Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

टोमॅटो कडाडला, बळीराजा मात्र नाडला

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

परिसरात गेल्या महिनाभरापासून कोसळत असलेल्या पावसाचा भाजीपाल्यावर चांगलाच प्रभाव पडला आहे. अनेक भाज्यांप्रमाणेच जेवणाची लज्जत वाढविणाऱ्या टोमॅटोचे दर सध्या ६० ते ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, असे असूनही प्रत्यक्ष बळीराजाला मात्र फारसा फायदा होत नसल्याची स्थिती आहे.

अलीकडच्या काही वर्षांत हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून टोमॅटोकडे बघितले जाते. मात्र, परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसाचा फटका टोमॅटोच्या उत्पादनाला बसला आहे. असंख्य शेतकऱ्यांनी एप्रिल-मेच्या दरम्यान लावलेल्या टोमॅटोचे पिकाचे नेमके फळ लागण्याच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसान झाले. टोमॅटोच्या रोपांवरील फूलकळी पावसाने झडून गेली. त्यामुळे उत्पादनात घट झाली. त्यासोबत बाजारपेठेत आवकही घटल्याने टोमॅटोचे दर दुपटीने वाढून ३० ते ४० रुपये प्रतिकिलोवरून थेट ८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. मात्र, असे असूनही शेतकऱ्यांना २० किलोंच्या जाळीसाठी केवळ तीनशे ते साडेतीनशे रुपये मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा फारसा फायदा न होता व्यापाऱ्यांनाच चांगला फायदा होत असल्याची स्थिती आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून टोमॅटो येत आहे.

नाशिकमधील शेतकरी आता आगामी लागवड ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करणार असल्याने ही दरवाढ महिनाभर कायम राहण्याची चिन्हे आहेत. मुंबईसह गुजरात राज्यात मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे व्यापाऱ्यांनी टोमॅटोची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढविली आहे.

सर्वसामान्यांना जरी टोमॅटोसाठी दुप्पट पैसे मोजावे लागत असले, तरी शेतकऱ्यांना २० किलोंच्या जाळीसाठी केवळ तीनशे ते साडेतीनशे रुपये मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांएेवजी व्यापारीच फायद्यात आहेत.

- बाळासाहेब कडभाने, शेतकरी

विविध भाज्या बनविण्यासाठी व डाळींसाठी टोमॅटो पूरक असल्याने तो वापरण्यावर बहुतांश गृहिणींचा भर असतो. मात्र, आत तोदेखील महाग झाल्याने रुचकर जेवणासाठी अन्य पर्याय शोधावा लागत आहे.

- आशा पाटील, गृहिणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूर्वदरवाजा मंडपातून भाविकांना दर्शनप्रवेश

0
0

भाविकांना लांब रांगेतून मिळाला दिलासा

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शनबारीच्या पूर्वदरवाजास उभारण्यात आलेला वॉटरप्रूफ पेंडाल रविवारी भाविकांसाठी खुला करण्यात आला. श्रावण महिना आणि पाऊस हे समीकरण दृढ असतानादेखील दर्शनार्थी भाविकांच्या रांगेची सुविधा करण्यात आलेली नव्हती. मात्र हा पेंडाल खुला केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

साधारणत: पंधरा दिवस भाविक पावसात भिजत होते. श्रावणी सोमावर असल्याने रविवारपासूनच भाविकांची संख्या वाढलेली होती. रविवारी नेहमीप्रमाणे उत्तर दरवाजाची रांग मंदिर प्रांगणाच्या बाहेर पोहचली तेव्हा पूर्वदरवाजास असलेल्या मंडपातून प्रवेश देणे सुरू करण्यात आले. येथे रांगेचे बॅरिकेडिंग कायमस्वरूपी करण्यात आले आहे. पूर्व दरवाजास असलेल्या या मंडपाच्या बाजूस स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली आहे. मात्र येथे स्वच्छतेचा अभाव दिसून आला. यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच स्वच्छतागृहाजवळ पाय धुण्यासाठी पाणीही नाही. तथापि, मंडप भाडेतत्त्वावर घेतला जातो. देवस्थानला त्याकरिता लाखो रुपये मोजावे लागतात. देवस्थान ट्रस्टने स्वतःचा मंडप खरेदी करून त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी अस्थापना निर्माण केल्यास देवस्थानचे पैसे वाचतील आणि काही बेरोजगारांना काम मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा हेल्पलाइन’चा ३७ जणांना सहारा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

२०११ पासून सुरू झालेल्या ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमाने आतापर्यंत ३७ विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. यातील अनेक जण आज नाशिककरांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून व ‘कमवा व शिका’ या योजनेच्या हातभारातून शिक्षण घेत आहेत. या ३७ जणांना सामाजिक जगतात मान वर करून जगण्याचे ‘मटा’ने शिकवलेच, परंतु नाशिककरांनी दिलेल्या पैशांतून हे विद्यार्थी चांगले आयुष्यही जगत आहेत.

‘महाराष्ट्र टाइम्स’ची नाशिक आवृत्ती २०११ या वर्षी सुरू झाली. त्याच वर्षापासून मुंबईच्या धर्तीवर ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रम नाशिकलाही सुरू करण्यात आला. पहिल्या वर्षी तेजस आमले, तेजस शिंदे आणि रोशनी गांगुर्डे या तीन विद्यार्थ्यांच्या निवडीने या उपक्रमाची सुरुवात झाली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या या तिघांनी दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले असल्याने त्यांना मदतीचा हात देण्यात आला. या तिघांसाठी नाशिककरांकडून मदत मागविण्यात आली. दानशूरांनीही भरभरून दान देत त्यांची झोळी भरली. त्यातून त्यांच्या शिक्षणाचा अडलेला प्रवास पुन्हा सुरू झाला. २०१२ मध्ये रोशनी भालेराव, स्वप्नील पवार, प्राजक्ता पाटील व राहुल बोरसे या चौघांची ‘मटा हेल्पलाइन’साठी निवड करण्यात आली. या वेळी निवडीचे तंत्र वेगळे ठेवत नाशिककरांकडूनच नावे मागविण्यात आली. ही नावे सिलेक्ट झाल्यानंतर चेकचा अक्षरशः पाऊस पडला. नाशिककरांची दानशूर वृत्ती या उपक्रमामागे बळकटपणे उभी राहिल्याने हे सर्व शक्य झाले. २०१३ मध्ये रूपेश गांगुर्डे, निकिता देवरगावकर, चैताली तुंगार, अमृता निकम यांच्या रूपाने नाशिकरोडलाही या उपक्रमात समावेशित करून घेण्यात आले. साधारणत: दोन महिने धनादेश जमा झाल्यानंतर एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यात हे चेक विद्यार्थ्यांना देण्यात येतात. २०१४ मध्ये विद्यार्थ्यांची संख्या चारवरून सहावर नेण्यात आली. या वेळी गौतमी धोकटे, प्रतीक्षा खानंदे, रोशन हरिणखेडे, विशाल चव्हाण, जितेश सोनवणे आणि भावेश सोनवणे ही सहा मुले निवडण्यात आली. त्यांनाही नाशिककरांनी भरभरून मदत केली. २०१५ मध्ये ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या १० करण्यात आली. कविता रंजवे, पूर्वा शेटे, अक्षता पवार, सोनल लोखंडे, शुभम गांगुर्डे, मंदार रोकडे, हर्षदा भामरे, मंगेश चौधरी, सौरभ वाघ, अनुराज ढोबळे या १० जणांना मदत करण्यात आली. २०१६ मध्ये १० जण निवडण्यात आले अश्विनी जाधव, अशोक खाडे, भाग्यश्री पाटील, कृष्णा निंबाळकर, कुणाल सोनवणे, नीलेश सावळे, प्रसाद देवकर, शिवानी देशमुख, श्रीवरद चव्हाण आणि वेदांगी भावसार हे ते १० विद्यार्थी होय. यंदाच्या वर्षीही १० विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. हेल्पलाइनसाठीचे चेक ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. नाशिककरांच्या मदतीतून, ‘मटा हेल्पलाइन’च्या माध्यमातून हे ३७ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजनेरीची रंजक सफर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा प्राचीन इतिहास त्याच्या कणाकणात दडलेला आहे, असाच अनुभव कधीकाळी राजधानीचे शहर असलेल्या अंजनेरीत रविवारी नाशिककरांनी घेतला. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित मटा हेरिटेज वॉकमध्ये अंजनेरीच्या पायथ्यावर असलेल्या प्राचीन मंदिरांच्या इतिहासाची सफर घडविण्यात आली. यावेळी सातवाहन, पुलकेशी, विक्रमादित्य, भोगशक्त‌ि ते यादव घराण्याची माहितीसह मंदिरावरील शिल्पसौंदर्य अन् मूर्तीशास्त्राची माहिती देण्यात आली.
‘मटा’तर्फे महिन्याच्या शेवटच्या रविवारी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात येते. अंजनेरीचा हेरिटेज वॉक पंधरावा होता. या वॉकमध्ये दोनशेहून अधिक नाशिककरांनी सहभाग घेतला. यावेळी इतिहास अभ्यासक प्रा. रामनाथ रावळ यांनी अंजनेरीच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकला. अंजनेरीतील ताम्रपट व मंदिरांतील शिलालेखांची सविस्तर माहिती दिली. हिंदू, जैन मंदिरांतील वेगळेपण, त्यांची शैली, त्यांच्यावरील शिल्पांचे अर्थ याबाबत नाशिककरांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. सातवाहनांपासूनचा नाशिकचा प्रवास उलगडताना नाशिककर हरखून गेले होते. त्याचबरोबर हा वारसा जपण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने प्रयत्न होण्याची गरज आहे, यावरही यावेळी चर्चा झाली. अंजनेरीतील हा वारसा नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटक व अभ्यासकांचे आकर्षण केंद्र करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न होण्याची गरज यावेळी हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली. नाशिक परिसरातील ऐतिहासिक स्थळांच्या पाऊलखुणा जपण्यासाठी हेरिटेज वॉकसारख्या उपक्रमांतून महत्त्वाचे काम उभे राह‌त असल्याची प्रतिक्रिया यावेळी नाशिककरांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस दिवसांत नऊ जण बेपत्ता

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरासह परिसराचा वाढता विस्तार व पोलिस संख्याबळ लक्षात घेता सटाणा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अवघ्या २५ दिवसांत सुमारे नऊ जण बेपत्ता झाले आहेत. यात सहा सज्ञान मुलींचा समावेश असल्याने शहरातील मुलींना समुपदेशन करण्याची वेळ येऊन ठेपली की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

सटाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ७९ गावांचा समावेश होत असला तरीही संपूर्ण सटाणा शहराची सर्वाधिक जबाबदारी सटाणा पोलिसांवर येऊन ठेपते. जानेवारी २०१७ पासून २९ जण बेपत्ता झाले असून, यामध्ये सर्वाधिक १३ मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १ ते २५ जुलै २०१७ या २५ दिवसांत नऊ जण बेपत्ता झाले आहेत. यात सर्वाधिक संख्यादेखील मुलींची आहे.

जानेवारी २०१७ पासून बेपत्ता असलेल्या २९ जणांपैकी १६ जण ठिकठिकाणी सापडले असून, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रेमविवाहामुळे मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे समुपदेशन करणे हा अत्यंत महत्त्वाचा मुदा पुढे आला असून, पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सटाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक हिरालाल पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रेमविवाहामुळे मुलींच्या बेपत्ताचे प्रमाण जास्त

बेपत्ता झालेल्या १३ मुलींपैकी ७ मुली आतापर्यंत मिळून आल्या आहेत. बहुतांश मुलींनी पळून जाऊन विवाह केला आणि आपल्या पती समवेत त्यांनी पोलिस ठाणे गाठले असल्याचे सांगितले जात आहे. जुलै महिन्याच्या २५ दिवसांत बेपत्ता झालेल्या सहा मुलींपैकी तीन मुली समक्ष पोलिस ठाण्यात हजर झाल्या असून, त्यांनी प्रेमविवाह केल्याचे सत्य समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलासाठी एल्गार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिंदे येथील मातीच्या भराव पुलाचे काम रद्द करुन त्याठिकाणी उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीला शासन दरबारी अपयश आल्याने रविवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. सरपंच माधुरी तुंगार, बाजार सम‌तिी उपसभापती संजय तुंगार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. यामुळे सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
आंदोलन मागे घेण्याचे पोलिसांचे आवाहन आंदोलकांनी धुडकावून लावत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शेवटी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिस आक्रमक होताच आंदोलकांची गर्दी कमी झाली. यावेळी पोलिसांनी ४९ आंदोलकांना ताब्यात घेतले.
शिंदे येथे नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर मातीचा भराव पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे सुमारे तीस टक्के काम झालेले आहे. मात्र, असा मातीचा भराव पूल नागरिकांसाठी गैरसोयीचा ठरणार असल्याच्या कारणास्तव येथे उड्डाणपूल व्हावा अशी मागणी शिंदे ग्रामस्थांनी आधीच महामार्ग प्राधिकरणाकडे केलेली आहे. मात्र, ती मान्य न झाल्याने शेवटी ग्रामस्थांनी रविवारी महामार्ग अडवून करुन प्रशासनाच्या कामकाजाचा निषेध केला. यावेळी सरपंच माधुरी तुंगार, बाजार समिती उपसभापती संजय तुंगार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अशोक बोराडे, दत्तू तुंगार, विठाबाई झाडे, फुलाबाई तुंगार, मुक्ता तुंगार, शोभा साळवे, ज्ञानेश्वर जाधव, संजय तुंगार, सुदाम जाधव, गणपत जाधव, राहुल तुंगार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सुरज बिजली, कुंदन सोनवणे, मंगेश मजगर आदी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत अवघ्या वीस मिन‌टिांतच आंदोलन आटोक्यात आणल्याने महामार्गावरील वाहतूक काही वेळातच धिम्या गतीने सुरू झाली. ग्रामस्थांनी पोलिसांना मागण्यांचे निवेदन दिले.

वेळेआधी रोखला मार्ग
शिंदे येथे महामार्गावर ‘रास्ता रोको’ची नियोजित वेळ सकाळी दहा वाजेची होती. मात्र, आंदोलक सकाळी साडेनऊ वाजताच गावातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र आले व रस्ता अडवला. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांची काही काळ धांदल उडाली. आंदोलकांची गर्दी वाढल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी ज्यादा कुमक मागविली.

आम्ही चोऱ्या केल्या का?

आंदोलकांची धरपकड करताना आंदोलनात सहभागी महिलांनाही पोलिसी खाक्याचा सामना करावा लागला. महिला पोलिसांनी अंगाला हात लावल्याच्या कारणावरुन लता मते, सविता तुंगार या महिलांनी ‘आंम्ही चोऱ्या केल्या का?’ असा सवाल विचारल्याने पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली. महामार्गावर ठिय्या मांडलेल्या आंदोलकांना ‘रास्ता रोको’ मागे घेण्याचे पोलिसांनी आवाहन केले. मात्र, आंदोलकांनी ते धुडकावून लावले. त्यामुळे पोलिसांनी धरपकड सुरू केली. परंतु, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलिस ठाण्यात नेण्यासाठी पोलिस वाहन वेळेत उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना खासगी वाहनात कोंबले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिसूत्रीद्वारे करणार शेतकऱ्यांना सक्षम

0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वीज, पाणी आणि बाजारपेठ या त्रिसूत्रीवर सरकार काम करीत आहे. तसेच, शेतकऱ्यांचा माल हा लवकरात लवकर बाजारपेठेत पोहचावा, यासाठी वाहतूक व्यवस्था सक्षम केली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या ई मार्केट या संकल्पनेत कांदा उत्पादक शेतकरीही जोडला जाणार आहे. त्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रात शीतगृहांचे जाळे उभारले जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लासलगाव येथे मध्य रेल्वे व लासलगाव खरेदी विक्री संघ यांच्या विद्यमाने होत असलेल्या बहुउद्देशीय शीतगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, की कांद्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्रकल्प हाती घेण्याचे ठरले आणि रेल्वे मंत्रालयाने अवघ्या एका महिन्यात लासलगाव येथील शीतगृह प्रकल्पाला मंजुरी दिली. महाराष्ट्रात विदर्भात २१ कोटी, मराठवाड्यात १९ कोटी व उत्तर महाराष्ट्रात २२ कोटींच्या प्रकल्पांचे काम चालू आहे. एकट्या महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांचे विविध प्रकल्प रेल्वेमार्फत सुरू आहेत. यातील अनेक प्रकल्प हे शेतकऱ्यांची दिशा बदलणारे आहेत. यापुढे देशाची बाजारपेठ रेल्वे व्यवस्थेतून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी रेल्वे आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के भार उचलणार आहे.

शीतगृहांची साखळी निर्माण करणार

कांद्याची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात असण्यासाठी शेतमालाची साठवणूक करणे आणि योग्य दर मिळाल्यावर विकता येईल, यासाठी आवश्यक व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रेल्वेच्या सहकार्याने शीतगृहांची साखळी निर्माण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. देशात उभारण्यात येणाऱ्या २२७ पैकी ५२ शीतगृह महाराष्ट्रात उभारले जात आहे. त्यापैकी २५ पूर्ण झाले असून, उर्वरित लवकरच पूर्ण होतील.

टोमॅटोचा दरप्रश्न सुटणार

नाशिकचे शेतकरी उपक्रमशील आहेत. यावर्षी आपण दुपटीने द्राक्ष निर्यात केली. आंबा, डाळिंब निर्यातही केली. नाशिकमध्ये टोमॅटोचे उत्पादन जास्त होते. त्यामुळे जपान येथील सॉस बनविणाऱ्या कंपनीशी करार करण्यात आला असून, ही कंपनी हमीभावाने टोमॅटो खरेदी करणार आहे.

पाणीप्रश्न मार्गी लागणार

नाशिकसह मराठवाड्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोलाची कामगिरी केली आहे. नार-तापी-नर्मदा आणि दमणगंगा-पिंजाळ योजनेबाबत ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. नार-पार खोऱ्यातून गिरणा खोऱ्यात दहा टीएमसीपेक्षा जास्त पाणी आणण्यात येणार आहे. पार खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी आणले जाईल. त्यापैकी तीन टीएमसी पाणी पालखेड समूहात येणार आहे. यामुळे परसवाडी पोहोच कालव्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होईल. दमणगंगा खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात २५ ते ३० टीएमसी पाणी येणार असल्याने पाण्याची तूट संपुष्टात येईल. नाशिकमधील चांदवड, येवला आणि सिन्नर व मराठवाड्यालादेखील याचा लाभ होईल.

दमणगंगा-एकदरे-गंगापूर योजनेतून पाच टीएमसी पाणी आणि वैतरणा-दमणगंगा-कडवा योजनेतून ७.३ टीएमसी पाणी मिळणार आहे. खान्देश आणि मराठवाडा ‘सुजलाम सुफलाम’ होण्यासाठी या योजना उपयुक्त ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

शेतकरी उपयोगी प्रकल्प उभारावेत : प्रभू

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, की फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे प्रकल्प राबविण्यासाठी रेल्वेकडे मागणी केली आहे. त्यानुसार लासलगाव येथील शीतगृह प्रकल्पाला ३ जून रोजी सुरुवात केली आणि आज त्याचे भूमिपूजन करीत आहोत. लवकरच जगातले आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशात आणून रेल्वे एक पाऊल पुढे टाकणार आहे. राज्य सरकार आणि रेल्वेचे कॉनकॉर यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या उपयोगाला येतील, अशा प्रकल्पांसाठी एक साखळी निर्माण करावी, त्यासाठी आम्ही नेहमी मदतीला तयार आहोत.

यावेळी रेल्वेच्या कॉनकॉरचे अधिकारी व्ही कल्याण रामा यांनी शीतगृह प्रकल्प व त्याच्या उपयोगाविषयी माहिती दिली. नानासाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यासपीठावर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयप्रकाश रावल, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सुरेशबाबा पाटील, आमदार सीमा हिरे, स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलिस अधीक्षक संजय दराडे, आर. के. यादव आदी उपस्थित होते.

शेतकरी संघटनेकडून घोषणाबाजी

कर्जमाफी विषयावर सभास्थळी उपस्थित असलेल्या शेतकरी संघटनेच्या नेते व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत व्यासपीठाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी शेतकरी संघटनेच्या अर्जुन बोराडे, संतू पा. झांबरे, संध्या पगारे, गफार पटेल, भीमराव बोराडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नैताळे येथे निषेध

फसवी कर्जमाफी केल्याचा निषेध करण्यासाठी नैताळे येथे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. महामागावरील सर्व दुकाने बंद ठेऊन, हातात टाळ वाजवत आणि फसव्या कर्जमाफीच्या टोप्या घालून मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्तोरस्ती ‘मौत का कुअाँ’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोडसह शहराच्या विविध भागांतील धोकादायक विहिरींचा प्रश्न पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एेरणीवर आला आहे. अशा बहुसंख्य विहिरी अगदी रस्त्यांना लागून असल्याने रस्तोरस्ती ‘मौत का कुअाँ’ अशी स्थिती दिसून येत आहे. या धोकादायक विहिरींकडे महापालिका प्रशासन कानाडोळा करीत असल्याने अपघातांची शक्यता वाढली असून, यासंदर्भात उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शहरातील अशा विहिरींमुळे जीवित हानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. जेलरोडला काही दिवसांपूर्वीच बब्बू सय्यद या आठवर्षीय बालकाचा अशाच धोकादायक विहिरीमुळे हकनाक बळी गेल्याची घटना घडली होती. नाशिकरोड विभागातील सहाही प्रभागांतील विविध उपनगरांत धोकादायक विहिरी आहेत. यातील बहुसंख्य विहिरी रस्त्यांच्या अगदी कडेलाच आहेत. त्यातील काही विहिरी सध्या वापरात नाहीत. बऱ्याचशा विहिरी खासगी मालकीच्या आहेत.

--

गोसावीनगरला जीवघेणी विहीर

प्रभाग क्रमांक १७ मधील गोसावीनगरमधील कठडे अथवा जाळी नसलेली अत्यंत धोकादायक विहीर अनेकांसाठी जीवघेणी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी याच विहिरीत पडल्याने परिसरातील बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या विहिरीत आजवर अनेकांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडलेल्या आहेत.

--

कलानगरवासीयांना डोकेदुखी

जेलरोडवरील श्री कलानगरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटसमोर असलेली जुनी विहीर स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या विहिरीला संरक्षक जाळीच नसल्याने लहान मुलांच्या दृष्टीने ही विहीर अत्यंत धोकादायक बनली आहे. भरपूर पाणी असलेल्या या विहिरीत आजूबाजूच्या झाडांचा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पडत असल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.

--

ओढारोडवर घातक स्थिती

प्रभाग क्रमांक १९ मधील जुना ओढारोडलगत मुख्य रस्त्याला लागूनच असलेली जुनी उघडी विहीर अत्यंत धोकादायक बनली आहे. आतापर्यंत या विहिरीत अनेक प्राणी पडले असून, सुदैवाने मोठी दुर्घटना घडलेली नाही. अगदी रस्त्यालगतच असणारी ही विहीर वाहनचालकांसाठी घातक ठरू शकत असूनही त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळी टाकण्याबाबत कुणीही पुढाकार घेत नसल्याची स्थिती आहे.

--

बालाजीनगरवासीयांत धास्ती

प्रभाग क्रमांक १८ मधील बालाजीनगरातही मुख्य रस्त्याला लागूनच असलेली विहीर अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. या ठिकाणी बऱ्याचदा पथदीप बंद असतात. त्यामुळे रात्री वाहनचालकांना ही विहीर लवकर दिसून येत नाही. या विहिरीवर कोणत्याही संरक्षक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे येथे अपघात होण्याची धास्ती वाहनचालकांत निर्माण झाली आहे.

--

बालाजीनगरात असलेल्या धोकादायक विहिरीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. ही विहीर अगदी रस्त्यालगतच आहे. रात्रीच्या वेळी या विहिरीमुळे अपघात होऊ शकतो. या विहिरीत अनेक प्राणी पडतात. त्यांना बाहेरही काढता येत नाही.

-सदानंद जाधव, स्थानिक रहिवासी

---

महापालिकेच्या धोकादायक विहिरींना कठडे बांधणे, जाळी बसविणे अशा उपाययोजना केल्या जातात. खासगी धोकादायक विहिरींच्या मालकांना नोटीस देऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले जातात. परिसरातील धोकादायक विहिरींबाबत बांधकाम विभागामार्फत लवकरच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील.

-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक होणार वायफाय सिटी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाशिक शहर वायफाय करणार असून, सीसीटीव्हीही बसविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिक येथे केली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मेळा बसस्थानकाच्या ठिकाणी विमानतळाच्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्रातील वातानुकूलित बसपोर्ट उभारले जाणार असून, या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.

नाशिक शहरात एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात फायबर ऑप्टिकचे जाळे टाकण्यात येणार असून, संपूर्ण शहर वायफाय करण्यात येणार आहे. या इंटीग्रेटेड सिस्टीमचा फायदा महापालिकेसह सर्व शासकीय कार्यालयांना उपयुक्त ठरणार असून, त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. त्याचप्रमाणे शहरात सीसीटीव्ही बसवल्यानंतर ट्रॅफिक मॉनिटरिंगसुद्धा त्यातून करता येणार आहे.

नाशिकला दत्तक घेतल्याची आठवण असल्याचे सांगत त्यांनी मुंबई- नाशिक हा प्रवास कमी अंतराने व्हावा, यासाठी फास्ट ट्रेन सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली असून, त्यांनी ती मान्य केली आहे. बुलेट ट्रेनला जागा देताना त्यांच्याकडे नाशिक, अमरावती, नागपूरसाठी फास्ट ट्रेन देण्याची मागणी केली होती. त्यामुळे नाशिकला त्याचा फायदा होणार असून, मुंबई व नाशिक या शहरांचे अंतर एक ते सव्वा तास कमी होणार आहे. पाणीप्रश्नाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की नाशिकसह मराठवाड्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले व त्यातून राज्याला फायदा होणार आहे. पार खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी आणले जाईल आणि त्यापैकी ३ टीएमसी पाणी पालखेड समूहात येणार आहे. परसवाडी पोहोच कालव्यासाठी त्यामुळे अधिक पाणी उपलब्ध होईल. दमणगंगा खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात २५ ते ३० टीएमसी पाणी येणार असल्याने पाण्याची तूट संपुष्टात येईल. जिल्ह्यातील पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या तालुक्याबरोबरच मराठवाड्यालादेखील याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील गोदावरी नदीच्या पूररेषेचा प्रश्न निकाली काढण्याचे काम लवकरच केले जाईल.

समृद्ध महामार्ग फायद्याचा

नाशिक जिल्ह्यातून जात असलेला मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग नाशिकसाठी फायद्याचा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकला ड्रायपोर्ट उभारणी करण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे येथील शेतमालाचे कंटेनर मुंबईला जलदगतीने जाऊ शकतील. याशिवाय मुंबई- नाशिक हा प्रवासही कमी कालावधीत शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.

नाशिकला रेल्वेचा कारखाना

नाशिक येथे रेल्वेचा कारखाना सुरू करण्याचा निर्णय झाला असून, त्यामुळे येथील कारखानदारीला फायदा होईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. या प्रकल्पाची बजेटमध्ये लवकरच तरतूद केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. नाशिक- पुणे रेल्वेचे काम प्रगतिपथावर असून, त्याचा डीपीआर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. हा रेल्वेमार्ग झाल्यास नाशिक- पुणे अंतर कमी होणार आहे. नाशिक येथून मुंबईला भाजीपाला मोठ्या प्रमाणात जातो. त्यासाठी मुंबईत हा भाजीपाला स्टेशनमध्येच विकला जावा, यासाठी मुंबईचे स्टेशन विकसित केले जाणार आहे. नाशिक- गुजरात कनेक्शन वाढवण्यासाठी भविष्यात त्याचाही विचार करू, असेही त्यांनी सांगितले.

नाशिकला काय मिळणार?

- संपूर्ण शहरात फायबर ऑप्टिकचे जाळे

- रेल्वेचा कारखाना सुरू होणार

- मुंबई रेल्वे स्टेशनमध्ये नाशिकचा भाजीपाला विकण्यासाठी जागा

- नाशिक- पुणे रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर

- नाशिकला फास्ट ट्रेन

- राज्यात इंटीग्रेटेड बसपोर्ट विकसित करणार

- बसस्थानकावर मराठी चित्रपटही दाखवणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा कुंभमेळा होणार जागतिक वारसा

0
0

संजय जगताप यांच्या छायाचित्रांची ‘युनेस्को’कडून दखल

नाशिकः नाशिकचे छायाचित्रकार संजय जगताप यांनी संगीत नाटक अकादमीच्या माध्यमातून युनेस्कोला पाठविलेल्या कुंभमेळ्याच्या छायाचित्रांचा इम्पॅक्ट होऊन कुंभमेळ्याला जागतिक वारसा मिळण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिकच्या छायाचित्रकाराचे हे मोठे यश असून, युनेस्कोच्या वेबसाइटवर संजय जगताप यांचे नाव झळकल्याने ही मोठी अॅचिव्हमेंट मानली जात आहे.

नाशिकचा कुंभमेळा हा जागतिक इव्हेंटमध्ये गणला जातो. या कुंभमेळ्याला मोठा इतिहास आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भरणारा कुंभमेळा हा चार महत्त्वाच्या कुंभमेळ्यांपैकी एक आहे. भारतात अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चारच ठिकाणी कुंभमेळा भरतो. सिंह राशीत जेव्हा गुरुचे आगमन होते त्यावेळी नाशिकमध्ये हा कुंभमेळा भरतो. ग्रहांची ही स्थिती दर बारा वर्षांनी येते. बारा वर्षांनी येणारा हा धार्मिक महोत्सव टिपण्यासाठी फोटोग्राफर्स जीवाचे रान करतात. गेल्या कुंभमेळ्यात मीडियाचे स्वरूप व्यापक नसल्याने ५०० फोटोग्राफर्स होते. मात्र, यंदाच्या वेळी मीडिया प्रचंड विस्तारला आणि पाच हजारांहून अधिक फोटोग्राफर्स कुंभमेळ्याचे फोटो काढण्यासाठी देशविदेशांतून आले होते. यातच नाशिकचे फोटोग्राफर संजय जगताप यांनीही हजारो छायाचित्रे घेतली आणि संग्रहित केली.


संगीत अकादमीचे प्रयत्न

नाशिकच्या या कुंभमेळ्याला जागितक वारसा मिळावा या हेतूने मुंबईच्या अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीतर्फे प्रयत्न सुरू होते. अशातच अकादमीच्या अध्यक्षा उषा आर. के. यांची भेट जगताप यांच्याशी झाली आणि जगताप यांनी कुंभमेळ्याची वेगवेगळ्या अँगलेने काढलेली छायाचित्रे उषा राव यांच्या पसंतीस उतरल्याने त्यांनी ती जमा करून ‘द अॅडव्हायझर बॉडी फॉर इन्टँजिबल कल्चरल हेरिटेज’ द्वारे युनेस्कोला पाठवली. काही महिन्यांचा कालावधी गेल्यावर संजय जगताप यांना उषा राव यांचे पत्र आले. त्यात केवळ त्यांच्या छायाचित्रामुळे युनेस्कोने कुंभमेळा अधिक परिणामकारक रित्या समजावून घेतला असून, कुंभमेळ्याला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचे कळवले. युनेस्कोच्या वेबसाइटवरही संजय जगताप यांची छायाचित्रे टाकण्यात आली असून, कॉप‌ीराइट म्हणून त्यांचे नावही मोठ्या अक्षरात झळकविण्यात आले आहे.


माझ्या कलेच्या माध्यमातून नाशिक शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवू शकलो याचा मला अभिमान आहे. केवळ व्यावसायिक न राहता संस्कृती जोपासण्याचे हे काम आहे. मोठ्या कामांचे श्रेय नेहमीच मुंबई, पुणे नाहीतर परदेशातील लोक घेऊन जातात. त्याऐवजी आता नाशिकचे नाव येणार असल्याचा आनंद आहे. ही माझ्या पाठीवर कौतुकाची थाप आहे.

-संजय जगताप, छायाचित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन टोइंगचे होणार चित्रीकरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘नो पार्किंग’मध्ये पार्क केलेली वाहने हटवण्यासाठी पुढील महिन्यात १२ अत्याधुनिक नवीन टोइंग व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये चारचाकी वाहनांसाठी चार तर तीनचाकी आणि दुचाकींसाठी आठ वाहनांचा समावेश आहे. वाहने उचलण्यापूर्वी त्या वाहनांचे फोटो घेण्यासह व्हिडीओ शूटिंगदेखील केले जाणार आहे. याबाबत एक टेंडर प्रसिध्द झाले असून, पुढील महिन्यात हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
शहरातील बहुतांश परिसरातील पार्किंगची ठिकाणे गायब असून, वाहनचालकांना रस्त्यावरच वाहने पार्क करावी लागतात. मात्र, बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातासारख्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी टोइंग व्हॅन सुरू करण्यात आली होती. मात्र, या टोइंग व्हॅनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानालाच फाटा देण्यात आला होता. त्यामुळे चारचाकी वाहनांचे प्रंचड नुकसान होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. अवघ्या काही महिन्यांत चारचाकी वाहने उचलण्याचे काम बंद झाले. दुचाकी उचलण्याचे काम सुरू राहिले. मात्र, यातदेखील अप्रशिक्ष‌ति कर्मचारी दुचाकी हाताळताना नुकसान करीत असल्याचे वारंवार समोर आले. सध्या, चारचाकी व दुचाकी उचलण्यासाठी दोन वेगवेगळी वाहने ठेकेदाराने नियुक्त केली आहेत. मात्र, यात आधुनिकतेचा अभाव असून, वाहने उचलण्याची क्षमता फारच कमी आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईप्रमाणे यंत्रणा राबवण्याचा निर्णय पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी घेतला होता. अत्याधुनिक साधनांमुळे वाहनचालकाचे नुकसान होत नाही. तसेच, टोइंग व्हॅनची संख्या मुबलक असल्यास रस्त्यावर वाहने पार्क झाल्याबरोबर कारवाई होऊ शकते. सध्या टेंडर प्रसिद्ध झाले असून, याबाबत पोलिस आयुक्तालयात ३१ जुलै रोजी एक बैठक पार पडणार आहे. आणखी काही तांत्रिक कामे आटोपल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी ठेकेदाराचा अंतिम निर्णय अभिप्रेत आहे.

शूटिंग, फोटो आवश्यक

या टोइंग व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणार असून, कोणतेही वाहन उचलण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना तेथील व्हिडीओ शूटिंग घ्यावे लागणार आहे. तसेच, फोटोदेखील काढावा लागणार आहे. हा डेटा जवळपास दोन महिने जतन करण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे सोपवण्यात आली आहे. अनेकदा वाहन उचलण्यात आल्यानंतर वाहनचालक आपले वाहन सदर ठिकाणी नव्हतेच असा दावा करतो. अशा वेळी हे फुटेज उपयोगी पडणार आहे. यामुळे वादाचे प्रसंग टाळता येतील. तसेच, ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनादेखील आळा बसेल, अशी शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटिग्रेटेड बसपोर्ट उभारणार

0
0

राज्यभरात बसपोर्ट विकसित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुजरातच्या धर्तीवर राज्यात एकाच ठिकाणी बसस्थानक, मेट्रो, रिक्षा व टॅक्सी यांच्यासाठी इंटिग्रेटेड बसपोर्ट विकसित करण्याचा विचार असून, त्यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनी स्थापन करणार आहोत. त्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांनी एसटीमध्ये आमूलाग्र बदल केल जात असून, आरामदायी प्रवास सर्वांना मिळवा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

नाशिक येथे मेळा बसस्थानकावर एअरपोर्टच्या धर्तीवर राज्यातील पहिल्या वातानुकूलित बसपोर्टच्या भूमिपूजन सोहळयात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी एसटी सामान्य माणसाकरिता वरदान आहे. पण सर्वसामान्यांना सेवा देता देता गुणवत्ता राखण्याचा विसर पडला. पण, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेऊन त्यात बदल केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. लहानपणी आम्ही फिरायला जाताना बसस्टॅण्डवर जायचो, आता तिकडे कोणी फिरकत नाही. पण आता एसटी बसस्थानक असे असतील की लोक येथे रेस्टॉरंटमध्ये खास खाण्यासाठी येतील. या कार्यक्रमास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी प्रास्ताविक करीत या कामासाठी कसा पाठपुरावा केला, याबाबत माहिती दिली. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचीही भाषणे झाली. विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद चव्हाण, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे उपस्थित होते.

सर्व सुविधांयुक्त बसपोर्ट

एसटीचे उपाध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले, की ११ कोटी रुपये खर्च करून हे बसपोर्ट तयार केले जाणार आहे. नाशिकचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन या पोर्टची अतिशय आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती करण्यात येणार आहे. या बसपोर्टवर २० बसेसचे प्लॅटफॉर्म असणार आहे. सिनेमागृह, शॉपिंगसह विविध सोयी असणार आहेत. ५५ हजार स्वेअर फूटचे सर्वात मोठे बसस्थानक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे गायब झाल्याने रविवार ठरला सुखद!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिन्नर फाटा व दारणा पुलावरील खड्ड्यांची चक्क मध्यरात्री दुरुस्ती उरकण्यात आली. शनिवारी रात्रीतून खड्डे गायब झाल्याने नागरिकांकडून रविवारी सकाळी आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सिन्नर फाटा ते चेहेडीदरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाल्याचे वृत्त ‘मटा’तून प्रसिद्ध होताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कार्यवाही केल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

संततधार पावसामुळे नाशिक-पुणे महामार्गाची सिन्नर फाटा, एकलहरे टी पॉइंट, निसर्ग लॉन्स, चेहेडी शिव, चेहेडी जकात नाका व चेहेडी गावाजवळील दारणा नदीवरील जुना पूल येथे खड्ड्यांनी अक्षरशः चाळणच झाली होती. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे वृत्त ‘मटा’तून नुकतेच प्रसिद्ध झाले होते.

--

जुन्या पुलावरही डांबरीकरण

या महामार्गाच्या कामाचा ठेका दिलेल्या चेतक एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा व चेहेडी शिव येथील महामार्गाची दुरुस्ती केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चेहेडी गावाजवळील दारणा नदीपात्रातील जुन्या पुलावरही डांबराचे अस्तरीकरण केले. त्यामुळे या ठिकाणच्या खड्ड्यांतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.

--

कामामुळे वाहतूक ठप्प

दिवसभर जास्त रहदारी असते. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी महामार्गावरील सिन्नर फाटा येथील काही खड्ड्यांची दुरुस्ती केली. चेहेडी शिव येथील खड्ड्यांच्या दुरुस्तीदरम्यान महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाहतूक मंदावली. त्यानंतर मध्यरात्री दारणा पुलावरील खड्डे दुरुस्तीसाठी दोन्ही बाजूंची वाहतूक काही वेळ थांबविण्यात आल्याने दोन्ही बाजूस दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुलावरील काम आटोपल्यानंतर थांबलेली वाहतूक काही तासांनंतर सुरळीत झाली.

---

काही खड्ड्यांचा मात्र विसर

सिन्नर फाटा, चेहेडी शिव व दारणा पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती चेतक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री केली. मात्र, एकलहरे टी पॉइंट, सिन्नर फाटा मारुती मंदिर व निसर्ग लॉन्स या ठिकाणच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे ठेकेदार कंपनीने साफ दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पार्किंग नियोजनात बदल करा’

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षांनी तिसऱ्या श्रावण सोमवारच्या नियोजनात खंबाळे येथे करण्यात येणारा पार्किंग कालावधी कमी करण्याची मागणी केली आहे. नगराध्यक्षा तृप्ती धारणे आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार महेंद्र पवार यांना याबाबत निवेदन दिले. खंबाळाऐवजी पेगलवाडी येथे पार्किंग करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या.

त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा निमित्ताने भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खासगी वाहनांना ५ ते ८ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हे नियोजन बदलण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा तुप्ती धारणे यांनी शनिवार ते मंगळवार इतके दिवस गरजेचे नसून, दरवर्षीप्रमाणे फेरीच्या आदल्या दिवशी पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तिसऱ्या सोमवारकरिता जिल्हा प्रशासनाने वाहनांना केलेली प्रवेशबंदी भाविकांसह नागरिकांची कोंडी करणारी ठरणारी आहे. याऐवजी रविवारपासून सोमवार सायंकाळपर्यंत वाहनांना शहराकडे प्रवेशबंदी करणे रास्त आहे. तसेच श्रावण सोमवारी फेरीस येणारे भाविक हे रविवारी रात्री ८ वाजेनंतर येतात आणि सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून परतात. चार दिवस प्रवेशबंदीमुळे या काळात प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक व रहिवाशी विनाकारण वेठीस धरले जातील. त्यामुळे हे नियोजन बदलावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच खंबाळे अडचणीचे असल्याने पेगलवाडी येथे पार्किंग करण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या पेगलवाडी येथे कुंभमेळ्यात साधुग्राम केले असून, ती जागा वाहनतळ म्हणून वापरता येणे शक्य आहे. खंबाळे पार्किंग हे १२ किमी अंतर खूपच दूर आहे. तेथे बेभरवशावर वाहने उभी करण्यास भाविक, पर्यटक नाखूष असतात. तेथून वेळेत बस मिळत नाही. त्यामुळे अनेकदा भाविक पायीच त्र्यंबकला येतात. यामुळे नियोजनासाठी प्रथम पेगलवाडी येथे पार्किंग करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी गटनेते रवींद्र सोनवणे, पुरूषोत्तम कडलग, पुरुषोत्तम लोहगावकर आदी उपस्थित होते.

‘मटा’च्या वृत्ताची घेतली दखल

महाराष्ट्र टाइम्सने खंबाळा पार्किंगबाबत दि. २९ जुलै २०१७ रोजी वृत्त प्रसिध्द केले होते. प्रवाशांना येणाऱ्या अडचणींवर लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेऊन नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन मटाची बातमी पुढे ठेवत याबाबत भाविकांसह सर्वांनाच सुसह्य होईल असे नियोजन करण्याची विनंती केली. याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवभक्तांना दर्शन दुर्लभ

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरी नदीच्या पुराची पातळी कमी झाली असली, तरी अजूनही गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. गोदापात्रातील असंख्य मंदिरांना अजूनही पाण्याचा वेढा आहे. पहिल्या श्रावणी सोमवारीही पूरस्थितीमुळे गोदापात्रातील शिव मंदिरांत भाविकांना दर्शन घेता आले नव्हते. आता आज (दि. ३१) दुसऱ्या सोमवारीही या मंदिरांतील दर्शन दुर्लभच राहणार आहे.

त्र्यंबकेश्वर आणि गंगापूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे गोदावरीच्या पाण्याची पातळी गेली तीन दिवसांपासून वाढली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पूरस्थिती जरी नसली, तरी अजूनही गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. संथ आणि सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे गोदावरीत मिसळणाऱ्या नाल्यांतून पाणी वाहतच आहे. नदीकाठच्या असंख्य विहिरीदेखील तुडुंब भरल्यामुळे त्यातील पाणी काढून देण्यात येत आहे.

विहिरींची पातळी कमी झाल्यास शेतात साचलेले पाणी कमी होईल, या उद्देशाने शेतकरी असे करीत असल्यामुळे हे पाणी नाल्यांत जात असल्याने नाल्यांचे पाणी वाढले आहे. त्याचप्रमाणे गंगापूर धरणातून वेळोवेळी पाणी सोडणे सुरूच असल्याने गोदापात्रातील पाण्याची पातळी चांगलीच वाढलेली आहे. परिणामी परिसरातील असंख्य मंदिर पाण्यातच आहेत.


या मंदिरांत दर्शन सुलभ

कपालेश्वर, नारोशंकर, तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमातील शर्वोयेश्वर, नांदूर पुलाजवळील नीलकंठेश्वर महादेव मंदिर भाविकांना सहज दर्शन घेता येणार असल्याने या मंदिरांमध्ये दुसऱ्या श्रावणी सोमवारीदेखील भाविकांची गर्दी होण्याची चिन्हे आहेत.


या मंदिरांना अजूनही वेढा

गोदापात्रातील सिद्धपाताळेश्वर, बाणेश्वर, नीलकंठश्वेर, टाळकुटेश्वर, सिद्धेश्वर, मुक्तेश्वर आदी महादेव मंदिरांना अजूनही पाण्याचा वेढा कायम आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या मंदिरांत पूजा, अभिषेक केला जातो. भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. या वर्षाच्या श्रावणात मात्र दुसऱ्या श्रावणी सोमवारीदेखील भाविक दर्शनपासून वंचित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्याने व्यापले उपनगरांतील रस्ते

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

परिसरातील उपनगरांमधील अनेक रस्ते पावसाच्या पाण्याने व्यापल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पावसाच्या उघडिपीनंतरही काही दिवस येथील पाण्याचा निचराच होत नसल्याची स्थिती असून, त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

नाशिकरोड परिसरात विविध उपनगरे विकसित झाली आहेत. त्यामध्ये नवीन रस्ते झाले आहेत. मात्र, ते बांधताना व्यवस्थित उतार न दिल्याने पावसाळ्यात रस्तोरस्ती पाणी साचते. हे पाणी अनेक दिवस तसेच राहत असल्याने डेंग्यू, हिवताप, चिकनगुन्या आदी रोगांचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा लगेचच निचरा होईल, अशी उपाययोजना करण्याची मागणी साईराज फ्रेंड सर्कलचे राहुल औटे, प्रतीक रायते, निखिल सावंत, ईश्वर राजपूत, विलास अस्वले, बंटी नाकील, कैलास सोनवणे, नितीन पंडित, धनंजय कडलग, अजय खराटे, विवेक अरिंगळे आदींनी केली आहे.

--

येथे साचते पाणी

जय भवानीरोड, दत्त मंदिररोड, सुभाषरोड, देवळालीगाव, आर्टिलरी सेंटररोड, औटेनगर, कदम मळा, गवळी वाडा, भालेराव मळा, आडकेनगर, जीवनविहार सोसायटी रोकडोबावाडी, जैन भवन परिसर, जगताप मळा, स्वामी विवेकानंदनगर आदी ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचते. जेलरोडच्या मॉडेल कालनी चौकातही तळे साचते. नाशिकरोडच्या शिवाजीनगर पुतळा येथील देवी चौक, नवले चाळ येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरते.

---

नालेसफाई झालीच नाही

पावसाळ्यापूर्वी योग्य पद्धतीने नालेसाफ सफाईच न झाल्याने पावसाळ्यात ही स्थिती उद्भवली आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. बहुतेक ठिकाणी रस्त्यांना पाटाचे रूप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. साचलेल्या पाण्यातील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळून अपघात व नुकसान होत आहे. परिणामी, वाहनधारकांना रस्त्यावर वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सकारात्मक विचारांनी दृष्टी शक्य

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
अंध व्यक्तीला बघता येईल असे संशोधन मी केले आहे. माणसाचे बुबुळ जसे लहान मोठे होते तशा कृत्रिम बुबुळाचा शोध पूर्ण होत आला आहे. त्यामुळे भविष्यात कृत्रिम डोळे अधिक लोकप्रिय होतील. डोळ्यांच्या आजाराशी लढतांना आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. सकारात्मक विचार करून दृष्टी पुन्हा प्राप्त करता येते, असे प्रतिपादन प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे ‘संवाद सृजनाशी’ या मालिकेतील दुसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. शाखा कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, रमेश औटे, पी. बी. गायधनी आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. चव्हाण म्हणाले की, अमेरिकेतील अथवा इंग्लंडमधील शास्त्रज्ञ आपल्या मंत्रांचा अभ्यास करून त्यातून नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करतात. आपले ज्ञान भांडार खूप समृद्ध आहे. केवळ आधुनिक शास्त्राशी सांगड घालून नव्या शास्त्रीय कसोट्यांवर ते सिद्ध करण्याची गरज आहे. साधारणपणे दहा हजारांपैकी एक मुल जन्मताच दृष्टिहीन असते. दृष्टी कमी होत जाते तसा आत्मविश्वासही कमी होतो. काचेचे बुबुळ अमेरिकेने संशोधित केले पण प्लास्टिकच्या बुबुळाचा शोध मी लावला. त्याचे माझ्या नावावर पेटंट आहे. या बुबुळावर अॅसिड हल्ल्याचाही परिणाम होत नाही. समुद्राच्या पाण्यावर वाढणारे पण शुद्ध पाणी देणारे फळ असलेले झाड मी शोधले आहे, त्याचेही मला पेटंट मिळाले आहे.
सुशांत उबाळे यांनी सूत्रसंचलन केले. दशरथ लोखंडे यांनी प्रास्तविक केले. रेखा पाटील यांनी स्वागतगीत सादर केले. मंगला सातभाई यांनी परिचय करून दिला. शिवाजी म्हस्के यांनी आभार मानले. अलका अमृतकर, प्रसाद पवार, रवींद्र मालुंजकर, सुदाम सातभाई, प्रशांत केंदळे, कामिनी तनपुरे, सुनील बोराडे, रमेश साळवे, हर्षल भामरे, राहुल बोराडे, महेश वाजे, ज्ञानेश्वर बोराडे, मानसी घमंडी, प्रशांत जमदाडे, शिवाजी हंडोरे यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नर्मदा बचाव’साठी नाशिककरांचे पाठबळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नर्मदा खोऱ्यामधील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने करावे, तोपर्यंत धरणाचे दरवाजे उघडावेत यासह विविध मागण्यांसाठी शहरातील डाव्या आघाडीशी संबंधित विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळ निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नर्मदा खोऱ्यामध्ये जल सत्याग्रह सुरू असून त्याअंतर्गत मेधा पाटकर २७ जुलैपासून उपोषणास बसल्या आहेत. पाटकर यांच्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी शहरातील विविध संघटनांतर्फे सोमवारी शहरात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर हे आंदोलन सुरू होते. या लाक्षणिक उपोषणात अॅड. श्यामला चव्हाण, निशिकांत पगारे, नरेंद्र दातरंगे, अरुण ठाकूर, पद्माकर इंगळे, वासंती सौर, मुकुंद दीक्षित यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी सहभागी झाले.

या मांडल्या मागण्या
खेडकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सुप्रीम कोर्टाने ८ फेब्रुवारी २०१७ ला दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला ६० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, नर्मदा जलविवाद न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार बुडित येण्यापूर्वी किमान सहा महिने विस्थापित धरणग्रस्त कुटुंबांना सर्व नागरी सुविधांसह पुनर्वसनस्थळी पुनस्थापित करणे बंधनकारक आहे. सरोवराच्या बुडीत क्षेत्रात दोन ते २.५ लाख लोक शिल्लक असताना १७ जून रोजी प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे. धरणाचे दरवाजे उघडण्यात यावेत, न्यायाधिकरणाचा निवाडा, कोर्टाचे विविध आदेश व राज्यांचे पुनर्वसन धोरण यानुसार पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी, भूमिहीन, मच्छिमार, केवट, कुंभार, टरबुजवाडीवाले, छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगारी, उद्योजकांचे पुनर्वसन करावे तसेच खोऱ्यातील विस्थांपितांना हटविण्यासाठी बळाचा वापर केला जाऊ नये, आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक घोटाळेबाजांवर मोक्का!

0
0

कोट्यवधींचे कर्ज बुडवणाऱ्या टोळीला चाप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बनावट दस्त नोंदवून एकाच मालमत्तेवर तब्बल ११ बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेणाऱ्या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अर्थात मोक्का लावण्यात आला आहे. आर्थिक घोटाळा करणाऱ्या टोळीला मोक्का लागण्याची बहुधा ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

बँकांना लुबाडणाऱ्या या टोळीत १२ संशयितांचा समावेश असून, शरद पंडित पगार (रा. मयुरेश अपार्टमेंट, आनंदवली, पाइपलाइनरोड) टोळीचा मुख्य सूत्रधार मानला जातो. शरद व त्याच्या साथीदारांनी आनंदवली येथे मयुरेश अपार्टमेंट या इमारतीच्या नावे तब्बल ११ बड्या बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. एप्रिल महिन्यात पगार विरोधात फसवणुकीची एक तक्रार आल्यानंतर पोलिस तपासात या टोळीचे कारनामे उजेडात आले. संशयितांचे कृत्य मोक्का कायद्यातील तरतुदीत बसत असल्याने त्यांच्याविरोधात मोक्का कलमाचा वापर करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी स्पष्ट केले.

मैत्रेयच्या ११ गुन्ह्यांचा तपास शहर पोलिसांकडे

राज्यभर गाजलेल्या मैत्रेय घोटाळ्याप्रकरणी राज्यभरात ११ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यातील धुळे, नंदुरबार, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर पोलिसांनी करावा. तसेच उर्वरित सात ठिकाणांवरील गुन्ह्यांच्या तपासामध्ये समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत.


केबीसीच्या २२ गुन्ह्यांचा तपासही करावा लागणार

राज्यात नव्हे तर देशभर पोहचलेल्या केबीसी घोटाळा नव्याने चर्चेत आला आहे. या घोटाळ्या प्रकरणी राज्यभर २२ गुन्हे दाखल असून, या सगळ्यांचा एकत्रित तपास करावा, अशी जनहीत याचिका मुंबई हायकोर्टात दाखल आहे. या पार्श्वभूमीवर राज्य गुप्तचर विभागाचे अधिकारी शहर पोलिसांच्या संपर्कात असून, या २२ गुन्ह्यांचा एकत्रित तपास शहर पोलिसांना सुरू करावा लागू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बससेवेचा प्रश्न प्रलंबितच

0
0

सिटी बसविना इंदिरानगरात पायपीट

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहरातील इंदिरानगर परिसराचा दिवसेंदिवस होणारा विकास विचारात घेता या भागात पुरेशा प्रमाणात शहर बससेवा उपलब्ध केलेली दिसून येत नाही. परिणामी, परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना शहर बससेवेचा अभाव असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी या भागात शहर बस सेवेबाबत केलेली कपात रद्द करावी तसेच बस फेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

नाशिक शहराच्या लगत व झपाट्याने विकसित होत असलेल्या इंदिरानगर भागात शहर बस सेवेची समस्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. सुरुवातीपासून या भागात आधीच बस सुविधा नसल्याने नागरिकांचे हाल होत होते. आता परिवहन महामंडळाने आहे त्या बस सेवांमध्येही कपात केल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत.

विद्यार्थ्यांचे हाल

इंदिरानगर भागात सध्या असलेली बससेवा ही फक्त वडाळा पाथर्डी रोड परिसरातच आहे. यापूर्वी इंदिरानगरमधून स्वतंत्र चक्री बस सेवा सुरु करावी यासाठी अनेकवेळा नागरिकांनी निवेदने दिली आहेत. जानेवारी महिन्यात एक चक्रीबस सुरू करण्यात आली मात्र अचानकपणे तीही बंद करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिकांकडून या भागात शहर बससेवा सुरू झालीच पाहिजे, अशी मागणी वारंवार होत असते. नवीन बससेवा सुरू करण्याआधीच आहे त्या बसेस बंद करण्यात आल्याने येथील विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना बस नसल्याने नाईलाजास्तव रिक्षाने प्रवास करून आर्थिक झळ नागरिकांना सोसावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images