Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सातपूरमध्ये शंभर किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरात मोकळ्या भूखंडांवर प्लास्टिकच्या पिशव्यांमधून कचरा टाकला जातो. यामुळे परिसरातील भूखंडांवर प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला दिसतो. यामुळे महापालिकेच्या सातपूर आरोग्य विभागाने प्लास्टिक मुक्त अभियना सुरू केले आहे. अभियानात भाजी विक्रेते, व्यावसायिकांकडून शंभर किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या.

महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून प्लास्टिक पिशव्या जप्ती मोहीम हाती घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय गांगुर्डे यांनी ‘मटा’शी बोलतांना सांगितले. दरम्यान, प्लास्टिकमुक्त अभियानात प्लास्टिकचा वापर टाळा, असे आवाहनही करण्यात येत आहे. सदर मोहीम सातपूर गाव, भाजी मंडई, सातपूर कॉलनी, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर आदी भागात राबविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवडाभरात कोटीची वसुली

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील खासगी जागेवरील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण केल्यानंतर १५८ अनधिकृत होर्डिंग आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू केलेल्या या कारवाईतून पालिकेच्या तिजोरीतून एक कोटी सहा लाख ६६ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. सातपूर विभागाच्या कारवाईतून एवढा दंड वसूल झाला असून, सहा अनधिकृत होर्डिंग हटविण्यात आले आहेत. मंगळवारपासून पश्चिम विभागात कारवाईला सुरुवात झाली असून, या कारवाईतून पालिका मालमाल होणार आहे. दरम्यान ही कारवाई थांबवण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याची चर्चा अधिकारी आता खासगीत करीत आहेत.

महापालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची मोहीम सुरू केली आहे. शहराच्या सहा विभागांत खासगी जागेवर अनधिकृतपणे १५८ होर्डिंग आढळून आली आहेत. त्यात सर्वाधिक ७० होर्डिंग पश्चिम विभागात आहेत. त्यानंतर पंचवटी २८, सातपूर २०, नाशिकरोड १९, सिडको १२, नाशिक पूर्वमध्ये ९ होर्डिंग आढळून आली आहेत. या सर्वांना नोटिसा देऊन दंड भरून होर्डिंग अधिकृत करून देण्याचे आदेश अतिक्रमण विभागाने काढले होते. मात्र, राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाने होर्डिंग हटवण्याची कारवाई सातपूरपासून सुरू केली. सातपूर विभागात आतापर्यंत सहा होर्डिंग काढण्यात आली असून, ११ होर्डिंग नियमित करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून ९ लाख ४८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सातपूरसोबतच शहरातील अन्य भागांतील होर्डिंगकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात १६ होर्डिंगधारकांनी पालिकेकडे दंड भरून होर्डिंग नियमित करून घेतले आहेत. त्यामुळे या कारवाईने पालिका आठवडाभरात कोट्यधीश झाली आहे. आठवडाभराच्या या कारवाईतून पालिकेच्या तिजोरीत एक कोटी ६ लाख ६६ हजार रुपये जमा झाले आहेत. पश्चिम विभागात मंगळवारपासून कारवाईला सुरुवात झाली आहे. पश्चिम विभागात सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग असून, त्यांच्यावरही कारवाई सुरू केल्याने दंडाची ही रक्कम कोट्यवधीच्या घरात पोहोचणार आहे.

होर्डिंगधारकांकडून राजकीय दबाव

शहरातील अनधिकृत होर्डिंग लावलेले एजन्सीधारक राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे पालिकेच्या या कारवाईने अनधिकृत होर्डिंगधारक बिथरले असून, त्यांनी मोहिमेत अडथळा आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणला जात आहे. मात्र, मोहीम सुरूच राहणार असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम यांची चौकशी लावण्यामागेही हाच गट असल्याची चर्चा आता पालिका वर्तुळात आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर कारवाई करू नये, यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

अनधिकृत होर्डिंगची संख्या

१५८ होर्डिंग अनधिकृत

७० पश्चिम विभागात

२८ पंचवटी विभागात

२० सातपूर विभागात

१९ नाशिकरोड विभागात

१२ सिडको विभागात

०९ नाशिक पूर्वमध्ये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटसचिवांचे ‘असहकार’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विविध मागण्या राज्य सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित होत असल्याच्या निषेधार्थ गटसचिवांनी कामकाज बंद करून असहकार आंदोलन सुरू केले आहे. बागलाण तालुक्यातील गटसचिवांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी व कर्जमेळाव्यांवर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील सुमारे ६ हजार ८८० गटसचिवांच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनानेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटी हे सहकारातील कामकाजाचे मुख्य घटक आहे. या अनुषंगाने आगामी काळात शेतकरी कर्ज माफी व मेळावे घेण्यास शासनाकडून गट सचिवांवर दबाब वाढत असतांना गटसचिवांच्या मागण्या मान्य होईपर्यंत असहकार आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सटाणा तालुका गटसचिव संघटनेचे अध्यक्ष दिनेश मोरकर, तालुका प्रतिनिधी अनिल खरे, सुनील देवरे, प्रशांत सोनवणे, शामसुंदर सोनवणे, आनंदा साळुंके, प्रमोद पवार, जयवंत भामरे, किरण खैरनार, लक्ष्मण सोनवणे, सुनील हिरे आदींनी कामकाजावर बहिष्कार टाकून असहकार आंदोलन सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशास उद्यापर्यंत मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुसऱ्या टप्प्यातील अपूर्ण प्रवेश अर्जांची लक्षणीय संख्या लक्षात घेता अकरावीच्या प्रवेशांसाठी ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी होणे सोपे जावे यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत शिक्षण विभागाच्या वतीने उद्यापर्यंत (२९ जून) वाढवण्यात आली आहे. यामुळे अर्जप्रक्र‌िया अपूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी दोन दिवसांची संधी मिळणार आहे.
नाशिक शहरातील ५४ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सुमारे २४ हजार जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी मंगळवारी दुपारपर्यंत अर्जाचा पहिला भाग एकूण २८ हजार ९०४ विद्यार्थ्यांन पूर्ण केला आहे. तर दुसऱ्या भागामध्ये २५ हजार ३५० विद्यार्थ्यांनी माहिती पूर्ण भरली आहे. आता या प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने अकरावीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता ‌शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
मंगळवारी या प्रक्र‌ियेचा अंतिम दिवस असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू होती. दिवसाअखेर सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी अर्ज पूर्णत: भरण्याच्या प्रक्रियेपासून दूर राहिले होते. nashik.11thadmission.net या वेबसाइटवर उर्वरीत विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही मुदत वाढल्याने पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची तारीखही आता पुढे ढकलली गेली असून, ही यादी शुक्रवारी (३० जून) जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंगळेंचा ४ जुलैला फैसला

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाचा फैसला आता ४ जुलै रोजी होणार आहे. बाजार समितीत नाशिकचे प्रांताधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार गणेश राठोड उपस्थितीत संचालकांची सभा होणार आहे. त्यामुळे पिंगळे सभापतिपदी राहणार की पायउतार होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंगळे यांना अटक केली होती. या कारवाईवेळी एका कारमधून ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली होती. पिंगळे यांच्यासह काही जणांवर म्हसरूळ पोल‌िस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. पिंगळे यांच्या कामकाजाबद्दल बाजार समितीचे अनेक आक्षेप आहेत. त्यामुळे शुक्रवारी, २३ जून रोजी काही संचालकांनी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. १८ पैकी १३ संचालकांनी या अविश्वास प्रस्तावाला पाठबळ दिले आहे. श्याम गावित, शिवाजी चुंबळे, संपतराव सकाळे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, संजय तुंगार, युवराज कोठुळे, चंद्रकांत निकम, जगदीश आपसुंदे, रवी भोये, संदीप पाटील, विमल जुंद्रे, भाऊसोब खांडबहाले आदी संचालक मंडळाने हा ठराव सादर केला आहे. अशा ठरावावर १५ दिवसांच्या आत सभा बोलवावी लागते. त्यानुसार ४ जुलै रोजी ही सभा बोलावण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

१४ जुलै रोजी सुनावणी

पंचवटी ः बाजार समितीच्या संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी ३ जून रोजी नोटिसा बजावल्या होत्या. या विषयासंदर्भात संचालकांना लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यासाठी १९ जूनपर्यंत मुदत दिली होती. १९ जून रोजी सुनावणी होऊ शकली नाही. ती २१ जूनला आणि नंतर २७ जूनला अशी पुढे ढकलण्यात आली. आता ही सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीत संचालकांना अजून काही अतिरिक्त म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार काही संचालकांना लेखी स्वरूपात त्यांचे म्हणणे मांडले. काही महिन्यांपासून विविध कारणांनी बाजार समिती गैरव्यवहारांच्या प्रकरणांनी गाजत असल्याने सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय घडामोडींना वेग

बाजार समिती सभापती निवडीच्या काळात अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजप यांनी पहिल्यांदा बाजार समितीच्या राजकारणात लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही पक्षांत काही संचालकांनी प्रवेश केलेला आहे, तसेच अविश्वास प्रस्ताव मांडण्यात काही पिंगळे समर्थकही असल्याने ऐनवेळी काहीही घडण्याची शक्यता वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईला दाखविणार सोनियाचा दिवस!

0
0

नाशिक : तिनं कधीही कोणत्या गोष्टीसाठी आईकडं हट्ट धरला नाही; किंबहुना हट्ट धरण्याची परिस्थितीच नव्हती. कधी पोटापुरतं मिळत होतं, तर कधी अर्धपोटीच रहावं लागत होतं. नातेवाईकांनी मदतीला धावून येण्याऐवजी हात वर केले, वडिलाचं छत्र लहानपणीच हरपलं...रहायला घर नाही, भाड्याच्या घरात इतर अडचणीच जास्त. अशावेळी तिनं उचल खाल्ली. या परिस्थितीतून बाहेर पडायचंय असं मनाशी ठरवलं. आईला सोन्याचे दिवस दाखवू या उद्देशानं प्रचंड अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलं. अशी आहे सोनिका चिंचोलेची कथा. आता तिचं स्वप्न खूप मोठं आहे, तिला चार्टर्ड अकाउंटन्ट व्हायचंय पण तिची ही बिकट शैक्षणिक वाट कशी सुकर होणार या विवंचनेत दोघी मायलेकी आहेत.

सोनिका १३ महिन्यांची असताना तिचं पितृछत्र हरपलं. तिच्या आईनं परिस्थितीला तोंड देत न डगमगता सोनिकाला शिकवून मोठं करायचं असा निश्चय केला. त्यासाठी लागेल ते कष्ट उपसण्याची तयारी ठेवली. सोनिकानं ९१.८० टक्के गुण मिळवून आपल्या आईच्या परिश्रमाचं चीज केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्यापारी’चा धुव्वा; ‘सहकार’चीच हवा

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेत सत्ताधारी सहकार पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकत श्री व्यापारी पॅनलचे पान‌पित करत हॅटट्रिक नोंदवली. व्यापारी पॅनलेचे नेते आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या पत्नी तथा भगूरच्या नगराध्यक्षा पराभूत झाल्या. गेल्या वेळी व्यापारी पॅनलला सहा जागा मिळाल्या होत्या. यंदा एकच जागा मिळाली. नगरसेवक रमेश धोंगडेंनी या पॅनलची लाज राखली. मात्र, ते जनरल गटात तळाला राहिले.
के. एन. केला हायस्कूलमध्ये रात्री साडेअकराला मतमोजणी पूर्ण झाली. एकूण २१ हजार (३३.६४ टक्के) मतदान झाले होते. पहिल्या फेरीतच सहकारच्या १९ उमेदवारांनी आघाडी घेतली. व्यापारी पॅनलचे आर. डी. धोंगडे, सुनील बोराडे, हेमंत गायकवाड हेच लढत देत होते. अंतिम तिसऱ्या फेरीत धोंगडेंनीच टिकाव धरला. व्यापारी पॅनलतर्फे गेल्यावेळी संचालक झालेले अशोक सातभाई आणि सुनील आडके यांनी सूज्ञपणा दाखवत यंदा सहकारची वाट धरली. ते विजयी झाले.
नगराध्यक्षांना धक्का
विजय करंजकर यांच्या पत्नी व भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर महिला गटात पहिल्या फेरीत शेवटच्या स्थानी होत्या. दुसऱ्या फेरीत चेहेडी, भगूर, देवळाली कॅम्पच्या पेट्या उघडल्यानंतर त्या तिसऱ्या आल्या. मात्र, त्यांचा पराभव झाला. सहकारचे नेते दत्ता गायकवाड हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तर विजय करंजकर हे विद्यमान जिल्हाप्रमुख आहेत. दोघांनी लढत प्रतिष्ठेची केली होती. दोन वाघांमधील झुंज अखेर गायकवाड यांनी जिंकली. पराभवाची चाहूल लागल्यामुळे करंजकर मतमोजणीच्या ठिकाणी आलेच नाहीत.
सहकार का जिंकले?
दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार पॅनलमध्ये शेवटपर्यंत एकी होती. प्रचार नियोजनबध्द होता. आरोपांपेक्षा बँकेची प्रगती व स्वच्छ कारभारावर त्यांनी भर दिला. शून्य एनपीए, बँकेला मिळालेले पुरस्कार, उघडलेल्या २४ शाखा, आधुनिकीकरण हे सहकारचे प्लस पाइंट होते. बँक या कारभाऱ्यांच्या हातीच सुरक्षित राहील, हा मुद्दा मतदारांना भावला. आत्महत्या केलेल्या ८८ शेतकऱ्यांच्या कुटंबियांना प्रत्येकी वीस हजारांची केलेली मदत, शेतकऱ्यांची एक लाखांपर्यंत वाढवलेली कर्जमर्यादा यामुळे ग्रामीण मतदार खूश झाला.
सहकारने विकासावर भर दिला. तर विरोधकांनी बँकेला बदनाम केले. ते सभासदांना रुचले नाही. नोटाबंदीतही बँकेने एटीएम बंद पडू दिले नाहीत. सभासद सूज्ञ व जागरुक आहेत. बँक कोणाच्या हाती सोपवायची हे त्यांना समजले. भपकेबाजीला ते भुलले नाहीत.
- दत्ता गायकवाड,
सहकार पॅनल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा संकुलाबाबत आमदार संतप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुका क्रीडा संकुलाचे बांधकामावरून सुरू असलेली टोलवाटोलवीची मंगळवारी आमदार अनिल कदम यांनी दखल घेतली. येथील विश्रागृहात अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेऊन येत्या महिनाभरात क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी चौधरी, प्रांताधिकारी महेश पाटिल, तहसीलदार विनोद भामरे, सां. बा. उपअभियंता महेश पाटील, क्रीडाशिक्षक सुभाष खाटेकर उपस्थित होते.

निफाड तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी ९१ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. तालुका क्रीडा संकुलात तातडीने क्रीडासाहित्य उपलब्ध करून महिनाभरात क्रीडा संकुल कार्यान्वित करण्याचे आदेश कदम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. क्रीडा संकुलाच्या इतर कामांचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचीही सूचनाही आमदार कदम यांनी केली. क्रीडा संकुलाबाबत दरमहा बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. वैनतेय विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सुभाष खाटेकर यांनी सदर क्रीडासंकुल देखभाल दुरुस्ती प्रस्ताव क्रीडा विभागाकडे दिला होता. त्यालाही यावेळी मंजुरी देण्यात आली. संकुलाचे क्रीडा प्रशिक्षक म्हणून सुभाष खाटेकर यांची नियुक्ति करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात ५११ दुकानांत पॉस मशिन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन धान्य वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशिन बसविण्यास सुरुवात झाली असून, त्यापैकी ५११ मशिन्स कार्यान्वित झाली आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत २,११६ पॉस मशिन प्राप्त झाल्याची माहिती पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी दिली. अंगठ्याचा ठसा घेऊनच आणि आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्याला धान्य वितरण करता यावे, यासाठी पॉस मशिन उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १,०९६ पॉस मशिन प्राप्त झाले. त्यानंतर आता पुन्हा १,०२० मशिन प्राप्त झाले आहेत. असे असले तरी मंगळवार, २७ जूनपर्यंत त्यापैकी ९६८ मशिन्सचे वाटप रेशन दुकानदारांना करण्यात आले आहे. नाशिक एफडीओ, नाशिक तालुक्यासह सिन्नर, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये सर्व रेशन दुकानांत पीओस मशिन बसविण्यात आले आहेत. बुधवारी पेठ, दिंडोरी, कळवण तालुक्यांना मशिन्सचे वाटप केले जाणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील १५१ रेशन दुकानदारांना १५१ ई–पॉस (इलेक्ट्रोनिक पॉईट ऑफ सेल पॉस) डिजिटल यंत्रांचे वाटप करण्यात आले. १ जुलैपासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दोष दूर करून पूर्ण व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी बॉयोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरीत केले जाणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना या यंत्रणेचा लाभ होईल व रेशन यंत्रणा सुटसुटीत होईल. रेशनीग पद्धतीतील बदलामुळे वादविवाद, तक्रारी, गैरसमज कमी होतील. दुकानदारांना ई पॉस मशीनचे वितरण करण्यात आले. या संदर्भात कुठलीही यांत्रिक अडचण येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांमुळे महिला भयभीत

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शिवाजीनगर, श्रमिकनगर व धृवनगर भागात टवाळखोरांच्या जाचामुळे महिला भयभीत झाल्या आहेत. याबाबत सातपूर व गंगापूर पोलिसांकडे महिलांनी निवेदन दिले आहे. तसेच सभागृहनेता दिनकर पाटील यांच्याकडेही लेखी तक्रार केली आहे. या महिलांनी पोलिस गुन्हेगारांच पाठीशी घालत असल्याचा आरोप केली आहे. उघड्यावर हत्यार घेऊन गुन्हेगार परिसरात दहशत पसरवत असतांना पोलिस कारवाई करणार कधी, असा सवाल महिला उपस्थित करत आहेत. त्यामुळे परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

सातपूर भागातील शिवाजीनगर, श्रमिकनगर व धृवनगर भागात टवाळखोरांचे अड्डे झाले आहेत. नेहमीच रस्त्यांवरून जाणाऱ्या महिला व तरूणींची छेड काढली जाते. यामुळे महिला व तरुणी भयभीत झाल्या असून, त्याबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु पोलिस महिलांनाच दोषी ठरवत गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा या आरोप या महिलांनी केला आहे. सोमवारी सायंकाळी पप्पू ढवळे नावाच्या सराईत गुन्हेगाराने महिलांच्या अंगावर धावून जात त्यांची छेड काढली. यानंतर भयभीत झालेल्या महिला सातपूर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या. पंरतु पोलिसांनी केवळ माहिती घेत महिलांना काढून दिले. सराईगत गुन्हेगारावर मात्र कुठलीच कारवाई केली नसल्याने महिलांनी न्याय कुन्हाकडे मागावा असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री सराईत गुन्हेगार ढवळे याने महिलांच्या अंगावर धावून जात छेड काढण्याचाही प्रयत्न केला. यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी थेट सातपूर पोलिस स्टेशन गाठत समस्या मांडली. परंतु महिलांच्या समस्येकडे पोलिसांनी पाठ फिरविल्याने अखेर नगरसेवक पाटील यांच्याकडे धाव घेतली.

नगरसेवक पाटील यांनी अगोदरच संबंधित गुन्हेगारांबाबत सातपूर व गंगापूर पोलिस स्टेशनला लेखी निवेदन दिले असल्याचे सांगितले. याबाबत पोलिस आयुक्तांकडे महिलांना घेत निवेदन देणार असल्याचे नगरसेवक पाटील यांनी सांगितले. त्यांनी महिलांना सोबत घेऊन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांची भेट घेत गुन्हेगारांबाबतच्या समस्या सांगितल्या.

भर रस्त्यात साजरे होतात वाढदिवस

कायदा व सुव्यस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचे वाढदिवस भर रस्त्यात श्रमिकनगर व शिवाजीनगर भागात साजरे केले जातात. रस्त्यावर कोणी हटकले तर त्याला धमकावले जाते. वाढदिवस साजरा करतांना रस्त्यावर उभ्या दुचाकीवर तलवारीने केक कापून मद्याच्या बाटल्या फोडल्या जातात. याबाबत स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिस केवळ पाहून निघून जात असल्याचा आरोपही महिलांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युत विभागाच्या नाकर्तेपणावर ताशेरे

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नाकर्तेपणावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले. पंचवटी विभागात सर्वात जास्त तक्रारी या पथदीपांच्या संदर्भात आहे. प्रत्येक प्रभागाला विद्युत विभागाचे कर्मचारी नेमून दिलेले आहेत. मात्र, विद्युत विभागाची गाडी प्रभागात आठ दिवसांतून एकदा येते तेव्हाच हे कर्मचारी दिसतात. इतर दिवशी हे कर्मचारी कुठे असतात, असा प्रश्न विचारून खुद्द महापौर रंजना भानसी यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले. त्यावर अधिकारी काहीच उत्तर देऊ शकले नाहीत.

पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत साडे तेरा लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक दोनमधील विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रभागात पाठवून देण्यात आल्याने प्रभागातील एक हजारपेक्षा जास्त पथदीप बंद पडले आहेत. महापालिकेत एलईडी येऊन दोन महिने झाले तरीही त्यांची फिटिंग झालेली नाही. ज्या अधिकाऱ्यांची या प्रभागाच्या देखभालीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांनी अजून प्रभाग एकदाही बघितला नसल्याची तक्रार उद्धव निमसे यांनी केली.

उडवाउडवीची उत्तरे

प्रभागाच्या हद्दीचा वाद, गटारीच्या साफसफाईचे काम ड्रेनेज विभागाने करायची की बांधकाम विभागाने यावरील चर्चा चांगलीच रंगली. घंटागाडी नियमित येत नसल्याने काय कारवाई केली याची माहिती नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना विचारली असताना उडावाउडवीची उत्तरे मिळाली. सभागृहाच्या काचा स्वच्छ केल्या जात नसल्याने पुंडलिक खोडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंबर तुंबल्याने परिसरात दुर्गंधी

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

पंचवटी परिसरातील गणेशवाडी मधील चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पण या पावसाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक ठिकाणी चेंबर तुंबले आहे. गणेशवाडी येथील चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात वाहत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय हे पाणी वाहून रस्त्याच्या कडेला व गणेशवाडी परिसरात जमा होत आहे. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डबक्यांमध्ये पाणी साचल्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय रस्त्यावर कायम वर्दळ असते. त्यामुळे आरोग्य विभागाने त्वरित दखल घेऊन या चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे परिसरातील चेंबर तुंबलेले आहे. गणेशवाडी येथील चेंबरमधून चार पाच दिवसांपासून पाणी वाहत आहे. स्थानिक नगरसेवक व प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.

- दीपक फलटणे, स्थानिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हिस रोड समस्यामुक्त कधी होणार?

0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

द्वारकापासून आडगावपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सर्विस रोड अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक थांबे यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोल‌सि यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानीक नागरिक करीत आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा या हेतूने द्वारकापासून आडगावपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सर्विस रोड साकारण्यात तयार करण्यात आले आहेत. पण सर्विस रोड अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतूक थांबे यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या समस्येबाबत मागीलवर्षी ‘मटा’ वृत्त प्रसिद्ध केले होते. पण वर्षभरात अधूनमधून केवळ नावापुरती कारवाई आली. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

शिवाय त्यात भर म्हणून सहा महिन्यांपासून एसटी बसची वाहतूक देखील सर्व्हिस रोडने सुरू झाल्याने प्रवाशीदेखील या मार्गावर उभे राहतात. परिणामी रिक्षादेखील सर्व्हिस रोड धावतात. सर्विस रोडवरील द्वारका, स्वामीनारायण परिसर, के. के. वाघ कॉलेज जवळील परिसर जत्रा हॉटेल कोणार्क परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट, अनधिकृतपणे थाटलेली दुकाने, टपऱ्या, हॉटेल, गॅरेज आदींनी बस्तान मांडले आहे. काही व्यावसायिकांच्या दुकानाजवळ पार्किंगसाठी जागाच नसल्याने वाहने सर्विस रोडवर अनधिकृतपणे उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शिवाय रोज छोटेमोठे अपघातही होतात.

या रोडवरून जाताना दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकांमध्ये तर रोजच वाद होतात. या समस्येकडे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधरकांमध्ये संताप होत आहे. कारवाई न करण्यामागे पोलिस आणि पोलिकेचेच या व्यवसायाला पाठबळ असल्याचे सर्वसामान्य नागरिक आरोप करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक निधीला कात्री

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे स्थायी समितीने सुचवलेला ४० लाखांचा नगरसेवक निधी महापौरांनी आपल्या अधिकारात ७५ लाखांपर्यंत नेला होता. परंतु, महापौरांनी केलेल्या या लाखोंच्या उड्डाणाला आता आयुक्तांनी जमिनीवर आणले आहे. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने नगरसेवक निधी हा ४० लाख रुपयेच मिळेल, असे स्पष्टीकरण आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे. या ४० निधीसाठी कामांचे प्राधान्यक्रमही ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक कुवतीचा अंदाज घेऊनच नगरसेवकांनी कामे सुचवावीत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापौरांसह सत्ताधारी भाजप नगरसेवकांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. भांडवली कामांसाठी केवळ १३० कोटी रुपये शिल्लक असतानाही सत्ताधाऱ्यांनी बजेटचे उड्डाण बावीशसे कोटींपर्यत नेले आहे. त्यातच चालू वर्षाचा स्पीलओव्हर हा साडेसहाशे कोटींवर गेला असून, सध्या १२० कोटींचे कर्ज पालिकेवर आहे. त्यातच विविध योजनांमध्ये पालिकेचा हिस्सा देणे बंधनकारक असल्याने याची जुळवाजुळव करण्यात प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. दुसरीकडे नव्याने सत्तारुढ झालेल्या नगरसेवकांना विकासकामांची घाई झाली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नगरसेवक निधी मिळावा यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकला आहे. स्थायी समितीने नगरसेवकांसाठी ४० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. परंतु, हा निधी कमी असल्याचा दावा नगरसेवकांनी करत, त्यात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात महापौर रंजना भानसी यांनी आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून नगरसेवक निधीत ३५ लाखांची घसघशीत वाढ करत तो ७५ लाख रुपये घोष‌ित केला होता. त्यामुळे नगरसेवकांनी निधी घोषित होताच कोट्यवधींच्या कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले होते. नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी दिल्यास तिजोरीवर तब्बल ९७ कोटींचा भार येणार आहे. परंतु, ४० लाख दिल्यास जवळपास ४७ कोटींची बचत होणार आहे. ४० लाखांप्रमाणे केवळ ५० कोटी रुपये नगरसेवक निधीसाठी लागणार आहेत.

वाढदिवस भेट निष्फळ
गेल्या सोमवारी महासभेत महापौरांनी नगरसेवक निधी ४० लाखांवरून ७५ लाख करत वाढदिवसाची भेट दिली होती. परंतु, ती अल्पायू ठरली. महापौरांनी तिजोरीचा अंदाज घेतला नाही. आता महापौर विरुद्ध प्रशासन संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणे दोन लाखांचा सटाण्यामध्ये दरोडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बंगल्याच्या खिडकीचे ग्रील कापून प्रवेश करून चोरट्यंनी कपाटातील रोकडसह पावणे दोन लाखांचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार सटाणा शहरातील मोरेनगर शिवारातील पाकळेवस्तीत बुधवारी सकाळी उघडकीस आला.

पाकळेवस्तीत नागेश पांडुरंग पाकळे हे शेतीनिमित्त कुटुंबीयांसह बंगल्यात वास्तव्यास आहेत. ते बाहेरगावी गेलेले असताना मंगळवारी (दि. २७) मध्यरात्री चोरट्यांनी बंगल्याच्या मागील खोलीच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. खोलीचा दरवाजा आतून बंद केला. चोरट्यांनी लोखंडी कपाट तोडून आतील तीन तोळ्याची सोन्याची पोत, ८५ हजारांची रोकड असा पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. पाकळे त्यांची सून सुनीता सकाळी सहा वाजता खोली उघडण्यास गेली असता दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आल्यानंतर चोरी झाल्याचे उघडक झाले. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी पाकळे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक घायवट करित आहेत. चोरट्यांनी नागेश पाकळे यांच्या बंगल्यात चोरी करण्यापूर्वी आत्माराम पाकळे यांच्या मालकीच्या चार दुचाकी घराजवळ लावलेल्या होत्या. अंधाराचा फायदा घेत नव्या चोरण्यात आली.

रजेचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार

मालेगाव ः रमजान ईदनिमित्त मालकाकडून हक्क रजेचे पैसे मागितले असता मालकाला राग आल्याने अतिशय कमी रक्कम देऊन मालकाने कामावरून कमी केले. त्यामुळे आपल्यावर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार येथील कामगार अधिकारी यांच्याकडे यंत्रमाग कामगाराने केली आहे.

रमजान अहमद रफिक अहमद (रा. फार्मसी नगर, मालेगाव) असे संबंधित कामगाराचे नाव आहे. शहरातील बिलाल अहमद खलील अहमद यांच्या नुमानी चौकातील पॉवरलूममध्ये ते काम करीत होते. रमजान ईदनिमित्त सोमवारी (दि. २६) मालकाकडून हक्क्याच्या रजेचे पैसे मागितले असता मालकाला राग आला. त्याने २१ जून रोजी मुकादमाद्वारे दोन हजार इतकी रक्कम दिली. सरकारी परिपत्रकाप्रमाणे जाहीर रकमेपेक्षा ती अतिशय कमी असल्याने रमजान यांनी पैसे मुकादमाकडे परत केले. याचा मालकाला राग आला. त्याने ‘तू कामाला येऊ नको’, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंदिरानगर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासह गुन्हेगारांवर वचक निर्माण करून इंदिरानगर परिसरात असलेल्या अवैध धंदे बंद करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी बुधवारी पहाटे पाच वाजेपासून कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी रेकॉर्डवर असलेले १३ संशयित पोलिसांना आढळून आले.

इंदिरानगर भागातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या हेतूने कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सकाळी पोलिस उपायुक्‍तांच्या श्रीकृष्ण कोकाटे मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्‍त अशोक नखाते व पोलिस निरीक्षक फुलदास भोये, सहाय्यक निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यासह पोलिस कर्मचारी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी रेकॉर्डवर असलेले १३ संशयित पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी भंगार बाजाराच्या सात गुदामांची तपासणी केली. तसेच वाहन कायद्यांतर्गत पोलिसांनी सुमारे अडीच हजाराचा दंड वसूल केला.

मद्यपींवर व्हावी कारवाई

अनेक वर्षांनंतर इंदिरानगर भागात झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारीवर वचक निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील अन्य पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही अशाच प्रकारे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पाथर्डी फाटा ते वडनेर मार्गावर सुरू असलेल्या अवैध मद्यविक्रीसह मद्यपींवरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरला गंडवले

0
0

म. टा. प्रतिन‌धिी, नाशिक

परदेशात नोकरी मिळवून देतो असे सांगून एका इंजिनीअरला ३० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी निशांत विष्णूपंत नागरे (रा. अमृत गार्डन, पिंपळगाव बहुला, सातपूर) यांनी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

परदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निशांत यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांना ऑनलाइन संकेतस्थळावरून ‘सूरज डेनिझ इरिटीकारेट लि. स्टी या इस्तंबूल देशातील जहाजावर फोर्स इंजिनीअर पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी त्यांनी २१ ते २७ जून या कालावधीत ३० हजार रुपयेही भरले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली.

भरगर्दीत लुटले

एखाद्याला निर्जन रस्त्यावर लुटल्याच्या घटना शहरात घडत असल्या तरी आता रविवार कारंजासारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशा घटना घडू लागल्या आहेत. मारहाण करून त्याच्याकडली ३० हजार रुपये लुटून नेल्याची तक्रार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. निकित सुनील शहा (रा. टिळकवाडी, शरणपूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. शहा सायंकाळी सातच्या सुमारास रविवार कारंजावरील विधाते फुल भांडार येथे थांबले असताना बाइकवरून तिघे संशयित आले. त्यांनी मारहाण करीत शहा यांच्याजवळील ३० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली.

जुगार अड्डयावर छापा

वडाळा रस्त्यावरील भारतनगर परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. अड्डा चालविणाऱ्यासह २१ हजार रुपयांची रोकड यावेळी जप्त करण्यात आली. भारतनगरमधील शिवाजीवाडीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई नाका पोलिसांच्या पथकाने मंगळवारी दुपारी तेथे छापा टाकला. संशयित जुबेर शेख शफी (२९, रा. अमृतवर्ष कॉलनी, इंदिरानगर) यास अटक करण्यात आली.

तलवार बाळगणारे ताब्यात

ठक्कर बाजार आणि रविवार कारंजा परिसरात तलवार जवळ बाळगणाऱ्या तिघा संशयितांना सरकारवाडा पोल‌सिांनी ताब्यात घेतले. विशाल काकड (१९, रा. अभोणकर गल्ली, रविवार कारंजा), शेखर नुनासे (३५, रा. शनिगल्ली, रविवारपेठ) व सिध्देश नवले (१८, रा. बेलदार गल्ली, हेमलता टॉकिजजवळ) अशी तिघांची नावे आहेत. काकड मंगळवारी दुपारी तलवार घेऊन ठक्कर बाजारकडून मेळा बसस्थानकाकडे जात होता. दुसऱ्या घटनेत संशयित नुनासे व नवले हे दोघे हेमलता टॉकिजच्या मागील रस्त्याने तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

महावितरणच्या रोहित्रातून चोरले ऑइल

गंगापाडळी येथील महावितरण कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या रोहित्रातील ४० हजारांचे ऑइल चोरट्याने चोरून नेले. उमेश किशोर खारवे (रा. सावतानगर, सिडको) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. महावितरणच्या गंगापाडळी येथील विभागीय कार्यालयाजवळील गुदामालगत २५ केव्हीए क्षमतेचे नादुरूस्त रोहित्र आहे. त्यामधील ४० हजार रुपयांचे ऑइल काढून चोरट्याने पोबारा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकरोडला घरफोडी

जयभवानी रोडवरील अपार्टमेंटमधील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सोमनाथ किसन क्षीरसागर (रा. शिवम अपार्टमेंट) यांनी फिर्याद दिली आहे. क्षीरसागर कुटुंबीय रविवार ते मंगळवार बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडला. आत प्रवेश करून सोन्याच्या पाच अंगठ्या, दोन चैन, एक ठुसी, कानातील झुबे असा एक लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोल‌सि स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छळाला कंटाळून कामगाराची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कंपनीतील सहकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कामगाराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अशोक बाबुराव चव्हाण (३८, रा. अली बाबा मळा, पॉवर हाऊस, अंबड) असे या कामगाराचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामुळे कंपनीतील त्यांच्या आठ सहकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम अंबड पोलिस स्टेशनमध्ये सुरू होते.

चव्हाण हे अंबड एमआयडीसीतील मेट्रो पॉलिमर्स कंपनीत कामास होते. त्यांचे सात ते आठ सहकारी त्यांना मानसिक त्रास देत असत. यामुळे त्रस्त होऊन त्यांनी दुपारी घरी गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला होता. चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामध्ये कंपनीत त्रास देणाऱ्या सहकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. त्यामुळे पोलिसांनी संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांना अटक; बाइक, मोबाइल जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात बाइक, मोबाइल चोरीसह जबरी चोऱ्या करणाऱ्या संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय प्रदीप कुरकुरे (१९, रा. शिवशक्ती चौक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या बाइक, मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना बारदान फाट्याकडून शिवाजीनगरच्या दिशेने दोन बाइकवरील चार मुलांना पोलिसांनी हटकले. त्यापैकी दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या संशयितांनी नंतर बाइक चोरीची असल्याची माहिती दिली. पाच बाइक, दहा मोबाइल, कॉम्प्युटर, टीव्ही, होम थ‌िएटर चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी चौघांकडून तीन लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देविकर यांच्या मागदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. व्ही. कोल्हे, पोलिस हवालदार एम. टी. गायकर, विष्णू उगले, पोलीस नाईक दत्तू गायकवाड, शिपाई तुषार देसले, नितीन नेटारे, सुरेश जाधव आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेनरोडवरील लॉजवर छापा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गजबजलेल्या मेनरोड बाजारपेठेतील एका लॉजवर पोलीसांनी बुधवारी दुपारी छापा टाकला. अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तीन पुरूष व तीन महिलांना ताब्यात घेतले.

बाळू रामचंद्र बोडके (५७, रा. रामशेत आशावाडी, ता. दिंडोरी), नागेश भानुदास मोरे (२६, रा. वाल्मिकनगर, पंचवटी) आणि बाळासाहेब काशिनाथ खरोटे (४४, रा. शिवाजीनगर, जेलरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तसेच या ठिकाणी आढळलेल्या तीन महिलांनाही पोल‌िसांनी ताब्यात घेतले आहे.

मेनरोडच्या ड्रिमलॅन्ड लॉज या ठिकाणी अनैतिक व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोल‌िस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार तेथे छापा टाकला. संशयित बोडके हा काही महिलांकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलिस निरिक्षक रोहकले, सहायक निरीक्षक अहिरराव, उपनिरिक्षक विलास देशपांडे, आदिनाथ मोरे, रवींद्र पानसरे यांच्या पथकाने लॉजवर सायंकाळी छापा टाकला. संशयितांकडून नऊ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. संशय‌ितांवर पिटा कायद्यान्वये सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images