Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गोदावरी, नंदिनीत आता बांधकाम मंजुरी आवश्यक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नासर्डी नदीपात्रात महापालिकेने सुरू केलेल्या बांधकामावर हायकोर्टाने आक्षेप घेतला असून, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची परवानगी का घेतली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, यापुढे गोदावरी आणि नंदिनी नदीत कोणतेही बांधकाम करायचे असल्यास उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीकडून परवानगी घ्यावी, असे आदेश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने दिल्याचा दावा याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केला आहे.

नंदिनी नदीपात्रात चालू असलेल्या भिंती आणि टाकल्या जाणाऱ्या भरावाबाबत राजेश पंडित यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यावर हायकोर्टाने निरीचा अहवाल मागवला होता. निरीने सादर केलेल्या अहवालाकडे मनपाने दुर्लक्ष केले होते. त्यावर निरीने पुन्हा आक्षेप घेतला होता. याबाबत हायकोर्टाने पालिकेची कानउघाडणी केली आहे. नदीच्या भिंतीबाबत कुठलेही पुढील काम करण्याअगोदर मनपाने हायकोर्टाने विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समिती (ज्यात निरी पण आहे) कडे अर्ज करून ना हरकत घेणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच, भविष्यात गोदावरी व तिच्या कुठल्याही उपनदीवर काहीही बांधकाम करायचे असल्यास हायकोर्टाने गठीत समितीकडून परवानगी घ्यावी, असे निर्देश ओक यांच्या खंडपीठाने दिल्याचा दावा पंडित यांनी केला आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या या आदेशाने गोदावरी आणि तिच्या उपनद्यांमध्ये बांधकाम करण्यास आता अडचणी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाड शहर ठरले हागणदारीमुक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

केंद्र सरकारने मनमाडला हागणदारीमुक्त गाव घोषित केले आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियान ही योजना शहरात प्रभावीपणे राबवल्यामुळे थेट केंद्राने मनमाड नगरपालिकेकेचा गौरव केला आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर व पालिकेतील सहकाऱ्यांनी हागणदारी मुक्त गाव योजना प्रभावीपणे राबवली.

या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी केंद्र-राज्य यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाला १२ हजार व पालिकेतर्फे ५ हजार असे एकूण १७ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले. मनमाड शहरात १४३० वैयक्तिक शौचालये बांधली गेली आहेत. तसेच ६२० कामे प्रगती पथावर आहेत. या गौरवाने नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटी-सिन्नर वाहतूक विस्कळीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी-सिन्नर महामार्गावरील पुलाला भागदाड पडल्याने संपूर्ण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान या पुलाच्या डागडुजीसंदर्भात शनिवारी घोटी पोलिस ठाण्यात बांधकाम विभाग, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत किमान मोटरसायकल व लहान वाहने धावण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

दारणा नदीवरील पुलाला शुक्रवारी भगदाड पडल्यामुळे छोटी वाहने देवळे-खैरगावमार्गे वळविण्यात आली आहेत. मात्र हा पर्यायी मार्गही खडतर व चिखलाचा तसेच लांब पल्ल्याचा असल्यामुळे वाहनधारक वैतागले आहेत. या पर्यायी मार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. तर मोठी व अवजड वाहने मुंढेगाव-साकूरमार्गे वळविण्यात आली आहे. या बैठकीला पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, कनिष्ठ अभियंता संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवा काळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रमेश परदेशी, भाजप तालुकाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, टाकेदचे सरपंच बाळासाहेब घोरपडे उपस्थित होते.

यंत्रणेची कानउघडणी

कमकुवत झालेल्या व भगदाड पडलेल्या पुलाचे काम यूद्धपातळीवर सुरू करणार असल्याचे बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी सांगितले. मात्र चोवीस तास उलटूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी ठेकेदार व यंत्रणेला झापले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संपामुळे आंबा निर्यात घटली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जून महिन्यात झालेल्या शेतकरी संपाचा यंदाच्या आंबा निर्यातीला मोठा फटका बसला आहे. मागील वर्षापेक्षा यंदा ३० मेट्रिक टन आंब्याची निर्यात कमी झाली आहे. ऐन निर्यातीच्या कालावधीत उसळलेल्या शेतकरी संपात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे ही घट झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

लासलगाव येथील भाभा ऑटोमेटिक रिसर्च सेंटरमध्ये विकिरण प्रक्रिया करून आंब्याची निर्यात केली जाते. यंदा ५४० मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली असून, मागील वर्षापेक्षा तुलनेने ३० मेट्रिक टनने घट झाली आहे. यावर्षी १ हजार ५० मेट्रिक टन आंबा देशातील बंगळुरू, मुंबई, लासलगाव येथून विकिरण प्रक्रिया करून निर्यात झाला आहे.

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने हंगामात शेतकऱ्यांनी फळभाज्यांची लागवड केली. फळभाज्यांचे पीक हमखास पैसे देते. मुबलक पाणी, औषधे आणि खते यांचा वापर केल्याने पिकेही चांगली आली होती. पण सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केला आणि सगळे गणित बिघडले. त्यातच शेतमालाची आवकही वाढल्याने कमी दर मिळाला. म्हणून शेतकऱ्यांनी कर्जमाफी, हमीभावासाठी १ जूनपासून संप पुकारला. या संपादरम्यान नुकसान होण्याच्या भीतीने निर्यातदारांनी निर्यात थांबविली. हापूस आंबा परदेशातही प्रसिद्ध आहे. हा आंबा परदेशात पोहोचावा यासाठी दरवर्षी लासलगाव येथे आंब्यावरविकिरण प्रक्रिया केली जाते.

शेवटच्या टप्प्यात परिणाम

शेतकरी संपात सुरू असलेली शेतमालाची नासाडी, लुटालूटमुळे व्यापाऱ्यांनी कोकणात आंबा खरेदीच केला नाही. खरेदी थांबल्यामुळे साहजिकच लासलगाव येथील केंद्रावर विकिरणासाठी आंबा कमी आला. त्यामुळे यंदा शेवटच्या टप्प्यात आंबा निर्यातीवर परिणाम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशय‌ितांवर कोर्टातही ‘वॉच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोर्टात हजर करण्यात येणाऱ्या संशयित गुन्हेगारांना त्यांचे परिचीत, नातेवाईक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करतात. याचा फायदा संशयित आरोपी घेतात. हे रॅकेट मोडून काढण्यासाठी शहर पोलिसांनी कोर्टात हजर करताना येणाऱ्या संशयितांचे व्हिड‌ीओ शूट‌िंग करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

शहर परिसरात कार्यरत असलेल्या गुन्हेगारांना विविध राजकीय पक्ष, संघटना पाठ‌िशी घालतात. पंचवटीसह नाशिकरोड, सातपूर, सिडको अशा अनेक भागात राजाश्रय घेऊन गुन्हेगारांनी बस्तान मांडल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना मिळणारी आर्थिक रसद मोडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून कोर्टात हजर करण्यात येणाऱ्या संशयित आरोपींचे व्हिड‌ीओ शूट‌िंग करण्यात येणार आहे.

विविध गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगारांना, न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयितांना न्यायालयीन कामकाजासाठी वेळोवेळी कोर्टात हजर करण्यात येते. संशयितांना एकाच वेळी सेंट्रलजेलमधून एका मोठ्या किंवा आवश्यकतेनुसार जास्त वाहनांमध्ये कोर्टात आणण्यात येते. प्रत्येक संशयितांची वेगवेगळ्या कोर्टात आणि वेळेत सुनावणी होते.

त्यामुळे सुनावणी पूर्ण झालेले संशयित पोलिसांसह कोर्टाच्या आवारात किंवा पोलिसांच्या वाहनांमध्ये बसलेले असतात. तेव्हा संशयितांचे नातेवाईक, मित्र, संशयितास मदत करणारे हितचिंतक तेथे हजर असतात. संशयितांना पैसे, केसची माहिती यासह इतर रसद पुरवली जाते. यामुळे संशयितांवर कायदेशीर कारवाईचा तितकासा फरक पडत नाही. या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या आवारात संशयितांवर कॅमेऱ्यांची नजर ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

लवकरच हे काम सुरू होईल. यामुळे संशयितांना कोण भेटते, त्यांचा हेतू काय? त्यांचा संबंध काय हे समजण्यास मदत होईल. गुन्हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या, गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या व्हॉईट कॉलर व्यक्ती यामुळे प्रकाशात येऊ शकतील.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीचे संचालक अज्ञातस्थळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींच्या निवडीची तारीख निश्चित झाल्यानंतर लगेच संचालकांना अज्ञातस्थळी घेऊन जाण्याची ‘खबरदारी’ इच्छुकांकडून घेतली जात आहे. काही संचालक शुक्रवारीच (दि. १४), तर काही शनिवारी (दि. १५) अज्ञातस्थळी गेले आहेत. निवडीला अजून पाच दिवसांचा कालावधी असला, तरी आधीपासूनच अशी खबरदारी घेण्यावर भर दिला जात आहे.

गेली दोन दशके बाजार समितीच्या सत्तेत असलेल्या देवीदास पिंगळे यांना प्रथमच सभापतिपदावरून पायउतार होण्याची वेळ आली. त्यांच्या पॅनलमधून निवडून आलेले संचालकच त्यांच्या विरोधात गेल्याने त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मंजूर झाला. हा अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी शिवाजीराव चुंभळे यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यानंतर सभापती निवडणुकीच्या आदेशाची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती. गुरुवारी (दि. १३) संचालकांना उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पत्र मिळताच या संचालकांची अज्ञातस्थळी सहल काढण्यात आली. आतापर्यंत एकहाती सत्ता मिळविणारे पिंगळे हे ऐनवेळी खेळी करण्याची शक्यता लक्षात घेऊन या संचालकांना त्यांच्या संपर्कात येऊ द्यायचे नाही, याची काळजी चुंभळे घेत आहेत.

---

गुरुवारी होणार निवड

येत्या गुरुवारी (दि. २०) सभापती आणि उपसभापतींच्या निवडीसाठी बाजार समितीच्या कार्यालयात सभा होणार आहे. या सभेत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली बाजार समितीची सत्ता शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ताप्रश्नी अधिकारी फैलावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

भगूर-नानेगाव ते पळसेदरम्यानच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामाची देवळालीचे आमदार योगेश घोलप यांनी शुक्रवारी भरपावसात भेट देऊन पाहणी केली. या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने या कामाची चौकशी करण्याचे व पुन्हा दर्जेदार काम होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराला देयक अदा न करण्याच्या सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. ठेकेदाराशी संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. या रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडल्याचे वृत्त ‘मटा’तून काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते.

‘नाबार्ड’मार्फत जुना नासाका रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडले होते. या समस्येची दखल ‘मटा’ने घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे उर्वरित काम केले होते. या रस्त्याच्या कामाची शुक्रवारी दुपारी आमदार घोलप यांनी पाहणी केली असता या रस्त्याच्या झालेल्या कामाचा दर्जा तांत्रिक व गुणात्मकदृष्ट्या अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने संबंधित ठेकेदाराला कामाची देयके अदा न करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दर्जाबाबत तडजोड नको

आपल्या अधिकारक्षेत्रात होणाऱ्या विकासकामांचा दर्जा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासला पाहिजे. कामाच्या दर्जाबाबत कोणत्याही स्वरूपाची तडजोड स्वीकारू नये. कामाच्या दर्जाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यास संबंधित ठेकेदारांकडून आर्थिक दंड वसूल करावा, असे आदेशही आमदार घोलप यांनी दिले. या रस्त्याचे काम पुन्हा दर्जेदार करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आगळे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, लीलाबाई गायधनी, सरपंच देवीदास गायधनी, नवनाथ गायधनी आदींनी आमदारांकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...हा तर काळू-बाळूचा तमाशा

$
0
0

अजित पवारांचा शिवसेना-भाजपवर हल्लाबोल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सेना-भाजपचे सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे. यात एक मारल्यासारखे, तर दुसरा रडल्यासारखे करतो. दोघांनी मिळून नौटंकी चालवली असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या दोघांनाही राज्यातील जनता, शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. अपेक्षित काही मिळाले नाही की लगेच मुदतपूर्व निवडणुकांचा विषय पुढे करून जनतेचं लक्ष विचलित करायचा असा सगळा तमाशा चाललायं असा जोरदार हल्ला चढवला.

नाशिक येथील तुपसाखरे लॉन्स येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, युवक अध्यक्ष संग्राम कोते-पाटील, युवती अध्यक्षा स्मिता पाटील, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार द‌ीपिका चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून अजित पवारांनी भाजप-सेनेवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३४ हजार कोटींची कर्जमाफी केली. दहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली. मात्र अद्याप काहीच मिळाले नाही. एकदा निर्णय घेतल्यानंतरही तीनवेळा जीआर बदलण्याचा विक्रम या सरकारने केला. आता परत चौथ्यांदा जीआर बदलणार असल्याचे समजते. अरे, जीआर काढायलाही अक्कल लागते, असा टोला पवार यांनी लगावला.

युतीत भाजपच मोठा

अजित पवार यांनी युतीत भाजपला मोठ्या भावाचे प्रशस्तीपत्र दिले. भाजपचे सर्वाधिक आमदार असून, सध्या शिवसेनेच्या नेत्यांना सातत्याने भाजप नेत्यांकडे जावे लागते. त्यामुळे भाजपच मोठा भाऊ असल्याचे सांगून पवार यांनी शिवसेनेला चिमटा काढला. समृद्धी महामार्गावरून शिवसेनेची भूमिका डबलढोलकीची असून, एकीकडे सरकारजमा नाही म्हणायचे अन् दुसरीकडे सत्तेचे लाभ घ्यायचे, अशी टीका केली.

वर्षावर ढोल वाजवावेत

मंत्रिमंडळात शिवसेनेचे १२ मंत्री आहेत. हे मंत्री कॅबिनेटमध्ये सरकारच्या निर्णयाशी सहमत असतात. मात्र, शिवसेनेचे नेते बाहेर रस्त्यावर उतरतात. त्यांना विरोधच करायचा तर सभागृहात विरोध का केला जात नाही. शिवसेनेने बँकांपुढे ढोल वाजवण्याचे नाटक करण्यापेक्षा मंत्रालयात, वर्षा बंगल्यावर ढोल वाजवावेत. शिवसेना सत्तेत आहे, हेच अजून त्यांना कळले नाही, असे पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिरवणूक मार्गास देवळालीत बॅरिकेड्सचा ब्रेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून येथील जुन्या बस स्थानक परिसरात लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेड्समुळे विविध उत्सवाच्या पारंपरिक मिरवणूक मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपला मनमानी कारभार करू पाहत असून, लष्कराप्रमाणे सर्व कारभार कॅन्टोन्मेंट बोर्डात सुरू आहे. याबाबत लोकप्रतिनिधीदेखील गप्प असल्याने विविध मंडळांमधील कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. देवळालीत गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्रोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांसह विविध सण-उत्सवांच्या मिरवणुका या जुन्या बस स्थानक ओलांडून जात असतात. हा मार्ग पारंपरिक मिरवणूक मार्ग बनला असल्याने याठिकाणी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड्स गणेशोत्सवापर्यंत काढण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वाहतुकीच्या सोयीसाठी बॅरिकेडिंग

देवळालीतील वाढत्या वाहतुकीला आळा बसविण्यासाठी हौसन रोडवरील वाहतूक सायंकाळच्या वेळी वन वे करण्यात आल्याने या ठिकाणाहून कुठलेही वाहन रस्ता ओलांडू नये, याकरिता ही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे या बॅरिकेड्सचा येथे भरणाऱ्या रविवार बाजारच्या दिवशी रिक्षा उभ्या राहण्यास अडथळा निर्माण होत आहे. शिवाय प्रशासनाने याच जागी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.

जुन्या बस स्थानक परिसरात लावण्यात आलेले २ फुटी लोखंडी संरक्षक बॅरिकेडिंग प्रशासनाने काढून घ्यावे. अन्यथा ते शिवसेना व विविध गणेश मंडळाच्या वतीने काढण्यात येतील.

- नितीन गायकवाड, अध्यक्ष, तरुण मित्र मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइक्सही रडारवर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगवेगळ्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या, तसेच जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांनी सोशल मीडियावर साम्रज्य पसरविले आहे. अशा आरोपींच्या अकाउंट्सवर पोलिसांची नजर पडली असून, त्यांची सविस्तर चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. विशेषतः संशयितांच्या क्लोज फ्रेंड्सना पोलिसांनी रडारवर घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अशा संशयितांच्या पोस्ट लाइक्स करण्यासह त्यांच्या अकाउंटपासूनही सर्वसामान्यांनी चार हात दूरच राहणे फायद्याचे ठरेल, असे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले.

पंचवटीतील संशयित गुन्हेगार जया दिवे यास हत्या प्रकरणी अटक केल्यानंतर पोलिसांनी हा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. दिवे फेसबुकवर अॅक्टिव असून, त्याच्या फ्रेंडलिस्टमध्ये जवळपास पाच हजार जणांचा समावेश आहे. हत्या व इतर गंभीर गुन्हे नावे असलेल्या दिवेचे मित्र नक्की कोण, असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली. याबाबत बोलताना आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले, की सोशल मीडियाचा दुरुपयोग करण्याचे प्रमाण वाढले असून, यात काही सराईत गुन्हेगारांचा समावेश धक्कादायक आहे. नावावर अनेक गंभीर गुन्हे असलेले सराईत गुन्हेगार फेसबुकसह इतर सोशल मीडियावर विविध फोटोग्राफ्स, व्हिडीओ शेअर करतात. तलवारीने केक कापणे हा असाच एक प्रकार आहे. अशा बाबी लाइक करून संशयितांना प्रोत्साहित करण्याचे काम केले जाते. संशयिताच्या पोस्टवर कॉमेंट्स करणारे आणि लाइक करणारे हे आरोपींच्या अधिक जवळचे असण्याची शक्यता आहे. किंबहुना गुन्हेगारांसोबत तेही एखाद्या गुन्ह्यात सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांनी निर्माण केलेले सोशल कनेक्टचे नेटवर्क रडारवर घेण्यात आल्याचे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी फेसबुक फ्रेंड्सना लक्ष्य केले असून, त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सायबर सेलच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. अनेक सराईत गुन्हेगारांच्या फॉलोअर्सच्या याद्या तयार करण्यात आल्या असून, लवकरच त्यांची चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिवेच्या किमान ५० मित्रांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांचीही चौकशी सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

--

मोक्काच्या दोन केस प्रस्तावित

सराईत गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात ओढण्यासाठी शक्य ते प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. सध्या मोक्काच्या दोन केस प्रस्तावित असून, त्यात सराईत गुन्हेगारांना आर्थिक, तसेच इतर प्रकारची मदत करणाऱ्यांचा गुन्हेगार म्हणून समावेश करण्यात येत असल्याचे डॉ. सिंगल यांनी स्पष्ट केले. विशेषतः राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी सराईत गुन्हेगारांपासून दूरच राहावे, असा सूचनावजा इशारा यापूर्वीच दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

--

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व्हायला हवा. सोशल मीडियावर लाइक, तसेच कॉमेंट करण्यापूर्वी सदर व्यक्ती कोण आहे ते पाहावे. आपल्या एका कृतीमुळे कोणाला काय फायदा होतो, हे तपासूनच व्यक्त व्हावे.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांचा श्वास मोकळा

$
0
0

नो हॉकर्स झोनच्या निर्णयाचे स्वागत; जागा बदलून देण्याची फेरीवाल्यांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेला न्यायालयाने शहरात हॉकर्स झोन निर्माण करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार महापालिकेत रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. दरम्यान महापालिकेच्या सातपूर विभागात नगरसेवक, अधिकारी व हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यात सातपूर भागातील सर्वच मुख्य रस्ते नो हॉकर्स झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. यामुळे घोषीत करण्यात आलेल्या हॉकर्स झोनमुळे सातपूरचे रस्ते मोकळा श्वास घेणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाचे व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. परंतु, देण्यात आलेल्या नवीन जागा अगदी बाजूला असून, त्या बदलून द्याव्या, अशी मागणीही हॉकर्स झोन संघटनेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण यांनी केली आहे. आता या हॉकर्स झोनबाबत मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा काय निर्णय घेतात याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे. हॉकर्स झोनची अंमलबजावणी शनिवारपासूनच सुरू केली गेल्याने महापालिका व रस्त्यावरचे व्यावसायिक यांच्यात वादावादी होण्याची चिन्हे आहेत. यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सातपूरच्या विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी सांगितले.

महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात सभापती माधूरी बोलकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच हॉकर्स झोनची बैठक झाली. याप्रसंगी हॉकर्स झोनबाबत माहिती देण्यासाठी उपायुक्त हरीभाऊ फडोळ उपस्थित होते. तसेच नगरसेविका सीमा निगळ, पल्लवी पाटील, नयना गांगुर्डे, दीक्षा लोंढे, राधा बेंडकोळी, नगरसेवक सलिम शेख, योगेश शेवरे यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. नगरसेविका निगळ यांनी रस्त्यांवर बसणाऱ्या व्यावसायिकांमुळे सातपूर गावाचा श्वास कोंडला गेला असल्याने त्यावर कारवाईची मागणी केली. तसेच या व्यावसायिकांना योग्य ठिकाणी जागा देण्याची सूचनाही त्यांनी मांडली. यावर नगरसेविका पाटील यांनी अशोकनगरला महापालिकेने मार्केटसाठी आरक्षित केलेला भूखंड ताब्यात घेत रस्त्यांवर बसणाऱ्या व्यावसायिकांसाठी देण्याबाबत सांगितले.

यावेळी उपायुक्त फडोळ यांनी बैठकीत नगरसेवकांनी मांडलेल्या सुचनांना समजावून घेत उत्तरे दिली. बैठकीद्वारे महापालिकेने जाहीर केलेल्या हॉकर्स झोनची अंमलबजावणी तातडीने करीत या 'नो हॉकर्स झोन'मध्ये सातपूर भागातील सर्वच मुख्य रस्ते घेण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यांवरील व्यावसायिक हटविल्यास निश्चितच रस्ते मोकळा श्वास घेणार, असा विश्वास आता व्यक्त होत आहे. त्यातच शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर व्यावसाय करणाऱ्यांना स्थलांतरित व्हावे लागणार असल्याने वाद होण्याची चिन्हे आहेत. याच बैठकीत हॉकर्स झोनचे स्वागत करून संघटनेचे अध्यक्ष चव्हाण यांनी हॉकर्स झोनची जागा या ग्राहक येणार नाहीत अशा ठिकाणी आल्याने त्याबदलून मिळाव्या, अशी मागणी केली. सातपूर प्रभागातील एकूण २० मुख्य रस्ते 'नो हॉकर्स झोन' घोषीत करण्यात आले आहेत.

असे आहेत नो हॉकर्स झोन

g एबीबी सर्कल ते पपया नर्सरी

g समृद्धनगर, अशोकनगर

g शिवाजीनगर ते बारदान फाटा

g पपया नर्सरी ते एक्स्लो सर्कल

g जेहान सर्कल ते गंगापूर गाव

g एबीबी सर्कल ते जेहान सर्कल

g सातपूर गाव कमान ते दादोबा पुलापर्यंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना आले ‘अच्छे दिन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यानंतर नाशिककरांना विकास अपेक्षित असताना गेल्या चार महिन्यांतील घडामोडी या नागरिकांच्या विकासाऐवजी नगरसेवकांच्या विकासाला पूरक ठरत आहेत. राज्याच्या नगरविकास विभागाने शनिवारी महापालिका नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात ब वर्ग महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन १५ हजार रुपये करण्यात आले आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन आता साडेसात हजारांवरून १५ हजार रुपये झाले आहे. त्यामुळे नगरसेवकांना अच्छे दिन आल्याचे चित्र आहे.

राज्याच्या नगरविकास विभागाने शनिवारी नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अ, ब, क व ड वर्गातील महापालिकांच्या नगरसेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. नाशिक महापालिका ही ब वर्गात आहे. राज्य सरकारने ब वर्गाच्या नगरपालिकांच्या मानधनात दुपटीने वाढ केली आहे. महापालिकेत सध्या नगरसेवकांना साडेसात हजार रुपयांचे मानधन मिळत आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील सदस्यांना १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना चांगलाच दिलासा मिळाला. या मानधनवाढीमुळे महासभेच्या भत्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून, विकासकामासाठी अगोदरच निधी नाही. यापूर्वीच नगरसेवकांच्या मानधनावर दरमहा ९ लाख १५ हजार रुपये खर्च होत होते. आता या निर्णयामुळे ही रक्कम १८ लाख तीस हजार रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवरच भार येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना रडारवर घेतले असून, हॉस्पिटल्स आणि आरोग्य केंद्रांची अचानक तपासणी सुरू केली आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असून, बिटको हॉस्पिटलच्या प्रमुखासह तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना हलगर्जीपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

वैद्यकीय विभागाचे सध्या आयुक्तांकडून ऑपरेशन सुरू असून, येथील कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच वैद्यकीय विभागातील ४४ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय विभागाने आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटल्सची तपासणी सुरू केली आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे मोरवाडी, पिंपळगाव खांब, वडनेर या तीन आरोग्य केंद्रांची तपासणी करण्यात आली. वडनेर आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. पंकज सोनवणे यावेळी गैरहजर आढळून आले. फिरत्या रजिस्टरमध्ये त्यांनी नोंद केलेली नव्हती. त्यामुळे सोनवणे यांना नोटीस बजावण्यात आली. बिटको हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. फुलकर यांनाही कामात हलगर्जीपणा केला म्हणून नोटीस बजावली आहे. येथील डॉ. कांचन लोकवानी आणि सुरक्षारक्षक गायकवाड यांना कुत्र्याच्या प्रवेशावरून नोटीस बजावली आहे. आठ दिवसांत खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

---

सोनोग्राफी केंद्रांची तपासणी

वैद्यकीय विभागाने सोनोग्राफी केंद्रे आणि खासगी रुग्णालये पुन्हा रडारवर घेतली आहेत. येत्या सोमवार (दि. १७)पासून शहरातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जाणार आहे. शहरातील २९९ केंद्रांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. ३१ जुलैपूर्वी वैद्यकीय विभागाकडे हॉस्पिटल्सच्या पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी अर्ज न करणाऱ्या हॉस्पिटल्सचीही तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरोडला हवे वीज तक्रार केंद्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथे वीज तक्रार केंद्र नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या हे केंद्र नाशिकरोड येथे असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. जेलरोडला केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरातील सर्वपक्षीय नगरसेवकही केंद्र सुरू करण्याच्या बाजूने आहेत.

नाशिकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सदोष मीटर, विजेचे अवास्तव बील याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्षांच्या नेत्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन गांभीर्य लक्षात आणून दिले होते. त्याची दखल घेत महावितरणने नाशिकरोडला दोन ठिकाणी तक्रार निवारण शिबिरेही घेतले. तक्रार करणाऱ्यांमध्ये जेलरोडच्या नागरिकांची संख्या लक्षणीय होती. यावरून जेलरोडला तक्रार निवारण केंद्र सुरू होणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट होते.

कार्यवाही नाही

जेलरोडला वीज तक्रार केंद्र सुरू करावे या मागणीचे निवेदन महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना जेलरोडच्या सर्वपक्षीय नेत्यांनी नुकतेच दिले होते. त्यावेळी शिवसेनेचे विक्रम खरोटे, नगरसेवक दिनकर आढाव, शंकर धनवटे, सचिन हांडगे आदींसह नागरिक उपस्थित होते. मात्र निवेदन देऊनही कार्यवाही झालेली नाही. आता या मागणीला प्रभाग सभापती सुमन ओहोळ, नगरसेवक विशाल संगमनेरे, मिलिंद रसाळ, बाळासाहेब शेलार, संपत शेलार, अनिल गायखे, रामू फणसे, धनाजी टिळे यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तातडीने याबाबत विचार होऊन केंद्र सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसरा दिवसही पावसाचा

$
0
0

टीम मटा

गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर चांगलाच जोर धरला. शनिवारीही त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक, नांदगाव, कळवण आदी तालुक्यात पाऊस झाला. बागलाण आणि मालेगाव तालुक्यात मात्र अजूनही दमदार पावसाची गरज आहे. चांदवड, येवला आणि देवळा तालुक्यातही तूरळक सरी बरसल्या.

इगतपुरी तालुक्यात ३३८ मिम‌ी पाऊस

म. टा. वृत्तसेवा, घोटी

तालुक्यातील घोटी शहरासह व कसारा घाट व पाश्चिम घाट माथ्यावर गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेे. गेल्या दोन दिवसात ३३८ मिम‌ी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाच्या सरासरीने दीड हजाराचा टप्पा पार केला आहे. या चार दिवसांच्या पावसाने धरणसाठ्यांतही वाढ झाली आहे.

घाटमाथ्यावरील इगतपुरी, घोटी, भावली, मानवेढे, काळूस्ते, वैतरणा पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील शेती जलमय झाली आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासांत १४५ मिम‌ी पावसाची नोंद झाली. तर आजपर्यंत तालुक्यात १ हजार ६३२ मिलीम‌ीटर पाऊस झाला आहे. दरम्यान सरासरीने हजारीचा टप्पा पार केल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान शनिवारी तालुक्यातील भावली धरण परिसरात सर्वाधिक १२७ मिम‌ी, इगतपुरी परिसरात १४५ मिम‌ी, घोटी परिसरात ६८, दारणा धरण परिसरात ११४ मिम‌ी असा विक्रमी पाऊस झाला आहे.

दारणातून विसर्ग

तालुक्यात सर्वत्र पाउस झाल्याने दारणा धरणातून ९ हजार ७९०, तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून आजपर्यत ३५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्व धरणांनी उन्हाळ्यात तळ गाठला होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणांच्या साठवण क्षेमतेत वाढ झाली आहे. दारणा व भावली धरणात अनुक्रमे ७५ व ६६ टक्के वाढ झाली आहे. शनिवारी दारणा धरणात १ हजार ७२८ दलघफू तर भावली धरणात ९५८ दलघफू साठा आहे. त्र्यंबक तालुक्यात शनिवारी दिवसभर पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी बरसल्या. दोन दिवसाच्या पावसामुळे गंगासागर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नमामि गोदा’चा क्रांतिदिनी गजर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गोदावरी नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी संत, सरकार आणि समाज यांच्या प्रयत्नांतून दि. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी नमामि गोदा महाअभियान सुरू केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह त्याचे नाशिक येथे उद्घाटन करतील, अशी माहिती नमामि गोदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, उपाध्यक्ष व अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. सचिव धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव, मिलिंद दंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राजेश पंडित व उदगीरकर यांनी सांगितले, की गोदावरीबाबत जनतेची अनास्था दूर करून गोदा स्वच्छतेत त्यांचा सहभाग वाढविणे, गोदाप्रश्नी सरकारपर्यंत आवाज पोहोचविणे, आपत्ती टाळणे हा अभियानाचा उद्देश आहे. डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हे त्र्यंबकेश्वरपासून आंध्रमधील राजमुंद्रीपर्यंत राबविले जाईल. अभियानात समाज, शाळा, कॉलेजेस गोदावरीशी जोडले जावेत यासाठी प्रयत्न केले जातील.

---

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

पहिल्या टप्प्यात नाशिकमधील ४० शाळा निवडून आठवीच्या पुढील विद्यार्थी, तसेच पालक-शिक्षकांची स्पर्धा घेतली जाईल. १) गोदावरी, तिच्या उपनद्या, नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण, अतिक्रमण, स्वच्छता व उपाय, २) उपलब्ध पाण्याचा योग्य वापर व नियोजन, ३) पाणी उपलब्धतेनुसार पीकपद्धती, ४) गोदावरी मातेबाबत कुठलीही संकल्पना, असे स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धेतील शाळांमधून २० गोदावरीरक्षक/सेवक निवडले जातील. शाळांमधून येणाऱ्या संकल्पना गोदा अभियानासाठी वापरल्या जातील. शाळांनी वरील विषयांतर्गत निबंध, चित्र, काव्य, पोस्टर, पथनाट्य, नृत्य, गायन आदी कोणतीही एक स्पर्धा घेऊन २० विद्यार्थी निवडून त्यांची नावे दंडे ज्वेलर्स, दत्त मंदिर, नाशिकरोड येथे पाठवावीत. या विद्यार्थ्यांना गोदासेवक/गोदारक्षक म्हणून ९ ऑगस्ट रोजी डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते सन्मानित केले जाईल. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी, शिक्षक, पालकांना गोदा अभियानात सहभागी केले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळी गटारींची सीबीआय चौकशी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नालेसफाईच्या चौकशीकडे दुर्लक्ष केल्याने सध्या नाशिककरांना पावसाळी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नालेसफाईच्या चौकशीच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी पावसाळी भुयारी गटार योजनेची चौकशी सीबीआयमार्फत करू, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारीही गोंधळात पडले आहेत.

पावसाळी गटार योजनेतील कामांना राज्य सरकारनेच यापूर्वी क्लीन चिट दिली आहे. त्यातच सध्या महापालिकेत नालेसफाईचा मुद्दा गाजत आहे. नालेसफाईच्या चौकशीची मागणी नागरिकांसह विरोधकांनी अनेक वेळा केली. परंतु, या मागणीकडे महापौरांनी वारंवार दुर्लक्ष केले आहे. त्यातच आज पंचवटीत महापौरांनी एका कार्यक्रमात बोलताना पावसाळी गटार योजनेची सीबीआयमार्फत चौकशी करू, अशी घोषणा केली. त्यामुळे सगळेच जण आश्चर्यचकित झाले. सध्या नालेसफाईच्या चौकशीची मागणी होत असताना महापौरांनी भुयारी गटारीच्या चौकशीची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे महापौरांच्या या अफलातून घोषणेची चर्चा सुरू आहे. सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकारला प्रस्ताव द्यावा लागतो. परंतु, या प्रक्रियेची माहिती न घेताच त्यांनी परस्पर घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकाऱ्यांना भरला दम

$
0
0

काम न केल्यास घरी पाठविण्याचा पवारांचा इशारा


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये सुरू असलेल्या गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांमधील हेव्यादाव्यांमुळे पक्षाचे झालेले नुकसान बघून संतप्त झालेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांचे कान टोचलेे. मागील काळातील चुकांची कबुली देत, राष्ट्रवादीत आता कोणताही गट नको, हेवेदावे नकोत अन् फोटोंवरून वादही नकोत असा सल्ला देत काम करा अन्यथा घरी बसा, असा सज्जड दमच त्यांनी पदाधिकाऱ्यांना भरला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना पवार आणि तटकरे यांनी पक्षाच्या सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करीत पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत खरडपट्टी काढली. गावात, वार्डात पक्षाचा उमेदवार निवडणून आणता येत नाही अन मोठं मोठी पदे घेऊन बसलात. निवडणुकांमध्ये पक्ष विरोधात काम करणाऱ्या गद्दारांना पक्षातून हाकलून लावा या शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले. चुकीच्या गोष्टींना वेळेत आवर न घातल्यास पक्षाला त्याचा फटका बसतो. यासाठी येत्या दोन महिन्यांत पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी तयार करा, कामात सुधारणा करावी. अन्यथा सप्टेंबर महिन्यात आढावा बैठकीत घरी बसविले जाईल, असा सज्जड इशारा पवारांनी दिला.

सत्तेच्या काळात पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली देत पवार म्हणाले, की पक्षाचा कणा असलेल्या अन् आम्हाला ताकद देणारा सामान्य कार्यकर्ता पदापासून वंचित राहिला. पक्षातील अतंर्गत गैरसमज व कुरघोड्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसला आहे. सोपवलेली जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी पार पाडली की नाही हे बघण्यासाठी बाहेर पडलो आहे. संघटनेत काम करताना कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाणे गरजेचे आहे. कार्यक्रमात नाव नाही, होर्डिंगवर फोटो नाही म्हणून येणारे रूसवे-फुगवे सोडून द्या, यातून कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखविणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संघटनेत चांगले वर्तन करणारे कार्यकर्ते हवे, उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाला आवश्यकता नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटनेत स्वच्छ चारित्र्य असलेले कार्यकर्ते असावेत. विविध २४ सेलच्या अध्यक्षापासून सर्व कार्यकारिणी तयार करून यात समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेनकोट खरेदीची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागात गेल्या वर्षी खरेदी केलेल्या वादग्रस्त रेनकोट खरेदीतील भ्रष्टाचार ‘मटा’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर या वृत्तमालिकेची आदिवासी आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. रेनकोट खरेदी प्रकरणात कळवण आणि नाशिकसह अन्य प्रकल्पांमध्ये झालेल्या दरांच्या तफावतीसंदर्भात संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच रेनकोटची गुणवत्ता तपासलेल्या लॅबच्या वस्तुस्थितीचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे. दुसरीकडे धुळे आणि नंदुरबारमधील प्रस्तावित निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणात सहभागी असलेल्या आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने लागलीच बदलीसाठी प्रयत्न सुरू केला असून, थेट मंत्रालयातून दबाव आणला जात आहे. आदिवासी विकास विभागात गेल्या वर्षी आश्रमशाळांमधील पावणेदोन लाख मुलांसाठी खरेदी करण्यात आलेल्या रेनकोटच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे. प्रकल्प अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमत करून आदिवासी विभागाला कोट्यवधीचा चुना लावल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. एकाच रेनकोटची कळवण प्रकल्पात १७९ रुपये, तर नाशिकसह अन्य प्रकल्पांमध्ये तब्बल ४९७ रुपयांमध्ये पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील अनियमिततेवर ‘मटा’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करत प्रकाश टाकल्यानंतर आदिवासी आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात कुलकर्णी यांनी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या खुलाशानंतर संबंधितांविरोधात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरांमध्ये एवढी तफावत कशी, असा जाब त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारला आहे. सोबतच यात अनियमितता झाल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदाराकडून जास्तीची रक्कम वसूल करण्यासंदर्भातील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ठेकेदारांना फेव्हर करणाऱ्या प्रकल्पाधिकाऱ्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.

मुंडेंची लक्षवेधी

‘मटा’च्या या वृत्तमालिकेची दखल आदिवासी विभागासोबतच विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. मुंडे यांच्या वतीने येत्या विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सादर केली जाणार आहे. अधिवेशनात विभागाच्या या भ्रष्टाचारावर आपण आवाज उठवणार असल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनातच रेनकोट खरेदीचा वाद गाजणार हे आता स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृउबा’च्या कारभाराचे पत्राद्वारे वाभाडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर अविश्वास आणून तो मंजूर करण्यापर्यंतच्या हालचालींत पडद्यामागून काम करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना चपराक देणारे खरमरीत पत्र त्यांच्याच पक्षाच्या समन्वयकाने पाठविल्यामुळे भाजपचे स्थानिक नेते तोंडघशी पडण्याची चिन्हे आहेत. संबंधित नेत्यांसाठी बूमरँग ठरू शकणारे हे पत्र मनोगत मासिकाचे समन्वयक रवींद्र अमृतकर यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाठविले असून, त्याची प्रत मुख्यमंत्री, पालकमंत्री, पणनमंत्री व पणन संचालकांना दिली आहे.

नाशिक बाजार समितीच्या गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आजी आणि माजी संचालकांनी सुमारे पाचशे कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी व संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आल्यामुळे भाजपचे सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. या पत्राबरोबरच अमृतकर यांनी नाशिक बाजार समितीमधील गैरव्यवहार आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आजी-माजी संचालक, विविध सरकारी अधिकारी यांनी केलेल्या संघटित लुटीची काही प्रकरणेही माहितीसाठी आणि चौकशीसाठी दिली आहेत. त्याबरोबरच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजार समिती संचालकांच्या दुष्टचक्रातून दिलासा, न्याय द्यावा आणि यापुढील काळात तरी बाजार समितीत शेतकरीहिताची कामे होतील असे निर्णय व्हावेत, यासाठी शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

--

रेडीरेकनेरपेक्षा कमी दराने विक्री

बाजार समितीकडे मुख्य मार्केट नाशिक महालक्ष्मी थिएटरजवळ (१८ एकर), पेठरोड (७२ एकर), नाशिकरोड (५ एकर), हरसूल, पेठ, त्र्यंबकेश्वर (५५ गुंठे) इतक्या जागा आहेत. गेल्या वीस वर्षांत बाजार समितीच्या मालकीच्या जागांची विक्री रेडीरेकनर दरापेक्षा कमी दराने करून त्या-त्या वेळच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले असल्याचे पत्रात म्हटले आहे.

--

जप्त मालमत्तेची विक्री

बाजार समितीने जप्त झालेली मालमत्ता परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न करूनही राज्य बँकेने त्याबाबत बाजार समिती सदस्यांवर कायदेशीर कारवाई न करणे, बाजार समिती या कर्जदाराची मालमत्ता जप्त केल्यानंतरही त्यांना सामोपचार योजनेत सामील करणे, सामोपचार योजना लागू केल्यास कर्जदाराची मालमत्ता विक्री करता येत नसताना अशी मालमत्ता (मंजूर प्लॅनमध्ये अस्तित्वात नसलेले प्लॉट व एफएसआय) बँक व बाजार समिती यांनी सिक्युटरायझेशन कायद्यानुसार शासकीय दरापेक्षा कमी दरात विक्री करणे, ही बाब संशयास्पद असून, या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केलेल आहे.

---

नूतनीकरणात नुकसान

आरटीओ-पेठरोडसमोरील बाजार समितीची जागा संपादित झाल्यानंतर त्याच्या नूतनीकरणापासून नुकत्याच झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणापर्यंत सुमारे वीसहून अधिक टप्प्यांत बाजार समितीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आठ महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६४ कोटींच्या गैरव्यवहाराबाबत सुरू केलेल्या चौकशीबाबत प्रगती नसल्याची बाबही पत्रात नमूद आहे.

--

७०० दिवसांचा हिशेब नाही

३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पाच महिने आधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाजार समितीची कागदपत्रे झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ताब्यात घेतली आहेत. बाजार समितीने नुकतेच सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी या ७०० दिवसांचे म्हणजे दोन आर्थिक वर्षांचे दैनंदिन कामकाजाचे हिशेबपत्र, खतावणी, आर्थिक पत्रके तयार नसल्याचे पत्राद्वारे कळविल्याची बाबही अधोरेखित करण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images