Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विचारवंतांची हत्या लांच्छनास्पद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ शहरातील पुरोगामी विचारवंतानी एकत्र येऊन शहरात मूक मोर्चा काढला. देशात विचारवंतांची हत्या होणे लांच्छनास्पद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मोर्चात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ गणेश देवी हेसुध्दा सहभागी झाले.
गंगापूर रोड येथील अपरांती अकादमी येथून मोर्चा सुरु झाला. यात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, निवृत्त पोलिस अधिकारी संजय अपरांती, हॉकर्स युनियनचे नेते शांताराम चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विश्वास लॉन्स येथून निघालेला मोर्चा विविध भागातून कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे विसर्जित झाला. यावेळी दक्षिणायन चळवळीचे प्रणेते व शिक्षण तज्ज्ञ प्रा. गणेश देवी यांनी मोर्चाला संबोधित केले. ते म्हणाले, की भारतात लोकशाही आहे की नाही हे समजत नाही अनेक विचारवंताच्या हत्त्या होत असता लोक म्हणतात की यानंतर कोण? घरांमध्ये येऊन मारेकरी हल्ले करता आहेत तरीही सरकारला ते सापडत नाही याचे दुखः आहे. आतापर्यंत डॉ. नरेंद्र दाभेलकर, प्रा. कलबुर्ग, कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाही, ही लाच्छनास्पद बाब आहे. यावेळी निवृत्त पोलिस अधिकारी अपरांती म्हणाले, की मारेकऱ्यांची मारण्याची पद्धत एकसमान आहे. त्यामुळे या विचाराशी साधर्म्य असणाऱ्या संस्थावर नजर ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मोर्चात शहरातील प्राध्यपक विचारवंत, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकेतून बॅटऱ्यांची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अभोणकर लेन शाखेतील जनरेटरची बॅटरी चोरट्यांनी चोरी केली. प्रशांत भाऊसाहेब मोदी यांनी या प्रकरणी तक्रार दिली.
मोदी हे सदर शाखेत व्यवस्थापक म्हणून काम करतात. रविवार कारंजा भागातील अभोणकर लेन शाखा असून, २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान चोरट्यांनी सुमारे पाच हजार रुपयांची महिंद्रा पॉवरऑल कंपनीची जनरेटर बॅटरी चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार व्ही. एच. चव्हाण करीत आहेत.

निगळ मळ्यात घरफोडी
सातपूर एमआयडीसीतील निगळ मळा भागात चोरट्यांनी भरदिवसा उघड्या घरात प्रवेश करून ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. त्यात रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाइलचा समावेश आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सुनीता कडू आहिरे (रा. गोरक्षनाथरोड, निगळमळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निगळ या बुधवारी (दि. ६) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घरकामात व्यस्त असताना ही घटना घडली. चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून कपाटातील रोकड, सोन्याचांदीचे दागिने व मोबाइल असा सुमारे ६६ हजार ५० रुपयांचा ऐवज चोरी केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वराडे करीत आहेत.

आर्थिक व्यवहारातून मारहाण
आर्थिक देवाण घेवाणीतून एकास त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूररोडवर घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश चौधरी, कल्पेश चौधरी आणि अभिजीत शीरसाठ अशी संशयितांची नावे आहेत. आनंदवलीतील प्रसाद गोरख देसले (रा. बजरंगनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. रविवारी गंगापूररोडवरील समाधान वाइन्ससमोरून देसले जात असताना संशयितांनी त्यांचा रस्ता अडवला. योगेश सोनवणे याचे उधारीचे पैसे का देत नाही?, असा जाब विचारित संशयितांनी त्यास बेदम मारहाण केली. घटनेचा अधिक अधिक तपास हवालदार गोवर्धन करीत आहेत.

टोळक्याकडून चोप
किरकोळ कारणातून शिवीगाळ करीत टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना सदगुरूनगर भागात घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये चार संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
महेंद्र शिंदे, विशाल साळवे, सिद्धार्थ कोचे आणि अनिकेत गोगे अशी संशयितांची नावे आहेत. सदगुरूनगर भागातील श्रीराम रुंजा मुसळे या तरुणाने फिर्याद दिली. मुसळे हा आपल्या घराजवळ मित्रांसमवेत सोमवारी (दि ४) साडे नऊ वाजेच्या सुमारास गप्पा मारत होता. यावेळी परिसरातील महेंद्र शिंदे याने मुसळे यांना गाठून माझ्या गाडीवर दगड का मारलास? असा जाब विचारत शिवीगाळ केली. संशयिताने त्याच्या साथीदारांना बोलावून घेत मुसळे यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. घटनेचा अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

घरातून लॅपटॉप पळविला
उघड्या घरातून चोरट्यांनी महागडा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना कामटवाड्यात घडली. या घटनेबाबत अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आश्विन अशोक चव्हाण (रा. देवरत सोसा. कामटवाडा) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. चव्हाण कुटुंबीय बुधवारी आपल्या कामात व्यस्त असताना चोरट्याने उघड्या घरात प्रवेश करून पलंगावर ठेवलेला सुमारे ४५ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

बसस्थानकातून दुचाकी चोरी
कंट्रोल रूममध्ये बसची चौकशी करण्यासाठी गेलेल्या दुचाकीस्वाराची अॅक्टिव्हा चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना सीबीएस बसस्थानकात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
उल्हास दत्तात्रेय सोनार (रा. सौभाग्यनगर) यांच्या तक्रारीनुसार, २४ ऑगस्ट रोजी घरी येणाऱ्या पाहुण्यांना घेण्यासाठी सोनार सीबीएस बसस्थानकात गेले होते. बराच वेळ प्रतीक्षा करून बस न आल्याने ते कंट्रोल रूममध्ये चौकशी करण्यासाठी गेले असता ही घटना घडली. चोरट्यांनी बसस्थानक आवारात पार्क केलेली त्यांची दुचाकी (एमएच १५ बीवाय ६७४६) चोरून नेली. घटनेचा तपास हवालदार राठोड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक टॉकिज’ देतेय कलावंतांना नवी ओळख

0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com
Tweet : bharvirkarPMT
‘ट्यून विथ अस’ म्हणत नाशिकसोबत नाते जोडणाऱ्या एका ‘राजा’ माणसाने सोशल मीडियाचा अत्याधुनिक फॉम्युला आजमवत यूट्यूबवर ‘नाशिक टॉकिज’ नावाने नाशिकचे अस्सल चॅनेल सुरू केले आहे. महिन्याभरापूर्वी सुरू केलेल्या या चॅनलला कमी कालावधीतच प्रचंड लाइक्स मिळत असून कलावंतांच्या अनघड बाजूला पैलू पडून तो रसिकांच्या नजरेसमोर येत आहे.

आजपर्यंत किमान दहा ते पंधरा जणांना नाशिक टॉकिजचे व्यासपीठ मिळाले असून त्यात काही नव्या तर काही जुन्या जाणत्या कलावंतांचा समावेश आहे. हार्मनी आर्ट गॅलरी या बॅनरखाली राजा पाटेकर यांनी नाशिक टॉकिज हे चॅनल सुरू केले आहे. राजा पाटेकर यांना ही संकल्पना नीलेश गिते यांच्याशी चर्चा करताना सुचली. यात एक विषय घेऊन त्यावर कलावंतांना बोलते केले जाते. एखादी कविता असेल, अभंग असेल, एखादा विचार असेल त्यावर कलावंत दोन ते पाच मिनिटे आपले मत व्यक्त करतो. त्यातूनच या कलावंतांचा कधीही दृष्टीस न पडलेला पैलू रसिकांसमोर येतो. ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ हे वैशिष्ट्य असलेल्या या चॅनलमध्ये आतापर्यंत दिग्दर्शक सचिन शिंदे, गझलकार कमलाकर देसले, कलावंत प्रज्ञा गोपाले, अभ्यासक उषा सावंत, अज्ञात कवी सी. एल. कुलकर्णी, कलावंत राजेश जाधव, अभिनेत्री अनुराधा धोंडगे यांच्यावरील एपिसोड टेलिकास्ट झाला असून काहीजणांचा होण्याच्या तयारीत आहे. रसिकांना भावणाऱ्या गोष्टी त्यांच्यासमोर आणणे हे व्रत म्हणून स्वीकारलेल्या पाटेकर यांनी याआधी लिजंड नावाने एक एपिसोड सुरू केला होता. त्यात ज्येष्ठ निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांच्यावर पहिली फिल्म तयार करून ती प्रसारित केली होती. त्या फिल्मला मिळालेला प्रतिसाद पाहून बाळ देशपांडे, नेताजी भोईर, राजू फिरके, राम थत्ते, गझलकार जोयासाहेब यांच्यावर देखील अर्ध्या तासाची माहितीपूर्ण फिल्म पाटेकरांनी बनवली. त्यातूनच नाशिक टॉकिजची संकल्पना सूचली. शहरात अनेक कलावंत असून त्यातील सर्वांनाच या चॅनलमध्ये आणण्याचा पाटेकरांचा मानस आहे. त्यांना या कामी अमोल थोरात, सुमंत वैद्य यांची मोलाची मदत मिळते.

हार्मनी आर्ट गॅलरीही मोफत
हार्मनी आर्ट गॅलरी. एव्हाना नाशिकमधील सर्वच कलावंतांसाठी हे हक्काचं व्यासपीठ झालेलं आहे. जागा एखाद्या हॉलइतकीच. पण त्याचा सदुपयोग करून घेत एका कलासक्त अन् संवेदनशील माणसाने तेथे प्रदर्शन भरवायला सुरुवात केली. मोठ्या मनाच्या, मोठ्या कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन येथे भरते. यात कलाकारांना खर्च येत नाही; कारण राजा पाटेकर त्यांना मोफत ही गॅलरी उपलब्ध करून देतात. नवोदित कलाकारांना किमान सुरूवातीला काही गोष्टी मोफत मिळाल्या की त्यांना उभे राहायला संधी मिळते. हार्मनी ती संधी देते आहे.


नाशिकमध्ये खूप पोटेन्शियल आहे. डोंगराएवढे कलाकार आहेत. त्यांच्या मनात काय आंदोलने आहेत, साहित्याविषयी त्यांना काय वाटते, कवितेविषयी त्यांची मते काय हे सर्वांना कळावे या खटाटोपातून नाशिक टॉकिज आले. साधे राहण्यात आनंद आहे तो इतरांना कसा वाटायचा याच्या वाटा मी शोधतोय. विशेष म्हणजे यात कोणताही कमर्शिअल हेतू नाही.
- राजा पाटेकर, मूळ संकल्पक

नाशिक टॉकिजचा नाशिक स्टुडिओ हा स्थानिक प्रतिभेला संधी देणारा उत्तम प्रकल्प आहे. कॅमेरा कलेची जाण असणारे राजा पाटेकर हे स्वतः उत्तम व्हिडिओ शुटर आहेत. कृष्ण-धवल व्हिडिओग्राफी हे या स्टुडिओचे वैशिष्ट्य आहे. दर्जेदार कवितांना यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी मिळाल्याने अनेक कवी कलावंत नाशिक टॉकिजच्या माध्यमातून उजेडात येणार आहेत.
- कमलाकर देसले, गझलकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पत्रकारांवरील हल्ले थांबणार तरी कधी?’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
देशपातळीवर तसेच महाराष्ट्र राज्यात समाजकंटक, माफिया, गुंड राजकारण्यांकडून पत्रकारांवर हल्ले वाढले असून निर्घृण हत्याही वाढल्या आहेत. पत्रकार हल्ला विरोधी समिती निष्क्रिय झाल्या असून पत्रकार संरक्षण कायदा अजूनही पुरता पारित झाला नाही. परिणामी पत्रकारांवरील जीवघेणे हल्ले थांबले नाहीत. हे सत्र थांबणार कधी? अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय पत्रकार समन्वय समितीतर्फे नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले. पत्रकारांवरील हल्ले थांबावे यासाठी सरकारने तातडीने कायदा पूर्णत्वास न्यावा यासाठी राज्यातील सर्व पोलिस प्रमुखांना पत्रकार संरक्षणाबाबत आदेश द्यावे याबाबत हे निवेदन होते. यावेळी अखिल भारतीय पत्रकार समन्वय समितीचे अध्यक्ष सतीश रुपवते, जर्नालिस्ट एक्टिविझम फोरमचे अध्यक्ष राम खुर्दळ, पत्रकार समन्वय समितीचे सचिव दिलीप सोनार, भूपेंद्र बारू, सुरेश भोर, अमर ठोंबरे, राजेंद्र गवारे, सचिन तुपे, दादाजी पगारे, माया खोडवे हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो मूर्ती; ‌टनावारी निर्माल्य

0
0

सामाजिक संस्थांनी दिले पर्यावरणासाठी भरीव योगदान
मूर्ती संकलन राजे संभाजी स्टेड‌यिम १०,८७८ पवननगर स्टेडीयम ४३४० पिंपळगाव खांब वालदेवी नदी २०७३ गोविंदनगर ६८७ डेकेअर शाळा ११५८

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीगणेश विसर्जनाच्या सोहळ्यात शहरातील विविध सामाजिक संस्थांनी योगदान देत नागरिकांडून हजारो गणेश मूर्ती आणि टनावारी निर्माल्याचे संकलन केले. रामकुंडाच्या मध्यवर्ती जागेसह उपनगरांमध्येही जागोजागी दिवसभर या संस्थांनी पर्यावरण रक्षणासाठी योगदान देत भाविकांचे प्रबोधन केले. गणेश मूर्ती संकलन, पर्यावरण पूरक मूर्तींचे विसर्जन, निर्माल्य संकलन, प्लास्ट‌किचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रयत्न आणि भाविकांचे पर्यावरण विषयक प्रबोधन यासाठी शहरात हजारो कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

नाशिक पोलिस

नाशिक पोलिसांच्या वतीने शहर हद्दीतील सहा पोलिस ठाण्यांतून भाविकांना अमोनिअम बाय कार्बोनेट पावडरचा पुरवठा करण्यात आला. या पावडरच्या सहाय्याने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीही करणे अनेकांना शक्य झाले. प्लास्टर ऑफ पॅरिसचे विघटनासाठी या पावडरचा उपयोग होतो. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली.

पालवी फाउंडेशन

पालवी फाउंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत मूर्ती दानासाठी भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. यंदा यासाठी ‘विघ्नहर्ता’ प्रकल्पाच्या माध्यमातून काम केले गेले. विविध शाळा, कॉलेजेसमधूनही याबाबत प्रबोधन केले गेले.

प्रयास फाउंडेशन

फाउंडेशनच्या सुमारे १५० कार्यकर्त्यांनी दशरथ घाटावर मूर्ती व निर्माल्याचे संकलन केले. मूर्ती संकलन करण्यासह मिरवणूक पार पडल्यानंतर घाटावर स्वच्छतेसाठी कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.

राजसारथी फाउंडेशन

जेलरोड परिसरातील दसक घाटावर भाविकांना मूर्तीदानासह अमोनिअम बाय कार्बोनेटच्या सहाय्याने घरच्या घरीच विसर्जन करण्याविषयी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली. बहुतांश भाविकांनी या पद्धतीचा उपयोग करीत नदीवर विसर्जनासाठी आणलेल्या मूर्तींचे पुन्हा घरी जाऊन विसर्जन केले. या आवाहनास भाविकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती फाउंडेशनचे रोहन देशपांडे यांनी दिली.

डे केअर स्कूल

या शाळेच्या वतीने इंदिरानगर परिसरात पाच ठिकाणांहून मूर्ती व निर्माल्य संकलित करण्यात आले. इंदिरानगर परिसरात गणेश विसर्जनासाठी निघालेल्या भाविकांची वाहने थांबवून शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रबोधन करत मूर्ती संकलित केल्या. शाळेच्या समोरील आवारातही मूर्ती विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. इंदिरानगर, चार्वाक चौक, कलानगर, रथचक्र सोसायटी परिसर आदी ठिकाणी शाळेची मूर्ती संकलन केंद्र कार्यरत होती.

जय बजरंग युवक मंडळ

नवीन नाशिक परिसरात मूर्ती विसर्जनासाठी निघालेल्या भाविकांसाठी जय बजरंग युवक मंडळाने आयटीआय पूल आणि उंटवाडी पूल या ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था करून दिली होती. मंडळाच्या वतीने यंदा गोदा संवर्धन मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती अमित कुलकर्णी यांनी दिली.

काँग्रेस सेवा दल

निर्माल्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर प्लास्ट‌कि पिशव्या गोदेत टाकल्या जातात. हे प्रदूषण रोखण्यासाठी काँग्रेस सेवा दलाच्या वतीने खास निर्माल्य संकलनाकरिता खास बनविलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप विविध गणेश मंडळे, शासकीय व खासगी कार्यालये आणि नागरिकांमध्ये दहा दिवसांपासून करण्यात आल्याची माहिती दलाचे वसंत ठाकूर यांनी दिली.

निर्मल ग्राम केंद्र

निर्मल ग्राम केंद्राच्या वतीने यंदा नागरीकांसाठी प्रबोधन मोहीम राबविली गेली. निर्माल्याच्या नावाखाली सरळपणे फळे, वस्त्र, प्लास्ट‌किच्या वस्तूही पाण्यात फेकू नयेत, मूर्ती दान करा, निर्माल्य मनपाच्या निर्माल्य संकलन व्यवस्थेत जमा करा, असे आवाहन नागरिकांना केले.

रूद्र प्रतिष्ठान

नाशिकरोड परिसरातील रूद्र प्रतिष्ठान या मंडळाच्या वतीनेही मूर्ती व निर्माल्याचे संकलन केले गेले. अमोनिअम बायकार्बोनेट पावडर नागरीकांना मंडळाच्या वतीने मोफत वितरीत करण्यात आली. शेकडो भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याची माहिती मंडळाचे प्रतिक वाजे यांनी दिली.

भुजबळ नॉलेज सिटी

भुजबळ नॉलेज सिटीच्या विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी चोपडा लॉन्स , घारपुरे घाट या परिसरात मूर्ती संकलनाचे केंद्र उपलब्ध करून दिले होते. प्राध्यापक चौबे यांनी या विद्यार्थ्यांच्या समन्वयाचे काम पाहिले. संस्थेच्या वतीने आठ वर्षांपासून निर्माल्य व मूर्ती संकलनाचे काम केले जात आहे.

संवेदना फाउंडेशन

पंचवटी परिसरातील हिरावाडीच्या संवेदना फाउंडेशनच्या वतीने गंगा घाटावरील म्हसोबा महाराज पटांगण येथे मूर्ती संकलन करण्यात आले. शेकडो भाविकांनी फाउंडेशनकडे मूर्ती दान दिल्या. सुमारे ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांचे मूर्ती संकलनासाठी प्रबोधन केले गेले. भाविकांचा उपक्रमास प्रतिसाद मिळाल्याची माहिती फाउंडेशनचे अॅड. अजय निकम

यांनी दिली.

मातोश्री अभियांत्रिकी

सिन्नर फाटा : येथील मातोश्री शिक्षण संस्थेच्या मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे गणेश विसर्जनानंतर दसक घाट येथे मूर्ती संकलनाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. गजानन खराटे, उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन कार्यक्रम अधिकारी प्रा. विवेक आरनके उपस्थित होते. स्वयंसेवकांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे एक हजारहून अधिक नागरिकांनी आपल्या गणेशमूर्ती या संकलन केंद्रात दान केल्या, तर अनेक टन निर्माल्य देखील यावेळी संकलित करण्यात आले. या उपक्रमास पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, अंकुर संस्थेच्या नेहा खरे आदी मान्यवरांनी भेटी देत स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. याप्रसंगी शंकर वाघ, श्रद्धा घुगे, विवेक जैन आदी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

देवळालीत उत्साह

देवळाली कॅम्प : घंटा अन शिट्टीच्या आवाजावर ढोल ताशे वाजवत तर ठेक्यावर भगवा ध्वज फडकव‌ति रामनगरी व रुद्र ढोल-ताशा पथकाने विविध तालबद्ध वादनासह तरुण मित्र मंडळ व लामरोडच्या राजा क्रांती मित्र मंडळाच्या बाप्पासमोर मानवंदना दिली. पाषाण तरुण मित्र मंडळाच्या बाप्पासमोर चारणवाडीच्या लेझ‌मि पथकाच्या विविध कलाप्रकारांनी आपली सेवा अर्पण केली. गणरायाला वाजत गाजत व भावपूर्ण वातावरणात, निरोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅप्रेंटिसशिप स्कीम’बाबत टिप्स

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अधिकाधिक कारखान्यांनी वेब पोर्टलवर नोंदणी करून नॅशनल अॅप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालक एस. एस. सूर्यवंशी यांनी उद्योजकांना केले. निमा, निपम व बीटीआरआयतर्फे निमाच्या सभागृहात आयोजित नॅशनल अॅप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या विषयावरील चर्चासत्रात उद्योजकांना विविध बाबींसदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

निमाचे उपाध्यक्ष उदय खरोटे, निमाच्या मनुष्यबळ विकास व औद्योगिक संबंध समितीचे अध्यक्ष मुकुंद भट यांचे प्रतिनिधी एस. एस. नेगी, निपमचे अध्यक्ष नीलकंठ बांदल, शासकीय कामगार अधिकारी जोशी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक डी. बी. गोरे, बीटीआरआयचे अंशकालीन प्राचार्य राजेश मानकर, निपमचे मानद सरचिटणीस, सुधीर पाटील व्यासपीठावर होते.

तरुणांना जास्तीत जास्त कामावरील प्रशिक्षणाचा अनुभव मिळावा व त्यांच्यात योग्य ती कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांनी जास्तीत जास्त तरुणांना संधी द्यावी, असे आवाहन निमाचे उपाध्यक्ष उदय खरोटे यांनी केले. निपमचे अध्यक्ष नीलकंठ बांदल यांनी तरुणांमध्ये कौशल्यविकास करून टप्प्याटप्प्याने २०२० पर्यंत ५० लाख तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उद्योजक व प्रशिक्षणार्थींनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उत्पादक कंपन्यांनी बेसिक ट्रेनिंग प्रोव्हायडरची भूमिका समर्थपणे पार पाडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी प्रश्नोत्तरे सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपस्थितांच्या शंका व प्रश्नांचे निरसन अधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमास निमा कार्यकारिणीचे संजय सोनवणे, राजेंद्र वडनेरे, बीटीआरआयचे कार्यालयीन निरीक्षक उगाळे तरुण व व्यावसायिक उपस्थित होते. निपमचे मानद सरचिटणीस सुधीर पाटील यांनी आभार मानले.


प्रात्यक्षिकांद्वारे माहिती

नॅशनल अॅप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमबद्दल तपशीलवार माहिती व या स्कीमची वैशिष्ट्ये बीटीआरआयचे अंशकालीन प्राचार्य राजेश मानकर यांनी पीपीटीद्वारे उपस्थितांसमोर विशद केली. बीटीआरआयतर्फे कंपनीने व प्रशिक्षणार्थीने वेब पोर्टलवर नोंदणी कशा प्रकारे करावी याचे प्रात्यक्षिक दाखविले. बॉशचे प्रशिक्षण विभागाचे व्यवस्थापक एस. एस. नेगी यांनी बॉश कंपनी १९७५ पासून बेसिक ट्रेनिंग आपल्या ‘बॉश व्होकेशनल सेंटर’मधून कशा प्रकारे देत आहे याची माहिती चित्रफितीद्वारे उपस्थितांसमोर मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर पितृपक्षाविषयी जागर

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर बुधवार, दि. ६ ऑगस्टपासून पितृपक्ष पंधरवड्याला प्रारंभ झाला आहे. हिंदू संस्कृतीत पितृपक्षात श्राद्धाच्या माध्यमातून पूर्वजांचे स्मरण केले जाते. या काळात पारंपरिक पद्धतीने विधी करण्याला महत्त्व दिले जाते. यंदा या पंधरवड्यासंदर्भातील पोस्ट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत अूसन, विविध विधींविषयीची माहिती देण्यासह या पंधरवड्याबाबतच्या गैरसमजांसंदर्भात प्रबोधनही केले जात आहे.

पितृपक्षाचा काळ काहीअंशी अशुभ असल्याचा समज बऱ्याच जणांमध्ये पाहायला मिळतो. परंतु, त्याविषयी कमी प्रमाणात योग्य मार्गदर्शन केले जाते. विविध पुस्तकांमध्येही याविषयी योग्य ते मार्गदर्शन नसल्याचे आढळून आले आहे. आता यावर तोडगा म्हणून सोशल मीडियावर प्रबोधनपर मेसेजेस शेअर होत आहेत. आज सोशल मीडिया हे जनजागृती आणि प्रबोधनाचे माध्यम असल्याने नेटिझन्सकडून पितृपक्षासंबंधी प्रबोधन करणारे मेसेजेस मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. निरनिराळ्या कथांच्या माध्यमातून फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर पितृपक्ष म्हणजे नक्की काय, यावरील प्रबोधनपर मेसेजेस शेअर होत आहेत. बहुतांश नेटिझन्स निरनिराळ्या प्रकारच्या कथा आणि मेसेजेसद्वारे सोशल मीडियावर प्रबोधन करीत आहेत.

--

‘अंधश्रद्धा भगाओ...’

पितृपक्षाचा काळ हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण असतो. मात्र, पितृपक्षाच्या काळात कशा प्रकारे अंधश्रद्धा पसरविली जाते यावरदेखील सोशल मीडियावर नेटिझन्समध्ये चर्चा रंगत आहेत. ‘अंधश्रद्धा भगाओ, भारत बचाओ’ या टॅगलाइनखाली सोशल मीडियावर प्रबोधन केले जात आहे. अंधश्रद्धा पसरविण्यापेक्षा पितृपक्षाकडे कर्मविधी म्हणून पाहण्याविषयी नेटिझन्स जनजागृती करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये निवडले जाणार गुगल डेव्हलपर्स

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमात गुगलतर्फे अँड्रॉइड डेव्हलपर्ससाठी कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेद्वारे देशभर मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटचे दर्जेदार प्रशिक्षण दिले जात असून, नाशिकमध्येही नवीन गुगल डेव्हलपर्स निवडले जाणार आहेत. १०० विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येणार असून, त्यातून २५ जणांनी निवड केली जाणार आहे. संदीप फाउंडेशनतर्फे १४ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

या योजनेत गुगलने ‘सॉल्व्ह फॉर इंडिया’ च्या माध्यमातून ग्रामीण व लहान शहरांची गरज लक्षात घेऊन संगणकीय प्रणाली व अॅप्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नवीन गुगल डेव्हलपर्स निवडण्यात येणार आहेत. या नव्या गुगल डेव्हलपर्ससाठी events.withgoogle.com/solveforindia - 2017 येथे सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी १३ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरुन देणे गरजेचे असणार आहे. गुगलकडे मोठ्या प्रमाणात तरुण अर्ज करतात. पण त्यात खूप कमी जणांना संधी मिळते. या योजनेंतर्गत गुगल क्लासमध्ये १३ ते २४ नोव्हेंबरपर्यंत बेंगळुरू येथील कार्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मार्गदर्शन शिबिरात गुगल विकसित तंत्रज्ञानाबाबत (अॅँड्रॉइड, प्ले, गुगल क्लाऊड, यूएक्स आणि यूआय डिझाइन, उत्पादन व्यवस्था आदी) मार्गदर्शन केले जाणार आहे.

अँड्रॉइड डेव्हलपर म्हणून संधी

मोबाइल अॅप्लिकेशन विकसनामध्ये जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचे नाव अग्रभागी यावे यासाठी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत असलेल्या कौशल्य विकसनाच्या उपक्रमात भारतातील जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी हा अभ्यासक्रम सोप्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. तो पूर्ण झाल्यानंतर गुगल एक परीक्षा घेणार आहे. यात चमकदार कामगिरी करणाऱ्यांना अँड्रॉइड डेव्हलपर म्हणून काम करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपाचा स्पीलओव्हर पाचशे कोटींवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेच्या कार्यकाळातील दीडशे कोटींची विकासकामे रद्द केल्यानंतर सहाशे कोटींचा स्पीलओव्हर हा साडेचारशे कोटींपर्यंत आला होता. परंतु, नगरसेवक निधीची कामे व विकासकामांची बिले लेखा विभागाकडे सादर झाल्याने स्पीलओव्हर पुन्हा पाचशे कोटींच्या टप्प्यापार गेला आहे. त्यामुळे तिजोरीवर पुन्हा भार येणार असून, विकासकामांना ब्रेक लावला जाणार आहे.

महापालिकेतील नगरसेवकांनी सध्या नगरसेवक निधीच्या कामांच्या फाइल्स सादर करण्याचा सपाटा लावला आहे. महापौरांनी नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे नगरसेवक निधी आणि पदाधिकारी निधीमुळे पुन्हा शंभर कोटींचा भार तिजोरीवर पडणार आहे. आतापर्यंत जवळपास ५० कोटींच्यावर नगरसेवक निधीच्या फाइल्स लेखाविभागाकडे सादर झाल्या आहेत. मनसेच्या काळातील दीडशे कोटी रुपये किमतीची कामे रद्द केल्यामुळे स्पीलओव्हर हा साडेचारशे कोटींपर्यंत खाली आला होता. परंतु, नगरसेवक निधीच्या फाइल्स वाढल्याने हा स्पीलओव्हर पुन्हा पाचशे कोटींवर गेला आहे. दरम्यान, सिंहस्थ विकास आराखड्यांतर्गत राज्य सरकारने महापालिकेला त्यांच्या हिश्श्यातील ६४३ कोटी रुपये दिले आहेत. हा निधी बँकेमध्ये ठेवण्यात आला होता. वर्षभर हा निधी बँकेत राहिल्याने त्याचे जवळपास १३ कोटी २० लाखांचे व्याज आले होते. राज्य सरकारने हे व्याजही परत घेतले आहे. राज्य सरकारच्या या दात कोरून पोट भरण्याच्या कृतीने संताप व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवतींसाठी लवकरच विभाग

0
0

आरोग्य मंत्र्यांचे तोडगा काढण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आण‌ि जिल्हा प्रशासनामधील लालफितीच्या कारभारामुळे सिव्हिल हॉस्प‌टिलमधील नवजात अर्भक आणि गर्भवती माता उपचार विभागाचे काम रखडले असून, याबाबत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी समन्वयातून तत्परतेने हा प्रश्न निकाली काढावा. या विभागाचे बांधकाम तातडीने सुरू करून नवजात अर्भकांची हेळसांड थांबवावी, असे आदेश आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी यंत्रणेला दिले.

‘गुदमरतोय श्वास’ या वृत्त मालिकेंतर्गत महाराष्ट्र टाइम्सने सिव्हिल हॉस्प‌टिलच्या एनआयसीयू विभागात नवजात अर्भकांची पुरेशा साधन सुविधांअभावी हेळसांड होत असल्याचा प्रकार पुढे आणला. इन्क्युबेटर्स, नवजात अर्भकांसाठीच्या व्हेंटिलेटर्सचा अभाव, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे रखडलेले नवीन इमारतीचे काम यावर या मालिकेद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला. पुरेशा सुविधांअभावी गत महिन्यात ५५ तर एप्र‌लिपासून पावणे दोनशेहून अधिक बालके दगावल्याचा घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. शुक्रवारी नाशिकमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुंबई येथे तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, प्रधान सचिव प्रदीप व्यास, आरोग्य संचालक सतीश पवार, सहसंचालक अर्चना पाटील, डॉ. बी. डी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद घुटे, एनआयसीयू विभागातील डॉक्टर्स तसेच कर्मचारी आदी उपस्थ‌ति होते. सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात ही बैठक पार पडली. सिव्हिल हॉस्प‌टिल्समध्ये झालेल्या अर्भक मृत्यूंचा आढावा यावेळी घेण्यात आला. नवजात अर्भक आणि गर्भवती माता उपचार कक्षाच्या नवीन इमारतीचे काम वृक्षतोडीच्या मुद्द्यामुळे रखडल्याची बाब सावंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वयातून हा प्रश्न निकाली काढावा. तसेच लवकरात लवकर या इमारतीचे बांधकाम सुरू करावे, असे आदेश देण्यात आले. या नवीन कक्षात सध्याच्या १८ इन्क्युबेटर्स व्यतिरिक्त आणखी २० इन्क्युबेटर्सची सुविधा उपलब्ध असणार आहे.

सावंत सोमवारी नाशकात

विभागीय संदर्भसेवा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्री दीपक सावंत नाशिकमध्ये येणार आहेत. आमदार जयंत जाधव यांच्या मागणीला अनुसरून सावंत यांनी‌ संदर्भसेवा रुग्णालयातील यंत्र सामुग्री दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.

‘आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’

नाशिक: नाशिकच्या सिव्हिल हॉस्प‌टिलमध्ये ऑगस्ट महिन्यात ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. या बालकांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. या प्रकाराची जबाबदारी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी स्वीकारावी. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तसेच, आरोग्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. सरकारी हॉस्प‌टिल्समधील आरोग्यसेवेचा दर्जा वाढवावा, तत्पर सेवा देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे भरा अन्यथा पाणी तोडणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पाणीपट्टी थकबाकीने चाळीस कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे पालिकेने थकबाकी वसुलीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मूल्यनिर्धारण व कर संकलन विभागाने थकबाकी वसुलीसाठी पुन्हा मोहीम सुरू केली असून, सहा विभागांतील जवळपास पंधरा हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. या सर्वांना ४८ तासांची मुदत दिली जाणार असून, दिलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्यास नळकनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, पाणीपट्टीची बिले वाटण्यासाठी कर विभागाकडे कर्मचारीच नसल्याने विभागाने पुन्हा बिलांचे वाटप आऊटसोर्सिंगने करण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेच्या घरपट्टी वसुलीचा ग्राफ चांगला असला तरी, पाणीपट्टी वसुलीची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. पाणीपट्टीची बिले वाटपासाठी विभागाकडे कर्मचारी नसल्याने नागरिकांना वेळेवर पाणीब‌िले मिळत नाहीत. घरपट्टीची बिले वाटपासाठी असलेल्या ११० कर्मचाऱ्यांकडूनच पाणीपट्टीचीही बिले वाटप केली जातात. त्यामुळे थकबाकीचा आकडा ४० कोटींवर गेला आहे. घरपट्टी वसुलीची मोहीम यशस्वी झाल्याने आता विभागाने त्याच धर्तीवर पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकी वसुलीसाठी १५ हजार बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना थेट ४८ तासांच्या नोट‌िसा दिल्या जाणार आहेत. दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही, तर थेट नळकनेक्शन बंद करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. येत्या सोमवारपासून ही वसुली मोहीम सुरू केली जाणार असल्याचे उपायुक्त रोहीदास दोरकुळकर यांनी सांग‌ितले.

पाणीबिलांचे आऊटसोर्सिंग

कर संकलन विभागाकडे पाणीपट्टीची बिले वाटण्याची यंत्रणाच नाही, त्यामुळे ग्राहकांना वेळेवर बिले मिळत नाहीत. पाणीपट्टी विभागाकडे शंभर कर्मचारी अपेक्षित आहेत. परंतु, सध्या एकही कर्मचारी नाही. त्यातच पाणीपट्टीची बिले तीन मह‌िन्यांतून दिली जातात. त्यामुळे या बिलांचे आऊटसोर्सिंग करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासंदर्भातील डॉकेट प्रशासनाकडूनच महासभेवर ठेवले जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागरिकांना वेळेवर पाणीबील मिळून वसुलीही वेळेवर होणार आहे.

लोकअदालतीत १२०० प्रकरणे

घरपट्टी विभागाकडे काही मालमत्तांकडील घरपट्टी वसुलीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने त्यांचीही थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वादग्रस्त असलेल्या जवळपास १२०० मालमत्तांबाबत तोडगा काढण्यासाठी पालिकेने लोकअदालतीचा निर्णय घेतला आहे. शनिवारी जिल्हा न्यायालयात होणाऱ्या लोकअदालतीत या मालमत्तांबाबत तडजोड केली जाणार आहे. या सर्व मालमत्ताधारकांना नोट‌िसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या अदालतीमध्ये निघालेल्या तोडग्यानंतर अंतिम निर्णय महापालिकेत घेतला जाणार आहे.

पाणीपट्टीची थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदारांना शॉर्ट नोट‌िसा दिल्या जाणार आहेत. या मुदतीत बिले भरली नाहीत तर थेट नळकनेक्शन तोडले जाणार आहे. जवळपास १५ हजार थकबाकीदारांची यादी तयार केली जात आहे.

- रोहीदास दोरकुळकर, उपायुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार्टअपला डेस्कची ‘हेल्प’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्टार्टअपअंतर्गत सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे यासाठी स्टार्टअप इंडियाच्या हेल्प डेस्कचा प्रारंभ गुरुवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाला. या डेस्कद्वारे नवीन उद्योजकांना विविध बाबींविषयीची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

नाशिकमध्ये स्टार्टअपला योग्य मार्गदर्शन मिळावे आणि नाशिकचे स्थान देशातील प्रमुख स्टार्टअप डेस्टिनेशन्सपैकी एकमध्ये समाविष्ट व्हावे, हा हेल्प डेस्क सुरू करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. इंटरनेटवर जरी माहिती उपलब्ध असली, तरी पदोपदी योग्य मार्गदर्शन, वित्तीय सहाय्यता, शासकीय योजना, प्रशिक्षण, पेटंंट फायलिंग, ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन, बिजनेस फुसिलिटेटर, त्यासाठी लागणारे नेटवर्क, कौशल्य आदी अनेक बाबींविषयीची माहिती या हेल्प डेस्कच्या माध्यमातून मिळणार आहे.

जास्तीत जास्त नवउद्योजकांनी स्टार्टअससाठी या डेस्कचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक पी. पी. देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक रेंदाळकर यांनी केले आहे. ‘निमा’चे अध्यक्ष मंगेश पाटणकर व ‘आयमा’चे अध्यक्ष राजेंद्र आहेर प्रमुख पाहुणे होते. मेकर्स अड्डा या मेकर्स स्पेसचे को-फाऊंडर व मेंटर इनामदार यांनी हेल्प डेस्कची वौशिष्ट्ये समजावून सांगितली. अमेरिकेन आर्किटेक्ट स्कॉट नॉक्स यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.

राधिका मलिक, हरीश गोडसे, प्रशांत गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अतुल दवंगे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रदीप मोकळ, अशोका बिजनेस स्कूलचे एचओडी प्रा. डॉ. अजय शुक्ला, अशियोटोचे परिक्षित जाधव, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअरचे महेश गुजराथी व तेथील नवीन स्टार्टअपवर काम करणारे उद्योजक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरभराटीसाठी बदलणार दालनाची दिशा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘नवसे सायासे पुत्र होती| तरी का करणे लागे पती?’ अशा शब्दांत संत तुकोबांनी पाखंडी धर्ममार्तंडांची सालपटं काढून शतके लोटली तरी माणसं काही सुधारायला तयार नाहीत, याची प्रचीती भाजपचे सरकार सर्वदूर सत्तेवर आल्यानंतर पावलोपावली येत असतानाच आता नाशिक महापालिकेच्या स्थायी सभापतींनी आर्थिक भरभराटीसाठी म्हणे, आपल्या दालनाची दिशा बदलायचे ठरविले आहे.

महापालिकेतील भाजपचा दिशाहीन कारभार योग्य मार्गावर आणण्यासाठी एकीककडे सर्व पदाधिकारी नगरसेवकांना प्रत्यक्ष भेटून कारभाराची दिशा ठरवीत असतानाच अशा दिशा बदलाचीही अवदसा आठवावी हे पक्षपरंपरेला साजेसेच झाले. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनीही पूजाअर्चा केल्यानंतर पदाची सूत्रे स्वीकारली होती.

महापालिकेत भाजपची सत्ता येऊन सहा महिने झाले तरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अद्याप कारभाराची दिशा सापडलेली नाही. वादावादी व हेव्यादाव्यांमुळे भाजपचा कारभारच भरकटला आहे. या भरकटलेल्या वारूला दिशा देण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केल्यानंतर महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी आता नगरसेवकांच्या दारी जाण्याचा निर्णय घेत कारभार सुधारण्याचा खटाटोप सुरू केला आहे. महापालिकेचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या स्थायी समितीलाच आर्थिक घरघर लागल्याने सभापतींनी आपल्या दालनातील खुर्चीची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

विकासाच्या आशेने नाशिककरांनी रामभूमीत प्रथमच कमळ फुलवले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका पक्षाला सत्ता मिळाल्याने नाशिकचा विकास चौखूर उधळेल अशी आशा बाळगून असलेल्या नागरिकांवर सहा महिन्यांतच पश्चात्तापाची वेळ आली आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समितीचे सभापती अशी महत्त्वाची चार पदे भाजपकडे असल्याने झटपट निर्णय होऊन विकास धावेल अशी अपेक्षा होती. मात्र, सहा महिन्यांतच पदाधिकाऱ्यांमधील वादाने कारभार भरकटला.

दक्षिणेकडील दालन पूर्वेकडे करणार

सध्या महापालिकेची गंगाजळी रिती आहे. या गंगाजळीच्या चाव्या स्थायी समितीकडे असल्या तरी निधीच नसल्याने फारसे अर्थपूर्ण प्रस्तावच मंजुरीला येत नसल्याची खदखद स्थायी समितीची आहे. सध्या सभापतींच्या केबिनची दिशा ही दक्षिणेकडे आहे. दक्षिण दिशा अशुभ मानली जात असल्याने भरभराट होत नसल्याचा सल्ला ज्योतिषाचार्यांनी सभापतींना दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संस्कृतीत मुरलेल्या सभापती शिवाजी गांगुर्डे यांनीही त्यांच्या सल्ल्यावर भरवसा ठेवत आपल्या दालनाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची दालने पूर्व दिशेला असल्याने सभापतीही आपली दिशा पूर्वेकडे करणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या गंगाजळीत भर पडेल, अशी भ्रामक आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे दिशा बदलल्याने तरी गंगाजळी भरून नाशिकच्या विकासाचा वनवास संपेल, अशी आशा नाशिककरांना आता बाळगायला हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना हरकत फीमध्ये कपात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोच्या सर्व योजनांमध्ये घरांचे वाढीव बांधकाम करण्यासाठी काढाव्या लागणाऱ्या ना हरकत दाखल्यासाठीच्या फी मध्ये पन्नास टक्‍क्‍यांची कपात करण्यात आली अाहे. त्याचबरोबर कर्ज, वारस व हस्तांतरणासाठी लागणाऱ्या रकमेतही सूट देण्यात आली असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिडको पूर्ण फ्री होल्ड होणार नाही, तोपर्यंत येथील कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार नसल्याचाही निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार हिरे म्हणाल्या, की सिडको कार्यालयाच्या स्थलांतराविरोधात पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सिडकोच्या मुख्य कार्यालयात मुख्य प्रशासक ओमप्रकाश बकोरिया, व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, सिडकोच्या नाशिकच्या प्रशासक कांचन बोधले आदींसमवेत झालेल्या बैठकीत सिडकोतील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन हे निर्णय संचालक मंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

यावेळी सिडकोच्या बांधकामासाठी ना हरकत दाखल लागत असून, या दाखल्यासाठी सध्या ५५ हजार २०० रुपये खर्च येत आहे. हा खर्च अनेकांना न परवडण्यासारखा असून, या फीमध्ये कपात करण्याची मागणी केली असता त्यावर चर्चा करून या रकमेत पन्नास टक्‍क्‍यांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कर्ज घेण्यासाठी, वारस दाखला व हस्तांतरणासाठीसुद्धा एवढीच रक्‍कम लागत असून, ही रक्‍कम या कामासाठी यापुढे लागणार नसल्याचेही निश्चित करण्यात आले.

संपूर्ण सिडको फ्री होल्ड होण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात नाशिकसह औरंगाबाद, नांदेड, नागपूर येथील सिडकोच्या मिळकतीसुद्धा फ्री होल्ड करण्याचे ठरले आहे. सिडकोच्या अनेक घरांलगत प्लॉट असून, या प्लॉट विक्रीबाबत एका महिन्यात सर्वेक्षण करण्यात येऊन त्याच्या विक्रीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. सिडकोने विक्री केलेल्या अनेक प्लॉटचे भाडेपट्टा, करारनामे झालेले नसून, यापूर्वीच्या सर्वांचे हे करारनामे एका महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहेत. टपरीधारकांना देण्यात आलेल्या प्लॉटबाबत करारनामे करण्याचे सर्वेक्षण सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोतील अनेक भूखंड धार्मिक स्थळांना योग्य दरात प्लॉट खरेदी देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचीही चर्चा या बैठकीत झाली.

मुंबईतील बैठकीत सिडकोसंदर्भातील विविध आठ ते दहा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून, याबाबतचे निर्णय झाले असले, तरी लवकरच याबाबत संचालक मंडळाचा निर्णय होऊन हे निर्णय जाहीर करण्यात येणार आहेत. संचालक मंडळाची बैठक साधारणतः या आठवड्यात होणार असून, या बैठकीनंतर हे नियम लागू होणार असल्याचेही आमदार हिरे यांनी सांगितले. संपूर्ण सिडको जोपर्यंत फ्री होल्ड होणार नाही, तोपर्यंत येथील कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार नाही, सिडकोच्या ऑनलाइन कामाबाबत पूर्णपणे माहिती व सराव झाल्यावरच त्याची अंमलबजावणी करण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे.

--

‘लीज डीड’बाबत करणार आवाहन

सिडकोच्या निम्म्याहून अधिक मिळकतींचे लीज डीड अद्यापही बाकी असून, याबाबत येत्या एक ते दोन महिन्यांत नागरिकांना एकत्रित आवाहन करण्यात येणार अाहे. त्याद्वारे लीज डीड लवकरात लवकर करून घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिडको कार्यालयाच्या परिसरात असलेल्या अकरा विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या मिळकतीसुद्धा सिडको फ्री होल्ड झाल्यावर आपोआप त्यात रुपांतरित होणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

--

सिडकोतील बांधकाम दाखल्याबाबतचा निर्णय झाला असून, संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बांधकाम परवाना दाखल्यासाठी सध्या नागरिकांनी घाई करू नये व जादा पैसे भरण्यापेक्षा याबाबतचा निर्णय जाहीर झाल्यानंतरच परवानगी काढावी. सिडको कार्यालयाचे स्थलांतरही तूर्त होणार नाही.

-सीमा हिरे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडांसाठी अर्भकांचा बळी!

0
0

महापालिकेचा आडमुठेपणा आणि सिव्हिल प्रशासनाची चालढकल भोवली

नाशिक : सिव्हिल हॉस्प‌िटल आवारातील १६ झाडे तोडण्यास महापालिकेने मज्जाव केल्याने नवजात अर्भक आणि गर्भवती माता उपचार विभागाच्या बांधकामाचे घोंगडे भिजत पडले आहे. झाडे वाचविण्यासाठी नवजात अर्भकांचा बळी देण्याचा उद्योग संतापजनक असतानाच सिव्हिल हॉस्प‌िटलमधील उपलब्ध जागेचा तरी कोठे नियोजनबध्द उपयोग केला जातोय, असा सवाल उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

नाशिकच्या सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये इन्क्युबेटरची तोकडी संख्या, नवजात अर्भकांसाठीच्या व्हेंटिलेटरचा अभाव आणि लालफितीत अडकलेला अद्ययावत विभाग यामुळे बालकमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता विभागात इन्क्युबेटर तसेच, व्हेंटिलेटरचा तुटवडा असून, त्यामुळे प्रकृती खालावलेल्या बालकांच्या उपचारांवर मर्यादा येत आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातील मोकळ्या जागेत नवजात अर्भक आणि गर्भवती माता उपचार कक्ष उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने २१ कोटींचा निधी देखील मंजूर केला आहे. परंतु, या जागेवर १६ झाडे असून, बांधकाम सुरू करण्यासाठी ती तोडावी लागणार आहेत. सिव्हिल हॉस्प‌िटलच्या प्रशासनाने त्यासाठी महापालिकेकडे परवानगीही मागितली. डिसेंबर २०१६ मध्ये हे पत्र पाठविण्यात आले असून, गेले नऊ महिने या प्रश्नावर तोडगा निघू शकलेला नाही. महापालिका आणि सिव्हिल प्रशासन यांच्यातील टोलवाटोलवीमुळे नवीन विभागाच्या बांधकामाचा प्रश्न अधांतरीतच असून, पुरेशा सोयी सुविधांअभावी अर्भकांना जीव गमवावा लागत आहे.

२०० खाटांची ‘ती’ इमारत निरुपयोगी

सिंहस्थ काळात भाविकांच्या सोयीसाठी सिव्हिल हॉस्प‌िटलच्याच आवारात २०० खाटांची इमारत बांधण्यात आली. त्यावर आठ कोटी २७ लाख सात हजार रुपये खर्च करण्यात आला. सिंहस्थानंतर ही इमारत पूर्णत: महिला रुग्णांसाठीच वापरण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. सिव्हिल हॉस्प‌िटलमधील प्रसूती विभाग तोकडा ठरू लागल्याने हा विभाग या नव्या इमारतीमध्येच स्थलांतरीत करण्यात येणार होता. परंतु, सिंहस्थाला दोन वर्षे उलटूनही हा विभाग हलविण्यात आला नाही. परिणामी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नव्या इमारतीमध्ये सद्यस्थ‌ितीत महिला शल्य विभाग, पुरूष शल्य विभाग तसेच स्त्रीरोग विभाग कार्यान्वित आहे. इमारतीचा पहिला मजला रिकामाच असून, इमारतीत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. या इमारतीमध्ये सुविधा पुरवून येथेच महिला प्रसूती आणि नवजात अर्भक उपचार कक्ष का सुरू केला जात नाही, असा सवाल उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

जन्मत:च अनेक बाळांची प्रकृती चिंताजनक

ऑगस्ट महिन्यात एनआयसीयूमध्ये बालक मृत्यूचे प्रमाण वाढले असले तरी या विभागात दाखल झालेल्या बाळांपैकी अनेक बाळांची प्रकृती जन्मत:च चिंताजनक होती. नवजात अर्भकाचे वजन किमान अडीच किलो असायला हवे. परंतु, या विभागात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या बालकांपैकी दोन बालकांचे वजन अवघे ५०० ग्रॅम होते. १८ बालकांचे वजन अर्धा ते एक किलो होते, तर २९ बालकांचे वजन एक ते दीड किलोदरम्यान असल्याची माहिती सिव्हिल हॉस्प‌िटलमधील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा नियोजनाच्या ३३ जागा बिनविरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ३३ जागा बिनविरोध करण्यात यश आले असले, तरी उर्वरित सात जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ही निवडणूक पूर्णत: बिनविरोध करण्यास अपयश आले आहे.

मोठ्या नागरी क्षेत्रातून महापालिका नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला गटातून दोन, तर सर्वसाधारण प्रवर्गातील चार जागा आणि संक्रमणकालीन निर्वाचन क्षेत्रातून नगरपंचात एक जागा अशा एकूण सात जागांसाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी ११ सप्टेंबरला प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण ४० सदस्य निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. संक्रमणकालीन म्हणजेच नव्याने निर्मित झालेल्या नगरपंचायतीमधून एका सदस्याची निवड करावयाची असून, त्यासाठी १०२ मतदार आहेत. नऊ नगरपरिषदांमधून दोन, तर नाशिक आणि मालेगाव महापालिकेतून १४ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी २०६ मतदार आहेत. ४० पैकी २० जागा महिला सदस्यांसाठी राखीव असून, ५७८ मतदारांपैकी ३०४ महिला मतदार आहेत. या निवडणुकीसाठी १२९ अर्ज दाखल झाले होते. महापालिका क्षेत्रातील १४ पैकी सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातील २ जागांसाठी ४ अर्ज प्राप्त झाले आहेत. पुष्पा आव्हाड, शानेहिंद निहाल अहमद, आशा अहिरे या तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वसाधारण गटातील चार जागांसाठी सुनील गायकवाड, नंदकुमार सावंत, योगेश हिरे, चंद्रकांत खोडे, अन्सारी अमानतुल्ला पीर मोहम्मद हे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरपंचायत क्षेत्रातील एका जागेसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. १७ सप्टेंबरला मतदान तर १८ ला मतमोजणी होईल.

हे उमेदवार बिनविरोध

मोठे नागरी क्षेत्र सर्वसाधारण (महिला) : संगीता गायकवाड, सुषमा पगारे, शेख ताहेरा शेख रशिद, दीपाली कुलकर्णी. अनुसूचित जाती प्रवर्ग : प्रशांत दिवे. महिला : पूनम धनगर. नागरिकांचा मागास प्रवर्ग : गणेश गिते, रमेश धोंगडे. ग्रामीण क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्ग : यशवंत शिरसाट. महिला : कविता धाकराव. नागरिकांचा मागास प्रवर्ग : शंकरराव धनवटे, यशवंत ढिकले, सुरेश कमानकर. महिला : अश्विनी आहेर, सुरेखा दराडे, वनिता शिंदे, वैशाली खुळे. सर्वसाधारण प्रवर्गः हरिदास लोहकरे, महेंद्रकुमार काले, रमेश बरफ, ज्ञानेश्‍वर जगताप, रमेश बोरसे, दीपक शिरसाठ. महिला : नूतन आहेर, बलवीर कौर निर्मल गिल, लताबाई बच्छाव, शोभा कडाळे, सविता पवार, सिमंतीनी कोकाटे, कलावती चव्हाण. लहान नागरी क्षेत्र नागरिकांचा मागास प्रवर्गः सुनील मोरे. सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) अनिता करंजकर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज महालोकअदालत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शनिवारी (दि. ९) होणारी महालोक अदालत खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. लोक अदालतीत तब्बल ६४ हजार खटले सादर होणार असून, त्यापैकी २५ ते ३० हजार खटल्याचा निपटारा होण्याची शक्यता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे दोन्ही बाजुच्या व्यक्ती शनिवारी थेट कोर्टात हजर राहिल्यास त्यांच्या दाव्यावरही सुनावणी होणार आहे.
गत वर्षी आयोजित लोक अदालतीत कोर्टात प्रलंबीत असलेले सहा हजार खटले ठेवण्यात आले होते. तर, दावा दाखल पूर्व प्रकरणांची संख्या १२ हजार इतकी होती. त्यापैकी सुमारे दोन हजार खटल्यांचा निपटारा झाला. यावेळेस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिंदे यांच्यासह सर्व यंत्रणा झाडून कामाला लागली. न्यायाधीश शिंदे यांनीही जिल्ह्यातील सर्वच कोर्टाना भेटी दिल्यात. पथनाट्यासह इतर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून लोक अदालतीचे महत्त्व विषद केले. त्याचा चांगला परिणाम झाला. लोक अदालीतत निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांची सहमती आवश्यक असते. ही महत्त्वपूर्ण अट असताना तब्बल ६४ हजार खटल्यांचा लोकअदालतीत निपटारा होणार आहे. यात, न्यायालयात प्रलंबित असलेल्या १४ हजार १२ प्रकरणांचा समावेश आहे. न्याय व्यवस्थेवरील ताण हलका कमी होण्याच्या दृष्टीने तसेच झटपट आणि शाश्वत न्याय मिळण्याच्या दृष्टीने लोक अदालत महत्त्वपूर्ण असून, सर्वांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन न्यायाधीश शिंदे यांनी केले आहे.

प्रलंबित अथवा दावा दाखल पूर्व प्रकरणात दोन्ही बाजुच्या व्यक्तींना लोक अदालतीत सहभाग घ्यायचा आहे, अशा व्यक्ती शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केव्हाही कोर्टात हजर राहू शकतात. त्यांच्या प्रकरणावर निश्चित सुनावणी घेतली जाईल.
- सूर्यकांत शिंदे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

लोक अदालतीत जास्तीत खटल्यांचा निपटारा व्हावा म्हणून सर्व व्यवस्था दिवसरात्र काम करते आहे. त्यामुळे जवळपास ६४ हजार प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात आली आहे. यातील किमान २५ हजार दावे निकाली काढण्याचे उद्दिष्ट्य असून, ते साध्य झाल्यास ही बाब सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
- एस. एम. बुक्के, सचिव, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम सापडले अन् तो झाला मालामाल!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रस्त्यावर पडलेले एटीएम कार्ड सापडले. या कार्डद्वारे जणू पैसा कमवण्याचा राजमार्गच त्याने शोधला. एक-एक करीत त्याने गुजरात, मुंबई, नाशिक आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथे फसवणुकीचा उद्योग सुरू केला. सध्या या राज्यस्तरीय चोरट्यास अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
राजेश हसमुखभाई भट (रा. अहमदाबाद, गुजरात) असे या संशयिताचे नाव आहे. फसवणूक प्रकरणी अंबड पोलिसांनी त्यास मुंबई पोलिसांकडून नुकतेच ताब्यात घेतले. साधरणतः ३२ ते ३४ वयोगटातील या तरुणाने मुंबई, नाशिक, मध्य प्रदेशातील भोपाळ तसेच गुजरातमध्येही एटीएम कार्डची अदलाबदल करून लाखो रुपये चोरी केले. नाशिकच्या प्रकरणात तर एका क्लास वन अधिकाऱ्यास त्याने सव्वादोन लाख रुपयांना गंडवले होते. या संशयितांने दिलेली माहिती ऐकून तर पोलिसही चक्रावले. एटीएम सेंटर्सची सुरक्षा व्यवस्था मजबूत नाही. एकावेळी दोन ते तीन व्यक्ती सहज एटीएम सेंटरमध्ये जातात. अनेक एटीएम मशिन्स वापरून खराब झाले आहेत. असे ठिकाण हेरून फक्त सावाजाची वाट पहायची. त्यांचीही कमी नसते. बोलण्याच्या नादात असताना पासवर्डची माहिती मिळवायची आणि हातचालाखीने बंद कार्ड समोरील व्यक्तीच्या हाती सोपवत तेथून निघायचे. तेथून जवळच असलेल्या एखाद्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढायचे अशी फसवणुकीची त्याची पद्धती होती. मात्र, भोपळ पाठोपाठ मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. रस्त्याने चालत जात असताना एटीएम कार्ड सापडले. ते चालू आहे की बंद हे पाहत असताना एका व्यक्तीबरोबर कार्डची अदलाबदल झाली अन् तेव्हापासून चोरीच्या मार्गावर गेल्याचे त्याने सांगितले.

चोर बाजारात कार्डची खरेदी
मुंबईत पाकिटमारी झाल्यानंतर चोरटे पैसे काढून पाकीट फेकून देतात किंवा चोर बाजारात विकतात. तिथे अनेक ठिकाणी बंद एटीएमकार्डसची विक्री होते. अगदी ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत बंद कार्डस विकली जातात. त्यातील १५ ते १६ कार्डस त्याने संकलित केली. समोरील व्यक्तीकडे कोणत्या रंगाचे कार्ड आहे हे पाहून तो क्षणात कार्डसची अदलाबदल करतो.

संशयितांच्या अटकेनंतर एटीएम कार्ड, एटीएम सेंटर्सची ढिसाळ सुरक्षा व्यवस्था यावर प्रकाश पडला. अगदी सहजतेने सुशिक्षित व्यक्तींना त्याने लाखो रुपयांना गंडा घातला आहे. अगदी पासवर्ड टाकताना अनेक व्यक्ती तो क्रमांक तोंडाने पुटपुटतात. ही सहज बाब धोकादायक ठरू शकते, हे या निमित्ताने स्पष्ट झाले.
- मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य पर्यटनदृष्ट्या शिरवाडेचा विकास करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
साहित्य पर्यटनाच्यादृष्टीने शिरवाडे गावाचा विकास करण्यावर भर देऊन गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे विकासकामांचे उद्‍घाटन व लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर, जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतींद्र पाटील आदी उपस्थित होते.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन साहित्य पर्यटनाच्यादृष्टीने गावात नवीन संकल्पना राबविल्या जाव्यात. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पर्यटन विभागामार्फत करण्यात येईल. गावाच्या विकासात शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्त करणे आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘कल्पवृक्ष’ या योजनेच्या माध्यमातून गावात कामे करण्यात यावी, असे रावल यांनी सांगितले. पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कवीवर्य कुसुमाग्रज स्मारकाचे बांधकाम व पथदीप बसविणे, सर्वशिक्षा अभियानांतर्गत जि. प. शाळा १० नवीन खोल्यांचे बांधकाम, जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत इमारत बांधणे, खासदार निधीतून कवीवर्य कुसुमाग्रज ग्रंथालय इमारत बांधणे, ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना व आदिवासी वस्ती रस्ता क्राँक्रीटीकरण करणे, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत श्रीशनीदेव मंदिर वाहनतळ उभारणे या कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
घरकुल योजनेतून इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत १२६, शबरी घरकुल योजनेंतर्गत १०, रमाई घरकुल योजनेंतर्गत १२ लाभार्थ्यांना मोबदला देण्यात आल्याची माहितीही यावेळी दिली. खासदार चव्हाण यांनी गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटो, कांद्याला धुळीचे ग्रहण

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

जोपुळ रोडवरील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार सम‌तिीच्या मुख्य बाजार आवरात टोमॅटो आवक सुरू झाल्यानंतर बाजार सम‌तिीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रचंड धुराळा उडत असल्यामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाच्या किमतीवरही परिणाम होत आहे. पिंपळगाव बाजार सम‌तिीने टोमॅटोची आवक लक्षात घेऊन जोपुळ रस्ता दुरुस्तीसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी टोमॅटो, कांदा उत्पादकांनी केली आहे.

गत पंधरा वीस दिवसांपासून येथील जोपुळरोड बाजार आवारावर टोमॅटोचा हंगाम सुरू आहे. टोमॅटो बरोबरच कांद्याचेही लिलाव याच ठिकाणी होतात. त्यामुळे ट्रॅक्टर, जीप, ट्रक आदी अवजड वाहनांच्या दिवसभरातील वर्दळीने जोपुळ रस्त्याची ‘वाट’ लागली आहे. विशेष बाब म्हणजे नवीन पिंपळगाव शहराचा विस्तार चिंचखेड रोड, जोपुळरोड परिसरातच झाला आहे. मोठी नागरी वस्ती, इंग्लिश स्कूल, विधी उद्योग व्यवसाय याच परिसरात स्थिरावला आहे. मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रोज उडणाऱ्या धुळीने व वाहतुकीने सर्वच परिसराचा अक्षरश :जीव गुदमरला आहे.

सध्या कांदा, टोमॅटोचा बाजार तेजीत आहे. मात्र या खड्ड्यांमुळे वाहतूक सातत्याने ठप्प होते. परिणामी शाळेय विद्यार्थी, शिक्षक, परिसरातील शेतकरी, व्यापारी चांगलेच त्रस्त झाले आहेत.

शुभारंभाचा नुसताच थाट

वर्षभरापूर्वी मुंबर्इ-आग्रा महामार्गावरील अपूर्ण कामे, उड्डणपूल यांचा भूम‌पिूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्या हास्ते थाटामाटात करण्यात आले. त्यानंतर या कामांसाठी अद्यापपर्यंत एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही. त्यामुळे मोठा गाजावाजा करूनही या रस्त्याच्या कामांना हात न घातल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पिंपळगाव बाजार सम‌तिीने जोपुळ रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images