Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हर्षद सपकाळच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0

तक्रारदारांची संख्या १०च्या घरात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉलीवूडसह मराठी सिनेमांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरूण तरुणींना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयित हर्षद आनंद सपकाळच्या पोलिस कोठडीत २८ जूनपर्यंत वाढ करण्यात आली. एकास तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मुंबई नाका पोलिसांनी हर्षदला अटक केली होती.

शरद पाटील या व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार हर्षद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी फाटा येथे एका अलिशान भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारा हर्षद एजंट म्हणून काम करीत असल्याचे भासवत होता. या प्रकरणी २० जूनला अटक केल्यानंतर कोर्टाने त्यास २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले. हर्षदविरोधात आतापर्यंत जवळपास १० तक्रारदार पुढे आले आहेत. त्यात एका मोलकरणीचा देखील समावेश असून, अभिनेता रितेश देशमुख याच्या घरी कामाला लावून देतो असे सांगत त्याने तिच्याकडून २५ हजार रुपये उकळले आहेत. याबाबत बोलताना सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले, की संशयित आरोपीविरोधात इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा वेगळा गुन्हा दाखल आहे. सध्या तो मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात अटक असून, चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यातील चौकशी संपल्यानंतर त्याला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येरे माझ्या मागल्या...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या १४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाच्या आठवणी ताज्या असतानाच शनिवारी पुन्हा शहराला संततधार पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा शहराची दैना उडाली. पावसाळापूर्व कामांच्या ढिलाईमुळे शनिवारी पुन्हा ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज गायब झाली, तर अनेक ठिकाणी वृक्ष कोसळल्याने वाहतुकीवर त्याचा विपरित परिणाम झाला. पंचवटी, जुने नाशिक, भद्रकाली, सीबीएस, शालिमार, द्वारका, इंदिरानगर, सातपूर या ठिकाणी अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे वादानंतर प्रशासनाने घाईघाईत केलेल्या नालेसफाईचा कोणताही फायदा झाला नाही. अनेक भागात दिवसभर वीज गायब झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून, महावितरणच्या कामांचीही पोलखोल झाली. गेल्या वेळेपेक्षा पावसाचे प्रमाण कमी प्रमाणात असल्याने सराफ बाजारात काहीसी समाधानकारक स्थिती होती.

--

खंडित वीजपुरवठ्याचा ‘वार’

सिन्नर फाटा ः देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील विविध भागातील तब्बल सतरा वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा वेगवेगळ्या वेळेत खंडित राहिल्याने लाखो नाशिककरांना खंडित वीजपुरवठ्याचा ‘वार’ सहन करावा लागला. खंडित वीजपुरवठयाचे वेळापत्रक जाहीर केलेले असले, तरी बहुतांश ठिकाणी नियोजित वेळेपेक्षाही जास्त काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांचे हाल झाले. काही भागात तब्बल पाच तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिक बेहाल झाले महावितरणकडून प्रत्येक आठवड्याला वीजवाहिन्यांची दुरुस्ती का करावी लागते, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. वीजपुरवठ्यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी महावितरणने मोबाइल ऍपची सुविधा सुरू केलेली आहे. या सुविधेचा नागरिक वापर करीत आहेत.या पद्धतीने तक्रार केल्यानंतर नागरिकांना संबंधित कर्मचाऱ्याचा मोबाइल नंबर एसएमएसद्वारे कळविला जातो. मात्र, या मोबाइल नंबरवर संपर्क साधल्यास संबंधित कर्मचारी नागरिकांची तक्रार सोडविण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

---

औरंगाबाद नाक्यावर साचले पाणी

पंचवटी ः रस्ता तयार करताना पाण्याचा निचऱ्याची व्यवस्था केली नसल्याने औरंगाबाद नाका येथील रस्त्यावरच पाणी साचू लागले आहे. शनिवारी येथे साचलेल्या पाण्यातून वाहने चालविणे अवघड बनले होते. थोड्याशा पावसाने येथे पाणी साचत असल्यामुळे, तसेच वाहनचालकांना या पाण्याचा आणि खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे.

--

महात्मानगरला वृक्ष कोसळले

सातपूर ः परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या व घरात पावसाचे पाणी जाण्याच्या घटना शनिवारी घडल्या. जोरदार पावसामुळे महात्मानगर भागात चार ठिकाणी वृक्ष कोसळले. सुदैवाने हानी टळली. गणपती मंदिर, गुलमोहर कॉलनी, गंगापूररोड व नरसिंहनगर येथे पावसाने वृक्ष कोसळल्याचा घटना घडल्या. रस्त्यालगत झुकलेल्या वृक्षांच्या फांद्याही अग्निशमन दलाचे जवान व उद्यान विभागाने काढल्या. सातपूर अग्निशमन दलाच्या जवानांनी उद्यान विभागाच्या वतीने कोसळलेले वृक्ष हटविले. परिसरात ठिकठिकाणी साचलेले पाणी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून वाहते करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

--

सिडकोत रस्ते जलमय

सिडको ः परिसरात संततधार पावसाने हजेरी लावल्याने सिडकोतील सर्वच रस्ते जलमय झाले होते. महापालिकेच्या वतीने मागील आठवड्यातील गटारी व नाले साफसफाई झाल्याने पाणी साचण्याचे प्रमाण काहीसे कमी होते. महापालिकेच्या बांधकाम विभागाने विविध भागात साचलेले पाणी काढण्याचे काम सकाळपासूनच केल्याचे दिसून आले. बांधकाम विभागाच्या वतीने उंटवाडी येथील नंदिनी पुलाजवळ, गोविंदनगर, मनोहरनगर, आनंदनगर या ठिकाणी साचलेले पाणी काढण्याचे काम सुरू होते. इंदिरानगर भागात सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. कलानगर, चार्वाक चौक या मुख्य वर्दळीच्या चौकांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.

--

गंगापूर धरण समूहात मात्र भर
मान्सूनच्या पावसाचे जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच आगमन झाले असले, तरी शनिवार खऱ्या अर्थाने पावसाचा ठरला. नाशिककरांची सकाळ उजाडली तेव्हा पावसाची संततधार सुरूच होती. ना ढगांचा गडगडाट. ना विजांचा कडकडाट. पावसाच्या संततधार सरींनी केवळ शहरातच नव्हे, तर बहुतांश ग्रामीण भागातही दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असले, तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाणी पातळी वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

--

अनेकांनी लुटला पावसाचा आनंद

शहरात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत शहरात ५४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी औद्योगिक वसाहतींमधील कामगार, तसेच सरकारी कार्यालयांना सुटी असल्याने अनेकांनी कुटुंबीयांसमवेत पावसाचा आनंद लुटला. शहरातील बहुतांश भागात दिवसभर विजेचा खेळखंडोबा झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. नाशिक तालुक्यात ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉफिट बुकिंगला चाप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शेतीखालील वहिवाटी जमिनीसाठी अकृषक परवाना मिळविण्यासाठीच्या निकषांतील क्लिष्टता राज्य सरकारने पूर्णतः दूर करण्यास मंजुरी दिली आहे. अकृषक करण्याबाबतची प्रक्रिया जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्ये दुरुस्ती करून शिथिल केल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली असून, अकृषक परवाना मिळविण्यासाठी एजंटांच्या जाचातूनही सुटका झाली आहे. यलो झोनमधील जमिनी अकृषक करण्यासाठीचा कर भरणा केल्याची पावतीच अकृषक दाखला मानली जाणार असून, त्यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची यापुढे कोणतीही गरज राहणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी शुक्रवारी येथे दिली. यावेळी उपायुक्त रघुनाथ गावडे, सहाय्यक आयुक्त उन्मेष महाजन, तहसीलदार मंजूषा घाटगे आदी उपस्थित होते.

मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र या केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या धोरणांच्या अनुषंगाने नवीन उद्योग व प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या जमिनी अकृषक करण्यासाठी कोणतीही अडचण अथवा पूर्वपरवानगीची अट नसावी, या दृष्टीने शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मध्ये सुधारणा केली असून, विविक्षित क्षेत्रातील जमिनी अकृषक करण्यावरील निर्बंध अधिक सुलभ केले आहेत.

--

नागरिकांचे दिव्य टळणार

अकृषक दाखला मिळविण्यासाठी नागरिकांनी मोठे दिव्य पार करावे लागत होते. शेतजमिनीचा व्यावसायिक अथवा औद्योगिक कारणासाठी वापर करण्यासाठी अकृषक परवाना आवश्यक असतो.त्यासाठी अनुभवी वकिलामार्फत गेल्या ३० वर्षांच्या फेरफार नोंदींच्या आधारे सर्च रिपोर्ट तयार करावा लागत असे. याशिवाय शासनाच्या विविध १८ विभागांचा ना हरकत दाखला मिळवावा लागत असे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी जात असे. शिवाय एजंटगिरीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत असे. परंतु, आता नवीन सुधारणांमुळे शहर विकास आराखडे अथवा प्रादेशिक योजनांमधील यलो झोनमधील जमिनींचा अकृषक कर भरला, की संबंधित जमीन अकृषक होणार आहे. त्यासाठी शासनदरबारी इतर कोणत्याही स्वरुपाचा अर्ज सादर करावा लागणार नाही. अकृषक कराव्यतिरिक्त अकृषक कराच्या पाच पट रुपांतरण करही भरावा लागणार आहे. या सुधारणेमुळे अवघ्या एका दिवसात यलो झोनमधील जमीन अकृषक होणार आहे. औद्योगिक कारणासाठी जमिनीचा वापर करावयाचा असेल तर ३० दिवस आगोदर तहसीलदारांना नोटीस द्यावी लागणार आहे. या कालावधीनंतर सदरची जमीन आपोआप अकृषक जमिनीत रुपांतरित होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व बांधकाम परवाने मात्र मिळवावे लागणार आहेत.

--

जमीन खरेदीत येणार सुलभता

प्रादेशिक योजना अथवा शहर विकास योजनेतील, वतन, आदिवासींच्या व शासनाच्या (वर्ग दोनच्या) जमिनीही आता शेतकरी नसलेल्यांनाही खरेदी करता येणार आहेत. मात्र, या जमिनींचा पाच वर्षांत वापर केला पाहिजे. त्यासाठी बाजारमूल्याच्या २ टक्के कर भरून एकदा मुदतवाढ मिळविता येणार आहे. मात्र, एकदा मुदतवाढ मिळूनही संबंधित जमिनीचा वापर न झाल्यास अशी जमीन मूळ शेतकऱ्याला पुन्हा मिळणार आहे. या बदलामुळे जमिनी खरेदीतील प्रॉफिट बुकिंगला आळा बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, धर्मादाय संस्था, कंपन्या यांनाही आता अशा जमिनी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आदिवासींची जमीन शेतीसाठी खरेदी करता येणार नाही. खऱ्याखुऱ्या अौद्योगिक वापरासाठी मात्र खरेदी करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपादित क्षेत्राचा लागला हिशेब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामासाठी भूसंपादनादरम्यान पळसे येथील शेतकरी संजय डहाळे यांच्यावर भूमी अभिलेख खात्याकडून झालेल्या अन्याय दूर झाला असून, या शेतकऱ्यास त्याच्या अधिग्रहित संपूर्ण जमिनीचा मोबदला मिळण्याचा मार्गही मोकळा आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची चोरीला गेलेली जमीन अखेर सापडली आहे. या अन्यायाला गेल्या वर्षी ‘मटा’ने सर्वप्रथम वाचा फोडली होती.

नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० च्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी जमिनीचे भूसंपादन २००९ पासून सुरू होते. या भूसंपादन प्रक्रियेत पळसे गावाच्या शिवारातील संजय डहाळे या शेतकऱ्याच्या सहा गुंठे जमिनीचे संपादन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या मालकीच्या गटातील चौदा गुंठे क्षेत्र कमी झाल्याचा त्यांचा दावा होता. आठ गुंठे क्षेत्र संपादन करावयाचे राहून गेल्याने संजय डहाळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तशी तक्रारही त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणकडे केली होती. परंतु, भूमी अभिलेख विभागाचा तसा दाखला असेल, तरच त्यांचा दावा मान्य केला जाणार होता. त्यामुळे संजय डहाळे यांनी नाशिकच्या भूमी अभिलेख विभागाकडेही आपले अधिग्रहित क्षेत्र पुन्हा मोजून देण्याची मागणी केली होती.

--

भूमी अभिलेखची दिरंगाई

संजय डहाळे यांच्या नाशिकच्या भूमी अभिलेख विभागाकडे आपले क्षेत्र मोजून देण्याच्या केलेल्या विनंतीला कचऱ्याची पेटी दाखविण्यात आली होती. त्यामुळे वैतागलेल्या संजय डहाळे यांनी या भूसंपदनावर मनाई हुकूम मिळविला होता. परिणामी महामार्गाचे काम पळसे येथे रखडले होते. यासंदर्भात ‘मटा’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच हा प्रश्न मार्गी लागला. भूमी अभिलेख विभागाने तत्काळ त्यांच्या क्षेत्राची मोजणी केल्याने संजय डहाळे यांचे संपादनाचे राहून गेलेले आठ गुंठे क्षेत्र संपादनाचे काम पूर्ण झाले आहे.

---

माझी १४ गुंठे जमीन नाशिक-पुणे महामार्गासाठी संपादित झाली होती. मात्र, कागदोपत्री केवळ सहा गुंठेच नोंदविली गेली होती. या प्रकरणाची दखल ‘मटा’ने घेतल्याने माझ्या अतिरिक्त संपादित क्षेत्राचा हिशेब अखेर लागला असून, या क्षेत्राची खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. या क्षेत्राचा महत्तम मोबदलाही निश्चित झाला आहे.

-संजय डहाळे, शेतकरी, पळसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड देवळाली बँकेसाठी आज मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडची अर्थवाहिनी असलेल्या नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक आज, रविवारी (दि. २५) होत असून, सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवारी (दि. २६) जेलरोड येथील के. एन. केला हायस्कूलमध्ये सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. सायंकाळी सहापर्यंत निकाल लागेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ कऱ्हे, सहाय्यक अधिकारी एस. पी. कांदळकर आणि एम. डी. परदेशी यांनी दिली.

मतदार सत्ताधारी सहकार पॅनललाच पुन्हा सत्ता देणार, की विरोधी श्री व्यापारी पॅनल परिवर्तन घडविणार हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार पॅनलने सलग दोन टर्म सत्ता मिळविल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. २०१२मध्ये साली त्यांचे २२ पैकी १६ संचालक विजयी झाले होते. यंदा नवीन नियमानुसार २१ संचालक आहेत. विरोधी श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, हेमंत गायकवाड करीत आहेत. गेल्या वेळी या पॅनलला सहा जागा मिळाल्या होत्या. पारदर्शी कारभार आणि बँकेची केलेली चौफेर प्रगती यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा दावा सहकारने केला आहे. तर, प्रगतीचा खोटा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा पराभव करून बँकेत यंदा नक्कीच परिवर्तन घडवू, असा दावा व्यापारी पॅनलने केला आहे.

--

२१ जागांसाठी ४९ उमेदवार

२१ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. बँकेचे सभासद ६५ हजारांवर, तर मतदार ६१ हजार आहेत. मतदार हे प्रामुख्याने नाशिक व सिन्नरमध्ये आहेत. मतदानासाठी एकूण ११० बूथ असून, आठशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रमुख मतदान केंद्रे- नाशिकरोड- मनपा शाळा १२५, देवळालीगाव- आनंदऋषीजी शाळा, जेलरोड- के. एन. केला शाळा, उपनगर- मनपा शाळा १०८, चेहेडी-मनपा शाळा ७९, सिडको- हिरे विद्यालय, इंदिरानगर- विवेकानंद विद्यालय, नाशिक- व्ही. एन. नाईक कॉलेज, देवळाली कॅम्प- कॅन्टोन्मेंट शाळा, भगूर- जि. प. शाळा, सिन्नर- मविप्रचे वाजे विद्यालय.

--

प्रतिष्ठा पणाला

महिनाभरात दोन्ही पॅनलने नाशिक व परिसर पिंजून काढला. सोशल मीडियासह हायटेक टेक्नॉलॉजीचा प्रचारासाठी वापर केला. टीम्स तयार करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. सहकारचे नेते दत्ता गायकवाड शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, तर व्यापारी पॅनलचे नेते विजय करंजकर विद्यमान जिल्हाप्रमुख आहेत. या दोन्ही ‘वाघां’नी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. करंजकर यांनी पत्नीला उमेदवारी मिळवून दिली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप सहकारच्या व्यासपीठावर दिसले, तर आमदार योगेश घोलप प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत. मतदान शांततेत पार पडण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज चंद्रदर्शन झाल्यास उद्या रमजान ईद

$
0
0

सामूहिक नमाजपठणासाठी ईदगाह मैदान सज्ज

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

इस्लामिक कालदर्शिकेच्या नियमाप्रमाणे नववा रमजान महिना आज, रविवारी (दि. २५) संपत असून, सोमवारी (दि. २६) दहावा महिना शव्वालचा प्रारंभ होत आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मुस्लिमबांधव ईद-उल-फित्र अर्थात, रमजान ईद साजरी करतात. मात्र, जेव्हा ईदचा उल्लेख होतो तेव्हा चंद्रदर्शनाचादेखील उल्लेख हमखास होतो. त्याप्रमाणे आज सायंकाळी चंद्रदर्शन घडल्यास सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे.

ईद-उल-फित्रच्या सामूहिक नमाजपठणासाठी शहरातील ऐतिहासिक शहाजहाँनी ईदगाह मैदान सज्ज करण्यात आले आहे. त्याप्रमाणे नाशिकरोड भागातील देवळालीगाव व देवळाली कॅम्पमधील ईदगाह मैदानेदेखील सज्ज करण्यात आली असून, या मैदानांवर हजारो मुस्लिमबांधव सामूहिक नामजपठणासाठी एकत्र येतात. त्यानंतर गळाभेट घेऊन परस्परांना शुभेच्छा देतात. मित्र, आप्तेष्ट परस्परांना शिरखुर्मा खाण्यासाठी आग्रहाने निमंत्रित करतात. याद्वारे तसेच इफ्तार पार्टीमुळे परस्परांत बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत होते. सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी ईद महत्त्वाची भूमिका निभावते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसलेला बाजार पुन्हा काढणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशावरून भंगार बाजार जमिनदोस्त केला होता. मात्र तेथे पुन्हा भंगार बाजार वसलेला आहे. कारवाई करून अनेक महिने उलटले तरी बाजार जैसे थे अाहे असा आरोप नगरसेवक दिलीप दातीर यांनी केला आहे. त्यामुळे स्वच्छता मोहिमेसाठी आलेले महापालिकेचे अतिरिक्त उपायुक्त किशोर बर्डे, आरोग्य अधिकारी डॉ. बुकाणे यांसह अधिकाऱ्यांनी बाजाराची पहाणी केली. त्यामुळे लवकरच आयुक्तांच्या आदेशाने भंगार बाजारात दुकाने थाटलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
रात्रीच खाली होतात ट्रक

भंगार बाजार न्यायालयाच्या आदेशाने हटविण्यात आला असला, तरी व्यवसाय मात्र आजही तेजीत सुरू आहे. दररोज रात्री चोरीच्या मालाचे तब्बल दहा ट्रक भंगार बाजारात खाली होत असतात. तसेच संबंधित स्टील व्यावसायिक रात्रीतून माल आपल्या गोडाऊनमध्ये नेतात. याबाबत महापालिका, पोलिस प्रशासन व नगरसेवकांना देखील माहिती आहे. परंतु प्रशासनाला लाखो रुपयांचा हप्ता मिळत असल्याने संबंधित स्टील चोरी करून विकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. पोलिस आयुक्तांनीच याकडे लक्ष घालावे, अशी मागणी केली आता जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईतील मराठा मोर्चासाठी सूक्ष्म नियोजनावर भर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सकल मराठा समाजातर्फे मुंबई येथे काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी शनिवारी नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुंबईत ९ ऑगस्टला काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे जिल्ह्यातील सहभागाची सूक्ष्म नियोजन, आणि मोर्चाबाबत आखणी करण्यात आली. त्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विविध समित्यांचे गठण करण्यात येणार आहे. तालुका, गाव आणि विभागानुसार बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

नांदूर येथील वरदलक्ष्मी लॉन्स येथे झालेल्या बैठकीत करण गायकर, उमेश शिंदे, संतोष माळोदे, गणेश कदम, शिवाजी मोरे, संदीप लभडे, सागर माळोदे आदींनी सूचना मांडल्या. ग्रामीण भागातील बैठकींच्या नियोजनाची जबाबदारी उमेश शिंदे, संतोष माळोदे, विलास जाधव यांच्यावर तर शहरी भागाची जबाबदारी योगेश नाटकर, विशाल कदम, संदीप लभडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा समिती, तालुका समिती, शहर समिती गठीत करून त्यांना पुढील नियोजनात काय काम करायचे आहे हे ठरविण्यात येणार आहे. गावा-गावातील बैठकांच्या तारखा, वेळा, ठिकाण निश्चित करूनच त्या घेण्यात याव्यात. मोर्चाचा प्रचार आणि प्रसार योग्य पद्धतीने आणि परिणामकारक व्हावा यासाठी गावात, तालुक्याच्या चौकात बॅनर, होर्डिंग लावण्यात यावेत. तसेच वाहनांवर स्टिकर चिटकविण्यात यावेत. त्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करणे, प्रसिद्धी, वाहतूक अशा विविध समित्यांची नेमणूक करण्याची तयारी या बैठकीत करण्यात आली.

दोन जुलैला बैठक

नियोजनासाठी २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरद लक्ष्मी लॉन्स येथे जिल्हास्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्यात झालेल्या कामांचा आढावा तसे पुढे करण्याचे कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थीसुरक्षेला शाळांमध्ये धक्का पोहोचू नये यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने गेल्या वर्षी दिले होते. मात्र, अद्याप हा निर्णय कागदावरच असून, त्याची अंमलबजावणी अत्यल्प शाळांमध्ये झाली असल्याचे समोर आले आहे. सर्व व्यवस्थापनाच्या पाचशेहून अधिक शाळा आहेत. त्यातील निम्म्या शाळांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. महापालिका शाळा अद्याप सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रक्रियेत आहेत. ग्रामीण भागातील शाळा मात्र अद्यापही विद्यार्थी सुरक्षेबाबत उदासीन असल्याचे चित्र नाशिकमध्ये आहे.

गेल्या वर्षी दादर येथील एका शाळेत चौथीतील मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्यातील शाळांमधील विद्यार्थी सुरक्षा हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावर तातडीने प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले. जोपर्यंत हा विषय चर्चेत होता तोपर्यंत स्थानिक स्वराज्य शाळा व इतर शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याविषयी मोठ्या चर्चा रंगल्या. नियोजन करण्यात आले. परंतु, जसजसे दिवस सरले विद्यार्थीसुरक्षा पुन्हा दुर्लक्षित झाली. शहरातील परिस्थिती बरी असली, तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मात्र शाळांनी गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. जिल्ह्यातील शाळांमध्ये सीसीटीव्हीचे प्रमाण अत्यल्प आहे.

--

१८२ शाळांमध्ये सीसीटीव्ही

शहरात २२३ खासगी शाळा असून, १८२ खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान, तालुका स्तरावर परिपत्रक काढून सूचना देण्यात येणार आहेत. निधीबाबत अडचणी असून, निधी उपलब्ध करून घेऊन मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या असल्याची प्रतिक्रिया माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदाचा प्रभारी पदभार सांभाळत असलेल्या नितीन उपासनी यांनी दिली.

--

जुलैअखेर मनपा शाळांमध्ये कॅमेरे

नाशिकमध्ये महापालिकेच्या १२८ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली. प्रतिशाळा तीन याप्रमाणे हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. जुलैअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व शिक्षा अभियानाच्या उपलब्ध तरतुदीतून शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक, इगतपुरीला झोडपले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहर आणि तालुक्यात शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस झाला. या मोसमातील हा पहिलाच दमदार पाऊस असल्याने शेतकरी सुखावला आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या भाताची पुनर्लागवड (आवणी) सुरू होण्यास मदत होणार आहे. शनिवारी दिवसभरात १२० म‌ि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून पावसाच्या आगमनासाठी डोळे लावून बसलेल्या ञ्यंबक शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने भाविकांची तारांबळ उडाली. शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग सुट्यांचा हंगाम आल्याने दर्शनार्थी भाविकांची संख्या वाढलेली आहे. शहरात गर्दी असतांना पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. वाहनांची दाटी त्यात अशी बिकट परिस्थिती झाल्याने भाविकांना मंदिर परिसरातून मार्ग काढणे अवघड झाले होते. त्र्यंबक पालिकेने यावर्षी नालेसफाई प्रभावीपणे केलेली नाही याचा परिणाम गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आलेले सर्वत्र पहावयास मिळाले आहे.
त्र्यंबक तालुका दुर्गम भागात विस्तारलेला आहे. घाटमाथ्याचे आणि वळणावळणांचे रस्ते यामध्ये दरडी कोसळण्याचा धोका असतो. गतवर्षी पावसाळ्यात हरसुल घाटात बिकट गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. सार्वजनीक बांधकाम विभागाने वर्षभर याकामाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान यावर्षी देखील तालुक्यातील पुलांची आणि रस्त्यांची परिस्थिती पाहणी सांगण्यास टाळाटाळ केली आहे. प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन बैकठीत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या बैठकीस जबाबदार पदावर असलेले अधिकारी गैरहजर होते. यावर्षी रस्ते आणि पुलांबाबत काही प्रसंग उद्भवल्यास संबंध‌ति अधिकाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाईचे संकेत आहेत.

घोटीत जोरदार सलामी
घोटी : गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून इगतपुरी तालुक्यात जोरदार हजेरी लावली. शनिवारी दिवसभरात अधूनमधून मुसळधार, त्यानंतर संततधार पावसाने घोटीसह इगतपुरी तालुक्याला झोडपले. या पावसाने दारणा, भाम, वाकी या नद्या प्रवाहित झाल्या आहेत. शुक्रवारी घोटी शहराचा आठवडे बाजार असूनही पावसाळी साहित्याच्या खरेदीसाठी भर पावसातही ग्राहकांची झुंबड उडाली.

निफाड परिसरात संततधार पाऊस
निफाड ः शनिवार निफाड परिसरात दुपारपासून संततधार पावसाने हजेरी लावली. दहा दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील काही गावात पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले होते. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून कडक उन्हाने निफाडकरांना घाम फोडला होता. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उष्मा आणि ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी बारा वाजता संततधार पावसास सुरुवात झाली. निफाड, जळगाव, कोठूरे, दावचवाडी या गावात हा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून तालुक्यावर विशेष कृपा असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यातच शनिवारच्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील उकाडा वाढला होता. मात्र शनिवारच्या पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काठेगल्लीत घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरदिवसा बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी लाकडी कपाटात ठेवलेले सुमारे दोन लाखाचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरी केल्याची धक्कादायक बाब काठेगल्लीतील घोडेबाबानगर भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब लक्ष्मण जाधव (वय ४८, रा. राजकमल रेसिडन्सी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. जाधव कुटुंबिय गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घराबाहेर पडल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लाकडी कपाटातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिणे, महत्त्वाची कागदपत्रे आणि नामको बँकेच्या लॉकरची चावी असा सुमारे दोन लाख तीन हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लोखंडे करीत आहेत.

सिडकोत घरफोडी

सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरातील घर फोडून चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. त्यात सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली संदीप चोथवे (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यांच्या तक्रारीनुसार चोथवे कुटुंबिय १४ ते २३ जूनदरम्यान बाहेरगावी गेले होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मागचा दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच, लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे, रोख रक्कम आणि कॅमेरा असा ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला.

युवतीची आत्महत्या

ग्रामीण पोलिस दलाच्या वसाहतीत राहणाऱ्या एका महाविद्यालयीन युवतीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. युवतीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूजा मारूती मेमाणे (वय १९, रा. रूम क्रमांक १०, पोलिस मुख्यालय, नाशिक ग्रामीण) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी तीने आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये अज्ञात कारणातून ओढणीने गळफास लावून घेतला होता. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे ‘मिशन प्लास्टिकमुक्ती’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने प्लास्टिकमुक्त नाशिक शहर करण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी आता होलसेल व्यापाऱ्यांवरच पाळत ठेवून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यापाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरीत प्लास्टिकमु‍ळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी गोदाघाटाच्या परिसरात सीएसआर फंडातून कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने आठवडाभर राबविलेल्या मोहिमेत ८५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून, ४३ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

इंदूरच्या धर्तीवर शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्लास्टिक कॅरिबॅग व्यवस्थापन व हाताळणी समितीची बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे आदी उपस्थित होते. शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची सर्रास विक्री होत आहे. आरोग्य विभागाकडून कारवाई होत असली, तरी त्याचा वापर थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत या व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. शहरात होलसेल दुकानदारांकडूनही मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथकांची संख्या वाढविली जाणार आहे.प्लास्टिकच्या वापरकर्त्यांवर दंडात्मक कारवाईबरोबरच जनजागृतीच्या पर्यायावर विचार सुरू आहे. गोदावरी परिसरात नो प्लास्टिक झोन जाहीर करण्याची मागणी करण्यात आली असून, त्याच्यावरही प्रशासनाकडून विचार केला जात आहे. गोदाकाठावर प्लास्टिक बंद करून तेथे सीएसआर फंडातून कागदी पिशव्या वाटप करण्याचेही नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. प्लास्टिक कॅरिबॅग व्यवस्थापन व हाताळणी समितीची स्थापना विभागीय पातळीवर व्हावी, त्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्याचा प्रस्ताव निशिकांत पगारे यांनी मांडला. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

--

८५ किलो प्लास्टिक जप्त

महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. दुकानदाराकडे पहिल्यांदा ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास पाच हजारांचा दंड करण्यात येत आहे. दुसऱ्यांदा १०, तर तिसऱ्यांना २५ हजारांचा दंड आणि तीन महिन्यांची शिक्षा, असा दंड केला जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या आठवडाभर राबविलेल्या मोहिमेत आतापर्यंत ८५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून, संबंधितांकडून ४३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या तीन महिन्यांपासून तारुखेडले (ता. निफाड) येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. पावणेतीन महिन्यांपासून बिबट्याला पकड्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला होता.

तारुखेडलेत दि. ३ एप्रिल २०१७ रोजी शरद जगताप यांच्या शेतात मजुरी करणारे अशोक हांडगे यांची मुलगी गुड्डी (वय ५) ही सायंकाळी सातच्या दरम्यान खेळत असताना गव्हाच्या शेतात दबा धरून बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले होते. या घटनेमुळे तारुखेडले व परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. या घटनेची दखल घेत येवला वन विभागाने जगताप यांच्या शेताजवळच राजेश संपतराव सांगळे यांच्या शेतात बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. या पावणेतीन महिन्याच्या कालखंडात बिबट्यांकडून तारुखेडलेत शेळ्या, कुत्रे, कोल्हे यांचा फडशा पाडण्याचा उद्योग चालूच होता. शिवाय शेतकऱ्यांना अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत होते. अखेर शनिवारी (दि. २४) राजेश सांगळे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेला नर बिबट्या असून, त्याचे वय चार ते पाच वर्षे आहे. येवला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल पी. एस. पाटील, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख आदींनी जेरबंद बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरेंचा आज शेतकऱ्यांशी संवाद

$
0
0

पिंपळगाव, निफाडमध्ये देणार भेट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफीची घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेची आक्रमकता कायम राहणार आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या भाजपचा हिरमोड होणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचा २५ जून रोजीचा नियोजित नाशिक आणि नगरचा दौरा पूर्ण होणार आहे. रविवारी उद्धव ठाकरे जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांची भेट घेणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी शिवसेनेने आक्रमक कर्जमाफीच्या घोषणेनंतरही कायम आहे. भाजपकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीवरून सरकार दरबारी खेळल्या जात असलेल्या राजकारणाला शह देण्यासाठी शिवेसना रस्त्यावर उतरली होती. त्याचाच भाग म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २५ जूनपासून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौऱ्यावर निघणार होते. त्यापार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा करून या दौऱ्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या घोषणेमुळे उद्धव ठाकरेंना दौरा रद्द करावा लागेल अशी भाजपच्या गोटात अपेक्षा होती. परंतु उद्धव ठाकरेंचा नियोजित नाशिक दौरा होणार असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे. ठाकरे नियोजित दौऱ्यानुसार रविवारी सकाळी १० वाजता नाशिकला येणार आहे. त्यांच्या दौऱ्यात पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. पिंपळगाव, निफाड, येवला येथील शेतकऱ्यांशीही ते संवाद साधणार आहे.

शिवसेना पुन्हा आक्रमक होणार असल्याचे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून दिसत आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे कोणतीही सभा न घेता शेतकऱ्यांच्या समस्या जाणून संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात शिवसेनेचे पदाधिकारीही बाजूला असतील असे नियोजन आमदार अनिल कदम यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये नव्या नोटांचे घबाड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड- मालेगाव मार्गावर मालेगाव चौफुलीनजीक इनोव्हा कारमधून एक कोटी ९७ लाख रुपयांच्या नवीन नोटा शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी जप्त केल्या असून, महादेव मार्कंड व मोहन शेलार (दोघेही रा. कात्रज, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वीच मालेगावमध्ये ८३ लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्यानंतर मनमाडमध्ये नव्या नोटा पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन कोटी रुपये जमीन व्यवहाराशी संबंधित असून, पुण्याच्या एका सेवाभावी ट्रस्टचे असल्याचे व मालेगावहून नगरकडे नेले जात असल्याचे संशयितांनी सांगितले आहे.

नाशिकच्या प्राप्तिकर विभागाच्या सहकार्याने पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक सपकाळे व त्यांच्या पथकाने या नोटा पकडल्या. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री मनमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक सपकाळे व त्यांचे सहकारी ए. एच. शेख मनमाड-मालेगाव चौफुलीवर नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. मालेगावकडून नगरकडे जाणारी एमएच १२/ डीवाय ५७३६ या इनोव्हा कारची तपासणी केली असता एका बॅगेत सुमारे १ कोटी ९७ लाख रुपयांच्या नवीन नोटा आढळून आल्या. यात दोन हजार व पाचशेच्या नोटांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेतले असून, रात्रीच मनमाड अर्बन बँकेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नोटांची तातडीने मोजणी करण्यात आली.

रक्कम सेवाभावी ट्रस्टची; संशयितांचा दावा

पोलिसांनी ताब्यात घेतलेली १ कोटी ९७ लाखांची रक्कम पुणे येथील एका सेवाभावी ट्रस्टची असल्याचे संशयितांनी सांगितले. मालेगाव येथे जमीन व्यवहार फिस्कटल्याने पुन्हा नगरमार्गे पुण्याकडे ही रक्कम घेऊन जात असल्याचे संशयितांचे म्हणणे आहे. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी चौकशी करीत असून, या रकमेची सत्यता पडताळून पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरीच्या गुन्ह्यात आठ संशयित जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या विविध भागात चोऱ्या करणाऱ्या टोळीला सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून अनेक हत्यारे, चोरीच्या मोटरसायकली, मोबाइल असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आठ जणांच्या या टोळीमध्ये चार मुले अल्पवयीन असून, सर्व संशयित हे पंचवटी परिसरातील रहिवासी आहेत.

पंकज नरेंद्र टोंगारे (वय २१, रा. मोरेमळा, पंचवटी), प्रतीक गणेश धात्रक (वय २१, रा. गंगावाडी, रविवार पेठ), जितेंद्र रवींद्र शेटे (वय २०, रा. घासबाजार) आणि रवि अण्णा उगले (वय २२, पंचवटी) अशी या संशयितांची नावे आहेत. या चौघांसह आणखी चार अल्पवयीन मुलांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरकारवाड पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे पथक विसे मळा परिसरात गस्त घालत असताना दोघे जण संशयास्पदरित्या हालचाली करीत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना अडवून झडती घेतली असता या टोळीचे भिंग फुटले. पोलिसांना संशयितांकडे मोटरसायकल व धारधार शस्त्र मिळून आले. पोलिसांनी या दोघांकडील मुद्देमाल जप्त केला. तसेच, त्यांच्याकडून इतर साथिदारांची माहिती मिळवली. त्यांच्या टोळीतील इतर सहा जणांना अटक करीत त्यांच्या घराच्या झडती घेत पोलिसांना सात कोयते, एक चॉपर, एक चाकू आणि चोरीचे १४ मोबाइल आणि चार मोटरसायकल असा सुमारे दोन लाख ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमध्ये गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव, भालेराव, पळशिकर, वाघमारे, मरकडे, शेळके, संगम जगदाळे, भोये आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध धंदे रडारवर

$
0
0

ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक कार्यान्वित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी विशेष पथकाची निर्मिती केली आहे. या पथकाच्या मदतीने शुक्रवारी (दि.२३) त्र्यंबकेश्वर येथे छापा मारण्यात आला. नऊ जुगाऱ्यांना अटक करीत पोलिसांनी साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक पोलिसांना या कारवाईची कल्पना नव्हती हे विशेष.

स्थानिक पोलिसांना या कारवाईची कुठलीही कल्पना न देता हा छापा टाकण्यात आल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोलिसांच्या साटेलोट्यामुळे अवैध धंदे सुरू आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक दराडे यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. यासाठी खास पथकांची निर्मिती करण्यात आली असून, सहाय्यक निरीक्षक पळे यांच्या पथकाने कारवाईस प्रारंभ केला आहे. शुक्रवारी पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक कैलास शिरसाठ, दत्तात्रेय कराळे व संकेत कासार या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून त्र्यंबकेश्वर येथील हॉटेल राधाकृष्ण परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला.

या कारावाईत जुगार अड्ड्याचा मालक समाधान नथू वाकसरे, देवीदास निवृत्ती कानकाटे, ज्ञानेश्वर बाळू सोनवणे, धोंडीराम तुळशीराम गुंड, संतोष खंडू निकम, समाधान खंडू आहेर, आनंदराव गेंदा देशमुख, सुकदेव काळू आहेर, नामदेव रामभाऊ चव्हाण आदींना अटक करण्यात आली. संशयित पिपंरी, अंजनेरी, तळवाडे व पिंपळद येथील रहिवासी आहेत. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी आणि चारचाकी वाहने असा सुमारे ८ लाख ५२ हजार २५० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. दरम्यान, अशाच प्रकारची कारवाई जिल्ह्याच्या इतर भागात होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

कठोर कारवाईचे संकेत

ग्रामीण भागातील अवैध धंद्यांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. यामुळे धाडसत्र संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, यात स्थानिक पोलिसांचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विहितगाव येथील ईश्वर दशरथ हांडोरे (वय ४०) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. उपनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने, तसेच डोक्यावर कर्जही असल्याने निराश झालेल्या हांडोरे यांनी बुधवारी दुपारी शेतात विष प्राशन केले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हांडोरे यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव ठाकरेंची सरकारला पुन्हा धमकी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, तर राजकीय भूकंप होईल, असा इशारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ऐतिहासिक कर्जमाफीच्या घोषणेनंतरही सरकारला धमकावलं आहे. अर्थात, यावेळी त्यांची मागणी वेगळी आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याचं दिसलं तर या सरकारचं काय करायचं ते मी बघून घेईन, असं त्यांनी ठणकावलं आहे. तसंच, सरकारचा कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नसल्याची टीकाही त्यांनी केलीय.

नाशिकच्या पिंपळगावात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या संवाद यात्रेला सुरुवात केली. त्यावेळी, राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल ते काय बोलतात, याबद्दल उत्सुकता होती. कारण, कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांचे आभार मानले होते. तसंच, शिवसेनेच्या मंत्र्यांसमोरच कर्जमाफीचा निर्णय झाला होता. त्यामुळे या घोषणेबद्दल उद्धव सरकारची पाठ थोपटतील, अशी आशा होती. परंतु, त्यांनी वेगळाच सूर लावला. आंदोलक शेतकरी आणि शिवसेनेमुळेच कर्जमाफीचा निर्णय झाला, असं श्रेय त्यांनी घेतलं, पण या कर्जमाफीमुळे संपकरी शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळणार नसल्याचंही ते म्हणाले.

'सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना काहीही लाभ झालेला नाही. शेतकऱ्यांच्या मनात असंतोष आहे. सरकारने २०१६ ऐवजी २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना दिलासा द्यायला हवा. तसंच, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी त्यांना करावीच लागेल', अशी भूमिका उद्धव यांनी मांडली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सरकारच्या कृतीचा त्यांनी सडकून समाचार घेतला. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच उभी असेल. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आम्ही खपवून घेणार नाही. जर शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याचे दिसले तर या सरकारचं काय करायचे ते आम्ही बघू. ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांची यादी आमच्याकडे द्यावी, आम्ही ते गुन्हे रद्द करायला लावू, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिलं. त्यामुळे शिवसेना विरुद्ध सरकार हा संघर्ष येत्या काळातही सुरूच राहणार असल्याची चिन्हं आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांस फेकले जातेय उघड्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

परिसरातील शिवाजीनगरच्या जलनगरी व गोवर्धन गावाच्या रस्त्यावर सर्रासपणे उघड्यावर मांसाचे तुकडे टाकले जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळही अशा ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे धास्ती निर्माण झाली आहे. शहरात अन्यत्रदेखील काही प्रमाणात अशी स्थिती दिसून येत असून, महापालिकेने उघड्यावर मांस टाकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. परंतु, सातपूर भागात अनेक ठिकाणी उघड्यावर घाण, कचरा टाकणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे मोकळ्या भूखंडांवर कायमच कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यातच उघड्यावर टाकले जाणारे मांसाचे तुकडे हीदेखील मोठी समस्या सातपूर भागात पाहायला मिळत आहे. शिवाजीनगरच्या जलनगरी व गोवर्धन गावाच्या रस्त्यावर रोजच मांसाचे तुकडे मोकळ्या जागेवर टाकले जात असल्याचे आढळून येत आहे. परंतु, त्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अशा मांसविक्रेत्यांवर कारवाई करणार तरी कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे स्वच्छता मोहीम राबविताना उघड्यावर कचरा टाकू नये, असे सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे मांसविक्रेत्यांकडून सर्रासपणे उघड्यावर मांस टाकण्याचे प्रकार होत आहेत. असे उघड्यावरील मांस खाण्यासाठी मोकाट कुत्र्यांची झुंबड उडत असून, वाहनचालकांसह नागरिकांत त्यामुळे धास्ती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

--

प्रबोधन करण्याची गरज

उघड्यावर कचरा टाकू नये यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात असले, तरी महापालिकेकडून प्रबोधन करणार तरी कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेने उघड्यावर कचरा, मांसाचे तुकडे टाकणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे. मात्र, उघड्यावर घाण, कचरा टाकल्याने कशाप्रकारे आजार पसरतात याबाबत प्रबोधन करणेही गरजेचे झाले आहे. स्थानिक नगरसेवकांनीदेखील आपल्या प्रभागातील नागरिकांना उघड्यावर घाण, कचरा टाकू नये यासाठी वेळोवेळी आवाहन करण्याची गरज सूज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

---

जलनगरी व गोवर्धन रस्ता भागात उघड्यावर मांस टाकले जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचीही येथे झुंबड उडत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने उघड्यावर मांस टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

-एस. डी. पाटील, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images