Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वाहतूक संघटनेचे चक्काजाम आंदोलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनात जिल्ह्यातील ४ हजाराहून अधिक ट्रक सोमवारी रस्त्यावर धावले नाहीत. या आंदोलनामुळे ट्रकमालकांचे भाडेपोटी मिळणाऱ्या सुमारे १ कोटी २० लाखांचे नुकसान झाले.

जीएसटीतील तरतुदीमध्ये बदल करा, डिझेलवर जीएसटी लागू करून सर्व राज्यात सारखे भाव करा, परिवहन विभागाकडून आणि वाहतूक पोलिस यांच्याकडून महामार्गावरील होणारी लूट आणि वाहतूकचालकांना मिळणारी हिनतेची वागणूक बंद करा, या मागण्यासाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी नाशिकने आंदोलनात सहभाग नोंदवला. आंदोलनात नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अंजु सिंघल, सेक्रेटरी सुभाष जांगडा, विनोद शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, जॉइंट सेक्रेटरी विशाल पाठक, अमोल शेळके, ज्ञानेश्वर वर्पे, शरद बोरसे, रईस शेख, अजयसिंह, अर्जुन राठोड, सचिन जाधव, जयप्रकाश दवे, अतुल रावल आदींनी सहभाग घेतला.

जुन्या मालाची खरेदी-विक्री करताना जीएसटी कर नसावा, डिझेल जीएसटीच्या कक्षेत यावे, देशभरात डिझेलचे दर समान असावे, चालकांना मालाची वाहतूक करत असताना परिवहन विभागाच्या अधिकारी व पोलिस यांच्याकडून चांगली वागणूक मिळावी, परिवहन विभागाकडून रस्त्यावर होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसावा, यासाठी केंद्रीय स्तरावर ‘एसआयटी’ची नेमणूक व्हावी अशा विविध मागण्यांसाठी करण्यात आल्या आहे. या आंदोलनात नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन चालक व वाहतूकदारही सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आईस स्केटिंगमध्ये निखिलचा झेंडा

$
0
0




नाशिक ः विविध क्षेत्रात नाशिकचे युवक जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी करीत असल्याचे ननिदर्शनास येत आहे. आताही आइस स्केटिंग या अनोख्या क्षेत्रात नाशिकच्या निखिल पिंगळेने वैश्विक स्तरावर ठसा उमटविला आहे. पोलंड येथे आयोजित वर्ल्ड ज्युनिअर ग्रॅम्प्री आइस स्केटिंग चॅम्प‌यिनशीप स्पर्धेत त्याने ६४.५ गुण मिळवून २८ वे स्थान मिळवले आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय आहे. शिवाय आगामी ऑलिम्पिकमध्ये तो पात्रता मिळविण्याची दाट शक्यता आहे.


संपूर्ण भारतात या खेळात विशेष प्राविण्य मिळवणार हा एकमेव खेळाडू असून, सध्या तो पोलंड येथे प्रशिक्षण घेत आहे. निख‌लि मंगेश पिंगळे याने फिगर स्केटिंग म्हणजेच आइस स्केटिंग या खेळातच करियर केले असून, आज पर्यंत त्याने २३ देशात आपल्या खेळाची चुणूक दाखवली आहे. २०२२ मध्ये होणारी व्हिंटर ऑलिम्पिक स्पर्धा हे त्याचे ध्येय असून त्यासाठी भारत सरकारने ८.५ लाखाची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.

२००६ मध्ये टिव्हीवर ऑलिम्पिक पहात असताना इफगेनी फ्लयुशेको या स्केटिंग खेळाडूचा खेळ त्याच्या पहाण्यात आला. आपणही खेळात नाव कमवावे असे त्याच्या मनात आल्याने त्याची आई विद्या यांच्याशी बोलून स्केटिंगची निवड केली. ज्युड ऑगस्टीन व बुलंगे अॅकेडमी येथे त्याने प्राथमिक शिक्षण घेतले. ४ वर्ष नाशिक मध्ये खेळ केल्यानंतर पुढे आणखी प्राविण्य मिळवावे यासाठी त्यांनी मुंबईच्या मेघना जुवेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत असताना जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवली.

अनेक मेडल्स मिळविले

हैद्राबाद येथील प्रशिक्षक अनुपकुमार यांच्याशी त्याची एकदा भेट झाली. अनुपकुमार हे जगातील एक नंबरचे स्केटर म्हणून ओळखले जात होते. त्याच्याकडे प्रशिक्षण घेत असताना २०१२ व २०१४ मध्ये सलग दोन वर्ष तो नॅशनल चॅम्प‌यिनशीपचा मानकरी ठरला. याखेळात जागतिक किर्ती संपादीत करायची असेल तर फिगर स्केटिंग म्हणजेच आईस स्केटिंग खेळण्याशिवाय पर्याय नाही. या खेळापर्यंत पोहचण्यासाठी त्याला ७ वर्ष वाट पहावी लागली. त्यानंतर मनीला येथे झालेल्या वर्ल्ड डेव्हलपमेंट ट्रॉफी या प्रकारात त्याने यश मिळवले. या ठिकाणी त्याची अॅलेक्सी फेदोरो या प्रशिक्षकाची भेट झाली. त्याच्याकडून निख‌लिने तीन आठवड्याचे प्रशिक्षण घेतले हे प्रशिक्षण त्याच्या करियरला कलाटणी देणारे ठरले. २०१४ मध्ये बॅँकॉक येथे झालेल्या एशियन ओपन फिगर स्केटिंग ट्रॉफी मध्ये त्याने बाँझ मेडल मिळवले. २०१४ मध्ये मलेशिया येथे झालेल्या ओपन चॅम्पीयनशीप मध्ये गोल्ड मेडल मिळवले.

…म्हणून परदेशातच सराव

अंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ खेळणारे भारतात अवघे १० खेळाडू आहेत. त्यापैकी सर्वात जास्त स्कोअर करण्यात निख‌लि सातत्याने आघाडीवर असतो. तो म्हणतो या खेळासाठी भारतात चांगली खेळपट्टी नाही आणि चांगले कोच देखील नाही त्यामुळे सातत्याने परदेशात राहूनच खेळाचा सराव करावा लागतो.

निख‌लिच्या खेळातील करिअरसाठी मला नाशिक सोडावे लागले. आज त्याने सर्वात जास्त स्कोअर करुन नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या विन्टर ऑलिम्पिक मध्ये तो निश्चित भारताला मेडल मिळवून देईल यात शंका नाही.

-विद्या पिंगळे, निखिलची आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक ठरताहेत नैराश्याचे बळी

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com
Twitter : jitendratarte@MT
नाशिक : परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत, प्रेमामध्ये अपेक्षापूर्ती झाली नाही किंवा व्हर्च्युअल ग्लॅमरस जग आणि वास्तवातील दुनिया यातील अंतराची अनुभूती आली म्हणून मरणाला मिठी मारणाऱ्या मनोवृत्तीचं लोण नाशिकसारख्या थ्री टायर शहरांकडेही येऊ लागल्याचं गंभीर निरीक्षण इंडियन सायकॅट्रीक सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या तज्ज्ञांच्या एका बैठकीत नोंदविले आहे.
गत वर्षभरात नाशिकच्या परिघातील आत्महत्या विषयक घटनांच्या नोंदीवर नजर टाकल्यास या प्रकरणांमध्ये युवकांची संख्या मोठी असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यासंदर्भात माहिती देताना इंडियन सायकॅट्रिक सोसायटीच्या नाशिक शाखेचे सचिव डॉ. उमेश नागापूरकर यांनी युवकांच्या बदलत्या मानसिकतेबद्दल चिंता व्यक्त केली. जिल्ह्याच्या परिघात वर्षभरात सुमारे ६०० आत्महत्येचे प्रयत्न झाल्याच्या नोंदी असल्याचे त्यांनी सांगितले. यातील काहींना यात प्राण गमवावे लागले तर काहींना नैराश्यातून बाहेर काढण्यास यश मिळाले आहे. मात्र, आत्महत्येचे टोक गाठण्यापर्यंत गेलेले ही ६०० संख्या अपघातातील मृतांच्या संख्येसही मागे टाकणारी किंवा तिची बरोबरी करणारी ठरावी, इतके गांभीर्य या मनोविषय समस्येचे असल्याचेही त्यांनी ‘मटा’शी बोलताना अधोरेखित केले. विशेष बाब म्हणजे या घटनांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे नैराश्य आणि आत्महत्येस बळी पडणाऱ्या युवकांची संख्या वाढू लागल्याच्या वास्तवाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

१५ ते २९ वयोगटात प्रमाण सर्वाधिक

भारतातील आत्महत्यांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार १ लाख नागरिकांमागे ९५ लोक या दुर्घटनेस बळी पडता. यातही १५ ते २९ या वयोगटातील प्रमाण अधिक आढळते. साधारणत: १४ वर्षापुढील युवक या नैराश्याच्या मार्गावर आलेला दिसून येतो. अलिकडील काही घटनांमध्ये १४ वर्षे वयाखालील युवकही अशा घटनांना बळी पडत आहेत. हे प्रमाण अत्यल्प असले तरीही असे होणे सामाजिकदृष्ट्या गंभीर आहे.

ही आहेत कारणे

नैराश्याला बळी पडून आत्महत्येचा पर्याय स्वीकारू पाहणाऱ्या युवकांमध्ये प्रामुख्याने स्पर्धेचा दबाव, ताण तणाव, प्रेमभंग, तुटत चाललेला संवाद, एकलकोंडेपणा, स्पर्धा आणि तुलनात्मकतेकडे झुकणारी जीवनशैली, अपयश न पचविण्याची क्षमता, नकारात्मक कौटुंबिक परिस्थिती आणि वाढता हव्यास आदी प्रमुख कारणे आहेत.

... तर मनमोकळं बोला!
कुठल्याही कारणांमुळे तुमची मानसिक घुसमट होत असेल तर याचे रुपांतर मोठ्या त्रासात होण्यापूर्वी तुमच्या प्रेमाच्या, विश्वासातल्या माणसांशी आडपडदा न ठेवता मनमोकळं बोला. तुमच्य मदतीसाठी तत्पर असणाऱ्या सामाजिक संघटना, टोल फ्री क्रमांक, पोलिस आणि समुपदेशकांशी कुठल्याही घुसमटीच्या क्षणी मोकळं बोलला तर समस्या अगदी सहजपणे सुटेल, यावर विश्वास ठेवा, असा सल्लाही मानसोपचारतज्ज्ञांनी युवकांना दिला आहे.

देशात मुंबईसारख्या मेट्रो शहरांपर्यंत कधीकाळी बऱ्याच अंशी मर्यादित असणारे युवकांमधील नैराश्य आणि आत्महत्येचे लोण नाशिकसारख्या थ्री टायर शहरांपर्यंतही पसरते आहे. गतवर्षात नोंदींनुसार जिल्ह्यात या दृष्टीने ६०० जणांनी प्रयत्न केले. विशेष म्हणजे यात युवकांचे प्रमाण जास्त आहे आणि रेकॉर्डवर न आलेली पण घुसमट सोसणारी कित्येक मने आपल्या भोवताली असतील.
- डॉ. उमेश नागापूरकर, सचिव,
इंडियन सायकॅट्रिक सोसायटी, नाशिक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नार-पारचे पाणी देण्यास तीव्र विरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दमणगंगा-नार-पार लिंक प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्यात येऊ नये अशी आग्रही भूमिका नाशिकच्या लोकप्रतिनिधीनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बोलावलेल्या विशेष बैठकीत मांडली. नार-पार लिंक प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी महाराष्ट्रालाच मिळायला हवे, अशी सूचना या बैठकीत पवार यांनी राज्य सरकारला केली.

राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव आणि जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजिनीअरिंग राजेंद्र जाधव यांच्या पुढाकाराने सोमवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांनी दमणगंगा-नार-पार, औरंगा-अंबिका इ. खोऱ्यातील प्रस्तावित नदीजोड प्रकल्पांबाबत बैठक झाली. बैठकीला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इकबालसिंग चहल, जलसंपदा विभागाचे सचिव आर. व्ही. पानसे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे उपसचिव आर. आर. शुक्ल आदी अधिकाऱ्यांसह आमदार पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, जीवा पांडू गावित, राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पवार, उदय रकिबे या नाशिकच्या लोकप्रतिनिधींसह मराठवाड्यातील आमदार सतीश चव्हाण हे उपस्थित होते. राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सदर बैठकीस दांडी मारली.

यावेळी शरद पवार यांनी राजेंद्र जाधव आणि नाशिकचे लोकप्रतिनिधी तसेच सरकारच्या वतीने जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव इकबालसिंग चहल यांची बाजू समजून घेतली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी महाराष्ट्राला मिळवून देण्याचे अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या प्रकल्पांबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सूतोवाच केले. यावेळी सदर प्रकल्पाबाबत आपली भूमिका मांडताना राजेंद्र जाधव म्हणाले, की सरदार सरोवर व उकाई धरणामुळे गुजरातची सिंचन क्षमता ४५ टक्क्यांवर पोहचली असून त्या तुलनेत महाराष्ट्राची सिंचन क्षमता २०.४० टक्के आहे. त्यामुळे जास्त सिंचन क्षमता असलेल्या प्रदेशाकडे पाणी नेणे हे महाराष्ट्रावर अन्याय कारक आहे. दमणगंगा-नार-पार खोऱ्याची सुधारित पाणी उपलब्धता काढण्यात यावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी सरकारची भूमिका मांडताना इकबालसिंग चहल म्हणाले, की राज्याच्या हिताचा विचार करून पार-तापी-नर्मदा व दमणगंगा-पिंजाळ लिंक योजनेच्या ‘डीपीआर’मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पार-तापी नर्मदा लिंक योजनेत सुधारणा करून नार-गिरणा आणि पार-गोदावरी लिंक या सुधारित नदीजोड योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच दमणगंगा-पिंजाळ लिंकमध्ये सुधारणा करून दमणगंगा-एकदरे-गंगापूर लिंक मार्फत ५ टीएमसी पाणी गंगापूरधरणात वळविण्यात येणार आहे. तसेच दमणगंगा-वैतरणा- कडवा- देवनदी लिंकप्रकल्पाद्वारे ७ टीएमसी पाणी सिन्नर व शिर्डी साठी वळविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच भविष्यामध्ये पिंजाळ व इतर बांधकामाधीन प्रकल्पांद्वारे मुंबईची पाण्याची गरज पूर्ण झाल्यानंतर वैतरणा धरणातील पाणी गोदावरीद्वारे मराठवाद्याला देण्याचे सरकारचे नियोजन आहे. नार-पार खोऱ्यातील १५ टीएमसी पाणी गुजरातला देऊन त्याबदल्यात तापी खोऱ्यामध्ये गुजरातकडून पाणी घेण्यात येणार असल्याचे चहल यांनी सांगितले. दमणगंगा-पिंजाळ, दमणगंगा-एकदरे-गंगापूर, दमणगंगा-वैतरणा-कडवा-देवनदी तसेच नार-गिरणा, पार-गोदावरी लिंक यासर्व प्रकल्पांना ११ हजार कोटींचा खर्च येणार असून त्यातील ९० टक्के खर्च केंद्र सरकार व १० टक्के खर्च राज्यसरकारकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मात्र, नार-पार खोऱ्यातील १५ टीएमसीपाणी गुजरातला देण्यास आमदार जयंत जाधव, जीवा पांडू गावित, श्रीराम शेटे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध असल्याचे बैठकीत सांगितले. यावेळी अमादार जाधव म्हणाले, की दमणगंगा, नार-पार, औरंगा, अंबिका खोऱ्यातील जलनियोजनाबाबत सरकारने तज्ज्ञ समिती गठीत केली होती. सदर समितीने २५ जुलै २०१६ रोजी सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालामुळे गुजरातला पाणी देण्यात येऊ नये अशी शिफारस तज्ज्ञ समितीने सरकारला केल्याने शासनाने हा अहवाल गुंडाळल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला. या नदी खोऱ्यातील उपलब्ध संपूर्ण पाणी महाराष्ट्राला वापरणे शक्य असून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिल्यास तुटीच्या गिरणा व गोदावरी खोऱ्यास भविष्यात पाणी उपलब्ध होणार नाही. अशी शिफारस समितीने एकमताने केली असल्याचे राजेंद्र जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुजरातला पाणी; हे तर लिकिंग करप्शन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला घेऊन जाणे म्हणजे लिकिंग करप्शन आहे असे सांगत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सरकारचे कान उपटले.

महाराष्ट्रात पाण्याची गरज असताना दुसऱ्या राज्याला पाणी देताच कसे ?असा प्रश्न राजेंद्रसिंह यांनी उपस्थित केला. ‘‘कौनसा मुख्यमंत्री देशमें है जो कहता है की हमारे पास सरप्लस पाणी है?’’ असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला हाणला. यावेळी त्यांनी नदीजोड न करता नदी तलावाला जोडली तर संपूर्ण राज्य पाणीमय होईल, असेही सूचविले.

यावेळी डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, की ‘हम पहेले प्यासे की प्यास बुझायंगे की दुसरे को पाणी देंगे’ असे सांगत राज्याच्या पाणी नियोजनावरही टीका केली. यावेळी त्यांनी दमणगंगामधून गुजरातला पाणी देताना पाच ठिकाणी उचलावे लागणार आहे. पण नाशिकला आणण्यासाठी पाणी लिप्ट करण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे तुटीच्या खोऱ्यात हे पाणी येईल व त्यातून नाशिकसह, अहमनगर व इतर ठिकाणी पाणी मिळेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नदीजोड प्रकल्पाचा समाचार घेऊन ‘नदी जोड नही तर नदींयो को समाज से जोडना चाहिए’ असे मत नोंदविले. पूर्वी नद्यांवर त्या गावांचा हक्क असायचा; पण आता केवळ नागरीकरण व मोठ्या कंपन्याची गरज पूर्ण केली जात आहे, अशी खंत त्यांनी मांडली.

महाराष्ट्र प्रदूषणात नंबर वन

महाराष्ट्र प्रदूषणाबाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील सर्व नद्या प्रदूषित आहेत. गुजरातमध्येही केमिकल झोनमुळे प्रदूषण आहे. पण त्यांच्याकडे तर त्यावर उपाय सुद्धा नाही. त्यामुळे हा मुद्दा गंभीर असून त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत राजेंद्रसिंह यांनी मांडले.

अच्छी सरकार कौनसी?

ज्या राज्यात जंगली प्राणी व नदी यांना मुक्तसंचार करता येईल तेथे विकास व समृद्धीचा मार्ग मिळतो, असे सांगत जलसंपत्ती व वनसंपत्तीवरही राजेंद्रसिंह यांनी आपले मत प्रकट केले. यावेळी त्यांनी नदीवरील अतिक्रमण, प्रदूषण व शोषण थांबवायला हवे, असे सांगितले.

पवारांनाही टोला

बारामतीचा उल्लेख करून राजेंद्रसिंह यांनी शरद पवारांनाही टोला मारला. राज्यातील ‘पॉवरफुल’ नेत्याने पाणी आपल्याकडे वळवले व पीक पद्धती सुध्दा चुकीची वापरली. ज्या ठिकाणी पाणी नाही तेथे ऊस काढला जातो व जेथे पाणी आहे तेथे दुसरे पिक घेतले जाते. त्यामुळे पिकपद्धती आतापर्यंत चुकीची झाल्याचेही त्यांनी सांगितले.

साधुबाबांची राजबाबांशी युती

देशात साधुबाबा व राजबाबा मिळाले व त्यांनी नदीची हत्या केल्याचा आरोप राजेंद्रसिह यांनी केला. नदीला जिवंत करणे महत्त्वाचे आहे. पण तसे केले जात नसल्यामुळे त्यातून प्रश्न निर्माण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

देशात नदीचा वाद

स्वातंत्र्यानंतर देशात पाण्यावरून राज्या-राज्यातील अनेक वाद झाले. पण हे वादातले एकही प्रकरण मिटले नाही. भारतीय संविधानमध्ये नदीचे अधिकार राज्याला असते. त्यामुळे ते त्याचे निर्णय घेत असतात. त्यामुळे कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री आमच्याकडे सरप्लस पाणी आहे असेही सांगत नाही, असे राजेंद्रसिंह यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये काँग्रेसची सरशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीचे सोमवारी निकाल हाती आले. तालुक्यातील निकालानंतर बहुतांश ग्रामपंचायतींवर महिला राज अवतरणार असल्याचे दिसले. ग्रामपंचायत सरपंच निवडणूक राजकीय पक्षाच्या अधिकृत तिक‌िटावर लढली गेली नाही. या निवडणुकीत स्थानिक गट, आघाड्या पॅनल यांचाच मोठा प्रभावहोता. कोणत्या राजकीय पक्षांची सरशी हे अधिकृत सांगणे अवघड असले तरीही ३५ पैकी २० ठिकाणी काँग्रेसचे सरपंच निवडून आले. व गावात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली.

चांदवड तालुक्यातील थेट सरपंच विजयी उमेदवार

मेसन खेडे-भाग्यश्री ठोंबरे, देवरगाव-धनश्री शिंदे, चिखल अंबेगाव-जयश्री धुळे, कुंदलगाव- दयानंद आहिरे, भुत्याणे- गणेश महाले, शिंगवे-नीता पाटील, दुगाव-आरती सोनवणे, रेडगाव- मनीषा काळे,

खेलदरी-राहुल जाधव, विटावे-सगुणा गांगुर्डे, दुधखडे-नारायण गावीत, निंबाळे-नंदू चौधरी, वाद- ललित खुरसणे, साळसाने- ललिता ठाकरे, बोराळे- जिजाबाई जाधव, कोकणखेडे- सोनल माळी,

काजीसांगवी- साहेबराव सोनवणे, पुरी- बापू भवर, तळेगाव- साधना पाटील, दहेगाव- समाधान कलवर, डोणगाव- मुरलीधर शेळके, गणूर- पूजा ठाकरे, माळसाने- संजय जाधव, नारायणगाव-रामदास कांदळे, निमोण- किरण गोलवड, पाटे कोलटेक- जयश्री ठोके, सोनी सांगवी- प्रवीण ठाकरे, तळवाडे- साधना पाटील, वडाळीभोई- अनिता जाधव, शेलू- शकुंतला जाधव.

बिनविरोध सरपंच ः चिंचोले- कावेरी जाधव, खडकओझर- सुरेखा पगार, दरेगाव- अमोल देवरे, भाटगाव- सागर सोनवणे, आडगाव-बाबाजी पारधी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत प्रस्थापितांना हादरा देणारे व नव्या चेहऱ्यांना संधी देणाऱ्या धक्कादायक निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग २ मध्ये समसमान मते पडल्याने दामू गोपजी भामरे यांचा चिठ्ठीवर विजय झाला आहे. तर कातरवेलच्या सरपंचपदी श्रीराम चव्हाण अवघ्या १० मतांनी विजयी झाले आहेत. वाघळे सरपंचपदासाठी फेर मतमोजणी करण्यात आली होती.

आज सकाळी १० वाजता येथील नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणी प्रारंभ झाला. प्रारंभी आठ टेबलांवर प्रत्येकी पाच गावांची मतमोजणी करण्यात आली. ग्रामपंचायत निकालासाठी संपूर्ण तालुक्यातील उमेदवारांचे हितचिंतक व कार्यकर्ते तहसील आवाराच्या पटांगणात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थेट सरपंचपदी ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार ः आसखेडा-जया सावळा, औंदाणे-सविता निकम, वटार- कल्पना खैरनार, चौंधाणे लिलाबाई मोरे, आराई मनीषा अहिरे, गोराणे- कृष्णाताई देसले, महड- भाऊसाहेब धोंडगे, चौगाव लक्ष्मण मांडवडे, आनंदपूर- प्रवीण भामरे, वाघळे- सारीका पगार, मानुर- सुनीता अहिरे, तांदुळवाडी- प्रकाश बोरसे, डांगसौदाणे- जिजाबाई पवार, डोंगरेज- सुमन खैरनार, वनोली- कविता पगार, तळवाडे भामेर- शंकुतला गायकवाड, आव्हाटी- शांताराम भामरे, खिरमाणी- उज्ज्वला अहिरे, तळवाडे दिगर- दीपक पगार, तिळवण- चिंधा पवार, माळीवाडे- ज्योती बहिरम, मुल्हेर- भारती पवार, टेंभे वरचे- किशोर खरे, टेंभे खालचे- कांताबाई अहिरे ७६१, मुंगसे- चाफाबाई सोनवणे, पिंपळकोठे- किशोर भामरे, कातरवेल- श्रीराम चव्हाण, वीरगाव- ज्ञानेश्वर देवरे, किकवारी बुद्रक- सुनील माळी, जायखेडा- शांताराम अहिरे, निकवेल- चित्रा मोरे, वाघंबा- राजाराम चौधरी, मुंजवाड प्रमिला पवार, मोरेनगर- सुरेश जाधव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणी खरेदीची चौकशी करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येवल्यातून एका मंत्र्यासाठी थेट एकवीस लाखांच्या पैठणी खरेदीचे प्रकरण आता सरकारच्या अंगलट येणार आहे. तीन खात्यांचा कार्यभाग सांभाळणाऱ्या राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या उद्योगाची चर्चा मंत्रालयापर्यंत पोहचली असून, उद्योग भवन ते मंत्रालय पैठणी खरेदी कोणासाठी असा सवाल केला जात आहे. तर दुसरीकडे या पैठणींच्या खरेदीवरून राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांवर टीका केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खुलासा करावा तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

तीन खात्यांचा कार्यभार सांभाळणाऱ्या विदर्भातील एका ‘प्रवीण’ राज्यमंत्र्यास दिवाळसणासाठी तब्बल २१ लाख रुपयांच्या पैठणींची भेट देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘मटा’ने या संदर्भातील वृत्त प्रसारीत केल्यानंतर खळबळ उडाली असून, मंत्रालय ते उद्योग भवन मंत्र्याच्या या प्रतापाची चर्चा आहे. मंगळवारी उद्योग विभागातील अधिकाऱ्यांना आपले फोन स्वीच ऑफ केले तर, मंत्रालयात या पैठणी खरेदीची चर्चा रंगली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर दखल घेत, उद्योगमंत्री व मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. या मंत्र्याने होम मिनीस्टरचा कार्यक्रम सुरू केला आहे, का असा सवाल उपस्थित केला आहे. उद्योगमंत्र्यानी याचा खुलासा करावा व मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करावी अशी मागणी ते सरकारकडे करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.



एका मंत्र्यासाठी अधिकाऱ्यांनी एवढ्या प्रमाणावर पैठणी का घेतल्यात, याचा खुलासा खुद्द उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी करावा. विशेष म्हणजे बिलात एमआयडीसी असा उल्लेख केल्याने हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे.- राधाकृष्ण विखे पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांची दिवाळी फक्त साबणावर!

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक शहर पोलिसांसाठी हक्काची ठरलेली सद्‍भावना पोलिस कँटिन ऐन दिवाळीच्या तोंडावर रिकामी झाली आहे. दिवाळी खरेदीसाठी वस्तू शिल्लक नसल्याने पोलिस कुटुंबीयांना खाली हात परतावे लागत आहे. कँटिनमध्ये फक्त साबण आणि मसालेच उरले आहेत. यामुळे नाशिक पोलिस कुटुंबीयांची यंदाची दिवाळी साबणावरच साजरी होण्याचे चिन्हे आहेत.

तत्कालीन पोलिस आयुक्त कुलवंत सरंगल यांनी २०१३ मध्ये सद्‍भावना पोलिस कँटिनची सुरुवात केली. काही वर्षे कँटिनचा शहरासह ग्रामीण पोलिसांनीही फायदा झाला. शहर पोलिस आयुक्तालायतील सर्व पोलिस कुटुंबांना स्वस्त दरात वस्तू उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही सुविधा पुरविण्यात येते. मात्र, ऐन सणासुदीच्या वेळीच सद्‍भावना कँटिनमध्ये वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात सर्वत्र खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. याच गर्दीत बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना मात्र खरेदीपासून लांब राहण्याची वेळ आली आहे. सद्‍भावना कँटिनमध्ये घरोपयोगी वस्तू तसेच किराणा कमी दराने उपलब्ध होतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कॅन्टीनमधूनच या वस्तू खरेदी करण्याकडे पोलिस कुटुंबीयांचा ओघ असतो. परंतु, कँ‌टिनमध्ये साहित्यच शिल्लक राहिले नसल्याने कुटुंबीयांना बाहेरून जास्त किमतीला वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. माल पुरविणाऱ्या कंपन्यांचे बिल थकल्याने पुन्हा माल भरला जात नसल्याची चर्चा आयुक्तालयात रंगली आहे. कारण काहीही असले तरी पोलिस कर्मचाऱ्यांची​ दिवाळी गोड होणार नसल्याचे दिसते.

व्यवहार रोख, मग बिल का थकले?

पोलिस कँटिनमध्ये वस्तू खरेदीनंतर ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाते. सगळे व्यवहार चोख पार पडल्याशिवाय वस्तू ताब्यात दिली जात नाही. वस्तुंचे लागलीच पेमेंट मिळत असताना कँ‌टिनमध्ये माल पुरविण्याऱ्या कंपन्यांचे बिल कसे थकले? असा प्रश्न पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा उठणार भंगार बाजार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड लिंकरोडवरील नव्याने अनधिकृतपणे सुरू झालेल्या भंगार बाजाराचे अतिक्रमण काढण्यासाठी गुरूवारी कारवाई सुरू केली जाणार आहे. भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची तयारी पोलिस आयुक्तांनी दर्शविल्यानंतर पालिकेने या अतिक्रमणाविरोधात कारवाईसाठी नियोजन केले आहे. त्यामुळे उद्यापासून या अनधिकृत बाजारावर बुलडोझर फिरवला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी या बाजार संचलन केल्याने व्यावसायिक बॅकफुटवर आले आहेत.

अंबड-लिंक रोडवरील या अनधिकृत भंगार बाजार व्यावसायिकांनी हायकोर्टात पुन्हा धाव घेतली असली तरी, या कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे पालिकेने हे अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी पुन्हा मोहीम सुरू केली आहे. शहरातील गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळख झालेल्या आणि अनधिकृतपणे अंबड-लिंकरोडवर सुरू झालेल्या भंगार बाजाराचे अतिक्रमण महापालिकेच्या वतीने यंदा ७ जानेवारीला काढण्यात आले होते. या ठिकाणी अवैधपणे सुरू असलेली ७४६ भंगाराची दुकाने उद्धस्त करण्यात आली होती. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी राजकीय दबाव झुगारत या भंगार बाजाराचे ग्रहण सोडवले होते. तसेच, हा बाजार हटविण्यासाठी लागणारा ८५ लाखांचा खर्च वसुलीच्या नोटिसा या जागामालकांना देण्यात आल्या होत्या. परंतु, महापालिकेची पाठ फिरताच या व्यावसायिकांनी पुन्हा येथे बस्तान बसविण्यास सुरुवात केली. त्यामुळे दिलीप दातीर यांनी पुन्हा या बाजाराच्या तक्रारी केल्या असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

बाजाराचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने पोलिसांकडे बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याला पोलिसांनी आता प्रतिसाद दिला असून, त्यांनी पालिका आयुक्तांना १२ तारखेला पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार पालिकेनेही गुरुवारी या बाजारावर बुलडोझर चालविण्याची तयारी सुरू केली असून, कारवाईचे नियोजन केले आहे. गुरुवारी कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण मोहीम राबविली जाणार असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

सातशे कर्मचारी तैनात

महापालिकेने बाजारावर कारवाई करण्यासाठी नियोजन केले असून, त्यासाठी सात पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाचा प्रमुख कार्यकारी अभियंता असून, एका पथकात तीन जेसीबी, सहा डंपर, दोन क्रेन आणि कर्मचारी असा ताफा असणार आहे. महापालिकेचे जवळपास सातशे कर्मचारी या मोह‌िमेत सहभागी होणार असून, एका दिवसात मोहीम आटोपण्याचे नियोजन आहे. भंगार बाजार हटवण्याचा संपूर्ण खर्च व्यावसायिकांकडून वसूल केला जाणार आहे.

पुन्हा राजकीय दबाव

येथील व्यावसायिकांनी अतिक्रमणाची कारवाई टाळण्यासाठी पुन्हा राजकीय दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. पोलिस तसेच पालिकेवर कारवाई टाळण्यासाठी दबाव टाकला जात असून, हायकोर्टाच्या तारखेची वाट बघण्याची मागणी केली जात आहे. परंतु, पालिकेने कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाईचा निर्णय कायम ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधांऐवजी मनस्तापच अधिक

$
0
0

निमाणी बस स्टँड

--

सुविधांऐवजी मनस्तापच अधिक

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

शहर बस वाहतुकीचे प्रमुख केंद्र व पंचवटी परिसरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या निमाणी बस स्टँडला विविध समस्यांनी ग्रासले असून, बस स्टँडसह शौचालयाच्या समोरही मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे पावसाळ्यात येथे पाणी साचते. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक गैरसोय सहन करावी लागते.

येथील शौचालयात कायमच अस्वच्छता असते. त्यामुळे बहुसंख्य प्रवासी शौचालयात जाणेदेखील टाळतात. येथे महिलांकडून दोन व पाच रुपये आकारले जातात. मात्र, पैसे घेऊनही स्वच्छता होत नसल्याने महिला प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. येथून जवळपास पंचवीस ते तीस हजार प्रवासी प्रवास करतात. दहा हजार विद्यार्थी पासधारक असून, पाच हजार अन्य प्रवासी पासधारक व इतर सामान्य प्रवासी अशी मोठी संख्या असूनदेखील सुविधा मात्र फारच तोकड्या प्रमाणावर पुरविल्या जात आहेत. या बस स्टँडवर नियमितपणे जवळपास ८०० फेऱ्या ठरलेल्या असल्या, तरी ६७० ते ७०० फेऱ्या प्रत्यक्षात होतात. काही फेऱ्या आयत्यावेळी कॅन्सलदेखील केल्या जातात. त्याचाही सर्वाधिक त्रास महिला व विद्यार्थिनींना सहन करावा लागतो. गर्दी आणि धावपळीत बस पकडावी लागते, त्यामुळे छोटे-मोठे अपघातदेखील होतात.

--

निमाणी बस स्टँडमधील शौचालयात नेहमीच अस्वच्छता असते. मात्र, केवळ नाईलाजाने तेथे जावे लागते. त्यामुळे येथील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-स्वाती पाटील, प्रवासी

--

महिलांसाठी किमान चांगले स्वच्छतागृह असावे, असे एसटी महामंडळाला का वाटत नाही? स्वच्छतागृह ही मूलभूत सुविधा आहे. ती प्राधान्याने आणि चांगल्या दर्जाची असावी.
-शीतल गाडेकर, प्रवासी

-------------

ओझर बस स्टँड

--

अस्वच्छतेचा सामना नित्याचा...

म. टा. वृत्तसेवा आडगाव

नाशिक शहर व ग्रामीण वाहतुकीचे केंद्र असलेले ओझर बस स्टँड विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. येथील महिला स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झालेली असून, एसटी महामंडळाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने बहुसंख्य महिला प्रवासी स्वच्छतागृहाचा वापर टाळतात. नाईलाजाने स्वच्छतागृहात गेल्यास त्यांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो.

सायखेडा, पिंपळगाव, ओझर, तसेच निफाड तालुक्यातील नागरिकांची येथे दिवसभर वर्दळ असते. मात्र, बस स्टँडच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने निवारा शेडमध्ये जाण्यासाठी रस्ताच नसतो. येथे बस उभी केल्यानंतर बसमध्ये चढण्यासाठी चिखलातूनच जावे लागते. या स्टँडवरील सुलभ शौचालयाची पुरती दुरवस्था झालेली आहे. येथील नळ तुटलेले, पावसाळ्यात गळणारे छत, अस्वच्छता, दुर्गंधी ही नित्याची बाब झाली अाहे. पाच रुपये आकारूनही येथे नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने महिला प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी प्रशासन वा लोकप्रतिनिधींकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

--

स्वच्छतागृहाचा नाईलाजाने वापर

येथून दररोज पाच ते सहा हजार प्रवासी प्रवास करतात. जवळपास अडीच हजार विद्यार्थी आणि प्रवासी मासिक पासधारक असून, शहर बस वाहतुकीबरोबर ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये येथून बसेस जातात. अनेक एसटी बसचालक स्टँडमध्ये बस आणण्याचे कष्ट घेत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. अशा वेळीदेखील महिलांना स्वच्छतागृहाचा वापर करणे अशक्य बनते आणि नाईलाजाने तेथे गेल्यास त्यांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो.

--

येथील बस स्टँडमधील सुलभ शौचालयाची दुरवस्था झालेली आहे. स्वच्छतेअभावी दुर्गंधी पसरत असून, त्यामुळे नाहक गैरसोय होते. येथे स्वच्छता कर्मचारी नेमावा.

-साधना भडके, प्रवासी
--

येथे पावसाळ्यात पाणी साचलेले असते. त्यामुळे निवारा शेडमध्येही जाता येत नाही. स्वच्छतागृहाकडे जाणेदेखील अवघड होते. तेथे प्रचंड अस्वच्छता असते.

-कामिनी कदम, विद्यार्थिनी

----------------

नाशिकरोड बस स्टँड

--

प्रवासी अन् एसटी कर्मचारीही हतबल


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड / सिन्नर फाटा

नाशिकचे पूर्वेचे प्रवेशद्वार म्हणून नाशिकरोड ओळखले जाते. मात्र, हजारो प्रवाशांची दिवस-रात्र वर्दळ असलेल्या नाशिकरोड बस स्टँडवर एसटीचे स्वच्छतागृह नाही की शौचालय नाही. प्रवाशांना महापालिकेच्या सुलभ शौचालयात पैसे देऊन जावे लागते. शेजारील रेल्वे स्टेशनवरही प्रवाशांना पैसे द्यावे लागतात. मात्र, पैसे देऊनदेखील पुरेशा सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नाशिकरोड परिसरात महिलांसाठी स्वतंत्र शौचालय किंवा स्वच्छतागृहच नसल्याचाही स्थिती आहे.

नाशिकरोड बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन मिळून दररोज सुमारे लाखभर प्रवासी ये-जा करतात. दररोज येथून शहर बससेवेच्या २००, तर ग्रामीणच्या २०० अशा सुमारे ४०० बसेसची ये-जा होते. या बसेसद्वारे सुमारे तीन ते चार हजार महिला प्रवास करतात. तिकीट काढून प्रवास करणाऱ्या या प्रवाशांना मोफत स्वच्छतागृह आणि शौचालय मिळण्याचा अधिकार असतानाही त्यांना पैसे देऊन या सुविधा मिळवाव्या लागत आहेत. येथून कर्नाटक, कोकण, कोल्हापूर, सोलापूर, पालघर, पुणे आदी ठिकाणी प्रवासी जातात. अशा लांबपल्ल्याच्या प्रवासात अवघडलेल्या प्रवाशांची त्यामुळे कुचंबणा होत आहे.

--

सुलभमध्ये स्वच्छतेचा अभाव
पंचवटी डेपोच्या अाधिपत्याखालील नाशिकरोड बस स्टँडमध्ये ५० महिलांसह सुमारे अडीचशे एसटी कर्मचारी आहेत. पोलिस चौकीही आहे. या सर्वांना एसटीचे स्वच्छतागृह नाही. त्यामुळे त्यांना स्थानक आवारातील सुलभ शौचालयतच जावे लागते. अनेक जणांना नाईलाजाने उघड्यावर जावे लागत असल्याने येथे दुर्गंधी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रवाशांसह येथून बसने शाळा, कॉलेजांत जाणाऱ्या विद्यार्थिनी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिलांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. येथील सुलभ शौचालयात शौचास जाण्यासाठी पाच रुपये लागतात. लघुशंकेला जाणाऱ्या प्रवाशांकडून पैसे घेण्याचा त्यांना अधिकार नाही. तरीही ठेकेदार त्यासाठी पैसे घेतो, असा प्रवाशांचा आरोप आहे. या स्वच्छतागृहांची पुरेशी स्वच्छता ठेवली जात नाही.

--

नाशिकरोड बस स्टँडमध्ये प्रवाशांना मोफत स्वच्छतागृह आणि शौचालयाची सुविधा देणे ही एसटीची जबाबदारी आहे. महिला व इतर प्रवाशांसाठी अशी सुविधा गरजेची आहे.

-मुक्ताताई धोंगडे, प्रवासी

--

येथील बस स्टँडवरील महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह वापरण्यास योग्य नाही. येथे कायमच अस्वच्छता असते. महिलांकडून पाच ते दहा रुपये आकारले जातात.

-वैशाली गायधनी, प्रवास

-------------

भगूर बस स्टँड

--

प्राथमिक सुविधांचीदेखील वानवा

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
नाशिक तालुक्याला इगतपुरी व सिन्नर तालुक्यांशी जोडणाऱ्या भगूर येथील बस स्टँडवरून दिवसभरात शेकडो नागरिक प्रवास करतात. मात्र, या बस स्टँडवर महिलांसाठी अगदी प्राथमिक सुविधांचीदेखील वानवा असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून आहे.

भगूर बस स्टँड खासगी जागेवर उभारण्यात आलेले आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी रोटरी क्लबतर्फे येथे सुसज्ज सुलभ शौचालय व स्नानगृहाची उभारणी करण्यात आली. मात्र, देखभालीअभावी आज त्याची दुरवस्था झाली आहे. शौचालयाच्या भिंतींवरील टाइल्स उखडून पडल्या आहेत. शौचालयाच्या आतील बाजूस असलेल्या स्नान कक्षाजवळ प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडून आहे. दुसरीकडे महिलांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. परिणामी बस स्टँडच्या मागील बाजूच्या मोकळ्या जागेचा वापर बहुतांश प्रवाशांकडून होताना दिसतो. त्यामुळे आजूबाजूला कायम दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असते. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागते. येथील बोअरवेलही तीन वर्षांपासून बंदच आहे.

‘सुविधांबाबत न बोललेलेच बरे!’

येथे नियमित साफसफाई होत नसून, शौचालयांसाठी पाणीदेखील उपलब्ध नाही. एसटी महामंडळाच्या वतीने पाठविण्यात येणारा स्वच्छता कर्मचारी वेळ मिळाल्यास दुपारच्या सुमारास येतो अन् साफसफाई न करताच निघून जातो. येथील प्रवाशांमध्ये ५० टक्के शालेय व कॉलेजच्या विद्यार्थिनींचा समावेश असून, येथील सुविधांबाबत न बोललेलेच बरे, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

--

भगूर बस स्टँड परिसरात महिलांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवास करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

-हिराबाई खातळे, प्रवासी

--

एसटीने महिला प्रवाशांना तरी प्राथमिक सुविधा द्यायला हव्यात. मात्र, या वर्दळीच्या बस स्टँडमध्येदेखील सुविधांची वानवा असणे ही शरमेची बाब आहे.

-प्रीती गंधे, विद्यार्थिनी

-----------------

देवळाली कॅम्प बस स्टँड

--

सॅनिटरी व्हेंडिंग मशिनची निकड

--

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर बस स्टँडपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळाली कॅम्पमधील बस स्टँडवर रोटरी क्लबच्या वतीने सुसज्ज असे सुलभ प्रसाधनगृह उभारण्यात आलेले आहे. येथे पुरेशी स्वच्छता राखली जात असली, तरी येथे सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशिन लावणे गरजेचे असल्याचे मत महिला प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

देवळाली बस स्टँड जुन्या जागेवरून सध्याच्या नव्या जागी हलवितानाच प्रसाधनगृहाच्या सुविधेबाबत शहरातील लोकप्रतिनिधी व समाजसेवक यांनी विचार करून स्थानकाच्या शेजारील मोकळ्या जागेत कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या सहकाऱ्याने व सिवानंदा इलेक्ट्रॉनिक्सच्या सौजन्याने रोटरी क्लबने सर्व सुविधांयुक्त प्रसाधनगृह सन २००५ मध्येच बांधलेले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने खासगी ठेकेदारामार्फत या प्रसाधनगृहाची नियमित स्वच्छता व योग्य ती देखभाल करण्यात येत आहे. त्यामुळे येथे महिलांची गैरसोय होत नाही.मात्र, या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशिन बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे येथील सेवेचा दर्जा वाढून महिलांना चांगली सुविधाही मिळेल.

(संकलन ः डॉ. बाळकृष्ण शेलार, नवनाथ वाघचौरे, प्रशांत धिवंदे, अभिजित राऊत)

--

(फोटो ः सतीश काळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस भाडेतत्त्वावर?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुढील वर्षांपासून सिटी बस सेवा बंद करण्याचा इशारा राज्य परिवहन महामंडळाने दिल्यानंतर महापालिकेने आता सीबीबस सेवा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या वतीने सिटी बससंदर्भात कन्सल्टंट नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आज अंतिम निर्णय होणार आहे. भाडेतत्त्वावर, पीपीपी आणि स्वतः बससेवा चालविणे अशा तीन पर्यायांची महापालिकेतर्फे चाचपणी सुरू असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे. कन्सल्टंटच्या अहवालानंतर पालिकेच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्यात बस सेवेवरून वाद सुरू आहेत. महामंडळाने ही बससेवा टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील वर्षी बंद करण्याचा इशारा दिला आहे. महामंडळाने बससेवा ही महापालिकेने चालवावी असे सांगत, हात झटकले आहेत. बससेवा चालविण्याबाबतची आर्थिक स्थिती सद्या तरी पालिकेची नाही. त्यामुळे सिटी बसचा तिढा आता चिघळला आहे. सध्या तरी पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सीटीबस पालिका ताब्यात घेवू शकत नाही. त्यामुळे महापालिकेने सिटी बसबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी कन्सल्टंट नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी कन्सल्टंटची नियुक्ती केली जाणार असून, कन्सल्टंट तीन महिन्यांत पालिकेला आपला अहवाल सादर करणार आहे.

याबाबत आयुक्त कृष्णा यांनी स्पष्टीकरण देत, सिटीबसचा तोडगा लवकरच काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले. शहर बस सेवा सुरू करण्यासंदर्भात पालिका सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आधी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करून सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी कशा प्रकारे ही सेवा चालवावी लागेल. त्याचे रूट, तिकीट दर यांचा अभ्यास करून समितीकडून येणाऱ्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. महापालिका व नागरिकांच्या हिताचा निर्णय घेऊ, असा दावा त्यांनी केला आहे.

द्वारकावर सिग्नलच पर्याय!

द्वारकेवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी राबवलेला यू- टर्नचा प्रयोग हा फेल गेला आहे. द्वारकेच्या वाहतूक कोंडीवर सिग्नल यंत्रणा व त्याचे योग्य मॅनेजमेंट हाच पर्याय असल्याचा दावा आयुक्त कृष्णा यांनी केला आहे. महापालिका तिथे सिग्नल बसविण्यास तयार असून, पोलिसांनी योग्य नियोजन केल्यास येथील वाहतूक कोंडी फुटू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

हे आहेत पर्याय...

१. सिटी बससेवा टेकओव्हर करणे

२. पीपीपी तत्त्वावर बससेवा चालविणे

३. बससेवा थेट भाडेतत्त्वावर घेणे

(पालिकेच्या दृष्टीने तिसरा पर्याय सर्वाधिक व्यवहार्य असल्याने, त्यादृष्टीने चाचपणी केली जात आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठातर्फे महिलांना रोपवाटिका प्रशिक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण आदिवासी भागातील महिलांना बचत गटाद्वारे स्वंयरोजगाराच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सारूळ येथील २० महिलांना भाजीपाला रोपवाटिका तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.

मुक्त विद्यापीठाचे कृषि विज्ञान केंद्र ग्राम विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवीत असते. विशेषतः शेतकरी आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उत्कर्ष साधता यावा यासाठी कार्यरत आहे. याचाच एक भाग म्हणून तीन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी यासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कम्युनिटी सर्व्हिस अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी केल्या जाणाऱ्या कामाचा एक भाग म्हणून या प्रशिक्षणासाठी सहकार्य करण्यात आले.

प्रशिक्षणार्थींना केंद्राचे उद्यानविद्या तज्ज्ञ हेमराज राजपुत, राजाराम पाटील यांनी विशेष सहभाग दिला. या प्रशिक्षणात महिलांना भाजीपाला रोपाचे संपूर्ण मार्गदर्शन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले. बेळगाव ढगा येथील कृषि रोपवाटिकेत महिलांनी तांत्रिक माहिती घेतली. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी भविष्यात या महिलांना तांत्रिक सहकार्य करण्यास केंद्राची मदत देणार असल्याचे सांगितले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल यांनी या महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहू असे ते म्हणाले. तसेच फळे व भाजीपाल प्रक्रिया, शेळी पालन, शिवनकाम, आरोग्य तपासणी यांसारख्या उपक्रमांसाठी बिनव्याजी पतपुरवठा करणार असल्याचे रोटरीचे माजी अध्यक्ष अनिल सुकेणकर यांनी सांगितले. तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांना रोटरी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या शास्रज्ञांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. गृहशास्त्र तज्ज्ञ अर्चना देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हैदराबादचा सोनसाखळीचोर गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तेलंगणा राज्यातील हैदराबाद पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून आलेल्या आणि शहरात वास्तव्यास राहून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले. संशयिताने ११ गुन्ह्याची कबुली देऊन सहा लाख रुपयांचे १६ तोळे वजनाचे सोने पोलिसांच्या स्वाधीन केले. शहरात गुन्हे करण्यात मदत करणाऱ्या दोघा स्थानिकांनाही या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

महम्मद मुजीब अफान बीन (२५, बंजारा इस्ट, रोड नंबर १०, जोहरानगर, शिंगाडा वस्ती, हैदराबाद) असे संशयित आरोपीचे नाव आहे. साधारणत‍ः आठ महिन्यांपूर्वी महम्मद हैदराबाद पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. त्याच्या विरोधात हैदराबादमधील विविध पोलिस स्टेशनमध्ये ५४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. चेन स्नॅचिंगसह हत्येचा प्रयत्न व इतर काही गुन्ह्यांचा यात समावेश आहे. पोलिसांच्या तावडीतून सुटलेला महम्मद रेल्वेने नाशिकमध्ये पोहचला. प्रवासात त्याने नाशिकच्या तरुणाशी मैत्री केली. काही दिवस त्याच्यासोबत घालवल्यानंतर त्याने आक्रम अस्मल खान (३०, रा. एनडी पटेल रोड, पंचशीलनगर, गंजमाळ) तसेच अहमद शेख कादर शेख (३०, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) यांना सोबत घेतले. या तिघांनी मिळून शहरात सुमारे ११ चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले. या टोळीबाबत क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे कॉन्स्टेबल स्वप्निल जुंद्रे यांना माहिती मिळाली. त्यानुसार क्राइम ब्रँचच्या पथकाने शिताफीने तिघांना जेरबंद केले. संशयित आरोपींनी गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीत वाहनचोरी केली होती. तसेच स्थानिक संशयितांच्या एका दुचाकीचा वापर संशयित आरोपींकडून केला जात होता. हैदराबाद येथील संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून, पोलिसांनाही तो धमक्या देतो. या संशयिताची माहिती हैदराबाद पोलिसांना कळवण्यात आली असून, लवकरच ते त्याचा ताबा घेणार आहेत. संशयितांनी मिळून शहरात ११ गुन्हे केल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडील सहा लाख रुपयांचे १६ तोळा वजनाचे सोने जप्त केले आहे.

पोलिसांनी चालू वर्षीच्या ८३ पैकी ७० चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात परजिल्ह्यातील संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. संशयितांचा आणखी एक साथिदार फरार असून, त्यालाही लवकरच अटक केली जाईल.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर बसला मनमाडजवळ अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नंदुरबारहून पंढरपूरकडे जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आणि येवल्याहून मनमाडकडे येणारा ट्रक यांच्यात मनमाड-येवला मार्गावर सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात ३५ प्रवासी जखमी झाले. त्यातील पाच जण गंभीर असून, त्यांना तातडीने नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे मनमाड-येवला मार्गावरील वाढत्या अपघातांचा व रस्त्यावरील दुभाजकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सोमवारी रात्री नंदुरबार-पंढरपूर (एमएच २० बीसी ४०९४) ही बस मनमाड बसस्थानकातून येवल्याकडे निघाली असता जुन्या ट्रेनिंग कॉलेजजवळ येवल्याहून-मनमाडकडे येणाऱ्या ट्रकवर आदळली. रस्त्यावरील दुभाजक लक्षात न आल्याने आधी बस दुभाजकाला धडकली व नंतर समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली, असा अंदाज आहे. या अपघातात दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात जाऊन आदळल्या. या अपघातात ३५ प्रवासी जखमी झाले. तर त्यातील सहा जण गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथे हलविण्यात आले. या अपघातात बस चालक एस. व्ही. राठोड व वाहक एस. के. बिडगर दोघे गंभीर जखमी आहेत.

अपघात घडल्यानंतर जोराचा आवाज आल्याने परिसरातील नागरिक कार्यकर्त्यांनी जखमींना बसमधून बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मृत्यूचा सापळा

मनमाड-येवला मार्ग हा मृत्यूचा सापळा झाला असून, या मार्गावर वारंवार होणारे अपघात हा चिंतेचा विषय आहे. मनमाड-येवला मार्गावर नेहमी अंधाराचे साम्राज्य असल्याची ओरड होत असते. सोमवारी या मार्गावर अंधार असल्यानेच बसचालकाला मार्गावरील दुभाजक दिसले नसावे व दुभाजकावर आदळून नंतर समोरून येणाऱ्या ट्रकला बसची धडक बसली असा अंदाज आहे.

पुलाचे नूतनीकरण आवश्यक

मनमाड-येवला मार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजवर होणारे अपघात ही देखील मोठी गंभीर बाब असून या रेल्वे ओव्हर ब्रिजची आयुमर्यादा तपासली गेली पाहिजे. हा पूल जुना झाला असून वर्षानुवर्षे तो वापरला जात असल्याने या पुलाची सध्याची क्षमता व नूतनीकरण आवश्यक आहे की नाही याची सक्षम तंत्रज्ञ वा तज्ञांकडून पाहणी तसेच निरीक्षण करावे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालवाहतूकदार संपाचा औद्योगिक क्षेत्राला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद लाभला जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद ठेवण्यात आली. याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला.

मालवाहतुकीला जीएसटीमध्ये जास्त कर लावल्याने व डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या किमतीमुळे देशभरातील मालवाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस देशव्यापी संपाची हाक दिली. त्याला नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के मालवाहतूकदार संपात सहभागी झाले. जिल्ह्यातील सुमारे ५ हजार गाड्या उभ्या होत्या. सोमवारी व मंगळवारी प्रवासात असलेली वाहने वगळता इतर सर्व वाहने संपात सहभागी झाली. माल वाहतूकदारांच्या संपामुळे मुंबई-आग्रारोडवरील वाहतूक तुरळक होती. सरकारने या संपाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर देशव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा संघटनेचा विचार असल्याचा इशारा वाहतुकदारांनी दिला आहे. संपामुळे मालवाहतूक ठप्प झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

सरकारने जीएसटीची अन्यायकारक आकारणी करू नये, डिझेलचे दर कमी करावेत, मालवाहतूकदारांना वाहतूक पोलिस, आरटीओ यांच्यामार्फत होणारा त्रास कमी होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, टोल संदर्भातील व्यावहारिक धोरण आखावे आदी विविध मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून हा संप सुरू झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर देशभरातील मालवाहतुकीचे बुकिंग व डिलिव्हरीत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळत सर्व मालवाहतूक ठप्प होती. त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्राला झाला. अनेक कारखान्यांना कच्च्या मालाचा पुरवठा न झाल्याने उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली. सरकारने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास दिवाळीनंतर बेमुदत संप केला जाणार आहे. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल.
- अंजू भगवानदास सिंघल, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि. १०) बेमुदत संपाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. संपामुळे कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.

महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्या मान्य व्हाव्यात, यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटना चार वर्षांपासून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. परंतु, अजूनही अनेक मागण्या मान्य होऊ शकलेल्या नाहीत. सरकारने पुरवठा निरीक्षकपद सरळसेवेतून भरण्याचा निर्णय घेतल्याने अव्वल कारकूनांवर अन्याय होणार आहे. त्यांनी सुरू केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील २५३ अव्वल कारकून, ३४३ लिपिक, वाहनचालक ४१ तसेच १८२ शिपाई तसेच २४ पदोन्नत नायब तहसीलदार असे एकूण ८४३ कर्मचारी सहभागी झाले आहेत. यापैकी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प‍्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

नागरिकांची गैरसोय

महसूल कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने नागरिकांची मात्र गैरसोय होऊ लागली आहे. तहसील कार्यालये, पुरवठा व‌िभाग, टंचाई शाखेसह विविध कार्यालयांमध्ये कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या टेबल खुर्च्यांचे दर्शन घडले. कार्यालयात कर्मचाऱ्यांनी संपाबाबतचा सूचना फलक लिहिला असून नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअर्स असोसिएशनचे धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यासाठी मंगळवारी जिल्हापरिषदेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व कॉन्ट्रॅक्टर व त्यांच्यावर अवलंबून असलेले कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
मुख्य लेखाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर्सला नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे धनादेश वितरित करण्यात आले आहे. या बँकेचे कामकाज ठप्प असल्याने तेथून पैसे मिळवण्यास अडचण येते आहे. ती अडचण दूर करण्यात येऊन आम्हाला रोख स्वरुपात पैसे देण्यात यावे. तसेच मार्च २०१७ पर्यंत जी बिले देण्यात आली आहेत त्यांचे पैसे आद्यप मिळालेले नाही. ते पैसे व्याजासह देण्यात यावे. संघटनेच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर्सने वेगवेगळ्या बॅँकाकडून कर्ज घेतले आहे. ते फेडण्यास कॅन्ट्रॅक्टर हतबल आहेत. लोकांचे देणी अद्याप दिलेली नाही. त्यामुळे बाजारात तोड दाखवणे मुष्कील आहे. त्यामुळे अर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. येत्या तीन दिवसात पैसे देण्यात यावे; अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यत येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियामुळे तरुणाई डिप्रेशनमध्ये

$
0
0

jitendra.tarte@timesgroup.com
Twitter : jitendratarte@MT

नाशिक : वाढती स्पर्धा, तणावपूर्ण जीवनशैली आणि अपेक्षापूर्ती न झाल्याने येणारे नैराश्य या कारणांच्या बरोबरीलाच इंटरनेट आणि सोशल मीडियाचे लागणारे व्यसन हे ही टीन एजर्स युवकांना डिप्रेशनच्या जाळ्यात ओढत आहे, असे गंभीर निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

या निरीक्षणास शहरातील समुपदेशक व संमोहनतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी ‘मटा’शी बोलताना पुष्टी दिली. ‘मना सज्जना’ या मालिकेच्या माध्यमातून युवकांच्या भावविश्वाची घुसमट पहिल्या भागात मांडल्यानंतर टीन एजर्सच्या अस्वस्थ मनांची दाहक स्पंदनेही प्रतिक्रियात्मक स्वरूपात आली. इयत्ता आठवीपासून स्मार्ट फोन अन् इंटरनेटच्या आहारी गेलेल्या टीन एजर्स युवक व युवतींच्या कहाण्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. आधुनिक जगातील संवाद साधण्याची ही नवमाध्यमेच टीन एजर्सना नैराश्याच्या अन् प्रसंगी आत्महत्येच्या गर्तेतही खेचत असल्याच्या मुद्द्यावर संमोहनतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी प्रकाशझोत टाकला.

डॉ. गायकवाड म्हणाले, की इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या आहारी शाळकरी मुले जात असल्याच्या समस्या घेऊन पालक भेटण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. ही आधुनिक साधने उपयुक्त असली तरीही त्यांचे जडणारे व्यसन माणसांमधील संवाद संपवित आहे. परिणामी भावनांचा ओलावा संपल्याने टीन एजर्समध्ये गैरसमजांना येणारे उधाण, वादाच्या परिणीतीत अन् प्रसंगी गुन्हेगारीत होणारे याचे रूपांतर हे नवयुवकांचे आयुष्य फुलण्या अगोदरच उध्वस्थ होण्यास कारणीभूत ठरत आहे.

भासमान जगाचे बळी

शहरातील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थी स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाच्या आहारी गेला होता. त्याच्या चेहऱ्यावरील आणि वर्तणुकीतील वाढत्या तणावामुळे पालकही अस्वस्थ झाले होते. त्याच्या समस्येवर उतारा शोधताना पालकांना धक्काच बसला. सोशल मीडियावर त्याने फेक अकाउंट उघडून चक्क एका एका बॉलिवूड अभिनेत्रीशी चॅटिंग सुरू केले होते. अर्थात, अभिनेत्रीच्या नावे चालविले गेलेले फेक सोशल मीडिया अकाउंटही खोटे असू शकते. मात्र, या प्रसंगातून टीन एजर्स मुले इंटरनेट अन् सोशल मीडियाच्या भासमान जगाला बळी पडत असल्याचेच अधोरेखीत होते आहे.

सोशल मीडियाचा दुष्प्रभाव

आणखी काही प्रसंगांमध्ये युवकांनी सोशल मीडियावर स्वत:चे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो शेअर करणे, स्वत:च्या घरात किंवा कॉलेजमध्ये मौज मजेसाठी मोठ्या चोऱ्या करणे, टोळीयुद्ध करणे यासारखी मानसिकता केवळ इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या दुष्प्रभावाने होते आहे, असेही निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञांनी नोंदविले.

तिशीच्या आतील तरुणाईचे वास्तव

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सर्वाधिक आत्महत्या भारतात होतात. जगाच्या तुलनेत भारतातील या घटनांचे प्रमाण १० टक्के आहे. यामध्येही सर्वाधिक आत्महत्या तिशीच्या आतील युवकांच्या आहेत. देशातील एकूण आत्महत्यांपैकी जवळपास ३० ते ४० टक्के आत्महत्या फक्त युवकांच्या असतात, या वास्तवावरही ‘डब्ल्यूएचओ’च्या नोंदी प्रकाश टाकतात. आत्महत्येच्या प्रयत्नात युवतींचेही प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक बाब आहे.

मेंदूतही होतात अतिसूक्ष्म बदल

चीनमध्ये झालेल्या एका मनोविषयक अभ्यासातही ‘इंटरनेट अॅडिक्शन डिसॉर्डर’ या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला. इंटरनेटच्या अतिरेकाने मेंदूतही अतिसूक्ष्म बदल घडून रचनांमध्ये परिवर्तन होते. परिणामी, चांगले विचार करण्याच्या क्षमतेत घट होणे, भावनांवरील नियंत्रण हरविणे यासारख्या गंभीर बाबी टीन एजर्स आणि तरुणांमध्ये वाढीस लागल्याचे दाहक सत्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पसा’ नाट्यगृहात प्रथमच चित्रपट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकांकिका, हौशी, प्रायोगिक व व्यावसायिक नाटके, व्याख्याने इतकेच नाही तर स्नेहसंमेलने, विविध कार्यशाळा आणि सभा संमेलनांसाठी प्रसिद्ध असलेल्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात प्रथमच चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

याआधी पसा नाट्यगृहात ‘कावळा’ हा लघुपट दाखविण्यात आला होता; मात्र त्यासाठी छोटा पडदा वापरण्यात आला होता. कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे रिन्युएशनचे काम सुरू झाले आणि त्यापाठोपाठ शहरातील इतर नाट्यगृहांचा भाव चांगलाच वधारला. त्यातच परशुराम साईखेडकर हे नाट्यगृह मध्यवर्ती असल्यामुळे या ठिकाणी अधिकाधिक कार्यक्रम होऊ लागले; परंतु आता या नाट्यगृहात चक्क चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने नाशिककर कलाकारांनी बनवलेल्या जातीअंताच्या चळवळीअंतर्गत जाती निर्मूलनाचा विषय घेऊन ‘उतरंड’ हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाचा आशय सामाजिक आहे. या चित्रपटात लेखक दिर्ग्दाकापासून तर मुख्य कलाकारापर्यंत सर्वाधिक नाशिककरांचा समावेश आहे. रंगकर्मी श्रीराम गोरे, धर्मराज खैरनार, प्रवरा कुलकर्णी, तुषार माने, संगीता गायकवाड, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. सुनिता वाघमारे, नरेंद्र खाडे, पुष्पेंद्र जाधव, अमित शिरसाठ, अमित गायकवाड, शरद गांगुर्डे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. लेखक व दिग्दर्शन सुदाम वाघमारे असून प्रथमच चित्रपट पसा नाट्यगृहात होत असल्याने त्याविषयी कुतूहलाचे वातावरण आहे.

सर्वांना मुक्त प्रवेश

समता, एकता प्रस्थापित करू पाहणाऱ्या या चित्रपटाची पहिली चाचणी बुधवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजता होत आहे. हा प्रयोग विनामूल्य असून आसन क्रमांक निश्चित करण्यासाठी ९८३३७७७२५० किंवा ९२०९१४३१९२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images