Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महापेडिक्रिटीकॉन परिषद आजपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सद्वारा महापेडिक्रिटीकॉन ही राज्यस्तरीय परिषद २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान पाथर्डी फाटा येथील एक्सप्रेस इन येथे होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बाफना व परिषदेचे अध्यक्ष डॉ. केदार मालवतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेली महापेडिक्रिटीकॉन ही संस्थेची तिसरी परिषद आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पाचशेहून अधिक बालरोगतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील नामवंत वक्ते डॉ. सुचित्रा रंजित, डॉ. धीरेन गुप्ता, डॉ. मनिंदरसिंह धालीवाल, मुंबईचे डॉ. सोनू उदानी व डॉ. उमा अली येणार असून त्यांचे मार्गदर्शन बालरोगतज्ज्ञांना लाभणार आहे. परिषदेदरम्यान माहितीपर कार्यशाळा तसेच तज्ज्ञांच्या शोधनिबंधांचेही वाचन करण्यात येणार आहे. बालकांच्या गंभीर, अतिदक्षता उपचारासाठी या परिषदेत बरीच उपयुक्त माहिती मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. बालकांच्या अतिदक्षता उपचारांशी निगडित नवनवीन उपचारपद्धती व तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानासाठी महत्त्वाच्या असलेल्या महापेडिक्रिटीकॉन या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पॉवर ग्रीडप्रश्नी शेतकरी एकवटले

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ल‌मििटेडच्याच्या ४०० के. व्ही. डबल सर्किट औरंगाबाद बोईसर या लाइनची उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. या लाइनमधून केव्हाही विद्युत प्रवाह सोडण्यात येणार असल्यामुळे संबंधित गावातील शेतकरी खडबडून जागे झाले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि आश्वासन पूर्ण न करता हा प्रकल्प सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पिंपळगाव येथे बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

संबंधित गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून टॉवर उभे आहेत व लाइन गेली आहे. त्यांनी याबाबत नागरिकांनी दक्ष राहावे, अशी जाहीर सूचना पावर ग्रीडकडून प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केल्यानंतर ते शेतकरी खडबडून जागे झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण न करता हा प्रकल्प सुरू होत असल्याने शेतकरी संतापले आहेत. कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीवर टॉवर उभारताना जे आश्वासन दिले त्याचा पुनरूच्चार केला असून ते पूर्ण करावे, असा बैठकीत ठराव केला.

बुधवारी ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतरच या शेतकऱ्यांना पावर ग्रीडच्या लाइन सुरू होणार असल्याचे समजले. निफाड तालुक्यातील शेतकरी या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असून, याबाबत पिंपळगाव येथे शेतकऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत देवेंद्र काजळें यांनी मार्गदर्शन केले. संतोष जगन पुरकर, संजय निफाडे, दत्तात्रय खैरे, नीलेश कतोरे, प्रशांत दवंगे, साहेबराव दवंगे, पुंडलिक दवंगे, बाळासाहेब दवंगे उपस्थित होते.

या गावातून जाणार पॉवर ग्रीड

पॉवर ग्रीडची लाइन व टॉवर निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द, मऱ्हाळगाव खुर्द, पाचोरे बुद्रुक, निमगाव वाकडा, विंचुर, लासलगाव, कोटमगाव नजीक, थेटाळे, खाणगावनजीक, वनसगाव, कुंभारी.

या आहेत मागण्या

अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेगळा मोबदला दिला जावा, या गावांमध्ये जास्तीत जास्त मुल्यांकन असलेला दुय्यम निबंधक कडील नोंदविलेला दस्तानुसार मुल्याकन व्हावे, लाइन खालील व जवळील घरे विहीर, शेततळे,फ ळझाडे, झाडे यांचे मुल्यांकन आजच्या दराने करावे, लाईन चालू झाल्यापासून भविष्यात होणारी जीवित व वित्त हाणी याची जबाबदारी कंपनीने घ्यावी, प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या आमिषाने दोन महिलांना फसविले

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
शैक्षणिक व गृह कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांची तब्बल सहा लाखांना फसवणूक झाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वसंत धोंडीराम कोल्हे (४८, रा. सह्याद्री कॉलनी, नाशिकरोड) यांनी १३ जुलै २०१६ ते आजपर्यंत सुमन विलास निंबाळकर आणि मंदाकिनी उल्हास भोईर (दोघीही रा. नाशिकरोड) यांना कर्जाचे अमिष दाखवून फसवल्याचा आरोप आहे. कोल्हे यांनी निंबाळकर यांना घरासाठी कर्ज मंजूर करून देतो, असे खोटे आश्‍वासन देऊन त्यांच्याकडून ४ लाख तर भोईर यांना शैक्षणिक कर्जाचे आमिष दाखवून दोन लाख रुपये घेतले. ही रक्कम मिळाल्यानंतर दोघींनाही कर्ज मंजूर करून दिले नाही. काही दिवसांनी त्यांनी कर्ज मंजूर करा किंवा पैसे परत द्या असा तगादा लावला. तथापी, कोल्हेंनी रक्कम देण्याएवजी निंबाळकर यांना बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली तर भोईर यांना तुमच्या मुलीच्या तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली. दोघींनी उपनगर पोलिस ठाण्यात जाऊन कोल्हेंविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कोठडीनंतर पुन्हा अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते गजानन शेलार यांना जिल्हा कोर्टाने गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, सेंट्रल जेलमध्ये जाण्यापूर्वीच सरकारवाडा पोलिसांनी शेलारांना ताब्यात घेतले. त्यांना शुक्रवारी (दि. २२) कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एका गुन्हात जामीन मंजूर झाल्यावर लगेचच दुसऱ्या पोलिस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यात शेलार यांना अटक झाली.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडे हनुमान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच नगरसेवक शेलार यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात जिल्हा कोर्टासह हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने शेलार बुधवारी (दि. २०) भद्रकाली पोलिस स्टेशनला हजर झाले. त्यांना गुरूवारी कोर्टासमोर उभे करण्यात आले. शेलारांना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाकडून करण्यात आली. तर, बचाव पक्षातर्फे अॅड. राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडताना हा गुन्हा जामीनपात्र असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, कोर्टाने सरकारी पक्षाची मागणी फेटाळून लावत शेलारांची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्याचे आदेश दिले. दरम्यान, शेलारांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल असल्याने पोलिसांनी शेलारांना ताब्यात देण्याबाबत अर्ज केला. त्या अर्जावर सुनावणी घेत कोर्टाने शेलारांना सेंट्रल जेलमधून ताब्यात घेण्याचे आदेश दिले. मात्र, बचाव पक्षातर्फे अॅड. कासलीवाल यांनी पुन्हा बाजू मांडली. शेलारांना ताब्यात घ्यायचे असल्यास येथूनच घ्यावे. त्यांना सेंट्रल जेलमध्ये नेण्याची गरज नाही, असा मुद्दा मांडला. कोर्टाने हा मुद्दा मान्य करीत सरकारवाडा पोलिसांना पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. पोलिसांनी शेलारांना ताब्यात घेऊन त्यांची मेडिकल टेस्ट केली. आता, शेलारांना शुक्रवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.

पोलिसांकडून दणका
ध्वनी प्रदूषण कायदा जामीनपात्र आहे. मात्र, गणेशोत्सवात सोशल मीडियासह इतर ठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला आणि पर्यायाने हायकोर्टालाही उघड आव्हान दिले. त्यामुळे पोलिसांनी शेलारांना चांगलेच दमविले. आता खटल्यात जामीन मिळवण्यासाठी शेलारांचे प्रयत्न सुरू असून, त्यांची सेंट्रल जेलची वारी चुकणार काय, हे शुक्रवारीच स्पष्ट होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजात हाजीर तोच वजीर

0
0

म. टा. प्रतिनधी, नाशिक

नव्याने आलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामुळे आता थेट विद्यापीठ स्तरावर संघटनेचे नेतृत्व पाठविण्यासाठी विविध राजकीय पक्ष प्रेरीत विद्यार्थी संघटनांनी दंड थोपटले आहेत. मात्र, या कायद्यातील तरतूदींनुसार जे विद्यार्थी पूर्ण वेळ कॉलेजमध्ये तासिकांना हजर असतात त्यांनाच या निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे संघटनांद्वारे गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सिनेटची निवडणूक ८ ऑक्टोबरला पार पडत आहे. या निवडणुकीद्वारे विद्यार्थ्यांना विविध परिषदांवर विद्यापीठात प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे. या निवडणुकीसाठी आता शहरातील विद्यार्थी संघटनाही कार्यरत झाल्या आहेत. विद्यापीठ विभाग, विद्यापीठ संघ, कॉलेज विद्यार्थी परिषद आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषद या स्तरांवर विद्यार्थ्यांना निवडणुकीद्वारे प्रतिनिधित्वाची संधी यंदापासून मिळणार आहे. विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या या परिषदांना राजकीय चळवळींमध्ये सहभागी होता येणार नाही.

जे विद्यार्थी पूर्ण वेळ कॉलेजमध्ये तासिकांना हजर असतात त्यांनाच या निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. यामुळे कॅम्पसमध्या निशाण फडकावून स्वयंघोषित नेतृत्व करू इच्छ‌िणाऱ्यांचा पत्ता आपोआप कट होणार आहे. जो विद्यार्थी निवडणूक लढविणार आहे त्याचे नाव हजेरीपटावर असणे आवश्यक आहे. त्यामुळे बाह्य घुसखोरीला कायदाच आपोआप पायबंद घालणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या अखेरच्या दिवसापर्यंत शैक्षणिक परिषद कार्यरत असेल.

विद्यार्थी परिषदांच्या बैठकीत एक तृतीयांश सदस्य आवश्यक असणार आहेत. परिषदेची बैठक तीन महिन्यांतून एकदा होणे गरजेचे आहे.

अशी असेल कॉलेज विद्यार्थी परिषद

कॉलेज विद्यार्थी परिषदेच्या रचनेत कॉलेज प्रतिनिधी, सचिव आणि इतर सदस्यांचा समावेश

पूर्ण वेळ विद्यार्थीच निवडणुकीत सहभागी होतील

पार्ट टाइम अभ्यासक्रमचा विद्यार्थ्याला सहभाग नाही.

पूर्णवेळ विद्यार्थीच मतदान करू शकतील

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक महिला सदस्य निवडता येणार

अनुसूचित जाती-जमाती/ भटक्या जमाती/ इतर मागासवर्ग यांच्यामधूनदेखील सदस्य निवडला जाणार

विद्यापीठातर्फे कॉलेजसाठी स्वतंत्रपणे आरक्षणाची सोडत करण्यात येणार

प्राचार्यांना राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येकी एक सदस्य परिषदेसाठी निवडता येणार

विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गातून एक सदस्य निवडता येणार

विद्यार्थी परिषदेचे समन्वयक म्हणून वरिष्ठ अध्यापक, शिक्षण विभागाचे संचालक आदी काम पाहणार

राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी हे परिषदेचे कायमस्वरूपी निमंत्रित सदस्य असतील.


विद्यापीठस्तरीय परिषदांची रचना

विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेही अशाच प्रकारे कार्यरत राहील. यात विद्यापीठातील प्रत्येक विभागातून एक सदस्य परिषदेचा सदस्य होईल. विद्यार्थी विभागाचे संचालक पदसिद्ध सदस्य असतील. विद्यापीठ संघात कॉलेज विद्यार्थी परिषद आणि विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष आणि सचिव, महिला प्रतिनिधी आणि इतर राखीव प्रवर्गातील सदस्यांचा समावेश असेल. सर्वांत महत्त्वाच्या विद्यापीठ परिषदेत विद्यापीठ संघातून निवडून दिलेले अध्यक्ष, सचिव, एक महिला प्रतिनिधी, मागासवर्गीय प्रवर्गातील एक प्रतिनिधी; तसेच राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा आणि सांस्कृतिक आदी उपक्रमांत सहभागी झालेल्यांमधून प्रत्येकी एक सदस्य असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेस ठार मारण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
निफाड तालुक्यातील सुंदरपूर येथील प्रियंका दीपक सोमवंशी या नवविवाहितेला नऊ सप्टेंबर रोजी रात्री बळजबरीने विष पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद तिच्या माहेरच्या मंडळींनी दिली आहे. प्रियंकाला मारण्याचा प्रयत्न झाला त्या दिवशी तिचा वाढदिवस होता.
‌विवाहितेच्या माहेरच्या मंडळींच्या फिर्यादीवरून निफाड पोलिस स्टेशनमध्ये प्रियंकाचा पती दीपक, सासरे नानासाहेब सोमवंशी, सासू आशा सोमवंशी आणि दीर अमोल सोमवंशी यांच्याविरूद्ध दहा दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटल्यानुसार प्रियंकाचा सुंदरपूर येथील दीपक सोमवंशी यांच्याशी वर्षभरपूर्वीच विवाह झाला होता. दीपक हा वसई येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. लग्नानंतर सासरच्या लोकांकडून छळ सुरू झाला. प्रियंकाला नऊ सप्टेंबर रोजी सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली आणि विष पाजून तिला मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर अत्यवस्थ असताना तिला निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत नाशिकला राहणारे तिचे आई, वडील, भाऊ हे निफाडला आले. त्यांनी उपचारासाठी प्रियंकाला नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तिच्यावर उपचार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किशोर पाठक यांना साहित्य साधना पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कादवा प्रतिष्ठानचा स्व. एकनाथराव माधवराव देशमुख स्मृती राज्यस्तरीय साहित्य साधना पुरस्कार नाशिकचे प्रसिद्ध कवी किशोर पाठक यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम पाच हजार शंभर रुपये, सन्मानचिन्ह मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कविवर्य किशोर पाठक यांचे पालव, आभाळाचा अनुस्वार, संभवा, शुभ्र कोवळे आभाळ गाणे इ. काव्यसंग्रह, मनस्पर्शाच्या गहनतळी (कादंबरी), पाण्यातला दिवा, अलगुज (ललित) काळोखाच्या वर, प्रकाशाच्या खाली, अंत:स्वर (नाटक) रिंग रिंग रिंगण, भिंगर भिंगरी, झुंबड आली झुंबड (बालकविता) इ. ग्रंथसंपदा प्रकशित आहे. नाशिकच्या सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. शासकीय कर्मचारयाच्या वाचनालयाचे मार्गदर्शक, संवादचे माजी अध्यक्ष, सावानाचे उपाध्यक्ष, लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त तसेच नाशिक येथे झालेल्या ७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्यवाह म्हणून यशस्वी नियोजन केले. या त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कादवा प्रतिष्ठानच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात कादवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष कल्याणराव आवटे व माधवराव जाधव यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मुद्रांक वसुलीत घट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्याच्या मुद्रांक शुल्कात गेल्या आर्थिक वर्षात १३३ कोटी २३ लाखाची घट झाल्यानंतर या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्याचे आकडे समोर आले आहे. त्यात वाढ झाली असली तरी तिचे प्रमाण अल्प आहे. यावेळेस टार्गेटही कमी दिल्यामुळे टक्केवारी वाढलेली दिसते.
२०१६- १७ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या काळात ४७ हजार ४५१ दस्त नोंदवले गेले. त्यात २२६ कोटी ९० लाख रुपये उत्पन्न मुद्रांक विभागाला मिळाले. मात्र, चालू आर्थिक वर्षात ४२ हजार ४१० दस्त नोंदले गेले असून त्याद्वारे २२७ कोटी ७८ लाख रुपये उत्पन्न मिळाले. टार्गेटमुळे या दोन वर्षांची टक्केवारी वाढल्याचे दिसत असले तरी आकडेवारीमधील ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत ८८ लाख इतकीच जादा आहे.
यावर्षी मुद्रांक शुल्कचे टार्गेट १६२ कोटीने कमी दिले आहे. त्यामुळे मुद्रांक विभागाला दिलासा मिळाला असला तरी उर्वरित सात महिन्यांमध्ये ४०५ कोटी रुपये त्यांना शुल्क गोळा करावे लागणार आहे. नोटबंदीनंतर बाजारपेठेत थोडा सुधार असला तरी ‘रेरा’ आणि ‘जीएसटी’मुळे रिअल इस्टेट बाजाराची उलाढाल मंदावली आहे. त्यामुळे मुद्रांकलाही त्याचा फटका बसणार आहे. मुद्रांक शुल्कमधील ७५ टक्के उत्पन्न हे रिअल इस्टेटचे असते. मालमत्ता खरेदी करताना मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. गेल्या काही वर्षात या व्यवहारांचे प्रमाण घटले आहे. शहरात कपाट, टीडीआर बंदीमुळे सुद्धा बांधकाम क्षेत्रात मंदी आहे. त्यात नोटाबंदीचा मोठा दणक्यातून अजून काही जण सावरले नाही.

नोटबंदीचा फटका
गेल्या आर्थिक वर्ष २०१६-१७ मधील एप्रिल ते मार्चमधील घट चिंतेचा विषय ठरली होती. या बारा महिन्यात अपेक्षित वसुली झालेली नव्हती. या वर्षात सर्वाधिक फटका हा नोटबंदी काळात बसला. या काळात ही वसुली सर्वात कमी झाली. नोटबंदीआधी ऑक्टोबर महिन्यात ८ हजार ६१८ दस्त नोंदवले गेले. त्यातून मुद्रांक शुल्कापोटी ६० कोटी ४३ लाख ७३ हजार ५३० रुपये सरकारला मिळाले. पण नोटबंदीनंतर नोव्हेंबरमध्ये हाच आकडा ५ हजार ६९५ इतका होता. त्यातून ३५ कोटी ५१ लाख ८२ हजार ७४६ रुपये मिळाले होते. या एकाच महिन्यात २५ कोटींचा फटका बसला होता. यावर्षी त्यातून किती वाढ होते हे महत्त्वाचे आहे.

याद्वारे मिळते मुद्रांक शुल्क
मुद्रांक शुल्क हे मानवी अभिहस्तांतरण, भेटनामा, गहाणखत, अदलाबदली करार, वाटणीपत्र, मुखत्यारपत्र, भाडेकरारपत्र, कुळवहिवाट, भाडेपट्टीपत्रातूनही मिळते. पण सर्वाधिक उत्पन्न हे रिअल इस्टेटमधून असते. त्यामुळे याचा फटका मुद्रांकला बसतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एटीएम कार्ड बदलून फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची आदलाबदल करून भामट्यांनी दोघांना लाखोंचा गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी आडगाव आणि सातपूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडगाव शिवारातील जत्रा हॉटेल परिसरात राहणारे अशोक काशिनाथ पोटे (५२, रा. प्राकृती पार्क रो हाऊस) हे मंगळवारी (दि. १९) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आडगाव शाखा परिसरातील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या तरुणाने त्यांना मदत करण्याचा बहाणा करून एटीएम कार्डची आदलाबदल केली. ही बाब पैसे काढून घरी परतल्यानंतर लक्षात आली. कार्डवर सूरज प्रकाश असे नाव असल्याने पोटे यांनी पुन्हा एटीएमकडे चक्कर मारला. मात्र, तोपर्यंत त्यांच्या खात्यातील १ लाख ४४ हजार ५०० रुपयांची रोकड भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने दुसऱ्या खात्यात वर्ग केली. अधिक तपास उपनिरीक्षक योगिता जाधव करीत आहे.
दुसरी घटना गत महिन्यात सातपूर एमआयडीसीत घडली. श्रमिकनगर येथील समाधान बाबाजी पानसरे हे २८ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पैसे काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशोकनगर भागातील एटीएमवर गेले. तेथे पिनकोड नंबर जनरेट होत नसल्याने त्यांनी एकाची मदत घेतली. त्याने एटीएमची आदलाबदल करीत तसेच पासवर्ड लक्षात ठेवून पानसरे यांच्या बँक खात्यातील ३५ हजार रुपयांची रोकड परस्पर काढून घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक अवतारे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमराणे येथील तरुणाची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उच्चशिक्षण घेत असलोल्या उमराणे (ता. मालेगाव) येथील २६ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना भाभानगर परिसरात घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली.
राहुल भाऊसाहेब मोरे (हल्ली रा. पुष्पराज सोसा. नाशिक हॉस्पिटलजवळ, भाभानगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. राहुल उच्चशिक्षित असून तो स्पर्धा परीक्षांच्या सरावासाठी भाभानगर येथील पुष्पराज सोसायटीत कॉट सिस्टीमने भाडे तत्वावर राहत होता. त्याने बुधवारी (२०) सकाळी कारणातून आपल्या रूममधील पंख्यास गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच अन्य विद्यार्थ्यांनी त्यास तात्काळ नजिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार युनुस शेख करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शारदानगरला वृद्धेचा गळफास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गंगापूररोडवरील शारदानगर भागात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेने बाथरूममधील शॉवरच्या पाइपाला गळफास लावून आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ताराबाई भगवान गडाख (६०, रा. श्री बंगला, शारदानगर) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. ताराबाई यांनी बुधवारी (दि. २०) सकाळी आपल्या घरात गळफास घेतला. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मा‌त्र, आजारपणास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. अधिक तपास हवालदार गोवर्धन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकास मारणाऱ्या दोघांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जुन्या मैत्रिणीशी बोलल्यावरून कुरापत काढून अल्पवयीन युवकास बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने जखमी करणाऱ्या सिडकोतील दोघा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. त्यात एका अल्पवयीन युवकाचा समावेश असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश जगताप (रा. केवलपार्क, अंबड) असे संशयिताचे नाव असून त्याच्या अल्पवयीन साथीदारासही पोलिसांनी ताब्यात घेतले. किरण गोरख पवार (१७, रा. मयूर अपा., अतुल डेअरीजवळ) हा युवक मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उत्तमनगर बसस्थानक परिसरात थांबलेला असताना ही घटना घडली. जगतापने हातावर धारदार शस्त्राने वार केल्याने किरण जखमी झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुनिता निमसे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोडला सोनसाखळी खेचली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पादचारी व्यक्तीने खेचून पळ काढल्याची घटना कॉलेजरोडवरील येवलेकरमळा भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमलता सुमतीलाल संघवी (६६, रा. आनंदवन कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. संघवी या शनिवारी (दि. १६) सकाळी शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. आनंदवन कॉलनीत फेरफटका मारून त्या घराकडे परतत असताना ही घटना घडली. गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या ऑफिससमोरून जात असताना समोरून येणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपयांची सोनसाखळी तोडून पळ काढला. त्यानंतर पुढे थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून तो फरार झाला. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिडके कॉलनीत घरफोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
तिडके कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने, विदेशी मनगटी घड्याळाचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी प्रकाश कन्हैय्यालाल माहेश्वरी (रा. ड्रीम ग्रॅन्युर, मातेश्रीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. माहेश्वरी कुटुंबीय १५ ते २० सप्टेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे लॉक तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, भांडे, रोकड आणि मनगटी घड्याळ असा सुमारे २ लाख ६ हजारांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केतन राठोड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेळावा समिती सदस्यांची नावे न विचारताच पत्रिकेत!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाचा जिल्हा साहित्यिक मेळावा यंदा पन्नाशी गाठत आहे. परंतु, नव्या कार्यकारिणीबाबत विश्वासार्हता अद्यापही येऊ शकलेली नसल्याचे चित्र आहे. साहित्यिक मेळाव्याच्या पत्रिकेत छापलेल्या मेळावा समिती सदस्यांच्या यादीमधील अनेकांना आपले नाव पत्रिकेत छापले आहे, याची गंधवार्ताच नसल्याचे समोर आले आहे.

सार्वजनिक वाचनालय दर वर्षी जो साहित्यिक मेळावा घेते त्यात शहरातील काही मान्यवर साहित्यिकांची एक समिती नेमली जाते. त्यांच्या सलग तीन-चार महिने सातत्याने बैठका होऊन कार्यक्रम ठरविले जातात. यंदाच्या मेळाव्यात मात्र मेळावा समिती सदस्य म्हणून आपल्याला घ्यावे का, हे विचारण्याचे सौजन्यही सावाना कार्यकारिणीने बाळगले नाही, अशी चर्चा आहे.

सततच्या नवनव्या राजकारणाने जिल्हा साहित्यिक मेळाव्यातही प्रवेश केला असून, नाशकातील सगळे मान्यवर साहित्यिक आपल्या बाजूने आहेत आणि आपण करीत प्रत्येक कामात ते आपल्याबरोबर आहेत हे दर्शविण्यासाठी जवळ जवळ तीसहून अधिक साहित्यिक आणि ज्यांचा साहित्य क्षेत्राशी काहीही संबंध नाही असे प्राचार्य, वरिष्ठ, आप्तेष्ट, प्राध्यापक बांधव आदींची नावे पत्रिकेत घुसविण्यात आली आहेत.

ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक मेळाव्याचे माजी अध्यक्ष दत्ता सराफ, बाळासाहेब सराफ, आनंद ढाकीफळे, प्रवीण काळोखे, अनंत येवलेकर, वृंदा भार्गवे, अपर्णा वेलणकर अशा अनेक मान्यवरांची नावे त्यांना न विचारातच पत्रिकेत टाकण्यात आलेली आहेत, असे समजते. शहरातील या सगळ्या मान्यवरांची नावे त्यांना न विचारताच पत्रिकेत टाकून संबंधितांनी ‘हम करेसो कायदा’ या वृत्तीचा प्रत्ययच पुन्हा एकदा दिला की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांडव्यावरची देवी साक्षात सप्तशृंगनिवासिनी

0
0

विजय गोळेसर

--

देवीच्या साडेतीन पीठांतले महत्त्वाचे ‘सप्तशृंगनिवासिनी’चे अर्धेपीठ नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगनिवासिनीच्या मंदिरांची आणि भक्तांची संख्या खूपच वाढली. जिल्ह्यातील अनेक गावांत सप्तशृंगनिवासिनी देवीची मंदिरं स्थापन झालेली दिसून येतात. एकट्या नाशिक शहरात सप्तशृंगनिवसिनीची पन्नासपेक्षा जास्त मंदिरे आहेत. परंतु, त्या सर्व मंदिरांत पंचवटीतील गोदावरीच्या काठावरील ‘सांडव्यावरची देवी’ किंवा ‘राजेबहाद्दरांची देवी’ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.

--

गोदावरीच्या पात्रात नारोशंकराच्या मंदिराला लागूनच सांडव्यावरच्या देवीचे मंदिर आहे. थेट गोदापात्रातच हे मंदिर असल्यामुळे गोदावरीच्या पुरात मंदिर दर वर्षी न्हाऊन निघते. आतादेखील गोदावरीला पाणी सोडल्यामुळे देवीच्या मंदिराच्या दोन पायऱ्या पाण्यात बुडालेल्या आहेत. मागच्या वर्षी तर नवरात्री सुरू होण्याला आठ दिवस राहिले असतानाच गोदावरीला महापूर आला होता. देवी मंदिराशेजारच्या नारोशंकराच्या घंटेला त्यावेळी पुराचे पाणी लागले होते. देवी मंदिर तर पूर्णपणे पुरात बुडून गेले होते. त्यावेळी मंदिर काही वाचत नाही असेच सर्वांना वाटत होते. परंतु, मंदिराचा पुढचा सभामंडप, फरशा आणि दीपमाळ पुरात वाहून गेले. देवी आणि तिचा गाभारा मात्र जसेच्या तसे सुखरूप राहिले. त्यानंतर मोठ्या घाईने नवरात्रीची तयारी करावी लागली. त्यावर्षीच चंद्रकांत राजेबहाद्दर यांनी नवीन दीपमाळ बनवून घेतली. दगडी दीपमाळ हेदेखील सांडव्याच्या देवीचे वैशिष्ट्य समजले जाते. दर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला ही दीपमाळ दिवे लावून प्रज्वलित केली जाते. रात्रीच्या वेळी अनेक दिव्यांनी प्रकाशमान झालेली दीपमाळ गोदाकाठावरील सर्वांचे लक्ष वेधून घेते.

--

अठरा हातांची भव्य मूर्ती

सांडव्यावरची देवी ही साक्षात गडावरची सप्तशृंग निवासिनीच आहे. त्यामुळे येथील देवीची मूर्ती हुबेहूब सप्तशृंगगडावरील देवीसारखीच आहे. मूर्ती अतिशय भव्य आहे. मुख्य म्हणजे गडावरच्या देवीप्रमाणेच याही देवीला अठरा हात आहेत. देवीच्या या अठरा हातांत मणिमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू या वस्तू आहेत. देवीने डाव्या बाजूला एक हात कानावर टेकलेला असून, जणू काही देवी भक्तजनांची गाऱ्हाणी एकत आहे असे वाटते.

गोदावरीच्या पत्रात हल्ली अनेक पूल तयार झालेले आहेत. पूर्वी मात्र एवढे पूल नव्हते. ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आहे तेथे पूर्वी पाण्याचा एक सांडवा किंवा कॉजवे होता. या सांडव्यावरून गोदावरीचे पाणी वाहू लागले की जाणे-येणे बंद होत असे. इतर वेळी ये-जा करण्यासाठी लोक या सांडव्याचा उपयोग करीत असत. देवी मंदिराच्या जवळच हा सांडवा असल्यामुळे या देवीला ‘सांडव्यावरची देवी’ असे नाव पडले.

--

अशी आहे आख्यायिका

सप्तशृंगगडावरची देवी थेट नाशिकला (गोदावरीत) कशी आली याचीही एक आख्यायिका सांगितली जाते. हल्लीच्या राजेबहाद्दर यांचे पूर्वज नारोशंकर राजेबहाद्दर हे सप्तशृंगनिवासिनी देवीचे निस्सिम भक्त. दर पौर्णिमेला ते घोड्यावरून गडावर देवीच्या दर्शनाला जात असत. पुढे वयोमानानुसार त्यांना दर पौर्णिमेला गडावर जाणे कठीण वाटू लागले. आपल्याला आता देवीचे दर्शन नियमितपणे घेता येणार नाही याची त्यांना खंत वाटू लागली, तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली. देवीसाठी अनुष्ठान केले. त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला, ‘ठीक आहे. मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन. मात्र, माझी एक अट आहे. तू मागे वळून पाहू नकोस. जर तू मागे वळून पहिले, तर मी आहे त्याच ठिकाणी थांबेन.’ नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली. ते पुढे आणि त्यांच्या मागे देवी निघाले. गडापासून पंचवटीत येईपर्यंत नारोशंकरांनी मागे वळून पहिले नाही. मात्र, पंचवटीत येताच त्यांच्या मनात शंका आली. देवीने आपल्याला फसविले तर नाही? त्यामुळे त्यांनी मागे वळून पहिले. साक्षात सप्तशृंगनिवासिनी त्यांच्या समोर उभी होती. ती म्हणाली, ‘मुला, तुझ्या मनांत शंका आली. आता मी येथेच थांबते.’ आणि ती तिथेच अदृश्य झाली. देवी ज्या ठिकाणी गुप्त झाली त्याच जागेवर नारोशंकर राजेबहाद्दरांनी मंदिर बांधले, तेच हे सप्तशृंगनिवसिनीचे सांडव्यावरील देवी मंदिर. सुमारे २५० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आज नारोशंकरांची दहावी पिढी सांडव्यावरील देवीची नित्यनियमाने पूजा करते. तिचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो.

--

नारोशंकर राजेबहाद्दर यांचे दहाव्या पिढीतील वंशज

१. सदाशिव त्र्यंबक राजेबहाद्दर

२. चंद्रकांत त्र्यंबक राजेबहाद्दर

३. निशिकांत त्र्यंबक राजेबहाद्दर

४. मधुसूदन त्र्यंबक राजेबहाद्दर

देवीचे वार्षिक उत्सव आणि देखभाल वर्षभरासाठी एकेका भावाकडे आळीपाळीने दिले जातात. यावर्षी देवीचा नवरात्रोत्सव निशिकांत त्र्यंबक राजेबहाद्दर यांच्याकडे आहे.

--

देवीचे वैविध्यपूर्ण दागिने

देवीला सोन्या-चांदीचे वैविध्यपूर्ण दागिने आहेत. भाविक देवीला काहीना काही अर्पण करीतच असतात. देवीला २/३ चांदीचे मुकुट आहेत, सोन्याची नथ, कानात घालावयाची माशाच्या आकाराची कर्णफुले, पायात चांदीचे तोडे, गळ्यात सोन्याचा हार, चांदीच्या बांगड्या, बिंदी, कमरपट्टा इत्यादी दागिने आहेत. चांदीचे दागिने सोन्याचं प्लेटिंग केलेले आहेत.

--

साड्या देणार आदिवासी पाड्यांवर

देवी मंदिराशेजारी नारोशंकराचे मंदिर आहे. या मंदिरावरील मोठी घंटा हे नाशिकचे भूषण आहे. महापालिकेच्या लोगोमध्येसुद्धा या घंटेचा समावेश केलेला आहे. इसवी सन १७२१ मध्ये ही घंटा दोन हत्तींवरून नाशिकला आणली गेली होती. २०२१ मध्ये या घंटेचा तीनशेवा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. नारोशंकर मंदिरात मागच्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला ११ हजार पणत्या लावण्यात आल्या होत्या. यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला २१ हजार पणत्या लावण्याचा मानस आहे. देवीला दान म्हणून येणाऱ्या साड्या आदिवासी पाड्यांवर जाऊन गरीब व गरजू महिलांना वाटण्यात येणार असल्याचा मनोदय निशिकांत राजेबहाद्दर यांनी व्यक्त केला.

--

निर्माल्याची योग्य विल्हेवाट

देवीला दररोज हार, फुले, तसेच नारळ फोडणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. नवरात्रात तर हार-फुलांचे ढीगच्या ढीग जमा होतात. या निर्माल्याची विल्हेवाट लावणे हे मोठेच काम असते. या मंदिरांत निर्माल्य दररोज जमा करून एक तर घंटागाडीत टाकले जाते किंवा राजेबहाद्दरांच्या शेतात टाकले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रींच्या मंदिर परिक्रमेने ब्रह्मोत्सवास प्रारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री व्यंकटेश बालाजी मंदिर, कापडपेठ येथे पुण्याहवाचन करून ब्रह्मोत्सवास सुरुवात झाली. सकाळी भूपाळी आरती होऊन अॅड. हर्षवर्धन व ऐश्वर्या बालाजीवाले यांनी पुण्याहवाचन बसवले. त्यानंतर श्रींची रथातून मंदिर परिक्रमा होऊन श्रींची स्वारी सिंह वाहनावर आरूढ झाली.

सायंकाळी ६ वाजता सुदर्शन दिग्विजय रथ मिरवणुकीला सुरुवात होऊन पारंपरिक मार्गाने सवाद्य मिरवणूक निघाली. रथयात्रेत महंत डॉ. रमेश बालाजीवाले हे देवासमोर चालत होते, तर रथ मिरवणुकीचे संचालन अॅड. हर्षवर्धन बालाजीवाले यांनी केले. पारंपरिक लाकडी रथ हाताने ओढत राजेश नाशिककर, गोसावी बंधू, विक्रम बालाजीवाले, डी. पी. कुलकर्णी, पीयूष देसाई, शिवराम मूर्ती व आदींनी रथ ओढण्यास मदत केली.

ठिकठिकाणी रथाचे शहरातील विविध मंडळांकडून स्वागत करण्यात आले. सोमवारपेठेत पोळ गुरुजींच्या घरी रथ नमस्कारास थांबला. पुढे भद्रकालीचे दर्शन घेऊन टेकावरून पार्श्वनाथ गल्लीतून हुंडीवाला लेन मार्गे सरकारवाड्यापासून कापडपेठेत परत मंदिरात आला. नगरसेवक शाहू खैरे, नगरसेविका वत्सला खैरे, पैठणकर व रोकडोबा मंडळाचे सदस्य रथ मिरवणुकीत सहभागी झाले. मंदिरात परतल्यावर रथाची विधिवत पूजा होऊन सुदर्शन दिग्विजय चक्र मंदिरात आसनाधीन करण्यात आले.

रविवारी भरतनाट्यम

रविवारी (दि. २४) मंदिरामध्ये श्रींची मंदिर परिक्रमा होऊन अश्व वाहनावर श्रींची स्वारी आरूढ होईल. सायंकाळी ८.३० वाजता श्री बालाजी संगीत सेवेतर्फे भरतनाट्यम हा कार्यक्रम सादर होणार असून, डॉ. श्रीमती संध्या पुरेचा, मुंबई यांच्या शिष्या भरतनाट्यम सादर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषितांना ‘कांगारू मदर केअर’ची ऊब

0
0

पंकज काकुळीद, धुळे

आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबारमधून कुपोषणाची समस्या उखडून काढण्यासाठी ‘कांगारू मदर केअर’ या उपक्रमाला लक्षण‌ीय यश मिळाले आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील कमी वजनाचे बाळांचे जन्माचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. ‘कांगारू मदर केअर’च्या प्रयत्नांमुळे येत्या काळात नंदूरबार जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाच्या वाढत्या समस्यामुळे गेल्या काही वर्षांत शेकडो बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटना, टाटा ट्रस्ट व युनिसेफकडून ‘कांगारू मदर केअर’(KMC) हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जन्मतः कमी वजानाच्या बालकांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यात ‘कांगारू मदर केअर’ला यश आले आहे.

‘कांगारू मदर केअर’बाबत माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या प्रतिनिधीने याबाबत सविस्तर आढावा घेतला. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कमी वजनाचे बालक जन्माला येत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे युन‌िसेफच्या माध्यमातून अशा बालकांची प्रकृती सुधारण्यासाठी ‘कांगारु मदर केअर’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. त्याद्वारे जिल्ह्यातील गाव पातळीवर अंगणवाडी सेविकांसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून जिल्ह्यातील शेकडो बालक व माता यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला.

आदिवासी भागातील महिला प्रसृती झाल्यानंतर जन्मलेल्या बाळाचे वजन कमी भरते. कारण गरोदरपणात मातेला आवश्यक पौष्ट‌िक अन्न आहारातून मिळत नाही. तसेच काही वेळा कमी वयात लग्न होणे, दोन मुलामंधील अंतर कमी असणे, यासह अन्य कारणांमुळे मुलांचे वजन कमी भरते. मात्र आता शासनासह जागतिक आरोग्य संघटनांनी याकडे लक्ष वेधून पुढाकार घेत प्रयत्न सुरू केले आहेत. आणि त्यात बरेच यश हाती येत असल्याचा दावाही युनिसेफकडून करण्यात आला आहे.

कांगारू मदर केअर म्हणजे काय?

जन्मतः कमी वजन असलेल्या बालकांना साधारण ३ ते १० दिवसांपर्यत मातेच्या त्वचेचा संपर्क ठेवण्यात येते. त्यामुळे माता व बालक दोघांना ऊब मिळते. तसेच वारंवार स्तनपान करूनही या बालकांना संरक्षण देण्यात येते. ज्याप्रमाणे कांगारु माता आपल्या बाळाचा सतत चिटकून राहते, त्याप्रमाणे अशा बालकांनाही सतत आईच्या संपर्कात ठेवण्यात येते. म्हणूनच या उपक्रमाला ‘कांगारू मदर केअर’ असे नाव देण्यात आले आहे. आतापर्यत जिल्ह्यातील कमी वजनाचे बाळाचे प्रमाण या उपक्रमामुळे २० टक्क्यांपर्यंत आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावर चैतन्याचा झरा...

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात शुक्रवारी दुसऱ्या माळेला भगवतीची पंचामृत महापूजा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सपत्निक, तसेच जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जयश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. पहिल्या माळेपासूनच भाविकांचा सुरू झालेला ओघ दुसऱ्या माळेला वाढल्याने गडावर चैतन्य अवतरल्याचे दिसून आले.

दैनंदिन अलंकार पूजा, मिरवणूक व पूजन आदी विधीदेखील पार पडले. यावेळी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदी उपस्थित होते. पहाटेपासून रात्रीपर्यंत भाविकांचा ओघ कायम राहिला.

गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी असल्याने केवळ एसटी बसने नांदुरी ते गड प्रवास करावा लागत आहे. अनेक भाविक पायी गडावर हजेरी लावत असून, गडाचा परिसर सकाळी विलोभनीय धुके व हिरवळीने न्हाऊन निघत आहे, तर दुपारच्या वेळी कडक ऊन, रात्रीच्या वेळी पसरणारा गारवा अशा वातावरणात भाविकांची भगवतीच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे.

गडावर येणाऱ्या भाविकांमध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर समावेश दिसून येत अाहे. नांदुरी ते गड या घाट रस्त्यावर अजूनही काही ठिकाणी धबधबे दिसत असून, दर्शनाबरोबरच सेल्फी काढण्याचा त्यांचा खटाटोप पाहता घाट व वळणरस्त्यावर उतरून कुठेही सेल्फी न घेण्याचे, तसेच भाविकांनी स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघडी गटार अखेर बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील नवीन बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या उघड्या गटारीत बुधवारी दोन विद्यार्थी पडल्याची घटना घडली होती. घटनास्थळी असणाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्या दोघांना गटारीतून बाहेर काढल्याने ते वाचले होते. या घटनेनंतर पालिका प्रशासनाकडून उघड्या गटारीवर लोखंडी जाळी बसवण्यात आली असून, त्याच्या आजूबाजूला बॅरिकेट लावण्यात आले आहे.

नवीन बसस्थानकच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली ही उघडी गटारे आहेत. येथून ये जा करणारे प्रवासी, दुचाकीस्वार, शाळकरी मुले, सायकलस्वार व पदचारी यांच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत होते. याबाबत शहरातील राजकीय पक्ष संघटनांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली होती. बुधवारी या उघड्या गटारात ए. टी. टी. शाळेची दोन मुले सायकलसह पडली होती. सुदैवाने घटनास्थळी असेल्यांनी त्यांना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र या घटनेनंतर येथे पालिका प्रशासनाकडून एक अधिकारी, कर्मचारी देखील न फिरकल्याने नागरिक संतप्त झाले होते. तसेच ही उघडी गटारे तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त ‘मटा’ने गुरुवारी प्रसिद्ध केले होते.

अखेर या घटनेनंतर प्रशासनास जाग आली असून, या उघड्या गटारीवर लोखंडी जाळ्या तसेच बॅरिकेट लावण्यात आले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात हे लावण्यात आले असले तरी पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून याबाबत कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. तसेच गटारी स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांनी वेळीच या जाळ्या उघड्या गटारीवर टाकून बंद कराव्यात अन्यथा पुन्हा अशी दुर्दैवी घटना घडण्याचा धोका कायम राहील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गटारीच्या पाण्यामुळे ‘तो’ रुग्णालयात

बुधवारी त्या उघड्या गटारीत पडलेल्या दोघांपैकी एकाची प्रकृती बिघडल्याने त्यास शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुक्तार अहमद असे त्याचे नाव असून त्याच्या शरिरात गटारीचे दूषित पाणी गेल्याने त्यास मलेरिया झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुक्तार सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र याप्रकाराबाबत त्याच्या पालकांनी संताप व्यक्त करीत पालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुलांचा जीव धोक्यात आला असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images