Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘संगणकीय ७/१२’ची कासवगती

$
0
0

नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा
प्रशासनाचा ढिला कारभार आणि संगणकीकरणातील तांत्रिक समस्यांमुळे अद्याप सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. राज्यभरातील ४३ हजार ९४३ पैकी अवघ्या ९ हजार ५३२ म्हणजेच २१.६९ टक्केच गावांचे संगणकीय ७/१२ कामाचे अंतिम प्रमाणपत्र पूर्ण झाले आहे. नाशिक विभागात हेच प्रमाण अवघे १०.२३ टक्के म्हणजे ६७९ गावे असे आहे. प्रशासनाच्या कासवगती कारभारामुळे राज्य सरकार तोंडघशी पडल्याचे चित्र आहे.

डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास अनुसरून स्वातंत्र्यदिनापर्यंत राज्यातील सर्व गावांमधील ७/१२ उतारे संगणकीकरण करण्याची घोषणा सरकारने केली. राज्याच्या महसूल व वन विभागाने गाव दप्तरातील नमुना ७/१२ चे संगणकीकरणाचे कामही हाती घेतले. मात्र, महिला उलटून गेल्यानंतरही राज्य सरकार आपले लक्ष्य पूर्ण करू शकलेले नाही.

स्वातंत्र्य दिनापासून सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे गाव दप्तरातील नमुना ७/१२ उतारे ऑनलाइन प्राप्त होणार होते. काही महिन्यांपासून महसूल यंत्रणा या जिकिरीच्या कामासाठी झटत आहे. घोषणेनुसार स्वातंत्र्यदिनापर्यंत राज्यातील सर्व विभागांतील गावांचे सातबारा संगणकीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, या कामात प्रशासनाला अद्याप यश मिळू शकलेले नाही. सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना ऑनलाइन ७/१२ वितरणास प्रातिनिधीक स्वरुपात प्रारंभही केला होता. उर्वरित गावांचे अपूर्ण काम ऑगस्ट अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता होती. मात्र डेडलाइन उलटल्यानंतर राज्यातील प्रशासकीय कामकाजात सुस्तपणा दिसून आला आहे. निम्मा सप्टेंबर उलटला तरी अद्याप राज्यभरातील सर्व गावांचे अंतिम प्रमाणपत्र पूर्ण झालेले नाही.

सरकार ऐकेना; अधिकारी जुमानेतना
राज्यातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांचे ७/१२ संगणकीकृत करून ते ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना चांगली आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीतील समस्या ऐकून घेण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आले आहे. तर या योजनेची अंमलबजावणी करणारे अधिकारी सरकारच्या आदेशांना जुमानत नसल्याचे उघड झाले आहे.

अमरावती, नंदुरबार अव्वल
संपूर्ण ७/१२ संगणकीकरण कामात राज्यात अमरावती महसूल विभागाने तर नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. अमरावती विभागात ४७.७५ तर नंदुरबार जिल्ह्यात २७.९५ टक्के गावांना अंतिम प्रमाणपत्र मिळाले आहे. राज्यातील कोकण (८.६१), पुणे (९.२६) या महसूल विभागांची टक्केवारी तर दोन आकडी संख्याही गाठू शकलेली नाही.

मंत्र्यांच्या जिल्ह्यातच खोडा
नाशिक विभागातील जळगाव, नगर आणि नाशिक या तिन जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन संगणकीकरणाचे अगदी निचांकी काम झालेले आहे. विशेष म्हणजे या तिन्हीही जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान लाभलेले आहे. मंत्र्यांच्याच जिल्ह्यात या योजनेच्या कामाला खीळ बसला आहे.

संगणकीय सातबारा राज्याची प्रगती
महसूल विभाग......संगणकीय सातबारा पूर्णतेचे प्रमाण (टक्के)
अमरावती....................४७.७५
औरंगाबाद....................३०.४७
नागपूर....................१८.६६
नाशिक....................१०.२३
कोकण....................८.६१
पुणे....................९.२६
एकूण....................२१.६९

नाशिक विभागातील स्थिती
जिल्हा........गावे........संगणकीकरण ७/१२ झालेली गावे........टक्के
जळगाव........१,५०२............७२................४.७९
नगर...............१,६०२...........११६................७.२४
नाशिक........१,९६६................१७८................९.०५
धुळे.............६७८................६५................९.५८
नंदुरबार ........८८७................२४८................२७.९५
एकूण.............६,६३५........६७९................१०.२३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निमा’ विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी ब्राह्मणकर

$
0
0

नाशिक ः निमा हाऊस येथे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मधुकर ब्राह्मणकर यांची विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली. या निवडीनंतर ब्राह्मणकर यांनी भविष्यात नवीन उपक्रमांच्या माध्यमातून निमामार्फत नाशिक जिल्ह्याच्या विकासात निश्चितच भरीव योगदान दिले जाणार असल्याचे सांगितले. या निवडीनंतर निमा अध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, विश्वस्त मंडळाचे सदस्य मनिष कोठारी व रवी वर्मा यांनी अभिनंदन केले.

मधुकर ब्राह्मणकर यांनी २००९-१० रोजी निमाचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच निमाच्या घटना समितीची धुरा देखील त्यांनी सांभाळली आहे. निमाच्या घटना उपसमितीचे अध्यक्षपद भूषवितांना त्यांनी केलेले भरीव योगदान हे भविष्यातील निमाच्या वाटचालीस मार्गदर्शक ठरणारे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकाच चालविणार सीटीबस!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळासाठी डोईजड ठरलेली शहर बससेवा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. तोट्यातील सेवेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीत पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांचाही समावेश आहे. सर्वंकष वाहतूक आराखड्यातही शहर बससेवा महापालिककडेच असावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ही सेवा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू झाल्याने बससेवेचे शुक्लकाष्ठ संपण्याची शक्यता आहे.

शहर बससेवेवरून सध्या महापालिका आणि राज्य परिवहन सेवेत संघर्ष सुरू आहे. शहर बससेवा परवडत नसल्याचे सांगत महामंडळाने ही बससेवा महापालिकेने चालवावी, अशी मागणी केली आहे. तर वाढत्या तोट्यामुळे महामंडळाने २७३ बसेसवरून हा आकडा आता १४५ पर्यंत घटवला आहे. दुसरीकडे महापालिकेने बससेवेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी कन्स्लटंट नियुक्त केले आहेत. तर सर्वंकष शहर वाहतूक आराखड्यात बससेवा ही महापालिकेनेच चालवावी, अशी शिफारस केली आहे. त्यामुळे बससेवेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालिकेवर दबाव वाढला आहे. पालिका याबाबत चाचपणी करित आहे. परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने पालिका याबाबत निर्णय घेण्यास कचरत आहे.

महापालिका संभ्रमात असतांनाच राज्य सरकारने तोट्यात सुरू असलेल्या शहरी बससेवा संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. परिवहन विभागाने परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून, समिती अंतिम निर्णय घेणार आहे. या समितीत सदस्यम्हणून पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, महामंडळाचे एमडी आणि नगरविकास विभागाचे उपायुक्त सदस्य आहे. ही समिती अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे बससेवा पालिकांकडे हस्तांतरीत होण्याच्या हालचाली आता शासन स्तरावरच सुरू झाल्या आहेत.

पीपीपी तत्वावर शिफारस

महापालिकेने शहर बससेवेसंदर्भात कन्स्टटंटची नियुक्ती केली आहे. सोबतच इंदूर महापालिकेच्या बससेवेचा अभ्यास केला जात आहे. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बससेवा ही पीपीपी तत्वावर चालवावी, अशी शिफारस अगोदरच दिल्लीस्थिती यूएमटीपी संस्थेने केली आहे. त्यामुळे पालिकाच बससेवा घेणार हे निश्चित झाले असून त्याच्यावर धोरणात्मक समितीकडून मोहोर उमटवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कावनई’च्या विकासाला ब्रेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

कुंभमेळा होऊन दोन वर्षे उलटूनही सिंहस्थाच्ये मूळस्थान असलेल्या श्रीक्षेत्र कावनई येथील विकासकामांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. चौदा वर्षांपूर्वी (२००३) सरकारने भरघोस निधी दिला होता. त्यावेळी मंदिर परिसरातील सर्वच कामे पूर्ण झाली होती. मात्र यावेळी दोन वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यात शासनाकडून निधी तर पूर्ण आलाच नाही, त्यातही जो निधी मिळाला त्यातील कामे अपूर्ण आहेत.

श्री क्षेत्र कावनई येथे कुंभमेळा होऊन दोन वर्षे उलटली. या ठिकाणी येणाऱ्या संतांसाठी निवास, गोशाळा, प्रसाधनगृह, तीर्थक्षेत्रावरील डागडुजी, परिसरातील सिमेंट रस्ते, विद्युत पथदीप अशा अनेक कामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आला होता. मात्र आजही येथील काहीच सुविधा नाहीत. संतनिवास व गोशाळेचे काम अजूनही अपूर्ण आहे.

गोशाळा अर्धवट

दोन वर्षे उलटूनही ही कामे अपूर्ण का असा प्रश्न महंत उडिया महाराज व भरतदास महाराज यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या ठिकाणी देशभरातील भाविक व संत अजूनही मोठ्या संख्येने येतात. याठिकाणी आल्यानंतर त्याची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. कपिलधाराच्या गोमाता दोन वर्षांपासून गोशाळेच्या प्रतीक्षेत कुंभमेळ्यात याठिकाणी गोशाळा बांधण्यात आली होती. मात्र त्या गोशाळेवर अजूनही पत्रे, दरवाजे, खिडक्या बसव‌िलेल्या नाहीत.

जिल्हा परिषदेने ८० लाख रुपये श्री क्षेत्र कपिलधाराला मंजूर केले असून, ही कामे पूर्ण का होत नाहीत. झालेली ७० टक्के कामे ही दोनवर्षापूर्वीची आहेत. मात्र अद्यापही ती पूर्ण झालेली नाही. ही कामे लवकर पूर्ण केली नाही, तर झालेले काम देखील पाण्यात जाईल.- उडिया महाराज

गत दोन वर्षांपूर्वी कुंभमेळ्यात कावनई कपिलधारा तीर्थ येथे संतनिवास, गोशाळा, प्रसाधनगृह, स्वयंपाक गृह ही कामे कामे शासनाने उभी केली आहेत. मात्र ती कामे अजूनही अपूर्ण आहेत. ही कामे जर वेळेत पूर्ण केली नाहीतर शिवसेनेना आंदोलन करणार.

- कुलदीप चौधरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीत गाळेधारकांचे उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गाळा नं ११६चे व्यावसायीक अनधिकृतपणे याच आवारातील गाळे नं १६ धारक सतीश महाजन यांच्या गाळ्यासमोर माल उतरवून लिलाव करतात. यामुळे वादाचे प्रसंग उभे राहतात. त्यांना याठिकाणी लिलाव करण्यास बंदी घालाण्यात यावी, या मागणीसाठी गाळेधारकांनी बाजार समिती आवारात उपोषण केले.

बाजार समितीच्या आवारात सतीश महाजन हे १९८८ पासून व्यवसाय करीत असून, त्यांच्या गाळ्याच्या पूर्वेस असलेल्या रस्त्यावर ज्योती एंड कंपनीचे गाळे धारक अनधिकृतपणे माल उतरवतात. यामुळे फळ बाजाराकडे असलेल्या गाळयांकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांसह वाहनांना त्रास होतो. यावरून अनेकदा वाद होवून शेतमालाची नासधूस होते. ज्योती एंड कंपनीचे गाळेधारक यांना गाळा नं ११६ च्या मागील बाजूस जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीदेखील ते गाळा नं. १६ च्या पूर्वेस बळजबरीने लिलाव करतात. गाळेेधाराकांचे आर्थिक नुकसान होत असून यास बंदी घालावी, अशी मागणी े करण्यात आली आहे. या लाक्षणिक उपोषणात सतीश महाजन, जगदीश महाजन आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छते’ला मिळाले बळ

$
0
0

टीम मटा ः १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोह‌िमेत जिल्हाभरात विविध उपक्रमांद्वारे स्वच्छता करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथे गोदापात्राची स्चच्छता, येवल्यात राष्ट्रपुरुषांचे शिल्प अन् त्यांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. देवळा, कळवणमध्येही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तर निफाड तालुक्यातील नैताळे येथे मात्र या मोहिमेचा निषेध करीत पेट्रोल दरवाढीवर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
येवला बाजार समिती आवाराची साफसफाई

येवला ः केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय कृषी, पणन व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशानुसार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी अन् कर्मचाऱ्यांनी रविवारी हाती झाडू घेत बाजार समिती आवारात स्वच्छता मोहीम राबवली.

रविवारी सकाळी येवला बाजार समितीत ही मोहीम राबविण्यात आली. सभापती उषाताई शिंदे, उपसभापती गणपत कांदळकर यांच्यासह समितीतील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेतला. केंद्रीय विपणन अधिकारी एस. एम. शुक्ला व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अधिकारी यांनी यावेळी येवला बाजार समितीस भेट देवून स्वच्छता अभियानाची पाहणी केली.


गोदापात्र स्वच्छतेला त्र्यंबकेश्वरमध्ये सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गोदापात्राची स्वच्छता करत स्वच्छता हिच सेवा या अभियानाला पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे शुभारंभ करण्यात आला. त्र्यंबक नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज, डॉ. बिंदू महाराज या साधुमहंतांसोबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस अधीक्षक संजय दराडे आदींसह महसूल अधिकारी सहभागी झाले. बेझे येथील श्री राम शक्ती पिठाचे भक्त आणि संदीप फाउंडेशन, आर्कीड, ब्रह्माव्हॅली आदी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग नोंदवला.

त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर पालकमंत्री महाजन यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासमवेत नगराध्यक्षा तृप्ती धारणे, भाजप शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र, उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे आदींसह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. स्वच्छतेची शपथ घेतल्यानंतर नियोजनाप्रमाणे शहराच्या विविध भागात स्वयंसेवक स्वच्छतेसाठी रवाना झाले. दरम्यान पालकमंत्री महाजन आणि महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज यांच्यासह नगराध्यक्षा धारणे व नगरसेवक नदीपात्रात उतरले आणि स्वच्छता केली.
कळवणच्या विद्यार्थ्यांचा मोहिमेत सहभाग

कळवण ः कळवण नगर पंचायत व आर. के. एम. उच्चमाध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हीच सेवा या मोहिमे अंर्तगत कळवण शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत शासनाच्या आदेशानुसार स्वच्छता हीच सेवा ही मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणूण सोमवारी कळवण नगर पंचायत व कळवण एज्युकेशन संचालित आर. के. एम. उच्चमाध्यमिक विद्यालय, कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने कळवण बस स्थानक परिसर, नवीन कोर्ट आवार, गांधी चौक, मेनरोड या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, नगराध्यक्षा सुनिता पगार, शिवसेनेचे उपनगराध्यक्ष साहेबराव पगार, गटनेते कौतिक पगार, नगरसेवक अनुराधा पगार, भाग्यश्री पगार, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल, विद्यालयाचे प्राचार्य एच. के. शिंदे, उपप्राचार्य सी. आर. गांगुर्डे यांच्यासह विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

चांदवडला फेरी

मनमाड ः चांदवड नगरपालिकेतर्फे सोमवारी शहरातून स्वच्छता फेरी काढण्यात आली. विविध सरकारी कार्यालये, अधिकारी कर्मचारी विविध विद्यालयातील शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांनी सात सहभाग घेतला. आमदार राहुल आहेर, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झाला. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी या अभियानात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

निफाडला मोहीम

निफाड ः निफाड नगरपंचायत अंतर्गत शहरातील वैनतेय विद्यालय, कर्मवीर ग. दा. मोरे महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक संस्था यांच्यासह निफाड नगरपंचायतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली. निफाड गावातील विविध रस्ते, चौक, तसेच खुल्या भूखंडावर ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी निफाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष मुकुंद होळकर मुख्याधिकारी किशोर चव्हाण नगरसेवक देवदत्त कापसे, नगरसेविका सुनीता कुंदे, वि. दा. व्यवहारे, नवनाथ पवार, उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेक्नोलॉजीसह साधनसामुग्रीचा वापर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र पोलिस दल सर्वच दृष्टीकोनातून सक्षम आहे. मात्र, आपण टेक्नोलॉजीसह उपलब्ध साधनसामुग्रीचा तितका वापर करीत नाही. त्याचा कुठेतरी परिणाम होतो. त्यामुळे राज्यातील पोलिसांनी यापुढे काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी केले.
महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमीमध्ये सुरू असलेल्या १५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार, प्रशिक्षण आणि विशेष शाखेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. जगन्नाथन, एमपीएचे संचालक विजयसिंग जाधव, अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे, संचालक रितेशकुमार, अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल, पोलिस महानिरीक्षक, अनुपकुमारसिंह, सुनील रामानंद, विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, श्रीकांत तरवडे, डॉ. जय जाधव आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी हजर होते. यावेळी माथूर यांनी सांगितले, की सीसीटीएनचा आपण वापर करतो हे जाहिर केले आहे. मात्र, अद्याप यात बऱ्याच त्रुटी आहेत. राष्ट्रीय पातळीवर सीसीटीएनचा वापर सुरू झाला असून, राज्य पोलिसांनाही या प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. परदेशात डॉग स्वॉडच्या मदतीने अनेक कामे केली जातात. राज्यात डॉग स्वॉडची संख्या वाढवण्यात येत असून, ही चांगली बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस दलात सव्वा दोन लाख पोलिस असून, त्यांच्या कुटुंबीयासह तसेच नातेवाइकांसह ही संख्या आठ लाखांच्या पुढे जाते. पोलिसांकडून पुरवल्या जाणाऱ्या ऑनलाइन सुविधांचा वापर करण्याची सुरुवात या लोकांनी केली तर सर्वसामान्य नागरिकही त्याकडे वळतील. ईद आणि गणेशोत्सव या दरम्यान राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेची बाजू पोलिसांनी चांगली संभाळली. याचा मोबादला म्हणून राज्य सरकारने पोलिसांसाठी मोठे बक्षिस जाहीर केल्याचे माथूर यांनी स्पष्ट करीत पोलिसांना सकारत्मक संदेश दिला.

पोलिस दलासाठी जागा
पोलिसांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, जमिनीच्या किंमती वाढत आहे. त्यामुळे ज्यांनी कधीकाळी जमिनी दिल्या, त्या व्यक्ती अथवा स्थानिक प्रशासन जमीन परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दौंडमध्ये एसआरपीएफच्या जागेबाबत असा अनुभव आला. आता तिथे डॉग स्वॉड युनिट सुरू करण्यात आले आहे. भविष्यातील हा धोका ओळखून सर्वांनी आपल्या हक्काच्या जमिनींबाबत सजग राहावे, असे आवाहन माथुर यांनी केले.

विजेत्या संघांचा सन्मान
कर्तव्य मेळाव्यात राज्यभरातील २३ संघाचे ४७५ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. पोलिस व्हिडिओग्राफीमध्ये शहर पोलिसांनी बाजी मारली. वैज्ञानिक मदत व तपास यात पुणे सीआयडी अव्वल ठरले. फोटोग्राफीमध्ये कोल्हापूर रेंज, डॉग स्वॉडमध्ये अमरावती आणि अॅण्टी स्टॉबेज चेक आणि कम्प्युटर अवेरनेस यात एमआयए पुणे विजेते ठरले. विजेत्या संघांचा पोलिस महासंचालकांच्या हस्ते चषक देऊन सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् त्यांचा पुन्हा फुलला संसार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
लग्न करुन त्या दोघांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. पण, अवघे ११ महिने होत नाही तोच दोघांमध्ये विसंवादातून टोक गाठले. अखेर एकमेकाविरोधात पोलिस स्टेशनमध्ये ते गेले आणि तेथून हा वाद थेट कोर्टात. अखेर जिल्हा विधी प्राधिकरणाने त्यांचा समेट घटवून आणला आणि त्यांचा संसार पुन्हा फुलला.
वयाच्या २१ व्या वर्षी तिचे आणि त्याचे वयाच्या २६ व्या वर्षी लग्न झाले. दोघांचा सुखी संसार सुरू झाला; पण अवघ्या ११ महिन्यांनंतर दोघांमध्ये प्रचंड वाद झाले. सासरच्या मंडळींविरोधात ती आणि तिच्याविरोधात सारे उभे ठाकले. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नंतर गुन्हा आणि त्यानंतर कोर्टात हा वाद गेला. अखेर हे प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे आले. दोघांमध्ये समेट घडावा यासाठी मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यवान डोके, प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुधीरकुमार बुक्के, मध्यस्थ न्यायाधीश आर. एम. कपाट यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांच्यातील मतभेद दूर केले. दोघांनीही सकारात्मकता दर्शविल्याने अखेर त्यांचा मोडलेला संसार पुन्हा जोडला गेला आहे. या दोघांनीही एकमेकांसोबत पुढील आयुष्य गुण्यागोविंदाने नांदण्याचा निर्णय घेतला असून तसा शब्द कोर्टाला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामायणावर आधारित बहारदार नृत्याविष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्री संत सेवा संघातर्फे श्रीरामायणातील व्यक्तीरेखांवर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यात आला. परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सोमवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
‘रामायण : आदर्श समाज का स्वर्णचित्र’ या शीर्षकाने हा कार्यक्रम झाला. श्री संत सेवा संघातर्फे २० वर्षांपासून तत्त्वज्ञानातील दिव्य विचारांचा प्रसार समाजामध्ये करण्यासाठी विविध माध्यमातून कार्यरत आहे. या श्रृंखलेतील हा नाविन्यपूर्ण उपक्रम होता. श्री रामायणातील व्यक्तिमत्त्वांनी जे आदर्श जीवन जगून दाखवले ते समाजासमोर आणणे अत्यंत आवश्यक आहे. श्री संत सेवा संघाचे संस्थापक संजय गुरूजी यांच्या मार्गदर्शनातून संस्थेचे कार्यकर्ते संगीतकार जीवन धर्माधिकारी यांनी श्रीरामायणातील व्यक्तिरेखांवर आधारित हिंदी गिते लिहून त्यांना संगीतबध्द केले आहे. कार्यकर्ती नेहा भाट हिने या गीतांवर नृत्संरचना केली होती. प्रत्येक नृत्याविष्काराच्या सुरूवातीला त्या व्यक्तिरेखेची माहिती देण्यात येत होती. ज्येष्ठ शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर यांनी गायलेल्या सूर्यवंशी राम या गीतावर आधारित काही प्रसंग यावेळी सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सोमनाथ मुठाळ, सीमा पछाडे आणि मनीषा विसपुते, दिलीप दीक्षित, नितीन ढगे व चेतन भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोटरी क्लबतर्फे आज शालेय साहित्य वाटप

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रोटरी क्लबने २०२२ पर्यंत शंभर टक्के भारत साक्षरता मोहीम हाती घेतली आहे. शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासास प्रोत्साहन देण्याचे कार्य या मोहिमेतून करण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील तब्बल २३ शाळांमधील सुमारे ११०० विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी रोटरी क्लबने ‘टीच’ उपक्रमांतर्गत शिक्षक प्रशिक्षण, ई लर्निंग, प्रौढ शिक्षण, मुलांचा शैक्षणिक विकास आणि आनंदी शाळा असा पाच कलमी कार्यक्रम आखला आहे. त्याचाच भाग म्हणून रोटरीतर्फे घोटी परिसरातील २३ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता चौथी आणि पाचवीच्या ११०० गरजू विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश, शूज, सॉक्स, पेन्सिल बॉक्स, कंपास पेटी, पाण्याची बाटली, पाच वह्या अशा वस्तूंचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. प्रती किट दोन हजार रुपये मूल्य असलेल्या या साहित्यासाठी रोटरी इंटरनॅशनल आणि अमेरिकेच्या लुईस विले मॉर्निंग क्लबने अर्थसहाय्य दिले आहे. याशिवाय या सर्व शाळांमध्ये नेलकटर आणि हॅण्डवॉश सोप किटचेही वाटप होणार आहे.
सामाजिक उपक्रमांतून समाजाचा विकास साधण्याच्या या उपक्रमाला टिचर्स ट्रेनिंगची गरज आहे. यात गरजूंना मदतीचा हात देऊ इच्छिणाऱ्या दानशुरांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक, दूरध्वनी २५०९८०८ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल यांनी केले आहे. या उपक्रमासाठी सचिव मनीष चिंधडे, विवेक जायखेडकर, उदयराज पटवर्धन, नितीन पाठक, राधेय येवले आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीची कॉलेजमध्ये आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील व्ही. एन. नाईक कॉलेजध्ये बारावीत शिक्षण घेणारी काजल संजय साळवे (१८) या तरुणीने कॉलेजच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. कॉलेजमध्ये गर्दी असतानाच सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विद्यार्थी व संस्थेच्या स्टाफने तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
काजल साळवे सातपूर परिसरातील रहिवासी आहे. ते बारावी कॉमर्स शाखेमध्ये शिक्षण घेत होती. सध्या कॉलेजमध्ये घटक चाचणी परीक्षा सुरू आहेत. तिने सोमवारी परीक्षा दिली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. कॉलेज इमारत आणि कॅम्पसमधील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू होती. घटनेची माहिती समजताच सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.

चित्रपट प्रमोशनपूर्वीच दुर्घटना
व्ही. एन. नाईक कॉलेज शहराच्या मध्यवर्ती परिसरात आहे. बारावीची घटक चाचणीचा पेपर झाल्यानंतर काही वेळात एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही अभिनेते कॅम्पसमध्ये येणार होते. मात्र, तत्पूर्वीच बारावीची विद्यार्थिनी काजलने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. कॉलेजमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने तिला सिव्हिलमध्ये दाखल केले. या वेळी मुलीचे नातेवाइकही दाखल झाले. जोपर्यंत आत्महत्येचे कारण समजत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा तिच्या नातेवाइकांनी घेतला. मात्र, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दिवसभरात संस्थेचे कामकाज बंद ठेवण्यात आले.

घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. वृत्त कळताच संस्थेतील सहकाऱ्यांनी विद्यार्थिनीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ नेले. मात्र, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. कोणतेही टोक गाठण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी तणावाच्या स्थितीत थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे.
- कोंडाजीमामा आव्हाड, अध्यक्ष,
व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णवाहिका सेवेतून जखमींना जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील राज्याच्या हद्दीत आजपर्यंत अपघातातील २ हजार ९८५ जखमींना जीवदान मिळाले आहे. या मार्गावर रुग्णवाहिका सुरू झाल्यापासून १ हजार ९०४ अपघात झाले आहेत. गोंदे फाटा हद्दीत सर्वाधिक अपघात झाले. त्यात तब्बल १ हजार २८९ जखमी प्राण या सेवेमुळे वाचले आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावर सहा ठिकाणी रुग्णवाहिका होत्या. त्यात शहापूर हद्दीत आजपर्यंत ९२३ अपघात झाले, त्यात ६४३ जखमींचे प्राण वाचले. गोंदे फाटा हद्दीत ६४७ अपघात झाले असून त्यात १ हजार २८९ जखमींचे प्राण वाचले. शिरवाळे फाटा (पिंपळगाव) टापूत २२७ अपघात होऊन त्यात ७५५ जखमी झाले. झोडगे हद्दीत ४२ अपघात होऊन त्यातील ७५ जखमींचे प्राण वाचले. शिरपूर (चोपडा फाटा) हद्दीत २८ अपघात झाले. त्यात १५८ जखमी झाले आहेत. सोनगीर हद्दीत ३७ अपघात झाले. त्यात ६५ जखमींचे प्राण वाचले आहेत.
या सर्व जखमींना संस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने रुग्णालयात नेले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले व त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. सध्या या मार्गावर चार रुग्णवाहिका आहेत. अपघात झाला की जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले तर उपचार लगेच सुरू होतात व त्यांचे प्राण वाचू शकतात. हे ओळखून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी मोफत रुग्णवाहिका सेवेचा उपक्रम सुरू केला आहे.
सध्या मुंबई-गोवा महामार्गावर आठ ठिकाणी, मुंबई-गुजरात महामार्गावर तीन ठिकाणी, मुंबई-आग्रा महामार्गावर चार ठिकाणी, मुंबई-हैदराबाद महामार्गावर पाच ठिकाणी, पुणे-बंगळुरू महामार्गावर सहा ठिकाणी, कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर एक रुग्णवाहिका आहे. रुग्णवाहिकांची ठिकाणे तेथील अपघातांच्या संख्येनुसार बदलत असतात.
संस्थानने त्यांच्या चालकांचे मोबाइल नंबर त्या भागात जाहीर केलेल आहेत. त्याशिवाय संस्थानचाही नंबर जाहीर केला आहे. कोठेही फोन आली की नजिकची रुग्णवाहिका अपघातस्थळी जाते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात व रुग्ण गंभीर असेल तर जिल्हा रुग्णालयात दाखल करते. त्यामुळे त्या देवदूत ठरल्या आहेत.

मदतीसाठी येथे साधा संपर्क
रुग्णवाहिका सेवा मोफत आहे. गाडीचा इंधन व चालकाच्या पगाराचा खर्च संस्थानतर्फे दिला जातो. या जखमींकडून वा त्यांच्या नातेवाइकांकडून पैसे घेतले जात नाही. पोलिसांनाही ही सेवा उपयुक्त आहे. सर्व महामार्गावरील रुग्णवाहिकांशी संपर्क साधण्यासाठी ८८८८२६३०३० हा मोबाइल क्रमांक सुद्धा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस मुख्यालयाची जागा कोर्टाच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा सोमवारी (दि. १८) रितसर जिल्हा कोर्टाच्या स्वाधीन करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांच्यासह वकील आणि इतर अधिकारी यावेळी हजर होते.
शहराच्या मध्यवर्ती भागात १९८५ साली स्थापन झालेले जिल्हा कोर्टाला अनेक वर्षांपासून जागेचा प्रश्न सतावतो आहे. कमी जागेमुळे पार्किंगसह वकील, पक्षकार, आरोपी अशा सर्वांच्या दृष्टीकोनातून सुसज्ज इमारतीची गरज असून, कोर्टाच्या पाठीमागील आणि पोलिसांच्या ताब्यातील पाच एकर जागा कोर्टासाठी मिळावी म्हणून अॅड. का. का. वाघ यांनी थेट मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आजमितीस येथे ३१ न्यायाधीश न्यायदानाचे काम करतात. नाशिक कोर्टाला जागा कमी असल्यामुळे कुटुंब न्यायालय, मोटार वाहन न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच स्कुल ट्रिब्युनल हे शहरातील इतर ठिकाणी चालवावे लागतात.

पोलिसांची कार्यालये शिफ्ट
नाशिक कोर्टाच्या पश्चिमेकडील पोलिस हेडक्वार्टरच्या ताब्यात असलेली पाच एकर जागा मिळावी म्हणून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडून २००० पासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना जनहित याचिकेच्या माध्यमातून यश मिळाले. या खटल्याची मुंबई हायकोर्टात काही महिन्यांपूर्वी सुनावणी पूर्ण झाली. त्यात, कोर्टाने अडीच एकर जागा सरकारने कोर्टासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. काही महिन्यापूर्वी भूमीअभिलेख विभागामार्फत मोजणी प्रक्रिया राबवण्यात आली. पोलिस प्रशासनाच्या सात ते आठ इमारतीतील कामकाज दुसऱ्या जागेत हलवण्यात आले.

लवकरच बांधकाम
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे, सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, याचिकाकर्ते का. का. घुगे यांच्यासह वकील संघाचे सदस्य व इतर अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. तसेच पोलिसांच्या ताब्यातील हस्तांतरण कागदपत्रे कोर्ट प्रशासनाला देण्यात आली. कोर्टाच्या नवीन जागेत लवकरच बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन इमारतीत बार रूम, बहुमजली पार्किंग यासह इतर सुविधा उभारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य, भुसार मालाचे झोडगेत होणार लिलाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
येथील बाजार समितीच्या झोडगे उपबाजार आवारात धान्य व भुसार मालाचे लिलाव सुरू करण्यात येतील, तसेच मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर सुरू असलेल्या लिलाव पद्धतीनुसार कांद्याचे लिलाव दररोज दुपारी चार वाजता सुरू करण्यात येतील, असे आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले. शेतकरी बांधवांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात भुसे यांनी तालुक्यातील झोडगे, मुंगसे येथील व्यापारी, आडते, माथाडी कामगार, हमाल मापारी, बाजार समितीचे सदस्य यांची संयुक्त बैठक घेतली. झोडगे येथील ओट्याचे तसेच इतर अपूर्ण राहिलेले काम १५ दिवसात पूर्ण करण्यात येतील, पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी कायमस्वरुपी ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेत पिण्याचे पाणी देऊन गैरसोय दूर करण्यात येईल, आवश्यक सोयी बाजार घटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. बाजार समितीकडून अडचणींची सोडवणूक करण्यात येईल, झोडगे येथे दररोज दुपारी चार वाजता कांद्याचे लिलाव सुरू करण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. तसेच उत्पन्नवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बैठकीस समितीचे उपसभापती सुनील देवरे, सदस्य संग्राम बच्छाव, उमाकांत देसले, संजय घोडके, वसंत कोर, फकिरा शेख, मालेगाव, झोडगे, मुंगसे व्यापारी असोसिएशनचे सचिव अशोक देसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा बळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
दिक्षी (ता. निफाड) येथील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात रविवारी (दि. १७) दोन वर्षीय बालकाचा जीव गेला. देविदास दशरथ प्रधान असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. मोकाट कुत्र्यांनी या भागात दहशत माजवली असून शेळ्या, मेंढ्या यांच्यावरही यापूर्वी हल्ले केले आहेत.
मूळचे पेठ तालुक्यातील असलेले दशरथ प्रधान हे आपल्या कुटुंबीयांसह दिक्षी येथील शेख यांच्या द्राक्षबागेत मजुरीसाठी आलेले आहे. जुन्या रेल्वेलाइनलगत शेख यांच्या वस्तीवरच प्रधान कुटुंब राहते. दशरथ प्रधान यांचा दोन वर्षांचा देविदास हा मुलगा इतर लहान मुलांसोबत रविवारी खेळत होता. तिथे कुत्र्यांची झुंड आली. यातील एका कुत्र्याने देवीदासला फरपटत उचलून बाजूला नेले. यानंतर इतर कुत्र्यांनी देविदासच्या पायाला, अंगाला अनेक ठिकाणी चावे घेऊन शरिराचे लचके तोडले. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने घाबरलेल्या शेतमजुरांनी गावात येऊन ही घटना सांगितली. कुत्र्यांच्या दहशतीमुळे वस्तीवर काम कसे करावे, असा प्रश्न केला. कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यावर तेथे लस उपलब्ध नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

नाशिकमधील कुत्री गावांमध्ये
नाशिक महापालिका हद्दीत पकडण्यात आलेले मोकाट संबंधित विभागाकडून गाडीत घालून पहाटेच्या वेळेस निफाडसह तालुक्यातील इतर ग्रामीण भागात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ग्रामीण भागात अन्न मिळत नसल्याने हे मोकाट कुत्रे एकत्रितपणे हल्ले करीत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातातील जखमी बहिणीचाही मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा इंदिरानगर
पाथर्डी-देवळाली रोडवर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गुरुवारी (दि. १४) तरुण भाऊ ठार झाला होता. याच दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या जखमी बहिणीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी-देवळाली मार्गावरून सागर कासार हा तरुण आपल्या बहिणीला सातपूर येथे सासरी सोडायला जात होता. त्याचवेळी ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार सागर हा जागीच ठार झाला. मात्र मागे बसलेली त्याची बहिण योगिता विकास शिंदे ही गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रविवारी दुपारी सविताचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातात बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्‍त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात तरुणावर गोळीबार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
शहरातील किदवाई रस्त्यावरील सोडा पिण्यास गेलेल्या तरुणावर बंदुकीने गोळी झाडून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. १७) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
जमाल अहमद अब्दुल खालीक (२४, रा. कुंभारवाडा) या तरुणाने पोलिसात फिर्याद दिली. जमाल आणि त्याचा मित्र अकीब हुसेन हे दोघे सोडा पिण्यासाठी ए. टी. टी. हायस्कूलजवळील सोडागाडीवर गेले. त्यांनी कडक सोडा बनविण्यास सांगितले. माझ्याकडे कडक सोडा नाही, असे सांगितल्याने जमाल त्याचावर रागवत असताना सोडागाडीचालकासोबत उभ्या असलेल्या ३० ते ३५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचे व जमालचे भांडण झाले. यावेळी अनोळखी व्यक्तीने त्याच्याजवळ असलेल्या बंदुकीने जमालवर गोळी झाडली. त्यास येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जमालची प्रकृती स्थिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिलाव पूर्ववत; भाव कमीच

$
0
0

टीम मटा
कांदा व्यापाऱ्यांवरील आयकर विभागाच्या धाड सत्रानंतर जिल्हाभरातील कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते. जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेत आदेश दिल्यानंतर कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार सोमवारी सुरळीत सुरू झाले. मात्र नेहमीपेक्षा आवक कमी राहिल्याने भाव देखील खाली आल्याचे ठिकठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये दिसून आले.

मुंगसेत तीन हजार क्विंटल आवक
मालेगाव : मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्रात केवळ तीन हजार क्विंटल आवक झाली. मालेगाव तालुक्यातील उमराणे येथील कांदा व्यापारी खंडू देवरे यांच्यावर गुरुवारी आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर कांदा व्यापारीमध्ये खळबळ उडाली होती. व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र सोमवारपासून येथील मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्रावर कांदा लिलाव सुरू झाले. याची अनेक शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याने कांद्याची नेहमीपेक्षा कमी आवक दिसून आली. मुंगसे येथे केवळ तीन हजार क्विंटल आवक झाल्याची माहिती सचिव अशोक देसले यांनी दिली. तर कांद्याचे भाव ३०० रुपयांपर्यंत खाली आले. दुपारनंतर भाव सरासरी एक हजार १०७ रुपयांवर स्थिरावले. कांद्याला कमाल भाव एक हजार ३०४ रुपये इतका मिळाला.
उमराणे बाजार समितीच्या आवारातही लिलाव सुरू झाले असले तरी सकाळच्या सत्रात आवक कमी होती. दुपारनंतर आवक वाढल्याने दिवसभरात सुमारे १० क्विंटल आवक झाल्याची माहिती सचिव नितीन जाधव यांनी दिली. उमराणे बाजार समितीतही कांद्याचे भाव स्थिर होते.‌ किमान ९०० रुपये आणि कमाल एक हजार ५०० रुपये तर सरासरी १ हजार २०० रुपये इतका भाव होता.

पिंपळगावात सरासरी ११२५ रुपये
पिंपळगाव बसवंत : लिलाव बंद व दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी पिंपळगाव बसवंत बाजार समिती लिलाव पूर्ववत सुरू झाले. सुमारे ३०७ ट्रॅक्टर, ७६ जिपमधून नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल १६२०, किमान ८२५ तर सरासरी ११२५ रुपये क्विंटलने कांद्याची विक्री झाली. दोन दिवस बाजार बंद राहूनही दरात मात्र फारसा फरक पडला नाही.

सटाण्यात आज लिलाव
सटाणा : कांदा व्यापाऱ्यांकडे खरेदी केलेल्या मालाला ठेवण्यासाठी जागा नसल्याने सोमवारी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला. कांदा लिलाव मंगळवार (दि. १९) दिवसभर करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. बुधवारी (दि. २०) सर्वपित्री अमावस्या तर गुरूवार (दि. २१) घटस्थापना असल्याने बाजार समिती बंद ठेवून शुक्रवारी (दि. २२) कांदा लिलाव होणार आहे. या सप्ताहात सटाणा बाजार समितीत अवघे दोनच दिवस कांदा लिलाव होणार असल्याने कांदा उत्पादक चिंतेत आहेत.
सटाणा शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाने सद्यस्थितीत जोर पकडला आहे. यामुळे बाजार समिती आवारात कांदा खरेदी करणे आणि तो साठवून ठेवणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. कांदाचाळीत कांदा साठवून ठेवलेला असला तरीही कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणण्यासठी उत्सुक आहे. मात्र, कांदा बाजार येत्या सप्ताहभरात अवघ्या दोनच दिवस सुरू राहणार असल्याने शेतकरी हताश झाला आहे.

दरात तीनशे रुपयांची घसरण
येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी लिलाव सुरू होताना शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी उन्हाळ कांद्याचे बाजारभाव पूर्वीच्या तुलनेत सरासरी तब्बल तीनशे रुपयांनी खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली.
यंदाच्या हंगामात ऑगस्टमध्ये प्रतिक्विंटल सुमारे अडीच हजार रुपये भाव दिलेला उन्हाळ कांदा चालू सप्टेंबरमध्ये खाली आला. प्राप्तीकर विभागाकडून कांदा व्यापाऱ्यांवर छापा टाकण्यात आल्यानंतर बाजारभाव अधिकच गडगडला. स्थानिक व्यापाऱ्यांनी शुक्रवार व शनिवारी पाठ फिरवल्याने बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवरासह अंदरसूल उपबाजार आवारातील लिलाव बंद होते. व्यापारी वर्गाने सोमवारी लिलावात सहभाग घेतल्याने सरासरी पावणे तीननशे रुपयांनी कांद्याचे दर घसरले. गेल्या आठवड्यातील सोमवारी उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ६०० ते कमाल १ हजार ६५० (सरासरी १ हजार ४००) रुपये असा बाजारभाव मिळाला होता. सोमवारी सकाळच्या सत्रात किमान ५०० ते कमाल १ हजार ४६६ (सरासरी १ हजार १५०) असा बाजारभाव मिळाला. सोमवारी दुपारच्या सत्रात दर पुन्हा खाली आले. दुपारी किमान ५०० ते कमाल १ हजार ३५० (सरासरी १ हजार १२५) असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, महिनाभरापूर्वी चांगला भाव मिळेल या आशेने चाळीत उन्हाळ कांदा साठविलेल्या उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावासाठी पाचशे ते सहाशे ट्रॅक्टर्स येतात. मात्र, सोमवारी सकाळी २६३ ट्रॅक्टरचे लिलाव होताना, दुपार सत्रात अवघे शंभरच्या आसपास ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडून लिलावासाठी आणले गेले. सकाळच्या सत्रात मिळालेला कांदा बाजारभाव हा समाधानकारक नसल्यानेच नंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. येवला बाजार समितीच्या येवला मुख्य आवारात सोमवारी दिवसभरात एकूण ३६३ ट्रॅक्टरमधून जवळपास सात हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.


लासलगाव, चांदवडमध्ये लिलाव नाही

बाजार समितीत पावसाचे पाणी साचल्याने लासलगावमध्ये लिलाव होवू शकले नाही. तसेच रविवार व सोमवारी बंद वार असल्याने चांदवड येथेही लिलाव हरोऊ शकले नाहीत. जिल्ह्यातील उर्वरित इतर १३ कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी लिलाव झाले. त्यात कांद्याचे कमाल दर १ हजार ३५० रुपये तर किमान दर ९०० रुपये प्रतिक्विटंल होते. सरासरी दर हे १ हजार १०० रुपये होते. छापा पडण्यापूर्वी दर होते तेच या लिलावत असल्यामुळे त्यात फारसा बदल झाला नाही.

प्राप्तिकरची छाननी सुरू
प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्यानंतर तीन दिवसानंतर गडकरी चौकातील कार्यालयात कागदपत्राच्या छाननीचे काम सुरू केले आहे. त्यात सर्व व्यवहार तपासले जात असून उर्वरित माहिती मागवली जात आहे. या कारवाईनंतर व्यापाऱ्यांच्या ‘सीए’च्या प्राप्तिकर विभागात फेऱ्या वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामदेवतेचा रंगणार उत्सव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, गुरुवारी घटस्थापना होणार असल्याने पहिल्या माळेपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

नाशिकचे कुलदैवत असणाऱ्या कालिका मातेच्या मंदिराची सजावट पूर्ण झाली असून मंदिराला विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी महापूजा होणार असून त्यानंतर दहा दिवस देवी घटी बसणार आहे. दहा दिवस या परिसरात यात्रोत्सव होत आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. २१ सप्टेंबर, घटस्थापनेपासूनच ग्रामदैवत असलेल्या कालिकामातेची यात्रा भरणार असून तब्बल दहा दिवस चालणारी ही यात्रा पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा असल्याने बऱ्याच घडामोडी येथे घडतात. १५ ते २० लाख भाविक येथे यात्रेदरम्यान हजेरी लावत असल्याने त्यांच्वा सुरक्षिततेसाठी बंदोबस्त ठेवण्यात येतो.

कालिकामातेला रोज पहाटे २ ते ४ या वेळेत गुलाबपाणी, पंचामृत, शुध्द पाण्याने अभिषेक करुन साडी नेसवली जाते व पूर्ण साज शृंगार केला जातो. रोज सकाळी ६ वाजता व संध्याकाळी ७ वाजता आरती केली जाते. हे सर्व मंदिराचे पुजारी करतात. यंदाच्या यात्रोत्सवातही श्री कालिका मातेला आकर्षक सुवर्णलंकार करण्यात येतात. कालिका माता ग्रामदैवत असल्याने स्थानिक भाविकांबरोबर इतर भाविकांची देखील अपार श्रद्धा या देवीवर आहे. भक्तांना पावणारी देवी म्हणून कालिका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक श्रद्धेने येतात.

यात्रा काळात देवीदर्शनासाठी नाशिक जिल्ह्यासह धुळे, नगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, मुंबई इत्यादी जिल्ह्यातील भाविक येत असतात. या भाविकांसाठी राहणाऱ्या सोयी सुविधांसह त्यांच्या सुरक्षिततेसाठी २४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे कालिका मंदिराचे २०० हून अधिक स्वयंसेवक भाविकांच्या सेवेत रहाणार आहेत. यात्राकाळात २४ तासांसाठी मंदिर भाविकांना खुले राहणार आहे. रांगेत उभे राहू न शकणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्टने मुखदर्शनाची स्वतंत्र रांग करत खास व्यवस्था केली आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर, जुना आग्रा रस्त्यावरील वाहतूक सकाळी पाच ते दहा आणि दुपारी चार ते रात्री बारा या कालावधीत दररोज बंद ठेवण्यात येते. यात्रोत्सवात दररोज साधारणत: दीड लाख भाविक कालिका मातेच्या दर्शनासाठी येतात, असा ट्रस्टचा अनुभव आहे. दर्शनासाठी महिला व पुरूषांच्या स्वतंत्र रांगा असतात. यात्रोत्सवाच्या काळात जुन्या आग्रा रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्याने पोलिस यंत्रणेने सुरक्षा यंत्रणेबाबतचे कडक नियम केले आहेत.

कालिका मातेच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

श्री कालिका माता ही बाल्यस्वरुप कुमारीकेची मूर्ती आहे. तिचे स्वरुप चंडिकेसारखे नसून अतिशय सात्विक रुप आहे. देवीच्यामागे नऊ फण्यांचा शेष आहे आणि तिच्या चरणी तीन राक्षसांची मुंडकी आहेत व त्यावर देवी उभी आहे. तिच्या उजव्या हातात त्रिशुल व तलवार आहे व डाव्या हातात डमरु व खडग आहे. राक्षसाला मारल्यानंतर त्याचे रक्तगोळा करण्याकरिता असलेले खापराचे कमंडलुसारखे भांडेही आहे. प्रारंभी हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. पण १०० वर्षांपूर्वी तिवारी, मेहेर, वाजे यांनी श्री लक्ष्मीमाता व श्री सरस्वती मातेची मूर्ती मंदिरासाठी दिली. नंतर कालिका मातेच्या उजव्या बाजूला लक्ष्मीमाता व डाव्या बाजुला सरस्वती मातेची स्थापना करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधी जयंतीपासून खादीवर सवलत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

महात्मा गांधी जयंती (दि. २ ऑक्टोबर)पासून १४ नोव्हेंबरपर्यंत खादीवर १० टक्के सवलत देण्याचा निर्णय नाशिक जिल्हा सहकारी खादी व ग्रामद्योग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. खादी जीएसटीमुक्त केल्याबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला.

ही सभा मराठा मंगल कार्यालय, मेनरोड येथे पद्माकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्हाइस चेअरमन शंकराव बर्वे, सचिव मानिनी कन्सारा, अंजली दामले, रमेशचंद्र घुगे, प्रमोद गर्गे, दिलीप मोरे, काशीनाथ निमसे, कैलास सोनवणे, मकरंद सुखात्मे, केदारनाथ सूर्यवंशी, अजय तांबट आदी उपस्थित होते.

जॅकेट, साड्या, अगरबत्त्या आदी खादी भांडारमध्ये उपलब्ध असून,नागरिकांनी खादी भांडारला भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. संस्थेचे एकूण १४०९ सभासद असून, यावर्षी ४ लाख ५१ हजार रुपये नफा झाल्याची माहिती बर्वे यांनी दिली. संस्थेचे मागील वर्षाचे इतिवृत्त वाचून सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थापक तथा स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर पांडुरंग करंजकर, डॉ. यशवंत पाटील, शांताराम निगळ यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images