Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाण्याला ‘मोकळी’ वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गंगापूररोड

महापालिकेने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी शहरात मुख्य रस्त्यांसह गरजेच्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून स्वतंत्र पाइपलाइन टाकलेल्या आहेत. परंतु, या पाइपलाइनमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी व्यवस्थाच नसल्याने रस्त्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशी व्यवस्था करणार तरी कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक स्रोतही नाहिसे झालेले आहेत. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जवाहलाल नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत तत्कालीन बहुतांश नगरसेवकांनी आपल्या प्रभागात पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी पाइपलाइन टाकण्याची मागणी केली होती. महापालिकेनेदेखील मुख्य रस्त्यांवर, तसेच गरजेच्या ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पाइपलाइन टाकल्या होत्या. परंतु, या पाइपलाइनमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्थातच केली गेली नसल्याने पाणी रहिवासी भागात अनेकांच्या घरात पाणी शिरत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यासाठीचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप होत आहे.

--

तातडीने करावी उपाययोजना

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी रस्त्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने टाकलेल्या पाइपलाइनमध्ये पाणी जाण्याची व्यवस्थाच नसल्याने रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळे अशा पावसाळी पाइपलाइनमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था महापालिकेने तातडीने करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

--

महापालिकेने टाकलेल्या पावसाळी पाइपलाइनमध्ये पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्थाच केली नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या पाइपलाइनमध्ये वाहून जाण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.

-नितीन बोरसे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आडगाव पोस्ट ऑफिस वाऱ्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव परिसरात गेल्या काही वर्षांत शाळा, कॉलेजेस, प्रशासकीय कार्यालये, नववसाहतींमुळे आडगाव शिवाराची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. पण, येथे छोट्या गावाचा विचार करून उभारण्यात आलेले पोस्ट ऑफिस मात्र वर्षानुवर्षे तसेच असून, मूलभूत सोयी-सुविधांची तेथे वानवा असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात ‘मटा’ने गतवर्षी वृत्त प्रसिद्ध केल्यावर आडगाव पोस्ट ऑफिससाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, वाढत्या लोकसंख्येला अनुसरून सर्व सुविधांयुक्त पोस्ट ऑफिस कधी सुरू होणार, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

आडगाव परिसराचा जसा विकास होत गेला, तसा पोस्ट ऑफिसचा झालेला दिसत नाही. अजूनही येथील पोस्ट ऑफिसला हक्काची जागा नाही. त्यामुळे खासगी जागेतून कारभार चालविला जात आहे. ही जागा अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांनादेखील बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे जमा झालेले टपाल वेगळे करणे, कार्यालयात आलेल्या लोकांचे टपाल घेणे यांसारख्या कामांसंदर्भात अडचणी निर्माण होत आहेत.

मुंबई-आग्रा महामार्ग विस्तारीकरणामुळे नवीन वसाहतींचे आणि कार्यालायचे अंतर खूप वाढले आहे. त्यामुळे स्मार्ट होणाऱ्या नाशिक शहराबरोबर आडगावचे पोस्ट ऑफिस स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

--

लोकसंख्या वाढूनही दुर्लक्ष

पूर्वी आडगाव शिवाराच्या तीन हजार लोकसंख्येचा विचार करून आडगावात ऑफिस सुरू केले होते. पण, आज आडगाव शिवाराची लोकसंख्या ६०-७० हजारांपेक्षा जास्त आहे. शिवाय या परिसरात शैक्षणिक संस्थादेखील मोठ्याप्रमाणात विकसित झालेल्या असून, ग्रामीण पोलिस मुख्यालय, समाजकल्याणचे एक हजार मुलांचे वसतिगृह, तसेच अनेक प्रशासकीय कार्यालये या परिसरात आहेत. त्याचप्रमाणे कोणार्कनगर १, २, ३, श्रीरामनगर, शरयू पार्क, सागर व्हिलेज, समर्थनगर, कर्मयोगीनगर, जत्रा हॉटेल परिसर अशा नवीन वसाहतीही आहेत. सोबतच आडगाव गावठाण व मळे परिसर, ट्रक टर्मिनस एवढ्या मोठ्या परिसरासाठी येथे पोस्टाचे एकमेव ब्रँच ऑफिस आहे.

--

कर्मचारी संख्या अपुरी

आडगाव शिवारात रहिवासी भाग वाढत असतानाही पोस्ट कार्यालय व कर्मचारी पूर्वीएवढेच आहेत. पोस्टात कर्मचारी, अधिकारी व पोस्टमनची संख्या कमी असल्याने अनेकदा महत्त्वाचे दस्तावेज वेळेवर पोहोचत नाहीत, त्यामुळे गैरसोय सहन करावी लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात आडगाव पोस्ट ऑफिसमध्ये विचारणा केली असता एक वाजेपर्यंत सर्व नोंदणी हाताने केली जाते. आमच्याकडे कम्प्युटरदेखील नाही. आज कार्यालयात चार-चार कर्मचारी आहेत, त्यांची नेमणूकदेखील फक्त चार तासांची आहे, तरी बऱ्याचदा ते जास्त वेळ काम करतात. एवढ्या मोठ्या परिसराचा विचार करता सर्व्हिस ऑफिस होणे गरजेचे आहे किंवा आडगाव शिवाराचा काही भाग पंचवटीला जोडणे गरजेचे आहे, तेव्हाच कामात गतिमानता येईल, असे संबंधितांनी सांगितले.

---

आडगाव परिसराचा वाढता विस्तार पाहता आडगाव पोस्ट ऑफिस कार्यालय छोटे पडत आहे. त्यामुळे परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव पाठविलेला असून, त्यासाठी पाठपुरावा करू.

-सुरेश खेताडे, नगरसेवक

--

आडगाव परिसराची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व सुविधा नसल्याने बऱ्याचदा पंचवटी, सीबीएस येथे जावे लागते. त्यामुळे आडगाव परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून नवीन प्रशस्त कार्यलय होणे गरजेचे आहे.

-रामभाऊ जाधव, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा जोर ओसरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले काही दिवस धुव्वांधार बरसणाऱ्या पावसाचा जोर रविवारी ओसरला. जिल्ह्यात दिवसभरात केवळ ९२.३ मिलीमीटर पाऊस झाला असून, निम्म्या तालुक्यांमध्ये काल पावसाने दांडी मारली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील न‌िम्म्या तालुक्यांवर वरुणराजाने कृपादृष्टी कायम ठेवली आहे. शक्यतो रात्रीच पावसाचे जोरदार आगमन होत असल्याने जनजीवनावरही यंदा फारसा परिणाम झालेला नाही. या पावसामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढण्यासही मोठी मदत झाली आहे. जिल्ह्यात चालू हंगामात आतापर्यंत सात हजार ४९५.३ मिल‌िमीटर एवढा पाऊस‌ झाला आहे. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी आठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ५३२.२ मिल‌िमीटर पावसाची नोंद झाली. पेठमध्ये १६२ मिमी, तर इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये अनुक्रमे ७८ आणि ६६ मिमी पाऊस झाला.

सकाळनंतर पावसाचा जोर अधिकच ओसरला. पावसाच्या हलक्या सरींनी जिल्ह्यात हजेरी लावली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांमध्ये जिल्ह्यात ९२.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये अवघा १० आणि आठ मिमी पाऊस पडला आहे. दिवसभरातील सर्वाधिक २५.४ मिमी पाऊस‌ सुरगाणा तालुक्यात झाला असून पेठ तालुक्यात १९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पाच तालुके पूर्णत: कोरडे

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा यांसारख्या तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस असताना जिल्ह्यातील काही तालुके अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रविवारी दिवसभरात चांदवड, मालेगाव, बागलाण, देवळा आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये पावसाचा थेंबही पडला नाही. येवला आणि सिन्नर तालुक्यांमध्ये अवघा एक मिल‌िमीटर पाऊस पडला आहे. निफाड, नाशिक आणि कळवण या तालुक्यांमध्येही पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

रविवारी सायंकाळी पाच पर्यंतचा पाऊस

तालुका पाऊस (मिमी)

सुरगाणा २५.४

पेठ १९.२

इगतपुरी १०

दिंडोरी ९

त्र्यंबकेश्वर ८

कळवण ८

नाशिक ५.५

निफाड ५.२

येवला १

सिन्नर १

देवळा ०

नांदगाव ०

चांदवड ०

मालेगाव ०

बागलाण ०

एकूण ९२.३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावली, कडवा धरणे भरणार

$
0
0

इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या ५० टक्के पाऊस

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. तर भावली व कडवा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, सततच्या पावसामुळे या तालुक्यात रविवारअखेर एकूण सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाल्याची माहिती आकडेवारी वरुण स्पष्ट होते.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस या तालुक्यात होत असल्याने या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मराठवाडा या परिसराकडे अर्थात जायकवाडीकडे करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून हजारो क्युसेस पाणी दारणा धरणातून विसर्ग होत आहे. दारणा धरणात भाम, वाकी, भावली या नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात संचित होत असल्याने आजमितीस ७६ टक्के साठवण करून उर्वरित पाणी प्रशासनाच्या आदेशानुसार विसर्ग करण्यात येत आहे.

या तालुक्यातील दारणा धरणाबरोबरच भावली, कडवा, वैतरणा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. तर मुकणे धरणातही समाधानकारक साठा निर्माण झाला आहे. येत्या एक-दोन दिवसांत भावली धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. इगतपुरी तालुक्यात पाऊस गेल्या चार दिवसांपासून शंभर मिलीमीटरांवर आकडे गाठत असून, रविवारीही चोवीस तासात ९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण १७१७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

शेतीकामाला सुरुवात

दिंडोरी : दिंडोरी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरूच असून धरणसाठ्यात वाढ झाली आहे. पश्चिम भागात भाताची अावणी तर पूर्व भागात टोमॅटोसह इतर भाजीपाल्याच्या लागवड सुरू आहे. भात, नागली, वरई या पिकांना जीवदान मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन करारानंतरच निवडणूक!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील वेतनवाढ कराराची बोलणी सुरू असल्याने महिंद्रा एम्प्लॉइज युनियनच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच एकमताने मुदतवाढ देण्यात आली आहे. वेतनवाढीचा करार होईपर्यंत आहे तीच कमिटी कायम ठेवण्याचा ठराव कामगारांनी दादासाहेब गायकवाड सभागृहातील वार्षिक सभेत मंजूर केला. विरोधकांनी मात्र नियमानुसार एम्प्लॉइज युनियनची त्रैवार्षिक निवडणूक घेणे गरजेचे होते, असे सांगितले. सत्ताधाऱ्यांनी वेळेत वेतनवाढीचा करार केला नसून, कामगारांना वेठीस धरल्याचाही आरोप केला. सभेत काही वेळा गोंधळही झाला. परंतु, तो लगेचच निवळला.

युनियनचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ही वार्षिक सभा झाली. महिंद्राच्या कामगारांनी, वेतनवाढीचा करार करा नंतरच त्रैवार्षिक निवडणूक घ्या, असा पवित्रा घेतल्याचे अनेकांनी स्वागत केले. विरोधकांनी मात्र त्यावर टीका केली.

दरम्यान, वेतनवाढ करार ४ एप्रिल २०१७ रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर महिंद्रा व्यवस्थापन व युनियन यांच्यात १० ते १२ बैठकाही या करारासाठी झाल्या. परंतु, त्यात सकारात्मक मार्ग निघू शकला नाही. त्यातच येत्या १७ जुलै रोजी युनियनचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यानंतर १८ जुलै रोजी निवडणूक घ्यावी लागणार होती. त्यासाठी युनियनच्या वार्षिक सभेत अध्यक्ष चव्हाण यांनी वेतनवाढीचा करार करायचा, की निवडणूक घ्यायची असा विषय कामगारांसमोर मांडला. बहुतांश कामगारांनी अगोदर वेतनवाढीचा करार करा, त्यानंतर निवडणूक घ्या, अशी मागणी केली. त्यामुळे वेतनवाढीचा करार होईपर्यंत युनियनच्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा ठराव संमत करण्यात आला. मुदतवाढ दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी वेळेत वेतनवाढीचा करार न केल्यास वाद होण्याची शक्यता असल्याचे विरोधकांनी सांगितले. सभेला युनियनचे सरचिटणीस सोपान शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव परशुराम कानकेकर, सहसचिव लॉरेन्स भंडारी, खजिनदार ज्ञानेश्वर पाटील, सदस्य सुनील अवसरकर, डी. के. भोई यांच्यासह हजारो कामगार उपस्थित होते.

--

हजारो कामगारांनी एकमताने वेतनवाढीच्या करारासाठी युनियनच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना एकमताने मुदतवाढ दिली आहे. पुढील काही महिन्यात निश्चितच चांगली वेतनवाढ देण्याचा प्रयत्न राहील.

-योगेश चव्हाण, अध्यक्ष, महिंद्रा एम्प्लॉइज युनियन

--

कायद्यानुसार दिलेल्या मुदतीत निवडणूक होणे गरजेचे आहे. कमिटीला मुदतवाढ मिळाल्याने त्यांनी तत्काळ वेतनवाढ करार करणे महत्त्वाचे ठरेल. अन्यथा त्यांना कामगारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

-शिरीष भावसार, माजी अध्यक्ष, महिंद्रा एम्प्लॉइज युनियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मविप्र’तील घराणेशाही संपवा

$
0
0

विरोधक आक्रमक; निवडणुकीचा बिगूल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या सत्ताधाऱ्यांच्या चाललेल्या स्वैर कारभारामुळे एकाच कुटुंबाच्या दावणीला मराठा विद्या प्रसारक समाज ही शतकापासून मोठे शैक्षणिक योगदान देणारी संस्था बांधली गेली आहे. सद्यःस्थितीत १९७५सारखे आणीबाणीचे वातावरण संस्थेत आहे. येथे सुरू असलेली दडपशाही, भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपविण्यासाठी सभासदांनी साथ द्यावी, असे आवाहन मविप्र सभासदांच्या सहविचार सभेत संस्थेचे विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे आणि विद्यमान अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे यांनी केले.

मविप्रचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसाद मंगल कार्यालयात विरोधी गटाच्या वतीने सभासदांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरे व सोनवणे यांनी उपस्थित सभासदांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद नामदेव ठाकरे होते. समवेत अॅड. नितीन ठाकरे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, दिलीप मोरे, बी. बी. मोगल, बाळासाहेब कोल्हे, डॉ. विलास बच्छाव, मोहन पिंगळे, अशोक चव्हाण, अशोक बच्छाव, विश्राम निकम, नारायण कोर आदी उपस्थित होते.

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी शिक्षणसंस्था असलेल्या मराठा विद्याप्रसारक संस्‍थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्र‌ियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेतील नाराज सभासदांच्या गटाने निवडणुकीदरम्यान दिशा ठरविण्यासाठी सहविचार सभेचे रविवारी आयोजन केले होते. यावेळी नाराज सभासदांमधून सत्ताधाऱ्यांवर घणाणाती आरोप करण्यात आले.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे म्हणाले, ‘संस्थेचे खरे हित जोपासणाऱ्या सभासदांना सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने हेतूपुरस्सर डावलले जाते. एकाच कुटुंबाच्या दावणीला ही संस्था बांधली जात असून, परिणामी १९७५ सारखी आणीबाणी संस्थेत लादली गेली आहे. येथे केवळ भ्रष्टाचाराला थारा दिला जात असून, खुनशी पद्धतीचे राजकारण केले जाते. मुख्य धोरणांपासून संस्था भरकटत आहे. हा धोका लक्षात घेऊन सभासदांनी निवडणुकीत अत्यंत सावध राहून संस्थेच्या हिताचा विचार करावा, असे आवाहन सोनवणे यांनी केले.

मविप्रचे विद्यमान सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे म्हणाले, ‘संस्थेचा कारभार पारदर्शी राह‌िलेला नाही. संस्थेत चालणाऱ्या चुकीच्या मुद्द्यांवर बोलू पाहणाऱ्या लोकांना हुकुमशाहीने येथे दडपले जाते. संस्थेचे यश आणि कारभार हा व्यक्तिकेंद्रीत करण्याचा प्रयत्न येथे सुरू असून गेल्या काही महिन्यांत सत्ताधाऱ्यांना मिळालेले पुरस्कार हे विकत घेतले गेले आहेत. हे केवळ व्यक्त‌िगत स्वार्थातून सुरू आहे’, असा घणाणाती आरोप अ‍ॅड. ठाकरे यांनी केला.


वेळेअगोदर निवडणूक?

संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अद्याप दोन महिन्यांचा अवधी शिल्लक असताना इतक्या लवकर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची घाई सत्ताधाऱ्यांनी प्रतिस्पर्धी बेसावध रहावेत, याचसाठी केली असल्याची टीका यावेळी डॉ. विलास बच्छाव यांनी केली. डॉ. बच्छाव यांनी संस्थांतर्गत कारभारावर बोट ठेवत सभासदांना मिळणारी अयोग्य वागणूक, सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही आदी मुद्द्यांकडे अंगुलीनिर्देश केला.

१३ ऑगस्टला मतदान

मविप्रच्या सन २०१७ ते २०२२ या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी संस्थेच्या घटनेनुसार निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली असून, १३ ऑगस्ट रोजी मतदान आणि १४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचार प्रणालीव्दारे व्यूहरचनेस सुरुवात झाली आहे. या निवडणूकीसाठी करण्यात आलेल्या रचनेत निवडणूक मंडळाच्या अध्यक्षस्थानी अॅड. भास्करराव चौरे, सचिवपदी डॉ. डी. डी. काजळे, सदस्य अॅड. बाकेराव बस्ते आणि सदस्य अॅड. रामदास खांदवे यांचा समावेश आहे. संस्थेचे १० हजार १७६ सभासद आहेत. निवडणूक मंडळाच्या झालेल्या बैठकीत मतदार याद्या अंतीम करण्यासंदर्भात चर्चा झाली.

निवडणूक कार्यक्रम :

_ उमेदवारी अर्ज वाटप : २१ ते २७ जुलै

_ अर्ज स्वीकृती : २३ ते २७ जुलै

_ अर्जांची छाननी : २८ जुलै

_ लवादाकडे अपिलाची मुदत : २८ जुलै ते २९ जुलै

_ लवादाच्या निर्णयाची मुदत : ३१ जुलै (दुपारी ३ वाजेपर्यंत )

_ उमेदवारी माघारी अंत‌िम तारीख : ३ ऑगस्ट

_ अंतिम उमेदवार यादी प्रसिध्दी : ३ ऑगस्ट

_ निवडणूक चिन्ह वाटप : ३ ऑगस्ट

_ मतदान : १३ ऑगस्ट

_ मतमोजणी : १४ ऑगस्ट

_ निकाल : १४ ऑगस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रामाणिक रिक्षाचालकांची दखल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांना मदत करणाऱ्या रिक्षाचालकांना पोलिसांकडून बक्षीस दिले जाणार आहे. एवढेच नाही तर अशा रिक्षाचालकांची यादी बनवून त्यांचे मोबाइल क्रमांक पोलिस आपल्या वेबसाइटवर टाकणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

शहरात १५ ते २० हजार रिक्षा असून, अनेकदा रिक्षाचालकांच्या अरेरावीची ओरड होत असते. मात्र, यात काही चांगले रिक्षाचालकदेखील आहेत. अगदी प्रवाशांचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने रिक्षाचालकांनी परत केले आहेत. काही बेशिस्त तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सहव्यावसायिकांमुळे प्रामाणिक रिक्षाचालकांना त्रास होतो. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अभिनव योजना पुढे आणली असून, प्रामाणिक रिक्षाचालकांचा यापुढे सत्कार करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले. याबाबत सिंगल म्हणाले की, शहरातील प्रामाणिक, ग्राहकाभिमुख सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांची यादी बनवली जाणार आहे. या यादीत रिक्षाचालकाचा क्रमांक आणि राहण्याच्या ठिकाणाचा देखील उल्लेख असणार आहे. ही यादी पोलिस आपल्या वेबसाइटवर प्रसिध्द करणार आहेत. रात्री-अपरात्री रिक्षाची आवश्यकता असल्यास नागरिक थेट रिक्षाचालकाशी संपर्क साधू शकतील. यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांच्या रोजगारात वाढ होऊ शकते. तसेच नागरिकांच्या मनातदेखील सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकेल. ही अभिनव संकल्पना लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा सिंगल यांनी व्यक्त केली.

कारवाई सुरूच राहणार

बेशिस्त वाहनचालकांविरोधात सुरू झालेली कारवाई यापुढे कायम राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. संततधार पावसात कारवाई सुरू राहिल्यास वाहतुकीलाच अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाऊस असल्यास कारवाई काहीशी थंडावते. शनिवारी शहर वाहतूक पोलिसांनी आरकेसह कॉलेजरोड परिसरात दुचाकीचालकांसह रिक्षा व्यावसायिकांची कसून तपासणी केली. ए, बी आणि सी पॉइंट ठरवून कारवाई केली जात असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले.

टोईंगसाठी लवकरच नवीन यंत्रणा

यापूर्वी दिलेल्या वाहन टोईंगच्या ठेक्याची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी नवीन अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, ही आधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर रस्त्यावर पार्क होणाऱ्या चारचाकी वाहनांवर जलदगतीने कारवाई होणे शक्य आहे. दुचाकी उचलण्याची प्रक्रिया देखील जलद आणि सुकर होणार असून, यामुळे शहरातील रस्त्यांवर पार्क होणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना चाप बसणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाव आवारात सांडपाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गटारींतील सांडपाणी चक्क महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या बाथरूममध्ये शिरले आहे. परिणामी नागरिकांना शॉवर न घेताच टँकमध्ये उतरावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अशी परिस्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या पावसाचा फटका सखल भागात असलेल्या सोसायट्यांना बसला. शिंगाडा तलाव, सिडको, सातपूर आदी ठिकाणी असलेल्या तळमजल्यांवरील घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. अशीच परिस्थिती महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव परिसरातही झाली. या भागातून वाहणाऱ्या गटारींचे पाणी टॅँकच्या बाथरूममध्ये पसरल्याने स्वीमिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना शॉवर न घेताच टॅँकमध्ये उतरावे लागत आहे. दोन दिवस जलतरण तलावाच्या गेटपासूनच तळे साचले होते. प्रवेश करताना वाट कशी काढायची, असा संभ्रम नागरिकांमध्ये होता. तिकीट काउंटरवर तिकीट घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत होती. जलतरण तलावाच्या आत प्रवेश करताच तेथेही मोठ्या प्रमाणात तळे साचले होते. बाथरूममध्ये घोट्याच्या वर पाणी असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली होती. आणखी जास्त पाऊस झाला असता, तर हे पाणी टॅँकमध्ये शिरण्याची शक्यता होती. सुदैवाने तसे झाले नाही. या ठिकाणी पोहोण्यासाठी वर्षाला साडेचार हजार रुपये फी आकारली जाते, त्या तुलनेत पुरेशा सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. अनेक ठिकाणी शॉवर तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी नळ नाही, अशा अवस्थेत नागरिकांना स्वीमिंगला जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

--

दुरुस्तीवेळी दुर्लक्ष का?

मध्यंतरी तरणतलाव दुरुस्तीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी गटारीची दुरुस्ती का केली नाही, असा सवाल पोहोण्यासाठी येणारे नागरिक विचारत होते. त्यावेळी टँकची दुरुस्ती केली गेली. मात्र, अशा प्रकारची कामे ठेवण्यात आली. महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या तरणतलावाचेच असे हाल होत असतील, तर नागरिकांच्या समस्यांची चर्चाच करायला नको, अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली.

--

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने तरणतलाव परिसराला गटारगंगेचे स्वरूप आले होते. या ठिकाणची दुरुस्ती न केल्याने व पावसाळापूर्व कामे न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. येथे तातडीने दुरुस्ती करावी.

-डॉ. अजिंक्य वाघ, नागरिक

--

दोन दिवसांपसून गोल्फ क्लबचे पाणी तरणतलाव परिसरात येत होते. परंतु, तातडीने ते थांबविण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. आवारात असलेले सर्व ड्रेनेज साफ करण्यात येत आहेत.

-हरी सोनकांबळे, मुख्य व्यवस्थापक, तरणतलाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाईच्या पुढाकाराने अवनखेड झाले स्मार्ट

$
0
0

विभागीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार जाहीर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डिजिटल अंगणवाडी, सीसीटीव्ही, ऑनलाइन दाखले वितरण, वायफाय, भव्य सभागृह, बांधलेला नदीघाट, ग्रामपंचायत इमारतीतील अभ्यागत कक्ष, सोलर पथदीप, वैकुंठ रथ यासारख्या सुविधा असणारे दिंडेारी तालुक्यातील अवनखेड खऱ्या अर्थाने स्मार्ट गाव ठरले आहे. कादवा नदीच्या काठावर वसलेल्या साधारण अठ्ठावीसशे लोकसंख्येच्या या गावात ४१४ कुटुंब असून, प्रत्येकाकडे वैयक्तिक शौचालय बांधलेले आहे. ग्रामपंचायतीच्या सुंदर इमारतीसमोर तेवढेच उत्तम प्रकारचे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. सीएसआरमधूनदेखील लाभार्थींना वैयक्तिक शौचालये बांधून देण्यात आली आहेत. लोकसहभागामुळे गावात शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची सुंदर इमारत उभी राहत आहे.

या गावातील तरुण सरपंच नरेंद्र जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराने गावाचा कायापालट झाला आहे. नागरिकांच्या मानसिकतेत झालेले परिवर्तन आणि गावाच्या विकासात वाढत्या लोकसहभागामुळे हे गाव संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्यस्तरावर पोहोचले आहे. या अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार अवनखेडला जाहीर झाला आहे. गाव अस्वच्छता, गावातील अतिक्रमण आणि व्यसनाधिनतेने त्रस्त असताना स्वामी पद्मानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने गावात आमुलाग्र बदल झाला. त्यांनी गावाच्या विकासात प्रसंगी श्रमदान करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, गावाला पावित्र्याचा आणि मांगल्याचा मार्ग दाखविला.

नैसर्गिक उतारानुसार गावाच्या चारही बाजूस शोषखड्डे बनविण्यात येऊन त्यात गटारीचे पाणी जिरवण्यात आले आहे. स्थिरीकरण तळे बनविण्याचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी सुला वाईनतर्फे सीएसआर निधीअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडीचे वाटप करण्यात आले आहे. घंटागाडीद्वारे बुधवार आणि रविवारी कचरा संकलन करण्यात येते. कचरा साठवणुकीसाठी कंपोस्ट टाकी बनविण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी कचराकुंड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गाव स्वच्छतेसाठी शाळेतील विद्यार्थी आणि महिलांचा सहभागही विशेष असाच आहे. प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन देण्यात आले असून, जलशुद्धीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील वस्तीवर दुहेरी सोलर पंप वापरून पाणीपुरवठ्याची सुविधा करण्यात आली आहे. या सर्व सुविधा असल्याने अवनखेड स्मार्ट गाव ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू विक्रीविरोधात एल्गार

$
0
0

टीम मटा

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटरपर्यंत दारू विक्रीला बंदी केल्यानंतर शहर परिसरात अनेक ठिकाणी रहिवासी परिसरात दारू विक्रीची दुकाने खुली झाल्याने नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला आहे. नाशिकरोड, दिंडोरीरोड, सिडको, सातपूर परिसरात या दुकानांविरोधात स्थानिकांनी एल्गार पुकारला असून, त्यात महिला आघाडीवर आहेत.

--

चौथ्या दिवशीही ठिय्या

नाशिकरोड ः नाशिक-पुणे महामार्गावरील फेम थिएटरमागील दारूचे दुकान हटविण्यासाठी परिसरातील महिलांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सोमवारी त्यांनी हे दुकान उघडण्यास आलेल्या दुकानदाराला पिटाळून लावत दुकानासमोर ठिय्या आंदोलन केले.

या इमारतीत राहणाऱ्या श्री १००८ दीपानंदजी सरस्वती या साध्वीच्या नेतृत्वाखाली वैशाली दारोले, नीलम पगारे, मेघा थूल, ज्योती चांदवानी, डॉ. स्नेहल पाटील, समाधान पगारे, संजय दारोले, मुक्तार शेख, नाझिया शेख, जगदीश चांदवानी, कुंदन घडे, नाना पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

शासकीय पातळीवर लेखी निर्णय होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरू राहणार असून, रोज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू, असे या महिलांनी स्पष्ट केले. हे दुकान हटविण्यासाठी महिलांनी काही दिवसांपूर्वी उपनगर पोलिस ठाणे गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, कार्यवाही न झाल्याने नगरसेविका सुषमा पगारे यांच्या नेतृत्वाखाली फेसबुकवर लाइव्ह आंदोलन केले. सध्या या महिला दररोज सायंकाळी दुकानासमोर धरणे आंदोलन करीत आहेत.

नागरिकांनी सांगितले, की सह्यांची मोहीम राबवून उपनगर पोलिस ठाणे, पोलिस उपायुक्त कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला निवेदन दिले आहे. दुकान सुरू करताना सोसायटीच्या रहिवाशांची परवानगी घेण्यात आली नाही. मद्यपींकडून महिला, विद्यार्थी यांना त्रास होत आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

--

दुकानदाराला हुसकावले

आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले, की आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. इमारतीमध्ये आणि परिसरात राहणाऱ्या सर्व महिला एकत्र होऊन सकाळी नऊ वाजल्यापासून आंदोलन करीत आहेत. दारू दुकानाचे कर्मचारी आणि मालक दारुचे दुकान उघडण्यासाठी दोन वेळा आले, मात्र, महिलांनी त्यांना हुसकावून लावत दारू दुकान उघडू दिले नाही.

०००

सिडकोत दुकानाला टाळे!

इंदिरानगर ः सिडकोतही डीजीपीनगर भागात रहिवासी भागात दारू विक्रीचे दुकान सुरू झाले होते. त्यास नगरसेवक व नागरिकांनी विरोध दर्शविला होता. परंतु, ते दुकान बंद होत नसल्याने नगरसेवकांसह नागरिकांनी थेट या दुकानाला टाळे लावले आहे.

--

पाथर्डीत वाढता विरोध

महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर दारू विक्री करावी लागत असल्याने पूर्वी पाथर्डी फाटा येथे असलेले दुकान स्थलांतरित करण्यात आले आहे. या दुकानामुळे या परिसरातील मदयपींची वर्दळ वाढल्याने मुख्य रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. याच रस्त्यावर अजून दोन दारू विक्रीची हॉटेल्स असल्यासने सायंकाळी या रस्त्याने वाहन चालविताना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. भरवस्तीतील हे दारू दुकाने प्रशासाने तातडीने बंद करावे अन्यथा त्याविरोधात आंजोलन छेडावे लागेल, असा इशारा परिसरातील रहिवाशांकडून देण्यात आला आहे.

--

इंदिरानगरचे दुकान सुरू

इंदिरानगरमध्ये चार्वाक चौकात भरवस्तीत सुरू करण्यात आलेल्या दारू दुकानाविरोधात स्थानिक नगरसेवकांसह महिलांनी आंदोलन केले. परंतु, हे दुकान आजही सुरूच असून, सायंकाळी येथे मद्यपींच्या होणाऱ्या गर्दीमुळे परिसरातून पायी चालणेही अवघड झाले आहे. एकेकाळी अत्यंत शांतताप्रिय असलेल्या चार्वाक चौकात हे दुकान झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असतो. तसेच या दुकानापासून जवळच एक क्लास असल्याने सायंकाळी येथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या दुकानाबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

--

सातपूरला विरोध कायम

सातपूर ः अशोकनगर भागात महिलांनी मद्यविक्रीचे दुकान बंद करावे, अशी मागणी केली होती. परंतु, शहरात असलेल्या त्र्यंबकरोडवर देशी, विदेशी मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी मिळाल्याने रहिवाशांना माघार घ्यावी लागली आहे. मात्र, त्यांचा या दुकानास विरोध कायम आहे. यामध्ये नावालाच पुढारी असलेल्यांनीदेखील मद्य व्यावसायिकाकडून आर्थिक लाभ घेत आंदोलन मागे घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सातपूर भागातील अनेक ठिकाणी सुरू असलेली अवैद्द दारूची दुकाने उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी बंद करीत कठोर कारवाई केली आहे.

०००


दिंडोरीरोडवरील दुकान पाच दिवस ठेवणार बंद

पंचवटी ः दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नर येथील अमित वाइन्स शॉप हे दुकान तातडीने बंद करावे, या मागणीसाठी येथील महिलांनी तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी या आंदोलकांची म्हसरूळ पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदर वाइन शॉप पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पाच दिवसांत आंदोलकांनी जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांची यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करून त्यावर तोडगा काढावा, असे सांगण्यात आले.

हे वाइन शॉप सुरू झाल्यापासून येथील रहिवाशांनी त्यास विरोध केला आहे. त्यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात पंधरा दिवसांपूर्वी निवेदन दिले. त्यानंतर शनिवारी (दि. १५) सायंकाळपासून आंदोलनास सुरूवात केली. येथील दुकानाचे स्थलांतर करण्यात यावे, अशी येथील नागरिकांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी त्यांनी दुकानाचे शटर उघडण्यास दुकानदाराला विरोध केला. महिलांचा या दुकानासमोरील ठिय्या सोमवारी दुपारीपर्यंत होता. त्यानंतर बैठक घेण्यात आली या बैठकीत स्थानिक महिलांनी त्यांना दुकानामुळे होणारा त्रास कथन केला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पाच दिवस दुकान बंद ठेवण्याचा निर्णय झाला. पाच दिवसांत स्थलांतराविषयी काही कारवाई करता आली नाही, तर सहाव्या दिवशी पुन्हा येथेच दुकान सुरू करण्यात दुकानदाराला काही हरकत नसावी, असे या आंदोलकांना सांगण्यात आले. ही अट त्यांनी मान्य केल्याने पाच दिवसांनंतर या दुकानाविषयीचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधनिर्मिती प्रक्रिया पेटंटकेंद्रित

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

मुख्य पेटंट फाइल करताना प्रयोगाचे पेटंट आणि डेटा सादर करावा लागतो. त्यामुळे औषधनिर्मिती ही प्रक्रिया संपूर्णपणे पेटंटभोवतीच आधारलेली आहे, असे प्रतिपादन पेटंट आणि कॉपीराइट विषयाच्या अभ्यासक डॉ. मृदुला बेळे यांनी केले. ‘कथा औषध आणि पेटंटची’ या विषयावर त्या बोलत होत्या.

जेव्हा इनोव्हेटर औषधांची निर्मिती सुरू असते, तेव्हा प्रचंड प्रमाणात संशोधन आणि प्रयोग केले जातात. सुमारे दहा ते बारा वर्षे एक इनोव्हेटर औषध तयार होण्यास अवधी लागतो. यादरम्यान औषधांच्या मात्रांचा प्राणी, तसेच इतर जिवांवर प्रयोग सुरू असतो, तेव्हा त्या प्रत्येक प्रयोगाचा पेटंट फाइल करणे अत्यंत गरजेचे असते. नाहीतर या प्रयोगांचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. जेव्हा संपूर्ण प्रयोगप्रक्रिया पूर्ण होऊन औषध विक्रीसाठी तयार होते,असेही त्या म्हणाल्या.

दवप्रभा फिल्म प्रॉडक्शन आणि झेप कला व क्रीडा मंडळ यांच्यातर्फे शिक्षणतज्ज्ञ भावनाताई भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात त्यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर झेप संस्थेचे संस्थापक गुरुमित बग्गा, प्रा. डॉ. वृंदा भार्गवे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. भार्गवे यांनी प्रास्ताविकात शिक्षणतज्ज्ञ भावनाताई भार्गवे यांच्या जीवनातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याची थोडक्यात माहिती विशद केली. यावेळी डॉ. मृदुला बेळे यांच्या शैक्षणिक कार्यकाळासोबतच पेटंट विषयावरील ज्ञान, फार्मसीचा अभ्यास करताना एलएल.बी., एलएल.एम. करीत आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या यशोगाथेचा आढावा चित्रफितीद्वारे सादर झाला.

जेनेरिक औषधांचे समज-गैरसमज, त्यांचे अर्थकारण, औषधांचे पेटंट आणि कायदे या मुद्यांवर नाशिककरांसमवेत संवाद साधताना डॉ. बेळे म्हणाल्या, कोणतेही औषध तयार होण्यास २.६ बिलियन यूएस डॉलर इतका अवाढव्य खर्च येतो. भारतीय फार्मा कंपन्यांकडे ज्ञान आहे, त्यांनी औषधनिर्मितीत आता जगभरात तिसऱ्या क्रमांकावर स्थान फटकावले आहे. भारतीय पेटंट आणि कायदे यासाठी खूप लाभदायक आहेत. मुख्यत्वे कोणत्याही पेटंटचे वय म्हणजे त्याची मान्यता ही फक्त २० वर्षे असते. जेव्हा तुम्हाला पेटंट दिले जाते, तेव्हाच ते पब्लिक डोमेनमध्ये अपलोड केले जाते. त्यानंतर तुमचा संपूर्ण रिसर्च कोणीही वाचू शकतो. तुमच्या पेटंटची मान्यता संपेपर्यंत हा रिसर्च कोणी वापरू शकत नाही. पण, त्यानंतर मात्र त्याचा वापर करायला सर्वांना परवानगी आहे.

--

औषधांतील फरक केला विशद

डॉ. बेळे यांनी जेनेरिक औषधे व इनोव्हेटर औषधे यातील फरक श्रोत्यांना सांगितला. डॉ. बेळे म्हणाल्या, की जेनेरिक औषधे तयार होण्यास कमी वेळ व खर्च येतो. इनोव्हेटर औषधांप्रमाणेच आमचे औषध असल्याचा रिसर्च आणि डेटा जेनेरिक कंपन्यांना सादर करावा लागतो. त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत कमी असते. पेटंट मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत आणि फार्मासिस्टच्या अर्थकारणावरही डॉ. बेळे यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या अखेरीस अनेकांनी पेटंट आणि कॉपीराइट तसेच औषधांबाबतीत असलेल्या आपल्या शंकांचे डॉ. बेळे यांच्याकडून निरसन करवून घेतले. नाशिकच्या अनेक मान्यवरांसोबत तरुणाईने या व्याख्यानास हजेरी लावली.

--

...असे मिळते पेटंट

पेटंट म्हणजे संशोधनकर्ता आणि सरकार यांच्यातील करार होय. पेटंट फाइल केल्यावर त्या संशोधनाची गरज, रिसर्च पद्धती, नावीन्य आणि आतापर्यंत कुठेच लिखित, चित्रीत, तसेच इतर कुठल्याही स्वरूपात उपलब्ध नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतरच पेटंट फाइल करण्याची प्रोसेस सुरू केली जाते. पेटंट मिळण्याची प्रोसेस खूप किचकट असून, प्रत्येक देशाच्या पेटंटचे कायदे वेगळे आहेत. पेटंट मिळवण्यासाठीचा रिसर्च हा नवीन आणि ठोस असणेच गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांच्या सेवासमाप्तीचा निर्णय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण विभागाने धक्कादायक निर्णय घेत राज्यात २ मे २०१२ नंतर मान्यता मिळालेल्या राज्यातील सुमारे २५०० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. या निर्णयास शिक्षकभारती संघटनेसह शिक्षकांनी विरोध दर्शविला असून, अशा प्रकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील सुमारे २०० शिक्षकांना याचा फटका बसू शकतो.

दोन मे २०१२ नंतर मान्यता मिळालेल्या राज्यातील २५०० शिक्षकांवर या निर्णयाचा परिणाम शक्य आहे. या संदर्भात ज्या त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांना सेवासमाप्तीच्या नोटिसा बजावल्याचे शिक्षकभारती या संघटनेने म्हटले आहे. मात्र, या विरोधात संघटितपणे दाद मागण्यात येईल, अशी माहिती शिक्षकभारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी दिली.

२००५ नंतरच्या नेमणुकांनाही सरकारने नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात २००५ नंतरच्या नेमणुकांची संख्या सुमारे ५० हजारांच्या घरात जाते. सरकारच्या या धोरणांना विरोध दर्शविण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जागोजागी निदर्शने काढण्यात येणार असल्याचीही माहिती संघटनेने दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या नेमणुका चुकीच्या ठरवून त्याबाबत चौकशीही लावण्यात आली आहे.

२०१२ ते २०१५ या तीन वर्षांदरम्यान राज्यात सुमारे ४,३१७ मान्यता शासनाच्या वतीने तपासण्यात आल्या होत्या. या कालावधीत दोन वेळा मान्यतांची तपासणी करण्यात आली होती. यातील १,४९३ मान्यता नियमानुसार असल्याचा अहवाल सरकारला सादर कण्यात आला होता, तर २,८२४ मान्यता या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी दिल्याबाबत सरकारचा आक्षेप होता. यापैकी २५०० मान्यतांच्या सेवेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे वृत्त आहे. यात नाशिकमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या वतीने दिलेल्या सुमारे २०० मान्यतांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोडवरील अतिक्रमणे पोलिसांच्या रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शरणपूररोडसह कॉलेजरोडवरील जवळपास ५० लहान-मोठ्या व्यावसायिक आस्थापनांना शहर वाहतूक शाखेने नोटिसा बजावल्या आहेत. पादचारी मार्गावर केलेले अतिक्रमण, या मार्गाचा केला जाणारा दुरुपयोग याबाबत या नोट‌िसा असून, व्यावसायिकांना यात सुधारणा करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

राजीव गांधीभवन ते कॉलेजरोडवरील भोसला कॉलेज सर्कलपर्यंत हजारो व्यावसायिक आस्थापना आहेत. मात्र, वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने अरूंद रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्यासह अपघाताच्या घटना घडतात. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी संबंध‌ित व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, शहरातील प्रमुख मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. पादचारी मार्ग उंच करणे, त्यावर विविध साहित्य विक्रीस ठेवणे किंवा बोर्ड लावणे असे प्रकार केले जातात. यामुळे पायी चालणाऱ्यांना जागाच मिळत नाही. त्यात अशा व्यावसायिकांकडे येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने पार्क करतात. या वाहनांमुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना फारच कमी जागा उपलब्ध होते. या पार्श्वभूमीवर आजपासून नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

या व्यावसायिकांना नोटिसा

शहर वाहतूक शाखेने दिवसभरात ५० पेक्षा अधिक व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या. यात नंदन स्वीट्स, तनिष्क शोरूम, पीएनजी शोरूम, आडगावकर सराफ, सुराणा ज्वेलर्स, रुपाली अॅनेक्स अशा व्यावसायिकांचा समावेश असल्याचे पोलिस उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले. ही कारवाई आणखी दोन दिवस सुरू असून, संबंध‌ितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.


बेशिस्त वाहनचालकांना तंबी

दरम्यान, वाहतूक पोलिस निरीक्षक नम्रता देसाई यांनी पथकासह पायी फिरत कॉलेजरोडवर कारवाई केली. रस्त्यावरच पार्क केलेल्या वाहनचालकांना तंबी देत पोलिसांनी जॅमर बसवले. यादरम्यान, वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या हातगाड्या किंवा विक्रेत्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे वाहनचालकांची त्रेधा उडाली.

कॉलेजरोडवरसह शरणपूररोडवरील पादचारी मार्गावर निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सतत उद्भवतो. या पार्श्वभूमीवर नोटिसा बजावण्यासह थेट कारवाई केली जात आहे. रस्ता मोकाळा असेल तरच वाहतूक सुरळीत होऊ शकते.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन पावसाळ्यात टँकरद्वारे पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काही भागात धो धो बरसणारा पाऊस, दिवसाला दहा-वीस टक्क्यांनी वाढणारी धरणांमधील पाणी पातळी, खबरदारी म्हणून धरणांमधून सुरू असलेला हजारो दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग असे सुखावह चित्र जिल्ह्यातील काही भागात असतानाही काही तालुके पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: आसुसलेले आहेत. कधी नव्हे, ते पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे. बागलाण, सिन्नर, येवला, मालेगाव, चांदवड तालुक्यांमध्ये २१ टँकर सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच वेळी निसर्गाची कृपा आणि अवकृपेचा अनुभव जिल्हावासीय घेत आहेत.

नाशिकसह इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर व इतर काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावत परिसर सुजलाम केला असला तरी काही तालुक्यांमध्ये जुलैमध्येही दुष्काळाची दाहकता अनुभवावी लागत आहे. टंचाई कृती आराखड्याची मुदत ३० जूनपर्यंतच असल्याने एक जुलैपासून जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे खेड्यापाड्यांतील रहिवाशांची तहान शमली असे नाही. त्यानंतरही सातत्याने टँकरची मागणी जिल्हा प्रशासनाकडे होत राहिली. मात्र, भूजल सर्वेक्षण विभागाच्या (जीएसडीए) अहवालाशिवाय टँकर सुरू न करण्याचे सरकारी धोरण असल्याने जिल्हा प्रशासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गंगापूर, दारणा, कडवा, नांदूरमध्यमेश्वर या धरणांमधील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर गेल्याने तेथून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा व‌िसर्ग सुरू करण्यात आला आहे. असे असले तरी सिन्नर, येवला, मालेगाव, चांदवड आणि बागलाण या तालुक्यांमधील काही गावे आणि वाड्या पाण्यासाठी आसुसल्या आहेत.

६८ गावांमध्ये अद्याप टँकर

भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल मागवण्यात येऊन या तालुक्यांतील ४५ गावे, २३ वाड्या अशा एकूण ६८ गावांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बागलाण तालुक्यातील १४ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. तालुक्यातील खिरमाणी, सारद, राहूड, इजमाने, बहिराणे, देवळाणे, भाक्षी, कातरवेल, नवेगाव, महाड या गावांकडून टँकरची मागणी नोंदविण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने केली पोलखोल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू असल्यामुळे नव्या रस्त्यांसह सिंहस्थातील दर्जेदार रस्त्यांचीही चाळण झाली. गंगापूर रोडसह शहरांतर्गत रस्ते संततधार पावसामुळे खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यांत रस्ते, असा प्रश्न आता वाहनधारकांना पडला आहे.

दावा केलेले सिंहस्थातील दर्जेदार रस्ते आणि गेल्या वर्षी १९२ कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्यांच्या गुणवत्तेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गेल्याच आठवड्यात पालिकेने या रस्त्यांची डागडुजी केली होती. परंतु पावसाने त्यावर पाणी फिरव‌िल्याने सध्या शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाली आहे. दरम्यान आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या रस्त्यांच्या कामांचा अहवाल मागवला आहे.

गेल्या आठवड्यापासून शहरात कधी जोरदार तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. पावसाळी गटार योजना कुचकामी ठरल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवास हा रस्त्यानेच गोदावरी नदीपात्राकडे होत आहे. रस्त्यांवरच पाणी साचल्याने या रस्त्यांची खरी गुणवत्ता समोर आली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने १९२ कोटी रुपये खर्चून रस्ते तयार करण्यात आले होते. या रस्त्यांचीही अवस्थाही बिकट झाली आहे. त्यांच्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामळे संततधार पावसाने सिंहस्थात तयार केलेल्या रस्त्याची पोलखोल पावसाने केली.

पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची पूर्णतः चाळणी झाली आहे. यातून सिंहस्थात तयार झालेले चकचकीत रस्तेही सुटले नाहीत.

वाहतुकीचा बोजवारा

प्रमख चौकांसह जागोजागी खड्डे पडल्याने नाशिककरांना रस्ता कुठे अन खड्डा कुठे, असा प्रश्न पडला. त्यामुळे वाहन चालवणेही अवघड झाले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. रस्त्यांवरून जातांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हीच का रस्त्यांची गुणवत्ता, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी १९२ कोटींचे रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. परंतु पावसाळ्यात या रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. ठेकेदाराने निविदेच्या अटींप्रमाणे लेयरचे काम अद्यापही पूर्ण केलेले नाही. कुठे एक लेयर टाकला, तर कुठे दुसरा व तिसरा लेयरच टाकलेला नाही. त्यामुळे नवे रस्ते उखडले आहेत. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या रस्त्यांच्या कामांचा सविस्तर अहवाल शहर अभियंत्याकडून मागव‌िला आहे. निविदेतील अटी व शर्ती आणि प्रत्यक्षात केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे ठेकेदारांसह अधिकाऱ्यांचाही पोलखोल होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'मैत्रेय'विरोधात धुळ्यात गुंतवणूकदारांचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

'परताव्यासाठी एकजूट-न्यायासाठी वज्रमूठ', 'आता आम्ही थांबणार नाही, तोपर्यंत कष्टाचा पैसा मिळणार नाही', अशा घोषणा देत मैत्रेय कंपनीने विविध उपक्रमात गुंतविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा परत मिळाव्यात या मागणीसाठी सोमवारी (दि. १७) धुळे शहरात मैत्रेय उपभोक्ता अभिकर्ता असोसिएशनतर्फे मोर्चा काढण्यात आला.

पांझरा चौपाटीपासून हा पायी मोर्चा काढत मैत्रेय उपभोक्ता अभिकर्ता असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी मैत्रेय कंपनीच्या संचालिका वर्षा सपकाळ यांच्यासह कंपनीच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरासह जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. आणि ही आकडेवारी कोट्यवधीचे रुपयांमध्ये आहे. मात्र गेल्या दीड वर्षापासून गुंतवणूकदारांना कंपनीकडून कोणताही परतावा मिळालेला नाही. प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने अखेर मैत्रेय गुंतवणूकदार व प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व मैत्रेय ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रदीप सिसोदे, नीलेश वाणी, गौतम महाजन यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांना’ तारतेय ‘मटा हेल्पलाइन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असताना ‘त्यांनी’ दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नुसतेच शिक्षण नाही घेतले, तर त्यात उज्ज्वल यश संपादन करून दाखविले. दारिद्र्याच्या या दशावतारामधून बाहेर पडण्यासाठी ‘ते’ प्रयत्न करीत आहेत. भविष्यात त्यांना खूप काही करून दाखवायचे आहे. त्यासाठी हवी होती आर्थिक मदतीची गरज. ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमांतर्गत त्यांच्यासाठी नाशिककरांना २०११ मध्ये मदतीची हाक देण्यात आली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत नाशिकमध्ये प्रथमच असा प्रयत्न झाला. त्याला अभूतपूर्व असे यशही लाभले. ‘मटा’ने दहावी उत्तीर्ण झालेले तीन जण हेरले व त्यांना मदत केली. या मदतीमुळे त्यांची शैक्षणिक वाटचाल सुकर होत आहे.

तेजस आमले. वडिलांना पगार दोन हजार रुपये... त्यातही पाचशे रुपये घराचं भाडं जाणार. घराला दहा ठिकाणी ठिगळं लावलेली... तरीही पाणी ठिबकतंच. पुस्तकांसाठी शेजाऱ्यांनी मदत केलेली. घरात अठराविशे दारिद्र्य; पण आभाळाला गवसणी घालण्याची उमेद ठेवणाऱ्या तेजसनं दहावीत नेत्रदीपक गुण मिळवले होते. तो मेकॅनिकल इंजिनीअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या तेजसला यशाची आणखी शिखरं पादाक्रांत करण्यासाठी गरज होती मदतीची. ‘मटा’ने हेल्पलाइनच्या माध्यमातून त्याला साथ दिली.

तेजस शिंदे. वडिलांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय. त्यातून घरात तीन हजार रुपये येतात. त्यातही किराणा, लाइटबिल, घरपट्टी खर्च जाता जाता हाती शिल्लक राहतात ते खुळखुळण्याइतकेच पैसे. घरात लक्ष्मीची अवकृपा असली तरी तेजसच्या बुद्धिमत्तेच्या रूपानं सरस्वतीचे मात्र अगदीच झुकते माप होते. त्याला दहावीच्या परीक्षेत ९२.७३ टक्के गुण होते. डॉक्टर व्हायची इच्छा उरी बाळगून त्याने शिकण्यासाठी कंबर कसली खरी, पण आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्याचे शिक्षण पूर्ण होईल का, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना पडला होता. मात्र, ‘मटा’ने हात दिल्याने तो आज डॉक्टर होण्याची उमेद बाळगून आहे.

रोशनी गांगुर्डे. खाणारी तोंडे पंधरा अन् कमावणारे मात्र दोघेच. घरची परिस्थिती बेताची. एकत्र कुटुंब पद्धतीत असल्याने कितीही कमावलं तरी ‘पुराटी’ पडत नाही, अशी सततची ओरड. मात्र, हलाखीच्या काळोखीत रोशनीने तिच्या यशाचा प्रकाश झाकोळू दिला नव्हता. तिने दहावीत चांगले गुण मिळवले होते. कम्प्युटर इंजिनीअर बनण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तिला या शाबासकीची आवश्यकता तर होतीच, पण आर्थिक मदतीचीही गरज होती. ‘मटा’ने तिच्यातील स्पार्क ओळखून तिला आर्थिक मदत मिळवून दिली.

नाशिककरांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलण्याचीही तयारी दाखविली होती. कुणी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण आम्हीच पूर्ण करू, असा हट्ट धरला होता, तर कित्येक कॉलेजांनी या विद्यार्थ्यांना तिन्ही वर्षे मोफत शिकवू, असे सांगितले होते. मात्र, हा उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातूनच ओढला जावा, असा हेतू नाशिककरांच्या भरभरून प्रतिसादामुळे पूर्णदेखील झाला. हे ति‌न्ही विद्यार्थी नाशिककरांच्या मदतीमुळे आज चांगले शिक्षण घेत आहेत. मदतीचा ओघ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मटा’ माध्यम झाल्यामुळेच हे सर्व शक्य झाले. ‘मटा हेल्पलाइन’चे हे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आज काहीअंशी तरी आर्थिक विवंचनेपासून दूर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेत महापौरच बॉस!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालिकेत बहुमत मिळाल्यानंतरही पदाधिकाऱ्यांमधील हेवेदावे आणि समांतर सत्ता केंद्रामुळे भाजपची बदनामी होवून पालिकेतील कारभार भरकटला आहे. वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली असून, महापौरांना डावलून होणाऱ्या परस्पर बैठका आणि पदाधिकाऱ्यांचे दरबार बंद करण्याचे फर्मान पक्षाने काढले आहेत. पालिकेत महापौरच पक्षाची भूमिका जाहीर करतील, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे महापौरच प्रमुख सत्ताकेंद्र असतील.

निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, पालिकेच्या सर्व कारभारावर पालिकेची पकड आहे. परंतु चार महिने उलटूनही पालिकेचा कारभाराला चालना मिळण्याऐवजी पदाधिकाऱ्यांमधील हेवेदावे आणि परस्पर सत्ताकेंद्र निर्माण झाल्यानेच पालिकेचा कारभार चर्चेला येत आहे. महापौर, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, गटनेता या पाच पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नव्हता. महापौरांना डावलून पदाधिकारी परस्पर अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून निर्देश देत होते. त्यामुळे महापौरही नाराज झाल्या होत्या. काही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र दरबार भरवणे सुरू केले होते.

गेल्या आठवड्यात महापौरांना डावलूनच गाळेधारकांची बैठक घेण्यात आली होती. त्यामुळे महापौरांनी नाराजी व्यक्त केली होती. तर पदाधिकाऱ्यांच्या सूचनांनी पालिकेतील अधिकारीही वैतागले होते. पक्षाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. पाच ही पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, गटनतेा संभाजी मोरुस्कर यांना एकत्र‌ित बसवून त्यांना सबूरीचा सल्ला देण्यात आला आहे. पालिकेत पक्षाची धोरणात्मक निर्णयाची भूमिका महापौरच मांडतील, असे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना समन्वयाने व सर्व सहमतीने काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता महापालिकेत महापौरांच्याच शब्दाला महत्त्व राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ मायलेकींची झाली भेट

$
0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

सगळीकडे गो-रक्षक आणि गो-वंश हत्या यावर चर्चा सुरू असताना येथील गो-रक्षकांनी मात्र नुकत्याच जन्मलेल्या वासराची अन् त्याच्या आईची भेट घडवून आणली आहे. या मायलेकींची ताटातूट झाली होती, मात्र गो-रक्षकांनी तत्परता दाखविल्यामुळे ते पुन्हा एकत्र आले आहेत.

येथील विश्व हिंदू परिषदेचे मच्छिंद्र शिर्के यांना गुरुवारी (१३ जुलै) रात्री सिद्धेश दुसाने व विशाल आहिरराव या तरुणांचा फोनवरून मामको हॉस्पिटलनजीक नुकतेच जन्मलेले वासरू सापडल्याची माहिती दिली. शिर्के व त्यांचे सहकारी बहादूर परदेशी, दिनेश चौधरी, भावेश भावसार, नरेश गवळी यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. काही संशयास्पद लोक गाय व वासरू बळजबरीने घेवून जात असल्याची माहितीही त्यांना प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्या लोकांना शिर्के आणि त्यांच्या साथीदारांनी हटकले असता त्यांनी तेथून पळ काढला. वासरू तर सापडले होते, मात्र गाय जवळपास कुठेच नसल्याने त्यांनी शोध सुरू केला. थोड्याच वेळात एकात्मता चौकाजवळ ती गाय सापडली. मात्र तिने नुकताच वासराला जन्म दिला असल्याने तिला असह्य वेदना होत होत्या. गो-रक्षकांनी तिच्यावर उपचार करून तटातूट झालेल्या त्या मायलेकींची भेट घडवून आणली. सध्या शिर्के त्या मायलेकींचा सांभाळ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ते मद्यदुकान आठ दिवस बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिडके कॉलनीतील हिरा वाइन्ससंदर्भात आठ दिवसांमध्ये लेखी अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी सोमवारी लंबोदर अॅव्हेन्यूमधील रहिवाशांना दिले. या काळात दुकान बंद ठेवण्याची सूचना दुकान मालकाला देण्यात आली आहे.

नवीन तिडके कॉलनीमध्ये हिरा वाइन्स हे दुकान सुरू करण्यास तेथील रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दुकान सुरू करण्याच्या मु्द्दयावर व्यावसायिकही ठाम असल्याने हा तिढा सुटण्याऐवजी वाढू लागला आहे. या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी (दि. १७) सुनावणी ठेवण्यात आली होती. लंबोदर अॅव्हेन्यूमधील रहिवाशी आणि वाइन शॉप मालक यांना या सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. तुमच्या आदेशावर तुम्हीच कशी सुनावणी घेणार, असा आक्षेप वकिलांनी घेतला. रहिवाशांच्या वतीने मांडण्यात आलेल्या बाजूचा अहवाल आठवडाभरात सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच या कालावधीत दुकान बंद ठेवण्याची सूचना दुकान मालकाला देण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून ५०० मीटरच्या आतील बाधित वाइन्स आणि बियरशॉपीला स्थलांतरणासाठी परवानग्या दिल्या जात आहेत. मात्र, अशी दुकाने सुरू होऊ देण्यास रहिवाशी विरोध करू लागले आहेत. पंचवटीमधील दिंडोरी रोडवरील अमित वाइन्सबाबतदेखील स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुकान बंद करण्याची मागणी केली.

रहिवाशांना मतदानाचा हक्क

लंबोदर अॅव्हेन्यूबरोबरच शहरातील अन्य तीन दुकानांबाबत सध्या वाद सुरू आहे. एखाद्या ठिकाणी बियर अथवा वाइन शॉप नको असेल, तर त्याबाबत त्या परिसरातील नागरिकांचे मतदान घेण्याची तरतूद कायद्यात आहे. नागरिकांनी मतदानातून दुकानांना विरोध दर्शविल्यास दुकानाला परवानगी नाकारता येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शहरात तसेच ग्रामीण भागातही रीतसर परवानगी न घेता कोणी वाइन अथवा बियरशॉपी सुरू केल्यास अशा दुकानांवर गुन्हे दाखल केले जातील. तसेच संबंधिताचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दुकानांच्या तुलनेत घट कमीच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्री बंदीने ७६३ दुकाने बंद झाली आहेत. मात्र, बंद दुकानांच्या संख्येचा विचार करता मद्यविक्रीत झालेली घट कमी आहे. दारूविक्रीचा भार उर्वरीत ३५३ दुकानांवर पडल्यामुळे या दुकानांतून दारूविक्री ६० ते ७० टक्क्यांनी वाढली आहे.

मार्चनंतर जिल्ह्यातील १११६ पैकी तब्बल ७६३ मद्यविक्री दुकाने बंद झाली. चालू असलेल्या ३५३ दुकानांमधील तीन महिन्यांच्या विक्रीचा आकडा ६० ते ७० टक्के वाढलेला असल्याचे समोर येत आहे. सरकारी आकडेवारीवरुन जिल्ह्यात देशी, विदेशी दारू व बिअर विक्रीत घट झाली आहे, तर वाइन विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. १११६ दुकानांमधून जी विक्री होत होती, तीच आता चालू असलेल्या ३५३ दुकानांतून होत असून, त्यात एकूण विक्रीत १० ते २५ टक्के घट झाली आहे. खरेतर हा घटीचा आकडा ७० टक्के हवा होता. पण बंद असलेल्या दुकानांचा भार या दुकानावर पडल्यामुळे ही विक्री कायम आहे. या सरकारी आकड्याबरोबरच अवैध दारू विक्रीचा आकडाही मोठा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दारू दुकाने बंद झाली असली, तरी एकूण विक्रीत घट न झाल्याचे चित्र आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एप्रिल, मे व जूनचे आकडे समोर आले असून, दारु विक्रीत घट झाली असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. २०१६ मध्ये १११६ दुकाने व २०१७ मध्ये ३५३ दुकानांतून विक्री झाल्यानंतर ही घट झालेली आहे. त्याची टक्केवारी तीन महिन्यांची असून ती अल्प आहे.


२०१६ च्या विक्रीच्या तुलनेत घट (टक्केवारीत)

दारुचा प्रकार - एप्रिल - मे - जून

देशी - १७.१६ - १२ - ६.४२

विदेशी ३०.४६ - १६.३६ -१८.५४

बिअर - ३८.७५ -२७ - ३६.२९

वाईन - +१२.४५ - १३- १५.८९



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images