Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अंबड औद्योगिक वसाहतीत औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनाधिकृतपणे धार्मिक स्थळे उभारण्यात आली होती. या स्थळांचे अतिक्रमण शुक्रवारी औद्योगिक विकास महामंडळ व महानगर पालिका यांच्या वतीने काढण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता मोहिम शांततेत पार पडली.

नाशिक महानगरपालिकेने मागील काही महिन्यांपूर्वी शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर आता ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या सहकार्याने ही मोहीम सकाळी अंबड परिसरात राबविण्यात आली. यावेळी ओट्यांवर असलेली चार धार्मिक स्थळे व एक पक्‍के बांधकामाचे धार्मिक स्थळ हटविण्यात आले. या मोहिमेत औद्योग‌िक विकास महामंडळाबरोबरच महानगरपालिकेचेही अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले हेाते. सुरुवातीला या मोहिमेला नागरिकांकडून विरोध करण्यात आला. मात्र, पोल‌िस निरीक्षक मधुकर कड यांनी या मोहिमेला विरोध करता येणार नाही असे सांगितले. त्याचबरोबर यावेळी दोन पोल‌िस निरीक्षक, दहा सहाय्यक पोल‌िस निरीक्षकांसह सुमारे ऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा असल्याने विरोध करण्यास कोणी धजावले नाही. या मोहिमेत अंबड परिसरातीलही धार्मिक स्थळे काढण्यात आली. या मोहिमेबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली असली तरी न्यायालयाचा आदेश असल्याने ही कारवाई करावीच लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाभर फुटबॉल फिव्हर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशात महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये ऑक्टोबरमध्ये १७ वर्षांखालील मुलांसाठी फिफा विश्वचषक कप फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या वातावरणनिर्मितीसाठी महाराष्ट्र फुटबॉलमय व्हावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाला नाशिकमध्ये उत्स्फू्र्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील १२ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्यातील शाळांना सुमारे ४०० फुटबॉल वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या उपक्रमात १५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त महेश झगडे, ऑलिम्पियन धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय खेळाडू मोनिका आथरे, छत्रपती पुरस्कारप्राप्त नरेंद्र छाजेड, साहेबराव पाटील, अशोक दुधारे, आनंद खरे, शिक्षण समितीचे सभापती यतीन पगार (पाटील), उदय सांगळे, उपसंचालक जाधव, जयप्रकाश दुबळे, डॉ. धर्माधिकारी, अर्जुन टिळे, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

देवळालीतही सामने

देवळाली कॅम्प ः मिशन फिफा वर्ल्ड कप २०१७ च्या प्रचार व प्रसारासाठी आनंद रोड मैदानावर कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक, हायस्कूल, दर्शन अॅकॅडमी, डॉ. गुजर सुभाष हायस्कूल या शाळांचे सराव व सामने येथील येथील आनंद रोड मैदानावर आयोजित करण्यात आले होते.

या सामन्याचा शुभारंभ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांच्या ७-७ च्या बॅचेस तयार करून एकूण १५ सामने खेळविण्यात आले तर प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळाची ओळख संयोजन समितीचे देवळाली कॅम्प समन्यवयक मनोज कनोजिया यांनी करून दिली. १७ वर्षाच्या आतील मुलांच्या या सामन्यांसाठी क्रीडा विभागाकडून प्रत्येक शाळेसाठी ३ फुटबॉल देण्यात आले होते. ज्या शाळांकडे खेळांचे मैदान उपलब्ध होते त्यांनी हे सामने त्यांच्या मैदानावरच खेळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेने शिक्षकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नवरात्र उत्सवाच्या वर्गणीपायी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा हकनाक बळी गेल्याची घटना लाडगाव फाटा येथे घडली. ट्रकने जोरदार धडक दिल्याने जखमी झालेल्या वामन धवळू चव्हाण (वय ५३, रा. गोपाळपूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम पाहणारे वामन चव्हाण हे शुक्रवारी सकाळी दुचाकीने (एमएच १५ एफसी ३८४३) पोहाळी येथे जात असताना साडेनऊच्या सुमारास त्यांना लाडगाव फाटा येथे नवरात्र उत्सवाची वर्गणी मागणाऱ्या तरुणांनी अडविले. त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत असतानाच चिराई घाटाच्या तीव्र उतारावरून रेशनिंगचे धान्य सुरगाणा येथे आणणाऱ्या मालट्रकने (एमएच ०४ बीजी २८७५) चुकीच्या बाजूने येऊन जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर फेकले गेले. पुढील चाक अंगावरून गेले. चव्हाण यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत चौधरी यांनी प्राथमिक उपचार करून चव्हाण यांना तातडीने जिल्हा रुग्णालय नाशिक येथे नेण्याचा सल्ला दिला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक शिवाजी शेलार (रा. पळसे) याच्यासह ट्रक ताब्यात घेतला असून, अपघाताची नोंद करण्यात आली आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात सुरगाणा ते घागबारी दरम्यान अनेक अनधिकृत मंडळांचे कार्यकर्ते वाहनचालकांकडून जबरदस्तीने वर्गणी जमा करतात. सूचनांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी सोसायट्यांची तपासणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाढत्या रोगराईला महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय समितीने थेट नागरिकांनाच जबाबदार धरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अस्वच्छतेला नागरिकही जबाबदार असल्याचे सांगत, आरोग्य समितीने शहरातील सोसायट्यांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेत खासगी सोसायट्यांचे चेंबर तपासले जाणार असून, त्याची स्वच्छता होते की नाही याची पाहणी केली जाणार आहे. त्यात अस्वच्छता आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सभापती सतीश कुलकर्णी यांनी दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या आरोग्य व वैद्यकीय समितीच्या बैठकीत सभापती कुलकर्णी यांनी आरोग्य विभागाला आदेश दिले आहेत.

सोसायटी व अपार्टमेंटमधील अस्वच्छताही रोगगाईला कारणीभूत ठरत आहे. सोसायट्यांचे चेंबर थेट या भूमिगत गटारांच्या चेंबरला जोडण्यात आले आहेत. त्यामुळे यापूर्वी सोसायट्यांसाठी असलेले स्वतंत्र चेंबर बंद पडले आहेत. ज्या भागातून भुयारी व पावसाळी गटार योजना गेली नाही, तेथे मात्र चेंबरची व्यवस्था आहे. पालिकेच्या व्हॅक्‍युम एम्टीयरच्या साहाय्याने मैला उचलला जातो. अनेक सोसायट्यांमध्ये चेंबर स्वच्छ केले जात नसल्याने दुर्गंधीसह रोगराईला सामोरे जावे लागत आहे. डास वाढण्यामागे चेंबरची नियमित साफसफाई होत नसल्याचे महत्त्वाचे कारण असल्याने सोसायट्यांचे चेंबर तपासण्याची मोहीम राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदकविजेती निकिता स्वागताने भारावली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जळगाव (निं) येथे जिल्हा परिषद शाळा व गो. य. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने केलेले सादरीकरण... नागरिकांनी केलेले उर्त्स्फूत स्वागत...गावातून वाजतगाजत निघालेली भव्य मिरवणूक... गावात ठिकठिकाणी होणारे औक्षण पाहून ऑस्ट्रेलियात युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी निकिता काळे भारावून गेली होती. निमित्त होते सत्कार समारंभाचे.

निकिता काळे हिने ऑस्ट्रेलियात झालेल्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर मनमाड येथील प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्यासह जळगाव (निं) येथे शुक्रवारी आगमन झाले. त्यावेळी मोठ्या उत्साहात त्‍यांचे स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंगचे सुवर्णपदक मिळवून देणारी निकिता जिल्ह्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिच्या स्वागतानिमित्त गावाला उत्सवाचे स्वरूप आले होते. मिरवणूक मार्गावर रांगोळी काढली होती.

स्वर्गीय रोडूआण्णांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात निकिता, प्रशिक्षण व्यवहारे व काळे दांपत्याचा सत्कार संस्थेचे खजिनदार बाळासाहेब दुकळे व सचिव महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थाध्यक्षा कासुताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मनीषा पवार, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, सदस्य विकी खैरनार, तालुका पोलिस निरीक्षक शिंगटे, मनमाडचे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, मल्हार सेनेचे मच्छिंद्र बिडगर, संग्राम बच्छाव, केंद्रप्रमुख हिरे आदींची यावेळी भाषणे झाली.

सत्काराला उत्तर देताना निकिताने तिच्या इथपर्यंतच्या खडतर प्रवासाची माहिती दिली. व्यवहारे यांनी निकिताने आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळवून आपले स्वप्न पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. एच. पी. दुकळे यांनी सूत्रसंचालन केले. बी. एम. नाईकवाडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छता अभियानात सहभागी व्हा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून स्वच्छता हीच सेवा या मोहिमेत सगळ्यांनी सहभागी व्हावे. स्वच्छतेची कामे अधिकारी, कर्मचारी यांनी जलद गतीने मार्गी लावावीत. सकारात्मक विचार केला, तर स्वच्छ मालेगाव व सुंदर मालेगावचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ सप्ताहाचा शुभारंभ अग्रेसन भवन, मालेगाव येथे झाला. यावेळी भुसे बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे आदी उपस्थित होते.

जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे यावेळी म्हणाल्या, की नाशिक जिल्ह्याचे काम कसे चांगले होईल व मालेगाव तालुक्याचा कायापालट होईल. सर्वांनी एकत्र येऊन कामकाज करावे. गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी स्वच्छता ही सेवा अभियान जिल्हा व तालुकास्तरीय १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सप्ताहात करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत माहिती दिली.

शाळांचे प्रश्न सोड‌विण्याच्या सूचना

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना यांनी तालुक्यातील जि. प. शाळा, अंगणवाडी, शौचालय बांधकाम, स्वच्छता व ज्या शाळांना वीज जोडणी नाही तिथे त्वरित देणे आदींबाबत बैठकीत सूचना केल्या. उपस्थित विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना कामकाजाबाबत समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभियंत्यांनी द्यावे शहरासाठी योगदान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर असलेल्या वाहतुकीचे अपडेटस सहजगत्या मिळावेत यासाठी सॅटेलाइट यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पुढील महिनाभरात व्हर्च्युअल क्लासरूमचा प्रयोग राबविण्यात येणारअसून, शहर स्मार्ट करण्यासाठी अभियंत्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांन‌ी शुक्रवारी केले.

दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स इंडियाच्या नाशिक शाखेतर्फे पन्नासाव्या अभियंता दिनानिमित्त अशोका हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष मनीष कोठारी, मानद सचिव सुमित खिंवसरा, सहसचिव विपुल मेहता, अजित पाटील, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, नाशिक सिटिझन फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग, महिंद्राचे महाव्यवस्थापक नॉर्बट डिसुझा आदी उपस्थित होते. यावेळी खासदार गोडसे म्हणाले, की मी प्रथम अभियंता आणि नंतर लोकप्रतिन‌िधी आहे. अभियंत्यांकडे उत्तम नियोजन कौशल्य, तसेच दूरदृष्टिकोन असतो. नाशिकच्या नियोजनात्मक विकासासाठी अभियंता आणि खासदार म्हणून केलेल्या प्रयत्नांची माहितीही यावेळी त्यांन‌ी दिली. विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत असला, तरी ती निश्च‌ित सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विज्ञानावर आधारित लोकसभा कार्यक्षेत्राच्या विकासाची, तसेच टेलिमेडिसीनची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. नाशिकला स्मार्ट शहर बनविण्यात अभियंत्यांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमात नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील अभियांत्रिकी शाखेच्या पोस्ट ग्रॅज्युएट व पॉलिटेक्निक शाखेतील अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

--

यांचा झाला गौरव

मयूर जैन, रशिदा बाटलीवाला, संजय महाजन, परणीत चौधरी, गोविंदा भावसार, शुभम गायधनी, शुभांगी भुसारे, प्रतीक्षा देवकर, शीतल कहांडळ, श्वेता धोंडगे, सोनाली भंडारे, चंचल जावळे, गणेश शेटे, शीतल बोरसे, स्नेहा हंसवाणी, दिव्या वानखेडे, हुसेन असरानी, ऐश्वर्या बरड, निकिता चव्हाण यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालमृत्यू प्रकरणी कोर्टात जाऊ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह राज्यातील अर्भक व बालमृत्यूला सरकारचे तीन मंत्री जबाबदार असतानाही, मुख्यमंत्री या भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करण्यातच व्यस्त आहेत. त्यामुळे मंत्री व यंत्रणा बेफिकीर झाली असून, या मंत्र्यांच्या राजीनाम्याऐवजी मुख्यमंत्र्यांमध्येच नैतिकता शिल्लक असेल तर आता त्यांनीच जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या मृत्यूला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत असून, आता सरकारला जाग आणण्यासाठी न्यायालयाचाच दरवाजा ठोठवू, असा इशाराही विखे पाटील यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी समृद्धी, मेट्रो या स्वप्नरंजनातून बाहेर पडून वास्तवाला सामोरे जात जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे व लोकांना स्वप्ने दाखवण्याचा धंदा बंद करावा, असा टोमणाही राधाकृष्ण विखे यांनी लगावला आहे.

विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी शुक्रवारी नवजात अर्भक मृत्यू प्रकरणी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करत वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. विखे पाटील यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला. गोरखपूर येथील बालमृत्यू घटनेनंतर सरकारने धडा घ्यायला हवा होता, असे सांगत सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप केला. नाशिकच्या प्रकरणात आरोग्यमंत्र्यांनी नैतिकता स्वीकारायला पाहिजे होती. मात्र, त्यांनी येऊन घोषणाबाजी करत आपली जबाबदारी झटकली आहे. रुग्णालयातील २२५ बालकांच्या मृत्यूला सरकारचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.

राज्य सरकारने ग्रामबालविकास केंद्र बंद केल्याने, तसेच आदिवासी योजनांची पुरती वाट लागली असून, कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी डॉ. एपीजी अब्दुल कलाम अमृत योजना सुरू केली खरी, परंतु योजनेतून मोठ्यांच्या नावालाच काळीमा फासण्याचे काम सरकारने केले आहे. योजनेत बंद पाकिटातून आहार देण्यास सुरुवात केली. मात्र, बंद पाकिटे मंत्रालयात जात असल्याने त्यात काही शिल्लक राहत नाही, असा टोलाही त्यांनी आदिवासी विकासमंत्र्यांना लगावला.

राज्यातील वाढत्या अर्भक व बालमृत्यूस आदिवासी, महिला व बालकल्याण व आरोग्य विभाग जबाबदार असून, या तिन्ही खात्यांच्या मंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र, मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करीत असल्याने मंत्र्यांसह यंत्रणाही बेफिकीर झाली आहे. मुख्यमंत्री दुसरीकडे समृद्धी, मेट्रो यांचे स्वप्न जनतेला दाखवत फिरत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या स्वप्नरंजनातून बाहेर पडत मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच ‘मुख्यमंत्री बोलतोय’ यापेक्षा प्रत्यक्षात कृती केली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यूला महापलिका व जिल्हा रुग्णालय यात समन्वय नसल्याने हे प्रकार वाढल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

इंधनावरील टॅक्स रद्द करा

देशभरात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या असून, अच्छे दिन दाखवण्याऐवजी लोकांचा खिसा रिकामा करण्यात सत्ताधारी व्यस्त असल्याचा आरोपही विखे पाटील केला. इंधनाचे दर कमी असतानाही ग्राहकाला त्याचा लाभ दिला जात नसून, उलट ग्राहकांची लूट करून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा भरला जात आहे. केंद्र व राज्य सरकारे ग्राहकांना लाभ देण्याऐवजी तो कंपनी व सरकार लाटत आहे. अच्छे दिन दाखविण्यासाठी पेट्रोलचे भाव ३०- ३५ रुपये हवे होते. राज्य सरकारकडे उत्पन्नाचे स्रोत नसल्याने पेट्रोलवर अतिरिक्त कर लादला जात असल्याने पेट्रोल दरवाढ झाली असून, सरकारने इंधनावरील सर्व टॅक्स मागे घ्यावेत, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

विभागीय आयुक्त अंधारात

बालमृत्यूसारखे गंभीर प्रकार घडत असताना महापालिका, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांमध्येच समन्वय नसल्याचा आरोप त्यांनी केला. विभागीय आयुक्त नाशिकमध्येच बसतात. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन समन्वय साधण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यांच्या डोळ्यादेखत बालमृत्यूचे प्रकार घडत असताना त्यांच्या खुर्चीखाली मात्र अंधार असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांमध्येसुद्धा समन्वय नाही. महापालिका रुग्णालयातील बालकेच जिल्हा रुग्णालयात दाखल होत असल्याने भाजपच्या सत्तेखाली महापालिकेत चालले काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राणे काँग्रेसमध्येच

नारायण राणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, ते काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी या वेळी दिले. त्यांच्या नाराजीचा कोणताही प्रश्न नसून, भाजप प्रवेशाचीही चर्चा नाही. माध्यमांमध्येच प्रवेशाची चर्चा असल्याचे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आवक टिकून; दरात घसरण

$
0
0

कांदा उत्पादकांमध्ये नाराजी; धाडींचाही परिणाम

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नवीन पोळ कांदा बाजारात येईपर्यंत पुरेल इतका कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक असताना दर कोसळल्याने उत्पादकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. परिणामी सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा आवक टिकून आहे. त्यात उत्पादन शुल्क विभागाने कांदा व्यापाऱ्यांवर धाडसत्र टाकल्याने इतर व्यापारीही धास्तावले आहेत. याचा कांदा खरेदीवर विपरित परिणाम झाला आहे. बागलाण तालुक्यात अद्यापही किमान सात लाखांहून अधिक टन कांदा शेतकऱ्यांच्या चाळीत साठविलेला असल्याने कांदा उत्पादकांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

देशभरात नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक म्हणून नावारूपाला आलेला आहे. त्यातही कळवण, देवळा, बागलाण, मालेगाव हा परिसर कांद्याचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्तही लासलगाव व पिंपळगाव पसिरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कळवण, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभाग व नाफेडच्या माध्यमातून कांदा चाळीचे मोठे जाळे निर्माण केले आहे. यामुळे कांदाचाळीच्या माध्यमातून उत्पादकांनी कांदा साठवून त्यांची जपणूकदेखील तितक्याच काळजीने केली आहे.

मध्यंतरी श्रावण महिन्यात कांद्याला सुमारे २५०० ते ३००० रुपयापर्यंत भाव वधारल्याने कांदा उत्पादकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परिणामी कांदा उत्पादकांनी कांदा चाळीतून काढण्याऐवजी अधिक तेजी येईल या अनुषंगाने वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली. मात्र या दरांची उंची अल्पशी ठरली.

मध्यंतरी बाजारात मध्य प्रदेश सरकारच्या हमीभावाच्या कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केला. त्यात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेतकरीवर्गाने हात आखडता घेऊन कांदा आवक कमी झाल्याने बाजारात कांद्याचे दर चढे झाले होते. दरम्यान, कांदा व्यापाऱ्यांकडे देखील याच काळात मोठ्या प्रमाणात कांदा साठविल्याने त्यांनी देखील तेजी-मंदीचा खेळ खेळून आपले उखळ पांढरे केले. मात्र अवघ्या दोन ते चार दिवसांत भाव घसरल्याने कांदा उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे डोळे पांढरे झाले.

चाळींमध्ये कांद्याची साठवणूक

बागलाण तालुक्यात पणन महामंडळाने २५ टन क्षमतेच्या २०१० ते २०१३ पर्यंत किमान १५०० पेक्षा अधिक तर कृषी विभागाने २०१४ ते २०१७ पर्यंत किमान २००० हून अधिक कांदाचाळी करिता अनुदान दिले आहे. या चाळींव्यतिरिरीक्त देखील कांदाचाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उभारून दीर्घकाळ कांदा कसा टिकेल यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. यामुळे आजही मोठ्या प्रमाणात कांदा या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे घडतात, पुढे होत तरी काय?

$
0
0

रमेश धर्माधिकारी, मटा वाचक

शहर परिसरात अनेकदा मोठे गुन्हे घडतात, पण पुढे त्यांचे काय होते ते कळत नाही. काही वर्षांपूर्वी द्वारका येथे दूध भेसळीचा मोठा प्रकार घडला. नामवंतांची मुले हुक्का पार्लरमध्ये आढळून आली. बेकायदेशीर देहविक्रीचा व्यवसाय सुशिक्षित वसाहतीत पकडला गेला, या साऱ्यांचे पुढे काय झाले?

--

लोकप्रतिनिधींच्या निधीतून द्यावी भरपाई

जी. जी. मोरे, मटा वाटक

शहरातील प्रभागांत किंवा वॉर्डांत चोऱ्या झाल्या, तर त्यांची नुकसानभरपाई आमदार, नगरसेवक यांच्या निधीतून करावी. तसा निर्णयच घेण्यात यावा. किमान त्यामुळे तरी लोकप्रतिनिधी जागरूकपणे आपला मतदारसंघ सांभाळतील अन् गुन्हे घटतील. आपापल्या प्रभागात ते सीसीटीव्हीदेखील बसवतील.

--

सिव्हिलप्रश्नी व्हावी सखोल चौकशी

सचिन धोंडगे, मटा वाचक

उत्तर प्रदेशातील गोरखपूरप्रमाणेच नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवजात अर्भकांचा बळी जाण्याचे दुर्दैवी प्रकार घडले. अपुऱ्या सुविधा, उपचारांचा अभाव आणि टाळमटाळ यास कारणीभूत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी.

--

हेल्मेटसक्ती कितपत व्यवहार्य?

शरद साठे, मटा वाचक

पुणे, कोल्हापूरवासीयांनी हेल्मेटसक्ती मोडून काढली आहे. याउलट नाशिकची स्थिती आहे. मुकी बिचारी कुणीही हाका व हाणा अशी शहरवासीयांची स्थिती आहे. नाशिकसारख्या शहरात सरसकट हेल्मेटसक्ती करणे कितपत व्यवहार्य आहे, याचा विचार व्हावा. शारीरिकदृष्ट्याही हेल्मेटच्या अनेक तक्रारी आहेत. रिक्षाचे बंद मीटर आणि सार्वजनिक बस वाहतुकीचा उडालेला बोजवारा यामुळे दुचाकी वापरणे अपरिहार्य आहे. ज्येष्ठांना पाठ, मानदुखीचा आधीच त्रास असतो. आता त्यात हेल्मेटची भर पडली आहे. हेल्मेटवापरामुळे मूळ दुखणे बळावण्याची भीती आहे. ज्येष्ठांनी यासाठी कुणाला जबाबदार धरावे? चौकांमध्ये, भररस्त्यात पोलिस अडवतात. क्लासेस किंवा एखाद्या ठिकाणाहून मुलांना आणणे-सोडणे हे काम महिला करतात. त्यांचीही मोठी अडचण हेल्मेटमुळे होते. त्यामुळे सबुरीने घेणाऱ्या नाशिककरांवर सक्तीची कुऱ्हाड चालविली जाते आहे, असेच म्हणावे लागेल.

--


अडचणी, समस्या, तक्रारी पाठवा

आपणही आपल्या परिसरातील सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारी, अडचणी, समस्या पाठवू शकता. मटा सिटिझन रिपोर्टर हे अॅप त्यासाठी उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप मोफत डाऊनलोड करता येईल. त्यानंतर अवघ्या तीन सोप्या स्टेप्समध्ये आपल्याला तक्रार फोटोसह किंवा फोटोशिवाय पाठविता येईल. तसेच, ही तक्रार प्रसिद्ध झाल्याचे नोटिफिकेशनही तुम्हाला प्राप्त होईल. ऑनलाइन प्रसिद्ध होणारी तक्रार, या अॅपमध्येच दिसण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामे लावा आठवड्यात मार्गी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शासनाच्या लोकाभिमुख, पारदर्शी व गतिमान प्रशासकीय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा दररोज वाढत असलेला दबाव व या धोरणाची अंमलबजावणी गांभीर्याने करण्याकडे विभागातील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दप्तरदिरंगाईमुळे कात्रीत सापडलेल्या विभागीय महसुल आयुक्त महेश झगडे यांनी विभागातील बीडीओ ते जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आपल्या स्तरावरील कामे त्यांना आठवडाभरात पूर्ण करण्याचा थेट अल्टिमेटमच दिला.

शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचारमुक्त व गतिमान प्रशासनाचे आदेश डावलले जात असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस आल्याने विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्वच अधिकारीवर्गाची चांगलीच कानउघाडणी केल्याने विभागातील अधिकारीवर्गास आता गतिमान प्रशासनासाठी कंबर कसून काम करावे लागणार आहे.

नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयात विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील बीडीओ ते जिल्हाधिकारी स्तरावरील सर्व महसूल अधिकारी व जिल्हा परिषदांचे सर्व अधिकारी यांची कार्यशाळा नुकतीच झाली. या कार्यशाळेत महसूल आयुक्तांनी उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत आपल्या स्तरावरील कामे आठवडाभरात पूर्ण न केल्यास कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा स्पष्ट इशारा दिला. या कार्यशाळेस नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रशासनाविषयी सामान्य जनतेच्या मनात नकारात्मक भावना आहे. विभागातील अधिकारी सामान्य जनतेस वेठीस धरत असल्याचे प्रकारही घडले आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित केलेला असूनही अधिकारी अशी कामे करण्यासाठी दिरंगाई करीत असल्याचे सांगून महसूल आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तालुकास्तरावरील अधिकारी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मर्जीसाठी त्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत अशा अधिकाऱ्यांवर यापुढे कडक कारवाईचे संकेतही दिले.

--

आदेशांचे पालन करा

सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी वास्तव्यास असणे बंधनकारक आहे. मात्र, मुख्यालयी वास्तव्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढे कारवाई करण्यात येईल, असेही झगडे यांनी यावेळी सांगितले. काही महत्त्वाच्या अहवालांची माहिती मागवूनही वेळेत सादर करण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, त्यामुळे यापुढे प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांच्या आदेशांचे पालन वेळेत न केल्यास अशा अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच झगडे यांनी दिला.

--

या चुका पुन्हा झाल्यास खबरदार!

बदलीसाठी राजकीय दबाव आणणे, न्यायिक स्तरावर न तपासताच प्रकरणे अहवाल पाठविणे, पदाचा गैरवापर करणे, आदेशांकडे डोळेझाक करणे, अर्धन्यायिक प्रकरणांत चुकीचे आदेश देणे, सामन्य नागरिकांना वेठीस धरणे, सेवा हमी कायद्याचे उल्लंघन करणे, फाइल निर्णयाविना थांबवून ठेवणे असे प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नसल्याचे झगडे यांनी या कार्यशाळेत ठणकावून सांगितले. अधिकाऱ्यांकडून कशा प्रकारच्या चुका होत आहेत याबद्दल आयुक्तालयातील उपायुक्तांनी सोदाहरण माहिती दिली.

--

नागरिकांची सजगता कारणीभूत

जिल्हा व तालुकास्तरावर सामान्य नागरिकांची शासकीय कामांंसाठी अधिकाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याने नागरिकांकडून थेट वरिष्ठ पातळीवर तक्रारी येत आहेत. त्यामुळे विभागातील अधिकाऱ्यांचा प्रशासनातील मनमानीपणा उघड झाला आहे. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे राज्य शासनाच्या पारदर्शी व गतिमान प्रशासकीय धोरणालाच खोड बसला आहे. या सर्व प्रकारामुळेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे झगडे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किऑस्क मशिनची घोषणा हवेत विरली

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात नागरिकांच्या सोयीसाठी ‘इन्फर्मेशन क‌िऑस्क मशिन बसविण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली घोषणा हवेत विरली आहे. याउलट स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांनी उद्‍घाटन केलेले मशिनही संबंधित कंपनीने परत नेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९२ मंडळांमध्ये ही मशिन्स बसविली जाणार की नाही असा प्रश्न उपस्थ‌ित झाला आहे.
सात-बारा उतारा मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि प्रत्येक तालुक्यातील तहसील व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये सातबारा वितरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी इन्फर्मेशन किऑस्क मशिन बसविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. स्वातंत्र्यदिनी या मशिनचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरणही झाले. परंतु हे मशिन उद्‍घाटनापुरतेच मर्यादित राहिले. स्वातंत्र्यदिनी आणख‌ी चार ठिकाणी हे मशिन बसविण्यात येणार होते. मात्र, तसे होऊ शकलेले नाही.
ग्रामीण तसेच आदिवासी भागात सातबारा उतारे मिळण्यात इंटरनेटच्या समस्येमुळे अडचणी येतात. अशा भागात किऑस्क मशिन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, सायबर कॅफेसह इतर कुठलीही सुविधा नसलेल्या नागरिकांना या किऑस्क मशिनद्वारे सात-बारासह इतरही सेवा मिळणार आहे.
९२ मंडळांमध्ये हे मशिन बसविण्यात येणार आहे. सीएसआर फंडातूनच त्या मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्याच्या ठिकाणी स्वातंत्र्यदिनीच मशीन बसविले जाणार होते. मात्र, अद्याप एकाही ठिकाणी ते बसविलेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय विभागात जम्बो भरती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
अपुऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी संख्येमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याने महापालिकेने आपल्या हॉस्पिटलमध्ये मानधन तत्वावर २८ डॉक्टरांसह २५१ अन्य पदांची जम्बो भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढत्या आस्थापना खर्चाचा हवाला देत सरकारने नोकरभरतीला बंदी घातल्याने पेचात सापडलेल्या महापालिकेने या पदांची मानधनावर भरती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून त्यासाठी प्रतिवर्ष साडेचार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून चार रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने व ३० शहरी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा-सुविधा पुरविल्या जातात. परंतु, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या सेवा देतांना अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर वैद्यकीय विभागासाठी ७५४ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी ४९३ पदांवरच कर्मचारी कार्यरत असून, तब्बल २६१ पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या अस्तित्वातील, तसेच नव्याने उभारण्यात येत असलेल्या रुग्णालये, दवाखान्यांसाठी उपलब्ध कर्मचारी संख्या अत्यंत तोकडी आहे. शहराचा दिवसेंदिवस वाढणारा विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेच्या रुग्णालयांवरील रुग्णसंख्येचा ताण मात्र वाढतच आहे. महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्याने सरकारने सरळसेवेने नोकरभरतीला बंदी घातली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागातील रिक्तपदांची संख्या भरून काढण्यासाठी आता मानधनावरील भरतीचा प्रस्ताव पुढे आला आहे. यासाठी वार्षिक ३.९५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मानधन खर्चासाठी ४.५० कोटींची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ही पदे भरली जाणार

वैद्यकीय अधिकारी.....पदांची संख्या
कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर-एमबीबीएस-दंतरोगतज्ज्ञ : १४
फिजीशियन : ३
सर्जन : २
नाक-कान-घसा तज्ज्ञ : २
क्ष-किरण तज्ज्ञ : २
अस्थिरोगतज्ज्ञ : २
त्वचारोगतज्ज्ञ : २
पॅथॉलॉजिस्ट : १

एकूण : २८ पदे

अन्य पदे
स्टाफनर्स - ११५, वॉर्डबॉय - २९, आया - २३, एएनएम - १४, हेडनर्स - १०, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ६, मिश्रक - ५, बहुउद्देशिय सेवक - ४, परिचर प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ४, एक्से-रे टेक्निशियन - २, एक्स-रे असिस्टंट - २, कुष्ठरोग तंत्रज्ञ - २, ड्रेसर - २, परिचर शस्त्रक्रिया गृह - २, बायोमेडिकल इंजिनिअर - २, ब्लॉक लेव्हल सुपरवायझर - १ : एकूण २५१ पदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीचशे कोटींचे गाजर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मनसेच्या सत्ताकाळातील दोनशे कोटींच्या रस्त्यांची बोंब असताना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नगरसेवकांमधील असंतोष कमी करण्यासाठी अडीचशे कोटींची रस्तेविकास योजना प्रस्तावित केली आहे.
निवडणुकीला सात महिन्यांचा कालावधी उलटला तरी प्रभागातील विकासकामे होत नसल्याने अस्वस्थ असलेल्या नगरसेवकांमधील संताप कमी करण्यासाठी प्रत्येक प्रभागात साडेसात कोटींचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या कामांची निविदा प्रक्रियाही राबवली जाणार असली तरी, प्रत्यक्षात या कामांना २०१८ उजाडणार आहे. पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात त्याचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकासाठी ही लॉटरी असली तरी त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने साडेचारशे कोटी रुपये खर्चाची रस्ते व रिंगरोड विकासाची योजना राबविण्यात आली. यानंतर मनसेच्या सत्ता काळातील शेवटच्या टप्प्यात कॉलनी अंतर्गत रस्ते विकासासाठी १९५ कोटींची योजना राबविण्यात आली. त्यामुळे शहरातील बहुतांश भागातील रस्त्यांचा विकास झाला आहे. या रस्त्यांचीच कामे अजून अपूर्ण आहेत. काही ठिकाणी अस्तरीकरण तर काही ठिकाणी तिसरा चौथा लेअर बाकी आहे. सिंहस्थातील काही रस्तेही अपूर्ण आहेत. मनसेची सत्ता जावून महापालिकेत भाजप सत्तारुढ झाली आहे. महापालिकेत भाजपला बहुमत मिळाले असले तरी, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकच विकासकामांसाठी चाचपडत आहेत. सत्ता येऊन सात महिने झाले तरी नगरसेवकांची विकासकामे होत नाहीत. त्यामुळे भाजपच्याच नगरसेवकांमध्ये असंतोष असून त्यांनी पालकमंत्र्याकडे बोलून दाखवला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या नगरसेवकांचा असंतोष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तिजोरीत खडखडाट असताना नव्याने शहरात अडीचशे कोटींची रस्ते विकास योजना हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे बोट दाखवण्यात आले असून त्यांच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा करण्यात आल आहे. पंरतु, हा केवळ नगरसेवकांचा असंतोष कमी करण्यासाठीचा अट्टाहास असल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण
महापालिकेने रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. सुमारे २०० किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती या माध्यमातून केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागात किमान ७.५ कोटींच्या रस्त्यांचा विकास होणार आहे. डांबरी तसेच सिमेंटचे रस्ते केले जाणार असून त्यासाठी प्रामुख्याने नव्याने विकसित झालेल्या भागांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच जुन्या वसाहतीतील पाच ते दहा वर्षे जुन्या रस्त्यांचे अस्तरीकरण केले जाणार आहे. प्रस्तावित रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल. प्रत्यक्ष कामांना एप्रिल २०१८ मध्ये सुरुवात होऊ शकेल, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता यू. बी. पवार यांनी दिली. त्यामुळे केवळ गाजरच ठरण्याची शक्यता अधिक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा लिलाव ठप्प

$
0
0

म. टा. खास, प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवडसह मोठ्या बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी लिलाव झाले नाहीत. मालेगाव येथे शुक्रवारची सुटी असल्यामुळे बाजार समिती बंद होती. मनमाड, सटाणा वगळता कोठेही लिलाव झाले नाहीत. काही बाजार समित्यांना दोन दिवस सुटी आल्याने सोमवारीच लिलाव सुरू होऊ शकणार आहेत.
मनमाड व सटाणा येथे झालेल्या कांदा लिलावात मात्र कांद्याच्या किमतीत कोणतीही घसरण व वाढ झाली नाही. या दोन्ही बाजार समितीत भाव स्थिरच राहिले. मनमाड येथे किमान ७०० रुपये क्विंटल तर कमाल भाव १ हजार ३५१ रुपये क्विंटल होते. या बाजार समितीत सरासरी भाव मात्र १ हजार १९० रुपये क्विंटल होता. सटाणा येथेही लिलावात फारसा फरक नव्हता. येथे किमान दर ९०० रुपये क्विंटल तर कमाल भाव १ हजार ४०० रुपये क्विंटल होता. या बाजार समितीत सरासरी भाव मात्र १ हजार २०० रुपये क्विंटल होता. शनिवार व रविवारी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद असणार आहे. त्यामुळे सोमवारनंतर या बाजार समितीत लिलाव सुरू होणार आहेत.
कांद्याची साठेबाजी आणि त्यातून होणारी भाववाढ रोखण्यासाठी या धाडी टाकल्या असल्या तरी त्यामुळे कांद्याची बाजारपेठ ठप्प झाली. विशेष म्हणजे यातील सर्वच व्यापारी मोठे खरेदीदार असल्याने ती सुध्दा अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कांद्याची मोठी बाजारपेठ असून, देशात व परदेशातही येथून कांदापुरवठा केला जातो. त्यामुळे येथील लिलावाचे परिणाम भाववाढीवर होऊ शकतात. त्यामुळे हे लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. व्यापाऱ्यांवर पडलेल्या धाडीने लिलाव ठप्प झाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे.

नाशिकला मार्केट सुरळीत
पंचवटी : नाशिक जिल्हाभरात कांदा मार्केट बंद असताना नाशिक बाजार समितीत कांद्याचे व्यवहार सुरळीत सुरू होते. जिल्ह्याच्या तुलनेत नाशिकला कांद्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी प्रमाणात असतात. सध्या नाशिक मार्केटमध्ये १० ते १३ रुपये प्रति किलो असा कांद्याला दर मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औषध निर्यातीमध्ये जगात भारत अव्वल

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भारत हा औषध निर्यातीमध्ये फार्मसी ऑफ वर्ल्ड झाला असून २०० देशात औषधांचा पुरवठा आता आपल्याकडून होतो. या पुरवठ्यातून वर्षभरात २ लाख कोटी व्यवयास होतो. येत्या तीन वर्षात तो दुप्पट होईल त्यामुळे या व्यवसायाकडे नाशिकच्या केमिस्टने सहभाग घेवून कायद्याच्या चौकटीत आपला व्यवसाय वाढवावा त्यासाठी कायदेशीर मदत ही अन्न औषध प्रशासनाकडून देण्यात येईल, असे आवाहन अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त ओमप्रकाश सादवाणी यांनी केले.

नाशिक जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात सादवाणी बोलत होते. ते म्हणाले, की फार्मसी व्यवसायत मी सुद्धा काम केले आहे. पेशंटची सेवा करणे हे महत्त्वाचे आहे. त्यांना चांगल्या दर्जाचे औषध मिळावे यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. या व्यवसायात विश्वास महत्त्वाचा असून तुम्ही कस्टोडियन आहात. लायसन्स असलेला कोणाताही विक्रेता नकली औषध विकत नाही. पण लायसन्स नसलेले असले उद्योग करतात. त्यामुळे त्यांना रोखण्याची गरज आहे. औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या पिस्क्रिप्शन घेऊन आणि बील देऊनच औषधाची रुग्णांना विक्री करावी. या व्यवसायात कायदेशीर काम करावे आणि आपला व्यवसाय वाढवावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सादवाणी यांचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौरव चौधरी यांनी सत्कार केला. योगेश बागरेचा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपेंद्र दिनानी, जगदीश भोसले, संजय अमृतकर, अतुल दिवटे, महेंद्र शहा, सुरेश अहिरे यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स हाउसिंग फेस्ट’चा आजपासून धमाका

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना आपल्या बजेटमधील घरे, रो-हाउसेस, फ्लॅट्स, प्लॉट्स यासारख्या प्रॉपर्टीजची माहिती एकाच ठिकाणी मिळविण्याची संधी चालून आली आहे. टाइम्स ग्रुपतर्फे शनिवारपासून त्र्यंबक रोडवरील हॉटेल एमरल्ड पार्कमधील ग्रीन व्ह्यू हॉलमध्ये ‘टाइम्स हाउसिंग फेस्ट नाशिक’ होणार आहे.
‘टाइम्स हाउसिंग फेस्ट नाशिक’ या प्रॉपर्टी प्रदर्शनातून ही संधी उपलब्ध झाली आहे. शहर व परिसरातील नामांकित बांधकाम विकसकांचे प्रकल्प एकाच ठिकाणी या प्रदर्शनातून पाहता येणार आहे. नवरात्रोत्सव, दिवाळी असे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सण उत्सवाच्या या काळात ग्राहकांचा गृहखरेदीकडे मोठा ओढा असतो. तसेच बांधकाम विकसकांकडूनही वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्सची बरसात सुरू करण्यात आली आहे. जीएसटी नाही, पाच ते दहा लाख रुपयांची सूट, कार फ्री अशा अनेक आकर्षक ऑफर्सचा यात समावेश आहे. नोटबंदी व रेराच्या अवलंबानंतर रिअल इस्टेट मार्केट डळमळीत झाले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून रिअर इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी एक पाऊल उचलण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये सुमारे १७ बिल्डर्स शंभरपेक्षा जास्त प्रोजेक्ट घेऊन सहभागी होणार आहेत. ग्राहकांना एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्पाची माहिती उपलब्ध व्हावी असा त्या मागील उद्देश आहे. अधिकाधिक ग्राहकांनी या फेस्टला भेट देऊन आपल्या मनात असलेले घर बुक करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिपचे चार शिक्षक बडतर्फ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कामात गैरवर्तणूक, नियमबाह्य वर्तन, अनधिकृत गैरहजेरी, विद्यार्थ्यांसमोर मारहाण करणे अशा गंभीर कारणांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या चार शिक्षकांना बडतर्फ करण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. यातील तीन शिक्षक पेठ तर एक शिक्षक सुरगाणा तालुक्यातील आहे. बडतर्फीचे अजून सुमारे दहा प्रस्ताव रांगेत असून येत्या महिनाभरात या शिक्षकांवरही कारवाई होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.
शिक्षकांना विद्यार्थी आदर्श मानत असले तरी त्यांच्या कृतींनी विद्यार्थ्यांमध्येही सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई झाल्यानंतर अशा अनेक मारकुट्या शिक्षकांचे प्रताप समोर आले आहे. यामध्ये मुख्याध्यापकांच्या अंगावर धावून जाणे, विद्यार्थ्यांसमोर मारहाण करणे, अर्वाच्य भाषेचा शाळेत वापर करणे, विद्यार्थ्यांचा अभ्यास विहित वेळेत पूर्ण न करणे, शाळेतील संगीत कॅसिओची तोडफोड करणे अशा अनेक कारणांनी बडतर्फीचा बडगा जिप अधिकाऱ्यांकडून उचलण्यात आला आहे. यामध्ये पेठ तालुक्यातील अरुण भगवान चव्हाण, लक्ष्मण नवसू खाडस, जगन्नाथ सुपडू घृणावंत आणि सुरगाणामधील चंदर उखा चौधरी या शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांप्रमाणेच येत्या महिनाभरात आणखी दहा शिक्षकांवर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येणार असून तसेच प्रस्तावही शिक्षण विभागाने दिले आहेत. कारवाई झालेल्या शिक्षकांना पेठ तालुक्यातील शिक्षकांची संख्या मोठी असून इगतपुरी, निफाड, दिंडोरी, नांदगाव, चांदवड, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे. या कारवाईमुळे येत्या काळात असे वर्तन करणाऱ्या शिक्षकांच्या वर्तणुकीला चाप बसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यांची रोखली वेतनवाढ
हिरामण रामदास बैरागी यांची एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात बंद, मंगला पुरुषोत्तम गवळी यांची तीन वेतनवाढी कायमस्वरूपी बंद, जिभाऊ पंडित सोनजे यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद, मिलिंद प्रल्हाद गांगुर्डे, मधुकर गंभीर अहिरे, नाना वसंत गंगावणे आणि दिनकर आधार पवार यांच्या दोन वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय, नांदगावमधील घनश्याम बाबुराव पाटील व चांदवड तालुक्यातील सुनंदा राणोजी जाधव या दोन शिक्षकांना त्यांच्या वर्तणूक सुधारण्याची ताकीद देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेतून काढलेले चार लाख लांबवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड
लासलगाव येथील दत्ताजी पाटील सहकारी बँकेतून मुलाच्या फ्लॅट खरेदीसाठी काढलेले चार लाख रुपये चोरट्यांनी पल्सरवरून येत लंपास केल्याची घटना घडली.
अण्णासाहेब सीताराम सुरवाडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. सुरवाडे यांनी लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेतून सकाळी चार लाख रुपये काढले. घरी परतत असताना गणेशनगरजवळ पल्सरवरून आलेल्या तरुणांनी तुमचे पैसे पडल्याचे सांगत त्यांच्याकडे असलेली पैशांची बॅग ओढून नेली. सुरवाडे यांनी आरडाओरड केला; परंतु तोपर्यंत दुचाकीस्वारांनी पोबारा केला. मुलाच्या फ्लॅट खरेदीसाठी त्यांनी बँकेतून पैसे काढले होते. चोरट्यांनी बँकेपासून सुरवाडे यांच्यावर पाळत ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अत्यंत गजबजलेल्या भागात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

उगावमधील मंदिरात चोरी
निफाड : उगाव येथील मध्यवस्तीत असलेल्या श्रीराम विठ्ठल मंदिरात दानपेटी फोडून चोरी झाल्याची घटना घडली. भाविकांनी गुरुवारी (दि. १४) रात्री आरतीनंतर मंदिराचे सर्व दरवाजे कुलुपबंद केले होते. भाविक शुक्रवार (दि. १५) पहाटे काकड आरतीसाठी मंदिरात दाखल झाले त्यावेळी मंदिराचे प्रवेशद्वार व आतील गाभाऱ्यापर्यंतचे दोन दरवाजांची कुलुप तोडून दरवाजे उघडे दिसले. मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याचे भाविकांना आढळले. भाविकांनी मंदिराभोवती गर्दी केली. दुपारच्या सुमारास मंदिरातील चोरीस गेलेली दानपेटी निफाड रोडलगत शिवडी शिवारातील शेतात आढळून आली.

अपघातात दोघे ठार
निफाड : येवला येथून विंचूरला येत असलेल्या दोघा मोटरसायकलस्वारांचा पाठिमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. सुनील बाबुराव गारे (४३, रा. चांदवड) आणि मोहम्मद मन्सूर आलम (५२, रा. कोलकाता) हे डाळिंबाचे व्यापारी येवल्याहून विंचूरला कामानिमित्त जात होते. त्यांना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरात धडक दिली. यात दुभाजकावर फेकले गेल्याने दोघेही जागीच ठार झाले. अपघातात मोटरसायकल चक्काचूर झाली. निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ पाटील यांनी शवविच्छेदन झाल्यानंतर त्या दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावजवळ गोवंश मांस जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
केळीची वाहतूक करीत असल्याचा बनावाद्वारे गोवंश जनावरांची कत्तल करून मांस वाहतूक करणाऱ्या धुळे येथील टोळीस येथील पोलिसांनी गजाआड केले. पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने व अजित हगवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मुंबई-आग्रा महामार्गवरील चाळीसगाव फाट्याजवळ शालिमार हॉटेल येथे सापळा रचून धुळेकडून मुंबईच्या दिशेने जणारा टेम्पोची (एमएच ०४ सीपी १७६९) तपासणी केली. यावेळी गाडीत केळीचे फांद्यांखाली तीन लाख रुपयांचे तीन हजार किलो गोवंश जनावरांचे मांस भरलेले प्लास्टिक १५ ड्रम आढळून आले. दोन आरोपी टेम्पो चालवित होते तर अन्य दोघे त्यांना टेम्पो सुरक्षितरित्या नेता यावा यासाठी कारने (एमएच १८ क्यू ००७१) टेहळणी करीत होते. धुळे येथील मुश्ताकीन अय्युब कुरेशीच्या सांगण्यावरून ही वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी शेख अहमद शेख इमान (रा. जळगाव), अफजल खान यासिन खान (रा. मालेगाव), मुजाहिद आयुब कुरेशी (रा. धुळे) आणि इंडिगोचालक जुनेद कुरेशी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images