Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तिची राष्ट्रीय ‘धाव’

$
0
0

नाशिकच्या नवदुर्गा- मोनिका आथरे


तिची राष्ट्रीय ‘धाव’

लहान मुलांच्या समोर खेळणी टाकली की, आपल्याला जी खेळणी आवडतात त्याच खेळण्याकडे ती जास्त आकर्ष‌ित होतात. त्यात काहींना आवाजाची खेळणी आवडतात, काहींना चित्रांची तर काहींना यांत्रिकी खेळण्यात रस असतो. खेळण्यावरुन त्या मुलाचा कल कुठे आहे ते समजायला मदत होते. आपल्या धावण्याने संपूर्ण भारताचे नाव जगात पोहचवणारी मोनिका आथरे हिच्या बाबतीत परिस्थिती वेगळीच होती. ती अशा खेळण्यात कधी रमलीच नाही. शेतीकाम, खेळ आणि ग्राऊंड हेच त‌िचे विश्व होते. सतत खेळात रमणारी मोनिका घरच्यांसमोर आली की, त्यांना धाक पडायचा. पुढे जाऊन काही करेल की नाही, ही मुलगी आपले नाव कमवेल की नाही अशी शंका वाटायची. २६ मार्च १९९२ रोजी जन्मलेल्या मोनिकाने खेळात करिअर करुन भारताबरोबरच माता-पित्यांचे नाव संपूर्ण खेळजगतात उंचावले आहे.

तिच्यात असलेली खेळाची आवड पाहून वड‌िलांनी त‌िला दिंडोरी येथून नाशिकला पाठवण्याचा निर्णय घेतला. त‌िचे काका नाशिकला असल्याने त्यांच्याकडे मोन‌िकाला मखमलाबाद येथे पाठवण्यात आले. मराठा विद्या प्रसारक समाजाचे मराठा हायस्कूल खेळाला सातत्याने प्रोत्साहन देत असल्याने त‌िच्या काकांनी येथे त‌िचा प्रवेश घेतला. मराठा हायस्कूलचे क्रीडा शिक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्तरावर त‌िचा क्रीडा प्रवास सुरू होता. त‌िच्यातील खेळाची चुणूक पाहून पाटील यांनी त‌िला भोसला कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे सुचवले. येथे आल्यानंतर त‌िची विजेंद्र सिंग यांच्याशी भेट झाली व त‌िने येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यास सुरुवात केली. विजेंद्र सिंग यांच्याकडे सराव सुरू केल्यानंतर त‌िच्या खेळाला एक वेगळा आयाम मिळाला, शास्त्रशुद्धता आली. त‌िच्या आधी सरांकडे शिकत असलेली कविता ही त‌िची आयडॉल होती. त‌िच्या पावलावर पाऊल ठेऊन आपणदेखील खेळात नाव कमवावे असा त‌िने निश्चय केला.

मेडलचा ओघ

२००३ मध्ये विजेंद्र सिंग यांच्याकडे आल्यानंतर मेडलचा ओघ सुरू झाला. मात्र, २००८ मध्ये मदुराई येथे झालेल्या स्पर्धेत त‌िने राष्ट्रीय विक्रम प्रस्थाप‌ित केला. तीन किलोमीरचे अंतर अवघ्या १० म‌िन‌िटे ९ सेकंदात पार केले. हा दिवस त‌िच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. यानंतर त‌िने मागे वळून पाहिले नाही. मुंबई मॅरेथॉन, ठाणे मॅरेथॉन अशा भारतातल्या अनेक मॅरेथॉनमध्ये तिने बाजी मारली. २०१२ मध्ये चीन येथे झालेल्या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले. अमेरीकेत वर्ल्ड अॅथलेट‌िक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत २ तास ३९ मिन‌िटे ८ सेकंद नोंदव‌ित यशाला गवसणी घातली.

आता लक्ष्य ‘एशियन गेम्स’

आता त‌िचे लक्ष्य आहे २०१८ मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ आणि एश‌ियन गेम्सचे. यानंतर २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी ती तयारी करीत आहे. ऑलिम्पिकमध्ये मेडल नक्कीच आणणार असा विश्वास ती व्यक्त करते. सध्या ती एलआयसीमध्ये नोकरीला असून भोसलाच्या ग्राउंडवर सराव करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंग्यूग्रस्त शंभरीपार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात असली तरी, स्वाइन फ्ल्यू आणि डेंग्यूचा प्रकोप थांबत नसल्याचे चित्र आहे. डेंग्यूग्रस्त रुग्णांची संख्या १०५ वर पोहचली असून, संशयितांचा आकडा २०८ वर गेला आहे. स्वाइन फ्लूमुळे गेल्या २७ दिवसांत १४ जणांचा बळी गेला असून, त्यात महापालिका हद्दीतील सात जणांचा समावेश आहे. शहरातील डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडाही वाढत असल्याने स्वाइन फ्लू आणि डेंग्यूबाबत सुरू असलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आयशा शेख या मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला नसल्याचा अहवाल मिळाल्याने पालिकेला काह‌िसा दिलासा मिळाला आहे.

अस्वच्छतेमुळे शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू वाढत असल्याचा ठपका ठेवत महापालिकेने गेल्या आठवड्यापासून स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या मोह‌िमेमुळे रोगराई कमी होईल असे वाटत होते. परंतु, वैद्यकीय विभागाच्या अहवालानुसार डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरूच असल्याचे चित्र आहे. गेल्या २७ दिवसांत महापालिका हद्दीत डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडा २०८ वर गेला असून, पॉझ‌िट‌िव्ह रुग्णांचा आकडा १०५ वर गेला आहे. गेल्या पाच दिवसांत डेंग्यूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ ने वाढली आहे. त्यामुळे उपाययोजनांनंतरही डेंग्यू रोखला जात नसल्याचे चित्र आहे. डेंग्यूसोबतच स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. २७ दिवसांत १४ जणांचा बळी स्वाइन फ्लूने गेला आहे. त्यात महापालिका हद्दीतील सात जणांचा समावेश आहे. शहराच्या हद्दीत जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूचे २८ बळी गेले असून, जिल्ह्यातील मृतांचा आकडा ६५ पर्यंत गेला आहे. त्यामुळे नाशिककरांचे आरोग्याची चिंता अधिक वाढली आहे.

मुलीचा मृत्यू डेंग्यूने नाही

दरम्यान, शहरातील डेंग्यूचा प्रकोप वाढत असला तरी, गेल्या आठवड्यात जुन्या नाशिकमध्ये १३ वर्षीय आयशा शेख या मुलीचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचा संशय होता. त्यासंदर्भात खासगी रुग्णालयाने अहवाल दिला होता. परंतु, पालिकेने संबंधित मुलीचे रक्‍‌ताचे नमुने तपासले असता, त‌िचा मृत्यू डेंग्यूने झाला नसल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे शहरात अद्याप डेंग्यूचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरतीतील दोषींची पाठराखण?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गेल्या वर्षी झालेली वादग्रस्त नोकरभरती तत्काळ रद्द करण्याची मागणी महामडंळाच्या बैठकीत संचालकांनी केली आहे. या प्रकरणातील दोषींची अधिकाऱ्यांकडून पाठराखण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी भरतीप्रक्रियेच्या चौकशी अहवालानंतर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत. पुढील बैठकीत संचालकांच्या पटलावर अहवाल ठेवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी विकास महामंडळ संचालक मंडळाची सभा गुरुवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी भरती प्रक्रियेतील झालेला भ्रष्टाचार उघड केला असून, त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल सादर झाला असताना कारवाई का होत नाही, असा सवाल धनराज महाले यांनी उपस्थित केला. चौकशीत अधिकारी दोषी आढळून आले असतानाही, त्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर सर्व संचालकांनी नोकर भरतीबाबत प्रश्न उपस्थित करीत, सचिवांना धारेवर धरले. त्यानंतर सावरा यांनी संबंधित नोकर भरतीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. दोषींवर कारवाई केली जाईल. याचा सविस्तर अहवाल पुढील सभेत ठेवला जाणार असल्याचे जाहीर केले.

खावटी कर्ज योजना सुरू करण्याचा व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धर्तीवर आदिवासींचे खावटी कर्जमाफ करण्याचा ठराव झाला. महामंडळाच्या तूर, भात विक्रीचा निर्णय होत नसल्याने तो सडत असल्याचे विकास वळवी यांनी सांगितले. त्यामुळे महामंडळाच्या संचालक व अधिकाऱ्यांना हे धान्य विक्रीचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना समावून घेण्याचा, वाहनचालकांचा ठेका कायम ठेवणे आदी विषयांवर चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षिणेची प्रथा बुम्मा-गोलू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

विविधतेत एकता अशी आपल्या देशाची ओळख आहे. भाषा, वेशभूषा, सण-उत्सव, परंपरा, कला, संस्कृती, आहार अशा सर्वच बाबतीत ही विविधता आढळते. सण-उत्सवांतील वैविध्यता जास्तच ठळक जाणवते. बुम्मा-गोलू हा असाच एक वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक उत्सव आहे. तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यात नवरात्रीत घरोघरी हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. सामान्य माणसाला सदाचाराची शिकवण देणारा हा उत्सव नाशिकरोडला स्थायिक झालेल्या उमा मोहन यांच्या कुटुंबात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरातील नागरिकही या उत्सवात सहभागी होत आहेत.

नवरात्री म्हणजे आद‌िशक्तीच्या पूजनाचा उत्सव. नवरात्रीत तामिळनाडूमध्ये बुम्मा-गोलू हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवी लक्ष्मी तपसाधना करते, असे मानले जाते. बुम्मा-गोलू उत्सवात विविध देवदेवतांच्या मूर्तींची कलात्मकतेने मांडणी केली जाते. यात निर्जिव वस्तूंपासून सजीव, सामान्य माणूस, संत महात्मे आणी देव अशा स्तराची रचना केली जाते. यातून सामान्य माणसाने आपल्या आचरणात सातत्याने सुधारणा करुन ईश्वरासमान झाले पाहिजे, अशी शिकवण मिळते.

नवरात्रीत साजऱ्या होणाऱ्या बुम्मा-गोलू या पारंपरिक उत्सवात देवीचे भजन, कीर्तन व संगीताला विशेष महत्त्व असते. या काळात मिरची, मसाला, लसूण, कांदा या पदार्थांचे सेवन वर्ज्य असते. सकाळ-सायंकाळ सुवास‌िनींना हळदी-कुंकवाला आमंत्रित करुन सर्वांना नवधान्याचा प्रसाद दिला जातो. या काळात दक्षिण भारतात शेत पिकांची लागवड पूर्ण झालेली असते. त्यामुळे शेतकरी निवांत असतात. अशावेळी नदीच्या काठावरील मातीपासून शेतकरी बांधव विविध देव देवतांच्या मूर्ती बनवितात. याच मूर्ती बुम्मा गोलू या उत्सवात वापरल्या जातात. उमा मोहन यांनीही तामिळनाडूतून या सर्व मूर्ती आणलेल्या आहेत.

दरवर्षी वेगळी थिम

बुम्मा-गोलु उत्सवात दरवर्षी एका विषयावर सजावट केली जाते. गेल्या वर्षी उमा मोहन यांनी नवविध भक्ती या विषयावर सजावट केली होती. यंदा ‘महाराष्ट्रातील संत’ या विषयावरील सजावटीत दिंडी, वारकरी, चंद्रभागा, विठ्ठल रुखुमाई यांच्या रुपांची कलात्मक आरास उभी केली आहे. उमा मोहन या नाशिकमधील न्यू इरा शाळेत प्राचार्या असून, त्या संगीत विशारदही आहेत. दाक्षिणात्य क्लासिकल संगीतात त्या प्रवीण असून वीणावादनात त्यांचा हातखंडा आहे. बुम्मा-गोलू हा उत्सव सामाजिक एकतेचे प्रतीक बनले आहे.


बुम्मा-गोलू हा नवरात्रीतील देवीचा पारंपरिक उत्सव आहे. देवीच्या आराधनेबरोबरच सामाजिक सौहार्द्रता जपणारा व सदाचरणाची शिकवण देणारा हा उत्सव आहे. याशिवाय शांतता, एकाग्रता आणि संगीत यालाही या उत्सवात महत्त्व असते.

- उमा मोहन

घागर फुंकणे, घटी बसणे

नाशिक जिल्ह्यातील देवी मंदिरांमध्ये नवरात्रात घटी बसणे आणि अष्टमीच्या दिवशी घागर फुंकणे अशा दोन प्रमुख प्रथा आहेत. अनेक महिला अष्टमीच्या दिवशी घागर फुंकतात. मात्र, आपण हे का करतो, हे त्यांनादेखील माहीत नसते. काहीतरी दैवी चमत्कार घडेल, लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित होईल, यासाठी घागर फुंकली जाते. यात दैवी प्रकार वगैरे काहीही नसून, तो एक नृत्य प्रकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. घागर फुंकताना तोंडातून बाहेर पडणारी फूक जेव्हा घागरीत जाते, तेव्हा त्यातून एक वेगळा ‘नाद’ तयार होतो. घुमलेला आवाज सातत्याने टिकावा, यासाठी घागरीतून बाहेर पडणाऱ्या आवाजाच्या तालावर आपोआप पावले नृत्य करतात. अश्‍विन शु. अष्टमीच्या दिवशी चित्पावन ब्राह्मणांत मुखवट्याची लक्ष्मी करतात. याप्रसंगी सुवासिनी स्त्रियांनी घागर फुंकून नृत्य करावे, असे सांगितले आहे. याप्रसंगी स्त्रिया पदर बांधतात व दोन्ही हातांनी घागर उचलून तिच्यात फुंकर घालून नाद घुमवतात. यावेळी काही स्त्रियांच्या अंगात देवीचा संचार होतो, असा समज आहे. अशा संचार झालेल्या स्त्रीला महालक्ष्मीपुढे बसवून भाविक स्त्रिया तिला आपल्या संसारातल्या अडचणींविषयी प्रश्‍न विचारतात. ती घुमणारी स्त्रीही त्या प्रश्नांना उत्तरे देते. अष्टमीला घागर उदाच्या धुपाने भरून घेतात आणि ती घागर कमीतकमी पाच वेळा फुंकतात. असे करण्याने श्वसनमार्ग शुद्ध होतो. पहिल्या व्यक्तीला जेव्हा दम लागेल, तेव्हा हातातील घागर दुसऱ्याकडे सुपूर्द केली जाते. हा एक श्वसनाचा व्यायाम असून, त्याला दैवी उपासनेची जोड दिली आहे. नाशिक शहरातील रेणुका देवी मंदिर, सांडव्यावरची देवी, कालिका मंदिर याठिकाणी आजही ही प्रथा पाळली जाते.


नऊ दिवस बसतात ‘घटी’

जिल्ह्यातील चांदवड, कोटमगाव, कालिका मंद‌िर येथे अनेक भाविक स्वतः घटी बसतात. पहिल्या दिवशी देवीची विधीवत पूजा करुन नंदादीप तेवत ठेवायचा अथवा असलेल्या नंदादीपात सव्वाच्या प्रमाणात तेल टाकायचे आणि घटी बसायचे. म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांत मंदिरात बसून राहायचे. उठायचे नाही. हा एक नवसाचा प्रकार मानला जातो. घटाच्या भोवती धान्य पेरायचे आणि घटात फुलांची माळ सोडायची. ती झेंडूची, शेवंतीची किंवा नागवेलीच्या पानांची असते. यात काही लोक पाठीवर झोपून आपल्या पोटावर घटस्थापना करतात. हलायचे नाही, हा एकमेव उद्देश त्यामागे असतो. नवरात्राचे नऊ दिवस जे लोक घटी बसतात, त्यांचे दर्शन घेण्यासाठीदेखील लोक जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हणे, कचरा विलगीकरणात ५८ टक्के घरे पास!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी ठेक्यासाठी नाशिकची लोकसंख्या ही कोटीच्या वर फुगवणाऱ्या आरोग्य विभागाने कचरा विलगीकरणाबाबत नवा जावईशोध लावला आहे. आकडेमोडीत मातब्बर झालेल्या या विभागाने शहरातील ५८ टक्के कुटुंबांकडे ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असल्याची माहिती जाहीर केली आहे, तर ४२ टक्के कुटुंबांकडे अद्याप कचरा विलगीकरण केले जात नसल्याचे सर्वेक्षणात उघड केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या या सर्वेक्षणावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील तीन लाख ४३ हजार घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यापैकी दोन लाख घरांमध्ये कचरा विलगीकरण केले जात असल्याचे समोर आले आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियानांतर्गत महापालिकेकडून कचरा विलगीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. घंटागाड्यांमध्येच ओला व सुका कचरा गोळा करण्याची तरतूद केल्यानंतर आता नागरिकांनासुद्धा त्याची सक्ती केली जात आहे. त्यासाठी महापालिकेकडून जनजागृती केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू केली आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात शहरात ओला व सुका कचरा वर्गीकरणासंदर्भात सहा विभागांत सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार शहरातील तीन लाख ४३ हजार २०९ कुटुंबांना भेटी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन लाख ६८ घरांमध्ये कचरा विलगीकरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळपास ५८.२९ टक्के घरांमध्ये कचरा विलगीकरण केले जात असून, ४१.७९ टक्के घरांमध्ये कचरा विलगीकरण केले जात नसल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या जनजागृतीमुळे हा चमत्कार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

प्रभाग १३ पिछाडीवर

आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेहेक्षणात प्रभाग क्र. १३ हा कचरा विलगीकरणात सर्वांत पिछाडीवर आहे. या विभागातील १३,१४१ घरांपैकी १९४४ घरांमध्ये कचरा विलगीकरण होत असून, त्याची टक्केवारी अवघी १४ टक्के आहे, तर प्रभाग क्र. ८ मध्ये ९३ टक्के घरांमध्ये कचरा विलगीकरण केले जात आहे. या विभागातील १०,१३३ घरांपैकी ९,४३० घरांमध्ये विलगीकरण केले जात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विभागातील रिक्त पदे भरण्याचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी आयुक्तालयांतर्गत विविध संवर्गातील पदे पदोन्नतीतून तत्काळ भरा आणि रिक्तपदांबाबत आकृतीबंध राज्य सरकारकडे पाठवून नोकरभरतीबाबत कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र विधानमंडळ आदिवासी कल्याण समितीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अशोक उईके यांनी दिले. सोबतच आदिवासी बांधवाना शासकीय योजना व उपयोजनांचा लाभ देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्यात. आश्रमशाळांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

राज्य अनुसूचित जमाती कल्याण समिती बुधवारपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आली आहे. बुधवारी आयुक्तालयात समितीने आढावा बैठक घेवून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके, सदस्य डॉ. देवराम होळी, पास्कल धनोरे, राजाभाउ वाजे, अमित घोडा, डॉ संतोष टारफे, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, चंद्रकांत रघुवंशी, श्रीकांत देशपांडे यांची उपस्थिती होती. समितीकडून आदिवासी आयुक्तालयात संध्याकाळी उश‌िरापर्यंत आढावा घेण्यात आला.


भ्रष्टाचाराची चौकशी करा

दरम्यान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासी विभागातील विविध विभागामंध्ये झालेल्या घोटाळ्याबाबात समितीकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. लेखन सामग्री, रेनकोट खरेदी, शालेय साहित्याबाबत अधिकाऱ्यांनी मोठा घोळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिषदेच्या वतीने लकी जाधव यांनी अध्यक्ष डॉ. उईके यांची भेट घेवून तक्रारीचे निवेदन दिले असून, त्यांची सखोल चौकशीची मागणी केली आहे. नाशिकचे प्रकल्प अधिकारी अमोल येडगे हे अधिकाऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलचा मार्ग सुकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील झोपडपट्टी धारकांसाठी पालिकेकडून एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमाअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या घरकुल योजनेत एक जानेवारी २००१ पूर्वीच्या लाभार्थींना घरकुले वाटप करण्यात येथील पालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. तसेच भुयारी गटार योजनेच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा देखील विषय महासभेत मंजूर करण्यात आला.

येथील पालिकेच्या सभागृहात महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीत भुयारी गटार योजना तसेच घरकुल योजनेतील लाभार्थीबाबत निर्णय घेण्यासाठी गुरुवारी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

महासभेच्या प्रारंभी केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजनेच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा विषय चर्चेस आला. यावेळी शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यस्तरीय समितीच्या बैठकीस या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे.

करांचा बोजा वाढणार

अमृतच्या पहिल्या योजनेतील कामे देखील अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप नगरसेवक डॉ खालिद परवेज यांनी केला. तर बुलंद इक्बाल यांनी २५ कोटींचा निधी उभारणीसाठी पालिका प्रशासन जनतेवर कराचा बोजा वाढणार का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर महापौर यांनी शहराच्या विकास हवा असल्यास कररूपाने बोजा वाढणार, त्यामुळे याबाबत राजकारण करू नये असे सुचविले.

पडताळणीनंतर घरकुल

महासभेत घरकुल योजनेवर चर्चा करण्यात आली. यात उपमहापौर सखाराम घोडके यांनी १८ महिन्यांत पूर्ण होणारी योजना अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे निदर्शनास आणून देत या योजनेचा लाभ बोगस लाभार्थींना होवू नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी सूचना केली. सभागृहात प्रभागनिहाय झोपडपट्टीधारकांची संख्या, लाभार्थी संख्येवर चर्चा झाली चर्चेअंती एक जानेवारी २००१ पूर्वीच्या लाभार्थ्यांना घरकुले वाटप करण्यात यावी. झोपडपट्टीधारकांना पडताळणी करून घरे देण्यात यावी अशी सूचना शेख यांनी मांडली.

२५ कोटींबाबत चर्चा नाही

भुयारी गटार योजनेत शहरातील कोणते नाले समाविष्ट केले आहेत, मोठ्या व लहान गटारींचे कामे होणार का? अशा अनेक विषयांवर यावेळी नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. आयुक्त धायगुडे यांनी याबाबत निवेदन करताना सांगितले की, १४ व्या वित्त आयोगातून या योजनेसाठी ५ टक्के निधी उभारला जाणार आहे. या प्रकल्पांची वेळेत, दर्जेदार कामे पूर्ण केल्यास पुढील टप्प्यातील कामे देखील होणार आहेत. त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. तब्बल एक तासाच्या चर्चेतनंतर भुयारी गटार योजनेसाठी आवश्यक असलेला संपूर्ण २५ कोटी निधी पालिका प्रशासन कसा उभारणार याबाबत सभागृहात कोणतीही चर्चा न करताच विषयाला मंजुरी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मामासह दोन भाचे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे फाट्यावर कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. यात तीन जण जागीच ठार झाले. बुधवारी रात्री ११ वाजता हा अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त टेहरे ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. अपघातीत मृतात दोन भाच्यांसह मामाचा समावेश आहे.

अपघातात संजय अर्जुन पवार (३४, रा. आद‌विासी वस्ती, मालेगाव) हा दुचाकीस्वार व त्याचे भाचे अवी विजय जाधव (वय १३) व ऋषीकेश राजेंद्र जाधव (९ दोघे रा. टेहरे) हे दोघे ठार झाले. हे तिघे दुचाकीने (एमएच ४१ एम २७४५) रस्ता ओलांडत असतांना कंटेनरने धडक दिली. दोघा बालकांचे मुतदेह तातडीने सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. संजय हे दुचाकीसह कंटेनरखाली अडकले होते. त्यांना काढण्याचे प्रयत्न सुरू होते. छावणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

उड्डणपुलासाठी रास्तारोको

महामार्गावर येथे उड्डाणपूल व भूमीगत रस्ता आवश्यक आहे. पूल मंजूर असूनही झालेला नाही. हा पूल तातडीने उभारावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी रात्री रास्तारोको केला. अपघातात यापूर्वी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यावेळी वारंवार आंदोलन झाल्यानंतर फक्त गतीरोधक करण्यात आले आहेत. मात्र यानंतरही अपघातांना आळा बसलेला नाही. ग्रामस्थांनी कंटेनर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजकीय वरदहस्तामुळेच ठेकेदारावर कारवाई नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील घंटागाडी ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा ठराव सर्व नगरसेवकांनी केलेला असताना केवळ राजकीय वरदहस्तामुळे या ठेकेदारावर कारवाई होत नसल्याचा आरोप सिडकोतील नगरसेवकांनी केला.

सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांच्या अध्यक्षतेखाली सिडकोची प्रभाग सभा गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुरुवातीलाच नगरसेवकांनी घंटागाडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यास सुरुवात केली. राजकीय आश्रय मिळत असल्याने ठेकेदाराची मुजोरी वाढली असून, तो नगरसेवकांनाही जुमानत नसल्याचा सूर सर्वच नगरसेवकांनी व्यक्त केला. यावेळी यावेळी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी नाशिक शहराप्रमाणेच सिडकोतही दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. या मागणीला शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबा व्यक्त करून ही मागणी पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशाराही दिला. या बैठकीत सहा लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीला सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, प्रवीण तिदमे, कल्पना पांडे, रत्नमाला राणे, भाग्यश्री ढोमसे, किरण गामणे, डी. जी. सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खोडे, राकेश दोंदे, भगवान दोंदे, छाया देवांग, पुष्पा आव्हाड, प्रतिभा पवार, मुकेश शहाणे आदी नगरसेवक उपस्थित होते.


तक्रारी करुनही कामे नाही

यावेळी सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचा उडालेला बोजवारा, घंटागाडी ठेकेदार व कर्मचाऱ्यांची मनमानी, वारंवार सांगूनही न झालेली कामे अशा मागण्यांची पुनरावृत्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांनी टीका केली. तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही कामे होत नसल्याचा आरोप सर्वच नगरसेवकांनी केला. अधिकारी काम करीत नसल्याने कोणत्याच समस्या सुटत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केल्याने काही काळ नगरसेवक विरुद्ध अधिकारी असा वाद निर्माण झाला होता. अखेरीस सभापती सुदाम डेमसे यांनी याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम करण्याचे आदेश दिले.


दोन वेळा पाणीपुरवठा अशक्य

दोन वेळा पाणी पुरवठा करण्याची मागणी शिवसेना नगरसेवकांनी केल्यानंतर ती चुकीची असून, तांत्रिकदृष्ट्या ते शक्य नसल्याचे मत नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केले. शिवसेना नगरसेवकांनीच मांडलेल्या मागणीला शिवसेनेचे नगरसेवक बडगुजर यांनी विरोध दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीच्या उत्पन्न वाढीला प्राधान्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती कठीण प्रसंगातून वाटचाल करीत आहे. समितीवर तब्बल ७३ कोटींचे कर्ज आहे. यापुढे बाजार समितीचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने कामकाज केले जाईल, असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी केले.

बाजार समितीची सर्वसाधारण सभा दिंडोरी रोडवरील अमरापूर धाम येथे शुक्रवारी झाली. यावेळी ते बोलत होते. माजी सभापती देविदास पिंगळे यांनी बाजार समिती अक्षरशः विकायला काढल्याचा आरोप चुंभळे यांनी यावेळी केला. कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा डोंगर, उत्पन्न कमी, मातीमोल भावात समितीच्या जागा विकणे असे प्रकार सुरू होते. यापुढे बाजार समितीत स्वच्छ व पारदर्शी व्यवहार केला जाणार असून, कामात कुचराई करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा चुंभळे यांनी दिला.

सर्वसाधारण सभेस बाजार समिती उपसभापती संजय तुंगार, संपत सकाळे, चंद्रकांत निकम, शाम गावित, संदीप पाटील, रुची कुंभारकर, हेमंत खंदारे, विमल जुंद्रे, ताराबाई माळेकर आदी संचालकांसह कृउबा कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व आदी उपस्थित होते. बाजार समिती सचिव महेंद्र निकाळे यांनी सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले. संजय तुंगार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोक पतसंस्थेतर्फे १४ टक्के लाभांश

$
0
0

म. टा.खास प्रतिनिधी, नाशिक

अशोक नागरी सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा समर्थ मंगल कार्यालय येथे झाली. यात सभासदांना १४ टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनजे यांनी केली.

समाजातील आर्थिक विषमता दूर करून समाजबांधवांना प्रगती करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. या बांधिलकीला जपण्याचे काम पतसंस्था २५ वर्षांपासून करीत असल्याचेही सोनजे यांनी सांगितले. संस्थेचे दोन हजार ६४१ सभासद आहेत. त्यात अ वर्गाचे एक हजार ६८५ आणि ब वर्गाचे ९५६ सभासद आहेत. संस्थेचे अधिक भागभांडवल दीड कोटी असून, वसूल भागभांडवल ९९ लाख २९ हजार २७५ रुपये इतके झाले. यात ८ लाख २१ हजार ६०० इतकी भरीव वाढ झाली. संस्थेमध्ये आजमितीला २३ कोटी ४ लाख ९७ हजार ८६८ रूपयांच्या ठेवी आहे. या सर्व प्रगतीसाठी सभासद, कर्जदार, संचालक मंडळ, पदाधिकारी, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी यांनी केलेल्या अनमोल सहकार्यामुळेच संस्थेची प्रगती इतक्या झपाट्याने होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी सभेच्या चर्चेत अनेक सभासदांनी सहभाग घेतला.

गुणवंतांचा सत्कार

सभेमध्ये सभासदांच्या विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या पाल्यांचा स्कूल बॅग देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव रमाकांत अलई, उपाध्यक्ष सतीश वाणी, जनसंपर्क संचालक डॉ. नीलेश कुंभारे, खजिनदार सुभाष कोठावदे, संचालक दत्तात्रय मेतकर, सुनील अमृतकर, ज्योती कोठावदे, नीलम भदाणे, लक्ष्मण दशपुत्रे, डॉ. प्रकाश भोकरे, व्यवस्थापक मधुकर कोतकर तसेच सल्लागार संचालक भास्कर सोनजे, छगन वाणी, देवीदास भदाणे, जितेंद्र येवले, दत्तात्रय कोठावदे, भिकालाल कोठावदे, रवींद्र अमृतकर, अ‍ॅड. भास्कर सोनजे, अ‍ॅड. प्रवीण अमृतकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्हिल हॉस्प‌िटलला मिळाले नऊ इन्क्युबेटर

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्प‌िटलमधील नवजात अर्भक अतिदक्षता विभागासाठी प्रशासनाला अतिरिक्त नऊ इन्क्युबेटर प्राप्त झाले आहेत. त्यामुळे इन्क्युबेटर्सअभावी होणारी बालकांची हेळसांड थांबण्यास मदत होणार आहे.

महापालिका आण‌ि जिल्हा प्रशासनामधील लालफितीच्या कारभारामुळे सिव्हिल हॉस्प‌िटलमधील नवजात अर्भक आणि गर्भवती माता उपचार विभागाचे काम रखडल्याचे उघडकीस आले होते. ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्त मालिकेंतर्गत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने याबाबतची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. उपचारासाठी दाखल होणाऱ्या बालकांच्या तुलनेत इन्क्युबेटर्सची संख्या अत्यंत तोकडी असल्याने अर्भकांची हेळसांड होत असल्याकडे या वृत्तमालिकेतून लक्ष वेधण्यात आले. सुविधांअभावी गत महिन्यात ५५, तर एप्र‌िलपासून पावणेदोनशेहून अधिक बालके दगावल्याचा खळबळजनक प्रकारही उघडकीस आला. त्यामुळे यंत्रणाही जागी झाली. आरोग्यमंत्री दीपक सावंत, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि अनेक मातब्बरांनी हॉस्प‌िटलला भेट देऊन परिस्थ‌ितीची पाहणी केली. हॉस्प‌िटलमध्ये होणाऱ्या नवीन कक्षात सध्याच्या १८ इन्क्युबेटर्सव्यतिरिक्त आणखी १६ इन्क्युबेटर्सची सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही सावंत आणि महाजन यांनी दिली होती. त्यानुसार सिव्हिल हॉस्प‌िटल प्रशासनाला नवीन नऊ इन्क्युबेटर्स प्राप्त झाले आहेत. उर्वरित इन्क्युबेटर्स पुढील महिन्यात प्राप्त होणार असल्याचे सिव्हिल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फूल विक्रेत्यांचे पावसामुळे नुकसान

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

परतीच्या पावसाने शुक्रवारीदेखील नाशिककरांना झोडपून काढले. दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. दसऱ्यानिमित्त रस्त्यावरच पथारी टाकून फूलविक्रीसाठी बसलेल्या नागरिकांचे हाल झाले.

तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही मिनिटांत पाऊस धो धो कोसळत असल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. बुधवारी (दि. २७) १०, तर गुरुवारी (दि. २८) २.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारी मात्र पावसाचा जोर अधिक होता. अवघ्या काही वेळात धो- धो पाऊस झाला. सकाळी साडेआठ ते सायंकाळ‌ी साडेपाच या वेळेत शहरात तब्बल ३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुपारी पावणेदोन ते दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने काही मिनिटांत पाणी पाणी केले. दसऱ्यासाठी शहरातील विविध परिसरात रस्त्यांवर दुकाने थाटून बसलेल्या फूल विक्रेत्यांची या पावसाने दैना उडवली. पावसामुळे फुले भिजल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. कालिका यात्रेतील व्यावसायिक आणि भाविकांचीही या पावसाने तारांबळ उडवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनडीसीसीच्या ठेवींत घट; थकबाकी वाढली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक कोंडीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवींत २०१६- १७ या आर्थिक वर्षात तब्बल २३७ कोटी ३७ लाखांची घट झाली असून, त्याची टक्केवारी ७.०७ टक्के कमी आहे. बँकेकडे ३१२१ कोटी सहा लाखांच्या ठेवी असून, त्यातही घट झाली आहे. त्याचप्रमाणे बँकेकडे अल्पमुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत शेती कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, वैयक्तिक कर्जापोटी २०३५ कोटी ९२ लाख रुपये थकीत आहेत. त्यात अवसायनातील संस्थांकडील येणे बाकी १९ कोटी ३९ लाख आहे. २०१६-१७ मध्ये बँकेला १२० कोटी ४९ लाख तोटा झाल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती अहवालातून देण्यात आली.

सभेत सुरुवातीला मागील सभेच्या इतिवृत्ताला अगोदर मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ३१ मार्च २०१७ या दिवशी संपलेले नफा- तोटापत्रक, त्याच तारखेचे ताळेबंद व संचालक मंडळाच्या अहवालाचा स्वीकार करणे, २०१७-१८ च्या बँकेच्या आर्थिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे, २०१७-१८ साठी बँकेच्या बाहेरील कर्ज उभारण्याची मर्यादा ठरविण्याबाबत विचार करणे, २०१५-१६ या तीन वर्षांच्या बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षणातील दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे, २०१६- १७ च्या बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे, २०१७- १८ या कालावधीसाठी बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकांच्या नियुक्तीबाबत विचार करणे, अनुपस्थित सदस्यांची क्षमापित करणे, बँकेच्या सेवकांच्या सेवानियमात केलेल्या दुरुस्तीस मान्यता देणे या विषयांना मंजुरी देण्यात आली.

बँकेला १२० कोटींचा तोटा

२०१६-१७ मध्ये बँकेला १२० कोटी ४९ लाख तोटा झाल्याचे सांगण्यात आले. यामागील कारणेही या वेळी सांगण्यात आली. त्यात आर्थिक वर्ष २०१६- १७ मध्ये बँकेस ४१ कोटी ६८ लाखांचा ढोबळ नफा झाला. त्यात एनपीसाठी प्रधान कार्यालय स्तरावरील विविध तरतुदींसाठी १०० कोटी ५४ लाख गेले. २०१६- १७ मध्ये बँकेला ५८ कोटी ८६ लाख तोटा झाला, तर २०१५- १६ मधील शिल्लक तोटा ६१ कोटी ६३ लाख होता. असा एकूण तोटा १२० कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमोल्लंघनासाठी बाजारपेठ सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. सराफ बाजारासह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व वाहन विक्रेते सज्ज झाले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी विविध प्रकारच्या स्क‌िम्स बाजारात आणल्या आहेत.

घरातील नवीन वस्तू खरेदीला नवरात्रोत्सवाच्या पूवार्धात सुरुवात होते. पितृपंधरवड्यातील शांततेनंतर नवरात्रात खरेदीला वेग येतो. यावेळी केलेली खरेदी चिरकाल टिकत असल्याचे मानले जात असल्याने दसऱ्याच्या खरेदीकडे कल असतो.

सराफ बाजारात चैतन्य

सराफ बाजारातील व्यवसायिकांनी ग्राहकांसाठी नवनवीन योजना आणल्या असून, सोने खरेदीवर आकर्षक सूट दिली जात आहे. काही व्यावसायिकांनी मजुरीवर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. तसेच दहा हजारांच्या खरेदीवर लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, विजेत्यांना वाहनांसह आकर्षक बक्ष‌िसे देण्यात येणार आहेत. काही व्यावसायिकांनी जितके सोने खरेदी कराल तितकी चांदी मोफत अशीही जाह‌िरात केली आहे. सध्या सोन्याच्या भावात स्थिरता असल्याने अनेक ग्राहक गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने खरेदी करतील, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे.

नव्या वाहनांची नोंदणी

दसऱ्याला वाहन खरेदी केली जात असल्याने नागरिकांनी वेगवेगळ्या वाहन विक्रेत्यांकडे आठ दिवसांपासूनच चौकशीला सुरुवात केली होती. अनेकांनी कागदपत्रांची पूर्तता करुन दसऱ्याला वाहन घरी आणण्याची तयारी केली आहे. नोंदणीची प्रक्र‌ियाही पूर्ण करण्यात आली असून, सकाळीच वाहने घरी आणण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. चारचाकी गाड्यांप्रमाणेच दुचाकी विक्रेत्यांकडेही जोरदार गर्दी होत आहे.


इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस

टीव्ही, फ्रीज, एसी, ओव्हन, सीडी, एलसीडी, संगणक, नवीन कपडे आदी वस्तू खरेदीस प्राधान्य दिले जात आहे. शहरातील विक्रेत्यांसोबतच ग्राहक मॉलमध्येही चौकशी करताना दिसत आहे. विक्रेत्यांनी घरगुती वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलती देऊ केल्या आहेत. बाजारपेठेत कोणतीही वस्तु खरेदी करताना विक्रेता कोणत्या सवलती देणार याचीही चौकशी ग्राहक करीत आहे. त्यामुळे सर्वच वस्तूंवर काहीना काही भेट वस्तू दिल्या जात आहेत. कपड्यांवर देखील मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात असून काही दुकानांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त सवलत दिली जात आहे.

सोनपिवळ्या फुलांचा बाजारात बहर

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आज विजयादशमीच्या मुहूर्तावर झेंडूंच्या सोनपिवळ्या फुलांनी बाजार बहरला आहे. शहरात जागोजागी, गल्लोगल्ली फुले विक्रीस आली आहेत. विजयादशमी आणि दीपावली या सणांना येणारी फुलांची मागणी लक्षात घेऊन या कालावधीत फुले काढणीस येतील, याचा अंदाज घेऊन फुलांची लागवड करण्यात येते. विजयादशमीनिमित्ताने शुक्रवारी (दि. २९) रोजी नाशिकच्या फुलबाजारासह शहरातील विविध भागात झेंडूच्या फुलांचा बाजार भरला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूच्या फुलांची आवक कमी असल्याचे जाणवले. शेतकऱ्यांकडील पाच किलोच्या क्रेटला २०० ते ३०० रुपये असा दर मिळत होता. किरकोळ बाजारात हीच फुले शंभर रुपये शेकडा किंवा १६० रुपये प्रति किलो अशा भावात विकला गेला.

विजयादशमीला घर आणि दुकाने सजविण्यासाठी लागणाऱ्या झेंडूंच्या फुलांच्या बाजाराने नाशिक शहर खऱ्या अर्थाने गुलशनाबाद असल्याचे दिसत होते. केशरी आणि पिवळ्या झेंडूचे उंच ढिगारे आणि लांबलचक माळा रस्त्यांच्या दुतर्फा ठिकठिकाणी दिसत होत्या. आपट्यांची पाणी आणि पुजेसाठी लागणारी आंब्याच्या डहाळ्याही विक्रीसाठी आल्या होत्या.

फुलांचे उत्पादन करणारे शेतकरी आणि सराफ बाजाराजवळील फुलबाजारातील विक्रेते यांच्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत फुलांच्या दराविषयी विरोधाभास असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या मते मागील वर्षी साधरणतः पाच किलो फुलांचे क्रेट ३० ते ४० रुपयांना विकले गेले. कित्येकांना तर फुले फेकून देण्याची वेळ आली होती. मागील वर्षी झेंडूच्या फुलांची लागवडही मोठ्या प्रमाणात होती. यंदा ती लागवड केवळ २० टक्के झाली असल्याचे झेडू उत्पादक शेतकरी भरत निमसे यांनी सांगितले. तर मागील वर्षी झेंडूच्या फुलांचा भाव २०० रुपये प्रतिकिलो होता. यंदा तो १६० रुपये किलो झाला असल्याचे फुलबाजारातील विक्रेते विजय शिंदे यांनी सांगितले.

चांदवड तालुक्यात झेंडूचे मोठे मार्केट उभारण्यात आले आहे. येथून थेट मुंबईला झेंडू पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सिन्नर, संगमनेर, मोहाडी, जानोरी, चांदशी या भागातून यंदा मोठ्या प्रमाणात झेंडू विक्रीस आले.


परतीच्या पावसाचा फटका

परतीच्या पावसामुळे फुलांवर पाणी साचून फुले सडण्याचे प्रमाण वाढले आहे. तीव्र उन, पाऊस आणि धुके अशा प्रतिकूल वातावरणामुळे झेंडूच्या झाडांवर रोग-कीडीचे प्रमाण वाढले आहे. धुक्यामुळे फुलांची गळ होऊ लागली आहे. त्याचा परिणाम दिवाळीच्या काळात जाणवणार आहे.

फुलांचे भाव (प्रति किलो)

झेंडू- १६०

छोटा गुलाब गड्डा- २०

पॉलिहाऊस गुलाब-३००

मोगरा-४००

जास्वंद-१००

सुपारी फुल-३००

अस्टर-१६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेवर सल्लागारांचे राज्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गळतीमुळे आता पालिकेवर खासगी सल्लागारांचे राज्य येताना दिसत आहे. प्रशासनाने सध्या शहर विकासाच्या नावाखाली विविध खासगी संस्थांना पालिकेत आवतन देत, सल्लागार नियुक्तीची परंपरा सुरू केली आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांच्या विकासासाठी आता ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर भूखंड विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. भूखंडांच्या निवडीसाठी सल्लागार संस्थांच्या नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायीवर ठेवण्यात आला आहे. परंतु, वारंवार येणाऱ्या सल्लागार संस्थांबाबत स्थायीकडून ब्रेक लावला जाण्याची शक्यता आहे.

जकातीपाठोपाठ एलबीटी रद्द होऊन थेट अनुदान देण्याची पद्धत सुरू झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी बजेटमध्येच पालिकेच्या मोकळ्या भूखंडांचा विकास पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप व ‘बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ या तत्वावर करण्याचा समावेश आहे. पालिकेला या जागांचा विकास करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे आता पीपीपी तत्वावर या भूखंडांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कामासाठी सल्लागार कंपनी नियुक्त केली जाणार आहे. बांधकाम विभागाने त्यासाठी निविदा प्रक्रिया राबिविली होती. त्यात पाच निविदा धारकांना निवडण्यात आले आहे.

बहु झाले सल्लागार

महापालिकेकडे सक्षम अधिकारी व अभियंत्याची फौज असतानाही, सध्या पालिकेचा भरवसा मात्र सल्लागार संस्थांवर वाढला आहे. यापूर्वी स्मार्ट सिटी कंपनीसाठी प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट कन्सल्टटंट, स्वच्छता अभियानासाठी सर्व्हेअर, पाणी गळती थांबविण्यासाठी नियुक्त केलेली स्काडा कंपनी, घरकुल योजना, मालमत्ता सर्व्हेक्षण, वाहतूक आराखडा, पार्किंग, एसटीपी सर्व्हेक्षण व स्ट्रीट डिझाइनसाठी सल्लागार संस्था नियुक्त केली आहे. आता भूखंड विकास कार्यक्रमासाठी पुन्हा सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

असा देणार मोबदला

२५ कोटी रुपयांपर्यंत प्रकल्पाची किंमत असेल तर सल्लागार कंपनीला ०.७५ टक्के मोबदला दिला जाणार आहे. २५ ते ५० कोटी रुपयांच्या कामासाठी ०.६० टक्के, ५० ते ७५ कोटी रुपयांसाठी ०.५० टक्के, ७५ ते १०० कोटी रुपयांचा प्रकल्प असेल तर ०.४० टक्के व शंभर कोटी रुपयांच्या वर प्रकल्पाची किंमत असेल तर ०.२५ टक्के मोबदला सल्लागार संस्थेला दिला जाणार आहे.

या भूखंडांचा समावेश

फाळके स्मारक, ट्रक टर्मिनस, जुने पंचवटी विभागीय कार्यालय, निलगिरी बाग, यशवंत मंडई, महात्मा फुले मार्केट, शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन, नाशिकरोड येथील टाऊन हॉल व सुभाष मार्केट, सिडको, मोरवाडी येथील मलजल शुध्द‌िकरण प्रकल्पाच्या जागेचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनरांची आर्थ‌िक कोंडी थांबवा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

बँक खात्यामध्ये किमान पाच हजार रुपये शिल्लक ठेवणे एसबीआयने बंधनकारक केल्यामुळे पेन्शनरांची आर्थिक कोंडी होते आहे. अनेक पेन्शनरांना अवघी तीन हजार रुपये पेन्शन मिळत असताना पाच हजार शिल्लक कशी ठेवणार, असा सवाल पेन्शनरांनी शुक्रवारी उपस्थित केला. बँकेने जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शुक्रवारी जिल्हा निवृत्तिवेतनधारक संघटनेचा मेळावा झाला. जिल्हा लेखाधिकारी विलास गांगुर्डे, सहाय्यक लेखा अधिकारी शीतल महाले, संघटनेचे अध्यक्ष माधवराव भणगे यांच्यासह पेन्शनर्स उपस्थ‌ित होते. भणगे यांनी पेन्शनर्सची कैफियत मांडली. ते म्हणाले, की स्टेट बँकेने सक्ती केलेल्या शिल्लक रकमेचा मुद्दा गंभीर आहे. पीएफ पेन्शनरधारकांना २६०० ते ३१०० रुपये पेन्शन मिळते. स्टेट बँकेत पेन्शन जमा होणाऱ्या पेन्शनरांनी किमान पाच हजार रुपये शिल्लक नसेल तर दंड भरावा लागतो. हा पेन्शनरांवर अन्याय आहे. लेखा कोशागार विभागाने या विषयात लक्ष घालून स्टेट बँकेकडे भावना मांडाव्यात, तसेच जिल्हा परिषदेच्या निवृत्तिवेतन धारकांना वेळेवर पेन्शन मिळण्यात अडचणी येतात. त्या दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे पेन्शनरांचीही पेन्शन वाढणार आहे, अशी माहिती गांगुर्डे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रगती आणि परिवर्तन या दोन्ही पॅनलकडून रणशिंग फुंकले गेले आहेत. भास्कर बनकर यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनल तर दिलीप बनकर यांच्या परिवर्तन पॅनलचा प्रचाराला सुरुवात झाली आहे. दोन्ही पॅनलने येथील बाजार पेठेतील सिद्धिविनायकास विजयासाठी साकडे घातले. दोन्ही पॅनलने एकाच दिवशी प्रचाराचा धमाका उडविल्याने पहिल्याच दिवशी प्रचारात रंगत आली.

हुकूमशाही, दडपशाहीला लोक वैतागले

गत पंधरा वीस वर्षात पिंपळगाव बसवंत शहराच्या नावलौकीकास साजेसा विकास झालेला नाही. शहरातील रस्त्याची स्थिती अत्यंत वार्इट असून, मूलभूत सुविधा आजही सामान्य नागरिकांपर्यत पोहचलेल्या नाहीत. शहरात केवळ हुकूमशाही, दडपशाहीचे राजकारण झाले असल्याचे आपण सर्वजण साक्षिदार आहात. त्यामुळे हुकूमशाही राजवट हटवून पिंपळगाव शहराला भयमुक्त, स्वच्छ बनविण्यासाठी परिवर्तन पॅनलला पाठबळ द्या, असे आवहन परिवर्तन पॅनलचे प्रमुख दिलीप बनकर यांनी केले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूम‌विर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी दिलीप बनकर बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रतापराव मोरे, अशोक शहा, तानाजी बनकर, विश्वास मोरे, सुरेश खोडे उपस्थित होते.

दिलीप बनकर म्हणाले, पाच वर्ष आपण आमदार असताना शहरातील विस्तारीत १५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. विविध योजना शहरासाठी मंजूर करून घेतल्या. मात्र केवळ याचे श्रेय मला मिळेल म्हणून सत्ताधारी गटाने ग्रामपंचायतमार्फत प्रस्तावच पाठविले नाहीत.

सुरक्ष‌ति अन् स्वच्छ शहरासाठी कट‌बिद्ध

विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक मुद्द्यावर होत आहे. गत पंचवीस वर्षातील आपल्या कार्यकाळात विविध विकास कामांच्या माध्यमातून पिंपळगाव शहराला नवीन रंग रुप देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. पुढील काळातही स्वच्छ, सुंदर पिंपळगाव शहर विकस‌ति करण्याचा आपला संकल्प असल्याचे भास्कर बनकर यांनी आश्वासन दिले.

प्रगती पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ येथील सिद्धिविनायक मंदिरात मविप्रचे माजी संचालक दिलीप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ज्येष्ठ नेते अॅड. शांताराम बनकर, पंढरीनाथ देशमाने, रावसाहेब मोरे, नुरचाचा शेख, नाना खडके, रामराव डेरे आदी मान्यवर उपस्थित होते. भास्कर बनकर म्हणाले, पालखेड धरणातून पाणीपुरवठा कार्यान्व‌ति करून शहराची पिण्याच्या गरज पूर्ण केली आहे. त्यामुळे दुष्काळातही शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात आला. याशिवाय शहरातील उपनगरे व आदिवासी झोपडपट्टी वस्तीत रस्ते, गटारी, पथदीप, उदयाने, अंगणवाडी आदी सुविधा दिल्या. पुढील काळातही स्वच्छ, सुंदर पिंपळगाव शहर विकस‌ति करण्याचा आपला संकल्प असल्याचे भास्कर बनकर म्हणाले. यावेळी दिलीप मोरे, चंद्रक्रांत खोडे, वैशाली बनकर, किरण लभडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहो आश्चर्यम्! एनडीसीसी सभा शांततेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदी व कर्जमाफीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या ४५ मिनिटांतच गुंडाळण्यात आली. अध्यक्षांच्या भाषणाविना झालेल्या या सभेत विद्यमान संचालकांपैकी अवघे सात संचालक, तर ९,६०० पैकी ३५० च्या आसपासच सभासद उपस्थित होते. सभासदांमध्ये खदखदणाऱ्या संतापामुळे ही सभा वादळी ठरेल, अशी चर्चा असताना ही सभा शांततेत पार पडल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

जुन्या सीबीएसजवळ बँकेच्या जुने केंद्र कार्यालयात सकाळी ११ वाजता झालेल्या सभेत सुरुवातीला मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी र. वा. बकाल यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रास्ताविक व कार्यक्रमपत्रिकेतील विषय वाचले. त्यानंतर एक-एक विषयांना सभासदांकडून संमती घेत सर्व विषयांना मंजुरी घेतली. सभेच्या सुरुवातीलाच विषयपत्रिकेच्या दहा विषयांना मंजुरी दिल्यामुळे सभेतील वादाचे विषय संपले. त्यानंतर कोणीही विरोध प्रकट न केल्यामुळे या सभेने इतिहासही घडवला. यानंतर बँकेचे सभासद बाबा करंजकर, पंडितराव काकड व बँकेचे संचालक शिरीष कोतवाल यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांना काही कळायच्या आतच या सभेचा समारोप कोतवाल यांनी केला.

संचालकांनी सोडला सुस्कारा

नेहमीच वादळी ठरणाऱ्या सभेत यंदा कोणताही वाद न झाल्यामुळे संचालकांनीही सुस्कारा सोडला. या वेळी आयत्या वेळचे कोणतेही विषय मांडण्यात आले नाहीत. बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत गणपतराव पाटील, माजी आमदार शिरीष कोतवाल, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, परवेझ कोकणी, डॉ. शोभा बच्छाव या संचालकांसह माजी खासदार माधवराव पाटील उपस्थित होते.

बँकेच्या कारभारावरही चर्चा नाही

सीसीटीव्ही खरेदी, लोखंडी तिजोरी खरेदी, नोकरभरती यांसारख्या विषयांची चौकशी सुरू असताना बँकेच्या वार्षिक सभेत मात्र याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याचप्रमाणे नोटाबंदी, नवीन कर्जवाटप न करणे, बँकेतून पैसे काढण्यासाठी होणाऱ्या त्रासाबद्दलही कोणी संताप व्यक्त केला नाही. बँकेविरुद्ध झालेले आंदोलनही या सभेत चर्चेत आले नाही.

वादळ न उठण्यामागे अनेक कारणे

नेहमीच वादळी होणाऱ्या सभेत बहुतांश सभासद आपले प्रश्न मांडत; पण कर्जमाफी मिळणार म्हणून ७५ टक्क्यांहून अधिक सभासद थकबाकीदार आहेत. त्याचप्रमाणे कर्जमाफीमुळे आता पैसे मिळणार असून, त्यात बँकेने अडचणी टाकू नयेत अशी अपेक्षाही आहे. याबरोबरच ३० सप्टेंबरपर्यंत सर्व संस्थांना वार्षिक सभा घेण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शुक्रवारी सभा असल्यामुळे सभासदांची उपस्थिती घटली. मात्र, या शेतकरी सदस्यांबरोबरच नागरी बँका व विविध संस्थाही बँकेच्या सभासद आहेत. त्यांनीही आपले प्रश्न मांडले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थचक्राला गती देणारी श्री सप्तशृंगनिवासिनी

$
0
0

विजय गोळेसर

--

श्री सप्तशृंगनिवासिनीदेवी म्हणजे उत्तर महाराष्ट्राला पडलेले एक गोड स्वप्न आहे. महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी आणि सप्तशृंगगडावर विसावलेली आई जगदंबा. श्री सप्तशृंगनिवासिनीची नाशिक जिल्ह्यावर विशेष कृपादृष्टी आहे. सर्व क्षेत्रांत नाशिक पुढे आहे, त्याचेही अधिष्ठान जगदंबा आहे...

--

महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे प्रसिद्ध आहेत. देवी भागवतात या साडेतीन पीठांचा उल्लेख आहे तो असा-

कोल्हापूरं महास्थानं, यत्र लक्ष्मी सदास्थिता।

मातृ:पुरं द्वितीयंच, रेणुकाधिष्ठितं।

तुळजापूर तृतीयं स्थान, सप्तशृंग तथैवच।।

यातील सप्तशृंगनिवासिनी म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील भाविकांची आवडती भगवती. नाशिकपासून ६५ किलोमीटरवर सप्तशृंगदेवीचे हे पवित्र स्थान आहे. गडाच्या पायथ्याशी नांदुरी हे गाव आहे. नांदुरी ते सप्तशृंगगड हा पक्का रस्ता अनेक वर्षांपासून तयार झालेला आहे. त्यामार्गे एसटी बसेस, तसेच खासगी वाहनांतून वर्षभर गडावर वाहतूक सुरू असते. नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी जी पायवाट आहे तीदेखील सुस्थितीत आहे. धुळे, जळगाव, नाशिक, तसेच गुजरात राज्यातून येणारी वाहने नांदुरीला थांबतात. यात्रा काळात या सर्व गाड्यांसाठी मोठ्या वाहनतळाची व्यवस्था केली जाते. नांदुरीहून पायी, खासगी वाहनाने अथवा एसटीच्या मिनी बसने गडावर जाता येते.

गडाचा चढ चढून मध्यसपाटीवर आले, की सप्तशृंग हे टुमदार गाव लागते. गडावर पाणी भरपूर आहे. स्वच्छ पाण्याने भरलेली आणि काळ्या दगडांनी बांधलेली सरस्वती, लक्ष्मी, तांबुल, अंबाल्य, शीतल, कालिका, सूर्यकुंड व दत्तात्रेय कुंड अशी १०८ कुंडे गडावर आहेत. गावापासून शंभर मीटर अंतरावर सिद्धेश्वर महादेवाचे हेमाडपंती बांधणीचे मंदिर आहे. या मंदिराजवळ शिवालय नावाचे कुंड असून, त्याचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

गडापासून देवीपर्यंत जाण्यासाठी ४७२ पायऱ्यांचा दुसरा टप्पा चढून वर जावे लागते. पहिल्या पायरीजवळ नगारखाना व विश्वस्तांचे उपकार्यालय आहे. यंदा दीपमालेसाठी पहिल्या पायरीला तेल अर्पण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

--

अशी आहे आख्यायिका

स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगीच्या उत्पत्तीसंदर्भात श्रीसप्तशतीमध्ये उल्लेख आढळतो. त्यानुसार महिषासुराच्या जाचाला कंटाळून देव-देवतांनी होम केला. देवीला प्रसन्न केले. देवांच्या विनंतीनुसार देवीने महिषासुराबरोबर झालेल्या घनघोर युद्धात त्याला ठार केले. मरतेसमयी महिषासुराने देवीकडून एक वर मागितला, की तुझे दर्शन घेण्यापूर्वी भक्तांनी माझे दर्शन घ्यावे. यामुळे मंदिरात जाताना पहिल्या पायरीजवळ डाव्या बाजूला महिषासुराच्या मस्तकाची स्थापना केली असून, नंतर श्रीगणेशाचे मंदिर, निम्म्या पायऱ्या चढून गेल्यावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे मंदिर लागते.

येथील ४७२ पायऱ्या पेशव्यांचे एक सरदार खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी उमाबाई यांनी बांधल्या आहेत. या पायऱ्यांवर विसाव्यासाठी व सावलीसाठी ट्रस्टने अकरा शेड बांधले आहेत. कासव टप्प्याच्या थोडे पुढे औदुंबराचे झाड आहे. या झाडाच्या पूर्वेस ३० फुटांवर मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख आहे तो असा,

तो मच्छिंद्र सप्तशृंगी।

भग्नावयव चौरंगी।

भेटला की तो सर्वांगी।

संपूर्ण झाला।।

त्रिभुवनी भुवनी पाहता तुजऐसी नाही...

पर्वतशिखराच्या मधोमध कड्यामध्ये गुहाकृती अशी अठरा-वीस फूट उंचीची कपार आहे. त्या कपारीत खोलवर महिरप कोरलेली आहे. त्या महिरपीतच श्री सप्तशृंगदेवीची आठ फूट उंच मूर्ती कोरलेली आहे. देवीची मूर्ती अतिशय भव्य, शेंदूर लावलेली रक्तवर्णी आहे. देवीची पूजा शिडीवर उभे राहूनच करतात. देवीला अठरा हात आहेत. तिच्या उजव्या हातांमध्ये मणिमाळ, कमळ, बाजा, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल आणि कुऱ्हाड ही आयुधं, तर डाव्या बाजूच्या हातांमध्ये शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र, कमंडलू आहेत. सप्तशृंगनिवसिनीला अष्टादशभुजा महालक्ष्मीच म्हणतात. देवी पूर्वाभिमुख आहे.

--

त्रिकाल पूजेची व्यवस्था

देवीला रोज वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक केल्यावर तिच्या सर्वांगाला शेंदूर लावतात. पापण्या व भुवया रंगाने कोरून कपाळावर ठसठशीत कुंकू लावतात. हे कुंकू दररोज निरनिराळ्या रंगाचे व आकाराचे असते. रविवारी सूर्यफूल, सोमवारी शैवपंथी, मंगळवारी गोल, बुधवारी फुलाकृती, गुरुवारी स्वस्तिक, शुक्रवारी पिंपळपान, शनिवारी शंखाकृती कुंकू लावतात. याचप्रमाणे अष्टमी, नवमी आणि पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा कुंकवाचा आकार बदलण्यात येतो. नंतर देवीच्या अंगात तीन खणांची चोळी. कटीला वस्त्र व डोक्यावर मुकुट चढवितात. संस्थानाने देवीच्या त्रिकाल पूजेची व्यवस्था केली आहे. देवीला दर वाराच्या वेगवेगळ्या पैठण्या आहेत. पैठणी नेसवून झाली म्हणजे नित्याचे अलंकार घालतात. अंबाबाईसाठी सोन्याचा कंठहार, गाठले, बिंदी, मंगळसूत्र, नथ, पुतळीहार, चांदीचा मुकुट, कमरपट्टा, चांदीचे पाय, पादुका आदी लाखो रुपये किमतीचे दागिने, तसेच अभिषेकपात्र, समया, घागरी, मोरमुकुट, घंटा, ताटवाटी, राजदंड आदी पूजेची उपकरणे आहेत.

पहाटेपासून विधींचा प्रारंभ

पहाटे पाच वाजता सप्तशृंगीदेवीचं मंदिर उघडतात. सहा वाजता काकड आरती होते. त्यानंतर आठ वाजता आईच्या महापुजेला सुरुवात होते. यामध्ये भगवतीच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते नवी पैठणी किंवा शालू नेसवून तिचा साजशृंगार केला जातो. मातेच्या मुखात पानाचा नवीन विडा दिला जातो. नंतर वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखविला जातो. दुपारी बारा वाजता महानैवेद्य आरती होते. देवीची सायंकाळी साडेसात वाजता आरती करतात.

देवीला प्रदक्षिणा घालायची झाल्यास सप्तशृंग पर्वताच्या मध्यावरून आखलेल्या पायवाटेने घालावी लागते. मात्र, नवरात्राच्या काळात प्रदक्षिणा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. गडावर चैत्र पौर्णिमा व नवरात्रोत्सव हे दोन्ही उत्सव अत्यंत धार्मिक व मंगलमय वातावरणात पार पाडले जातात. वरील दोन्ही उत्सवांच्या वेळी श्रीजगदंबेचे मूळ स्थान असलेल्या सर्वोच्च शिखरावर दरेगावचे पाटील पारंपरिक पद्धतीने ध्वज लावतात. ध्वज लावणारा परत येताना विशिष्ट प्रकारचे गवत प्रसाद म्हणून घेऊन येतो व ते गवत प्रसाद म्हणून वाटतो. हा समारंभ झाला की यात्रा परतू लागते.

--

ही आहेत ठळक वैशिष्ट्ये

भगवतीला श्री सप्तशृंगनिवासिनी म्हणतात, कारण ज्या गडावर भगवतीचा निवास आहे त्या गडाला सात शिखरे आहेत. सप्तशृंगगडावर अनेक औषधी वनस्पती व पाण्याची १०८ पवित्र कुंडे आहेत. देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर आहे. गडावर शीतकडा नावाची सुमारे १५०० फूट खोल दरी आहे. एका सवाष्णीने देवीला नवस केल्यानुसार आपल्या पुत्रासह बैलगाडीत बसून शीतकड्यावरून खोल दरीत उडी घेतली. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा अजूनही शीतकड्यावर पाहता येतात. सप्तशृंगनिवासिनीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७२ पायऱ्या चढून जाव्या लागतात. या पायऱ्या टाळून देवीच्या दर्शलाना जाण्यासाठी गडावर फ्युनिक्युलर ट्रॉली तयार झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्याचे ट्रस्टचे नियोजन आहे. गडावर दसऱ्याच्या दिवशी होणारी बोकडबळीची प्रथा व मानवंदना म्हणून हवेत गोळीबार करण्याची प्रथा बंद करण्याचा ठाम निर्णय प्रशासनाने यावर्षी घेतला आहे. यात्रा कालावधीत गडावर प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून, या नियमाचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत गडावर खासगी वाहतुकीस बंदी आहे. भाविकांसाठी एसटी महामंडळाने २५० बसेसची व्यवस्था केली आहे. दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता शांतिपाठ, अकरा वाजता कोजागरी उत्सवाची सांगता होणार आहे.

--

खऱ्या अर्थाने महालक्ष्मी...

‘उपासना शक्ती सामर्थ्याची’ या लेखमालेच्या निमित्ताने जिल्ह्यातील देवी मंदिरांत, यात्रांत फिरताना या यात्रांच्या माध्यमातूनच जीवन जगणाऱ्या अनेक माणसांशी भेट झाली. मोठे रहाट पाळणे किवा जायंट व्हील चालविणारी अनेक कुटुंबे यात्रांवरच उदरनिर्वाह करतात. यात्रेत फुगे, पिपाण्या, लहान मुलांची छोटी खेळणी विकून अनेक निराधार महिला जीवन जगतात. या सगळ्यांना जगण्यासाठी पैसे मिळवून देणारी देवी खऱ्या अर्थाने महालक्ष्मी आहे, असेच म्हणावे लागेल. अनेकांच्या अर्थचक्राला गती देण्याचे काम देवी तिच्या यात्रांमधून वर्षानुवर्षे करीत आली आहे.

एक साधे उदाहरण घेता येईल, नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगनिवासिनीच्या अस्तित्वामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळ जवळ प्रत्येक गावात एकतरी देवी मंदिर आहे. काही गावांत एकापेक्षा अधिक देवी मंदिरे आहेत. नवरात्रीत या प्रत्येक देवी मंदिराभोवती लहान-मोठ्या प्रमाणांत यात्रा भरते. ९-१० दिवस ही यात्रा चालते. यात्रेत प्रत्येक देवीच्या दर्शनच्या निमित्ताने हजार ते लाख भाविक येतात. सप्तशृंग, चांदवड, कोटमगाव, नाशिकची कालिका, घाटनदेवी यांसारख्या प्रत्येक मंदिरांत तर या दहा दिवसांत ७-८ लाखांपेक्षा अधिक भाविक येतात. या यात्रांमध्ये लहान मुलांसाठी प्रसाद, खेळणी व खाऊची हजारो दुकाने लागत. लहान-मोठे रहाट पाळणे, जायंट व्हील्स तर प्रत्येक यात्रेचे आकर्षण असते. गृहिणींसाठी सौंदर्य प्रसाधानांसोबतच गृहोपयोगी वस्तू, खाण्याच्या पदार्थांचे हजारो स्टॉल्स लागतात. देवीदर्शनाला जाण्यासाठी एसटी, रिक्षा, तसेच खासगी वाहनांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जत्रेतल्या फुले, नारळ विक्रेत्यांसह लहान मुलांसाठी फुगे, पिपाण्या विकणाऱ्यांपासून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, घरे, सोने-चांदीचे दागिने विकणाऱ्या सर्व व्यावसायिकांना यात्रा काळात आपापल्या क्षमतेनुसार आर्थिक लाभ होतो. यादृष्टीने पाहिले तर देवीमुळे आपल्या जिल्ह्यातील अर्थचक्राला चांगलीच गती मिळते. अशा या भवानी, जगदंबामाता, सप्तशृंगीमातेच्या या कर्तृत्वाचा विचार केल्यावर मनात विचार येतो खरच माते, त्रिभुवनी भुवनी पाहता तुजऐसी कुणीही नाही!!

----

सिन्नरची निमजग्याची देवी


नवरात्रीच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर वैशिष्ट्यपूर्ण आहे. सिन्नर गावात देवीची जितकी मंदिरे आहेत तेवढी ती कुठेही नाहीत. सिन्नरला देवीची मोठी बारा मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिर स्वतंत्र, तिथल्या देवी मूर्ती भव्य, सुबक व देखण्या आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास आहे. सिन्नरचे प्रमुख देवी मंदिर गावाबाहेर आहे. त्यामुळे सगळे सिन्नरकर तिला ‘गावाबाहेरची देवी’ म्हणतात. गावाबाहेरच्या देवीचे खरे नाव ‘निमजग्याची देवी’ असे आहे.


मार्कंडेय पुराणांतर्गत देवी माहात्म्यात असे सांगितले आहे, की ‘जगात जेव्हा तामसी व क्रूर वृत्तीचे लोक प्रबळ होऊन सात्विक जनांस त्रास देऊ लागतात, तेव्हा त्यांच्या हातून सज्जनांची सुटका करून त्यांना सुख मिळवून देण्यासाठी पुन:पुन्हा शक्तिदेवी अवतीर्ण होते.’ देवीचे अनेक अवतार झाले. तिने केलेल्या महत्कृत्यांची स्तुती करून भक्तजनांनी जेव्हा आपल्या अंत:करणातील प्रेम व आदर प्रशंसापर शब्दांत व्यक्त केला, तेव्हा देवीने असे अभय वचन दिले, ‘ोमी भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहीन, त्यांना दु:खमुक्त करीन. प्रत्येक अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घटपूजा, होमहवन करून माझे पूजन करा.” तेव्हापासून नवरात्री पाळण्याची प्रथा सुरू झाली.

सिन्नरपासून दूर गावाच्या पश्चिमेला गावाबाहेर देवीचे मंदिर आहे. नाशिक वेशीतून किंवा भैरवनाथाच्या मंदिरासमोरून जाणारा रस्ता देवीच्या मंदिरापर्यंत जातो. आडव्या फाट्यावरूनही थेट देवी मंदिरापर्यंत जाता येते. मंदिर सरस्वती नदीच्या काठावर आहे. नदीपासून उंचावर, छोट्या टेकडीवरच गाबाहेरच्या देवीचे मंदिर आहे. सिन्नरचे देवी मंदिर पूर्वाभिमुख आहे. पूर्वी ते दगड-विटांनी बांधलेले दोन घुमटी लहानसे मंदिर होते. पण, आता या मंदिराने कात टाकली असून, ते नव्या आकर्षक रूपात उभे राहिले आहे. सिन्नरमधील दानशूर मंडळी आणि भाविक यांनी लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. हल्लीचे मंदिर चांगलेच प्रशस्त असून, आधुनिक पद्धतीने बांधण्यात आले आहे.

येथील देवीची मूर्ती अतिशय प्रसन्न आहे. गडावरच्या सप्तशृंगनिवासिनी देवीप्रमाणेच गावाबाहेची ही देवी अठराभुजांची असून, तिची मूर्ती सात फूट उंच आहे. देवीच्या या अठरा हातांत मणिमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू या वस्तू आहेत. ती वाघावर स्वर झालेली आहे आणि हातातील त्रिशुळाने तिने महिषासुराचा वध केला आहे. मंदिरातील वातावरण शांत आणि आल्हाददायक असल्यामुळे भाविकांना येथे आल्यावर निश्चितच मन:शांती मिळते. कै. दशरथ किसन बलक या मंदिराचे वारस आणि पुजारी होते. आता वसंत विश्वनाथ तनपुरे हे मंदिराचे पुजारी आहेत. हल्ली देवीचे मंदिर एका लहानशा टेकडीवर आहे. परंतु, फार पूर्वी या जागेवर तळे होते. काळाच्या ओघात ते नष्ट झाले. त्या ठिकाणी टेकडी निर्माण झाली. गावाबाहेच्या देवीच्या गाभाऱ्यापुढे सभामंडपात डाव्या बाजूला पार्वतीची एक मूर्ती पाहायला मिळते. ती मूर्तीही देवीच्या मूर्ती इतकीच प्राचीन आहे.

देवीला चांदीचा मुकुट, सोन्याची नथ, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, चांदीचा कमरपट्टा वगैरे अलंकार भाविकांनी अर्पण केलेले आहेत. चैत्र पौर्णिमेला, तसेच नवरात्रीत हे सर्व दागिने देवीला घालतात. गावाबाहेरची देवी हे स्थान जागृत असल्याचा अनेक भाविकांना अनुभव आलेला आहे.

सालाबादप्रमाणे यंदाही घटस्थापनेने नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली आहे. नवरात्रीत नऊ दिवस येथे मोठा उत्सव होतो. पहाटे तीन वाजेपासूनच सिन्नरचे भाविक स्त्री-पुरुष, मुले, मुली मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात. पहाटेची शांतता, गाबहेरचा अंधारलेला रस्ता आणि देवीच्या मंदिरावर लावलेल्या लाउडस्पीकरवर वाजणारी भक्तिरसपूर्ण गाणी एक वेगळेच वातावरण निर्माण करते. आजही अनेक सिन्नरकरांच्या मनात प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ किंवा ‘चल गं सखे, चल गं सखे पंढरीला’ ही गाणी नवरात्रीतील काळात गावाबाहेरच्या देवीची आठवण जागवतात. गावाबाहेरील देवी मंदिर परिसरात सध्या मोठी यात्रा भरली आहे. मंदिरात दररोज सकाळ सायंकाळ आरती, देवीच्या गीतांचा कार्यक्रम होतो. मंदिराशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये सिन्नर शहरातील व आसपासच्या गावांतील ६० महिला व २० पुरुष घटी बसले आहेत. १९७६ पासून घटी बसण्याची प्रथा येथे सुरु झाली आहे.मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत सालाबादप्रमाणेच यंदाही बालगोपालांचे मनोरंजन करण्यासाठी आनंदमेळा भरला आहे.विविध प्रकारचे रहाट पाळणे,जायंटव्हील,टोराटोरा,छोटी-मोठी खेळणी,विविध प्रकारच्या खाउची दुकानं, महिलावर्गासाठी सौंदर्यप्रसाधने,तरुणांसाठी विविध खेळांचे स्टॉल्सही आनंदमेळ्यात आलेले आहेत.ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देणारा आनंदमेळा हजारो भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.पूर्वी केवळ देवीदर्शनासाठी केली जायची यात्रा आज शेकडो हातांना काम मिळवून देत आहे. गावाबाहेरच्या देवीचे खरे नाव ‘निमजग्याची देवी’ असे आहे. पूर्वी देवीच्या मंदिराभोवती निंबाची खूप झाडे होती. निंबाच्या झाडीत राहणारी ती ‘निंबाची देवी’ म्हणजेच ‘निमजग्याची देवी’ असे सांगतात. या देवीला निमजग्याचीदेवी हे नाव कसे पडले त्याची कथा अशी, ब्रिटिशांच्या राजवटीत देशभर प्लेगची साथ आली होती. सिन्नर गावातही ही साथ पसरल्याने गावातील प्लेगग्रस्त रुग्ण गावाबाहेर असलेल्या निंबाच्या झाडांच्या आश्रयाला जाऊन राहू लागले. औषधी गुणधर्म असलेल्या कडुनिंबाच्या झाडांमुळे कदाचित अनेक रुग्ण बरे झाले असतील. तेव्हापासून या जागेला ‘निमजगा’ असे म्हणू लागले. त्यामुळे येथील देवीला ‘निमजग्याची देवी’ असे नाव पडले. सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट, सिन्नरची स्थापना डिसेंबर १९९४ मध्ये झाली असून, द्वारकानाथ नरसिंगदास चांडक अध्यक्ष आहेत.


सिन्नरमधील देवी मंदिरे...

गावाबाहेरच्या देवीप्रमाणेच सिन्नरला शिवनदीच्या काठावरची ‘काशीआई’, लोंढे गल्लीतील जीर्णोद्धार झालेली ‘भद्रकाली’, वावी वेशीजवळ ‘तेली समाजाची देवी’, नाशिक वेशीजवळची ‘सरस्वतीदेवी’, गंगावेशीजवळची ‘इंगळादेवी’, त्याच्या जवळची ‘लाड सुवर्णकार समाजाची देवी’, लाल चौकातील ‘महालक्ष्मी’, पुढे ‘नामदेव शिंपी समाजाची देवी’, प्रताप टॉकीजजवळची ‘वाघाई देवी’, शिंपी गल्लीतील ‘रेणुकामाता’, गणेश पेठेतील ‘कालिका देवी’, कुंदेवाडी रस्त्यालाच जरा पुढे संगमाजवळील ‘काळूआई’, नारायणबाबा मंदिराजवळची ‘संतोषीमाता’, तसेच पंचायत समितीजवळील ‘शीतलादेवी’ आदी देवी मंदिरे सिन्नर येथे आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठा उत्सव या सर्व मंदिरांत साजरा केला जातो.

----

तांबट आळीतील श्री कालिकादेवी!


नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी नवीन तांबट आळीत श्री कालिका देवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात कालिकेची अतिशय सुंदर मूर्ती आहे. मंदिरही अतिशय सुबक, स्वच्छ व शांत आहे. देवीच्या गाभाऱ्याला समोर काचेची केबिन केलेली आहे. देवीची नित्यनेमाने पूजा केली जाते. उपेंद्रभाई तळाजिया देवीचे पुजारी आहेत.

चैत्र पौर्णिमा आणि नवरात्री हे देवीचे प्रमुख उत्सव कालिका मंदिरात साजरे केले जातात.

नवरात्रीत सकाळी ६ वाजता काकड आरती, रात्री ७ वाजता देवीची आरती केली जाते. नवरात्रीत रोज सायंकाळी ७.३० वाजता मंदिरामागच्या मोठ्या हॉलमध्ये गरबा नृत्य केले जाते. रात्री ८ वाजता रत्नदीपपूजा केली जाते. या पूजेसाठी ७१ कुटुंबप्रमुख मानकरी असतात. रत्नदीपपूजा म्हणजे कणकेची देवी करून तिची पूजा केली जाते. नऊ दिवसांत कोण मानकरी होईल ते चिठ्ठ्या काढून ठरविले जाते. पूजेनंतर खाऱ्या शेगदाण्यांचा प्रसाद वाटतात. नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणारे भाविक अष्टमीला उपवासाचे पारणे फेडतात. दसऱ्याला ‘खण’, ‘कडकण्या’ने चौसष्ट योगिनींची पूजा करतात.


मानाची महारत्नदीपपूजा

आश्विन शु. प्रतिपदेला येथे घटस्थापना केली जाते. या काळात कालिकाष्टक व श्रीसूक्त वाचन करतात. सप्तमीला होमहवन व पूर्णाहुती होते. अष्टमीला महाअष्टमी उपवास व सायंकाळी कालिकाष्टक, नवमीला गोत्रज पूजन करतात. दसऱ्याला महारत्नदीपपूजा होमहवन व पूर्णाहुती. सायंकाळी महारत्नदीप शोभायात्रा काढली जाते. महारत्नदीप पूजा अतिशय मानाची समजली जाते. पूर्वी ही पूजा आपल्या घरी व्हावी यासाठी बोली लावली जात असे. हल्ली गुरुजी चिठ्ठी काढतात, ज्याची चिठ्ठी निघेल त्याला हा मान दिला जातो. त्याच्या घरी वाजत-गाजत महारत्नदीप पोहोचविला जातो. देवी घरी आणल्यावर तिची यथासांग पूजा करतात व देवीच्या लाडूचा प्रसाद सर्व समाजातील घरी वाटतात. कोजागरीला रात्री ९ वाजता देवीचा गोंधळ व मध्यरात्री १२ वाजता दुग्धपान केले जाते. आश्विन कृ. द्वितीयेला ब्राह्मण भोजन व महाप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता होते.

दक्षिणमुखी श्री कालिका देवी मंदिर समस्त कन्सारा मंडळी, नवी तांबट लेन, नाशिक, चॅरिटी ट्रस्ट रजि. नंबर ए-३८ विश्वस्त मंडळ सन २०१७-१८ या नावाने येथील ट्रस्ट ओळखला जातो. सागर रमणभाई तांबट (अध्यक्ष), रोहित कन्सारा (उपाध्यक्ष), राकेश कन्सारा (सचिव), सदस्य- जीवन तांबट, अभिजित तांबट, निखिल तांबट, अमित तांबट, शीतल कन्सारा, नीलेश तांबट, सुयोग कन्सारा, दीपेश तांबट व अनिल तांबट (सभापती) याप्रमाणे पदाधिकारी आहेत.


पावागडची कालिका नाशिकला

श्री कालिका देवीचे हे मंदिर कन्सारा किंवा कासार समाजाचे आहे. मंदिरातील घंटेवरील तारखेनुसार मंदिराला १७७ वर्षे झाली आहेत. सहस्रार्जुनाचे वंशज असलेला हा समाज मूळ गुजरातमधील चंपानेर किंवा पावागड भागात राहणारा. पावागडची कालिकादेवी ही त्यांची कुलदेवता. पावगडवर महंमद बेगडा या मुस्लिम राजाने हल्ला केला, तेव्हा आपले गाव व परिसर सोडून कासार मंडळी गुजरात व महाराष्ट्रात स्थलांतरित झाली. यापैकी काही लोक नाशिकजवळच्या ओझर येथे स्थायिक झाले. त्यामुळे ओझरला तांबटाचे नाव पडले. कालांतराने ही मंडळी नाशिकला आली. नाशिकमध्येही या मंडळींनी आपला तांब्यापितळेची भांडी बनविण्याचा व्यवसाय भरभराटीस आणला. येथे आल्यावर तांबट मंडळींनी आपली कुलदेवता पावगडावरची कालिकादेवीही नाशिकला स्थापन केली. या देवीची नाशिकच्या नवीन व जुन्या तांबट आळीत, तसेच ओझर व मुंबई येथेही मंदिरे आहेत, अशी माहिती ईश्वरलाल तांबट यांनी दिली.

------

मालेगावातील देवीदर्शन...

देवीच्या विविध रुपांतील वास्तव्याने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पावन झाले आहे. नवरात्रीत तर या गावांतील मंदिरांना जत्रेचे रूप लाभते. लहान-मोठी, नवी-जुनी सारी मंदिरे भाविकांनी गजबजून जातात.

येथील अंबिकामातेची मूर्ती अठरा भुजांची असून, तिची उंची आठ ते नऊ फूट आहे. देवीचे मुख भव्य व प्रसन्न असून, तिच्या अठरा हातांत विविध शस्त्रे आहेत. ही देवी सिंहावर आरुढ झालेली असून, हातातील त्रिशुळाने तिने महिषासुराचा वध केलेला आहे. मालेगावातील संगमेश्वरात रामसेतूसमोरच अंबिकेचे मोठे मंदिर आहे. नवरात्रांत घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत विविधप्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येते. मंदिरासमोरील दगडी दीपमाळ त्रिपुरारी पौर्णिमेला शेकडो दिवे-पणत्यांनी प्रज्वलित करतात. देवीदासगिरी महेश्वरगिरी गोसावी हे या मंदिराचे मालक व वंशपरंपरागत पुजारी आहेत.

येथील राजेबहाद्दर यांची महालक्ष्मी देवीही प्रसिद्ध आहे. तिला कोंडवाड्यातील देवी म्हणतात. महालक्ष्मीचे मंदिर पूर्वी नदीकाठी होते. त्यावेळी गावातील मोकाट सोडलेली जनावरे येथील आवारात आणून बंद करीत म्हणून या देवीला कोंडवाड्यातील देवी असे नाव पडले असावे. दीड हात उंचीच्या पेढीवर देवी पश्चिमाभिमुख असून, सिंहावर बसलेली आहे. महालक्ष्मीची मूर्ती संगमरवरी पाषाणाची असून, अष्टभुजा आहे. देवीच्या बाजूला गणपती, सूर्यनारायण, विष्णू, शंकर व पार्वती यांचे पंचायतन आहे. दर वर्षी आश्विन महिन्यात मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मालेगावात वरील दोन मंदिरांशिवाय सुवर्णकारांची भद्रकाली, कॅम्पमधील श्रीसप्तशृंगीमाता, कासारांची कालिका आदी देवी मंदिरे प्रसिद्ध आहेत.


तळवाड्याची मनसादेवी

मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथे मनसापुरी नावाची देवी असून, दर वर्षी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते नवमी अशी तीन दिवस या देवीची यात्रा भरते. येथे गाव वेशीजवळच उंच ओट्यावर अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी मनसापुरी देवीचे मंदिर आहे. ही देवी मनातील इच्छा (मनसा) पूर्ण करणारी आहे म्हणून तिला मनसापुरी नाव पडले आहे. देवीचे पुजारी उपासनी आहेत. देवीची प्राणप्रतिष्ठा ना. दा. व लक्ष्मीताई उपासनी यांनी केलेली आहे. नवरात्रोत्सवात अष्टमीला दुपारी बारा वाजता नवीन ध्वज चढवितात. दुपारी पिलकी नदीच्या पात्रात कुस्त्यांची दंगल होते. विजयी पहिलवानास वाजतगाजत देवी मंदिराजवळ आणून देवीस वंदन करून हा कार्यक्रम समाप्त होतो. अष्टमीच्या दिवशी देवीपुढे होमहवन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील यात्राकाळात सप्तमीच्या सायंकाळी गावभर तगदरावांची मिरवणूक काढली जाते, हे येथील वैशिष्ट्य समजले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images