून दिवसभर जाणवत असलेली उन्हाची तीव्रता व दुसरीकडे थंडीची चाहूल अशा मिश्र वातावरणाचा सामना नाशिककरांना करावा लागत आहे. दिवसभर कडक ऊन, रात्री व सकाळी थंडी लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

शहरातील अनेक बालरुग्णालयांमध्ये बालकांची गर्दी दिसून येत असून बदलत्या वातावरणाचा सामना करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याची गरज डॉक्टरांकडून व्यक्त केली आहे. अशा बदलत्या वातावरणात दवाखान्यांमध्ये पेशंट्सची, प्रामुख्याने लहान मुलांची रिघ लागली आहे. बदलत्या ऋतुमानाचा योग्य प्रतिकारशक्तीच्या अभावाने लहान मुलांच्या आरोग्यावर तत्काळ परिणाम दिसून येतो. ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, अशक्तपणा अशा लहानमोठ्या आजारांचा सामना त्यांना करावा लागतो. गेल्या काही काळापासून डेंग्यू, स्वाईन फ्लू अशा गंभीर आजारांनी डोके वर काढल्याने आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.

लक्षणांना ओळखा

ताप, सर्दी, खोकला, कफ झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. तपासणीनंतर तांबड्या, पांढऱ्या पेशी कमी झाल्यास डेंग्यूसारख्या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या डॉक्टरांकडून जाऊन लक्षणे लक्षात घेऊन त्यावर उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

अशी घ्या काळजी

- मुलांना पौष्टिक आहार द्या.
- घराजवळील परिसर स्वच्छ ठेवा.
- आजारांची लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- आजारी मुलांना नियमित औषधे द्या.
- मुलांना तळलेले पदार्थ देऊ नका.
- घरी बनवलेला ताजा व सात्विक आहाराचे सेवन आवश्यक.
- थंड पदार्थांचे सेवन टाळा.

डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या आजारांचे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे. साथीचे आजार टाळण्यासाठी वेळीच लसीकरण करून घेणे महत्त्वाचे असते. शिवाय, ताप आल्यास लहान बाळांना कपड्यांमध्ये गुंडाळून न ठेवता काहीवेळ मोकळे ठेवून त्यांची काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. मिलिंद भराडिया, बालरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीनंतर लाल परी सुसाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चार दिवसाच्या संपानंतर सुरू झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला तिसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी असल्याने १२८ जादा बसेस एसटी प्रशासनाने सोडल्या. भाऊबीजेला सुरू झालेली एसटीला रविवारी सुद्धा परतीच्या प्रवाशांची गर्दी होती.

राज्यभरात विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये पुणे व कसारा येथे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. संपानंतरच्या दोन दिवसात जिल्ह्यात एसटीला १ कोटी ८२ लाखाचे उत्पन्न मिळाले. यात भाऊबीजेच्या दिवशी (दि. २१) ७२ लाख तर रविवारचे (दि. २२) उत्पन्न १ कोटी १० लाख आहे.

हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकादेशीर ठरवल्यानंतर शनिवारी पहाटेपासून एसटी रस्त्यावर धावू लागल्या. पण, प्रवाशांना पुरेशी कल्पना न आल्याने सकाळपर्यंत गर्दी कमी होती. त्यानंतर दुपारी मात्र भाऊबीजेची गर्दी वाढली. त्यानंतर रविवारी सुद्धा एसटीचे बहुतांश मार्गाचे आरक्षण फुल्ल झाले. तर साध्या बसमध्येही गर्दी होती. दिवाळीच्या कार्यालयीन सुट्या व त्यानंतर शाळा, कॉलेजेसच्या सुट्यांमुळे पुढील आठ दिवस ही गर्दी कायम राहणार आहे.

आरक्षण खिडक्यांवर रांगा

नाशिकमधून पुणे, कसारा सह सर्वाधिक जास्त बसेस धुळे, जळगाव, औरंगाबाद या ठिकाणी सोडण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचाही प्रवास सुकर झाला. धुळे येथे जाण्यासाठी आक्षणची स्वतंत्र व्यवस्था असल्याने तेथेही रांगा दिसत होत्या.

शिवशाहीला मागणी

नव्याने दाखल झालेल्या शिवशाही बसेसला सर्वाधिक मागणी आहे. नाशिकहून १७ बस सध्या सुरू असून या बसेसचे सर्व आरक्षण फुल्ल आहे. वातानुकूलित असलेल्या या बसचे भाडे परवडणारे असल्याने अनेकांनी आपला मोर्चा या बसकडे वळवला आहे.

खासगी वाहतूकही जोरात

एसटी महामंडळाच्या बसेसला गर्दी असल्याने खासगी बसचा व्यवसायही जोरात आहे. एसटीचे आरक्षण फुल्ल झाल्यानंतर अनेकांनी खासगी बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले. तर अनेक प्रवाशांची पसंती खासगी बस असल्यामुळे त्यांनी येथेही गर्दी दिसून येत आहे.

तिसऱ्या दिवशी सर्वच आगारात प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे १२८ जादा बस सोडण्यात आल्या. पुढील आठ दिवस ही गर्दी कायम राहणार आहे. दोन दिवसात एसटीला १ कोटी ८२ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
- राजेंद्र जगताप, वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंपिंग स्टेशनमध्ये कामगार जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सिन्नरमधील माळेगाव एमआयडीसीत पंपिंग स्टेशनमध्ये इलेक्ट्रिकचे काम करत असताना शिडीवरून पडून कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. परंतु, संबधित ठेकेदाराकडून कामगाराला उपचारासाठी योग्य मदत मिळाली नसल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी कुठेही पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही.

शंकर आढाव (२५) असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. सातपूरच्या स्वारबाबानगर येथे राहणा ऱ्या या कामगारावर मुंबई नाका येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी आढाव यांना उपचारासाठी आवश्यक ती मदत ठेकेदाराकडून केली जात नसल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे. नेहमीच एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागात होत असलेल्या घटना दाबल्या जात असल्याने याला वाचा फोडणार कोण असा सवाल कामगार संघटनेने केला आहे. दरम्यान, याबाबत एमआयडीसीच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना विचारले असता चार दिवसांपूर्वी इलेक्ट्रिकचे काम करत असताना संबधित कामगार शिडीवरून पडून जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यायामाने साधले जाते मानसिक आरोग्य

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com
Twitter : jitendratarte@MT

नाशिक : चुकीची आणि दगदगीची जीवनशैली अनेक मानसिक आजारांना निमंत्रण देत असली तरीही दिनचर्येत व्यायामाचा समावेश केल्यास शरीरासोबत मनाचाही तोल सांभाळला जाऊ शकतो, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

या संदर्भात भाष्य करणारी नवसंशोधनेही अलिकडेच काही आंतरराष्ट्रीय मेडिकल जरनलमधून प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील काही संदर्भांनुसार दिनचर्येत व्यायामाचा न चुकता समावेश केला गेल्या आपली विचारक्षमता, ग्रहणशक्ती आणि निर्णय क्षमतेवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडतो. व्यायामाने शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होते.

एका पाहणीत असेही आढळून आले, की जे लोक नियमितपणे जीवनशैलीत व्यायामाचा समावेश करतात ते व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या अग्रेसर राहतात. व्यायाम करणाऱ्या नागरीकांमध्ये तुलनेने जास्त प्रमाणात ऊर्जा आणि विचारक्षमता निर्माण होण्यास मदत होते. व्यायाम करणाऱ्या नागरिकांना झोपही वेळेत येते. शरीरास मानवेल इतक्या व्यायामामुळे हृदयरोग आणि हेमोरेजिक स्ट्रोक्सचा धोका दूर राहतो. याशिवाय कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनाही चार हात दूर ठेवण्यासाठी व्यायाम ऊर्जा पुरवत असल्याचेही नवीन वैद्यकीय संशोधन सांगते. दिवसाकाठी किमान अर्धा ते एक तासाचा व्यायाम गरजेचा आहे. शरीरातील स्नायूंना उर्जा मिळण्यासोबतच मनही यामुळे प्रसन्न होते.

याकडेही द्या लक्ष
- वयोगट १८ ते ६५ मधील व्यक्तींनी आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायामास द्यावीत
- दररोज ३० मिनिटे चालावे
- फिटनेस चांगला असणाऱ्या प्रौढांसाठी आठवड्यातून दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हवे
- अन्नाचा समतोल आणि धूम्रपान सोडणे हेही आरोग्यासाठी गरजेचे आहे

व्यायाम देतो मनाला ऊर्जा
निरोगी मन हे सुदृढ शरीरातच वास करते. व्यायामाचा फायदा शारिरीक तंदुरुस्तीसोबतच मानसिक आरोग्यास होतो, हे सत्य आहे. दिनचर्येत व्यायामाच्या समावेशासोबतच मानसिक आरोग्यासाठी दीर्घ श्वसन, योगासने, प्राणायाम, मंत्रोच्चार किंवा प्रार्थनेचाही समावेश हवा.
- डॉ. राहुल सावंत, आयुर्वेदाचार्य

अशी केली नकारात्मकतेवर मात!
स्पर्धा, ताण-तणाव, धावपळीची जीवनशैली या शब्दांमुळे मेटाकुटीस आलेल्या तरुणाईचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न आम्ही ‘मना सज्जना’ या मालिकेद्वारे करत आहोत. या विषयावर अनेक तरुणांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत. तुमच्याही आयुष्यात कधीतरी करिअर, स्पर्धा, रिलेशनशिप, व्यसनाधिनता, अपयश अशा कुठल्याही मुद्द्याशी निगडीत कसोटीचे क्षण असतीलच ना! मग या कसोटीला तुम्ही तोंड कसं दिलंत? नैराश्यावर मात करून यश कसं मिळवलं? तुमचे अनुभव लिहून पाठवा. तुमच्या योग्य अनुभवांना ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून प्रसिद्धी देण्यात येईल. अनुभवाच्या मांडणीत तुमची नावे आणि वैयक्तिक ओळख गुप्त ठेवण्यात येईल. तर, ‘पत्र नव्हे मित्र’ हे ब्रीद जपणाऱ्या ‘मटा’च्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आमच्या ई-मेल पत्त्यावर मेल करा : पत्ता असा : mataamanasajjana@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटकांचे दर्शनरांगेत हाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

दिवाळी सण आटोपताच त्र्यंबकेश्वर येथे पुन्हा एकदा भाविक पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पूर्वदरवाजा दर्शनबारी मंडपाची अद्यापही सुविधा मिळत नसल्याने भाविकांच्या मुख्य दरवाजासमारे रांग लागली आहे. उन्हाचा तडाखा सहन करत भाविक दर्शनासाठी वेटिंग करीत आहेत. मंदिराच्या समोरच असलेल्या पोल‌िस बॅरेकेडिंग जवळ चपलांचा खच पडत आहे. गर्दी वाढताच दोनशे रुपये सशुल्क दर्शन बंद करण्यात आले आहे. रांगेत काही तास उभे राहावे लागत असल्याने दूर अंतरावरून आलेले भाविक दर्शन न घेताच परतीचे नियोजन करीत आहेत. मंदिरा समोरील रस्त्यावर उभे असलेल्या आणि त्यानंतर मंदिर प्रांगणातील दर्शनबारीतील भाविकांना पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध होत नाहीत. मंदिर परिसरात स्वच्छतागृहांची वाणवा असल्याने भाविकांची विशेषत: महिला भाविकांची कुचंबणा होत आहे. याबाबत नगर पालिका प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन या दोन्ही संस्थांनी एकत्र‌ित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

वाढलेल्या भाविक पर्यटनाचा व्यवसाय‌िकांना फायदा होत आहे. तसाच तो नगरपालिकेस देखील वाहन प्रवेश फीच्या मध्यमातून होत आहे. दिवाळी सुरू असतांना नगरपालिका फंडात खडखडाट झाल्याने सफाई ठेकेदाराचे देयक रखडले होते. शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने सुटीच्या कालावधीत लाखोंचा भरणा मिळाल्यास पालिकेलाही लाभ झाला असेल, अशी चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा फटाके ‘फुटलेच’ नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मंदी, नोटाबंदी, जीएसटीचा सर्वाधिक फटका यंदा फटाके विक्रेत्यांना बसला आहे. राज्यभरात सर्वत्रच यंदा फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सटाणा सारख्या ग्रामीण भागात देखील त्यांचे परिणाम जाणवले आहेत. त्यामुळे दिवाळीत न ‘फुटलेल्या’ फटाक्यांचे पुढे काय करायचे असा सवाल फटाके विक्रेत्यांना सतावत आहे.

नोटबंदी, जीएसटी यांचा थेट परिणाम ग्राहकांच्या क्रयशक्तीवर झाला आहे. यंदा दसऱ्यापासून बाजारात तेजी अपेक्षित असते. मात्र, यातूनही खिशात असलैल्या चार पैशातून उत्सवासाठी गरजेचा फराळ, पूजा साहित्य, मुलांसाठी कपडे आदी गोष्टी घेण्यावरच बहुतेकांनी भर दिला. यामुळे याचा सर्वात मोठा फटका शेवटी फटाक्यांच्या विक्रीला बसला आहे.

दर दिवाळीला अभ्यंगस्नान झाल्यानंतर फटाके फोडण्याची मजा काही औरच असते. मात्र यंदाच्या सकाळी हा फटक्यांचा आवाज आलाच नाही. बाजारात फुलबाज्या, भुईनळे, भुईचक्र, चुटपुट, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी तोटे यापैकी मोठ्या आवाजाचे फटाक्यांची मागणी तर खूपच कमी झाली. दिवाळीत पाच दिवसांऐवजी केवळ लक्ष्मीपुजनालाच आणि ते ही व्यापारीपेठेतच यंदा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लहान मुलांच्या हौसेखातर फुलबाजी किंवा तत्सम फटाक्यांची किरकोळ खरेदी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनकौल ठरविणार स्वच्छ सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशात केलेल्या स्वच्छतेबाबतच्या पाहणीत नाशिकचा १५१ क्रमांक आल्यानंतर महापालिकेचे अधिकारी कसून कामाला लागले आहेत. हा क्रमांक दहाच्या आत कसा आणता येईल, यासाठी पावले उचलली जात असून त्याबाबतची बैठक सोमवारी राजीव गांधी भवन येथे पार पडली. यंदाच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या मतावर जास्त भर दिला जाणार असून त्यानुसार क्रमांक काढले जाणार आहे.

बैठकीत विभागीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व खाते प्रमुख सहभागी झाले. या स्वच्छ सर्वेक्षणात केंद्र सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करायचे असून मागील वेळी झालेल्या चुका टाळून यावेळेस शहरात चांगल्या प्रकारे स्वच्छता कशी राबविली जाईल, यासंबंधी मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना करण्यात आले. मागील वेळी आलेल्या समितीने सर्वेक्षण करून अहवाल दिला होता; मात्र यावेळेस नागरिकांच्या मताला जास्त प्रमाणात प्राधान्य देण्यात येणार आहे.

असे होणार गुणांकन

सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेससाठी ३५ टक्के गुण देण्यात आले आहे. त्यासाठी १ हजार ४०० गुण देण्यात येणार आहे. त्यानंतर समिती थेट पहाणी करणार असून त्याला एकूण गुणांच्या ३० टक्के म्हणजेच १ हजार २०० या प्रमाणे गुण देण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांचा सहभाग वाढवण्यात आला आहे. समितीकडून नागरिकांची मते जाणून घेतली जाणार असून त्याला ३५ टक्के म्हणजेच १ हजार ४०० गुण देण्यात आले आहे. नाशिक महापालिकेल्या स्वच्छता सर्वेक्षणासाटी ४ हजार गुणांची परीक्षा द्यावी लागणार आहे.

महापालिकेला ७ हजार २४६ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले; परंतु ते पूर्ण होऊ शकले नव्हते. यंदाही हेच उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. हे पूर्ण करणे या सर्वेक्षणात महत्त्वाचा भाग असणार आहे. संपूर्ण देशातील ४ हजार ४१ शहरांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाथर्डीत मूलभूत सुविधांची वानवा

$
0
0

कॉलनी वृत्त

पाथर्डीत मूलभूत सुविधांची वानवा


म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहरातील विविध भागांचा ज्याप्रमाणे विकास होत आहे, त्याप्रमाणे पाथर्डी परिसरात सध्या नव्याने नववसाहतींची निर्मिती जोमाने होत असल्याचे दिसत आहे. या भागात नवनवीन बांधकाम प्रकल्प उभे राहत असतानाच या परिसरात मूलभूत समस्यांची मात्र वानवा असल्याचे दिसून येत आहे.

या ठिकाणच्या नववसाहतींतील रस्त्यांची समस्या अद्यापही सुटलेली नसल्याचे चित्र असून, वडाळा-पाथर्डी हा मुख्य रस्ता वगळता परिसरातील कॉलनी रस्ते आजही अपूर्ण अवस्थेत अाहेत. येथे कोणत्याही प्रकारचे खडीकरणसुद्धा करण्यात आलेले नाही. रस्त्याच्या मुख्य समस्येबरोबरच या ठिकाणी पाणी व घंटागाडीचीही समस्या भेडसावत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पाथर्डी गाव परिसराचा काही गेल्या काही वर्षांत विकास झाला असला, तरी या ठिकाणी होणाऱ्या नवनवीन इमारतींचा व नववसाहतींचा विचार करता या ठिकाणी चांगला विकास होणे आवश्यक होते. पाथर्डी गावठाणापासून इंदिरानगरमधील राजीवनगरचा काही भाग यात असल्याने या प्रभागात सर्वच स्तरांतील नागरिक बघावयास मिळतात. नाशिक शहरात कोठेही नसलेले असे भव्य बांधकाम प्रकल्प याच भागात सुरू असल्याने प्रशासन व नगरसेवकांनी या प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणे खऱ्या अर्थाने अपेक्षित होते. मात्र, तसे होताना दिसत नाही.

--

मुरुमाचे रस्ते जैसे थे

येथील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून, महापालिकेने अनेक भागातील रस्त्यांवर तर साधे खडीकरणसुद्धा केलेले नाही. गुरू गोविंद सिंग कॉलेजसमोरून जाणारा रस्ता हा अर्धवटच बनविण्यात आलेला असून, हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काही ठिकाणी जमीन हस्तांतराचा प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगितले जात असले, तरी नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही या ठिकाणी पूर्वीचे मुरुमाचेच रस्ते बघावयास मिळत असून, पावसाळ्यामध्ये या रस्त्यांना अक्षरशः चिखलाचे स्वरूप प्राप्त होत आहे.

--

पाणी, घंटागाडीचा तिढा

पाथर्डी परिसरातील पाण्याचा प्रश्नही अद्याप सुटलेला नसून, पाथर्डीपासून चेतनानगरपर्यंतच्या नववसाहतींमधील पाणीप्रश्नासाठी अनेकदा नागरिकांनी व नगरसेवकांनीही अधिकाऱ्यांची भेटी घेऊन निवेदनेसुद्धा दिली आहेत. मात्र, त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रभागात घंटागाडीसुद्धा अनियमित असल्याने अनेकदा येथील खुल्या जागांवरच नागरिकांकडून कचरा टाकला जात असतो. समर्थनगर व परिसरात अनेक खुल्या जागा असल्याने या जागांवर गवतांचे जंगल वाढलेले दिसत असते. यामुळे येथे अस्वच्छता पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. पाथर्डी ते देवळाली हा रस्ता अत्यंत वर्दळीचा झाला असून याठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्याप्रमाणे ज्या पद्धतीने वडाळा पाथर्डी रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आले आहेत, तसेच दुभाजक या ठिकाणीसुद्धा टाकावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वनवसाहती असल्याने येथे नागरी वस्ती काही प्रमाणात कमी असली, तरी येथे किमान मूलभूत सुविधा तरी मिळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

--

परिसरात काही ठिकाणी हायमास्ट लावण्यात आले असले, तरी आवश्यक त्या ठिकाणी ते लावलेले नाहीत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तर पथदीपच दिसून येत नाहीत. घंटागाडी नियमित येत नसल्याने नाईलाजाने नागरिकांना मोकळ्या मैदानांवर कचरा टाकावा लागतो.

-विवेक जाधव

--

पाथर्डी-वडाळा व पाथर्डी-देवळाली या दोन रस्त्यांवर लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्याचबरोबर या रस्त्यांलगत अनेक शाळा व कॉलेजेस असल्याने या रस्त्यांवर आवश्यक तेथे गतिरोधक आणि दुभाजकदेखील उभारणे अपेक्षित आहे.

-महेंद्र पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीला लाभेना मुहूर्त

$
0
0

लोगो- मटा मालिका

उद्यानांचे तीनतेरा

भाग २

--

दुरुस्तीला लाभेना मुहूर्त

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

तुटलेल्या खेळणी, वाढलेले गवत, अस्वच्छता अशी दयनीय अवस्था आहे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरातील आडगाव परिसरातील उद्यानांची. या परिसरातील उद्यानांची दुरुस्तीअभावी दयनीय अवस्था झाली आहे. परिसरात उद्याने तयार झाली तेव्हापासूनच कोणतीही दुरुस्तीची कामे झालेली नसल्याची स्थिती आहे.

आडगावमधील अडीच एकरमध्ये उभारण्यात आलेले महालक्ष्मी उद्यान, तसेच कोणार्कनगर, स्वामी समर्थनगर, सागर व्हिलेज कॉलनी, श्रीरामनगर, सरस्वतीनगर आदी ठिकाणच्या उद्यानांची दुरवस्था झालेली आहे.

आडगाव परिसरातील उद्यानांची देखभाल करण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारीच नसल्याने येथील उद्यानांत कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले अाहे. त्यामुळे परिसरातील नागरिकदेखील उद्यानांत येणे टाळत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

दिवाळीच्या सुटीमुळे बच्चेकंपनीचा ओढा उद्यानांकडे वाढला आहे. पण, परिसरातील उद्यानांची दयनीय अवस्था झाल्याने त्यांची निराशा होत आहे. ज्येष्ठ नागरिक, सुटीनिमित्त आलेले पाहुणे आदींनादेखील गैरसोय सहन करावी लागत आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे ही स्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

--

पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा अभाव

आडगाव परिसरात उद्याने तयार झाली तेव्हापासूनच कोणतीही दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. शिवाय उद्यानाच्या देखभालीसाठी पूर्णवेळ कर्मचारीही नसल्याने उद्यानांतील गवतच काढले जात नाही. परिसरातील उद्यानांतील खेळणीही पूर्णपणे मोडलेल्या असून, लॉन्सचीदेखील वाट लागली आहे. उद्यानांतील कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, काही उद्यानांत तर मद्याच्या बाटल्यादेखील दिसून येत आहेत.

--

खेळणी, पथदीपांची दुरवस्था

बहुतांश उद्यानांना अजून संरक्षक भिंतच बांधलेली नाही, तर काही ठिकाणचे संरक्षक कथडे कोसळलेले आहेत. काही ठिकाणी संरक्षक जाळ्यांची मोडतोड झालेली आहे. उद्यानातील पथदीपांचीही दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे सायंकाळनंतर उद्यान परिसरात टवाळखोरांचा वावर वाढल्याचे दिसून येते. काही उद्यानांतील ग्रीन जिमच्या साहित्याचीही मोडतोड झालेली आहे. त्याचीदेखील कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

--

मैदानांची आवश्यकता

आडगाव परिसरात अनेक नवीन वसाहती विकसित होत आहेत. पण, परिसरात उद्यानांची दयनीय अवस्था आहे. शिवाय मुलांना खेळण्यासाठी मैदानेदेखील नाहीत. त्यामुळे उद्यान विभागाच्या वतीने सर्व उद्यानांची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करून पुनर्वैभव मिळवून द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

--

आडगाव परिसरातील बहुतांश उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे. उद्यानांतील गवत काढले जात नाही, स्वच्छता केली जात नसल्यामुळे डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे. महापालिकेने परिसरातील उद्यानांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

-अजित पाटील, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किचनचे बजेट कोलमडले

$
0
0

किचनचे बजेट कोलमडले

यंदा दमदार मॉन्सूननंतर परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने भाजीपाला पिकांची नासाडी झाली. परिणामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाज्यांची मागणी जास्त नसली, तरीही आवकेत घट झाल्याने भाज्यांचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. २० ते ४० रुपये किलोप्रमाणे विक्री होणाऱ्या भाजीपाल्याची ६० ते ७० रुपयांप्रमाणे विक्री सुरू आहे. मेथी, शेपू, पालक यांसारख्या नाशवंत पालेभाज्यांचे दरदेखील कडाडले आहेत. भाजीपाल्याच्या या तडक्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे किचनचे बजेटच कोलमडल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भातील स्थितीवर टाकलेला फोकस...

--

बाजार समिती, पंचवटी

--

आवकेत घट, चढ्या दराचे भांडवल

---

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली असून, ऐन दिवाळीत भाजीपाल्याचे दर वाढले होते ते आता काहीसे स्थिर झाले आहेत. मात्र, दिवाळीत वाढलेल्या दराचे भांडवल करीत किरकोळ विक्रेत्यांनी बाजार समितीच्या भावापेक्षा जास्त चढ्या दराने भाजीपाल्याची विक्री सुरू केली आहे. पंचवटीतील नीलगिरीबाग, म्हसरूळ, कोणार्कनगर, पेठरोड, दिंडोरीरोड, गंगाघाट या भागातील किरकोळ विक्रीत कोणतीही भाजी १५ ते २० रुपये पाव किलो या दरात म्हणजे ६० ते १०० रुपये किलो अशी विक्री होत आहे. बाजार समितीतील लिलावाच्या दरात आणि या दरात मोठी तफावत आहे. लिलावात विक्रीस येणाऱ्या भाजीपाल्याची खरेदी दर्जानुसार केली जाते. मात्र, किरकोळ विक्रीवेळी कसाही दर्जा असला, तरी दर कमी होत नाही.

लिलावातील सोमवारचे दर

--

भाजी.......आवक (क्विंटलमध्ये)...........दर (प्रतिकिलो).....किरकोळ

टोमॅटो..................१५५७८................................१२ ते २५.......२० ते ३०

वांगी.....................११२०.................................२५ ते ५५.......४० ते ७०

फ्लॉवर.................१०७०..................................२० ते ३०........३० ते ६०

कोबी....................४६५०..................................२० ते ४०.......४० ते ८०

ढोबळी मिरची........१६२०..................................४० ते ७५......७० ते ९०

दुधी भोपळा............३१५०.................................२० ते ४०....४० ते ७०

कारली...................३६२०..................................१५ ते २५....२५ ते ५०

दोडका...................१०२०..................................२५ ते ४५.....५० ते ७०

गिलके..................३१०.....................................२० ते ३०....४० ते ८०

भेंडी.....................११०......................................३० ते ५०....५० ते ८०

गवार....................५.........................................४० ते ६०....६० ते ९०

डांगर....................१०........................................२५ ते ७५...८० ते ९०

काकडी.................४१५०......................................२० ते ३५...४० ते ६०

---------

पालेभाजी .........आवक (जुडी).............दर (प्रतिजुडी)...किरकोळ

कोथिंबीर...........५०००..........................८० ते १५०.......१०० ते २००

मेथी.................२०००...........................२५ ते ३५......४० ते ७०

शेपू...................१५००...........................२० ते २५......४० ते ६०

कांदापात...........३०००............................२० ते ३०......४० ते ७०

आडगाव

--

जुडीची विभागणी करून विक्री

--

घाऊक बाजारातील दरांप्रमाणेच असंख्य ग्राहक भाजीपाला मागतात, असे परिसरातील किरकोळ विक्रेते सांगतात. त्यामुळे आमच्याकडेदेखील माल पडून राहत असून, तोटा सहन करावा लागत असल्याने आम्ही एका जुडीचे दीड किंवा दोन भाग करून किरकोळ बाजारात विक्री करतो. त्यामुळे काही भाज्या खराब झाल्यास आमचा तोटा कमी होतो अन् बऱ्याच ग्राहकांची मागणीदेखील कमी असल्याने असल्याने त्यांनादेखील भाज्या देता येतात. १० ते १५ रुपये किलोने विक्री होणाऱ्या टोमॅटोची चाळीस ते पन्नास रुपयांनी विक्री सुरू आहे. परतीच्या पावसाने शेतमालाची नासाडी झाली आहे. त्यामुळे आता नवीन माल बाजारात येईपर्यंत भाज्यांचे दर असेच कायम राहणार असल्याचे विक्रेते सांगतात.

--

किरकोळ बाजारातील दर

भाजी- रुपये किलो

--

गवार १०० ते १२०

भेंडी ६० ते ७०

वांगी ५० ते ६०

कारली ५० ते ६०

दोडके ६० ते ७०

कोबी ५० ते ७०

घेवडा ८० ते १००

टोमॅटो ४० ते ५०

फ्लॉवर ५० ते ६०

काकडी ३० ते ४०

----

देवळाली कॅम्प

--

ताटातील भाज्यांत घट!

--

देवळालीच्या भाजीबाजारात गवार, कोथिंबीर, मेथी आदी भाज्यांचे दर दुप्पट झाल्याने स्वयंपाक करायचा कसा, असा पेच गृहिणांना पडला आहे. आधी पावसामुळे अन् आता महागाईमुळे सर्वसामान्यांच्या ताटातील भाज्या घटत आहेत. दरवाढ गगनाला भिडल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकवर्गातही असंतोष असून, भाव पुन्हा कमी होण्यासाठी साधारण अडीच महिन्यांनंतर येणाऱ्या नव्या उत्पादनाची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार आहे. देवळाली परिसरात लष्करी भागातील जवान व त्यांचे कुटुंबीय खरेदीसाठी येत असतात. तेदेखील एवढी भाववाढ या दिवसांत कधी पाहिली नसल्याचे सांगतात. शेतकऱ्यांना काही उत्पादनांमागे खर्च वजा जाता हाती शंभर-दोनशे रुपये, तर व्यापारीवर्गाला किलोमागे दोन ते पाच रुपये मिळतात. आगामी काळात कांद्याचे भाव अजून वाढण्याची चिन्हे आहेत.

--

किरकोळ बाजारातील दर

भाजी- रुपये किलो

--

मिरची – ६०

गवार – ८०

भेंडी -६०

वांगी -६०

ढोबळी मिरची- ८०

कांदा -४०

तोंडली-६०

लसूण - ८०

दोडके -५०

कारले -५०

टोमॅटो -३०

गिलके-४०

वाल -६०

बटाटा-१२

लिंबू -५०

गाजर-६०

आले -६०

घेवडा-६०

डांगर -३०

काकडी -३०

फ्लॉवर - २५ रुपये नग

कोबी -२० रुपये नग

भोपळा -२० रुपये नग

--

पालेभाजी – रुपये जुडी

मेथी – २५

शेपू – १५

पालक -२०

कोथिंबीर -५०

कांदापात- २०

तांदूळका -१०

पुदिना जुडी १०

मुळा २०

बीट २०

----

कळवण

--

ग्राहक, व्यावसायिकही हवालदिल

--

तालुक्यात भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, तरीही सध्या ६० रुपये किलोंच्या दराखाली कुठलीही भाजी मिळत नसल्याची स्थिती आहे. उत्पादनावर झालेला परिणाम व कळवण तालुक्यात अपेक्षित मार्केट नसल्यामुळे ग्राहकांप्रमाणेच बाहेरून माल भरणारे छोटे व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत. भाजीपाला उत्पादन व खर्च याचा ताळमेळ स्थानिक पातळीवर बसत नसल्याने बाहेरच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी माल पाठवावा लागतो. येथे चार महिने मिरची मार्केट जोमात चालते. सर्वाधिक दर हिरव्या वांग्यांना प्रति १० किलो १ हजार रुपये, अर्थात १००रुपये किलो उपलब्ध होतो, तो सध्या १२०,१३० रुपये किलो आहे.

--

खरेदी अन् विक्रीची स्थिती

--

कोबी ः शेतकरीवर्गाकडून २५ रुपयांना मिळत असून, कळवण भाजी बाजारात ३०, ३५ रुपये किलोने विक्री होत आहे.

फ्लॉवर ः ५५ रुपये खरेदी, ७०, ८० रुपये किलोने विक्री.

वांगी ः १३०० रुपयांत क्रेट, २५, ३० रुपये पावकिलोने विक्री.

कांदा ः भाजीबाजारात उपलब्धच होत नाही.

बटाटे ः ९०० रुपये क्विंटल खरेदी, १५ रुपये किलोने विक्री.

भेंडी ः ३० रुपये किलोने उपलब्ध, ४० रुपये किलोने विक्री.

गवार ः खरेदी ८० रुपये किलो, विक्री १२० रुपये

गिलके ः खरेदी ३५, ४० रुपये किलो, ६०, ७० रुपये किलोने विक्री.

कारले ः खरेदी ३५, ४० रुपये किलो, ६०, ७० रुपयांना विक्री.

काकडी ः खरेदी १५, २० रुपये किलो, ३० रुपयांना विक्री.

टोमॅटो ः खरेदी ३० रुपये किलो, ४० रुपये किलोने विक्री.

----–---------

मनमाड

--

...तर तुम्हाला काय देणार?

--

दिवाळीपासूनच भाज्यांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. मनमाड शहर व चांदवड, नांदगावमध्ये भाज्यांचे भाव कडाडल्याचे दिसत असून, मंगळवारी भाज्यांचे दर दुपटीने वाढल्याने सामान्य नागरिकांत नाराजीचा सूर दिसून आला. मनमाड बाजारात एरवी ५ ते ५ रुपयांना मिळणारी कोथिंबीर जुडी १५ ते २० रुपयांनी विकली जात होती. पालेभाज्यांमध्ये शेपू, पालक, मेथीचे भाव वाढल्याचे चित्र असून, १० रुपयांना मिळणारी जुडी २० ते २२ रुपयांना मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत असल्याचे चित्र आहे. फ्लॉवर ५० रुपये किलो, शिमला मिरची ४० रुपये किलोने विक्री होत आहे. आम्हालाच मालासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. आधीच्या कमी भावात देणे परवडत नाही, तर तुम्हाला काय देणार, असा सवाल भाजीविक्रेत्यांकडून ग्राहकांना केला जात आहे.

---

सटाणा

--

किलोच्या भावात पावकिलो!

--

शहरातील भाजीमंडईत भाजीपाल्याचे दर आकाशाला गवसणी घालू लागल्याने सर्वसामान्य महिला व गृहिणींमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. किलोच्या दराचे भाव पावकिलोकरिता मोजावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील बस स्थानकामागे भरणाया दैनंदिंन भाजी मंडईत भाजीपाल्यांचे सद्यस्थितीत आकाशाला भिडल्याने विक्रेते व ग्राहकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. भाजी मंडईत वांगी ४० रुपये पाव, तर १६० रुपये किलो दराने विक्री होत आहेत. गिलके, दोडके, भेंडी ३० रुपये पाव, तर १२० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. टोमॅटो १५ रुपये पाव, तर ६० रुपये किलो दराने मिळत आहेत.मेथीची जुडी २० रुपये, तर कोथिंबिरीच्या बोटांवर मोजण्याइतक्या काड्यांची जुडी २५ रुपयांना विकली जात आहे. गेल्या पंधरवड्यात हाच भाजीपाला ४० ते ५० रुपये किलो दराने मिळत होता. आता अचानक झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य गृहिणी तर कमालीच्या धास्तावल्या आहेत. भाजीपाल्याच्या दरवाढीमुळे महिलांकडून आता कडधान्ये, डाळी, मठा, मुगाला पसंती दिली जात आहे.

--

दिवाळीत घरी भरपूर पाहुणे आल्याने भाजीपाला जास्त लागत आहे. त्यातच भाजीपाल्याच्या किमती दुपटीने वाढल्याने आर्थिक फटका बसत आहे. पालेभाज्यांचे भावदेखील वाढले असल्याने किचनचे बजेटच कोलमडले असून, आता कोणत्या भाज्या घरी न्याव्यात, असा प्रश्न पडला आहे.

-रोहिणी विधाते, गृहिणी, मनमाड

--

यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच जेरीस आणले. त्यामुळे भाजीपाल्यात दरवाढ होणे अपेक्षित होते. त्यानुसार दरवाढ झाली असून, आगामी दोन-अडीच महिन्यांनंतर भाजीपाल्याचे दर उतरतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

-दीपक शिरसाठ, भाजीपाला विक्रेते, देवळाली

--

दिवसेंदिवस होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशालाच कात्री लागत असून, साधा भाजीपालादेखील प्रचंड महाग झाला आहे. इतर ठिकाणांहून आवक वाढवावी किंवा काय करता येईल यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून कोणतीही हालचाल होत नसल्याने आश्चर्य वाटते.

-मंगेश मुसळे, ग्राहक, देवळाली

--


कळवण तालुक्यात भाजीपाला मार्केट प्रभावीपणे नाही. येथील किरकोळ भाजीपाला विक्रेत्याला तुटपुंज्या स्वरूपात माल उपलब्ध होतो. आगामी दोन-तीन महिने अशीच स्थिती राहण्याची चिन्हे आहेत. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न होतील तेव्हाच बाजारभाव स्थिर व पूर्ववत होऊ शकतील.

-जब्बार शेख, भाजीपाला विक्रेते, कळवण

--

(संकलन ः रामनाथ माळोदे, अभिजित राऊत, प्रशांत धिवंदे, दीपक महाजन, संदीप देशपांडे, कैलास येवला)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरग्रस्तांना ‘आरंभ’चा मदतीचा हात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ‘आरंभ’ या गटातर्फे कॅन्सर जीवनशैली कार्यशाळाचे नियोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पहिल्या कार्यशाळेला मिळालेल्या प्रतिसादानंतर दुसरी कार्यशाळा दि. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्याद्वारे कॅन्सरच्या रुग्णांना विविध बाबींसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॅन्सरच्या अनुभवातून गेलेल्या व्यक्तींतर्फे हा पुढाकार घेण्यात आला आहे, हे या कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे.

कमालीच्या वेगाने आणि समाजातील सर्व स्तरांत पसरणाऱ्या कॅन्सरवर मात करणारे अनेक आधुनिक उपचार आता कॅन्सर रुग्णांना मदत करीत आहेत. अशा उपचारांच्या जोडीला जर योग्य आहार, मानसिक बैठक, व्यायाम अशा परिघावर असलेल्या, पण रुग्णांना मदत करणाऱ्या गोष्टींचे शिक्षण आणि माहिती रुग्णांना मिळाली, तर त्याचा खूप फायदा रुग्णांना होऊ शकतो, हे लक्षात घेऊन ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कॅन्सरच्या रुग्णांसाठी विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्याच्या हेतूने हा गट काम करणार असून, ही कार्यशाळा हा त्याचाच एक भाग आहे. प्रभावी परस्पर संवाद घडावा यासाठी फक्त १५ रुग्णांना या कार्यशाळेत प्रवेश देण्यात येईल. ज्यांचे केमो अथवा रेडिएशनसारखे उपचार सुरू आहेत किंवा नुकतेच संपले आहेत, त्यांना या कार्यशाळेचा अधिक फायदा होऊ शकतो. ‘आरंभ’तर्फे वंदना अत्रे आणि डॉ. नीरजा कणीकर यांनी ही माहिती दिली.

दि. ३० आणि ३१ रोजी दिवसभर चालणारी ही कार्यशाळा डॉ. सुळे यांच्या पाटील लेन येथील क्लिनिकमध्ये होणार आहे. अधिक माहितीसाठी वंदना अत्रे यांच्याशी ९९६०८००२५८ या क्रमांकावर किंवा डॉ. नीरजा कणीकर यांच्याशी ९४२३९६९५९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

यासंदर्भात होणार मार्गदर्शन

दोन दिवसांच्या या कार्यशाळेत कॅन्सर रुग्णांसाठी योग्य आणि पोषक आहार, मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी विविध तंत्र, उपचारांदरम्यान अशी घेतली जावी शरीराची काळजी याचबरोबर आर्ट थेरपीचा उपचारांदरम्यान होणारा फायदा अशा विविध महत्त्वाच्या गोष्टींवर तज्ज्ञ व्यक्तींची सत्रे होणार आहेत. चर्चा, परस्पर संवाद, प्रश्नोत्तरे असे या कार्यशाळेचे स्वरूप राहील. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ऋचा सुळे, डॉ. तेजा कुलकर्णी, डॉ. विजयलक्ष्मी गणोरकर, आहारतज्ज्ञ अश्विनी देशमुख, आर्ट थेरपिस्ट सोनाली जोशी आदी ही सत्रे घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मजुरांवर काळाचा घाला!

$
0
0

मालेगाव तालुक्यात तलावात ट्रॅक्टर उलटून सात महिलांचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील वडेल येथील शेतमजूर महिलांवर मंगळवारी (दि. २४) काळाने घाला घातला. अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर तलावात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात सात शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला, तर दहापेक्षा अधिक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतातील कामे आटोपून १५ ते २० महिला ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून घराकडे परतत असताना हा अपघात झाला. गंभीर जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मंगळवारी सायंकाळी ढवळीविहीर येथील शेतातून कांदा लागवड आटोपून अजंग येथील एका ट्रॅक्टर ट्रॉलीत १५ ते २० मजूर महिला अजंग गावाकडे परतत होत्या. या रस्त्यावर पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ढवळीविहीर तलावाजवळून जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली थेट तलावात कोसळली. यावेळी ट्रॉलीतील काही महिला तलावात बुडाल्या, तर काही ट्रॅक्टरखाली अडकल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. परिसरातील नागरिकांना घटनेचे माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले. सायंकाळी अंधार होत असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. दाभाडी, अजंग, वडेल परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने तेथे मोठी गर्दी झाली होती. अग्निशामक दल, पोलिस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.

या दुर्दैवी अपघातात मृत झालेल्या महिलांचे मृतदेह मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तसेच गंभीर जखमी महिलांना सामान्य रुग्णालयासह, दाभाडी, वडेल येथील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालय परिसरात मृत तसेच जखमींच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दिवाळीसणाच्या लगबगीत अशी दुर्दैवी घटना घडल्याने अजंग गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत महिलांची नावे

संगीता किशोर महाजन, रोहिणीबाई रतन शेलार, संगीता गोवर्धन भदाणे, उषा गणेश भदाणे, आशाबाई जगन मळके, सुनंदा रघुनाथ शेलार, रंजना किसान महाले (सर्व रा. वडेल). दरम्यान, अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी, अशा मागणीचे पत्र राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. भुसे यांनी रात्री उशिरा मालेगाव रुग्णालयात जखमींची भेट घेतली.

गंभीर जखमींची नावे

वंदना रमेश सोनवणे, ताईबाई अभिमान मंडाले, गायत्री अभिमन मंडाले, सुवर्णा अनिल भदाणे, कमल प्रकाश गोविंदा, निर्मला बारकू सावळे, लताबाई नाना शेलार, शहाबाई सुभाष शेलार, नवलेआई लक्ष्मण शेलार, संगीता शाम बोरसे (सर्व रा. वडेल)

पंचवटीत भिंत अंगावर पडून मजुराचा मृत्यू

पंचवटी : सरदार चौक येथे पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना भिंत अंगावर पडून मजूर सोमनाथ भागीनाथ गाढवे (वय ३८, रा. शेरेमळा, गणेशवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल मंगल कार्यालयात पाइपलाइनचे ठेकेदार श्रीराम बन्सी जाधव यांनी काम घेतले होते. ठेकेदारास भिंत पडावयास आलेली असल्याचे माहित असूनदेखील सुरक्षेचे कोणतेही उपाय केले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी ठेकेदारास ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातमाळ रांगेतील हतगड

$
0
0

नाशिक येथील हतगड किल्ला एक निसर्गरम्य व पर्यटन स्थळ. अकबर बादशहा अन् छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील पैलू उलगडण्याचे कसब अंगाशी बाळगून असलेला हतगड किल्ला आपल्या अंगाखांद्यावर आजही इतिहासाच्या पाऊलखुणा मिरवताना दिसतो. अनेक लपलेल्या पैलूंवर येथील किल्लेदारे मोरेंचे वंशज प्रकाश टाकतात, तर हतगडवाडीचे पूर्वीचे वैभव मात्र हिरावले गेले आहे. हतगडवाडीच्या खाणाखुणा आता शोधाव्या लागतात. पण, अजूनही हतगडवाडीतील किल्ल्याचे किल्लेदार गोगाजीराव मोरे यांची समाधी येथील पराक्रमाची साक्ष देत आहे.
महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. ज्या दुर्गप्रेमींना किल्ल्यांची आवड आहे, अशांनी हतगड किल्ला जरुर पहावा. नाशिकहून वणीगावात आल्यावर सप्तश्रृंगी देवीकडे न जाता सापुताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचे. तेथून २० किलोमीटरवर गेल्यावर उजव्या हाताला आडवा पहुडलेला एक पाषाण आपल्याला आकर्षित करतो. हा पाषाण म्हणजेच हतगड.
शंभर उंबऱ्यांची हतगडवाडी आता आधुनिक रिसॉर्ट संस्कृतीचे रूप धारण करू लागली आहे. हतगड किल्ला व परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे. हतगडाची सफर आता खूप सोपी झाली आहे. वरपर्यंत गाडीने जाता येते तर गडाच्या पूर्वेकडे नव्याने पायऱ्यांची पायवाट बनविण्यात आली आहे. या पायवाटेने वर गेल्यावर हतगडाच्या पायथ्याशी स्थिरावलेली हतगडवाडी पहायला मिळते अन् पूर्वीचे गाव कसे असेल याची प्रचितीही येते. उभ्या कातळात कोरलेले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अन् त्यानंतर चार उपप्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करता येतो.
पाहण्यासारखी ठिकाणे
गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात. पहिल्या दरवाजाच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते. येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. गडाच्या पहिल्या दरवाजाचे फक्त खांब शिल्लक आहेत. या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत. या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुसऱ्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगासारख्या दरवाज्यातून आत जाता येते. दरवाजाच्या बाजूला एक गुहासुद्धा कोरलेली आहे. यात पाण्याची तीन टाकी आहेत. या दरवाजातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो. गडमाथा खूप विस्तीर्ण आहे. दरवाजातून वर आल्यावर पायऱ्यांची एक वाट डावीकडे खाली उतरते. येथे मोठी तटबंदी आहे. समोरच एक पीर आहे. उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे. पाण्याचे एक टाके आहे. दरावाजाच्या उजवीकडची वाट धरावी. येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते. थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात. येथे एक बुरुजवजा इमारतही आहे. थोडे खाली उतरल्यावर पाण्याचा एक तलाव आहे. यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे. तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठारदेखील आहे. किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे. तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे. ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसऱ्या टोकाला जाते. वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुसऱ्या टोकाला एक बुरुज आहे. असा हा हातगड नाशिकपासून १०० किमीवर आहे. किल्ल्याचे मोठे पठारदेखील आहे. किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.
(संकलन- फणिंद्र मंडलिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रिटिशकालीन शाळेस ‘आयएसओ ९००१’

$
0
0

दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांच्या योगदानाचे फलित

नाशिक : डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडे बघण्याचा समाजाचा पूर्वग्रह फारसा चांगला नाही. अनेक शाळांचा घसरलेला दर्जाही या पूर्वग्रहात भरच घालत असल्याचे वास्तव आहे. पण या पूर्वग्रहाला छेद देत शंभरी ओलांडलेली आदिवासी भागातील शाळा ‘आयएसओ : ९००१’ प्रमाणपत्र मिळविण्यात यशस्वी ठरली आहे.

दिंडोरी या आदिवासीबहुल तालुक्यातील मडकीजांब येथील शाळेने चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर लोकसहभागाच्या आधारावर हे प्रमाणपत्र मिळविण्याचे स्वप्न पूर्ण केले. मडकीजांबमध्ये आजमितीस सुमारे तीन हजारावर लोकवस्ती आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव अवघे दहा किमीच्या परिघात असले तरीही परिसरातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना बड्या शाळांचा पर्याय सहजासहजी परवडत नाही. दुसरीकडे पटसंख्या स्थिर ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शाळांसमोरही नव्याने होऊ घातलेल्या बड्या शाळांचे आव्हान कायम असते. या स्थितीत ब्रिटिशकालीन असलेल्या मडकीजांब जिल्हा परिषद शाळेने २०१४ पासून एक स्वप्न पाहिले.

सन १९०४ ची स्थापना असलेली ही शाळा शतकानंतर मोडकळीस आली होती. शाळेच्या इमारतीची अवस्था, वर्गखोल्यांची स्थिती, अभ्यास साधनांची अनुपलब्धता, वाचनालयाची दुर्दशा, स्वच्छतागृहांची बिकट स्थिती अशा ओझ्याने मोडकळीस आलेल्या शंभरीतील जर्जर शाळेचा कायापालट करण्याचा संकल्प शतकपूर्ती वर्षात शाळेतील सात शिक्षक आणि एक मुख्याध्यापक अशा आठ जणांच्या स्टाफने सोडला. ‘ई लर्निंग’च्या प्रकल्पापासून शाळेच्या कायापालटला सुरुवात झाली.

मदतीसाठी सरसावले हात

शाळेच्या जीर्णोध्दारास सुरुवात झाली तेव्हा शाळेला ‘आयएसओ : ९००१’ प्रमाणपत्र मिळवून देण्याचे स्वप्न सर्वांनी बाळगल्याचे येथील शिक्षक साहेबराव गुंजाळ सांगतात. गावातल्या विद्यार्थ्यांसाठी परिसरातील एकेक घटकास आवाहन केल्यानंतर प्रत्येकाने थोडे-थोडे दान शाळेच्या पदरात टाकले. परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांनीही यात मोलाचा वाटा उचलला. ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारीवर्गानेही शंभरी जगण्याच्या शाळेच्या उध्दारासाठी हातभार लावला. या लोकवर्गणीतून जमलेल्या सुमारे ६ लाख ७ हजार ३४५ रुपयांच्या मदतीवर शाळेने नुकतेच ‘आयएसओ ९००१ : २०१५’ हे गुणवत्ता धारण करण्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता दडलेली असते. मडकीजांब शाळा परिवाराची इच्छाशक्ती आणि गाव परिसराची मिळालेली साथ या जोरावर मडकीजांब जिल्हा परिषद शाळेने ‘आयएसओ ९००१ : २०१५’ हे गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळविले आहे.

- साहेबराव गुंजाळ, शिक्षक, मडकीजांब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतींच्या मुलीला डेंग्यू?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांच्या मुलीलाच डेंग्यूसदृश आजार झाल्याचे उघड झाले आहे. यंदा सिडकोतील सर्वच शिवसेना नगरसेवकांनी डेंग्यू होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, याबाबतची पत्रके वाटली होती. मात्र, प्रशासन व आरोग्य विभागाला याची चिंता नसल्याचे दिसून येत आहे.

सिडको प्रभागात सिडकोच्या योजनांसह लगतच्या वनवसाहतींमध्ये स्वच्छताच केली जात नसल्याचे वारंवार दिसून येते. अनियमित घंटागाड्यांबरोबरच सिडकोत कुठेच योग्य पद्धतीने धूर फवारणी होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व नगरसेवकांकडून वारंवार केल्या जात असतात.

सिडकोतील नगरसेवक सुधाकर बडगुजर, डी.जी. सूर्यवंशी, शाम साबळे, सुवर्णा मटाले यांनी यावर्षी डेंग्यू होऊ नये म्हणून घ्यावयाच्या दक्षतेबाबतची पत्रके वाटली. सिडकोचे प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांच्या मुलीलाच डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे समजले असून, प्रशासनाला याबाबत त्यांनी संपर्क केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. येत्या काळात आरोग्य विभाग व मलेरिया विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याशी अशा पद्धतीने खेळ झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींचीच ही अवस्था तर सामान्यांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.


दिवाळीपूर्वी संपूर्ण सिडको विभागात स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत आरोग्य विभागाला कळविण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही. धूर फवारणी करताना निष्कृष्ट दर्जाचे औषध वापरण्यात येत असून ठेकेदाराच्या मुजोर कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

- सुदाम डेमसे, प्रभाग सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो खाद्यपाकिटे फेकली उघड्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलनगरी भागात हजारो खाद्यपाकिटे उघड्यावर फेकल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक तथा सभागृहनेता दिनकर पाटील यांना कळविल्यानंतर

त्यांनी महापालिका प्रशासनाला तत्काळ माहिती दिली. संबंधित अन्नपाकिटे फेकणाऱ्यावर महापालिका तसेच अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी सभागृहनेता पाटील यांनी केली आहे.

खाद्यपाकिटांची संख्या हजारोंच्या घरात होती. ही पाकिटे गोळा करण्यासाठी तब्बल चार मागविण्यात आल्या. या चारही घंटागाड्या या पाकिटांनी भरल्या होत्या. एक्स्पायरी डेट संपलेली ही पाकिटे उघड्यावर टाकण्यात आल्याने काही नागरिकांनी खाण्यासाठी नेल्याचेही सांगण्यात आले. मुदत संपलेल्या या पाकिटांमुळे कोणाला विषबाधा झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल सभागृहनेता पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलनगरी भागात नेहमीच घाण-कचरा टाकला जातो. अनेकदा स्थानिक रहिवाशी व नगरसेवक महापालिकेकडे समस्या मांडत असतात. परंतु, याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग लक्ष देत नसल्याने जलनगरी भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच जलनगरी भागात उघड्यावर मांस

टाकण्याचे प्रकारही नेहमीच घडत असतात. मात्र, आता खट्टा-मिठा प्रकारच्या खाद्यान्नाची हजारो पाकिटे

उघड्यावर टाकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाच ते दहा रुपये किंमत असलेली ही पाकिटे टाकली कोणी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पहाटे फिरायला गेलेल्या पोपट आहेर यांना उघड्यावर पडलेली ही ‘खट्टा-मिठा’ची पाकिटे दिसली. यानंतर त्यांनी सभागृहनेता पाटील यांना माहिती दिल्यानंतर महापालिकेची यंत्रणा जागी झाली. जलनगरी भागात चार ते

पाच ठिकाणी मोठ्या वाहनांतून ही पाकिटे टाकण्यात आली होती. आरोग्य विभागाचे कर्मचारी व घंडागाडी कर्मचाऱ्यांनी ही पाकिटे गोळा करुन खत प्रकल्पात नेली. महापालिकेचे अधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पाकिटातील अन्नपदार्थाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. संबंधित व्यापाऱ्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


पाकिटातील पदार्थ खाऊ नका!

उघड्यावर पडलेली आणि भरलेली ही हजारो ‘खट्टा-मिठा’ची पाकिटे पाहिल्यानंतर अनेक रहिवाशांनी ती खाण्यासाठी घरी नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यातील अन्नपदार्थांची मुदत संपलेली असून, हे अन्न खाल्ल्यास विषबाधा होऊ शकते. त्यामुळे यातील पदार्थ कोणीही खाऊ नये.

कारवाई हवी

अशा प्रकारे अन्नपदार्थ उघड्यावर फेकून देणे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. ही पाकिटे कोणी आणि का फेकली, याबाबत चौकशी होणे गरजेचे असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

जलनगरी भागात स्वच्छता केली जात नसल्याने आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यातच हजारो खट्टा-मिठाची पाकिटे उघड्यावर टाकणारे कोण आहेत, याचा शोध महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. तसेच संबंधित व्यापाऱ्यावर

तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा.

- दिनकर पाटील, सभागृहनेता

पहाटे नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी जलनगरी भागात आलो असता अन्नपदार्थांची हजारो पाकिटे उघड्यावर पडली असल्याचे दिसले. यानंतर नगरसेवक पाटील यांना फोन केल्यावर महापालिकेची घंटागाडी उघड्यावर पडलेली पाकिटे उचलण्यासाठी आली. यातील काही पाकिटे नागरिकांनी नेली आहेत.

- पोपट आहेर, प्रत्यक्षदर्शी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images