Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता शहर पोलिसांनी २९, ३१ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर या तीन दिवशी पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल केला आहे. पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी सार्वजन‌िक व घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन होत असल्याने या दिवशी मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.

पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ या मार्गावर मिरवणुका तसेच भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी वरील तीन दिवस वाहतूक मार्गात बदल केला आहे.

निमाणी बस स्थानकावरून पंचवटी कांरजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा मार्गावरून जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बसेस व जड वाहनांना हे तीन दिवस दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बसेस व इतर प्रकारच्या जड वाहनांना अशोक स्तंभ ते रविवार कारंजामार्गे पंचवटी कारंजापर्यंताचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

हा असेल पर्यायी मार्ग

निमाणी बसस्थानक मार्गावरील वाहन चालकांना पंचवटी कारंजा, काट्या मारूती चौक, संतोष टी पॉइंट, कन्नमवार पूल, द्वारका सर्कल या मार्गाचा वापर करावा लागेल. सीबीएसकडून अशोक स्तंभाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना अशोक स्तंभ, रामवाडी ब्रिज, मखमलाबाद नाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरी नाका या मार्गावरून निमाणी बस स्टॅण्डकडे जाता येईल. वरील निर्बंध ३१ ऑगस्ट व ३ सप्टेंबर या दिवशी लागू असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खोळंब्याने वाहन‘कोंडी’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणासह नूतनीकरणाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान वाहतुकीचे योग्य नियोजन केले जात नसल्याने प्रवाशांना दररोजच वाहतुकीच्या खोळंब्याचा सामना करावा लागत आहे. बऱ्याचदा अनेक तास वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने प्रवासी वाहनांतच अडकून पडत असल्याने अशा सक्तीच्या वाहन‘कोंडी’बाबत प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या महामार्गाचे काम करणाऱ्या चेतक एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सुरळीत वाहतुकीसाठी पुरेशा उपाययोजना करण्याकडे डोळेझाक होत असल्यानेच शिंदे गावाजवळ दररोज वाहतूक ठप्प पडण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी असून, खोळंब्याचा या प्रकाराने प्रवाशांसह स्थानिक नागरिकही अक्षरशः वैतागले आहेत. येथील वाहतूक कोंडीसंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गाव व बंगालीबाबा थांब्याजवळ फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. या कामामुळे येथे सिन्नर व नाशिकच्या दिशेने येणारी वाहतूक दररोज ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी रहदारीसाठी तयार करण्यात आलेले रस्ते अतिशय सुमार दर्जाचे असल्याने या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शिवाय रस्ताही एकेरी आहे. परिणामी येथे सायंकाळच्या सुमारास दररोज वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. या प्रकाराने प्रवाशांचा वेळ दररोज वाया जात असल्याने प्रवासीवर्ग प्रचंड वैतागला आहे. तासन् तास वाहतूक ठप्प पडत असल्याने प्रवाशांना महामार्गावरच थांबावे लागत आहे.

खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

बंगालीबाबा थांब्याजवळ महामार्ग पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे येथून वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असते. त्यातच अवजड वाहने आल्यास अशा वाहनांना येथून पुढे जाण्यास जास्त वेळ लागतो. परिणामी इतर लहान वाहनांची गर्दी वाढते. त्यामुळे अनेक वाहनचालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, खड्ड्यांमुळे त्यांचा प्रयत्न फसतो. वास्तविक पाहता येथे रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत याची काळजी महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासनाने घेणे आवश्यक असतानाही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

--

पोलिसांचे वरातीमागून घोडे

शिंदे येथे शहर वाहतूक शाखेचे दोन पोलिस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी नेमलेले आहेत. परंतु, तेदेखील बऱ्याचदा जागेवर नसतात. बंगालीबाबा थांब्याजवळ तर पोलिस कर्मचारी नेमलेलेच नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याशिवाय शहर वाहतूक पोलिस कर्मचारी या ठिकाणी फिरकतच नसल्याचा आरोप केला जात आहे.

--

शिंदे गाव व बंगालीबाबा थांबा येथे दररोज वाहतूक ठप्प होते. येथील उपाययोजनांअभावी प्रवाशांचा वेळ वाया जात असून, दूरवरून आलेल्या वाहनांमधील प्रवाशांनाही रात्रीच्या वेळी येथे वाहनांतच अडकून पडावे लागत आहे.

-रोहित देसले, प्रवासी

--

शिंदे येथील वाहतूक पोलिस बऱ्याचदा गैरहजर असतात. याशिवाय काही वाहनचालकांचा बेशिस्तपणाही वाहतूक ठप्प होण्यास कारणीभूत ठरतो. आम्ही दररोज ठप्प होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतो.

-राहुल तुंगार, स्थानिक रहिवासी

--

बंगालीबाबा थांब्याजवळ रस्ता उखडल्याने रहदारीला अडथळा निर्माण होतो. ठेकेदारास दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस कर्मचारी उशिरापर्यंत थांबून वाहतूक सुरळीत करतात. दोन-चार दिवसांत ही समस्या सुटेल.

-कैलास पाटील, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

--

मटा भूमिका

नाशिक-पुणे रस्त्याचे रुंदीकरण हा विषय आता दंतकथा बनत चालला आहे. गेली कित्येक वर्षे या रस्त्याच्या यातनांना व त्यामुळे हजारो प्रवाशांना होत असलेल्या त्रासाला तर अंतच नाही. आता रुंदीकरण चालू आहे, पण त्याची गती संथ आहे. पर्यायी रस्त्याचा दर्जा सुमार आहे. त्यात पावसामुळे खड्ड्यांची भर पडली आहे. वाहतूक नियमनाची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्नच आहे. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार यांना या समस्येशी जणू काहीच देणेघेणे नाही. त्यामुळे दररोज तासन् तास वाहतूक कोंडीत सापडून जनतेच्या हालअपेष्टांत भरच पडते आहे. लोकप्रतिनिधींनाही या प्रश्नात लक्ष द्यायला वेळ नाही हे नाशिककरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा’त समित्यांची स्थापना

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या कार्यकारिणीची पहिली बैठक निमा हाउसमध्ये झाली. यावेळी विविध समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय होऊन या समित्यांसाठी सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली.

निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध समित्यांची स्थापना करून पदाधिकारीही जाहीर करण्यात आले, ते असे ः जनसंपर्क व प्रसिद्धी समिती- मंगेश पाटणकर, अॅग्रो बिझनेस समिती- मनीषा धात्रक, निमा बुलेटिन- प्रवीण आहेर, घटना व कायदेशीर बाबींविषयक समिती- मनीष कोठारी, इतर औद्योगिक संस्थांशी समन्वय समिती- संदीप सोनार, मनुष्यबळ व औद्योगिक संबंध समिती- मुकुंद भट, ‘मेक इन नाशिक’ समिती- हरिशंकर बॅनर्जी, माहिती अद्ययावतीकरण समिती- अखिल राठी, आंतरराष्ट्रीय उद्योग प्रोत्साहन समिती- अमरजितसिंग छाबरा, निमा हाउस व तक्रार निवारण समिती- गजकुमार गांधी, कौशल्य विकास व गुणवत्ता व्यवस्थापन समिती- मितेश पाटील व नीरज बदलानी, पायाभूत सुविधा समिती- मनीष रावल, ऊर्जा समिती- मनीष रावल, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा समिती- सुधीर आवळगावकर, औद्योगिक विकास समिती- संजय सोनवणे, वित्त, कर व सवलती समिती- बी. ए. गव्हाणे, माहिती व तंत्रज्ञान, तसेच सेमिनार समिती- गौरव धारकर, मेंबरशिप डेव्हलपमेंट समिती- वरुण तलवार, स्वच्छता व पर्यावरण समिती- उदय रकिबे, पायाभूत सुविधा समिती (सिन्नर)- संदीप भदाणे, तक्रार निवाण समिती (सिन्नर)- किरण जैन, ऊर्जा समिती (सिन्नर)- एस. के. नायर, सिन्नर रिक्रिएशन सेंटर समिती- आशिष नहार, सिन्नर निमा हाउस बिल्डिंग समिती- शिवाजी आव्हाड. मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव यांनी ही निवड जाहीर केली.

सभेस उपाध्यक्ष उदय खरोटे, माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सचिव नितीन वागस्कर, ज्ञानेश्वर गोपाळे, खजिनदार हर्षद ब्राह्मणकर, अतिरिक्त उपाध्यक्ष (सिन्नर) आशिष नहार, अतिरिक्त सचिव सुधीर बडगुजर, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

--

यांची झाली निवड

या बैठकीत स्वीकृत सदस्य म्हणून वरुण तलवार, सुरेश माळी, मंगेश काठे, बबनराव चौरे, तर सिन्नर विभागातून शिवाजी आव्हाड (शिवम नर्सरी) यांची निवड करण्यात आली. निमाच्या तज्ज्ञ मंडळावर मुकुंद भट (बॉश लिमिटेड), ज्येष्ठ वित्त व कर सल्लागार बी. ए. गव्हाणे, किरण चव्हाण (ग्रीन स्पेसेस रिअॅल्टर्स), मनोज पिंगळे (चिंतामणी सोल्युशन्स) यांची, तसेच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून देवयानी महाजन (इंदिरा इंडस्ट्रिज), कैलास अहिरे (एन. व्ही. आॅटो स्पेअर्स प्रायव्हेट लिमिटेड), नानासाहेब देवरे (मोना इंजिनीअरिंग वर्क्स), सुनील जाधव (पूनम एंटरप्रायजेस), सुनील बागुल (ऋतिका इंडस्ट्रिज), सुधीर आवळगावकर (सीजी पॉवर अॅण्ड इंडस्ट्रिअल सोल्युशन्स् लिमिटेड), अनिल जाधव (यशराज इथेनॉल प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड) यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षणगृहांचा प्रादेशिक असमतोल करणार दूर

0
0

निरीक्षणगृहांतील समस्यांसह महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अनाथ बालआश्रम आणि स्पेशल होम्सचे काही प्रश्न गंभीर आणि प्रलंबित आहेत. आर्थिक, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या संस्था मजबूत होणे आवश्यक असून, त्यावर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी मत व्यक्त करीत, आगामी काळात परिस्थिती बदलण्याचे सूतोवाच केले. सिंगल यांच्या केलेली बातचीत...

--

-उत्तर महाराष्ट्रात बालनिरीक्षणगृहांची संख्या खूप कमी असून, त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे?

-महाराष्ट्रात बालनिरीक्षणगृहांच्या संख्येत असमतोल दिसून येतो. विशेषतः कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात बालनिरीक्षणगृहांची संख्या फारच कमी आहे. या प्रादेशिक असमतोलाची कारणे, त्याचे परिणाम सध्या तपासले जात असून, भविष्यात हा असमतोल नक्कीच दूर केला जाईल. लोकसंख्येच्या अथवा मुलांच्या संख्येनुसार बालनिरीक्षणगृहांची संख्या असणे अधिक चांगले ठरू शकते. उत्तर महाराष्ट्राचे केंद्र असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एखाद्-दुसरे बालनिरीक्षणगृह असून, त्यांची संख्या वाढविण्यासाठी काय करता येईल, याची चाचपणी सुरू आहे. राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक बालनिरीक्षणगृहे आहेत.

--

-खासगी, तसेच सरकारी संस्थांमधील सुरक्षेसाठी काय उपाययोजना राबविल्या जात आहेत?

-राज्यातील सरकारी बालनिरीक्षणगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे काम सुरूच असते. त्यात अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दिसते. याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असून, कंत्राटी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. विशेषतः निवृत्त लष्करी अधिकारी अथवा पोलिसांनी ट्रेन केलेले सुरक्षारक्षक वापरले गेल्यास त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. हाच नियम सरकारी अनुदान घेणाऱ्या संस्थांसाठीसुद्धा लागू आहे. सरकारच्या बालनिरीक्षणगृहांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासह इतर सुरक्षात्मक बाबींमध्ये वाढ करण्यात येत आहे. सीसीटीव्ही बसविताना ते कोठे, कसे व किती बसवावेत यालाही मर्यादा असते. त्यासाठी सरकारच्या धोरणात्मक बाबींचा नक्कीच विचार केला जातो.

--

-मानधनच खूप कमी असल्याने संस्थांमधील जागा भरल्या जात नाहीत का?

-मानधन किती द्यायचे याबाबतचे दिशानिर्देश सरकारने दिले आहेत. त्यात काही अडचणी असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार वेळोवेळी बैठकी होत असून, सकारात्मक मार्ग निघू शकतो.

--

-उत्तर महाराष्ट्रात विशेष मुलांसाठी संस्थाच नसल्याने अनेक अडचणी येतात...

-विशेष मुलांसाठी मुंबईसह पुणे येथे सरकारी संस्था आहेत. नाशिकमध्ये अशी संस्था नाही, हे खरे आहे. यामुळे काही अडचणी निर्माण होतात. भविष्यात उत्तर महाराष्ट्रासाठी एखादे स्पेशल होम असावे यासाठी प्रयत्न केले जातील.

--

-या मुलांसाठी केअर टेकरदेखील उपलब्ध होत नाहीत...

-स्पेशल होम्स असतील, तरच तसे केअर टेकर ठेवता येऊ शकतात. आजमितीस स्पेशल होम्सच नसल्याने ही अडचण येते. इतर संस्थांमध्ये किती विशेष मुले आहेत, हे तपासून त्यानुसार केअर टेकर देता येतील का, याचा विचार होऊ शकतो.

--

-महिला सुरक्षितता व जन्मदराबाबत काय सांगाल?

-महिला सुरक्षिततेसाठी राज्य सरकार अनेक योजना राबवीत आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही महत्त्वाकांक्षी योजना वैशिष्ट्यपूर्ण आहे. बारावी पास झालेली एक मुलगी पोलिस खात्यात भरती झाल्यास रात्री-अपरात्री, एकटी बंदोबस्तासाठी हजर राहते. तिला याची जाणीव असते, की आपल्यामागे कायदा आहे. प्रशिक्षणादरम्यान याची जाणीव तिला होते. तेच सर्वसाधारण मुलगी एकटी काही करण्यास तयार होणार नाही. एकाच वयातील मुलींमधील ही मानसिकता वेगवेगळी असते. त्यामुळे शासन प्रत्येक महिलेच्या मागे आहे, ही जाणीव सर्वच मुलींमध्ये, तसेच मुलांमध्येही करवून दिली जात आहे.

--

-ढासळणारा जन्मदर काय सांगतो?

-गर्भलिंग निदान रोखण्यासाठी सरकारने अनेक कायदे बनविले आहेत. माझी कन्या भाग्यश्री ही योजना सध्या सरकारने सुरू केली आहे. मुलगा आणि मुलगी असा फरक ज्यामुळे केला जातो, ती धारणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. शाळ असो की कॉलेज, सरकारी संस्था या माध्यमातून ही चळवळ आणखी व्यापक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनमाड-इंदूर’ला ग्रहण

0
0

चौथ्या सर्वेक्षण अहवालातील त्रुटींबाबत आमदार अनिल गोटेंचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मनमाड-धुळे-इंदूर या रेल्वेमार्गाच्या चौथ्या सर्वेक्षण अहवालात सदर रेल्वे मार्गार्चा रेट ऑफ रिटर्न अर्थात गुंतविलेल्या पैशांचा परतावा फक्त अडीच टक्के दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग निर्माण होणार नाही याचीच ही व्यवस्था करण्यासारखे आहे, असा आरोप आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी (दि. २८) पत्रकार परिषदेत केला.

या रेल्वेमार्गासाठी मध्य प्रदेश सरकारने विरोध दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. मध्यप्रदेशात खंडवा ते इंदूर रेल्वेमार्ग सुरू झाल्याने मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाची आवश्यकता नाही, असे मध्यप्रदेश सरकारचे म्हणणे असल्याचेही गोटे यांनी यावेळी सांगितले.

रेल्वे मंत्रालयाच्या अहवालानंतर तीव्र नाराजी व्यक्त करीत आपण या रेल्वेच्या आर. ओंना यापूर्वीच विरोध दर्शविला असून, केंद्रीय परिवहन दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेदेखील यातील त्रूटी सविस्तरपणे मांडल्या असल्याचेही गोटे म्हणाले. नुकताच दिल्ली दौरा करून आमदार गोटे यांनी पत्रकार परिषद घेतली.

रेल्वे मंत्रालयाने तयार केलेल्या नव्या डीपीआरमधील खर्चिक आणि अनावश्यक गोष्टी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लक्षात आणून दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे विभागाने तयार केलेल्या या अहवालात जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या ७० हजार कंटेनरच्या वाहतुकीचे उत्पन्न धरले गेलेले नाही. नवीन सर्वेक्षणात माल वाहतुकीतून मिळणाऱ्या परताव्याचाही अंतर्भाव करण्यात आलेला नाही. सोबतच रेल्वेमार्गाची उंची चक्क २४ फुट धरली गेली असून, नव्याने रेल्वे मार्गाचे अतिरिक्त किलोमीटर हिशोबात धरण्यात आलेले नाही, असेही आमदार गोटेंनी सांगितले.

लोकप्रतिनिधींचे सोयीनुसार वक्तव्य

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गावरील विकासाचे अधिकार मंत्रालयाने रेल्वे कार्पोरेशनला देण्यासंबंधी कबूल करून आजापर्यंत ते दिलेले नाहीत. सर्व जमेच्या बाजू हिशोबात धरल्या असल्या तरी आरओआर बावीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत यायला पाहिजे होता. पण तो फक्त अडीच टक्के इतका खाली आला आहे. तो इतका कमी धरणे म्हणजे मनमाड-इंदूर पर्यतचे सर्व आदिवासी, दलित व करोडो शेतकऱ्यांना न्याय नाकारण्यासारखे आहे.

तसेच हा रेल्वेमार्ग होवूच नये, अशी कायमची तरतूद करून ठेवणे असे प्रकार चालले आहेत, असा आरोप आमदार गोटेंनी पत्रकार परिषदेत केला. तर मनमाड रेल्वेमार्गाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपल्या सोयीनुसार वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरपरीक्षा निकाल २२.९६ टक्के

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १८ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल २२.९६ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ७ हजार ३३८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी १ हजार ६८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा दोन टक्क्याने हा निकाल वाढला आहे. तर, राज्याचा निकाल २४.४४ टक्के लागला आहे.

यंदा नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने नाशिकसह धुळे, नंदूरबार, जळगाव या चार जिल्ह्यांमध्ये ३७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. विभागात नंदूरबार जिल्ह्याचा सर्वाधिक ५४.६७ टक्के निकाल लागला. या जिल्ह्यातून १२२० पैकी ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धुळे जिल्ह्याचा निकाल ३४.५२ टक्के लागला. या जिल्ह्यातून १००८ पैकी ३४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जळगाव जिल्ह्याचा निकाल ३३.४५ टक्के लागला. या जिल्ह्यातून २९५७ पैकी ९८९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. नाशिक विभागात १२ हजार ५२३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी ३६८९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. दहावी फेरपरीक्षेचा नाशिक विभागाचा निकाल २९.४६ टक्के लागला. तर राज्यामध्ये १ लाख २४ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ३० हजार ४८८ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

फोटोकॉपीसाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदत

उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजपासून (३० ऑगस्ट) १८ सप्टेंबर पर्यंत मंडळाकडे अर्ज करायचे आहेत. अर्जासोबत ऑनलाइन निकालाची गुणपत्रिकेची प्रत जोडावी. बोर्डाच्या वेबसाइटवर अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.


११ वी प्रक्र‌ियेत व्हावे सहभागी

या परीक्षेव्दारे उत्तीर्ण होऊन ११ वी साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनर मंडळाच्या ऑनलाइन मार्कशीटची झेरॉक्स प्रत सेल्फ अटेस्टेड करून ऑनलाइन प्रक्र‌ियेत सहभागी व्हावे. अशा विद्यार्थ्यांनी ज्युनिअर कॉलेजशी संपर्क साधावा, असे आवाहन एसएससी बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे ठप्पमुळे प्रवाशांचे हाल

0
0

दुरांतोला अपघात; इगतपुरी, घोटीत प्रवाशांची गर्दी अन् हिरमोड

म. टा. वृत्तसेवा, घोटी

आसनगाव शिवारात दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक विस्कळीत झाले. याचा सर्वाधिक फटका मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना बसला. पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस या घोटीपर्यंतच धावल्या. अखेर सकाळी पंचवटी, गोदावरीच्या प्रवाशांना घोटी इथेच सोडून या रेल्वे मनमाडला परत गेल्या. मुंबईहून नाशिकला जाणारी पॅसेंजर एक्स्प्रेसही रद्द झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

मुंबई येथे गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. तसेच नोकरदार व कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांना इगतपुरीहून पुढे जाता आले नाही. रेल्वेगाड्या रद्द झाल्याने गणेशभक्तांचाही हिरमोड झाला. काही प्रवाशांनी नाशिककडे परत जाणे पसंत केले, तर पंचवटीचे बहुतेक प्रवासी खासगी वाहनांनी मुंबईला गेले. घोटी महामार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. इगतपुरी स्थानकातून गाड्या रद्द झाल्याची माहिती मिळताच प्रवाशी हतबल झाले. तर काही रेल्वेगाड्या इगतपुरीपर्यंत आल्याने या स्थानकावरही प्रवाशांची गर्दी झाली होती.

मंगला एक्स्प्रेसची आठवण

गेल्या चार वर्षांपूर्वी अर्थात १५ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी मंगला एक्सप्रेसला घोटी शहराजवळ अपघात होऊन तीन प्रवासी ठार, तर दहा प्रवासी जखमी झाले होते. त्यावेळीही अशाच पद्धतीने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या व मुंबईहून नाशिकला येणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळीही प्रवाशांची अशीच गैरसोय झाली होती. असाच हा घोटीपासून ५० ते ५५ किमी अंतरावर दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्याची बातमी समजताच घोटीच्या मंगला एक्स्प्रेसच्या अपघाताची आठवण झाली. त्यावेळीही प्रवाशांना वाहनांची प्रतीक्षा करावी लागली होती.

प्रवाशांसाठी बसेसची व्यवस्था

रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने राज्य परिवहन महामंडळने इगतपुरी आगाराच्या माध्यमातून १४ बसेस प्रवाशांच्या मदतीला पाठविण्यात आल्या. त्यात १२ बसेस प्रवाशी घेऊन कल्याणपर्यंत पोहचविण्यात आले, तर दोन बसेस प्रवाशी घेऊन नाशिकला रवाना करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी खून प्रकरणी संशयितांना कोठडी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
सिडकोतील धनराज उर्फ कुणाल राजू परदेशी या अंडारोल विक्रेत्याची हत्या करणा ऱ्या चारही संशयित आरोपींना कोर्टाने मंगळवारी सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. चारही आरोपींना पिंपळगाव बसवंत येथून सोमवारी ताब्यात घेण्यात आले होते.
कुणालचा त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने भोसकून रविवारी (दि. २७) रात्री खून केल्याची घटना उघडकीस आली होती. विशेष म्हणजे चारही संशयित आणि घटनेत मृत्यू झालेला तरुण यांचे खुटवडनगर परिसरात वास्तव्य आहे. मात्र, ते जगतापवाडी कसे आले? याचा पोलिस शोध घेत आहेत. आपापसातील वाद मिटविण्यासाठी ते नेमके कुणाकडे गेले होते याचाही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. परंतु, एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असलेल्या भागात कुणालचा खून झाल्याने शहरात पुन्हा उलटसुलट चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर मनसे टाकणार कात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका निवडणुकीत मनसेचे पानीपत झाल्यानंतर सहा महिने शांत असलेल्या मनसेने पुन्हा कात टाकण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचा गेल्या सहा महिन्यातील कारभार समाधानकारक नसल्याने मनसे आता थेट विधानसभेसाठीच शड्डू ठोकले आहेत. मनसेच्या वतीने सोमवारपासून प्रभाग व गटनिहाय पक्षाची बांधणी सुरू केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सप्टेंबरअखेर नाशिकमध्ये येऊन पक्षाला संजीवनी देणार आहेत.
गेल्या पंचवार्षिकमध्ये महापालिकेत सत्ता असलेल्या मनसेचे महापालिका निवडणुकीत पानीपत झाले होते. तीन आमदार व महापालिकेची सत्ता दिल्यानंतर मनसे नाशिकमध्ये विकास करेल असे अपेक्षित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्योजकांच्या मदतीने काही प्रमाणात नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच मनसेच्या शिलेदारांनी पक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेसह अन्य पक्षांचा हात धरला. त्यामुळे नाशिकमध्ये चांगले काम करूनही महापालिका निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. मनसेचे ४० वरून पाच नगरसेवक निवडून आले. तसेच पक्षाचा ढाचाही कोसळला होता.
मुख्यमंत्र्यानी दत्तक घेतलेल्या नाशिकचा कारभार सहा महिन्यातच ढासळला आहे. भाजपची कामगिरी समाधानकारक नसल्याने मनसेने पुन्हा कात टाकण्याची तयारी सुरू केली आहे. सहा महिन्यांच्या चिंतनानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पूनर्बांधणीला सुरुवात केली आहे. शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, गटनेता सलिम शेख यांनी पक्षाची बांधणी नव्याने सुरू केली आहे. त्यासाठी मनसेने शहराची गटात विभागणी केली असून गटनिहाय पक्षकार्यकर्त्यांची नवी फळी तयार केली जात आहे. गट आणि प्रभाग निहाय पक्षाची पुनर्रचना करून नव्याने कार्यकर्ते व पदाधिकारी जोडले जात आहे. मनसेने विधानसभा निवडणुकीचे लक्ष केंद्रीत केले असून तीन विधानसभा मतदारसंघात जोरदार बैठका घेतल्या जात आहेत. त्याला कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळत असल्याने पदाधिकाऱ्यांचाही जोश वाढल्याचा दावा केला जात आहे.

राज ठाकरेंचा सप्टेंबरमध्ये दौरा
पदाधिकाऱ्यांकडून गट व प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची निवड केल्यानंतर या नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सप्टेंबरमध्ये राज ठाकरे स्वतः येणार आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबतच नव्याने जुडलेल्या कार्यकर्त्यांशी ठाकरे वन टू वन चर्चा करणार आहेत. तसेच विधानसभानिहाय पक्षाचा आढावा घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिव्हिलच्या आवारात बालकाचा मृतदेह

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात एक ते दीड वर्षीय मुलाचा अर्धवट अवस्थेत बुजवलेला मृतदेह आढळून आला. मंगळवारी सांयकाळच्या सुमारास कर्मचारी साफसफाई करण्याकरीता गेले असता हा प्रकार उघडकीस आला. यामुळे सिव्हिलमध्ये खळबळ उडाली असून, सरकारवाडा पोलिस रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करीत होते.
सिव्हिलच्या आवारातील क्षयरोग विभागाच्या पाठीमागील बाजुस असलेल्या वॉल कम्पांउडनजीक हा मृतदेह अधर्वट अवस्थेत पुरण्यात आल्याचे दिसून आले. हा भाग फारसा वर्दळीचा नसून, झाडांनी वेढलेला आहे. या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास सिव्हिलचे कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेले. त्यावेळी हा मृतदेह दिसून आला. साधारणतः एक ते दीड वर्षाचा पुरूष जातीचा मृतदेह असून, एक ते दोन दिवसांपूर्वी तो बुजवण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. प्रथम दशर्नी आजारपणामुळे दगावलेल्या बालकाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली गेली असावी, अशी शक्यता व्यक्त होते. बालके दगवण्याचे प्रकार सिव्हिलमध्ये नवे नाहीत. मात्र, काहीही असले तरी पालक मृतदेह सोबतच घेऊन जातात. असा प्रकार पहिल्यांदाच घडला असून, सिव्हिल प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे. दोन ते तीन दिवसात झालेल्या मृत्यू नोंदीमध्ये याबाबत काही सुगावा लागतो काय याचीही चाचपणी घेतली जाते आहे. दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस अधिक तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीसाठी करा ‘महाडीबीट’वर अर्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना २०१७-१८ वर्षापासून थेट त्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी mahadbt.gov.in या वेबसाइटवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
थेट रक्कम जमा करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी-प्रतिपूर्ती योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना इयत्ता अकरावी व बारावी व सैनिकी शाळेतील विदयार्थ्यांना निर्वाह भत्ता या शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. अर्ज करताना अपलोड करण्यात येणाऱ्या कागदपत्रांचा आकार २५६ केबीपर्यंत असायला हवा. लाभार्थ्यांचे आधारकार्ड गरजेचे आहे. ते बँक खाते व मोबाइल क्रमांकाशी संलग्न असावे. विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढून ते बँक खाते तसेच मोबाइल क्रमांकाशी संलग्न करून घ्यावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनातील संशयित अडीच महिन्यानंतर जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गॉगल विक्रेता ऐतेशाम इरशाद अन्सारी याच्या हत्येप्रकरणी मागील अडीच महिन्यांपासून फरार असलेल्या संशयितास क्राइम ब्रँचच्या पथकाने अखेर जेरबंद केले. या गुन्ह्यातील इतर सात संशयितांना घटनेच्या काही दिवसातच वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात आली होती.
संदीप सुरेश त्रिभुवन (२५, रा. राजवाडा, म्हसरूळ, पंचवटी) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. हत्येच्या प्रकरणी अटक झालेला हा आठवा संशयित ठरला आहे. गॉगल विक्रेता ऐतेशाम इरशाद अन्सारी याची १० जून २०१७ रोजी दुपारच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील वेद मंदिराजवळ हत्या झाली होती. अन्सारी रस्त्यालगत स्टॉल उभारून गॉगल विक्री करीत असताना तिथे आलेल्या संशयितांसमवेत किमतीवरून वाद झाला. त्यानंतर सहा ते सात जणांच्या टोळक्याने अन्सारीवर जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपासानुसार पोलिसांनी जितेंद्र भगवान काळे (रा. घनकर लेन), मुकेश चंद्रकांत साळवे (रा. मल्हारखान झोपडपट्टी), मनीष रेवर (रा. रामवाडी), चेतन यशवंत इंगळे आणि अजिंक्य प्रकाश धुळे यांना अटक केली. चेतन आणि अजिंक्यला आश्रय देणाऱ्या विशाल अशोक निकम (रा. दहावा मैल) आणि योगेश चंद्रकांत धांडे यांनाही पोलिसांनी सहआरोपी केले. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेला त्रिभुवन मात्र फरारच होता. तो शहरात असल्याची माहिती क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे पोलिस हवालदार वसंत पांडव यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी त्यास अटक करण्यात आली. संशयितास मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईसाठी धावली ‘लालपरी’

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
मुसळधार पावसामुळे अवघी मुंबई थांबली असून रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई रेल्वेसेवाही प्रभावित झाली असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सरसावले आहे. महामार्ग बसस्थानकासह मनमाड, लासलगाव, इगतपुरीहूनही कल्याण आणि ठाण्यापर्यंत तब्बल ८९ जादा बसेस सोडण्यात आल्या.

पावसाने मुंबईकरांना मंगळवारी दिवसभर झोडपून काढले. तेथील रस्त्यांच्या अक्षरश: नद्या झाल्या. रेल्वेमार्गावरही गुडघाभर पाणी साचल्याने तेथील उपनगरीय रेल्वे सेवेसह लांब पल्ल्याची रेल्वे प्रवासी वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पावसाने मुंबईच्या दळणवळणाचे तीनतेरा वाजविले असून नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटीसह अनेक गाड्याही त्यामुळे रद्द कराव्या लागल्या. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची त्यामुळे प्रचंड गैरसोय झाली. नियमित धावणाऱ्या रेल्वे रद्द झाल्याने प‍्रवाशांनी बसस्थानकांकडे धाव घेतली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांना मदत करण्यासाठी रस्त्यांवर उतरविण्यात आल्या. नाशिकमार्गे मुंबईकडे दररोज ७३ बसेस जातात. कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, बोरीवली या मार्गांवर या बसेस धावतात. नाशिकरोड, तसेच महामार्ग बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने मुंबईकडे जादा बसेस सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. महामार्ग बसस्थानकावरून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४६ तर नाशिककरोड बसस्थानकावरून सहा जादा बसेस कल्याणपर्यंत सोडण्यात आल्या. काही रेल्वे इगतपुरीत थांबविण्यात आल्याने त्यांमधील प्रवाशांनी इगतपुरी बसस्थानकाकडे धाव घेतली. त्यामुळे या बसस्थानकातूनही १० जादा बसेस कल्याणपर्यंत सोडण्यात आल्या. रेल्वेसेवा ठप्प झाल्याने मनमाड आणि लासलगाव येथेही प्रवासी अडकून पडले. त्यामुळे तेथूनही अनुक्रमे १७ आणि १० जादा बसेस सोडण्याची व्यवस्था एसटी महामंडळाकडून करण्यात आली. या बसेसने नाशिक आणि पुढे कल्याणपर्यंत प्रवासी सोडले.

कल्याण, ठाण्यापर्यंत सेवा
नाशिकहून नियमितपणे मुबंईकडे जाणाऱ्या बसेस ठाण्यापर्यंतच सोडण्यात आल्या. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पा‌णी साचल्याने बसेस पुढे नेणेच शक्य नव्हते. त्यामुळे प्रवाशांना ठाण्यापर्यंत सोडण्यात आले. जादा बसेसने कल्याणपर्यंतच प्रवाशांची वाहतूक झाली. रेल्वेसेवा बुधवारीदेखील (दि. ३०) बंद राहण्याची शक्यता असून एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याची तयारी ठेवली आहे. नाशिकसह जिल्ह्यातील सर्वच आगारांमधून बसेस मागवून त्याद्वारे कल्याणपर्यंत प्रवासी वाहतूक करण्यात आली.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर जादा बसेस सोडत आहोत. कल्याणपर्यंत या बसेस सोडण्यात येत आहेत. त्यासाठी आम्ही जिल्ह्यातील अन्य आगारांमधून बसेस मागविल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत या बसेस सुरू राहतील.
- आर. डी. जगताप, विभागीय वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरोडला चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सोसायटीच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील चोरट्यांनी तोडून नेली. ही घटना नाशिकरोड परिसरातील आनंदनगर भागात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सुलोचना मधुकर सूर्यवंशी (रा.मधुआशा अपार्ट. सातभाईनगर, जेलरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जगतापमळा येथील देवस्मृती सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सूर्यवंशी उभ्या असताना दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने पत्ता विचारण्याचा बहाणा करीत त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची पोत ओरबाडून नेली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भेंडेकर करीत आहेत.

कारच्या धडकेने सायकलस्वार जखमी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भरधाव कारने दिलेल्या धडकेत सायकलस्वार तरूण जखमी झाल्याची घटना सातपूर एमआयडीसीतील श्रमिकनगर येथे घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश साहेबराव जाधव (१९, रा. सातमाऊली चौक, सातपूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सोमवारी (दि. २८) सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास प्रकाश श्रमिकनगर येथील महिद्रा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आपल्या सायकलवर प्रवास करीत असताना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात कारने त्यास धडक दिली. अपघातात प्रकाश जखमी झाला असून, अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

पंचवटीत दुचाकी चोरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गंगाघाटावरील यशवंत महाराज मंदिराजवळ पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
संजय दामू गायकवाड (रा. उद्यनगर कॉलनी, मखमलाबादरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गायकवाड बुधवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी गंगाघाटावर गेले होते. यशवंतराव महाराज मंदिर परिसरात पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर (एमएच १५ बीई ६४७२) चोरट्यांनी पळवून नेली. घटनेचा अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

भद्रकालीत आठ जुगारी गजाआड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वर्दळीच्या मेनरोड परिसरात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या आठ जुगारींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातून आठ हजाराची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये मुंबई जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल विनायक मेहेर (रा. चित्रमंदिर चौक, शिवाजीरोड), प्रकाश सुरेश शहा उर्फ गुजर (रा. त्रिकोणी गार्डन, काठेगल्ली), महेंद्र मोतीराम गडपे (रा. बुधवारपेठ), राम भीमराव आढाव (रा. टाकसाळ लेन), निनाद पांडुरंग कर्पे (रा. तपोवन रोड), राहुल मिलिंद कदम (रा. म्हसरूळ टेक), लक्ष्मण साहेबराव घरपाळ (रा. बोधलेनगर, नाशिकरोड) आणि बाळासाहेब यशवंत सोनवणे (रा. द्वारका) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. सोमवारी (दि. २८) रात्रभर संशयित जुगार खेळत होते. सकाळी उपनिरीक्षक अनमोल केदारे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांनी पंचासमक्ष टाकलेल्या छाप्यात संशयित पैसे लावून पत्यांवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या अंगझडतीत आठ हजार १०० रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक केदारे करीत आहेत.

युवतीचा विनयभंग
इंदिरानगर : इंदिरानगर येथील रंगरेज मळ्यात युवतीच्या घरात प्रवेश करून तिला मारहाण आणि विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रंगरेज मळा, कलानगर येथे फिर्यादी त्यांच्या दोन मुली व एका मुलासह राहतात. दुपारी संशयित आरोपी संकेत चंद्रात्रे व त्याचे मित्रांनी घरात बळजबरीने प्रवेश केला. ‘तू माझ्याशी का बोलत नाहीस?’ असे संकेतने युवतीला विचारले. तिने उत्तर न दिल्याने संतापलेल्या संकेतने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. युवतीच्या आईने विचारणा केली असतात त्यांनाही मारहाण करून चावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’चा मुहूर्त टळणार?

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
समृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाने जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू केली असली तरी अजूनही बहुतांश मालमत्तांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पावसामुळे मूल्यांकनात अडथळे येत असून हे काम रखडले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनाचा १ ऑक्टोबरचा मुहूर्त टळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या घोषणेपासूनच त्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाची धार तीव्र असतानाही सरकारने शेतकऱ्यांची मनधरणी करण्यात बऱ्यापैकी यश मिळव‌िले आहे. संपादित करावयाच्या जमिनींसाठी चांगले दर देऊनही अद्याप काही शेतकरी जमिनच न देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. जमिनीबरोबरच घरे, विहिरी, झाडे, पाइपलाइन, गोठे देखील या महामार्गात जाणार असल्याने त्याचाही मोबदला सरकारकडून दिला जाणार आहे. परंतु, नेमका मोबदला देता यावा यासाठी संपादन प्रक्रियेत जाणाऱ्या या सर्व बाबींचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. या मूल्यांकनाचे काम सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात सुरू करण्यात आले असले तरी ते अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन मूल्यांकन होणे आवश्यक असले तरी पावसामुळे या कामात अनेक अडथळे येत आहेत. इगतपुरीत तर सातत्याने पाऊस सुरू असल्याने मूल्यांकन करणारी यंत्रणा गावांमध्ये पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये अद्याप मूल्यांकनाच्या कामाला सुरुवातच होऊ शकलेली नाही.

समृद्धी महामार्गासाठी अपेक्षित खर्च मोठा असून हे काम मुदतीत सुरू करून मुदतीतच संपविण्याचे आव्हान सरकार आणि प्रशासनापुढे आहे. कामाचा कालावधी वाढला तर त्याचा खर्चही वाढणार आह. त्यामुळे १ ऑक्टोबर २०१७ पासून जिल्ह्यात कामास प्रारंभ करण्याचा सरकार आणि प्रशासनाचा मानस आहे. परंतु, पावसाने मूल्यांकनाचे काम रखडल्याने प्रारंभालाही विलंब होण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. मूल्यांकनाचे काम केव्हापर्यंत पूर्ण करायचे याची निश्च‌ित मुदत नसल्याचे प्रशासनाकडून सांग‌ितले जात आहे. पावसाने उघडीप दिल्याशिवाय मूल्यांकनाच्या कामाला गती मिळणार नाही. सिन्नर तालुक्यातील पाच गावांचा अजूनही या महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे या सर्व अडचणी दूर झाल्यानंतरच जमिनींचे संपादन आणि पुढील कार्यवाही होऊ शकणार आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरचा मुहूर्त टळण्याची शक्यता बळावल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

प्रत्येक सोमवारी आढावा
सिंहस्थ कुंभमेळा काळात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक आठवड्याला ठराविक दिवशी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला जात होता. समृद्धी महामार्गाबाबतही तेच धोरण अवलंबिण्यात आले आहे. प्रत्येक सोमवारी कार्यवाहीचा आढावा घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कामकाजास गती मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधी खड्डे, आता गतिरोधक

0
0

सारडा सर्कलच्या दुर्दशेने अपघाताची भीती; वाहनचालकांचा संताप

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या द्वारका चौकात काही वर्षांपूर्वी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले होते. मात्र त्याची जोरदार पावसामुळे पुरती वाट लागलेली आहे. परिणामी, द्वारका सर्कलकडे जाणारा हा रस्ता जीवघेणा झाला आहे. याचा थेट त्रास या रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. असे असतानाच त्याठिकाणी आता गतिरोधक टाकल्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

वाहनचालकांना नाशिकरोडहून शालीमारला जाताना उपनगर, फेम टॉकीज, काटे गल्लीतील वाहतुकीचे अडथळे पार करत जावे लागते. त्यानंतर द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचे दिव्य पार पाडावे लागते. हे सर्व पार केल्यानंतर सारडा सर्कलला पोहचल्यावर वाहनचालकांसमोर खड्ड्यांचे संकट उभे राहते. त्यासोबतच याठिकाणी नव्याने करण्यात आलेल्या गतिरोधकामुळे आणखीनच जास्त त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

कारण एकीकडे खड्ड्यांची दुरुस्ती तर केलीच जात नाही, त्यावर आता गतिरोधक केल्याने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. परिणामी, अपघाताची भीती नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने ही समस्या मार्गी लावण्याची मागणीही वाहन चालकांनी केली आहे.

दर्जाहीन पेव्हर ब्लॉक

सारडा सर्कलसह शालीमार, जेल रोडचा सैलानी चौक आदी ठिकाणी काही वर्षांपूर्वी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले. टक्केवारीच्या नादात अत्यंत खराब दर्जाचे पेव्हर ब्लॉक टाकल्याबद्दल तत्कालीन महापालिका आयुक्तांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता या सर्व ठिकाणी हेच पेव्हर ब्लॉक अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. सारडा सर्कलवरील पेव्हर ब्लॉक मुळे रस्ता वर-खाली झाला आहे. त्यामुळे वाहन घसरून चालकाला गंभीर दुखापत होण्याची भीती आहे.

शालीमारहून नाशिकरोडला जाताना वाहनचालकांना आपले वाहन कसरत करूनच चालवावे लागते. तसेच यापुढील सारडा सर्कलवर या खड्ड्यांच्या त्रासाने वाहनचालक वाहने जीव मुठीत धरून चालवत आहेत. या परिसरात उर्दू शाळा असून, विद्यार्थ्यांनाही यामुळे धोका उद्भवू शकतो. हे खड्डे चुकविण्याचा प्रयत्नात वाहनचालकांचा अपघातही होऊ शकतो.

शहरातील प्रवेशाचा सारडा सर्कल महत्त्वाचा मार्ग आहे. या चौकातून शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर पायी प्रवास करतात. खराब दर्जाचे पेव्हर ब्लॉक आणि प्रचंड खड्ड्यांमुळे येथे अपघात होऊ शकतो. तरी पेव्हर ब्लॉक काढून हा पक्का रस्ता करावा जेणेकरून वाहनचालकांना त्रास होणार नाही.

अजीज पठाण, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात जागोजागी नो एंट्री

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सवादरम्यान आरास पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीदरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील प्रमुख वाहतूक मार्गात ५ सप्टेंबरपर्यंत बदल करण्यात आले आहेत. दररोज सायंकाळी ७ पासून मध्यरात्रीपर्यंत नियोजित मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे शहर बस वहातूकीचे काही मार्ग सायंकाळी ७ ते १२ पर्यंत बदलण्यात आले आहे.

गणेशोत्सवादरम्यान देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांमुळे शहरातील पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, शालिमार, कालिदास कलामंदिर, सीबीएस, मेहेर, अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, मेहेर ते मेनरोड, भदकाली परिसराला यात्रोत्सवाचे स्वरुप आलेले असते. गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवसांत तर अनेक भागांत चालायलाही जागा नसते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प असते. या पार्श्वभूमीवर पोल‌िस उपायुक्तांनी वाहतूक मार्गातील बदलांबाबत अधिसूचना काढली आहे.

दोन्ही बाजूंनी बंद

किटकॅट चौफुली ते महाकवी कालिदास कलामंदिरमार्गे सुमंगल कपड्याच्या दुकानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने बंद राहील. सीबीएसकडून गायकवाड क्लास, कान्हेरेवाडी मार्गे - किटकॅट व सुमंगलकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूने वाहनांसाठी बंद राहील. पंचवटीतील सरदार चौक ते श्री काळाराम मंदिर दरम्यानचा रस्ता दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. याच भागातील मालविय चौक-गजानन चौक-नागचौक-शिवाजी चौक ते पुन्हा मालविय चौक हा मार्ग दोन्ही बाजूने बंद ठेवला जाणार आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक दिवशी सायंकाळी ६ ते १२ पर्यंत हे नियोजन राहणार आहे.

एसटीच्या मार्गात बदल

खासगी वाहतुकीसोबतच एसटी बसेसच्या मार्गातही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार निमाणी बसस्थानकातून शालिमारमार्गे जाणाऱ्या बसेस तसेच या मार्गावरील इतर वाहतूक रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नलपर्यंत येतील. त्यानंतर सांगली बँक सिग्नल ते सारडा सर्कलपर्यंतचा मार्ग बंद राहील. ही वाहतूक निमाणी बसस्थानक येथून रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल येथून मेहेर सिग्नल - सीबीएस - मोडक सिग्नल - गडकरी चौक - सारडा सर्कलमार्गे पुढे जाईल. नाशिकरोडकडून निमाणीच्या दिशेने जाणाऱ्या बसेससह इतर वाहने सारडा सर्कलमार्गे मोडक सिग्नल - सीबीएस - मेहेर सिग्नल - अशोकस्तंभ - रविवार कारंजामार्गे पुढे जातील. अशोक स्तंभ ते रविवार कारंजादरम्यानचा रस्ता दोन्ही बाजूने ‘नो पार्किंग’ घोषित करण्यात आला आहे. पोलिसांची वाहने तसेच अॅम्ब्युलन्स व अग्निशमन दलाच्या वाहनांना वरील निर्बंधामधून वगळले आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक दिवशी सायंकाळी ६ ते १२ पर्यंत हे नियोजन असेल.

प्रवेश बंद मार्ग ( ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर सायं. ७ ते रात्री १२)

- खडकाळी सिग्नल येथून शाल‌िमार मार्गे- सीबीएसकडे ये-जा करणारी वाहने

- खडकाळी सिग्नल येथून दिपसन्स कॉर्नर - नेहरुगार्डकडून गा. मा. पुतळामार्गे - मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारी वाहने

- त्र्यंबक पोलिस चौकी ते बादशाही कॉर्नरपर्यंत ये -जा करणारी वाहने

- गाडगेमहाराज पुतळा - धुमाळ पॉइंट - ते मंगेश मिठाई कॉर्नर

- सीबीएस सिग्नलपासून सांगली बँक सिग्नल - धुमाळ पॉइंट -दहीपुलाकडे ये-जा करणारी वाहने

- प्रतिक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारी वाहने

- अशोक स्तांभाकडून रविवारकारंजा - मालेगाव स्टॅण्डकडे ये-जा करणारी वाहने

- रविवार कारंजाकडून सांगली बँक सिग्नल - येणारी वाहने


पर्यायी मार्ग

खडकाळी सिग्नल - किटकॅट कॉर्नर - मोडक सिग्नल - सीबीएस सिग्नल - मेहरसिग्नल - अशोकस्तंभ - रामवाडीमार्ग - मालेगाव स्टँड येथून इतरत्र जातील किंवा खडकाळी सिग्नल - किटकॅट कॉर्नर - मोडक सिग्नल - अशोकस्तंभ - रामवाडी - मखमलाबादनाका - पेठनाका- दिंडोरीनाका येथून इतरत्र जातील


दुसरा पर्यायी मार्ग

खडकाळी सिग्नलपर्यंत येणारी वाहने सारडा सर्कल येथून गडकरी सिग्नल - मोडक सिग्नल - सीबीएस सिग्नल - मेहरसिग्नल - अशोकस्तंभ - रामवाडी मार्ग- मालेगाव स्टॅण्ड येथून इतरत्र जातील किंवा खडकाळी सिग्नल - किटकॅटकॉर्नर - मोडक सिग्नल - सीबीएस सिग्नल - मेहरसिग्नल - अशोकस्तंत्र - रामवाडी- मखमलाबाद नाका - पेठनाका - दिंडोरीनाका येथून इतरत्र ये - जा करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल शॉपी फोडणाऱ्यास अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील माळेगाव (ता. सिन्नर) औद्योगिक वसाहतीतील मोबाइल दुकान फोडून लाखोंचा मुद्देमाल लांबविणाऱ्या चोरट्यांपैकी एकास पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून इंडिका कारसह मोबाइल आणि होमथ‌िएटर असा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

सोपान रमेश कोकाटे (वय २३, रा. माळेगाव एमआयडीसी) असे अटक केलेल्या संशय‌िताचे नाव आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीतील साई स्टार मोबाइल या दुकानाचे पत्रे उचकटून चोरट्याने दुकानातील इंटेक्‍स, आयटेन कंपनीचे मोबाइल, बॅटऱ्या, होमथिएटर, लॅपटॉप असा सुमारे एक लाख १० हजारांचा मुद्देमाल २५ ऑगस्ट रोजी चोरी केला होता. पोलिसांनी संशयावरून कोकाटे याला ताब्यात घेतले. विनायक बाळू उर्फ प्रल्हाद काळे (रा. शिक्रापूर, जि. पुणे) व संदीप मुरलीधर हांडे (रा. माळेगाव, सिन्नर) या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती त्याने तपासात दिली आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार (एमएच १५ बीएन ७४११), मोबाइल आणि होमथिएटर असा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, हवालदार रवी वानखेडे, प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, प्रीतम लोखंडे, संदीप हंडगे, लहू भावनाथ, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला मुंबईला सुखरूप रवाना

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मुंबईला रोज ३५ ते ४० ट्रक भाजीपाला पाठविला जातो. येथील सर्व भाजीपाला वाशी मार्केटमध्ये पाठवला जात असल्याने अडचण आली नाही. मंगळवारी (दि. २९) रोजी मुंबईला अतिवृष्टी सुरू असतानाही दुपारच्या आणि सायंकाळच्या लिलावाच्या गाड्या वाशी मार्केटला सुखरूप पोहचल्या. बुधवारीही भाजीपाल्याच्या बाजारावर मुंबईच्या पावसाचा काही परिणाम झाला नाही. उलट बुधवारी आवक वाढलेली असतानाही भाजीपाल्याचे दर वाढले.

मुंबईला अतिवृष्टी झाल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले. नाशिक जिल्हा परिसरातही पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असल्याने भाजीपाल्याची काढणी अवघड होत असतानाही मोठ्या कष्टाने भाजीपाला बाजारापर्यंत पोहचविण्याचे काम शेतकरी करीत आहेत. आवक वाढल्याने तसेच मुंबईच्या पावसाची परिस्थिती बघता मंगळवारी (दि. २९) भाजीपाल्याचे दर काहीसे उतरले होते. त्यामुळे बुधवारी परिस्थिती कशी राहील या विषयी उत्सुकता होती. दुपारच्या ल‌िलावासाठी भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली होती. दुपारी होणाऱ्या या फळभाज्याच्या लिलावात कालच्या तुलनेत आज दरवाढ झाल्याचे दिसले. मुंबईप्रमाणेच गुजरातलाही भाजीपाला पाठविण्यात येत असल्यामुळे दुपारचे लिलाव सुरळीत पार पडले.

मार्केटमधील भाव

भाजीपाला ------- मंगळवारचे...........बुधवार(प्रति किलो)

टोमॅटो ...............१० ते २८....................१२ ते ३०

वांगी ..................१५ ते ४०....................१५ ते ५०

फ्लावर ................ ६ ते ९ ................... ६ ते १०

ढोबळी मिरची..........१८ ते ३७...................२५ ते ४२

पिकॅडोर................१५ ते २५....................१८ ते २७

दुधी भोपळा..........१० ते २०.....................१६ ते ३३

कारले .................८ ते १६.......................११ ते १५

दोडका..................१२ ते २५.....................१६ ते ३०

गिलके...................८ ते २५......................२१ ते २९

भेंडी.......................२१ ते ३३....................२५ ते ३५

काकडी...................६ ते १३........................५ ते १५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरासरीपेक्षा अधिक सरी!

0
0

जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा १३ टक्के जास्त पाऊस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककर हो, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एरव्ही सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यात वार्षिक सरासरी गाठणाऱ्या पावसाने यंदा ऑगस्ट अखेरीसच सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि कळवणसारखे काही तालुकेही लवकरच सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात उन्हाळ्यात तप्त झळा तर हिवाळ्यात थंडी अधिक असते. पावसाळ्यात पावसाचा जोरही अधिक असतो. त्याचाच प्रत्यय सध्या जिल्हावासी घेत आहेत. जिल्ह्यात दरवर्षी १ जून ते ३० सप्टेंबर १५ हजार २००.९० मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र ३० ऑगस्टलाच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात यंदा १ जून ते ३० ऑगस्ट २०१७ या कालावधीत १५ हजार २८१.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे सरासरीहूनही अधिक पाऊस झाला आहे. प्रत्येक तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०१३.३९ मिलीमीटर आहे. ही सरासरी १०१८.७९ मिलीमीटर एवढी नोंदविली गेली आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १३ हजार २३२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच सरासरीच्या ८७ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र १००.५३ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील १५ पैकी सहा तालुक्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. नाशिक तालुक्यात दरवर्षी सरासरी ६१४.२० मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा ९८०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात १५९.६९ टक्के पाऊस पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मालेगावी निम्माच पाऊस

यंदा मालेगाव तालुक्यात सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरी ४४०.८० मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु, यंदा आतापर्यंत २५१.८ मिमी म्हणजेच ५७.१२ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल देवळ्यात ३३१.७ मिमी म्हणजेच ५८.११ टक्के पाऊस झाला आहे. चांदवडमध्ये ७३.९९ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरीत सर्व तालुक्यांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images