Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अबब! साठ ट्रक चपला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड लिंकरोडवर असलेल्या अनधिकृत भंगार बाजाराचे अतिक्रमण काढताना रोजच नवीन किस्से समोर येत आहेत. खाडी भागात असलेल्या आझादनगर येथे एका भंगार व्यावसायिकाने तब्बल साठ ट्रक स्क्रॅप चपला साठविल्या होत्या. आता या चपला येथून उचलण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.

या चपला येथून हलविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन लाख रुपये खर्च येणार आहे. परंतु, संबंधित भंगार व्यावसायिकाला नाममात्र दंड होणार आहे. आझादनगर येथे एका भंगार व्यावसायिकाने तब्बल साठ ट्रक स्क्रॅप चपला साठवून ठेवल्या होत्या. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दोन जेसीबी लावून या सर्व चपला खत प्रकल्पावर टाकल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने भंगार व्यावसायिकाने चपलांचा साठा केला होता. पावसाळ्यानंतर वीटभट्टी चालकांकडून भट्टीत जाळण्यासाठी या चपला खरेदी केल्या जातात. कोळशाचे भाव परवडत नसल्याने बहुतांश वीटभट्टीचालक चपलांचा वापर विटा भाजण्यासाठी करतात, असे या जाणकारांचे म्हणणे आहे.


हटविण्यासाठी दोन लाख खर्च, दंड नाममात्र!

या चपला उचलण्यासाठीचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून होणार आहे. तथापि, ज्याने चपला साठविल्या त्या व्यावसायिकाला नाममात्र दंड होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेकडून या व्यावसायिकांच्या फायद्याचा विचार केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शिवाय, अतिक्रमण काढताना एका कोळसा डेपोचालकाला पहिल्याच दिवशी सगळा कोळसा क्लब हाऊसवर टाकण्यास सांगितले जाते, तर दुसऱ्या कोळसा डेपोचालकास कोळसा उचलण्यास तीन दिवस मुदत दिली जाते, असा दुजाभाव का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सोशल’ बदनामीप्रकरणी कठोर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिबेटियन मार्केटबद्दल सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी पोलिसांकडे केली आहे. सरकारवाडा पोलिसांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून तिबेटियन मार्केटबद्दलचा बदनामीकारक मजकूर व्हायरल झाला आहे. येथील व्यावसायिकांकडून विक्री होत असलेल्या मालाबाबत चुकीची माहिती त्याद्वारे पसरविण्यात येत आहे. निवेदनात म्हटल्यानुसार, तिबेटियन मार्केटमधील व्यापाऱ्यांनी कष्टाने व्यवसाय उभे केले असून, नेहमीच ग्राहकांचे हित जोपासले आहे. ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेचे कपडे परिधान करता यावेत यासाठी प्रतिष्ठित कंपन्यांचा मालच ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो. तरीही येथील कपडे आरोग्यास अपायकारक असल्याच्या अफवा काही विघ्नसंतोषी लोक व्यावसायिक स्पर्धेतून उठवित अाहेत. येथील कपडे, तसेच अन्य वस्तूंमूळे कुणालाही शारीरिक इजा अथवा बाधा झाली नसतानाही मार्केट, तसेच व्यावसायिकांची बदनामी सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दिवाळी काळात जाणीवपूर्वक असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करून आमच्या मार्केटची बदनामी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.


शहरवासीयांनी साधली खरेदीची पर्वणी

किफायदशीर किमतीत चांगल्या गुणवत्तेचे कपडे मिळण्याचे ठिकाण, असा नाशिककरांचा विश्वास तिबेटियन मार्केटने संपादित केला आहे. दिवाळी अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने अबालवृद्धांची पावले कपडे खरेदीसाठी तिबेटियन मार्केटकडे वळू लागली आहेत. कपड्यांच्या असंख्य व्हरायटीज् ग्राहकांना खुणावत असल्याने शनिवार आणि रविवारच्या सुटीत नाशिककरांनी येथे खरेदीची पर्वणी साधली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्यांचं तुटलेपण दूर करण्यासाठी अनामिकची धडपड

$
0
0

नाशिक ः अनामिक (नाव बदलले आहे) साधारण पंचविशीतला मुलगा. आईवडिलांच्या नात्यातील तणाव लहानपणापासून त्याने भोगला. एके दिवशी तर आई-बाप भांडून वेगळे झाल्याने त्यांच्या एकत्रित प्रेमालाही तो पारखा झाला. या परिस्थितीतनं मात्र तो जाणीव घेऊन उभा राहिला... खरं तर कुठल्याही शहरातील तणावग्रस्त कुटुंबातील प्रातिनिधिक वाटावी अशी ही कहाणी. मात्र, या खऱ्या कहाणीचा ट्विस्ट पुढे आहे..

बालपणापासून तशी घरची सुबत्ता असल्याने अनामिक म्हणेल ती गोष्ट त्याच्या पुढ्यात होती. मात्र, घरातील कौटुंबिक कलहामुळे त्याच्यापर्यंत एकच गोष्ट पोहोचू शकणार नव्हती, ती म्हणजे मायेचा ओलावा. आई-बाप उशाशी असूनसुद्धा त्यांच्या मायेला पारखं होण्याची करुण वेळ कोवळ्या वयात आल्याने तेव्हापासूनच अनामिक अबोल बनला. ते वेगळे झाल्यानंतर अंतर्मुख झालेल्या या पोराने स्वत:च स्वत:ला सांभाळत एका करिअरच्या दिशेने वाटचाल सुरू केली. अपेक्षित ठिकाणी प्रवेश घेऊन त्याने अभ्यासही सुरू केला. मात्र, तो अलिप्त राहत होता. त्याच्या प्रभावी वक्तृत्वाविषयी मित्रांना ठाऊक होते. त्याच्यात चांगला वक्ता दडला असतानाही त्याचं शांत बसणं, सर्वांपासून तुटक वागणं मित्रांसोबत मार्गदर्शकांनाही खटकत होतं. एके दिवशी सरांनी त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या विचारांमध्ये अतिशय चांगली मूल्ये आणि मांडणी असल्याचे त्यांना जाणवले. खात्रीसाठी त्याची मांडणी वाचण्या आणि ऐकण्यालाही मार्गदर्शकांनी प्राधान्य दिले. त्यानंतर अनामिक भराभर उलगडत गेला अन् त्याने बालपणापासून ते आजवरचा प्रवास कथन केला. मनातनं कणखर असणारा हा विशीतला पोरगा मात्र एका ध्येयाच्या चिंतनात सातत्याने राहत असल्याचे मार्गदर्शकांना जाणवले. त्याचं ध्येय एक दिवस समजावून घेताना या विषयातलं गांभीर्य मार्गदर्शकांपुढे अधोरेखित झाले. अनामिक म्हणाला, ‘‘आई-वडिलांच्या टोकाच्या मतभेदाने तुटणारी, एकलकोंडी बनणारी अनेक मुले आहेत. मोठ्या माणसांच्या चुकांमुळे अनेकदा कोवळी आयुष्ये खुरटी होतात. मला शक्य तितक्या माझ्यासारख्या मुलांची मदत करायला हवी. त्यांच्या अस्वस्थ स्पंदनांना साद द्यायला हवी. त्याच्यासाठीच मला शिक्षण घेऊन लवकरच या पुण्यकर्माला लागायचं आहे. सर, पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवाल ना?’

त्याच्या या उत्तराने क्षणभर स्तब्ध झालेले मार्गदर्शक ‘मना सज्जना’ मालिकेसाठी या प्रसंगाच्या मांडणीमधून संदेश देत होते, ‘नाती जपताना आपल्यात दडलेला टोकाचा अहंकार, प्रतिष्ठा, वर्चस्व आदी दुर्गुणांचे कळत-नकळत होणारे पोषण आपल्याच कोवळ्या जिवांचं जगणं खुरटत असतं. या स्थितीतही अनामिकच्या जीवनाला प्रेरक दिशा मिळाली, ही सकारात्मक बाब आहे; पण प्रत्येक अनामिक यातून सावरेल याची शाश्वती नाही. म्हणून असे अनामिक एकटे पडू नये यासाठी दुर्गुण सोडून एकमेकांना नात्यांनी जसे आहात तसेच स्वीकारायला हवे,’ असा अनामिकच्या सरांचा अनुभव आज असंख्य कुटुंबातील घुसमटीची कथा बनून बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आली दिवाळी दिवाळी...

$
0
0

आली दिवाळी दिवाळी...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीची खरी सुरुवात होते ती अश्विन कृष्ण द्वादशी, गोवत्स द्वादशीस म्हणजेच वसुबारस या सणापासून. आज, सोमवारी (दि. १६) वसुबारस असल्यामुळे आजपासूनच या लखलखत्या दीपोत्सवाचा प्रारंभ होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला रविवारी शहरातील सर्वच बाजारपेठा गर्दीने ओसंडल्याचे दिसून आले.

गाय आणि वासराच्या पूजेचे महत्त्व असलेला वसुबारस हा दिवाळीच्या दिवसांपैकी पहिला दिवस. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गाय, वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी घरातील महिला गायीच्या पायावर पाणी घालतात. गायीला वस्त्र अर्पण करतात. शिंगे व खुरांना हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून, गायीचे व वासराचे औक्षण करून त्यांना नैवेद्य खाऊ घातला जातो. आजकाल गोशाळांमार्फत या दिवशी वसुबारस पूजेचे आयोजनही करण्यात येते. ज्यांना जवळपास कुठेच गाय उपलब्ध होत नाही, ते घरच्या घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय-वासराचे चित्र रेखाटतात व त्याची पूजा करून नैवेद्य दाखवतात.



आज गोवत्स पूजन

पंचवटी ः तपोवनातील नवीन शाही मार्गावरील कृषी गो-सेवा ट्रस्टतर्फे आज (दि. १६) दुपारी ४ वाजता वसुबारसनिमित्त गोवत्स पूजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथील नंदिनी गोशाळेमार्फत आज दुपारी ४ ते ६ या वेळेत वसुबारस साजरी केली जाणार असून, यावेळी गाय व वासराचे पूजन होणार आहे. या पूजेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गाय म्हणजे लक्ष्मीचे स्वरूपच मानले जाते. आपल्या कृषिप्रधान देशात गाय हे एक धनच आहे. त्यामुळे गायीला गोधन असेही संबोधण्यात येते. भगवान कृष्णांनीही आजच्या दिवशी गाय-वासरांचे पूजन करावयास सांगितल्याचे मानले जाते. त्यामुळे हे पूजन करतात. याला कोणताही विशेष मुहूर्त नाही. पूर्वी गायी दिवसभर चरायला जात व सायंकाळी परत येत. त्यामुळे सायंकाळीच हे पूजन केले जाते.

- सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयीपेक्षा गैरसोयच अधिक

$
0
0

ताहाराबाद बस स्टँड

सोयीपेक्षा गैरसोयच अधिक


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

ताहाराबाद बस स्टँडवरील स्वच्छतागृह म्हणजे काय, तर चार भिंतींचा सांगाडा अन् सोयीपेक्षा गैरसोयच अधिक. अगदी शरमेने खाली मान घालावी इतकी दुर्दशा. पण, सांगणार तरी कुणाला? हे सारे चित्र आहे ताहाराबाद येथील बस स्टँडच्या महिला स्वच्छतागृहाचे.

विंचूर-शहादा प्रकाशा राज्य महामार्गावरील गुजरात राज्याला जोडणाऱ्या ताहाराबाद बस स्टँडवर गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक राज्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचा राबता असतो. मात्र, नियोजनशून्य कारभार असलेल्या या बस स्टँडमध्ये महिला प्रवाशांच्या स्वच्छतागृहाची वानवाच दिसून येत आहे.

ताहाराबाद बस स्टँडवर दिवसभरात हजारो पुरुष व महिला प्रवासी ये-जा करीत असतात. मात्र, महिलांसह अन्य प्रवाशांसाठी या ठिकाणी स्वच्छतागृहाची चांगल्याप्रकारे सोयच नसल्याने सर्वांनाच मोठी गैरसोय सहन करावी लागते.

या ठिकाणी विजेची सोयच नसल्याने सायंकाळनंतर असंख्य महिलांना स्वच्छतागृहात न जाता बस स्टँडमध्येच अाडोशाचा आधार घ्यावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. स्वच्छतागृहासाठी कोणत्याही प्रकारे ठेकेदार अथवा कर्मचारी न नेमल्याने येथे सारेकाही आलबेल आहे.

दुर्गंधीने काहींना भोवळ

या बस स्टँडलगतच पुरुष व महिला स्वच्छतागृह आहे. नाव स्वच्छतागृह असले, तरीही संपूर्ण अस्वच्छतेचे प्रतीक म्हणून ते उभे आहे. स्वच्छतागृहाला ना दरवाजा, ना पाण्याची सोय. संरक्षक भिंतीचाही अभाव असल्याने महिलांना येथील स्वच्छतागृहात जाणे अत्यंत अवघडल्यासारखे वाटते. स्वच्छतागृहाची स्थिती अत्यंत खराब असून, शिसारी येईल इतकी दुर्गंधी आणणारी आहे. त्यामुळे महिलांना आजूबाजूला बघून व सोबत अन्य महिलेला घेऊनच येथे जावे लागते. येथील दुर्गंधीमुळे काहींना भोवळ आल्याचेही प्रवासी सांगतात.


-----------

दिंडोरी बस स्टँड

दुर्गंधीने स्वच्छतागृहात जाणेही अवघड


म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

नाशिक-कळवण या राज्य महामार्गावरील दिंडोरी बस स्टँडची निगा राखली जात नसल्याने ते अस्वच्छतेचे आगार बनले अाहे. येथील स्वच्छतागृह नावापुरतेच राहिले असून, दुर्गंधीमुळे येथे प्रवेश करणेही अवघड होत आहे. त्याचे दरवाजे, खिडक्याही पूर्णपणे तुटलेल्या अाहेत. या स्वच्छतागृहावर लाखो रुपये खर्च होऊनही त्याची योग्य निगा राखली जात नसल्याने सारा पैसा घाणीत जाऊन जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

बस स्टँडच्या बाजूला मोठे गवत फोफावलेले असून, याठिकाणी कचरा व घाण साचली आहे. येथे स्वच्छता मोहीम राबविताना जनता इंग्लिश स्कूल व नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. परंतु, पेठ डेपो व एसटी महामंडळ यांच्याकडून स्वच्छ भारत अभियानाची ऐशीतैशी झाली आहे. यावर एस टी महामंडळाने लक्ष देऊन स्वच्छता करावी अशी मागणी प्रवाशी व ग्रामस्थ यांनी केली आहे.

या बस स्टँडवर दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक तुषार वाघमारे यांच्या पुढाकाराने एका कंपनीच्या सीएसआर निधीतून स्वच्छतेचा संदेश देणारा स्टॅच्यू उभारलेला अाहे. ही चांगली कल्पना नगरपंचायतीतर्फे राबविली जात आहे. पण, या स्टॅच्यूपासून चांगला संदेश घेण्याऐवजी शेजारी शंभर फुटांवर स्वच्छतेची ऐशीतैशी होत आहे. परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाने येथील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करावे, स्वच्छता कर्मचारी, पहारेकरी नेमावेत, अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांनी केली आहे.

--

विद्यार्थिनी अन् महिलांची गैरसोय

या बस स्टँडच्या दुरवस्थेमुळे खेड्यापाड्यांवरून येणाऱ्या विद्यार्थिनी, तसेच महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होते. येथे स्वच्छता नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. नावाच सुलभ असलेले हे शौचालय सर्वच दृष्टींनी असुलभ आहे. सुलभचा कंत्राट कालावधी संपल्याने तेथील एक जुनी कर्मचारी महिला स्वच्छतागृहाचा जे कुणी वापर करतील त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह करीत तिच्या परीने बस स्टँडची साफसफाई करीत आहे. दिंडोरी बस स्टँड हे पेठ आगाराला जोडलेले असून, येथे स्वच्छता कर्मचारी किंवा रात्रीचा पहारेकरी नेमलेला नसल्याने स्वच्छतेबरोबरच सुरक्षाही रामभरोसे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोर अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

स्वतःचे संपर्क क्रमांक प्रवाशांना देण्याच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन जवानांच्या अभिनव उपक्रमामुळे मुंबई- हावडा एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकणारे चारपैकी दोन दरोडेखोर रेल्वे सुरक्षा बलाच्या जाळ्यात सापडले. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव ते भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अभिनव कल्पना वापरणाऱ्या मुंबई रेल्वे सुरक्षा बलातील करम पाल व अंकुर खोकार या दोन कॉन्स्टेबलनी ही कामगिरी केली असून, त्यांच्या या कामगिरीतून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या उक्तीची प्रचीती आली. विशेष म्हणजे ही घटना घडल्याप्रसंगी हे दोन्ही कॉन्स्टेबल्स चक्क ३०० किलोमीटर दूर होते.

मुंबई- हावडा एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे करम पाल व अंकुर खोकार या दोन कॉन्सटेबल्सची मंगळवारी रात्री ड्युटी होती. या दोन्ही कॉन्सटेबलने आपले संपर्क क्रमांक असलेले कागद गाडीतील जनरल बोगीतील काही प्रवाशांना देऊन ठेवले. अडचण निर्माण झाल्यास तत्काळ संपर्क करण्याचे आवाहनही प्रवाशांना केले. नाशिक रोड रेल्वे स्थानकात गाडी सुमारे रात्री साडेबाराच्या सुमारास आली. या दोन कॉन्स्टेबल्सची ड्युटी नाशिकपर्यंतच असल्याने ते दोघेही नाशिकरोड रेल्वे स्थानकात उतरले व दुसऱ्या गाडीने पुन्हा मुंबईकडे परतले. हावडा एक्स्प्रेस नाशिकरोडहून पुढे रवाना झाल्यावर चाळीसगाव रेल्वे स्थानकापूर्वी या गाडीतील जनरल बोगीत चार दरोडेखोरांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली. या वेळी प्रवाशांनी प्रसंगावधान राखत थेट कॉन्स्टेबल करम पाल व अंकुर खोकार यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत गाडीत घडत असलेल्या प्रसंगाबद्दल माहिती दिली. या जवानांनी त्याच क्षणी रेल्वेच्या मुंबईतील रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. मुंबई नियंत्रण कक्षाने तातडीने भुसावळच्या रेल्वे सुरक्षा बल नियंत्रण कक्षाला कळविले. या नियंत्रण कक्षातून हावडा एक्स्प्रेसमध्ये ऑनड्युटी स्टाफला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जनरल बोगीकडे धाव घेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांची धरपकड केली. मात्र दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. मनोज एकनाथ पवार (वय ३५) व अमोल शंकर (वय १८) अशी या घटनेत अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. प्रसंगावधान राखणाऱ्या करम पाल व अंकुर खोकार या दोन रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचा मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक एस. के. जैन यांच्या हस्ते मुंबईत गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरी प्रदक्षिणेत हरिनामाचा गजर

$
0
0

अश्विन वद्य एकादशीनिमित्त त्र्यंबकला आयोजन

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अश्विन वद्य एकादशीच्या निमित्ताने हजारो वारकरी भाविकांनी रविवारी (दि. १५) ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हरिनामाचा गजर करीत पूर्ण केली. यावेळी श्री संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदीर संस्थान आणि श्री संत निवृत्तिनाथ महाराज भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून संत निवृत्तिनाथांची पालखी घेऊन वारकरी अश्विन एकादशीला प्रदक्षिणा करतात. श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांना योगीराज गहिनीनाथ यांचा अनुग्रह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर लाभला होता. त्यांनी तो धाकटे बंधू संत ज्ञानेश्वर माऊलीस दिला आणि भागवत धर्माची स्थापना झाली. आज विश्वात मानवतेचा संदेश देणारी भावी पताका सर्वदूर पोहचली आहे. त्याप्रित्यर्थ वारकरी अश्विन वद्य एकादशीस संत निवृत्तिनाथांची पालखीमध्ये वयोवृद्ध महिला, बालके यांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

ही प्रदक्षिणा जवळपास ३६ किलोमीटरची होती, यामध्ये अभंग म्हणत आणि 'माऊली जय हरी' अशी साद घालत उत्साहात पार पडली. शनिवारी (दि. १४) सायंकाळपासून वारकरी शहरात दाखल झाले होते. रविवारी, सकाळी ६ वाजेपासून त्यांनी प्रदक्षिणेस सुरुवात केली. सात वाजेच्या सुमारास श्री संत निवत्तिनाथ महाराजांच्या पादुका असलेली पालखी कुशावर्तावर आली तेथे पूजाविधी होऊन स्नान झाले. तेव्हा मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी जयंत महाराज गोसावी आदींसह गावोगावचे नियमित महिन्याच्या वारीस येणारे वारकरी उपस्थित होते. तर नाथांची पालखी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मंदिरात परत आली तेव्हा येथे विश्वस्त मंडळाने वारकरी बांधवांचे स्वागत केले. प्रदक्षिणा मार्गावर संस्थानच्यावतीने फराळ व्यवस्था केली होती. यावर्षी १५ हजारांपेक्षा अधिक भाविक यात सहभागी झाले होते, अशी माहिती जयंत महाराज गोसावी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भात कापणीसाठी धावपळ

$
0
0

त्र्यंबकेश्वर शिवारात पावसाने नुकसान; बळीराजाच्या चिंतेत वाढ

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिक शहरासह जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्र्यंबकेश्वरला पाऊस सुरूच असल्याने भाताच्या पिकाचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हे सकाळी पावसाच्या गैरहजेरीत जमेल तसे भाताच्या कापण्या करून घेताना दिसत आहेत. जेणेकरून पावसाच्या येण्याअगोदर पिकाचे नुकसान होणार नाही.

त्र्यंबकेश्वरला शेतकरी हे सकाळी सहसा पाऊस नसल्याने उन्हाची ताप मिळते तेव्हा भात कापणी करून शेताच्या बांधावर जागा मिळेल तेथे ताडपत्री टाकून भात झोडून घेत आहेत. तसेच त्याला तयार करून तेथेच सुपाने उफणणी करून दुपारनंतर आकाश काळोखाच्या अगोदर घराची वाट धरताना दिसत आहेत. आता दिवाळीच्या शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने शेतकऱ्यांची मुले-मुली त्यांना मदत करीत आहेत.

शेतकरी जमेल तसा कापणी हंगामास सामोरा जात असून, शेत शिवारातील चित्र अत्यंत धक्कादायक असे आहे. शेतकऱ्यांचा भात पिकासाठी आतापर्यंत पेरणी पूर्व मशागतीपासून आवणी आणि निंदणीवर मोठा खर्च झालेला आहे. असे असताना हाती रोकड नसलेला शेतकरी सततच्या पावसाने अत्यंत हातघाईला आलेला आहे. भात पीक पावसाने भिजत असल्याने धावपळ करीत त्याला तातडीने तयार करून विकून पैसे मोकळे करण्याच्या प्रयत्नात आहे. पावसाने पीक खराब होण्यापेक्षा ते घरात आणून मालाला बाजारात चांगला भाव मिळणार नाही, ही चिंताही त्याला सतावत आहे. नागली, वरई यांची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नाही. सरकार यंत्रणांना लोकप्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत.

मात्र गतवर्षी पेरणी झाल्यानंतर झालेल्या नुकसानींचे पंचनामे झाले पण त्याची भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने त्रस्त झालेला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वळवाच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने भात पीक संकटात आले आहे. त्र्यंबक परिसरातील कापणी झालेले भाताचे पीक आता खराब झाले असून, त्यासाठी शेतकरी चिंतेत आहे. त्याचबरोबर त्यांच्या शिवारात उभे असलेले भाताचीदेखील प्रतवारी घटण्याची शक्यता वाढली आहे. या भीतीने शेतकरी आता आपापल्या भातपीकाच्या कापणीसाठी सरसावला आहे. भाताला अगोदरच उत्पादन मूल्यापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यात आता सतत सुरू असलेल्या पावसाने बळीराजाच्या अडचणी वाढवल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतूक पोलिसांवर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भद्रकाली, तसेच मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीत कर्तव्य बजावत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर वाहनचालकांनी हल्ला केला. या प्रकरणी संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी, तसेच हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असल्याची टीका झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे प्रमाण कमी केले. मात्र, त्यानंतर असे हल्ले झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फेम टॉकीजजवळ हाणामारीची पहिली घटना घडली. या ठिकाणी शहर वाहतूक शाखेच्या युनिट चारचे पोलिस शिपाई नंदू भागवत गवळी कर्तव्य बजावत असताना त्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. नंदू गवळी सिग्नलवर वाहतूक नियंत्रणाचे काम करीत असताना एमएच १५/ईसी. ८६६५ या दुचाकीवरील सुभाष हुळहुळे (वय ३०, रा. वडगाव पिंगळा, ता. सिन्नर) व त्याच्या साथीदाराने सिग्नल तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पुढे उभे असलेल्या गवळी यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दुचाकी थांबवली. संशयितांकडे सिग्नल तोडल्याचे कारण विचारत वाहनाचे पेपर मागितले. या वेळी संशयित आरोपींनी गवळी यांच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली. वाद वाढल्यानंतर थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी, तसेच कलम ३३२ आणि मोटार वाहन कायद्यातील ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. हवालदार एस. डी. आहिरे तपास करीत आहेत.

दुचाकी अंगावर नेली!

दरम्यान, वन वे मधून जाण्यास प्रतिबंध करणाऱ्या पोलिसाच्या अंगावरच वाहन घालून त्याला जखमी करण्याची घटना शालिमार येथील देवी मंदिरासमोर घडली. या प्रकरणी नीलेश भगवान पाटील (वय ३१, श्रीकला अपार्ट., फ्लॅट क्र. ६, एकता कॉलनी, इंदिरानगर) या संशयिताविरोधात भद्रकाली पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत भद्रकाली पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक यतीन प्रल्हाद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना शनिवारी सांयकाळी सहाच्या सुमारास घडली. या ठिकाणी पवार आपले कर्तव्य बजावत असताना संशयित त्याच्याकडील एमएच १५/एफजे ६४२५ या दुचाकीवर वन वेमध्ये घुसताना दिसला. पवार यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला असता, त्याने दुचाकी थेट पवारांच्या अंगावर घातली. यात दुचाकीचे चाक पवार यांच्या पायावर गेल्याने दुखापत झाली. पीएसआय जोनवाल तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रज्वल दुहेरीत विजेता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत १३ वर्षांखालील वयोगटात नाशिकच्या प्रज्वल सोनावणे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून दुहेरीत विजेतेपद पटकावले, तर एकेरीत उपविजेतेपद मिळविले.

प्रज्वलने एकेरीच्या तिसऱ्या फेरीत नागपूरच्या सिद्धान्त बावनकारला १५-०७, १५-०५, तर उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या अथर्व किशतीला २१-१३, २१-१८ असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीही जिंकत प्रज्वलने अंतिम फेरी गाठली. मात्र चुरशीच्या झुंजीनंतर प्रज्वलला सांगलीच्या तेजस शिंदेकडून १९-२१, २१- १५, १४- २१ असा पराभव स्वीकारावा लागला. दुहेरीत खेळताना प्रज्वलने प्रथम वाणीच्या साथीने बहारदार खेळ करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. दुहेरीत प्रज्वल आणि प्रथम या जोडीने उपउपांत्य फेरीत आराध्य पारसनीस (पुणे) आणि तेजस शिंदे (सांगली) या जोडीचा १५-११, १५-०८ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीतही या जोडीने डेरायास परडीवाला आणि सिद्धार्थ दास या मुंबईच्या जोडीचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतही विजयाची घोडदौड सुरूच ठेवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. प्रज्वल सात वर्षांपासून नाशिकच्या गंगापूर रोड येथिल शिवसत्य क्रीडा मंडळात मकरंद देव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठेपणी वाचनातून संस्कार घडतात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाचाल तर वाचाल हे आजही सत्यच आहे. निसर्ग परिपूर्ण आहे आपण नाही म्हणून निसर्ग वाचायला शिका. महात्मा फुलेंनी स्त्रीच्या शिक्षणाबाबत जी चळवळ उभी केली, त्यामुळेच मी आज तुमच्यासमोर बोलत आहे. घरातील शिकवण हे लहानपणाचे संस्कार असतात पण मोठेपणी मात्र वाचनातूनच संस्कार घडतात, त्यामुळे प्रत्येकाने वाचावे, असे प्रतिपादन कळवण कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उषा शिंदे यांनी केले.

दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे जेलरोडच्या राजराजेश्वरी मंगल कार्यालयात वाचन प्रेरणादिन साजरा झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. संस्काराचा धागा बालवयात तर संस्काराची शिदोरी पुस्तकातून मिळते. आपल्यातील विकार दूर करण्याचे काम साहित्य करते. चांगले विचार कधीच संपत नाहीत. मनाला वाचनाची गरज आहे. त्यामुळे माणसे, परिस्थिती, प्रसंग वाचायला शिका. साहित्य हे लढण्याचे बळ देते. सामाजिक मूल्य हरवित चालली असल्याने वाचन गरजेचे आहे, असे शिंदे यावेळी म्हणाल्या.

दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षपदाखाली झालेल्या कार्यक्रमात कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, अॅड. नितीन ठाकरे, प्रसाद पवार, वैशाली राठोड, कार्यवाह रविंद्र मालुंजकर, सुदाम सातभाई यांची प्रमुख उपस्थिती होती. दहावीत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या नाशिकरोड परिसरातील प्रत्येक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आणि सर्व विद्यार्थ्यातून ज्याला सर्वात जास्त गुण आहेत त्या विद्यार्थ्याच्या शिक्षकाचा सत्कार करण्यात आला.

कामिनी तनपुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सुरेखा गणोरे यांनी प्रास्तविकेत अभिनव उपक्रमाची दाखल राज्य सरकारने घेतल्याचे सांगितले. यावेळी सप्तशृंग देवी ट्रस्टचे विश्वस्थ डॉ. रावसाहेब शिंदे, न्या. नारायण कऱ्हाडकर, अनिल गुरव, रमेश औटे उपस्थित होते. प्रशांत केंदळे, दशरथ लोखंडे, शिवाजी म्हस्के, जयंत गायधनी, सुशांत उबाळे, वृंदा देशमुख, सुजाता हिंगे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक मॅरेथॉनसाठी आजपासून नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांतर्फे येत्या १८ फेब्रुवारीला ‘रन फॉर ट्रॉफिक सेफ्टी’ आणि ‘कम्युनल हार्मनी’ या २०१८ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांना रजिस्ट्रेशनसाठी वेबसाइट सुरू करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अभिनेता सचिन खेडेकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. १६) सकाळी साडेअकरा वाजता त्र्यंबक रोडवरील फ्रावशी अॅकॅडमीच्या आयसीएसई हॉलमध्ये पार पडणार आहे.

शहर पोलिस दलातर्फे मागील दोन वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारीत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेच्या यशस्वतीतेसाठी पोलिस प्रशासनाने यात व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न केला. यंदा स्पर्धेच्या आयोजनाचे तिसरे वर्षे असून स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. यंत्र व मंत्रभूमी असलेल्या नाशिकमध्ये खेळ संस्कृती बहरत असून, त्याचा संदेश जगभरात देण्यासाठी या मॅरेथॉनची सुरुवात तत्कालीन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केली. शहराची चांगली छबी जनमाणसात रुजावी, असा जगन्नाथन यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा मानस होता. जगन्नाथन यांच्या बदलीनंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनीही हा उपक्रम पुढे नेण्याचा निर्णय घेतला. १८ फेब्रुवारी रोजी आयोजित होणाऱ्या स्पर्धेसाठी देश-विदेशातील धावपटूंना सहभाग नोंदवता यावा, यासाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू करण्यात येणार आहे. या वेबसाइटचे उद्‍घाटन सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता फ्रावशी अॅकॅडमीच्या आयसीएसई हॉलमध्ये होणार आहे. यासाठी अभिनेते सचिन खेडेकर यांची उपस्थिती राहणार आहे.

रनर्सला आहाराविषयी मार्गदर्शन

फक्तच व्यायाम किंवा फक्तच आहार याचा प्रकृतीवर परिणाम होतो. या दोन्ही गोष्टींचे नियोजन असेल तरच व्यायामाचा वा आहाराचा योग्य फायदा होतो. अन्यथा अनेकदा अतिरिक्त श्रमाचे दुष्परिणामही दिसून येतात. या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन स्पर्धेसाठी इच्छूक असलेल्या रनर्ससाठी शहर पोलिसांनी धावपट्टुंचा आहार कसा असावा या विषयावर आहारतज्ज्ञ व फिटनेसगुरू मिकी मेहता यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हे मार्गदर्शन शिबिर फ्रावशी अॅकॅडमीच्या आयसीएसई हॉलमध्ये सकाळी १० ते साडेअकरा या वेळेत पार पडेल. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाही बसला प्रवाशांचा प्रतिसाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या १३ शिवशाही बस रविवारी पुणे आणि धुळे मार्गावर धावल्या. पहाटेपासून या बसच्या फेऱ्या सुरू झाल्या. या बसचे भाडे दिवाळीनिमित्त ४१६ रुपये असे ठेवण्यात आले असले तरी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

एसटीने शिवशाही बस पुणे मार्गावर सोडण्याचे नियोजन केले. पण ऐनवेळी धुळे येथील गर्दी वाढल्याने यातील काही बसेस या मार्गावर सोडण्यात आल्या. धुळे येथे जाण्यासाठी सेमी लक्झरी बसचे भाडे १९६ रुपये आहे तर शिवशाहीचे भाडे हे ३०१ रुपये ठेवण्यात आले. वातानुकुलित असलेल्या या बसप्रमाणेच पुणे मार्गावर शिवनेरी बसही धावत होत्या. नव्या शिवशाही १३ बस मिळाल्यानंतर आता त्यात चार बसने वाढ होणार आहे. खासगी बसेसशी स्पर्धा करण्यासाठी एसटीने घेतलेला हा निर्णय तूर्त सणांमध्ये तरी यशस्वी ठरला आहे. नाशिक येथून एसटीने सर्वाधिक प्रवाशी पुणे, धुळे व औरंगाबाद मार्गावर असतात. त्यामुळे एसटीने या बस वापर मागणीप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत या बसेसचे वेळापत्रक १५ ते २३ ऑक्टोबरपर्यंत दिले असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. हळूहळू शिवनेरी व हिरकणी बस कमी करून पुणे मार्गावर शिवशाही बसच सोडण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

नव्या शिवशाही बसेसचे कोल्हापूर आरटीओमधून पासिंग झाल्यानंतर शनिवारी (दि. १४) सकाळी नाशिकला दाखल झाल्या. रविवारी सकाळी ४.३० वाजेपासून त्या पुणे येथे त्या सोडण्यात आल्या. हिरकणी व शिवनेरीसाठी असलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच या बसचे वेळापत्रक आहे. या बसेससाठी ऑनलाइन बुकिंगही सुरू करण्यात आले. एसटीकडे प्रवाशी वळवण्यात ५०० हून अधिक बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील काही बसेस आता राज्यातील विविध मार्गावर धावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ठेवा संस्कृती’तर्फे रंगला दीपोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठेवा संस्कृतीचा महिला व्हॉट्सअप ग्रुप व गुलालवाडी व्यायामशाळा यांच्यातर्फे दिवाळीचे औचित्य साधून ‘सण दिव्यांचा-उत्सव ठेवा संस्कृतीचा’ हा अनोखा दीपोत्सव रविवारी सायंकाळी गुलालवाडीच्या मैदानावर झाला.

याच कार्यक्रमात ‘तुझ्यात मला शोधतांना’ हा पती-पत्नीच्या नात्यावर सुख-दुःखाच्या गोष्टी करत हुळवार पुढे जाणारे अभिवाचन हेमा जोशी, अनघा धोडपकर व पल्लवी पटवर्धन यांनी सादर केले. यावेळी आंतरविभागीय वेशभूषा स्पर्धा झाली. ठेवा संस्कृतीचा संस्थापिका पल्लवी पटवर्धन यांनी दिवाळीनिमित्त हा अनोखा दीपोत्सव ग्रुपमधील मैत्रिणींसाठी आयोजित केला. या कार्यक्रमाला गुलालवाडी व्यायामशाळेचे अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे व सुहास अष्टपुत्रे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशाली साठे, गायत्री बेळगे, सोहा लाळे, गितांजली आव्हाड, मनाली गर्गे, वैशाली शुक्ल, वैशाली घोडके, भाग्यश्री शिवदेकर, सायली सप्रे, त्रिवेणी सानप यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी बसप्रवासाठी मोजा ‌दुप्पट पैसे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीसाठी एसटी महामंडळाने बससेवांमध्ये १० ते २० टक्के वाढ केल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या तिकिटात वाढ केली आहे. या भाडेवाढीत काही मार्गावर दुप्पट भाडे आकारले जात आहे तर काही मार्गावर २५ ते ४० टक्के वाढ करण्यात आली आहे. तर काही मार्गावर मात्र भाडे ‘जैसे थे’ आहे.

दिवाळीच्या सुट्या लागल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी अनेकांनी खासगी बस वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवला असून मोठ्या प्रमाणात आरक्षणही केले जात आहे. ही भाडेवाढ काही मार्गावर १८ ऑक्टोबरपर्यंतच असणार असून काही मार्गावर मात्र ती कायम आहे. वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्याचे दर मात्र त्यांच्या सर्व्हिसप्रमाणे ठरवण्यात आले असून काही ठिकाणी त्यात वेळेवर वाढ केली जात असल्याच्याही तक्रारी आहे.

नाशिक येथून पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, लातूर, गोवा, सूरत, अहमदाबाद, बेंगलुरू, नागपूर, इंदूर येथे खासगी बसची सेवा असून त्यात सर्वाधिक बसेस मुंबई व कोल्हापूर येथे धावणाऱ्या आहेत. तसेच नागपूर, सूरत, अहमदाबाद येथे जाण्यासाठी पाचहून अधिक बसेस आहे. जास्त अंतरावर धावणाऱ्या मार्गावरील सर्व बसेस या एसी स्लिपर कोच आहे. त्यामुळे प्रवाशांची त्याला पसंती आहे. नाशिकमधून मुंबई नाका, ठक्कर बाजार, द्वारका, नाशिकरोड येथून खासगी बस सोडण्यात येतात. त्यात मुंबई नाका येथून सुटणाऱ्या बस या मुंबई, पुणे येथे मोठ्या प्रमाणात आहे. तसेच ठक्कर बाजार येथून जाणाऱ्या बसमध्ये पुणे, सूरत ,कोल्हापूर बस आहे. द्वारका येथून अहमदाबाद, इंदूर, नागपूर व लातूर येथे बस सोडल्या जातात. नाशिकरोड येथून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह मोठ्या प्रमाणात बसेस आहेत.

नाशिकमध्ये कामानिमित्त राहणारे दिवाळीत गावाकडे जात असल्यामुळे मोठी गर्दी असते. त्यामुळे ही भाडेवाढ १८ तारखेपर्यंत असल्याचे ट्रव्हल्सचालकांचे म्हणणे आहे. त्यानंतर येतांना ही भाडेवाढ त्या ठिकाणाहून असते. काही मार्गावर मात्र दिवाळीच्या सुट्यासाठी प्रवाशी जातात त्या मार्गावरची भाडेवाढ मात्र कायम राहणार आहे. दरम्यान, पुणे व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात धावतात; पण याची भाडेवाढ २५० रुपये आहे. त्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

दिवाळीत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने भाडेवाढ झाली असली तरी प्रत्येक मार्गावर ती वेगवेगळी आहे. यंदा प्रवाशांची गर्दी चांगली आहे. गाड्यांची संख्या व सुविधा सुद्धा देण्यात येत असल्याने प्रवाशांकडून पसंती मिळत आहे.
- साहेबराव आव्हाड, ट्रॅव्हल एजंट

नाशिकहून सुटणाऱ्या बसचे भाडे (एसटी स्लिपर कोच)
शहर..............पूर्वीचे भाडे....आताचे भाडे.......बसची संख्या
- पुणे..............५००..............७००..............४
- सोलापूर.........६००..............९००..............२
- लातूर............६००..............१,१००.............४
- कोल्हापूर........६५०..............९००..............१२
- अहमदाबाद.....८००..............१,६००..............७
- इंदूर..............८००..............८००..............५
- गोवा.............१,२७०..............१,५७०..............१
- बेंगळुरु..........१,६००..............१,६००..............२
- नागपूर...........१,२००..............१,५००..............५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिंगणवेढ्यातून ४० किलो गांजा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड पोलिसांनी हिंगणवेढे (ता. जि. नाशिक) येथे वास्तव्यास असणाऱ्या विष्णू चादू कुंवर (५२) या व्यक्तीच्या घरावर छापा टाकून ८० हजार रुपयांचा तब्बल ४० किलो गांजा जप्त करण्याची कामगिरी केली. रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हिंगणवेढे गावात खळबळ उडाली.

हिंगणवेढे गावातील संशयित विष्णू कुंवर याच्या घरात गांजाचा साठा केलेला असल्याची माहिती नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली, सहाय्यक पोलिस निरिक्षक कुंदन सोनोने यांच्या पथकाने रविवारी रात्री दीड वाजता विष्णू याच्या घरी छापा टाकला. या कारवाईप्रसंगी या संशयिताच्या घरात २० पाकिटांत भरलेला तब्बल ४० किलो वजनाच गांजा आढळून आला. या गांजाची बाजारभावाप्रमाणे ८० हजार रुपये इतकी किंमत आहे. पोलिसांनी या कारवाईनंतर सरकारतर्फे उपनिरीक्षक सचिन शेंडकर यांच्या फिर्यादीवरून विष्णू याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णु यास पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता त्यास न्यायालयाने बुधवाररपर्यंत (दि. १८) पोलिस कोठडी सुनावली आहे.

गांजाचे मातोरी कनेक्शन

आपल्या घरात मातोरी येथील शिवाजी मोहिते याने आणून ठेवल्याची कबुली संशयित विष्णु कुंवर याने नाशिकरोड पोलिसांना दिली. यावरुन मातोरी येथील शिवाजी मोहिते हा दुसरा संशयित गांजा पुरविण्याचे रॅकेट चालवित असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे रॅकेट किती दिवसांपासुन सुरू आहे, त्यांना गांजा कुठून मिळतो, त्यांच्याकडून हा गांजा कुठे पुरविला जातो याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान नाशिकरोड पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कथक नृत्यानुष्ठानात रंगले रसिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चक्रदार, परण, तिहाई, गत, तोडे अशा कथक नृत्यातील एकापेक्षा एक विविध प्रकारांनी नटराज पंडित गोपीकृष्ण जयंतीच्या रजत महोत्सवाचे दुसरे पुष्प रविवारी सायंकाळी परशुराम साइखेडकर नाट्यगृहात सादर झाले. यावेळी पंडित रेखा नाडगौडा यांच्या शिष्या ऐश्वर्या पवार आणि गुरू मधुरिता सारंग यांच्या गंडाबंध शागिर्द नूतन पटवर्धन यांचे कथक नृत्य सादर झाले.

ऐश्वर्या पवार हिने नवदुर्गेची विविध रुपे साकारत देवीवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. माता भवानी काली, दुर्गे गौरी ही पारंपरीक बंदीश भाववंदनेतून साकारली. त्यनंतर तीश्र तीनतालाने ताल प्रस्तुतीची सुरुवात झाली. यात उठान, थाट, आमद, पेशकार, कायदा परण, गत, परण, चक्रदार परण, कवित्त यांचा समावेश होता. सर्व रचना या पंजाब घराण्याच्या आणि उस्ताद अल्लारखा खॉँ साहेबांनी रचलेल्या होत्या. संपूर्ण ताल प्रवास तिश्र अंगाने प्रस्तुत करण्यात आला. या दोन्ही नर्तकांना तबला संगत निसर्ग देवकर, संवादीनी, दिव्या रानडे, गायन आशिष रानडे, पंडित रेखा नाडगौडा आणि शीतल कपोले यांनी केले. प्रियदर्शनी शिरवाडकर आरोळे यांनी निवेदन केले.

अभिनयाच्या विविध छटांचे दर्शन

अभिनयात खमाज रागातील ‘कोयलिया कुक सुनावे’ ही ठुमरी सादर केली. प्रियकराचा विरह, त्याचे सतत होणारे भास बरसणाऱ्या पावसात तो अडकला तर नसेल म्हणून काळजी आणि अखेर त्या मधुर स्वरांना तिने गप्प रहायला सांगतांनाचे आर्जव हे रसिक प्रेक्षकांना दाद देऊन गेले. यानंतर मधुरिता सारंग यांच्या शागिर्द नूतन पटवर्धन यांनी ‘शुक्लांबरा’ ही सरस्वती वंदना सादर केली. चौतालात तिश्र अंगाने सुरू होणाऱ्या बंदीशी असा सुरेख मिलाफ असलेल्या पारंपरिक नृत्यरचना सादर केल्या. अभिनयात रामायणातील प्रसंगावर नवरस प्रस्तुती केली. कार्यक्रमाची समाप्ती द्रुत तीनतालाने केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसीबीचा तपास ‘गुपचूप’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तीन इंजिनीअर्सला लाचखोरीच्या आरोपात अटक करणाऱ्या अॅण्टी करप्शन ब्युरोचा (एसीबी) पुढील तपास मात्र ‘गुपचूप’ सुरू आहे. अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासह इतर कोणतेही अधिकारी या प्रकरणाबाबत बोलण्यास राजी नाहीत. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याने एसीबी तपासातील महत्त्वाच्या बाबी प्रसारमाध्यमांपासून लपविल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे.

रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यासाठी ठेकेदाराकडून सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपये स्वीकारणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे तिन्ही इंजिनीअर्सला कोर्टाने १७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे देवेंद्र सखाराम पवार (३५, एक्झीक्युटिव्ह इंजिनीअर), सचिन प्रतापराव पाटील (४२, असिस्टंट इंजिनीअर) तसेच अजय शरद देशपांडे (४५, ब्रँच इंजिनीअर) या तिघांच्या संपत्तीची झडती सुरू आहे. मात्र, तीन दिवसानंतरही ‘एसीबी’ने यातील तपशील दाबून धरला आहे. यामुळे या प्रकरणात मोठे अर्थकारण झाल्याचा तसेच राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा शहरात चर्चिला जातो आहे. या तिघांपैकी एक इंजिनीअर भाजपाच्या लोकप्रतिनिधीशी संबंधीत असल्याने एसीबीचे अधीक्षक पंजाबराव उगले माहिती देण्यास टाळटाळ करीत असल्याचे सांगितले जाते.

‘एसीबी’च्या एकूण कामगिरीचा लाचखोरीच्या घटनांवर थेट प्रभाव पडतो. ‘एसीबी’कडून होणाऱ्या चांगल्या कामगिरीची माहिती सर्वसामन्यांपर्यंत पोहचल्यास नागरिक ‘एसीबी’कडे तक्रार करण्यास धजावतील. चिखलीकर-वाघ प्रकरणानंतर ‘एसीबी’कडे लाचखोरीची तक्रार करणाऱ्यांची रांग लागली होती. मात्र, पंजाबराव उगले यांनी नाशिक विभागाचा कार्यभार हाती घेतल्यापासून तक्रारदारांची संख्या कमी झाल्याचे दिसते. याबाबत ‘एसीबी’कडून गांभीर्याने विचार होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सरकारला काही घेणे-देणे नाही

ब्युरोचे असे, ब्युरोचे तसे असे म्हणत ‘एसीबी’च्या कोणत्याही कामाची माहिती बाहेर पडूच द्यायची नाही, अशी भूमिका पंजाबराव उगले यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे याबाबत राज्य सरकारला काहीच घेणे देणे नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात संशयित आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मुळातच फार कमी आहे. त्यात शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणतेही ठोस उपाय होताना दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सापळा रचल्यानंतर ‘एसीबी’च्या अधीक्षकांसह इतरांची माहिती दडवण्यासाठी चाललेला खटाटोप सर्वसामान्यांच्या मनात थेट सरकारच्या धोरणांबाबत संशय निर्माण करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसा दाखल्यासाठी महिलेची परवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तीन महिन्यांपूर्वी बांधकाम विभागात मैल बिगारी असलेल्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर एक मुलगा व दोन मुली असा कुटुंबकबिला सांभाळणाऱ्या महिलेला बांधकाम विभागाकडून सेवानिवृत्ती लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास निफाडच्या सेतू कार्यालयाने सव्वादोन महिने झुंजवत ठेवले.

निफाड तालुक्यातील नागापूर येथील रहिवासी रवींद्र सगर हे सार्वजनिक बांधकाम विभागात मैल बिगारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे १९ जुलै २०१७ रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पश्चात मिळणाऱ्या निवृत्तिवेतनासाठी पत्नी शकुंतला सगर यांनी वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून निफाड सेतू कार्यालयात अर्ज सादर केला. मात्र, सेतू कार्यालयाने दिलेल्या मुदतीप्रमाणे वारस प्रमाणपत्र तयार केले नाही. शंकुतला सगर या सोमवारी पुन्हा निफाड तहसीलच्या सेतू कार्यालयात आल्या. मात्र, त्यांना हुसकावून लावले. सामाजिक कार्यकर्ते सचिन गिते यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास या महिलेची कैफियत आणून दिल्यानंतर त्यांना वारसा प्रमाणपत्र देण्यात आले.

कामे होईना वेळेत!

निफाड तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयाच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी आहेत. या कार्यालयातून वेळेवर दाखले दिले जात नाही. अर्ज व कागदपत्रे गहाळ केली जातात. हे सेतू कार्यालय ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती बाहेरील तालुक्यातील आहे. सेतू कार्यालयात कधीच येत नाही. डेर्ले आणि कांगणे नावाचे दोन तरुण हे सेतू कार्यालय अनेक वर्षांपासून चालवतात.

निफाड तहसीलच्या सेतूबाबत अनेकांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यांचा रिपोर्टही केला आहे. आमच्या स्तरावर कोणतीही कामे पेंडिंग राहत नाही. सेतूबाबत नागरिकांच्या तक्रारी असतील, तर त्या लेखी स्वरूपात तहसील कार्यालयात सादर कराव्यात.

- विनोद भामरे, तहसीलदार, निफाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये रोगराईत वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कडाक्याचे पडणारे ऊन, मधूनच येणारा पाऊस तसेच, सातत्याने बदलणारे हवामान यामुळे मनमाड शहरात साथीचे रोग मोठ्या प्रमाणावर बळावले आहेत. मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लूसदृश आजाराने मनमाडच्या विविध रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. दरम्यान, शहरात डासांचा प्रादुर्भाव व कचऱ्याचे वाढलेले प्रमाण याकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

मनमाड शहरात सध्या साथीच्या रोगांनी तोंड वर काढले असून, ऐन दिवाळीत शहरातील दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. खोकला व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असून, शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी वा जास्त होण्याचा आजार बळावताना दिसत आहे. स्वाइन फ्लूसदृश रोगाने रुग्णांना त्रासले असून, नाशिकला उपचारासाठी काहींना पाठविण्यात आले आहे. शहरातील एका तरुणाला स्वाइन फ्लूसदृश आजाराचा त्रास झाला. त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असताना दुसऱ्याच दिवशी त्याच्या आईच्या छातीत पाणी झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.ऑक्टोबर महिन्याचे कडाक्याचे ऊन व संध्याकाळी अचानक येणारा पाऊस, सातत्याने बदलणारे हवामान यामुळे शहरात साथीचे रोग पसरले असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. पावसाळी वातावरण असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

समस्या सोशल मीडियावर

मनमाड महाविद्यालयातील प्रा. डॉ. विलास थोरात यांनी मनमाड समस्या हा नवा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर मनमाडमधील समस्यांचे प्रतिबिंब उमटले आहे. या ग्रुपवर कचरा व स्वच्छतेसंदर्भात आलेल्या सूचनांची दखल मुख्याधिकारी डॉ. मेनकर यांनी तातडीने घेतल्याचे व काही ठिकाणी कचरा कुंड्यांची व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images