Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

समृद्धी विरोधात काढणार मुंबईत मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला आता चांगलाच विरोध होवू लागला आहे. येत्या अधिवेशन काळात मुंबईत मंत्रालयावर थेट मोर्चा काढण्याचा निणर्य सोमवारी नाशिक येथे झालेल्या समृद्धीबाधीत शेतकऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला. दिवसभर सुरू असलेल्या या मेळाव्यात सहा ठरावांना मंजुरी देण्यात आली.

नाशिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात समृद्धीबाधीत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष्‍ा तुकाराम भस्मे, बबन हरणे, राजू देसले, भाऊ मांडे, डॉ. राम बाहेती, भाऊसाहेब शिंदे, डी. एस. मोरे, प्रल्हाद पोळेकर, अॅड. रतनकुमार इचम, वैशाली महिस्कर, प्रशांत वाडेकर आदींसह विविध जिल्ह्यातून सहभागी झालेले समृद्धीबाधीत शेतकरी उपस्थित होते.

मुंबई-नागपूर हा समृद्धी मार्ग नसून शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा मार्ग आहे. या मार्गासाठी शेतकऱ्यांचा विराध असून, सरकार शेतकऱ्यांशी संवादच साधत नसल्याचा आरोप करण्यात आला. हा मार्ग जाणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यावर त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध म्हणून शेकडो हरकती घेतल्या असल्या तरीही सरकारने त्याची अजूनही दखल घतलेली नाही, असा अरोप करण्यात आला.

या मार्गासाठी भूसंपादन चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकऱ्यांवर दडपण आणून जमिनी हस्तांतरीत करून घेत आहेत. या मार्गाचे काम पाहणाऱ्या एमएसआरडी या कार्यालयातील दहा ते बारा अधिकारी हे भ्रष्ट असल्याचाही आरोप मेळाव्यात करण्यात आला. या मार्गाची जबाबदारी असलेले राधेश्याम मोपलवार हे तेलगी घोटाळ्यातील आरोपी असून, त्याबाबतच्या तक्रारी पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आल्या असल्याचे कागदपत्र यावेळी दाखविण्यात आले. तसेच धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनीही या व्यक्तीविरोधात तक्रार दिली असल्याचे सांगण्यात आले.

अधिकारी भ्रष्ट

समृद्धीचे काम पाहणारे मुख्य अधिकारी राधेश्याम मोपलवार हे भ्रष्ट असून, त्यांच्या विरोधात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून काहीही उपयोग झाला नसल्याचा आरोप सतिष मांगले यांनी केला आहे. बैठकीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळा स्वच्छतेसाठी ‘एनएसई’चा पुढाकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) सामाजिक उत्तरदायित्व या उपक्रमाअंतर्गत फिनिश सोसायटी या संस्थेने नाशिकमधील नऊ शाळांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा पुरविल्या आहेत. यात स्वच्छतागृहांचे नूतनीकरण, हात धुण्याचे युनिट, स्वच्छ पाण्यासाठी ‘आरओ’ तसेच थंड पाण्यासाठी कूलर आदिंचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये स्वच्छ व आनंददायी वातावरणात शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळांमध्ये स्वच्छतेच्या अपुऱ्या सुविधांअभावी विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, तसेच त्यांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी या सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. याशिवाय, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करावे यासाठी संस्थेकडून ‘एमराल्ड पार्क’ येथे एक दिवसाचे शिक्षक प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये शिक्षक, शिक्षिका व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशा ६५ व्यक्त‌िंनी सहभाग घेतला होता. या नऊ शाळांमधून एका स्मार्ट स्कूलची निवड करण्यात येणार आहे. या निवडपद्धतीवरही यावेळी चर्चा करण्यात आली. विधिज्ञ राजेश हिवरे यांनी शिक्षकांच्या नेतृत्वाचा विकास व्हावा यासाठी फिल्म, खेळ, गटचर्चा आदींचे आयोजन केले होते. फिनिश सोसायटीचे अमोल नेमणार, प्राजक्ता चव्हाण, पूजा झुबरे, आशुतोष अग्रवाल आदीं यावेळी उपस्थित होते.

स्वच्छतेविषयी मार्गदर्शन

स्वच्छतेच्या सवयी, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक शौचालय याचा वापर कसा करावा या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. स्त्री-पुरुषांच्या पौगंडावस्थेमध्ये शरीरात होणारे बदल व शारीरिक स्वच्छता, अन्न-पाण्याची स्वच्छता यावर पावरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली. तसेच अस्वच्छतेमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात त्याचा विद्यार्थ्यांच्या वाढीवर आणि कार्यक्षमतेवर काय परिणाम होऊ शकतो. हे आजार होऊ नये, यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, स्मार्ट स्कूल आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.


या शाळांचा सहभाग

धोंडेगाव, गिरणारे जिल्हा परिषद शाळा, श्रीराम विद्यालय पंचवटी, गांधीनगर शाळा, महादेवपूर, अभयवाडी जिल्हा परिषद शाळा आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरांचे स्मृतिस्तंभ उभारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गडकिल्ल्यांवर व त्या परिसरात इतिहासातील पराक्रमी शूरवीरांच्या बलिदानाचे कुठलेही स्मारक किंवा स्मृतिस्तंभ नाहीत. यासंदर्भात तातडीने लक्ष घालून ऐतिहासिक घटनांचे, पराक्रमी शूरवीरांचे स्मृतिस्तंभ उभारावेत, असे साकडे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घालण्यात आले. यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांसाठीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना नुकतेच देण्यात आले.

नाशिक जिल्ह्याला लाभलेल्या सह्याद्री, सातपुडा, सातमाळा पर्वतरांगेत साठहून अधिक उत्तुंग ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. आजपर्यंत शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, पुरातत्त्व, वन, पर्यटन विभाग सामाजिक पातळीवर गडकिल्ल्यांची कायमच उपेक्षा झाली आहे. या दुर्लक्षित गडकिल्ल्यांची दुरवस्था झाल्याने या किल्ल्यांवरील ऐतिहासिक वारसा नष्ट होत आहे. गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक संदर्भाचा विसर पडल्याने नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर पराक्रमी शूरवीरांचे कोणतेही स्मारक अथवा त्यांचा स्मृतिस्तंभ नाही, याकडे निवेदनातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.

मोहिमांमध्ये आढळल्या उणिवा

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था २०१२ पासून नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या अस्तित्वासाठी श्रमदानाच्या मोहिमा काढून गडकोट संवर्धन व दुर्गजागृती अभियान राबवीत आहे. संस्थेच्या वतीने आजपर्यंत ४९ दुर्गसंवर्धन मोहिमा नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर झाल्या. दुर्गसंवर्धन कार्यात विविध कामे श्रमदानातून सुरू आहेत. मोहिमेत विविध क्षेत्रांतील अभ्यासक आहेत. या मोहिमांतील अभ्यासानुसार नाशिकच्या गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे, असे संस्थेचे निरीक्षण आहे. स्थानिक प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधीही उदासीन असल्याची स्थिती आहे. याकामी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था राज्य शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीशी सतत पत्रव्यवहार करीत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देताना शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, निमंत्रक प्रा. सोमनाथ मुठाळ, मानद सल्लागार संदीप भानोसे, आर. आर. कुलकर्णी, कृष्णचंद्र विसपुते आदी उपस्थित होते.

--

या ठिकाणी आहे गरज

नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या किल्ले रामशेज किल्ल्यावर शंभू महाराजांच्या काळात सहा वर्षे झालेल्या अजिंक्य लढ्याचे कुठलाही स्मृतिस्तंभ, स्मारक नाही. सातमाळा पर्वतरांगेत किल्ले कांचन-मंचनला लागून असलेल्या कांचनबारीत सुरतेहून परतत असताना छत्रपती शिवराय व दाऊद खानच्या मोगली सैन्यात घमासान लढाई झाली. या अजिंक्य लढाईचे कांचनबारीत कुठलेही स्मारक नाही. सातमाळा पर्वतरांगेत असलेल्या किल्ले कन्हेरागडाच्या अजिंक्य लढ्यात शिवकालीन किल्लेदार रामजी पांगेरा या शूराने अवघ्या ७०० मावळ्यांसह दिलेरखानच्या हजारोंच्या फौजेला पहाटेच्या प्रहरात दिलेली निकराची झुंज अन् या लढाईत रामजी पांगेरा धारातीर्थी पडल्याचे संदर्भ इतिहासात क्वचित आढळतात. या लढ्याचा कुठलाही स्मृतिस्तंभ किल्ले कान्हेर गडावर अथवा पायथ्याला नाही. या ठिकाणी स्मृतिस्तंभ असावेत, ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांमुळे रस्त्यांची ‘वाट’

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात पंचवटी परिसरातील रस्त्यांच्या कामांवर विशेष भर देण्यात आला होता. मात्र, ही कामे किती निकृष्ट दर्जाची आहेत हे आता उघड होत असून, यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पंचवटीतील रस्त्यांची अक्षरशः वाट लागल्याचे दिसून येत आहे. पंचवटीतील चौकांच्या भागात प्रचंड खड्डे पडल्याने तेथून वाहन चालविणे वाहनचालकांसाठी जिकिरीचे ठरत आहे.

जुना आडगाव नाक्याच्या चौफुलीवर आणि दिंडोरी नाक्याजवळील भडक दरवाजा भागात रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आलेले आहेत. हे पेव्हर ब्लॉक सततच्या रहदारीमुळे फुटले आहेत, काही रस्त्यात गाडले गेले आहेत. त्यामुळे येथे खड्डे तयार झाले आहेत. या चौकांच्या भागातून वाहने चालविणे अत्यंत खडतर बनले आहे. फूटपाथवर टाकण्यात येणारे पेव्हर ब्लॉक रस्त्यावर का टाकले जातात, हा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. या पेव्हर ब्लॉकमुळे पडलेले खड्डे वाचवून वाहन चालविताना दुसऱ्या वाहनांवर आदळण्याचे प्रकार होऊन या परिसरात किरकोळ अपघातांत वाढ झाली आहे.

नवीन आडगाव नाका परिसरातील बस स्थानकासमोरच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यावर वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा खड्ड्यांमध्ये जोराने वाहने आदळत आहेत. खड्ड्यांतील पाणी जवळ बस स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांवर, पादचारी, अन्य वाहनचालक व विद्यार्थ्यांवर उडत असून, त्यामुळे वादावादीचे प्रकारही होत आहेत. येथे अपघातही वाढले आहेत.

निमाणी बस स्थानकाच्या समोर मोठे खड्डे पडलेले होते. ते बुजविण्याचा सोपस्कार केला असला, तरी तो तात्पुरता असल्याने येथे पुन्हा खड्डे पडण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादरोडवर दुभाजकांच्याजवळ पाणी साचणाऱ्या भागात खड्डे पडू लागले आहेत. हे खड्डे त्वरित बुजविले नाहीत, तर येथील अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

--

या रस्त्यांवर पडलेत खड्डे

मुंबई-आग्रा महामार्ग, औरंगाबादरोड यांसारख्या मुख्य रस्त्यांबरोबरच नवीन आडगाव नाका, जुना आडगाव नाका, निमाणी बस स्थानकासमोरील रस्ता, दिंडोरी नाक्याजवळील चौक, गंगाघाट रस्ता, तसेच उड्डाणपुलावरील रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक रस्त्यांना स्ट्रीट डिझायनरचा आधार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात जवळपास दोन हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे असले, तरी या रस्त्यांची निर्मिती शास्रोक्त पद्धतीने झाली नसल्याने अपघातांचे प्रमाण मोठे आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची वळणे, चौक, सिग्नल्स धोकादायक असून, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने ते सोयीचे नाहीत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्वच रस्त्यांचा शास्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील रस्त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी अत्यावश्यक सूचना करण्यासाठी स्ट्रीट डिझायनरची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव येत्या महासभेत ठेवण्यात आला आहे. संबंधित डिझायनर रस्त्यांचा अभ्यास करून त्यात आ‍वश्यक ते बदल करण्याच्या सूचना करणार असून, त्यानुसार रस्त्यांमध्ये बदल केले जाणार आहेत.

महापालिका हद्दीत सध्या लहान-मोठे जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. शहराचे नागरीकरण झपाट्याने होत असले, तरी अनेक रस्त्यांची निर्मिती पारंपरिक पद्धतीने करण्यात आली आहे. जुने रस्ते रुंद आहेत, तर नवीन रस्त्यांची रचनाही वाहतुकीसाठी योग्य नाही. रस्ते तयार करताना धोकादायक वळण, चौक यांचा अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहेत. प्रमुख रस्त्यांवर वाहन चालविताना कुठून कोण येईल, याचा अंदाज नसतो. त्यामुळे शहरात अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. अनेक ठिकाणी सिग्नल्स चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. शहर वाहतुकीत सुसूत्रता नसल्याने वाहतूक आणि पार्किंगचीही समस्या निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने स्ट्रीट डिझायनर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहर वाहतुक सुरक्षेसाठी काय उपाययोजना करता येतील, याचा अभ्यास स्ट्रीट डिझायनरमार्फत केला जाणार आहे. दिल्ली, मुंबईच्या धर्तीवर कन्सल्टंट कंपनीकडून स्ट्रीट डिझायनिंगचे काम केले जाणार आहे. संबधित डिझायनर शहरातील प्रमुख रस्त्यांचा अभ्यास करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करणार आहे. रस्त्यांमधील त्रुटी, धोकादायक वळणे, चुकीच्या ठिकाणी तयार केलेले सिग्नल, चौकांचे नियोजन या संदर्भात आवश्यक सूचना महापालिकेला करणार आहे. त्यामुळे महापालिकेला या रस्त्यांचे शास्रोक्त पद्धतीने नियोजन करण्यास मदत होणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला असून, त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अपघातमुक्त होऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली जाणार आहे.

प्रकल्पांसाठी कन्सल्टंट

रस्त्यांच्या नियोजनासोबत महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांसाठी कन्सल्टंट नियुक्त केला जाणार आहे. दादासाहेब फाळके, पेलिकन पार्क, तारांगण, नेहरू उद्यान यांसारखे बडे प्रकल्प पालिकेसाठी डोईजड झाले आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकल्प पीपीपीच्या धर्तीवर खासगी कंपन्यांना देण्याचा विचार पालिका करीत आहे. त्यासाठी पालिकेने आता कन्सल्टंट नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा प्रस्ताव येत्या (२० जुलै) महासभेत ठेवण्यात येणार आहे. कन्सल्टंट कंपनी या प्रकल्पांचा सविस्तर डीपीआर तयार करून पालिकेला सादर करणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचाही वनवास कमी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने एकाचा बळी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिनाभराच्या शांततेनंतर जिल्ह्यात पुन्हा स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील एक रुग्ण स्वाइन फ्लूने दगावला असून, अन्य तीन जणांवर सिव्हिलमधील विशेष कक्षात उपचार सुरू आहेत. या वर्षात आतापर्यंत ३६ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.

कैलास गणत टाकळकर (वय ३६, रा. निफाड) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूसदृश आजाराचे दोन रुग्ण १० जुलैदरम्यान दाखल झाले होते. पैकी टाकळकर यांचा उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला. त्यांचा प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चालू वर्षात आतापर्यंत स्वाइन फ्लूचे १६८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर जिल्ह्यात ३६ पेक्षा अधिक रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. बळी गेलेल्यांमध्ये नाशिक शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने निफाड, सिन्नर, बागलाण, चांदवड, दिंडोरी या तालुक्यांतील रुग्णांची संख्या अधिक आहे.

वर्षभरात सिव्हिल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालये, महापालिकेचे दवाखाने आदी ठिकाणी मिळून ५४ हजार रुग्णांची स्वाइन फ्लूची चाचणी करण्यात आली आहे. पैकी १ हजार ४२१ रुग्णांना टॅमी फ्लू गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगीतले. जिल्ह्यामध्ये मागील महिनाभरापासून कमी होत जाऊन स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव पूर्ण बंद झाला होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेला स्वाइन फ्लू कक्षही काही दिवसांपासून बंद होता. मात्र मागील आठवड्यापासून पुन्हा स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृगात बरसला, नंतर रुसला

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक, दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला. मात्र, बागलाण, मालेगाव तालुक्यासह देवळा तालुक्यातील काही भागाकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे या तीन तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत. बागलाण तालुक्यात तर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

जूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावणाऱ्या वरूण राजाने बागलाण तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. दिवसदिवसभर केवळ ढगाळ वातावरण असल्यामुळे कधी एकदाचा पाऊस पडतो, याकडे तालुक्यातील बळीराजाचे लक्ष आहे. महागाचे बियाणे खरेदी करून ते डोळ्यांदेखत वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

तालुक्यातील खरिपाचे सरासरी क्षेत्र ७२ हजार ३०८ हेक्टर असतांना यंदा जेमतेम ५६.१५ टक्के म्हणजेच ४० हजार ५९८.५० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. १० जुलैअखेर पर्यंत तालुक्यात अवघ्या ११९ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेने अत्यंत तोकडे आहे. तालुक्यात तब्बल महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. परिणामी येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस पडला नाही तर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सुरुवात दमदार, नंतर ओढ

बागलाण तालुक्यात यंदा मृग नक्षत्रापासून सलग दोन ते तीन दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यानंतर अधूनमधून एकखादी सर हजेरी जावून जाते. गतवर्षाच्या अनुभवावरून शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसानंतर पेरणी केली. महागडे बियाणे खरेदी करून शेतीची कामे सुरू केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतीची कामे थंडावली आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी आहे, त्यांनी ठिबकने पणी देण्यास सुरूवात केली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची स्थिती नाजूक आहे. दुष्काळाची दाहकता अनुभवलेल्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रात पेरणी झाली, मात्र पावसाने पाठ दाखविल्याने त्यांचे स्वप्न भंगते की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

खतांचा साठा पडून

तालुक्यातील सर्वच शेतकरी दुबारच्या संकटामुळे नाराज झाले आहेत. बी-बियाणे विक्रेत्यांनी तर मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करून ठेवला आहे. मात्र पाऊसच नसल्याने शेतकरीही खतांची खरेदी करताना विचार करीत आहेत. त्यामुळे व्यापारीही संकटात सापडले आहेत. गतवर्षी जून तालुक्यात ११४ मि.मी. इतका पाऊस झाला होता. तर जून अखेर केवळ ८४ मि.मी पाऊस झाला आहे. १० जुलैअखेर यात अवघी पाच मि.मी इतकी वाढ झाली आहे. यंदाच्या पावसात सातत्य नसल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील हरणबारी, केळझर या धरणांतही पाणीसाठा नगण्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रोझमेर्टा’चे शटर अखेर डाऊन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनातील तांत्रिक दोष शोधणाऱ्या ऑटोमॅट‌िक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटरचे (एव्हीइएस) काम पाहणाऱ्या रोझमेर्टा कंपनीचा करार संपुष्टात आला आहे. यापुढे हे सेंटर प्रादेश‌िक परिवहन विभागाच्या अधिपत्याखाली सुरू राहणार आहे. यासाठी एसटी महामंडळाचे पाच चालक आणि पाच मेकॅनिक आरटीओत वर्ग करण्यात आले आहेत.

प्रादेश‌िक परिवहन विभागातील (आरटीओ) पाच एकर जागेत हा प्रकल्प साकारला गेला आहे. जून २०१५मध्ये हे सेंटर सुरू झाले. वाहनांच्या फिटनेस टेस्टची स्वयंचलित पद्धतीने तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने एव्हीईएस यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच हे केंद्र वाहनचालकांकडून लक्ष्य करण्यात आले. अगदी किरकोळ दोषही तपासणीत समोर आल्याने शेकडो वाहने फेल होऊ लागली. यातून वाहनचालक आणि एजंटांनी हे केंद्र बंद करण्याची मागणी सुरू केली. हा वाद वाढल्याने वाहनचालकांनी केंद्रच बंद पाडून तेथे तोडफोडदेखील केली. यामुळे केंद्र सुरू झाल्यानंतर काही दिवसांपुरते बंद करण्यात आले. आरटीओनेही सोयीने कधी वाहनचालकांना सोबत घेतले तर कधी कंपनीच्या संचालकांना. यामुळे काही महिन्यांपासून फार वाद न होता तसेच अगदीच किरकोळ दुरुस्त्यांकडे दुर्लक्ष करून कामकाज करण्यात आले. रोझमेर्टा कंपनीचा करार जुलै २०१७पर्यंत होता. तो आता संपुष्टात आला असून, यापुढे तपासणीसह सर्टिफिकेट देण्याचे काम आरटीओमार्फत सुरू राहणार आहे. यासाठी आरटीओने एसटी महामंडळाचे पाच बसचालक तसेच पाच मेकॅनिक वर्ग करून घेतले आहेत. या दहा कर्मचाऱ्यांसह आरटीओचे सहा अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. रोझमेर्टा कंपनीने याच कामासाठी ३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

सर्टिफिकेट्साठी वाद

हेडलाईटसचा कमी प्रकाश, वायफर नसणे, वाहनांचे स्ट्रक्चर, ब्रेकिंग सिस्टिम, टायर, वेट बॅलन्सिंग येथपासून मशिन्समधील अगदी छोट्या परंतु दुर्लक्षीत केलेल्या बिघाडांमुळे वाहनांचा अपघात होऊ शकतो. या सेंटरमध्ये हेच काम चालते. वाहनाची स्थिती चालण्यासारखी नसली तरी वाहनचालकास फिटनेस सर्टिफिकेट हवे असते. अगदी हेडलाईटस नसलेली वाहने पात्र करून घेण्यासाठी सेंटरमध्ये वाद झाल्याचे अनेक किस्से आहेत. एव्हीईएस स्थापन करण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) सहकार्याने हाती घेतले होते. सार्वजनिक-खासगी सहभाग तत्वावर (पीपीपी) उभारण्यात आलेल्या या केंद्रामध्ये नियमांची मोडतोड न करता पारदर्शक काम झाले, तरच या योजनेचा खरा फायदा होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरबसल्या व्हा ‘कल्चर क्लब’चे सदस्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सतर्फे वाचकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यातीलच एक ‘कल्चर कल्ब’ होय. या माध्यमातून विविध उपक्रम, कार्यक्रमांची संधी वाचकांना ‘मटा’ने उपलब्ध करुन दिली आहे. ‘कल्चर क्लब’चे सदस्य होण्याची संधी मटाने वाचकांना घरबसल्या उपलब्ध करून दिली आहे. मटा कल्चर क्लबचे फॉर्म वाचकांना घरबसल्या मिळणार आहेत.

मटा कल्चर क्लबतर्फे सातत्याने विविध सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लहानांपसून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाचा हवाहवासा वाटणारा ‘हॅप्पी स्ट्रीट’ असो वा तरुणींसाठी ‘श्रावण क्विन’ असो. त्याला तुमच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळालाय. मराठी संस्कृतीशी जोडलेली नाटकं असोत किंवा वेस्टर्न झुम्बा डान्स, खाऊचा डब्बा. अशा विविध कार्यशाळा ‘मटा’ने आजवर आयोजित केल्या आहेत. कल्चर क्लब सदस्यांचे गेट टुगेदर, लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, टेन्शन खल्लास कार्यक्रम, किटी पार्टी, गानतंत्र स्पर्धा, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निव्हल, सहल, मँगो फेस्टिव्हल, नवरंग नवरात्रीचे, मंगळागौर, एज्युकेशनल सेमिनार, क्विझ कॉन्टेस्ट, संगीत मैफिली, ख्रिसमस कार्निव्हल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा लाभ सदस्यांना वर्षभर घेता येतो. तसेच वाचकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘मटा कल्चर क्लब’तर्फे व्यासपीठही उपलब्ध करून देण्यात येते. नाटकांसाठी विशेष सवलतही देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा. हे सदस्यत्व तुम्हाला घरबसल्या घेता येईल.


सदस्य होण्यासाठी हे करा..

तुम्हाला तुमच्या घरी मिळालेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती व्यवस्थित लिहा. हा फॉर्म आणि २९९ रुपयांचा BCCL या नावाचा चेक तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे जमा करा. चेकच्या मागे तुमचं नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. हा चेक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कल्चर क्लब सदस्यत्वाचे कार्ड थेट तुमच्या घरी मिळेल. आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि विविध कार्यक्रमांचा आस्वाद घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खताच्या दुकानाला देवळ्यात आग

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा येथील बाजार समितीच्या गाळ्यांमधील आनंद अॅग्रो या बियाणे व खतांच्या दुकानाला सोमवारी पहाटे आग लागली. या आगीत २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे हा अपघात झाला.

बाजार समितीचे संचालक जगदीश पवार यांचे हे दुकान आहे. ते रविवारी रात्री आठ वाजता दुकान बंद केले. सोमवारी पहाटे तीन वाजता कळवण रस्त्यावरील संजय आहेर यांच्या घराकडे चोर आल्याचा संशयामुळे परिसरातील नागरिक सतर्क झाले होते. त्यातच बाजार समितीच्या गाळ्यांमध्ये आग लागल्याचे प्रदीप आहेर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ देवळा पोल‌िस ठाण्यासह पवार यांनाही कळविले. पोल‌िस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सटाणा अग्निशमन दलाला फोन बोलावून घेतले. तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पहाटे साडेचार वाजता सटाणा येथील अग्निशमन बंब पोहोचले. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी साडेसात वाजता आग आटोक्यात आली. आगीत दुकानातील खतांसह जवळपास २५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत सोमवारी उत्तमनगर व पाथर्डी फाटा येथील तीन अनधिकृत होर्डिंग्ज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आली.

महापालिकेच्या वतीने होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी आवश्यक ती परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र, शहरात अनेक होर्डिंग्ज हे विनापरवाना असल्याचे लक्षात आल्याने महापालिकेने हे होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी उत्तमनगर येथील अनधिकृत लोखंडी स्ट्रक्चर असलेले होर्डिंग हटविण्यात आले, तर पाथर्डी फाटा येथील दोन अनधिकृत लोखंडी स्ट्रक्चर असलेले होर्डिंग्ज हटविण्यात आले. यावेळी या होर्डिंग्जसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.

दोन अतिक्रमण निर्मूलन पथकांनी जेसीबी व गॅस कटरच्या सहाय्याने ही होर्डिंग्ज जमीनदोस्त केली. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई झाली. ही मोहीम आयुक्त अभिषेक कृष्णा व किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्या सूचनेप्रमाणे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी राबविली. महापालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेचे स्वागत होत असले, तरी सिडकोसारख्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांबाबत महापालिका केव्हा पुढाकार घेणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

--

...तर कोणत्याही क्षणी कारवाई

महापालिकेने यापूर्वीच अनधिकृत होर्डिंग्ज उभारणीबाबत दंडात्मक कारवाईच्या नोटिसा दिलेल्या आहेत. दंडात्मक रक्कम भरून होर्डिंग्जसाठी नियमानुसार परवानगी घ्यावी अन्यथा महापालिका संबंधितांचे अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई कोणत्याही क्षणी करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या, तसेच पार्किंगच्या व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांना त्यांची बेकायदेशीर व अतिक्रमित असलेली बांधकामे काढून घेण्याबाबतही यावेळी आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावातून दानपेटी चोरीस

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

शहरात घरफोड्यानंतर चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष केले आहे. शनिवारी पहाटे शहरातील शिवाजीनगर भागातील शनीमंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असले, तरी सोमवारी निफाड रोडवरील रानमळ्यातील कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेटीच चोरट्यांनी लंपास केली आहे.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून मंदिरातील दानपेटी उघडण्यात आलेली नव्हती. त्यामुळे दानपेटीत अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपये असतील, असा अंदाज परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केला आहे. गेल्या महिनाभरापासून पिंपळगाव बसवंत शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसात दोन मंदिरांची दानपेटी फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदे, मोरुस्कर कार्यक्षम नगरसेवक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सिटीझन फोरमच्या वतीने सन २०१५ ते २०१७ या कालावधीसाठीचे कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार भाजपचे संभाजी मोरुस्कर आणि शिवसेनेच्या विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादीचे विक्रांत मते आणि सुफ‌ी जीन यांची विशेष उल्लेखनीय (बेस्ट प्रॅक्टीसेस अॅवार्ड) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या बुधवारी (दि. १९) नाईस संकुल येथे विभागीय आयुक्त महेश झगडे आणि आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग आणि निवड समितीचे अध्यक्ष अॅड. नंदकिशोर भुतडा यांनी दिली आहे.

शहराच्या विकासासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडले जावेत यासाठी नाशिक सिटीझन फोरमच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून मतदार जनजागृतीचे काम केले जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून चांगले काम करणाऱ्या नगरसेवकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या नगरसेवकांच्या निविडीसाठी ज्येष्ठ विधीज्ज्ञ नंदकिशोर भुतडा यांच्या अध्यक्षतेखआली निवड समिती गठित करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, संजय पाठक, मोहन रानडे यांच्या समितीने १२२ नगरसेवकांच्या कामांचे अवलोकन केल्यानंतर निवड केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्याचा खून

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. धुळे शहरातील कराचीवाला चौकात असलेल्या गोपाल टी समोर आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टोळी युद्धातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली आहे. गुड्ड्यावर धुळे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वीच तो पोलीस कोठडीत होता. तिथून सुटल्यानंतर लगेचच त्याच्यावर हल्ला झाला. घटनास्थळी काही काडतूस पोलिसांना मिळाले आहेत. तिथं असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं लवकरच मारेकऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधारांना मिळणार अनुदानाचा आधार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे एप्र‌िलपासूनचे थकीत अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुदान वाटपासाठीचा निधी सरकारने मंजूर केला असून, बिल‌िंगची कार्यवाही पूर्ण होताच हे अनुदान लाभार्थींच्या बँक खात्यांवर जमा केले जाणार आहे. चारही महिन्यांचे अनुदान एकदम मिळणार असल्याने अपंग, अंध व तत्सम लाभार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे.

संजय गांधी निराधार योजनेचे जिल्ह्यात या योजनेचे २३ हजार ८१४ लाभार्थी आहेत. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून या लाभार्थींना अनुदानच मिळालेले नाही. सरकारकडून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे बिल‌िंगची प्रक्रिया पूर्ण झाली की लगेचच अनुदान तहसील लाभार्थींच्या खात्यात वर्ग केले जाईल.

आधारकार्ड गरजेचे

लाभार्थींची नाशिक जिल्हा सहकारी बँकेत खाती आहेत. परंतु, त्यांना देण्यात येणारे अनुदान राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यांमध्ये वर्ग करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला आहे. त्यामुळे लाभार्थींचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असेल तर त्याची माहिती संबंधित तहसील कार्यालयाकडे द्यावी. खाते नसल्यास बँकेत खाते उघडावे, असे आवाहन तहसीलदार देवगुणे यांनी केले आहे.


अनुदान मिळण्यास विलंब झाला ही वस्तुस्थ‌िती आहे. परंतु, सरकारने अनुदान मंजूर केले असून, लवकरच हे अनुदान तहसीलदारांमार्फत लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होईल.

- अभिलाषा देवगुणे, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात गुंडाची हत्या

0
0

गोळ्या घालून आणि तलवारीने वार; सीसीटीव्हीची मदत घेणार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचा मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जुना आग्रा रोडवरील चहाच्या दुकानासमोर बंदुकीच्या गोळ्या घालून आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची मदत घेतली जात आहे.

रफियोद्दीन शेख जुना आग्रा रोडवरील गोपाल टी हाऊस येथे सकाळी चहा पिण्यासाठी आला होता. इंडिका कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी रफियोद्दीनला चहाच्या दुकानातून बाहेर ओढून नेले. त्याच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडल्या तसेच हल्लेखोरांपैकी काही जणांनी त्याच्यावर तलवारीने वार केले. क्षणात सफियोद्दीन जमिनीवर कोसळला. या घटनेचे वृत्त सोशल म‌ीडियावरून शहरात व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली. अनेकांनी संबंधित चहाच्या दुकानाजवळ गर्दी केली. पोलिस उप अधीक्षक हिंमत जाधव, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रमेश परदेशी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल वडनेरे कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना हटविले. दरम्यान सफियोद्दीनची हत्या जुने धुळेमधील विक्की शाम गोयर, राजेंद्र रमेश देवरे, भिमा रमेश देवरे, दादू रमेश देवरे, शाम गोयर, विलास शाम गोयर, विजय शाम गोयर यांच्यासह अन्य त‌ीन ते चार जणांनी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध शहर

पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

तपासासाठी पाच पथके

पोलिसांनी चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेतले असून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच तपास पथक रवाना झाली आहेत. आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्त्रायलची शैली तंत्रज्ञानाने सुकर

0
0

नरहरी कुलकर्णी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्याला इस्त्रायलकडून खूप शिकण्यासारख्या बाबी असून, प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जीवनशैली सुकर कशी बनवावी याचे मूर्तिमंत उदाहरण इस्त्रायल असल्याचे प्रतिपादन भारतातील इस्त्रायलचे मित्र व इस्त्रायलच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित नरहरी कुलकर्णी यांनी केले. ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल अर्थातच ‘बीबीएनजी’च्या ग्रेट भेट या कार्यक्रमात उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कुलकर्णी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर रशियाचा पगडा असलेल्या भारतीय अर्थव्यवस्था आपल्या पायावर उभे राहण्याकरिता प्रयत्न करीत होती. भारतीय उद्योजक जगातील विविध देशांकडून तंत्रज्ञान व कच्चा माल मिळवण्याकरिता प्रयत्न करत होते. इस्त्रायलला भारत, रशिया व आखाती देशांनी अधिकृत मान्यता दिली नव्हती; परंतु १९७२ च्या सुमारास इस्त्रायलमध्ये असलेल्या मृत समुद्रातून ब्रोमिन या रसायनाचे उत्पादन विकण्यासाठी इस्त्रायल जागतिक बाजारपेठ शोधात होता. त्यादरम्यान म‌ी केमिकल व्यवसायात होतो. मी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे अधिकृत मान्यता नसलेल्या इस्त्रायलला भारतीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली तेव्हापासून ते अधिकृत मान्यता मिळेपर्यंत माझे कार्यालयच इस्त्रायलचे भारतातील कार्यालय होते, असेही कुलकर्णी म्हणाले.

संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी ब्राह्मणांच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये भारतातील १६ शहरे व दुबईमध्ये कार्यरत बीबीएनजीबाबत माहिती दिली. मधुरा कुंभेजकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे, प्रमोद पुराणिक, महेश देशपांडे यांच्या समवेत अनेक व्यावसायिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय पुलावर कसरत

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या आयटीआय पुलावर रोजच वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यातच सध्या येथे पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या आयटीआय पुलाला समांतर पुलाची उभारणी होणार तरी केव्हा, असा सवाल स्थानिकांसह कामगारांनी उपस्थित केला आहे.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या खुटवडनगर येथील आयटीआय पुलावर रोजच वाहतूक कोंडी होत असते. त्यातच पुलावर पावसाचे पाणी साचत असल्याने रात्रपाळीवरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात एकमत होत नसल्याने समांतर पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. विशेष म्हणजे दररोज हजारो वाहने या पुलावर जे-जा करीत असल्याने भविष्यात अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही कामगारांनी उपस्थित केला आहे. या पुलावर सततच्या कोंडीने नागरिक त्रस्त असतानाच पावसाच्या पाण्याने पुलाचा एका बाजूकडील भाग ढासळल्याने अपघातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका व एमआयडीसीने तत्काळ आयटीआय पुलाला समांतर पुलाची उभारणी करावी, अशी मागणी कामगार, तसेच वाहनचालकांनी केली आहे.

दरम्यान, प्रभाग २६ च्या नगरसेविका अलका आहिरे यांनी सिडकोकडे जाणाऱ्या आयटीआय पुलाला समांतर पुलाची उभारणी करावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना त्यांनी पत्रदेखील दिले आहे. महापालिका आयुक्तांनी कामगारांची मागणी लक्षात घेऊन आयटीआय पुलाला समांतर पूल उभारावा, अशी अपेक्षा कामगारांसह नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

--

एकमताअभावी रखडला पूल

येथे समांतर पूल बांधण्यासंदर्भात महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात एकमत होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आयटीआय पूल या अत्यंत वर्दळीच्या भागात समांतर पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. परिमाणी सिडको, सातपूर परिसरातील रहिवाशांसह येतून दररोज वावर असणाऱ्या हजारो कामगारांना गैरसोय सहन करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. येथील पुलासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीबाबत तक्रारींचा सूर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील प्रत्येक प्रभागात घंटागाड्या अनियमितपणे येत असून, नव्या निकषाप्रमाणे एकाही घंटागाडीत ओला व सुका कचरा टाकण्यासाठीची स्वतंत्र व्यवस्था ठेकेदाराने केली नसल्याच्या कारणावरून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, असा ठराव सिडको प्रभाग सभेत मंगळवारी करण्यात आला. सर्व सदस्यांनी केलेल हा ठराव आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे प्रभाग सभापती सुदाम डेमसे यांनी सांगितले.

सभापती डेमसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रभाग सभेत सुरुवातीलाच नगरसेवक श्याम साबळे यांनी गेल्या आठवड्यात रस्त्यात शॉक लागून गायीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नक्की जबाबदार कोण, याची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पवननगरचा रस्ता किती दिवस बंद राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला. या रस्त्याच्या कामावेळी अनेकदा पाण्याच्या पाइपलाइन फुटल्या होत्या. त्यामुळे येथे केलेल्या कामाची नुकसानभरपाई ठेकेदाराकडून वसूल करण्यात आली की नाही, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पवननगर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या बिलातून ती रक्कम वजा करावी, अशी सूचना करण्याबरोबरच प्रभागात छोटी घंटागाडी का दिली जात नाही, असा सवाल करून आरोग्य अधिकारी कायम उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोपही शहाणे यांनी केला. यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई सुरू असल्याचे सांगितले.

नगरसेवक तिदमे यांनी हाच विषय पकडून केवळ भोंगे लावून नागरिकांना आव्हान केले जात असले, तरी घंटागाड्यांत मात्र कचरा वेगळा टाकण्याची सोयच नसल्याचे निदर्शनास आणून दिले. घंटागाडी ठेकेदार हा ओला व सुका कचरा वेगळा का करीत नाही, असा सवाल करून संबंधित ठेकेदाराचा ठेकाच रद्द करण्याची मागणी तिदमे यांनी केली. यावेळी ठेकेदार एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे तिदमे यांनी सांगताच नगरसेवक शहाणे यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेऊ नका, आपण कारवाईसाठी ठराव करू, असे सांगितले.

नगरसेविका कल्पना पांडे यांनी कालिका पार्क येथील रो-हाउसमध्‍ये पावसाचे पाणी शिरून नागरिकांचे नुकसान होत असून, येथील पाणी काढण्याबरोबरच येथील रस्त्याचे काम करावे, अशी सूचना केली. शिवाजी चौकातील भाजीमार्केटचा प्रश्न उपस्थित करून येथील अर्धवट असलेल्या इमारतीच्या बिल्डर्सवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी विभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित बिल्डर भेटत नसून, नगररचना विभागाच्या वीतने काही कारवाई करता येते का याबाबत विचार सुरू असल्याचे सांगून एक महिन्यात कारवाई होईल, असे सांगितले.

नगरसेवक सुधाकर बडगुजर म्हणाले, की पवननगर येथे गायीचा मृत्यू झाला असून, ही घटना महापालिकेमुळे झाल्याचा आरोप वीज वितरण कंपनीने करणे चुकीचे आहे. घंटागाडी ठेक्याबाबतही विचार झाला पाहिजे, तसेच घंटागाडीच्या प्रश्नाबाबत सिडकोतील नगरसेवकांनी स्थायी समितीत आवाज उठविला पाहिजे.

सभेच्या अखेरीस सभापती डेमसे यांनी घंटागाडी ठेकेदारावर कारवाई करण्याबाबतचा ठराव तयार करण्यात आला असून, तो आयुक्तांकडे पाठवून कारवाई करण्याची मागणी करण्‍यात येणार आहे. सिडकोत चोवीस सदस्य असून, किमान चोवीस गाड्या या भागासाठी दिल्याच पाहिजेत, असे सांगून सदस्यांची कामे तातडीने करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.


यांनीही मांडल्या समस्या

यावेळी नगरसेविका प्रतिभा पवार, पुष्पा आव्हाड, किरण गामणे, संगीता जाधव, भाग्यश्री ढोमसे व कावेरी घुगे यांच्यासह नगरसेवक नीलेश ठाकरे, राकेश दोंदे, चंद्रकांत खाडे, भगवान दाेंदे, डी. जी. सूर्यवंशी यांनी आपापल्या प्रभागातील घंटागाड्यांचा प्रश्न, पथदीपांची दुरवस्था, उंटवाडी येथील स्मशानभूमीत सुरू असलेले डंपिंग व पाथर्डी फाटा येथील पाडण्यात आलेल्या सुलभ शैाचालयाबाबत, तसेच नाल्यालगत संरक्षक भिंत उभारण्याबाबतचे प्रश्न उपस्‍थित करून विविध सूचना केल्या.

आयुक्त दौऱ्यावरून नाराजी

महापालिका आयुक्तांनी सिडकोत दौरा करून पाहणी केली होती. त्यावेळी काही नगरसेवकांना याबाबत माहिती न मिळाल्याने सुरुवातीलाच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. विभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत यापुढे लक्ष दिले पाहिजे, तसेच नव्याने येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख नगरसेवकांना करून दिली पाहिजे, अशी सूचना करण्यात आली.

नगरसेवक मात्र त्रस्त!

अनेक वर्षे शासकीय सेवेत राहिलेले नगरसेवक चंद्रकांत खाडे यांनी ‘अधिकारी मस्त, नगरसेवक त्रस्त’ अशी सिडकोतील नगरसेवकांची अवस्था असल्याचे सांगितले. नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सभागृहात अधिकारी तेल लावलेले पहिलवान आहेत तर आम्ही सर्व नगरसेवक बाहुबली आहोत अशी कोटी केल्याने तणावाच्या वातावरणातही सभागृहात हशा पिकला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अडचणी आल्या तरी शिक्षणाची जिद्द सोडू नका’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘सर्वप्रथम मला ‘मटा’ला धन्यवाद द्यावेसे वाटतात, की त्यांनी हे मदतकार्य उभारले. ज्यांना शिक्षणाची तळमळ आहे, त्यांना पैशांची कोणतीही अडचण येत नाही. ते देणारे असतातच. मात्र, या विद्यार्थ्यांनी शिक्षणाची जिद्द सोडू नये. शिक्षणाशिवाय विद्यार्थी जणू अंधच. त्यामुळे जे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यासाठी परमेश्वर मार्ग मोकळे करतो हे नेहमी लक्षात ठेवावे’, हे शब्द आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप राठी यांचे.

अत्यंत भरघोस अशी मदत त्यांनी या दहा विद्यार्थ्यांसाठी केली आहे. ते म्हणतात, ‘या प्रत्येक मुलात गट्स आहेत, कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे; परंतु पैसा नाही. तो आपल्याकडे आहे ना! आपल्याला या मुलांसाठी वेळ काढता येत नसेल तर अशी मदत करणे योग्य असल्याचे वाटले व मदत केली.’

पुण्यातील एक सद््गृहस्थ नाशिकला त्यांच्या भगिनीकडे थांबले असता त्यांच्या वाचनात ‘मटा हेल्पलाइन’ची बातमी येते काय अन् ते कापऱ्या पावलांनी ‘मटा’च्या कार्यालयात येत मदतीचा धनादेश देतात. त्याच्यासोबत एक छोटेखानी पत्र असते. त्यात लिहिलेले आहे, की ‘दीपाली, मलाही एक नात आहे. तिलाही ९० टक्के मिळालेय. मी तिचे अॅडमिशन पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात करून दिलेय. तुलाही ९० टक्के आहे; पण शिकण्यासारखी तुझी परिस्थिती नाही हे वाचून मनाला लागलं. तुझ्यासाठी मदत पाठवत आहे ती स्वीकार.’ फ्लाइंग ऑफिसर म्हणून नुकतेच रिटायर्ड झालेले हे गृहस्थ तसे पुण्याचे आहेत, परंतु हेल्पलाइनच्या स्टोरीचा अंक वाचण्यात आला व त्यांनी त्वरित ‘मटा’चे कार्यालय जवळ केले. ते लिहितात, ‘दीपाली वरघडे हिच्याविषयीचा वृत्तान्त वाचून मनाला यातना झाल्या. जी मुलगी इतके गुण मिळवू शकते तिला मदत करण्यात मला आनंदच होत आहे. मला निवृत्तिवेतन मिळते. त्यातूनच मी हे पैसे देत आहे. मी लवकरच माझ्या मुलाकडे शिलाँगला जाणार आहे. आम्ही जग पाहिले आहे व तेच सुंदर जग या मुलांनी पाहावे, अशी माझी अपेक्षा आहे. मी स्वत: प्रचंड गरिबीतून वर आलो आहे. त्यामुळे गरिबीचे दु:ख मी जाणतो.’

सु. गो. काटे, मालेगाव यांची कहाणी जरा निराळी आहे. ते म्हणतात, ‘विद्यार्थ्यांशी माझी नेहमीच जवळीक होती; परंतु मला त्यांना मदत करता यावी इतकी ती नव्हती. आता रिटायर्डमेंटनंतरही आपण विद्यार्थ्यांसाठी काही करू शकतो का, या भावनेतून आम्ही ही मदत करीत आहोत. त्यासाठी ‘मटा’ माध्यम झाल्याचा आनंदही असल्याचं सांगत आपण केलेली मदत निश्चितपणाने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘प्रचंड पाऊस सुरू होता, परंतु ‘आदित्य’चे वाचले अन् असे वाटले, की लगेचच जाऊन या मुलांना मदत करावी. या मुलांना किती समज आहे!’

हेल्पलाइनच्या मुलांना मदत करणाऱ्या प्रत्येकाची एक कहाणी आहे. या मुलांना मदत करीत असताना त्यांचे बालपण त्यांना दिसते. ‘मटा’त आवाहन केल्यावर दहाही मुलांसाठी मदत सुरू आहे. या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड पैसा उभा करावा लागणार आहे. त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करू इच्छिणारेही आहेत. मात्र, ‘मटा हेल्पलाइन’ हा जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातूनच ओढला जावा, अशी अपेक्षा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा म्हणून वाचकांच्या सत्प्रवृत्तीला साद घालत हा ‘मटा हेल्पलाइन’चा उपक्रम हाती घेतला. या मुलांची कहाणी ‘मटा’त प्रसिद्ध झाली आहेच, त्यांच्या नावाने क्रॉस्ड चेक काढून ड्रॉपबॉक्समध्ये जमा करावेत. चेकच्या मागे पाठवणाऱ्याचे नाव आणि फोन नंबर लिहावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images