Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बनावट नोटांच्या मुख्य सूत्रधाराचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शंभर रुपयांच्या नोटा स्कॅन करून त्याद्वारे बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराचा क्राइम ब्रँच शोध घेत आहेत. या टोळीने तयार केलेल्या नोटा सफाईदारपणे छापल्या असून, मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर या टोळीच्या आणखी काही करामती समोर येण्याच्या शक्यता आहे.

आण्णा कुमावत (रा. खर्डी, ता. शहापूर, जि. ठाणे) असे या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. क्राइम ब्रँचच्या युनिट एकने त्याच्या चौघा साथिदारांना शनिवारी (दि.१ जुलै) रात्री पाथर्डी फाटा परिसरात सापळा रचून अटक केली होती. प्रशांत विनायक खरात (आसनगाव, शहापूर जि. ठाणे), राजेंद्र परदेशी (खर्डी, शहापूर जि. ठाणे), उत्तम गोळे (शहापूर जि. ठाणे), कांतीलाल यशवंत मोकाशी (खर्डी, ता. शहापूर, जिल्हा ठाणे) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांची नावे आहेत. बनावट नोटांची विक्री करणारी एक टोळी शहरात येणार असल्याची माहिती क्राइम युनिटचे सहायक पोलिस निरीक्षक एन. एन. मोहिते व पोलिस शिपाई संदीप भुरे यांना मिळाली होती. या माहिती आधारे वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. यात हे चौघे संशयित पोलिसांच्या हाती सापडले. मात्र, बनावट नोटांचा मुख्य सूत्रधार आण्णा कुमावत मात्र वाडिवऱ्हे येथेच उतरून गेला. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून इंडिका कार तसेच १०० रुपयांच्या बनावट नोटांचे १७ बंडल सापडले. एक लाख ७० हजार २०० रुपयांच्या या बनावट नोटा शहरात विक्री करण्यात येणार होत्या. संशयितांकडे केलेल्या चौकशीअंती या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आण्णा कुमावत असल्याचे स्पष्ट झाले. कुमावतला अटक केल्यानंतर बनावट नोटांचे रॅकेट केव्हापासून सुरू आहे किंवा त्यांनी यापूर्वी कोणा-कोणास बनावट नोटांची विक्री केली, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अटक संशयितांना ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, खर्डी येथे तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी स्पष्ट केले.

१० हजारांचा बनावट नोटांचा एक बंडल विक्री केल्यानंतर या टोळीला पाच हजार रुपये मिळणार होते. तत्पूर्वीच क्राइम ब्रँचने त्यांना अटक केली. या नोटा फारच सफाईदार पध्दतीने छापण्यात आल्या असून, या गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढण्यात येतील.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आडगावात फ्लॅटधारकांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लॉटवर धुळे येथील पतसंस्थेचे कर्ज असतांना सातबारा कोरा असल्याचे भासवून आडगाव शिवारात १२ फ्लॅटधारकांना सदनिका विक्री केल्याप्रकरणी भूखंड मालकासह बिल्डरविरोधात आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जागामालक नरेंद्र पोपट पगार (रा. मॉर्निंग ग्लोरी अपार्ट. महात्मानगर) आणि बिल्डर दिनेशभाई अर्जुनभाई पटेल (रा. उमादर्शन सोसा. कलानगर) अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहे. अमोल रमेशसिंह परदेशी (रा. लक्ष्मीनिवास अपा. गायत्रीनगर आडगाव) यांच्या तक्रारीनुसार, नरेंद्र पगार आणि दिनेशभाई पटेल यांनी अमृतधाम सर्व्हे क्रमांक २६१ मधील प्लॉटवर धुळे येथील समर्थ पतसंस्थेकडून २४ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यापोटी २००४ ते २०१३ पर्यंत हा प्लॉट पतसंस्थेकडे गहाण होता. या कर्जाची परतफेड न करता आणि मिळकतीवर कर्जाचा बोजा न लावता नंतरच्या काळात या दोघांनी याच प्लॉटवर इमारत बांधून १२ जणांना सदनिका विकल्या. नवीन मालकांना जुन्या कर्जाची पूर्व कल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कर्जाची माहिती दडवून ठेवून फसवणूक केली म्हणून फ्लॅटधारक परदेशी यांनी संशयितांविरूध्द पोलिसांकडे फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठलनामाची शाळा भरली...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आज, मंगळवारी (दि. ४) साजरी होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शहर परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने सोमवारी विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. वृक्षदिंडी, रिंगण असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

बॉइज टाऊन स्कूल

बॉइज टाऊन शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्याची सुरुवात ईश्वर काळे यांच्या कीर्तनाने करण्यात आली. वेगवेगळ्या अभंगांवर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता. शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ व शिक्षकवृंदाने फेर धरून, फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. या सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’ अश्व मिरवणूक. पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते, तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. पावसाच्या रिमझिम सरींतला हा सोहळा पाण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सोहळ्याची पसायदानाने सांगता करण्यात आली.

--

वाघ गुरुजी शाळा

‘मविप्र’च्या शाळेतर्फे वृक्षदिंडी काढण्यात आली. विठ्ठल-रखूमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी, पाऊले चालती, विठ्ठलनामाची शाळा भरली... यांसारखी गीते व भजने विद्यार्थ्यांनी सादर केली. संगीतशिक्षक शेवाळे यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, पालखीपूजन व विठ्ठलाची आरती झाली. सीमा भामरे यांनी आषाढी एकादशीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष लावा, मोक्ष मिळवा अशा विविध घोषणा देत वृक्षदिंडीतून चिमुकल्यांनी नागरिकांना झाडांचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापिका वनिता पाटील यांनी आभार मानले. कविता आगळे यांनी सूत्रसंचालन केले. मविप्रचे सेवक संचालक अशोक पिंगळे, नगरसेविका स्वाती भामरे व शालेय समितीचे सदस्य बी. एल. चव्हाण, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक साळवे व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वनिता पाटील आदी उपस्थित होते.

--

रंगूबाई जुन्नरे शाळा

विठ्ठलाचा जयघोष करीत अन् अभंग सादर करीत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या माँटेसरी विभागात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल-रखूमाई, वारकरी अशा वेशभूषेतील विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. हातातील टाळ-चिपळ्यांचा गजर, मुखी विठ्ठलनाम यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. मुख्याध्यापिका स्मिता वाळवेकर यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.

--

स्ट्रॉबेरी इंग्लिश स्कूल

पाथर्डी फाटा येथील शाळेत साक्षात अलंकापुरी अर्थात, पंढरपूर अवतीर्ण झाले होते. विठ्ठल-रखूमाई, वारकरी अशा वेगवेगळ्या पोशाखांतील विद्यार्थ्यांनी परिसरात काढलेली दिंडी अन् माउली माउलीचा जयघोष यामुळे चैतन्य अवतरले होते. विठ्ठल-रखूमाईच्या विधिवत पूजनानंतर विद्यार्थ्यांनी अभंग सादर केले. माउलीच्या जयघोषावर सर्वांनी ठेका धरला होता. शिक्षकांनी वारी, दिंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. मुख्यध्यापिका रिना गोविल, सायली काळे व शिक्षकवृंद उपस्थित होता.

--

वाल्मीकी टॉट्स शाळा

गंगापूररोडवरील प्री-प्रायमरी आणि प्रायमरी शाळेतर्फे दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी या अभंगानुसार विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. शाळेच्या संचालिका सीमंतिनी कोकाटे, संस्थापिका सीमा कोकाटे, मुख्याध्यापिका मोनिका गोडबोले यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

--

भगूर, देवळाली परिसर

देवळाली कॅम्प : आषाढी एकादशी व वृक्ष लागवड सप्ताहानिमित्त नूतन विद्यामंदिर, ओम साईराम सेवाभावी संस्था व भोर नर्सरीतर्फे भगूर शहरात प्रभात फेरी काढून वृक्ष लागवड व वृक्ष जोपासना करण्याचा संदेश येथील विद्यार्थ्यांनी दिला. मुख्याध्यापिका लता जोशी, तानाजी भोर यांच्या हस्ते वृक्षपूजन झाले. चिमुकल्यांनी हातात विविध प्रबोधनपर घोषवाक्यांचे फलक घेऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत परिसरातून वृक्षदिंडी काढली. चिमुकल्यांनी केलेली वारकऱ्यांची वेशभूषा, तर नऊवारी साडीतील विद्यार्थिनींनी नागरिकांचे लक्ष वेधले. भगूरकरांतर्फे भाजपचे शहराध्यक्ष कैलास गायकवाड यांनी शिवाजी चौकात दिंडीचे स्वागत केले. दिंडीत अशोक बोराडे, बी. जे. शिंदे, नीलेश गोसावी, दीपक कोकणी, योगेश शेळके, विशाल शिरसाठ, शीतल जाधव आदींसह सर्व शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. वनश्री पुरस्कारप्राप्त तानाजी भोर यांनी विद्यार्थी व भगूरकरांना तुळशीच्या तीन हजार रोपांचे वाटप केले. दिनेश गोविल, नामदेव सूर्यवंशी, जितेंद्र पावशे आदींचे सहकार्य लाभले. देवळालीतील दर्शन अॅकॅडमी, सरस्वती विद्यामंदिर संचालित देवळाली हायस्कूल, मविप्र संचालित आदर्श शिशुविहार येथील विद्यार्थ्यांनीदेखील वृक्षदिंडी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानेश्वर मंदिररुपाने ‍नाशकात अवतरली ‘आळंदी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आळंदी येथील ज्ञानेश्वरांच्या मंदिरानंतर नाशिकचे ज्ञानेश्वर मंदिर हे दुसरे महत्त्वाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. ज्या भाविकांना आळंदीला जाऊन समाधीचे दर्शन घेणे शक्य नाही अशांसाठी कार्तिकी व आषाढी एकादशीला हुंडिवाला लेन येथील हे मंदिर म्हणजे आळंदीच ठरते. या दोन्ही दिवशी येथे यात्रा भरते आणि भाविक आळंदीला आल्याचे समाधान मानून कृतकृत्य होतात. आज आषाढीनिमित्त येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.

मंदिरात दर वर्षी मोठ्या प्रमाणात उत्सवाचे आयोजन करण्यात येते गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी दहीहंडी, गोपालकाल्याचे आयोजन केले जाते. ज्ञानेश्वर माउलींचा जन्मसोहळा आयोजित करण्यात येतो. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी कीर्तन, प्रवचनादी कार्यक्रम व भागवत सप्ताह होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळा अर्थात, संजीवन समाधी सोहळाही होतो. कार्तिक वद्य पंचमी ते कार्तिक वद्य चतुर्दशी अशा संजीवन समाधी सोहळ्याच्या १० दिवसांत मंदिरात भजन-कीर्तन-भागवत सप्ताह व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्रयोदशीला मंदिरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते, तर समाधी सोहळ्याच्या दिवशी भंडाऱ्याचे आयोजन केल जाते. मंदिराच्या उत्सवाची परंपरा व दैनंदिन दैवतांची पूजा नारायण गणेश शौचे यांचे चिरंजीव पांडुरंग शौचे व त्यांचे कुटुंबीय करीत आहेत.

मोठा सांस्कृतिक वारसा

या मंदिरात पूर्वी संस्कृत नाटकांच्या तालमी होत आणि येथेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. एकदा संस्कृत नाटकाच्या बक्षीस समारंभावेळी बालगंधर्व आले आणि त्यांनी आपले रेशमी जोडे मंदिराच्या बाहेर काढून ठेवले. इकडे बक्षीस समारंभ संपल्यानंतर ते बाहेर पडत असताना रेशमी जोडे चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यावर शास्त्रीजींनी बालगंर्धवांना तुमचे जोडे आमच्या मंदिरातून चोरीला गेले त्याबद्दल मी तुमची माफी मागतो, असे सांगितले. त्यावर बालगंधर्व म्हणाले होते, की माझ्याकडे असे अनेक जोडे आहेत, तुम्ही काळजी करू नका! देशातल्या नामवंत संगीतकारांनी या ठिकाणी आपली कला सादर केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या ठिकाणी क्रांतिकारकांनी बैठका घेतल्याचीही नोंद आढळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्ण, नातेवाइकांशी साधावा सुसंवाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे यंत्रांवरील खर्च वाढला आहे, पर्यायाने उपचारांवरील खर्चातही वाढ झाली आहे. मात्र, या मुद्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होत आहेत. डॉक्टरांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी सुसंवाद ठेवायला हवा. आपली भूमिका मांडण्यासाठी समाजप्रबोधन करावे, सोबतच आत्मचिंतनही करावे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे डॉक्टर दिनानिमित्त रविवारी (दि. २) रोजी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते सहा डॉक्टरांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, महिला शाखेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, की देशाच्या जीडीपीच्या किमान पाच टक्के तरतूद सार्वजनिक आरोग्यासाठी असायला हवी. काही वर्षांपूर्वीपर्यंत ती तरतूद अत्यल्प होती. केंद्र सरकारने अडीच टक्क्यांपर्यंत तरतूद आणली आहे. तरीही ही तरतूद अत्यल्प आहे. यामुळे ७० टक्के रुग्णांना खासगी सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे.

क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्टमधील काही बाबी वास्तवाला धरून नाहीत. वैद्यकीय व्यवसायाची धोरणे एखाद्या दालनात बसून ठरविली जाऊ शकत नाहीत. हा कायदा इन्स्पेक्टरराजला आमंत्रण देणारा असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

---

...यांचा झाला सन्मान

या कार्यक्रमात डॉ. भामरे यांच्या हस्ते डॉ. निवेदिता पवार, डॉ. मृणालिनी केळकर, डॉ. अशोक बच्छाव, डॉ. डी. एम. पवार, डॉ. महेश मालू, डॉ. नवीन पटेल यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारार्थींनी मनोगतात त्यांच्या जीवनातील अनुभवांचे कथन केले. अमेरिकेतील खडतर रॅम स्पर्धा पूर्ण करण्याऱ्या डॉ. राजेंद्र नेहेते व डॉ. रमाकांत पाटील यांच्याबरोबर एकल गटातून स्पर्धा पूर्ण करणाऱ्या डॉ. श्रीनिवास गोकुलनाथ यांचाही सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ई-पॉस’मशिनचे दुकानदारांना वाटप

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, येवला

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिकाधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने पावले टाकताना राज्य सरकारने या प्रणालीतील स्वस्त धान्य दुकानांमधील नेहमी चर्चेचा विषय ठरणाऱ्या गैरकारभाराला पायबंद घालण्यासाठी ‘ई-पॉस’मशिन आणले आहे. राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने रेशनिंग दुकानधारकांना धान्य वितरित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ओयासिस कंपनीच्या या मशिनचे वाटप नुकतेच येवल्यात करण्यात आले.

रेशनिंग धान्य दुकानांमध्ये होणारा गैरकारभार रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘पीओएस’ मशिनच्या माध्यातून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात असलेल्या रेशनिंग दुकानधारकांना पीओएस मशिन दिल्या जात आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तहसीलच्या सभागृहात तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील १४० रेशनिंग दुकानदारांना मशिनचे वाटप केले. तसेच याबाबत मशिन वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

रेशनिंग दुकानधारकांना पीओएस मशिनचा वापर कसा करावा, कार्डधारकांचे बोटांचे ठसे कसे घ्यावे, यासह इतर आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्व दुकानदारांना प्रस्तुतीकरणाद्वारे पीओएस मशिनची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. प्रसंगी पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे, पुरवठा अव्वल कारकुन योगेश पाटील, उपलेखापाल पुष्कराज केवारे, लिपीक सरोदे आदींसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थी उपस्थित होते. १ जुलैपासून या मशिन्सचा वापर प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, आधारबेस रेशन धान्य वितरणास शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत आपले रेशनकार्ड

आधार लिंकिंग केले नाही त्यांना मुदत मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आषाढी’ने अवतरले चैतन्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वर्षातली सर्वांत मोठी एकादशी मानली जाणारी आषाढी एकादशी आज, मंगळवारी (दि. ४) साजरी होत असून, त्यामुळे शहर परिसरात चैतन्य अवतरले आहे. दिंडीतील वारकऱ्यांप्रमाणेच शहर परिसरातील भाविकांनाही विठ्ठल-रखूमाईच्या दर्शनाची आस लागली असून, रोषणाईने उजळलेल्या शहरातील मुख्य विठ्ठल मंदिरांमध्ये सोमवारी सायंकाळनंतर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

शहरात कॉलेजरोडवरील नामदेव विठ्ठल मंदिर, काझीपुरामधील विठ्ठल मंदिर, तसेच हुंडिवाला लेन येथील ज्ञानदेव विठ्ठल मंदिर येथे काकडा आरती, दुग्ध रुद्राभिषेक, महापूजा त्यानंतर महाआरती असा सोहळा रंगणार असून, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

कॉलेजरोडवरील नामदेव मंदिरात सकाळी ६.३० ला महापूजा होणार असून, ३०० महिलांची दिंडी काढण्यात येणार आहे. ९.३० वाजता ज्येष्ठ नागरिकांची दिंडी निघणार असून, ११ ते १ भजनी मंडळाचा कार्यक्रम, गायक पुष्कराज भागवत यांची बोलावा विठ्ठल मैफल होईल. दुपारी ३ ते ५ भजन होईल. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत महिलांचा हरिपाठ होईल. सुशीलाबाई विष्णुपंत तुपसाखरे यांच्या स्मरणार्थ तुपसाखरे परिवाराने हे मंदिर बांधले आहे.

जुन्या नाशकातील श्री संत नामदेव विठ्ठल मंदिरात सकाळी ८ वाजता अभिषेक, ९ ते १२ या वेळेत भजन, दुपारी ४ ते ५.३० या वेळेत प्रवचन, तर रात्री ९ ते ११.३० या वेळेत कीर्तन होणार असल्याची माहिती नंदलाल काळे यांनी दिली. मंदिराची संपूर्ण व्यवस्था नाशिक शहर नामदेव शिंपी पंच मंडळ पाहत आहे.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीही म्हटले जाते. आषाढी एकादशी ही महाविष्णूंची तिथी मानलेली असल्याने तिला ‘हरिदिनी’ असेही म्हणतात. .

या दिवशी श्रीविष्णूंची ‘श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी केला जातो. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत जातात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तिनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

प्रेमाची साठवण

आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरीत वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो. पंढरपुरात जाऊन दर्शन घेणे शक्य नाही, असे भाविक स्थानिक विठ्ठल मंदिरांत दर्शन घेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताहाराबाद शाळेची दयनीय अवस्था

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सदरचे विद्यामंदिर हे तळीरामांचे आश्रयस्थान झाले असून, शाळेच्या परिसरात प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात डुकरांचा सुळसुळाट असल्याचेही दिसत आहे. परिणामी प्रचंड दुर्गंधी पसरल्याने चिमुरड्यांचे आरोग्य धोक्यात तर आलेच आहे. परंतु, तळीरामांच्या आश्रयस्थानामुळे त्यांच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती यतीन पगार यांच्या गावापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावरील प्राथमिक शाळेची ही स्थिती भयावह आहे.

ताहाराबाद येथील प्राथमिक शाळेचे पहिले ते चौथीचे वर्ग असलेल्या वर्गांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. नियमित परिसर स्वच्छ होत नसल्याने हे ज्ञान मंदिर परिसरात डुक्करांचा वावर असतो. शाळेत जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थी संख्या आहे. याठिकाणी येण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी डुक्करांचा सामना करून मगच वर्गात प्रवेश करावा लागतो,असे चित्र आहे. या उपद्रवामुळे शाळेच्या आवा‌रात ठिकठिकाणी घाणीचे, चिखलाचे साम्राज्य तयार होऊन दुर्गंधी परसत आहे. तरी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी तसेच नागरिकांनी केली आहे.

तळीरामांचा बनला अड्डा

सरकारने मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम, यांना नागरी वसाहत, शाळा, कॉलेजेस, मंदिर परिसरात बंदी केली आहे. असे असतानाही ताहाराबादच्या ज्ञान मंदिरात तळीरामांनी याठिकाणी मद्य सेवन करून त्याचठिकाणी रिकाम्या बाटल्या फोडून फेकल्या जातात. काही विद्यार्थ्यांना तर यामुळे इजादेखील झाल्याचे उघडकीस आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक : सचिनला भेदायचाय गरिबीचा अंधार

$
0
0

नाशिक : परिस्थिती नाही तर व्यक्तीतील जिद्द त्याचे भविष्य घडवत असते. गरिबीच्या अंधारातही गुणवत्तेचे तेज झाकोळत नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन अरुण गांगुर्डे. हलाखीच्या परिस्थितीतही मराठा हायस्कूलमध्ये दहावीत ९२.८० टक्के गुण मिळवत त्याने आपली खडतर वाट उज्ज्वल केली. गुणवत्तेच्या या प्रकाशवाटेतूनच गरिबीचा अंधार भेदण्याची सचिनची जिद्द आहे. त्याच्या या जिद्दीला, प्रकाशवाटेवर सुरू झालेल्या प्रवासाला साथ हवी समाजाच्या दातृत्वाची. सचिनला सीए व्हायचं आहे. तशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली आहे. इंजिनीअरिंग किंवा मेडिकलपेक्षा अकाउंट्स क्षेत्रात नाव कमवावे हे आठवीपासूनचे स्वप्न असल्याचे सचिन म्हणतो.

सचिन गांगुर्डे याने सध्या ११ वी कॉमर्सला अॅडमिशन घेतली आहे. त्याला सीए व्हायचे आहे. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या सचिनने दहावीत मिळविलेले घवघवीत यश कौतुकास्पद आहे. दहा बाय दहाच्या खोलीत गांगुर्डे कुटुंबाचा संसार गुजराण करतो आहे. सचिनचे वडील अरुण गांगुर्डे पंडित कॉलनीतील मुरकुटे वाचनालयात वॉचमन आहेत. महिन्याकाठी मिळणारे साडेसहा हजार रुपयांचे वेतन कुटुंबाच्या चरितार्थासाठी अपुरे पडते म्हणून गांगुर्डे वेळ मिळेल तेव्हा विविध संस्थांसाठी गार्डनिंगचेही काम करतात. त्यातून महिन्याकाठी दोनएक हजार रुपये पदरात पडतात. सचिनची आई संगीता घरीच असतात. मात्र, मुलांच्या शिक्षणाला आणि संसाराला हातभार लागावा म्हणून त्याही दोन-चार मेसचे डबे करतात. सचिनला एक लहान भाऊ असून, तोही अभ्यासात हुशार. मुरकुटे हॉलजवळ संस्थेने दिलेल्या छोट्याशा घरात हे कुटुंब अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे.

गांगुर्डे कुटुंब मूळ चांदवडचे. शेतीच्या छोट्याशा तुकड्यावर एकत्र कुटुंबाचा भार पेलणे शक्य नसल्याची जाणीव झाल्याने १७-१८ वर्षांपूर्वी गांगुर्डे बिऱ्हाड घेऊन शहरात आले. शहरात राहून मुलांना चांगले शिक्षण मिळेल, त्यांचे भविष्य आपल्यापेक्षा चांगले घडावे ही त्यांची अपेक्षा सचिनच्या रूपाने फळाला आली. सचिनला हळूहळू घरातील परिस्थिती समजत गेली. मराठा हायस्कूलमध्ये अॅडमिशन घेतलेल्या सचिनने लहानपणापासूनच आपल्या हुशारीची चुणूक दाखवली. चौथीत असताना स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल अवघ्या दोन मार्कांनी हुकला, याची खंत आजही त्याच्या बोलण्यात जाणवते. सचिनने आठवीत असताना नॅशनल मिन्स कम मिरिट ही परीक्षा उत्तीर्ण केली. यामुळे त्याला महिन्याकाठी पाचशे रुपयांची मदत मिळते. बारावीपर्यंत या पाचशे रुपयांतदेखील भागवू; पण पुढे काय, असा प्रश्न सचिनसह त्याच्या कुटुंबाला सतावतो आहे. सचिनला सीए व्हायचं आहे. तशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली आहे. इंजिनीअरिंग किंवा मेडिकलपेक्षा अकाउंट्स क्षेत्रात नाव कमवावे हे आठवीपासूनचे स्वप्न असल्याचे सचिन म्हणतो. आजच्या टप्प्यापर्यंत जगण्याची लढाई लढणाऱ्या गांगुर्डे कुटुंबीयाला सचिनच्या ज्ञानाचा यज्ञ सुरू ठेवायचा आहे. अशा वेळी समाजातील दातृत्वाने मदतीचा हात पुढे केल्यास सचिनला नक्कीच उभारी मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पल्स पोलिओत मालेगाव पिछाडीवर

$
0
0

विशेष अभियानात केवळ ४१ टक्के बालकांना डोस; पोलिओ निर्मूलनाचे आव्हान

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशभरात जरी पोलिओ निर्मूलन झालेले असले तरी मालेगाव शहरात पोलिओ विरोधातील लढाई संपलेली नाही. शहरातील पूर्व भागात असलेल्या मुस्लिम समाजातील चुकीच्या प्रथांमुळे अनेक कुटुंबाकडून पोलिओ डोस देण्यास नकार दिला जातो. याचा परिणाम पल्स पोलिओ मोहिमेवर दिसून येतो. यामुळेच रविवारी (दि. २) येथील महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत निरुत्साह दिसून आला. परिणामी, रविवारच्या या विशेष अभियानात केवळ ४१ टक्के बालकांना पोलिओ डोस देण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणेसमोर पोलिओ निर्मूलनाचे आव्हान उभे राहिले असून, मालेगाव या मोहिमेत पिछाडीवर गेले आहे.

रविवारच्या विशेष मोहिमेत १ लाख २५ हजार ७२५ बालकांना पोलिओ डोस मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ५२,५६८ बालकांपर्यंतच हे पोलिओ डोस पोहचवता आले. या मोहिमेचा शुभारंभ महापौर रशीद शेख, आयुक्त संगीता धायगुडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस देऊन करण्यात आला. विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाकडून ३७९ बूथवर एकूण १,२३३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यात बूथवरील १,११८ कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मोबाइल टीम व ट्रान्झिट टीम तयार करण्यात येऊन शहरातील मुस्लिमबहुल भागात घरोघरी जाऊन पोलिस डोस देण्यात आला. शहरातील बसस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणीदेखील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात आले. शहरातील मुस्लिमबहुल पूर्व भागात पोलिओ लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याने आरोग्य यंत्रणेला सातत्याने प्रयत्न करावे लागत आहेत. यामध्ये लसीकरण नाकारणाऱ्यां कुटुंबांचे मत परिवर्तन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यात ९०० कुटुंबांचे मतपरिवर्तन करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मात्र रविवारच्या विशेष मोहिमेनंतरदेखील ७३,१५७ बालकांना पोलिओ डोस देण्याचे आव्हान कायम आहे.

अमेरिकेतील पथकाचे प्रयत्न

या आधीदेखील शहरात जानेवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत अमेरिकेतील रोटरी पथकाने शहरातील मुस्लिमबहुल भागात जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शहरातील नगरसेवक, धर्मगुरू तसेच सामाजिक संस्था शहरातील पोलिओ निर्मूलनासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेळके दाम्पत्याची २१६ वेळा वारी

$
0
0

अनोखी विठ्ठलभक्ती; मनमाडमध्ये सत्कार

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक सामाजिक, राजकीय, क्रीडा साहित्य व इतर अनेक गोष्टींबाबत तसेच जन्मदिनानिमित्त अनेक प्रसंगी सत्कार व सन्मानाचे कार्यक्रम होत असतात. परंतु, सन १९९९ पासून दरमहा प्रत्येक एकादशीस श्रद्धा आणि भक्तीने मनमाड येथून पंढरपूरला जाऊन श्रीविठ्ठलाच्या चरणी लीन होऊन आजपर्यंत २१६ वारींचा विक्रम करणाऱ्या सीताराम पांडुरंग शेळके आणि कलावती सीताराम शेळके या दाम्पत्याचा सत्कार त्याहूनही अनोखा ठरला आहे.

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आलेल्या या सत्काराने नव्या पिढीला श्रद्धा आणि भक्तीचा एक आदर्श दिला. वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, नरेश गुजराथी यांच्या कल्पकतेतून झालेला हा अनोखा सत्कार चर्चेचा विषय ठरला.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेच्या या वारीमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरपूर वारीत भाविक सहभागी होतात. परंतु, प्रत्येक महिन्याला वादळवारा, पाऊस, सांसारिक अडचणी यांची तमा न बाळगता नेमाने वारी करणारे मनमाड शहरातील शेळके दाम्पत्य अनोखे वारकरी होय. संतोष बळीद, किशोर पाटोदकर, प्रज्ञेश खांदाट, नीलकंठ त्रिभुवन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार पार पडला.

१९९९ साली सीताराम शेळके यांचा नांदगाव-मनमाड रस्त्यावर अपघात झाला आणि या अपघातात ते जबर जखमी झाले. या दुखापतीत ते सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बेशुद्धावस्थेत होते. अशा कठीण संकटप्रसंगी त्यांची पत्नी कलावती यांनी त्यांच्या उशाशी पांडुरंगाची मूर्ती ठेवून सतत धावा केला. आणि अत्यंत दुर्धर दुखापतीतून सीताराम शेळके हे बरे झाले. यानंतर शेळके दाम्पत्याने पंढरीच्या वारीला दर महिन्यास जाण्याचा नेम केला. यानंतर ते बरे झाल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून हे दाम्पत्य तो नेम पाळत आहेत. आतापर्यंत त्यांनी २१६ वारी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शेतकऱ्यांची जिल्ह्यात आत्महत्या

$
0
0

दिंडोरी : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यावर अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त होणार, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात अध्यादेश निघाल्यानंतर त्यांची घोर निराशा झाली. याच नैराश्यातून दिंडोरी तालुक्यातील सोनजांब आणि नामपूर येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील माधव बळवंत जाधव (वय ७२) यांनी द्राक्ष बागेसाठी सुमारे साडे पाच लाख कर्ज सोसायटीकडून घेतले होते. त्यांचे कर्ज २०१२ पूर्वीचे असल्याने त्यांना याचा लाभ मिळणार नव्हता. या निराशेतून त्यांनी दि. २९ जूनला द्राक्षबागेत विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी (दि. १) रात्री प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत सटाणा तालुक्यातील नामपूर येथील भिकन श्रावण सावंत या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी रविवारी (दि. २) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी जायखेडा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांची बिले रोखली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभऱात १ जुलैपासून जीएसटी लागू झाला असला तरी, या कररचनेसंदर्भात महापालिकांना कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. त्यामुळे ठेकेदारांच्या बिलांचे करायचे काय, असा प्रश्न पालिकेसमोर आहे. जीएसटीत नोंदणी नसलेल्या ठेकेदारांची ब‌िले तूर्तास अडवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
त्यासंदर्भात सर्व खातेप्रमुखांना फर्मान काढण्यात आले असून, स्पष्टता येत नाही तोपर्यंत फाइल फिरवू नका, असा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदारांवर नवीन आफत ओढावली आहे. पालिकेने विक्रीकर विभाग आणि चार्टर्ड अकाऊंटंट यांच्याकडून यासंदर्भात मार्गदर्शन मागवले आहे.
महापालिकेकडून ठेकेदारांवर यापूर्वी वर्क कंट्रोल टॅक्स आकारला जात होता. नोंदणीकृत ठेकेदारांवर हा टॅक्स दोन टक्के तर नोंदणीकृत नसलेल्या ठेकेदाराला पाच टक्के टॅक्स आकारला जात होता. जीएसटीमुळे हा टॅक्स आता एक टक्का झाला आहे. त्यामुळे ठेकेदारांना दिलासा मिळाला असला तरी, जीएसटीतील तरतुदी आणि ठेकेदारांच्या बिलांवर टॅक्स लावण्यासंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. त्यामुळे या ठेकेदारांबाबत करायचे काय, असा प्रश्न पालिकेच्या लेखा विभागाला पडला आहे. ठेकेदारांच्या बिलांसाठी पालिकेने जीएसटी नोंदणी सक्तीची केली आहे. ज्या ठेकेदारांची जीएसटीत नोंदणी झाली आहे, त्या ठेकेदारांची बिले अडवली जाणार नाहीत.

चार कोटी रखडले
जीएसटीच्या अस्पष्टतेमुळे सध्या लेखा विभागात असलेल्या जवळपास चार कोटींची बिले थांबण्यात आली आहेत. जीएसटीसंदर्भात पूर्ण स्पष्टता येत नाही, तोपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठेकेदारांनी जीएसटी नोंदणीसाठी घाई सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाणीपुरवठा’त टंचाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराची अत्यावश्यक सेवा असलेला पाणीपुरवठा विभाग हा अभियंते आणि कर्मचाऱ्यांअभावी अपंग बनला आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ५० अभियंत्यांची गरज असताना केवळ सहा अभियंत्यांवर विभागाचा गाडा सुरू आहे. विशेष म्हणजे विभागाचा प्रमुखही प्रभारीच आहे. विभागाला साडेतीनशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना १३५ कर्मचाऱ्यांवर विभागाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे या विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याची स्थिती आहे.

महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग हा अत्यावश्यक सेवेत येत असला, तरी या विभागात सध्या अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांची मोठी वानवा आहे. सन २००० पासून या विभागात एकही पद भरले न गेल्याने हा विभाग जणू व्हेंडिंलेटरवरच सुरू आहे. शहराचा पाणीपुरवठा विस्तारत असताना विभागात मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची मात्र कमतरता होत चालली आहे. या विभागात सध्या ५० अभियंते, ३२ शिफ्ट इन्चार्ज आणि ३५६ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु, निवृत्तीमुळे हा विभाग सध्या ६० टक्के रिता झाला आहे. सध्या या विभागात सहा अभियंते आणि १३५ कर्मचारीच शिल्लक आहेत. विभागाची बरीचशी पदे ही प्रभारींच्या हातात आहेत. त्यातच सहा अभियंत्यांना शाखा अभियंत्यांचेही कामकाज करावे लागत आहे. जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन, बुस्टर स्टेशनवर काम करण्यासाठीदेखील कर्मचारी नाहीत. सन २००३ मध्ये पाणीपुरवठा विभागाकडे मलनिस्सारण केंद्रांचीही जबाबदारी आली आहे. त्यामुळे एकीकडे अतिरिक्त कामांचा ताण असताना दुसरीकडे मात्र कर्मचारी आणि अधिकारी यांची कमरतरता जाणवत आहे.

--

विभागप्रमुखदेखील प्रभारी

या विभागात अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांची वानवा असतानाच या विभागाचे अधीक्षक अभियंतापदही प्रभारीच आहे. यू. बी. पवार यांच्याकडे शहर अभियंतापद दिल्याने त्यांच्या रिक्त जागेवर शिवाजी चव्हाणके यांना पदभार देण्यात आला आहे. त्यांच्यावर अभियंतापदासह अधीक्षक अभियंतापदाचीही जबाबदारी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाअनुदानित ‘पीजी’साठी नवे शुल्कधोरण

$
0
0

नाशिक : व्यावसायिक विद्याशाखेचा पदव्युत्तर विभाग अनुदानित नसताना तो अनुदानित असल्याचे स्टेटस जाहीर करणाऱ्या सर्व संस्थांनी आता त्वरीत शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांच्याकडून त्या-त्या वर्षाचे शुल्क मंजूर करून घ्यावे, असे निर्देश नुकतेच उच्च शिक्षण विभागाने संबंधित शिक्षण संस्थांना दिले आहेत.
याशिवाय शासकीय संस्थांमधील विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या फी निश्चितीचे धोरण ठरविण्यासाठी डीटीईच्या वतीनेही सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती एका तक्रारदारास तंत्रशिक्षण संचलनालयाचे संचालक चंद्रशेखर ओक यांनी दिली आहे.
राज्यातील बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर विद्याशाखांना (पीजी कोर्सेस) अनुदान उपलब्ध नसतानाही त्यांचे ऑनलाइन स्टेट्स सर्रास चुकीचे दर्शवून शासन अन् पालकांच्या डोळ्यांत धूळफेक करणाऱ्या नफेखोर संस्थांना या नव्या आदेशांमुळे दणका बसला आहे. पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी अंशत: अनुदान घेऊन संस्थेतील पीजी अभ्यासक्रम पूर्णत: अनुदानित असल्याचे भासविणाऱ्या संस्थांनी अनुदानाच्या मुद्द्याचा गैरफायदा उचलत नफेखोरी चालविल्याचे काही दिवसांपूर्वी एका माहितीच्या अधिकारात उघड झाले होते.
यासंदर्भात ‘मटा’ ने ‘फार्मसी कॉलेजकडून दिशाभूल?’ असे १२ मे २०१७ रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या प्रकारे व्यावसायिक विद्याशाखेचा पदव्युत्तर विभाग अनुदान‌ित असल्याचे स्टेटस जाहीर करणाऱ्या सर्व संस्थांनी आता त्वरीत शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांच्याकडून त्या त्या वर्षाचे शुल्क मंजूर करून घ्यावे. शिवाय शासकीय संस्थांमधील विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या फी निश्चितीचे धोरण ठरविण्यासाठीही डीटीईच्या वतीने सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

प्राधिकरणाच्या भूमिकेकडे लक्ष

पदवी स्तरापर्यंत अनुदानित असणाऱ्या काही संस्थांनी त्यांच्या पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांनाही अनुदानित म्हणून चुकीची माहिती जाहीर केल्याचा आक्षेप पालकांनी घेत शासनापर्यंत चिकाटीने पाठपुरावा केला आहे. यामुळे शुल्क नियंत्रण प्राधिकरण या कोंडीत पकडलेल्या संस्थांवर काय कारवाई करणार किंवा कशा पध्दतीने शुल्क निश्चिती करणार, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरसेवकांकडून बिटकोचे ‘ऑपरेशन’!

$
0
0

पाण्याच्या टाकीत पाल; एका इन्क्युबेटरमध्ये दोन बाळं

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
आजारी बिटको हास्पिटलला नाशिकरोडच्या नगरसवेकांनी सोमवारी सरप्राइज व्हिज‌िट दिली. यावेळी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाल सापडली तर काचेच्या एका पेटीत दोन बालकं ठेवलेली आढळली. व्हेंटिलेटर लावण्यास डॉक्टर नसल्याचे निदर्शनास आले. सोलर, सीसीटीव्ही बंद असल्याचा, तसेच येथील औषधे बाहेर जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
वैद्यकीय अधिकारी जयंत फुलकर समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने नगरसेवकांनी महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांना येण्यास भाग पाडले. पंधरा दिवसांत बिटकोचा सेटअप बदलू, सहाय्यक निवासी वैद्यकीय अधिकारी देऊ, आपण स्वतः आठवड्यातील दोन दिवस येथे थांबू, १२ जुलैला पुन्हा नगरसेवकांसोबत बैठक घेऊ आदी आश्वासने डेकाटेंनी दिल्यानंतर नगरसेवक शांत झाले.
बिटको हॉस्पिटलबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रभाग सभापती सुमन सातभाई, नगरसेविका सीमा ताजणे, सरोज आहिरे, जयश्री खर्जुल, पंड‌ित आवारे, मीरा हांडगे, अंबादास पगारे आदींनी सोमवारी दुपारी हॉस्पिटलला सरप्राइज व्हिज‌िट दिली. जगन गवळी, सागर गवळी, महेंद्र आहिरे, नितीन खर्जुल, गणेश सातभाई, जगदीश पवार आदी उपस्थित होते.
‘पाणी पिऊन दाखवा’
रुग्णांना ज्या टाकीतून प‌िण्याचे पाणी येते त्यामध्ये नगरसेवकांना पाल आढळली. तसेच गाळही साचलेला आढळला. अनेक वर्षांपासून ही टाकी साफ केली नसल्याचे समजताच नगरसेवकांनी ते पाणी वैद्यकीय अधिकारी जयंत फुलकर यांना पिण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिला. रुग्ण येथे बरे होण्यासाठी येतात की आजारी पडण्यासाठी, असा संतप्त सवाल नगरसेवकांनी केला. व्ह‌िज‌िटआधी मला कळवायला हवे होते. स्टाफ माझे ऐकत नाही, अशा सबबी फुलकर यांनी सांगताच नगरसेवकांचा पारा चढला. त्यांनी डेकाटे यांना तातडीने येण्यास भाग पाडले. डेकाटे आल्यावर त्यांच्याशी दोन तास वादळी बैठक झाली. त्यांनी येथील समस्या १५ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिले.

या आहेत समस्या

एका रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्यास डॉक्टर नसल्याने त्याचा मृत्यू झाला. काचेच्या एकाच पेटीत दोन बालके ठेवली जातात. स्टाफ नम्रतेने वागत नाही. २००५ पासून रुग्णांना पिण्यास घातक पाणी मिळत आहे. टाक्या धुतल्या जात नाहीत. सोलर २०१३ पासून बंद आहे. रुग्णांची बेडशीट्स नियमित बदलली जात नाहीत. सीसीटीव्ही बंद आहेत. वैद्यकीय अधिकारी फुलकर पूर्णवेळ थांबत नाहीत. त्यांचे कोणी एकत नाहीत. त्यांच्याकडे तीन चार्जेस असल्याने प्रशासनाचा खेळखंडोबा झाला आहे. श्वान व सर्पदंशावरील लशीची तीव्र टंचाई आहे. डॉक्टर व कर्मचारी संख्या कमी आहे. रुग्णांना बाहेरुन औषधे आणावी लागतात. बिटकोतील औषधे बाहेर विकली जातात. औषधांचे ऑडिटच झालेले नाही. बायोमेट्रिक बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे फावते.

डेकाटेंची आश्वासने

g पंधरा दिवसांत बिटकोचा सेटअप बदलणार.
g आठवड्यातील दोन दिवस सकाळी नऊ ते पाच बिटकोत थांबणार
g वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीस सहाय्यक देणार
g डॉक्टरांनी बाहेरुन औषधांचे प्रिस्क्र‌िप्शन दिल्यास कारवाई करणार
g औषधे बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना महापालिकेचे लेबल लावणार.
g ८ जुलैपर्यंत नवीन डॉक्टरांची नियुक्ती करणार.
g सीसीटीव्ही तातडीने सुरू करणार.
g दर आठवड्याला बिटकोच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार.
g वैद्यकीय अधिकारी आठ तास हॉस्पिटलमध्ये थांबतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’सिंचनातून फुलणार उद्याने!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
केंद्राच्या अमृत योजनेतून शहरातील उद्यानांचा कायापालट केला जात आहे. पंचक आणि मखमलाबाद येथे सुसज्ज उद्यानांचे काम प्रगतीपथावर आहे. पंचक येथे चार एकरवरील उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, हे उद्यान १ ऑगस्टपासून नागरिकांसाठी खुले होणार आहे. तर मखमलाबादच्या तवली फाटा येथील उद्यान सुशोभिकरणाची निविदा काढण्यात आली आहे. या दोन्ही उद्यानांच्या कामांनतर वसंत कानेटकर उद्यानाचे सुशोभिकरणही अमृत योजनेतून केले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.
अमृत योजनेतून पंचक येथे चार एकर जागेवर सुसज्ज असे उद्यान तयार केले जात आहे. यासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिव्ह‌िल वर्क हे ३१ जुलैपर्यंत पूर्ण केले जाणार असून हे उद्यान नागरिकांसाठी १ ऑगस्टपासून खुले केले जाणार आहे. पंचकपाठोपाठ मखमलाबाद येथील तवली फाटा येथे दहा एकर जागेवर भव्य उद्यान तयार केले जाणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत कामाला लगेच मंजुरी दिली जाणार आहे. जानेवारीपर्यंत या उद्यानाचेही काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी दोन मोठी सुसज्ज उद्याने नागरिकांसाठी खुली होणार असल्याची माह‌िती आयुक्तांनी दिली. याशिवाय गंगापूर गाव येथील वसंत कानेटकर या उद्यानाच्या सुशोभिकरणाचे कामही अमृत योजनेतून केले जाणार आहे. या दोन उद्यानांच्या कामांतून मिळणारा वाढीव निधी हा कानेटकर उद्यानाच्या कामासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे कानेटकर उद्यानाचाही वनवास संपणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंगळे यार्डातून आऊट!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. पिंगळे यांच्या विरोधात १३ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी पत्र दिल्यानंतर या ठरावासाठी मंगळवारी (दि. ४) रोजी सभा घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी प्रातांधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा १६ संचालक उपस्थित होते. १५ संचालकांनी पिंगळे यांच्या विरोधात मतदान केले. अध्यक्षांनी पिंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.

बाजार समितीच्या कार्यालयात सकाळी अकराला सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. पिंगळे यांनी शनिवारी (दि.१) सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या सभेत अविश्वास ठरावाची प्रोव्ह‌िजन करता येणार नसल्याचे येडगे यांनी सांगितले. त्यावर संचालक शिवाजी चुंभळे यांनी बाजार समितीत सभापती असताना दामोदर मानकर यांनी राजीनामा दिला असताना त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला गेला होता, असे सांगत त्यावेळीची प्रोसिडिंग दाखविली. त्यामुळे आताही मतदान घेण्यात यावे, अशी सूचना केली. संचालकांनीही या सूचनेला अनुमोदन दिल्यामुळे मतदान घेण्याचे ठरविण्यात आले.

हात दाखवून मतदान करण्याचे अध्यक्षांनी सांगितल्यावर उपस्थित १६ पैकी १५ संचालकांनी हात उंचावून पिंगळे यांच्या विरोधात असल्याचे सांगितले. अध्यक्षांनी प्रत्येक संचालकांच्या नावाचा उल्लेख करून त्यांचे मत विचारात घेतले. तसेच प्रोसिडींगवर प्रत्येक संचालकांची सही घेतली. श्यामराव गावित, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, शंकर धनवटे, शिवाजी चुंभळे, तुकाराम पेखळे, संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, विमल जुंद्रे, दिलीप थेटे, विश्वास नागरे, संजय तुंगार, रवींद्र भोये, भाऊसाहेब खांडबहाले, संदीप पाटील या १५ जणांनी पिंगळे यांच्या विरोधात अविश्वासाच्या बाजूने मतदान केले. प्रभाकर मुळाणे यांनी मतदानासाठी हात वर केला नाही. तसेच ताराबाई माळेकर या सभेचे कामकाज संपल्यानंतर आल्याने त्यांचे उपस्थिती ग्राह धरण्यात आली नाही. बाजार समितीच्या या सभेसाठी शिवाजी चुंभळे यांच्यासोबतच १३ संचालक पावणे अकरालाच हजर झाले होते.

आषाढीचा योगायोग

दोन वर्षांपूर्वी आषाढी एकादशीच्या दिवशी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी झाली होती. त्यात पिंगळे यांच्या पॅनलचे १५ संचालक निवडून आले होते. विरोधकांना केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. दोन वर्षांनंतर आज, आषाढी एकादशीच्याच दिवशी १५ संचालकांनी पिंगळे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला. त्यामुळे त्यांच्याकडे स्वतःसह केवळ तीन संचालक उरले, हा योगायोग की नियतीची खेळी अशी सभेनंतर चर्चा सुरू होती.

चुंभळेंची दावेदारी, घोडेबाजाची चर्चा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आता सभापतिपद निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अविश्वास प्रस्तावासाठी संचालकांची जुळवाजुळव करणारे जिल्हा बँकेचे संचालक शिवाजी चुंभळे हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पिंगळेंना हटवण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. सभापतिपदासाठी आता बहुतांश संचालक चुंभळे यांच्या नावावर राजी असल्याचे समजते. अर्थात अर्थपूर्ण देवाण-घेवाणीचा शब्द मिळाल्यानेच त्यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची चर्चा आहे. बाजार समितीवर असलेली बरखास्तीची टांगती तलवारही दूर करण्यासाठी एका आमदाराच्या मध्यस्थीने भाजपची मदत घेण्याची तयारी सुरू असल्याचेही समजते. चुंभळे शिवसेनेत आहेत, तर राष्ट्रवादीचे काही सदस्य भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप मिळून बाजार समितीवर कब्जा करू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत अडीच लाखांची दारू जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोड येथील लक्ष्मणनगर येथे देशी आणि विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी (दि. ३) रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करून भरत रामकिसन गुंजाळ (रा. लक्ष्मण नगर, पेठरोड, पंचवटी) यांना ताब्यात घेतले, त्याच्याकडील दोन लाख ४९ हजार ६०० रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली.

पंचवटी पोलिसांना पेठरोड येथील लक्ष्मणनगरात शांताबाई गुंजाळ यांच्या किराणा दुकानामागे एका खोलीत देशी दारू आणि विदेशी दारूच्या बाटल्या विनापरवाना विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकला. त्या खोलीत प्रिन्स संत्रा देशी दारुच्या १८० मिलीलिटरच्या आणि प्रिन्स संत्रा टँगो पंच देशी दारूच्या १०० पेट्या आढळल्या. त्यांची किंमत दोन लाख ४९ हजार ६०० रुपये आहे. या बाटल्या विनापरवाना बेकायदेशीर विक्री करण्यात येत होत्या.

पोलिसांच्या छाप्यात या पेट्या ताब्यात घेऊन जप्त करण्यात आल्या. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक महेश इंगोले, एस. के. म्हात्रे, प्रवीण कोकाटे, संजय पाटील, सुरेश नरवडे, प्रभाकर पवार, संदीप शेळके, संतोष काकड, महेश साळुंके, विलास चारोस्कर यांनी छापा टाकून ही कारवाई केली.

येवल्यात सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने येवला येथे दोन वेगवेगळे छापे मारून मद्याच्या तब्बल २८९ तसेच बियरच्या १२ बॉटल्स जप्त केल्या. या कारवाईत एकूण एक लाख २५ हजार १३९ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हायवेवरील शेकडो बार बंद झाले असून, चोरी छुपे मद्य विक्री करण्याचे प्रकार वाढले आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त पी. पी. सुर्वे तसेच अधिक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वेगवेगळे पथक अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर लक्ष ठेऊन आहे. याच पार्श्वभूमीवर येवला विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक सुचित कपाटे, सहायक दुय्यम निरीक्षक एन. के. मोरे, जवान डी. आर. रतवेकर, जी. एन. गरूड, के. आर. चौधरी, डी. आर. नेमनार आदींनी येवला शहर व येवला रोडवरील पिंपळगाव जलाल शिवार येथून वाहतूक होणारा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत एकूण २८४ देशी विदेशी मद्याच्या बॉटल्स, १२ बिअरच्या बॉटल्स तसेच एमएच १५ सीडी १७४९ ही ओमनी कार जप्त केली. या प्रकरणी योगेश पोपटराव जावरे (३१, रा. नामपूर, ता. सटाणा) आणि यशवंत सोपान शिंदे (३५, नांदगाव) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, या छाप्याचा सखोल तपास केला असता बनावट दारूचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या दोन्ही घटनांचा अधिक तपास निरीक्षक श्रीवास्तव करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगशिक्षणाचे मिळणार धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री शारदा मल्टीपरपज संस्था संचलित श्री आदियोग आंतरराष्ट्रीय शिक्षण, अनुसंधान आणि साधनापीठ इन्स्टिट्यूटमध्ये योगशास्त्र अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. योगशास्त्र आणि संस्कृत या विषयातील डिप्लोमासोबतच योगशास्त्रातील पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे. या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

तिडके कॉलनी परिसरात श्री आदियोग कॉलेज आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी हे महाविद्यालय संलग्न असून डिप्लोमा इन योगशास्त्र, डिप्लोमा इन संस्कृत आणि एम. ए. इन योगशास्त्र असे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आठवड्यातून शनिवार व रविवारी या दोन दिवशी अभ्यासक्रमांचे लेक्चर्स होणार असून विविध विद्याशाखांमधील युवकांसोबतच गृहिणी वर्ग, महिला, विविध आस्थापनांमधील कर्मचारी यांच्यासाठीही या प्रवेशांची संधी आहे. योगशास्त्र डिप्लोमा हा अभ्यासक्रम कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्णांसाठी असून या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षे आहे. डिप्लोमा इन संस्कृत हा अभ्यासक्रमही एक वर्षे कालावधीचा असून यासाठी दहावी उत्तीर्ण अशी पात्रता आहे. तर एम. ए. योगशास्त्र या अभ्यासक्रमासाठी योग पदविका उत्तीर्णतेसोबतच कुठल्याही विद्याशाखेतील पदवी असे निकष आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ईश्वरकृपा, दुसरा मजला, नाशिक ब्लड बँकेच्या जवळ, चांडक सर्कल, तिडके कॉलनी, नाशिक येथे किंवा प्राचार्य अतुल तरटे (७५०७७७८६९५ / ९८५००३७२६३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संशोधनास मोठा वाव

योगशास्त्र शिक्षणासाठी अलिकडील काळात केंद्र आणि आयुष मंत्रालयाची अनुकूल बनलेल्या धोरणांमुळे करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या डिप्लोमा किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांनंतर योगशिक्षक, योग समुपदेशक, योगा मार्गदर्शक अशा पदांवर शिक्षणसंस्था, पर्यटन विश्रामगृह, स्वास्थ्यकेंद्र, समुपदेशन केंद्र आदी ठिकाणी करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. याशिवाय योगशास्त्रात संशोधनासाठीही मोठा वाव असून अप्लाइड योगामध्ये पाश्चात्य देशांमध्येही मोठ्या संधी उपलब्ध आहेत, अशी माहितीही कॉलेजने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images