Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शालेय जागेचे सर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस आणि शाळा व्यवस्थापनाच्या सहकार्याने मध्यवस्तीत असणाऱ्या शाळांकडे उपलब्ध जागेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसमुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, पोलिस उपायुक्त लक्ष्मिकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय देवरे, राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभाग नियंत्रक यामिनी जोशी, तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या शाळांच्या परिसरात बसेसमध्ये विद्यार्थी चढताना व उतरताना होणारी वाहतूक कोंडी व त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्कूल बस नियम २०११ अन्वये कार्यवाही करून गतवर्षीच्या तुलनेत १,३५४ वाहनांचे रुपांतर स्कूल बसमध्ये करण्यात आल्याचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांवर कारवाई करण्याबरोबरच वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

--

वाहन तपासणीतून करवसुली

एप्रिल ते जून या कालावधीत एकूण ४,६३४ वाहने तपासून १,२२१ वाहनचालकांकडून दोन लाखांपेक्षा अधिक कर वसूल करण्यात आला. दीड लाखांपेक्षा अधिकचा न्यायालयीन दंडदेखील करण्यात आला. २०३ वाहनांचे परवाना निलंबन, १४४ अनुज्ञप्ती निलंबन आणि ४३ नोंदणी निलंबन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिटको चौकात वाहनकोंडी

$
0
0

नाशिकरोड उड्डाणपुलाखालील अनधिकृत थांब्याने वाहतुकीस अडथळा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड उड्डाणपुलाखालील रस्त्यातच वाहनचालक वाहने उभी करत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. दोन दिवसांपूर्वी एका खासगी बसच्या चालकाने भररस्त्यात बस उभी करून भाजी खरेदी केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही समस्या आता वाढत असल्याने त्यावर उपाय करून ही वाहनकोंडी सोडविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नाशिकरोडचा बिटको चौक कायम वाहतुकीने गजबजलेला असतो. येथे रिक्षा, फेरीवाले आणि व्यावसायिकांच्या दुकानांपुढे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते. बिटको चौकाच्या सर्व दिशांना रिक्षाचालक बेशिस्तपणे उभे असतात. त्यामुळे नाशिक, जेलरोड, देवळालीगाव किंवा सिन्नरफाटा येथे वळणे अवघड जाते. दोन वर्षांपूर्वी याठिकाणी काही चारचाकी वाहनचालकांवर कारवाई झाली होती. तसेच वाहने पार्किंगसाठी लाईनही मारण्यात आली होती. मात्र आता त्यावर अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या कायम असल्याने तिला तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे.


भाजीबाजाराने समस्या

सावरकर उड्डाणपुलाखाली सुमारे तीनशे भाजी व फळ विक्रेते आहेत. याठिकाणी ताजा भाजीपाला मिळत असल्याने परिसरातील नागरिक मोठी गर्दी करतात. त्यांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावलेली असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. काही ग्राहक थेट भाजी बाजारातच दुचाकी घालतात. या बाजाराला संरक्षक लोखंडी कठडे अनेक ठिकाणी तोडण्यात आले आहेत. त्यामुळे भाजीबाजारात वाहन घेऊन आलेले ग्राहक अचानक महामार्गावर येतात. तसेच पायी आलेले ग्राहकही चुकीच्या ठिकाणाहून रस्ता ओलांडतात त्यामुळेही वाहतूक खोळंबते. याचा त्रास वाहनचालकांना तसेच पायी चालणाऱ्यांनाही होत असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्वचादानाविषयी वाढतेय जागरूकता!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही वर्षांपासून अवयवदानाची चळवळ प्रबोधनाच्या माध्यमातून रुजत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात शहरात सुरू झालेल्या त्वचा बँकेत आतापर्यंत पंधरा व्यक्तींनी त्वचादानासाठी पुढाकार घेतला आहे. दर महिन्याला एक व्यक्ती याप्रमाणे या पंधरा महिन्यांच्या कालावधीत पंधरा व्यक्तींनी त्वचादान केले आहे. नाशिकच्या पातळीवर सध्या मागणीपेक्षा त्वचादान करणारे अधिक असल्याने मुंबई किंवा निकड असलेल्या इतर ठिकाणी त्वचा पुरविण्यात येत असल्याची माहिती प्लास्टिक सर्जन डॉ. राजेंद्र नेहेते यांनी दिली.

रक्तदान, नेत्रदान या चळवळींच्या प्रसाराबरोबरच गेल्या काही वर्षांत अवयवदानाची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक डॉक्टर्स, संस्था पुढाकार घेत आहेत. मात्र, भीतीपोटी किंवा माहितीअभावी अजूनही त्याचे हवे तितके प्रमाण वाढलेले नसल्याने असंख्य गरजू व्यक्तींना त्याचा फटका बसत आहे. त्वचादानाबाबत विचार करता किमान शहर पातळीवर तरी ही बाब समाधानकारक असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी ८ मे २०१६ रोजी नाशिकमध्ये पहिली त्वचा बँक सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत दर महिन्याला एका व्यक्तीची त्वचा या बँकेत जमा होत आहे. कोणत्याही दुर्धर आजाराशिवाय ज्या व्यक्ती मृत झाल्या आहेत, अशा व्यक्तींची त्वचा चार तासांमध्ये या बँकेत दान करता येते. त्वचादानाचे शहरातील प्रमाण सध्यातरी समाधानकारक असल्याचे मत डॉ. नेहेते यांनी वर्तविले. परंतु, एकूण अवयवदानाचा विचार करता मोठी जनजागृती होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

--

जळितांच्या वेदनांवर फुंकर

भाजणे, जळणे अशा घटनांना सामोरे गेलेल्या व्यक्तींच्या वेदनांवर इतर व्यक्तींनी दान केलेली त्वचा फुंकर घालणारी ठरत आहे. जळिताच्या घटनांमधून येणारे अपंगत्व, विद्रुपपणा यामुळे जळिताच्या रुग्णांमधील आत्मविश्वास घटण्याचे प्रमाण मोठे आहे. या घटना घडल्यानंतर पुन्हा मानसिकदृष्ट्या पूर्ववत होण्यास व समाजात मिसळण्यास त्यांचा बराच कालावधी जातो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी त्वचादान मदतकारक ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोतून झाली दोन मुले बेपत्ता

$
0
0

नाशिक : खेळण्यासाठी मैदानावर गेलेली दोघे शाळकरी मुले दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांचे अपहरण करण्यात आले असावे, असा संशय कुटुंबीयांनी पोलिसांकडे वर्तवला आहे. अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रतीक सुधीर साळी (वय १२, रा. सिंहस्थनगर, मोरवाडी) व प्रसाद प्रवीण कासार (वय १२ रा. कृष्णा केबलमागे, मोरवाडी) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. गुरुवारी सायंकाळी दोघे सिंहस्थनगर येथील स्वामी समर्थ केंद्र परिसरातील मैदानावर खेळण्यासाठी गेले होते. परंतु, ते घरी परतलेच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद दिली.

तरुणास मारहाण

नाशिक : मद्यसेवनासाठी तीनशे रुपये दिले नाहीत या रागातून तरुणास मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. गुरुवारी आठ वाजेच्या सुमारास संभाजी चौक परिसरात हा प्रकार घडला. संशयित चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुन्ना उर्फ राजेंद्र बोंबले, राजेंद्र रतन तराळ, किरण रतन तराळ व करण भगवान शिंदे (सर्व रा. म्हसरूळ) अशी संशय‌तिांची नावे आहेत. वडजे गल्लीत राहणारा गौरव बबन पेंढारकर (वय २०) या युवकाने फिर्याद दिली आहे. तो गुरुवारी आठ वाजेच्या सुमारास संभाजी चौकातून पायी चालला होता. चौकात थांबलेल्या चौघांनी त्याला थांबविले. दारू पिण्यासाठी त्याच्याकडे ३०० रुपयांची मागणी केली. गौरवने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संशय‌तिांनी मारहाण करीत त्याला जिवे मारण्याची धमकी दिली.

मोबाइल, लॅपटॉपची चोरी

उघड्या दरवाजाने घरात प्रवेश करून चोरट्यांनी तीन मोबाइल व लॅपटॉप असा सुमारे २२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. कामगारनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरज शिवाजी गांगुर्डे (रा. पार्वती चौक, घाटोळमळा) यांनी फिर्याद दिली आहे. गांगुर्डे शुक्रवारी दुपारी घरात झोपले होते. चोरट्यांनी घरात प्रवेश करून लॅपटॉप आणि तीन मोबाइल लांबविले.

मोटरसायकलची चोरी

नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, गेल्या काही दिवसांत बुलेटसह पाच मोटरसायकली चोरीस गेल्या आहेत. वाहन चोरट्यांचा पोलिसांनी छडा लावावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

विहीतगाव येथील रोहित एकनाथ कोठुळे हा युवक कामानिमित्त पिनॅकल मॉल परिसरात आला होता. उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात लावलेली त्याची पल्सर मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली. दुसरी घटना कॉलेजरोड परिसरात घडली. इंदिरानगर येथील जलपरी सोसायटीत राहणाऱ्या वर्षा गोविंद पाटील या आरवायके महाविद्यालयात गेल्या होत्या. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची मोपेड चोरट्यांनी चोरून नेली. तिसरी घटना अंबड औद्योगिक वसाहतीत घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ नियुक्त्यांना खो

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीवर राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून अपक्ष सदस्य व माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या नावाची शिफारस केली आहे. परंतु, बग्गा यांनी यापूर्वीच एसपीव्हीचा पंचनामा केल्याने त्यांच्या नियुक्तीला सत्ताधाऱ्यांकडून विरोध केला जात आहे.

स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कंपनीची बैठक येत्या सोमवारी (दि. १४) अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटीत बग्गांची निवड झाली, तर आपल्यासाठी डोकेदुखी ठरेल, असा सूर सत्ताधाऱ्यांमध्ये असल्याने बग्गांच्या नियुक्तीच्या ठरावाला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याची चर्चा आहे. हे वादळ शांत करण्यासाठी कंपनीवर खासदार, आमदारांना घेण्याची खेळी सत्ताधाऱ्यांकडून खेळली जात आहे. महापालिकेतील सत्ताबदलामुळे स्मार्ट सिटी कंपनीतील पदाधिकाऱ्यांमध्येही फेरबदल झाले आहेत. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांची कंपनीवर सदस्यपदी निवड झाली आहे. विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही या कंपनीवर प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. काँग्रेसने गटनेते शाहू खैरे यांच्या नावाची शिफारस केली आहे, तर राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून अपक्ष नगरसेवक गुरुमित बग्गा यांच्या नावाची शिफारस महासभेवर केली होती. गेल्या महासभेत गटनेते गजानन शेलार यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्रही दिले होते. परंतु, त्याला आता महिना लोटला, तरी या पत्राचे अद्यापही ठरावात रुपांतर झालेेले नाही. सत्ताधाऱ्यांकडून या नियुक्त्यांना खो घातला जात आहे.

मनसेच्या सत्ताकाळात स्मार्ट सिटीतल्या एसपीव्ही कंपनीच्या नियमावलीवरून गुरुमित बग्गा यांनी भाजपची कोंडी केली होती. एसपीव्ही ही महापालिकेच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचे सांगत त्यांनी त्यात बदल करण्यास भाग पाडले होते. आता महापालिकेत नेमकी भाजपची सत्ता आहे. त्यामुळे बग्गा व खैरे यांना कंपनीत सदस्य म्हणून घेतले, तर त्यांच्याकडून पुन्हा कंपनीच्या कामांची पोलखोल होण्याची शक्यता आहे. विशेषतः बग्गा यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांमुळे आपली कोंडी होण्याची भीती सत्ताधाऱ्यांना आहे. कंपनीत दोघेही राहिल्यास एकतर्फी प्रस्तावांना त्यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे. महिना लोटूनही दोघांच्या प्रस्तावाचे अद्यापही ठरावात रुपांतर झालेले नाही.


आमदार, खासदारांची वर्णी?

सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना डावलण्यासाठी नवी खेळी खेळण्यावर विचार सुरू आहे. विरोधकांना कंपनीत घेण्याऐवजी आमदार व खासदारांचा यात समावेश करण्यावर विचार सुरू आहे. त्यासंदर्भातील कायदेशीर चाचपणी केली जात असून, त्यासाठी थेट सरकारकडूनच परवानगी घेण्याची तयारी सुरू आहे. नाशिकचे खासदार आणि भाजपचे तीनही आमदारांना या कंपनीत घेऊन विरोधकांचा पत्ता कापण्याची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी विरोधकांनीही न्यायालयीन लढाईची तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाइपरायटरही गेले अन् विद्यार्थी पासही गेला

$
0
0

टाइपरायटरही गेले अन् विद्यार्थी पासही गेला

नाशिक : कॉम्प्युटर येऊन त्याचे प्रस्थ पूर्णपणे निर्माण होईपर्यंत आपले स्थान अबाधित राखणाऱ्या टाइपरायटर युगाची शनिवारी अखेर झाली. सरकारी कार्यालये, घराघरांत पोहोचलेल्या कॉम्प्युटरने काळानुसार आपली पाळेमुळे घट्ट केली, तर दुसरीकडे टाइपरायटरची मुळे तितक्याच वेगाने उखडली गेली. हजारो टायपिंग इन्स्टिट्यूट्सबरोबरच ग्रामीण भागांमधील विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार आहे. टायपिंगच्या मॅन्युअल अभ्यासक्रमासाठी मिळणारा राज्य परिवहन महामंडळाचा विद्यार्थी पास सुधारित कॉम्प्युटर टायपिंग अभ्यासक्रमासाठी मिळण्याविषयी कोणतीही तरतूद नसल्याने संबंधित गरजू विद्यार्थी या अभ्यासक्रमापासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत.

ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या साधारण विद्यार्थ्यांचा टायपिंग क्लास लावण्यामागील दृष्टिकोन गेल्या अनेक वर्षांपासून भविष्यात सरकारी नोकरी मिळविणे हाच असे. त्यामुळे दहावी, बारावीनंतर प्रामुख्याने या भागातील विद्यार्थ्यांचा टायपिंग, शॉर्ट हँड अशा अभ्यासक्रमांकडे मोठा कल असे. आर्थिकदृष्ट्याही या अभ्यासक्रमांची फी भरणे, तसेच विद्यार्थी पासचे साहाय्य यामुळे हे शिक्षण घेणे त्यांच्यासाठी अत्यंत सुकर होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. टाइपरायटरवरील टायपिंग क्लाससाठी सहा महिन्यांसाठी बाराशे ते पंधराशे रुपये फी घेतली जात असे, तिथे आता कॉम्प्युटर टायपिंग अभ्यासक्रमासाठी सहा महिन्यांसाठीच ४७०० रुपये फी घेतली जाणार आहे. शिवाय, विद्यार्थी पास योजनाही लागू नाही. या मुलांना रोजच्या प्रवासाचा खर्च व वाढीव फीचा खर्च परवडणारा नसल्याने शिक्षण घेण्याची इच्छा असूनही अशा विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होण्याची व त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील केंद्रातून विद्यार्थी पास देण्याविषयीचे असे पत्र टायपिंग इन्स्टिट्यूट्सला मिळाल्यास ही सवलत मिळू शकेल, तसेच सरकारी व्यवस्थेने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, असे मत यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.

--

टाइपरायटरचा प्रवास भंगार बाजाराकडे

अनेकांनी आठवणीत राहण्यासाठी म्हणून टाइपरायटर आपल्याकडे संग्रही ठेवले आहेत. मात्र, याचे प्रमाण अत्यंत थोडे आहे. उर्वरित टाइपरायटरचा प्रवास आता भंगार बाजाराकडे होत आहे. एक एक मशिन मेहनतीने घेतलेल्या संस्थांना हा बदल सहन करणे भावनिकदृष्ट्या कठीण जात आहे. परंतु, या बदलाची गरज ओळखत त्याचे स्वागतही त्यांच्यावतीने करण्यात येत आहे.

--

आजच्या स्पर्धेच्या युगात कॉम्प्युटरचे ज्ञान प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा बदलांचा स्वीकार करायलाच हवा. परंतु, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मॅन्युअल टायपिंगला विद्यार्थी पासची सुविधा होती, ती आतादेखील पुरविल्यास या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल. जास्तीत जास्त विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊन कॉम्प्युटरचे ज्ञान मिळविण्याचा उत्साह दाखवतील, जो आता कुठेतरी कमी पडतो आहे.

-मानसी देशमुख, प्राचार्या, दांडेकर टेक्निकल इन्स्टिट्यूट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मविप्र’साठी आज मतदान

$
0
0

जिल्हाभरातील मतदान केंद्रांवर यंत्रणा सज्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा विद्या प्रसारक या शिक्षण संस्थेसाठी यंदा अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या निवडणुकीकरिता आज (दि. १३ ऑगस्ट) मतदान होणार आहे. जिल्हाभरातून सुमारे साडेदहा हजार सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उद्या (दि. १४ ऑगस्ट) मविप्रच्या प्रांगणातील जिमखाना परिसरातच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक मंडळाने दिली. आज सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हे मतदान होणार आहे.

मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयावर २०१७ ते २०२२ या पंचवार्षिक कालावधीकरिता सत्तेचे निशाण रोवण्यासाठी सत्ताधारी प्रगती पॅनल आणि विरोधी समाज विकास पॅनलने सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचार थंडावल्यानंतरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साम, दाम, दंड आणि भेद या चतु:सूत्रीचा उपयोग होत असल्याच्या चर्चा मविप्रच्या वर्तुळात मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत रंगल्या. दरम्यान, दिवसभर जिल्हाभरातील केंद्रांना आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा मध्यवर्ती कार्यालयातून निवडणूक मंडळाव्दारे करण्यात आला.

५५० कर्मचारी आणि ४३ बूथ

मविप्रसाठी १० हजार १४७ हजार सभासद आहेत. सेवकांची संख्या ४६४ आहे. याप्रमाणे एकूण १० हजार ६११ सभासद आहेत. जिल्ह्यात पंधरा तालुक्यांमध्ये १३ मतदान केंद्रांवर ४३ बूथची रचना करण्यात आली आहे. यातील दोन बूथ हे सेवकपदासाठी होणाऱ्या मतदानाकरिता आहेत. आजच्या मतदानाकरिता ५५० कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण २१ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वाधिक सभासद असलेल्या निफाड तालुक्यात १२ बूथ, तर अल्प सभासद असणाऱ्या इगतपुरी, नांदगाव आणि येवला तालुक्यात प्रत्येकी एका बूथची व्यवस्था केली आहे.

असे असतील मतदान केंद्र

या मतदानास आज, रविवारी सकाळी ८ वाजता सुरुवात होऊन दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. नाशिक मनपा क्षेत्रासाठी गंगापूर रस्त्यावरील मराठा हायस्कूल, महापालिका क्षेत्रातील २० गावे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी अभिनव बालविकास मंदिर, सेवक सभासद मतदारांसाठी शिवाजीनगर येथील केआरटी कॉलेज, निफाड तालुक्यासाठी कर्मवीर गणपतदादा मोरे कॉलेज, इगतपुरीसाठी कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कॉलेज, कळवण व सुरगाण्यासाठी मानूर आर्ट, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, चांदवड तालुक्यासाठी जिजाबाई गुंजाळ कॉलेज, दिंडोरी आणि पेठसाठी दिंडोरीतील जनता इंग्लिश स्कूल, नांदगाव तालुक्यासाठी नांदगांव आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, सटाण्यासाठी कर्मवीर आबासाहेब सोनवणे तथा ना. म. सोनवणे कॉलेज, मालेगाव तालुक्यासाठी सोयगावचे आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, सिन्नर तालुक्यासाठी जीएमडी आर्ट, बी. डब्ल्यू. कॉमर्स या मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

लक्षवेधी लढती

मविप्रच्या घटनेतील केंद्रस्थानच्या म्हणजेच सरचिटणीसपदाच्या मुख्य लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार आणि विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे यांच्यात होणारी ही दुरंगी लढत चर्चेचे मध्यवर्ती केंद्र आहे. अध्यक्षपदासाठीही तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये विद्यमान अध्यक्ष व माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, डॉ. तुषार शेवाळे आणि भास्कर पवार यांच्यात लढत होत आहे. यामध्ये सोनवणे आणि डॉ. शेवाळे हे दोन्ही उमेदवार कसमादे पट्ट्यातील आहेत. सभापतिपदासाठी माणिकराव बोरस्ते आणि दिलीपराव मोरे यांच्यात, उपसभापतिपदासाठी राघो आहिरे, रवींद्र पगार, भगवंत बोराडे, रामदास गायकवाड यांच्यात तर चिटणीस पदासाठी नानासाहेब बोरस्ते व डॉ. सुनील ‌ढिकले यांच्यात लढत होत आहे. याशिवाय उर्वरित तालुका सदस्य पदासाठीच्या लढतीवर प्रत्येक तालुक्याचे लक्ष लागले असून, एकेक जागेसाठी दोन्हीही पॅनलने जोरदार फिल्डिंग लावली आहे.

सोमवारी मतमोजणी

रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडल्यानंतर उद्या (दि. १४ऑगस्ट) मविप्र आवारातील जिमखाना परिसरात मतमोजणी होणार आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् त्यांना मिळाला शिक्षणाचा अधिकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

केवळ पुढच्या वर्गात जाण्यासाठी फी भरायला पैसे नसल्याने शाळाबाह्य झालेल्या दहा मुलींना निफाड पंचायत समितीचे सदस्य संजय शेवाळे व गटविकासधिकारी सरोज जगताप यांनी तातडीने पुन्हा शाळेत दाखल केले आहे. त्यामुळे या मुली आता पुन्हा शालेय वातावरणात आल्या आहेत. त्या सर्व सहावीत शिक्षण घेत आहेत.

पहिली ते दहावीपर्यंत सर्व स्तरातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा देण्यात येते. मात्र केवळ फी भरली नाही म्हणून मुलींना श‌िक्षण हक्कापासून वंचित रहाण्याचा प्रकार विंचुर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत घडला. पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे यांनी गटशिक्षणअधिकारी सरोज जगताप यांना विंचुर येथील पटसंख्येबाबत शाळाबाह्य मुले असल्याची माहिती दिली. त्यानुसार जगताप यांनी प्राथमिक शाळेतील पाचवीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कोणत्या शाळेत गेले याची माहिती मागितली. तेव्हा दहा विद्यार्थी कोणत्याच शाळेत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या विद्यार्थ्यांची माहिती घेतली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर जगताप यांनी इंदिरानगर येथील वस्तीकडे धाव घेतली.


…म्हणून सोडले शिक्षण

आम्ही गावातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात गेलो. परंतु तेथे आमच्याकडून फी मागितली. आमची परिस्थिती नसल्याने आम्ही प्रवेश घेतला नाही, असे मुलांच्या पालकांनी सांगितले. तेव्हा गटशिक्षणाधिकारी जगताप यांनी त्या महिलांना संबंधित शाळेत बोलावले. मुख्याध्याकांच्या समोर त्या महिलांनी आमच्याकडे फी मागितली असे सांगताच जगताप यांनी मुख्याध्यापकांना धारेवर धरले. तसेच या मुलींना शाळेत प्रवेश द्यायला सांगितले. जहीर फारुख शहा, अमीन मोहम्मद शेख, सुनीता कचरू पवार, मनीषा अनिल शिंदे, काशी शिंदे, मोहसीन शहा, प्रीती पवार, पूनम पवार, सोनाली सोनवणे, ओमकार जाधव ही मुले शाळाबाह्य घली होती. ही सर्व मुले आता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे सहावी ड व ई मधे शिक्षण घेत आहेत.

आठवीपर्यंत मुलांना व बारावीपर्यंत सर्व मुलींना शिक्षण मोफत आहे. त्यामुळे कोणत्याही पालकाने फी अभावी मुलांना शाळेतून काढू नये.

सरोज जगताप, गटशिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वायफाय नावालाच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसमध्ये ग्राहकांना मोफत वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेतला. निर्णय झाल्यावर अनेक बसेसमध्ये वायफायचे इन्स्ट्रमेंट बसव‌िण्यात आले. परंतु प्रवाशांना वायफाय सेवा मिळत नसल्याची प्रवाशांची ओरड आहे. एसटी बसमध्ये वायफाय सेवा सुरू असल्याचे जाहिरातींचे फलक नावालाच असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.

एसटीत वायफाय सेवा सुरू करून प्रवाशांना आकर्षित करण्याचा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा प्रयत्न आहे. बसेसमध्ये कार्यान्वित करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर सोपवण्यात आली, त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कॉईन बॉक्सच्या जमान्यात मोठा गाजावाजा करत एसटीने बसेसमध्ये कॉईन बॉक्स बसवले होते. परंतु कॉईन बॉक्सवरून किती कॉल्स लागले हा संशोधनाचा विषय आहे.

सध्या वायफायच्या जमान्यात बसेसमध्ये वायफायची इन्स्ट्रमेंट लावून प्रवाशांना आकर्षित करण्याचे गाजर दाखवले आहे. शिवाय वायफाय नेटवर्क आपल्या मोबाइलसाठी कसे कार्यान्वित करावे, यासाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. मात्र बहुतांश बसमध्ये ही सेवाच सुरू होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर-चांदवड बस वर्षभरापासून बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सायखेडा येथील गोदावरी नदीवर असलेला धोकादायक पूल अवजड वाहनांसाठी बंद केल्यामुळे गेल्या वर्षभरापासून सिन्नर-चांदवड ही बस बंद आहे. यामुळे सिन्नर-निफाड व निफाड-चांदवड असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. करंजगाव व नांदूरमध्यमेशवेर हे दोन पर्यायी मार्ग असूनही महामंडळ ही बस सुरू करीत नसल्याने प्रवाशी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सिन्नर-चांदवड ही बस प्रवाशांची सेवा करीत होती. परंतु मागील वर्षी गोदावरीला महापूर आला. त्यात सायखेडा येथील जुना जीर्ण झालेल्या पुलाला धोका निर्माण झाल्याने या पुलावरून जड वाहने नेण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने बंदी घातली. तसे पत्र या विभागाने पोल‌िस व एसटी महामंडळाला दिले. त्यानंतर महामंडळाची एकही बस गेल्या वर्षभरात या पुलावरून गेलेली नाही. याच नियमामुळे महामंडळाने सिन्नर-चांदवड ही बस रद्द केली. ही बस बंद होऊन वर्ष उलटले तरी कोणीही राजकीय नेतृत्वाने याची दखल घेतली नाही. ही बस रद्द झाल्याने निफाड व परिसरातून सिन्नर चांदवडकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. चांदवडला जाण्यासाठी निफाडहून एकही बस नाही. चांदवडला जायचे असेल तर निफाड येथून लासलगाव व तेथून चांदवड असा लांबचा व खर्चिक मार्ग अवलंबवा लागतो.

निफाडला कोणी वालीच नाही!

निफाडचे प्रवासी विविध बसेसच्या मागणीसाठी सातत्याने मागण्या करीत असतात. निफाड रेल्वेस्थानक येथे विशिष्ट रेल्वे थांबवाव्या यासाठी निफाडचे रेल्वे प्रवासी मागण्या करीत असतात. परंतु याप्रश्नी राजकीय नेते कुठलाही उत्साह दाखवीत नसल्याने निफाडकरांमध्ये संताप आणि नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजदेरवाडीच्या सौंदर्याला स्वच्छतेची किनार

$
0
0

पर्यटनस्थळ करण्याचे ग्रामस्थांचे प्रयत्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चांदवडपासून साधारण १० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजदेरवाडी गावात पावसाळ्यात जाणे हा आनंददायी अनुभव आहे. सातपुड्याच्या राजदेर, कोळदेर आणि इंद्राई किल्ल्याचे सौंदर्य, डोंगररांगांमध्ये कोसळणारे धबधबे आणि हिरवागार निसर्ग हे सर्व अद्भुत चित्र इथे अनुभवायला मिळते. हे सौंदर्य जपताना गावाला स्वच्छ, सुंदर पर्यटनस्थळ करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्नातून सुरू केला असून त्याला यशही येत आहे.

साधारण चौदाशे लोकसंख्येच्या या गावात २७० घरे आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गावाला पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्यासाठी गाव हागणदारीमुक्त करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला. घराघरात शौचालय उभारण्यात आले. उर्वरित नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयाची सुविधा करण्यात आली. गतवर्षी गाव हागणदारीमुक्त झाले. केवळ शौचालयापुरती स्वच्छता मर्यादित न ठेवता सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीनेदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. कचऱ्याचे रुपांतर खतात करण्यासाठी एकूण १९ ठिकाणी घनकचरा नाडेप खड्डे तयार करण्यात आले आहेत. गावात गाई-म्हशींची संख्या अधिक असल्याने चांगले शेणखत तयार करण्यासाठी या खड्ड्यांचा उपयोग होतो.

शोषखड्ड्यांचा प्रयोग

सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी नळ कोंडाळ्याच्या ठिकाणी शोषखड्डे बांधण्यात आले असल्याने सांडपाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. काही घरांभोवती सांडपाण्याच्या माध्यमातून परसबागा फुलविण्यात आल्या आहेत. गावात प्लास्टिकमुक्तीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तत्कालीन विस्तार अधिकारी भूपेंद्र बेडसे, विस्तार अधिकारी डी. जी. सपकाळे आणि ग्रामसेवक भागवत सोनवणे यांनी ग्रामस्थांसोबत प्रामाणिक प्रयत्न केल्याने गावाच्या विकासाला गती मिळाली आहे.

अनेक पुरस्कार प्राप्त

गावाने सामूहिक कामगिरीच्या बळावर निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन आदी पुरस्कार मिळविले आहेत. नुकताच तालुका स्तरावरील स्मार्ट ग्राम पुरस्कारदेखील ग्रामपंचायतीने मिळविला. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्याचे प्रयत्न होत आहेत. नुकतीच गावाची निवड वनपर्यटन स्थळ म्हणूनही झाली आहे. ग्रामस्थांचे एकत्रित प्रयत्नांमुळे गावाची वेगाने वाटचाल होत आहे.

ई लर्निंगची सुविधा

गाव स्वच्छ करण्याबरोबरच ते विकसित होण्यासाठी ग्रामस्थ एकत्रित प्रयत्न करीत आहेत. ग्रामपंचायत इमारतीतील विश्रामकक्ष इथल्या सुंदर निर्मितीचे जणू प्रतीकच आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून जिल्हा परिषद शाळेत ई-लर्निंगच्या सुविधेसोबतच शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. ग्रामपंचायतीतील माती परिक्षण युनिट, वायफाय सुविधा, एसएमएस सुविधेद्वारे ग्रामस्थांना दिली जाणारी माहिती, गावातील सौर दिवे गावाच्या विकासाची साक्ष देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकच्या अतिक्रमणाबाबत नगरसेवकांची आज सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वरच्या नगरसेवकांनी शासकीय जागांवर अतिक्रमण केल्याबाबत गत पंधरवड्यात विधानपरिषदेत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित चार नगरसेवकांचे अतिक्रमण काढून त्यांच्यावर महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ (ई) नुसार संबंधित नगरपरिषद सदस्य यांच्यावर जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही प्रस्तावित असल्याचे सांगितले. याबाबत आज (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार असून, त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येथील श्रमजीवी संघटनेने ११ नगरसेवकांनी त्र्यंबकला अतिक्रमण केल्याचे पत्र दिले होते व त्यावरून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्‍णन बी. यांनी नगरसेवक विजया लढ्ढा, शकुंतला वटाणे, योगेश तुंगार आणि रवींद्र सोनवणे या चार नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. यामध्ये मुख्याधिकारी त्र्यंबक नगरपालिका यांनी दिनांक १८ जुलैला पाठविलेल्या अहवालात त्र्यंबकमधील चार नगरसेवकांचे अतिक्रमण काढून टाकल्याचे म्हटलेले आहे. या कारवाईवर या चारही नगरसेवकांना म्हणणे मांडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासमोर आज (दिनांक १४) दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरस्वती पॅनलला एकहाती सत्ता

$
0
0

कळवण एज्युकेशन सोसायटी निवडणूक

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत श्री सरस्वती पॅनलने सर्व बारा जागांवर विजय मिळवत पुन्हा संस्थेची सत्ता प्राप्त केली. नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाच्या बैठकीत कळवण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी अॅड. शशिकांत पवार, उपाध्यक्षपदी डॉ. रावसाहेब शिंदे व सरचिटणीसपदी बेबीलाल संचेती यांची एकमताने निवड करण्यात आली.

कळवण एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त कार्यकारी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळात मतदान झाले. त्यात ८३३ पैकी ७४८ आजीव सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी साडेचार वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कळवण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री सरस्वती पॅनलने बाराही जागांवर विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवली. दोन्ही अपक्षांना पराभवाचा सामना करावा लागला.

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत विश्वस्त मंडळाच्या १२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. कळवण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमान विश्वस्त सुमन देवरे व अरुण पगार यांना पराभव पत्करावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. विजय जुन्नरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. देवेंद्र सोनवणे, उपप्राचार्य एन. के. आहेर यांनी काम पाहिले.

विजयी उमेदवार

अॅड. शशिकांत पवार (५८६), बेबीलाल संचेती (५७४), डॉ. रावसाहेब शिंदे (५९३), रघुवीर महाजन (५५६), विश्वनाथ व्यवहारे (५१९), भूषण पगार (६४४), बाबुलाल पगार (६३२), सुनील महाजन (६०४), सुधाकर पगार (६२०), राजेंद्र भामरे (५३३), हेमंत बोरसे (६२९), रमेश पगार (५४५) विजयी झाले.

वार्षिक सभा

कळवण एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त कार्यकारी मंडळासाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अनेक दिवसानंतर होणारी निवडणूक व वार्षिक सर्वसाधारण सभा गाजणार अशी चिन्हे असताना निवडणूक व सभा शांततेत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात केवळ ‍४२ आधार सेंटर्स

$
0
0

शंभर सुविधा केंद्रांची गरज; नागरिकांची गैरसोय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार नोंदणीसाठी जिल्ह्यात कंत्राटदार संस्थांचा ठेका संपला असून ही जबाबदारी महाऑनलाइनकडे सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थ‌ितीत १४० केंद्रांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ ४२ केंद्रच सुरू आहेत. त्यामुळे आणखी १०० आधार सेंटर्सची आवश्यकता असून, त्याअभावी आधार नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते आहे.

जिल्ह्यात आधार नोंदणीची जबाबदारी दोन संस्थांकडे सोपविण्यात आली होती. त्यापैकी एका संस्थेचा ठेका संपला असून, आता पूर्ण राज्यातच आधार कार्डसाठी महाऑनलाइनला ठेका देण्यात आला आहे. येत्या काळात याबाबत स्वतंत्र केंद्रचालक नेमण्यापेक्षा सरकारी कार्यालयांमध्येच आधार नोंदणी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे.

तसेच या केंद्रांमधील कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये वाटून देण्यात येणार आहे. सद्यस्थ‌ितीत महाऑनलाइनच आता आधार कार्डासाठी केंद्रचालक नियुक्त करीत आहे.

सेंटर्स वाढवावेत

बहुतांश केंद्रचालक जुनेच असून त्यांनाच आधारचे किटही दिले जात आहे. परंतु, ही नोंदणी थेट युआयडी करीत आहे. परिणामी, दिवसभरात एखाद-दूसऱ्या केंद्राचेच अॅक्टिवेशन होत असून, आधारनोंदणी, त्यातील दुरुस्तीलाही अडचणी येत आहेत.

सध्या १४० केंद्रांची आवश्यकता असली तरी ४२ केंद्रच कार्यरत आहेत. एकीकडे सरकार ठिकठिकाणी आधार लिंकिंगची सक्ती करीत असताना आधार कार्डच मिळत नसल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. तरी प्रशासनाने तातडीने या आधार सेंटर्सना सुरू करून नागरिकांची

समस्या सोडवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणाच्या मंडपाला आकारले भाडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
न्याय मागण्यासाठी लोकशाही व अहिंसा मार्गाने वापरले जाणारे उपोषणाचे हत्यार हे प्रभावी असते. उपोषण शक्यतो सार्वजनिक जागांवर केले जाते. त्यासाठी विविध परवानग्या घेतल्या जातात. मात्र, उपोषणाच्या जागेसाठी भाडे आकारल्याचे फारसे ऐकिवात नव्हते. मात्र, नाशिक महानगरपालिकने एका उपोषणाच्या मंडपासाठी थेट ८४०० रुपयांची फी वसूल केली आहे. पावती देताना मात्र रस्त्यावर सामान ठेवण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे महानगपालिकेचा हा लोकशाहीवरील हल्ला कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
गेल्या २१ दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागातील कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व कार्यकारी अभियंता एस. पी. बांगडी यांना तत्काळ निलंबित करावे या मागणीसाठी मुकेश शिससाठ, किशोर ठोकळ व त्यांचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाची दखल अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नसली, तरी महानगपालिकेने त्यांची दखल घेऊन फी वसूल केली आहे. या फी वसुलीबरोबर महानगरपालिकेने २४ तासांत उपोषणाचा मंडप काढून घेण्याची नोटीसही दिली आहे. त्यामुळे आपला हा उपोषणाचा तंबू वाचवण्यासाठी या उपोषणकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

पहिलाच प्रकार?

उपोषणाच्या जागेचे असे भाडे आकारण्याचा हा लोकशाहीतील पहिलाच प्रकार असावा, असे मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले आहे. असे भाडे आकारले जाऊ लागले, तर स्वतंत्र भारतात लोकशाही राहिली कुठे, असा उद्विग्न प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराबरोबर आता महापालिकेच्या या भाडेपद्धतीवर आंदोलनकर्त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले, तर हे भाडे मनपाला चांगलेच महागात पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘न्यायालयाच्या जागेचे श्रेय सर्वांचे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्हा न्यायालयाची जागा मिळविण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभल्याने हे सर्वांचे श्रेय आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा यांनी केले. ते धुळ्यात जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या 'बेटी बचाव-बेटी पढाव' या संमेलनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्त्री-भ्रूणहत्यासह विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. विजयराव कोतवाल यांच्यासारखे न्यायमूर्ती अद्याप झालेले नाहीत. न्यायमूर्ती होण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. तो त्याग विसरून चालणार नाही. आणि ज्या पदावर असतो त्या पदाचे पावित्र्य प्रत्येकाने जपले पाहिजे, असेही ते म्हणाले. वकिली व्यवसायात बार हा निदर्शक असतो. त्याच्या ऋणात राहता आले पाहिजे. त्यासाठी निष्ठेने काम केले पाहिजे. शहरात रविवारी (दि. ) जिल्हा विधीसेवा प्राधिकरणातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापासून 'बेटी बचाव-बेटी पढाव' फेरी काढून जनजागृती करण्यात आली. या रॅलीत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर शाहू नाट्यमंदिरात 'बेटी बचाव-बेटी पढाव' संमेलनाचा कार्यक्रम झाला.

या संमेलनास औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. सारंग कोतवाल, धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. प्रल्हाद बावस्कर तसेच औरंगाबाद खंडपीठाचे प्रमुख सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे उपस्थित होते. या कार्यक्रमास शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यावेळी जिल्हा न्यायाधीश पी. सी. बावस्कर यांनी न्यायालयीन कामकाजाची माहिती दिली. तसेच न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामासाठी सर्वांचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांचा अॅड. श्यामकांत पाटील तर न्या. पुखराज बोरा यांचा अॅड. रवी देसर्डा, न्यायाधीश पी. सी. बावस्कर यांचा अॅड. अमित दुसाने, अॅड. भिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये नेत्यांनी ठोकला तळ

$
0
0

मविप्र मतदानासाठी रांगा

टीम मटा, निफाड

सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या निफाड तालुक्यात ९३.९३ टक्के मतदान झाले आहे. सकाळपासूनच दोन्ही पॅनलचे नेते निफाडमध्ये तळ ठोकून होते. तसेच, दिंडोरीत ९३.६५ टक्के, इगतपुरीत ९२ टक्के, तर ९३.५६ टक्के मतदान झाले.

निफाडमध्ये ९३.९३ टक्के मतदान

निफाड : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्ह्याचे लक्ष लागून असलेला आणि तालुक्याच्या सर्वाधिक मतदार असलेल्या निफाड मतदान केंद्रात २६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे एकूण सरासरी ९३.९३ टक्के मतदान झाले. सरचिटणीसपदासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेले दोनही प्रतिस्पर्धी उमेदवार मतदान केंद्रावर आपल्या समर्थकांसह तळ ठोकून होते.

सायंकाळी चार वाजेपर्यंत २६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे १७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. मतदान केंद्राबाहेरच प्रगतीची छोटेखानी आभारसभा झाली. यात आमदार आनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर, माणिकराव बोरस्ते, नीलिमा पवार आदींनी मनोगतातून मतदारांचे व निवड समितीचे आभार मानत विजयाचा दावा केला आहे. आज, सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्याचे अवाहनही केले.

निफाड तालुक्यातील मविप्रच्या मतदारांसाठी कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात मतदान केंद्र होते. मतदानासाठी १४ बूथ होते. दिंडोरीकडे लक्ष

दिंडोरी : मविप्र पंचवार्षिक निवडणुकीसाठी दिंडोरीत शांततेत मतदान झाले. एकूण ८३४ पैकी ७८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९३.६४ टक्के मतदान झाले. बूथ क्रमांक २९/ (१) एकूण मतदान २५० पैकी २२७ मतदान झाले. बूथ क्रमांक ३०/(२) मध्ये २५० पैकी २३२ मतदान झाले. बूथ क्रमांक ३१/(३) वर २०० पैकी १९० मतदान झाले. बूथ क्रमांक ३२/(४) मध्ये १३४ पैकी १३२ मतदान झाले.

इगतपुरीत शांतता

इगतपुरी : येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी ९५.७७ टक्के मतदान झाले. १४२ पैकी १३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. समाज विकास पॅनलचे वसंतराव मुसळे व प्रगती पॅनलचे उमेदवार भाऊसाहेब खातळे यांचे नशीब मतदान पेटीत बंद झाले आहे.

सिन्नरमध्ये साथ कोणाला?

सिन्नर : सिन्नर तालुक्यात मविप्रसाठी ९३.५६ टक्के मतदान झाले. एकूण ४३५ पैकी ४०३ मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. समाज विकास पॅनलकडून अशोक मुरकुटे तर प्रगती पॅनलकडून हेमंत वाजे निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे दोन्ही उमेदवारांत काँटे की टक्कर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारसंघाचे उपग्रहामार्फत सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या सर्वेक्षणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्त्रो’ची मदत घेण्यात येणार आहे. सोमवारी (दि.१४) इस्त्रोचे वैज्ञानिक नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षणाबाबतची चर्चा होणार आहे. इस्त्रोमार्फत प्रथमच जिल्ह्यात असे सर्वेक्षण होत असून, त्यामुळे विकासाला वैज्ञानिक आधार मिळेल असा दावा खासदार हेमंत गोडसे यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे. बैठकीला वैज्ञानिक सचिन देवकर, मुख्य व्यवस्थापक वैज्ञानिक कामेश्‍वर राव, तसेच दिल्ली, बेंगळुरू, हैद्राबाद आणि नागपूर येथून अधिकारी नाशिकमध्ये येणार आहेत. नाशिकसाठी जीआयएस अॅप्लिकेशन तयार करण्यात इस्‍त्रोने पुढाकार घेतला असून, मतदारसंघातील विविध विषयांची माहिती त्याद्वारे मिळेल.
तसेच नियोजनबद्ध विकासाला गती मिळू शकेल असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला. याचा लाभ शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक विकास व शहरी तसेच ग्रामीण भागाला होऊ शकेल.

इंजिनीअरिंगच्या प्राध्यापकांना निमंत्रण
बैठकीला सर्व सरकारी यंत्रणांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी के. के. वाघ कॉलेज, गुरू गोविंदसिंग, जवाहर एज्युकेशन सोसायटी, संदीप फाऊंडेशन, सपकाळ कॉलेज, ब्रह्मा व्हॅली, आर. एच. सपट, मेट, सर विश्वेश्वरैया आदि इंजिनीअरिंग कॉलेजांचे प्राध्यापक उपस्थ‌ित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात आज चक्काजाम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे आज, १४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यांत हे आंदोलन होणार आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर सोमवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणाबाबत सुकाणू समितीने गोपनीयता पाळली आहे.

आंदोलनापूर्वी सुकाणू समितीने राज्यभर १० ते २३ जुलै रोजी सभा घेऊन जनजागृती केली. त्यासाठी जिल्ह्यात पत्रकवाटप व बैठकीही घेण्यात आल्या. सरकारच्या धोरणामुळे ४० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार असून, अनेक शेतकऱ्यांना पीककर्जही मिळाले नसल्याचे सुकाणू समितीने म्हटले आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार नसल्याने चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिल्याचे सुकाणू समितीने स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व महामार्ग व सर्व रस्ते जाम केले जाणार असून, जिल्हा सुकाणू समितीतर्फे वेगवगेळ्या ठिकाणी पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे समितीचे राजू देसले यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांना रोखणार

जिल्हा पातळीवर १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजवंदन न करता ते शेतकऱ्यांच्या हस्ते करावे, अशी सुकाणू समितीची भूमिका आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती दिलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना राज्य सरकारचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे ध्वजवंदन शेतकऱ्यांच्या हस्ते व्हावे, यासाठी पालकमंत्र्यांना ध्वजवंदन करण्यापासून रोखणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.

या आहेत प्रमुख मागण्या

- राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे नियमित व थकीत कर्ज माफ करा

- हमी भाव द्या; स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा

- वीजबिल माफ करा; शेतीला मोफत वीज

- निर्यातबंदी उठवा; ‘समृद्धी’साठी बागायती जमिनी घेऊ नका

- शेतकऱ्यांना वृद्धापकाळात तीन हजार पेन्शन मिळावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक विमा योजनेस धुळ्यात ठेंगा

$
0
0

पंकज काकुळीद, धुळे

मराठवाड्यात शेतकरी पीक विम्यासाठी रांगा लावून बसले आहेत. खान्देशात मात्र विपरित परिस्थिती आहे. खान्देशात गेल्यावर्षी जितक्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यापेक्षा निम्मे शेतकऱ्यांनीसुद्धा पीक विमा काढलेला नाही. धुळे जिल्ह्यात गेल्यावर्षी ७२ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र यावर्षी फक्त २४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यातही पीककर्ज घेणाऱ्या २२ हजार शेतकऱ्यांचा सक्तीने विमा काढण्यात आला आहे. अशा परिस्थितीत केवळ ३५ टक्के शेतकऱ्यांनी विमा काढण्यासाठी रस घेतला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त ३५ टक्के आहे. जिल्ह्यात एकही शेतकरी स्वतःहून पीक विमा काढायला तयार नाही. नाईलाजास्तव पीक विमा काढावा लागत असल्याचे शेतकरी सांगतात. गेल्यावर्षी धुळे जिल्ह्याचा दुष्काळी जिल्हा म्हणून घोषित केले गेले असताना फक्त २० कोटी रुपये मिळाले. वास्तविक ही रक्कम १०० कोटींच्या घरात पाहिजे होती. मात्र तसे झालेले नाही.

विमा काढून मिळणार लाभ अत्यंल्प असल्याने धुळ्यातील शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. लाभच मिळणार नसेल तर पीक विमा का काढावा? असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. कृषी आणि महसूल विभागाने चुकीची रंगून ठेवलेली आणेवारी आणि उत्पादनाचे रेकॉर्ड हेच या योजनेला खान्देशात अपयशी करत असलीच असे तज्ज्ञांचे मत आहे. शेतकऱ्यांकडून विम्याची भरभरून रक्कम घेतल्यावर त्यांना देताना मात्र विमा

कंपनीने हात आखडून घेतल्याने शेतकऱ्यांची पंचायत झाली. यावर्षी पुन्हा काही कारण करून विमा कंपनी टोलवून लावेल या विचाराने पीक विमा योजनेला खान्देशातील शेतकऱ्यांनी ठेंगा दाखवला आहे.
तोंडाला पाने पुसणारी योजना

गेल्यावर्षी ६० हजार शेतकऱ्यांचा पीककर्ज घेतानाच सक्तीने पीक विमा काढण्यात आला होता तर उर्वरित शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने विमा काढला. गेल्यावर्षी १२ कोटी रुपयांचा हप्ता भरून धुळ्यातील ७२ हजार शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त २० कोटी रुपये आले. १२ कोटींच्या तुलनेत २० कोटी अधिक वाटत असले तरी सरकारने या १२ कोटी हप्त्यात विमा फरकाची भरलेली रक्कम जोडली तर एकूण पीकविम्याची कंपनीला भरण्यात आलेल्या रकमेपेक्षा कमीच भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. असे असताना कृषी विभाग आपली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानतो आहे. कृषी विभागाची गेल्या आणि चालू वर्षाची पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पहिली तरी ही तफावत लक्षात येईल. पीकविम्याची मुदत वाढवून मिळावी यासाठी अधिवेशनात रणसंग्राम गाजला. सरकारने फुशारकी मारत ५ ऑगस्टपर्यंत पीक विमा योजनेला मुदतवाढ दिली. मात्र धुळे जिल्ह्याला तर पीक विमा योजना तोंडाला पाने पुसणारी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images