Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आता लक्ष जिल्हा बँकेकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
सहकार मंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नाशिक सहकारी साखर कारखान्याचा (नासाका) बॉयलर पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहकारमंत्र्यांच्या आदेशांमुळे आता ‘नासाका’च्या लिलावासाठी सरसावलेल्या जिल्हा बँकेच्या भूमिकेकडे ‘नासाका’ क्षेत्रातील ऊस उत्पादक व सभासदांचे लक्ष लागले आहे.

गत चार गळीत हंगामांपासून आर्थिक अडचणींमुळे बंद असलेला ‘नासाका’ यंदाच्या हंगामात सुरू करण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी साखर आयुक्तांना नुकतेच दिले. पुढील आठवड्यात याबाबतची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ‘नासाका’ सुरू करण्यासाठी आमदार बाळासाहेब सानप यांनी वर्षभरापासून प्रयत्न सुरू केले.
जिल्हा बँकेचे ८४.२३ कोटी रुपये थकीत झाल्याने शंभर टक्के ‘एनपीए’मध्ये असलेल्या ‘नासाका’स अर्थपुरवठा करण्यास असमर्थता दाखविली. कारखान्याच्या प्रशासकीय संचालक मंडळाने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. संचालक मंडळाने केलेल्या पाठपुराव्यास मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला सकारात्मक दृष्टीकोन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखावणार ठरणार आहे.
सहकार मंत्र्यांच्या आदेशान्वये साखर आयुक्तांनी मागील आठवड्यात कारखाना संचालक मंडळाकडून कारखान्यावरील आर्थिक बोजा कमी करण्याबाबत प्रस्ताव मागितला. कामगारांनी त्यास प्रतिसाद देत सुमारे ११ कोटीची देणी मागणार नसल्याचा लेखी करार दिला. यामुळे कारखान्याच्या हंगामी कर्जासाठी साखर आयुक्त कार्यालयाने वेगवान हालचाली सुरू केल्या. राज्य बँकेला ‘नासाका’ला संचालकांच्या हमीवर पूर्व हंगामी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले आहे. याशिवाय पालकमंत्र्यांनी सहकारमंत्र्यांना १९ ऑगस्ट रोजी पत्र दिले. त्यानुसार सहकारमंत्र्यांनी साखर आयुक्तांना ‘नासाका’ सुरू करण्याचे आदेश २३ ऑगस्ट रोजी दिले आहेत. आता सोमवारी (दि. २८) आमदार बाळासाहेब सानप, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, संचालक मंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

प्रति पोते टॅगिंग होणार
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकीत कर्ज फेडण्यासाठी ‘वसाका’च्या धर्तीवर ‘नासाका’, राज्य बँक व जिल्हा बँक यांच्यात त्रिपक्षीय करार करणार असून प्रती पोते टॅगिंग केले जाणार आहे. राज्य बँकेने कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतर ते फेडण्याची जबाबदारी संचालक मंडळाने स्वत:ची मालमत्ता तारण ठेवून घेतली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीअर विक्रीत ३० टक्के घट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सुप्रीम कोर्टाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री सुरू करण्यास बंदी घातल्यानंतर जिल्ह्यात देशी, विदेशी व बीअर व वाइन विक्रीत घट झाली आहे. गेल्या चार महिन्यात बीअर विक्रीत तब्बल ३० टक्के घट झाली. तर विदेशी दारुलाही फटका बसला असून त्यातही २०.६९ टक्के घट झाली आहे. पण या बंदीनंतर देशी दारुच्या विक्रीत १२ तर वाइन विक्रीमध्ये अवघी ७ टक्के वाढ झाली.
जिल्ह्यातील १ हजार ११६ पैकी तब्बल ७६३ मद्यविक्री दुकाने बंद करण्यात आली. नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील ४३ दुकाने सुरू झाली तर ३७ दुकानांनी स्थलांतर केल्याने सुरू असलेल्या दुकानांची संख्या ३५३ वरून ४३३ इतकी झाली. या सर्व दुकानांमधील मद्यविक्रीमध्ये चार महिन्यात घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये देशी दारुची विक्री ६३ लाख २७ हजार ९२७ लिटर झाली होती. हीच विक्री गेल्या चार महिन्यांमध्ये ५५ लाख २५ हजार ७९१ लिटर झाली आहे. या विक्रीत ८ लाख २ हजार १३६ लिटरची घट झाली आहे. विदेशी दारुतही २०.६९ टक्के घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये विदेशी दारुची विक्री २९ लाख ८४ हजार ९०३ लिटर झाली होती. हीच विक्री आता २३ लाख ६७ हजार ४१६ लिटर झाली आहे. त्यामुळे चार महिन्यात या विक्रीत ६ लाख १७ हजार ४८७ लिटर घट झाली आहे. देशी-विदेशी बीअर विक्रीत तब्बल ३०.०५ टक्के घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये बीअर विक्री ५१ लाख २ हजार २९२ लिटर झाली होती. हीच विक्री २०१७-१८ मध्ये ३५ लाख ६९ हजार २४१ लिटर झाली. चार महिन्यात या विक्रीत १५ लाख ३३ हजार ५१ लिटर घट झाली आहे. वाइन विक्रीला मात्र या सर्वांमध्ये तुलनेने कमी फटका बसला. केवळ ६.८९ टक्के घट या चार महिन्यात झाली. २०१६-१७ मध्ये १ लाख ६७ हजार ६०४ लिटर विक्री होती; तीच विक्री आता १ लाख ५६ हजार ५६ लिटर झाली आहे. चार महिन्यात या विक्रीत ११ हजार ५४८ लिटर घट झाली आहे.

राज्यात सरकारचा वर्षाला किमान १० हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे बोलले जात असून जिल्ह्यातही त्यात घट होणार आहे. या दारू विक्रीत विदेशी मद्यविक्री ३०.४६ टक्के कमी झाली. तर बीअर विक्रीत ३८.७५ टक्के घट झाली. देशी दारूचा आकडाही १७.११६ ने घटला असून वाइन विक्रीत मात्र १२.४५ टक्के वाढ आहे. त्यामुळे या आकड्यातून काय निष्कर्ष काढायचा याबाबत संभ्रम आहे.

मद्यदुकाने घटली कागदावर
२०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १ हजार ११६ दुकाने सुरू हाती. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ७६३ मद्यविक्री दुकाने बंद करण्यात आली. त्यानंतर नाशिकमधील त्र्यंबकरोड महापालिकेत वर्ग करण्यात आल्याने ४३ दुकाने सुरू झाली. तसेच ३७ दुकानांनी स्थलांतर केल्यामुळे ती चालू झाली आहे. त्यामुळे अगोदर सुरू असलेल्या १ हजार ११६ दुकानाची विक्री व आता सुरू असलेल्या ४३३ विक्रीची तुलना केल्यास दारू विक्री मोठी घट नसल्याचे समोर येते.

अजून दुकाने सुरू होणार?
सुप्रीम कोर्टाने महापालिका क्षेत्रात हा निर्णय लागू नसल्याचे स्पष्ट केल्याने नाशिक व मालेगाव येथील सर्वच दुकान सुरू होणार आहे. त्यामुळे त्यानंतर विक्रीत मोठी वाढ होईल. या निर्णयामुळे नाशिकमध्ये १४१ तर मालेगावमध्ये ३६ जादा दुकाने सुरू होण्याचे समजते.

अवैध मद्यविक्री वाढली
सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अनेक दुकाने बंद झाली असली तरी अवैध दारू विक्रीत मोठी वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली असली तरी त्यात अद्याप घट झालेली नाही. काही ठिकाणी हा धंदा जोरात सुरु असून त्यामुळे जिल्ह्यात वैध व अवैध दारु विक्रीतून दारू पिण्यामध्ये मात्र कोणतीही घट झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या फुलांनी गुजरात ‘गुलशन’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
किमान नफा पदरी पडेल या अपेक्षेने वर्षानुवर्षे मुंबईला फुले पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना गुजरातच्या रूपाने नवे मार्केट उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासारख्या मुख्य व्यावसायिक मोसमात फुले पाठविण्यासाठी शेतकरी मुंबईपेक्षा गुजरातला प्राधान्य देत आहे. तेथे फुलांना मिळणारा अधिक भाव हे शेतकऱ्यांसाठी एकमेव आकर्षण ठरत आहे.

गणेशोत्सवात फुलांना वर्षभरातील सर्वाधिक भाव मिळतो; ‌त्यामुळे या काळात स्थानिक बाजारपेठाही गुलाबासह सर्वच फुलांनी डवरलेल्या असतात. या काळात फुलांच्या जीवावर मुंबई करून घेण्यासाठी शेतकरी गुलाबासह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा, मोगरा, लीली, शेवंती ही फुले मुंबापुरीला पुरवतात. पूर्वी मुंबईमध्ये फुलांना सोन्याचा भाव मिळत असल्याने या भागाची निवड करणारे शेतकरी वर्षापासून आपला मोर्चा गुजरातकडे वळवत आहेत. मुंबईपेक्षाही अधिक भाव मिळत असल्याने सुरत, अहमदाबाद, राजकोट येथे फुले पाठविण्यात येतात.
मुंबईत जाणारा ८० टक्के गुलाब नाशकातून तर २० टक्के तासगाव-सांगलीहून येतो. त्याचे भाव दररोज बदलते असल्याने त्याबाबत दहा-बारा रुपयांचा फरक पडत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईला गुलाब ४० रुपये डझन असेल तर त्याच गुलाबाला गुजरातेत ५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी तेथे फुले विकण्याला प्राधान्य देत आहेत. विशेषत: सफेद रंगाच्या फुलांना अधिक मागणी आहे.

सजावटीसाठी अधिक मागणी
गणेशोत्सवात पूजेव्यतिरिक्त सजावटीसाठीही फुले लागतात. गुलाब, जरबेरा, कार्निशन, अन्थोरियम, ग्लॅडिओलस, ऑर्किड, ट्यूबरोझ या फुलांना सजावटीसाठी मोठी मागणी आहे. नाशिकमध्येही काही फुले बंगळूरुहून येतात. सुटा गुलाब, गुलछडी, रजनीगंधा ही फुले पुण्याहून तर पिवळा-लाल गोंडा तासगावहून, पांढरी शेवंतीही बंगळूरुहून आणली जाते. सध्या गणेशोत्सवामुळे फुलांचे मार्केट तेज असून मुंबई तसेच गुजरातला फुले रवाना होत आहेत.

गेल्या वर्षापर्यंत मुंबईला फुलांना चांगला भाव मिळत होता; परंतु यंदा खूपच कमी किमतीत फुले मागत आहेत. त्यामुळे आम्ही मुंबईपेक्षा गुजरातला फुले पाठविण्याचा निर्णय घेतला. यात मुंबईच्या तुलनेत गुजरातला गुलाबाच्या फुलाच्या गड्डीमागे किमान पंधरा रुपये सुटतात.
- मधुकर गायकवाड, फुल उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायपूरला टोमॅटो खरेदी केंद्र सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड बाजार समितीच्या रायपूर शेतीमाल खरेदी-विक्री केंद्रावर टोमॅटो लिलावास सुरुवात झाली. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व व्यापाऱ्यांशी झालेल्या संयुक्त बैठकीनुसार रायपूर येथे शुक्रवारी (दि. २५) समितीचे सभापती डॉ. श्री. आत्माराम कुंभार्डे यांच्या उपस्थितीत बाजार समितीचे उपसभापती नितीन आहेर यांचे शुभहस्ते टोमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, लिलावासही चांगला प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, लिलावाच्या पहिल्याच दिवशी एक हजार क्रेट्स टोमॅटोची आवक झाली. प्रति क्रेट्सला सरासरी ७०० रुपये बाजारभाव मिळाले, अशी माहिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी द‌लिी. बाजार समितीचे संचालक निवृत्ती घुले, विलास ढोमसे, आण्णासाहेब आहेर, टोमॅटो खरेदीदार व्यापारी नितीन गुंजाळ, विलास चव्हाण, देवीदास आहेर आदींसह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’ची अभ्यास केंद्रे सक्षम करण्यावर भर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वांसाठी शिक्षण खुले असणे, तसेच वेळ, ठिकाण आणि अंतर यांच्या मर्यादा ओलांडून शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी निर्माण करणे ही दूरस्थ शिक्षण प्रणालीची खरी संकल्पना अाहे. भविष्यात ही शिक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी विद्यापीठाची राज्यातील सर्व अभ्यास केंद्रे सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

मुक्त विद्यापीठाच्या राज्यातील विभागीय केंद्र संचालकांची विशेष बैठक विद्यापीठ मुख्यालयात झाली होती. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या दिल्ली झोनचे संचालक डॉ. के. डी. प्रसाद, पुणे विभागीय केंद्राचे संचालक डॉ. मसूद परवेज, विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे उपस्थित होते.

कुलगुरू म्हणाले, की दूरस्थ शिक्षण प्रणाली हे एक सांघिक काम असून, ही जबाबदारी पूर्ण करताना सर्वांना सोबत घेऊन विविध योजनांची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. अभ्यास केंद्रांचे सक्षमीकरण अतिशय महत्त्वाचे असून, त्यासाठी अभ्यास केंद्रे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याचे नियोजन आहे. अभ्यास केंद्रांना विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुरेशा शैक्षणिक साधनांचा पुरवठा केला जाईल. याव्यतिरिक्त गरजाभिमुख नवनवीन अभ्यासक्रम विकसित करणे, सध्या सुरू असलेले अभ्यासक्रम कायम ठेवून त्यांचे बळकटीकरण करणे, नियामक संस्थांच्या निकषानुसार अभ्यासक्रम सुरू करण्यावरही भर देण्यात येईल.

यावेळी डॉ. के. डी. प्रसाद आणि डॉ. मसूद परवेज यांनी विद्यापीठ आणि विभागीय केंद्र स्तरावर काम करताना एकसूत्रीपणा आणण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. प्रवीण घोडेस्वार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश देशमुख यांनी आभार मानले.

--

तक्रारींसाठी ई व्यासपीठ

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र ई व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी तयार करण्याचा मानस आहे. या व्यासपीठाद्वारे विद्यार्थी आपल्या तक्रारी नोंदवू शकतील. विशेष म्हणजे या तक्रारींचे त्वरित निराकरण केले जाईल. त्यामुळे विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांदरम्यान विश्वासाचे नाते निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूचा प्रभाव थांबणार कधी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गेल्या काही वर्षांपासून सातपूरला डेंग्यू सदृश आजाराने हैराण केले आहे. महापालिकेकडून वेळोवेळी मलेरिया विभागाकडून फवारणी मारली जात असताना डेंग्यूचे रुग्ण मात्र कमी होण्यास तयार नाहीत.

यामुळे सातपूर भागात डेंग्यूची लागण कधी थांबणार, असा सवाल सातपूरकरांनी उपस्थित केला आहे. त्यातच डेंग्यू सदृश आजाराने सर्वसामान्य कामगारांच्या खिशाला आर्थिक झळ पोहचत असल्याने परेशान झाले आहेत. महापालिकेने गल्लोगल्ली साजत असलेल्या पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही कामगारांनी केली आहे.सातपूर विभागातील धृव नगर, शिवाजी नगर, श्रमिक नगर, अशोक नगर, राधाकृष्ण नगर, सावरकर नगर, जाधव संकुल व सातपूर कॉलनी या भागात डेंग्यू सदृश आजाराने शेकडोहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यावर उपचार कोण काढणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

धूर फवारणीही नावालाच

दरम्यान, मलेरिया विभागाकडून रोजच फवारणी केली जात असताना डेंग्यूचे रुग्ण मात्र रोजच खासगी रुग्णालयात उपचार घेताना दिसत आहेत. डेंग्यू सदृश आजार होण्याचे कारण काँक्रिटीकरणच्या रस्त्यांवर साजत असलेले पावसाचे पाणी हेच असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. महापालिकेने साचत असलेल्या पाण्याला वाहते करावे, अशीही मागणी कामगारांनी केली आहे. महापालिकेकडून केली जात असलेली धूर फवारणीही नावालाच असल्याचा आरोप सातपूरच्या प्रभाग बैठकीत नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव यांनी केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेट निवडणुकीला ऑक्टोबरचा मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर पदवीधरांमधून निवडून येणाऱ्या १० आणि कॉलेज, शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींमधून ६ अशा एकूण १६ जागांसाठी ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी मतदान होऊन १० ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुकांना २१ सप्टेंबरला अर्ज भरता येईल.

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी प्रतिनिधी आणि अधिसभा निवडणुका होणार आहे. संबंधित अर्ज छापील स्वरुपात विद्यापीठातील निवडणूक कार्यालयात जमा करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

२६ हजार नोंदणी अपात्र

२६ हजार पदवीधर मतदार नोंदणी अर्जामध्ये त्रुटी आहेत. यामुळे सुमारे २६ हजार पदवीधर अपात्र ठरले आहेत. एकूण ६० हजार पदवीधरांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केली होती. महिलांनी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र जमा न केल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.


निवडणूक कार्यक्रम

अंतिम मतदार यादी - ७ सप्टेंबर, निवडणुकीची सूचना - १२ सप्टेंबर, अर्ज भरण्याची तारीख - २१ सप्टेंबर, अर्जांची छाननी - २२ सप्टेंबर, अर्ज माघार - २५ सप्टेंबरला, मतदान - ८ ऑक्टोबर, निकाल - १० ऑक्टोबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण संवर्धनाचा जागर

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

गणेशोत्सवासाठी सर्वच स्तरांवर आकर्षक पद्धतीच्या सजावटीला प्राधान्य दिले जाते. अलीकडे इको फ्रेंडली पद्धतीने अशी सजावट करण्याकडे मंडळांसह नागरिकांचाही कल दिसून येत आहे. यंदा अनेकांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक सजावट साकारली असून, सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अशा सजावटींचा बोलबाला दिसून येत आहे.

शहरात बहुतांश ठिकाणी नागरिकांनी पर्यावरणपूरक सजावटीवर भर दिलेला आहे. अनेकांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू आरास साकारली आहे. घरातील न लागणाऱ्या वस्तूंचा वापर करून घरगुती देखावे साकारण्यात आले आहेत. साध्या पद्धतीने, परंतु आकर्षक स्वरूप दिलेले असे देखावे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

घरात वापरात नसलेल्या काठ्या, तसेच बांबू यापासून देखावे साकारण्यात आले आहेत. काही ठिकाणी केवळ दगडांचा आणि कापडाचा वापर करून देखावे साकारण्यात आले आहेत. दगड आणि कापडाचा उपयोग करून आकर्षक डोंगरांचा देखावा साकारण्यात आला आहे.

निसर्गाचा समतोल ढासळणार नाही ही भावना मनात ठेेवून घरगुती देखावे साकारण्यात आले आहेत. काही ठिकाणी घरातील ताट, वाटी आणि अन्य भांडी वापरून प्रत्यक्ष बाप्पा साकारण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक देखावे साकारण्यावर अनेकांचा भर असल्याचे यावरून दिसून येत आहे.

--

घरातील न लागणाऱ्या लाकडी वस्तू, तसेच बांबू आदींचा वापर करून मी देखावा साकारला आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळूू न देता केवळ घरातील न लागणाऱ्या वस्तूंपासून बाप्पांसाठी देखावा साकारला आहे.

-प्रतीक पंडित

---

माती, वाळूू आणि इतर वस्तूंपासून मी देखावा साकारला आहे. कापडाचा उपयोग करून दगडांना आकर्षक असे डोंगराचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यासदेखील हातभार लागला आहे.

-निखिल गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात विद्यार्थ्यांचे ‘सीएस’मध्ये यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या वतीने १ ते १० जून या कालावधीत पार पडलेल्या कंपनी सेक्रेटरीज प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह परीक्षेच्या निकालात नाशिकच्या सात विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

या परीक्षेत सीएस प्रोफेशनल अंतिम परीक्षेत सात तर एक्झिक्युटिव्ह परीक्षेत पाच विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कंपनी सेक्रेटरी शाखेचा अभ्यासक्रम आणि परीक्षांचे आयोजन केंद्र सरकारच्या आयसीएसआय संस्थेच्या वतीने केले जाते.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नाशिकमधून केतकी भडकमकर, निधी शाह, मिहीर तपस्वी, सोनम जेठवा, अभिषेक देशपांडे, करण सोमवंशी, जयेश कटारिया यांनी यश मिळविले. सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेत हितेश सारडा, निशांत बाफना, अक्षदा भासे, सायली कुलकर्णी, सचिन कुलकर्णी हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांसाठी शंभर विमा रुग्णालये

$
0
0

राज्यभरात लवकरच होणार उभारणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगारांसाठी नेहमीच पुढाकार घेत असलेल्या सिटू संघटनेने कामगारांसाठी विविध ठिकाणी रुग्णालयांची मागणी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली होती. सिटू संघटनेची मागणी मान्य झाली असल्याने महाराष्ट्रात कामगार विमा रुग्णालयाची शंभर रुग्णालये लवकरच उभारण्यात येणार असल्याचे कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून कामगार विमा रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी याची मागणी सिटू संघटनेने केली होती. अखेर सिटूच्या मागणीला यश आल्याने कामगारांनीही आनंद व्यक्त केला आहे.


महाराष्ट्रात विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या कोटींच्या घरात आहे. यात प्रत्यक्ष कामावर असताना किंवा रस्त्यांवर अपघात झाल्यास शासनाने कामगारांसाठी कामगार विमा रुग्णालयाची व्यवस्था केली होती. परंतु, अनेक ठिकाणी कामगारांना कामावर असताना अपघात झाल्यास वेळेवर योग्य औषध, उपचार केला जात नसल्याने प्रसंगी जीव जाण्याचीही वेळ येत असते. याकरीता सिटू कामगार संघटनेने आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्याकडे कामगार विमा रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी याची मागणी केली होती. याबाबत महाराष्ट्र शासनानेही योग्य प्रतिसाद दिल्याने लवकरच शंभर कामगार विमा रुग्णालये उभारण्यात येणार असल्याचे कामगार नेते डॉ. कराड यांनी सांगितले. आरोग्य मंत्री डाँ. सावंत यांच्याकडे सिटू संघटनेने पाठपुरावा केला होता. तसेच आरोग्य सचिव यांना देखील वाढलेल्या कामगारांची संख्या व कमी असलेले कामगार रुग्णालये याबाबत माहिती सिटू संघटनेने दिली होती.


सातपूरला रुग्णालयात सुविधा द्याव्या

सातपूरला असलेल्या कामगार रुग्णालयात सुविधा वाढवण्याबाबत सिटू संघटनेने मागणी केली आहे. यात अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात याव्या. तसेच कमी असलेली डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणीही सिटूने शासनाकडे केली आहे. त्यामुळे आता या मागणीकडे सरकारने लक्ष देऊन त्या सुविधा सातपूरच्या रुग्णालयांमध्ये पुरवाव्यात. कामगारांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी या सुविधा आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्रात विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी कामगार विमा रुग्णालये आहेत. परंतु, वाढलेली कामगारांची संख्या पाहता विमा रुग्णालये कमी पडत आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे कामगार विमा रुग्णालयांची संख्या वाढवण्याबाबत मागणी केली होती. लवकरच शंभर कामगार विमा रुग्णालये उभारण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. सांवत यांनी सांगितले.

डॉ. डी. एल. कराड, सिटू संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालवी’ रोखणार गोदाप्रदूषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी पालवी फाउंडेशनकडून ‘विघ्नहर्ता’ उपक्रम राबविण्यात येत आहे. अमोनिअम बायकार्बोनेट पावडरच्या साहाय्याने घरच्या घरी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार असून, नाशिककरांमध्ये त्याविषयी प्रबोधन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पालवी फाउंडेशनकडून सिरिन मेडोज येथे शनिवारी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींविषयी मोठ्या प्रमाणात प्रबोधन केले जात असले, तरी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे खरेदीचे प्रमाण आजही मोठे आहे. या प्रकारातील गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने पर्यावरणाला हानी पोहोचते, शिवाय मानवी जीवनावरही त्याचा परिणाम होतो. हे नुकसान टाळण्यासाठी पालवी फाउंडेशनकडून ‘विघ्नहर्ता- पर्यावरणपूरक गणेश उत्सव’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत अमोनिअम बायकार्बोनेट पावडर व पाणी यांच्या मिश्रणातून घरच्या घरी विसर्जन करावे, याविषयी त्यांच्याकडून प्रबोधन करण्यात येत असून, शनिवारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करून नदीपात्र स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालवी फाउंडेशनकडून करण्यात आले आहे. यावेळी सुवर्णा पवार, दीपाली खेडकर, मोना गुलाटी आदी उपस्थित होते.

--

अशी आहे प्रक्रिया

एका बादलीमध्ये मूर्तीच्या उंचीनुसार मूर्ती बुडेल इतके पाणी व मूर्तीच्या वजनाइतकी अमोनिअम बायकार्बोनेट पावडर घ्यावी. एका काठीने ते मिश्रण ढवळून घ्यावे. गणेशमूर्तीवरील निर्माल्य व सजावटीच्या वस्तू काढून ती मूर्ती मिश्रणामध्ये विसर्जित करावी. काही तासांनंतर मूर्ती पाण्याच्या तळाशी जाईल. दिवसातून सहा-सात वेळा काठीने हे मिश्रण ढवळावे. पावडरच्या प्रमाणानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात काही तासांत, दिवसांत पूर्णपणे विरघळून जाते. मूर्ती विरघळलेल्या पाण्यात अमोनियम सल्फेटचा थर उत्तम खत म्हणून वापरता येत असून, ते घरातील झाडांना टाकावे, तर खालचा मातीचा थर ही माती बागेतील मातीत एकत्र करता येईल, असे पालवी फाउंडेशनकडून सांगण्यात आले.

--

येथे मिळेल अमोनिअम बायकार्बोनेट

मनपा सिडको विभाग- अंबड पोलिस स्टेशनसमोर, पंचवटी विभाग- विभागीय कार्यालय, मालेगाव स्टँड, सातपूर विभाग- सातपूररोड, नाशिक पूर्व- मेनरोड, नाशिक पश्चिम- पंडित कॉलनी, नाशिकरोड- दुर्गा मंदिराशेजारील कार्यालय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर उत्पन्नावर आधारित असावा

$
0
0

अतिरिक्त आयकर आयुक्तांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्राचे उत्पन्न वाढविण्याकरिता वस्तू व सेवांकरिता समान कर दर असणे गरजेचे आहे. अगदी प्राचीन काळापासूनच सुशासन व कर यांचा संबंध आहे. श्रीमंत व्यक्ती व सर्वसाधारण व्यक्ती यांच्यात आयकर आकारणीमध्ये विभिन्नता असायला हवी. जेणेकरून श्रीमंत व्यक्ती व सर्वसाधारण व्यक्ती यांच्यावर पडणारा कराचा बोजा हा समान न राहता त्यांच्या उत्पन्नावर आधारीत असेल. म्हणजे अधिक श्रीमंत व्यक्तींना जास्तीत जास्त कर व सर्वसाधारण व्यक्तीला कमी कर असावा जेणेकरून सामाजिक विषमता दूर होईल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (पश्चिम विभाग), नाशिक सीए शाखेच्या वतीने नाशिकमधील अशोका मार्ग येथील आयसीएआय भवन येथे दोन दिवसीय प्रादेशिक कर परिषदेस शनिवारी सुरुवात झाली. या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स व उपाध्यक्ष चार्टर्ड अकाउंटन्‍ट्सचे पश्चिम विभागाचे सीए सर्वेश जोशी, केंद्रीय परिषद सदस्य सीए जय छयेरा, प्रादेशिक परिषदेचे सदस्य आणि शाखा नामनिर्देशित सीए विक्रांत कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप्रज्वलनाने करण्यात आले.

फिलिप्स पुढे म्हणाले, की सद्यस्थितीतील भारताचा जो कर भरणा होत आहे, त्याचा दर कमी असला तरी तो भविष्यात वाढून अर्थव्यवस्था बळकट होण्याकामी मदत होईल. सीए सर्वेश जोशी म्हणाले, की राष्ट्राच्या प्रगतीसाठी कमीतकमी कर म्हणजेच करात सूट व वजावट यावर भर देण्याची गरज आहे. सध्याचा आयकर कायदा हा अधिकाधिक क्लिष्ट होत असून, त्यात सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. सदरच्या प्रादेशिक परिषदेच्या पहिल्या दिवशी सुरत येथील तज्‍ज्ञ सीए जय छयेरा (केंद्रीय परिषद सदस्य), नाशिक येथील उदयराज पटवर्धन, मुंबई येथील जगदीश पंजाबी आणि आशिष केडिया यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

या प्रादेशिक परिषदेत नाशिक व नाशिक बाहेरील असे ३०० हून अधिक सीएंनी सहभाग नोंदवला आहे. या परिषदेचे यशस्वी आयोजन करण्याकरिता नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए विकास हासे, उपाध्यक्ष मिलन लुनावात, सचिव रोहन आंधळे, खजिनदार हर्षल सुराणा, रेखा पटवर्धन, रणधीर गुजराथी, राजेंद्र शेटे, पश्चिम विभागीय कार्यकारणीचे सदस्य विक्रांत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

आज जीएसटीवर चर्चा

परिषदेच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी प्रथम सत्रात सीए व्ही. रघुरामान, भूपेंद्र शाह, गिरीश अहुजा हे जीएसटी कायद्यातील तरतुदी, सर्विस टॅक्स याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध धंदे जोरात

$
0
0

त्र्यंबकरोडवर बुकींकडून हॉटेल्समध्ये खास व्यवस्था

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी अवैध व्यवसाय बंद करण्याची मोहीम हाती घेतली होती. यानंतर नव्यानेच परिमंडल दोनमध्ये दाखल झालेले पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी संपूर्ण अवैध व्यवसायच बंद केले आहेत. यात जुगारींसाठी अड्डे चालविणाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत त्र्यंबक रोडवर दररोज नवीन ठिकाणी जुगार खेळण्याची व्यवस्था केल्याचे समोर आले आहे. महादेवाचे श्रद्धास्थान असलेला त्र्यंबक रोडवरील लॉजिंग असलेल्या हॉटेल्स जुगारींचे अड्डे बनले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील जुगारींना जुगार खेळण्यासाठी बुकींकडून खास व्यवस्था केली जात असून, चारचाकी वाहनेही ठेवण्यात आली आहेत.

एकीकडे शहर पोलिसांनी अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा उगारला असताना ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनीदेखील जुगार अड्ड्यांसह अवैध व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. देश-विदेशातील भाविक विविध धार्मिक कामासाठी त्र्यंबकेश्वरला येत असतात. यामुळे रोजच हजारो वाहनांची वर्दळ त्र्यंबकेश्वर रोडवर असते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या लॉजिंग हॉटेल्समध्ये जुगार खेळणाऱ्यांची खास व्यवस्था करण्यात येत असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी शहरातील सर्वच अवैध व्यवसाय बंद केले असताना ग्रामीण पोलिस अधीक्षक दराडे कधी बंद करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजतार पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

वीज वितरण कंपनीच्या ११ केव्ही मुख्य उच्चदाब वीजवाहिनीची तार अचानक तुटून अंगावर पडल्याने शेतात कांदा रोपाची लागवड करीत असलेल्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. येवला तालुक्यातील गवंडगाव शिवारात शनिवारी (दि.२६) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली.

गवंडगाव येथील शेतकरी बाजीराव विश्वनाथ भागवत (वय ७५) हे रास्ते सुरेगाव शिवारातील आपल्या शेतात शनिवारी सकाळी कांदा रोपे लागवडीचे काम करीत होते. यावेळी वीज वितरण कंपनीच्या गवंडगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून तालुक्यातील खामगाव येथे जाणारी ११ केव्ही मुख्य उच्चदाब वीज वाहिनीची तार अचानक तुटून खाली पडली.

ही तुटलेली तार थेट भागवत यांच्या अंगावर पडल्याने विजेचा मोठा झटका बसल्याने त्यांचे पाय जळाले. मोठी गंभीर दुखापत असल्याने त्यांना तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयातील उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी येवला तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरच्या ‘त्या’ खुनाला फुटली वाचा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनोळखी मृतदेहाच्या शर्टवरील टेलरच्या नावाचा तपास करीत ग्रामीण पोलिसांनी अखेर एका खुनाच्या घटनेला वाचा फोडली. अनैतिक संबंधातून सदर खून झाल्याचे पुरावे पोलिसांनी शोधून काढले असून, या प्रकरणी महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

बालाजी पंढरी बनसोडे (रा. मंगरूळ, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बनसोडेचे मृतदेह २४ फेब्रुवारी २०१७ रोजी सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील दातली शिवारातील एका शेतातील तळ्यात आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास नव्याने सुरू करण्याचे आदेश दिले. ग्रामीण पोलिस दलाच्या विशेष तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक ए. ए. गडाख, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाजरे, हवालदार इंगळे, पोलिस नाईक केदारे, कॉन्स्टेबल गावले तसेच स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. मृतदेहाच्या शर्टच्या कॉलरवर कळंब येथील दीपक टेलर असा लिहिलेला मार्क एवढाच एक पुरावा पोलिसांकडे होता. याच टेलरकडे पोलिसांनी सुरुवातीस चौकशी केली होती. मात्र, त्यात काही निष्पन्न झाले नव्हते. यावेळी पोलिसांनी दोन ते तीन दिवस मुक्काम करून टेलरकडील सर्व नोंदीची तपासणी केली. त्यात, बालाजी बनसोडे नावाच्या दोन नोंदी पोलिसांना मिळाल्या. यातील एक बालाजी गावातच होता. तर, दुसरा व्यक्ती सहा महिन्यांपासून गावात नसल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसांनी गुप्त तपास सुरूच ठेवला. बालाजीची पत्नी मंदाकिनी हिचे गावातील व्यापारी भागचंद भागरेचा याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना समजले. तसेच बालाजी बेपत्ता झाल्यानंतर तिने पोलिसांकडे कुठलीही तक्रार दिलेली नव्हती. त्यानुसार पोलिसांनी संशयितांचे मोबाइल रेकॉर्ड तपासले असता २४ फेब्रुवारीच्या घटनेचा एक एक पदर उलगडत गेला. पोलिसांनी मंदाकिनीसह भागचंदला अटक केली. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे बालाजी भागचंदला ब्लॅकमेल करीत असे. तसेच गावात झालेल्या भांडणामुळे तो जानेवारी महिन्यातच नाशिकला आला होता. २२ फेब्रुवारी रोजी बालाजीने भागचंदला घेण्यासाठी बोलावले. त्यानुसार, तो एका चालकासह इंडिका कारने आला. परत जाताना सिन्नरच्या पुढे आल्यानंतर भागचंदने वाद उकरून काढला. तसेच बालाजीच्या डोक्यात दगड टाकून हत्या करून निघून गेला. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर भागचंदने ही घटना मंदाकिनीला फोनकरून कळवली होती. सध्या पोलिस घटनास्थळी असलेल्या त्या इंडिका चालकाचा शोध घेत आहेत.

अत्यंत क्लिष्ट असा खुनाचा प्रकार शोधून काढण्यात यश मिळाले. तपासाचे काम अत्यंत चांगले झाल्याने या पथकातील कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. अनोळखी मृतदेहांचा तपास करण्यासाठी हे पथक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

- संजय दराडे, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विंचुरला सशस्त्र दरोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील विंचुर येथील माजी सरपंच शकुंतला दरेकर यांच्या घरासह आणखी तीन ठिकाणी शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास शस्रांचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना घडली. मरळगोई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वस्तीत शनिवारी पहाटे आठ ते दहा जणांनी शस्त्रांसह दरोडा टाकला. आकाशनगर येथेही याच दरम्यान दोन घरात डोरोड्याचा अशस्वी प्रयत्न या दरोडेखोरांनी केला. या दरोड्यात सोने व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला.

शकुंतला दरेकर यांच्या मरळगोई रोडवरील वस्तीवर सर्व कुटूंब झोपलेले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास कंपणासह दाराचे कडीकोयंडा तोडून आठ दरोडेखोर गुप्ती, कोयता घेऊन घरात घुसले. दरोडेखोरांनी रत्नाकर दरेकर यांना मारहाण केली. सहा तोळे सोने लुटून नेले. गोविंद दरेकर यांच्या घरातून मोबाइल व पाच हजार रुपये, अरुण ढोमसे यांच्या घरातून दोन तोळे सोने असा ऐवज चोरला. दरोडेखोर जाताच सचिन दरेकर यांनी लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना याबाबत माहिती दिली. सोनवणे फौजफाट्यासह अवघ्या दहा मिनीटात घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली.

संशयित पुण्याचे

पहाटेच विंचूर येथे एक तवेरा गाडी उभी असताना काही संशयित हालचाली पोलिसांना दिसल्या. पोलिसांनी विचारपूस केली असतात उघवाउघवीची उत्तर दिल्याने पोलिसांनी अंकुश लोळगे, खंडू टावरे (दोन्ही रा. पुणे)दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


दोन महिन्यांनंतर दरोडेखोर अटकेत

पिंपळगाव बसवंत ः येथे दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या दरोड्यातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. आझाद नगर येथील रवींद्र मोरे यांच्या घरावर दरोडा टाकून मोरे मारहाणही करण्यात आली होती. पोल‌सि निरीक्षक वासुदेव देसले यांनी राज्यातील पोल‌सि ठाण्यात संपर्क साधून गुन्ह्यांबाबत माहिती दिली. त्यावरुन हे दरोडेखोर नेवासा या ठिकाणचे असल्याचे संशय व्यक्त केला होता. नगर पोल‌सिांच्या सहकार्य ने नेवासा येथील अमोल यशवंत पिंपळे, उमेश हरीसिंग भोसले, रमेश भोसले, अल्ताफ भोसले (रा. नेवासा) यांना अटक केली आहे. पिंपळगाव बसवंत न्यायालयात या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली.

अ‌श्ल‌‌िल वर्तन; गुन्हा दाखल

मनमाड ः अमरावती-मुंबई रेल्वेतील आरक्षित बोगीत प्रवासी महिलेसमोर लघुशंका करणाऱ्या व महिलेकडेपाहून अश्ल‌लि वर्तन करणाऱ्या अकोल्याच्या नितीन जवळकर यांच्या विरोधात मनमाड रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयितास रेल्वे न्यायालयासमोर उभे केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. जवळकर हे अन्न निरीक्षक या अधिकारी असल्याचे बोलले जात आहे.

अमरावती येथून मुंबईकडे जाणारी एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकानजीक असताना नितीन जवळकर यांनी दारूच्या नशेत बाथरूम मध्ये न जाता बोगीतील महिलेसमोरील सीटजवळ लघुशंका केली, अशी तक्रार संबंधित महिलेने शुक्रवारी रात्री मनमाड लोहमार्ग पोलिसांत केली.

वणीत चेन स्नॅचिंग

दिंडोरी : तालुक्यातील वणी येथे नातवांना क्लासमधे घेऊन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या संशयीतांनी ओरबडून नेली. हरितालिकेच्या दिवशी भरदुपारी देशमुख गल्लीत हा प्रकार घडला. याप्रकरणी रमाबाई सुरेश गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात सशय‌तिांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३७२ प्रशिक्षणार्थी देशसेवेत दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

४४ आठवड्यांच्या अवघड प्रशिक्षणानंतर नाशिकरोड येथील तोफखाना विभागातील ३७२ प्रशिक्षणार्थींची तुकडी दिमाखात सशस्त्र संचलन करीत शनिवारी देशसेवेत दाखल झाली. यावेळी त्यांनी मै दृढ प्रतिज्ञा करता हूँ...मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा अशी शपथ घेतली. तोफखाना विभागातील वरिष्ठ अधिकारी व आईवडिलांच्या उपस्थित थाटात झालेल्या या सोहळ्यातील परेडने सर्वांचे लक्ष वेधले. रिमझिम पाऊस व लष्करी बॅण्डपथकाने वाजवलेली शेर-ए-जवान या धूनने सोहळ्यात रंगत आणली.

या शपथ सोहळ्यासाठी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशचे सबकमान्डर मेजर संजीव चौधरी व बिग्रेडीयर जे. एन. बिंद्रा उपस्थित होते. नाशिकरोडच्या तोफखाना प्रशिक्षण केंद्रात या नवसैनिकांना फिजिकल, ड्रिल, वेपन ट्रेनिंगसह असाल्ट व ट्रेडमधील अॅडव्हान्स प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर आता हे नवसैनिक सैन्य दलातील वेगवेगळ्या युनिटमध्ये दाखल होणार आहेत. वेगवेगळ्या राज्यातून निवड झालेल्या या प्रशिक्षणार्थीच्या या परेडला सकाळी ८.३० वाजता सुरुवात झाली. त्यानंतर तोफांचे प्रात्यक्षिक व हेलिकॉप्टरच्या घिरट्यांनंतर हा सोहळा पार पडला. या शपथ सोहळ्यात विविध धर्मांचे धर्मगुरूही उपस्थित होते.

पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

नवसैनिकांच्या या शपथ सोहळ्यात त्यांच्या पालकांना खास आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यात आपला मुलगा आता सैन्य दलात दाखल होणार असल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. शपथ सोहळ्यानंतर या प्रशिक्षणार्थींच्या वडिलांनाही मेडल देऊन गौरविण्यात आले.

‘विश्वकी सर्वश्रेष्ठ सेना’

शपथग्रहण सोहळ्यात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशचे सबकमान्डर मेजर संजीव चौधरी यांनी या नवसैनिकांमध्ये जोश भरत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनुशासन व देशभक्तीचा धागा पकडत आपला देश म्हणजे अनेकता मे एकता असल्याचे सांगितले. भारतीय सेना विश्वकी सर्वश्रेष्ठ सेना असून, त्यात तुम्हाला संधी मिळाल्याचे सांगत आगे बढनेका अवसर आपको मिलेगा असे सांगितले.

उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार

प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सबकमान्डर मेजर संजीव चौधरी यांनी केला. यात मुकेशकुमार शर्मा (बेस्ट इन ड्रिल), अतुल सिंग (बेस्ट इन पीटी), राहुल (बेस्ट इन डब्ल्युटी), मोहित (बेस्ट इन जीएनआर), कमलेश कुमार (बेस्ट इन टीए), कमलकुमार (बेस्ट इन ओपीआर), सरबजितसिंग (बेस्ट इन डीएमडी), गुलशन कुमार (बेस्ट इन टीडीएन), राहुल शर्मा (ओव्हरऑल बेस्ट).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’ची आंतरराष्ट्रीय भरारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिल्ली येथील दी उमराव येथे झालेल्या ‘अब्राक्सस गॉडेस ऑफ ब्यूटी २०१७’ या राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत नाशिकच्या श्रिया तोरणे व भैरवी बुरड या दोन कन्यांनी देदीप्यमान कामगिरी करीत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे या दोघीही ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘श्रावणक्वीन’च्या फायनालिस्ट राहिलेल्या आहेत.

या दोघीही आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भैरवी ही २०१५ व श्रिया २०१६ मध्ये ‘श्रावणक्वीन’मध्ये सहभागी होत्या. सौंदर्य स्पर्धांमध्ये नाशिकचे नाव दिवसेंदिवस उंचावत आहेत. या दोघींच्या विजेतेपणामुळे पुन्हा एकदा ते सिद्धही झाले आहे. श्रिया हिने मिस टिन युनिव्हर्स इंडिया २०१७ या स्पर्धेचे विजेतेपद त्याचबरोबर मिस ब्यूटुफुल आइज हा किताब पटकावला. श्रिया फेब्रुवारीत होणाऱ्या मिस टिन युनिव्हर्स या सेंट्रल अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भैरवी बुरड हिने या स्पर्धेत मिस ग्लोबल इंटरनॅशनल हे विजेतेपद आणि बेस्ट रॅम्प, बेस्ट कंजुनिअॅलिटी हा किताब पटकावला. जमैका येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल या स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रिया आणि भैरवी यांची निवड पश्चिम भारत विभागातून झाली होती. त्यासाठी दोघीही दिल्ली येथे गेल्या होत्या. देशभरातून या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. मिस टीजीपीसी या ऑनलाइन पेजंटमध्ये २०१६ मध्ये भैरवीने, तर २०१७ मध्ये श्रियाने विजेतेपद पटकावले होते. सर्व स्पर्धकांसमवेत त्यांना विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाकडून लूट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलास काळिमा फासणारी आणखी एक घटना सिन्नरमध्ये समोर आली आहे. शहर पोलिस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने दोघांना बरोबर घेत चक्क कोल्हापूर येथील सराफ व्यावसायिकास लुटले. सुदैवाने सिन्नर पोलिसांनी लागलीच हालचाल करीत तिघांना जेरबंद केले. त्यामुळे शहर पोलिस दलात खळबळ उडाली असून, तोतया पोलिसांच्या नावाने होणारे गुन्हे खरोखर सराईत गुन्हेगारच करतात का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

महेश शांताराम उगले, (रा. कानडी मळा, सिन्नर), गणेश शांताराम उकाडे (रा. बारागाव प्रिंपी, सिन्नर) आणि समाधान दिनकर ढेरिंगे (रा. पळसे, फुलेनगर, ता. जि. नाशिक) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. गणेश उकाडे हा शहर पोलिस दलात वाहतूक शाखेच्या युनिट चारमध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंनगले तालुक्यातील ईपरी येथील राजेंद्र बाळगोंडा पाटील व त्यांचा मुलगा मनीष राजेंद्र पाटील हे सराफ व्यावसायिक २५ ऑगस्ट रोजी सिन्नर येथील सराफ व्यावसायिककडे आले होते. काम आटोपल्यानंतर दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास ते पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने आपल्या कारमधून जाण्यासाठी निघाले. सिन्नर-पुणे हायवेवर रौनक लॉन्सजवळ वरील दोन संशयित दुचाकीवर आले. त्यांनी सदर कार थांबवून पाटील पितापुत्राकडील मोबाइल हिसकावले. आम्ही क्राइम ब्रँचचे पोलिस असून, तुमच्या कारचे सीट फाडून सोन्या-चांदीचे दागिने काढू शकतो, अशी दमबाजी केली. पाटील यांनीही ओळखपत्र दाखविण्याची मागणी करीत पोलिस स्टेशनला घेऊन चला, असे सांगितले. त्यावर तुम्हाला नाशिक येथील क्राइम ब्रँचमध्ये न्यावे लागेल, असे सांगत संशयित त्यांना नाशिकरोडवरील शाहू हॉटेलजवळ घेऊन गेले. तिथे डिक्कीत ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड घेऊन संशयितांनी पळ काढला. यादरम्यान पाटील यांनी संशयिताच्या दुचाकीचा क्रमांक लिहून ठेवला.

--

मित्राच्या दुचाकीचा वापर

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. डी. परदेशी, पोलिस नाईक भगाव शिंदे, सचिन गवळी, प्रवीण गुंजाळ, विनोद टिळे यांनी तपास सुरू केला. पाटील यांनी दिलेल्या दुचाकी क्रमाकांचा शोध घेऊन संबंधित मालकाकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यात त्याने आपली दुचाकी पोलिस असलेल्या उकाडेला दिली असल्याचे पुढे आले. या एका पुराव्यावरून पोलिसांनी उकाडेसह अन्य दोघांना जेरबंद केले.

तोतया की खरेच पोलिस?

तोतया पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याच्या अनेक घटना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडत असतात. या घटना शक्यतो उघडकीस येत नाहीत. सिन्नर पोलिसांनी मात्र अवघ्या काही तासांत टोळीला जेरबंद केले. या टोळीतील एक सदस्य चक्क पोलिसच निघाल्याने तोतया पोलिसांच्या गुन्ह्यांचा नव्याने अभ्यास करण्याची गरज असल्याची भावना पोलिसच बोलून दाखवत आहे.

--

सिन्नर पोलिसांनी अवघ्या काही तासांत लूट करणाऱ्या टोळीस जेरबंद केले. संशयितांकडून ९६ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. तिघांपैकी एक संशयित शहर पोलिस दलात वाहतूक शाखेत कार्यरत असून, त्या विषयीचा अहवाल पाठविण्यात येणार आहे.

-संजय दराडे, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्सवमूर्ती सन्मान’मध्ये सहभागी होण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झालेले आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचे स्वागत भक्तांनी अगदी वाजतगाजत केलेय. शहरातल्या सार्वजनिक मंडळांनीदेखील यंदा वैविध्यपूर्ण देखावे साकारले आहेत.

गणेशोत्सवात मुख्य आकर्षण असते ते सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्याचे. मंडळाचे कार्यकर्ते दिवस-रात्र एक करून हे देखावे उभे करतात. शहरातल्या गणेश मंडळांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र टाइम्सने यंदाही उत्सवमूर्ती सन्मान हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे.

सार्वजनिक मंडळे, देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडतात, तर काही मंडळे प्रबोधनही करतात. अनेक मंडळे पर्यावरणपूरक देखावे उभारतात. मंडळांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्सवमूर्ती सन्मानअंतर्गत मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम सजावट केलेले मंडप, सर्वांत सुंदर मूर्ती, पर्यावरणस्नेही मूर्ती अशा विविध गटांत ही स्पर्धा होत आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयात येऊन प्रवेश अर्ज भरून आपल्या मंडळाची नावनोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी ९५५२५६६८४२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images