Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

खासगी जागेत फटाकेविक्रीस बंदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औरंगाबाद शहरात गेल्या वर्षी फटाके विक्रीच्या स्टॉल्सला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर दिवाळीत ठिकठिकाणी खासगी जागेवर फटाके विक्रीसाठी लावण्यात येणाऱ्या गाळ्यांना यंदा बंदी घालण्यात आली आहे. विनापरवाना कुठेही शहरात फटाक्यांचे गाळे लावण्याचे आढळून आल्यास कडक कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यामुळे डोंगरे वसतिगृहावरील फटाक्यांचे स्टॉल संकटात सापडले आहेत. दरम्यान, औरंगाबादच्या घटनेमुळे यंदा फायर नियमावलीची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याने फटाके स्टॉलची संखाही रोडावणार आहे.

औरंगाबादमध्ये गेल्या वर्षी फायर नियमावलीची अंमलबजावणी केली नसल्याने मोठी दुर्घटना झाली होती. फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. त्यापार्श्वभूमीवर यंदा महापालिकेने शहरात फायर नियमावलीची कडेकोट अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात अग्निशमन विभागाने करसंकलन विभागाला पत्र लिहून परवानग्या देताना नियमावलीची आठवण करून दिली आहे. शहरात सहा विभागात सहाच ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल्स उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच दोन स्टॉल्समध्ये दहा फुटाचे अंतर, एका ठिकाणी ५० स्टॉल्स असावेत, स्टॉल्सचे तोंड एकमेकांच्या विरुद्ध दिशेला हवेत, कापडाचा वापर टाळावा, पत्र्याचा वापर जास्त व्हावा, अग्निशमनची व्यवस्था असावी अशा अटी त्यात टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नियमांची अंमलबजावणी करणे स्टॉल्सलाही परवडणारे असणार नाही. या कडक जाचक अटी शर्तीमुळे शहरातील फटाके स्टॉल्सची संख्या रोडावणार आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय स्टॉल्स उभारता येणार नाहीत, अशी सक्तीही करण्यात आली आहे. विनापरवाना स्टॉल्स उभारल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

तर होणार कारवाई
शहरात दरवर्षी महापालिकच्या परवानगीशिवाय अनेक ठिकाणी फटाके स्टॉल्स उभारले जातात. सिडकोतील पवननगरचे मैदान आणि डोंगरे वसतिगृह मैदानावरही मोठ्या प्रमाणावर स्टॉल्स लावले जातात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नसून हे स्टॉल्स अनधिकृत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे डोंगरे वसतिगृह मैदानावर यंदा स्टॉल्स उभे केल्यास थेट कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाबासाहेबांच्या पुतळ्याने त्र्यंबक पावन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

‘जगभर गाजत आहे माझ्या भिमाचे नाव, आज बाबासाहेबांच्या पुतळ्याने पावन झाले त्र्यंबकेश्वर गाव, असे उद्गार आपल्या खास शैलीत केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.

त्र्यंबकेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उद्घाटक म्हणून आणि राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार अपूर्व हिरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदींसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

त्र्यंबक नगरपालिकेने सर्वांना प्रेरणादायी ठरेल, असे स्मारक तयार केले असल्याचे आठवले म्हणाले. त्र्यंबकेश्वरला लाभलेला ऐतिहासिक, सामाजिक वारसामध्ये पूर्णाकृती पुतळा प्रेरणादायी ठरणार असून जगभरात सर्वाधिक पुतळे बाबासाहेबांचे असल्याने ते पुतळे शोभेची वस्तू न राहता त्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत शिक्षणासह सर्व सोयीचे काम आपण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री म्हणाले, हा उत्साह बघून त्र्यंबकेश्वरमध्ये दिवाळी असल्याचा भास होत आहे. संविधानमुळे देशातील विषमता नष्ट होऊन समतेचे राज्य आले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून डॉ. आंबेडकरांचा पुतळा हा सर्व समाजास दिशा देत शहराची ओळख बनला आहे.

कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, सुनील अडसरे, राजेंद्र धारणे, पंकज धारणे, पुरुषोत्तम कडलग उपस्थित होते. पुरुषोत्तम कडलग यांनी प्रस्ताविकातून पुतळ्याचा गेल्या अकरा वर्षाचा प्रवास सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवासाठी सजले रेणुका मातेचे मंदिर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

राज्य व देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदवडच्या रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर, पालिका व पोल‌िस प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यासह स्वतंत्र जिने दर्शन रांगेतील भाविकांसाठी रांगेच्या दरम्यान बेंचेसची सोय आणि घटी बसणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र प्रशस्त दालनाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवात भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पोल‌िस प्रशासनाला गृहरक्षक दल व सुराणा महाविद्यालयातील तरुण स्वयंसेवकांची साथ लाभणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने चांगली तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

नवरात्रोत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याचे मंदिराचे व्यवस्थापक सुभाष पवार यांनी सांगितले. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी चांदवड नगरी सज्ज झाली आहे. भाविकांचे लाडके दैवत असलेल्या रेणुका मातेच्या मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आह. मंदिराच्या पौराणिक वास्तूचे जतन करत मंदिराला नवरात्राच्यानिमित्ताने देखणे रूप बहाल करण्यात आले आहे. गुरुवारी चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना होणार आहे. नवरात्र उत्सवातील पहिली आरती न्यायाधीश के. जी. चौधरी व सहन्यायाधीश एस. एस. धपाटे यांच्या हस्ते होणार आहे. नवरात्रात दररोज सकाळी महाभिषेक व पालखीतून मिरवणूक यासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. नवरात्रोत्सवातील बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, वैयक्तिक पातळीवर देवस्थान ट्रस्टची हद्द सोडून कुठेही नवसपूर्ती, जावळांचा विधी, लग्न समारंभ तसेच विविध प्रकारच्या धार्मिक (बळी संदर्भातील)विधीला मज्जाव करण्यात आलेला नाही.

सप्तशृंग देवी गडावर देवस्थान ट्रस्ट हद्दीत बोकडबळी न देण्याचे पालन देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापनाकडून केले जाणार आहे. बोकडबळीची प्रथा बंद करू नये याबाबत ग्रामस्थांनी भूमिका मांडली असली तरी देवस्थान हद्द सोडून कुठल्याही विधीला प्रशासनाची हरकत नाही. मात्र देवस्थान हद्दीत हा विधी होणार नाही हे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. बैठकीत ग्रा. प. सदस्य राजेश गवळी, अनिल खताळे, दिलीप बर्डे, सुधाकर धामोडे, मयूर बेनके, शांताराम सदगीर, विजय दुबे यांच्यासह ट्रसटचे पदाधिकारी उपस्थित होते.

असे असतील कार्यक्रम

गुरुवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. सकाळी ७ वाजता दररोज श्री भगवतीची पंचामृत महापूजा करण्यात येईल. शुक्रवारी (दि. २९) शतचंडी याग, होमहवन पूजाविधी होईल. ३० सप्टेंबर रोजी विजयादशमीला सकाळी १० वाजता पूर्णाहुती विधी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीवर पितृपक्षाचे सावट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या १८ संचालक निवडीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमदेवारी अर्ज मिळण्याची आणि दाखल करण्याची सुरवात झाली आहे. मात्र, सध्या पितृपक्षामुळे एकाही इच्छुक उमेदवाराने उमेदवारी अर्ज घेतला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारपर्यंत (दि. २२) संधी आहे. त्यामुळे शेवटचे दोन दिवस म्हणजे पितृपक्ष संपल्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
प्राप्त झालेल्या निवडणूक अर्जांची शनिवारी (दि. २३) छानणी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवारपर्यंत (दि. २६) अंतिम मुदत आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी बुधवारी (दि. २७) जाहीर केली जाणार असून याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. सोसायटीसाठी रविवारी, एक ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी सोमवारी (दि. २) ऑक्टोबर रोजी करण्यात येईल.
पंचवटी एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९३३ ला झाली असून या संस्थेचे सध्या आर. पी. विद्यालय, ए. पी. पी. विद्यालय, बी. के. एम. पी विद्यालय, एस. बी. एम. विद्यालय, गोदावरीबाई प्राथमिक शाळा आणि वाणिज्य व विज्ञान कॉलेज आहे. संस्थेच्या गुजराती आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत.

बिनविरोध निवडीची परंपरा
संस्थेच्या पंचवार्षिक कार्यकारिणीच्या निवडीसाठी बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे. या निवडणुकीच्या वेळीही तसा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे ते उमदेवारी अर्ज दाखल करतील, त्यातील किती माघारी घेतील त्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय विद्यार्थिनीचा सटाण्यात विनयभंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा
येथील दोधेश्वर नाक्यावर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा तिच्याच गावातील तरुणाने गाडीवर सोडून देण्याचा बहाणा करत विनयभंग केला. या प्रकरणी पीडित विद्यार्थीनीने सटाणा पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी नानाजी तथा भावसा मानसिंग पवार (३०, रा. कौतिकपाडा) या संशयितास अटक केली.
शाळा सुटल्यानंतर संबंधित विद्यार्थिनी एसटीची वाट बघत दोधेश्वर नाक्यावर उभी होती. यावेळी ‌तिच्याच गावातील भावसा पवार दुचाकी घेऊन आला. ‘तुला मी घरी सोडतो’ असे सांगितल्याने ती गाडीवर बसली. मात्र, भावसाने मुळाणे शिवारात आडमार्गाला वळवत एका ठिकाणी दुचाकी थांबविली. वाईट नजरेने पाहून विद्यार्थिनीसमोर लघुशंका केली. याबाबत घरी कोणाला काही सांगू नको, असे सांगत तिचा विनयभंग केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सटाणा पोलिसांनी आरोपी भावसा याला ताब्यात घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा घायवट करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोडला तरुणीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
प्र‌िंटरचे टोनर रिफिलिंग करून देणाऱ्या एका तरुणाने तरुण महिला सीएचा विनयभंग केला. कॉलेजरोड परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी सिडकोतील संशय‌िताला ताब्यात घेतले आहे.
प्रशांत कमलाकर दीक्ष‌ित (३०, रा. रायगड चौक, सिडको) असे त्याचे नाव आहे. तो संगणकीय प्रिंटरला टोनर पुरविण्याचे काम करतो. या प्रकरणी हिरावाडीत राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. तिचे कॉलेजरोड परिसरात कार्यालय आहे. संशय‌िताचे टोनर बदलण्याच्या निमित्ताने कार्यालयात येणे-जाणे होते. त्याच्याकडे तरुणीचा मोबाइल नंबरही होता. इनकम टॅक्स रिटर्न भरायचे असल्याचा बहाणा करीत त्याने तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या मोबाइलवर अश्लिल मॅसेज पाठवून विनयभंग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुकद्वारे बदनामी

$
0
0

नाशिक : महिलेचा फोटो वापरून बनावट फेसबुक अकाउंट बनविल्याचा व त्यावर अश्लिल चित्रफिती टाकून बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूररोडवरील आनंदनगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली दाखल आहे. अज्ञाताने जुलैमध्ये महिलेचे छायाचित्र वापरून अनुषा खन्ना नावाने फेसबुकवर अकाउंट उघडले. त्यानंतर या अकाउंटवर अश्लिल फोटो व चित्रफिती टाकून बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातामध्ये २६ भाविक जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण
सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथील भाविकांची पिकअप गाडी वणी-नाशिक रस्त्यावरील ओझरखेड गावाजवळ पलटी होऊन झालेल्या अपघातात १३ महिलांसह २६ भाविक जखमी झाले आहे.
जखमीपैकी दोघांना नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वणी व सप्तश्रृंगी गडावर यात्रा असूनही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी एकच महिला डॉक्टर उपस्थित असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. केळी रुम्हणवाडी येथील जय माता दी मंडळाचे दीडशेवर भाविक वेगवेगळ्या वाहनाने सप्तश्रृंगी दर्शनासाठी येत होते. दिंडोरी तालुक्यातील ओझरखेडजवळ पिकअप गाडीचे (एमएच १५ १९८७) इंजिन अचानक लॉक झाले. यामुळे गाडीने अचानक उलटली. यात पिकअपमध्ये बसलेले सर्व २६ भाविक पडले. सगळ्यांच्या शरीरास वेगवेगळ्या ठिकाणी मार लागल्याने ते जखमी झाले. अपघातानंतर परीसरातील रहिवाशी व मार्गावरील वाहनचालकांनी जखमींना तातडीने मदत करीत वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्व विचारधारांच्या योगदानातून स्वातंत्र्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भारतीय स्वातंत्र्य प्रचंड प्रयत्नातून, त्यागातून, बालिदानातून मिळाले आहे. त्यामुळे एकट्या गांधींच्या चळवळीचे किंवा कुठल्याही एका विचारांचे, एका प्रवाहाचे, एका तत्वज्ञानाचे यश नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलांचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

येथील कॅम्प वाचनालयात भारतीय स्वातंत्र्य लढा या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी सबनीस बोलत होते. यावेळी कवी कमलाकर देसले अध्यक्षस्थानी होते. शिवाजी साळुंखे, भास्कर तिवारी उपस्थित होते.

सबनीस यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक विचारधारेचे योगदान असून, या विचारधारांचे सामर्थ्य आणि मर्यादा त्यांनी यावेळी मांडल्या. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगताना मात्र हिंदुत्ववादी माणूस हिंदूंचा

इतिहास सांगतो, कुणी सावरकर सांगेल तर कुणी गोळवलकर सांगेल. पण गांधींना कुणी वालीच उरला नाही. दोन्हीही काँग्रेसच्या निष्ठावंत काँग्रेसी राजकारण्यांनी गांधींच्या नावाचे जेवढे वाटोळे केले, जगामध्ये दुसरे कोणी केले नसेल अशी टीका त्यांनी केली.

लिखानात दुजाभाव

स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहास लेखनाबाबत ते म्हणले, इतिहास ब्राह्मणांच्या लेखणीतून लिहला

गेला. पण मुस्लिम क्रांतिकारक, आदिवासी क्रांतिकारकांच्या फासावर लटकलेल्या माणसांच्या नोंदी ब्राह्मणांनी लिहलेल्या इतिहासात सापडत नाहीत. नंतर बहुजनांचे लेखकही पुढे आले, पण
त्यांचीही औदार्याची भूमिका माझ्या वाचण्यात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण प्रकरणी तरुणास अटक

$
0
0

नाशिक : रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी बागवानपुरा येथील एकास पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अफताब नजीर शेख (२२, रा. जहागीरदारवाडा, बागवानपुरा) असे अटक केलेल्या संशय‌िताचे नाव आहे. द्वारका परिसरात राहणारा अमोल सुरेश पवार हा तरुण सोमवारी (दि. १८) सकाळी नऊच्या सुमारास द्वारका परिसरातील रामसिंग बावरी यांच्या कार्यालयाजवळून पायी जात होता. अफताबने त्याला अडवित लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात अमोल जखमी झाला. त्याच्यावर सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी शेख याला गजाआड केले आहे.


टोळक्याचा युवकावर हल्ला
नाशिक : तरुणास रस्त्यामध्ये अडवून आगर टाकळी येथील चौघांनी बेदम मारहाण केली. द्वारका परिसरातील घोडेस्वार बाबानगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुह्याची नोंद केली आहे.
मारूती भिसे, सिद्धार्थ पगारे, रुपेश सारूक्ते व ऋतिक सायसिंग (सर्व रा. आगरटाकळी) अशी संशयितांची नावे आहेत. द्वारका भागातील लोकमान्य हॉल समोर राहणाऱ्या मुकूंदा तुळशीराम कोरडे या तरुणाने फिर्याद दिली आहे. तो सकाळी आठच्या सुमारास शंकर मंदिरासमोरून पायी चालला होता. संशय‌ितांनी त्याला अडवून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

अशोकनगरला घरफोडी
नाशिक : अशोकनगरमध्ये घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७१ हजाराचा ऐवज चोरून नेला. राजेंद्र नारायण भावसार (६१, रा. राज्य कर्मचारी वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. भावसार कुटुंबीय १४ ते १८ जुलै या काळात बाहेरगावी गेले होते. त्यावेळी ही घरफोडी झाली. चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणे व दहा हजार रुपयांची रोकड असा सुमारे ७१ हजारांचा ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारीनंतर लगेच कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विविध घोटाळे आणि ‘मुक्त’ कर्मचाऱ्यांच्या अनेक किस्स्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात एका कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल होताच तत्काळ कारवाई झाली. या कारवाईने विद्यापीठ वर्तुळात चर्चा रंगली आहे.
विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांची मनमानी वागणूक, घोटाळ्यांभोवती फिरणारे धागेदोरे आणि संशयास्पद कारभाराची यापूर्वी सातत्याने चर्चा अन् तक्रारी होऊनसुद्धा अनेक प्रकरणांची अखेरपर्यंत तड न लागल्याची पार्श्वभूमी मुक्त विद्यापीठातील अनेक घटनांना आहे. या कार्यपद्धतीला नुकत्याच झालेल्या एका कारवाईने छेद दिला. विद्यापीठात कार्यरत एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या विभागातील महिला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह्य वर्तन केल्याची तक्रार विद्यापीठातील विशाखा समितीकडे दाखल झाली. महिला कर्मचाऱ्यांसंदर्भातील तक्रारींचे कामकाज या समितीद्वारे पाहिले जाते. तक्रार दाखल होताच त्रिसदस्यीय चौकशी समितीने या प्रकरणी तातडीने दखल घेत चौकशी सुरू केली. त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याचीही चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. या संदर्भात कुलगुरू डॉ. इ. वायूनंदन यांच्याशी संपर्क साधला असता या कारवाईस त्यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘विद्यापीठातील एका प्रकरणात संबंधित चौकशी समितीकडे कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी समितीने स्वतंत्ररित्या चौकशी करून कारवाई आहे.’ ही समिती स्वतंत्ररित्या कार्यरत असते. यामुळे या कारवाई संदर्भात किंवा कारवाईच्या इतर तपशीलाबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.
कारवाईने मात्र ‘मुक्त’ कारभार हाकणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य तो संदेश गेला आहे. चुका करूनही आपले काहीच होत नाही, अशा आर्विभावात असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असाच सुप्त संदेश विद्यापीठ वर्तुळात असल्याची चर्चा बुधवारी दिवसभर रंगली होती.

बदलीची चर्चा
विद्यापीठातील मध्यवर्ती विभागातील एका कर्मचाऱ्याच्या बदलीची चर्चाही विद्यापीठात रंगली. विद्यापीठातील गोपनीय माहिती संदर्भात गांभीर्य न बाळगत ती इतरत्र देण्याची चूक झाल्याने एका कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याची चर्चाही या प्रकरणामागोमाग रंगली. या संदर्भात कुलगुरूंना विचारले असता अशा चर्चेत तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की गोपनीय माहिती संदर्भातील असा कुठलाही प्र्रकार विद्यापीठात घडलेला नाही. नियमित नियमावली आणि आस्थापनांमधील गरजांचा भाग म्हणून एका कर्मचाऱ्याची बदली नियमांनुसार झाली आहे. त्या संदर्भात जोडल्या जाणाऱ्या बाबी तथ्यहीन आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांवरील प्रसाद असावा शुद्ध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

राज्यातील सर्व देवस्थानात वाटप होणारा प्रसाद व मंदिर परिसरातील अन्नपदार्थ हे गुणवत्तापूर्ण आणि भक्तांसाठी सुरक्ष‌ति असावेत, यासाठी त्र्यंबकेश्वर ये‌थे देवस्थानच्या कर्मचाऱ्यांसह शहरातील पदार्थ विक्रेते, व्यवसायीकांची कार्यशाळा घेण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या सूचनेप्रमाणेच प्रसाद तयार करण्याच्या सूचना या कार्यशाळेत करण्यात आल्या.

त्र्यंबकेश्वर येथे आयोजित सुरक्षित प्रसाद कार्यशाळेत साधुमहंतांसह मंदिर विश्वस्त उपस्थित होते. धार्मिक स्थळांवर भक्तांना देण्यात येणारा प्रसाद गुणवत्तापूर्ण पद्धतीने तयार करण्यात यावा, याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थानचे कर्मचारी तसेच देवस्थान परिसरातील अन्नपदार्थ विक्रेत्यांचा देखील समावेश होता. षडदर्शन आखाडा परिषदचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, प्रवक्ता डॉ. बिंदू महाराज, मंदिर विश्वस्त सचिन पाचोरकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त उदय वंजारी यांची उपस्थिती होती.

मंदिर देवस्थानतर्फे प्रसाद वाटप करण्यात येत असेल तर तो अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचे निकष पूर्ण करणारा असावा. त्याचप्रमाणे स्वच्छतेची काळजी घेतली जावी, याची सखोल माहिती यावेळेस देण्यात आली. यात केवळ देवस्थानाचा प्रसाद अंतर्भूत नाही. तर त्यासोबतच येथे येणाऱ्या भाविकांना जेवण, नास्ता, पिण्याचे पाणी, पेढे व मिठाई आदी प्रकारचा प्रसाद पुरविणरे व्यवसायीकांचा देखील समावेश होतो. केवळ शिजवलेले अन्नपदार्थ व्रिकी करणाऱ्यांना कायदा आहे, असे नसून त्यांना कच्चा माल पुरविणारे व्यवसायीक देखील गुणवत्ता, पॅकिंग आणि मुदत याची तरतुदीप्रमाणे काळजी घेतली पाहिजे, असे या सांगण्यात आले.

आता तरी प्रसाद मिळेला का?

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना महाप्रसाद असावा अशी वारंवार मागणी होत आहे. काही वर्षांपूर्वी लाडू आणि त्यानंतर केसरी भात वाटप करण्यात येत होता. आता तो देखील बंद झाला आहे. या निम‌त्तिाने या विषयास पुन्हा उजाळा मिळतो आहे. देवस्थान ट्रस्टने अन्न प्रशासनाच्या नियमात बसेल असा प्रसाद आता सुरू करण्यास हरकत नाही, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ क्लर्क गजाआड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) वाहन तपासणी यंत्राच्या हॅकिंगप्रकरणी आरटीओमधील क्लर्क परितोष रणभोरे यास पोलिसांनी बुधवारी अटक केली. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

नाशिक आरटीओमध्ये देशातील पहिले स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र कार्यन्वित आहे. याच केंद्राची वेबसाइट हॅक झाल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यात क्लर्क रणभोरे हा संशयास्पद असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मोहिम उघडली. गेल्या काही दिवसांपासून तो आरटीओमध्ये कामावर येणे टाळत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने कोर्टाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. पण, कोर्टाने तो फेटाळला. पुणे रोडवरील फेम थिएटर परिसरातील घरातून पोलिसांनी बुधवारी रणभोरेला अखेर अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी तपासाला वेग येणार आहे.

असे करत होता ‘उद्योग’
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन तपासणी केंद्राचा पासवर्ड आणि त्याची वेबसाइट हे सर्व काम रणभोरे पाहत होता. स्वतःचा लॅपटॉप आणि मोबाइल याद्वारे त्याने तपासणी प्रमाणपत्र डाउनलोड केले. त्याने संशयास्पदरित्या १३ प्रमाणपत्र डाउनलोड केल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले. घरुन किंवा ऑफिस वेळेनंतर त्याने हे प्रमाणपत्र डाउनलोड केले. संशयास्पदरित्या प्रमाणपत्र मिळालेल्या दोन वाहनधारकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यात रणभोरेचे कारनामे उजेडात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईच्या पावसाचा नाशिकला फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई आणि गुजरातला मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाठविण्यात येतो. या दोन्ही बाजारपेठेच्या भागात बुधवारी जोरदार पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम नाशिकच्या बाजारावर झाला. दुपारच्या लिलावात फळभाज्यांच्या दरांमध्ये घसरण झाली. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला भाजीपाला या बाजारपेठांमध्ये पाठविण्यास अडचण असल्याने यातील किती भाजीपाला पोहचतो याविषयी व्यापाऱ्यांच्या मनात शंका होती.

जोरदार पावसाने भाजीपाला पाठविण्यास अडचण येण्याची ही यंदाच्या पावसाळ्यातील दुसरी वेळ आहे. व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदी करण्याची जोखीम घेतली. त्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या पॅकिंग पूर्ण झाली असून रात्रीच्या सुमारास हा शेतमाल घेऊन ही वाहने मुंबई आणि गुजरातकडे रवाना होतात. पावसाची स्थिती अशीच राहिली तर हा भाजीपाला पोहचविण्यात अडचणी येतील. दुपारचे फळभाज्यांचे लिलाव सुरळीत झाले. मात्र, भाजीपाल्यांच्या दरात घसरण झाली.

नाशिक बाजार समितीतून रोज ३५ ते ४० ट्रक भाजीपाला मुंबईला आणि १५ ते २० ट्रक भाजीपाला गुजरातला रवाना होत असतो. भाजीपाल्याची आवक ज्या प्रमाणात असते, त्या प्रमाणात ही संख्या कमी जास्त होत असते. मुंबईला भाजीपाला पुरविणात नाशिकच्या बाजाराचा वाटा सर्वात मोठा आहे. मुंबईला सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका नाशिकच्या बाजार समितीतील भाजीपाल्याला बसला. दुपारच्या बाजारात विक्रीसाठी आलेला भाजीपाल्याचे लिलाव तर झाले मात्र, त्यांच्या भावात घसरण झाली.

भाजीपाल्याचे भाव

भाजीपाला............मंगळवारचा दर.........बुधवारचा दर (प्रतिकिलो)
टोमॅटो...............५ ते १५.........३ ते ११
वांगी..................१७ ते ३२.......१५ ते ३०
फ्लॉवर................ ८ ते ११........६ ते ९
कोबी.....................९ ते १६.........८ ते ११
ढोबळी मिरची.......... ३१ ते ४३.....२८ ते ३७
पिकॅडोर................३४ ते ४७.......२० ते ३५
दुधी भोपळा.......... ६ ते १३.........६ ते १२
कारले .................८ ते १२.........६ ते १०
दोडका..................१२ ते १८.......१० ते १६
गिलके...................१४ ते १८......१२ ते १६
भेंडी.......................२० ते ३०.....१५ ते २७
काकडी...................७ ते ११........६ ते १०

पालेभाज्या............दर रुपये (प्रति जुडी)
कोथिंबीर...............२० ते ५०
मेथी....................१० ते ४०
शेपू ....................७ ते २१
पालक .................३ ते ७
कांदापात................१० ते २०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कव्वालीद्वारे भाजपचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढत्या महागाई विरोधात रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेसने बुधवारी महागाई विरोधात निर्देशने केली. ‘अच्छे दिन कब आयेगें तब तक सब मर जायेंगे ‘पानी सस्ता रहा ना खाना कोई मोदी को जो सिखाना, देश आता नही है चलना’, अशी कव्वाली गाऊन वाढत्या महागाईबद्दल निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर चुली पेटवून हे आंदोलन करण्यात आले.

ऐन सणासुदीच्या काळात पेट्रोल व गॅसचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. वाढत्या महागाई विरोधात शहर काँग्रेसने बुधवारी (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयावर निर्देशने केली. मोदी सरकारने वाढविलेल्या महागाईचा पाढा वाचण्यासाठी हुसैनी मस्ताना ग्रुपच्यावतीने कव्वाली सादर करण्यात आल्या. रफीक मस्ताना, तबरेज शेख, शाहानवाज शेख, आरिफ पीरजादा, शाहाबाबा, सादिख खान यांनी या कव्वाली सादर केल्या. आंदोलनात शहराध्यक्ष शरद आहेर, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शाहू खैरे, सभापती डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गजानन शेलार यांना अटक

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि नगरसेवक गजानन शेलार यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना कोर्टात गुरुवारी (दि. २१) हजर करण्यात येणार आहे.
दंडे हनुमान मित्र मंडळाचे संस्थापक असलेल्या शेलार यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमचा वापर केला होता. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी ७ सप्टेंबरला अटक केली. मात्र, मुख्य आरोपी शेलार यांनी नाशिक कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी हायकोर्टात अर्ज केला. परंतु, तेथेही तो फेटाळण्यात आला. त्यामुळे शेलार यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना पोलिस कोठडी मिळावी यासाठी गुरूवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक डीपीत ६२ फेरबदल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक शहाराचा डीपी नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातील फेरबदलाने नाराजांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली असून आता कोर्टकचेरीला चालना मिळण्याची शक्यता आहे. एकूण ६२ फेरबदल सूचना यात आहेत.

१४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात त्र्यंबक शहराच्या प्रारूप विकास योजनेत झालेल्या फेरबदलांची सूचना प्रसिद्ध झाली आहे. सोमवारी त्याबाबतचा नकाशा आणि फेरबदल सूचना नगर परिषद कार्यालयात प्रसिद्ध झाले आहेत. शहराच्या मूळ हद्दीतील आणि वाढीव हद्दीतील असे दोन नकाशे आहेत. एकूण ६२ फेरबदल सूचना यात आहेत. नागरिक हा नकाशा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. प्रसिद्धीपासून ३० दिवसांपर्यंत नागरिकांच्या अवलोकनासाठी हा नकाशा उपलब्ध आहे.

सुचवलेले फेरबदल अनेकांना धक्का देणारे आहेत. पूर्वीच्या नकाशात पिवळे झालेले गट नंबर आता पुन्हा हिरवे करण्यात येणार आहेत. त्यांची संख्याही बरीच मोठी आहे. अर्थात यामध्ये जमीन मालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पूर्वीच्या नकाशात मागणी

केलेली नसतांना पिवळ्या पट्ट्यात जम‌निी घेऊन पुन्हा शेतीकडे वर्ग करण्याचे फेर बदल निश्च‌तिच वादाचे कारण ठरणार आहे.

विशेष म्हणजे पूर्वी पिवळया जम‌निी झाल्या म्हणून पर्यावरणाची हानी झाली म्हणून वादळ निर्माण झाले. त्या जम‌निींच्या पिवळ्या क्षेत्रात विशेष फरक झालेला नाही. उलट शहर वाढीस वाव असलेल्या भागात मात्र शेती झोन सुचविण्यात आला आहे. शहराची पूर्वी हद्द १.८९ चौरस कि.मी. होती. हद्दवाढीनंतर ती ११ चौरस किमी
झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंनी घेतला स्वच्छतेचा वसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
स्वच्छता हीच सेवा मोहिमेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान मोहीम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातही राबविण्यात आली. कृषी शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांसह विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन तसेच शिक्षकांनीही झाडू हाती घेऊनही विद्यापीठ परिसर स्वच्छ केला.
यावेळी परिसरात पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. झाडांचा पालापाचोळा गोळा करून त्याचा खतासाठी वापर करण्यात आला. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, प्रा. हेमराज राजपूत, डॉ. नितीन ठोके, डॉ. प्रकाश कदम, यामिनी भाकरे, प्रभारी जनसंपर्क प्रमुख संतोष साबळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. विद्यापीठ परिसराबरोबरच आपले घर आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा निर्धार यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दोन ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे तसेच आदिवासी गावांत ज्या ठिकाणी शौचालये नाहीत अशा गावांत श्रमदान करण्यात येणार आहे. या गावांत शौचालये बांधणे व ते वापरण्यावर जनजागृती करण्यात येणार आहे.

‘स्वच्छता ही सेवा’चे आयोजन
केंद्र सरकारने दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’चे आयोजन केले आहे. याअंतर्गत स्वच्छतेविषयी जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत ही आपल्या देशातील नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे, ही भावना रुजविण्यात येणार आहे. समाजाच्या सक्रिय सहभागामुळेच स्वच्छ भारत अभियानाचे रुपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झाले असून या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणीसाठी २२५ बसेस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नवरात्रोत्सवासाठी वणी सप्तशृंगी गडावर दर्शनाला जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने २२५ बसेसचे नियोजन केले आहे. या बसेस दहा दिवस जिल्ह्यातील १३ आगारातून धावणार आहे.
पहिले तीन दिवस कळवण आगारातील ३० बसेसच नांदुरी पायथा व सप्तशृंगी गड येथे भाविकांना जाण्यासाठी सोडणार आहे. त्यानंतर सर्व आगाराकडून आलेल्या ५७ बसेस या नियमित धावणार आहे. तसेच सहा आगारातील बसेस थेट गडावर जाणार आहे. नाशिक येथून सीबीएसवरून १०६ तर नाशिकरोड येथून पाच बसेस सोडण्यात येणार आहे.
वणीला जाण्यासाठी भाविकांची राज्यभरातून गर्दी असते. त्यामुळे बसने त्यासाठी जिल्ह्याचे नियोजन केले. नवरात्रोत्सवात मालेगाव येथून २५, मनमाडहून १५, पिंपळगाव येथून ७ तर सटाणा आणि दिंडोरी येथून प्रत्येकी ५ बसेस आहेत. नाशिक येथून गडावर जाण्यासाठी ९ आगारातून बसेस मागवण्यात आल्या आहेत. तसेच इतर ठिकाणी सुद्धा दुसऱ्या आगारातील जादा बसेसचे नियोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य प्राप्तिकर आयुक्त शुक्ल आज नाशकात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील सात कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने २४ ठिकाणी छापे टाकल्यानंतर हवाला व दुबई कनेक्शनची चर्चा असताना या विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए. सी. शुक्ल गुरुवारपासून (दि. २१) दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येणार आहे.
आयुक्त शुक्ल यांच्या दौऱ्यामागे व्यापाऱ्यांवरील छापे हे कारण नसले तरी ते महाराष्ट्र चेबर कॉमर्स सह औद्योगिक संघटनेच्या प्रतिनिधीशी ते चर्चा करणार आहेत. यात व्यापाऱ्यांना लक्ष्य केल्याचा विषय सुद्धा पुढे येणार असल्याने प्राप्तिकर विभागाचे स्थानिक अधिकारी चिंतेत आहेत.

शुक्ल यांचा दौरा २१ आणि २२ सप्टेंबर रोजी असून या दोन दिवसात ते व्यापारी व उद्योजकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्राप्तिकर विभागाच्या गडकरी चौकातील कॉन्फरन्स हॉल, नाशिक येथे विविध संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स इत्यादींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आर्थिक वर्षातील आयकर विभागाच्या धोरणांवर माहिती देऊन चर्चा केली जाणार आहे. तसेच नवी दिल्ली येथे झालेल्या राजस्व संगममध्ये झालेल्या चर्चेबद्दल सहभागी सदस्यांना माहिती दिली जाणार आहे.

प्रश्न विचारण्याची संधी
प्राप्तिकर विभागाच्या आयुक्तांचे कार्यक्षेत्र नागपूर व मुंबई कार्यालयाचा भाग वगळून उर्वरित महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती अनेकांना मार्गदर्शक असणार आहे. तसेच सर्वांना आपले प्रश्नही या निमित्ताने मांडता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images