Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘महारेरा’ने वाढवला फेरा

$
0
0

वीज कनेक्शनसह सातबारा नावावर लावण्यापर्यंत एजंटची जबाबदारी

नाशिक : केवळ ग्राहकाला फ्लॅट दाखवून त्याची खरेदी झाल्यानंतर कमिशन घेण्याचा एजंटांचा प्रकार महारेरा कायद्याने बंद होणार आहे. या कायद्याने वीज कनेक्शन देणे, सातबारावर नाव लावणे, लिव्ह अँड लायसेन्स करार रजिस्टर केल्यावर त्याची एक प्रत पोलिस ठाण्यात देऊन नोंद करून देणे यासह विविध प्रकारची कामे एजंटला करावी लागणार आहेत. त्यामुळे महारेराने एजंटांमागे कामांचा फेरा आणल्याचे स्पष्ट होत आहे.

भारत सरकारने रेरा अर्थात रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅक्ट कायदा १ मे २०१७ रोजी अंमलात आणला. या कायद्यांतर्गत केवळ बिल्डरांवर वचक रहाणार नसून, इस्टेट एजन्सी व्यवसायदेखील यात अंतर्भूत करण्यात आला आहे. फ्लॅट आणि बंगले विकणे आणि भाड्याने देणे तसेच बिनशेती प्लॉट विकणे व्यवसायाचे स्वरूप असलेल्यांनाही नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असल्याने ग्राहकांची एजंटांकडून होणारी फसवणूक टळणार आहे. ३१ जुलै ही एजंटांसाठी नोंदणी करण्याची अखेरची तारीख आहे

रेरा कायद्यांतर्गत रजिस्टर इस्टेट एजंट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक इस्टेट एजंट एक किंवा दोन टक्के घेऊन बिल्डरकडच्या सदनिका ग्राहकांना विकून मोकळे होतात. त्यानंतर बिल्डर आणि ग्राहक यांच्यात फसवणूक झाल्यास त्याला एजंट जबाबदार रहात नसे. परंतु, आता रेरा कायद्यांतर्गत इस्टेट एजंटांचाही या कायद्यात अंतर्भाव केल्याने आता एजंटांवरही कारवाई होणार आहे. पूर्वी पॉवर ऑफ अॅटर्नी व खरेदी-विक्री तसेच लिव्ह अँड लायसेन्स या व्यवहारात मसुदा तयार करून ग्राहक व विक्रेता यांच्यात एजंटांमार्फत व्यवहार करून दिले जात होते. परंतु, आता या व्यतिरिक्त एजंटांना जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. विक्रेता व ग्राहक यांची समोरासमोर मिटिंग करून मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅहडिंग नोटराईज करणे, दस्त रजिस्टर करून पूर्ण फाइल ग्राहकाच्या हातात देणे. खरेदीपत्र झाले की नवीन ग्राहकाच्या नावे वीज मीटर, पाणी मीटर हस्तांतर करणे, सिटी सर्व्हे किंवा ७/१२ उतारा सदरी नाव लावून देणे. विक्री झालेल्या घरांच्या खरेदीला एक वर्ष पूर्ण झाले की ग्राहकाची चौकशी करणे, लिव्ह अँड लायसेन्स करार रजिस्टर केल्यावर त्याची एक प्रत पोलिस ठाण्यात देऊन नोंद करून देणे. इत्यादी कामे नवीन कायद्यांतर्गत करून द्यावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालयातील कामे म्हणजे तारणगहाण खत, रिकन्व्हेशन डिड, मृत्यूपत्र, बक्षीस पत्र, हक्कसोड पत्र, खरेदी पत्र, करारनामा, खरेदीखत ही कामे देखील करून द्यावी लागणार आहेत. तसेच प्रत्येक बॅकेस लागणारे कागद, सोसायटी एनओसी ग्राहकास देणे. शक्य असल्यास लोन प्रपोजल करून देणे. तसेच सहकारी गृहनिर्माण सोसायटी नोंदणी करून घेणे, सिटी सर्व्हे आणि सात बारा उतारा यावर नावे लावायची कामे करून देणे. एजंटने आपल्या फर्मचे फेसबुक पेज व वेबसाईट करणे व त्यात चांगल्या प्रोजेक्टची सर्व तपासणी करून सर्च रिपोर्टसह मंजूर नकाशा, जमीन मालकी व संबंधित सर्व माहिती ग्राहकास देण्याची सेवा देखील या व्यवसायांतर्गत अंतर्भूत केली आहेत.

भारत सरकारने रेरा कार्यद्यांतर्गत अनेक चांगले निर्णय घेतले असून, त्यात एजंटांचाही समावेश करण्यात आला आहे. ३१ जुलै ही या कायद्यांतर्गत नोदणी करण्याची अखेरची तारीख असून, ज्या एजंटांनी नोदणी केली आहे, अशाच एजंटांकडून ग्राहकांनी सेवा घ्यावी.

- विजय सागर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शिक्षण थांबू देऊ नका’

$
0
0

डॉ. दीपक पवार यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपले भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाचा मजबूत पाया सहाय्यक ठरत असतो. मात्र अनेक विद्यार्थ्यांबद्दल वेगवेगळ्या कारणांनी शिक्षण थांबल्याची उदाहरणे समोर येत असतात. मुलींबाबत अशा घटना दुर्दैवीपणे जास्त घडत असतात. परंतु, कोणत्याही परिस्थितीत आपले शिक्षण थांबू देऊ नका.

करिअरसाठी बंडखोरी करावी लागली तरी चालेल पण शिक्षण पूर्ण करण्यावर भर द्या, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख तथा राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांनी केले.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि. २३) मानव अधिकार संवर्धन संघटनच्या वतीने एकलव्य गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. शहरातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी नसताना, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रथम प्रयत्नात दहावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या १५० विद्यार्थ्यांना या सोहळ्यात गौरवण्यात आले.

या संस्थेने शहरातील ४४ शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करुन हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांची निवड केली होती. या गौरव सोहळ्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक श्यामला चव्हाण यांनी केले. तर शांताराम चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. मिलिंद वाघ, शेखर साळवी, उन्मेष बागवे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी दानशूरांनी पुढे यावे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या, पण उज्ज्वल यशाची गुढी उभारत काही तरी करून दाखविण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणाऱ्या दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांना ‘मटा’ने हेरले आणि त्यांना शैक्षणिक प्रवासात साथ देण्यासाठी सज्ज झाला. ड्रॉपबॉक्स तुडुंब भरताहेत. त्यात येणारी रक्कम फार मोठी नसते; अगदी ५० रुपयांपासून चेक येतात. मात्र, त्यामागची भावना मोठी असते. ती लक्षात घेता, नाशिककरांच्या या दातृत्वाला सलाम केला पाहिजे.

गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव या दहा जणांचे भविष्य सुकर करण्यासाठी ‘मटा’ने हेल्पलाइनच्या माध्यमातून नाशिककरांना साद घातली. नाशिककरांनीही या विद्यार्थ्यांसाठी घासातील घास काढून दिला. अजूनही मुक्त हस्ताने धनादेश येत आहेत. या मुलांच्या नावे असणारे धनादेश त्या त्या ठेवलेल्या ड्रॉपबॉक्समध्ये देण्यात यावेत.

जे विद्यार्थी अत्यंत गरिबीतून पुढे आले आहेत, त्यांना शिकण्याची इच्छा आहे; परंतु दारिद्र्याचे दशावतार असल्याने शिकू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ‘मटा’ दरवर्षी वाचकांना हाक देते. दानशूर वाचक मुलांसाठी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेने भरभरून दान देतात. यंदाही पुणे-मुंबई-नाशिक या सुवर्णत्रिकोणात कोटीचा निधी जमा झाला. नाशिकमधून जमा झालेला निधी अत्यंत समाधानकारक असला तरी या तिघा यशस्वितांसाठी आणखी मदतीची गरज आहे. काही वाचक वेळात वेळ काढून येतात. काही जणांनी अशी तक्रार केली, की धनादेश देण्याची इच्छा आहे; मात्र त्यांची राहण्याची जागा व धनादेश जमा करण्याची जागा यात मोठी तफावत असल्याने ती मदत पोहोचविणे शक्य होत नाही. वाचकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नाशिक शहरामध्ये, तसेच नाशिकरोड परिसरात विविध ठिकाणी हेल्प बॉक्स ठेवण्यात आले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा म्हणून वाचकांच्या सत्प्रवृत्तीला साद घालत हा ‘मटा हेल्पलाइन’चा उपक्रम हाती घेण्यात आला. या मुलांची कहाणी ‘मटा’त प्रसिद्ध झाली आहेच, त्यांच्या नावाने क्रॉस्ड चेक काढून ड्रॉपबॉक्समध्ये जमा करावेत. चेकच्या मागे पाठवणाऱ्याचे नाव आणि फोन नंबर लिहावा. ‘महाराष्ट्र टाइम्स’चा हेल्पलाइन हा उपक्रम नाशिककर दिवसेंदिवस पुढे नेत आहेतच, परंतु या मुलांना आणखी मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे समाजातील दानशूरांनी पुढे यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मविप्रसाठी निफाडमध्ये चुरस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या संस्थेवर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन प्रमुख गटांसह अनेक मान्यवर सज्ज झाले आहेत. पाच पदाधिकारी तेरा तालुका संचालक आणि तीन सेवक संचालक अशा एकवीस जागांसाठी १३ ऑगस्ट रोजी मतदान होत आहे.

मविप्रच्या सत्तेचा इतिहास बघितला तर प्रदीर्घ काळ या संस्थेवर निफाड तालुक्याचा अंमल राहिला आहे. साधारण दहा हजार सभासदांपैकी किमान तीन हजार सभासद हे निफाडचे आहेत. त्यामुळे साहजिकच प्रमुख पदांवर निफाडची दावेदारी असते. त्यामुळे यंदाही निफाड तालुक्यात चुरस दिसणार आहे. विद्यमान सरचिटणीस नील‌िमा पवार या अर्थातच पुन्हा सरचिटणीस पदाच्या उमेदवार असतील. तर मागील निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विरोधी गटाचे प्रमुख असलेले माणिकराव बोरस्ते यांनी पवारांबरोबर तडजोड केल्यामुळे ते आता सत्ताधारी गटातून अध्यक्ष किंवा सभापती पदाचे उमेदवार असतील. या शिवाय पवार गटाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी निफाड तालुक्यातील अनेक मान्यवर प्रयत्नशील आहेत. त्यात माजी चिटणीस प्रतापराव मोरे, माजी संचालक विश्वासराव मोरे, माजी अध्यक्ष अरविंद कारे, प्रतापराव मोगल, पिंपळगावचे उपसरपंच संजय मोरे यांची नावे चर्चेत आहेत. विरोधी गटातर्फे अॅड. नितीन ठाकरे यांनी नील‌िमा पवार यांच्या विरोधात सरचिटणीस पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे हे विरोधी गटाकडून पुन्हा एकदा अध्यक्षपदाचे उमेदवार असतील, हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. त्यामुळे विरोधी गटाकडून निफाडसाठी दोन पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विरोधी ठाकरे, सोनवणे गटाकडून विद्यमान संचालक दिलीप मोरे, नानासाहेब बोरस्ते, डी. बी. मोगल, बाळासाहेब कोल्हे यांची नावे चर्चेत आहेत. निफाडमधील मतदार संख्या आणि सत्ताधारी गटातील पवार व बोरस्ते यांची प्रमुख उमेदवारी लक्षात घेऊन विरोधी गटाकडून निफाडसाठी सभापती आणि चिटणिस पदासाठी उमेदवारी मिळू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएच.डी.ची सूचना आली अन् वेबसाइट बंद झाली!

$
0
0

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच. डी. आणि एम.फिल.च्या नियमावलीत झालेल्या बदलानंतर या प्रतिष्ठेच्या पदव्यांच्या प्रवेशप्रक्रियेचे नोटिफिकेशन प्रथमच विद्यापीठाने जाहीर केले. प्रदीर्घ कालावधीनंतर ही सूचना प्रसिद्ध झाल्याने हजारो इच्छुक उमेदवारांनी या वेब लिंकवर क्लिकक्लिकाट केला. मात्र, दिवसअखेरीसही ही लिंक ओपन न झाल्याने विद्यापीठाच्या ई-कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दीर्घ कालावधीनंतर पीएच.डी. आणि एम. फिल. या अभ्यासक्रमाच्या सूचनेसोबतच प्रवेश परीक्षेची तारीख आणि वेबसाइट प्रसिद्ध करताना ही लिंक कधीपासून सुरू होईल, याची माहिती देण्याचा विसरच विद्यापीठास पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संशोधनासाठी उत्सुक असणारे विद्यार्थी संभ्रमात आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांप्रमाणे पुणे विद्यापीठाने या अभ्यासक्रमांच्या नियमावलीत मोठे बदल करून अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक तयार केले आहे. पीएच.डी.च्या २०३५ जागा, तर एम.फिल.च्या २६५ जागा यासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशाची पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १०० गुणांची प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याच्या विद्याशाखेशी निगडित ५० गुण आणि संशोधनपद्धती या विषयावर ५० गुण असणार आहे. प्रत्येक एक गुण याप्रमाणे एकूण १०० गुणांची ही परीक्षा होईल. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धती असणार नाही. ही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी दोन तासांचा अवधी मिळणार असून, येत्या १० सप्टेंबर रोजी परीक्षा पार पडणार आहे.

त्यांना मिळणार एंट्रन्समधून सूट

एंट्रन्समधून एम. फिल. पूर्ण केलेले व नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सूट मिळणार असून, त्यांची थेट नोंदणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळी कवितांत हरखले रसिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सावाना बालभवनतर्फे दोन दिवसीय पावसाळी कविता गायन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या सुरावटींत नाशिककर रसिक चिंब झाल्याचे दिसून आले. संजय करंजकर यांच्या संयोजनाखाली ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुषमा जोशी, प्रशांत केंदळे, प्रकाश वैद्य, रवींद्र मालुंजकर, विवेक उगलमुगले यांनी काम पाहिले.

स्पर्धेत इयत्ता तिसरीच्या गट क्रमांक एकमधील प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. हर्षिता बऱ्हे, सार्थक सोनवणे यांनी तो पटकावला. द्वितीय क्रमांकही विभागून देण्यात आला. भार्गवी शिवदे व स्नेहल बोधले यांनी तो पटकावला. तृतीय क्रमांक जय घुले व समीधा पंचाक्षरी यांना देण्यात आला. निधी पाटील, अवंतिका डोळस, युक्ता खंडाळे, कृष्णा निकम, अतिक चव्हाण व शर्वरी वडुलेकर हे उत्तेजनार्थ विजेते ठरले. इयत्ता चौथीच्या गट क्रमांक दोनमध्ये प्रथम क्रमांक स्वामिनी कुलकर्णी, द्वितीय क्रमांक गौरांगी पाटील, तृतीय क्रमांक मनस्वी जगझाप यांना देण्यात आला. आस्था धांडे, नक्षत्रा जोशी, खुशी कुडाळे, तन्वी आव्हाड, कृतिका पाटील, शतावरी पंडित, प्रसाद घोटेकर, अवधूत जस्ते, हर्षिता ताजणे हे उत्तेजनार्थ विजेते ठरले.

इयत्ता पाचवी व सहावीच्या गट क्रमांक तीनमध्ये प्रथम क्रमांक विभागून स्नेहल सोनवणे व वेदिका शेवाळे, द्वितीय क्रमांक विभागून स्वराली सोनवणे व अनुष्का साक्रीकर, तृतीय क्रमांक ज्ञानेश्वरी रसाळ, श्वेता चव्हाण यांनी पटकावला. इयत्ता सातवी व आठवीच्या गट क्रमांक चारमध्ये प्रथम क्रमांक मनस्वी मालपाठक, द्वितीय क्रमांक पूजा बोबडे, तृतीय क्रमांक संयुक्ता कर्पे यांनी मिळविला. नंदिनी काचगुंडे, आर्या मुळे, श्रेया गायकवाड, दुर्वा पिंगळे, ऋचा झेंडे, मृदुला देशपांडे हे उत्तेजनार्थ विजेते ठरले. स्पर्धा यशस्वीतेसाठी ज्योती फड, गीता बागुल, सविता कुशारे, जयश्री बस्ते, संगीता बोराडे, शुभांगी ब्रह्मे यांनी प्रयत्न केले.

--

कवितालयचा अकरावा भाग

सार्वजनिक वाचनालयाचा कवितालय हा नवीन उपक्रम शोकेसच्या रूपाने सुरू करण्यात आला असून, त्याचा अकरावा भाग नुकताच शोकेसमध्ये लावण्यात आला. यात कवी सुरेश मेणे, विठ्ठल शिंदे, राम पाठक व रेखा भांडारे यांच्या कविता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कवींनी आपल्या कविता सुवाच्च अक्षरात वाचनालयात आणून द्याव्यात, असे आवाहन सावानाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीत साडेनऊ तास बत्ती गूल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका अगोदरच विविध समस्यांच्या गर्तेत असलेल्या अंबड औद्योगिक वसाहतीला सोमवारी बसला. पाच फिडर बंद झाल्यामुळे अंबड एमआयडीसीतील वीजपुरवठा सोमवारी पहाटे ४.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद होता.
यामुळे अनेक उद्योगांना एक शिफ्ट बंद ठेवावी लागली. परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये १६०० हून अधिक उद्योग असून, येथे हजारोंच्या संख्येने कामगार काम करतात. . या सेक्टरमधील ‘डब्ल्यू’ व ‘डी’ मधील सकाळची शिफ्ट बंद होती. मशिनरी बंद असल्यामुळे कामगार बसून होते. यामुळे निर्यात उद्योगांवर लेट डिल‌िव्हरीचा शिक्का बसणार आहे. वीज पुरवठा खंड‌ित झाल्यानंतर आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे व सरचिटणीस निखिल पांचाल व पॉवर समितीचे सिद्धार्थ पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर अध्यक्ष अहिरे यांनी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना फोनवरुन माहिती दिली. त्यानंतर साडेनऊ तासांनी वीज पुरवठा सुरळीत झाला.

विद्युत पुरवठा खंड‌ित झाल्यामुळे १०० कोटींहून अधिक नुकसान झाले असून पाच हजार कामगारांना विना काम बसावे लागले. वीज पुरवठा खंड‌ित होण्याबरोबरच रोजच व्होल्टेज कमी जास्त होत आहे.
- सुरेश माळी, माजी अध्यक्ष, आयमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्ग वर्षभरातच खड्ड्यात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

द्वारका ते नाशिकरोड या शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर तब्बल पन्नासहून अधिक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या वर्षीच राष्ट्रीय महामार्गाकडून दत्त मंदिर ते द्वारका डांबरीकरणासाठी ४ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यात रस्त्यावर साइडपट्ट्या सोडून दोन्ही बाजूंनी ९ मीटर रुंदीवर ३० मिलिमीटरचे डांबरीकरण करण्यात आले होते. पण, वर्षभरानंतरच रस्ता खड्ड्यात गेल्याची स्थिती आहे. परिणामी वाहनचालकांना गैरसोय सहन करावी लागत आहे.

नाशिक व नाशिकरोडला जोडणारा हा ५.९० किलोमीटरचा शहरातील सर्वांत मोठा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर पडलेलेे खड्डे हा चिंतेचा विषय आहे. सिंहस्थात याच रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आठ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा मे २०१६ मध्ये थर टाकण्यात आला. पण, त्यात रुंदीकरणाच्या साइडपट्ट्या सोडण्यात आल्या होत्या. या रस्त्यावर अगोदरच मोठ्या प्रमाणात झाडे असल्यामुळे हा रस्ता धोकादायक आहे. त्यात ही खड्ड्यांची भर पडली आहे. २०१६ मध्ये या रस्त्याचे काम करण्यापूर्वी खड्डे बुजविले गेले व त्यानंतर डांबरीकरण सुरू करण्यात आले. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांनी लावून धरली आहे.

या रस्त्यावर काही ठिकाणी पाणीही साचले आहे. उपनगर व फेम टॉकीजजवळ असलेल्या यामाहाच्या शोरूमजवळ तर या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पोलिसांचे बॅरिकेडिंग ठेवण्यात आले आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता आहे. पण, या विभागाला दुरुस्तीसाठी एकत्रित खर्चाचे इस्टिमेट पाठविण्याचे बंधन असल्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू आहेत.

--

कारचालकांची कसरत

५.९० किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर पडलेले बहुतांश खड्डे डिव्हायडरच्या बाजूच्या भागात आहेत. चारपदरी असलेल्या या रस्त्यावर एका बाजूला कमी खड्डे आहेत. त्यामुळे कारचालकांना त्याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. पण, चांगल्या रस्त्यावरही खड्ड्यांचे प्रमाण वाढत असल्याने दुचाकीस्वारांनादेखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

--

द्वारका ते दत्त मंदिर हा रस्ता प्रचंड रहदारीचा आहे. त्यावर सध्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. ते तातडीने दुरुस्त केले जातील. याबाबतच्या सूचना केल्या आहेत. हा रस्ता लवकरच दुरुस्त होईल.

-आर. एस. सोमवंशी, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील पंधरा पेट्रोलपंप रडारवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

पेट्रोलपंपांवर मापात पाप असल्यावरून आता नाशिकमधील १५ पंप गुन्हे शोधपथकाच्या रडारवर आले आहेत. या पेट्रोलपंपांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्यातील गुन्हे शोधपथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील विशाल पेट्रोलपंपाची सोमवारी तपासणी करण्यात आली आहे. या पंपावर चीप वापरण्यात आल्याच्या संशयावरून काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

नागपूर, पुणे, मुंबई व रायगड येथे ठाणे क्राइम ब्रँचच्या वतीने पेट्रोलपंपावर घोळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून, आता शहरातील पेट्रोलपंपाची तपासणी सुरू करण्यात आली. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास त्रिमूर्ती चौकातील विशाल पेट्रोलपंपावर ठाणे क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी व अंबडसह शहरातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने पंपावरील मशीन तपासणी करण्यात आली.

मशीनमधील पल्सर कार्डमध्ये मॅन्युअल शोल्डरिंग केल्याचा संशय आल्याने दोन कार्ड तपासणीसाठी नेण्यात आले. मशीनची तपासणी करीत असताना परमिसेबल उणे ५० किंवा त्यापेक्षा कमी आढळून आले असून, ते मशिनरी किंवा मॅन्युअली हँडलिंग करताना होऊ शकते. यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार आढळून आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पंपावरून जे पल्सर कार्ड काढण्यात आलेले आहे, ते थेट कंपनीत पाठवणार आहे. ही तपासणी सुरू असताना कंपनीचे सेल्स मॅनेजरदेखील बोलावण्यात आले होते. शहरात अशा १५ पेट्रोलपंपांवर तपासणी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घोडके यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

पल्सर कार्ड संशयास्पद

पेट्रोलपंपावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ आढळून आला नसला तरी दोन पल्सर कार्ड पोलिसांनी तपासणीसाठी नेले आहेत. यात काहीतरी छेडछाड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता या पंपासह अन्य पेट्रोलपंपावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष्‍ा लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारबाजीत मणिपूरच्या मुलांची बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आणि के. एन. डी. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मिनी गट मुलांमध्ये मणिपूरच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये पंजाबने सर्वा‌धिक पदकांची कमाई करून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस तथा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक नानासाहेब महाले, भारतीय तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस अशोक दुधारे, बळवंत सिंग, महाराष्ट्र फेन्सिंग अससोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश काटोले, सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे, खजिनदार राजकुमार सोमवंशी, नाशिक तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता पाटील, विलास वाघ, आनंद खरे, नितीन हिंगमिरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वसाधारण विजेते, उपविजेते आणि तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या संघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फॉईल, सॅबर आणि ईपी या तीन प्रकारांत वैयक्तिक स्पर्धेत पारितोषिक मिळविणाऱ्या खेळाडूंनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना रवींद्र नाईक म्हणाले की, या लहान गटाच्या स्पर्धेचे आयोजन गेल्या आठ वर्षांपासून नाशिकमध्ये होत आहे. लहान वयातच खेळाडूंना संधी मिळाली तर पुढे जाऊन ते आणखी जास्त प्रगती करू शकतात. म्हणून तलवारबाजी या खेळाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून असे उपक्रम राबविल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताला चांगले यश मिळू शकेल. यावेळी नानासाहेब महाले, डॉ. बळवंत सिंग यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उदय डोंगरे यांनी केले, तर प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी केले. स्पर्धेत भारताच्या १९ राज्यातील मुलांनी आणि १८ राज्यांतील मुलींच्या संघांनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेत मुलांमध्ये मणिपूरच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत २८ गुणांची कमाई करून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर पंजाबच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, मुलींमध्ये पंजाबच्या खेळाडूंनी जोमाने खेळ करून २७ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मणिपूरला १७ गुणांसह उपविजेतेपद मिळाले.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक तलवारबाजी असोसिएशनचे सचिव राजू शिंदे, नितीन हिंगमिरे, राहुल फडोळ, अशोक पवार, मनीषा काठे, दीपक निकम, पांडुरंग गुरव, योगेश शिंदे, किरण गुरव आणि नाशिकचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा अंतिम निकाल

मिनी गट ः मुले - १) मणिपूर (२८ गुण), २) पंजाब (१८ गुण), केरळ (१० गुण)

मिनी गट सर्वसाधारण विजेतेपद

मुली - १) पंजाब (२६ गुण) २) मणिपूर (१७ गुण) ३) चंदीगड ( ११ गुण)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा जोर ओसरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले काही दिवस कधी संततधार, तर कधी मुसळधार बरसणाऱ्या पावसाने पहिल्या श्रावणी सोमवारी काहीशी विश्रांती घेतली. पावसाचा जोर ओसरल्यामुळे धरणांमधून होणाऱ्या विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरीला आलेला पूरही ओसरल्याचे चित्र सोमवारी दिवसभर पहावयास मिळाले. भावलीपाठोपाठ वालदेवी आणि आळंदी धरणही ओव्हरफ्लो झाले आहे.

जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने धुव्वांधार फटकेबाजी‌ केली. गंगापूर आणि दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस झाल्याने धरणांमधील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे गंगापूरसह आळंदी, दारणा, भावली, कडवा, नांदुरमध्यमेश्वर या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या हंगामात आतापर्यंत २१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आले आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसारख्या काही भागात १५० मि.मी.पर्यंत कोसळणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी दिवसभरात कमालीचा ओसरला. सोमवारी सकाळी आठपर्यंत पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यात ४८२.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. इगतपुरीत १०७ मि.मी. तर त्र्यंबकेश्वरमध्ये ६७ मि.मी. पाऊस झाला. परंतु, पाणलोट क्षेत्रातील हाच जोर दिवसभरात ओसरला. त्र्यंबकेश्वरमध्ये अवघ्या नऊ मि.मी. पावसाची नोंद झाली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान जिल्ह्यात अवघा ७८.६ मि.मी. पाऊस झाला. इगतपुरीत २७ मि.मी. तर त्र्यंबकेश्वरमध्ये नऊ मि.मी. पाऊस झाला.

विसर्ग घटला

दारणा धरणातून सकाळी ९ वाजता ११ हजार ५०० क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. तो दुपारनंतर ८०३८ क्युसेक करण्यात आला. दुपारी चारनंतर तो ४ हजार ४२० करण्यात आला. गंगापूरमधून करण्यात येणारा ७७८२ क्युसेकचा विसर्ग ५०९४ क्युसके करण्यात आला. कडवातून २६५८ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. तो १८९८ क्युसेकवर आणण्यात आला. नांदुरमध्यमेश्‍वरमधून मात्र ६१ हजार क्युसेकने विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. सध्या पावसाचा जोर कमी असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास प्रशासनाला पुन्हा विसर्गात वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील रहिवाशांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडावे

$
0
0

धनंजय व्यवहारे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडल्यास त्या क्षेत्रामध्ये तो जास्त प्रगती करू शकतो. इंजिनीअर, डॉक्टर एवढीच क्षेत्र करिअर करण्यासाठी नसून, आज अनेक वेगवेगळी क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे मत इंडिया सॅमसंग नेटवर्कचे प्रमुख धनंजय व्यवहारे यांनी केले.

जु. स. रुंगटा हायस्कूलच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभप्रसंगी मंचावरून ते बोलत होते. या शाळेच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन सोमवारी मोहिनीदेवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिरच्या सभागृहात करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले तर आभार राजेंद्र गायवन यांनी मानले. कार्यक्रमप्रसंगी शालेय समिती सदस्य जगन्नाथ मेतकर, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य नेहा सोमठाणकर, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा संगीता जेऊघाले, माजी विद्यार्थी विश्वास दिक्षित संजय बाविस्कर, शाळेचे मुख्याध्यापक संजय सूर्यवंशी, पर्यवेक्षिका माधुरी देशपांडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी ठेकेदारांना वेसण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वाधिक तक्रारी असलेल्या पंचवटी आणि सिडकोतील जी. टी. पेस्ट कंट्रोल या घंटगाडी ठेकेदारावर पालिकेने अखेर वक्रदृष्टी फिरवली आहे. सुरुवातीपासूनच वादग्रस्त राह‌िलेल्या या ठेकेदाराने वेळेत गाड्या न आणणे आणि कचरा विलगीकरणाबाबत दुर्लक्ष केल्याने पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली आहे.हा ठेकाच रद्द होण्याची शक्यता आहे.
महापालिकेने सिडको आणि सातपूर या प्रभागांचा घंटागाडीचा ठेका जी. टी. पेस्ट कंट्रोल या कंपनीला दिला आहे. परंतु, ठेका देण्यापासून संबंधीत ठेकेदार वादात अडकला आहे. त्याच्याबाबत मुदतीत घंटागाड्या दाखल न करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन न देणे आणि कचरा विलगीकरणासाठीच्या अटींचे पालन न करणे अशा तक्रारी पालिकेत आल्या आहेत. या ठेकेदाराने पूर्ण क्षमतेने घंटागाड्याही शहरात आणलेल्या नव्हत्या. संबंधीत ठेकेदार हा भाजपचा पदाधिकारी असल्याने त्याच्यावर केवळ दंडात्मक कारवाई केली जात होती. त्याला वारंवार कारभारात सुधार करण्यासाठी समज देण्यात आली. परंतु, तरीही तक्रारींमध्ये वाढ होत आहे. कचरा विलगीकरणासाठी पालिकेने मोहीम सुरू केली असतानाही ठेकेदाराने त्याची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे अखेर पालिका आयुक्तांनी या ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठेका रद्द का करू नये, अशा आशयाची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. पालिकेच्या नोट‌िशीला समाधानकारक उत्तर दिले नाही तर, पंचवटी व सिडकोच्या घंटागाडीचा ठेकाच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डॉ. डेकाटे यांना नोटीस
मागील घंटागाडी ठेक्यात ठाणे येथील एका ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन अदा न केल्याप्रकरणी तत्कालीन आरोग्य अधिकारी व सध्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांना आयुक्तांनी पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठेकेदाराच्या फाइलमधून नस्ती गायब होणे व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची खातरजमा न करताच संबंधीत ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले होते. यापूर्वीही आयुक्तांनी डेकाटे यांना नोटीस बजावली होती.

कचरा विलगीकरण नाहीच

पालिकेने घंटागाडीच्या अटी व शर्तींप्रमाणे प्रत्येक गाडीत ओला व सुका कचरा वर्गीकरणाची सक्ती करण्यात आली आहे. परंतु, ठेका देऊन सात महिने झाले तरी, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र आहे. ठेकेदारांच्या २०६ घंटागाड्यांपैकी केवळ १०१ घंटागाड्यांमध्येच कचरा विलगीकरणाची व्यवस्था आहे. त्यात सर्वाधिक कचरा विलगीकरणाची व्यवस्था नसलेल्या गाड्या जी. टी. पेस्ट कंट्रोल या ठेकेदाराच्या आहेत.

मटा भूमिका
घंटागाडीची कार्यक्षमता हा चर्चेचा अन् चिंतेचा विषय असताना सर्व नियम धाब्यावर बसवू पाहणाऱ्याचा ठेकाच रद्द करण्याची नोटीस आयुक्तांनी बजावली हे बरे झाले. वास्तविक सत्तारुढ पक्षाच्या या जावयाला इतके दिवस सांभाळले, त्याचा पाहुणचार केला, हीच खरे तर प्रशासनाची घोडचूक. पक्षानेही अशांचे चोचले पुरवू नका, हे ठणकावून सांगायला हवे, कारण स्वच्छतेचा विषय केवळ मोदींच्या घोषणेपुरताच मर्यादित नाही तर तो संपूर्ण शहरातील जनतेच्या आरोग्याशीही निगडीत आहे. लोक नाराज झाले तर काय घडू शकते, हे वेगळे सांगायला नको. आता उशिरा का होईना पण पक्षाला व प्रशासनालाही जाग आली असली तरी ही कारवाई केवळ कागदोपत्री राहणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिव हर शंकर नमामि शंकर…

$
0
0

टीम मटा

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शहर परिसरातील शिव मंदिरांमध्ये बम बम भोले, हर हर महादेवचा जयघोष निनादला. शहरातील कपालेश्वर, सोमेश्वरसह अन्य उपनगरांतील शिव मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. विविध ठिकाणच्या मंदिरांत पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांसह प्रसादवाटपदेखील करण्यात आले.

--

श्री कपालेश्वराचा जयघोष

व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ख्याती असलेला श्रावणाचा पहिला सोमवार कपालेश्वराच्या जयजयकाराने दुमदुमला. पहाटेपासूनच भाविकांनी भगवान महादेवाचे शहरातील मुख्य मंदिर असलेल्या रामकुंडावरील श्री कपालेश्वराचे भक्तिभावाने दर्शन घेतले.

कपालेश्वर मंदिराच्या समोर रविवारी पुराचे पाणी होते. पूर ओसरल्याने कपालेश्वराच्या पश्चिम प्रवेशद्वाराने भाविकांना दर्शनासाठी जाता आले. वाहनांसाठी मंदिराकडे येणारे सर्व रस्ते बंद ठेवण्यात आले होते. बम बम भोलेचा गजर करीत भाविकांनी रामकुंडातील तीर्थाने कपालेश्वराला स्नान घातले. त्यानंतर दुधाने अभिषेक करण्यात आला. यावेळी कपालेश्वराची महापूजा करण्यात आली.

पहाटेपासूनच धुपाचा दरवळ, चंदनाचा सुगंध, फुलांची आरास अशा वातावरणात कपालेश्वराची महापूजा, महाआरती झाली. त्यानंतर भाविकांना राजगिऱ्याच्या लाडूचा प्रसाद वाटण्यात आला. प्रदक्षिणा मार्गावरील महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात येत होता. बेल, तसेच फुले वाहून महादेवाची पूजा बांधण्यात आली.

--

व्रत करणाऱ्यांची गैरसोय

श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सोळा सोमवार व्रताची सुरुवात करण्याची प्रथा आहे. या महिन्यात चार सोमवार आले आहेत. श्रावणातील काही व्रते स्वत:साठी, तर काही कुटुंबाशी निगडित असतात. गोदाघाटावरील बाणेश्वर महादेवाचे मंदिर सध्या पाण्यात असून, सोळा सोमवारसाठी येथेच बसून अनेक भाविक पूजा करतात. परंतु, सध्या त्यांची गैरसोय झाली आहे.

०००

पंचवटीतील शिव मंदिरे फुलली

पंचवटी ः श्रावणी सोमवारच्या पहिल्याच सोमवारी भाविकांच्या गर्दीने शहर परिसरातील शिव मंदिरे फुलली होती. श्री कपालेश्वरासह तपोवनातील शर्वायेश्वर महादेव मंदिर, नांदूर पुलाजवळील नीलकंठेश्वर महादेव मंदिर, रामवाडी पुलाजवळील सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळी कोसळलेल्या पावसाच्या सरींचा अपवाद वगळता पावसाने उघडीप दिल्याने विविध मंदिरात, तसेच गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गोदापात्राशेजारील मंदिरांत दर्शनासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. ठिकठिकाणच्या शिव मंदिरांत भाविकांनी दुग्धाभिषेक, जलाभिषेक करून पूजा केली. अनेक मंदिरांच्या आवारात बेल आणि फुले यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची, तसेच प्रसाद, दूध पिशव्या विक्रीची दुकाने लावण्यात आली होती.

०००

सोमेश्वरला भाविकांचा उत्साह

गंगापूररोड ः शहरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सोमेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी पहाटे तीनपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

सोमेश्वर महादेव मंदिरात पहाटे सहा वाजेला ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी अभिषेक केला. यावेळी ट्रस्टचे संचालकही उपस्थित होते. पहिल्याच श्रावणी सोमवारी भाविकांनी मनोभावे पूजा करीत महादेवाला अभिषेक केला. पावसाच्या दमदार हजेरीने दर्शनानंतर असंख्य भाविक सोमेश्वर धबधब्यासह अन्यत्रही पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना दिसून आले. गंगापूर पोलिस स्टेशनतर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, गंगापूररोड, ध्रुवनगर, श्रमिकनगर, अशोकनगर, सावरकरनगर, सातपूर कॉलनी, सातपूर गाव, चुंचाळे गावातही महादेव मंदिरांत भाविकांची दिवसभर दर्शनासाठी गर्दी उसळली होती.

०००

श्री त्र्यंबकेश्वराला अभिषेक

त्र्यंबकेश्वर ः येथे पहिला श्रावणी सोमवारी पाऊस कोसळत असतानाही भाविकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. मंदिराच्या सभामंडपात भाविक पूजा, अभिषेक, जपतप, अनुष्ठानात मग्न झाले होते. दुपारी तीन वाजेच्या दरम्यान निघालेल्या पालखीच्या दर्शनासाठीही भाविकांची गर्दी झाली होती.

भरपावसात भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते. उत्तर दरवाजाने भाविकांना प्रवेश दिला जात होता. दर्शनरांग मंदिर प्रांगणाच्या बाहेरील रस्त्यावर व तेथून थेट जुना महादेव मंदिरापपर्यंत पोहोचली होती. प्रदक्षिणेला जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती.

--

प्रशासनाचे हुकले नियोजन

मंदिर परिसरात दर्शनबारीची व्यवस्था झाली नसल्याने मुख्य दरवाजासमोरच्या रस्त्यावर पावसात लागलेल्या रांगांनी येथील दर्शनाच्या हुकलेल्या नियोजनाचे प्रदर्शन घडविले. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियाजन बैठकांचा धडाका लावला होता. मात्र, पावसाळा असल्याने भाविकांना दर्शनरांगेत काही तास उभे राहण्यासाठी डोक्यावर निवारा गरजेचा असल्याचाच विसर यंत्रणेला पडलेला दिसून आला. परिणामी भाविकांना अनेक तास भिजतच दर्शनासाठी रांगेत थांबावे लागले.

000

दोधेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी

सटाणा ः श्री क्षेत्र दोधेश्वर येथे भाविकांनी भगवान श्री शंकर महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. सटाणा शहरापासून अवघ्या १० किलोमीटरवर असलेल्या श्री क्षेत्र दोधेश्वर येथे सटाणा आगारातून पहाटेपासूनच बसची सोय करण्यात आली होती. येथील महादेवाच्या पिंडीवर भाविकांनी दूध, पाणी व बिल्वपत्रांचा अभिषेक करून पूजाविधी केला. परिसरात यात्रोत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धनलक्ष्मी’कडून ज्येष्ठांचा सन्मान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

येथील श्री धनलक्ष्मी पतसंस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. एखाद्या व्यावसायिक संस्थेकडून शहरातील ज्येष्ठांचा सन्मान होणे, हा उपक्रम खूपच अभिनंदनीय आणि गौरवास पात्र आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील शेतकरी बाबूलाल केदा पगार होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार कैलास चावडे, पोल‌िस निरीक्षक सुजय घाडगे, महाराष्ट्र चेंबर्सचे उपाध्यक्ष अनिल लोढा, कळवण मर्चंट बँकेचे चेअरमन सुनील महाजन, गटनेते कौतिक पगार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक अशोक जाधव, महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष विलास शिरोरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष गालिब मिर्झा आदी उपस्थित होते.

प्रमुख अतिथींचे स्वागत पतसंस्थेचे व्हा. चेअरमन कृष्णा बापू पगार, लक्ष्मण खैरनार, योगेश अमृतकार, किशोर कोठावदे यांनी केले. तहसीलदार चावडे यांनी एकत्र कुटूंब पद्धतीतील ज्येष्ठांचे स्थान यावर मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक सुजय घाडगे, बाबूलाल पगार यांनीही मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते ३५ ज्येष्ठ नागरिकांना स्मृतिचिन्ह, शाल देत सन्मान करण्यात आला.

यांचा झाला सन्मान

राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार विजेते मोतीराम शिंदे, बालाजी देवघरे, रामदास पगार, देवमन पगार, बाजीराव पगार, शंकरराव देवरे, बाबूलाल महाजन, रफ‌ियोद्दीन शेख, विश्वनाथ सोनजे, वसंतराव मालपुरे, लक्ष्मण कोठावदे, दगडू आहिरे, दगडू महाले, नारायण महाजन, श्रीमती सुंदरबाई जैन, कमलाबाई संचेती, सुमनताई देवरे, पार्वताबाई वाडेकर, नारायण पगार, रामचंद्र शिरोडे, रघुनाथ जंगम, रामदास ठोके, मधुकर वाघमारे, व्ही. के. व्यवहारे, दिगंबर रायते, डी. ए. दुसाने, गंगाधर गुंजाळ, रामदास दशपुत्रे, डी. डी. पगार, गोपाळराव व्यवहारे आदींचा सन्मान झाला. संस्थापक चेअरमन दीपक महाजन यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चला, भंडारदऱ्याच्या पिकनिकला...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्रावणाची मजा लुटायची असेल तर घराबाहेर पडायला हवे. पिकनिकला जायला हवे, पण पिकनिकला जायचे म्हणजे ग्रुप हवा. त्यात भंडारदरा व त्यासारखी आजूबाजूची काही ठिकाणे असतील तर ग्रुपशिवाय पर्याय नाही. हाच विचार करून ‘मटा कल्चर क्लब’तर्फे खास तुमच्यासाठी ३० जुलै रोजी एकदिवसीय पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्यांसाठी विशेष सवलतीही देण्यात येणार आहे. वय वर्षे ५० पेक्षा कमी असलेल्यांना या पिकनिकसाठी नोंदणी करता येईल.

पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर भटकंतीशिवाय पर्याय नाही. अशा पिकनिक्सच्या आयोजनाचीही अनेकजण वाट बघत असतात. सध्या पावसामुळे निसर्गाने हिरवी शाल पांघरली असून त्याचा अनुभव या एकदिवसीय पिकनिकमधून घेता येणार आहे. या सहलीत चहा, नाश्ता आणि दुपारचे जेवण कल्चर क्लबकडून असणार आहे. या पिकनिकसाठी लिमिटेड सिट्स असल्याने नोंदणी करणे गरजेचे आहे. ‘मटा कल्चर क्लब मेंबर’साठी ८५० तर इतरांसाठी ९५० रुपये नोंदणी फी आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चौधरी यात्रा कंपनीतर्फे देशांतर्गत यात्रेसाठी ५ टक्के डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. तुमचा जर पाच जणांचा ग्रुप असेल आणि तुम्हाला देशांतर्गत टूर करायची असेल तर प्रत्येक सीटमागे तुम्हाला ५ टक्के (कमाल ७५० रुपये प्रतिसीट) डिस्काउंट मिळेल. तुमचा १० जणांचा ग्रुप असेल तर प्रत्येक सीट मागे ७ टक्के (कमाल १००० रुपये प्रतिसीट) डिस्काउंट मिळेल. ही ऑफर सहलीत सहभागी होणाऱ्या मटा कल्चर क्लब मेंबरसाठीच आहे. विदेश यात्रांसाठी आकर्षक सवलती चौधरी यात्रा कंपनीने दिल्या आहेत.

नोंदणीसाठी संपर्क
महाराष्ट्र टाइम्सच्या अल्फा स्क्वेअर, दुसरा मजला, डिसुजा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक - ४२२००५ या पत्त्यावर किंवा ०२५३-२६६३७९८७ , ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी
फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub
टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटसचिवांनी घेतली जयंत पाटील यांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्य सहकारी गटसचिव व कर्मचारी संघटनेला राज्य सरकारकडून आश्वासनांखेरीज काही न मिळाल्याने गटसचिवांच्या शिष्ट मंडळाने पुणे येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि शेकाप आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली.
राज्यातील गट सचिवांचे सेवा व वेतनाच्या समस्यांबाबत संघटनेने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. पण सरकारकडून आश्वासनांखेरीज काहीच मिळाले नाही, अशी कैफियत संघटनेने मांडली. शेतकरी कामगार पक्ष युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष कृषिभूषण महेश कडूस-पाटील व युवक आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष विकास मोरे यांनी गट सचिवांचे प्रश्न जयंत पाटील यांना विस्तारित करून त्यांच्या समस्याबाबत सांगितले. हे प्रश्न शेतकरी कामगार पक्षातर्फे विधानभवनात मांडण्याची मागणी केली. या संदर्भात पक्षातर्फे बुधवारी (दि. २६) कारवाई सुरू करणार असल्याचा दिलासा जयंत पाटील यांनी गटसचिवांना दिलासा दिल्याची माहिती महेश कडूस-पाटील यांनी दिली. यावेळी ‘शेकाप’चे शांताराम कुंजीर, युवक आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष विकास मोरे, हेमंत भरवीरकर, योगेश मोरे, प्रशांत शेलार, चेतन बोराडे, प्रदीप साळुंके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगी गडासाठी मदतीस केंद्र तयार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

श्री सप्तशृंग देवीच्या सेवेसाठी व गडाच्या विकासासाठी केंद्राकडून जी मदत अपेक्षित आहे ती सर्व मदत आम्ही करू. राष्ट्रीय स्तरावरील इतर देवास्थानांप्रमाणे गडाचा विकास करण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा यांनी दिले.

सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, विश्वस्त उन्मेष गायधनी, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार प्रसाद पवार व प्रसाद पेटकर यांच्याशी ते दिल्लीत बोलत होते. गडावरील विकासाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी श्री सप्तशृंग निवासीनी देवी ट्रस्ट व श्री सप्तशृंग गड ग्रामपंचायतीचे निमंत्रण खासदार गोडसे, विश्वस्त गायधनी यांच्या हस्ते देण्यात आले. मंत्री शर्मा म्हणाले, की शिवा सर्किटप्रमाणे शक्तीपीठ सर्किट सुरू करण्याची कल्पना चांगली आहे. त्यावर आवश्य विचार करू. त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंग मातेचे दर्शन एकाच वेळी करण्याचा माझा विचार आहे. नाशिकला धार्मिक पर्यटनवाढीसाठी केंद्राकडून पाहिजे ती मदत खासदारांनी मागावी, आम्ही लगेच ती उपलब्ध करून देऊ. भाविकांना अधिक सुविधा मिळाल्या पाहिजे. तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे आकर्षित झाले पाहिजे, अशा सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यावेळी मंत्री शर्मा यांना ‘सृजनाचा सारथी’ हे पुस्तक देण्यात आले. श्री सप्तशृंग निवासीनी देवी ट्रस्टचे आमंत्रण त्यांनी स्वीकारून पुढील भेटीत श्री दर्शनासाठी जरूर येईन, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये निर्मलवारी अभियान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवात निर्मलवारी अभियान राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पंढरपूर यात्रेत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत असून त्याच धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दरवर्षी जानेवारीत त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ यात्रोत्सव होतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी बांधव त्र्यंबक नगरीत दाखल होतात. भाविकांच्या गर्दीमुळे व्यवस्थापन पहाणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवरही ताण येतो. कुशावर्तात स्नान, त्र्यंबकराजासह निवृत्तीनाथांचे दर्शन व फडावर मुक्काम या पध्दतीने येथील कार्यक्रमाचे नियोजन होते. दरवर्षी यात्रेपूर्वी मेनरोड, कुशावर्त परिसरातील अतिक्रमण हटविणे, खड्डे डांबराने बुजविणे अशी कामे केली जातात. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी जंतूनाशक फवारणीही करण्यात येते. परंतु, या काळात त्र्यंबकमध्ये अस्वच्छता तसेच रोगराईचे प्रमाण वाढते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा आधार घेत पंढरपूरप्रमाणेच त्र्यंबक यात्रोत्सवातही निर्मलग्राम संकल्पना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. श्रावणी सोमवारच्या नियोजनाबाबत त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

निर्मलग्रामची संकल्पना मूर्त रुपात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावर ही संकल्पना राबविण्यासाठी त्र्यंबकमधील १३ ठिकाणे निश्च‌ित केली आहेत. त्र्यंबकमधील विविध आखाड्यांशी याबाबत चर्चा केली जाणार आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती आणि उपाययोजना अशा दोन टप्प्यांमध्ये हे निर्मलवारी अभियान कार्यान्वित केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठाच्या दातृत्वाला मुख्यमंत्र्यांचा सॅल्यूट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धकाधकीच्या जीवनात अनेक टक्केटोणपे खाल्यानंतर माणसाला खरे जीवन जगण्याचे सूत्र कळते. माणसाने माणसाला मदत केली पाहिजे, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे चालले पाहिजे याची जाणीव होते. आणि त्याबरहुकूम तो चालायला लागतो. मदतीसाठी हात पुढे करतो, धडपडणाऱ्याला उठवतो, चालणाऱ्याला पळायला शिकवतो अशाच माणसाचे कौतुक होते. त्याची ही धडपड सत्कारणी लागते, आणि सर्वोच्च पातळीवरून त्याच्या या सद्गुणांचा सन्मान होतो अशीच एक श्रृंखला आली आहे, एका ज्येष्ठ नाशिककराच्या वाट्याला. आयुष्याच्या सायंकाळी त्याने केलेल्या मदतीचे थेट मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून कौतुक केले आहे. या उतारवयातही पाठीवरती कौतुकाची ही पडलेली थाप पाहून या वृध्दाला कृतकृत्य झाल्याचा भास नसेल झाला तर नवल!

रामचंद्र बाळकृष्ण देशपांडे असे या ज्येष्ठ नाशिककराचे नाव आहे. वयाच्या ९० व्या वर्षी आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनमधून मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी त्यांनी चक्क पन्नास हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. त्यांच्या या कृतीचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी कौतुक केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तात्काळ ट्विट करून समाधान व्यक्त केले. रामचंद्र देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की ‘मी माझ्या मुलाकडे रहात असून मला फारसा खर्च करावा लागत नाही. मला २३००० रुपये पेन्शन असून माझे वय ९० वर्षे आहे. आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत माफी देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबाबत आपले अभिनंदन. कर्जमाफीची रक्कम मोठी आहे ती उभारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी या देशाचा नागरिक म्हणून माझ्या ऐपतीनुसार ५०००० रुपये चेक देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा.’ या पत्राचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले असून एकप्रकारे मदतीसाठी त्यांनी आवाहनच केले आहे.

माणुसकीचा सर्वोच्च गहीवर म्हणजे रामचंद्र बाळकृष्ण देशपांडे यांनी पाठवलेली मदत व पत्र आहे. रामचंद्रजी ९० वर्षांचे असून निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांना २३ हजार रुपये पेन्शन मिळते. त्यांनी दोन महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांसाठी पाठवून त्यांना एकप्रकारे सॅल्यूटच केला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


मी कोणतीही प्रसिध्दी मिळण्याच्या हेतूने हे काम केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले हेदेखील मला माहीत नाही. मी माझे काम केले आहे. माझी क्षमता ५० हजारांचीच आहे, म्हणून ते दिले; परंतु मला त्यांना आणखी पैसे देता आले असते तरी आनंदच झाला असता.
- रामचंद्र देशपांडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images