Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पिंपळगावात चोरांचा हैदोस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पिंपळगाव बसवंत येथे चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. बँकेतून पैसे घेऊन निघालेल्या शेतकऱ्यांच्या गाडीतून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली. शहरातील बस डेपो शेजारच्या एचडीएफसी बँकेजवळ ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून पिंपळगा बसवंत शहरात चोऱ्या, दरोड्यांचे सत्र सुरुच असून, त्यामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणत्याही घटनेतील चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती सापडले नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दलही नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

जऊळके वणी (ता.दिडोरी) येथील शेतकरी राजेंद्र बाबुराव पाटील यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता बँकेतून दोन लाख रुपये काढले. त्यानंतर ते बँकेच्या बाहेर लावलेल्या कारमध्ये (एमएच १५ ईडी ९९७३) पैसे ठेवून शेजारच्या दुकानात वस्तू घेण्यासाठी गेले. त्यानंतर काही वेळात चोरट्यांनी गाडीच्या डाव्या बाजूची काच फोडून दोन लाखांची रोकड लंपास केली.

पल्सर मोटारसायकवरून हे दोन आले होते. काही क्षणातच त्यांनी काच फोडून गाडीतील दोन रुपये लंपास केले. त्यानंतर हे दोन्ही चोरटे मोटारयायकलने मुंबई-आग्रा महामार्गाने न जाता शहरातून पसार झाले. त्यामुळे ते शहरातील आहेत की, शहराबाहेरच्या याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

गुन्ह्यांमध्ये वाढ

शहरातील चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या शुक्रवारी (दि.२३) पहाटे येथील चिंचखेड रोड लगत राहणाऱ्या रवींद्र रामदास मोरे यांच्या घरावर दरोडा पडला होता. चोरट्यांनी मोरे कुटुंबावर प्राणघातक हल्ला करून दहा हजार रुपये, मंगळसूत्र लंपास केले होते. तसेच आजूबाजूच्या घरांवरही दगडफेक केली होती. त्यानंतर सोमवारी (दि. २६) शहरात खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटन घडल्या होत्या. पिंपळगाव बसवंत हे शहरा मुंबई-आग्रा महामार्गावर असल्यामुळे चोरट्यांनी येथून लगेच पसार होता येते. मात्र शहरातच मोठे पोलिस ठाणे असूनही पोलिसांचा चोरट्यांवर धाक उरला नसल्याचे वरील घटनांवरून दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेचार लाखांचे दागिने केरसानेतून लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराजवळील पाकळे वस्तीवर सोने व दोन दुचाकी चोरीच्या घटनेची रात्र उलटते न उलटते तोच तालुक्यातील केरसाने येथे निवृत्त शिक्षक राजाराम आनंदा आहिरे यांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल साडेचार लाख रुपये किमंतीचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. अहिरे यांनी सटाणा पोलिसात तक्रार दिली आहे.

अहिरे कुटुंबियांसह केरसाणे शिवारात वास्तव्यास आहेत. बुधवारी ते पत्नी आणि मुलासह घरात झोपलेले होते. गुरुवारी पहाटे ते लघुशंकेसाठी उठले असता घराच्या दोन्ही खोल्यांच्या कड्या बाहेरून लावल्याचे त्यांना समजले. त्यांनी किचनच्या दरवाजातून बाहेर आले. त्यांना इतर खोलीतील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळले. घराच्या छतावरील तीन कौलेही काढलेली दिसली. कपाट तपासले असता त्यातील सोन्याच्या दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. ४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनात बिघाड; नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक


नाशिक-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक मागील दीड तासांपासून ठप्प पडली आहे. नाशिकजवळ वाराणसी-दादर एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस बंद पडल्यामुळे अन्य लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गोदावरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. बिघाडग्रस्त इंजिन काढण्याचे प्रयत्न सुरू असून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस स्टेशनजवळच चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जेवण करून हॉटेलमधून बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना मुंबई नाका पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ तास उलटूनही चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची नातेवाईक असलेल्या नाझीया फैयाज सय्यद (रा. पोलिस वसाहत, गंगापूर रोड) या महिलेने घटनेबाबत तक्रार दिली आहे. नाझीया सय्यद कुटुंबीयांसह मुंबई नाका पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायबा हॉटेल येथे बुधवारी (दि. २८) रात्री जेवणासाठी गेल्या होत्या. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास त्या कारमध्ये बसत असताना एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून पोबारा केला. या घटनेनंतर सय्यद यांच्या पतीने तात्काळ कारने चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, पुढे उभ्या असलेल्या दुचाकीस्वार साथीदारासमवेत आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर आला आहे. दरम्यान, चेन स्नॅचिंगच्या घटनेनंतर महिलेने आरडाओरड केल्याने हॉटेलमधील नागरिकांसह नजीकच असलेल्या पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ हॉटेल व परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये आरोपी दिसत असून, ते महिलेच्या पाळतीवर असल्याचे स्पष्ट होते. मात्र, घटना घडून २४ तासानंतरही चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.

मृतदेह आढळला
पंचवटीतील होंडा शोरूम भागातील पाणपोईच्या बाकड्यावर बुधवारी (दि. २८) दुपारी ४० ते ४५ वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे खालील वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हवालदार बी.व्ही. थेटे यांनी केले आहे. रंगाने निमगोरा, उंची साडे पाच फूट, शरीराने सडपातळ, चेहरा उभट, डोक्याचे केस वाढलेले, पाठीवर जुन्या जखमेचे व्रण असे मृतदेहाचे वर्णन आहे. त्याने अंगात विटकरी रंगाचा बारीक चौकटींचा शर्ट व विटकरी रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.

अपघातामधील जखमीचा मृत्यू
नाशिक : भरधाव दुचाकीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची घटना सोमवारी (दि. २६) दुपारी त्र्यंबकरोडवर झाली होती. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सुधाकर बाबुराव भावसार (रा. फुले शासकीय वसाहत, टिळकवाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी भावसार सिव्हिल हॉस्पिटलच्या सेवेतून निवृत्त झाले होते. भावसार टिळकवाडीकडून भवानी सर्कलकडे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पायी जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली होती.

कॉलेजरोडला भरदिवसा चोरी
नाशिक ः भरदिवसा घरात प्रवेश करून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून सोने-चांदीचे दागिने, रोकडसह असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही घटना कॉलेजरोड परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली आहे.
सपना नंदलाल जैन (रा. रुपक सोसा. विसेमळा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. मंगळवारी (दि. २७) सायंकाळी ही घटना घडली. जैन कुटुंबीय कामात व्यस्त असतांना चोर उघड्या घरात घुसला. त्याने थेट बेडरुममध्ये प्रवेश करीत कपाटातील रोकड, सोन्याचांदीचे दागिने तसेच बेडवर ठेवलेला लॅपटॉप, माऊस, चाजर्र, हेडफोन असा सुमारे चार लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.

पेटीएम वॉलेटचा गैरवापर
हरवलेल्या मोबाइलवर डाऊनलोड केलेल्या पेटीएम वॉलेटचा गैरवापर करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भामट्यांनी सापडलेल्या मोबाइलवरील पेटीएम वॉलेटचा वापर करीत बँक खात्यातील चार हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिष अशोक जोशी (रा. निसर्ग रो हाऊस, देवळालीरोड) यांच्या तक्रारीनुसार, २१ ते २४ जून दरम्यान जोशी कुलू मनाली येथे पर्यटनासाठी गेले होते. या ठिकाणी त्यांची बॅग हरवली. बॅगमध्ये कॅमेरा, मोबाइलसह अन्य साहित्यही होते. दरम्यान ते सहलीवरून परतले. मात्र, त्यांच्या हरवलेल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेल्या पेटीएम वॉलेटचा भामट्यांनी गैरवापर केला. जोशी यांच्या बँक खात्यातील चार हजार १० रुपयांची रक्कम चोरट्यांनी परस्पर खर्ची केली. घटनेचा अधिक तपास निरीक्षक चौधरी करीत आहेत.

ज्येष्ठ नागरिक बेपत्ता
नाशिकरोड : उपनगर परिसरातील लोखंडे मळ्यातील हनुमंत नगरमधील शांताराम दगडू रुपवते (६८, रा. रुख्मिणी हौसिंग सोसायटी) हे सोमवार (दि. २६) दुपारी तीनच्या सुमारास फिरायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. त्यानंतर सायंकाळी नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला असता ते कुठेही सापडले नाहीत. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात नातेवाइकांनी तक्रार दिली आहे. रंग सावळा, मध्यम बांधा, उंची चार फूट असे त्यांचे वर्णन आहे. ते आढळल्यास उपनगर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळीबारप्रकरणी चौघे ताब्यात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

हप्ता न दिल्याच्या रागातून गुरुवारी (दि. २९) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या संदीप लाड याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली होती. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणातील चार संशयितांवर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यातील एका संशयिताला गुरुवारी रात्री तर फरार झालेल्या तिघा संशयितांना औरंगाबाद येथे ताब्यात घेण्यात आले आहे.

गोळीबारानंतर फरार झाल्यांचा शोध घेत असताना ते औरंगाबादला गेल्याचा सुगावा पोलिसांनी लागला, पोलिसांचे एक पथक रात्रीच औरंगाबादला रवाना झाले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शेखर निकम, केतन निकम आणि विशाल भालेराव यांना ताब्यात घेतले. चौथा संशयित संदीप पगारे याला गुरूवारी रात्रीच अटक झाली होती.

संदीप अशोक लाड (रा. भराडवाडी, फुलेनगर, पंचवटी) याच्यावर गोळीबार करणाऱ्या संशयित शेखर निकम व केतन निकम यांचा भाऊ किरण निकम याची पेठरोड येथे हत्या झाली होती. या खूनाचा सूड घेण्याच्या उद्देशाने शेखर आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या भावाचे मारेकरी जेलरोड येथे असल्याचे समजून कसारा येथून नातेवाइकाकडे आलेल्या एका युवकाची हत्या केली होती. या हत्येतील संशयित शेखर निकम तेव्हापासून फरार होता. पोलिसांना हुलकावण्या देऊन तो हप्ता वसुलीचे काम करीत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. संदीपकडून अपेक्षित हप्ता मिळला नसल्याने त्याने गोळी झाडली होती. घटनेनंतर चौघे संशयित फरार झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅकर्सकडून महिला लक्ष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून त्याद्वारे अश्लिल मॅसेज पसरवणाऱ्याचा फटका आणखी दोन महिलांना बसल्याचे उघड झाले आहे. सायबर पोलिस स्टेशनकडे फिर्याद देणाऱ्या तक्रारदारांची संख्या ३० झाली असून, यात २८ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, संशयितांच्या मागावर दोन पथके असून, लवकरच तो जेरबंद होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

व्हॉट्सअॅप अथवा फेसबुक आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले असले तरी ते तितके सुरक्षित नसल्याचा प्रत्यय नाशिककरांनी बुधवारी घेतला. एका हॅकरने अगदी छोट्याशा ट्रिकद्वारे तब्बल २६ महिलांसह दोन पुरुषांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले होते. याच पध्दतीने त्याने काही फेसबुक अकाउंटवरदेखील डल्ला मारला. हॅक केलेल्या अकाउंटवरून हॅकरने

कॉर्न्टक्ट लिस्ट किंवा फ्रेंडलिस्टमधील महिलांना अश्लिल मॅसेजेस पाठवण्यास सुरुवात केली. काही जणांना याबाबत संशय आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली. एकापाठोपाठ एक येणाऱ्या तक्रारीवरून हा मास हॅकिंगचा प्रकार असल्याचे पोलिसांचे लक्षात आले.

गुरूवारपर्यंत हॅकिंगचा फटका २८ जणांना बसला. याबाबत सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की हॅकिंगबबत आणखी दोन महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एकूण ३० तक्रारदार समोर आले आहेत. हा आकडा आणखी वाढू शकतो, असे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संशयित आरोपी हा तेवढाच निष्णात असून, ३६ तासानंतरही तो पोलिसांच्या हाती गवसलेला नाही. काही तांत्रिक बाबींचा त्यास फायदा होत असला तरी त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली असल्याचे पवार यांनी सांगितले.

संशयिताचा माग काढून त्यास लवकरच जेरबंद करण्यात येईल. कोणाचे व्हॉट्सअॅप अथवा फेसबुक अकाउंट या पध्दतीने हॅक झालेले असल्यास त्यांनी सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधवा. सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनीच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य ती काळजी घ्यावी.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अघोषित लोड‌शेडिंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहर परिसरात पावसाची संततधार आणि वीजेचा लंपडाव यामुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. शहरात सलग आठ ते दहा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरी जीवनावर याचा थेट परिणाम होत आहे. शासनाने आपत्ती व्यवस्थापन करताना वीजपुरवठा अखंड सुरळीत राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना केलेल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते.

सिंहस्थ नियोजनात जवळपास पाच कोटी रुपये खर्च करत शासनाने त्र्यंबक शहरातील वीज वितरण तारा भूमिगत केल्या आहेत. वादळी वारे आणि पाऊस याचा परिणाम होणार नाही याकरिता खास काळजी घेतल्याचे सांगण्यात येत होते. ते अवघ्या दोन वर्षात फोल ठरले आहे. शहरात मीनीपीलर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. तसेच रस्त्यावर तुंबणारे पाणी थेट या डीपीत जाणार नाही याबाबत कुठलीही दक्षता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे वीजवितरण कारभाराच्या चुकीच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे.

गत महिन्याभरापासून वीजपुरवठा अचानक खंड‌ित होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी भूमिगत तारा खडल्या तर कधी बिघाड न सापडणे असे प्रकार वाढले आहेत. जून महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. शहरात भाविकांची दाटी असतांना वीज नसणे ही एक प्रकारची गैरसोयच आहे. व्यवसाय‌िक जनरेटर सारखी यंत्रणा वापरत वीजेची गरज भागवतात मात्र, सर्वसामान्य ग्रामस्थांना हे परवडणारे नाही. सायंकाळी व रात्री वीज नसल्यास सुरक्षेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पर्यटक, भाविक अंधारात

राज्यात सर्वत्र भारनियमन असतांनादेखील त्र्यंबकेश्वर हे तीर्थपर्यटनस्थळ असल्याने येथे अखंड वीजपुरवठा ठेवण्यात आला होता. मात्र सध्या वीजपुरवठा सतत खंड‌ित होत आहे. त्र्यंबक शहरास ३३ केव्हीच्या दोन फिडर यंत्रणा आहेत. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळचे आणि खंबाळे येथेल अशा दोन ठिकाणी पावरस्टेशन असतानाही नियोजनाअभावी नागरिकांवर अंधारात चाचपडण्याची वेळ आली आहे.
घोटीतही पुरवठा खंडित
इगतपुरी तालुक्याची उद्योगनगरी समजल्या जाणाऱ्या घोटी शहरात
शुक्रवार मध्यरात्रीपासून अचानक वीजपुरवठा खंडित झाला आहे. उद्योग व्यवसायांवर याचा थेट परिणाम झाला आहे. वीजमंडळाच्या अनागोंदी कारभाराला घोटीकर त्रस्त झाले आहेत. दरम्यान या आठवड्यात ही समस्या प्रखरपणे जाणवत असल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून घोटी व इगतपुरी परिसरात होत असलेल्या दमदार पावसामुळे वीजपुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली आहे. कधी दिवसा तर कधी रात्री वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सामान्य जनता त्रस्त असताना पदाधिकारी व विविध पक्षाचे राजकीय पुढारी मात्र तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत. तालुक्यातील खेड्यापाड्यांवर विजेचे पोल कोलमडले असून तेथेही पुरवठा खंड‌ित आहे. शुक्रवारी पहाटे एक वाजेपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सन्मान सिटिझन रिपोर्टर्सचा...

$
0
0

सन्मान सिटिझन रिपोर्टर्सचा...

मटा सिटिझन रिपोर्टर हे अतिशय प्रभावी अॅप असून, त्याद्वारे समाजाचे मोठे काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे मत मटा सिटिझन रिपोर्टर्सनी व्यक्त केले. दर आठवड्याप्रमाणे यंदाही निवडक सिटिझन रिपोर्टर्सचा सन्मान करण्यात आला. गिरीश ताजणे, सुरेश शेखरे, रवींद्र गुडी, मनीष निकुंभ या सिटिझन रिपोर्टर्सला ‘मटा’चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यापुढेही आम्ही या अॅपद्वारे सार्वजनिक समस्या, तक्रारी, अडी-अडचणी पाठवू, असा निर्धार सिटिझन रिपोर्टर्सनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदाही वृक्षलागवडीचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात उद्यापासून (१ जुलै) वृक्षलागवड सप्ताह साजरा करण्यात येत असून, सात जुलैपर्यंत जिल्ह्यात ४४ लाख १३ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. राज्यात चार कोटी वृक्षलागवडीचे उद्द‌िष्ट ठेवण्यात आले आहे.

वन विभागाने वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्यासह सर्व तयारी पूर्ण केली आहे. एकूण वृक्षलागवडीपैकी वन विभाग १९४ ठिकाणी ३४ लाख ८९ हजार, ग्रामपंचायत १३१४ ठिकाणी पाच लाख आणि इतर सरकारी यंत्रणा ३१०१ ठिकाणी चार लाख १८ हजार वृक्षलागवड करणार आहे. वृक्षलागवडीसाठी वन विभागाच्या ८६ रोपवाटिकांत एक कोटी १२ लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. वृक्षलागवड कार्यक्रमानंतर उरणारी रोपे पुढील वर्षाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात उपयोगात आणली जाणार आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार ७६४ जणांनी वन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली असून, विभागातील ही सर्वाधिक नोंदणी आहे. गेल्या वर्षी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण २९ लाख २९ हजार रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी वन विभागाने लावलेली ९० टक्के, तर इतर यंत्रणांनी लावलेली ७५ टक्के रोपे जगली आहेत. नागरिकांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वृक्षलागवड कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पर्यावरण रक्षणात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

येथे करा नोंदणी

नागरिकांना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ‘My Plants’ या मोबाइल अॅप्लिकेशनची मदत घेता येणार आहे. तसेच ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, मनमाड आणि चांदवड येथील १२ ठिकाणी कक्ष उभारून नागरिकांना रोपे वाटप करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत १९२६ क्रमांकावरदेखील नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. वृक्षलागवडीसाठी हरितसेना सदस्य नोंदणी सुरू असून, वन विभागाच्या mahaforest.gov.in या संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत अनुदानासाठी आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजनेतील तसेच अपंग, व विधवा महिला लाभार्थी अनेक महिन्यांपासून शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा बच्छाव यांच्या नेतृत्त्वाखाली येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. लाभार्थ्यांना त्वरित वेतन अनुदान मिळावे, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.

शुक्रवारी सकाळी अकराला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर पुतळ्यापासून अपंग, वृद्ध व महिलांचा मोर्चा काढण्यात आला. तहसील आवारात मोर्चा येताच तहसीलदार सुनील सैंदाणे यांना निवेदन देण्यात आले. गोरगरीब लाभार्थ्यांना शासनाकडून एक आधार म्हणून दर महिन्याला गरीब कुटुंबाना काही अंशी रक्कम दिली जाते. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत राज्य शासनाकडून ही रक्कम अनुदान स्वरुपात दिली जाते. मात्र सहा ते सात महिन्यांपासून हे अनुदान रखडले आहे. या लाभार्थ्यांना ही रक्कम देण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या देण्यात आला आहे. या आंदोलनात वेणुबाई बच्छाव, मीराबाई पानपाटील, शांताबाई देवरे, सिंधुबाई अहिरे, शीलाबाई देवरे, रमाबाई अहिरे आदींसह महिला व पुरुष सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती बरखास्त करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची निराशा केल्याचा आरोप करत किसान शिखर मंचने नाशिकमध्ये बैठक घेऊन पुन्हा शेतकऱ्यांना संघटित करून लढा उभारण्याचा बिगूल वाजवला. या बैठकीनंतर मंचाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुकाणू समितीने कर्जमाफीच्या विरोधात ठरवलेल्या संघर्षयात्रेत व आंदोलनात सहभाग न घेण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, शेतकऱ्यांची तत्त्वतः कर्जमाफी व कर्जमाफीचे निकष किसान शिखर मंचाला मान्य नाहीत. शेतीशी संबंधित मूलभूत प्रश्न सरकारने तातडीने सोडवणे गरजेचे असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

राजू शेट्टींना महाराष्ट्रात अपयश आल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरू केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्याचप्रमाणे सरकारमध्ये प्रतिनिधी ठेवायचा व सरकारशी संघर्ष करायचा, यावरही या नेत्यांनी बोट ठेवत टीका केली. राज्यभरातील शेतीप्रश्नावर लढणाऱ्या नेत्यांनी एकत्र येत औरंगाबाद येथे प्राथमिक बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी नाशिकमध्ये त्यात दिशा ठरवण्यात आली. सुकाणू समितीने ९ जुलै रोजी नाशिकमध्ये बैठक होणार आहे. बैठकीनंतर ९ जुलैपासून नाशिक येथून संघर्षयात्रा काढण्यात येईल. पुणे येथे २३ जुलै रोजी या यात्रेचा समारोप होईल. तत्पूर्वीच किसान शिखर मंचने बैठक घेऊन त्याला विरोध सुरू केला. पत्रकार परिषदेत शेतकरी एकत्रीकरणासाठी पुढाकार घेणारे माजी अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी सांगितले, की नुकत्याच कर्जमाफीसाठी झालेल्या शेतकरी आंदोलनावेळी सुकाणू समितीचे सदस्य व अन्य नेते अपुरे पडत असल्याचे दिसून आले. त्याचे कारण दिवंगत शरद जोशी यांच्या कृषी अर्थशास्त्राची पुरेशी वैचारिक बैठक आंदोलनाला नाही, असे लक्षात आल्यानंतर जगभर चर्चा झालेल्या शेतकरी संघटनेच्या संबंधित नेत्यांशी महिनाभर चर्चा होत होती. औरंगाबादला एक प्राथमिक बैठकही झाली. त्यानंतर नाशिक येथे किसान शिखर मंच बैठक घेण्याचे निश्चित झाले. सध्याच्या अडचणीच्या काळात शिखर मंच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा दिलासा राज्यभरातील शेतकऱ्यांना देणे आणि शेतीशी संबंधित मूलभूत प्रश्नांवर दीर्घकालीन लढाईची दिशा ठरविणे हा या बैठकीचा उद्देश होता. सरकारने केलेल्या कर्जमाफीचे निकष आणि केलेली कर्जमाफी सरसकट की तत्त्वतः, सातबारा अजून कोरा नाही, ३० जून २०१६ पर्यंतच कर्जमाफी अशा जाचक अटी असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकच्या गोल्फ क्लब विश्रामगृहावर ही बैठक झाली. यावेळी बैठकीत विधानसभेचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, अजित नरदे, डॉ. गिरिधर पाटील, खेमराज कोर, भगवान बोराडे, सुनील पवार, देविदास पवार, सुरेखा ठाकरे, शांताराम जाधव, शंकर पूरकर, रामनाथ ढिकले, अर्जुन बोराडे आदी उपस्थित होते. किसान शिखर मंचच्या या बैठकीतच शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक नागपूर येथे १६ व १७ जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर विभागवार दौरे, मेळावे व त्यानंतर राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांची खरीपकोंडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात मेअखेर जिल्हा सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांने फक्त ९,१९० शेतकऱ्यांना १६८ कोटी १४ लाख रुपयांचे कर्जवाटप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व ३४ बँकांना २८०६ कोटींचे उद्दिष्ट सरकारने दिले होते. मात्र, त्यातून केवळ ५.९९ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. गेल्या वेळेस खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ३ लाख ३ हजार ६९६ शेतकऱ्यांना २७८३ कोटी ७८ लाख रुपयांचे कर्जवाटप केल्यामुळे त्याची टक्केवारी ११८ टक्के झाली होती. त्यात जिल्हा बँकेने सर्वाधिक १७१९ कोटी १८ लाख कर्ज दिले होते.

यंदा नाशिक जिल्हा मध्यवर्ती आर्थिक अडचणीत आली व शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. या आर्थिक अडचणीमागे ३४२ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा, पीक कर्ज न मिळणे व बँकेची वसुली रखडणे ही कारणे होती. त्यामुळे बँकेला मोठा दणका बसला. गेल्या वेळेस बँकेने उद्दिष्टापेक्षा ४६२ कोटी अधिक पीक कर्ज खरिपासाठी वाटप केले होते. मात्र, यंदा बँकेने फक्त ३८ कोटी कर्जवाटप केले. त्यांना ११०१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या बँकेबरोबरच राष्ट्रीयीकृत बँकांना १६९१ कोटी २६ लाख रुपये उद्दिष्ट होते, तर ग्रामीण बँकांना ६ कोटी ८८ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. त्याचबरोबर खासगी बँकाना ६ कोटी ९४ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यात स्टेट बँकेने २६ कोटी ५७ लाख, बँक ऑफ महाराष्ट्रने ३० कोटी ७५ लाख, तर बँक ऑफ बडोदाने ११ कोटी १० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे, तर इतर बँकांचा आकडा फारसा समाधानकारक नाही.

पावसाळ्यात खरीप हंगामासाठी खरं तर मार्चनंतर कर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होतो. मात्र, यंदा नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले, तर कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले. त्याचाही परिणाम या कर्जवाटपावर झाला आहे. जूनमधील आकडा अजून समोर आला नाही. त्यातून या बँकेकडून काय दिलासा मिळेल हे स्पष्ट नाही. जिल्हा बँकेची स्थिती खराबच असल्यामुळे त्यात खूप वाढ होण्याची शक्यता नाही.

कर्जमाफीचा काहींना दिलासा

सरकारच्या दीड लाख रुपये कर्जमाफीच्या घोषणेनंतर काही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याची संख्याही खूप कमी आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना बँकेकडून फारसा दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकाराकडून कर्ज काढून किंवा स्वतःचे पैसे टाकूनच पीक काढावे लागणार आहे. त्यासाठी काहींनी पेरणीला सुरुवातही केली आहे. त्याचा आकडा या महिन्यात ३४ टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाला पुन्हा लाभला ‘राम’स्पर्श

$
0
0

डॉ. ताकवलेंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ टाकतेय कात

ना‌शिक : उखाळ्या-पाखाळ्या, जातीय राजकारण, कर्मचाऱ्यांचे न सुटणारे प्रश्न या विळख्यात सापडलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला तारण्याचा रामबाण उपाय म्हणून विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांना पाचारण करण्यात आले आहे. मुक्त विद्यापीठाला पुन्हा एकदा त्यांचा परिसस्पर्श लाभला असून, त्यांच्या प्रगल्भ अन् अनुभवी ज्ञानाचा फायदा विद्यापीठाला होणार असल्याने मुक्त विद्यापीठ कात टाकणार आहे.

मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र शासनाने निर्मित केलेले पहिले मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १ जुलै १९८९ ला करण्यात आली. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन मुक्त विद्यापीठ दूरशिक्षणाचे यशस्वी काम करीत आहे. तसे पाहिले तर मुक्त विद्यापीठ म्हणजे एकप्रकारे पांढरा हत्तीच. तो पोसणे ही अवघड बाब परंतु, ही बाब लिलया पेलून दाखवली होती ती डॉ. राम ताकवले यांनी. मुक्त विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाद्वारे देण्यात येणाऱ्या पदव्या इतर पारंपारिक विद्यापीठाच्या समकक्ष आहेत. मात्र मुक्त विद्यापीठ आणि मुक्त शिक्षण प्रणाली हा विषयच नवीन असल्यामुळे काही मंडळी विद्यार्थ्यांच्या पदवीच्या समकक्षतेबाबत शंका उपस्थित करतात. अशावेळी मुक्त विद्यापीठ रूजविण्याचे काम डॉ. राम ताकवले यांनी केले.

डिजिटायजेशनवर भर

डॉ. राम ताकवले यांचा भर डिजिटायझेशनवर आहे. डिजिटल लोकविद्यापीठ व्हावे अशी त्यांची इच्छा असून, त्यादृष्टीने ते पावले टाकत आहेत. विद्यापीठाने पारंपारिक जळमटे दूर सारून तंत्रज्ञानावर भर द्यावा, अशी त्यांच‌ी शिकवण असून, त्यादृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. आज (१ जुलै) विद्यापीठाचा वर्धापनदिन आहे, आणि अशातच विद्यापीठाला डॉ. राम ताकवलेंसारखा समर्थ हात दिशादर्शक म्हणून लाभणे ही सुखकारक बाब आहे.

डॉ. राम ताकवले हे आमच्यासाठी आदर्श आहेत. डॉ. ताकवले यांच्याशी सुहृदयतेचे संबंध असल्याने ते आम्हाला प्रत्येक गोष्टीत दिशा दाखवतात. सध्या त्यांच्याच मार्गदर्शनाने विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे आणि ते मुक्त विद्यापीठाला एका उंचीवर नेऊन ठेवतील, असा विश्वास आहे.

- डॉ. ई. वायुनंदन, कुलगुरू, मुक्त विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्या. रानडेंचे दुर्मिळ ‘फोटोदर्शन’

$
0
0

सुनील कुमावत, निफाड

ब्रिटिश काळात आपल्या विद्वतेने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमट‌विणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निफाड येथे भव्य स्मारक होत आहे. या स्मारकात आता त्यांचे दुर्मिळ फोटोही पहायला मिळणार आहेत. न्या. रानडे यांच्या पणती व पणतूने ही अमूल्य भेट श्री माणकेश्वर वाचनालयाकडे सुपूर्द केली आहे.

न्या. रानडे यांचा जन्म झालेल्या निफाड येथील जागेवर न्या. रानडेंचे भव्य स्मारक उभे राहत आहे. या स्मारकाच्या उभारणीत न्या. रानडेंचे पणतू रमाकांत विद्वांस, पणती डॉ. वसुधा आपटे, राधा ठाकूर यांनीही सहभाग घेतला आहे. नुकताच त्यांच्या वंशजांनी न्या. रानडे व त्यांच्या परिवारातील शंभर वर्षांपूर्वीचे दुर्मिळ फोटो माणकेश्वर वाचनालयाच्या स्वाधीन केले. हे दुर्मिळ फोटो साधारण ११५ वर्षांपूर्वीचे आहेत. तसेच, या स्मारकात लावण्यात येणाऱ्या न्या. रानडेंच्या अर्धपुतळ्याचा खर्चही डॉ. वसुधा आपटे यांनी केला आहे.

फोटो शंभर वर्षांपूर्वीचे

विद्वांस परिवाराने वाचनालयाला चार फोटो दिले आहेत. या फोटोंमध्ये डॉ. रानडेंची मानसकन्या सखूबाईंनी एक फ्रेम स्वतः आपल्या कलाकुसरीने तयार केली आहे. न्या. रानडेंचा फोटो १९०१ या वर्षांतील आहे. दुसरा एक फोटो रमाबाई रानडेंचा आहे. तिसरा फोटो न्या. रानडे व त्यांच्या समवेत असलेल्या परिवाराचा आहे. रानडे यांचे हे दुर्मिळ फोटो स्मारकात लावण्यात येणार आहेत.

न्या. रानडे यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करताना नामदार गोपाळ कृष्ण गोखले व रमाबाई रानडे असे दोन उत्तुंग व्यक्तिमत्व घडवले. मात्र स्वातंत्र्योत्तर भारतात न्या. रानडेंच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेतली नाही. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांना जो सन्मान मिळायला हवा तो मिळाला नाही, अशी खंत आम्हा रानडे, विद्वांस परिवाराला आहे.

- डॉ. वसुधा आपटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते दुरवस्था पोलिस ठाण्यात!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पावसामुळे देवळाली कॅम्प शहरात सध्या सुरू असलेल्या भूमिगत गटारींच्या कामामुळे अनेक रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याविरोधात येथील वॉर्ड क्रमांक २ चे नगरसेवक भगवान कटारिया यांनी थेट देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात निवेदन देत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

देवळाली शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे काम वॉर्ड क्रमांक ७, ४, ३, २, १ मध्ये सुरू आहे. त्यामुळे गटारीचे पाइप भूमिगत करण्यासाठी रस्ते मधोमध खोदण्यात आले होते. आता पाइप टाकून बऱ्याच अंशी काम पूर्ण झाले आहे. मात्र, खोदण्यात आल्याने बहुसंख्य रस्त्यांवर माती-दगड शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता पावसाने या मातीचे चिखलात रूपांतर झाले आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांची पूर्णपणे वाताहत झाल्याची स्थिती असल्याचा आरोप केला जात आहे. त्यात सर्वाधिक रस्त्यांची दुरवस्था वॉर्ड क्रमांक ४ व ७ मध्ये झाली आहे. रस्त्याने ये-जा करताना हमखास एखादा नागरिक तास-दोन तासांनी घसरून पडत असल्याने शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही बाब नगरसेवक भगवान कटारिया यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाच्या नजरेस वारंवार आणून दिली, तरी प्रशासन आपले आडमुठेपणाचे धोरण सोडत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, कनिष्ठ अभियंता विलास पाटील, आरोग्य अधिकारी सतीश भातखळे व संबंधित कंत्राटदार खिल्लारी यांच्याविरोधात कटारियांनी पोलिसांत तक्रारच दाखल केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने हा सारा चाललेला प्रकार थांबविण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

अधिकारी रजेवर, जनता वाऱ्यावर

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झालेली असताना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ विलास पवार गेल्या तीन-चार दिवसांपासून सुटीवर गेले असल्याने कुठलाही निर्णय घेणे इतर अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. नागरिकांची गैरसोय राहिली एका बाजूला, त्यात सीईओंनी ‘रस्त्याच्या कामासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे’ अशा आशयाचे आवाहन जाहीर नोटीस प्रसिद्ध केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे शहराचा कुठल्याही पद्धतीचा विकास आराखडा नसून, सुरू असलेले भूमिगत गटारीचे काम पूर्णपणे वाया जाणार आहे.

-विश्वनाथ काळे, ज्येष्ठ नेते, रिपाइं

--

सध्याच्या कामांमुळे रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास कॅन्टोन्मेंट प्रशासनालाच जबाबदार धरण्यात यावे.

-भगवान कटारिया, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वन महोत्सवासाठी मालेगावात जागर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य शासनाच्या वनमंत्रालयाकडून १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत मालेगाव वनपरिक्षेत्रात एकूण ९ लाख ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. याबाबत जनजागृतीसाठी शुक्रवारी येथील वन विभाग, पोल‌िस प्रशासन, महापालिका व आम्ही मालेगावकर या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शहरात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

वृक्षदिंडीप्रसंगी पालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, पोल‌िस उपअधीक्षक गजानन राजमाने, उप-विभागीय वन अधिकारी जगदीश येडलावर, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, वन परिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे, मनपा उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, उपस्थित होते.

वृक्षदिंडीचा प्रारंभ राष्ट्रीय एकात्मता चौक येथून करण्यात आला. शहरातील र. वी. शाह विद्यालय, काकाणी विद्यालय, काकाणी कन्या विद्यालय, या. ना. जाधव विद्यालय, ल. र. काबरा विद्यालय, के. बी. एच. विद्यालय, विनय मंदिर शाळा, साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर आदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडीत सहभाग घेतला. काही विद्यार्थिनींनी हिरव्या साड्या परिधान केल्या होत्या. तर काही पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत ताल, मृदृग, चिपळ्याच्या तालावार ठेका धरला होता. सकाळी आठ वाजता राष्ट्रीय एकात्मता चौकातून दिंडीस सुरवात झाली. मोसम पूलमार्गे दिंडी निघाली. वन विभाग कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान मालेगाव युवा संघटना, साई आर्ट क्लासेस, महादेव सेवा समिती, हभप वडगे माऊली यांच्यातर्फे खाऊचे वाटप करण्यात आले. वृक्ष लागवड व संगोपन कार्यात बहुमोल योगदान देणाऱ्या सुनील माधवराव देवरे व अझहर जमील अन्सारी यांना आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती च्या वतीने ‘वृक्षमित्र पुरस्कार २०१७’ देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांसमोरच फुटला विकासकामांचा फुगा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको विभागात झालेल्या विकासकामांची पाहणी थेट मनपा आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी केल्यानंतर अनेक विकासकामे झालीच नसल्याची धक्‍कादायक बाब समोर आली. आयुक्‍तांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात उपस्थित नगरसेवकांनी आयुक्‍तांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. महानगरपालिकेच्या रुग्णालयाची पाहणी करताना डॉक्‍टरच उपस्थित नसल्याचे समोर आले, तर पेलिकन पार्कचीही पाहणी आयुक्‍तांनी केली.

महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर प्रथमच मनपा आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी सिडकोतील पाचही प्रभागांमधील विकासकामांची पाहणी केली. यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर, मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, छाया देवांग, रत्नमाला राणे, प्रवीण तिदमे, किरण दराडे, दीपक दातीर आदी उस्थित होते. अचानक ठरलेल्या या दौऱ्यामुळे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसाळ्यापूर्वी पावसाळी नाले व गटारींची सफाई झाल्याचे सांगण्यात येत असतानाही पुन्हा या ठिकाणी घाण किंवा कचरा कसा आला, असा प्रश्न आयुक्‍तांनीच उपस्थित केल्यावर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. रस्त्यांवर साचलेले पावसाचे पाणी, अस्वच्छता या सर्व गोष्टी पाहून नगरसेवकांनी आयुक्‍तांसमोर नाराजी व्यक्‍त केली. आयुक्‍तांनी पाहणी केलेल्या कामांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या असल्या तरी यावर काही उपाययोजना होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


डॉक्टर अनुपस्थित

सिडकोतील मोरवाडी येथे असलेल्या स्वामी समर्थ रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आयुक्‍त गेले असता त्याठिकाणी डॉक्‍टरच उपस्थित नसल्याचे समोर आले. पावसाळ्यामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ झालेली असताना डॉक्‍टरच याठिकाणी उपस्थित नसल्याचे समोर आल्याने नगरसेवकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. त्यानंतर जवळच असलेल्या पेलिकन पार्कचीही पाहणी आयुक्‍तांनी केली. मात्र, या ठिकाणी असलेली अस्वच्छता पाहून आयुक्‍त थक्‍क झाले.

आयुक्तांनी दखल घ्यावी

सिडकोत यंदा सर्वाधिक नवीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या भागात वारंवार आयुक्‍तांनी पाहणी करून येथील कामांबाबत माहिती घेतली पाहिजे, असे मत यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केले. सिडकोत बऱ्याच ठिकाणी यंदा पावसाळापूर्व कामे योग्य पद्धतीने न झाल्याची तक्रार नगरसेवक करीत आहेत. आगामी काळातील पावसाचा विचार करून ही कामे आता तरी पूर्ण करावीत, असेही नगरसेवकांचे म्हणणे आहे.

सिडकोतील काही नगरसेवकांनी कामांची पाहणी करण्याची मागणी केली होती. ज्या-ज्या ठिकाणी कामात दिरंगाई किंवा दर्जाबाबत शंका वाटली, त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

- अभिषेक कृष्णा, मनपा आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकत्याच राबविलेल्या एका विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये येवला शहर व परिसरातील अनेक चोऱ्यांचा छडा लागला आहे. या धडक मोहिमेतील तपासात एलसीबीच्या पथकाने पाच सराइत चोरांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील चार पोल‌िस अधिकारी आणि तब्बल ४० पोल‌िस कर्मचाऱ्यांच्या पथकाने रात्रभर येवला शहर, पारेगाव रोडसह कनकोरी (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथे विशेष ऑपरेशन राबवून छापे घातले. यात किरण उर्फ शिवा छगन सोनवणे, (रा. पेठ रोड), सागर गुलाब पवार, शंकर ज्ञानेश्वर कुमावत (दोन्ही रा.पारेगाव ता. येवला), चांगदेव भानुदास निकम (रा.कनकोरी ता. गंगापूर) या पाच जणांना पथकाने ताब्यात घेतले. या चोरट्यांनी येवला शहरातील म्हसोबानगर, पाबळेनगर, बाजीराव नगर, लोणारी नगर, विठ्ठलनगर, वल्लभनगर, निवारा कॉलनी, नीलांबरी कॉलनी, पारेगाव रोड, कोटमगाव रोड अशा ठिकाणी घरफोड्या करून लाखो रुपये, दाग‌िने, टीव्ही, कम्प्यूटरसह इतर महत्त्वाचे साहित्य चोरून नेले होते. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण ५ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.१२ घरफोडी व दोन चेन स्नॅच‌ींग व दोन मोटारसायकल चोरी व इतर दोन असे एकूण १६ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर नवले, गजेंद्र पाटील, अरूण पगारे आदींनी ही कामगिरी पार पाडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी हरणाला जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील कासारखेडे शिवारात अज्ञात वाहनाने अडीच ते तीन महिन्यांच्या गरोदर हरणीला धडक मारल्याने तिचे मागील दोनही पाय तुटले. रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेली ही हरीण रस्त्याच्या कडेला तडफडत असतानाच या मार्गावरून जाणारे येवल्यातील ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांनी या जखमी हरणाला येवल्यातील पशू वैद्यकिय दवाखान्यात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. बनकर यांच्या समयसूचकतेमुळे एका हरणासह तर दोन वन्यजिवांचे प्राण वाचले.

येवला तालुक्यात हजारो हेक्टर वनक्षेत्रात अगदी हरीण, काळवीट आदी वन्यजीवांचा संचार आहे. बऱ्याचदा हे वन्यजीव वनक्षेत्र सोडून नागरी वाड्यावस्त्या अथवा शेतशिवाराकडे थडकतात. त्यात कधी रस्ता ओलांडताना त्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू होतो, तर कधी ते मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडून आपले प्राण गमावतात.

येवला-मनमाड रोडवरील येवला तालुक्यातील कासारखेडे शिवारातील जाधव वस्तीजवळ गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अंबादास बनकर हे येवल्याकडून मनमाडकडे जात होते. अशातच त्यांचे लक्ष रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या हरणाकडे गेले. त्यांनी तातडीने हरणाला पाणी पाजून पायातील रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्रयत्न केले. जाधव वस्तीजवळील बाळू शेलार यांना बोलावून बनकर यांनी त्यांच्या वाहनाने जखमी हरणाला येवला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथू डॉ. व्ही. आर. बाऊसकर, डॉ. सतिश कुऱ्हे, परिचर संदीप रक्ताटे यांनी भूल देवून शस्त्रक्रिया करून हरणाला वनविभागाकडे देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बससाठी खासगी कंपन्या इच्छुक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिटी बस सेवेला ताब्यात घेण्यासाठी येथील एका खासगी बस कंपनीने प्रयत्न सुरू केले असून, त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. ही बससेवा ताब्यात घेण्यासाठी अद्याप एसटी महामंडळाने कोणताही निर्णय घेतला नसला, तरी खासगी बस कंपन्यांच्या फेऱ्या नाशिकला वाढू लागल्या आहे. पुणे येथील एका खासगी बस कंपनीने जळगावच्या कंपनीबरोबर संयुक्तपणे ही बससेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी या कंपनीने एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अभ्यास करुन नंतर प्रस्ताव एसटी महामंडळासमोर ठेवणार आहे.

राज्य परिवहन महामंडळातर्फे शहरात सुरू असलेल्या सिटीबसला सहा वर्षांत तब्बल १२५ कोटींहून अधिक तोटा झाला आहे. त्यामुळे महामंडळ या बस चालवण्यास इच्छुक नाही. त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेने ही सेवा ताब्यात घ्यावी, असा प्रस्तावही दिला. पण महानगरपालिकेने हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर एसटीने अनेक मार्गांवरील बससेवा कमी करत आपला तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांची ओरडही वाढली. या सर्व कारणांमुळे अनेक खासगी बस कंपन्या एसटी महामंडळाकडे संपर्क करू लागल्या आहेत. पण त्याबाबत ठोस कोणताच प्रस्ताव अद्याप मिळालेला नाही व एसटीचाही कुठलाही निर्णय झालेला नाही.

सिटी बस सेवेचा वर्षभरात पाच कोटींहून अधिक प्रवासी लाभ घेतात. त्यामुळे ती किती महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन खासगी कंपन्यांचा कल नाशिकला वाढला आहे. पण, दुसरीकडे गेल्या पाच वर्षांत १०८ कोटी रुपयांचा तोटा एसटीला झाला. या आर्थिक वर्षातही १७ कोटी ७९ लाख ६२ हजारांची त्यात भर पडली. त्यामुळे हा आकडा आता १२५ कोटींपर्यंत गेला आहे. यावर्षी सिटी बसच्या माध्यमातून एसटीला ६५ कोटी ११ लाख ५५ हजार रुपये उत्पन्न मिळाले, तर खर्च ८२ कोटी ३१ लाख ४४ हजार झालेला आहे. त्यामुळे खासगी बस कंपनी ही सेवा ताब्यात घेऊन कशी फायद्यात, ठरेल हा प्रश्न मात्र कायम आहे.

नागरिकांचा विरोध?

एसटी महामंडळ चांगली सेवा देत असले तरी अनेक मार्गांवर त्यांच्या बस नाहीत. त्यामुळे त्या सुरू कराव्या ही नागरिकांची मागणी आहे. पण तोट्यात चाललेल्या सिटी बसससाठी हे अवघड आहे. त्यामुळे खासगी बस कंपनीने ते ताब्यात घ्यावे असे काहींचे मत असले तरी अनेक शहरांमध्ये खासगी बससेवेचा अनुभव तितकासा चांगला नाही. त्यामुळे नागरिकांचा याला विरोध असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images