Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शांतता-समृद्धीसाठी दुआ

$
0
0

टीम मटा

शहरातील मुख्य शहाजहाँनी ईदगाहसह शहर परिसरातील देवळाली कॅम्प, सातपूर, नाशिकरोड परिसरात सोमवारी ईद-उल-फित्रनिमित्त सामुदायिक नमाजपठण झाले. यावेळी शांतता व समृद्धीसाठी विशेष दुआ करण्यात आली. ज्येष्ठांसह तरुणाई आणि बच्चेकंपनीमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आकर्षक वेशभूषेतील बच्चेकंपनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देण्यात हरखून गेली होती.

--

देवळाली कॅम्प परिसरात रौनक

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

परिसरातील मुस्लिम बांधवांनी वडनेररोडवरील ईदगाह मैदानावर मौलाना सादिक रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, तर भगूर येथे हाफिज इक्बाल दाऊद यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक नमाजपठण केले. यावेळी देशात शांतता व समृद्धी नांदावी यासाठी विशेष दुआ करण्यात आली. ईदनिमित्त परिसरात रौनक दिसून आली.

नमाजपठणानंतर मुस्लिम बांधवांनी गोरगरिबांना खैरात वाटप करीत ईद-उल-फित्र अर्थात, रमजान ईदनिमित्त एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. अन्य धर्मीयबांधवांनीही यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री बबनराव घोलप, नगरसेवक

सचिन ठाकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले, पोपट जाधव, बाळासाहेब गोडसे, संजय गोडसे, छावा संघटनेचे मुस्लिम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रशीद सय्यद आदी उपस्थित होते.

ईदनिमित्त दोन्ही शहरांत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. लष्करानेही ईदगाह मैदान परिसरात जवान तैनात केले होते. देवळाली पोलिस ठाण्यात छावा मुस्लिम आघाडी फ्रेंड सर्कलच्या वतीने शिरखुर्मा वाटप करण्यात आला. याप्रसंगी मुस्लिम आघाडीचे सय्यद राशीद, जहाँगीर शेख, शाहीद शेख, मोहसिन शेख, नजफ सय्यद, अब्दुल्लाह शेख आदींसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

--


लष्करी जवानांप्रति कृतज्ञता

रमजान ईदनिमित्त येथील लष्करी हद्दीत असलेल्या ईदगाह मैदानावर सुरक्षेसाठी पोलिसांसह लष्करी जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आलेली होती. यावेळी काही मुस्लिमबांधवांनी लष्करी जवानांप्रति कृतज्ञता दाखविताना थेट गळाभेट घेत शुभेच्छांची देवाण-घेवाण केली. काही चिमुकल्यांनी जवानांना सॅल्युट करीत त्यांच्याप्रतिचा आदर व्यक्त केला.

--

नाशिकरोडला पारंपरिक उत्साह

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड परिसरातील जेलरोड, विहितगाव, चेहेडी, देवळालीगाव, शिंदे, पळसे, जाखोरी, सिन्नर फाटा आणि मुख्य ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त

मुस्लिमबांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. मुस्लिम समाजबांधवांनी पारंपरिक उत्साहात एकमेकांना शुभेच्छा दिल्या. इतर समाजबांधवांनीही मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

नमाज अदा करण्यासाठी सोमवारी सकाळी देवळालीगाव व विहितगाव येथील मुख्य ईदगाह मैदान, उपनगर मदरसा, अंजुमन पैजाने हजफिया, नूरी ट्रस्ट मदरसा, कौनेन मदरसा, डीजीपीनगर, अशफिया गुलशने चित्तीया, कॅनॉलरोड, विहितगाव, रोकडोबावाडी, सोमाणी गार्डन, जामा मशीद मरकज, मस्जिद-ए-नूरिया, नूर-ए-महंमदिया मदरसा मस्जिद शिंदे, अश्रफिया मस्जिद अरिंगळे मळा, इमाम अहमद रजा मस्जिद, सिन्नर फाटा व देवळालीगाव येथील मशीद आदी ठिकाणी सामुदायिक नमाजपठण झाले. मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन, पंढरीनाथ ढोकणे, नगरसेवक सूर्यकांत लवटे आदी उपस्थित होते.

--

सातपूरला दिसला सर्वधर्म समभाव

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

परिसरात सोमवारी सामुदायिक नमाजपठण करून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. देशात शांतता व समृद्धी राहावी, यासाठी यावेळी विशेष दुआ करण्यात आली. नमाजपठणानंतर मुस्लिमबांधव एकमेकांना शुभेच्छा देण्यात दंग झाले होते. त्र्यंबकेश्वररोडवरील रजविया मशिदीत राजकीय नेत्यांनी मुस्लिमबांधवांना गुलाब पुष्प देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ईदच्या पार्श्वभूमीवर सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश सोनावणे, राजेश आखाडे

यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुस्लिमबांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सातपूर प्रभाग सभापती माधुरी बोलकर, मनसेचे गटनेते सलिम शेख, रिपाइंच्या गटनेत्या दीक्षा लोंढे, नगरसेवक सुदाम नागरे,

योगेश शेवरे, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, नितीन निगळ, भिवानंद काळे, अरुण काळे, रवी काळे, रामहरी संभेराव आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौदा हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील चौदा हजार विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत. शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरीदेखील गणवेश न मिळाल्याने मुलांना विना गणवेशच शाळेत जावे लागत आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन कपडे आणि नवीन पुस्तके मिळावेत, अशी ओढ बालकांमध्ये सर्वत्र असते. मात्र शासनाला त्र्यंबकमधील विद्यार्थ्यांचा विसर पडल्याचे दिसून येते. नवीन लाभाच्या योजना देताना शासन त्याचे पैसे पालकांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. हा उपक्रम निश्चितच चांगला आहे. तथापि, जुलै महिना उजाडला तरी देखील पैसे नसतील तर सर्वसामान्य पालक गणवेश स्वखर्चाने खरेदी तरी कसे करणार? पोषण आहाराचे बिल आठ महिन्यांपासून दिलेले नाही.

अनुदानाची प्रतीक्षा

प्रत्येक पात्र विद्यार्थ्यास ४०० रुपये गणवेश अनुदान दिले जाणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २५४ शाळा असून, त्यामध्ये ७४५४ मुली, अनु.जाती ४१६ मुले, अनु. जमाती ६२२३ मुले आणि बीपीएल ५६५ मुले असे एकूण १४६५८ मुले व मुली गणवेशाच्या लाभास पात्र आहेत.


जिल्हा परिषद शाळांत गणवेश लवकरात लवकर द्यावेत अन्यथा आंदोलन केले जाईल.

- भगवान मधे, श्रमजीवी संघटना

विद्यार्थी गणवेशाची रक्कम थेट पालकांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. जि. प. ला अद्याप निधी प्राप्त झालेला नाही.

- भास्कर कनोज, गट शिक्षणाधिकारी, त्र्यंबक पंचायत समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारची वाटचाल हॅटट्रिकच्या दिशेने?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडची अर्थवाहिनी असलेल्या नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेत सत्ताधारी सहकार पॅनल विजयाची हॅटट्रिक करण्याची चिन्हे आहेत. सोमवारी झालेल्या मतमोजणीच्या एकूण तीन फेऱ्यांपैकी पहिल्या फेरीत सहकारचे २१ पैकी १९ उमेदवार आघाडीवर होते. विरोधी श्री व्यापारी पॅनलचे नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर मतमोजणीच्या ठिकाणी फिरकलेही नाहीत. त्यांच्या पत्नी व पॅनलच्या उमेदवार तथा भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर या पहिल्या फेरीअखेर शेवटच्या स्थानी होत्या. गेल्यावेळी विरोधी श्री व्यापारी पॅनलकडे सहा जागा होत्या.

बँकेसाठी रविवारी ३४.६४ टक्के (२१,२६४) मतदान झाले होते. बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड आणि ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांनी सहकार पॅनलचे तर विजय करंजकर, हेमंत गायकवाड यांनी श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्त्व केले. सत्ताधाऱ्यांना धूळ चारून आमचे पॅनल परिवर्तन घडवून आणणारच असा ठाम विश्वास करंजकर यांनी व्यक्त केला होता. सहकार पॅनलचा पारदर्शी कारभार, प्रगतीचा मुद्दा प्रभावी ठरला. आमच्या हातीच बँक सुरक्षित राहील, अशी मतदारांची भावना दिसली, अशी प्रतिक्रिया दत्ता गायकवाड यांनी ‘मटा’कडे व्यक्त केली.

करंजकरांना धक्का

शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या व्यापारी पॅनलने आक्रमक व हायटेक प्रचार केला होता. प्रचंड खर्चही केला होता. पॅनल मागे पडल्याने त्यांना धक्का बसला. महिला गटात त्यांची पत्नी तथा भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर ३२२५ मते मिळवून चौथ्या स्थानी होत्या. रंजना बोराडे (४४४९) पहिल्या, कमल आढाव (४२४३) दुसऱ्या तर जयश्री गायकवाड (३५५१) तिसऱ्या स्थानी होत्या. अन्य गटात सहकारच पुढे होते. भटक्या जाती गटात शाम चाफळकर (५१५२) यांनी हनुमंता देवकरांवर (२८२९), तर ओबीसी गटात संचालक सुधाकर जाधव (४८८५) यांनी सुधाकर ताजनपुरेंवर आघाडी घेतली होती. अनुसुचित जाती जमाती गटात संचालक रामदास सदाफुले (४८६२) हे नगरसेवक प्रशांत दिवे (३४४९) यांच्या पुढे होते.

हे होते आघाडीवर

पहिल्या फेरी अखेर सर्वसाधारण गटातून निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, डॉ. दत्तात्रय पेखळे, श्रीराम गायकवाड, अशोक सातभाई, सुनील आडके, भाऊसाहेब पाळदे, जगन्नाथ आगळे, प्रकाश घुगे, मनोहर कोरडे, वसंत अरिंगळे, अशोक चोरडिया, सुनील चोपडा, डॉ. प्रशांत भुतडा, जयंतीलाल लाहोटी हे आघाडीवर होते. व्यापारी पॅनलचे आर. डी. धोंगडे आघाडीवर होते.

मतमोजणीचा वेग कमी

निवडणूक निर्णय अधिकारी नीळकंठ करे, सहायक अधिकारी एस. पी. कांदळकर आणि एम. डी. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी आठला के. एन. केला शाळेत ४३ टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतपेट्या नव्हत्या. पाच मतपत्रिका होत्या. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल लागण्यास सायंकाळ झाली. या फेरीत ८१०० मतांची मोजणी झाली. त्यात के. एन. केला, मनपा शाळा क्र. १२५ आणि आनंद ऋषीजी शाळेतील १ ते ४२पेट्यांची मते होती. रात्री उश‌िरापर्यंत मतमोजणी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाच्या प्रगतीत प्रत्येकाने योगदान द्यावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिक परिसरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या भारत देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी हातभार लावावा, असा संदेश तमाम मुस्लिम बांधवांसह नाशिककरांना गोल्फ क्लब येथील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावरून देण्यात आला. जुन्या नाशिकसह शहराच्या विविध भागांतून हजारो मुस्लिम बांधवांनी नमाजपठणासाठी येथे हजेरी लावली. पारंपरिक पध्दतीने उपस्थितांनी सामूहिकरित्या विशेष नमाज अदा केली.

रमजान ईदनिमित्त (ईद-उल-फित्र) शहरातील ईदगाह मैदानावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह मुस्ल‌िम बांधवांनी नमाजपठण केले. थोड्याफार प्रमाणात वातावरणातील बदलामुळे काही काळ नमाज होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, नमाजाच्या वेळी ढगाळ वातावरणाची स्थिती बदलून लख्ख सूर्यप्रकाश पडल्याने चिंता दूर झाली. नाशिकच्या विविध भागांतून सकाळी साडेआठच्या सुमारास नमाज अदा करण्यासाठी मैदानाच्या दिशेने मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव येत होते. नऊ वाजेच्या सुमारास संपूर्ण मैदान नागरिकांनी गच्च भरून गेले होते. खास पद्धतीने बांधण्यात आलेल्या हिरव्या-पांढऱ्या पगड्या, आकर्षक पठाणी कुर्ते-इस्लामिक पद्धतीच्या गोल टोप्या परिधान करीत मुस्लिम बांधव मैदानावर जमत होते. स्वयंशिस्तीने एका रांगेत बसत ईदगाह व सुन्नी मरकजी सिरत समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी उपस्थितांना ‘ईद’ व ‘ईदगाह’चे महत्त्व पटवून दिले. तसेच हजरत मुहम्मद पैगंबर यांनी सांगितलेल्या धार्मिक बाबींवर आपल्या खास शैलीत विवेचन केले. यावेळी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-काजी मोईजोद्दीन, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, मौलाना शाकीर रजा, मौलाना महेबुब आलम आदि मान्यवर उपस्थित होते. दहा वाजता खतीब यांनी ध्वनिक्षेपकावर येत उपस्थितांना विशेष नमाजपठणाच्या पद्धतीची माहिती दिली आणि नमाजपठणाला सुरुवात केली. पंधरा ते वीस मिनिटांमध्ये उपस्थित हजारो समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने नमाज अदा करीत एकमेकांची गळाभेट घेत ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या. कबरीस्थानामध्ये देखील आपल्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्त व्हावा, म्हणून अनेकांनी प्रार्थना केल्या.


देवळालीतही नमाजपठाण

ईद-उल-फित्रनिमित्त शहरातील मुस्लिम बांधवांनी ‌नमाज अदा केली. शहरातील इदगाह मैदानावरही हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत शांतता व समृद्धीसाठी अल्लाहकडे प्रार्थना केली. देवळाली कॅम्पला वडनेररोडवरील इदगाह मैदानावर मौलाना सादिक रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तर भगूर येथे हाफिज इकबाल दाउद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी गोरगरिबांना खैरात वाटप करत ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद निमित्त एकमेकांना तर सर्वधर्मियांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुस्ल‌िम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री बबनराव घोलप, नगरसेवक सचिन ठाकरे, वरिष्ठ पोल‌िस निरीक्षक सुभाष डौले, पोपट जाधव, बाळासाहेब गोडसे, संजय गोडसे, छावा संघटनेचे मुस्लिम आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रशीद सैय्यद आदी उपस्थित होते. ईदनिमित्त पोलिसांनी बंदोबस्त तर लष्करानेही आपले सैनिक ईदगाह मैदान परिसरात तैनात केले होते. देवळाली पोलीस स्थानकात छावा मुस्लिम आघाडी फ्रेंडसर्कलच्या वतीने शिरखुरमा वाटप करण्यात आला. याप्रसंगी मुस्लिम आघाडीचे सैय्यद राशीद, जहांगीर शेख, शाईद शेख, मोहस‌िन शेख, नजफ सैय्यद, अब्दुल्लाह शेख आदींसह पोलिस बांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलचोरीने ग्राहकांना चाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोलपंपाच्या मशिनमधील पल्सरमध्ये टॅम्परिंग व शोल्डरिंग करून त्यातील आयसी पार्टच्या साहाय्याने प्रत्येकी पाच लिटरमागे २०० ते ६०० मिलिलिटर पेट्रोलची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आॅइल कंपन्यांचेसुद्धा धाबे दणाणले आहे. नाशिक जिल्ह्यातही यासंदर्भात कारवाई झाली असून, काही पेट्रोलपंप सील करण्यात आले आहेत. या चोरीतून असंख्य पेट्रोलपंपचालकांनीनी ग्राहाकांच्या खिशाला लाखो रुपयांची चाट लावली आहे.

अनेक दिवसांपासून ही चोरी होत असतानाही संबंधित कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष कसे केले व वैद्यमापनशास्त्र विभाग नेमके काय करीत हाेता, असे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत. ठाणे गुन्हे शाखेने राज्यात ४४ पेट्रोलपंपांवर धाडी टाकून ३० पंपांवरील चोरी उघड केली आहे. त्यात सहा जणांना या चोरी प्रकरणात अटक केली आहे. नाशिकमध्येही अशी कारवाई झालेली आहे.

उत्तर प्रदेशमधील पेट्रोलपंपांमध्ये सॉफ्टवेअर चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलमध्ये घोटाळा करणाऱ्या दोन संशयितांना ठाणे पोलिसांनी डोंबिवली आणि पुण्यातून अटक केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर ठाणे पोलिसांनी राज्यभर पेट्रोलपंपांवर धाडी टाकून ही चोरी पकडली. या चोरीचे लोण राज्यभर पसरले असून, पोलिसांच्या कारवाईमुळे काही जणांनी हा छुपा चोरीचा प्रकार तात्पुरता बंद केला आहे. पल्सर मशिनमध्ये फेरफार करून एक चिप पेट्रोलपंपांच्या मशिनमध्ये बसविली की, पाच लिटर पेट्रोलमागे २०० मिलिलिटर ते ६०० मिली लिटरची चोरी करण्याचा हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून बिनबोभाट सुरू असल्याचे त्यामुळे उघड झाले आहे. मात्र, याप्रश्नी अजूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

याअगोदर उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलपंपांवर चिप आणि रिमोटच्या साहाय्याने होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचोरीचे कनेक्शन एप्रिल महिन्यात उघडकीस आल्यानंतर राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्यानंतर वैधमापनशास्त्र विभागाचे अपर पोलिस महासंचालक तथा नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी राज्यभर मोहीम उघडली होती. त्यात राज्यातील १,६३६ पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या तपासणीत ११,४१८ पंपांची तपासणी करण्यात आली, त्यात २५२ पंपांद्वारे कमी-जास्त प्रमाणात वितरण होत असल्याचे आढळून आले होते. पण, त्यात पल्सरमध्ये टॅम्परिंग व शोल्डरिंगचा प्रकार प्रकर्षाने पुढे आला नाही.

७० टक्के पंप संशयास्पद

पोलिसांनी यासंदर्भातील सहा संशयित तंत्रज्ञांना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यातून अटक केली आहे. या अटक केलेल्यांपैकी एक तंत्रज्ञ शिबू थॉमसने १५०० पेट्रोलपंपांवरील मशिनमध्ये छेडछाड केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे राज्यातील हा पेट्रोलचोरीच्या प्रकरणाची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याचे दिसून येत असन, तब्बल ७० टक्के पेट्रोलपंप संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन प्रक्रियेमुळे गोंधळ टळण्याची अपेक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या निकालात दिसून आलेल्या गुणांच्या फुगवट्यामुळे या शैक्षणिक वर्षासाठीची अकरावी प्रवेशाची मेरिट लिस्ट यंदाही नव्वदीपार जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षीही शहरात खुल्या प्रवर्गातून सायन्ससाठी पहिल्या मेरिट लिस्टने ठेवलेले नव्वदीपारचे आव्हान तब्बल तिसऱ्या लिस्टनंतरही कायम राहिले होते. यंदा गुणांच्या फुगवट्यामुळे याच दरम्यानच्या आकडेवारीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांमध्येही वाढ झाल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांना यासाठी चित्रकला, लोककला आणि स्पोर्टस कोट्यातील १५ गुणांचा फायदा झाल्याने त्यांची एकूण टक्केवारीही वधारली आहे. परिणामी, राज्याप्रमाणेच नाशिकच्या विद्यार्थ्यांनीही एकूण ५०० पैकी ५०० गुण मिळविण्याचा किंवा त्या आकडेवारीच्या आसपास पोहोचण्याचा विक्रम केला आहे. परिणामी, यंदाही शहरातील रँकिंग असणाऱ्या कॉलेजांमध्ये सायन्स शाखेसाठी पहिल्या तीन मेरिट लिस्टची आकडेवारी ९२ टक्क्यांच्या आसपास राहील, तर कॉमर्ससाठी ही टक्केवारी ९० च्या आसपास लागण्याची शक्यता आहे.

सोमवारपर्यंत ११ वीचे ऑनलाइन अर्ज स्वीकारले गेले आहेत. यामुळे आता पाच जुलै रोजी लागणाऱ्या मेरिट लिस्टवर विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. यंदा अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पहिल्यांदाच ऑनलाइन राबविण्यात आली. यामुळे एकाच कॉलेजभोवती होणारा विद्यार्थिसंख्येचा फुगवटा दूर होऊन विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया राबविली जाण्याची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनैतिक संबंधातून पत्नीसह मुलाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनैतिक संबंधावरून पतीने पत्नीसह नातेवाइकाच्या दहा वर्षीय बालकाचा खून करून स्वतः आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २६) सकाळी पिंपळगाव बसवंत येथील पवननगर भागात उघडकीस आली.

रवींद्र नागमल (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. रवींद्रने मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी सुरेखा नागमल (२३) आणि विशाल विजय पानपाटील (१०) याची गळा दाबून हत्या केली. नागमल कुटुंब मूळचे धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सोनगीर येथील आहे. गवंडीकाम करणारा रवींद्र कुटुंबासह १५ दिवसांपूर्वी पिंपळगाव बसवंत येथे आला होता. पवननगर येथील अनसूया निवास येथील रूम क्रमांक आठ ही रूम त्याने भाड्याने घेतली. शेजारी राहणाऱ्या एका मुलीला सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास नागमलच्या घरात कोणी तरी गळफास घेतल्याचे दिसले. तिने ही माहिती लागलीच घरमालक निखिल शिंदे यांना कळवली. त्यांनी नागमलच्या घराचा दरवाजा उघडून पाहिला असता नागमलने गळफास घेतल्याचे, तर सुरेखा आणि विशाल निपचित पडलेले आढळले. शिंदे यांनी ही माहिती पिंपळगाव बसवंत पोलिसांना कळवली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना तेथे सुसाइड नोट आढळून आली. त्यात त्याने पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे ही हत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. याबाबत बोलताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय गायकवाड यांनी सांगितले, की पत्नीचे विजय पानपाटील या साडूबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय नागमलला होता. त्यातच चार दिवसांपूर्वी या दोघांना रवींद्रने एकत्र पाहिले. पत्नीने जाणीवपूर्वक पानपाटीलच्या मुलाला शिक्षणासाठी बरोबर ठेवल्याचा रवींद्रचा संशय होता. याच कारणातून त्याने मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी सुरेखासह पानपाटील यांचा दहा वर्षीय मुलगा विशाल याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेतला. त्याच्या सुसाइड नोटमुळे हा प्रकार अनैतिक संबंधावरून झाल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

पोटच्या मुलाला सोडले

नागमल दाम्पत्यास सहा ते सात वर्षांचा मुलगा असून, त्याला रवींद्रने काही केले नाही. त्याचा सर्व राग पत्नीसह विशालवर होता. मध्यरात्रीच्या सुमारास रवींद्रचा मुलगा गाढ झोपेत असताना त्याने या दोघांचा गळा दाबला. यानंतर स्वतः आत्महत्या केली. सकाळी हा मुलगा उठला. मात्र, त्याला काही समजलेच नाही. यानंतर थोड्याच वेळात इतर शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला. या मुलास काहीच कसे झाले नाही, त्याचे इतर नातेवाईक कोण, याचा तपास सुरू असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर मानीव खरेदीखत डीडीआरनेच करून द्यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील नोंदणीकृत ३,२४६ गृहनिर्माण सोसायट्यांचे डीम कन्व्हेन्स (मानीव खरेदीखत) होणे अजूनही बाकी आहे. परिणामी सातबारा उताऱ्यावर बांधकाम व्यावसायिकाचेच नाव असून, सोसायटीचे आणि ग्राहकांचे नावच येत नसल्याने भविष्यात घर विक्रीसाठीही त्यांना अडचणी येऊ शकतात. म्हणूनच ग्राहकांनी त्वरित जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क साधावा, तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून अडवणूक केली जात असल्यास डीडीआरने स्वत:च्या अधिकारात डीम कन्व्हेन्स करून द्यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ग्राहकांना घरे खरेदी करण्यासाठ‌ी बांधकाम व्यावसायिकांकडे धाव घ्यावी लागते. व्यवहार निश्च‌ित झाल्यावर प्रथम केवळ सेलडीड केले जाते. डीम कन्व्हेन्स करून देणे आवश्यक असतानाह‌ी बांधकाम व्यावसायिक ग्राहकांची अडवणूक करतात. असे प्रकार सर्रास होऊ लागल्याने सरकारने २०१२ पासून बिल्डरच्या वतीने डीम कन्व्हेन्सचे अधिकारी डीडीआरला दिले आहेत. त्यासाठी सोसायटीतील एकुण सदनिकाधारकांपैकी ६० टक्के ग्राहकांची संमती असावी आणि इमारत पूर्णत्वाचा दाखला असावा, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता करणाऱ्याचे डीम कन्व्हेन्स डीडीआरही करून देऊ शकतो.

प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील ४,९९० गृहनिर्माण सोसायट्यांपैकी केवळ १,७४४ सोसायट्यांचेच डीम कन्व्हेन्स झाले आहे. उर्वरित ३,२४६ सोसायट्यांचे डीम कन्व्हेन्स अजूनही होऊ शकलेले नाही. पैसे देऊनही केवळ सेलडीडच मिळत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. परिणामी, घरे खरेदी-विक्रीसाठी ग्राहकांना अडचणी येत असल्याची तक्रार ग्राहक तक्रार निवारण समितीच्या बैठकीत अशासकीय सदस्यांकडून अलीकडेच करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्हा उपनिबंधकांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. अडचणीतील सोसायट्यांनी, तसेच तेथील रहिवाशांनी त्वरित डीडीआरशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधकांकडे गृहनिर्माण सोसायटी म्हणून नोंदणी झालेल्या, परंतु अजूनही डीम कन्व्हेन्स न झालेल्या सोसायट्यांना नोटिसा देऊन ते नोंदवि‌ण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बैठकीला सुरेशचंद्र राहटकर, दीपक पाटोदकर, सुधीर काटकर, हरीश मारू, लक्ष्मण गव्हाणे, शिवाजी मोंढे, प्रकाश वैशंपायन, डॉ. प्रतिभा औंधकर यांच्यासह अधिकारी आणि समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे जिल्ह्यातही रमजान उत्साहात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरासह जिल्ह्यातील चारही तालुक्यात पवित्र रमजान ईद सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील मौलवी गंज, ऐंशी फुटी रोडवरील बाजारपेठ भागात तात्पुरता स्वरुपात कपड्यांसह विविध वस्तू खरेदीसाठी दुकाने थाटण्यात आली होती. तर ईदनिमित्त शहरातील पाझंरा नदीकिनारी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हिंदू-मुस्लिम

एकतेचे प्रतीक असलेले अंजान शाह बाबा दर्गाबाहेर पोलिस अधीक्षक

एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, तहसीलदार अमोल मोरे, अप्पर तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव, पोलिस निरीक्षक अनिल वडनेरे, पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, एसआरपीएफचे समादेशक चंद्रकांत गवळी यांच्यासह शहरातील सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच ईदनिमित्त जिल्हाभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील चारही तालुक्यात एक हजाराहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि सहाशे गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाभरात सर्वत्र रमजान ईद सण उत्साहात साजरा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशसेवेसाठी निवडा स्पर्धा परीक्षा

$
0
0

‘करिअर मार्गदर्शन’मध्ये अविनाश धर्माधिकारी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षांचा प्रांत हा ग्लॅमरचा नक्कीच नाही. केवळ ग्लॅमर म्हणून या क्षेत्राकडे बघत असाल तर येथे येण्याअगोदर एकदा विचार करा. या मार्गाव्दारे मिळणारी देशसेवेची मोठी संधी ही सर्वाधिक मूल्यवान आहे. त्यापुढे इतर सर्व गोष्टी गौण आहेत. देशसेवेसाठी या मार्गाची निवड नक्की करा, असे आवाहन माजी आयएएस अधिकारी आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना केले.

‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गर्दीने खच्चून भरलेल्या सभागृहाशी त्यांनी संवाद साधला. ‘दहावी व बारावीनंतरचे करिअर आणि स्पर्धा परीक्षा’ या विषयावर बोलताना धर्माधिकारी म्हणाले, की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रत्येक विद्यार्थ्याने एक त्रिसूत्री कायम स्मरणात ठेवायला हवी. स्वत:ची ओळख हे पहिले सूत्र, मानसिक कलानुसार करिअरच्या क्षेत्राची निवड हे दुसरे क्षेत्र आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात कमालीचे नैपुण्य या तीन सूत्रांची सांगड घातल्यास यशाचा किल्ला दूर नाही, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

स्पर्धा परीक्षांकडे वळताना विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरसमज असतात. कधी शिक्षणाचे माध्यम, शिक्षणाची विशिष्ट शाखा, कौटुंबिक परिस्थितीचे स्वरूप आदी मुद्द्यांचा यात समावेश होतो. पण आजवर यूपीएससी आणि एमपीएससी या सेवांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा अभ्यासल्यास तुमच्या डोळ्यांसमोरचे गैरसमज दूर होतील.

बुध्दीमत्तेविषयी समाजात भ्रामक संकल्पना आहेत. त्या संकल्पना बदलत्या जग प्रवाहासोबत आपण दूर केल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. विशिष्ट टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले म्हणजे तो हुशार किंवा केवळ इंजिनीअरिंग आणि मेडिकल शाखेचे शिक्षण घेतो तो हुशार अशा चुकीच्या व्याख्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विषमता तयार केली आहे. आपल्या क्षेत्रातील उत्कृष्ट असा आविष्कार सादर करण्याला दिवंगत क्रीडामानसोपचारतज्ज्ञ डॉ. भीष्मराज बाम यांच्यासारख्या मार्गदर्शकांनी यश म्हटले आहे, असेही धर्माधिकारी यांनी नमूद केले.

स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र आज व्यापक बनले आहे. आपण निवडू त्या करिअरमध्ये स्पर्धा परीक्षांचा एक पर्याय समोर येतो आहे. त्यामुळे विशिष्ट शाखा निवडून मग स्पर्धा परीक्षा देऊन करिअर घडविणे हा समज चुकीचा होईल, असे त्यांनी सांगितले. या क्षेत्राला बुध्दिवान आणि विशाल दृष्टिकोन असणाऱ्या तरुणांची गरज आहे. तुम्ही येथे नक्की या मात्र येताना देशसेवेचे ध्येय उराशी बाळगून या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

‘स्लाइड शो’तून प्रकाशझोत

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धा परीक्षांचे स्वरूप या विषयावर स्लाईड शोच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला. यूपीएससी परीक्षेत यश मिळविणारा नाशिकचा विद्यार्थी आदित्य रत्नपारखी यानेही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्याची यशोगाथा मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारिका जगताप यांना पीएच.डी.

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वडनेरभैरव येथील महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका प्रा. सारिका जगताप यांना स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

सारिका जगताप या राष्ट्रीय कबड्डीपटू असून, कबड्डी खेळात मातीचे मैदान व मॅटवर खेळाडूंकडून खेळल्या जाणाऱ्या कौशल्यांचा अभ्यास या विषयावर संशोधन पूर्ण करून अवघ्या २९ व्या वर्षी सेट व डॉक्टरेट मिळविण्याचा बहुमान मिळविला. जगताप यांनी मिळविलेल्या पीएच.डी.बद्दल मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. सुनील ढिकले, अॅड. नितीन ठाकरे, नाना महाले, शिक्षणाधिकारी काजळे, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील, प्राचार्य अमोल भगत, अशोक दुधारे यांनी त्यांचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव बसवंत दहशतीखाली

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत शहर परिसर गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडा, चोरी आदी घटनांमुळे चांगलाच हादरला आहे. त्यातच सोवारी घडलेल्या दोन घटनांमध्ये तिघांचा खून, एकाची आत्महत्या यामुळे संपूर्ण शहरासह परिसरावर दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिस यंत्रणा याविरुद्ध कठोर भूमिका कधी घेणार, असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गेल्या आठवड्यात शहरातील चिंचखेड रोड भागात आठ दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील दोघांना निर्दयीपणे मारहाण केली. काही घरांवर दगडफेक केली. हजारोंचा चोरून नेला. या घटनेला चार पाच दिवस उलटले तरीही पोलिसांच्या हातात अद्याप कोणताच पुरावा हाती आलेला नाही. दरोड्याच्या घटनेमुळे नागरिक दहशतीखाली असतानाच सोमवारी मध्यरात्री पिंपळगाव शहरात तीन खून झाले. यात दोन निष्पाप लहान मुलांचे बळी गेले. या घटना पिंपळगाव शहराला काळिमा फासणाऱ्या आहेत. शिवाय पोलिसांच्या कार्यक्षमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. लागोपाट खून दरोडा सारख्या घटना शहरात घडत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र पिंपळगाव शहरात निर्माण झाले आहे.

पिंपळगाव बसवंत सुस्कंकृत, शांतताप्रीय शहर आहे. येथे विविध धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळेच देशभरातील अनेक नागरिक व्यवसाय नोकरीनिमित्ताने येथे स्थायीक झाले आहेत. शहराची व्याप्ती वाढली. नवीन उपनगरे उद्यास आली आहेत.

मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील शांतता सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मोबाइल चोरी, चेन स्नॅचिंग, महिलांची छेडछाड असे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यातच आता खून, दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पिंपळगाव शहरासाठी हे प्रकार धोक्याची घंटा आहेत. परिसरात अनेक सधन शेतकरी मळ्यात, वस्तीवर राहतात. या घटनांमुळे मळ्यातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. शहरातील शांतता सुव्यवस्था लक्षात घेऊन पोल‌िसांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे, अशीच रास्त अपेक्षा आता नागरिक व्यक्त करीत आहेत.

पोलिसांचे हातावर हात

शहरात अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्यांचे पोलिसांशी साटेलोटे असल्यामुळे हा प्रकार सुरू आहे. या व्यावसायिकांकडून पोलिसांना मिळणाऱ्या हप्त्यांमुळे पोलिसांचेही हात बांधले गेले आहेत, अशी उघडउघड प्रतिक्रिया येथील नागरिक देत आहेत. पिंपळगाव बसवंत येथे बदली मिळावी म्हणून पोलिस निरिक्षकांची अक्षरश: स्पर्धा चालते, असेही काही पोलिस खासगीत सांगतात.

शहरात चोऱ्या सुरुच…

रवींद्र मोरे यांच्या घरावर दरोडा टाकून चार दिवस ऊलटत नाही तोच परिसरातील बंद घराचा फायदा घेत सोमवारी दिवसा घरफोडी करण्यात आली. उंबरखेड रोडवरील भिडे नगरातील गोरख सुभाष खैरनार सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेले असता, दुपारी घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साठ हजार रुपये लंपास केले. याच रोडवरील साईकृपा अपार्टमेंट मधील संजय शार्दुल यांच्या बंद घरातून तेरा हजार रुपये, दागिने चोरून नेले. तसेच दाते कुटूंब नोकरी निमित्ताने रोज बाहेर पडते. त्यांच्या घरातूनही पाच हजार रुपये व मोबाइलची चोरी केली आहे. तर रात्री मोहम्मद अमिर सिद्दगी यांचे तीनशे पत्रे व इतर सामानाची चोरी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यार्थी मित्र’ ठरतेय मार्गदर्शक

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

डिजिटल इंडियात आता शैक्षणिक कोणतीही माहिती एका क्लिकवर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. विद्यापीठे, कॉलेजेस, कोर्सेस, एन्ट्रन्स एक्झामसोबतच करिअर कौन्सिलिंग असो किंवा हव्या त्या फॅकल्टीच्या एक्स्पर्टसोबतच बोलण्याची संधी, हे सर्व एकाच ठिकाणी मिळणे आता शक्य झाले आहे. ते म्हणजे ‘विद्यार्थी मित्र’ वेबसाइट. प्राथमिक शिक्षण घेण्याऱ्यांपासून पीएच.डी.पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ही वेबसाइट मार्गदर्शक ठरत आहे.

www.vidyarthimitra.org ही वेबसाइट राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. डिजिटल इंडियातील स्मार्ट विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. या वेबसाइटवर देशातील महत्त्वाच्या व नामांकित सर्व विद्यापीठांची व शैक्षणिक संस्थाची माहिती अपलोड करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी घरबसल्या ऑनलाइन स्वरूपात देशभरातल्या सगळ्या इन्स्टिट्यूट व विद्यापीठांच्या कोर्सची माहिती घेत तेथील प्रवेशप्रक्रिया व अभ्यासक्रम जाणून घेऊ शकतो. यासोबतच स्पर्धापरीक्षा, विविध विद्यापीठांच्या व कॉलेजच्या फॅकल्टी कोर्ससाठीच्या एन्ट्रन्स टेस्टची माहिती या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या वेबसाइटवर करिअर कौन्सिलिंगचाही पर्याय उपलब्ध आहे. विद्यार्थी अनेकदा करिअर निवडीबाबत संभ्रमात असतात. यासाठी करिअर कौन्सिलिंग हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. करिअर कौन्सिलिंग पर्यायाअंतर्गत एक्स्पर्टसोबत चॅट करण्याचा पर्याय या वेबसाइटवर देण्यात आला आहे. यामुळे एखाद्या प्रश्नाचे किंवा समस्येचे उत्तर घरबसल्या एक्स्पर्टकडून मिळवणे आता शक्य झाले आहे. विद्यार्थी मित्र या वेबसाइटवर सरकारकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकालही जाहीर केले जात आहेत. यासोबतच शिक्षण क्षेत्रातल्या बातम्यादेखील या वेबसाइटवर अपलोड केल्या जात आहेत. कॉलेजांच्या मेरिट लिस्ट, त्यांचे सर्टिफिकेट कोर्सेस यांची माहिती एका क्लिकवर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असल्याने ही वेबसाइट ‘टीचिंग गुरू’ची भूमिका पार पाडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेरोजगारांसाठी उद्या मेगा रोजगार भरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे सुशिक्षित बेरोजगारांसाठी एकूण १५९ रिक्त पदांसाठी गुरुवारी, २९ जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मेळावा होणार आहे. कॉलेज रोडवरील बीवायके कॉलेजमध्ये हा मेळावा होईल.

जिल्ह्यातील डेटामॅट्रिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि. नाशिक (ट्रेनी ५० पदे), धुमाळ इंडस्ट्रीज लि. सातपूर (ट्रेनी १७१ पदे), इपकॉस इंडिया प्रा.लि. सातपूर (ट्रेनी २० पदे), जनरल मिल्स इंडिया लि. माळेगाव सिन्नर (ईपीपी ट्रेनी १५ पदे), मे. शारदा मोटर्स इंडस्टीज लि. सातपूर ना‍शिक (ईपीपी वेल्डर, फिटर ३० पदे), सिप्रा इंजिनीअरिंग प्रा.लि. सातपूर नाशिक (मेन्टेनन्स इंजिनीअर १० पदे), जिंदाल सॉ मिल माळेगाव सिन्नर (ट्रेनी- ८, टर्नर/गाइडर, सीएनसी ऑपरेटर), डब्लूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि. इंदिरानगर (डाटा प्रोसेसिंग ऑपरेटर १० पदे) या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीला कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन निवड केली जाणार आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत असून, त्यांतर्गत ब्यूटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग, गारमेंट, अॅग्रीकल्चर बिझनेस अँड कॅामर्स, रिटेल अॅटोमोटिव्ह, प्लास्टिक प्रोसेसिंग, बँकिंग अँड अकौंटिंग, मेडिकल अँड नर्सिंग, प्रॉडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रीकल, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, इन्फॉरमेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी आणि इतर क्षेत्रांतही रोजगारक्षम विनामूल्य कौशल्य प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. उद्योग व्यवसाय मेळाव्यात व स्वयंरोजगारासाठी कर्ज सहाय्यकरणाची शासनाची विविध महामंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विविध महामंडळांकडून कर्जसहाय्य घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची येथे नोंदणी करण्यात येणार आहे. या वेळी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, त्यासाठी शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा व उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, रेशनकार्ड अनुभव प्रमाणपत्र, व्यवसायासाठी जागा उपलब्धता इ. कागदपत्रे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे. इच्छुकांनी किमान पाच प्रतींत बायोडाटा, फोटो, आधारकार्ड, सेवायोजना नोंदणीसह मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदारांचे ना‘राजीनामास्त्र’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरिबांना स्वस्तात धान्य वितरित करणाऱ्या रेशन दुकानदारांना दरमहा ३० हजार रुपये मानधन द्यावे, २०१४ पासूनचे थकीत अनुदान मिळावे, अन्नसुरक्षा कायद्याप्रमाणे दुकानांपर्यंत माल पोहोच करावा आदी मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने जिल्ह्यातील ९० रेशन दुकानदारांनी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे सामूहिक राजीनामे सुपूर्द केले. एक जुलैपासून धान्य न उचलण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार महिनोन् महिने सरकारदरबारी हेलपाटे मारत आहेत. अन्न व पुरवठामंत्र्यांशी अनेकदा चर्चा करूनही आश्वासनांपलीकडे काही मिळाले नाही, अशी कैफियत त्यांच्याकडून मांडली जात आहे. त्यामुळे रेशन दुकानदार संघटनेने आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांवर प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांचे अर्ज भरून घेणे, आधारकार्डच्या झेरॉक्स घेणे यांसारखी कामेदेखील सोपविण्यात आली असून, त्यासही दुकानदारांचा विरोध आहे. सरकारी धान्य गुदामातून थेट रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, ती पाळली जात नाही. कमी केलेला घासलेटचा कोटा पूर्ववत करावा हीदेखील संघटनेची मागणी आहे.

पॉस मशिनवर प्रश्नचिन्ह

रेशनव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी करीत पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशिन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे शिधापत्रिकाधारकाच्या अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतरच त्यांना धान्य वितरित केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन दुकानदारांना मंगळवारी या मशिनचे वाटप करण्यात आले. दुकानदारांनी हे मशिन स्वीकारले, पण प्रलंबित मागण्यांसाठी ९० रेशन दुकानदारांनी परवान्याचे राजीनामे दिले. या राजीनाम्यामुळे पॉस मशिनच्या अंमलबजावणीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेशन दुकानदारांच्या संघटनाप्रमुखांशी जिल्हा प्रशासनाने चर्चा केली असून, लवकरच थेट त्यांच्या दुकानापर्यंत धान्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. थकित अनुदान देण्याबाबतही पाठपुरावा करण्यात येणार असल्याची ग्वाही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारतातील उद्योग, व्यापार प्रामाणिक

$
0
0

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, मुंबई

प्राचीन काळापासून भारताशी व्यापार करण्यासाठी अनेक देश जुळले गेले होते. याचे कारण म्हणजेच भारतातील उद्योग व व्यापार प्रामाणिक असल्याची जगात ख्याती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी केले.

महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत वालचंद हिराचंद यांच्या ४४ व्या स्मृतीदिनानिमित्ताने सरसंचालक भागवत यांचे ‘समाज परिवर्तनातून समर्थ भारत उभा करण्यात उद्योग व व्यापाराचे योगदान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. मुंबईत लोवर परेल येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चर नूतन अध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात सरसंचालक भागवत यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे नाशिकचे उद्योजक संतोष मंडलेचा यांनी मावळते अध्यक्ष शंतनू भडकमकर यांच्याकडून स्वीकारली. यावेळी व्यासपीठावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रामचंद्र भोगले, अनिलकुमार लोढा, ललित गांधी, अमित कामत, अरविंद जोशी आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना सरसंचालक भागवत म्हणाले, की संस्कृतमधून उद्योग, व्यापार व कृषीचे विविध दाखले देत भारत महाशक्ती नव्हे तर विश्वगुरू बनण्याकडे वाटचाल करीत आहे. भारतातील उद्योग, व्यापार व कृषी एकमेकांवर आधारीत आहेत. जगभरात अनेक देश समस्यांच्या गर्तेत सापडले असून, भारत मात्र त्याला अपवाद असल्याचे भागवत यांनी नमूद केले. सीएसआरचा कायदा आज आला असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेल्या संपत्तीतून समाजोपयोगी कामे उद्योजकांनी केली आहेत. भारतात अनेकविध धर्म, जात, पंत असले तरी एकसंघाने उद्योग व व्यापार वाटचाल करीत आहेत. इतर देशात मात्र वंशावरून वाद होत असल्याने त्याचा थेट परिणाम उद्योगांवर होत असल्याचेही भागवत म्हणाले.

भारतातील युवा शक्ती दुसऱ्या देशात जाऊन ज्ञानाचे काम मोठ्या जोमाने करीत आहे. युवाशक्तीमुळे भारताला कुठलीही शक्ती संपविण्याची हिमतच करणार नाही. जगण्याचे साधन किंवा नफा कमविण्यासाठी उद्योग, व्यापाराला महत्त्व न देता देशहिताला प्राधान्य दिल्यास देश खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होईल असेही भागवत म्हणाले. याप्रसंगी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, आयमाचे अध्यक्ष राजू आहिरे, निमाचे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, मनिष रावल, आशिष नहार, हर्षद ब्राह्मणकर, बाळासाहेब वाघ, उत्तम दोंदे, ज्ञानेश्वर गोपाळे, नितीन वागस्कर, नीलिमा पाटील, प्रज्ञा पाटील यांसह औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

शेतीमालाला हमी भाव हवा

शेतीवर निष्ठा असल्यानेच आजही शेतकरी टिकून आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यात कर्जमाफी शेतकऱ्यांना देणे हा पर्याय नसून, शेतीमालाला हमीभाव मिळण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी शासनासह इतरांनी देखील प्रगत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी देखील याबाबत विचार करावा, असेही सरसंघचालक भागवत म्हणाले.

डिफेन्स क्लस्टर उभारणार

सरंक्षण क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी डिफेन्स क्लस्टर उभारणार असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. यात नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद व नागपूर याठिकाणी केंद्र सरकार डिफेन्स क्लस्टर उद्योगांसाठी उभारण्यास प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलांसाठी रस्त्यांवरच ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आम्ही राहतो त्याच ठ‌िकाणी सरकारी योजनेतून घरे बांधून द्या, तेथे मुलभूत सुविधा पुरवून घरपट्टी लागू करा आदी मागण्यांसाठी गौतमनगर, शांतीनगर, साठेनगर आणि रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील रहिवाशी मंगळवारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य दोन्ही रस्त्यांवर त्यांनी ठ‌िय्या मांडल्याने वाहतूक ठप्प झाली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ हे आंदोलन सुरू राह‌िल्याने भरपावसात नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
गौतमनगर, शांतीनगर, साठेनगर, रमाबाई आंबडेकर नगर आणि गरवारे पॉइंट परिसरात अनेक मागासवर्गीय तसेच गरीब कुटुंबे १९९२ पासून वास्तव्यास आहेत. आम्ही राहतो त्याच जागेवर सरकारने घरकुल योजना राबवावी, तेथेच मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी हे नागरिक १९९५पासून करीत आहेत. परंतु, त्यांच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत महापालिका रहिवाशांना शहराच्या बाहेर घरे देणार आहे. परंतु, त्यास या रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली असून, आता रहिवाशांना नोट‌िसा आणि धमक्या दिल्या जात आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा महापालिका तसेच जिल्हाधिकारी प्रशासनाला देण्यात आला होता. या रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. मात्र, तरीही प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने आंदोलक संतापले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. मेहेर चौक ते सीबीएस आणि सीबीएस ते मेहेर चौक अशा दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने परिसरातील सर्वच मार्गांवर वाहतुकीचा बोजवारा उडाला. ‘कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘घरकुल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ यांसारख्या घोषणा देऊन सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
वाहनधारकांना मनस्ताप
या आंदोलनामुळे मेहेर ते रेडक्रॉस, मेहेर ते अशोकस्तंभ, सीबीएस ते राजीवगांधी भवन, सीबीएस ते शालिमार यासह परिसरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुक व्यवस्था ठप्प झाली. ऐन पावसात हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने दूरच दूर वाहनधारकांच्या रांगा लागल्या. परिणामी त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी पर्यायी मार्गांनी वाहतूक वळविली. परंतु, त्यामुळे अन्य रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या.

आंदोलकांना घेतले ताब्यात

आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु, आंदोलकांना नियंत्र‌ित करण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे पहावयास मिळाले. सुरुवातीला रस्त्याच्या एकाच बाजूला आंदोलकांनी ठिय्या मांडला. त्यानंतर मात्र त्यांनी दोन्ही रस्ते अडविले. परिणामी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. समजूत काढूनही आंदोलक ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी जादा कुमक बोलावून घेतली. आदोलकांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊ शकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रथमच्या प्रसंगावधानामुळे बालकाची आईशी भेट!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

भाजीबाजारातील गर्दीत आईपासून हरवलेल्या एका चार वर्षाच्या रडणाऱ्या बालकाची आस्थेने चौकशी करुन त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्याचे धाडस येथील एका वृत्तपत्र विक्रेत्याच्या बारा वर्षाच्या मुलाने दाखवल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या मुलाचे नाव प्रथम सोनवणे असे असून, तो नाशिकरोड येथील वृत्तपत्र विक्रेते गौतम सोनवणे यांचा मुलगा आहे.
मंगळवारी सायंकाळी नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी दोन महिला आल्या होत्या. त्यातील एका महिलेसोबत राज चंद्रकांत वाघमारे (४ वर्षे) हा लहान मुलगाही होता. या महिला भाजीपाला खरेदी करीत असताना गर्दीत राज हरविला. रडणारा लहानगा राज आईच्या शोधात भाजीबाजारातील संपूर्ण गर्दी ओलांडून बिटको चौकापासून विभागीय आयुक्तालय रस्त्यापर्यंत आला. तेथे प्रथम सोनवणे हा मुलगा पेपर स्टॉलवर पेपर विक्री करीत होता. त्याने रडणाऱ्या राजला बघितले व त्याला जवळ घेत त्याची विचारपूस केली. परंतु, राजला काही सांगता आले नाही. लहानगा राज हरविला असल्याचे प्रथमच्या लक्षात आल्याने त्याने राजला त्याचे वडील गौतम सोनवणे यांच्याकडे नेले. त्यांनी राजला खाऊ देऊन शांत केल्यावर राजने त्याचे नाव सांगितले. परंतु, त्याला पत्ता सांगता आला नाही. केवळ हाताच्या इशाऱ्याने आईकडे जाण्यासाठी त्याने हट्ट धरला. त्यामुळे गौतम सोनवणे व त्यांचा मुलगा प्रथम याने भाजीबाजारात जाऊन चौकशी केली असता बिटको चौकाजवळ दोन महिला आपला मुलगा हरविला म्हणून ओक्साबोक्शी रडत असल्याचे त्यांना आढळून आले. या महिलांकडे गौतम सोनवणे यांनी राजला सोपविले. या दोन्ही महिला नाशिकच्या सिव्हिल रुग्णालय परिसात वास्तव्यास आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोट क्लब पर्यटकांसाठी खुला करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर येथील बोट क्लब व मेगा पर्यटन संकुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असतानाही ते अद्याप सुरू न झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी मंगळवारी या पर्यटनस्थळाची पाहणी केली. अपुऱ्या निधीअभावी काही कामे रखडली असून, पुरेशा निधीद्वारे ही कामे मार्गी लावावीत, अशी मागणी आमदार जयंत जाधव यांनी केली आहे.

नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी, तसेच पर्यटकांना शहरात अधिकाधिक वेळ घालविता यावा, या उद्देशाने तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून गंगापूर येथे मेगा पर्यटन केंद्र साकारण्यात आले. तेथे बोट क्लब, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा संकुल, कन्व्हेन्शन सेंटर व गोवर्धन येथील कलाग्राम आदींचा समावेश आहे. २०१४ मध्ये बोट क्लबचे काम पूर्ण झाले. मात्र, अजूनही ते सुरू झाले नाही, याकडे आमदार जयंत जाधव यांनी पर्यटन विकास महामंडळाचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर वाघमारे यांनी या पर्यटन संकुलाची पाहणी केली. या वेळी आमदार जाधव यांच्यासह नाशिक प्रादेशिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन मुंडावरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सरचिणीस संजय खैरनार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

गंगापूर धरणाच्या बॅक वॉटर भागात हा बोट क्लब असून, तेथे जेट्टी, प्रशासकीय इमारत, इक्विपमेंटकरिता देखभाल दुरुस्ती शेड, प्रेक्षकगृह, खुले सभागृह, वाहनतळ तयार करण्यात आले आहे. पर्यटकांना बोटिंग करता यावी यासाठी ४७ अत्याधुनिक बोटी धरणस्थळी दाखल झाल्या आहेत. पक्ष्यांच्या चित्रांचे दालन येथे असून, 'पर्यटक निवास' व 'लेक व्ह्यू नेचर्स रिसॉर्ट’चे कामही प्रगतिपथावर आहे.

‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर गोवर्धन येथे २०१४ मध्ये कलाग्राम उभारण्याचे काम एमटीडीसीकडून हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असले तरी पुरेशा निधीअभावी ते बंद पडले आहे. अपूर्ण कामांसाठी राज्य सरकारने एकरकमी निधी उपलब्ध करून द्यावा आणि कलाग्राम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी जाधव यांनी या वेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कोतवाल, गडाखची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्युनिअर गटासाठी सिद्धी कोतवालची, तर सबज्युनिअर गटासाठी कृष्णा गडाख याची पुणे येथे ३ ते ६ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सिद्धीने १७ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धेत ८००, १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला, तर १४ वर्षांखालील वयोगटात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मुलांमध्ये कृष्णा गडाखने १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात प्रथम क्रमाक मिळविला. कृष्णा प्रथमच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. याशिवाय अनुज कित्तूर याची वॉटरपोलोसाठी स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू भोंसला मिलिटरी स्कूलच्या साई सेंटरचे खेळाडू असून, शंकर मादगुंडी, घनश्याम कुंवर, विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ते येथील जलतरण तलावावर सराव करतात. भोंसला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images