Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भारतमातेच्या रक्षणासाठी तत्पर व्हा!

0
0

लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तो पर्यंत तुम्ही जिद्दीने लढत रहा. संकटावर मात करत यश खेचून आणता येते. तुम्ही देशाचे उज्ज्वल भविष्य असून, आपल्या भारतमातेच्या रक्षणासाठी तत्पर व्हा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांनी विद्यार्थ्यांना केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी स्कूलचा ८० वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. २९) उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल पन्नू उपस्थित होते. ध्येयाबरोबर जिद्द ठेवा शारीरिक क्षमता तुमच्या ध्येयसिद्धीसाठी अडथळा ठरणार नाही यासाठी स्वत:ची शारिरीक क्षमता वाढवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नाशिकचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी शहीद स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. तसेच संस्थेचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या समाधीस प्रमुख पाहुण्यांनी माल्यार्पण केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करुन प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयाच्या वास्तूंचे पुजन करून पारंपरिक ध्वजपूजनही करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय रामदंडी साहिल अतुल यांनी केले. स्वागत कॅप्टन सौरभ मोकाशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विद्यालयाचे समादेशक मेजर (नि.) चंद्रसेन कुलथे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात विद्यालयातील विविध उपक्रम, भौतिक सुविधा, शैक्षणिक प्रगतीचा आढावा त्यांनी सादर केला. शालेय समिती अध्यक्ष अतुल पाटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामदंडी आबुजेद शेख याने केले. यावेळी संस्थेचे नाशिक विभागाचे सहकार्यवाह नितीन गर्गे, पदाधिकारी नरेंद्र वाणी, प्रशांत नाईक, राजकुमार गुजराथी, प्राचार्या चेतना गौड, उपप्राचार्य एम. एन. लोहकरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रकला अन् मोदक मेकिंगची आज पर्वणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी आज, रविवारी (दि. ३) चित्रकला, तसेच मोदक मेकिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना सात हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, द्वितीय क्रमांकाला चार हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळणार आहे. योगेश इलेक्ट्रॉनिक्सकडून हे गिफ्ट व्हाउचर दिले जातील. सर्व विजेत्यांना सह्याद्री हॉस्पिटलतर्फे फॅमिली हेल्थ चेकअप व्हाउचरही दिले जातील.

यावेळी दहा झटपट रेसिपी वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर जिंकण्याचीही संधी मिळणार आहे. पार्कसाइड होम, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलसमोर, बळी मंदिराजवळ, हनुमाननगर, मुंबई-आग्रा हायवे, पंचवटी या ठिकाणी या दोन्ही स्पर्धा दुपारी २ वाजता होणार आहेत. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात झटपट तयार होतील, अशा विविध पाककृती कशा तयार करायच्या याविषयी डेमो वर्कशॉपसुद्धा दुपारी ३ वाजता पार्कसाइड होम या ठिकाणी होणार आहे. कोमल सूर्यवंशी या व्हेजी नगेट, इन्स्टंट चोको लावा केक, इन्स्टंट ब्रेड दहीवडा या आणि अशा झटपट तयार होणाऱ्या रेसिपी करून दाखविणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा आणि वर्कशॉपसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नसून, ते सर्वांसाठी खुले आहे.

या स्पर्धांदरम्यान दहा झटपट रेसिपी वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेकअप व्हाउचर जिंकण्याची संधी मिळणार आहे. सायंकाळी ५ वाजता चित्रकला स्पर्धा, आणि मोदक मेकिंग कॉम्पिटिशनमधील विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क- ६६३७९८७, ७०४०७६२२५४.

--

नियम व अटी पुढीलप्रमाणे

चित्रकला स्पर्धा ः पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा तीन गटांत ही स्पर्धा होईल.

स्पर्धेचा विषय गणेशोत्सव हा आहे. रविवारी दुपारी २ वाजता ही स्पर्धा सुरू होईल. स्पर्धेचा कालावधी २ तास असेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी लागणारे साहित्य घरून आणावयाचे आहे. फक्त ड्रॉइंग पेपर स्पर्धेच्या ठिकाणी उपलब्ध होतील. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.

--

मोदक मेकिंग कॉम्पिटिशन ः स्पर्धेला येताना स्पर्धकांनी मोदक बनवून आणावेत. मोदक स्पर्धकांनी स्वतः बनविलेले असावेत. स्पर्धेच्या ठिकाणी सजावटीसाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध होणार नाही. स्पर्धेसाठी मोदक तिखट किंवा गोड कुठल्याही प्रकारचे चालतील. ही स्पर्धा दुपारी २ वाजता सुरू होईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यानिकेतन ठरले ‘स्वच्छ विद्यालय’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या राज्यातील पंधरा शाळांना राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, विद्यानिकेतन, देवळा ही शाळा या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

दिल्ली छावणी परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव आनंद स्वरूप, अपर सचिव अनिता करवल उपस्थित होते. तीन राज्य, अकरा जिल्हे आणि १७२ शाळांना यावेळी विविध श्रेणींमध्ये गौरविण्यात आले.

मनुष्यबळ विकास मंत्रलयाच्यावतीने वर्ष २०१६-१७ साठी देशभरातील सर्व शाळांना ‘स्वच्छता विद्यालय पुरस्कार’ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार देशभारातील २ लाख ६८ हजार शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयांची व्यवस्था, हात धुण्यासाठीची व्यवस्था, देखभाल व्यवस्था आणि वर्तणूक बदल व क्षमता विकास या मानांकनावर शाळांची निवड झाली.

१७२ शाळांची निवड

तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील समित्यांनी गुणांकन करून शाळांची निवड केली आहे. देशातील एकूण १७२ शाळांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील १५ शाळांचा समावेश आहे. या शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय चिन्हापासून ‘थेट सरपंच’ मुक्त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या १७३ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत मुक्त चिन्हांचा वापर केला जाणार असल्यामुळे राजकीय पक्षाची डोकेदुखी वाढणार आहे. पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नसल्यामुळे पक्षीय उमेदवारांना त्याचा फटका बसणार आहे.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या चिन्हांवर उमेदवार उभे केले होते. त्यात बहुतांश निवडणुकीत स्थानिक उमेदवारांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. पण, या निवडणुकीत राजकीय पक्षाचे चिन्ह नसल्यामुळे पक्षाचे बलाबल मोजणे सुद्धा अवघड होणार आहे.

आतापर्यंत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व राखले. आता या ग्रामपंचातीच्या निवडणुकीत भाजपला किती फायदा होतो हे मोजणे अवघड असणार आहे. थेट सरपंचाच्या निवडणुकीत निवडून आलेला सरपंच हा पाच वर्षांसाठी असणार आहे. त्यामुळे त्याला आपल्याकडे वळविण्यासाठी रस्खीखेचही होणार आहे.

गावगाड्याचे राजकारण

ग्रामपंचायतमध्ये गावगाड्याचे राजकारण असते. त्यामुळे छोट्याशा कारणातून येथे भांडण होते. आता पाच वर्षे एकच उमेदवार पाच वर्षे सत्तेत असल्यामुळे त्यातून मोठे वाद होण्याची शक्यता आहे.

सातवी उत्तीर्ण आवश्यक

सरपंचपदाची उमेदवार असलेली व्यक्ती १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना सातवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने तसे प्रमाणित करणे आवश्यक राहणार असल्यामुळे अनेक उमेदवारांवर अन्याय होणार आहे. लोकशाहीत पहिल्यांदा असा निर्णय ग्रामपंचायतीला लागू केला आहे. त्यामुळे असे निकष सर्वच निवडणुकीला लावावा, अशी मागणीही ग्रामीण भागात असून संतापही आहे.

प्रभाग व सरपंचाचे मत

थेट सरपंच निवडणुकीत एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल, तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील. त्यामुळे तीदेखील डोकेदुखी असणार आहे. प्रभागातील गटांचाही या निवडणुकीत थेट सरपंचाला मारक ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कट प्रॅक्टिसला लगाम!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गावपातळी ते मुंबईपर्यंत कट प्रॅक्ट‌सिमुळे सर्वसामान्य माणसाची पिळवणूक होत आहे. जवळपास ४० टक्के कम‌शिन घेवून वैद्यकीय क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात आहे. कम‌शिन घेणाऱ्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे ‘कट प्रॅक्टिस’ विरोधातील कायद्याचा मसुदा येत्या डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. या कायद्यासंदर्भात डॉक्टरांच्या विविध संघटनांशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील एका रुग्णालयात कट प्रॅक्टिस संदर्भातील स्टिंग ऑपरेशनचा एक व्ह‌डि‌िओ प्रसारित झाला. या व्हिड‌िओने पुन्हा एकदा वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडाली. शनिवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, सामान्य माणसाला चांगल्या आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी आमचेही प्रयत्न आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रातही मोठी स्पर्धा सुरू आहे. या व्यवसायातही कमिशन देणारे तयार झाले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करणारे डॉक्टरही यात भरडले जातात. रुग्णांचीही पिळवणूक होते. मात्र सरकारने यासंदर्भात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील स्टिंगमध्ये जे समोर आले त्याची क्लिपचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर नक्कीच कारवायी केली जाईल. हे खरंय की, कारवायीसाठी आपल्याकडे कायदे अपूर्ण आहेत. याकरिताच आता लवकरच कट प्रॅक्टिस विरोधात आगामी अधिवेशनात कायदा करण्यात येईल. ‘कट प्रॅक्टिस’ विरोधात कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आणि समितीने अल्प कालावधीत राज्य सरकारकडे मसुदाही सादर केला. परंतु हा कायदा अधिकाधिक पारदर्शी तसेच सक्षम होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या सुधारणांसह मसुदा पुढच्या अधिवेशनात म्हणजेच डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशात सादर करण्याची तयारी सुरू असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

स्वाइन फ्लूवरून झापले

जिल्ह्यात जानेवारीपासून ४७ जणांचा स्वाइन फल्यूने मृत्यू झाला. राज्यात नाशिकमध्ये स्वाइन फल्यूने बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या वैद्यकिय विभागाच्या बैठकित महाजन यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्ह्यात गेल्या एप्र‌लि महिन्यापासून स्वाइन फ्ल्यूची लस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत तातडीने ही लस उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील आठवणींचा पैन् पै ठेवा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आचार्य अत्रे यांची कन्या, ज्येष्ठ कवयित्री, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. नाशिकमध्ये त्यांनी बालपणीचा काळ घालवला. नाशिकच्या कन्याशाळेत आठवीत असताना त्यांनी माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांच्यासोबत एका मराठी नाटकातही काम केले होते, तर वर्टी कॉलनीत त्या पाच वर्षे राहिल्या होत्या.

मराठी काव्यक्षेत्रात शिरीष पै यांचे मोठे योगदान होते. त्यांनी कथा, ललित लेखन, बालसाहित्य, नाटक या प्रांतांतही संचार केला. लेखनाचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला होताच, परंतु त्याला आपल्या शैलीची जोड देत शिरीष पै यांनी मराठी साहित्यात अभिनव प्रयोग केले. आयुष्याचा बराचसा काळ मुंबईला व्यतीत केलेल्या शिरीष पै यांचा बालपणीचा काळ मात्र नाशिकला गेला.

जून १९४१ मध्ये आचार्य अत्रे यांच्या पत्नी सुधा अत्रे या पुण्याहून नाशिकला बदलून आल्या. त्या शासकीय कन्या शाळेत मुख्याध्यापिका आणि ट्रेनिंग कॉलेजला अधिक्षिका म्हणून दुहेरी कारभार त्यांच्याकडे होता. त्या वेळी शिरीष पै आणि त्यांची लहान बहीण या दोघी नाशिकला आल्या होत्या. त्यानंतर पाच वर्षे त्या नाशिकमध्ये होत्या.

पुष्पाताई हिरेंसोबत नाट्यकला

शासकीय कन्याशाळेत त्या शिकत होत्या. त्या आठवीच्या वर्गात असताना त्यांनी शाळेच्या स्नेहसंमेलनात नाटकात भूमिकाही केली होती. ‘स्लीपिंग ब्यूटी’ नावाचे ते नाटक होते. राजकुमार व राजकुमारीचे प्रेम असा या नाटकाचा आशय होता. विशेष म्हणजे या नाटकात राजकुमाराची भूमिका शिरीष पै यांनी, तर राजकुमारीची भूमिका माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांनी साकारली होती. त्यानंतर हिरे व पै यांचा संबंध कायम राहिला.

वर्टी कॉलनीत वास्तव्य

शिरीष पै नाशिकला जिल्हा परिषदेशेजारी असलेल्या वर्टी कॉलनीत पाच वर्षे राहिल्या. तेथे डॉ. अ. वा. वर्टी यांच्या कन्यांसमवेत त्या खेळायला जात असत. १९४१ ते १९४६ या काळातील त्यांच्या नाशिकमधील आठवणी सुधा अत्रे यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘गोदातरंग’मध्ये नमूद केलेल्या आहेत.

‘हायकू’वर हुकूमत होती

हायकू हा अतिशय सोपा वाटणारा मात्र अतिशय अवघड असा प्रकार शिरीष पै यांनी लीलया हाताळला. या प्रकारात त्यांची हुकूमत होती. त्यांनी आपल्या ‘हायकू’मुळे अनेकांना लिहिते केले. सावानाच्या साहित्यिक मेळाव्यासाठी मी त्यांना दोन वेळा निमंत्रित केले होते. मात्र, त्यांना येणे शक्य झाले नाही. ही खंत मला लागून आहे. कवितेच्या उत्तम आस्वादक, समीक्षक व ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांची काव्यप्रेमींना कायमच आठवण राहील.

- नरेश महाजन, माजी उपाध्यक्ष, सावाना

रितेपण देणारे जाणे

शिरीष पै यांनी आचार्य अत्रे यांच्याविषयी ‘पप्पा’ हे पुस्तक लिहिले. वडिलांचे बोट धरून पत्रकारितेत आलेल्या शिरीष पै यांची ‘प्रेमकहाणी’, ‘ऊन-सावली’ ही पुस्तके गाजली. ‘एकतारी’, ‘एका पावसाळ्यात’ हे कवितासंग्रह लिहिणाऱ्या पै यांनी मराठीत जपानी हायकू भाषांतरित तर केलेच, पण हा काव्यप्रकार मराठीत आणला. चारोळीच्या आधी तीन ओळींचा हायकू त्यांच्यामुळे रूढ झाला आणि रुजलाही. त्यांनी कवितेबरोबरच कादंबरीलेखनही केले. लाल बैरागीण ही त्यांची कादंबरी त्या काळात चर्चेत होती. मुलांसाठी त्यांनी आईची गाणी, बागेतील गमतीजमती ही पुस्तके लिहिली. वकिलीचे शिक्षण घेतलेल्या शिरीष पै यांनी पत्रकारिता आणि लेखन या क्षेत्रात विविधांगी मुशाफिरी आणि कामगिरी केली. त्यांचे जाणे नैसर्गिक असले तरी रितेपण देणारे आहे. शिरीष पै यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

- प्रा डॉ. शंकर बोऱ्हाडे, ग्रंथसचिव, सावाना

साहित्यक्षेत्रात मोलाची भर

आचार्य अत्रे असल्यापासून शिरीष पै यांच्याशी परिचय होता. त्या काळी मी ‘नवयुग’ला कथा, लेख लिहीत असे. पै तेव्हा ‘नवयुग’च्या कथा, लेखांचे संपादन करीत. जपानी काव्यप्रकार हायकू त्यांनी मराठीत आणून साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली. माझे पहिले पुस्तक येत असताना, त्याचे भट नावाचे संपादक शिरीष पै यांच्या घरी होते. त्यामुळे तेथेच पै यांच्याशी प्रथम भेट झाली होती. ‘नवयुग’पासून परिचय असल्याने त्यांनी आपुलकीने संवाद साधला होता.

- चंद्रकांत महामिने, ज्येष्ठ लेखक

लेखनयुगाचा अस्त

आचार्य अत्रे यांच्या कन्या असलेल्या शिरीष पै यांना साहित्याचा समर्थ वारसा लाभला होता. पै यांनी आपल्या स्वतंत्र लेखनशैलीने मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला. जपानी हायकूला मराठीत रुजविण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांच्या निधनाने एका लेखनयुगाचा अस्त झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- रवींद्र मालुंजकर, कार्यवाह, मसाप, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात ५० टक्के क्लासेस बेकायदेशीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजांमध्ये इंटिग्रेटेड क्लासेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, असे क्लास शोधण्यासाठी जिल्हा दक्षता समितीने अचानक भेटी देऊन कारवाई करणे आवश्यक आहे. राज्यात ५० टक्के क्लासेस बेकायदेशीर असून, त्यांच्यावर व दुहेरी क्लासचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष प्रा. बंडोपंत भुयार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारने कोचिंग क्लासेसच्या नियंत्रण व नियमनासाठी बारा सदस्यीय समिती गठित केली आहे. समितीत कोचिंग क्लासेसच्या चार प्रतिनिधींचाही समावेश असून, समितीसमोर कोचिंग क्लासची भूमिका ठरवण्यासाठी नाशिकमध्ये संदीप फाउंडेशनमध्ये बैठक घेण्यात आली. २२ जिल्ह्यांच्या २२ प्रतिनिधींनी या बैठकीत आपली भूमिका मांडली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रवीण ठाकूर, कायदेविषयक राज्य सल्लागार प्रा. रवींद्र फडके, जयंत मुळे आदी उपस्थित होते.

बेकायदेशीर क्लासचालकांना संघटना समर्थन देत नसून शैक्षणिक क्षेत्रात फोफावलेल्या या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आमचाही पुढाकार आहे, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली. क्लासची फी क्लास शिक्षकांच्या कौशल्यावर आधारित असते, ज्याप्रमाणे डॉक्टर, वकील यांची फी सरकारला ठरवता येणार नाही. क्लासेसच्या वेळेविषयी बंधने घालण्यात येऊ नये, क्लासमध्ये स्वच्छतागृह, पार्किंग यांसारखी बंधने लागली जाऊ नये, अशी ठाम मतेही या वेळी मांडण्यात आली. राज्य सरकारकडून देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्काराच्या धर्तीवर कोचिंग क्लास चालकांसाठीही पुरस्कार योजना सुरू करावी, शिक्षक मतदारसंघात खासगी क्लासेस शिकवणी प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार मिळावा, गणिताला अंतर्गत २० गुण बंद करून संपूर्ण १०० मार्कांची परीक्षा घेण्यात यावी, अशा मागण्याही सरकारकडे करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा

0
0

डॉ. सुभाष भामरे यांचे आ‍वाहन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानले आहे. गरीब शेतकऱ्यांचे कल्याण हाच त्यांचा ध्यास आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना आणल्या आहेत. या योजनांचा लाभ कृषी विभागाने सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. आगामी पाच वर्षांत शेतीचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र व कृषि विभाग आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया मंथन संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाचे उद्‍घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते नंदुरबार येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत. काम करण्याची त्यांच्यात ताकद आहे. वीज, पाणी, शेतमालाला योग्य भाव आणि शेतीला पूरक जोड व्यवसाय केला, तर तो प्रगती करू शकेल. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यापर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवावेत. जमिनीच्या आरोग्यपत्रिका तयार करून घ्यावी. शास्त्रोक्त व आधुनिक पद्धतीने प्रगती साधावी. तसेच आगामी काळात कोल्ड स्टोरेज आणण्यासाठी प्रयत्न राहतील. त्यामुळे कांद्यासारखा शेतमाल तेथे ठेवता येईल आणि योग्य दर मिळाल्यावर शेतकरी त्याची विक्री करू शकेल, असेही भामरे म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ डॉ.कलशेट्टी यांनी, दारिद्ररेषेखालील घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन केले. शेतकऱ्यांची पाण्याचा काटेकोर वापर करून गटशेतीवर भर दिला पाहिजे. तसेच पीक विमा योजनेत सहभागी झाले पाहिजेत, असेही सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘माझे मनमाड’ आले स्मार्ट फोनवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड व नांदगाव शहर अँड्रॉइड मोबाइलवर आता केवळ एका क्लीकने सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. मनमाडमधील राहुल कांदे या तरुणाने मित्रांच्या सहकार्यातून ‘माझे मनमाड’ हे अॅप्लिकेशन विकसित केले आहे. मनमाड शहराला राज्यात देशात सर्वदूर नेणारे हे अॅप कौतुकाचा विषय ठरले आहे.

एमबी. ए. झालेल्या राहुल कांदे याच्या हुशारीतून साकारलेल्या अॅपचे पोल‌सि उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक परदेशी, पालिका गटनेते गणेश धात्रक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी कौतुक केले. मनमाड रेल्वे स्थानकापासून नगरपरिषदेपर्यंत आणि मनमाड, नांदगावमधील वैद्यकीय सुविधांपासून ते परिसरातील प्रेक्षणीय स्थळांपर्यंत सर्व माहिती मिळणार आहे. राहुलने आपल्या आजोबांना हे अॅप समर्पित केले आहे.

महत्त्वाची संकेतस्थळे

या अॅपमध्ये नोकरी विषयक, महाराष्ट्र सरकारच्या नवनवीन योजना या वेबसाईट्सही जोडण्यात आल्या आहेत. विविध दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिब‌रि आदींही माहिती या अॅपमध्ये जोडली आहे.

अॅपमध्ये विविध लिंक

‘माझे मनमाड’ अॅप्लिकेशनमध्ये नांदगाव तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये, मनमाड आणि नांदगाव शहरात असलेले सर्व मेडिकल स्टोअर्सचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत. मनमाड आणि नांदगाव शहर व परिसरातील सर्व शाळा महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा क्लासचे संपर्क क्रमांक आदींबाबत माहिती आहे. मनमाड आणि नांदगावला थांबा असलेल्या रेल्वेगाड्यांची यादी, वेळ तसेच बसेसचीही माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, राष्ट्रवादीचे बडे नेते संपर्कात

0
0

पालकमंत्री गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विरोधी पक्षातील अनेक बडे नेते राज्य सरकार व भाजपच्या कामांचे कौतुक करीत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक बडेनेते भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे केला आहे.

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजीमंत्री राणे यांच्या प्रवेशाबाबत विचारले असता, महाजन म्हणाले, की राणेंसह काँग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. सांगलीत माजीमंत्री पंतगराव कदम व ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी सरकारच्या कामांचे कौतुक केले आहे. विरोध पक्षांतील अनेक नेते भाजपात येत आहेत. काँग्रेसचे भाजपात विलीनीकरण झाले तर बरेच होईल अशी मिश्किल टिप्पणी महाजन यांनी यावेळी केली.

खडसेंवर मिश्किल टिप्पणी

खडसे यांच्या टीकेबाबत विचारले असता, खडसे हे काही शेअर बाजार आहेत का, ते उसळतील अशा शब्दात महाजन यांनी चिमटा काढला. तसेच, बाजू सावरत ते आमचे ज्येष्ठ नेते असून, लवकच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच दिवसांनंतर रेल्वे ट्रॅकवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसला आसनगाव-वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान पाच दिवसांपूर्वी अपघात झाल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. शंभरावर कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्यानंतर शनिवारी पाचव्या दिवशी वाहतूक सुरळीत झाली.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डाउनपाठोपाठ अप (मुंबईला जाणारा) रेल्वेमार्गही दुरुस्त झाला आहे. मात्र, तरीही शनिवारी पंचवटी, गोदावरीवगळता राज्यराणीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. अनेक गाड्यांना २० ते ३४ तास विलंब झाला. सोमवारपर्यंत वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. चाळीसगावजवळ शनिवारी ब्लॉक घेण्यात आल्याने लांबपल्ल्याच्या गाड्यांना आणखी विलंब झाला. काशी एक तास, तर उद्योगनगरी एक्स्प्रेस ३७ तास उशिरा आली. पुष्पकला २४ तास, लखनौ-एलटीटीला २२ तास उशीर झाला. आता मार्ग सुरू झाल्याने रेल्वे प्रशासन उत्साहाने कामाला लागले आहे.

अपघातामुळे अप आणि डाऊन हे दोन्ही मार्ग बंद पडल्याने अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे मध्य रेल्वेला मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली. प्रवाशांनाही चार दिवस मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांमधील व परिसरातील अनेक व्यावसायिकांवर उपाशी झोपण्याची वेळ आली. आता दोन्ही मार्ग सुरळीत झाल्याने प्रशासनासह प्रवासी, व्यावसायिक आदींनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

--

‘ते’ रूळ बदलले

रेल्वे अपघातामुळे वाशिंदजवळ रुळांची मोडतोड झाली होती. वाशिंद आणि आसनगावदरम्यान अपघात झालेल्या ठिकाणचे नऊशे मीटरचे रूळ बदलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीही खबरदारी म्हणून या मार्गावर रेल्वे हळू धावत आहे. मुंबईला जाणारा मार्ग बंद पडल्याने मुंबईहून नाशिकला येणाऱ्या मार्गावरच रेल्वेची भिस्त होती. भुसावळहून मुंबईला जाणाऱ्या गाड्या वाशिंदजवळ येताच डाउनच्या मार्गावर टाकण्यात येत होत्या. तेथून पुढे दहा ते तीस किलोमीटर गतीने नेऊन पुन्हा अपच्या मार्गावर येत होत्या. सिंगल लाइनचा हा धोका पत्करल्यामुळे पंचवटी, गोदावरी व अन्य गाड्या तरी सुरू झाल्या. त्यामुळे प्रवाशांचा उद्रेकही टळला.

--

राज्यराणीला विश्रांतीच

पंचवटी, गोदावरी, राज्यराणी, मंगला एक्स्प्रेस या सकाळच्या गाड्या जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी उपयुक्त आहेत. अपघातामुळे या गाड्या दोन दिवस बंद होत्या. चाकरमान्यांचा विचार करून पंचवटी व गोदावरी दोन दिवसांनंतर सुरू करण्यात आली. राज्यराणी पाचव्या दिवशीही धावू शकली नाही. ती सोमवारी धावेल, असे सूत्रांनी सांगितले. तोपर्यंत पंचवटीवरच चाकरमान्यांची भिस्त आहे.

--

रद्द झालेल्या गाड्या

पाच दिवसांपासून अनेक गाड्या रद्द कराव्या लागत आहेत. शनिवारी मुंबईला जाणाऱ्या पुष्पक-लखनौ, सिकंदराबाद (देवगिरी), पंजाब मेल, विदर्भ, जनता, हावडा मेल, गरीब रथ, वाराणसी, महानगरी, पटना, गोरखपूर-पनवेल, कामाख्या, तर मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या तपोवन, गुवाहटी, पवन, गरीब रथ, अमरावती, जनता-पटना या गाड्या रद्द करण्यात आल्या. भुसावळ-पुणे व अन्य गाड्या दौंडमार्गे मुंबईला सोडण्यात येत आहेत. रक्सोल एक्स्प्रेस अपघात स्थळावरून जाणारी पहिली गाडी ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतेतून दिला त्यागाचा संदेश

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुस्लिम धर्मियांचा सण बकरी ईद मालेगाव शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील पोलिस कवायत या मुख्य ईदगाह मैदानावर हजारो मुस्ल‌िम बांधव या सहभागी झाले होते. मौलाना इ‌म्तियाज इक्बाल यांनी दुआँ पठण केले. बकरी ईद म्हणजे अल्लाहप्रती त्याग करण्याचा संदेश देणारा सण असून, शहरातील शांतता सलोखा कायम राहील अशा प्रकारे हा सण साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शहरातील एकूण १३ वेगवेगळ्या ईदगाह मैदान आणि सुमारे १०० मशिदीत नमाज पठण व अन्य मुस्लिम धर्मीय कार्यक्रम झाले. या नंतर शहरात विविध ठिकाणी कुर्बानीचे कार्यक्रम झाले. कुर्बानीसाठी मनपाकडून कायमस्वरुपीचे एक व तात्पुरता १४ असे एकूण १५ कत्तलखान्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पुढील तीन दिवस बकरी ईद साजरी होणार आहे. बकरी ईद आणि गणेश विसर्जन जोडून आल्याने अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उप अधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांच्या नेतृत्त्वाखाली पोल‌िस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रमुख ईदगाह मैदानावरील नमाज पठाणावेळी वाहतूक अन्य मार्गाने वळव‌िण्यात आली होती. जिल्हा पोलिसप्रमुख संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, आयुक्त संगीता धायगुडे, उपायुक्त राजू खैरनार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. येत्या वर्षभरात सांडपाणी शुद्ध‌िकरण प्रकल्प राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

शहरातील प्रवाशांचे हाल

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून शहरातील कॅम्प भागाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. नाशिककडून येणाऱ्या बसेस गिरणा पुलापासूनच धुळे, जळगावकडे रवाना होत होत्या. मात्र प्रवाशांना याची पूर्वकल्पना नसल्याने बस स्थानकात प्रवाशांची गर्दी होती, मात्र बसेस नव्हत्या. यामुळे प्रवाशांना बस स्थानकापासून रिक्षाने गिरणा पुलापर्यंत यावे लागले. तर शहरात येणाऱ्या प्रवाशांना तेथेच उतरावे लागत होते. यामुळे सकाळी प्रवासाला निघणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले.

रक्तमिश्रित पाणी आल्याने वाद

बकरी ईद निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात कुर्बानी होत असते. मात्र मनपाच्या अधिकृत कत्तलखान्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी कुर्बानी होत असल्याने रक्तमिश्रित पाणी मोसम नदीपात्रात येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. शानिवारी देखील शहरातील सांडावा पुलानजीक रक्तमिश्रित पाणी आल्याने सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे, निखील पवार तसेच शांतता समिती व मध्यवर्ती गणेश उत्सव समितीच्या सदस्यांनी पालिका प्रशासनास धारेवर धरले. बोरसे यांनी याबाबत वारंवार प्रशासनास निवेदन देऊन देखील रक्तमिश्रित पाण्यास पायबंद घातला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी पोल‌िस उप अधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांनी भेट घेऊन त्यांची समजूत काढली. तसेच पालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून झाडाझडती

0
0

सातपूर विभागाची बैठक; अभियंत्यांसमोर अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या सातपूर विभागात गेल्या काही दिवसांपासून असमतोल पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. यासाठी शनिवारी (दि. १) प्रभाग सभापती माधूरी बोलकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली होती. यावेळी सातपूर विभागाच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच कार्यकारी अभियंता चव्हाणके यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सभापती बोलकर यांनीही आश्चर्य व्यक्त केले.

गंगापूर धरणात पिण्याचे पाणी मुबलक असतानादेखील सातपूर भागात अनेक ठिकाणी असमतोल पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. याकरीता सभापती बोलकर यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक बोलावली. यात श्रमिक नगर, राधाकृष्ण नगर, पवार संकुल, पिंपळगाव बहुला, वास्तू नगर, सातपूर कॉलनी, खोडे पार्क व सातपूर गावात असमतोल पाणीपुरवठा केला जात असल्याची समस्या सभापती बोलकर

यांनी मांडली. यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाणके यांनी पाणीपुरवठा का असमतोल होतो, असा जाब अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारला होता. परंतु, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने कार्यकारी अभियंता चव्हाणके यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरत सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. तसेच जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी कमी येत असेल तर त्याची तत्काळ माहिती मला द्या, असे आदेशच चव्हाणके यांनी दिले.


परिसराची पाहणी करीत सूचना

सातपूरकरांनी पाणीपुरवठ्याबाबत केलेल्या तक्रारीनुसार शनिवारी झालेल्या बैठकीत कार्यकारी अभियंता चव्हाणके यांनीच अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सातपूर भागात ज्याठिकाणी असमतोल पाणीपुरवठा होतो त्या भागाची पाहणीही कार्यकारी अभियंता चव्हाणके यांनी सभापती बोलकर यांच्यासमवेत केली. याप्रसंगी नगरसेविका पल्लवी पाटील, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ए. व्ही. जाधव यांसह कर्मचारी उपस्थित होते.

केवळ दोन व्हॉल्व्हमनच उपस्थित

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात बढतीवर असलेले व्हॉल्व्हमन ३० आहेत. परंतु, प्रत्यक्ष बैठकीला केवळ २ व्हल्व्हमन असल्याने सभापती बोलकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. या भागात असमतोल पाणीपुरवठा का होता याबाबत अधिकारी, कर्मचारी व व्हॉल्व्हमन यांनादेखील बोलाविण्यात आले होते. परंतु, मुजोर व्हॉल्व्हमन यांनी बैठकीस येण्याबाबत टाळाटाळ केल्याचे समोर आले. परंतु, पाणीपुरवठ्याच्या विभागात रोज इमाने इतबारे सही करण्यासाठी वेळ मिळेल त्यावेळी व्हॉल्व्हमन कसे येतात, असा सवाल सभापती बोलकर यांनी उपस्थित केला आहे. कार्यकारी अभियंता चव्हाणके यांनीच याकडे लक्ष घालावे, अशी मागणीही बोलकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिर्डी करणार नाशिकला टेकओव्हर

0
0

नाशिक ः साईबाबांच्या समाधी शताब्दीवर्षानिमित्त शिर्डीत सज्ज झालेले विमानतळच नाशिकच्या विमानसेवेला टेक ओव्हर करणार असल्याची चिन्हे आहेत. भारतासह परदेशातूनही भाविक शिर्डीला येत असल्याने तेथे तातडीने सेवा देण्यास कंपन्या इच्छुक आहेत, तर नाशिकच्या परिघात मुंबई, शिर्डीसारखी विमानतळे असताना ओझरला सेवा कशी द्यायची, या निर्णयाप्रत विमान कंपन्या आल्या आहेत. त्यामुळे ओझरला सेवा मिळण्याची शक्यता धूसरच आहे.

दर १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा पापक्षालनासाठी जगविख्यात आहे. याच वैश्विक सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या विमानसेवेचे स्वप्न साकार होईल, अशी अपेक्षा नाशिककरांना होती; पण सिंहस्थ उलटून दोन वर्षे झाली आहेत. याउलट शिर्डीतील साई समाधी शताब्दी सोहळा शिर्डीवासीयांना फलदायी ठरणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने तेथे विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. शिर्डी विमानतळाचे काम पूर्ण होण्याची आणि तेथील काही परवानग्या मिळण्याची वाट विमान कंपन्यांकडून पाहिली जात असून, येत्या काही महिन्यांतच तेथून सेवेचे टेकऑफ होणार आहे. शिर्डीहून राज्यातील विविध शहरांसाठी, परराज्य आणि परदेशातील महत्त्वाच्या शहरांसाठी सेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हीच बाब नाशिकच्या विमानसेवेला बाधा पोहोचविणार असल्याचे ठाम मत हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

शिर्डी येथील विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास नाशिकपासून दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे असणार आहेत. नाशिकपासून अवघ्या ८७ किलोमीटरवर शिर्डी, तर सध्याचे मुंबई १६६ किलोमीटरवर. त्यामुळे दोन सक्षम विमानतळ नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असताना ओझर विमानतळाच्या ठिकाणाहून सेवा सुरू केल्यास प्रवाशांचा किती प्रतिसाद लाभेल, याबाबत विमान कंपन्यांमध्ये साशंकता आहे. नाशिकच्या विमानसेवेचा आजवरचा इतिहास पाहता, प्रवासी संख्येअभावीच सेवा बंद पडली आहे. शिर्डीहून सेवा सुरू झाल्यानंतर नाशिकला मुबलक प्रवासी मिळू शकतील का, असा प्रश्न विमान कंपन्यांच्या सर्वेक्षणातून उपस्थित होत आहे. याउलट नाशिककर शिर्डीहूनच सेवा घेण्यास पसंती देतील, असेही काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विमानसेवा ही कुठल्याही एका शहर किंवा जिल्ह्याला नाही तर ती त्या प्रदेशाला दिली जाते. त्यामुळे दोन मोठी विमानतळे जवळ असताना ओझरची सेवा कितपत यशस्वी ठरेल, असा प्रश्नच हवाई वाहतूक क्षेत्रातून विचारला जात आहे. त्यामुळे ओझरहून सेवा सुरू होण्याची शक्यता जवळपास नाहीच, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ स्पष्ट करीत आहेत.

किती आले, किती गेले

एअर इंडिया, सोव्हिका एअरलाइन्स, श्रीनिवास एअरलाइन्स, एअर टॅक्सी या कंपन्यांनी सेवेच्या घोषणा केल्या; पण त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत. किंगफिशर एअरलाइन्सने सेवा दिली, पण ती बंद पडली. मेरिटाइम हेलि एअर सर्व्हिस प्रा. लि. (मेहेर) या सी प्लेन कंपनीने सेवा सुरू केली, पण ती तांत्रिक कारणांमुळे अयशस्वी ठरली आहे.

स्लॉट उपलब्ध नाही

ओझरहून सेवा सुरू व्हावा यासाठी खासदार हेमंत गोडसे आग्रही आहेत. शनिवारीही त्यांनी एअर डेक्कन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र, मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले आहे. याबाबत लवकरच एक बैठक होणार असून त्यात तोडगा निघेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे गोडसे यांनी म्हटले आहे.

(समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना तंबी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिले आहे. त्यामुळे कारभार सुधारा, निर्णयात एकवाक्यता ठेवा, जनतेचा भ्रमनिरास होऊ देऊ नका, पदाधिकाऱ्यांमधील वाद टाळा अन्यथा आपलीही मनसेच होईल, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी पदाधिकारी व नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या.

महापालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादविवादाची गंभीर दखल घेतल्याचे सांगत भाजप पदाधिकाऱ्यांचे महाजन यांनी कान उपटले. विश्वासात न घेताच परस्पर निर्णय घेतले जातात, मोठा विसंवाद आहे, असे सांगत निदान मनसेचे काय हाल झाले त्यापासून धडा घेऊन कामात सुधारणा करण्याचा अल्टिमेटम पालकमंत्र्यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना दिला. आता मीच महापालिकेच्या कार्यालयात लक्ष घालणार असल्याचा इशारावजा संदेशही त्यांनी नगरसेवकांना दिला. दरम्यान, करवाढीच्या प्रस्तावाचे महाजन यांनी समर्थन केले असून, प्रामाणिक करदात्यांवर अन्याय होणार नसल्याची भूमिकाही त्यांनी घेतली.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांनी शनिवारी आपल्या व्यस्त दौऱ्यात महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. महापालिकेत सुरू असलेल्या कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या असमन्वयावरही त्यांनी आसूड ओढला आहे. महापौर रंजना भानसी, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होेते. महाजन यांनी यावेळी महापालिकेत सुरू असलेल्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या असमन्वयाबद्दल पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले आहे. त्यामुळे जनतेने मोठ्या अपेक्षेने तुम्हाला निवडून दिले आहे. जनतेचा भ्रमनिरास करू नका, अशा शब्दांत खडसावत पदाधिकारी व नगरसेवकांमधील वाद तातडीने टाळा, अशी सूचना त्यांनी केली. विविध सत्ताकेंद्रे तयार होऊ देऊ नका, कारभारात सुधारणा करा, नाही तर मनसेसारखेच आपले हाल होतील, असा इशारा त्यांनी दिला. तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा, मी सोडवतो; परंतु वादविवाद टाळण्याचा आदेश त्यांनी दिला. नगरसेवक व पदाधिकारी आता पक्षासाठीही वेळ देत नसल्याचे सांगत पक्षात जे काम करीत नसतील त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, असा इशाराही महाजन यांनी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दिला. महापालिकेचा कारभार सुधारण्यासह निर्णयात एकवाक्यता ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. निदान मनसेच्या स्थितीपासून धडा घेऊन कारभार करण्याचे खडेबोल त्यांनी यावेळी पदाधिकारी व नगरसेवकांना सुनावले. यापुढे कारभार सुधारला पाहिजे, असा दमही त्यांनी भरला. त्यामुळे पदाधिकारी व नगरसेवक महाजन यांचा सल्ला कसा घेतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

--

कारभारात घालणार लक्ष

पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केले. पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नाही, परस्पर निर्णय घेतले जातात. त्यामुळे वादविवाद आहेत, असे मान्य करीत पुढच्या काळात मीच बारकारईने महापालिकेच्या कारभारात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदाधिकाऱ्यांमधले छोटे-मोठे वाद मिटविले जातील अाणि नाशिककरांना अपेक्षित असलेला विकास करण्याचा प्रयत्न मी करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.

--

करवाढीचेही समर्थन

भाजपकडून महापालिकेत मांडण्यात आलेल्या करवाढीचेही महाजन यांनी समर्थन केले. गेल्या अनेक वर्षांपासून करवाढ झालेली नाही. त्यामुळे विकासकामांसाठी करवाढ आवश्यक असल्याचे सांगत प्रामाणिक करदात्यांवर मात्र अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. नोंदणी नसलेल्या मालमत्ता रडारवर आणून त्यांनी नोंद करू, तसेच करबुडव्यांवरही कारवाई करू, असे सांगत महाजन यांनी करवाढीचे संकेत दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरीस गेलेली कार शोधली पोलिसांनी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात कार अडवून लूट प्रकरणी मुंबई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून, मुंबई नाका पोलिसांनी काही तासातच पळविलेली कार शोधून काढली.विवो मोबाइल कंपनीचे विदेशी व्यवस्थापक जिहान हे शुक्रवारी सकाळी शोरूमच्या उद‌्घाटनासाठी शहरात आले होते. बिड येथून रात्रीचा प्रवास करून ते चालकासमवेत सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा जवळ स्विफ्ट कारने (एमएच २५ आर ०४७२) प्रवास करीत असतांना इंदिरानगर जॉगिंग टॅक जवळील शनीमंदिर भागात टोळक्याने कार अडविली. चालक विशाल नवले व व्यवस्थापक जिहान (रा. दोघे बिड) यांना धारदार चाकूचा धाक दाखवित कार घेवून मुंबईच्या दिशेने पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लुटारूंचा माग काढला. हे संशयित मुसळगाव (ता. सिन्नर) औद्योगीक वसाहतीत वाहन सोडून पळून गेले. वाहनात पासपोर्ट असलेली बॅग मिळून आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मुंबई नाका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजीवनी जाधवचे भोसलामध्ये जोरदार स्वागत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भोसला मिलिटरी कॉलेजची विद्यार्थिनी संजीवनी जाधव हिने तैवानच्या ताईपे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. तिने यावेळी १० हजार मीटर पळण्याच्या स्पर्धेत ३३ मिनिटे २२ सेकंद स्वतःची सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. नुकतेच तिचे नाशिकमध्ये आगमन झाले यावेळी भोसला मिलिटरी स्कुलच्यावतीने तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये संजीवनी जाधवचा रविवारी (दि. ३) सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत बेडेकर, नाशिक विभागाचे सहकार्यवाह आशुतोष रहाळकर, कोषाध्यक्ष अतुल पाटणकर, भोसला मिलिटरी कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. नितीन अहिरराव, नॅक संयोजक डॉ. प्रसन्ना सेठी, कार्यालय अधीक्षक रवींद्र वैद्य, ग्रंथपाल के. बिनू हे यावेळी उपस्थित होते.

नाशिकची पताका जगभरात फडकविणाऱ्या संजीवनी जाधवने पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. महिनाभरापूर्वी भुवनेश्वर येथे झालेल्या बाविसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या संजीवनी जाधवने पुन्हा आंतरराष्ट्रीय विजयाची परंपरा राखली आहे. कविता राऊतनंतर आशियाई स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणारी ती नाशिकची दुसरी धावपटू ठरली आहे. आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन वर्षे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संजीवनी जाधवने गुंटूर येथे ५७ व्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. गेले १० वर्ष सतत ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्याचा मान भोसला मिलिटरी कॉलेजचा राहिला आहे. कविता राऊत, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, आरती पाटील, किसन तडवी, ताई बामणे या भोसलाच्या विद्यार्थ्यांनी ही परंपरा राखली आहे.

कुलगुरूंच्या हस्ते बुधवारी सत्कार

संजीवनी जाधव, किसन तडवी, कांतीलाल कुंभार, शरयू पाटील व मार्गदर्शक विजेंद्र सिंग यांचा जाहीर सत्कार सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, डॉ. दीपक माने संचालक क्रीडा मंडळ पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. ६ सप्टेंबर २०१७ रोजी भोसला मिलिटरी कॉलजेच्या मैदानावर ४ वाजता पार पडणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अंतर्गत येणाऱ्या कॉलेजचे सर्व प्राचार्य, क्रीडा संचालक व खेळाडू विद्यार्थी यास हजर राहणार आहेत, अशी माहिती भोसला मिलिटरी कॉलजेच्या प्राचार्या डॉ. सुचेता कोचरगावकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खादी अन् गांधी टोपीचा गणपती

0
0

देवकिसन सारडा, उद्योगपती

नाशिकमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशोत्सवाची परपंरा आहे. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही गणेशोत्सवावर स्वातंत्र्य चळवळीचे प्रतिबिंब दिसायचे. गणपती आणि गणेशोत्सवातील देखावेसुद्धा स्वांतत्र्य चळवळीशी निगडितच असायचे. त्या काळी नाशिकरोडचा रेल्वे गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा सर्वांत प्रसिद्ध गणपती होता. १९६५ पर्यंत हा गणपती उत्सव सुरू असावा. माजी खासदार बाळासाहेब देशमुख या गणेश मंडळाचे अध्यक्ष होते.

गणेशोत्सवाचे स्वरूप अत्यंत साधे असायचे, पण या काळात आयोजित केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम जनतेसाठी पर्वणी असायची. या मंडळाच्या दहा दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये बहुधा गायनाचे व कधी कधी नाटकाचे कार्यक्रम होत. त्या काळात भावगीतगायन हा लोकप्रिय प्रकार होता. त्या वेळच्या नामांकित भावगीत गायक गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, मालती पांडे, कालिंदी केसकर, माणिक दादरकर- वर्मा यांसारख्या नामवंत मंडळींचे कार्यक्रम या मंडळांकडून आयोजित केले जात. रेल्वे स्टेशनबाहेर साधा, पण मोठा मंडप उभारला जायचा. लोकवर्गणीतूनच सर्व कार्यक्रम पार पडत असत. देखावेही अत्यंत साधे अन् धार्मिक, सांस्कृतिक वा पौराणिक असत. आंदोलनाच्या काळात इतरत्र बऱ्याच ठिकाणी गणपती हा खादी कपडे घातलेला अन् गांधी टोपी परिधान केलेला असायचा. आम्ही सिन्नरहून दररोज रेल्वे गणेश मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी येत असू. पहाटे चार वाजेपर्यंत गायनाचे कार्यक्रम या ठिकाणी चालायचे. रेल्वेने त्या वेळी उतरणारे प्रवासीदेखील या मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेत असत. ‘गळ्याची शपथ तुला जीवलगा’ हे लोकप्रिय गावे ते माणिक बाईंनीच असे रसिक श्रोते म्हणत. आम्ही फार दर्दी नव्हतो. मात्र, हौस म्हणून दररोज या कार्यक्रमांना हजेरी लावत असू. बरेच सिन्नरकर खासगी वाहनांनी गणपती बघायला यायचे. नाशिकचे गणपती फारसे पाहिले नाहीत; पण मार्गात दिसणारे काही गणपती आम्ही जरूर बघायचो. कधी कधी आम्ही गणपती बघायला पुण्यालाही जात असू. त्या काळी गणपतीच्या मिरवणुकीला फारसे वाद्ये नसत. कुठेही बीभत्सपणा नसायचा.

गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होत असे. संपूर्ण कुटुंबे गणेशोत्सवात सहभागी व्हायची अन् कार्यक्रमांना उपस्थित राहायची. सांस्कृतिक कार्यक्रम भारतीय बैठकीवरच संपन्न होत. मात्र, आता गणेशोत्सवाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. गणेशोत्सव हा आचकट-विचकटपणाचासुद्धा कुठे कुठे झालेला. होणारे कार्यक्रम हे क्वचितच दर्जेदार असतात. गणेशोत्सवाच्या नावाखाली तथाकथित कार्यकर्त्यांच्या जेवणावळी, पत्त्यांचे डाव आणि दारूच्या पार्ट्यासुद्धा अनेक गणेश मांडवांत होत असतात, असेही ऐकतो. नागरिकांना त्रास देणारे असे गणेशोत्सवाचे स्वरूप हल्ली झाले आहे. डीजेचा ठणटणाट अन् सिनेमाच्या बीभत्स गाण्यांवर थिरकणारी तरुणाई बघून गणेशोत्सव आता नकोसा वाटतो. पूर्वी असा हिडीसपणा नसे. वर्गणी जबरदस्तीने न घेता लोक स्वतःहून देत असत. मात्र, आता गणेशोत्सवासाठी जबरदस्तीने पैसे गोळा केले जातात. त्यातूनच गणपतीसमोर धांगडधिंगा गाणी लावून तरुण दारू पिऊन स्वैर नाचत असतात. देखाव्यांना राजकीय स्वरूप आले आहे. त्यामुळे कुटुंबाने एकत्रपणे गणपती बघायला जावे असे आताच्या गणेशोत्सवाचे स्वरूप राहिलेले नाही. पूर्वी गणेशोत्सव हा समाजप्रबोधन आणि जनजागृती व एकोप्याचे माध्यम होते. दुर्दैवाने आताचा गणेशोत्सव हा धिंगाण्याच्या करमणुकीचे माध्यम बनले आहे. हे माझ्या पिढीतील मंडळींना नक्कीच नकोसे वाटते.

संकलन ः विनोद पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंसाठी लवकरच स्पोर्ट एक्सलन्स सेंटर

0
0

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात खेळाडूंसाठी चांगले वातावरण असून, त्यासाठी सरकारनेदेखील पावले उचलली आहेत. शहरात असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचा वापर करून खेळाडूंसाठी लवकरच स्पोर्ट एक्सलन्स सेंटर सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. नाशिक डिस्ट्रीक्ट अॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने वर्षभर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. हा सत्कार समारंभ रविवारी (दि. ३) हॉटेल एसएसके येथे आयोजित करण्यात आला होता.

नाशिकमधील खेळाडूंचा सराव मी पाहत असून, त्यांनी अत्यंत मेहनतीने हे यश संपादित केले आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ज्या प्रमाणात त्यांचा गौरव व्हायला हवा त्या प्रमाणात तो होत नाही, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. नाशिकमधील खेळाडूंना नागरिकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे असून, नाशिकमधील अनेक मोठ्या कंपन्यांनी या खेळाडूंच्या यशासाठी पुढे येणे गरजेचे आहे. शहरातील भौगोलिक वातावरण उत्तम आहे, त्याचा फायदा खेळाडूंना होत असतो. मात्र सरकारी पातळीवर फारसा प्रयत्न होताना दिसत नाही. याकरिता महाराष्ट्र सरकारने स्पोर्ट एक्सलन्स सेंटर सुरू करावे यासाठी मी वैयक्तिकरीत्या मदत करेन, असे जिल्हाधिकारी म्हणाले. त्याचप्रमाणे खेळाडूंना जी काही मदत लागेल ती मी अध्यक्ष या नात्याने करण्यास तत्पर आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात संजीवनी जाधव, रणजीत पटेल, दुर्गा देवरे, पुनम सोनवणे, ताई बामणे, किसन तडवी, कांतीलाल कुंभार, मोनिका अथरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

'खेळाडूंना सर्वतोपरी मदत देणार'

यावेळी आमदार सीमा हिरे यांनी या यशस्वी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करून नाशिकच्या वैभवात भर घालण्याचे काम या खेळाडूंनी केले आहे, असे सांगितले. कविता राऊतच्या प्रेरणेने जास्तीत जास्त खेळाडूंनी पुढे यावे त्याकरिता महाराष्ट्र सरकारतर्फे जी काही मदत लागेल ती मी देण्यास तयार असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या. तर आमदार राहुल आहेर यांनी, या सर्व खेळाडूंनी अपार कष्ट करून नाशिकचे नाव देशात पोहचविण्याचे काम केल्याचे सांगत हे सरकार खेळाडूंच्या पाठीशी कायम असेल असे ते म्हणाले. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकारने २०२० हे ऑलिम्पिकसाठी ध्येय ठेवले असून, त्यासाठी आतापासून आराखडा तयार केला आहे. हे खेळाडू म्हणजे नाशिक शहराला मिळालेली देणगी आहे. या सर्व खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी आतापासून शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

सरकारने खेळाडूंकडे लक्ष द्यावे

सत्काराला उत्तर देताना धावपटू मोनिका अथरे म्हणाली की, इतर देशांच्या तुलनेत भारतातील खेळाडूंना सापत्न वागणूक मिळते त्याकरता पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा येत्या २०२० ऑलिम्पिक मध्ये नाशिकमध्ये एकतरी पदक निश्चित येईल अशा ग्वाही देते. खेळाडूंचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग म्हणाले की, हरियाणामध्ये खेळाडू तयार करण्यासाठी लहानपणापासून तयारी केली जाते. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहाते. मात्र महाराष्ट्रात तशी परिस्थितीत नाही. शहरातील खेळाडूंनी इतकी चांगली कामगिरी केली आहे. सरकारने जर देशातील खेळाडूंकडे लक्ष दिले तर अनेक पदके खेळाडू आणतील यात शंका नाही, असे ते म्हणाले. यावेळी अॅथेलेटिक्स क्षेत्रातील खेळाडू, संघटक क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणासाठी सरसावल्या सामाजिक संघटना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदेचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा पुढाकार गरजेचा आहे. गणेश विसर्जन सोहळ्यात मूर्ती व निर्माल्य दानासाठी सामाजिक संघटनांचा आधार घेऊन पर्यावरण जपावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री गणेश विसर्जन सोहळा अधिकाधिक पर्यावरणपूरक पध्दतीने व्हावा, यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि शहरातील पर्यावरणपूरक संघटनांच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. यानुसार या उपक्रमात सहभागी सर्व संघटनांशी संपर्क साधून त्यांना श्री गणेश विसर्जन सोहळ्यात सहकार्य करावे, असे आवाहन ‘मटा’ च्या वतीने करण्यात आले आहे.

येथे करा मूर्ती अन् निर्माल्य दान

मूर्ती व निर्माल्य संकलन करणारी केंद्र आणि त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे : सुभाष बिडवई : (लक्ष्मीछाया मित्र मंडळ : पाथरवट लेन परिसर : पंचवटी, ९२२६०९६५७५, अविनाश वानलोडकर ९५४५९४४४९७), रोहन देशपांडे (राजसारथी फाऊंडेशन, जेलरोड ८००७७६५७७७), महेश महंकाळे (सरदार चौक मित्रमंडळ ट्रस्ट : ९८२२३२१३१३), अभिलाष नाळेगांवकर (रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ : ८६०००९९४६६), गणेश बर्वे (श्री. राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ, बी. डी. भालेकर मैदान : ९८२२४९११०४), शंकरराव बर्वे : (श्री संत गाडगे महाराज सहकारी पतसंस्था, भद्रकाली फ्रूट कॉर्नर ९८५०८४१२३३), शुभम घुले (गुरूदत्त शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट, पंचवटी कारंजा ८६२६००५६५३), राहुल सोनवणे (अथर्व गणेश मंदिर, मोटवाणी रोड, ना. रोड ८००७७७४९६५) येथे संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images