Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

करदात्यांच्या गर्दीमुळे सर्व्हर क्रॅश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची काल ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. करदात्यांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे सर्व्हर क्रॅश झाला. त्यामुळे अनेक करदाते रिटर्न भरू शकले नाहीत. सरकारने रिटर्न भरण्याची मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवून दिल्याने करदात्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

यंदापासून रिटर्न भरताना पॅनकार्डशी आधारकार्ड लिंक करणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याशिवाय रिटर्न भरता येत नाही. त्यातच आधारकार्डमध्ये अनेक दोष असल्याचे समोर आले. ते दुरुस्तीसाठी गेले असता शहरातील आधारकार्डची सेंटर बंद असल्यामुळे करदात्यांची दमछाक झाली. त्यातच सर्व्हर डाऊनमुळे करदात्यांचे प्रचंड हाल झाले.

का आली समस्या?

चार्टर्ड अकाउंटंट उदयराज पटवर्धन यांनी सांगितले की, रिटर्न भरताना एक्सएमएल ही फाइल बनवून इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर टाकावी लागते. नंतरच रिटर्न स्वीकारले जाते. यावर्षीपासून मॅन्युएली म्हणजे हाताने रिटर्न भरुन देणे बंद करण्यात आले आहे. एक्सएमएल फाइल बनवूनच तो भरावा लागतो. त्यामुळे गर्दी वाढली. अनेक करदाते जुलैच्या शेवटच्या आठवड्यातच जागे होतात. वेबसाइटच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होते. त्यामुळे तो क्रॅश होतो. रिटर्न ३१ जुलैपर्यंत भरले नाही, तर दंड होईल अशी चर्चा होती. त्यामुळेही यंदा गर्दी वाढून सर्व्हर क्रॅश झाला.

सर्व्हरची क्षमता कमी

इन्कम टॅक्स रिटर्न मेपासूनही भरले जाऊ शकते. नोटाबंदीमुळे यंदा करदात्यांची संख्या वाढली. त्यामुळे रिटर्न भरणाऱ्यांची संख्याही वाढली. हे लक्षात घेऊन सरकारने रिटर्न भरण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवायला हवी होती. मात्र, उपाययोजना केली नाही. गेल्या पंधरा वर्षापासून सर्व्हर बंद पडतो. यंदाही तोच अनुभव आला. गेल्या वेळी कर सल्लागारांच्या संघटनेने मुदतवाढीसाठी कोर्टात धाव घेतली होती. दुसरी महत्वाची बाब म्हणजे सरकार दरवर्षी रिटर्नचा फॉम बदलतो. त्यामुळे सॉफ्टवेअरही बदलावे लागते. ते मार्केटमध्ये आल्यावर रिटर्न भरणे सुरू होते. १ एप्रिलपासून रिटर्न भरण्याची सुविधा असते. मात्र, फॉर्म व सॉफ्टवेअर बाजारात येत नाही. त्यामुळे मेपासून रिटर्न भरण्यास सुरुवात होते.

पुढील वर्षी दंड

पुढील वर्षी रिटर्न वेळेत भरला नाही, तर दहा हजारापर्यंत एकरकमी दंड होऊ शकतो. पगारदार आणि ज्यांचे ऑडिट नाही, अशा व्यापाऱ्यांसाठी ३१ जुलै ही रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आहे. कंपन्या, ऑडिट असणारे व्यापारी आणि पार्टनरशिप फर्म यांना ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. या करदात्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न भरले नाही तर पाच हजार दंड होईल. ३१ डिसेंबरनंतर रिटर्न भरल्यास दंडाची रक्कम दहा हजारावर जाईल.

पुढील वर्षीपासून करदात्यांनी रिटर्न वेळेच्या आधीच भरावा. १ मेपासूनच रिटर्न भरण्याची तयारी केल्यास दंडही भरावा लागणार नाही. गर्दी, सर्व्हर डाऊनमुळे होणारा मानसिक त्रासही टळेल.

- उदयराज पटवर्धन, सी. ए.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कानबाई निघाली गंगेवरी...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

खानदेश भागातील कुटुंबियांच्या घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या कानबाईची सोमवारी वाजत गाजत मिरवणूक काढून गोदावरीत विसर्जन करण्यात आले. रामकुंडावर शहरातील विविध भागांतून भाविकांनी कानबाईच्या मूर्ती आणल्या होत्या. त्यांचे रामकुंड परिसरात विधीवत पूजन करण्यात येत होते.

नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाईची स्थापना घरोघरी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी कानबाईचे रामकुंड येथे पूजा करून विसर्जन करण्यात येते. विशेषतः खानदेशातील कुटुंबियांमध्ये कानबाईच्या स्थापनेची परंपरा आहे. या भागातील महिला भाविकांची या उत्सवासाठी रामकुंड परिसरात गर्दी झाली होती. ढोलताशांच्या गजरात मस्तकावर सजविलेल्या कानबाईची मूर्ती घेऊन भाविक येत होते. मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करण्यात आला. महिला पूजा करण्यात महिला दंग झाल्या होत्या.

कानबाईची स्थापना केल्यानंतर त्या कुटुंबात गव्हाच्या पिठाचे रोट बनविण्याची प्रथा आहे. हे रोट बनविताना तेलाचा वापर केला जात नाही. हे रोट फक्त त्या कुटुंबातील सदस्य किंवा जवळचे नातवाईक यांना दिले जातात. अशी या उत्सवाची परंपरा शहर परिसरातील खानदेश भागातील कुटुंबात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील धरणांत ७२ टक्के साठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे गिरणा धरण निम्मे भरले आहे. या धरणामधील उपयुक्त पाणीसाठा ५१ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सोमवारी दिली. सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा ७२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची अशी एकूण २४ धरणे आहेत. त्यापैकी गिरणा हे सर्वाधिक पाणीसाठवण क्षमतेचे धरण म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट म्हणजेच सुमारे ६६ टीएमसी आहे. त्यापैकी एकट्या गिरणा धरणाची पाणीसाठवण क्षमता १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट म्हणजेच १८.५ टीएमसी एवढी‌ आहे. या धरणामध्ये आजमितीस ९,३७६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एक महिन्यापूर्वी या धरणामध्ये ४,८४५ दशलक्ष घनफूट म्हणजेच २६ टक्के पाणी होते. महिनाभरात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा दुपटीने वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांमधील पाणीसाठा ७२ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणांमध्ये ४७ हजार ४३० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे.

सात धरणांत शंभर टक्के पाणी

जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे धरणांमधील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे. जिल्ह्यातील सात धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर पावसाचे प्रमाण आणि अनेक धरणांची पाणीसाठवण क्षमता गृहीत धरून त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी आणि केळझर या धरणांमधील पाणीसाठा शंभर टक्क्यांवर गेला आहे. गंगापूर, दारणा, काश्यपी या धरणांमधून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला; अन्यथा ही धरणेही आतापर्यंत पूर्ण भरली असती.

केळझर धरण ओव्हरफ्लो

सटाणा ः सटाणा शहरासह पश्चिम पट्ट्यातील ३८ खेड्यांच्या पिण्याच्या पाण्याचे व शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणारे केळझर धरण ओव्हरफ्लो झाल्याने सटाणा परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. पश्चिम भागातील संततधारेमुळे केळझर धरणाला दिलासा मिळाला.

धरण पाणीसाठा (टक्के)

‍आळंदी १००, वाघाड १००, भावली १००, वालदेवी १००, भोजापूर १००, हरणबारी १००, केळझर १००, कश्यपी ९४, गौतमी गोदावरी ९२, दारणा ८९, कडवा ८५, नांदूरमध्यमेश्वर ८४, करंजवण ८३, गंगापूर ८१, ओझरखेड ८०, पुणेगाव ७१, तिसगाव ६७, पालखेड ६६, मुकणे ६३, चणकापूर ६२, गिरणा ५१, पुनद ४८, नागासाक्या ०, माणिकपुंज ०, एकूण ७१.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा पुरस्कारासाठी आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ भारत मिशन, जनधन योजना, आरोग्य जागृती, स्वयंरोजगार कौशल्य विकास कार्यक्रम व अन्य महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या युवक मंडळांनी नेहरू युवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई यांनी केले आहे. २५ हजार रुपये, धनादेश व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अर्जाचा नमुना नेहरू युवा केंद्राच्या प्रणव इमारत, दोंदे पुलाजवळ, उंटवाडी नाशिक या कार्यालयात उपलब्ध आहे.

‘कैद्याबाबत माहिती द्या’

नाशिक ः नाशिक मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन कैदी शिवराम ऊर्फ शिवाजी शांताराम इंगळे याच्या मृत्यूच्या घटनेबाबत कोणास माहिती द्यावयाची असल्यास किंवा काही हरकत असल्यास १० ऑगस्टपर्यंत लेखी माहिती द्यावी, असे आवाहन येवल्याच्या प्रांताधिकाऱ्यांनी केले आहे. न्यायाधीन कैदी इंगळे यांना कारागृह रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय दंडाधिकारी भीमराज दराडे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

ग्रामस्वच्छता पंधरवडा

नाशिक ः जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रातर्फे १ ते १५ ऑगस्ट २०१७ दरम्यान ग्रामस्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या वेळी स्वच्‍छतेची शपथ घेण्यात येणार आहे. गावातील मोकळी जागा, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, खेळांचे मैदान या ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक, युवा मंडळ महिला मंडळ, सेवा भावी संस्थेच्या सहाकार्याने नाशिक, सुरगाणा, सटाणा, कळवण, पेठ, दिंडोरी, देवळा, नांदगाव, मालेगाव, चांदवड, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या सर्व तालुक्यांतील निवडलेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये कार्यक्रम होणार आहे. केंद्राशी संलग्न युवा मंडळांनी स्वच्छता अभियान कार्यक्रम आपापल्या गावामध्ये राबवावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वच्छता अभियाना’चा फज्जा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये असलेल्या वरचे चुंचाळे गावाला दीड हजार लोकवस्तीला केवळ पाच शौचालय आहेत. यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडाला आहे. परिसरात अनेकांच्या घरात आजही शौचालय नसल्याने उघड्यावर शौच करावी लागत असल्याने महापालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. त्यातच असलेल्या पाच शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

स्वच्छ भारत अभियानात झोपडपट्टी भागासाठी महापालिकेने केंद्र शासनाच्या मदतीने शौचालयांसाठी निधी मंजूर केला होता. यात ज्यांच्याकडे स्वतःचे शौचालय नसेल अशांनी महापालिकेकडे नोंदणीही केली होती. परंतु, महापालिकेच्या सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये असलेल्या वरच्या चुंचाळ्यात अनेकांना शौचालय मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत येथील नागरिकांना सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागतो. या सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याने उघड्यावर शौच करण्याची वेळ रहिवाशांवर येत आहे. त्यातच असलेल्या सार्वजनिक शौचालयात दहा भांड्यांची व्यवस्था महापालिकेने केली होती. मात्र केवळ पाच शौचालये बांधल्याने उरलेली भांडी पडून आहेत.

चुंचाळे गावाचा महापालिकेत समावेश झाल्यापासून नागरी सुविधांची वानवा आहे. वरच्या चुंचाळ्यात महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयात पाचच भांड्यांची व्यवस्था आहे. यामुळे अनेकांची गैरसोय होते तर अनेकजण उघड्यावरच शौच करत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असते.

दिनेश कांबळे, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा वाढीव वीजबिलाचा शॉक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वीज मिटरचे रीडींग प्रत्येक महिन्याला एका ठराविक तारखेस घेतले जात नसल्याचा प्रकार शहरात सर्रास सुरू आहे. परिणामी वीजब‌िलांच्या रकमेत व कालावधीत तफावत वाढली आहे. चालू महिन्यात अवघ्या वीस दिवसांचेच मीटर रीडिंग घेण्यात आल्याचे समोर आले आहे. मे महिन्यापासून अव्वाच्या सव्वा वीजब‌िल येत असल्याने वीज ग्राहकांच्या रोषावर महावितरणकडून अशा प्रकारचा अफलातून उतारा शोधला असण्याची शक्यता वीज ग्राहकांतून वर्तवण्यात आली आहे.

मे महिन्यापासून वीजब‌िलांत वाढ झाली आहे. विद्युत नियामक आयोगाने १ एप्रिल २०१७ पासून घरगुती वीज वापरासाठी निर्धारीत केलेल्या वीजदरांप्रमाणे ब‌िल सध्या दिली जात आहेत.त्यापुर्वी दि.१ नोव्हेंबर २०१६ रोजी विद्युत नियामक आयोगाने घरगुती वीज वापरासाठी निर्धारीत केलेल्या वीज दरांप्रमाणे वीजब‌िल दिले जात होते. परंतु, एप्रिल महिन्यापासून लागू झालेले नवीन निर्धारीत वीज दर व उन्हाळ्यामुळे वाढलेला वीजवापर या कारणांनी वीजब‌िलांची रक्कम वाढल्याचा खुलासा महावितरणने यापूर्वीच केला होता. मात्र, अव्वाच्या सव्वा वीजब‌िल येण्याचा प्रकार अद्याप थांबलेला नसल्याने वीजमीटरमध्येच दोष असल्याने मीटर टप्प्याटप्प्याने बदलण्याचे नियोजन महावितरणने केले आहे. या सर्व प्रकारामुळे वीज ग्राहक मात्र हवालदिल झाले आहेत.

वीजब‌िल पुन्हा वाढणार

घरगुती वीज वापरासाठीचा दर युनिटच्या टप्प्यांवर अवलंबून असतो. व‌िजेचा वापर पहिल्या शंभर युनिटच्या आत असेल, तर वीजब‌िल वाजवी येते. परंतु, वीज वापर शंभर युनिटच्या पुढे गेला तर मात्र वीज युनिटचा दर दुप्पटीहून जास्त आहे. याशिवाय इतर छुपे करही वाढतात. त्यामुळे साहजिकच वीजब‌िलाची रक्कम वाढते. वास्तविक शंभर युनिटच्या वर वाढीव वीजदर लागू केला पाहिजे. परंतु, त्याऐवजी सर्वच युनिटवर वाढीव वीज दराने आकारणी केली जाते. वीजवापर शंभर युनिटच्या खाली ठेवण्यासाठी चालू महिन्यात अवघ्या वीस दिवसांचेच मीटर रीडींग घेतले गेले आहे. त्यामुळे साहजिकच अशा वीज ग्राहकांना वीज बील कमी येईल. मात्र, उर्वरित दहा दिवसांच्या वीज वापराच्या युनिटवरील आकार त्यापुढील महिन्यातील वीजब‌िलात आकारला जाणार आहे. पर्यायाने वीज ब‌िलाची रक्कम पुन्हा भरमसाठ येण्याची शक्यता आहे.

महावितरणच डाव?

चालू महिन्यात वीस दिवसांचे व पुढील महिन्यात चाळीस दिवसांचे मीटर रीडींग घेण्यामागे वापरलेले वीज युनिट शंभरच्या वर यावेत यासाठीचा महावितरणचा डाव असण्याची शक्यता वीज ग्राहकांनी वर्तवली आहे. या प्रकाराने चालू महिन्याच्या वीज ब‌िलात ग्राहकांना दिलासा मिळणार असला, तरी पुढील महिन्याचे वीजबिल बघून मात्र वीज ग्राहकांना हाय व्होल्टेज शॉक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


कायद्याने तीस दिवसांचे वीजब‌िल देणे बंधनकारक असूनही महावितरणकडून काही वीज ग्राहकांना दोन महिन्यांचे, तर काहींना केवळ १५ ते २० दिवसांचेच ब‌िल दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वीज मीटर रीडींग एजन्सीवर महावितरण प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. खोटी वीजब‌िले दिली जात आहेत. अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे अशा स्वरुपाच्या १७ तक्रारी दाखल केल्या असून, त्यात वाढ होणार आहे.

- विलास देवळे, जिल्हा ग्राहक मंच

आता सेंट्रलाइज बिलिंग सिस्टीम मोबाइल अॅपद्वारे मीटर रीडींग घेतले जात आहे. या पद्धतीत प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला मीटर रीडिंगची व्यवस्था आहे. एखाद्या ग्राहकाला महिन्यापेक्षा कमी कालावधीचे वीज बिल आल्यास उर्वरित दिवसांचे स्वतंत्र ब‌िल असेल. त्यामुळे कोणत्याही वीज ग्राहकाचे आर्थिक नुकसान होणार नाही.

-ए. एम. थोरात (कार्यकारी अभियंता, नाशिक शहर मंडळ-२, महावितरण)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वासाळी, दुडगावात रस्त्यांची झाली चाळण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या वासाळी ते दुडगाव तीन मीटरच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वासाळी शिवारात एका सिमेंटच्या विटा तयार करणाऱ्या कारखान्यात रोजच अवजड वाहनांची ये-जा सुरू असलेल्या नव्याने बनविलेला डांबरी रस्त्या काही महिन्यातच खड्डेमय झाला आहे.

या रस्त्यांबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी शेतकऱ्यांना बरोबर घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देत संबधित कारखान्यावर कारवाईची मागणी केली आहे. तीन मीटरच्या रस्त्यालगत ग्रीन पट्ट्यात कारखान्याला परवानगी दिलीच कोणी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकऱ्यांना शहरात आपली वाहने नेता यावी यासाठी नव्याने डांबरी रस्ता केला होता. परंतु, सिमेंटच्या झालेल्या कारखान्यात रोजच अवजड वाहनांची वर्दळ असल्याने नवीन डांबरी रस्त्याचे खड्ड्यांमध्ये रुपांतर झाले आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम यांनी संबधित अवजड वाहनांवर तत्काळ कारवाई करत बंदी घालावी. तसेच ग्रीन पट्ट्यात कारखान्याला परवानगी देणाऱ्यांची नायब तहसीलदार अरूण शेवाळे यांनी चौकशी लावावी, अशी मागणी खांडबहाले व शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी अरूण मते, त्र्यंबक तिदमे, दीपक ढोमसे, बबनराव दुसाने, सचिन कासार, किरण शिंदे यांसह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कराचे डेअरी फार्म होणार इतिहासजमा

$
0
0

संरक्षण मंत्रालयाचे आदेश; देवळाली परिसरातील युवकांवर बेरोजगाराचे संकट

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

ब्रिटिशकाळापासून लष्करासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांची गरज भागवणारे लष्कराचे डेअरी फार्म बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशभरातील काही डेअरी फार्म आधीच बंद करण्यात आले असून, आता देवळालीतील फार्मही बंद होणार असल्याने कंत्राटी पद्धतीवर काम करणारे स्थानिक दोनशेहून अधिक युवक बेरोजगार होणार आहेत.

लष्करी छावण्या शहरापासून दूर असल्याने दूध व दुधाचे पदार्थ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जेथे कॅन्टोन्मेंट परिसर आहे, अशा ठिकाणी सन १८८९ मध्ये मिलिटरी डेअरी फार्मची रचना करण्यात आली होती. मात्र, शहरीकरणाच्या रेट्यात लष्कराच्या कॅन्टोन्मेंट भाग हा शहरी भागातच गणला जात असल्याने दुग्धजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. क्वॉर्टर मास्टर जनरल विभागाने सर्वेक्षण करून हा खर्चिक विभाग बंद करण्यात यावा, अशा सूचना केल्या होत्या. देशभरामध्ये लष्कराचे असे ३९ डेअरी फार्म असून, त्यापैकी २०१३ व २०१५ साली देशाच्या विविध भागांतील २९ डेअरी फार्म बंद करण्यात आले होते. उर्वरित १० डेअरी फार्म ३० ऑक्टोबर २०१७ पर्यंत बंद करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार देवळालीतील मिलिटरी डेअरी फार्मला टाळे लागणार आहे.

जमीन लष्करासाठीच

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संरक्षण मंत्रालयामार्फत तशा सूचना सदर्न कमांड यांना करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाराष्ट्रात पुण्यातील पिंपरी, अहमदनगर व देवळाली येथे असे डेअरी फार्म कार्यरत आहेत. फार्मची जमीन लष्कराच्या इतर कामांसाठी वापरण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. देवळालीत या फार्मवर ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या शेकडो जण बेरोजगार होतील.

डेअरी फार्म दृष्टिक्षेपात

देशभरात ३९ मिलिटरी डेअरी फार्म, व्याप्त जमीन - २० हजार १२६ एकर, पशूधन - २३ हजार ६००, दूध निर्मिती - ३३५ लाख लिटर
कार्यरत लष्करी जवान - सुमारे दोन हजार, कार्यरत लष्करी अधिकारी - २०

देवळालीतील डेअरी फार्मची स्थिती

वार्षिक उलाढाल - सुमारे एक कोटी रुपये, गायी, म्हशी - ८०० हून अधिक, स्थानिक कंत्राटी कामगार - २०० हून अधिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेटेंचा अर्ज अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील मविप्रचे ज्येष्ठ संचालक श्रीराम शेटे यांच्यासह चार जणांचे उमेदवारी अर्ज लवादाने अपात्र ठरविल्याने मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सत्ताधारी प्रगती पॅनलला जबर धक्का बसला आहे. शेटे हे कादवा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याने आता आगामी घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तीन ऑगस्ट रोजी अर्ज माघारीनंतर मविप्रच्या निवडणूक आखाड्यात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता असतानाच लवादाच्या निर्णयाने तत्पूर्वीच या घडामोडींना वेग आला आहे. अॅड. शिवाजी खालकर यांच्या लवाद मंडळाने श्रीराम शेटे यांच्यासह नंदा सोनवणे, गुलाबराव भामरे आणि नानासाहेब सोनवणे या चौघांचे अर्ज अपात्र ठरविले. यामुळे आता २१ जागांसाठी तब्बल ३३३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तीन ऑगस्टपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर ही संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. निवडणूक मंडळाने हरकती फेटाळल्यानंतर तक्रारदारांनी लवादाकडे अपील केले होते. लवादाला अंतिम निर्णय देण्यास सोमवार दुपारपर्यंतची मुदत होती. त्यानुसार हा निर्णय जाहीर होताच मविप्रच्या वर्तुळात खळबळ उडाली.

शेटेंचा यामुळे अर्ज अपात्र
श्रीराम शेटे यांच्या अर्जावर सुरेश डोखळे यांनी हरकत घेताना शेटे हे कादवा साखर कारखान्याशी संलग्न रा. स. वाघ शिक्षण संस्थेचे सभासद असल्याचे कारण देण्यात आले होते. याबाबतचा पुरावा म्हणून वाघ शिक्षण संस्थेतील चेंज रिपोर्ट सादर करण्यात आला. चेंज रिपोर्टमधील तारखा आणि संदर्भाचे पुरावे ग्राह्य धरताना संस्थेच्या घटनेच्या नियम १८/६ प्रमाणे शेटे यांचा अर्ज अपात्र ठरवत अपिलकर्त्याचे अपील मंजूर केल्याचा निर्णय लवाद मंडळाने दिला. शेटे व डोखळे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत.

दरम्यान, नानासाहेब दाते यांच्या महाविद्यालयीन सेवक सदस्यपदाच्या अर्जावर अशोक पिंगळे यांनी हरकत घेत त्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी शिल्लक असल्याचे म्हटले होते. यावर लवादाने हे अपीलही मान्य करत दाते यांचा अर्ज अपात्र ठरविला. त्यामुळे दाते यांचा अपात्र ठरलेला अर्ज विरोधी गटासाठीही धक्का मानला जातो आहे. लवादाच्या निकालानंतर मविप्रच्या वर्तुळात या घडामोडींबाबत सोमवारी दुपारपासून जोरदार चर्चा रंगली आहे. यापाठोपाठ प्राथमिक व माध्यमिक सदस्यपदासाठी गुलाबराव भामरे आणि नंदा सोनवणे यांच्या अर्जावर सयाजी पाटील आणि केशव शिरसाट यांनी अपील दाखल केले होते. लवादाने भामरे व सोनवणे परिशिष्ट ‘क’ नुसार सेवेचा अवधी कमी शिल्लक असल्याने त्यांचेही अर्ज अपात्र ठरत असल्याचा निकाल दिला.

२१ जागांसाठी ३३३ इच्छुक

लवादाने चार उमेदवारांना अपात्र ठरविल्याने आता या रिंगणात एकूण २१ पदांसाठी तब्बल ३३३ उमेदवार उरले आहेत. माघारीनंतर यापैकी बहुतांश अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. गुरुवार (३ ऑगस्ट) ही माघारीसाठी अंतिम मुदत आहे. यामुळे आता सरचिटणीसपदासाठी एकूण १६, तर अध्यक्ष आणि सभापती या पदांसाठी प्रत्येकी १८ अर्ज शिल्लक राहिले आहेत. आता अर्ज माघारीकडे मविप्र वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मविप्रसाठी १३ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. लवादाच्या निर्णयानंतर आता अध्यक्ष आणि सभापतिपदासाठी प्रत्येकी १८, सरचिटणीसपदासाठी १६, चिटणीसपदासाठी ३२, तर उपसभापतिपदासाठी ३८ अर्ज दाखल आहेत. तालुका सदस्यपदासाठी इगतपुरीमधून १३ , कळवण-सुरगाण्यातून १३, चांदवडमधून ७, दिंडोरी-पेठ मधून ५, नाशिक शहरातून ७, निफाडमधून ४६, नांदगावमधून १२, सटाण्यातून ३४, मालेगावमधून ५, येवल्यातून १५, सिन्नरमधून १६, देवळ्यातून १०, नाशिक ग्रामीणमधून १३, प्राथमिक व माध्यमिक सेवकपदासाठी १० आणि महाविद्यालयीन सेवकपदासाठी ५ असे एकूण ३३३ अर्ज आता निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कठीण प्रसंगातही शिक्षण थांबवू नका’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशाच्या प्रगतीसाठी मुस्लिम बांधवांनी देखील शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी आपले शिक्षण थांबू नये, असे प्रतिपादन मुंबई येथील डॉ. रोशन शेख यांनी केले.

नाशिक ग्रामीण व मालेगाव पोलिस दलातर्फे ‘उडाण’ प्रकल्पांतर्गत शहर व तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना करियर मार्गदर्शन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परिक्षा आणि वैद्यकीय व्यवसाय एक करियर’ या विषयावर डॉ. शेख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस उप अधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, डॉ. शशिकांत वाव्हळ, अब्दुल रहेमान, अनिकेत भामरे, गुफरान अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. शेख म्हणाल्या, वयाच्या सोळाव्या वर्षी एका रेल्वे अपघातात दोघेही पाय गमवल्यानंतर देखील मी जिद्दीने पुढील शिक्षणाचा प्रवास सुरू केला. त कुटुंबियांनी हिम्मत दिली. नीट प्रवेश परिक्षा उत्तीर्ण होवून देखील अंपगात्वामुळे मला प्रवेश नाकारण्यात आला. मात्र मी न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे तुम्हीही जीवनात हार मानू नका, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’साठी उरलेत शेवटचे तीन दिवस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मॉडेल बनण्यासाठीचा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म असलेली श्रावणक्वीन स्पर्धा यंदा संपूर्णपणे नाशिकलाच रंगणार असून, नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस उरलेले आहेत. त्यामुळे त्वरीत नोंदणी करावी. प्राथमिक निवड चाचणीपासून ते ग्रँड फिनालेपर्यंतचे सर्व इव्हेंट नाशिकला होणार असून, यंदा पहिल्यांदाच नाशिकची स्वतंत्र श्रावणक्वीन झळकणार आहे.

स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष आहे. दरवर्षी श्रावणक्वीन स्पर्धा घेण्यात येते. मात्र, फायनल मुंबईला होत असल्याने नाशिकमधून निवडलेल्या तीन स्पर्धक ग्रूमिंगसाठी मुंबईला पाठविण्यात येत असत. मात्र, यंदापासून नाशिकलाच ‘श्रावणक्वीन’ होणार असल्याने निवडीपासून ग्रूमिंग, इंट्रोडक्शन, कम्युनिकेशन स्किल्स, शोरूम व्हिज‌िट, फॅशन डिझायनिंग, फिटनेस हेल्थ केअर, फोटोशूट, ग्रँड रिहर्सल आणि फायनल नाशिकलाच होणार आहे. अधिकाधिक तरुणींनी श्रावणक्वीन स्पर्धेत सहभागी व्हावे.

नोंदणी ऑफलाइनही करता येणार

नावनोंदणीसाठी अटी फक्त दोनच, १८ ते २५ वयोगट आणि अविवाहित असणं. आता प्राथमिक फेरीसाठी नावनोंदणी कशी करायची? तर, www.mtshravanqueen.com या वेबसाइटवर जाऊन ‘पार्टिसिपेट नाऊ’ वर क्लिक करा. इथला फॉर्म भरल्यानंतर सोबत फोटो आणि दोन मिनिटांच्या व्हिडिओचीही लिंक अपलोड करायची आहे. यामध्ये तुमची ओळख आणि स्पर्धेमध्ये भाग का घेत आहात, हे सांगणं अपेक्षित आहे. स्पर्धेचे नियम साइटवर दिलेले आहेत. ज्यांना ऑनलाइन नोंदणी करणे शक्य होत नसेल त्यांनी ऑफिसमध्ये येऊन प्रत्यक्ष नोंदणी केली तरी चालणार आहे. येतांना आपले पोस्टकार्ड साईज दोन फोटो, दोन मिनिटांचा व्हिडीओ पेनड्राईव्हमध्ये, आयडेंटिटी प्रूफ आणावे. ऑफिसमध्ये येऊन एक फॉर्म भरावा लागणार आहे. ज्यांना कॉलेजमध्येच फॉर्म भरावयाचा आहे त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सीसीआर यांना भेटावे. त्यांच्याकडेही फॉर्म देण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५७ हजार इकोफ्रेंडली पिशव्यांचे लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेच्या महानगर शाखेतर्फे ५७ हजार इकोफ्रेंडली बहुउपयोगी पिशव्या तयार करण्यात आल्या आहेत. या पिशव्यांचे लोकार्पण शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरामुळे मनुष्याच्या व प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गणेशोत्सवात दहा दिवसांत निर्माण होणारे निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीत भरून गोदावरी नदीत टाकले जात असल्याने गोदावरीचे प्रदूषणदेखील वाढीस लागले आहे. यावर पर्याय म्हणून, तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासंबंधी आवड निर्माण व्हावी व गोदामाईचे होणारे प्रदूषणही थांबावे या उद्देशाने शिवसेना नाशिक महानगरच्या वतीने या इकोफ्रेंडली बहुउपयोगी पिशव्या तयार करण्यात आल्या आहेत. या पिशव्यांचे शहरातील विविध शाळांमध्ये वाटप करण्यात येणार असून, नाशिककरांनी या पिशव्यांचा जास्तीत जास्त उपयोग करावा व प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन शिवसेना नाशिकच्या वतीने महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले आहे. या प्रसंगी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, मनपा गटनेते विलास शिंदे, राजू लवटे, नगरसेवक आर. डी. धोंगडे, प्रशांत दिवे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतीश नाडगौडा यांचे आजपासून उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटननेचे राज्य अध्यक्ष सतीश नाडगौडा आजपासून (१ ऑगस्ट) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महसूल आयुक्त व शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. गेल्या सतरा वर्षांपासून प्रलंबित मागण्यांवर सरकार पातळीवर कोणतीही दखल घेतली जात नसल्याने हे उपोषण करण्यात येत असून, राज्यातील शिक्षक, शिक्षक संघटना यांच्याकडून त्यांना पाठिंबा दिला जात आहे.

२००० पासून शिक्षकेतरांसाठी आकृतिबंध प्रस्तावित करण्याच्या नावाखाली शिक्षकेतरांची पदे मंजूर करण्यात येत नाहीत, तसेच पदोन्नतीच्या पदांनाही मान्यता मिळत नाही. त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रासासोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नैराश्याने ग्रासले आहे. राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांबरोबर अनुदानित खासगी शाळा स्तरांवर कामे करणारी एकमेव नोंदणीकृत अधिकृत संघटना असताना शासन स्तरावर त्याची दखल न घेतल्याचे कारणही आंदोलन करण्यामागे सांगितले जात आहे. केंद्र, राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी वर्गास मिळाण्यापूर्वी शिक्षकांना लागू करण्यात आलेली त्रिस्तरीय वेतनश्रेणी केवळ शिक्षकेतरांनाच लागू करण्यात आलेली नाही. ती विनाविलंब लागू करण्यात यावी, अशा विविध मागण्याही करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समितीच्या पाहणी दौऱ्याकडे लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मालेगाव शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी येथील पालिका प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून विविध उपक्रम राबविले होते. यासाठी राज्य शासनाकडून ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. सोमवारी ही मुदत संपली असून, मुदतीअखेर पाच हजार ७७२ वैयक्तिक व ५० सार्वजनिक शौचालय पूर्ण झाल्याची माहिती स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे प्रमुख अभिजित पवार यांनी दिली.

गेल्या जून महिन्यात आयुक्त संगीता धायगुडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहर हागणदारीमुक्त अभियानास वेग आला होता. वैयक्तिक शौचालयांचे काम देखील वेगाने पूर्ण करण्यात येत होते. तसेच हागणदारीमुक्तीसाठी पालिकेकडून जनजागृती करणे, कार्यशाळा आयोजित करणे, स्वयं घोषणापत्र घेणे, पथनाट्य घेणे असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर थेट पोलिसी कारवाईचा बडगा उगारण्यात येवून ७० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पालिकेने सर्वेक्षणाद्वारे शहरात सुमारे ५८ ठिकाणे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यानुसार ५० हून अधिक सार्वजनिक शौचालय पूर्ण करण्यात आले.

दरम्यान, शासनाने ३१ जुलै ही मुदत दिल्याने मालेगाव महापालिका प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाली होती. त्यामुळे मुदतीअखेर हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असून, याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. यानंतर शासनाच्या समितीकडून मालेगाव दौरा करून पाहणी करणार आहे. ही समिती मालेगावात आल्यानंतर या भागांची पाहणी करणार आहे. समितीच्या अहवालानंतरच पालिकेला शहर हागणदारीमुक्त करण्यात कितपत यश आले हे स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीमुळे बाप्पा महागणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पर्यावरणीय दृष्ट्या जनजागृती झाल्याने नाशिकमध्येही अनेक नागरिकांचा कल शाडूमातीच्या मूर्ती स्थापित करण्याकडे वाढला आहे. मात्र, यंदा गणेशोत्सवाला जीएसटीचा फटका बसणार असून, त्यामुळे भाविकांच्या खिशाला चाट पडणार आहे.

शाडू मातीच्या मूर्ती, मोती, कुंदन, डायमंड, एम्ब्रॉयडरी लेस, आयलॅशसारख्या साहित्याने सजविण्यात येत असल्याने या साहित्यांवर वाढलेला जीएसटी लक्षात घेता शाडू मातीच्या मूर्ती महागणार आहेत. रंग साहित्यावर २८ टक्के, प्लास्टर ऑफ पॅरिसला ५ टक्के जीएसटी व सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंवरही १८ टक्के जीएसटी लागू झाल्याने मूर्ती बनविणे महागले आहे. त्याचा परिणाम मूर्ती बनविणाऱ्या व्यावसायिकांवर झाला असून, हजार मूर्ती बनविणारा कारखाना यावर्षी साधारण ७०० ते आठशे मूर्ती बनवणार आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या किमतीही जवळपास २० ते २५ टक्के महागणार आहेत.

मंडळांची लगबग

गणेशोत्सवाला अवघा महिनाभराचा कालावधी बाकी असल्याने सार्वजनिक उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. तरुण मंडळांकडून उत्सवाचे बजेट आखले जात असून, वर्गणीसाठीची गणिते आखणे सुरू झाले आहे. यंदा गणेशोत्सव १२ दिवसांचा असल्याने त्यानुसार खर्चाचे आकडेही वाढले आहेत. त्यामुळे मंडळांत लगबग सुरू झाली आहे.अशीच लगबग गणेशमूर्ती कारखान्यांसह नाशिकच्या रस्त्यांवर असलेल्या गणेशमूर्ती विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे पाहायला मिळू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीवाटपावरून राजकारण

$
0
0

म. टा वृत्तसेवा, मालेगाव

तळवाडे साठवण तलावातील पाण्यावर शहराचा हक्क अबाधित आहे. अतिरिक्त ५० दलघफू पाण्याचे आरक्षण दाभाडीसाठी करण्यात येणार आहे. दाभाडीला पाणी देण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर झाला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व महागठबंधन आघाडी जाणीवपूर्वक याबाबत नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप महापौर रशीद शेख यांनी केला.

पालिकेच्या २० जुलै रोजी झालेल्या महासभेत तळवाडे साठवण तलावातून दाभाडीसाठी पाणी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. याबाबत राष्ट्रवादी तसेच महागठबंधन आघाडीने मात्र विरोध कायम ठेवत माजी आमदार मौलाना मुफ्ती व महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल यांनी शहराच्या हक्काचे पाणी दाभाडीला दिले जात असल्याचा आरोप केला होता. यावर महापौर दालनात आयोजित पत्रकार परिषदेत शेख बोलत होते. यावेळी एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज, स्थायी समिती सभापती सलीम अन्वर उपस्थित होते.

महापौर शेख यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे महापौर हाजी मोह. इब्राहीम यांच्या कार्यकाळात दाभाडीला पाणी देण्याबाबत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत सादर केली. तसेच या पाणावाटपाबाबत होत असलेले राजकारण शहराला घातक असल्याचे शेख म्हणाले. तळवाडे साठवण तलावातील ८७ दलघफू पाण्याचे आरक्षण शहरासाठी कायम असून, त्या व्यतिरिक्त शासनाकडून ५० दलघफू पाणी चणकापूर धरणातून आरक्षित केले जाणार आहे.

ठरावावर आक्षेप

२० जुलैच्या महासभेत दाभाडी गावाला पाणी देण्याचा ठराव विखंड‌ित करून शासनाकडे पाठवा, यासाठी मौलाना मुफ्ती व गटनेते बुलंद इक्बाल बुधवारी आयुक्तांची भेट घेणार आहेत.


विरोधाचा अधिकार नाही

तत्कालीन महापौर हाजी इब्राहीम यांच्या कार्यकाळातच महासभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे दाभाडीला पाणी देण्याबाबत आता त्यांना विरोध करण्याचा अधिकार नसल्याचे शेख यांनी सांगितले. पाणी देण्याच्या मुद्द्यावर विरोधक शहरवासीयांची दिशाभूल करीत असून त्यास धार्मिक, जातीय रंग देण्याचा प्रयत्न शहराच्या हिताचे नाही, याचे तरी भान मुफ्ती व बुलंद इक्बाल यांना आहे का, असा सवाल त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडित महिलांसाठी ‘सखी’ची धाव

$
0
0

नाशिक : अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर, समुपदेशक व गरज असल्यास आश्रयाची सुविधा उपलब्ध असावी, या हेतूने केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘सखी’ वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात येत आहे. राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे सेंटर सुरू करण्यात येत असून, नाशिककडे पायलट प्रोजेक्ट म्हणून पाहिले जात आहे. वात्सल्य महिला वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले असून, हे सेंटर कायमस्वरूपी उभे करण्याच्या प्रयत्नात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून प्रक्रिया सुरू आहे.

शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, अॅसिड अॅटॅक किंवा सायबर क्राइममधील पीडित अशा कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलिस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचाराचा सामना करावा लागल्यानंतर अशा व्यक्तींकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता तिची उरलेली नसते. अशा महिलांना या योजनेंतर्गत एकाच छताखाली मोफत वैद्यकीय सुविधा, पोलिस मदतकेंद्र, समुपदेशन केंद्र, कायदेशीर मदत अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याबरोबरच पीडितेच्या गरजेनुसार तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधादेखील या सेंटरमध्ये ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. २०१५ पासून देशभरात विविध ठिकाणी या सेंटर्सची सुरुवात करण्यात आली असून, राज्यातील विविध ११ जिल्ह्यांमध्ये नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नाशिकबरोबरच पुणे, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर, अमरावती, बीड, अकोला येथे हे सेंटर्स सुरू करण्यात येणार आहे.

चोवीस तास सेवा

वन स्टॉप सेंटरमध्ये चोवीस तास सेवा पुरवली जाणार आहे. दहा कर्मचाऱ्यांची टीम यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे निश्चित केली जाणार आहे.

अशी असणार रचना

वन स्टॉप सेंटरची रचना कशा प्रकारची असावी, याचा आराखडा केंद्राच्या महिला व बालविकास मंत्रालयाने निश्चित करून दिला आहे. दोन मजल्यांमध्ये हे सेंटर उभारले जाणार आहे. त्यातील पहिल्या मजल्यामध्ये कार्यालयीन प्रशासक, व्हीडिओ कॉन्फरन्सिंग, समुपदेशक, वैद्यकीय सल्लागार या प्रत्येकांसाठी एक विशेष खोली, शिवाय पाच बेड असलेली वेगळी खोली, पँट्री रूम, दोन शौचालये यांची बांधणी केली जाणार आहे, तर दुसऱ्या मजल्यावरदेखील राहण्याची सुविधा, शौचालये, पँट्री रूम असणार आहे.

जागेचा प्रश्न सुटेपर्यंत ‘वात्सल्य’च सेंटर

वन स्टॉप सेंटरसाठी संपूर्ण निधी केंद्राच्या निर्भया फंडमधून दिला जाणार आहे. या सेंटरसाठी सुमारे चौदाशे स्क्वेअर फूट इतकी जागा अपेक्षित आहे. ही जागा सिव्हिल हॉस्पिटलपासून जवळ असावी, हा निकषदेखील या सेंटरसाठी ठेवण्यात आला आहे. यानुसार नासर्डी पुलाजवळील शासकीय अनुरक्षणगृहाच्या मोकळ्या जागेचा प्रस्ताव केंद्र सरकारला जुलैमध्ये सादर करण्यात आला असून, या आठवड्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता जिल्हा महिला व वालविकास येथील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. ही जागा निश्चित झाल्यास कायमस्वरूपी वन स्टॉप सेंटर येथे उभारले जाईल. मात्र, हे बांधकाम व सर्व सोयीसुविधा पूर्ण होण्यापर्यंत एक ते दीड वर्षांचा कालावधी लोटणार असून, तोपर्यंत ‘वात्सल्य महिला वसतिगृह’ हेच सेंटर असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवमंदिरांत भाविकांची गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

‘हर हर भोले’, ‘ओम नमः शिवाय’ अशा मंत्रघोषात भाविकांनी दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त पंचवटी परिसरातील शिवमंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती. कपालेश्वर महादेव मंदिरासह सर्वच मंदिरांत भाविकांनी पूजा, जलाभिषेक, दुग्धाभिषेक केला. मंदिर परिसरात विविध पूजा आणि धार्मिक विधी करण्यात येत होते.

तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमात श्रावण महिन्यात जपानुष्ठान यंदाही सालाबादाप्रमाणे सुरू झाले आहे. येथील शर्वायेश्वर महादेव मंदिरात माधवगिरी महाराज, संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दिवसभर भाविकांची पूजा आणि दर्शनासाठी गर्दी होती. पेठनाका येथील कैलासमठात नर्मदेश्वर उत्सव सुरू आहे. तो बघण्यासाठी आणि तेथे दर्शन घेण्यासाठी भाविक आले होते. नांदूरपूल येथील नीलकंठेश्वर, तपोवनातील महामृत्यूंजय महादेव मंदिर आदी मंदिरांतही भाविकांची गर्दी होती. मंदिर परिसराच्या आवारात बेल, फूल, पूजा साहित्य, तीळ, दूध आदींची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण काढले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असतानाच याकडे महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप नगरसेवकांसह स्थानिक नागरिक करीत होते. सोमवारी (दि. ३१) महापालिकेच्या नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्यावतीने त्रिमूर्ती चौक परिसरात रस्त्यांवर भाजी विक्री करणाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.

सिडकोत अतिक्रमणाचा मुद्दा हा दिवसेंदिवस वाढतच असल्याने परिसरातील नागरिकांनी अतिक्रमणाबरोबरच रस्त्यांच्या कडेला भाजी किंवा अन्य विक्रीसाठी बसणाऱ्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याचबरोबर लोकप्रतिनिधींनी अतिक्रमणाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यानंतर विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती चौक भागात अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

लवकरच जुन्या सिडकोतील शिवाजी चौकातदेखील अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार आहे. सिडकोतील अतिक्रमित भाजी विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई केली असली तरी भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडविण्याकडे मनपाचे लक्ष नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्रिमूर्ती चौकात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेप्रमाणे सिडकोतील सर्वच भाजी बाजारांलगत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक गजबजले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे दुसरा श्रावण सोमवार पर्वकाल साधण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती. पावसाने उसंत दिल्याने भाविकांचा उत्साह दुणावलेला दिसून आला. रविवारी रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी कुशावर्तावर गर्दी केली. पहाटे स्नान करून प्रदक्षिणेस सुरुवात केली. निवांत पहुडलेल्या ब्रह्मगिरीभोवती भाविकांनी ‘जय भोले’चा गजर करताच परिसरातील एक निराळेच चैतन्य पसरले होते.

भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी पूर्वदरवाजा दर्शनबारीत सोमवारी गर्दी उसळली होती. देणगी दर्शन रांगेतही भाविकांना तासभर प्रतिक्षा करावी लागली. त्र्यंबक नगरीतील इतर शिवमंदिरांमध्येही दर्शनासाठी स्थानिकांसह बाहेरगावचे भाविक दिसून येत होते. दुपारी सोमवारच्या पालखीस भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. गत काही दिवसांत होत असलेला पाऊस आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते की काय, अशी सोशल मीडियावर झालेल्या चर्चेमुळ गर्दीवर काहीसा परिणाम दिसून आला. त्र्यंबकेश्वर परिसरात उत्साहपूर्ण वातावरण आहे.

भाविक अंधारात

जिल्हाधिकारी कार्यालयासह स्थानिक प्रशासन श्रावण सोमवार निम‌ित्त नियोजनाचे ढोलताशे वाजव‌ित असतांना सोमवारच्या पूर्वसंधेला निम्मे शहर अंधारात होते. त्यामुळे प्र‌दक्षिणेसाठी आलेल्या भाविकांसह स्थानिकांची खूप हाल झाले. श्रावण महिन्यात त्र्यंबमध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी, ब्रह्मगिरी फेरीसाठी येतात. यावर्षी परिसर पालसामुळे खुलला असल्याने गर्दीत वाढ झालेली आहे. रविवारीदेखील प्रदक्षिणार्थींनी शहरात हजेरी लावली. शहरात भाविक आलेले असताना नगरपालिका याबाबत बेदखल असल्याचेच रविवारी दिसून आले. वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत असूनही पथदिव्यांची दुरस्तीबाबत अंधारच राहीला आहे. शहरातील पथदीप आणि हायमास्ट आदी इलेक्ट्रीक यंत्रणा देखभाल दुरुस्ती ठेकेदारीने दिलेली आहे. त्यासाठी महिन्याला अडीच लाख रुपये खर्च करण्यात येतो. मात्र शहरातील अंधाराचे साम्राज्य दूर झालेले नाही. शहरात पथदीप यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. शहरात ठिकठिकाणी विद्युतप्रवाह उतरत असल्यामुळे सायंकाळी दुरुस्तीसाठी कोणीही पुढे येत नाही.

मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांना त्र्यंबक नगरपालिकेच्या व्यतिरिक्त कार्यभार देण्यात आलेले आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, संत निवृत्त‌िनाथ देवस्थान ट्रस्ट, महिन्याभरापासून पेठ नगर पालिका अतिरिक्त कार्यभार त्याच बरोबर नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका आणि मुंबई येथे असलेले कार्यलयीन कामकाज यामुळे त्या व्यस्त असतात. परिणामी त्र्यंबक नगरपरिषदेच्या कामकाजात दिरंगाई होते. त्यामुळे केरूरे यांच्यावर टाकलेली अतिरिक्त जबाबदारी कमी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images