Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कांदा बाजारभावात चढ-उतार

$
0
0

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील चित्र

म. टा. वृत्तसेवा, येवला

जुलै महिन्यातील २४ तारखेपर्यंत बाजारभावाबाबत सपाटून मार देणाऱ्या उन्हाळ कांद्याने चार ते पाच दिवसांत उसळी मारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तब्बल चार महिने कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातावर कवडीमोल बाजारभावामुळे एकप्रकारे तुरी देणाऱ्या उन्हाळ कांद्याने गेल्या आठवड्यातील गुरुवारनंतर एकदम मोठी उसळण मारली. तरी, सकाळच्या लिलावात भावाचा आलेख वर, तर दुपारनंतर खाली अशा चढउतारातच कांदा बाजारभावाचा खेळ रंगला आहे.

यंदा लाल कांद्यापाठोपाठ बाजारात आणलेल्या उन्हाळ कांद्यानेदेखील उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाबाबत कमालीचा झटका अन् फटका दिल्याने शेतकरी संकटात सापडला होता. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कांद्याने साथ न दिल्याने गाठीशी पैसाच राहत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. उन्हाळ कांदा एप्रिल महिन्यापासूनच शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणला होता. मात्र पुढे जुलै महिन्याअखेरपर्यंत त्याचा बाजारभाव हजारच्यावर न गेल्याने शेतकऱ्यांच्या समोर ‘अर्थसंकट’उभे ठाकले होते.

असे बदलले भाव

येवला बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात या आठवड्यातील गुरुवारच्या सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल २४६० हा कमाल बाजारभाव मिळाला होता. मात्र, याच दिवसाच्या दुपार सत्रात बाजारभाव पुन्हा खाली येताना उन्हाळ कांदा किमान १२०० ते कमाल २००० (सरासरी १७००) या भावाने व्यापारीवर्गाने खरेदी केला. तर शुक्रवारी मात्र दिवसभर बाजारभाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांची धाकधूक कमी झाली होती. शनिवारी येवला आवारात ४०० ट्रॅक्टर अन् ३५० पिकअप रिक्षामधून एकूण १२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. सकाळच्या सत्रात येथे उन्हाळला किमान १५०० ते कमाल २६७५ (सरासरी २३००) असा बाजारभाव मिळाल्याने ज्यांचे लिलाव झाले त्या शेतकऱ्यांचे चेहरे उजळले होते. दुपारनंतर येथे किमान १२०० ते कमाल २२५० (सरासरी २२००) असा बाजारभाव मिळाला. अंदरसूल उपबाजारातदेखील दुपारनंतर बाजारभावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. अंदरसूल उपबाजार आवारात शनिवारी १० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाडळदे येथे शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पाडळदे येथील कृष्णा नारायण कदम (वय ५५) या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी शनिवारी रात्री विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. कदम यांची तीन ते साडेतीन एकर शेती असून, त्यावर जिल्हा बँकेचे एक ते दीड लाख रुपये कर्ज आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली आहेत.

मुलीची आत्महत्या

मालेगाव ः कलेक्टर पट्टा शरदनगर भागातील दिशा रवींद्र बागूल या १७ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन रविवारी आत्महत्या केली. रविवारी दुपारी घरात कोणीही नसताना तिने स्वयंपाकघरात सिलिंगला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. दिशाचे वडील यंत्रमाग कामगार असून, ती बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा देत होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पावसाची हजेरी

मालेगाव ः शहर व तालुक्यात काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी चांगलीच हजेरी लावली. शहरात सायंकाळी अर्धा तास पाऊस झाला. पावसाच्या आगमनाने नागरिकांची धावपळ उडाली. झोडगे परिसरातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यात ७५ टक्क्यांहून अधिक खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक पोलिस मोडणार यूएईचा विश्वविक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एक हजार ६०८ जणांनी मिळून ‘पुश अप्स’ मारण्याचा विश्व विक्रम संयुक्त अरब अमिरात (युएई) देशाच्या नावे आहे. हा विश्वविक्रम येत्या डिसेंबरमध्ये मोडण्याची तयारी नाशिक शहर पोलिसांनी सुरू केली आहे. सदृढ आरोग्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे नाशिकचे नावही जगात पोहचणार आहे.

सदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी तसेच पोलिसांची शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून शहर पोलिसांनी या उपक्रमाचे काम हाती घेतले आहे. डिसेंबर महिन्यात गोल्फ क्लब येथे हा कार्यक्रम होणार आहे. पोलिस दलातील दोन हजार अधिकारी व कर्मचारी एकाच वेळी प्रत्येकी ३० पुश-अप्स यावेळी मारतील. या उपक्रमाची गिन‌िज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. दरम्यान, अशा प्रकारे विश्व विक्रमाची नोंद करण्यासाठी पूर्व तयारी आवश्यक असते. त्यादृष्टीने पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. संबंधीत एजन्सीकडे कार्यक्रमाची नोंदणी करण्यात आली आहे. हा विश्वविक्रम यूएईच्या नावे असल्याने त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे संबंध‌ित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या उपक्रमाबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सांगितले की, यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक उमेदवारास प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. विश्व विक्रमात सहभागी होण्याचे प्रशस्तीपत्रक जवळ असणे ही नेहमीच आनंद देणारी बाब असते, असे सिंगल यांनी स्पष्ट केले. पोलिसांचे आरोग्य, त्यांच्यातील सांघिक भावना वाढीस लागण्याच्या दृष्टीने असे उपक्रम फायदेशीर ठरतात, असेही ते म्हणाले. या उपक्रमाची नोंद जागतिक स्तरावर होणार असल्याने त्यास वेगळे महत्त्व येते. सध्या तरी या उपक्रमात पोलिसांचा सहभाग असून, नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी काय करता येईल, याचा आढावा घेऊ असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांना यात ऐच्छिकरित्या सहभागी होता येणार आहे. सहभागी होण्याची इच्छा असलेल्या पोलिसांनी सरावाकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हा उपक्रम पोलिसांसह नाशिकचे नाव जागतिक स्तरावर घेऊन जाणार आहे. सदृढ आरोग्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात पोलिसांसह नागरिकांना सहभागी करून घेता येईल काय, याचीही चाचपणी सुरू आहे.

- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिस्थूलपणा अस्थिविकारासाठी घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हाडांचा ठिसूळपणा व ऑस्टिओपोरेसीसची समस्या वयोमानाने जवळपास प्रत्येकाला भेडसावते. विशेषतः स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर ही समस्या उद्भवते. या काळात स्त्रियांतील हॉर्मोन्समध्ये बदल होऊन हाडे ठिसूळ होतात. बऱ्याच वेळा वजनही नियंत्रणातही ठेवता येत नाही. परिणामी याच कालावधीत हाडांशी संबंधित विकार उद्भवतात. त्यामुळे अतिस्थूलपणा अस्थिविकारासाठी घातक ठरत असल्याचा सूर अस्थिविकारतज्ज्ञांनी व्यक्त केला.

नाशिक अस्थिविकार सोसायटीतर्फे अस्थिरोग व रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादामध्ये अस्थिविकारतज्ज्ञ डॉ. विजय काकतकर, डॉ. मनोज कनोजिया, डॉ. संजय धुर्जड, डॉ. प्रशांत भुतडा यांनी सहभाग घेतला.

यावेळी हाडांमध्ये ठिसूळपणा का येतो? फ्रोजन शोल्डर होण्याची कारणे? डायबेटिस असणाऱ्यांना हाडांचा ठिसूळपणा जास्त असतो का? महिलांमध्ये कंबरदुखी व मणक्यांचे विकार होण्याची कारणे? यांसारखे असंख्य प्रश्‍न उपस्थितांनी विचारले. या व अन्य प्रश्‍नांना समर्पक अशी उत्तरे परिसंवादात सहभागी तज्ज्ञ डॉ. काकतकर, डॉ. कनोजिया, डॉ. धुर्जड, डॉ. भुतडा यांनी दिली.

अस्थिविकार सोसायटीचे सचिव डॉ. राजेंद्र खैरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अध्यक्ष डॉ. मिलिंद पिंप्रीकर यांनी आभार मानले. डॉ. अखिल चौधरी यांनी परिसंवाद यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

यावेळी लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाचे कार्याध्यक्ष डी. एम. कुलकर्णी, दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव रमेश डहाळे, ज. रा. पाटील, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री. आंधळे, वसंत बाविस्कर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा जनजागृती
या सप्ताहांतर्गत एबीबी सर्कल व सिटी सेंटर मॉल परिसरातील सिग्नल या ठिकाणी प्रबोधनपर फलकांद्वारे वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जनजागृती करण्यात आली. काही वाहनचालकांचे या नियमांसंदर्भात प्रत्यक्ष प्रबोधनही करण्यात आले या उपक्रमात सोसायटीचे, तसेच ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटका मोठा, मदत तोकडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मागील वर्षी गोदावरीला आलेल्या महापुरात नुकसान झालेल्यांचे पंचनामे झाले, त्यातील काहींना मदतही पोहोचली. मात्र, ती अत्यंत तुटपुंजी असल्याने अनेकांनी नाकारली आहे. संबंधित रहिवासी पूररेषेत राहतात, व्यावसायिक पूररेषेत व्यवसाय करतात, त्यामुळे त्यांना कशाला भरपाई द्यायची, असे म्हणत सरकारी यंत्रणेने अनेकांना मदत देण्याचे टाळल्याचेही चित्र असून, त्यामुळे पूररेषेचा विषय एेरणीवर आला आहे.

वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत नियोजन होत नसल्यामुळेच थोड्या पावसातदेखील गोदावरीला पूर येऊ लागला आहे. त्यात गोदापात्राच्या काँक्रिटीकरणानंतर गोदापात्राचे पाणी आजूबाजूच्या परिसरात लवकर शिरत असल्याचा अनुभव २००८ आणि २०१६ च्या पुरात बघायला मिळाला. मागील वर्षी तर धरणातून एक थेंबही पाणी सोडले नसतानादेखील गोदावरीला पूर आला होता. पावसाळी गटार योजना आणि ड्रेनेज यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असल्याने पावसाळी गटारीचे पाणी ड्रेनेज लाइनमधून थेट गोदापात्रात मिसळते, त्यामुळे जोराचा पाऊस झाली, की शहरातून वाहणाऱ्या गोदावरीच्या पाण्याची पातळी लगेच वाढायला लागते. या बाबींचा विचार केला जात नाही, उलट गोदापात्रालगत झालेल्या बांधकामांना पूररेषेत आणले गेले आहे. परिणामी पूर कशामुळे येतो याकडे लक्ष देण्यापेक्षा व त्याचे नियोजन करण्यापेक्षा पूररेषेचाच बाऊ केला जात असल्याने संबंधित नागरिकांसह व्यावसायिकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.

गोदापात्रालगतची अनेक बांधकामे ५०-६० वर्षांपूर्वीची आहेत. गावठाणाच्या भागात ती बांधकामे गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा विचार करून करण्यात आलेली आहेत. ती आता जुनी झालेली आहेत. मात्र, ती दुरुस्त करण्यास परवानगी मिळत नाही. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे अशी बांधकामे अगोदरच अडचणीत असताना त्यात पूररेषाचा विषय आणखी अडचणीचा ठरत आहे. यासंदर्भात नियोजन योग्य पद्धतीने केले गेले, तर पुराच्या पाण्याचा प्रश्न सोडविता येईल, असे स्थानिक नागरिक, तसेच व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

--

महापुराच्या काळात नुकसान झालेल्या व्यावसायिकांना भरपाई मिळाली नाही. जे काही रहिवासी होते, त्यांना पूररेषेत राहतातच कसे, असा प्रश्न विचारला गेला. केवळ पंचनामे करण्यापुरता हा विषय राहिला. नुकसानीचा विचार केल्यास अशी तुटपुंजी मदत घ्यायची कशाला, म्हणून अनेकांनी ती नाकारली.

-प्रणव शिंदे, स्थानिक रहिवासी

--

धरणातून पाणी सोडण्यात येत नसतानाही गोदावरीला पूर येत असल्याचे चित्र जोराच्या पावसाच्या वेळी दिसते. पावसाळी गटार योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. या गोष्टी सोडून पूररेषेचा मुद्दा महापालिका उभा करीत आहे. बांधकामे आधीची आहेत, पूररेषा नंतरची आहे. मात्र, तरीही अनेकांना वेठीस धरले जात आहे.

-कृष्णकुमार नेरकर, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी नव्या गणवेशात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या ३३२१ प्राथमिक शाळांतील २ लाख ४७ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी तब्बल ९ कोटी ८८ लाख रुपये आले असून, त्यातील ८० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी नव्या गणवेशात मुले झेंडावंदनाला हजेरी लावणार आहे. शालेय गणवेशाचे अनुदान यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शाळा व्यवस्थापन समितीऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे हे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

राज्य सरकारने सगळ्याच वैयक्तिक लाभार्थी योजनांकरिता डीबीटीचा निर्णय घेतल्यानंतर नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना लोटल्यानंतर हे पैसे आले नव्हते. मात्र, आता सरकारने हे पैसे दिले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय सुटणार आहे. जिल्ह्यातील २० टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप बँकेत खाते उघडलेच नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत ते खाते उघडून हे पैसे वर्ग केले जाणार आहे.

यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीस गणवेशाचे अनुदान वितरित करण्यात येत असे. त्यानुसार निविदाप्रक्रिया राबवून गणवेश खरेदी, शिलाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यास केराची टोपली दाखवून व्यवस्थापन समित्या आपापल्या परीने गणवेश खरेदी करीत. आता मात्र अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही होणार असल्याने पालकांना आपल्या पाल्यांना नीटनेटका आणि दर्जेदार कापडाचा गणवेश खरेदी करता येणार आहे. या नव्या योजनेत विद्यार्थी आणि त्याच्या आईच्या नावे राष्ट्रीयीकृत, ग्रामीण अथवा शेड्युल्ड बँकेत संयुक्त खाते उघडणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् गोंदुणे गावात आली जलसमृद्धी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे या साडेसातशे लोकवस्तीच्या छोट्याशा गावात वनप्रेमी आदिवासी शेतकऱ्यांनी गावा भोवतालच्या ३८५ हेक्टर क्षेत्रावरील वनाचे संवर्धन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. जलसंधारण आणि वन संवर्धनाच्या माध्यमातून गावाच्या प्रगतीला गती मिळाली आहे.

गावाच्या समृद्धीत २०१६-१७ मध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामांनी विशेष भर टाकली. विविध योजनांच्या माध्यमातून गावात सिमेंट बांध तयार करणे, पाझर तलावातील गाळ काढणे, चर खोदणे अशी कामे करण्यात आली. याचा परिणाम पाणी टंचाई कमी होण्यात तर झालाच पण या बरोबरच जंगलातील वृक्षराजी बहरण्यातही झाला. जल संपत्ती वाढावी यासाठी वन विभागासोबत गावकऱ्यांनी केलेल्या कामांनी प्रभावित होऊन आजूबाजूच्या इतर गावांनी जलसंवर्धनासाठी कामांमध्ये सहभाग घेतला आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण चिमना भोये, मंगळ गावित, शिवराम भोये आदी सहकाऱ्यांनी डोंगरमाथ्यावर पाणी अडवून व जिरवून जंगलातील मातीची धूप थांबवण्यासाठी काम केले. वनपाल दादासाहेब बडे यांनी विभागाच्या योजनांचा नियोजित लाभ गावाला मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले. यातून वर्षभर पाण्याची उपलब्धता राहण्यास मदत झाली. वृक्ष संगोपनासाठी व संरक्षणासाठी समितीने विशेष कष्ट घेतले आहे.

वन विभागाने पाणीसाठा वाढवण्यासाठी गावाचा सुक्ष्म आराखडा तयार केला. सिमेंट बंधारे व पाझर तलावाचे खोलीकरण आणि जंगलासाठी बांबू रांझ्याच्या क्षेत्रात जल शोषक चर अशी कामे त्यातून उभी राहिली. यासाठी पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक रामानूजन यांनी लक्ष घालून कामाची गुणवत्ता राखण्याकडे लक्ष दिले.

श्रमदानातून बांधनिर्मिती

वनविभागाने राष्ट्रीय वनीकरण योजनेअंतर्गत सिमेंट नाला बंधाऱ्याच्या दुरुस्तीची, उंची वाढवण्याची, खोलीकरणाची कामे व नवीन कामे केली आहेत. गाव व परिसरात तलाव व १२ साखळी बंधाऱ्यांमध्ये जवळपास दहा लाख घनफूट पाणीसाठा जमा करण्यात यश आले आहे. या कामामुळे गाव व जंगल क्षेत्र सुजलाम् सुफलाम् झाले आहे. श्रमदानातून ओघळीवर दगड बांध घालणे, गाळ काढणे, त्यांचे दुरुस्तीसाठी पुढाकार घेऊन गावाने सहकार्य पुरवल्यामुळे विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चाबाबत उमराण्यात बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

मुंबई येथे दि. ९ ऑगस्टला होणाऱ्या मराठा समाजाच्या राज्यव्यापी मोर्चाला जाण्यासाठी उमराणे येथे सकल मराठा समाजाची बैठक श्री. क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिरात रविवारी (दि. ६) पार पडली.

राज्यातील मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाने मोर्चा काढून असंतोष व्यक्त केला आहे. मात्र राज्य सरकारने या मोर्चाची दखल न घेतल्याने राज्यभरातील मराठा समाज एकत्र येऊन मराठा समाजाची एकजूट व ताकद राज्यकर्त्यांना या मोर्चाद्वारे दाखवून देण्यासाठी बुधवारी (दि. ९) राज्यभरातील मराठा समाजाचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला जाण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी उमराणे येथे रामेश्वर महादेव मंदिरात बैठक घेण्यात आली. त्यात बाजार समितीचे सभापती विलास देवरे, प्रशांत देवरे, नंदन देवरे, धर्मा देवरे आदींनी मार्गदर्शन केले. मुंबई येथील मोर्चात उमराणे व परिसरातून मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या महामोर्चाच्या निमित्ताने सर्वत्र वातावरण निर्माण करण्यात आले. त्यात बॅनर, होर्डिंग्ज गावाच्या मध्यवर्ती भागात व चौकाचौकात लावण्यात आले आहेत. बैठकीला माजी सरपंच दिलीप देवरे, सुभाष देवरे, मोतीराम देवरे, शिवाजी नाना देवरे, उमेश देवरे, रामराव देवरे, दत्ता जाधव, दत्तू देवरे, पोपट देवरे, संजय देवरे, भरत देवरे, नाना वतनदार आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

कळवणला रॅली

कळवण : मुंबई येथे दि. ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण व विविध मागण्यांच्या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी कळवण तालुका सकल मराठा समाजच्या वतीने जनजागृती दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली रविवारी (दि. ६) सकाळी १० वाजता कळवण शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बस स्थानक परिसरातून काढण्यात आली. या रॅलीत महिलांनीही सहभाग नोंदविला. यावेळी जितेंद्र पगार, रवींद्र पगार, प्रदीप पगार, हिरामण पगार, सुचिता रौंदळ, वैशाली देवरे, हेमा पगार आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेलच्या शिपायाचा उपोषणाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिकरोड कारागृहातील गैरप्रकारांबाबत तक्रारी करूनही कारागृह प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करत धुळे कारागृहातील पोलिस शिपाई अनिल बुरकूल यांनी शुक्रवार ११ ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
बुरकूल यांनी प्रशासनाला यासंदर्भात पत्र दिले आहे. ऑगस्ट २०१६ पासून तक्रारी केल्या. मात्र, त्यांची दखल प्रशासन घेत नसून कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधातील तक्रारीचीही चौकशी करण्यात आलेली नाही. जेलमध्ये पाचशे मोबाइल सापडल्याच्या तक्रारीची चौकशी अजूनही झालेली नाही. तत्कालीन कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांच्या कथित भ्रष्टाचाराचे पुरावे सापडूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. डॉ. बळीराम शिंदे या कैद्याच्या मृत्यूला जबाबदार प्रशासनावर कारवाई करावी. कांबळे व धामणेंची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, कर्मचा-यांच्या अवैध बदल्या थांबवाव्यात.
दरम्यान, धामणे यांनी सांगितले की, बुरकूल यांनी नाशिकरोड कारागृहात १३ वर्षे सेवा दिली. त्यानंतर नियमानुसार त्यांची धुळ्याला बदली करण्यात आली. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी चौकशी समितीला पुरावे सादर करावेत. बुरकूले यांचीही चौकशी सुरू आहे. आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीला तयार आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन नाशिककडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
मुंबई येथे बुधवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान अशा काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो स्वयंसेवक जाणार आहे. मोर्चाच्या मार्गासह मैदानावर त्यांच्याद्वारे नियोजन केले जाणार आहे. हे स्वयंसेवक एक दिवस अगोदरच नियोजित स्थळी पोचणार आहे. मोर्चासाठी नाशिकसह इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लाखो समाजबांधवांना हे स्वयंसेवक मार्गदर्शन आणि मदत करणार आहेत.
मोर्चाच्या नियोजनासाठी नाशिक जिल्ह्याची बैठक वरद लक्ष्मी लॉन्स येथे सोमवारी झाली. नाशिक जिल्हा मुंबईच्या लगत असल्याने तसेच प्रमुख राष्ट्रीय महामार्ग हा नाशिक जिल्ह्यातून इतर जिल्ह्यातून राज्यातील मराठा बांधव या महामोर्चात सहभागी होण्यासाठी याच मार्गाने मुंबईकडे जाणार आहे. या समाज बांधवांसाठी आडगाव ते मुंबई या मार्गात नियोजित ठिकाणी, वैद्यकीय व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, पाणीवाटप, पार्किंगबाबतची माहिती व मार्गदर्शन करण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
मागण्या अगोदर मान्य झाल्या नाही तरी मोर्चा निघणारच आणि मागण्या मान्य झाल्या तर विजयी मोर्चा काढला जाईल. मोर्चा हाणून पाडण्याचे प्रयत्नही होतील. काहींनी षडयंत्रही रचण्याचे प्रयत्न होतील, असे प्रकार आढळल्यास त्याबाबत स्वयंसेवकांना तात्काळ माहिती द्यावी. राज्यभरात आतापर्यंत ५७ मोर्चे काढण्यात आले. त्याच शिस्तबद्दपणे हा मोर्चा काढण्यात येईल, असे बैठकीत ठरविण्यात आले.
बैठकीत समाजकन्यांनी मनोगतात समाजाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी हा मोर्चा मराठा समाजाच्या हक्कासाठी काढण्यात येत आहे, त्यात कुठल्याही जात-धर्माच्या विरोधात नाही. कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभरात मोर्चे निघूनही न्याय मिळाला नसल्याची खंत या कन्यांनी व्यक्त केली.

गनिमी कावा सुरूच राहणार
मराठा समाज्याच्या १५ प्रमुख मागण्यांचे पत्र आमदारांना देण्यात येणार आहे. त्यांनी मंगळवारी (दि. ८) ऑगस्ट रोजी विधानसभेत ठराव मांडून लेखी हमी द्यावे, ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. या मागण्या पूर्ण करा नाहीतर राजीनामे द्या, असाही इशारा देण्यात आला. गनिमी काव्याने लढा चालूच ठेवायचा आहे, असेही बैठकीत ठरविण्यात आले.

लढाईसह तहातही जिंकणार
इतिहासात ‘मराठे लढाईत जिंकले आणि तहात हरले’ अशी नोंद केली गेलेली आहे. मात्र, या मराठा क्रांती मोर्चात मराठे लढाईतही जिंकतात आणि तहातही जिंकतात हे दाखवून द्यायचे आहे, असा निर्धार सोमवारी बैठकीत करण्यात आला.

नाशिकच्या दोन कन्या बोलणार
आझाद मैदानावर राज्यभरातून येणाऱ्या समाजकन्यांना भाषण करण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एक कन्या मनोगत व्यक्त करतील, नाशिकच्या दोन समाजकन्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहिती करण गायकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा लाख जणांची जिल्ह्यातून उपस्थिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या राज्यव्यापी मोर्चाला नाशिक जिल्ह्यातून दहा लाख लोक सहभागी होतील, असा दावा सकल मराठा समाजाचे समन्वयक गणेश कदम यांनी व्यक्त केला आहे. मोर्चेकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची जिल्ह्यात नुकतीच रंगीत तालीम घेण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात मोर्चे काढून आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. हीच मागणी राज्य व केंद्र सरकार पर्यंत पोहचावी केंद्र सरकारला सकारात्मक निर्णय घेणे भाग पडावे यासाठी ९ ऑगस्ट रोजी मुंबईत विशेष मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक सहभागी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून देखीलही १० लाखांपेक्षा अधिक मोर्चेकरी सहभागी होतील. यासाठी विभागनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक नागरिकांसाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई येथील मोर्चाच्या वाहतूक नियोजनाची जबाबदारी नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडे देण्यात आली आहे. त्यासाठी दहा बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्थाही नाशिक जिल्ह्यातील स्वयंसेवक करणार आहेत. त्यासाठी कसारा घाटाच्या खाली जिल्हानिहाय भोजन नियोजन करण्यात आले आहे. मोर्चाला जाताना वाहतूककोंडी होऊ नये, मोर्चाला वेळेवर जाता यावे यासाठी कोणत्या जिल्ह्यातील वाहने कोणत्या मार्गाने जातील याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

सूक्ष्म नियोजनावर भर
मोर्चेकऱ्यांचे वाहन रस्त्यात नादुरुस्त झाल्यास मदतीसीठी टेक्निकल टिम्स कार्यरत असेल. मुंबईला पोहचल्यानंतर वाहनांचे पार्किंग कोठे करायचे हेही निश्चित करण्यात आले आहे. जाताना व येताना नागरिकांना अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्ते मार्गाप्रमाणेच रेल्वेने जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता पुणे व पंचवटी एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहे‌त. नाशिक मुंबई मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशमीधाग्यांनी जोपासले ऋणानुबंध

$
0
0

टीम मटा

शहर परिसरात सोमवारी रक्षाबंधन घरोघरी पारंपरिक उत्साहात साजरे झालेच, मात्र विविध सामाजिक संस्था, संघटनांतर्फेही हा सण राखी बांधण्यासग विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत लष्करी जवान, मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान, वीज कर्मचारी आदींना राख्या बांधून सामाजिक ऋणानुबंध जोपासण्याला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

--

अन् बंदिवान भारावले...

नाशिकरोड ः नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान डोळे सोमवारी रक्षाबंधनानिमित्त दूरवर असलेल्या बहिणींच्या आठवणीने हळवे झाले होते. मात्र, त्याची ही व्यथा जाणून त्यांना आधार दिला तो सामाजिक संस्थांनी. विविध संस्थांतर्फे कारागृहात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्यामुळे अनेक बंदिवान भारावल्याचे दिसून आले.

नाशिकमधील तेरा स्वयंसेवी संस्थांनी ४०० बंदिवानांना रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली. कारागृह प्रशानाने कारागृहात रक्षाबंधनाची तयारी केली होती. सकाळी दहा वाजेपासूनच रक्षाबंधन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवडाभर आधी रक्षाबंधनाचे नियोजन केले होते. श्रीमती र. ज. चौहान बिटको गर्ल्स हायस्कूल, कम्युनिटी हेल्थ संस्था, सहज योग ध्यान केंद्र इंदिरानगर, नाशिकरोड बेरोजगार अपंगांची स्वयंसेवी संस्था, गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक सोशल सर्व्हिस, स्पार्टन हेल्प सेंटर, संत आसारामजी महिला उत्थान संस्था, भीमाई शैक्षणिक- सामाजिक महिला मंडळ, दर्शन अकादमी, रेणुका महिला सहकारी संस्था, कृपाल आश्रम, रोटरी क्लब नाशिक या संस्थांच्या समाजसेवी महिलांनी बंदिवानांना राख्या बांधून औक्षण केले. यावेळी अनेक कैद्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

या कार्यक्रमावेळी कारागृह अधीक्षक साळी, शांतिदूत परिवाराचे अध्यक्ष समाधान गांगुर्डे, भाजपच्या मंदा फड, डॉ. प्रशांत भुतडा, रोटरीच्या अध्यक्ष मनीषा बागुल, अनिल बागुल, माजी नगरसेविका सुनंदा मोरे, संध्या शिरसाठ, सुमन विश्वकर्मा, नयना वाबळे, रुपाली मार्चाडे आदी उपस्थित होते.

---

सद्गुणांची राखी अन् गुणगौरव

सिन्नर फाटा ः नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व ब्रह्माकुमारीज शिक्षा प्रभागतर्फे गुणगौरव सोहळा व सद्गुणांची राखी हा रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा रंगला.

यावेळी प्रगत पदविका / पदविका मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षण या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या बंदिवान विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला, तसेच सद्गुणांची राखी या उपक्रमांतर्गत सर्व मान्यवरांसह बंदिवानांना राखी बांधण्यात आली.

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई.वायुनंदन म्हणाले, की शिक्षण मानवीय सत्याची प्रगती , परिवर्तन आणि प्रेरणा यांचा आधार स्तंभ आहे. शिक्षणा द्वारे ज्ञानाची प्राप्ती होते. पण, ते ग्रहण करण्याची व त्याप्रमाणे आपली जीवनक्षैली बनविण्याची जबाबदारी आपल्यावरच असते. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत ही शिक्षणाची ज्ञानगंगा विनामूल्य पोहोचविण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे जेलमधील कैदी बांधवांचे शैक्षणिक सशक्तीकरण होण्यास मदत होणार आहे.

कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, ब्रह्माकुमारी गोदावरीदीदी, ब्रह्माकुमारी पुष्पादीदी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. गुणवंतांनाही मनोगत व्यक्त केले. विकास साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. कारागृह अधिकारी वामन निमजे, अशोक कारकर, संतोष कोकणे, कारागृह गुरुजी विष्णू राठोड आदी उपस्थित होते.

--

‘कॅन्टोन्मेंट’मध्ये रंगला सोहळा

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आडकेनगरतर्फे देवळाली कॅन्टोन्मेंट कार्यालयात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना राखी बांधण्यात आली. उपाध्यक्ष दिनकर आढाव, बाबुराव मोजाड, भगवान कटारिया, कार्यालयीन अध्यक्ष उमेश गोरवाडकर आदी उपस्थित होते. मीराबेन यांनी रक्षाबंधन सणाचे महत्त्व विशद केले.

---

‘रणरागिणी’तर्फे जवानांचे औक्षण

नाशिकरोड ः येथील रणरागिणी महिला मंडळातर्फे गांधीनगरच्या लष्करी केंद्रातील जवानांना राखी बांधण्यात आली. मंडळाच्या पदाधिकारी तथा माजी नगरसेविका वंदना मनचंदा यांच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. आपल्या घरापासून कोसो दूर असलेल्या या जवानांना रक्षाबंधनासाठी सुटी मिळतेच असे नाही. घर संसाराचा त्याग करुन देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या या जवानांची ही व्यथा जाणून रणरागिणी महिला मंडळ दर वर्षी गांधीनगरच्या लष्करी केंद्रात जवानांना औक्षण करते. जवान त्याबदल्यात त्यांना मिठाई व भेटवस्तू देतात.

सोमवारी झालेल्या सोहळ्यावेळी शीला अग्रवाल, गीता पवार, कमल चव्हाण, रिचा वाघ, श्रद्धा गलांडे, सविता कदम, सुकन्या महाले, उषा कडाळे, स्नेहा मनचंदा आदींसह लष्कराचे पदाधिकारी व जवान उपस्थित होते.

---

वीज कर्मचाऱ्यांचे औक्षण

नाशिकरोड ः मानव उत्थान या सामाजिक संस्थेकडून तपोवनातील तिगरानिया कंपनीशेजारील वीज कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधण्यात आली. जगबीर सिंग, भारती जाधव, ज्योती ग्रोव्हर, हेमंत जाधव, तसेच मानव उत्थान मंचच्या सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. पावसाळ्यात विजेच्या तारांवरील झाडांच्या फांद्या छाटताना, तसेच वीजपुरवठा सुरळीत करताना वीज कर्मचाऱ्यांना जिवावर उदार होऊन काम करावे लागते. अनेकदा त्यांचे प्राणही संकटात सापडतात. अशा कर्मचाऱ्यांप्रति आदर व्यक्त व्हावा म्हणून मानव उत्थान मंचने रक्षाबंधनाचा उपक्रम राबविला. झाडांची छाटणी करताना पर्यावरणाचा विचार करण्याचे आश्वासन अधिकारी निंबाळकर यांनी दिले. भूमिगत तारांच्या योजनांची माहिती त्यांनी दिली.

---

हास्य योगतर्फे कार्यक्रम

नाशिकरोड येथील आनंद हास्य योग क्लबतर्फे रक्षाबंधनाचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. क्लबचे अध्यक्ष अॅड. वसंतराव पेखळे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. क्लबचे सदस्य रमेश नवले, सिद्धार्थ हिरे, सुरेश वाडगावकर, सुरेखा दुसाने, जयमाला भुतडा, सुरेखा वाघ आदींनी संयोजन केले. यावेळी 50 रक्षाबंधन-बीईंग कामन संस्था ५० सदस्य उपस्थित होते.२५ भगिनींनी उपस्थितांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या. सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारा हा क्लब विविध सण उत्साहाने साजरा करतो.

--

‘बीइंग कॉमन’चा संदेश

उपनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांना बीइंग कॉमन संस्थेच्या सदस्यांनी राखी बांधून सामाजिक एकतेचा संदेश दिला. संस्थेचे अध्यक्ष विक्रम कदम, गुरमित सिंग रेखी, विकी नालकर, सुधीर निकाळे, संदीप राजगुरू, मोईन खान, मोहित महाले, उमेश जाधव, विजय कदम आदी उपस्थित होते. निरीक्षक महाजन यांनी पोलिस आणि नागरिकांचे नाते घट्ट करण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असल्याचे नमूद केले.

--

बालसदनात अनोखा सोहळा

कळवण : निराश्रित-निराधार बालकांना सण-उत्सवांत सहभागी करीत त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटविण्याच्या हेतूने रक्षाबंधनाचे औचित्यसाधून मानूरच्या शिवप्रताप प्रतिष्ठानच्या युवतींनी राखीचा प्रेमळ धागा अनाथांच्या नाजूक मनगटावर बांधून बहिणीची माया देण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष परिमल पवार याच्या संकल्पनेतून भावना बालसदन या निराश्रित बालकांच्या निवासाची संस्थेत हा उपक्रम झाला. प्रतिष्ठानच्या प्राजली पवार, प्रतीक्षा पवार, हर्षदा पवार, सृष्टी आहेर, चारुशीला पाटील आणि कामिनी गुंजाळ या युवतींनी बालसदनातील बालकांचे विधिवत औक्षण करून, राख्या बांधून मिठाई भरविली. त्यावेळी सारे भारावले होते. बालसदनचे संस्थापक रवींद्रकुमार जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

--

चिमुकल्यांना पोलिसांचे गिफ्ट

येवला ः येथील पटेल कॉलनीतील संजीवनी टॉडलर्समधील शाळकरी चिमुकल्या मुलींनी येवला शहर पोलिस स्टेशनला भेट देत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत साजरे केलेले रक्षाबंधन आगळेवेगळे ठरले. या शाळकरी चिमुकल्यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये निरीक्षक संजय पाटील, उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांचे औक्षण करीत त्यांना राख्या बांधल्या. विशेष म्हणजे आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या राख्या त्यांनी स्वतः तयार केलेल्या होत्या. पोलिस कर्मचाऱ्यांनी या चिमुकल्यांना कॅडबरीचे गिफ्ट देत धन्यवाद दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धकांचा दुणावतोय आत्मविश्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तूत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ पॉवर्ड बाय ‘सोनी पैठणी’ दुसऱ्या दिवशीचे ग्रूमिंग सेशन पर्सनालिटी डेव्हलपमेंट आणि रॅम्पवॉकच्या रिहर्सलने रंगले. सोमवारी सकाळी नऊ वाजता पर्सनालिटी डेव्हलपमेंट सेशनने दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. इमेज कन्सलटंट गौतमी देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर नवीन तोलानी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅम्पवॉक रिहर्सल करण्यात आली.

ग्रुमिंग सेशनच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धकांचा उत्साह दुणावला होता. रोज होणाऱ्या विविध सेशनमुळे स्पर्धकांमधील आत्मविश्वासही वाढतो आहे. ग्रुमिंगच्या पहिल्या दिवशी एकमेकींशी ओळख झाल्याने स्पर्धा कमी आणि मैत्रीचे वातावरण जास्त दिसून येत होते. एकमेकींना सजेशन्स देणं, प्रश्न विचारणं, मार्गदर्शकांनी दिलेल्या टास्कवर एकत्रित चर्चा करणे असा माहोल याठिकाणी दिसला. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धकांनी ग्रुमिंग आणि कोरिओग्राफीचे धडे गिरवले. या सेशनचा व्यक्तिमत्त्व विकासात नक्कीच फायदा होणार असल्याचे मतही तरुणींनी यावेळी व्यक्त केले. याचबरोबर मनातील विविध शकांना प्रश्नांद्वारे वाटही मोकळी करून दिली.

फिनालेसाठी जय्यत तयारी

सोमवारी दुसऱ्या सेशनमध्ये नवीन तोलानी यांनी स्पर्धकांना रॅम्पवॉकचे विविध प्रकार शिकवले. यामध्ये विविध वेशभूषांप्रमाणे रॅम्पवॉक कसा करावा, प्रेझेंटेबल कसे राहावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच रॅम्पवॉकवेळी आवश्यक असलेले टाइम मॅनेजमेंट आणि टीमवर्क याविषयीदेखील मार्गदर्शन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरव्या सवंगड्यांशी मैत्रीचे बंध झाले घट्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

झाडे सांभाळणाऱ्यांची

सावली सांभाळतात झाडे

अनवाणी पायापुढे

सावली पेरतात झाडे

प्राणवायूचा अविरत पुरवठा करणारे अन् पानं, फुलं, फळं देणारे वृक्ष म्हणजे मानवाचे मित्रच... त्यांच्याकडे ना स्वार्थी वृत्ती, ना अपेक्षांचा डोलारा. एखाद्या योग्यासारखी ते सदैव त्यागाची भावना जोपासतात. अशा या झाडांशी असलेले मित्रत्वाचे नाते अधिक दृढ करीत शहरातील काही धडपड्या पर्यावरण प्रेमींनी अनोख्या पद्धतीने ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला. झाडांना आणि सहकाऱ्यांच्या हातांवर गवताचा ‘फ्रेंडशिप बँड’ बांधून मैत्रीचे हे नाते अधिक घट्ट करण्यात आले.

माणूस नावाचं एक झाड असतं. रंग, रूप, आकार विविध असले तरी सर्वांचं मूळ मनच असते. या मनाच्या गाभ्यातून मानवतेचे बीज अंकुरते, असे म्हटले जाते. माणसाबरोबरच निसर्गाप्रत‌िची आत्मीयताही माणसाने नाही, तर अन्य कुणी जपावी? हाच विचार करून व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर अॅक्ट‌िव्ह झालेल्या सुजाण आणि सुशिक्षित पर्यावरणप्रेमींच्या ‘ग्रीन रिव्होल्युशन’ या ग्रुपने यंदाचा फ्रेंडशिप डे अनोख्या पद्धतीने साजरा केला. निसर्ग हा आपला सर्वात जवळचा मित्र असून, त्याच्याप्रतीची भावना व्यक्त करण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी सात वाजता अनेकजण फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी चुंचाळे शिवारातील आनंदकानन टेकडी येथे जमले. कल्याणी मह‌िला बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या सुनीता मोडक आणि त्यांच्या सहकाऱ्यांची त्यांना मोलाची साथ लाभली. या संस्थेच्या माध्यमातून टेकडीवर १०० रोपांची लागवड करण्यात आली. यानंतर टेकडीवर पूर्वी लावण्यात आलेल्या आणि चांगली वाढ झालेल्या झाडांना ग्रीन रिव्होल्युशनच्या सदस्यांनी हिरव्या गवताचे बँड बांधून फ्रेंडशिप डे साजरा केला. असेच बँड या उपक्रमात सहभागी झालेल्या ४० हून अधिक पर्यावरण प्रेमींनी एकमेकांच्या हातावर बांधून हे नाते अधिक आश्वासक केले. या उपक्रमात डॉक्टर, इंजिनीअर यांसारख्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक सुजाण नागरिक सहभागी झाले. पर्यावरणपूरक फ्रेंडशिप डेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

विरदी यांना वृक्षारोपणाद्वारे श्रद्धांजली

पर्यावरणप्रेमी तसेच नाशिकमध्ये सायकलिंगची चळवळ रुजविणारे जसपालसिंग विरदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (८ ऑगस्ट) सकाळी सहा वाजता ग्रीन रिव्होल्यूशनचे सदस्य सायकली घेऊन पपया नर्सरी येथे जमणार आहेत. तेथून ते त्र्यंबकरोडवरील वासाळीजवळील आनंदवन या परिसरात एकत्रित जमून रोपांची लागवड करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राखीपौर्णिमेवर ग्रहण‘छाया’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भावाच्या मनगटावर राखी बांधत बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेली राखीपौर्णिमा सोमवारी शहरात उत्साहात मात्र काहीशा संभ्रमावस्थेत साजरी करण्यात आली. यावर्षी राखीपौर्णिमेवर चंद्रग्रहणाचे सावट असल्याने नेमक्या कोणत्या वेळेत राखी बांधावी, याविषयी महिलावर्गात संभ्रम दिसून आला.

भावा-बहिणीच्या नातेसंबंधांना जपणारा, त्यांचे नाते दृढ करणारा सण म्हणजे राखीपौर्णिमा. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र, यंदाच्या राखीपौर्णिमेवर चंद्रग्रहणाचे सावट असल्याने सकाळी ११.३० ते दुपारी १.३९ दरम्यान राखीपौर्णिमा साजरी करण्याचा मुहूर्त ज्योतिषांनी सांगितला होता. त्यामुळे अनेकांनी याचदरम्यान राखी बांधण्यास प्राधान्य दिले. सोशल मीडियावरदेखील यावर अनेक मेसेजेस फिरत असल्याने काहींचा योग्य मार्गदर्शनाअभावी, तर काहींचा पोस्ट्समुळे गोंधळ उडाल्याचेही चित्र शहरात होते.


आधाराश्रमात उत्साह

आधाराश्रमात चिमुकल्यांसोबत राखीपौर्णिमा साजरी करण्याला अनेक जण प्राधान्य देतात. यंदाही घारपुरे घाटावरील आधाराश्रमात अनेकांनी सामाजिक बांधिलकी जपत हा सण साजरा केला. या मुलांना खाऊ, मिठाईचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. आधाराश्रमातील मुलींनीही मुलांना राखी बांधत शुभेच्छा दिल्या. लहान मुलांमध्ये या सणामुळे आनंदाचे वातावरण होते. यानिमित्त आधाराश्रमात चिमुकल्यांसाठी नारळीभात हा गोड पदार्थही तयार करण्यात आला होता.


निरीक्षण व बालगृहात रंगला अनोखा सोहळा

उंटवाडी येथील निरीक्षणगृह व बालगृहात दर वर्षीप्रमाणे यंदाही राखीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. येथील मुलींनी मुलांना राखी बांधून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुलांनी मुलींनी खाऊ, चॉकलेट्स भेट स्वरूपात दिले. या सणामुळे या संस्थेच्या प्रांगणात आनंदाचे वातावरण होते. यावेळी संस्थेचे चंदुलाल शहा, हितेश शहा, चंद्रशेखर शहा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रखडलेल्या पर्यटनास मिळणार वेग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात निधीअभावी रखडलेल्या बोट क्लब, ओझरखेड, कलाग्रामसह सर्व पर्यटन स्थळांबाबत रोड मॅप तयार केला जात असून, ७ सप्टेंबरपूर्वी त्यावर निर्णय घेवून या कामाला वेग दिला जाणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संयुक्त कार्यकारी संचालक आशुतोष राठोड यांनी दिली. यावेळी त्यांनी इगतपुरी तालुक्यात रेनी फेस्टीवलचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भावली धरणाचा पायलय प्रोजेक्ट असून तेही विकसित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिकच्या पर्यटनाला चालणा देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने अनेक योजना तयार केल्या आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिस्टर सिटी ही संकल्पना पुढे आली असून, दोन शहरात माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते. त्यामुळे या शहराला विविध क्षेत्रातही फायदा होईल. नाशिक-ठाणे सिस्टर सिटी ही संकल्पा एका बिल्डरने मांडली त्याचा उपयोग होवू शकतो. देशभर असे केले तर त्याचा उपयोग सर्वांनाच होईल असेही राठोड यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर येथे असलेला मेडकर किल्लासह जिल्ह्यात असलेले वेगवेगळे पर्यटन स्थळही खूप चांगले असून त्यामुळे पर्यकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

...तसा प्रस्ताव नाही

मुंबई ते नाशिक हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचे एक पत्र खासगी कंपनीकडून महामंडळाकडे आले असले तरी त्यांचा प्रस्ताव नाही. हा प्रस्ताव आल्यास त्याला मान्यता देऊ, अशी सेवा सुरू झाल्सास त्याचा निश्चितच पर्यटनाला फायदाच होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहरगाव कालव्यासाठी १२ कोटींचा निधी मंजूर

$
0
0

आमदार अनिल गोटेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अक्कलपाडा प्रकल्पातून मेहरगाव ते देवभाने या २९ किलोमीटर लांबीच्या कालव्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून, या कालव्यामुळे तालुक्यातील मेहरगाव, देवभाने, कावठी, निमडाळे, गोंदूर, वलवाडी, चिचगाव, ढंढाणे, वडेल या गावातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी (दि. ७) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पाणी डाव्या कालव्यातून सोडावे, यासाठी गेल्यावर्षी किरण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत मेहरगाव, चिचगाव, ढढाणे, वलवाडी, भोकर, निमडाळे या परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले होते. या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यासह राज्यभर उमटले होते. त्याची दखल घेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी करून कालव्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने याबाबत पाठपुरावा करून प्रकल्पाचे सर्वेक्षण करून घेण्यात आले, अशी माहितीही आमदार गोटे यांनी दिली.

यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने १० लाख रुपये उपलब्ध करून दिले असून, मेहरगाव ते देवभान्यापर्यंत २९ किलोमीटर लांबीच्या कालव्यासाठी २०१६-१७ च्या डीएसआरनुसार १० कोटी २४ लाख रूपये खर्च अपेक्षित असताना २०१७-१८ या वर्षांतील डीएसआर गृहित धरून नदीजोड प्रकल्प जलसंपदा विभागाकडून १२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. एक्स्प्रेस कॅनॉलच्या धर्तीवर या कालव्याची निर्मिती होणार असून, याद्वारे अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पाणी देवभाने धरणापर्यंत नैसर्गिक उताराने पोहचणार आहे. देवभाने धरण भात नदीवर असून या कालव्यात पाणी सोडल्यानंतर ते पाणी भात नदीत जाईल.

या गावांना फायदा

या कालव्यामुळे मेहरगाव, देवभाणे, कावठी, निमडाळे, गोंदूर, वलवाडी, चिचगाव, ढंढाणे, वडेल, देवभाने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. बारमाही पिकांसाठीही पाण्याचा उपयोग होऊ शकेल. हे काम येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरू करून मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार गोटे यांनी यावेळी दिली. शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला आमदार अनिल गोटे यांच्यासह भिमसिंग राजपूत, सुनील नेरकर, भारती माळी, तेजस गोटे, माजी नगरसेवक दिलीप सांळुखे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिस प्रशासनावर विश्वास नाही

आमदार गोटे यांना गुड्ड्या खूनप्रकरणी विचारले असता या प्रकरणात पोलिस विभागाचा मोठा घोळ असल्याने माझा पोलिस प्रशासनावरच विश्वास राहिलेला नाही, असे सांगितले. या खूनप्रकरणाचा तपास आता मुंबई क्राइम ब्रँचकडे तपास देण्यात आला असून, या विभागातील तीन कर्मचारी धुळे शहरात गेल्या आठवड्यापासून दाखल झाले आहेत. जिल्हा पोलिस दलातील आरोपींना साथ देणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. लवकरच काय ते समोर स्पष्ट होईल असे गोटेंनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षपदाकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगर परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत काढण्यात निघाली असून, या दोन्ही पदांवर खुल्या गटाला संधी मिळाली आहे. नगराध्यक्ष होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

इगतपुरी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद गेली अनेक वर्ष विविध संवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या खुल्या प्रवर्गातील अनेकांना इच्छा असूनही या पदावर काम करण्याचीत्या संधी मिळत नव्हती. तर त्र्यंबकेश्वरमध्येही अध्यक्षपदाबाबत उदभवलेल्या वादानंतर तेथील समीकरणे बदलली आहेत. येथील नगराध्यक्षपदाची जागाही खुल्या गटासाठी राखीव झाल्याने आगामी निवडणूक चुरशीची होईल असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

सहा हरकतींवर सुनावणी

आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या दोन्ही नगर परिषदांच्या फेर प्रभागरचना आणि आरक्षण निश्चितीवर प्रशासनाने हरकती मागविल्या होत्या. त्र्यंबकेश्वरमध्ये एकही हरकत प्राप्त झाली नाही. तर इगतपुरीमध्ये सहा हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर शनिवारी सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये दोन हरकती प्रभागांच्या रचनेबाबत, तर चार हरकती आरक्षणाबाबत प्राप्त झाल्या आहेत. त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदेशाला हरताळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची अनुपस्थितीची आणि दांडीबहाद्दरांची गंभीर दखल घेतलेल्या आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल थेट विभागाप्रमुखांवर कारवाईचा इशारा दिला आहे. आयुक्तांनी श्रावणी सोमवारची दोन तासांची सुट्टीही रद्द केली आहे. परंतु त्याचा कोणताही परिणाम सोमवारी पालिकेत पहायला मिळाला नाही. आज, सोमवरी पालिकेत शांतता होती. अनेक विभागातील कर्मचाऱ्यांनी परस्पर दांड्या मारल्याने पालिकेत शुकशुकाट पहायला मिळाला. त्यामुळे आयुक्तांचे आदेशही कर्मचारी धाब्यावर बसवत असल्याचे चित्र आहे.

महापालिका मुख्यालयात तब्बल एक हजार ५९ कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या सोमवारी यातील निम्मे कर्मचारी हे काहीही न सांगताच गायब झाले होते. सोमवारी देण्यात येणाऱ्या दोन तासांच्या विशेष सुट्टीचा फायदा घेत, त्यांनी उपवासाच्या नावाने पर्यटनाला पसंती दिली. त्यामुळे आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेत, या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच विभागांची पाहणी करून कर्मचाऱ्यांची हजेरीही तपासली. यात विनापरवानगी सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. सोमवारची शेवटच्या दोन तासांची सुट्टी रद्द करत सर्व विभाग प्रमुखांना कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होती. तसेच गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचेही आदेश दिले होते. परंतु या आदेशाला आठवड्यात कर्मचाऱ्यांनी ठेंगा दाखवला आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी पालिकेतील निम्मे कर्मचारी गायब होते. त्यामुळे पालिकेत शुकशुकाट पहायला मिळाला. अनेकांना कर्मचारी अनुपस्थित असल्याचा फटका बसून, त्यांना माघारी जावे लागले. लोकप्रतिनिधींनाही त्याचा फटका बसला असून, एका आठवड्यातच आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

आयुक्तांची अनुपस्थिती म्हणजे सुटीच...

महापालिका आयुक्त कार्यालयात हजर राहीले तर, विभाग प्रमुख कर्मचाऱ्यांची ९५ टक्के हजेरी असते. परंतु आयुक्त कामानिमित्त मुंबईला किंवा सुटीवर असले तर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पर्वनीच असते. आयुक्तांच्या अनुपस्थितीचा फायदा थेट विभाग प्रमुख आणि कर्मचारीही घेतात. आयुक्त नसले तर, थेट हजेरीवर सह्या करून कर्मचारी गायब राहतात. सोमवारीही आयुक्त मुंबईत असल्याने कर्मचाऱ्यांनी दुहेरी लाभ घेतला. त्यात काही खातेप्रमुखांचाही समावेश होता. त्यामुळे आयुक्त याबाबत आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुद्देच नसल्याने विरोधकांची घसरण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

संस्था आणि समाज हिताचा विचार दूर ठेवून संस्थेच्या मालमत्तेसंदर्भात विरोधकांनी चालविलेला अपप्रचार हे विरोधकांचा नैतिक स्तर घसरल्याचे लक्षण आहे, अशा शब्दात निफाडच्या बालेकिल्ल्यात प्रगती पॅनलच्या वतीने आयोजित सभेत नीलिमा पवार यांनी तोफ डागली.

जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार सभासद असणाऱ्या निफाड पट्ट्यात प्रगती पॅनलने सभांचे आयोजन केले होते. यामध्ये चितेगाव, खेरवाडी, सुकेणे, चांदोरी, चाटोरी, सोनगाव, शिंगवे, करंजगाव, म्हाळसाखोरे, कोठुरे, पिंपळद, भाऊसाहेब नगर या गावांमध्ये सभा पार पडल्या. यावेळी पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार अनिल कदम आणि माजी आमदार दिलीप बनकर हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या मुद्द्यावर बोलताना दिलीप बनकर यांनी, राजकारणात गट तट असले तरीही समाज हितासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, असे सांगितले. आमदार कदम म्हणाले, चांगले कार्य उभारणाऱ्यांवर आरोप होणे स्वाभाविकच आहे. त्याकडे दुर्लक्ष करून पवार यांनी समाजकार्य सुरूच ठेवावे. योग्य कामाच्या पाठीशी सभासद आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images