Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लोंबकळत्या वीजतारांचा जिवाला घोर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारी थ्री फेज व‌िद्युत तार खाली लोंबकळत असल्यामुळे अनेकांच्या जिवाला धोका निमार्ण झाला आहे. याबाबत तोंडी आणि लेखी मागणी करून सहा महिने उलटले तरीही वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. एखाद्याचा बळी गेल्यावर तारा ओढणार का? असा सवाल आता शेतकरी कंपनीला विचारत आहेत.

निफाड-पिंपळगाव राज्य मार्गालागत शरद शंकर उबाळे (वय ३२) यांची गट नं १०५ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीच्या थ्री फेज वायर गेल्या आहेत. या वायर हाताला लागतील अशा पाच फुटापर्यंत खाली आल्या आहेत. याबाबत उबाळे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली देवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. उबाळे यांनी २२ डिसेंबर २०१६ रोली लेखी पत्राद्वारेही विनंती केली. तरीही कंपनीने शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.

याबाबत निफाड वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ठेकेदाराला सांगितले आहे. वरच्या ऑफिसलाही कळव‌िले आहे, अशी उडावाउडवीची उत्तरे देण्यात आली. उबाळे यांनी कंपनीच्या कारभाराला कंटाळून तारांना स्पर्श होऊन म्हणून पेरणीही थांबव‌िली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॅटट्रिक होणार की परिवर्तन?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेसाठी रविवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ३४.६४ टक्के मतदान झाले.जेलरोडच्या के. एन. केला केंद्रावर सायंकाळी माजी नगरसेवक अशोक सातभाई (सहकार पॅनल) आणि सुनील बोराडे (श्री व्यापारी पॅनल) यांच्यात झालेला वाद वगळता सर्व अकरा केंद्रांवर शांततेत मतदान झाले. दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी ‘मटा’शी बोलताना विजयाचा दावा केला आहे.

गतवेळी सहकार पॅनलने २२ पैकी १६ जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती. यंदा तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी रात्रीचा दिवस केला. तर परिवर्तनाच्या जिद्दीने विरोधी श्री व्यापारी पॅनलचे नेते व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सर्व शक्ती पणाला लावली. गेल्यावेळी या पॅनलला सहा जागा मिळाल्या होत्या. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोणची सत्ता येणार हे सोमवारी (दि. २५) रात्री आठपर्यंत स्पष्ट होणार आहे. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ कऱ्हे यांनी सांगितले.

संचालकांच्या २१ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार पॅनलचे गॅस सिलिंडर, तर व्यापारी पॅनलचे रोडरोलर हे चिन्ह होते. शनिवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने रविवारी विश्रांती घेतल्याने उमेदवारांमध्ये उत्साह होता. बँकेचे ६१ हजार मतदार आहेत. पैकी २१, २६२ (३४.६३ टक्के) जणांनी मतदान केले. के. एन. केला कंद्रावर सर्वात जास्त (११, ४१९ पैकी ४४७७) मतदान झाले. मुक्तीधाम जवळील मनपा शाळा, आनंद ऋषीजी शाळा, चेहेडी व नेहरुनगर येथील केंद्रासह सिन्नर, देवळाली कॅम्प, नाशिक, सिडको येथेही उत्साह होता. भगूरला २०८९, देवळालीत १८०५ मतदान झाले.


वाघांची प्रतिष्ठा पणास

सहकारी पॅनलने केलेली बँकेची प्रगती, पारदर्शी कारभार यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असे सुरुवातीला वाटले होते. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी आपल्या पत्नी व भूगरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांना व्यापारी पॅनलतर्फे उमेदवारी दिली. विरोधकांची मोट बांधत सर्व ताकद पॅनलमागे उभी केली. हायटेक व नियोजनबद्ध प्रचार केला. त्यामुळेच निवडणूक चुरशीची झाली. शिवसेनेचे दोन वाघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने शिवसैनिक गोंधळात पडले. आमदार योगेश घोलप तटस्थ राहिले तर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ‘सहकार’ला साथ दिली.

क्षणचित्रे

जेलरोडच्या के. एन. केला केंद्रावर सायंकाळी सहकारचे नेते अशोक सातभाई आणि व्यापारी पॅनलचे सुनील बोराडे यांच्यात किरकोळ वाद.

मुक्तीधाम शेजारील मनपा शाळेत रुग्णवाहिकेत येऊन रुग्णाने केले मतदान

जेलरोड व चेहडीच्या केंद्रावर उमेदवार व समर्थकांमुळे वाहतुकीला अडथळा

जास्त मतदारांमुळे नाशिकरोडवरच उमेदवारांचे लक्ष केंद्रीत

वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे व सहकाऱ्यांकडून चोख बंदोबस्त

दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे मनपा शाळा क्र. १२५ तर विजय करंजकर, सूर्यंकांत लवटे सकाळी आनंद ऋषीजी शाळेत तळ ठोकून.


निकालास विलंब

सोमवारी सकाळी आठला के. एन. केला शाळेत ४० टेबलांवर एकाचवेळी मतमोजणी सुरू होईल. मतदान पारंपारिक पद्धतीने झाले. मतदानासाठी ५ मतपत्रिका होत्या. त्या कॅटेगरीनुसार स्वतंत्र करून गठ्ठे करणे, मोजणे याला वेळ लागणार आहे. यामुळे संपूर्ण निकाल लागण्यास रात्रीचे आठ वाजतील अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमधील फुलबंदी उठविली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील त्र्यंबकराजाच्या मंदिरात भाविकांना फुले वाहण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून यावर बंदी होती. शनिवारी ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत चेअरमन न्या. चिटणीस यांनी भाविकांना देवास श्रद्धानुसार फुले वाहण्याचा अधिकार आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान, मंदिरात फुले नेऊ देण्यात येत असायची मात्र दरवाजाच्या बाहेरच ती भाविकाकडून काढून घेण्यात येत होती. याकरिता सुरक्षेचे कारण दिले जात होते. पाचपन्नास रुपयांची फुले देवाला न वाहता शिपायांनी हातातून काढून घेतल्याने भाविक संतप्त होत असत आणि वाद घडायचे. फुलबंदी उठविल्याबाबत भाविक तसेच फुलविक्रेते यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सलग शासकीय सुटीमुळे त्र्यंबकेश्वर येथे गर्दीत वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळपासून भाविकांचा ओघ सुरू झाला असून, रविवार सायंकाळपर्यंत तसाच होता. वाहनतळावरही वाहनांसाठी जागा शिल्लक नव्हती. नवीन बस स्थानक, जव्हार फाटा येथे देखील वाहने उभी करण्यात आली होती. त्र्यंबक नगर पालिकेस तीन दिवसात वाहन प्रवेश फीचे विक्रमी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान त्र्यंबकनगरीत पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. अर्थात भाविकांच्या सुविधांच्या नावाने असलेली बोंब मात्र कायम आहे. दर्शनबारी पासून ते स्वच्छतागृहापर्यंत सर्वच बाबतीत गैरसोय आहे. नगरपालिका प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन दोन्ही यंत्रणा उदासीन असल्याचे चित्र कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरेंच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना बळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने शनिवारी सरसकट दीड लाख कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोष असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्ध्व ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यामुळे त्यांना बळ मिळाले आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतल्या. सरकारने २०१६ ऐवजी २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना दिलासा द्यावा, कांद्याला हमीभाव द्यावा, यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल, असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. मात्र समाधानकारक नाही असे सांगत त्यांच्या शेतकऱ्याच्या भावनाही व्यक्त केल्या. त्यानंतर शेतकरी संपकाळात शेतकऱ्यांवरचे गुन्हे दिसले, तर सरकारचे काय करायचं ते मी बघतो, असा सज्जड दमही भरला. त्यामुळे शेतकऱ्यांना या दौऱ्यातून समाधान मिळाले आहे.

एकेकाळी शहरी पक्ष म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शिवसेनेने ग्रामीण भागात शाखा सुरू करत आपले बळ निर्माण केले. लढाऊबाणा असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले व शिवसेनेची ताकद नंतरच्या काळात वाढत गेली. पण, नंतरच्या काळात ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होवू लागताच शिवसेनेने पुन्हा शेतकऱ्याचे प्रश्न प्रखरपणे मांडायला सुरुवात केली. कर्जमाफीची मागणी सुद्धा शिवसेनेने सत्तेत असतांना लावून धरली. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू सरकारपर्यंत पोहचू लागली. या दौऱ्यात त्यांनी सरकारने स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी व नियमित कर्जफेड करणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले. त्याचप्रमाणे समृद्धी मार्गाच्या बाधीत शेतकऱ्यांच्याही पाठीशी शिवसेना असल्याचे सांगितले.

नाशिक जिल्हा कांदा, द्राक्ष, डाळिंबसह फळ भाज्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांचे आंदोलन असो की छोटे प्रश्न ते नेहमीच चर्चेत असतात. शेतकरी संघटनेची पाळेमुळेही याच जिल्ह्यात जास्त रुजली व नंतर त्याने मोठे स्वरुप घेतले. त्यामुळेच संवाद यात्रेसाठी उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अगोदरच सर्व तयारी केली. पण शनिवारी कर्जमाफीची घोषणा झाली व दुसऱ्या दिवशीच ठाकरे नाशिकला आले. त्यामुळे संभ्रमात व अस्वस्थ असलेल्या शेतकऱ्यांना समाधान वाटले. सरकारने कर्जमाफीचे पहिले पाऊल उचलले आहे. आता त्यात सर्वांना समाधान कसे मिळेल यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

शिवसैनिकही उत्साहात

शेतकरी संवाद यात्रेत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांचाही उत्साह वाढला आहे. महानगरपालिकेत अपेक्षित यश शिवसेनेला मिळाले नसले तरी ग्रामीण भागातून शिवसेनेला सर्वांनी पसंती दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. ठाकरे यांचा हा दौरा शिवसैनिकांना बळ देणारा ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टचपॅड रिप्लेस न करणे पडले महाग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाॅरंटीत पीरिअडमध्ये मोबाइल असताना टचपॅड खराब झाल्यानंतर विनामूल्य तो रिप्लेस न करून देणे लिनोवाे कंपनीला महागात पडले आहे. डॅमेजचे कारण पुढे करीत ग्राहकाची ही सेवा नाकारल्यामुळे लिनोवो कंपनीला ग्राहक न्यायमंचाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. या दंडाबरोबरच मोबाइलची किंमत १३ हजार ४९९ रुपये परत देण्याचे आदेशही दिले आहेत. या निकालामुळे वाॅरंटी देऊनही सेवा नाकारणाऱ्या कंपन्याला चाप बसणार आहे.

पाथर्डी फाटा येथील वासननगर येथे राहणाऱ्या कनिका पंकज शर्मा यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत हा निकाल देण्यात आला आहे.

या तक्रारीत शर्मा यांनी म्हटले आहे, की एसयूके-२१ हा लिनोवो कंपनीचा मोबाइल आॅनलाइन विकत घेतला. दोन-तीन महिन्यांनंतर सदर मोबाइल हँग होणे, अॅप व टचपॅड प्राॅपर वर्क न करणे, असे प्राॅब्लेम सुरू झाले. त्यामुळे होलाराम काॅलनीत असलेल्या शुभम टेलिकाॅम सर्व्हिसेसकडे तो दुरुस्तीसाठी दिला. त्यांनी तो चेक केल्यानंतर टचपॅड वाॅरंटी कालावधीत असल्याने १५ दिवसांत विनामूल्य बदलवून मिळेल, असे सांगितले. दुरुस्तीसाठी देताना त्यावर कोणत्याही प्रकारचे स्क्रॅचेस अगर पॅचेस नव्हते. त्यानंतर लिनोवो कंपनीने मोबाइल डॅमेज झाल्याचे सांगत टचपॅड रिप्लेस करून देणे नाकारले.

--

कंपनीने दिले स्पष्टीकरण

या तक्रारीनंतर लिनोवो कंपनीने आपली बाजू मांडताना सांगितले, की मोबाइल हँग होण्याची तक्रार केल्यानंतर मोबाइल तपासला असता मोबाइलच्या डिस्प्लेवर डाव्या बाजूस स्पाॅट आढळून आले. त्यामुळे वाॅरंटीच्या अटी व शर्तींनुसार मोबाइल विनामूल्य दुरुस्त करता येणार नाही, असे तक्रारदाराला सांगितले. त्यांनी चार्जेस देण्याचे नाकारल्यानंतर त्यांना मोबाइल दुरुस्त न करता परत दिला.

--

...असा दिला निकाल

या दोन्ही बाजू एेकल्यानंतर न्यायमंचाने वाॅरंटी काळातही मोबाइल विनामूल्य दुरुस्त करून देण्याचे लिनोवो कंपनीने नाकारून सेवा देण्यात कमतरता केली आहे. मोबाइल दुरुस्तीसाठी देतानाच त्यांचे फिजिकल डॅमेज झालेले होते, हे सिद्ध करण्यासाठी कंपनीने तत्सम पुरावा दाखल केला नाही. अगर इंजिनीअर्सचे प्रतिज्ञापत्र महत्त्वपूर्ण असतानाही सादर केले नाही. त्यामुळे त्यांनी मोबाइल परत घेऊन त्याची किंमत १३ हजार ४९९ तक्रारदारांना द्यावी. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी ३ हजार व अर्जाचा खर्च दोन हजार रुपयेसुद्धा द्यावा. हा निकाल ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणी रहिवाशांच्या दारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेला सातपूर भागातून सर्वाधिक आर्थिक उत्पन्न मिळूनदेखील परिसरातील असंख्य रहिवासांना नागरी सुविधांपासूनदेखील आजही वंचित राहावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून सातपूर कॉलनीतील म्हाडा वसाहतीला ड्रेनेजच्या सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या कॉलनीतील इमारतींच्या ड्रेनेजचे सांडपाणी थेट रहिवाशांच्या दारात साचत आहे. घरासमोरच साचलेल्या सांडपाण्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्यच धोक्यात आले असून, महापालिकेकडे तक्रारी करूनदेखील ड्रेनेजची समस्या मार्गी लागत नसल्याने परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कामगार वस्ती असलेल्या सातपूर कॉलनीत म्हाडाने तीन हजारांहून अधिक घरकुले उभारलेली आहेत. कामानिमित्त नाशिकला आलेल्या कामगारांना स्वस्तात घरकुले उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे घराचे स्वप्नही पूर्ण झाले. परंतु, वाढत्या लोकवस्तीत लहान असलेल्या घरकुलांचे रुपांतर इमारतींमध्ये झाले आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे गेल्या पंचवार्षिकमध्ये लाखो रुपये ड्रेनेज लाइनकरिता मंजूर करण्यात आले होते. परंतु, मंजूर करण्यात आलेला निधी केवळ आठ व वीस हजारांच्या वस्तीत नवीन ड्रेनेज लाइन टाकण्यातच खर्च झाला. उर्वरित जुन्या कॉलनीतील ड्रेनेजच्या नवीन लाइन टाकण्यात आल्या नसल्याने सांडपाण्याच्या लाइन वारंवार चोकअप होत असल्याने सांडपाणी थेट रहिवाशांच्या दारात साचत आहे. या चोकअपच्या समस्येमुळे परिसरातील मुलांना खेळणेही अवघड झाले असून, अस्वच्छतेमुळे त्यांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झालेला आहे. याबाबत महापालिकेकडे रहिवाशांनी वेळोवेळी तक्रारीदेखील केल्या. परंतु, रहिवाशांच्या समस्येकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नगरसेवकांनीही रहिवाशांना वाऱ्यावर सोडल्याने ड्रेनेज समस्येवर तोडगा काढणार कोण, असा सवाल महिला उपस्थित करीत आहेत.

--

...तर छेडणार आंदोलन

दरम्यान, महापालिका व स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याने ड्रेनेजच्या समस्येसाठी आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन निगळ यांनी सांगितले. गेल्या महिन्यापासून रहिवासी सातत्याने महापालिका व स्थानिक नगरसेवकांकडे ड्रेनेजची समस्या मांडत आहेत. परंतु, रहिवाशांच्या समस्येबाबत कुणालाही घेणे-देणे नसल्याने सांडपाणी आरोग्य विभागात टाकण्यात येणार असल्याचे निगळ ‘मटा’शी बोलताना म्हणाले.

--

जुन्या कॉलनीत म्हाडा घरकुले उभारल्यापासून असलेल्या ड्रेनेजच्या लाइन अजूनही वापरात आहेत. मात्र, लोकसंख्या दहा पटींनी वाढल्याने जुन्या ड्रेनेज लाइन कमी पडू लागल्या असून, नेहमची चोकअप होऊन सांडपाणी थेट दाराशी सात आहे. त्यामुळे ज्येष्ठांसह लहानग्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

-दीपक कदम, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरगाण्यातील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी भागातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला जाईल, तसेच तेथे तज्ज्ञ डॉक्टर्सची नेमणूक केली जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी नाशिककरांना दिली. आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टर्स काम करण्यास तयार व्हावेत यासाठी दीड ते दोन लाखांपर्यंत पगार वाढवून त्यांना सरकारतर्फे विशेष प्रोत्साहन देण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचे या वेळी सावंत यांनी सांगितले.

सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालय आणि बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. सावंत यांनी भेट दिली. या वेळी आमदार जिवा पांडू गावित, आरोग्य उपसंचालक डॉ. लोचना घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सावंत म्हणाले, की आदिवासी भागातील बांधवांसाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. रुग्णांच्या समस्या दूर करण्यासाठी सुरगाणा येथे ५० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र सुसज्ज इमारतदेखील उभी करण्यात येईल. हॉस्प‌िटलमध्ये फिजिशिअन, सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञाची नियुक्ती केली जाईल. रुग्णालयात एक्स-रे यंत्र कार्यरत करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. सावंत यांनी ग्रामस्थ आणि रुग्णांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी आरोग्य यंत्रणेस दक्ष राहण्याचे निर्देश डॉ. सावंत यांनी दिले. आदिवासी भागात सॅम आणि मॅमचे प्रमाण कमी करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

आदिवासी भागासाठी डॉक्टरांना पगारवाढ?

आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टर्स काम करण्यास इच्छुक नसतात ही वस्तुस्थ‌िती आहे. परिणामी, रुग्णांना वेळेत आरोग्याच्या सेवा मिळण्यात अडचणी येतात. डॉक्टरांनी आदिवासी भागात थांबून तेथे सेवा देणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. म्हणूनच डॉक्टरांनी तेथे काम करण्यास तयार व्हावेत यासाठी दीड ते दोन लाखापर्यंत पगार वाढवून त्यांना सरकारतर्फे विशेष प्रोत्साहन देण्यात येईल, असे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. आदिवासी भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शुक्रवारी स्थानिक स्तरावर बैठक घेऊन त्याचा अहवाल त्वरित सरकारला पाठवावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया विमा व्यवस्थापकाकडून ३२ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी विमा कंपनीचा व्यवस्थापक बोलत असल्याची बतावणी करून एका भामट्याने सातपूरमधील एकाची ऑनलाइन पद्धतीने तब्बल ३२ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन फसवणुकीबाबत अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विजय तुकाराम पाटील (रा. सातपूर कॉलनी, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार, १९ जून रोजी पाटील यांच्या मोबाइल क्रमांकावर संशयित आरोपी दीपक याने फोन केला होता. आपण मॅक्‍स लाइफ कंपनीचा कार्यकारी व्यवस्थापक बोलत असल्याचे भासवत आरोपीने पाटील यांचा विश्वास संपादन केला. तुमचा पॉलिसी ईसीएस परत गेला आहे. तुम्हाला आम्ही डिस्काऊंट देतो. मात्र, त्यासाठी दिल्लीच्या सेंट्रल बँक आफ इंडियाच्या शाखेत ऑनलाइन रक्कम टाकावी लागेल, असे आरोपीने सांगितले. त्याप्रमाणे पाटील यांनी तब्बल ३२ लाख २२ हजार ४७५ रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्स्फर केले. मात्र, पैसे भरल्यानंतर काही हालचाल झाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सायबर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू

दुचाकीवरून पडून डोक्‍याला गंभीर मार लागल्याने राजेंद्र मारुतीराव पोद्दार (वय ५०, रा. आदित्यकोन सोसायटी, महालक्ष्मी टॉकीजच्या मागे, दिंडोरी रोड, पंचवटी) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तेली गल्लीच्या कॉर्नरवर घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोद्दार रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून घराकडे परतत असताना ही घटना घडली. तेल्ली गलीच्या चौकात ते दुचाकीवरून पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला होता. त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सोलर मेटलसह रक्कम लंपास

सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीतील बायोमेट्रिक मशिन तोडून चोरट्यांनी नुकसान करीत कंपनीतील सोलर मेटलसह रोकड लंपास केली.

शेखर साईनाथ शिंदे (रा. म्हाडा कॉलनी, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, सातपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये डेराडेकस पॉवर स्विचेस ही कंपनी असून, गेल्या शुक्रवार ते रविवारी ही घटना घडली. वरील कालावधीत चोरट्याने कंपनीत प्रवेश करून बायोमेट्रिक मशिन तोडून नुकसान केले आणि अडीच किलोचे सोलर मेटल, ८,९२० रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरणा दुकान फोडले

सातपूरच्या शिवाजीनगरमधील किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने २० हजार रुपये लंपास केले. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी भाऊसाहेब बाजीराव गाडेकर (रा. दत्त मंदिर रोड, शिवाजीनगर, सातपूर) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गाडेकर यांचे शिवाजीनगरमधील दत्तमंदिर रोडवर गुरुदत्त किराणा स्टोअर्स आहे. गेल्या शनिवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटले आणि दुकानातील २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा प्रकार पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरीस

हनुमानवाडीतील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेली. अक्षय सतीश रामराजे (रा. सोनाली रिव्हर, हनुमानवाडी, पंचवटी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली २० हजार रुपयांची दुचाकी (एमएच १५/ बीयू ६९२८) चोरट्याने गेल्या १४ जून रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेच्या दरम्यान चोरी केली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नालेसफाईची चौकशी कधी?

$
0
0

महापौरांच्या घोषणेला आठ दिवस उलटले; शिवसेना विचारणार जाब

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या पहिल्या आणि काल परवा झालेल्या दुसऱ्या पावसांत नाशिक शहराची झालेल्या दैनाला पावसाळापूर्व कामांमधील भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी नालेसफाईच्या कामांच्या चौकशीची घोषणा केली होती. परंतु ही घोषणा होऊन आठ दिवस उलटले तरी चौकशीचा कागद हललेला नाही. महापौरांनी नालेसफाई कामांच्या चौकशीची रुपरेषा अद्यापही स्षष्ट न केल्याने या चौकशीबाबत संशय बळावला आहे. त्यामुळे विरोधकांना शांत करण्यासाठीच महापौरांनी घोषणा तर केली नाही ना, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

१४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराची दैना झाली होती. नदीत पाणी नसतांनाही शहरातील गल्लीबोळात मात्र पुराचे लोट आले होते. या पावसामुळे नाशिककरांचे मोठे नुकसान झाले होते. महापालिकेकडून नालेसफाईचे काम झाले नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांसह नगरसेवकांनी केला होता. पालिकेच्या ढिलाईमुळेच ही अवस्था निर्माण झाल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर झाला. या पावसाने शहराचे नुकसान झाल्याचा आरोप करत गेल्या महासभेत विरोधकांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीवर वादळ निर्माण झाल्यामुळे महापौरांनी सभाच गुंडाळली होती. त्यामुळे महापौरांवर प्रशासनाला पाठीशी घातल्याचा आरोप झाला होता.

महापौरांनी सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधकांच्या आरोपाची दखल घेत, गेल्या मंगळवारी पावसाळी पूर्व कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची घोषणा केली होती. त्यासाठी एक समिती स्थापन करून तज्ज्ञांच्या मदतीने चौकशी केली जाईल, अशी घोषणा महापौरांनी केली होती. परंतु या घोषणेला आता आठ दिवस उलटले असून, अजूनही चौकशीची रुपरेषा जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घोषणेबाबत संशय बळावला आहे. सध्या प्रशासनाकडून शहरातील नदी नाल्यांचे सफाईचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाला अभय देण्यासाठी या चौकशीला उशीर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. यासंदर्भात शिवसेना जाब विचारणार असून, महापौरांनी घोषणेची आठवण करून देणार असल्याचे बोरस्ते यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘असा कलादिग्दर्शक पुन्हा होणे नाही’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चित्रपट महामंडळाचे ऑफिस नाशिकला सुरू व्हावे, यासाठी दिवसरात्र मेहनत घेणारा अत्यंत मितभाषी कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. असा कलादिग्दर्शक पुन्हा होणे नाही, असे भावनाविवश प्रतिपादन मुंबई चित्रपट महामंडळाचे संजय ठुबे यांनी केले.

नाशिक शहरामधून सुरुवात करून मुंबई, पुणे, कोल्हापूरपर्यंत कला दिग्दर्शक म्हणून ज्यांचे नाव होते असे नेपथ्यकार व ज्येष्ठ कलादिग्दर्शक अरुण रहाणे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणी एकत्रित चर्चिल्या जाव्या यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. ही शोकसभा अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखा, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद नाशिक शाखा, सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नाशिकमधील सर्व नाट्य संस्थांनी मिळून आयोजित केली होती. वा. गो. कुलकर्णी कलादालन, परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर येथे ही सभा झाली.

ठुबे पुढे म्हणाले की, चित्रपट महामंडळाच्या काही योजना निम्नस्तरातील कलावंतांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. कलादिग्दर्शक हा प्रतिसृष्टी निर्माण करणारा असतो. दृश्य स्वरूपात चित्रपटाला पुढे आणण्याचे काम तो करतो. अरुणजींच्या जाण्याने नाशिकच्या कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असेही ठुबे म्हणाले.

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम म्हणाले, की अरुणच्या जाण्याची बातमी कानावर आली आणि त्यांनी नाट्यक्षेत्रात केलेल्या कामाची चित्रफितच नजरेसमोरून गेली. त्यांचे आयुष्य मी माझ्यासमोर घडताना पाहिले आहे. मी एकांकिका बसवायचो तेथे चर्चेसाठी अरुण हजर असायचा. त्याचा कामात प्रत्यक्ष सहभाग नसेलही परंतु, त्याला नेहमी वाटायचे की काहीतरी जबाबदारी माझ्यावर असावी. खंडोबाचं लगीन नाटकाचे अनेक प्रयोग झाल्यावर पडदे जीर्ण झाले आणि नेताजी भोईरांसारखेच पडदे रंगविण्याची जबाबदारी मी त्याला दिली तेव्हा तो खूप आनंदी झाला होता. दादांनी काम केलेल्या पडद्यावर काम करायला मिळणार म्हटल्यावर त्याने एक रुपयादेखील मोबदला न घेता काम करून दिले.

जयप्रकाश जातेगावकर यांनी कलाकारांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे, अशी सूचना यावेळी केली. श्याम लोंढे यांनी अरुण रहाणे यांच्या आठवणी जागवल्या. मनोज नागपुरे, वासू पाटील, हरिभाऊ जाधव, प्रदीप कोथमिरे, मुलचंद पटेल यांसह काही कलावंतांनी रहाणे यांच्या आठवणी ताज्या केल्या. सूत्र राजेश जाधव यांनी सांभाळले.

...अन् जोगवा टायटल मिळाले

शोकसभेत आठवणींना उजाळा देताना प्रा. रवींद्र कदम यांनी सांगितले, की जोगवा नावाची एकांकिका आम्ही केली होती. त्याचे पुढे काहीतरी भव्य करण्याच्या हेतूने हे टायटल शाहू खैरे व मी रजिस्ट्रेशन केले. त्याला बराच काळ उलटून गेल्यावर एकदिवस अरुणचा फोन आला, त्याला जोगवा हे टायटल एका चित्रपटासाठी हवे होते. तो चित्रपट राजीव पाटीलचा होता. अरुणने मध्यस्थी करून हे टायटल त्यांना मिळवून दिले. अरुण असा प्रत्येकासाठी धडपड करणारा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निविदेच्या फेऱ्यात कोमेजणार वृक्षलागवड

$
0
0

संरक्षक जाळ्या खरेदीसाठी लागणार दीड महिना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात महापालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. यासाठी गेल्या महासभेत संरक्षक जाळ्या खरेदीकरिता ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रशासनाकडून जाळ्या खरेदीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जाळ्या खरेदी निविदा पद्धतीने केली जाणार असल्याने त्याला दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे वृक्षलागवड कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या प्रशासनाकडून घोडा खरेदी करण्याअगोदर नाल खरेदी करण्याचे प्रकार अनेकदा होतात. त्याचाच प्रत्यय नुकत्याच महासभेने मंजूर केलेल्या वृक्षरोपणाच्या विषयावरून येत आहे.

यंदाच्या पावसाळा हंगामात सहा विभागात वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी दोन हजार ६२१ संरक्षक जाळ्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी ३९ लाख ९९ हजार रुपये खर्चाला महासभेने मान्यता दिली आहे. सिडको, नाशिक पूर्व, नाशिक पश्‍चिम, नाशिकरोड व पंचवटी विभागामध्ये प्रत्येकी ४३७ तर सातपूर विभागात ४३६ संरक्षक जाळ्या उभारल्या जाणार आहेत. एका संरक्षक जाळीची किंमत एक हजार ५२५ निश्‍चित करण्यात आली आहे. वृक्ष निधी या लेखा शिर्षकातून हा निधी खर्च केला जाणार आहे. परंतु वृक्ष लागवड कधी होणार आणि जाळ्यांची खरेदी कधी केली जाणार याबाबत संभ्रम आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने तातडीने वृक्षलागवड होवून त्यांना जाळ्या लावल्या तरच वृक्ष जगू शकतील. परंतु या जाळ्यांच्या खरेदीला किमान दीड ते दोन महिने लागणार आहे. त्यामुळे वृक्षलागवड कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ही वृक्षलागवड कागदावरच होण्याची शक्यता पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायगावकरांचे लाक्षणिक उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक करणारी असल्याचा आरोप करीत येवला तालुक्यातील सायगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. ‘भाजप-सेना सरकारची कर्जमाफी म्हणजे खऱ्याच्या आईला घोडा...’, या आशयाचा भव्य डिजिटल बॅनर लावत शासनाच्या निषेधार्थ गावातील रोकडोबा पारावर केल्या गेलेल्या या आंदोलनात गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरकारने कर्जमाफीची केलेली घोषणा समाधानकारक नसल्याचा सूर ठिकठिकाणाच्या शेतकऱ्यांकडून आता उमटू लागला आहे. त्यामुळेच शासनाच्या निषेधार्थ सोमवारी (दि.२६) येथील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते प्रा. शिवाजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने ३० जून २०१६ पर्यंत थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनाच दीड लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या कर्जमाफी निकषात केवळ आठ ते दहा टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. उर्वरित नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या ९० टक्के शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवले जाणार आहे, असा आरोप यावेळी सायगावच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शासनाची कर्जमाफी व निकष ही एकप्रकारे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच असून, शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात पेटून उठण्याची गरज यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली.

लाक्षणिक उपोषणात भागुनाथ उशीर, सरपंच योगिता भालेराव, उपसरपंच गोरख भालेराव, माजी सरपंच सुनील देशमुख, दिनेश खैरनार, ज्ञानेश्वर भालेराव, विजय खैरनार, रघुनाथ खैरनार, महेंद्र उशीर, रामनाथ उशीर आदींसह जवळपास सव्वाशे शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी संघटनेचे नेते संतू पा. झांबरे, बापूसाहेब पगारे, सुरेश जेजुरकर यांनीही उपोषणस्थळी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागात एक लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच नाशिक विभागातील बहुतांश तालुक्यांत मोसमी पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून, काही तालुक्यांत पेरण्यांनाही सुरुवात झाली आहे. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध व्हावीत, यासाठीचे नियोजन केले आहे. नाशिक विभागात एकूण १७ पिकांच्या २ लाख २६ हजार ७४४ क्विंटल बियाण्यांची कृषी विभागाकडून उपलब्धता करून देण्यात आली असून, त्यापैकी १ लाख एक हजार ८८५ क्विंटल बियाण्यांचा प्रत्यक्ष बाजारात पुरवठाही झालेला आहे.

यंदा हवामान खात्याने ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे कृषी विभागाने यंदाच्या खरिपाचे नियोजन करताना बियाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात नोंदवली होती. महाबीज व खासगी कंपन्यांकडे कृषी विभागाने नोंदविलेल्या बियाण्यांच्या मागणीपैकी २ लाख २६ हजार ७४४ क्विंटल बियाणे नाशिक विभागाला प्राप्त झाले आहे. त्यापैकी प्रत्यक्ष बाजारात निम्म्यापेक्षा जास्त बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे.

१७ पिकांचे बियाणे उपलब्ध

कृषी विभागाच्या नियोजनानुसार महाबीज व काही खासगी कंपन्यांचे विविध १७ पिकांचे बियाणे बाजारात उपलब्ध झालेले आहे. त्यात संकरित ज्वारी, सुधारित ज्वारी, संकरित बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, संकरित व सुधारित कापूस, बीटी कापूस, नागली या पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे.

सोयाबीन, मक्याला प्राधान्य

विभागातील शेतकरी सोयाबीन व मका यांसारख्या पिकांना प्राधान्य देत असल्याने यंदाच्या खरिप हंगामात नाशिक विभागासाठी कृषी विभागाने सोयाबीन बियाण्यांचे ६३ हजार ४५२, तर मका बियाणे ७७ हजार १७८ क्विंटलचे वाटप केलेले आहे. त्यापैकी सोयाबीनचे २८ हजार ६८७, तर मक्याचे २८ हजार ५०० क्विंटल बियाणे प्रत्यक्षात बाजारात उपलब्ध झालेले आहे. गेल्या काही वर्षांत विभागातील शेतकरी सोयाबीन व मका या पिकांना प्राधान्य देत असल्याने या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढू लागले आहे. परिणामी कृषी विभागाकडून या पिकांच्या बियाण्यांच्या वाटपातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

गुणनियंत्रणासाठी भरारी पथके

विभागातील बियाणे व खतांचा काळाबाजार, बोगस खते व बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर एक, जिल्हा स्तरावर ५, तालुका स्तरावर ५४ अशी विभागात एकूण ६० भरारी पथकांची व ६० गुणनियंत्रण कक्षांची स्थापना कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी गुणवत्ता नियंत्रणाच्या दृष्टीने या पथकांनी विभागात ७०३४ नमुने काढले होते, तर ४४ विक्रेत्यांवर परवाने निलंबनाची, तर ३४ विक्रेत्यांवर परवाने रद्दची कारवाई केली होती, तर ४९० इतके विक्री बंदचे आदेश देण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीचे फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक महानगरपालिका व देवळाली कटक मंडळ हद्दीतील अकरावी ऑनलाइन प्रवेशअर्ज प्रक्रिया सुरू आहे. यंदा केंद्रीयकृत पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात असून, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाइन प्रवेश अर्जांचा भाग एक भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आज (२७ जून) अंतिम मुदत आहे. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा भाग १ व भाग २ भरणे आवश्यक आहे. तसेच अर्ज भरल्यानंतर तो आपल्या माध्यमिक शाळेतून अथवा मार्गदर्शन केंद्रावरुन पडताळून घ्यावा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेशअर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या निकालानंतर या प्रक्रियेने गती घेतली. इनहाऊस, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन, तांत्रिक या कोट्यांमधून ही प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेचा भाग २ भरण्यास १६ जूनपासून सुरुवात झाली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अद्याप भाग १ देखील भरला नसल्याने शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया आजच्या आज पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
प्रवेशनिश्चिती आवश्यक
ज्या विद्यार्थ्यांची नावे इनहाऊस, अल्पसंख्याक व २५ टक्के बायोफोकल कोट्यासाठीच्या गुणवत्ता यादीत येतील, त्यांनी २८ व २९ जून रोजी पूर्ण शुल्क भरुन प्रवेश निश्चित करावा. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या मुदतीनंतर प्रवेश नाकारू शकतील. जे विद्यार्थी इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन व २५ टक्के बायफोकल कोट्याअंतर्गत प्रवेश निश्चित करतील, त्यांची नावे पुढील फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहेत. तसेच जे विद्यार्थ्यांचे गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकले नाही असे विद्यार्थी फेऱ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग २ भरणे पात्र राहतील.

होम सायन्सचे प्रवेश ऑफलाइन

नाशिक मनपा व देवळाली कॅम्प क्षेत्रातील सर्व प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, प्रवेशइच्छुक विद्यार्थ्यांनी nashik.11thadmission.net या वेबसाइटवर नोंदणी करणे व पसंतीक्रम अर्ज भरणे आवश्यक आहे. इन हाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन व २५ टक्के बायफोकल कोट्याच्या प्रवेशासाठीदेखील ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ व २ भरणे बंधनकारक आहे. केवळ एसएमआरके कॉलेजमधील होम सायन्स शाखेचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.

३५ पेक्षा कमी गुण असल्यास..
एसएससीशिवाय अन्य मंडळाच्या ज्या विद्यार्थ्यांना दहावीची उत्तीर्ण गुणपत्रिका प्राप्त आहे, परंतु एक किंवा दोन विषयांत ३५पेक्षा कमी गुण असतील अशा विद्यार्थ्यांनी बिटको कॉलेज, नाशिकरोड येथे आज (२७ जून) सकाळी ११.३० वाजता योग्य कागदपत्रांसह समक्ष भेटावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक अत्याचारानंतर बालकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या पाच वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याची संतापजनक घटना पिंपळगाव बसंवत येथील इस्लामपुरा भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीसह त्याच्या आईस अटक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी संशयितास चोप दिला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

या प्रकरणी लुकमान पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी भिकन पिंजारी (वय ४६) आणि त्याची आई अमिना पिंजारी (६४) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. संशयित आरोपी आणि फिर्यादी जवळच राहतात. लुकमान पिंजारी यांचा पाच वर्षीय मुलगा साहील शनिवारी (दि. २४) बेपत्ता झाला. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल होती. पोलिसांसह पिंजारी यांचे नातेवाईकदेखील साहीलचा शोध घेत होते. साहीलचा मृतदेह रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित आरोपी भिकनच्या घरात आढळून आला. यानंतर नातेवाइकांचा संताप अनावर झाला. त्यांनी भिकनला बेदम मारहाण केली. ही माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी भिकनला सोडवून त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत बोलताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले, की संशयिताने बालकावर लैंगिक अत्याचार केल्याचे पुरावे समोर आले आहेत. संशयिताने नाक व तोंड दाबल्याने साहीलचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. भिकनने केलेल्या गैरकृत्याची माहिती त्याच्या आईलादेखील होती. मात्र, तिने ही माहिती दडवून ठेवत पुरावे मिटवण्यासाठी भिकनला मदत केली. त्यामुळे तिलाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

जादूटोण्याचा संशय

संशयित आरोपी भिकनची पत्नी त्याच्या अशा उद्योगांमुळे निघून गेली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भिकन आपल्या आईबरोबर एकटाच राहतो. मद्य पिण्याची सवय असलेला भिकन आणि जादूटोणा करणारी त्याची आई, या दोघांनी काही तास साहीलच्या हत्येची घटना उघड होऊ दिली नाही. त्यामुळे या प्रकरणात जादूटोण्याचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त होतो आहे.

जवळच्या मामाकडून कृत्य

गादी पिंजून उपजीविका भागवणारी बरीच कुटुंबे इस्लामपुरा भागात राहतात. एकमेकांशी नातेसंबंध असल्याने सर्वांचे एकमेकांच्या घरी जाणे सहज होते. संशयित आरोपी भिकन हा साहीलचा जवळचा मामा लागत होता. ज्याने रक्षण करायचे, त्यानेच घात केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात सोमवारी चौघांचा बुडून मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणेबारीतील फैजा ओहळात पोहण्यासाठी उतरलेल्या दोघा इंजिनीअरिगच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२६) संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पिंपळगावजवळील मुखेड शिवारात दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी चंदू गहिरे (वय १४) व कार्तिक गहिरे (वय १२) हे आईसोबत सुनील कदम यांच्या शेततळ्याजवळून जात असताना दोघांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला.

संग्राम शिवाजी शिरसाठ (वय २३, रा. गंगापूररोड, नाशिक) आणि कौस्तुभ प्रमोद भिंगारदिवे (वय २६, रा. राहुरी, जि. अहमदनगर) अशी बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघे एनडीएमव्हीपी या इंजिनीअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. सोमवारी मित्रांसमवेत पहिणे येथे गेले होते. संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शिरसाठ आणि भिंगारदिवे पाण्यात उतरले. त्यांचे इतर मित्र काठावरच होते. पाण्याचा अंदाज न आल्याने एक मित्र बुडत असताना दुसरा मित्र मदतीला गेला. मात्र, दोघेही खोल पाण्यात बुडाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांचा खून, एकाची आत्महत्या

$
0
0

पिंपळगाव बसवंतमध्ये दोन वेगवेगळ्या घटना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-मुंबई महामार्गावरील पिंपळगाव बसवंत शहर सोमवारी खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी हादरून गेले. एका घटनेत बांधकाम मजुराने पत्नीसह साडूच्या मुलाचा खून करून नंतर स्वतःही आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत संशयित आरोपीने पाच वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचा खून केला. पहिली घटना अनैतिक संबंधांतून घडल्याचे समजते.

पिंपळगाव बसवंत येथील पवननगरमध्ये काही दिवसांपूर्वीच भाडेकरू म्हणून राहण्यास आलेल्या रवींद्र नागमल (वय ३५) याने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पत्नी सुरेखा रवींद्र नागमल आणि साडूचा मुलगा विशाल विजय पानपाटील (वय १०) यांची हत्या केली. तसेच नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. गवंडी काम करणाऱ्या नागमलजवळ आत्महत्येपूर्वी चिठ्ठी सापडली असून, पत्नीच्या साडूशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे हे कृत्य केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. रवींद्रने स्वतःच्या मुलाला काहीच केले नाही.

लैंगिक अत्याचार करून केला खून

दुसरी घटना इस्मालपूर परिसरात घडली. तेथील रहिवाशी लुकमान पिंजारी यांचा पाच वर्षीय मुलगा साहिल याचा मृतदेह रविवारी (दि. २५) रात्री संशयित आरोपी भिकन पिंजारी (४५) यांच्या घरात आढळून आला. संशयिताने मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याचे नाक-तोंड दाबले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी भिकनला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी भिकनला मदत करणारी त्याची आई अमिना पिंजारी (वय ६४) हिलाही अटक करण्यात आली. संशयित आरोपीचे कुटुंब जादूटोण्याचे काम करीत असल्याने पोलिस त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत.

लैगिंक अत्याचार करून अल्पवयीन मुलाचा खून करणाऱ्या संशयितासह त्याच्या आईविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, संशयित अटकेत आहे. दुसरी घटना अनैतिक संबंधामुळे घडल्याचे पुरावे समोर येत असून, मयताने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही सापडली आहे.

- विशाल गायकवाड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी डिप्लोमाधारक संतप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य कृषी शिक्षण परिषदेने कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळालेल्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षातील अभ्यासक्रमाचा परीक्षासक्तीचा निर्णय अचानक घेतल्याने कृषी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. या निर्णयास विरोध करण्यासाठी हे विद्यार्थी कृषी शिक्षण परिषदेवर मंगळवारी (२७ जून) मोर्चा काढणार आहेत.

कृषी अभ्यासक्रमात पदविकेचे शिक्षण पूर्ण करून पदवीस प्रवेश घेणारे विद्यार्थी थेट द्वितीय वर्षात प्रविष्ट होतात. पदविकेची अर्हता ते पूर्ण करीत असल्याने त्यांना पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमातून पूर्णत: सूट मिळते. यंदा मात्र अचानक कृषी शिक्षण परिषदेच्या वतीने या नियमाविरोधात जाण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भातील निर्णयाची प्रतही काही कृषी महाविद्यालयांमध्ये जाळण्यात आली.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रनिकेतन पदविकाधारकांना अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याची शासन निर्णयामध्ये तरतूद आहे. मात्र, ६ मे रोजी कृषी शिक्षण परिषदेने नवा शासननिर्णय काढला आहे. यानुसार थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रमाचा अतिरिक्त भार आता सहन करावा लागणार आहे.

या निर्णयावर विचारविनियम करण्यासाठी कृषी पदवीधर संघटनेच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत कृषी शिक्षण परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा मोर्चा मंगळवारी काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक महेश कडूस, संघटनेचे विद्यार्थी सेल प्रदेशाध्यक्ष प्रणव टोणपे यांनी दिली. बैठकीस प्रशांत घोलप, अक्षयकुमार देसाई, राजेंद्र मनकर, अक्षय दरंदले, मनोज कानवडे, गणेश सुडके, अभिजित शिंदे, काजल शिंदे, उत्कर्ष निकम, हर्षदा भदाणे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देहविक्री व्यवसाय प्रकरणी महिलेसह पाच जणांना कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

बिटको चौकातील सद््गुरू गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईतील पाच संशयितांना सोमवारी नाशिकरोड न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली.

पोलिसांनी बिटको चौकातील सद््गुरू गेस्ट हाऊसवर रविवारी दुपारी साडेचार वाजता छापा टाकून देहविक्रीचा अड्डा उद््ध्वस्त केला होता. या कारवाईत देहविक्रीचा अड्डा चालविणाऱ्या शैला गंगाधर शिंगाडे (वय ४५, रा. घर क्रमांक २३३३, बुधा हलवाईजवळ, संभाजी चौक, नाशिक) या महिलेसह गेस्ट हाऊसचा मॅनेजर राजू नारायण घुट्टे (वय २२, रा. कोनाराव पेठ, जि. करीमनगर (तेलंगणा), गोमान पांडेय कामी (वय २४, रा. भीमनगर, जेलरोड) या तिघांसह या देहविक्री अड्ड्यावरील गुरुमूर्ती यरय्या पुट्टी (वय ३९, रा. सीएचक्यू विंग स्टाफ, आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) व संदीप भाऊसाहेब दुधाळे (वय २७, रा. धोंगडे मळा, मुक्तिधाममागे, नाशिकरोड) या दोन ग्राहकांसह एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या पाच जणांना सोमवारी नाशिकरोड पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. देहविक्रीचा अड्डा सुरू असलेल्या सद््गुरू गेस्ट हाऊसचा मालक नरसीम मुल्लू प्रकाश जंगम (रा. गायकवाड मळा, रेजिमेंटल प्लाझामागे, नाशिकरोड) पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे. या छाप्यादरम्यान या गेस्ट हाऊसमध्ये देहविक्रीसाठी आणलेल्या चार महिलाही पोलिसांना आढळून आल्या होत्या. शैला शिंगाडे ही महिला देहविक्रीच्या व्यवसायासाठी प्रवृत्त करीत असल्याची माहिती या चार पीडित महिलांनी पोलिसांना दिली. उपनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक संध्या तेली यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत ही माहिती नमूद करण्यात आली आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कायद्यातील कलमांनुसार वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतःच रंगवा रेनकोट अन् छत्र्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चिखल, रेनकोट, छत्रीचे ओझे. पण या ओझ्याला जर कलरफूल करता आले तर...हे ओझेदेखील आपण एन्जॉय करू शकतो. यंदाचा पाऊस ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांसाठी असाच कलरफूल आणि आनंददायी करण्याच्या उद्देशाने कल्चर क्लब तर्फे येत्या रविवारी कॅलिग्राफी पेंटिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. २ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत हे वर्कशॉप होणार आहे.
आपल्या छत्रीवर किंवा रेनकोट वर तुम्ही स्वतः कॅलिग्राफी पेंटिंग करू शकता. त्यासाठीचे प्रशिक्षण या वर्कशॉपमध्ये देण्यात येणार आहे.
नाशिकचे प्रसिद्ध सुलेखनकार नंदू गवांदे हे छत्रीवर किंवा रेनकोटवर कॅलिग्राफी करण्याचे प्रशिक्षण देतील. या वर्कशॉपसाठी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची छत्री किंवा रेनकोट तसेच अॅक्रेलिक कलर, एक आणि दोन इंचाचा ब्रश, प्लास्टिकचा मग, रंग कालविण्यासाठी बाऊल, हात पुसायला कापड एवढे साहित्य बरोबर आणावयाचे आहे. या वर्कशॉपला कल्चर क्लबच्या सदस्यांना विनामूल्य प्रवेश आहे तर इतरांसाठी ३०० रुपये प्रवेश मूल्य ठेवण्यात आले आहे.
अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशनसाठी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधा - कमलेश ७०४०७६२२५४ किंवा ०२५३- ६६३७९८७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images