Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

६० दिवस, ४३ हजार वाहने अन् सव्वा कोटीचा दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत शहर पोलिसांनी तब्बल ४३ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत एक कोटी १५ लाख रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक शाखेच्या इतिहासात प्रथमच कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली आहे.

शहर वाहतूक शाखेने जानेवारी ते ६ ऑगस्ट या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल दोन कोटी सात लाख ७२ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला होता. यासाठी ८४,४७६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कालावधीत शहर पोलिसांनी वेळोवेळी जनजागृती अभियान राबवले. मात्र, बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तनात फरक पडला नाही. त्यामुळे ऑगस्ट, तसेच सप्टेंबरमध्ये शहर पोलिसांनी कारवाईला जोर दिला. आजमितीस कारवाई झालेल्या वाहनांची संख्या एक लाख २८ हजार ९१ इतकी झाली असून, दंडाची रक्कम तीन कोटी २२ लाख ८१ हजार ६०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. २०१६ मध्ये याच कालावधीत शहर वाहतूक शाखेने एक लाख ६३ हजार ७३७ वाहनांवर कारवाई करून एक कोटी ७२ लाख ९९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला होता.

शहरात वाहनांची संख्या लक्षणीय वाढली असून, शॉर्टकट मारणाऱ्या अथवा वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांमुळे वाताहत होते आहे. वन वे अथवा नो एंट्री नियमांकडे दुर्लक्ष करणे, ओव्हर स्पीड, फ्रंटसीट प्रवासी, ड्रंक अँड ड्रायव्हिंग, पार्किंग नियमाकडे दुर्लक्ष, सिग्नल जम्पिंग, सीटबेल्ट अथवा हेल्मेट न लावणे अशा अनेक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. झेब्रा क्रॉसिंग वा लेन कटिंगसारख्या नियमांची माहितीही वाहनचालकांना नसते. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी कारवाईची मोहीम सुरू केली. मोठा आर्थिक भुर्दंड लावण्याची मात्रा पोलिसांनी शोधून काढली. मोठा भुर्दंड बसल्यानंतर तरी वाहनचालक पुन्हा असे प्रकार करणार नाही, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. दुर्दैवाने दंडाचा आकडा तीन कोटींच्या घरात पोहोचूनही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इंडियन सायकल डे’साठी नाशिक ते मुंबई रॅली

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनतर्फे २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे सायकल रॅली काढून साजरा करण्यात आला. या वेळी पोलिस आयुक्तांसह ६० जणांनी नाशिक ते मुंबई सायकल रॅलीत सहभाग घेतला.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते रविवारी सकाळी ६ वाजता रॅलीला सुरुवात करण्यात आली. लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटचे अध्यक्ष के. डी. पाटील, सिटीझन बँकेचे चेअरमन शेखर सोनवणे, नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया आदी उपस्थित होते. रॅलीत डॉ. सिंगल यांच्यासह शहर अभियंता यू. बी. पवार, किरण चव्हाण यांनीही सहभाग घेत इगतपुरीपर्यंत सायकल चालवली. पहिल्या दिवशी भिवंडी फाटा येथे शांग्रीला रिसॉर्ट येथे मुक्कामी राहून २ ऑक्टोबर रोजी सर्व सायकलिस्ट्स गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचतील.

रिमझिम ग्रुपतर्फे स्वागत

रॅलीच्या प्रथम टप्प्यात घोटी येथे रॅलीत सहभागी नाशिक सायकलिस्ट्सच्या सदस्यांचे रिमझिम ग्रुपतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी रिमझिम ग्रुपचे अध्यक्ष नीलेश काळे, पुरुषोत्तम राठोड, समाधान जाधव, घोटीचे सरपंच माणिक खांब, हरीश चव्हाण, ओम कंदकुरीवार, नीलेश पदमेरे, रमेश बोराडे, संतोष व्यवहारे यांनी प्रत्येकाचे स्वागत केले.

इंडियन सायकल डे

नाशिक सायकलिस्ट्स सहा वर्षांपासून गांधी जयंती हा दिवस इंडियन सायकल डे म्हणून साजरा करीत आहे. या दिवशी जनतेस पर्यावरण, स्वच्छता व नागरी कर्तव्यांचा संदेश दिला जातो. शहरात विविध रॅली होतात. मात्र, ही चळवळ देशभरात नेण्याच्या उद्देशाने २ ऑक्टोबर रोजी इंडियन सायकल डे साजरा व्हावा असा मानस ठेवून २०१६ पासून नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.

आज जनजागृती

सायकल चळवळीतील रॅलीच्या दुसऱ्या पर्वामध्ये नाशिक सायकलिस्ट्सना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची साथ मिळत आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे सोमवारी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात एमटीडीसीचे सहव्यवस्थापक आशुतोष राठोड, तसेच अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत नाशिक सायकलिस्ट्सच्या सदस्यांकडून स्वच्छता, पर्यावरण आणि मानवी कर्तव्ये यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. दोन ऑक्टोबर हा इंडियन सायकल डे व्हावा, यासाठी संबंधित खात्याला निवेदन देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी संकुलांमध्ये पोल माऊंटिंग डस्टबिन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘झिरो गार्बेज सिटी’ म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये आता व्यापारी संकुलांत कचरा कुंड्या दिसणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने रीतसर निविदा प्रसिद्ध केली असून, त्यात कचरा संकलनासाठी ‘पोल माऊंटिंग डस्टब‌िन’ पुरवण्याचे दरपत्रक मागवले आहे. ११० लिटरचे हे डस्टबिन असणार असून, ते पोल वर उभे केले जाणार आहे. पण, ते फुल्ल झाले तर पुन्हा कचऱ्याचा प्रश्न समोर येणार आहे.

मुंबई, पुण्यासह देशातील सर्वत्र कचराकुंड्या व त्यातून बाहेर पडणारी घाण नेहमीच टिकेचा विषय असतो. पण, नाशिक महानगरात घंटागाडी आल्यानंतर कचरा कुंड्याच गायब झाल्या. घरात साठवलेला कचरा थेट घंटागाडीत अशी व्यवस्था केल्यामुळे हे शहर ‘झिरो गार्बेज सिटी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. कचरा संकलाची पद्धत व त्याचे नियोजन सूक्ष्म पद्धतीने महापालिकेने केल्यामुळे शहरात स्वच्छतेचा चांगला पायंडाही पडला व त्याचे कौतुकही झाले. पण, व्यापारी संकुल व व्यावसायिक ठिकाणांतील कचऱ्याचा विषय मात्र गांभीर्याने पुढे आला. या संकुलातील कचरा व घंडागाड्यांचे वेळेचे नियोजन फिसकटल्यामुळे अनेक जण हा कचरा कोठेही फेकू लागल्यामुळे त्याचा फटकाही बसला. काही व्यापारी संकुलांत घंडागाडी जाणे अवघड झाल्यामुळे हा प्रश्न तीव्रतेने समोर आला. त्यामुळे महानगरपालिकेने आता या संकुलांतील कचरा एकत्र करण्यासाठी ‘पोल माऊंटिंग डस्टब‌िन’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत महापालिकेने ई-निविदा प्रसिद्ध केली असून, आयएसओ ९००१ः२००८ मानांकन असलेल्या उत्पादक कंपन्यांचेच डस्टबीन पुरवावेत, असे म्हटले आहे.


कचरामुक्ती होणार का?

नाशिक स्मार्ट सिटीकडे जाण्याअगोदरच ‘झिरो गार्बेज सिटी’ व शहरातील रस्ते अनेकांच्या कौतुकाचे विषय ठरले आहेत. त्यामुळे या डस्टब‌िनमुळे शहराच्या स्वच्छतेच्या प्रतिमेला धक्का बसू नये याची काळजीही महानगपालिकेला घ्यावी लागणार आहे. कचरा कुंड्यांचे निर्मूलन करणे ही गोष्ट सोपी नाही. त्यासाठी घंटागाडीची संख्याही वाढवली गेली व त्याचे चांगले रिझल्ट मिळाले. शहराचा वाढता विस्तार व त्याच्या समस्या नेहमीच असतात. पण एखाद्या शहराची ओळख कचरा मुक्त शहर होणे अवघड असते. नाशिकला ती मिळाली असून, ती कायम रहावी यासाठी महानगरपालिकेला या डस्टब‌िनची काळजी घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथ तुमच्या दारी आता फिनलंडमध्ये

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अटकेपार मराठी पुस्तक पोहोचवण्यासाठी काही वर्षांपासून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ चळवळ उभी करणारे विनायक रानडे यांनी आता या वाचकप्रिय योजनेतून फिनलंडमधील वाचकांसाठी दर्जेदार मराठी पुस्तकांच्या ग्रंथपेट्या रवाना केल्या आहेत. देशात मूळचे भारतीय असलेल्या शिरीन कुलकर्णी चळवळीत समन्वयक म्हणून काम करणार आहेत. स्वित्झर्लंडमधील झुरीच येथे सुरू असलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेतील ग्रंथ परिवारात फिनलंडमधील वाचक समाविष्ट आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ही चळवळ उभी केली असून, तीन वर्षांपूर्वीच त्यांनी देशाच्या सीमाही ओलांडल्या आहेत.

आतापर्यंत दोन कोटींची पुस्तके महाराष्ट्रातील विविध भागांसह गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हास, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये पाठवण्यात आली आहेत. त्याबरोबरच देशाबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलियामध्येही ग्रंथ पोहोचवले आहेत. देशातील कानाकोपऱ्यात हे ग्रंथ पोहोचावे यासाठी रानडे यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी फिनलंडची निवड केली आहे.

याअगोदरच वाचनसंस्कृतीच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक खरेदीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला देणगी द्यावी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील सहभागी सर्व वाचक, समन्वयक, संस्था, देणगीदार, हितचिंतक यांच्या सक्रिय सहभागानेच हा विस्तार होत असल्याचे रानडे यांनी सांगितले. वाढदिवस, एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्र दर्शन, तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगानुरूप हे पुस्तक भेट देता येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवासाठी पेंट्सची बाजारपेठ सज्ज

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दिवाळी हा जसा दीपोत्सव आहे, तसा तो रंगोत्सवदेखील आहे. दिवाळीनिमित्त घर, ऑफीस रंगविण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे आता दसरा झाल्यानंतर दिवाळीसाठी पेंट्सची बाजारपेठ सज्ज झाली आहे.

घर जुने असो की नवीन असो, ते उठून दिसते ते रंगामुळे. घर रंगवल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखे वाटत नाही. पूर्वी कुटुंबातील सदस्य दिवाळीत घराचे रंगकाम करायचे. आता फ्लॅट सिस्टिम आली, बंगले झाले. त्यामुळे मजुरीवर रंगकाम दिले जाते. आधुनिकतेकडे झुकणाऱ्या रंगांचा वापर वाढला आहे.

रंगांचे नानाविध प्रकार

अनेकांकडून घराला आतून आणि बाहेरून रंग दिला जातो. त्यासाठी वेगवेगळे रंग असतात. रॉयल, डिस्टेम्पर, ट्रॅक्टर ईमर्शन आणि प्लास्टिक हे रंग घराच्या आतील भिंतींसाठी वापरतात, तर एस, अॅपेक्स, अल्टिमा आदी रंग बाहेरून वापरतात. ऑफिससाठी आतून रॉयल, तर बाहेरून अॅपेक्स रंग दिला जातो. बंगला व घरासाठी आतून इमर्शन व बाहेरून एस किंवा अॅपेक्स वापरतात. रॉयल पेंट्स ४७० रुपये लिटर, डिस्टेम्पर ९० रुपये, प्लास्टिक 280 रुपये, तर ट्रॅक्टर इमर्शन १४० रुपये लिटर आहे. बाहेरून द्यावयाच्या पेंट्सचे दर एस १७० रुपये, अॅपेक्स २८० रुपये आणि सर्वांत महाग अल्टिमा हा ३७० रुपये लिटर आहे. नाशिकरोड येथील पेंट व्यावसायिक विद्युत पडवळ यांनी ही माहिती दिली.

--

अन्य साहित्य अन् पेंटर्स

रंगकाम करण्याआधी भिंतीला पुट्टी (लांबी) केली जाते. त्यामुळे खाचखळगे जाऊन रंगवलेली भिंत आकर्षक दिसते. जे. के. व बिर्ला या दोन स्टॅण्डर्ड पुट्टी आहेत. त्यांचा दर चाळीस रुपये आहे. शालिमार, ब्रिटिश व एशियनचीही पुट्टी मार्केटमध्ये आहे. रंगकामासाठी ब्रश वापरला जातो. त्याचा दर वीस रुपयांपासून चाळीस रुपये इंचापर्यंत आहे. तीस रुपये इंचाचा ब्रश जास्त चालतो. ब्रशमध्ये लोकल कंपन्या आहेत. रंगकामासाठी रोलरही वापरतात. त्याचे दर ५० ते १०० रुपये आहेत. त्या तयार करणाऱ्या कंपन्याही लोकल आहेत. दिवाळीत पेंटर्सला मोठी मागणी असते. पेंटिंगचा दर सध्या ५०० रुपये मजुरीनुसार असून, रॉयल पेंट मारण्याचा दर प्रतिचौरस फूट २७ ते ३० रुपये आहे. पूर्वी रंग हाताने (स्टेन) केला जायचा. आता कार्टर वर्ल्डसारख्या कम्प्युटराइज्ड मशिन्स आल्या असून, त्याद्वारे तब्बल १५०० शेड्स अर्थात, रंगछटा उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांच्या सुरक्षेसाठी हवा जनतेचा दबाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बालकांवरील अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. बाल अत्याचार रोखण्यासाठी कायदे आहेत. परंतु, या कायद्यांचा कुणाला धाकच राहिलेला नाही. बालक आणि पर्यायाने देश सुरक्षित राहावा असे वाटत असेल, तर त्यासाठी कायद्याचा धाक निर्माण व्हायला हवा. जनताच सरकारवर दबाव आणून हा धाक निर्माण करू शकते, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांचे पुत्र भूवन सत्यार्थी यांनी रविवारी नाशिकमध्ये केले.
‘सुरक्षित बालपण-सुरक्षित भारत’ या विषयावर जनजागृतीसाठी कन्याकुमारी येथून निघालेली भारत यात्रा रविवारी (दि. १) नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिककरांच्या वतीने एनजीओ फोरमने या यात्रेचे स्वागत केले. यात्रेसमवेत आलेल्या भूवन यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, हेमलता पाटील, शिवाजी गांगुर्डे, दिनकर पाटील आदी उपस्थ‌ित होते.

बालके ही देशाचे भविष्य आहे. ही बालकं बेपत्ता होतात. त्यांची विक्री केली जाते. तसेच त्यांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषणही होते. ही बालकेच सुरक्षित राहू शकत नसतील, तर देश कसा सुरक्षित राहणार? असा सवाल भूवन यांनी उपस्थ‌ित केला. बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
गोल्फ क्लब मैदान येथून प्रबोधन रॅली काढण्यात आली. त्र्यंबकनाका, खडकाळी सिग्नल, शालिमार, एम.जी. रोड, मेहेर चौक, सीबीएस मार्गे गोल्फ क्लब मैदानावर या रॅलीचा समारोप झाला. त्यामध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक जण सहभागी झाले. रमाबाई आंबेडकर हायस्कूल, मानवधर्म प्रतिष्ठान, नर्सिंग कॉलेज, बीवायके कॉलेज यांसह शहरातील विविध शाळा आणि कॉलेजेसचे विद्यार्थी, एन. जी. ओ फोरमशी जोडल्या गेलेल्या ५६ स्वयंसेवी संस्थांचे प्रत‌िन‌िधी रॅलीत सहभागी झाले. रॅली यशस्वी करण्यासाठी फोरमचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजू शिरसाठ, डॉ. प्रकाश आहेर, निशिकांत पगारे यांन‌ी परिश्रम घेतले. त्यानंतर ही रॅली मालेगावकडे मार्गस्थ झाली.

देहविक्रय करणाऱ्या महिलांना शपथ
भूवन सत्यार्थी यांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. देहविक्रयसाठी लहान मुले, मुलींचा स्वीकार करू नका, असे आवाहन त्यांना करण्यात आले. बालकांना अनैतिक व्यवसायापासून दूर ठेवण्याची तसेच, त्यांचे बालपण वाचविण्याची शपथ यावेळी या महिलांना देण्यात आली. सातपूर येथील नॅब संस्थेलाही सत्यार्थी यांनी भेट दिली. अंध मुलींशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्यांनी समजावून घेतल्या.

बाल अत्याचाराबाबत देशातील परिस्थ‌िती
- देशात दररोज ४० बालकांवर बलात्काराला
- दररोज ४८ बालकांचे लैंगिक शोषण
- प्रत्येक सहा मिनिटांना एक बालक बेपत्ता
- साडेचार लाखांहून अधिक बालके तस्कांच्या जाळ्यात
- व्यावसायिक आणि लैंगिक शोषणासाठी बालकांची खरेदी-विक्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचा रास्ता रोको

0
0

कर्जमाफी करण्याची सरकारची मानसिकताच नसल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कर्जमाफी व अन्य कुठल्याही मार्गाने शेतकऱ्यांना मदत करण्याची युती सरकारची मानसिकताच नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी (दि. १) नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्ग अडविला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी, लाखलगाव येथे रास्ता रोको केला. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रतिकृती उभारून श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेच्या सभापती अपर्णा खोसकर, विष्णूपंत म्हैसधुणे, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, सोमनाथ खातळे, रत्नाकर चुंबळे, यशवंत ढिकले, विजया कांडेकर, प्रतीक्षा बिल्लाडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही अशी राज्यातील युती सरकारची सुरुवातीपासूनच भूमिका होती. विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा आणि ‘शेतकरी संप’आंदोलनानंतर सरकारने गाजावाजा करीत कर्जमाफीची घोषणा केली. ही देशातील सर्वात मोठी व ऐतिहासिक कर्जमाफी असल्याचा ढोल बडव‌िण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी दिली जात नसल्याने राज्यात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्याचा आरोपही आंदोलकाकडून यावेळी करण्यात आला.

वाहनांच्या लांब रांगा

रास्ता रोकोमूळे नाशिक-औरंगाबाद रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामध्ये अनेक लोक अडकून पडले होते. प्रसंगी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं जेवण: शरद पवारांची टीका

0
0

मटा ऑनलाइन वृत्त। नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं जेवण आहे. सरसकट कर्जमाफी मिळावी ही आमची मागणी आहे असं म्हणताना सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजिबात गंभीर नसून आता सरकारला शेतकऱ्यांची सामुदायिक ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असा इशारा शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे. नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधींच्या अधिवेशनात पवार बोलत होते.

नोटाबंदीनंतर देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त झाली असल्याचं म्हणत पवार यांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात शेतकऱ्यांवर मोठी संकटं आली असून शेतीमालाच्या किंमतीची अवस्था बिकट झाली असल्याचं ते म्हणाले. शेतकरी उद्धस्त झाला, तर देश उध्वस्त होईल, देशात हाहाकार माजेल. शेतीमालाच्या किंमतीसोबत खेळणं देशाला परवडणारं नाही असं सांगत, आज बळीराजा गप्प आहे, पण उद्या जर शेतकरी रस्त्यावर उतरला तर कुणाच्या बापाला घाबरणार नाही असा इशाराही पवार यांनी सरकारला दिला आहे.

पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आज देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची किंमत सगळ्यांनाच मोजावी लागत आहे. खरं तर शेतकरी आणि शेतमजुरांनाच ही किंमत जास्त मोजावी लागत आहे. इंधनाची दरवाढ करून सरकार जनतेची लूट करत आहे. महागाईने देशात उचांक गाठला आहे. संपूर्ण जगात पेट्रोल आणि डिझेलचे भाव घसरलेले असताना भारतात मात्र ते वाढत आहेत याकडेही त्यांनी शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

नोटाबंदी म्हणजे मारुतीची बेंबी

केंद्र सरकारनं घेतलेला नोटाबंदीचा निर्णय म्हणजे मारुतीची बेंबी आहे, असं वक्तव्य करत या निर्णयाचा झटका सगळ्यांनाच बसला मात्र सुरुवातीला कुणी ते मान्य केलं नाही. सर्वसामान्यांना २-३ दिवस रांगेत उभं राहावं लागलं, मात्र सरकारशी ज्यांचे लागेबांधे आहेत अशांनी अगोदरच आपल्या नोटा बदलवून घेतल्या असा थेट आरोपही त्यांनी सरकारवर केला.

किती दिवस आत्महत्या करायच्या?

नाशिक जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे, तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांनी किती दिवस आत्महत्या करायच्या असा प्रश्न उपस्थित करत पवार यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं. आत्महत्या करणं हा आपला मार्ग नव्हे, सरकारने शेतकऱ्यांचं सर्वच कर्ज माफ केलं पाहिजे. सरकारला मुदत द्या, जर कर्ज माफ केलं नाही तर आपण सरकारला ताकद दाखवू अशा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणे विद्यापीठालाच मराठीचे वावडे!

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

‘माझ्या मराठीचा बोलु कवतिके। परि अमृतातेही पैजा जिंके...’ अशी मराठीची थोरवी गाणाऱ्या महाराष्ट्रातच मराठीला डावलण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यूथ फेस्टमधील विविध स्पर्धांमध्ये हिंदी व इंग्रजीलाच प्राधान्य दिले असून, यात मराठीला चक्क नाकारले आहे. माय मराठीची गळचेपी करणारा आणि युवकांच्या उत्साहावर विरजण घालणारा हा तुघलकी निर्णय असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे. मराठीचा प्रचार- प्रसार करणाऱ्या विद्यापीठानेच मराठी भाषेला का वगळले, असा संतप्त सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.

यूथ फेस्टमधून संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीयत्व जपण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी विद्यापीठाच्या सर्व विभागीय स्तरावरून यासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय संघात सहभागी होतात. यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राष्ट्राच्या परंपरेचे प्रतिनिधित्व हा संघ कर असतो. मात्र, या यूथ फेस्टमध्ये वक्तृत्व, नाट्य आणि वादविवाद स्पर्धेत मराठी भाषेला वगळण्यात आले आहे. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असूनही विद्यापीठाने मराठी भाषेतून व्यक्त होण्यावर निर्बंध घातले आहेत. ‘जर तुम्हाला स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर फक्त हिंदी किंवा इंग्रजीमधूनच व्यक्त व्हा’ असा हुकूमवजा अटच विद्यापीठाने घातली आहे. विद्यापीठाच्या या अटीमुळे विद्यार्थ्यांचे विचार मांडण्यावर गदा आली आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी लढाई सुरू आहे. असे असतानाच विद्यापीठानेच मराठी भाषेला वगळल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. असेच निर्णय विद्यापीठ घेत राहिल्यास मराठी कायमची दूर होईल, अशी संतप्त टीका विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

परिपत्रकही इंग्रजीत!

यूथ फेस्टमध्ये वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेसाठी इंग्रजी आणि हिंदीतच सादरीकरण करण्याची अट घातली आहे. विशेष म्हणजे यूथ फेस्टच्या स्पर्धांचे जे परिपत्रक काढण्यात आले आहे, तेही इंग्रजीत आहे. त्यामुळे विद्यापीठाला मराठीचे किती वावडे आहे हे स्पष्ट होते. या निर्णयावर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा निर्णय अयोग्य असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला आहे.

यूथ फेस्टकडे विद्यार्थ्यांची पाठ

यूथ फेस्टमध्ये सहभागी होताना हिंदी आणि इंग्रजीमधूनच व्यक्त व्हा, असा फतवाच विद्यापीठाने काढल्याने अनेक विद्यार्थी यूथ फेस्टकडे पाठ फिरवणार असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाच्या विचित्र अटीमुळे अनेक कॉलेजांच्या विद्यार्थी संघाने फेस्टमध्ये सहभागी होणे टाळले आहे. अनेक मराठी तरुण वक्त्यांनी फेस्टमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्राय डेसाठी आलेला मद्यसाठा जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी जयंती निमित्त असलेल्या ड्राय डेच्या पार्श्वभूमीवर शहरात येणारा मोठा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. दमन निर्मित मद्यसाठा शहरात येणार असल्याच्या माहिती मिळाल्यानंतर पथकाने आडगाव येथे सापळा रचून कारसह सुमारे ३ लाख ८५ हजाराचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.

रवींद्र दिलीपराव पगार, असे मद्यवाहतूक करतांना पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. ड्राय डे लाच बेकायदा पद्धतीने अवैध मद्य विक्री केली जाते. याचसाठी विक्रीस बंदी असलेला आणि दमन निर्मित आणि दादरा हवेली येथे विक्रीस असलेला दारूसाठा शहरात येणार असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त प्रसाद सुर्वे व निरीक्षक एम. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महामार्गावरील आडगाव शिवारातील नटखट हॉटेल परिसरात सापळा रचून पथकाने ही कारवाई केली. तीन लाख ८५ हजार ७७० मद्यसाठा जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नासाका’रस्त्याची खड्ड्यांनी लावली वाट

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक साखर कारखाना रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, प्रवास करणे नागरिकांना तसेच वाहनांना अवघड झाले आहे. या रस्त्याची पुरती वाट लागली असून, रस्त्यावर असंख्य खड्डे झालेले आहेत. तरी या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.

बंगाली बाबा ते साखर कारखाना दरम्यान हा चार किलोमीटरचा रस्ता आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे हा रस्ता उखडला आहे. या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने जात असतात. तसेच पळसे आणि शिंदे या गावातील शेतकऱ्यांनी साखर कारखाना उभा राहावा म्हणून आपल्या जमिनी या कारखान्यासाठी दिलेल्या आहेत.

नाशिक-सिन्नर महामार्ग क्रमांक ५० लगत असणारा पळसे साखरे कारखाना हा एकेकाळी भरात होता. त्यावेळी या रस्त्याचा मोठा वापर होत असे, त्यावरून अवजड वाहनांचा प्रवास दररोज व्हायचा. आताही चिंचोली, घोटी, इगतपुरी, भगूर या रस्त्यांना जोडणाऱ्या या रस्त्याचा वापर रोज असंख्य शेतकरी करीत आहेत. पूर्वीपासून या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूत कताईसाठी फिरला चरखा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चरख्यावर सूत विणले जात असल्याचे चित्र आता खूपच दुर्मीळ झाले आहे. परंतु, नाशिक शहरातील हुतात्मा स्मारकात आज चरखा फिरला अन् सूतही कातण्यात आले. निमित्त होते महात्मा गांधी जयंतीचे.

सालाबादाप्रमाणे यंदाही सर्वोदय परिवाराच्या वतीने हुतात्मा स्मारकामध्ये सूत कताईचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वासंती सोर यांनी पेटी चरख्यावर सूत कताईला सुरुवात केली. त्याचवेळी सर्वोदय परिवाराशी जोडल्या गेलेल्या गौतम भटेवरा, मुकुंद दीक्षित यांसह २५ जणांनी अंबर चरख्यावर सूत कातण्यास सुरुवात केली. सूत कताई केली जात असतानाच बासरी वादनाची अनोखी परंपरा यंदाही जोपासण्यात आली. समृध्द कुटे याच्या बासरीच्या सुमधूर स्वरांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. अर्धा तास ही सूतकताई सुरू होती. त्यानंतर आस्था मांदळे या युवतीने वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणे रे हे भजन सादर केले. त्यानंतर नीलूताई नावरेकर यांचे कर्मयोगी महात्मा गांधी या विषयावर व्याख्यान झाले. वीणकाम, शेतीकामात महात्मा गांधी तरबेज होते. शिक्षण घेणाऱ्यांना काम करण्याची लाज वाटत असेल, तर मुलांनी निरक्षर राहिलेले बरे असे गांधींचे परखड विचार होते. उद्योगातूनच माणूस घडतो म्हणून प्रत्येकाने प्रत्येक काम करण्याची सवय ठेवायला हवी, असे नावरेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्या थांबता थांबेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यान गत वर्षाच्या तुलनेत चेन स्नॅचिंगला अटकाव करण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश मिळाले आहे. मात्र, दिवसाच्या घरफोडींमध्ये काहीशी वाढ झाली असून, गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाणही घटले आहे.

जानेवारी ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत चेन स्नॅचिंगचे ७३ गुन्हे घडलेत. गत वर्षी हेच प्रमाण ७७ इतके होते. यापैकी २० गुन्हे उघडकीस आले होते. यंदा मात्र, ४७ टक्क्यांच्या सरासरीने ३४ गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी संशयित आरोपींना जेरबंद केले. सप्टेंबर महिन्यात तर स्नॅचर्सची मोठी टोळी जेरबंद झाली असून, मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. चेन स्नॅचर्सच्या मागावर काही पथके सतत असून, त्याचाही परिणाम समोर येत आहे. चेन स्नॅचर्सचा बंदोबस्त करण्यात शहर पोलिस गुंतलेले असताना दिवसाच्या घरफोडी शोधून काढण्यात मात्र तितकेस यश मिळालेले दिसत नाही. २०१६ मध्ये दिवसाच्या ३१ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी आठ गुन्हे उघडकीस आले होते. यंदा मात्र यात ११ ने वाढ होऊन ऑगस्ट महिन्यापर्यंत गुन्ह्याची संख्या ४२ इतकी झाली. तर, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आठच राहिले. रात्रीच्या घरफोड्यांबाबत गत वर्षीची सरासरी राखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. गत वर्षी १६३ घरफोड्यांपैकी २५ टक्क्यांच्या सरासरीने ४० गुन्हे उघडकीस आले होते. तेच यंदा १७७ घरफोड्यांपैकी २४ टक्क्यांच्या सरासरीने ४२ गुन्हे उघड झाले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत घरफोडीच्या घटनांमध्ये १४ ने वाढ झालेली दिसते. दरम्यान इतर चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र तब्बल आठ टक्क्यांनी घसरले आहे. गत वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत २९५ चोऱ्यांच्या घटनांपैकी ८८ गुन्हे उघडकीस आले होते. यंदा हेच प्रमाण ३०४ पैकी ६७ इतके राहिले. वाहनचोरीच्या ४०७ घटनांपैकी ८१ गुन्हे यंदा उघडकीस आले होते. गत वर्षी हेच प्रमाण ३७२ पैकी ७८ इतके होते.



मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात विशेष पथके कार्यरत आहेत. नुकतेच परिमंडळ दोनमध्ये २० चोरीची वाहने रिकव्हर झाली आहेत. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात मोठे यश मिळाले असून, हेच चित्र लवकरच घरफोडीसह चोऱ्यांच्या घटनांमध्ये दिसून येईल.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोह‌िमेचा ‘कचरा’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रकोप रोखण्यासाठी व साथीच्या आजारांचे उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान हे फोटोसेशनपुरतेच मर्यादीत राह‌िले आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या मोह‌िमेपासून सर्वसामान्य नाशिककरांनी अंतर राखल्याने दहा दिवसांत मोह‌िमेचा फज्जा उडाला आहे.

महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाने दहा दिवस काही संस्थांना हाताशी धरत प्रसिद्धी मिळवली असली तरी, शहरातील अस्वच्छता व कचऱ्याची समस्या मात्र ‘जैसे थे’च असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या मोह‌िमेचा समारोप पालिकेने डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा आधार घेत केला आणि त्याचेही श्रेयही लाटण्‍याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याच धर्तीवर राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान राबविण्यात आले. शहरातील अस्वच्छता, डेंग्यूसह विविध साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेल्या २२ सप्टेंबरला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात याचा प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी या मोह‌िमेत साडेतीनशे टन कचरा गोळा करण्यात आला. परंतु, उद््घाटनाचे सोपस्कार पार पाडल्यानंतर मात्र ही संपूर्ण मोह‌िमच ढेपाळली. २२ ते २ ऑक्टोबरदरम्यानचा स्वच्छतेचा कृती आराखडाही ठरला होता. परंतु, हा कृती कार्यक्रम कागदावरच राह‌िला असून, शहरातील कचऱ्याचे ‘ब्लॅक स्पॉट’ही जैसे थेच राह‌िले आहेत.

गेल्या दहा दिवसांत केवळ फोटोसेशनपुरतीच मोहीम ही संपूर्ण शहरात सुरू राहिली. कधी शाळेतील, कधी कार्यालयातील, कधी मोकळ्या जागेवरील स्वच्छतेचे फोटो माध्यमांमध्ये कसे प्रसिद्ध होतील, याची काळजी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आली. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दिखावा करणाऱ्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनीही दहा दिवस या मोह‌िमेत सहभाग घेतला नाही. केवळ फोटोपुरताच कचरा साफ करून प्रसिद्धीसाठीचा खटाटोप मात्र पूर्ण केला. अधिकाऱ्यांनी केवळ सोपस्कार म्हणून मोह‌िमेची अंमलबजावणी करत, आपले कर्तव्य पूर्ण केले. त्यामुळे शहरातील रोगराई कमी होण्याऐवजी ती वाढतच गेल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. पर्यायाने डेंग्यू व स्वाइन फ्लूचा फैलाव जोमाने सुरू आहे.


भाजपचा अतिउत्साह नडला

या स्वच्छता मोह‌िमेवर सुरुवातीपासूनच भाजपची छाप होती. महापालिकेची मोहीम असली, तरी त्यात भाजपचेच ब्रँडिंग झाल्याने विरोधकांसह सर्वसामान्य नाशिककरांनी या मोह‌िमेपासून अंतर राखले. या मोह‌िमेतील भाजपेयींनी नागरिकांसह विरोधकांना विश्वासात न घेताच दाखवलेल्या अतिउत्साहामुळे स्वच्छता मोह‌िमेचा पुरता पचका झाला असून, शहरातील कचऱ्याचे ढीग ‘जैसे थे’च आहेत.


संस्थांच्या कामावर डल्ला

महापालिकेने या स्वच्छता मोह‌िमेत सहभागासाठी विविध संस्थांना आवाहन केले होते. त्यात काही संस्थाही सहभागी झाल्या होत्या. परंतु, पालिकेने स्वच्छतेचे श्रेय या संस्थांना देण्याऐवजी स्वतःच घेण्याची घाई केल्याने काही संस्थांनी अंतर राखले. शेवटच्या दिवशी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोह‌िमेत पालिकेने सहभाग घेऊन मोह‌िमेचा समारोप केल्याचा दावा केला. परंतु, यासाठी प्रतिष्ठानला विश्वासात न घेताच, परस्पर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न अंगलट आला. त्यामुळे प्रतिष्ठानने पालिकेच्या अधिकाऱ्यांना खडसावत तुमचा काय संबंध, असा जाब विचारल्याने अधिकारी निरुत्तर झाले.


७८ टन कचरा संकलित

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नाशिकसह नगर जिल्ह्यातील काही भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोह‌िमेत तीन हजार ५१९ सदस्य उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ९३ किलोमीटर रस्त्यांवर ७८ टन कचरा संकलित करण्यात आला आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमात लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही सहभाग नोंदवला.क तीव्र करण्यासाठी आजपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्धार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मा गांधी, शास्‍त्रींना शहरभर अभिवादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शहर परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य यावेळी शहरातील शाळांमध्ये, सामाजिक संस्था, विद्यापीठे येथे केले गेले.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संदीप कुलकर्णी, प्रकाश पाटील, डॉ. पायल बन्सल, रत्नाकर काळे, रंजिता देशमुख आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.


स्मॉल बर्डस शाळा

मखमलाबाद-म्हसरूळ लिंक रोडवरील स्मॉल बर्डस शाळेत गांधी जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या संचालिका अश्विनी ओसवाल यांनी गांधीजींच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. गांधी जयंतीनिमित्त फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. यावेळी शाळेतील शिक्षिका चारुशिला साळवे, पूजा म्हैसकर, मनीषा गावित, सोनाली येसनकार आदी उपस्थित होते.


मराठा हायस्कूल
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पिंगळे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सोपान येवले, पर्यवेक्षक अरुण पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सुनिल बस्ते यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा परिचय करून दिला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक पिंगळे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अरुण पवार यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचवटी सार्वजनिक वाचनालय

अॅड. उत्तमराव नथुजी ढिकले, पंचवटी सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रदान लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचनालयाचे कोषाध्यक्ष डॉ. शांताराम रायते यांच्या अध्यक्षतेखाली व माधवराव भणगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. शास्त्री व गांधी यांच्या जीवनातील ठळक प्रसंगांना उजाळा देऊन दोघांच्याही स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल परदेशी यांनी केले. तर आभार नगरसेवक उल्हास धनवटे यांनी मानले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र नथुजी देवरे, सुभाष पाटील, ग्रंथपाल योगिता भामरे, सोमनाथ बोबडे आदी उपस्थित होते.

जैन जॉगर्स ग्रुप

गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ हा संकल्प पूर्ण करण्यासाठी जैन जॉगर्स ग्रुपकडून गोल्फ क्लब ग्राऊंडवर दोन कचरापेट्या बसविण्यात आल्या. तसेच जैन जॉगर्स ग्रुपचे अध्यक्ष अरुण कोठारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मैदानावर साफसफाई केली. यावेळी नाशिक मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक जायभावे यांची यावेळी उपस्थिती होती.

चित्रकलेतून सत्य-अहिंसेचा संदेश

मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था पाथर्डी फाटा येथे चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ‘व्हिजन २०२०’ कार्यपूर्तीसाठी संस्थेतर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गांधीजींच्या मूल्यांची जोपासना करणे आदर्श नागरिक व आदर्श भारत निर्मितीसाठी या मूल्याचे बीजारोपण जनमानसात रुजवण्यासाठी कलेच्या माध्यम असावे, या हेतूने ही स्पर्धा संस्थेत आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांचे चित्र यावेळी रेखाटले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनीष देवघरे, योगेश आघाडे यांनी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे, सॅमसोनाईट कंपनीचे डायरेक्टर मिलिंद वैद्य, भारतीय शिक्षण परिषद सचिव अश्विनीकुमार भारतद्वाज, लीड इंडिया सेक्रेटरी मनीष मंजुळ आदी उपस्थित होते. या स्पर्धेत जिल्हाभरातील विविध शाळांमधील सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये चिराग पवार, अनुष्का निकाळजे, लक्ष्मी रमेश प्रसाद, विक्रांत बागूल, दुर्वा गोकुळ राव, हर्षाली शेवाळे, भूषण गायकवाड, पूनम गुंजाळ व मानसी भांडारकर, शिवानी श्रीवास्तव या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रीयीकृत बँकांत ज्येष्ठांची परवड

0
0

स्वतंत्र कक्ष देण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

देशातल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यातच पेन्शन व सरकारी कारणांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते असणे अनिवार्य आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जाताना ज्येष्ठांची होणारी परवड कोण रोखणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. निवृत्त झालेल्या ज्येष्ठांनी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये स्वतंत्र कक्ष देण्यात यावा, अशीही मागणी केली आहे. अनेकदा वयोवृद्ध झालेल्यांना बँकेत येताना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यातच आजाराने पीडित असलेल्यांना सर्वाधिक त्रास राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये येताना होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.

सेवानिवृत्त झालेल्यांची संख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. गेल्याच महिन्यात पेन्शनधारकांचा मोर्चा भविष्य निर्वाह निधी कार्यालय आयटीआय पुलाच्या बाजूला पार पडला. यावेळी शेकडोंच्या संख्येने सेवानिवृत्तांची एकच गर्दी झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडीही झाली होती. यानंतर सेवानिवृत्त झालेल्या शिष्टमंडळाने पीएफ आयुक्तांकडे पेन्शनबाबत व बँकांमध्ये होणाऱ्या त्रासाची व्यथा मांडली होती. परंतु, आजही ज्येष्ठांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जातांना परवड होत असल्याचे समोर आले आहे.

शहरातील राजीव गांधी भवनाच्या परिसरात अनेक बँका असून त्याठिकाणी अनेकवेळा ज्येष्ठांना बँकेत जाण्यासाठी तसेच उतरण्यासाठी एकमेकांचा सहारा घ्यावा लागतो. ते बँकेत गेल्यावर पैसे काढण्याची स्लिप भरून रांगेत उभे राहतात. परंतु, दोन काऊंटरपैकी केवळ एकच काऊंटर सुरू असल्यास एकाच लाइनीत उभे राहण्याची वेळही ज्येष्ठांवर येत आहे. याबाबत राष्ट्रीयीकृत बँकांनाही योग्य समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. काही ठिकाणी तर कर्मचारी नसल्याचेही निदर्शनास आल्याचे ज्येष्ठांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारशी असहकाराचा ठराव

0
0

किसान मंचच्या आंदोलनात नऊ ठराव संमत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजुराची व शेतीपूरक व्यावसायिकांना कोणत्याही अटी, शर्ती व निकष न लावता सन २०१७ पर्यंत संपूर्ण कर्जातून मुक्त करावे. कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत शेतीवरचे कर्ज, वीज बिल, पाणीपट्टी, शेतसारा आम्ही देणार नाहीत. तसेच, सरकारच्या वतीने होणाऱ्या कामकाज व कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार किसान मंचच्या अधिवेशनात करण्यात आला. शेती व शेतकऱ्यांशी निगडीत विविध प्रकारचे नऊ ठराव किसान मंचच्या राज्यस्तरीय अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान मंचतर्फे शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियानचा समारोप तथा राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी अधिवेशनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत झाला. मंचाचे समन्वयक माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार नरहरी झिरवाळ, दीपिका चव्हाण, पकंज भुजबळ, जयवंत जाधव हे सर्व आमदार, किशोर माथनकर, दत्ता पवार, खेमराज कोर, श्रीराम शेटे, रामचंद्र बापू पाटील, रंजन ठाकरे, प्रेरमा बलकवडे, विष्णुपंत म्हैसधुणे, मंचचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते. अधिवेशनात उद्घाटन झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी शेतकरीहिताचे नऊ ठराव मांडले. यानंतर या ठरावावर अधिवेशनात चर्चा झाली. खेमराज कोर यांनी अभियानामागील भूमिका मांडली.

राज्यातील तीस जिह्यांतून सलग ५५ दिवस शेतकरी, शेतमजूर व शेतकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधत अडचणीतील बळीराजाला धीर दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व आंदोलनाची भूमिका ठरविण्यासाठी अधिवेश होत असून, लबाडांचे सरकार असल्याचा आरोप शंकर अण्णा धोंडगे यांनी केला. सर्व ठरावांचे वाचन निमंत्रक शंकरराव धोंडगे यांनी केले, तर ठरावांना उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून अनुमोदन दिले. अधिवेशनासाठी सोपान पाटील (जळगाव), गोविंद बेंडाळकर (जालना), मनोज तायडे (अकोला), सुरेश रानगुंडे (चंद्रपूर), प्रभावती दिवटे, शंकरराव बोरसे (सातारा), राजू राऊत (नागपूर), शिवाजी पाटील (औरंगाबाद), एकनाथ शिंदे (सटाणा), शेषराव कटाळे, जंयत घोंगे, दिनकर कोंबे, बापू जग्वार, नानाजी सराडकर (सर्व यवतमाळ) या जिल्हा प्रतिनिधींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिवेशनातील ठराव

शेतकरी, शेतमजूर व पूर्व शेतीपूरक व्यावसायिकांची कोणत्याही अटी, शर्ती व निकष न लावता सन २०१७ पर्यंतच्या संपूर्ण कर्जातून मुक्तता करावी.
राज्य व केंद्राच्या शेतमाल भाव समितीला कायदेशीर अधिकार देऊन सर्व शेतमालाला कायद्याने उत्पादन खर्चानुसार योग्य भावाची हमी द्यावी.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसाय व शेतीपूरक उद्योग धंदे करण्यासाठी तारण जमिनीच्या मूल्यांकनाच्या ७० टक्के इतके कर्जपुरविण्याचे धोरण असावे. शेतकऱ्यांचे उत्पन्न किमान तृतीय श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या इतके सुरक्षित केले जावे. पेरणी ते काढणीपर्यंतची शेतीकामे मनरेगा अंतर्गत करण्यात यावी. तरुणांना काम मिळेपर्यंत किमान जीवनावश्यक गरजा भागविता येतील, इतके मानधन द्यावे. शेतकरी व शेती व्यवसायासाठी नक्की किती तरतूद केली आहे हे स्पष्ट होण्यासाठी जिल्हा परिषदेपासून राज्य सरकारकडून केवळ शेतीसाठीचा स्वतंत्र असा अर्थसंकल्प मांडण्यात यावा.
शेतकऱ्यांचे संपूर्ण प्रश्न सुटेपर्यंत सरकारसोबत असहकार आंदोलन केले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारत यात्रे’चे मालेगावात स्वागत

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी ‘सुरक्षित बालपण सुरक्षित भारत’ या उद्दिष्ठासाठी कन्याकुमारी पासून सुरू केलेल्या भारत यात्रेचे रविवारी मालेगावात आगमन झाले. सत्यार्थी यांच्यासह १२० स्वयंसेवक या यात्रेत सहभागी झाले आहेत.

सोनज येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या लेझीम पथकासह जी. ओ. फोरम, नाशिक, सेवाम–संस्था मालेगाव, हिंद सम्राट ज्युडो कराटे आणि सामाजिक संस्था मालेगाव यांच्यातर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

कैलास सत्यार्थी यांचे चिरंजीव भुवन सत्यार्थी म्हणाले, सध्या भारतात दर एक तासाला सहा बालके बेपत्ता होत आहेत. महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत ५० हजार बालके बेपत्ता झाली आहेत. त्यांचा तपास लागत नाही. हे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती आणि शासन प्रयत्न करीत आहे. परंतु हे प्रयत्न कमी पडत आहेत. त्यामुळे भारत यात्रेचे आयोजन करून देशात जाणीव जागृती करणे एवढाच प्रयत्न नसून, ही एक चळवळ व्हावी हा यात्रे मागील हेतू आहे. बालकांची सुरक्षेला सर्वप्रथम प्राधान्यक्रम दिला पाहिजे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवाम संस्थेचे समाधान घोंगडे, आनंदा बच्छाव, प्रदीप बच्छाव, हेमंत बच्छाव यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुमत मिळाले, पण सत्ता गमावली!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलला बहुमत मिळाले. मात्र सरपंचपद प्राप्त करण्यात अपयश आले. केवळ सात जागांवर कसाबसा विजय मिळविलेल्या ग्रामविकास पॅनलने सरपंचपद राखतांनाच ग्रामपंचायतीची सत्ताही राखली. शिवसेना बंडखोराच्या हाती सरपंचपद, तर भाजप पुरस्कृत पॅनलच्या हाती बहुमत सोपविलेल्या एकलहरेतील मतदारांनी दोन्हीही पॅनलला चांगलाच धडा शिकविला आहे.

एकलहरे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे यांचीच सत्ता होती. मात्र, यंदा एकलहरे ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने धनवटे यांना सरपंचपदावर पाणी सोडावे लागले. परंतु, त्यांनी ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीत आपले नशीब आजमावले. एकलहरेतील मतदारांनी त्यांना बहुमतापासून रोखले. दुसरीकडे धनवटेंचेच पट्टशिष्य राहिलेले व नंतर भाजपवासी झालेले नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला दहा जागा देत बहुमत दिले असले तरी चाणाक्ष मतदारांनी सरपंचपद मात्र परिवर्तनच्या हाती सोपविले नाही. मतदारांच्या या भूमिकेमुळे आता ग्रामविकास व परिवर्तन या दोन्हीही पॅनलची गोची झाली आहे.

दलित कार्ड चालले

ग्रामविकास पॅनलला दोन जागांचा अपवाद वगळता इतर जागा केवळ दलित व्होट बँकेमुळेच मिळाल्या आहेत. प्रभाग क्र १ व २ मधील पाचही जागा ग्रामविकास पॅनलला मिळाल्या. यातील तब्बल चार जागा अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. प्रभाग क्र.४ मध्ये मिळालेली एक जागाही अनुसूचित जाती प्रवर्गाचीच आहे. प्रभाग क्र.२ व ६ मध्ये मिळालेली प्रत्येकी एक जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील आहे. याशिवाय सरपंचपदी निवडून आलेल्या मोहिनी जाधव यादेखील अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. त्यांचे पती सागर जाधव यांच्यामुळे दलित व्होट बँक शंकर धनवटे यांच्या पॅनलच्या मदतीला धावून आली. २० कोटी रुपयांची स्मार्ट दलित वस्ती योजना सरपंच राजाराम धनवटे यांनी मंजूर करून आणण्यात यश मिळविले होते.

भाजपला पसंती

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शंकर धनवटे यांनी बंडखोरी केल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी व सर्वसाधारण मतदारांनी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलला साथ दिली. त्यामुळे परिवर्तनला थेट बहुमताला गवसणी घालता येणे शक्य झाले. मात्र, दलित मतदारांची संख्या जास्त असलेल्या प्रभागातील मतदारांनी ग्रामविकासला साथ दिल्याने सरपंचपद परिवर्तनच्या हातून निसटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूरला पळवल्या ‘शिवशाही’ बस

0
0

एक दिवसाच्या सेवेनंतर एसटीचा निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एसटी महामंडळाच्या नाशिक डेपोमध्ये दाखल झालेल्या चार शिवशाही बस तातडीने नागपूर डेपोकडे देण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकच्या वाटेला आलेल्या चार बस पहिल्याच दिवसाच्या सेवेनंतर नागपूरला रवाना होणार आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावर यापूर्वी शिवनेरी, हिरकणी व साध्या बसेस धावत होत्या. त्यातील ११ हिरकणींपैकी चार बसेस कमी करून त्याऐवजी शिवशाही बसेसचा समावेश करण्यात आला. नाशिक डेपोकडे चार नव्या बस रविवारीच दाखल झाल्या. या चार बसद्वारे नाशिक-पुणे-नाशिक अशी सेवा देण्यात आली. सोमवारी सकाळी ११.१५ वाजता, दुपारी १२.१५, दुपारी १.१५ आणि दुपारी २.१५ वाजता या बस नाशिकहून पुण्याकडे निघाला. या चारही बसेसला भरघोस प्रतिसाद लाभला. शिवशाही बसच्या प्रतिटप्प्याचे भाडे इतर बसच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतल्याने प्रवाशांमध्ये या बसचे आकर्षण आहे. शिवनेरी बसचे भाडे नाशिक-पुणेसाठी ६०५ रुपये आहे, तर सेमी लक्झरीचे भाडे ३१६ रुपये आहे. त्यामुळे ही बस परवडणारी असल्याचे प्रवाशांचे मत आहे. नाशिक डेपोकडील चार आणि पुणे डेपोकडील चार अशा एकूण आठ शिवशाही बसेसद्वारे नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा देण्यात आली. नाशिकमध्ये टप्प्याटप्प्याने २० बसेस मिळणार असून, त्यात स्ल‌िपर कोचसुद्धा असणार आहे. मात्र, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी महामंडळाचा अजब फतवा आला आहे. नाशिक आणि पुणे डेपोकडील नव्याने दाखल झालेल्या प्रत्येकी चार बसेस तातडीने नागपूरला देण्यात याव्यात, असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे अवघ्या एक दिवसाच्या सेवेनंतर या बसेस नागपूरला रवाना होणार आहेत. परिणामी, शिवशाही बसच्या सेवेपासून नाशिककर वंचित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कंडक्टर असलेल्या शिवशाही बसेस नाशिक डेपोला मिळाल्या होत्या. मात्र, त्या नागपूरला पाठविण्यात येणार आहेत. विनाकंडक्टर असलेल्या शिवशाही बसेस नाशिकला मिळतील. नव्या बस आल्या की या बसेस नागपूरला पाठविल्या जातील.

- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images