Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लेखनगोडीने सापडतो आपल्यातील लेखक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

माणसांच्या दैनंदिन जीवनातील साध्यासुध्या घटनांमध्ये साहित्यलेखनाचे विषय दडलेले असतात. माझ्यातील कांदबरी लेखक अशाच घटनांमधून जन्माला आला. शालेय वयात लिहिण्याची गोडी निर्माण झाल्यास व चांगले शिक्षक, मित्र व संस्कार मिळत गेल्यास आपल्यातील लेखक आपल्याला सापडतो, असे प्रतिपादन साहित्यिक, लेखक डॉ. राजेंद्र मलोसे यांनी केले.

येथील मसगा महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद‌्घाटन मलोसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. मलोसे यांनी साहित्यनिर्मिती प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. आपण कांदबरी लेखनाकडे कसे वळालो याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अनुभव कथन केले.

प्राचार्य डॉ. वाय. टी. पवार हे अध्यक्षस्थानी होते. तर उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम, पी. ए. आहिरे, डॉ. अनिता नेरे, मंडळाचे अध्यक्षा डॉ. विद्या सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राहुल मोरे व कामेश गायकवाड यांनी स्वागतगीत सादर केले. राज त्रिभुवन यांनी सूत्रसंचलन केले. महाविद्यालयाचे आर. एच. शेलार, जयवंत कट्यारे, जे. वाय. इंगळे उपस्थित होते. प्रा. सादिया परवीन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आताच घ्या साहित्याचा आनंद

विद्या सुर्वे म्हणल्या, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातच साहित्यातील सर्व प्रकारांचा रसस्वाद घेतला पाहिजे. यासाठी वाड्मयीन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पवार यांनी शाळा महाविद्यालयात लेखन, वाचनाचे छंद जोपासले तर आयुष्य सुंदर होते, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपची ‘स्वीकृत’ ओढाताण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपला महपालिकेत सत्तेत येवून सात महीने लोटले तरी, तीन स्वीकृत सदस्यांची निवड करता येत नसल्याचे चित्र आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी पालकमंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांमध्येच मोठी रस्सीखेच सुरू झाल्याने शनिवारीही स्वीकृतच्या नावांवर एकमत होवू शकले नाही. त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा मुहूर्त आता दुसऱ्यांदा हूकला असून, भाजपच्या अंतर्गत कुरूबुरीने आता प्रशासनही हतबल झाले आहेत.

महापालिकेत सख्याबळानुसार भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस होता. भाजपने तीन सदस्य निवडीसाठी ३८ इच्छुकांची यादी प्रदेश भाजपकडे पाठविली होती. तर शिवसेनेने दोन सदस्यांसाठी १२ जणांची यादी मातोश्रीवर पाठवली होती. यासाठी महापालिकेने यापूर्वी दोनदा मुदतवाढ दिल्याने शनिवारी कोणत्याही परिस्थितीत अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा होती. परंतु भाजपमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे शनिवारचा मुहूर्तही हूकला आहे. गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी आयुक्तांना पत्र लिहून महिनाभराची मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली आहे.

शिवसेनेची भाजपला मदत?

आपल्याच कार्यकर्त्याची वर्णी लावावी यासाठी पालकमंत्री, भाजप शहराध्यक्ष व आमदारांमध्ये मोठी रस्सीखेच आहे. पदाधिकाऱ्यांमध्येच एकमत होत नसल्याने प्रदेश पातळीवरील नेत्यांनी निर्णयच राखीव ठेवला आहे. सुत्रांनी दिलेल्या माह‌ितीनुसार भाजपने दोन नावांवर शिक्कामोर्तब केले असले तरी, एका नावावर मात्र एकमत होत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजपला थेट शिवसेनेलाच साकडे घालावे लागले. भाजपने विनंती केल्याने शिवसेनेने आपल्या इच्छुकांचेही अर्ज दाखल न करता भाजपला मदत केली. त्यामुळे या निर्णयाने आता प्रशासनापुढे पेच पडला आहे.


प्रशासनही झाले हतबल

महापालिका निवडणुकांनंतर पहिल्या महिन्यातच ही प्रक्रिया संपायला हवी होती. परंतु आतापर्यत दोन वेळा अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ माग‌ितली गेली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, १६ सप्टेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती. परंतु शनिवारीही अर्ज दाखल झाले नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. संख्याबळानुसार भाजप व सेनेचेच सदस्य द्यावे लागणार असल्याने इतरांना संधी देता येत नाही, या पक्षांची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. तरीही आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी मुदतवाढीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे.


पालकमंत्री कोटी अडला

पक्षातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड मंडलमधील एक पदाधिकारी, पक्षाचे कार्यालय सांभाळणारा एक पदाधिकारी अशी दोघांची नावे निश्चित आहेत. परंतु तिसऱ्या नावावरून पक्षात संघर्ष सुरू आहे. पक्षाचेच माजी शहराध्यक्षांच्या मुलाचे नाव चर्चेत आहे. परंतु या नावाला भाजपच्याच एका आमदाराचा तीव्र विरोध आहे. तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनीही आपल्या एका समर्थकांच्या नावावर आग्रह धरला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनाही अखेर निवडीबाबत आस्ते कदम घ्यावे लागले असून, निवडच महिनाभर लांबणीवर टाकावी लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून निष्ठावंतांना संधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

भाजपमध्ये स्वीकृतपदासाठी ओढाताण असतांना शिवसेनेने मात्र आपल्या कोट्यातील दोन जागांसाठी निष्ठावंत शिवसैनिकांना संधी देवून वेगळाच संदेश दिला आहे. शिवसेनेने शनिवारी दोन जागांसाठी चार जणांची नावे जाहीर केली असून, अर्ज छाननी नंतर अंतीम दोघांची निवड केली जाणार आहे.

सुनील गोडसे, राजू वकासरे यांच्यासह अलका गायकवाड व महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. शामला दीक्षित यांचा त्यात समावेश आहे. चारही सदस्य हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून सामान्य कुटूंबातील आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची शिवसेनेची परंपरा असल्याचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांग‌तिले आहे.

स्थानिक नेत्यांकडून दोन सदस्यपदासाठी मातोश्रीवर १२ नावे पाठवली होती. त्यापैकी पक्षाचे सचिव व खासदार अनिल देसाई व संपर्क प्रमुख आमदार अजय चौधरी यांनी चार नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. चौघांनाही अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले असून, त्यातून अंतीम दोघांच्या नावावर निर्णय घेतला जाणार आहे. परंतु शिवसेनेने स्वीकृतपदासाठी पाठविलेली नावे ही कोणी मोठे पदाधिकारी व कार्यकर्ते नसून ते निष्ठावान व सामान्य शिवसैनिक आहेत.

न्यायाची परंपरा कायम

सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यापूर्वी शिवसेनेने राजकुमार सूर्यवंशी व दादाजी आहेर, या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वीकृतची संधी दिली होती. तीच परंपरा आताही जपली आहे. शिवसेनेत प्रत्येकाला न्याय मिळतो असा संदेश दिल्याचे विजय करंजकर यांनी सांग‌तिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नमस्कार, बसमध्ये आपले स्वागत आहे…

$
0
0

नाशिक : एसटी प्रवास म्हंटला की वैताग हा ठरलेलाच. सीट मिळलेच याची खात्री नाही, बसमधील अस्वच्छता, दुर्गंधी आणि यावर कडी म्हणजे सतत खेकसणारे आणि प्रवाशांना वैतागलेले कंडक्टर. ही सगळी ओळख पुसून काढत एसटीत बसणाऱ्यांचे मराठीसह हिंदी आणि इंग्रजीत स्वागत करण्यापासून ते त्यांना हवंनको ते पाहण्यापर्यंत एक अवलीया कंडक्टर एका तपापासून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद जोपासत आहेत. सोपान जवणे असे त्या वाहकाचे नाव असून, त्यांच्या बसमधील अतिथी देवो भवः मुळे अनेक प्रवासी हसतमुखाने बस प्रवास करीत आहेत.

सोपान जवणे इतर कंडक्टर्सपेक्षा खूपच वेगळे आहेत. २०१२ मध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १३ टक्के भाडेवाढ केली. भाडेवाढ गैर नाही पण महामंडळाने चांगली सेवाही द्यायला हवी, अशा आशयाचे वाचकाचे पत्र जवणे यांनी वर्तमानपत्रात वाचले. त्याच दिवसापासून त्यांनी प्रवाशांना चांगली आणि समाधानकारक सेवा देण्याचा निश्चय केला. मुळचे कर्जत तालुक्यातील मिरजगावचे असलेले जवणे परिवहन महामंडळात १९८९ मध्ये रूजू झाले. सध्या ते श्रीगोंदा आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. श्रीगोंदा आगाराच्या जळगाव किंवा नाशिक बसमध्ये ते सेवा देतात.

परिचयापासून बरेच काही…

प्रत्येक स्थानकातून बस मार्गस्थ होताना ते येणाऱ्या नवनवीन प्रवाशांचे स्वागत करतात. सर्वप्रथम स्वत:चा तसेच बसचालकाचा परिचय करून देतात. बस कोणकोणते थांबे घेईल, याची माहिती देतात. बसमध्ये घाण करू नका, थुंकु नका तसेच धुम्रपानही करू नका असे कळकळीचे आवाहन करतात. मळमळणाऱ्या प्रवाशांना ते स्वखर्चाने लवंग, वेलदोडा तसेच प्लास्ट‌कि पिशवीही देतात. सुटे पैसे नाहीत या सबबीखाली प्रवाशाचा रुपया देखील ठेऊन घेतला जाणार नाही, हे अत्यंत नम्रपणे सांगतात. इतके करूनही आमच्याबद्दल काही तक्रार असेल, सूचना असतील तर त्या कोठे करायच्या याची माहितीही जवणे प्रामाणिकपणे देतात. त्यांचा हा उपक्रम प्रवाशांसाठी सुखद धक्का ठरत आहे.

जवणे यांचा ही सेवा यूट्युबहवरही लक्ष वेधत आहे. त्यांच्या या सेवेचे धावत्या बसमध्ये शुटींग करण्यात आले असून, आतापर्यंत ३९ हजार ६१२ जणांनी हा व्ह‌डि‌िओ पाहिला आहे. अनोळखी चेहऱ्यांवर हास्य फुलविणारा हा व्ह‌डि‌िओ ‘एकला चलो रे’ या नावाने जगभरात पोहोचला आहे.

विमानात प्रवाशांना चांगली सेवा मिळते, तर आपण बसमध्येही का देऊ नये हा विचार मी केला. प्रवाशांचे समाधान व्हावे हा उद्देश आहे. काही प्रवासी टिंगल करतात तर काही टाळ्या वाजवून दाद देतात. कामावर आल्यावर व घरी जाताना बस स्वच्छ करतो.

--सोपान जवणे, कंडक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीवर ग्रामस्थ ठाम!

$
0
0

दीपक महाजन, कळवण

प्रशासनाने गडावरील बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला असला, तरी वर्षांनुवर्ष सुरू असलेली परंपरा आम्ही खंडित करणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांसह भाविकांनी घेतली आहे. दसऱ्याच्या दिवशी गडावर बोकडबळी देणारच, असे परखड मत ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बोकडबळीचा प्रश्न आता पेटणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १९) होणाऱ्या बैठकीत यावर खडाजंगी होण्याचीही चिन्हे आहेत.

गेल्या वर्षी ही प्रथा सुरू असताना हवेत मानवंदना दिल्यानंतर गोंधळ उडाला होता. त्यामुळे १२ जण जखमी झाले होते. भविष्यात या प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घेत कळवणचे प्रांत अर्जुन श्रीनिवासन व तहसीलदार कैलास चावडे यांनी बोकडबळीची प्रथा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाविकांची निराशा झाली आहे.

अशी होती प्रथा

सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या दिवशी सहस्रचंडी यज्ञाच्या आहुतीसाठी बोकडाचा बळी दिला जातो. प्राचीन काळापासून रूढी व परंपरेने ही प्रथा सुरू आहे. गडावरील शिवालयापासून वाजत गाजत बोकडाची मिरवणूक काढण्यात येऊन ट्रष्ट कार्यालयात त्याची विधिवत पूजा होत होती. तेथून पहिल्या पायरीजवळ महिषासूर महाराजांच्या दर्शनानंतर उंबराच्या झाडाखाली दसरा टप्पा नावाच्या जागेत शेकडो ग्रामस्थ, भाविक, पर्यटकांच्या समोर बोकडबळी दिला जात असे. यादरम्यान

मानवंदना म्हणून हवेत फायरिंग

केली जायची. यावेळी उपस्थित ग्रामस्थ, भाविक व काही देवस्थानचे कर्मचाऱ्यांमध्ये झुंबड उडायची. बळी दिल्यानंतर बोकडाच्या उडालेल्या रक्तात चलनी नोटा भिजवण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होत असे.

ग्रामस्थांचा समज

ग्रामस्थ व गड देवस्थान प्रशासन यांच्यात सातत्याने खटके उडत असतात. म्हणून ही प्रथा ट्रस्टने बंद केल्याचा समज ग्रामस्थांचा झाला आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्ट प्रशासनाला भाविकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारच्या बैठकीत याचे पडसाद उमटणार आहेत.


…तर कायदेशीर कारवाई

तुळजापूर, कोल्हापूर या शक्तीपीठांमध्ये अशा प्रथांना बंदी आहे. कुठल्याही पशूंची क्रूरपणे हत्या करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. मात्र रूढी व परंपरेचा दाखला देत गडावर आजपर्यंत ही प्रथा सुरू होती. यंदा ही प्रथा अचानकपणे बंद करण्यात आली असल्याने गड ग्रामस्थ व काही भाविकांची नाराजी व्यक्त होत आहे. देवस्थान ट्रस्टने हा प्रयोग बंद न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महसूल प्रशासनाने दिले आहेत.

अनेक वर्षांपासूनची परंपरा खंडित करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा प्रश्न गडावरील ग्रामस्थांनी विचारला. बैठकीत आपण स्वतः या निर्णयाला विरोध केला. आज पशुहत्येचे नाव पुढे करून ही प्रथा बंद करण्याचा प्रशासनाचा डाव आम्ही हाणून पाडू. दसऱ्याच्या दिवशी बोकडबळीचा विधी होईलच.

- गिरीश गवळी, ग्रा. प. सदस्य, सप्तशृंग गड

आसुरी शक्तींवर विजय मिळवत सुरक्षितता निर्माण होण्यासाठी नवमीच्या दिवशी शतचंडी याग करत आहुती दिली जाते. बोकडाचा बळी दिला जातो. प्राचीन काळापासून ही परंपरा चालू आहे. ती अशी एकाएकी खंडीत करू नये.- श्रीकांत दीक्षित, मंदिराचे पुजारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गड प्रशासन दर्शनसेवेसाठी सज्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नवरात्रोत्सवासाठी गड प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यातील सप्तशृंग देवी गडावर २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याबाबतची नियोजन बैठक प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, गड व नांदुरी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

रस्त्यावरील खड्ड्यांवर त्वरित तोडगा काढा

बीएसएनएल सेवा अखंडित ठेवण्यावर भर

व्यावसायिकांच्या अतिक्रणावर असणार लक्ष

प्लॅस्टिक बंदी कायम ठेवून कापडी पिशव्यांना प्राधान्य

गडावरील सांडपाणी, स्वछतागृह हागणदारीमुक्तीबाबत सूचना

अखंडपणे वीजपुरवठासाठी वीज वितरण कंपनी सज्ज

अन्नदानासाठी रोख किंवा शिधा स्वरूपात आपली देणगी

बोकडबळी प्रथेबाबत अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई

अवैध दारू विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष

स्वछता अभियान राबविण्यात येणार

नांदुरी ग्रामपंचायत तात्पुरती स्वछतागृह उभारणार

असा असेल फौजफाटा

एक अतिरिक्त अधीक्षक

२ डीवायएसपी

१० निरीक्षक

१५ उपनिरीक्षक

२०० पोलिस कर्मचारी

५० महिला कर्मचारी

२५० होमगार्ड

एसआरपीएफची टीम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केट बंदमुळे कळवणला रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कांदा भाव पाडण्याचे धोरण, कांदा व्यापाऱ्यांवर धाडसत्र आणि पर्यायाने मार्केट बंदमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या सर्व प्रकारामुळे कांदा पीक वाया जाऊ नये म्हणून मार्केट त्वरित सुरू व्हावे या मागणीसाठी कळवणला भाजप सरकारच्या विरोधात सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

शासनाने कांदा निर्यात शुल्कावरील केलेली वाढ व कांद्याच्या भावात घसरण करण्यासाठी होणारे प्रयत्न यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच कांदा व्यापाऱ्यांवर धाडसत्र सुरू केल्याने मार्केट बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा आहे. मार्केट बंद राहिल्याने शेतकऱ्यांचा कांदा पडून आहे. पर्यायाने तो सडत आहे. शेतकऱ्यांचा कांदा विकण्यायोग्य राहू नये म्हणून चालवलेला खटाटोप म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचाच प्रकार आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी शासनाचा समाचार घेतला.

पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. मात्र आंदोलनामुळे कळवण-नाशिक व देवळा रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तासभर चाललेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, रवींद्र देवरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शांताराम जाधव, शिवसेनेचे कारभारी आहेर, स्वाभिमानी संघटनेचे गोविंद पगार, घनःश्याम पवार, विलास रौंदळ, प्रवीण रौंदळ आदींनी निषेध नोंदवला. यावेळी कौतिक पगार, संजय पवार, चंद्रकांत पवार, पोपट पवार, शिवसेनेचे जितेंद्र वाघ, संभाजी पवार, विनोद मालपुरे, किशोर पवार, नाना देवरे, छावा संघटनेचे प्रदीप पगार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला बाजार समितीत दिवसभर शुकशुकाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला बाजार समितीतील कांदा खरेदीदार व्यापाऱ्यावर कांदा खळे, गोदाम तसेच शहरातील राहत्या घरी गुरुवारी प्राप्तीकर विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीनंतर कांदा व्यापाऱ्यांनी गेले दोन दिवस कांदा लिलाव बंद ठेवले.

कांदा लिलाव बंद असल्याने शुक्रवार पाठोपाठ शनिवारीही कोणताही शेतकरी आपला कांदा घेवून येवला बाजार समितीकडे फिरकला नाही. परिणामी एरवी कांदा लिलावाच्या निमित्ताने चांगलेच गजबजणारे येथील बाजार समितीचे आवार अक्षरशः ओस पडताना सलग दुसऱ्या दिवशी आवारात शुकशुकाट होता.

जिल्हाभरात अनेक कांदा व्यापाऱ्यांवरील धाडसत्रामुळे कांदा व्यापाऱ्यांनी दोन दिवस लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवार व शनिवार दोन दिवस येथील कांदा लिलाव बंद राहिले. रविवारी साप्ताहिक सुटीचा वार असून सोमवारी लिलाव होतात की नाही याकडे लक्ष लगाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ते’ जपताहेत दुर्मिळ हस्तलिखितांचा खजिना!

$
0
0

नाशिक ः वयाची साठी ओलांडल्यानंतर अनेकजण भक्तीमार्गाकडे वळतात. परंतु, सिडको येथे रहाणारे चंद्रकांत जैन वयाच्या ८४ वर्षीही आपल्या आवडत्या छंदाकडे लक्ष देत असून, त्यांच्याकडे १८१८ सालापासूनचा दुर्मिळ हस्तलिखितांचा खजिना आहे. त्याचे संशोधन करणे हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. ‘पोस्ट’ ही संकल्पना सुरू झाल्यानंतरची ब्रिटिशांनी तयार केलेली पोस्टकार्डे व शिक्के नसलेली चांदीची नाणी हेदेखील त्यांच्या संग्रहात आहेत.

चंद्रकांत जैन यांचे बालपण पारोळा येथे गेले. तेथे अकरावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. या कालावधीत जळगावमधून नाशिक जिल्ह्यात त्यांची बदली झाली. पुढे ते नाशिकमध्येच स्थायिक झाले. नाशिकमध्ये येताना त्यांच्या वड‌िलांनी दिलेली हस्तलिखितांची पिशवी आणायला ते विसरले नाहीत. त्यात मोठ्या प्रमाणात हस्तलिखितांचा खजिनाच होता. त्यांच्याकडे १८१८ सालातील सर्वात दुर्मिळ असे ‘कळसूत्री घोडे’ हे पुस्तक, १८५६ सालातील ‘भाऊंच्या वीरकथा व पानिपत कुरुक्षेत्रवर्णन’ ही हस्तलिखिते आहेत. त्याचप्रमाणे शलापत्रकाचे शेकडो अंक त्यांच्या संग्रही आहेत. ‘टायटॅनिक’ची मूळ कथा व त्याचा कप्तान कॅप्टन स्मिथ याचा फोटोदेखील त्यांच्या संग्रही आहे. १२ एप्रिल १९१३ रोजी अंमळनेर येथील व्यंकटेश नाथो चव्हाण यांनी लिहिलेले ‘तिरुपती व्यंकटेश चरित्र’ही त्यांच्या संग्रहात आहे. या चरित्रात व्यंकटेश बालाजीचा शिष्य असलेला नेलप्पा वैश्य व त्याचा मित्र काशिम यांच्या खटल्यात खुद्द बालाजी यांनी साक्ष दिली होती. त्याचा संपूर्ण वृत्तांत या पुस्तकात देण्यात आला आहे.

संग्रहाला कशी सुरुवात झाली याबद्दल ते म्हणाले की, लहानपणापासून जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड होती. पुढे नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी फिरणे झाले. या भटकंतीतून अनेक दुर्मिळ कागदपत्रे हाती येत गेली व हा संग्रह आयुष्याचाच एक भाग बनून गेला. त्यांचे कलेक्शन पाहून अनेक मित्रांनी व नातेवाईकांनीदेखील त्यांच्या संग्रहाला हातभार लावला. संग्रहात इ. स. १८०० पासूनची हस्तलिखिते, पोस्टाची तिकिटे व नाण्यांचा संग्रह आहे. भारतात अनेकदा खोटी नाणी तयार केली जातात. त्यांच्या संग्रहात सर्व नाणी खरी आहेत. भारतीय नाणी, तिकिटे यांचा संग्रह तर आहेच. परंतु, विदेशी नाणी, तिकिटे यांचादेखील संग्रह त्यांच्याकडे आहे. केवळ संग्रह करून ते थांबले नाहीत, तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन मिळावे यासाठी ते दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करीत असतात.

पुढच्या पिढीला याची माहिती व्हावी यासाठी ही तळमळ आहे. जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो. अजूनही अनेक लोक संग्रहासाठी वस्तू आणून देत असतात. त्याच्या मेंटनन्समध्ये दिवस जातो. नवीन नाणे संग्रहात आल्यानंतर किंवा नवीन हस्तलिखित सापडल्यानंतर जो आनंद मिळतो त्याची गणना कुणी करूच शकत नाही.

- चंद्रकांत जैन, संग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांचा फेरा चुकेना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावर महत्त्वाच्या ठिकाणीच खड्डे पडल्यामुळे वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत. अशा खड्ड्यांमध्ये वाहने आदळण्याचे प्रकार नित्याचेच झाले असून, मोठ्या अपघाताची धास्ती चालकांत निर्माण झाली आहे. असे धोकादायक खड्डे बुजविण्यासाठी पावसाळा संपण्याची प्रतीक्षा करणारे प्रशासन एखादा बळी घेतल्यानंतरच हे जीवघेणे खड्डे बुजविणार का, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी केला आहे.

द्वारका येथून नाशिकरोडकडे येतानाचा मार्ग हा बरा आहे. मात्र, नाशिकरोडहून द्वारकाकडे जातानाच्या रस्त्यावर जागोजागी भलेमोठे खडले पडलेले आहेत. बिटको चौकातील खड्डे अखेर पोलिसांनी रिक्षाचालकांच्या मदतीने स्वतः बुजविले. दत्त मंदिर चौकात दोन दिवसांपूर्वीच पाइपलाइनसाठी रस्ता फोडण्यात आला. त्याचे अद्याप डांबरीकरण झालेले नाही. दत्त मंदिर चौकातील पॅचेस काढून संपूर्ण डांबरीकरणाची गरज आहे.

--

उपनगर परिसर जीवघेणा

उपनगरचा बस स्टॉप हटविल्यानंतर तेथे पडलेला भलामोठा खड्डा तसाच कायम आहे. येथे चार खड्डे आहेत. ते दिवसा टाळून पुढे जाता येते. मात्र, त्यात पाणी साचल्याने रात्री अंदाज येत नाही. या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे येथील बस स्टॉप हटवूनही वाहतुकीचा खोळंबा कायमच आहे. हिरवा सिग्नल सुरू झाला, तरी या खड्ड्यांमुळे पुढे जाता येत नाही. या चौकातील अपघातांत अनेकांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे येथील खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे झाले आहे.

--

द्वारका चौक घातक

द्वारका चौकातून तेरा रस्ते जातात. या चौकात प्रचंड वर्दळ, तसेच पुढे जाण्याची जीवघेणी चढाओढ असते. वाहतूक पोलिसांनाही वाहनचालक जुमानत नाहीत. या चौकातील सर्कलभोवती इतके मोठे खड्डे पडलेले आहेत, की चारचाकी मोठी वाहनेही थांबूनच पुढे जाऊ शकतात. मारुती मंदिरासमोरील खड्डा अद्यापही बुजविलेला नाही. काही मोठ्या खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती सोय केलेली आहे. परंतु, अशा मलमपट्टीएेवजी द्वारका सर्कलभोवती रस्ता तातडीने डांबरीकरण करणे गरजेचे आहे.

--

अन्यत्रही धोके

उपनगर नाका ओलांडून द्वारकाकडे जाताना आंबेडकरनगरसमोर मोठा खड्डा आहे. तो टाळून पुढे गेल्यावर पोलिस उपायुक्तालयासमोर तर अर्धा रस्ताच गायब आहे. येथे वाहनांचा वेग कमीच करावा लागतो. येथून शिवाजीनगरकडे रस्ता जातो. त्यामुळे वाहनचालक तिकडे वळतात. त्यातच आता खड्डे झाले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पुढे बोधलेनगरसमोर मोठा खड्डा झालेला आहे. त्याहीपुढे पेट्रोलपंप आणि श्रीकृष्ण लॉन्ससमोर घातक खड्डे आहेत. समाजकल्याण भवनासमोरच जीवघेणा खड्डा आहे. तेथून पुढे खरबंदा पार्कसमोर खड्डे आहेत. द्वारकाजवळील खड्डे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुचाकीचालक शेजारील सर्व्हिसरोडकडे वळतात आणि आगीतून फुफाट्यात पडतात. त्यामुळे या महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सटाण्याचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पुनद प्रकल्पातून थेट पाइपलाइनकरिता राज्य सरकारकडून सुमारे ५५ कोटी रुपयांचा निधी दिवाळीपर्यंत मंजूर होईल. यामुळे माता-भगिनींना सरकारकडून ही दिवाळीभेट असेल, असा आशावाद केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.

आगामी काळात पूर्व बागलाणचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी उजवा कालवादेखील पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प आहे. त्यासाठी जल आयोगाने हिरवा कंदील दिला असल्याचे स्पष्ट करून चारी क्रमांक आठचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने चारीचा शुन्य ते बारा किलोमीटरची गळती रोखण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आल्याचे डॉ. भामरे यांनी यावेळी नमूद केले. तत्पूर्वी डॉ. भामरे यांनी तालुक्यातील गेल्या वर्षापासून प्रलंबित असलेल्या हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर पोहच कालवा या योजनांसाठी सुमारे ७४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा ४६ गावांतील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, डॉ. विलास बच्छाव, पुष्पलता पाटील यांची भाषणे झाली.

विविध विकासकामांचे उद््घाटन

सटाणा नगरपरिषदेच्या वतीने प्रस्तावित ६० फुटी रिंग रोडचे, नाना-नानी पार्कचे भूमिपूजन, लोकमान्य टिळक रस्त्यांचे मजबुतीकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व सिद्धार्थ नगर अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या विकासकामांचा यावेळी शुभारंभ संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर येथील राधाई मंगल कार्यालयात आयोजित नागरी सत्कार समारंभ व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सटाणा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे होते. सटाणा शहरातील बायपासचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधीदेखील मंजूर झाला आहे. यामुळे शहरातील राज्य महामार्गाचा समावेश राष्ट्रीय महामार्गात झाल्याने आता शहराचा विकास थांबणार नाही, असे राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ टक्के अपघातात ‘हिट अँड रन’!

$
0
0

नाशिक: शहरात घडणाऱ्या एकूण घटनांपैकी तब्बल २७ टक्के अपघात ह‌िट अॅण्ड रन प्रकरातील असतात. म्हणजेच एका वाहनचालकास अथवा पादचाऱ्यास जखमी करून दुसरा वाहनचालक पळून जातो. अपघातानंतर समोरील वाहनचालक पळून जाण्याने अनेकदा जखमी व्यक्तीच्या जीवावर बेतते. शहरात रस्ते अपघातात दरवर्षी दोनशेंहून अधिक व्यक्तींचा बळी जातो.

अपघात घडल्यानंतर नागरिकांकडून होणारी मारहाण आणि पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने ‘हिट अॅण्ड रन’ अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदा जुलै महिन्यापर्यंत शहरात एकूण ४०९ अपघातांची नोंद झाली आहे. त्यातील ११२ अपघातांच्या घटनांमध्ये वाहनचालकांनी पोलिसांना खबर न देता अथवा जखमी व्यक्तीस उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे दिसते. विशेष म्हणजे शहरातील हायवे, रिंगरोड, हमरस्ते अथवा कॉलनीरस्ते अशा सर्वच ठिकाणी हे प्रकार घडतात. कमी रहदारी असलेल्या रस्त्यांवर ‘हिट अॅण्ड रन’ अपघातांचे प्रमाण थोडे जास्त असते. याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, अपघाताची घटना घडल्यानंतर पळून जाणाऱ्या व्यक्तीवर अपघातासह पळून जाण्याचा गुन्हा दाखल होतो. जखमी व्यक्तीला सोडून पळून जाण्याची वृत्ती चुकीची आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्याची पोलिसांना खबर दिली तर अपघातात नक्की चूक कोणाची आहे, हे शोधता येते. किंबहुना जखमी व्यक्तीसह पोलिसांचा संबंधीत वाहनचालकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. अनेकदा जखमी व्यक्ती अशा वाहनचालकाविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही, असेही प्रकार घडल्याचे वाहतूक शाखेतील एका पोलिसाने सांगितले.

नुकतेच घडलेले हिट अॅण्ड रन

आडगाव मेड‌िकल कॉलेजसमोर ६ सप्टेंबर रोजी विरुद्ध बाजने भरधाव वेगात जाणाऱ्या एसयूव्हीने रुपेश भावसार या दुचाकीचालकास धडक दिली. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर कारचालक पळून गेला. तर, गंभीर जखमी झालेल्या रूपेशचा मृत्यू झाला. आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापूर्वी २८ ऑगस्ट रोजी सातपूर परिसरात ‘हिट अॅण्ड रन’चा प्रकार घडला होता. भरधाव अज्ञात कारने दिलेल्या धडकेत प्रकाश जाधव या १९ वर्षीय तरुणास डोक्यासह इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली होती.

महिना- एकूण अपघात- हिट अॅण्ड रन

जानेवारी-६०-१५

फेब्रुवारी-७६-१६

मार्च-८८-१८

एप्रिल-५६-२३

मे-४५-१७

जून-४२-१२

जुलै-४२-११

एकूण-४०९-११२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी सर्वांनी एकत्र यावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिक, मालेगावचा परिसर पर्यटनसमृद्ध आहे. या भागातील शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी हिंमत न हारता सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तर या भागाचा कायापालट होईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नी राजकारण न करता सगळ्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे. शेतीसह लघु उद्योग करावेत. नव्या पिढीने शेतीकडे सकारात्मक नजरेने बघावे. राज्याचा शेतकरी हा शिवरायांचा खरा वारसदार- मावळा आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले.

दाभाडी येथे भाजपच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात खासदार भोसले बोलत होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे , माजी मंत्री प्रशांत हिरे, आमदार अपूर्व हिरे, भाजप नेते अद्वय हिरे, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कोणत्या सरकारने काय केले याबाबत राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन नेतृत्व करावे, असे आवाहन भोसले यांनी केले. डॉ. भामरे म्हणाले, की गेल्या तीन वर्षांत मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी पाठपुरावा सुरू असून, ९० टक्के प्रश्न मार्गी लागले आहेत. नार-पार, उजवा- डावा कालवा, मांजरपाडा प्रकल्पामुळे शेतीच्या सिंचनाचे प्रश्न मार्गी लागतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

अद्वय हिरे म्हणाले, की शेतकऱ्यांचे हित लक्षात घेताच सरकारने आजवरची सर्वांत मोठी कर्जमाफी दिली आहे. या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पवन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

‘उद््घाटन माझ्या हस्ते हा दैव योग!’

पंचायत समितीच्या इमारतीच्या उद््घाटनावरून झालेल्या वादाबाबत भाष्य करताना अद्वय हिरे म्हणाले, की राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार असताना नव्या इमारतीचा प्रस्ताव तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठवून तो मंजूर करण्यात आला होता. मात्र, नंतर सरकार बदलले. शिवसेनेकडून या इमारतीच्या उद््घाटनाचा घाट घातला गेला. मात्र, आचारसंहितेमुळे ते शक्य झाले नाही आणि निवडणुकीत पंचायत समितीत आमची सत्ता आली. त्यामुळे या इमारतीचे उद््घाटन माझ्या हस्ते होणे हा दैव योगच आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची भैरवी ‘मिस ग्लोबल’च्या टॉप टेनमध्ये

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जमैकामध्ये झालेल्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत नाशिकची भैरवी प्रदीपलाल बुरड हिने अंतिम फेरीत धडक मारत पहिल्या १० क्रमांकांत स्थान मिळविले. याच स्पर्धेत ती ‘मिस ग्लोबल एशिया २०१७’ या कॉन्टिनेंटल टायटलची विजेती ठरली. १५ सप्टेंबर २०१७ रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. भैरवी बुरड ही नाशिकमधील बीवायके महाविद्यालयात कॉमर्स शाखेत टीवायबीकॉमचे शिक्षण घेत आहे. भैरवीच्या यशाने प्रथमच नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नवी दिल्ली येथे ऑगस्ट २०१७ मध्ये झालेल्या स्पर्धेत भैरवीने मिस ग्लोबल इंटरनॅशनल इंडिया स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. याच स्पर्धेत तिने बेस्ट रॅम्प, बेस्ट कंजुनिअॅलिटी हा किताब पटकावला. या कामगिरीमुळेच तिची जमैकातील मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये तिने सेंट्रल अमेरिकेत झालेल्या सौंदर्य स्पर्धेत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले होते. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या भैरवीची ही कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत ती ‘मिस ग्लोबल एशिया २०१७’च्या कॉन्टिनेन्टल टायटल्सची मानकरी ठरली.

नृत्याचीही आवड

भैरवीला बालपणापासून नृत्याची आवड आहे. तिने आतापर्यंत नृत्याच्या विविध स्थानिक स्पर्धांमध्ये बक्षिसे पटकावली आहेत. २०१६ मध्ये झालेल्या मिस टीजीपीसी (दि ग्रेट पॅजिअंट कम्युनिटी) या ऑनलाइन सौंदर्य स्पर्धेत भैरवी विजेती ठरलेली आहे. दिल्ली येथील दि उमराव येथे झालेल्या अब्राक्सस गॉडेस ऑफ ब्यूटी २०१७ या राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत भैरवीने विजेतेपद पटकावले होते.

‘मटा श्रावणक्वीन’चा फायदा

२०१५ मध्ये झालेल्या मटा श्रावणक्वीन स्पर्धेत भैरवीने सहभाग घेतला होता. त्यात तिची टॉप फाइव्हमध्ये निवड झाली होती. यात भैरवीला बेस्ट रॅम्पचे पारितोषिक मिळाले होते. या स्पर्धेमुळे मुंबई येथे दहा दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये भैरवीची निवड झाली होती. त्याचा मला खूपच फायदा झाला असल्याचे भैरवी सांगते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सम्यकसंबुद्ध’ने उलगडला गौतम बुद्धांचा प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिद्धार्थने बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी षडरिपुंवर कशा प्रकारे विजय मिळवला त्याचा प्रवास रविवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या ‘सम्यकसंबुद्ध’ या नाटकातून उलगडण्यात आला. हे नाटक संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सादर करण्यात आले.

सिद्धार्थ जेव्हा बोधी झाला, त्याला बुद्धत्व प्राप्त झाले. त्या वेळी माराने त्याच्यावर आक्रमण केले. हे आक्रमण षडरिपुंच्या माध्यमातून होते. या आक्रमणावर भगवान गौतम बुद्धांनी आपल्या बुद्धत्वाने त्यावर विजय मिळवला व बुद्धत्व प्राप्त केले. जागतिक पाली भाषा दिन तथा अनागारिक धम्मपाल जयंती उत्सवानिमित्त पाली मराठी भाषेतील नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे लेखन माधव सोनवणे यांनी, तर दिग्दर्शन प्रशांत हिरे यांनी केले होते. रंगभूषा- माणिक कानडे, प्रकाशयोजना- रवी रहाणे, संगीत- रोहित सरोदे, नेपथ्य- विकास लोखंडे, तर वेशभूषा अंकिता पाटील यांची होती. या नाटकात दिलीप काळे, भूषण गायकवाड, मिलिंद साळवे, नितीन साळवे, मिलिंद अंभोरे, सतीश पवार, सुनील जगताप, शकुंतला दाणी, रेखा पवार, मृणाल निळे, अश्विनी आढाव, कोमल ढोले, किरण पाटील, रजत शिंदे, कुशल भालेराव, श्रीपाद ब्राह्मणकर आणि सचिन चव्हाण यांच्या भूमिका होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेयजल योजनेंतर्गत २१ कोटी निधी मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील कालमर्यादा संपलेल्या प्रादेशिक योजनांचे पुनर्जीवन करण्यासाठी मनेगावसह सोळा गाव योजनेत अधिक सात गावे आणि ४४ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत सुमारे एकवीस कोटी रुपयांच्या योजनेस शासनाकडून मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.

आमदार वाजे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची मुदत २००६ मध्ये संपलेली असताना या योजनेच्या पुनर्जीवनासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. या योजनेची मुदत संपल्याने वेळोवेळी नादुरुस्तीमुळे सर्व गावांना पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या प्रकरणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी पत्रव्यवहार करून या योजनेस मंजुरी मिळवली. पुनर्जीवन योजनेमुळे तालुक्यातील २२ गावे व ४४ वाड्यांना फायदा होणार आहे. नवीन योजनेत भोजापूर धरणातून थेट सात पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होणार आहे, असे आमदार राजाभाऊ वाजे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठीतील राठींचा सातारा मॅरेथॉनमध्ये झेंडा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातारा येथे रविवारी झालेल्या हिल मॅरेथॉनमध्ये नाशिक सायकल‌िस्ट्स फाउंडेशनचे सदस्य असलेल्या ६१ वर्षीय अॅड. दिलीप मदनलाल राठी यांनी सुपर वेटरन गटात दुसरा क्रमांक मिळवला आहे.

विशेष म्हणजे त्यांनी अनवाणी पायांनी केवळ २ तास ६ मिनिटांत २१ किलोमीटरची अर्धमॅरेथॉन पूर्ण केली आहे. याद्वारे त्यांनी फिटनेसच्या बाबतीत आजच्या तरुणाईसाठी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. सातारा हिल मॅरेथॉनचे संचालक डॉ. संदीप काटे यांच्या हस्ते अॅड. दिलीप राठी यांना गौरविण्यात आले. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपस्थिती होती.

अॅड. राठींनी आजपर्यंत देश विदेशांतील ५० हून अधिक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला असून, त्यांनी सायकलिंगमध्येही नाशिक ते गोवा, दिल्ली ते मुंबई अशा मोहीम फत्ते केल्या आहेत. त्याचप्रमाणे राठी हे उत्कृष्ट गिर्यारोहकही आहेत. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प, रुपकुंड ट्रेक, कांचनजुंगा ट्रेक, अन्नपूर्णा ट्रेक, कैलास मानसरोवर ट्रेक, ओमपर्वत ट्रेक असे नानाविध अवघड असे ट्रेक पूर्ण केले आहेत. गिर्यारोहण, सायकलिंग, धावणे यातून फिटनेस राखला तर त्याचा फायदा नक्कीच होतो, असे ते तरुणांना नेहमीच सांगत असतात.

सातारा मॅरेथॉनचे हे पाचवे वर्ष असून, नाशिक सायकल‌िस्ट्सच्या सदस्यांनी सलग तिसऱ्या वर्षी विविध गटांत सहभागी होत यशस्वीपणे अर्धमॅरेथॉन पूर्ण केली आहे. यात अॅड. वैभव शेटे, डॉ. मनीषा रौंदळ, साकेत भावसार, डॉ. नीलेश निकम, मनोज शिंदे, नारायण वाघ, अतुल संगमनेरकर, डॉ. सुदर्शन मलसाने आदींसह नाशिक सायकल‌िस्टच्या २० हून अधिक सदस्यांनी सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. नाशिक जिल्ह्यातील विविध मॅरेथॉन स्पर्धा गाजवितानाच महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यांतीलही स्पर्धा नाशिक सायकलिस्ट्स गाजवत आहेत.

नाशिकचा डंका

सातारा हिल मॅरेथॉनमध्ये शेकडो नाशिककरांनी सहभाग घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले. या मॅरेथॉनमध्ये शहरातून शेकडो धावपटू सहभागी झाले होते. गिन‌िज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात जास्त धावपटू धावण्याची नोंद असलेल्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये तब्बल ५ हजार धावपटू धावले. २१ किमी अल्ट्रा हिल मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील धावपटूंनी सहभाग घेतला असून, पहिले तीन विजेते हे केनियाचे होते. नाशिकमधून अनेक उद्योजक, डॉक्टर्स, वकील, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हिल मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी चामरलेणे, पांडवलेणे, कसारा अशा ठिकाणी साधारण एक महिन्यापूर्वीच धावपटूंनी गर्दी केली होती. हिल मॅरेथॉन धावताना तुमची मानसिक तथा शारीरिक परीक्षा होते व सरावाने ती अधिक मजबूत होते. रिव्हॅल्युएशन ग्रुप, नाशिक रनर्स, नाशिक सायकलिस्ट अशा अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाहतूक’नंतर आता आरटीओचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशांप्रमाणे ऑगस्ट महिन्यापर्यंत काम झालेले नसल्याचा ठपका ठेवत परिवहन विभागाने वाहन तपासणीस वेग देण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकसह राज्यभरात प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत कारवाई केली जाणार आहे.
सुरक्षा समितीच्या निर्देशांप्रमाणे राज्यभरात रस्ता सुरक्षा विषयक काही मुद्यांना अनुसरूण खासगी वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, विमा प्रमाणपत्र, हेल्मेट तसेच सिटबेल्टचा वापर आणि वाहन चालवताना मोबाइलचा वापर, नियमानुसार नंबर प्लेट नसणे, चुकीच्या हेडलाइट्सचा वापर, मल्टीटोन हॉर्न बसवणे, ट्रिपलसिट यांसह इतर नियमांचे पालन होते की नाही, याची तपासणी सदर मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. राज्यभरात सर्व परिवहन कार्यालयांमार्फत राष्ट्रीय व राज्य महामार्गावर ही मोह‌ीम राबवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी पळवापळवी जोमात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहराचे प्रवेशद्वार असलेले नाशिकरोड रेल्वे स्थानक व नाशिकरोड बस स्थानक काही महिन्यांपासून बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांच्या विळख्यात सापडले आहे. वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून येथे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून प्रवाशांची पळवापळवी जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका शहर व परगावच्या बससेवेला बसत असूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर स्वतंत्र रिक्षा व टॅक्सी स्टँड आहे. मात्र, असे असूनही बसस्थानकाच्या आजूबाजूस मोठ्या संख्येने अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. त्यामुळे रेल्वे व बस स्थानक परिसरात नागरिकांना आपली वाहने आणणे कसरतीचे ठरत आहे. या वाहनांच्या चालकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना नसतानाही ते सर्रासपणे प्रवासी वाहतूक करताना आढळतात. त्याचा फटका बससेवेसह परवानाधारक रिक्षाचालकांनाही बसत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सुरू आहे. मात्र, तरीही पोलिसांचा या अवैध प्रवासी वाहतुकीकडे कानाडोळा होत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

--

चालकांची पोलिसांशी गप्पाष्टके

नाशिकरोड बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी असंख्य वाहने रोजच राजरोसपणे उभी केलेली दिसतात. त्यातील काही वाहने तर थेट बस स्थानकावरील पोलिस चौकीला लागूनच उभी असतात. प्रवासी मिळेपर्यंत अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक पोलिस चौकीत ठाण मांडून ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्यांशी गप्पाही झोडत असतात. पोलिसच या अवैध प्रवासी वाहनचालकांवर मेहेरबानी करीत असल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

--

या मार्गांवर पळवापळवी

नाशिकरोड येथून शहर परिसरासह पुणे, संगमनेर, त्र्यंबकेश्वर, वणी, ओझर, सिन्नर व शिर्डी या मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू आहे. ही सर्व वाहने नाशिकरोड बस स्थानकावरील पोलिस चौकी व परिसरातील सुभाषरोड, डॉ. आंबेडकररोड, जवाहर मार्केटरोड, पेट्रोलपंप या ठिकाणी उभी असतात. प्रवासी वाहतुकीचा परवाना नसतानाही या वाहनचालकांकडून प्रवासी वाहतूक केली जात असल्याने शासनाचीही फसवणूक होत आहे. संबंधित वाहनचालक रेल्वे स्थानक प्रवेशद्वार, तिकीट बुकिंग कार्यालय, बस स्थानक अशा ठिकाणी प्रवासी शोधत फिरत असतात. शहर बससेवेच्या प्रवासी वाहतुकीवर व रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही या अवैध प्रवासी वाहतुकीने मोठा परिणाम झाला आहे.

--

नाशिकरोड रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे परवानाधारक शहर रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे शासनाचीही फसवणूक होत आहे.

-किशोर खडताळे, अध्यक्ष, रिक्षा-टॅक्सीचालक-मालक युनियन, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधाभासी धोरणाने मास्तरकीला ‘खोडा’

$
0
0

एकीकडे मागेल त्या संस्थेला शिक्षणशास्त्र कॉलेजची खिरापत देऊन दुसरीकडे पटपताळणी आणि शिक्षक भरती स्थगितीसारख्या विरोधाभासी धोरणांमुळे तरुणांचे मास्तरकीचे ध्येय कोंडीत सापडले आहे. नव्या भरतीवरची बंदी उठण्याच्या प्रतीक्षेत लाखो उमेदवार असतानाच दुसरीकडे शिक्षणशास्त्र कॉलेज नावाच्या कारखान्यांचे उत्पादन मात्र या समस्येत भरच टाकत आहे. या समस्येवर सरकारला लवकरच तोडगा काढावा लागेल अन्यथा शिक्षणव्यवस्था स्वच्छ करण्यास सरसावलेल्या सरकारच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. सामान्य वर्गातील तरुण आशेने या क्षेत्राकडे येत असले, तरी सरकारी धोरणांचा फटका त्यांना बसू पाहतो आहे. दुसरीकडे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदव्या देणारी कॉलेजेसही अस्तित्व वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत. याबाबतच्या वस्तुस्थितीवर टाकलेला हा प्रकाशझोत...

--

--

वस्तुस्थिती काय सांगते?

सद्यःस्थितीत राज्यभरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर कार्यरत शिक्षकांची संख्या सुमारे पाच लाखांच्या घरात आहे. हे सर्व शिक्षक खासगी अनुदानित शाळांसह महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत. राज्यात सन २०१२ नंतर नवी भरतीच झालेली नाही. रिक्त जागांची संख्या सुमारे ३५ हजारांच्या घरात आहे. अतिरिक्त शिक्षकांची संख्या सुमारे ३५ हजारांच्या घरात आहे. राज्यात बी. एड. अभ्यासक्रमाची सुमारे ५५० कॉलेजेस आणि डी. एलएड. अभ्यासक्रमाची सुमारे १२०० ते १४०० कॉलेजस आहेत. अशा शिक्षणशास्त्र विषयाच्या एकूण २ हजारांवर कॉलेजेसमध्ये लाखभर नवे मास्तर दर वर्षी घडविण्याची क्षमता आहे. यात बी. एड.मधून सुमारे ३५ हजार, तर डी. एलएड.द्वारे ७० हजार अशी विभागणी आहे. ज्युनिअर कॉलेजमध्येही राज्यभरात ७२ हजार प्राध्यापक सेवा देतात. त्यापैकी तब्बल २० हजारांवर प्राध्यापक विनावेतन वर्षानुवर्षे काम करीत आहेत. नाशिक विभागातील १८०० प्राध्यापकांचा त्यात समावेश आहे.

--

पटपडताळणीपासून बंधने कडक

राज्यात शाळांमध्ये पटावर बोगस विद्यार्थ्यांची संख्या दाखवून शिक्षकांच्या नेमणुका केला जात असल्याच्या एका तक्रारीनंतर सन २०११ मध्ये नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांची पटपडताळणी केली. तेथे सुमारे दीड लाखांवर बोगस विद्यार्थ्यांचा तपशील हाताशी लागल्यानंतर राज्यभरात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतून २० लाख बोगस विद्यार्थ्यांचा आकडा बघून अनेकांचे डोळे विस्फारले गेले. बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान लाटणाऱ्या शाळांमुळे नंतरच्या काळात बंधने कडक होत गेली. परिणामी या मोहिमेत अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन झाल्याखेरीज नव्या शिक्षक भरतीस परवानगी न देण्याचे आदेशच सरकारने २ मे २०१२ रोजी दिले.

--

तरीही धुडकावले गेले आदेश

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नव्या शिक्षक भरतीस परवानगी नसली, तरीही शिक्षण विभागातील अधिकारीवर्गाच्या सहाय्याने राज्यभरात २ मे २०१२ च्या नंतर सुमारे ७ हजारांवर शिक्षकांची भरती केली गेली. ही भरती कायदेशीर की बेकायदेशीर, याबाबत अद्यापचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.

--

अतिरिक्तांच्या समायोजनाचा प्रश्न

पटपडताळणी मोहिमेचे फलित म्हणून आढळलेल्या राज्यातील ३० हजारांवर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे रिक्त जागांवर अगोदर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेण्याचे प्राधान्याचे धोरण असल्याने नव्या मनुष्यबळ व्यवस्थापनाचा विचार अद्याप शिक्षण विभागाच्या मनाला शिवलेला नाही. यातच नवीन भरती आणि नव्या शाळा, तुकड्यांना परवानगी न देण्याचे परिपत्रक असल्याने पुढील चित्र स्पष्ट नाही.

--

टीईटी झाली, पुढे काय?

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) भूत नाचविले गेले. यंदाच्या शैक्षणिक वर्षापर्यंत या परीक्षेत यश मिळविणाऱ्या उमेदवारांची संख्या सुमारे लाखाच्या घरात आहे. अतिरिक्त शिक्षकांची संख्या ३५ हजारांच्या घरात आहेत, तर तितक्याच प्रमाणात रिक्त जागांची संख्या आहे. सरकारने रिक्त जागांवर भरतीदरम्यान अगोदर अतिरिक्त शिक्षकांचा विचार केल्यास ‘टीईटी’पात्र लाखभर उमेदवारांच्या भवितव्याबाबत धोरण काय, याबाबत शिक्षण विभाग बोलायला तयार नाही.

--

कॉलेजेसचा अस्तित्वासाठी लढा

बदलत्या नियमावलीनुसार अनेक शिक्षणशास्त्र कॉलेजेसचे अनुदान बंद करण्यात आले. अनेक कॉलेजेसना पुरेशी विद्यार्थीसंख्या आणि पुरेसे अनुदान असा समतोल साधण्यासाठी दर वर्षी संघर्ष करावा लागत आहे. बी. एड. अभ्यासक्रमाचा वाढलेला कालावधी, इतर व्यावसायिक आणि कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचे खुले झालेले पर्याय, रखडणारी प्रवेशप्रक्रिया आणि सरकारची नवीन भरतीविषयक धोरणे यांसारख्या प्रमुख कारणांमुळे या कॉलेजेसचा अस्तित्वासाठी लढा सुरू आहे. अनेक कॉलेजेस घटत्या विद्यार्थीसंख्येमुळे या स्थितीत अखेरच्या घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे.

--

परीक्षा परिषदेचे सूचक आवाहन

कुठल्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर नोकरीची खात्री कुठलीही संस्था किंवा सरकार देत नाही. असे असले तरीही अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेचा कोटा पूर्ण करण्यासाठी शिक्षण संस्था कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे प्लेसमेंटचे आमिष विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना दाखवितात. मात्र, डी. एलएड. अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वस्तुस्थितीकडे लक्ष वेधत उमेदवारांना सूचित करण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या आवेदनातून केला. या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध माहितीपत्रकावर नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांच्या आकडेवारीचे दाखले देत डी. एलएड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना नोकरी मिळेलच याची खात्री नाही, असे छापण्याचे धारिष्ट्य परिषदेला दाखवावे लागले.

--

संस्थाचालकांपुढे यक्षप्रश्न

बी. एड. व एम. एड. हे अभ्यासक्रमही दोन वर्षांचे करण्यात आल्याने एनसीटीईच्या २०१४ च्या निकषानुसार ५० प्रवेशक्षमता असलेल्या युनिटसाठी आठ अर्हताधारक प्राध्यापक असणे गरजेचे आहे. शंभर प्रवेश क्षमता असलेल्या युनिटसाठी १६ अर्हताधारक प्राध्यापकांची आवश्यकता आहे. या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देणे अपेक्षित आहे. सरकारच्या शिक्षणशुल्क समितीने (एफआरए) सद्यःस्थितीत जे शिक्षण शुल्क ठरविले आहे, त्यानुसार प्राध्यापकांचा पगार व मिळणारे शुल्क यात ताळमेळ बसत नसल्याचा संस्थाचालकांचा दावा आहे. त्यामुळे नियम पाळावेत तरी कसे, असा यक्षप्रश्न संस्थाचालकांना सतावत आहे.

--
बैठकीतही एकमत

डी. एलएड. आणि बी. एड. कॉलेजेस चालविणाऱ्या संस्थाचालकांची बैठक नुकतीच नाशिकमध्ये पार पडली. बैठकीत या कॉलेजेससमोरील आव्हाने आणि संभाव्य उपाययोजनांच्या अनुषंगाने मंथन झाले. उफराट्या सरकारी धोरणांमुळे या कॉलेजेससमोरील समस्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत असल्याच्या मुद्यावर संस्थाचालकांचे एकमत झाल्याने या अभ्यासक्रमाच्या उत्पादकतेची चिंता अधोरेखित झाली आहे.

--

शिक्षण विभागाचे प्रगतिपुस्तक

--

-बी. एड. प्रवेश क्षमता ः सुमारे ४० हजार

-डी. एड. प्रवेश क्षमता : सुमारे ६५ ते ७० हजार

-बी. एड. कॉलेजेसची संख्या : सुमारे ५५०

-डी. एड. कॉलेजेसची संख्या : सुमारे १२०० ते १४००

-ज्युनिअरचे प्राध्यापक : ७२ हजार

-विनावेतन ज्युनिअरचे प्राध्यापक : २० हजार

-कार्यरत शिक्षक : सुमारे ५ लाख

-रिक्त जागा : सुमारे ३५ हजार

-अतिरिक्त शिक्षक : सुमारे ३५ हजार

-टीईटीपात्र उमेदवार : सुमारे १ लाखांच्या आसपास

-भरती केव्हापासून बंद : २ मे २०१२ पासून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images