Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हिरवेनगरला घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वडाळा रोडवरील हिरवेनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सैफ अल्ताफ पटेल (रा. आयशा पार्क, हिरवेनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पटेल कुटुंबीय सोमवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून कपाटातील सोनसाखळी, चांदीचे पायल व दोन हजार २०० रुपये रोख असा ऐवज चोरून नेला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक दिघे करीत आहेत.

घरातून लॅपटॉपची चोरी
घरात शिरून चोरट्यांनी ३४ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरी केल्याची घटना गांधीनगर परिसरात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानाजी झांबर पवार (रा. समतानगर, आगरटाकळी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पवार कुटुंबीय बुधवारी सकाळी आपल्या कामात व्यस्त असताना चोरट्याने घरात प्रवेश करून सोप्यावर ठेवलेला लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप चोरून नेला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

खडकाळीत जुगारी गजाआड
जुने नाशिक परिसरातील खडकाळी भागात जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खडकाळी येथील सार्वजनिक शौचालय परिसरात काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी कारवाई केली. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी तोसिफ शेख शाहिद व त्याचे चार साथीदार जुगार खेळताना आढळून आले. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोकड जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक लवांड करीत आहेत.

बनावट मुख्यारपत्राद्वारे भूखंडधारकाची फसवणूक
गंगापूर परिसरातील भूखंडधारकाचे बनावट मुखत्यार पत्र तयार करून त्यावर बनावट स्वाक्षऱ्या करून वकिलासह सहा संशयितांनी ठाणे येथील मूळ मालकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीमनाथ कचरू जाधव (रा. कोरस रोड, वर्तकनगर, ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगापूर परिसररातील सर्व्हे नं. ५३/२ या प्लॉटपैकी प्लॉट नंबर २३ क्षेत्र ३०० चौ. मी. इतका भूखंड जाधव यांच्या मालकीचा आहे. संशयित अॅड. प्रशांत विजय पगारे, प्रवीण कचरू नागरे, अमोल व्ही. बांगर, दीपक सुधाकर आव्हाड, मुक्तार पठाण, रघुनाथ सुद्रिक आदींनी २८ सप्टेंबर २०१६ नंतर संगनमताने ५०० रुपयांच्या मुंद्रांकावर बनावट मुखत्यारपत्र तयार केले. त्यावर संशयितांनी मालक असल्याचे भासवून व बनावट स्वाक्षऱ्या करून घेत खरेदी खतामध्ये आणि ठरलेली रक्कम न देता परस्पर तलाठी कार्यालयातून ७/१२ उताऱ्यावरही नाव लावण्यासाठी अर्ज करून फसवणूक केली. फसवणुकीच्या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.

सिडकोत कामगाराकडून अपहार
रोकड व दोन रिफ्ररेजरेटरची बिले न बनविता नोकराने परस्पर एक लाख २० हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणुकचा प्रकार सिडकोतील टेक्नोकार्ड इंडिया लि. या शोरूममध्ये घडली.
शाहीद नियाज अन्सारी (रा. पिंजारघाट रोड, जुने नाशिक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. संशयित राजेश रमनलाल वसावा (रा. नवीन संसारी गाव, भगूररोड, देवळाली कॅम्प) हा बुरकुले हॉल परिसरातील टेक्नोकार्ड इंडिया लि. या फर्ममध्ये कामास आहे. २७ एप्रिल ते २ मे दरम्यान कंपनीच्या माल विक्रीमधून मिळणारी ८९ हजार ३९ रुपयांची रोकड व ३१ हजार २०० रुपयांचे दोन रेफ्रिजरेटर यांच्या विक्रीच्या रकमेची बिले बनविली नाही. तसेच ती रक्कम सीएमएस कंपनीच्या प्रतिनिधीकडेही जमा न करता एक लाख २० हजार २३९ रुपयांचा परस्पर अपहार करून ती स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक घुगे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात सहा दुचाकींची चोरी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील विविध भागात पार्क केलेल्या सहा दुचाकींवर चोरट्यांनी लंपास केल्या. वाहनचोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जाते आहे.
जुनी तांबट लेन परिसरातील ललित विनोद अंबडकर यांची ५० हजार रुपयांची दुचाकी (एमएच १५ डी झेड ०९३९) शनिवारी (दि. १२)सकाळी चोरी गेली. गोपाल कृष्ण सोसायटीत चोरीचा प्रकार घडला असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत. वाहनचोरीची दुसरी घटना अंबड एमआयडीसीत घडली. पाथर्डी फाटा, वासननगर येथे राहणारे अरविंद कानोबा राणे बुधवारी (दि. १६) दुपारी चार वाजेच्या सुमारास कामानिमित्त अंबड एमआयडीसीतील नागरे इंडस्ट्रीज येथे गेले होते. यावेळी पार्किंगमध्ये लावलेली त्यांची शाईन (एमएच १५ ईएन ६४७७) चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
दरम्यान, नाशिकरोड, आशानगर भागात राहणारे माधव गणपत गायकवाड शनिवार (दि. ५) रोजी दुपारी सिन्नर फाटा येथील बैठक हॉटेल येथे गेले असता चोरट्यांनी त्यांची हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत लावलेली अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ सीई ११७२) चोरून नेली. नाशिकरोड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत. वाहनचोरीची चौथी घटना सिडकोतील महाजननगर भागात घडली. राजेंद्रकुमार प्रेमजी मिनीपरा (रा. बिजेस सोसा., अतुल डेअरीजवळ) यांची पॅशन (एमएच १५ डीए ६१४४) गुरूवारी (दि. ३) रात्री त्यांच्या सोसायटीत पार्क केलेली असताना चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. बिटको कॉलेजमधील पार्किंगमध्ये मोहगाव येथील राजाराम रामचंद्र टिळे यांची प्लेझर (एमएच १५ डीव्ही ००८५) बुधवारी (दि. १६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार काकड करीत आहेत. दरम्यान, श्रमिकनगर भागात राहणारे सुनील भिला चौधरी यांची बुलेट (एमएच १५ एफपी १७३८) शनिवारी रात्री त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. सातपूर पोलिस वाहनचोरीचा शोध घेत आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध आजीला मातीच्या बैलांचा आधार

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
असे म्हणतात, की अंध व्यक्तीची गुरे देव राखतो. परंतु, एका अंध आजीला मात्र सर्व नातेवाईक असूनही मातीच्या बैलांचाच आधार उरला आहे. चेहडी गावातील या आजीची कहानी हृदयाला पाझर फोडणारी आहे. परंतु, तिची जगण्याचा संघर्ष, स्वाभिमान इतरांना प्रेरणादायीच आहे.
नाशिक-पुणे मार्गावरील चेहडी गावात दारणा पुलाशेजारी भीमाबाई रसाळ या आजी अनेक वर्षांपासून राहतात. पंधरा वर्षांपूर्वी रातआंधळेपणाचा आजार जडला. या आजारात बुबळांना रक्तपुरवठा बंद होत नाही. त्यामुळे रात्री काहीही दिसत नाही. उपचारांना उशीर झाल्याने त्यांना आता दिवसाही दिसत नाही. तज्ज्ञ डाक्टरांची भेट घेतली. मात्र, त्यांनी ऑपरेशन शक्य नसल्याचे सांगून आयुष्यात कधीच दिसणार नाही, असे स्पष्ट केले.


बैल हाच आधार
भीमाबाई यांना मातीचे बैल छान करता येतात. बैलपोळा जवळ आला की गावातील देवमाणस त्यांना माती व अन्य साहित्य आणून देतात. मातीचा चिखलही करून देतात. भीमाबाई बैल तयार करतात. दोन महिने त्या हेच काम करतात. शेजारची विवाहित शोभा शिंदेलाच त्यांनी मुलगी मानले आहे. त्या मातीच्या बैलांना डोळे चिकटवून देतात. विकी ताजनपुरे, लालू दौंड आदी मुले बैल रंगात बुडवून सुकवायला ठेवतात. ही बैल विकून भीमाबाईला काही मोजके पैसे मिळतात. या पुंजीवरच त्या जगत आहेत.

योजनांच्या लाभापासून वंचित
भीमाबाईंकडे सगळी कागदपत्रे आहेत. परंतु, त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात जाता येत नाही. सरकारने आपल्याला पेन्शनचे व अन्य योजनांचे लाभ मिळवून द्यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. स्थानिक नेत्यांनी केवळ निवडणुकीपुरते येऊन विचारपूस न करता महिना पाचशे रुपये पेन्शन मिळेल, अशी योजना सुरू करून दिली तर त्यांचे उपकार मरेपर्यंत मी विसरणार नाही, असे सांगताना त्या ओल्या डोळ्यांना पदर लावतात.

स्वाभिमानी जीवन
आपल्या पूर्वीच्या जुन्या छोट्या खोलीत भीमाबाई संघर्षपूर्ण जीवन जगत आहे. दहा फुटावर समोरच मुलगा व सून राहते. पण स्वाभिमानी भीमाबाई कोणाला त्रास नको म्हणून पती किंवा मुलाकडे न राहता एकट्याच राहतात. अंध असल्याने त्यांना पोळ्या करणे जमत नाही. मात्र, त्या भाकरी करू शकतात. शेजारी चूल पेटवतात. भाजी स्वतःच करतात. दिसत नसल्याने कधी कधी भाकरी करपून जाते. साखरेची जागा माहित झाल्याने त्यांना पाहुण्यांना चहा करता येतो. भाजीपाला, किराणा करायला जाता येत नाही. मग त्या गावातील लहान पोरांना खाऊसाठी रुपया देऊन त्यांना किराणा आणायला सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची आज सत्त्वपरीक्षा

$
0
0

करवाढीचा मुद्दा आजच्या महासभेत गाजणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

थकीत घरपट्टी व पाणीपट्टीकडे दुर्लक्ष करून केवळ स्मार्ट सिटी व अमृत योजनेच्या नावाखाली नाशिककरांवर करांचा बोझा टाकण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला कोंडीत पकडण्याची विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. आज, शनिवारी होणाऱ्या महासभेत या विषयांवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपला घेरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारची महासभा ही भाजपसाठी सत्वपरीक्षा ठरणार आहे.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा होत आहे. या महासभेत विकासकामांच्या विविध विषयांसह अंपग कल्याण आराखडा, यांत्रिक पार्किंगचे विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. स्थायी समितीने बुधवारी मालमत्ता करात १८, तर पाणीपट्टी करात पाच वर्षांत १२० टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पडसाद शनिवारच्या महासभेत उमटणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांसोबतच आप, प्रहार या संघटनांनी या करवाढीला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे शनिवारची महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. या करवाढीबाबत भाजपमध्ये मंथन सुरू असून, त्याबाबत शनिवारी सकाळी अकराला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत भाजपची भूमिका स्पष्ट होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच विरोधकांनी भाजपला घेरण्याची तयारी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौतीस कोटींचे विषय घुसडले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पारदर्शक कारभाराचा ढोल बडवून महापालिकेत सत्तेत आलेल्या सत्ताधारी भाजपने सहा महिने होत नाही तोच महासभा नियमावलींची ऐसीतैसी करत पारदर्शक कारभाराला तिलांजली दिली आहे. गेल्या महासभेत साडेसात कोटींची कामे सभा नियमावलीनुसार मंजूर करून घेतल्यानंतर याच महासभेत परस्पर जादा विषयांमध्ये ३४ कोटींचे विषय घुसडून ते मंजूर करून घेण्याचा प्रताप सत्ताधारी भाजपने केला आहे. शिवसेनेने भाजपचा हा अपारदर्शक कारभार चव्हाट्यावर आणला असून, त्या संदर्भात आयुक्तांकडे तक्रार केली आहे. महासभा संपल्यानंतर तब्बल ४१ विषयांना परस्पर मंजुरी घेतल्याने महापौरांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक कारभाराच्या आश्वासनांचे धिंडवडे उडवले आहेत.

विकास आणि पारदर्शक कारभार या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला भाळून नागरिकांनी महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती दिली. मात्र, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विकासापाठोपाठ आता पारदर्शक कारभारालाही तिलांजली दिली आहे. भाजपच्या या अपारदर्शक कारभाराचा सहा महिन्यांत शिवसेनेने बुरखा फाडला आहे. गेल्या महासभेत भाजपने विषयपत्रिकेवर २६८ विषय मंजूर केले होते. यामध्ये अडीच कोटींचे विषय नियमित विषयपत्रिकेत, तर पाच कोटींच्या कामांचे विषय जादा विषयांमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे महासभेत केवळ साडेसात कोटींचेच विषय मंजूर केले होते.

शनिवारी होणाऱ्या महासभेत विषयांची सुरुवात ही ३१६ क्रमांकाने झाली आहे. त्यामुळे २६९ ते ३१५ असे ४१ विषय कधी मंजूर झाले, असा सवाल शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे व माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. भाजपने सभा नियमावलीची पायमल्ली करत धोरणात्मक विषयही सभा संपल्यानंतर मंजूर केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. गटनेते, विरोधी पक्षनेता अथवा सदस्यांना या विषयांची कोणतीही माहिती नसताना ते मंजूर करून भाजपने सभा नियमांचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. विलास शिंदे, सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन मंजूर विषयांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये, अशी मागणी केली आहे. त्यामुळे भाजपचा अपारदर्शक कारभार गोत्यात आला आहे.

धोरणात्मक विषय जादा कसे?

महासभेत साडेसात कोटींच्या विषयांना मंजुरी मिळाली असताना सभागृहाबाहेर मात्र चक्क ३४ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. पाणीबिलांचे आऊटसोर्सिंग, यांत्रिक पार्किंग अशा धोरणात्मक विषयांवर महासभेत चर्चा होणे अपेक्षित असताना केवळ सदस्यांच्या प्रस्तावावर हे विषय मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदस्यांना अंधारात ठेवून परस्पर ३४ कोटींचे विषय मंजूर करण्याची घाई कोणासाठी, असा सवाल शिवसेनेने केला आहे. त्यामुळे महासभेत या विषयांवरून शिवसेनेकडून जाब विचारला जाणार आहे. त्यामुळे या जादा विषयांमधील घुसखोरी ही भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोग्रस येथे बालकाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील श्याम उर्फ कृष्णा सुखदेव माळी या सहा वर्षीय बालकाचा नदीवरील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. तो मित्रांसह गावातील नदीवरील बंधाऱ्याकडे गेला होता.

काही मुले बंधाऱ्यात अंघोळीसाठी उतरली असता कृष्णानेही बंधाऱ्यात प्रवेश केला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. मात्र, तो बुडाल्याची माहिती कोणालाही समजली नाही. बरोबरची मुले घरी निघून गेली, तर कृष्णाचे आईवडीलही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने हा प्रकार उशिरा उघडकीस आला. ग्रामस्थांनी कृष्णाला बाहेर काढत चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. कृष्णाच्या मागे आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक बाजार समिती बरखास्त?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक गैरव्यवहार व अनियमिततेमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर बरखास्तीची टांगती तलवार आहे. बाजार समिती बरखास्तीसंदर्भात जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्याकडे सुनावणी झाली असून, त्यांनी सुनावणीचा अहवाल हा पणन संचालकांकडे पाठविला आहे. त्यात बाजार समिती बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. करे यांच्या चौकशीत अनियमिततेबाबत संचालक समाधानकारक उत्तरे देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात बाजार समिती बरखास्तीचा आदेश निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यमान सभापती शिवाजी चुंभळे यांचे सभापतिपद हे औटघटकेचे ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या क्रीडा स्पर्धा सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

नाशिक जिल्हा ग्रामीण पोल‌िस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर तीन दिवशीय जिल्हा क्रीडा स्पर्धांना गुरुवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेत जिल्ह्यातील आठ उपविभागीय संघ आणि पोल‌िस मुख्यालय संघातील १५० पोल‌िस खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून संधिक व वैयक्तिक क्रिडा प्रकारात खेळाडूंनी सहभागी होऊन यश संपादन केले.

या स्पर्धेचे उद््घाटन ग्रामीण पोल‌िस अधीक्षक संजय दराडे आणि अप्पर पोल‌िस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाले. व्हॉलीबॉलने स्पर्धेला प्रारंभ झाला. पोल‌िस मुख्यालय विरुद्ध मालेगाव विभाग या संघामध्ये झालेल्या सामन्यात पोल‌िस मुख्यालय संघाने विजय संपादन केला. तर दहा हजार मीटर धावण्याच्या अटीतटीच्या सामन्यात सावळाराम शिंदे यांनी प्रथम तर दशरथ पटेल यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

दुसऱ्या दिवशी झालेल्या स्पर्धेदरम्यान जलतरण डायव्हिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पोल‌िस खेळाडू शिरीष चव्हाण प्रथम, तर पोल‌िस उपनिरीक्षक भरत चौधरी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. पाच हजार व पंधरा हजार मीटर स्विमिंग स्पर्धेत दशरथ पटले, सागर आरोटे, भरत खाडे व शिवा वाघ यांनी यश संपादन केले. ५० मीटर फ्री स्टाइल व बेस्ट स्ट्रोक या जलतरण प्रकारात शिरीष चव्हाण, समाधान गवळी, विनोद टिळे, बाळा भोर यांनी यश मिळवले. कुस्तीत विविध वजनी गटात बापूराव पगारे, योगेश यंदे, शत्रुघ्न राठोड, श्रीराम वारुंगसे ,रामदास शिंदे,सचिन पिंगळे यांनी वैयक्तिक यश संपादन करून कुस्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

महिला पोल‌िस कर्मचाऱ्यांनीही यात भाग घेतला. गोळाफेक प्रकारात न‌िता पटेकर यांनी प्रथम तर कांचन ठाकरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात खेळाडू संदीप चौधरी प्रथम व राजू मनोहर‌ द्वितीय आले.

यावेळी पोल‌िस उपअधीक्षक दिलीप पगारे, उपविभागीय पोल‌िस अधीक्षक अतुल झेंडे, दिलीप गीऱ्हे, राखीव पोल‌िस निरीक्षक एन. बी. भदाणे, एस. एम. यादव, क्रीडा प्रशिक्षक समाधान गवळी यांच्यासह पोल‌िस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आज समारोप

तीन दिवशीय क्रीडा स्पर्धांचा समारोप आज शनिवारी (दि. १९) कवायत मैदान, ग्रामीण पोल‌िस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत यावेळी उपस्थित राहणार आहे. यावेळी बक्षीस वितरण समारंभही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् सर्वांचेच डोळे पाणावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनेक विद्यार्थ्यांना लहान वयापासून आई किंवा वडिलांच्या प्रेमाला पारखे व्हावे लागलेले. उच्च शिक्षणाची चिंता दहावीचा अभ्यास करीत असल्यापासूनच सतावत होती. या कार्यक्रमात आल्यावर आपल्याला किती रक्कम मिळणार यापेक्षा समाजाने आपल्यावर इतका मोठा विश्वास टाकला आहे, याची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली होती. जसजशा भावना या विद्यार्थ्यांनी मोकळ्या करण्यास सुरुवात केली तसतशी त्यांच्या मनातील कालवाकालव समोर आली. बोलायचे खूप आहे, सांगायचे खूप आहे, पण कंठ दाटून आल्याने तोंडून शब्द बाहेर पडणेही कठीण व्हावे, अशी निर्माण झालेली परिस्थिती यावेळी प्रत्येकाच्याच हृदयाला स्पर्शून गेली अन् उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

--

आम्हीही पुढे येऊ...
मटा हेल्पलाइनने आम्हाला गरजू व्यक्तींसाठी मदतीचा हात देण्याची शिकवण दिली आहे. आमच्या गरजेच्या काळात समाजाकडून मिळालेले पाठबळ अतुल्य आहे. त्याची परतफेड आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर नक्कीच करू... शाळेचे वय संपवून कॉलेजच्या दिशेने प्रवासास निघालेल्या केवळ पंधरावर्षीय मुलांनी समाजाप्रति व्यक्त केलेल्या या भावनांनी या उपक्रमास आर्थिक मदत केलेल्या दानशूरांचा ऊर भरून आला. आपण केलेली मदत अतिशय योग्य ठिकाणी पोहोचली आहे अशी भावना त्यांच्यात निर्माण झालीच शिवाय, विद्यार्थ्यांची परतफेड करण्याची भावना ऐकून टाळ्यांच्या गजरात त्यांनी प्रोत्साहन दिले.

०००

यंदाचे शिलेदार म्हणतात...

--

करिअरमध्ये भरारी हीच परतफेड

माझे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आर्थिक मदत होतेय यासाठी ‘मटा’चा खूप ऋणी आहे. माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मला समाजाकडून झालेल्या मदतीची परतफेड करताना माझ्या करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेऊन त्याची पावती देईन. माझ्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

-आदित्य जाधव

मदत लावणार सार्थकी

मला इंजिनीअर व्हायच आहे. शिक्षणाच्या जोरावर खडतर आयुष्यावर मला मात करायची आहे. माझ्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी ‘मटा’ने मला मोलाची मदत केली आहे. ही मदत नक्कीच सार्थकी लावेन. उत्तुंग यशासाठी साथ देणाऱ्या ‘मटा’ची आभारी आहे.

-दीपाली वरघडे

वाटचालीसाठी मोलाची मदत

मला आयएसएस अधिकारी बनायचे आहे. या स्वप्नाची खडतर वाट पार करण्यासाठी ‘मटा’च्या माध्यमातून नाशिककरांनी मला दिलेले आर्थिक बळ समाजाच्या नवीन विद्यार्थ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा बघून मला अश्रू अनावर होत आहेत. ही मदत माझ्या भविष्याच्या वाटचालीसाठी अत्यंत मोलाची आहे.

-सोनाली कुंवर

पंखांत भरल नवे बळ

माझ्या शिक्षणासाठी पालकांनी केलेले जिवाचे रान आज खऱ्या अर्थाने फळास आले आहे. ‘मटा’ने आमची दखल घेत पंखांत नवे बळ भरल्याने आज गहिवरून आले आहे. मला सीए व्हायचे आहे. त्यासाठी मला मिळालेली मदत मोलाची ठरणार आहे. माझ्या उत्तुंग यशात ‘मटा’चा वाटा असणार आहे.

-सचिन गांगुर्डे

पुढील शिक्षणाचा रस्ता सुकर

प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता येईल का, याबाबत माझ्या मनात शंका होती. मात्र ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमाने माझी दखल घेतल्याने आता पुढील शिक्षणाचा माझा रस्ता सुकर झाला आहे. ही मदत माझ्यासाठी अनमोल आहे. या उपक्रमास मनःपूर्वक धन्यवाद देते.

-प्रतीक्षा गायकवाड

दातृत्वशील समाजाला अभिमान

समाजाने अत्यंत महत्त्वाच्या क्षणी पुढे केलेला मदतीचा हात आयुष्यात कधीही विसणार नाही. दातृत्वशील समाजाला मला अभिमान आहे. समाजाचे हे ऋण फेडणे अत्यंत कठीण आहे. मात्र, माझे शिक्षण पूर्ण जिद्दीने आणि मन लावून पूर्ण करेन. ‘मटा’ आणि दात्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.

-गौरी जाधव

आधाराने काढली उणीव भरून

प्रतिकूल परिस्थितीमुळे गुणवत्ता असूनही माझे हात आज घेणाऱ्यांमध्ये आहेत. पण, भविष्यात माझ्या करिअरमध्ये यश मिळवून माझ हात गरजूंना देण्यामध्ये, त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी असतील. दहावीत ९१ टक्के गुण मिळवूनही माझ्या मनात आर्थिक पाठबळाअभावी आनंद नव्हता. ‘मटा’ने दिलेल्या आधाराने ही उणीव भरून काढली गेली.

-धनश्री राजोळे

शिक्षणाची वाढविली उमेद

घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने उत्तम गुण असूनही मी पुढे शिक्षण घेऊ शकेन का, याविषयी मला शंका वाटत होती. पण, ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमामुळे पुढची वाट सोपी वाटत आहे. आता अधिक उमेदीने शिक्षण पूर्ण करू शकेन. आमच्या भविष्याला एक आशेचा किरण आणि भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल ‘मटा’च्या उपक्रमाचे आभार मानते.

-सोनिका चिंचोले

मदतीचा करणार सदुपयोग

अगदी लहानपणापासून ‘मटा’ अत्यंत आवडीने वाचायचे. हेच वृत्तपत्र माझ्या भविष्याचा आधार होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ची आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांनी केलेल्या मदतीचा नक्कीच सदुपयोग करेन. माझा पहिला पगार मी माझ्यासारख्या गरजवंताला देईन. माझे, माझ्या कुटुंबीयांचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेल.

-पूजा सांगळे

मदत व्यर्थ जाऊ देणार नाही

समाजाच्या दातृत्वातून आम्हाला करिअरची खडतर वाट सुखर करण्याची संधी ‘मटा’ने हेल्पलाइन उपक्रमाद्वारे दिली आहे. संकटाच्या काळात आमच्या मदतीला हा उपक्रम धावून आला. त्यांच्या आणि समाजाच्या पुढाकाराने भावी शिक्षण पूर्ण करू शकेन. ही मदत व्यर्थ जाऊ देणार नाही. करिअरसाठी नक्कीच मटाच्या मदतीचा आम्हाला मोठा फायदा होईल.

-आदित्य नाईक

---

पालक म्हणतात...

--

दहावीपर्यंतचे शिक्षण कसेतरी घेतल्यानंतर पुढील शिक्षणाचा गंभीर प्रश्न होता. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती म्हणून पुढील शिक्षण अत्यंत कठीण होते. पण ‘मटा’तर्फे मिळालेल्या मदतीमुळे चिंता मिटली आहे.

-भाऊसाहेब राजोळे

आम्ही शिकलो नाही तरी आमची मुले शिकून मोठी व्हायला हवीत अशी आमची इच्छा होती. पण, आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने मुलीचे पुढील शिक्षण थांबविण्याचा विचार होता. पण, महाराष्ट्र टाइम्समुळे पुढील शिक्षणास वेळेवर मदत सोबत मानसिक आधारही मिळाला, याबद्दल मटा व वाचकांचे आभार.

-सुरेखा वरघडे

दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती, जी मटा हेल्पलाइनच्या माध्यमाने अगदी वेळेवर मिळाली. या अमूल्य मदतीने समाजाचे देणे सुंदर झाले आहे.

-रुपाली जाधव

शिक्षणाची कसे घ्यावे ही अत्यंत गंभीर समस्या होती. मटाच्या मदतीमुळे आता माझा मुलगा सायन्सचे शिक्षण करू शकेल आणि इच्छेनुसार भौतिकशास्त्राचा वैज्ञानिक बनू शकेल. या उपक्रमाबद्दल मटा व सर्व दानशूरांना धन्यवाद.

-वैशाली नाईक

महाराष्ट्र टाइम्सच्या या मदतीने पुढील शिक्षण सोपे झाले. दहावीनंतर पुढे शिक्षण कसे करायचे असा प्रश्न होता. पण, मटा हेल्पलाइनने याचे निवारण झाले. मटा हेल्पलाइनच्या रुपाने जणू आम्हाला वेळेवर देवच पावला.

-संगीता गायकवाड

शिक्षणासाठी अत्यंत गरजेची आर्थिक मदत मिळाली. मुलाच्या पुढील करिअरसाठी ही मदत अत्यंत मोलाची असेल. आमचा मुलगादेखील मोठा होऊन या उत्तम उपक्रमातून अशी मदत करेल. महाराष्ट्र टाइम्सचे खूप खूप आभार.

-रोहिणी जाधव

मटा हेल्पलाइनच्या पुढील शिक्षणासाठीच्या मदतीमुळे आम्हाला मोठा आधार मिळाला. माझ्या मुलीची इच्छा होती, की तिने सीए व्हावे. ही इच्छा या मदतीने पूर्ण होऊ शकेल. मी महाराष्ट्र टाइम्स आणि सर्व दानशूर वाचकांची आभारी आहे.

-सरला चिंचोले

--

सजग नाशिककर म्हणतात...

--

मला गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याची खूप इच्छा होती. परंतु, योग्य विद्यार्थी कोण याची निवड करता येत नव्हती. मटा हेल्पलाइनच्या माध्यमातून योग्य व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची संधी मिळाली. मटा हेल्पलाइन हे विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचे उत्तम माध्यम आहे.

-प्रशांत पाटील

मटा हेल्पलाइन अतिशय उत्तम असा उपक्रम आहे. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र टाइम्सचे आभार मानतो. या उपक्रमाचा भाग आम्हाला होता आले म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. विद्यार्थ्यांनी स्वतःचे चांगले भवितव्य घडवावे. त्यासाठी आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद.

-वसंत कुलकर्णी

मटा हेल्पलाइन या उपक्रमाचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. यातून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक बळ मिळते. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या पंखांत बळ देण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सचा मोलाचा वाटा आहे.

-अश्विनी भालेराव

मटा हेल्पलाइनच्या या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र टाइम्सने समाजातील हिरे शोधून काढले आहेत. त्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यात महाराष्ट्र टाइम्सचा मोलाचा वाटा आहे. समाज साक्षर होण्यासाठी घेतलेला हा स्तुत्य उपक्रम आहे.

-आशिष कुलकर्णी

मटा हेल्पलाइन या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचे हात या विद्यार्थ्यांना दिले आहेत. विद्यार्थ्यांनीसुद्धा या गोष्टीचे भान ठेवावे आणि आपला व समाजाचा विकास साधावा. महाराष्ट्र टाइम्सचे यातील योगदान अवर्णनीय आहे.

-नीलेश सातपुते

समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. पण, त्यांना दान करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही अन् ते दान चुकीच्या किंवा अयोग्य व्यक्तींच्या हातात जाते. मटा हेल्पलाइन हे मदत करण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ महाराष्ट्र टाइम्सने उपलब्ध करून दिले आहे.

-रामदास अहिरे

महाराष्ट्र टाइम्सने राबविलेल्या मटा हेल्पलाइन उपक्रमाद्वारे खरोखरच अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बळ मिळाले आहे. त्यांच्या या उपक्रमाद्वारे अनेक विद्यार्थ्यांचा आर्थिक पाया मजबूत झाला आहे. त्यांना ध्येयाकडे वाटचाल करण्यास त्याची मदत होईल. ही मदत ज्या दानशूर व्यक्तींमुळे प्राप्त झाली त्यांना माझा सलाम.

-योगेश दुसाने

‘मटा’ने असे उपक्रम पुढेही सुरू ठेवावेत. विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे. म्हणजे या उपक्रमाचे ध्येय साध्य होईल. आम्हीदेखील त्यांच्या मदतीसाठी सदैव तयार आहोत. महाराष्ट्र टाइम्सने राबविलेल्या या उपक्रमामुळे उद्याचा साक्षर नागरिक घडेल व समाजाचा विकास साधेल.

-अमित खराटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजंदारींच्या भरवशावर सुरक्षेचा डोलारा

$
0
0

नाशिक : राज्यातील ४४ बालनिरीक्षण गृहे (रिमांड होम) कधी काळी थेट जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारीत येत होती. यामुळे रिमांड होमची प्रशासकीय कामांना चालना मिळत होती. कालांतराने या संस्था केंद्र सरकारच्या एकात्मिक बालसंरक्षण योजनेत समाविष्ट करण्यात आल्या. यामुळे महत्त्वपूर्ण ठरणारे मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे संस्थाचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. परिणामी, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर या बालकांच्या सुरक्षेचा डोलारा उभा आहे. त्यामुळे हा डोलारा कधीही कोसळण्याची चिन्हे राज्यभरात दिसून येत आहे.

अनाथ आणि विधी संघर्षित बालकांसाठी रिमांड होम्समधील वातावरण पोषक असणे आवश्यक ठरते. बालनिरीक्षण गृहामध्ये एकाच वेळी विधी संघर्षित, तसेच शिक्षण घेणारी मुले एकत्र येत असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. विशेषतः १६ ते १८ वयोगटातील काही मुले व्यसनांच्या अधीन असतात. व्यसन पूर्ण झाले नाही तर ही मुले आक्रमक बनतात. अशा वेळी त्या मुलांचे समुपदेन करून त्यांना मूळ प्रवाहात सहभागी करून घेण्याची जबाबदारी रिमांड होममधील कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागते. दुर्दैवाने केंद्र सरकारच्या एकात्मिक बालसंरक्षण योजनेच्या मार्गदर्शक सूचना, तसेच सरकारच्या प्रचलित नियमांमुळे अशा कर्मचाऱ्यांची वानवा निर्माण झाली आहे. २०१२ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य बालसंरक्षण संस्थेच्या प्रकल्प मंजुरी समितीच्या बैठकीत निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांची पदे भरणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले. यावर कार्यवाही करताना एकात्मिक बालसंरक्षण योजनेच्या सूचनांचा आधार घेण्यास सांगण्यात आले. यानुसार स्वयंपाकीसाठी तीन हजार, मदतनिसासाठी दोन हजार, शिक्षक, कलाशिक्षक, तसेच शिक्षिकेसाठी चार हजार मानधन निर्धारित करण्यात आले. सरकारच्या या जाचक अटींमुळे २०१२ पासून रिमांड होम्समधील भरतीप्रक्रिया पूर्णतः थंडावली आहे. याबाबत बोलताना राज्य रिमांड होम्स फेडरेशनचे अध्यक्ष माधवराव चौघुले यांनी सांगितले, की सरकारच्या या निर्णयाचा वेळोवेळी निषेध करण्यात आला. सर्वच संस्थाचालकांनी या पद्धतीला तीव्र विरोध करण्यात आला. मात्र, त्याचा परिणाम झालेला नाही. रोजंदारी पद्धतीने कर्मचारी नियुक्त झाल्यास गंभीर गुन्हे नावे असलेल्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी ते घेणार नाहीत. याचा फटका थेट मुलांच्या संगोपनावर होतो, असे चौघुले यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये कांदा २५०० रुपये क्विंटल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड येथील बाजार समितीत शुक्रवारी उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली असून, २५०० रुपये उच्चांकी भाव कांद्याला मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते. चांदवड बाजार समितीच्या आवारावर कांद्याच्या बाजारभावात वाढ झालेली असून, आवक स्थिर आहे, असे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी सांगितले.

चांदवड बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी कांद्याची १२,१०० क्विंटलची आवक होऊन बाजारभाव २५०० रुपयांपर्यंत मिळाले, तसेच सरासरी भाव २०१६० रुपये प्रतिक्विंटल मिळाले आहेत. देशांतर्गत व परदेशात महाराष्ट्रातील कांद्यास मागणी वाढल्याने कांदा बाजारभावात वाढ झालेली आहे. बाजारभावात सुधारणा झालेली असली तरी बाजार समितीच्या आवारावरील शेतमालाची आवक स्थिर आहे.

विक्री झालेल्या सर्व शेतमालाचे वजनमाप करून रक्कम तत्काळ रोख स्वरूपात अदा केली जात असल्याचे सभापती डॉ. कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्श जीवनशैली बाळगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
संतुलित आहार, न कंटाळता नियमितपणे केला जाणारा व्यायाम आणि आदर्श जीवनशैलीचे पालन हीच मधुमेही रुग्णांच्या सुदृढ आरोग्याची त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. यशपाल गोगटे यांनी केले.

‘ग्रीन प्लस फार्मसी’ या संकल्पनेचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त शालिमार चौकातील आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गोगटे ‘मधुमेह खरोखरच समूळ नष्ट होऊ शकतो का?’ या विषयावर बोलत होते. मंचावर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद पाटील आणि राज्य फार्मसी कौन्सिलचे सदस्य तथा माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभागृहात उपस्थित नागरिक व मधुमेही रुग्णांना मार्गदर्शन करताना डॉ. गोगटे म्हणाले, की बदलती जीवनशैली, रात्री उशिराचे जेवण, जंकफूड व फास्टफूडची चटक, दुग्धजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन, व्यसनाधीनता यामुळे मधुमेही रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. त्यामुळे मधुमेहापासून दूर राहायचे असेल तर आदर्श जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे.

सहायुक्त पाटील म्हणाले, की आजवर मेडिकल्सचा व्यवसाय हा मार्जिन बेस्ड होता. मात्र, आता त्यांना रुग्णाधारित करावा लागणार आहे. रुग्णांसाठी डॉक्टरांपेक्षा परिचयातील मेडिकल अधिक जवळचे असते. रुग्ण त्याच्याकडे अधिक मनमोकळा संवाद साधून प्रश्न मांडू शकतो. अशा वेळी मेडिकलचालकांनी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दुवा बनावे, असे आवाहनही त्यांनी केले. सुरेश पाटील यांनी ग्रीन फार्मसीची संकल्पना अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगत आपण नेहमीच त्यांच्या पाठिशी राहू, अशी ग्वाही दिली.

मयूर मणियार यांनी सूत्रसंचालन केले. महेश भावसार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लालाजी मोदानी, मंगेश अलई आदी प्रयत्नशील होते. कार्यक्रमापूर्वी बिटको पॉइंट येथील संजय मेडिकल्स आणि अशोका मार्गावरील समर्थ मेडिकल्सचा ग्रीन प्लस फार्मसीच्या रुपात शुभारंभ करण्यात आला.

असे मिळवा मधुमेहावर नियंत्रण
मधुमेही रुग्णांसह सर्वसामान्यांनीही दररोज न चुकता किमान १२ सूर्यनमस्कार काढावेत, नियमित व्यायाम करावा, सायंकाळी ६ वाजेदरम्यान जेवण घ्यावे, व्यसने टाळावीत. बदललेल्या जीवनशैलीमुळे रात्री उशीरा अधिक जेवण घेतले जाते आणि पचनापूर्वीच व्यक्ती झोपतो. अशा न पचलेल्या अन्नाचे उर्जेऐवजी चरबीत रुपांतर होत असते. त्यामुळे एखाद्या दिवशी उशिर झालाच तर पचनास हलका आणि कमी आहार घ्यावा. सकाळचे जेवण परिपूर्ण घ्यावे, असेही डॉ. गोगटे यांनी सांगितले. मधुमेही रुग्णांनी साखर, भात, दुग्धजन्य पदार्थ टाळले पाहिजेत. सलाद हवे तेवढे खाऊ शकता, त्यामुळे कुठला त्रास होत नाही, अशा टिप्सही त्यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या उपचाराचे आरोग्यावर दुष्परिणाम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
आजारावर चुकीचे उपचार केले जात असल्याने व्यक्तीला दुष्परिणाम भोगावे लागतात, असे प्रतिपादन मर्क्युरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. हेमंत चौधरी यांनी केले. दुर्गा बहुउद्देशीय विकास संस्था यांच्यातर्फे झालेल्या ‘जल्लोष स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. चौधरी म्हणाले, की सध्याच्या या धकाधकीच्या युगात कोणताही माणूस ताण तणावाशिवाय जगू शकत नाही. ताण तणावामुळे अनेक आजारांना त्यांना सामोरे जावे लागते, त्यात माणसांचा स्वभावही अनेक आजारांना आमंत्रण देतो. कंबरदुखी, मणक्याचे दुखणे, गुडघेदुखी अशा प्रकारच्या दुखण्याला स्त्रियांना समोर जावे लागते. त्यामुळे आहार आणि व्यायाम यांना जीवनात महत्त्व दिले पाहिजे. तणावामुळे ऍसिडिटीत ९० टक्के वाद होत असते. आहाराद्वारे केवळ १० टक्के अॅसेडिटी वाढू शकते. दुधयुक्त चहा पिणे हेदेखील अॅ‌सेडिटी वाढविण्यास कारणीभूत ठरते. निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टीतून आहार संतुलित करून आरोग्य चांगले ठेवता येते.
डॉ. मनोज मोरे यांनी चांगले आरोग्य राहण्यासाठी सर्व प्रकारच्या आहाराचा नियमितपणे समावेश करण्याचा सल्ला दिला. गायिका गीता माळी आणि मोहित माळी यांनी गायलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गीता माळी प्रस्तुत श्रावणसरींनी भरलेल्या गीतांचा कार्यक्रम झाला त्यात त्यांनी विविध गीतांचे सादरीकरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्नू, दुबे यांचे जंगी स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकचे सायकलिस्ट लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड अशी स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांचे नाशिकमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. रेस अराउंड ऑस्ट्रिया ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय असून नाशिकच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेला आहे.
पाथर्डी फाटा येथील शिवाजी महाराजांना पन्नू आणि दुबे यांनी पुष्पहार अर्पण केले आणि शहरात स्वागतचा स्वीकार केला. यावेळी नाशिक सायकलिस्टचे शैलेश राजहंस, नाना फड, डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. नितीन रौंदळ आणि पन्नू आणि दुबे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. लेफ्टनंट कर्नल पन्नू हे नाशिक आर्टिलरी सेंटरच्या स्पेस सेंटरमध्ये एरोनॉटिकल इंजिनीअर असून ब्रेवेट उपक्रमातून त्यांनी रॅन्डोनर सायकलिस्ट आहेत. तर सुपर रॅन्डोनर सायकलिस्ट असलेले दर्शन दुबे हे मूळ नाशिकचे असून नोकरी निमित्ताने ते बंगळूरू येथे असतात.
‘टीम इंस्पायर इंडिया’चे भारत आणि दर्शन यांनी जगभरातील सर्वोत्तम अल्ट्रा सायकलिस्ट्सशी स्पर्धा करत २२०० किलोमीटरची शर्यत पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ११७ तासांची वेळ असताना ‘टीम इंस्पायर इंडिया’ने केवळ १०० तासात स्पर्धा पूर्ण केली. केवळ ८ महिन्यांचे प्रशिक्षण आणि सरावाच्या बळावर या जोडीने हे यश मिळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मानगरला घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महात्मानगर येथील बंजारा हॉटेल परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी घरातील लॅपटॉपसह एलइडी टीव्ही असा सुमारे ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयंत जगदीश भराडकर (रा. एवर स्माईल अपार्ट., महात्मानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भराडकर कुटुंबीय १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून चोरी केली. घरात घुसलेल्या चोरट्यांनी एलइडी टीव्ही, लॅपटॉप आणि मनगटी घड्याळ असा सुमारे ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अधिक तपास उपनिरीक्षक धनेश्वर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यावसायिकास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दुकानासमोर ठेवलेले बाकडे काढण्याच्या वादातून व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना भांडी बाजारात घडली. या प्रकरणी एका तरुणास पोलिसांनी अटक केली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रशेखर दिगंबर शेटे (रा. रामनगर, गंगापूररोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. शेटे यांचे भांडीबाजारात दुकान आहे. शेटे गुरूवारी (दि. १७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात बसलेले असताना शेजारील व्यावसायिक योगेश संजय निकम (रा. मुरलीधर कोट, रामसेतू, पंचवटी) याने त्यांच्याशी दुकानासमोर ठेवलेल्या बाकड्यावरून वाद घातला. यावेळी बेसावध असलेल्या शेटे यांच्या डोक्यावर योगेशने लोखंडी अँगलने प्रहार केला. यात शेटे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत योगेश निकम यास अटक केली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत जुगारी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिडकोतील अंबड लिंकरोडवरील मोकळ्या जागेत पत्यांवर जुगार खेळणाऱ्या पाच जुगारींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत जुगारात लावलेली रोकड आणि साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये मुंबई जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान खैरनार, मच्छिंद्र कुमावत, रवी जाधव, किरण चित्ते आणि गोपी चौगुले अशी पोलिसांनी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. अंबड लिंक रोडवरील एच. पी. पेट्रोलपंपा शेजारील मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. १६) रात्री पोलिसांनी छापा टाकला असता संशयित पैसे लावून जुगार खेळतांना मिळून आले. अधिक तपास हवालदार हळदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत रिक्षाची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिडकोत अ‍ॅटोरिक्षा चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी दोघा संशयितांविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दातीरनगर भागातील मारूती संकुल येथे राहणारे रवींद्र ज्ञानेश्वर विंचू यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांची सुमारे ९० हजार रुपयांची अ‍ॅटोरिक्षा (एमएच १५ झेड ८९५५) बुधवारी (दि. १६) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असताना किरण उत्तम घुले (रा. रमाबाई आंबेडकरनगर, अंबड) आणि सुनील रामब्रिज यादव (रा. दत्तनगर, अंबड) यांनी चोरून नेली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक म्हात्रे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंनिस’तर्फे आज मूक रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे (अंनिस) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येस २० ऑगस्ट रोजी चार वर्षे होत पूर्ण होत आहेत. मात्र, अजुनही या खुनाचा तपास लागलेला नाही. याविरोधात शनिवारी (दि. १९) शहरात मूक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘अंनिस’तर्फे २० जुलैपासून राज्यभरात ‘जवाब दो’ आंदोलन छेडण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून मूक रॅली काढली जाणार आहे. कॅनडा कॉर्नर येथील व्ही. एन. नाईक कॉलेज ते हुतात्मा स्मारकापर्यंत सकाळी ८ ते ११ यावेळेत ही रॅली होणार आहे. ‘एनएसएस’चे विद्यार्थी व अंनिस कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहेत. डॉ. दाभोळकरांसोबतच डॉ. कलबुर्गी, कॉ. पानसरे यांच्याही मारेकऱ्यांना लवकर अटक करावी. तसेच दोषींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. नाशिककरांनीही या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक ‘अंनिस’तर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीविरोधात एल्गार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या स्थायी समितीने मान्य केलेल्या मालमत्ता व पाणीपट्टी करवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नाशिककरांची विभागवार स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे थेट मोर्चा काढला जाणार आहे. याशिवाय पक्षातर्फे प्रभागांमध्ये जाऊन करवाढीविरोधात जनजागृती केली जाणार आहे.
स्मार्ट सिटी व अमृत योजनेतील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी करांत दरवाढ आवश्यक असल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने घरपट्टीत सुचविलेली १८ टक्के तर पाणीपट्टीत सुचविलेली पंचवार्षिक १२० टक्के वाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. स्थायी समितीच्या बैठकीत नाशिकरांवर लादलेली ही मालमत्ता व पाणी करवाढ अतिशय निंदनीय आहे. सध्या नाशिककर नोटबंदी, महागाई व बेरोजगारी यात झुजत असताना करवाढ करणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे. महापालिका मालकीच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी जवळपास ९०३ मिळकती आहेत. त्या ताब्यात घेऊन त्याद्वारे उत्पन्न कमविण्याचा उत्तम पर्याय असताना नाशिककरांवर करवाढ लादण्यात आली आहे. घरपट्टी लागू नसलेल्या मिळकतींवर कर आकारावा. महापालिकेच्या कर थकबाकीदारांविरोधात वसुलीची मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई केल्यास महापालिकेला फायदा होऊ शकतो. असे विविध पर्याय असताना जनतेच्या खिशाला कात्री लावण्यासाठी करवाढ करण्यात येत आहे. त्यासाठी नाशिककरांची स्वाक्षरी मोहीम राबवून जनतेच्या रागाला वाचा फोडणार आहे. ही स्वाक्षरी मोहीम विभागवार असल्याने त्याच्या सूचनाही संघटनेच्या विभागाध्यक्षांना देण्यात आल्याचे ‘युवक राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.

मनपावर काढणार मोर्चा
शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या करवाढीच्या विरोधात प्रभागवार जनजागृती मोहीम राबवली जाणार असून करवाढ रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे. त्यानंतर थेट महापालिकेवर मोर्चा काढून करवाढीला विरोध केला जाणार असल्याची माहिती ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. पक्षाच्या नगरसेवकांची शुक्रवारी बैठक होऊन महासभेत विषय आल्यास त्याला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images