Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आत्मविश्वासानेच स्वप्नपूर्ती शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेमिना मिस इंडिया २०१७ या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविणे केवळ प्रयत्नांतील सातत्य, महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावरच साध्य झाले. ही त्रिसूत्री तुम्हीही बाळगा, यश नक्की मिळेल, असा सल्ला फेमिना मिस इंडिया स्पर्धेची उपविजेती प्रियांका कुमारी हिने तरुणाईला दिला.
के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने प्रियांका हिच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. फेमिना मिस इंडियाची उपविजेती प्रियांका ही नाशिकच्या के. के. वाघ वाघ इंजिनीअरिंग कॉलेजची माजी विद्यार्थिनी आहे. त‌िने २०१३ मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग या विषयात पदवी घेतली आहे. येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त‌िला टीसीएस कंपनीत करिअरची संधी मिळाली होती.
यावेळी सत्काराला उत्तर देताना तिने कॅम्पसमधील तरुणाईशी संवाद साधला. प्रियांका कुमारी म्हणाली, ‘मिस इंडियासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होणे आणि फेमिना मिस इंडिया २०१७ चे उपविजेतेपद पटकाविणे हा प्रवास अविस्मरणीय होता. यासाठी कुटुंबातील पार्श्वभूमी नव्हती. संशोधक वृत्ती आणि चांगल्या निरीक्षण क्षमतेचाही फायदा महाविद्यालयीन जीवनात झाला. एकदा या क्षेत्रात करिअर करण्याचे ध्येय ठरल्यानंतर प्रत्येक गोष्ट कठीण वाटत होती. मात्र, स्पर्धेच्या कालावधीत मिळालेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाने आत्मविश्वासात दुप्पट वाढ झाली. दुर्बल आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या निरागस लहान मुलांसाठी भविष्यात चांगले कार्य उभारण्याचा मानसही प्रियांका हिने यावेळी बोलताना व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नांदूरकर आणि मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. मुरुगकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त अशोक मर्चंट, डॉ. शाहबादकर, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपळगावची प्रभाग रचना गुगलद्वारे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीत या वर्षाअखेरीस निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुगलद्वारे नकाशा तयार करून प्रभाग रचना केली असल्याचे मंडळ अधिकारी एस. ए. शेख यांनी स्पष्ट केले. कोणत्याही नेत्याच्या सल्ल्याने किंवा दबावाने प्रभाग रचना केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. तरी अनेक इच्छूक उमेदवारांसाठी सदर आरक्षण गैरसोयीचे झाल्याने संबंधित इच्छुक उमेदवार प्रभाग रचना व आरक्षणावर हरकत घेणार असल्याचे समजते.

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीची निवडणूक या वर्षअखेर होत आहेत. निवडणुकीची वॉर्ड रचना आणि जागेचे आरक्षण मंडळ अधिकारी एस. ए. शेख यांनी ग्रामसभेत जाहीर केले. या निवडणुकीसाठी सहा प्रभाग आणि सतरा जागांचे नियोजन असून, नव्याने रचना केलेल्या प्रभागाची व जागांच्या आरक्षणाची ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयासमोरील आवारात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, विस्तार अधिकारी आर. के. सदगिर, तलाठी संजय गांगुर्डे आदींसह भास्कर बनकर, सरपंच महेंद्र गांगुर्डे, गणेश बनकर आदी, किरण लभडे, प्रशांत घोडके, आशिष बागुल, राजा गांगुर्डे, सुधाकर मेंगाने, कांतीलाल भंडागे, चंद्रकांत बनकर, संदीप बनकर, महेंद्र साळवे, अशोक शिंदे, तानाजी खोडे, उमेश बनकर, रामकृष्ण खोडे, नकुल शिंदे, विलास हानफोडे, उपस्थित होते.

११ जुलैपर्यंत हरकती

ओबीसी पुरूष, ओबीसी स्त्री, एस. टी. स्त्री, एक जागा सर्वसाधारण स्त्री याप्रमाणे सहा प्रभागातील १७ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आरक्षणानूसार ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. दरम्यान, या प्रभाग रचना व जागेच्या आरक्षण संदर्भात नागरिकांच्या काही हरकती असल्यास ४ ते ११ जूलै या दरम्यान निफाडचे तहसीलदारांकडे हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

असे आहे आरक्षण

प्रभाग क्र १ (तीन जागा)

एस. टी. पुरूष, एस. सी. स्त्री, ओबीसी स्त्री

प्रभाग २ (दोन जागा)

सर्वसाधारण पुरूष, सर्वसाधारण स्त्री

प्रभाग ३ (तीन जागा)

एस. टी. पुरूष, सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री

प्रभाग ४ (तीन जागा)

एस. सी. पुरूष, सर्वसाधारण पुरूष, सर्वसाधारण स्त्री

प्रभाग ५ (तीन जागा)

ओबीसी पुरूष, ओबीसी स्त्री, एस. टी. स्त्री

प्रभाग ६ (तीन जागा)

ओबीसी पुरूष, एस. टी. स्त्री, सर्वसाधारण स्त्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंत्यसंस्काराचा ‘पारदर्शक’ ठेका वादात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या सत्ताकाळात पालिकेत पारदर्शक कामकाज होईल, अशा अपेक्षेत असलेल्या नाशिककरांची निराशाच होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्मशानभूमीतील मोफत अंत्यसंस्काराच्या दीड कोटींचा ठेका निविदा न काढताच देण्याची तयारी पालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. भाजपच्या या ‘पारदर्शक’ कामकाजावर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बोट ठेवत हा ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कामकाज पद्धतीवर निशाणा साधला जात असल्यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

गेल्याच आठवड्यात नालेसफाईच्या चौकशीवर पाणी लोटल्यानंतर आता शहरातील स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यसंस्काराचा दीड कोटींचा ठेका हा निविदा न देण्याची तयारी भाजपच्या चांगलीच अंगलट येत आहे. ५० हजाराचे कोणतेही काम हे इ-निविदा पद्धतीने देणे बंधनकारक असतांना मोफत अंत्यसंस्काराच्या नावाखाली चक्क दीड कोटीचे काम अभिस्वारस्य प्रस्तावाद्वारे देण्याची घाई आरोग्य विभागाला झाली असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. विशेष म्हणजे महासभेनेही या ‘लगीन घाई’ला मंजुरी दिल्याने भाजपच्या पारदर्शक कामकाजाचे पितळ उघड झाल्याचा आरोपही बोरस्ते यांनी केला आहे. या ठेक्याला मंजुरी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शहरातील स्मशानभूमींमध्ये मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी दरवर्षी एक कोटी ५० लाख ६२ हजार रुपयांचा प्रस्ताव महापालिका आणि स्थायी समितीत नुकताच मंजूर करण्यात आला. मात्र निविदा काढण्याऐवजी ठेकेदारांच्या अभिस्वारस्य प्रस्तावाद्वारे हे काम करण्याचा उल्लेख करण्यात येणार आहे. विभागनिहाय पारंपरिक मक्तेदारांकडूनच हे काम करून घेण्याची तयारी आरोग्य विभागाने केली असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे.

पालिकेतील ५० हजार रुपयांवरील कोणतेही काम हे इ-निविदा पद्धतीने करण्याचे बंधनकारक आहे. परंतु दीड कोटीच्या कामात निविदा न मागवताच निवडक ठेकेदारांच्या भल्यासाठी ठेका दिला जात आहे. इ-निविदेत स्पर्धा होवून पालिकेला त्याचा आर्थिक फायदा होवू शकतो. परंतु अभिस्वारस्य प्रस्तावाद्वारे ठेका देवून पालिकेचे आर्थिक हित डावलले जात असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला आहे. यापूर्वीच्या ठेकेदारांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. तरीही केवळ ठेकेदाराचेच हित जपले जात असल्याबद्दल बोरस्ते यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच मंजूर डॉकेटची अंमलबजावणी न करण्याची मागणी केली आहे.

-

ठेकेदारांवर मेहरबानी

मोफत अंत्यसंस्काराच्या ठेक्याचा वाद हायकोर्टापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे ठेकेदार बदलणे आवश्यक असतांना आरोग्य विभाग मात्र त्याच ठेकेदाराचे हित जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. ठेका संपल्याच्या तीन महीने अगोदर नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश असतांनाही आरोग्य विभाग या ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडाळा भागात पाण्यासाठी वणवण

$
0
0

पाणीपुरवठा करण्याची रहिवाशांकडून मागणी

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पावसाळा सुरू होऊन महिना झाला असून, मागील आठवड्यापासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तरीही वडाळा गावात मात्र नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रस्त्यांवर चिखल आणि पाण्याचे डबके असताना घरात मात्र पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नसल्याचे चित्र सध्या वडाळा गावात बघावयास मिळत आहे. बुधवारी (दि. ५) याबाबतच्या समस्येची पाहणी परिसरातील नगरसेवकांसह महापालिका अधिकाऱ्यांनी केली.

इंदिरानगर भागातील वडाळागाव परिसरातील मेहबुब नगर परिसरात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत असतात. यावर उपाय म्हणून नगरसेवकांनी थेट महापौरांसह बैठकीचे आयोजन केले होते. मात्र त्यानंतर वडाळा गावात उन्हाळ्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र नंतर पावसाळा सुरू झाल्याने हे टँकर बंद करण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याचे लक्षात आले. पाऊस पडत असला, धरणात पाणी असले तरीसुद्धा नागरिकांच्या घरात पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी यासंदर्भात नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वन्यजीव’मध्ये पुढाऱ्यांचा जीव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने वन्यजीव क्षेत्रातही सोयीच्या मंडळींची वर्णी लावण्याचा घाट घातल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख आणि अमित खरे या दोघांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या विश्वरुप राहा यांचा पत्ता कट करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्य सरकारच्यावतीने वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली जाते. राज्याच्या महसूल व वनविभागाने या संदर्भातील नियुक्त्या विशेष कार्य अधिकारी स्वप्निल देशभ्रतार यांच्या स्वाक्षरीने जाहीर केल्या आहेत. आगामी तीन वर्षांसाठी राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये वन्यजीव रक्षक जाहीर करण्यात आले आहेत. वने आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी मदत होण्याकरिता या नियुक्त्या केल्या जातात.

वनविभागाला योग्य तो सल्ला लाभावा, मार्गदर्शन मिळावे, लोकसहभाग वाढावा, वनविभाग आणि नागरिक यांच्यात संवाद वाढावा, संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना व्हावी, या हेतूने मानद वन्यजीव रक्षक ही संकल्पना राबविण्यात येते.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच आगामी तीन वर्षांसाठी मानद वन्यजीव रक्षकांची यादी घोषित केली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये विकास देशमुख आणि अमित खरे यांची नावे आहेत. देशमुख भाजपशी संबंधित असल्याने राजकीयदृष्ट्या त्यांची याठिकाणी वर्णी लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर, यापूर्वी नाशिकमध्ये मानद वन्यजीव रक्षक म्हणून तब्बल १६ वर्षे काम पाहिलेले विश्वरुप राहा यांचे नाव यंदाच्या यादीत नाही. त्यामुळे त्यांना डावलून देशमुख आणि खरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप वने आणि वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनी केला आहे.

राहा यांनी बोरगड क्षेत्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. गंगापूर धरणाच्या ठिकाणी येणारे पक्षी असो, की शहर परिसरातील वनांचे संरक्षण याबाबत त्यांचे मार्गदर्शन मोलाचेच ठरले आहे. असे असताना त्यांना डावलण्यात आल्याने पर्यावरण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.

काय फायदा होणार?

नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. हे वनक्षेत्र टिकविण्यासाठी आणि त्यात वाढ करण्यासाठी देशमुख आणि खरे यांचे योगदान लाभणार का? तसेच जिल्ह्यातील बिबट्यांचा मानवी वस्तीकडे असलेला ओढा, त्यातून वाढलेला मानव-वन्यप्राणी संघर्ष यावरही या दोघांचा सल्ला, मार्गदर्शन फलदायी ठरणार का, असा प्रश्न वन आणि पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावस्त्राला फटका!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

स्त्री मनाला भुरळ घालतानाच अगदी सातासमुद्रापार पोहोचलेल्या भरजरी, जरतारी नक्षीदार अशा महाराष्ट्राचे महावस्त्र पैठणीला ‘जीएसटी’चा फटका बसणार आहे. देशभरात एकच करप्रणालीसाठी केंद्र शासनाने आणलेल्या या ‘जीएसटी’त यापूर्वी कोणताही कर नसलेल्या हातमाग उद्योगातील रेशीमवर पाच टक्के कर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य विणकरांची मोठी पंचाईत झाली आहे. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहरातील असंख्य विणकरांना हा ‘जीएसटी’ चांगलाच तापदायक ठरणार असल्याने विणकरांमध्ये चिंता पसरली आहे. विशेषतः येथील बहुसंख्य विणकरांची उलाढाल वीस लाखांच्या आत असल्यामुळे त्यांना जीएसटी रज‌िस्ट्रेशन असणार नाही, पर्यायाने त्यांना जीएसटीचा परतावाही मिळणार नसल्याने साहजिकच येत्या काळात रेशमी धाग्याची ही पैठणी महागणार आहे.

येवला शहरामध्ये जवळपास आठ हजारांच्या आसपास हातमाग असून, त्यावर सुमारे दहा हजारांहून अधिक विणकर हे पैठणी वस्त्र विणण्याचे काम करतात. यापूर्वी पैठणी विणकामासाठी कुठलाही कर नसलेला कच्चा माल उपलब्ध होत होता. मात्र एक जुलैपासून पैठणीसाठीच्या विणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या रेशीमवर ‘जीएसटी’ लागणार आहे. रेशीमच्या कोष व कच्च्या धाग्यावर ‘जीएसटी’ नसला तरी तो या पैठणी विणकामासाठी लागणाऱ्या तीनतारी रेशीमवर पाच टक्के आकारण्यात येणार आहे. परिणामी रेशमाचे भाव वाढताना साहजिकच पैठणी देखील किंमतीच्या बाबतीत पूर्वीच्या तुलनेत अधिक भाव खाणार आहे. परिणामी पुढील काळात पैठणीवर नजर ठेवून असणाऱ्या स्त्र‌ियांना अधिकचे दाम मोजावे लागणार आहेत.

नोंदणी नसल्यामुळे परतावाही नाही

कोष व त्यापासून बनवलेल्या धाग्यावर जीएसटी नाही. मात्र, जो तीनतार बनवणार आहे त्याचेवर जीएसटी आहे. त्याचमुळे रेशमाचे भाव हे पाच टक्के वाढणार आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य पैठणी विणकरांना बसणार आहे. विणकरांची उलाढाल वीस लाखांच्या आत असल्याने त्यांचे जीएसटी रज‌िस्ट्रेशन नसणार व पर्यायाने त्यांनी रेशीम व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या रेशमावरील जीएसटीचा परतावा त्यांना मिळणार नसल्याचे आज तरी दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवसाला अनोखा ‘भाई’चारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक
सातपूरला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवक योगेश शेवरे याच्या वाढदिवसाला गुन्हेगारी जगतातील अनेक ‘भाईं’नी हजेरी लावली. दस्तुरखुद्द मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा या कार्यक्रमाला हजर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शेवरे याचा वाढदिवस नुकताच त्र्यंबरोडवर महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला गुन्हेगारी प्रवृत्तींचाही भाईचारा दिसून आला. विशेष म्हणजे विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेले एकमेकांचे विरोधक ‘भाई’ वाढदिवसाला एकत्र आल्याने यातून पुढे नेमके काय घडणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विरोधात असलेले भाई विधायक कामांसाठी एकत्र येणे चांगली बाब आहे. परंतु, एखाद्याची खुन्नस काढण्यासाठी एकत्र येऊन अनुचित प्रकार तर घडणार नाही ना, याबाबत पोलिसांनीच सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सातपूर प्रभागाचे नगरसेवक योगेश शेवरे यांचा वाढदिवस नुकताच छोटेखानी कार्यक्रमात साजरा करण्यात आला. पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेल्या शेवरे यांचा पहिल्यांदाच उघडपणे वाढदिवस साजरा झाल्याने एकमेकांच्या विरोधातले भाई एकत्र येत वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. सभागृहनेता दिनकर पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची यादी दिली होती.

वाढदिवसामुळे ट्रॅफिक जाम

त्र्यंबक रोडवरील महिंद्रा सर्कलच्या बाजूला साजरा होत असलेल्या वाढदिवसामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. पाहुण्यांनी रस्त्यातच वाहने उभी केल्याने काही काळ वाहनचालकांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली होती. पोलिसांनीही संबंधित कार्यक्रमाकडे डोळेझाक केल्याने ट्रॅफिक जामचा सामना करण्याची वेळ आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७३ हॉस्पिटल्स होणार नियमित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
निवासी क्षेत्रात बांधण्यात आलेल्या आणि नगररचनासह फायर सेफ्टी आदेशाची पूर्तता करू न शकलेल्या हॉस्प‌िटल्सबाबत तोडगा काढण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने उपाययोजना सुचवल्या आहेत. त्या पालिका आणि आयमाने स्वीकारल्या आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील २७३ हॉस्प‌िटल्सची फायर सेफ्टीसह नगररचनाच्या जाचातून मुक्तता होण्याची शक्यता आहे. पंधरा बेड हॉस्प‌िटल्समधील पाच बेड अत्यावश्यक सेवेसाठी राखीव ठेवण्यासह दहा टक्के हार्डश‌िप प्रीम‌ियम आकारून त्यांना परवानगी दिली जाणार आहे. तसेच फायर सेफ्टीतील काही अटी शर्तीमध्ये या रुग्णालयांना दिलासा मिळाला आहे. परंतु, ज्या हॉस्प‌िटल्सकडे २०१३ पूर्वीचे पूर्णत्वाचे दाखले असतील, त्यांनाच हा लाभ होणार आहे. सुपर स्पेशाल‌िटी हॉस्प‌िटल्ससाठी नियम कायम राहणार आहेत.
महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर निवासी क्षेत्रात हॉस्प‌िटल्स उभे राह‌िले आहेत. सन २०११ मध्ये आरोग्य सेवा संचालनालयाने हॉस्प‌िटल्ससाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला सक्तीचा केला. तसेच प्रचलित अग्निशामक कायद्यानुसार परवानगी बंधनकारक केली. त्यामुळे शहरातील हॉस्प‌िटल्स, नर्सिंग होम आणि प्रसुतीगृहांची अडचण निर्माण झाली. या हॉस्प‌िटल्सच्या परवानगीचा वाद गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू होता. सध्याच्या हॉस्प‌िटल्समध्ये बदल करता येत नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर हॉस्प‌िटल्स विनापरवानाच सुरू होते. आयमा संघटनेकडून याबाबत तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली होती. त्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी तत्का‌लीन अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, नगररचनाचे आकाश बागूल, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने अहवाल सादर केला असून, त्यावर आयुक्तांच्या उपस्थितीत आयमाचे अध्यक्ष डॉ. मगेश थेटे, डॉ. किरण शिंदे, डॉ. संदीप कोतवाल, डॉ. आरती चिरमाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीत दहा आणि पंधरा बेड हॉस्प‌िटलचा तिढा सोडविण्यात आला असून, स्ट्रक्चरच्या बाबतीत काही मुभा देण्यात आली आहे. दहा प्लस पाच अत्यावश्यक सेवेसाठी बेड धरून त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. पाच बेडसाठी अतिरिक्त केलेल्या बांधकामावर अतिरिक्त बांधकामाच्या रेडीरेकनर दरानुसार दहा टक्के हार्डशीप प्रीम‌ियम आकारून त्यांना मंजुरी दिली जाणार आहे.
सिंगल विंडो क्लिअरन्स
या अटी व शर्तींचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी पालिकेत एक खिडकी सुरू केली जाणार असून, हॉस्प‌िटल्सनी नगररचना विभागात आणि फायर विभागात दोन स्वतंत्र प्रस्ताव सादर करायचे आहेत. या दोन्ही विभागांची परवानगी घेतल्यानंतर वैद्यकीय विभागाची परवानगी मिळणार आहे.

या आहेत नवीन अटी

g दहा बेडपर्यंत दीड मीटर ज‌िन्याची अट आता १.२ मीटरपर्यंत शिथ‌िल
g रहिवाशी क्षेत्रात अपार्टमेंटचा नाहरकत दाखला आवश्यक
g व्यावसायिक इमारतीत हॉस्प‌िटल्सला लिफ्ट असेल तर तिसऱ्या मजल्यापर्यंत परवानगी
g मिश्र वापराची इमारत असल्यास दुसऱ्या मजल्यापर्यंत हॉस्प‌िटल्सला परवानगी
g नर्सिंग होमसाठी पार्किंग व्यवस्था नसेल तरी पाच बेडपर्यंत परवानगी
g जादा बांधकामासाठी अतिरिक्त दहा टक्के हार्डश‌िप प्रीम‌ियम
g तळमजल्यावर हॉस्प‌िटल असेल तर फक्त अग्निनिर्वाणके व सूचनाफलक पुरेसे
g दहा बेडपेक्षा जास्त हॉस्प‌िटलसाठी आगशोधक व सूचना यंत्रणा आवश्यक

पाच बेडखालील हॉस्पिटल्सची नोंदणी

सध्या पालिकेत पाच बेडच्या वर असलेल्या हॉस्प‌िटल्सनाच परवानगी दिली जाते. परंतु, ही अटही शिथ‌िल करण्यात आली असून, दोन ते पाच बेडपर्यंतच्या हॉस्प‌िटल्सना परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे शहरातील डॉक्टर्स व नर्सिंग होमना मोठा दिलासा मिळणार असून, शहरातील हॉस्प‌िटल्सची संख्या वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूखंड गुरांना आंदण!

$
0
0

आय. टी. पार्कमधील बंद कारखान्यांच्या जागेवर अतिक्रमण

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक विकास महामंडळाने खास आयटी पार्कसाठी अंबड एमआयडीसीत जागा आरक्षित केली होती. याठिकाणी वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या या आपल्या शाखांसाठी जागा घेत आहेत. मात्र सद्यस्थितीत याठिकाणी आय. टी. कंपन्यांनी विकत घेतलेल्या भूखंडांवर काठेवाडींनी आपली गुरे चरायला सोडली आहेत. त्यामुळे मोकळ्या जागेवर कंपन्या नावावरच दिसत असल्याचे समोर येत आहे. यामुळे तातडीने याबाबत कारवाई करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.

अनेक अडचणींचा सामना करत शहरात येणाऱ्या आय. टी. कंपन्यांसाठी नुकतीच बदली होऊन गेलेले प्रादेशिक अधिकारी यांनी उद्योजकांना भुखंड वितरित केले होते. परंतु, त्यांना देण्यात आलेल्या भूखंडांवर केवळ नावालाच कारखाने टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या आयटी पार्क कारखान्याच्या हिरवळीवर काठवाडींनी जागा घेतली आहे. यात त्यांच्याकडून बंद असलेल्या कारखान्यांच्या जागेवर गुरांचा मुक्त संचार हिरवे गवत खाण्यासाठी होत आहे. जागेवरील संबंधित कारखाना जरी बंद असला तरी परिसरात असलेल्या गवताचा उपयोग तर गुरांसाठी झाला असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत कोणतीही ठोस भूमिका एमआयडीसी प्रशासनाने घेतलेली दिसून येत नाही.

याठिकाणी अनेक कारखाने केवळ नावालाच सुरू आहेत. तसेच आयटी पार्कच्या मोकळ्या जागेवर काठेवाडींनी सहारा घेतला आहे. या कारखान्यांच्या परिसरात त्यांच्या गुरांना हिरवेगार गवत खाण्यासाठी उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे आयटी पार्कच्या नावावर ऑटोमोबाइल्स उत्पादन घेतले जात असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, बदलून गेलेल्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची चौकशी संबधित भूखंडांच्या वितरणाबाबत सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यातच एमआयडीसीच्या अभियंता विभागाकडे संबंधित भूखंडांबाबत माहितीच नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांचे नेमके काम काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

नाशिक एमआयडीसीत आय. टी. पार्कच्या जागेवर नोंदणी केलेल्या मात्र जागा मोकळ्या ठेवलेल्या कंपन्यांबाबत आता पाऊले उचलण्याची गरज आहे. याने नाशिक एमआयडीसीच्या आय. टी. पार्कच्या जागेवर होणारे अतिक्रमण थांबेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात चार हजार किलो मांस जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंबई-आग्रा महामार्गावर टेहेरे श‌िवारात पोलिसांनी मुंबईकडे गोवंश जातीचे मांस नेणाऱ्या दोघांना अटक केली. त्याच्याकडून ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४ हजार किलो जनावरांचे मांस जप्त केले. पिकअपमधून हे मांस वाहून नेत होते.

पोल‌िस उपधीक्षक अजित हगवणे यांचे नेतृत्त्वाखाली भूषण खैरनार, संदीप गुरव, हरीश कोळी यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे टेहरे शिवारात ही कारवाई केली. भारत पेट्रोल पंपासमोरील स्पीडब्रेकरजवळ सापळा रचून मालेगावहून-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपला (एमएच ४१ एजी २२१६) अडव‌िले. वाहनाची तपासणी केली असता त्यात जनावरांचे मांस आढळले. वाहतूक करणारे शेख कुतुबुद्दीन शेख जैनूद्दीन (वय ३० रा. हिरापुरा, मालेगाव), अतिक अहमद मोह. रफिक (वय ३०, रा. सरकार नगर, मालेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. जनावराचे मांस मालक बाबू मुंडी (रा. अयुब्ब नगर मालेगाव) याचा पोलीस शोध घेत आहेत. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर छापा

शहरातील संगमेश्वर व सोयगाव भागातून मंगळवारी अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मंगळवारी सांडावा पुलाजवळील पान टपरीलगत अवैधरित्या दारू विक्री करणारा कुणाल राजेंद्र गायकवाड (वय २१ रा. नवनाथ नगर) यास अटक केली. त्याच्याकडून ५ हजार ७१५ रुपयांच्या विविध कंपनीच्या ३६ विदेशी दारू बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी छावणी पोल‌िसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत सोयगाव भागातील इंदिरानगर येथे पोल‌िस पथकाने छापा टाकला. या कारवाईत गावठी दारू विक्री करणारी महिला सरला तेली हिला पोलिसांच्या पथकाने अटक केली. या महिलेच्या विरोधात कॅम्प पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध रॉकेल, देशी-विदेशी दारू जप्त

विशेष पोल‌िस पथकाने मंगळवारी तीन ठिकाणी छापा टाकून अवैध रॉकेल, देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या पथकाने दुपारी धान्य वितरण अधिकारी व्ही. डी. शिंदे यांच्यासह मुन्शी शबाना नगर येथे छापा टाकला. एकूण १३ हजार ९८ रुपये किमतीचा अवैध रॉकेलसाठा जप्त केला. आरोपी हमीद खान शाहा मोह. खान यास ताब्यात घेतले. रावळगाव येथे छापा टाकून चार हजार रुपयांची देशी-वेदेशी दारू जप्त केली. चेतन चव्हाण व सुनील ठाकरे या दोघांना अटक केली. दाभाडी येथील छाप्यात एकूण दीड हजार रुपयांची देशी दारू जप्त केली. आरोपी सुनील पवार फरारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांनाच ‘पावतेय’ पावती!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
शहरातील हॉकर्स झोननिहाय लायसन वितरणासाठी महापालिकेच्या बाजार करवसुली विभागाने करभरणा केल्याच्या २५ पावत्या जमा करण्याचा अजब फतवा काढून हॉकर्सना वेठीस धरले जात आहे. या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जुन्या तारखेच्या एकत्रित पंचवीस पावत्यांच्या बदल्यात शेकडो रुपयांचा ‘मलिदा’ स्वतःच्या खिशात घालण्याचा सर्रास प्रकार येथील पालिकेच्या विभागीय कार्यालयात घडला आहे. या प्रकारामुळे सन २०१३-१४ पासून बाजार करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांनी पालिकेला लाखो रुपयांचा चुना लावल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
पालिकेच्या वतीने नाशिकरोड शहरात ५२ हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. या हॉकर्स झोनसाठी सन २०१३-१४ साली शहरातील हॉकर्सचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार आता शहरातील सर्व हॉकर्सला पालिकेकडून व्यवसायासाठी झोननिहाय लायसन दिले जाणार आहे. या कामाचा ठेका पालिकेने एका खासगी संस्थेला दिला आहे. हॉकर्स लायसन मिळविण्यासाठी प्रथम सन २०१३-१४ साली झालेल्या सर्वेक्षणातील हॉकर्सचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया नुकतीच राबविली आहे.
हॉकर्स लायसनसाठी अर्ज भरणाऱ्या हॉकर्सकडे बाजार करवसुली विभागाचे कर्मचारी यापूर्वी पालिकेकडे बाजार कर भरणा केल्याच्या पंचवीस पावत्यांची मागणी करीत आहेत. परंतु, बहुतांश हॉकर्सकडे बाजार कर भरणा केल्याचा जुन्या पावत्या उपलब्ध नसल्याने या विभागातील कर्मचारी अतिरिक्त पैसे आकारुन संबंधित हॉकर्सला पंचवीस पावत्या देण्याची व्यवस्था करीत आहेत. त्यापोटी शेकडो रुपयांचा ‘मलिदा’ या कर्मचाऱ्यांनी खिशात घातला आहे.

रक्कम तिजोरीत पोहचलीच नाही

सन २०१३-१४ सालच्या सर्वेक्षणानुसार यादीत नाव असलेल्या हॉकर्सना प्रथम अधिकृत लायसन दिले जाणार आहे. परंतु, यातील बहुतांश हॉकर्सना बाजार कर वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कर भरल्याची पावतीच दिलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून हा गोरखधंदा खुलेआम सुरू असल्याने हॉकर्सकडून वसूल झालेल्या कराची रक्कम हिशोबात न आल्याने ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत पोहचली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात सध्या हॉकर्सची संख्या काही हजारांच्या घरात आहे. याचा अर्थ बाजार कर वसुली विभागात लाखो रुपयांचा गफला झाला असण्याची दाट शक्यता आहे.

शहरातील ५२ हॉकर्स झोनसाठी लायसन नोंदणी सुरू आहे. त्यासाठी केवळ तीनशे रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पावत्या जमा करण्याचे पालिका प्रशासनाने आदेश दिलेले नाहीत.
-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, नाशिकरोड

हॉकर्स लायसनसाठी बाजार करवसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बाजार कर भरल्याच्या पंचवीस पावत्यांची मागणी केली जात आहे. काही हॉकर्सना बाजार कर विभागातील कर्मचाऱ्यांकडून जागेवर पंचवीस पावत्या दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनेक हॉकर्सना बाजार कर भरणा करूनही पावत्या मिळालेल्या नाहीत.
-गौतम सोनवणे, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला आता दररोज पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नियमीत सुरू करण्यात आला आहे. नगराध्यक्षा तृप्ती धारणे यांनी कार्यभार स्वीकारताच हा निर्णय घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच सोमवारी (दि.३) महाराष्ट्र टाइम्सने ‘धरण भरले, मात्र पाणी दिवसाआड’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला.

नगराध्यक्षा धारणे यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. त्याच दिवशी हे वृत्त प्रकाशित झाल्याने त्यांनी दखल घेत नागरिकाना पाणीटंचाईतून मुक्त केले.

पावसाळा सुरू झाला तरीही त्र्यंबक परिसराकडे यंदा पावसाने सुरुवातीला पाठ फिरवली होती. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे शहरालगतचे अहिल्या धरण भरले तरीही शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे धारणे यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला आणि नियमीत पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना संबंध‌ित विभागास दिल्या.

दरम्यान, शहरालगतचे ओव्होरफ्लो झालेल्या आहिल्या धरणाचे जलपूजन नगराध्यक्षा तृप्ती धारणे आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी केले. त्र्यंबक शहराच्या काही भागास या धरणातून पाणीपुरवठा होत असतो. ब्राह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या या धरणात पर्वतराईतून खळाळणारे धबधब्यांचे पाणी जमा होते. त्यामुळे हे धरण लवकर भरते. जलपूजन प्रसंगी नगराध्यक्षा धारणे यांच्या समवेत गटनेते योगेश तुंगार, गटनेते रवींद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव, ललीत लोहगावकर, यशोदा अडसरे, अलका शिरसाठ, अंजनाबाई कडलग, सिंधुबाई मधे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा बाजार समितीत सहा जागांवर संक्रांत

$
0
0

कैलास येवला, सटाणा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आगामी काळात राज्य सहकारी निवडणूक प्राध‌‌ीकरणाच्या माध्यमातून होणार आहेत. सद्यस्थितीत सटाणा बाजार समिती संचालक मंडळावर २१ सदस्यीय संचालक असतांना तब्बल सहा जागांवर संक्रांत येणार आहे. अवघ्या १५ सदस्यांसाठी येत्या काळात निवडणुका होणार असल्याने अनेकांचे स्वप्न भंगणार आहे.

सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीवर २१ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. विकास सेवा सहकारी सोसायटी गटातील संचालक, ग्रामपंचायत गटातील संचालक यासह कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समित्यांची सदस्यांनी निवडून दिलेले सदस्य तसेच पंचायत समिती व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य, व्यापारी, आडते, हमाल व मापारी यांच्यातील सदस्यांचा समावेश होता. परिणामी सर्वच घटकांना यात प्रतिनिधीत्त्व मिळत होते.

शेतकरी प्रतिनिधींना महत्त्व

नव्या अध्यादेशानुसार बाजार समित्यांवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्त्व देण्यात आले आहे. यासाठी किमान १० गुंठे इतकी जमीन धारण करणारे, बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रात वास्तव करणारे, बाजार समितीत गेल्या पाच वर्षांत किमान तीन वेळा ज्याने आपल्या कृषी उत्पन्नांची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्यांनाच निवडणूक लढविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

व्यापारी, हमालांना स्थान नाही

शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार पंधरा सदस्य निवडणूक लढविणार असून, यात १० सदस्य खुल्या पद्धतीने निवडून द्यावयाचे आहेत. दोन महिला, एक इतर मागास प्रवर्ग, एक विमुक्त भटक्या जातीमधील व एक अनुसुचित जाती जमाती या प्रवर्गातील असणार आहेत. यामुळे व्यापारीगट, हमाल मापारी गट, तसेच प्रक्रिया उद्योग या गटातील सदस्यांवर संक्रांत आली आहे. सोसायटी गटातील सर्व सभासदांना यापूर्वी मतदानाचा अधिकार होता. तो या अध्यादेशामुळे रद्द झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक होणार स्टार्टअप व्हिलेज!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
संरक्षण, शेती, मनोरंजन, उद्योग या क्षेत्रांशी संबंधित गुंतवणूक करण्यास नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वाव असल्याने, नाशिकमध्ये स्टार्टअप व्हिलेज स्थापन करण्याच्या खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या मागणीला राज्याच्या प्रधान सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकही लवकरच स्टार्टअपच्या नकाशावर विराजमान होणार आहे. स्टार्टअपच्या नकाशावर स्थान मिळविण्यासाठी राज्यातील नागपूर व औरंगाबाद ही शहरेही नाशिकचे मुख्य स्पर्धक आहेत.

औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य असले तरी येत्या काळात या क्षेत्रात इतर राज्यांची स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळे नव्या योजनांची आखणी करुन त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक बनले आहे. भारत सरकारनेही नीती आयोगाच्या माध्यमातून ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारखे उपक्रम हाती घेतले आहेत. गुजरातसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान व केरळ या पाच राज्यांनी स्वतःचे ‘स्टेट स्टार्टअप अँड इनोव्हेशन पॉल‌सिी’ अंमलात आणली आहे.

नीती आयोगाची मार्गदर्शक तत्वे व महाराष्ट्रातील सर्व भागधारकांची मते लक्षात घेता शासनाकडून ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी-२०१७’ तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई-पुणे येथे स्टार्टअप इकोसिस्टीम उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे नागपूर व औरंगाबाद येथेही मुंबई-पुण्याप्रमाणे स्टार्टअप इकोसिस्टीम विकसित केली जाणार आहे. नाशिकमध्ये मात्र स्टार्टअप इकोसिस्टीम अगोदरच तयार आहे. नाशिक शहरात डिज‌टिल इम्पॅक्ट स्क्वेअर आणि नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर येथे इन्क्युबेशन सेंटर अस्तित्वात आहे. त्यामुळे नागपूर आणि औरंगाबादपूर्वी नाशिकमध्ये अॅक्स‌लिरेटर स्थापन करणे शक्य असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या निदर्शनास आणून दिले. नाशिक येथे अॅक्स‌लिरेटर विकसित करण्याची मागणी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ सादर करतेवेळी केली होती. या अॅक्सिलरेटर कार्यक्रमासाठी पात्र ठरलेले स्टार्टअप्स विविध वित्तिय संस्थांकडून गुंतवणुकीस पात्र ठरतात. किंबहुना असे स्टार्टअप्स बहुतेक वेळा असे अॅक्सिलरेटर उपलब्ध असलेल्या ठिकाणीच आपले उद्योग उभारणीस प्राधान्य देतात. साहजिकच स्थानिक लोकांना रोजगारप्राप्तीसाठी याद्वारे संधी निर्माण होते.

सरकारने नाशिकचा अॅक्सिलरेटर कार्यक्रमात समावेश केल्यास येथे आपोआप विविध स्टार्टअप्सची गुंतवणूक वाढण्यास हातभार लागेल. पर्यायाने नाशिक स्टार्टअप व्हिलेज तयार होईल. रोजगार उपलब्धतेचे प्रमानही आपोआप वाढेल.
- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८ उमेदवार निवडणूक लढण्यास अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा खर्च जिल्ह्यातील तब्बल ३८ उमेदवारांनी मुदतीत सादर न केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे.

जिल्ह्यातील मनमाड, सिन्नर, भगूर, नांदगाव, नगरपालिकांच्या नोव्हेंबर २०१६ मध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये उमेदवारी करणाऱ्या मनमाडमधील २६, सिन्नरमधील ५, भगूरच्या तीन तर नांदगावच्या चार अशा एकूण ३८ उमेदवारांनी सहा महिने उलटूनही निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील सादर केलेला नाही. त्यामुळे या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील तीन वर्षांसाठी नगरपरिषदांच्या निवडणुका लढविण्यास अपात्र ठरविले आहे. अशा उमेदवारांमध्ये मनमाडच्या बेबी पवार, रोनावाला सबीहा, सविता पाटील, हिराबाई आहिरे, सुनील पगारे, प्रभाकर आहिरे, चंद्रकांत गरुड, शशीकांत दाभाडे, दिपाली चव्हाण, राजू निरभवणे, सुरेश गायकवाड, कांचन धिवर, वैशाली पगारे, शैला गायकवाड, दुगार्बाई मोरे, अनिता भालेराव, उमेश झोडपे, अनिल वाघ, सचिन मोरे, दयाबाई पवार, नंदा देवरे, रुक्म‌णिी आहिरे, रेश्मा बनसोडे, सचिन दराडे, भाऊराव भालेराव, कुसुम दराडे, तसेच शोभा लोंखडे, अनुसया रणमाळे, योगेश क्षत्रीय, ईश्वर लोणारे, ज्ञानेश्वर पवार (सिन्नर), सत्यभामाबाई मोजाड, प्राजक्ता बागडे, सुरेखा मोहीते, (भगूर), इंदिरा बनकर, संगिता उगले, शशिकला बागुरे, आशाबाई पाटील (नांदगाव) या उमेदवारांचा समावेश आहे.

ज्यांच्यावर कारवाई झाली ते सर्व निवडणूक लढविणारे उमेदवार आहेत. त्यापैकी कुणीही नगरसेवक नाही. तीन वर्षांसाठी ही अपात्रतेची कारवाई असून, या कालावधीत कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक त्यांना लढविता येणार नाही.

डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाथर्डी परिसरात विजेचा लपंडाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

ऐन पावसाळ्यात पाथर्डी गावासह परिसरातील नागरिकांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत. पाथर्डी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

पाथर्डी गावासह परिसरातील पिंपळगाव खांब, दाढेगाव व इतर भागात मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. काही वेळेस दिवसा तर प्रसंगी रात्री केव्हाही वीजपुरवठा बंद होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत.

विहिरीवरील पाणी विजेच्या सहाय्याने पंपाद्वारे पिण्यासाठी, इतर कामांसाठी लागत असते. परंतु, गरजेच्या वेळीच वीज गायब होत असल्याने पाणी मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. या बाबतीत सबस्टेशन केंद्रावर अधिकारी व वायरमन यांना फोन, भ्रमणध्वनीद्वारे, प्रत्यक्ष जाऊन तक्रारी देण्यात येऊन काही फायदा होत नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

रात्रीची वीज गेल्याने शेतातील राहणार्‍या शेतकऱ्यांना, महिलावर्गास विषारी जनावरांची भीती वाटत असते. पावसाचे दिवस असल्याने घरातील लहान मुलेसुद्धा अंधारात बाहेर पडायला घाबरत आहेत. विद्यार्थ्यांचेही यामुळे नुकसान होत आहे. तरी संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी तात्काळ लक्ष घालून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी होत आहे. ही मागणी मान्य न झाल्यास परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा सोमनाथ बोराडे, अंकुश भोर, संदीप जाधव, संतोष बोराडे, बाळासाहेब बोराडे, संजय बोराडे यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईचे आदेशावर आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नालेसफाईच्या कामांच्या चौकशीबाबत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या दबावानंतर महापौर रंजना भानसी यांनी चौकशीबाबतचा आपला निर्णय पुन्हा बदलला आहे. नालेसफाईच्या कामांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी भानसी यांनी आयुक्तांना पत्र लिहले असून, या कामांतील अनियम‌तितेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीही पत्राची दखळ घेत, अतिरिक्त आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पावसाळी गटारीचे कामे पूर्ण झाल्यानंतर चौकशीला आता उश‌रिाने सुरूवात होणार आहे. तर या चौकशीमुळे शहर अभियंता यू. बी. पवार यांच्यासह ठेकेदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शहरात गेल्या १४ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे वेळेत न केल्याने शहराचे नुकसान झाल्याचा ठपका विरोधकांनी ठेवून महासभेत लक्षवेधीही लावली होती. महापौरांनी सभा गुंडाळत चौकशीला अभय दिले होते. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी टीका केल्यामुळे या कामांच्या चौकशीची घोषणा महापौरांनी करावी लागली होती. परंतु आठच दिवसात त्यांनी घुमजाव करत, आपणच चौकशी करणार असल्याचा दावा केला होता. एक प्रकारे नालेसफाईच्या कामालाच त्यांनी क्लिनचीट दिली होती. त्यामुळे भाजपच्या पारदर्शक कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

दिनकर पाटील यांनी पुन्हा पत्र देवून नालेसफाई व पावसाळी गटार सफाई कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली. तर शिवसेनेनेही भाजपच्या पारदर्शक कारभारावर शंका उपस्थित केली. त्यामुळे महापौरांनी नमते घेत, या कामांच्या चौकशीची तयारी दर्शवली आहे. बुधवारी त्यांनी याबाबत आयुक्तांना पत्र देवून सदस्यांच्या भावनांचा व मागणीचा विचार करून या कामांची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनाही तातडीने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात होणार आहे.

पाणी वाहून गेले…

दरम्यान, या प्रकरणावर महासभा होताच चौकशी लावली असती तर नगरसेवकांच्या आरोपात काही प्रमाणात तथ्य आढळले असते. परंतु अतिवृष्टी होवून तीन आठवडे झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले असून, चौकशीत काय आढळणार याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन रुपयांवरून मारहाणीत तरुण ठार

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, धुळे

शहरातील साक्रीरोडलगत असलेल्या भीम नगराजवळील राजीव गांधी नगरात मंगळवारी (दि. ४) रात्री गुटखा पुडीच्या दोन रुपयांवरून झालेल्या भांडणात तरुणाला बेदम मारहाण करीत ठार करण्यात आल्याची घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, तर ठार मारणाऱ्या आरोपीच्या घराला आग लावल्यानंतर याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

राजीवगांधी नगर साक्रीरोड येथे गुटखा पुडीचे दोन रुपये कमी दिल्याच्या कारणावरून किराणा दुकानदाराशी झालेल्या भांडणातून संदीप विजय ठाकूर (वय २१) या तरुणाचा खून करण्यात आला. दुकानदार चंद्रकांत भालचंद्र चव्हाण यांच्यासह त्यांचे आई-वडील आणि पत्नीने केलेल्या मारहाणीत संदीप हा जबर जखमी होऊन मरण पावला. याप्रकरणी मृत तरुणाची आई रमाबाई विजय ठाकुर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चंद्रकांत भालचंद्र चव्हाण यांच्या किराणा दुकानावर गुटखा पुडी घेण्यासाठी गेलेला असताना त्याच्याकडून दोन रुपये कमी दिले व त्याची मागणी केल्याने सरिता चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, भालचंद्र चव्हाण, संदीप चव्हाण यांनी संदीप ठाकूरला मारहाण करीत त्याच्या डोक्यावर वार करीत जिवे ठार मार मारले असल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे.

त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर साक्रीरोडवर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तर संदीप ठाकूर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. चव्हाण कुटुंबीयांचे घर संदीप ठाकूर यांच्या नातेवाईकांनी दगडफेक करीत जाळले. यावेळी परिस्थिती हाताळण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिनकर पाटलांचा विरोधकांवर पलटवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौर आणि सभागृह नेत्यांमधील विसंवादावरून भाजपवर आरोप करणारे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि काँग्रेसच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील यांच्यावर सभागृहनेते दिनकर पाटील यांनी टीकास्र सोडले आहे. तसेच फोटोसाठी बजेट रखडले नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

आपण पावसाळी गटार योजनेतील लक्षवेधीत पाटील आणि बोरस्ते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले नसल्याचा खुलासा पाटील यांनी केला. तसेच बोरस्ते आणि पाटील यांनी भाजपवर खोटे आरोप करू नये. महापौर व सभागृहनेत्यांमध्ये कोणताही वाद नसून कोणीही त्यात नाक खुपसू नये, असा टोमणाही त्यांनी मारला आहे. महापौर, उपमहापौर, सभागृहनेता आणि गटनेत्यांमध्ये संवाद नसून, नेमका कारभार कोण पाहत आहे, असा टोमणा विरोधकांनी मारला होता. बोरस्ते यांनी अंत्यसंस्काराच्या ठेक्यावरून भाजपला कोंडीत पकडले, तर हेमलता पाटील यांनी पालिकेतील सत्ता नेमकी कोणाकडे आहे, असा सवाल उपस्थित केला होता. त्यांची टीका भाजपला चांगलीच झोंबली आहे. भाजपवरील आरोपांचा खुलासा करण्यासाठी सभागृह नेता दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे आणि गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी पत्रकार परिषद घेवून विरोधकांचे आरोप खोडून काढले. बोरस्ते आणि पाटील यांनी खोटे आरोप करू नये, असा सल्ला पाटील यांनी दिला आहे. तसेच आपल्या फोटोसाठी बजेट थांबले नसल्याचा खुलासा पाटील यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंध्र प्रदेशला भावली ३८ गावे योजना!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कुठलीही सार्वजनिक पाणीपुरवठा योजना म्हटली, की हमखास समोर येते ती त्या योजनेची दुरवस्था. बऱ्याच ठिकाणी पाणी योजनांना अखेरची घरघर लागलेली असते. मात्र, येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना याबाबतीत अपवाद ठरताना कौतुकास्पद ठरली आहे. त्यामुळेच या योजनेची आंध्र प्रदेश राज्याने दखल घेतली. मंगळवारी आंध्र प्रदेशातील शासननियुक्त चाळीस सदस्यीय समितीने या योजनेला भेट दिली. या योजनेचे समितीने कौतुक केले आहे.

जागतिक बँकेने गेल्या आर्थिक वर्षात केलेल्या देशातील पाणीपुरवठा योजनांच्या सर्वेक्षणात भारतातील ज्या तीन योजना अग्रक्रमाने निवडल्या होत्या त्यातील एक म्हणजे येवला तालुक्यातील ३८ गांवे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना. उत्कृष्ठ नियोजन आणि नफ्यात असलेली ही एकमेव योजना आहे. या योजनेचे आजवर अनेकांकडून कौतुक झाले. आता चक्क आंध्र प्रदेशला या योजनेने आपल्याकडे आकर्षित केले. ते‌थील प्रशासनाने तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या धर्तीवर राज्यात योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी तेथील ४० जणांच्या एका समितीने मंगळवारी येवल्यातील या योजनेची पाहणी करून योजनेची सविस्तर माहिती घेतली.

विशाखपट्टणम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ए. आप्पाराव, कृषी सभापती के. दामोधरराव, जिल्हा परिषद सदस्य गंगा भवानी, जलसंधारणाचे उपअभियंता ए. सावित्री, शाखा अभियंता के. रामास्वामी यांच्यासह आंध्रातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा या समितीत समावेश होता. या भेटीत या समितीने ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या तालुक्यातील बाभूळगाव येथील जलशुद्ध‌िकरण केंद्र, अनकाई येथील एम. बी. आर. येथे भेट दिली. तालुक्यातील अनकुटे भेटीदरम्यान गावातील प्रत्येक घरी भेट देवून योजनेचे पाणी कसे पोहचते आणि वसुली कशी केली जाते, याची माहिती जाणून घेतली. यावेळी पाणी पुरवठा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, पंचायत समिती माजी सभापती संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे, संजय बनकर यांच्यासह योजना व्यवस्थापनातील उत्तम घुले, सतीश बागुल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images