Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘रायसोनी’च्या ठेवीदारांचे मालेगावात उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील भाईचंद हिराचंद रायसोनी सोसायटीत शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी अडकल्या आहेत. सोसाटीच्या संचालकांसह सल्लागार मंडळावर गुन्हा दाखल झालेला असतांनाही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे संबंधितांना अटक करून ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी ठेवीदार ज्येष्ठ नागरिकांनी शुक्रवारी मालेगावात उपोषण केले.

पतसंस्थेच्या मालेगाव शाखेत शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक सल्लागार मंडळाच्या आश्वासनांवर गुंतवणूक केली. लाखो रुपयांच्या ठेवी असतांना शाखेकडून कुठलाही परतावा मिळाला नाही. आता तर शाखाही बंद आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आर्थिक फटका बसला आहे. या संदर्भात छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोन वर्ष उलटले तरीही संशयीतांना अटक झालेली नाही. त्यामुळे याकडे शासन व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी भर उन्हात उपोषण केले . या आंदोलनात अन‌िल पाठक, गोविंद राजपूत, सुनील आहीरे, अरुण भावसार, यागेश मोरे, शरद देवरे, गुलाब पाटील, मनोहर हिरे सहभागी झाले आहेत.
0000
पिंपळगावात दरोडा

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत/निफाड

पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड रोड लगत राहणाऱ्या रवींद्र रामदास मोरे यांच्या घरावर शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडा पडला. चोरट्यांनी मोरे कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला असून, रवींद्र मोरे व त्यांच्या वहिनी शीतल मोरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोरट्यांनी दहा हजार रुपये, मंगळसूत्र लंपास केले. या घटनेमुळे परिसरात भीती पसरली असून, पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

चिंचखेड रोडलगत असलेल्या मोरे बंगल्याच्या स्वयंपाकघराचा दरवाजा तोडून दरोडेखोर आत घुसले. शीतल मोरे यांनी चोरट्याना पाहताच आरडाओरड केली. त्यामुळे रवींद्र मोरे यांना जाग आली. त्यांची दरोडेखोरांशी झटापट झाली. दरोडेखोरांनी लाकडी दांडक्यांनी रवींद्र मोरे यांच्या डोक्यात वार केला. त्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांनी शीतल यांनाही मारहाण केली. घरातील लहान मुलांनाही एका खोलीत बंद केले. घरातील दहा हजाराची रोकड व शीतल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून घेतले. सर्व दरोडेखोर हिंदीत बोलत असल्याचे मोरे कुटुंबियांनी सांगितले.

इतर घरांवरही दगडफेक

चोरटे मोरे यांच्या घरात असताना त्यांचे दोन साथीदार बाहेर उभे होते. मोरे यांच्या घरात सुरू असलेला प्रकार समोर राहणारे दीपक शिंदे यांना कळताच त्यांनी मित्रांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोरे यांच्या घराबाहेर असलेल्या दोघांच्या हे लक्षात येताच त्यांनी शिंदे यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर सोमनाथ निकम यांनी पोल‌िस स्टेशनला फोन केला. परंतु फोन उचलला गेला नाही. नंतर पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर व अग्निशमन दलाचे कार्यकर्ते येथे आले. तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.

पोलिसांना पोहोचण्यास उशीर

पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली, तरी पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच पोलिस स्टेशनमध्ये फोन केला असता तो कुणीही घेतला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्ष लागवडीचा श्रीगणेशा

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

पावसाळा सुरू झाल्याने शहर परिसरात वृक्ष लागवडीसाठी बीज संकलनाच्या आवाहनास लाभलेल्या उदंड प्रतिसादानंतर आता हरितविश्व ग्रुपने यंदाच्या प्रत्यक्ष वृक्ष लागवड मोहिमेस प्रारंभ केला आहे. शहरातील आयुर्वेदिक डॉक्टर्सची हरितविश्व आणि या उपक्रमाचा मीडिया पार्टनर ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे यंदाच्या वृक्ष लागवडीसाठी बीज संकलनाचे आवाहन करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर परिसरात ही वृक्ष लागवड सुरू झाली असून, त्यासाठी डॉक्टरांची विविध पथकेही सज्ज झाली आहेत.

वृक्षसंवर्धनासाठी सध्या सर्वच स्तरांवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. विद्यार्थी, नागरिक, तसेच डॉक्टर्स वृक्षसंवर्धनासाठी पुढे आले आहेत. नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर्स ‘हरितविश्व’च्या छताखाली नाशिक व जवळपासच्या परिसरात वृक्ष लागवडीचे कार्य करीत आहेत. ‘हरितविश्व’मार्फत नाशिक व जवळपासच्या डोंगराळ भागात वृक्ष लागवडीचे कार्य सुरू असून, गेल्या दोन महिन्यांपासून नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर्स वेगवेगळ्या तुकड्यांमध्येे वृक्ष लागवड करीत आहेत. ‘हरितविश्व’तर्फे ब्रह्मगिरी येथे आतापर्यंत एक हजार औषधी वृक्षांची लागवड झाली आहे.

‘हरितविश्व’तर्फे नाशिक व जवळच्या भागात सीड बॉल्सद्वारे वृक्षारोपण करण्यात आले आहे. बीजांना बॉल्सचे स्वरूप देऊन त्यांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती हरितविश्वचे डॉ. राहुल चौधरी यांनी दिली. उत्तम स्वरूपाचे बीज, गोमूत्र, शेण, जैविक कीटकनाशकांचा वापरदेखील केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणेे यापुढे बेळगाव ढगा ते ब्रह्मगिरी डोंगर रांग या भागात वृक्षारोपण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पांडवलेणी, भास्करगड, हरिहर किल्ला या परिसरातील डोंगराळ भागातदेखील वृक्षारोपण होणार असल्याचे डॉ. राहुल चौधरी यांनी सांगितले. वृक्षारोपणाच्या ठिकाणी सर्व डॉक्टर्स एकत्रित येऊन नागरिकांच्या मदतीने वृक्षारोपण करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉक्टर्स, नागरिकांचा पुढाकार

वृक्षारोपणासाठी नाशिकमधील विविध ठिकाणी डॉक्टर्स आणि नागरिक काम करीत आहेत. डॉ. संदीप अहिरे, डॉ. संदीप पाटील, प्रसाद झेंडे, सागर जोशी, अमोल साळुंके, चंदन उमाळे, केतन पाटील, रवीभूषण सोनवणे, देवेंद्र बच्छाव, मुकुंद खानापुरे, तुषार निकम, रोहिणी पाटील यांनी यासाठी योगदान दिले आहे.

अन्य ग्रुप्सही सरसावले

ग्रीन रिव्हॉल्युशन ग्रुपतर्फे चुंंचाळे शिवार येथे पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, तसेच सोशल नेट्वर्किंग ग्रुपतर्फे पाचशे झाडे लावण्यात आली आहेत. पंचवटी डॉक्टर्स ग्रुपतर्फे पाचशे झाडांची लागवड करण्यात आली आहे, तर मानव ग्रुपतर्फे गेल्या महिन्यात पाचशे झाडांची लागवड करण्यात आली आहे.

या झाडांची झाली लागवड

हरितविश्वतर्फे हिरडा, बेहडा, आवळा, आंबा, चिंच, करवंद, बांबू, मोह, फणस, साग, शिंदळ, भोकर, सीताफळ, बाभूळ, कडुनिंब, शिरीष, बोर यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.


हा परिसर बहरणार

बेळगाव ढगा ते ब्रह्मगिरी डोंगररांग, पांडवलेणी, दुधाळा, महिरावणी, सासाळा, तळेगावच्या पाच्या, अंजनेरी, वाढोलीचा धामणगड, कारवी, कोथळा, रांजनगड, सरड्या, ब्रह्मा, नागफणी, कोधला-मोधला, आठवा, सोलावा, भास्करगड, हरिहर, नाशिक आजूबाजूची लहान गावे, किल्ले यांसारख्या डोंगराळ भागात वृक्षारोपण होणार असल्याची माहिती ‘हरितविश्व’चे डॉ. राहुल चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गावितांसह अधिकारी गोत्यात?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या न्या. एम. जी. गायकवाड चौकशी समितीचा सीलबंद अहवाल उघड करण्याची मागणी विभागाने केली आहे. हा अहवाल हायकोर्टात असून, तो उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर यातील दोषींवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोप ठेवलेले माजी मंत्री व भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावितांसह बड्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. दरम्यान, आदिवासी विकास महामंडळातील नोकरभरती प्रकरणाचा चौकशी अहवाल हा विधी व न्याय विभागाकडे अभ्यासासाठी गेला असून, विभागाच्या सल्ल्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सावरा यांनी दिली आहे.

सावरा यांनी शुक्रवारी आदिवासी विकास आयुक्तालयात विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरा यांनी विभागाने भ्रष्टाचार रोखण्यासाठी आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना वस्तूंऐवजी थेट डीबीटीचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे तक्रारी आणि भ्रष्टाचार कमी झाल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत ६० टक्के मुलांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. सोबतच वसतिगृहातील मुलांना प्रवेश मिळाला नाही तर तालुका स्तरावरही शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांना आता थेट रोख रक्कम दिली जात आहे. त्याचा सर्व खर्च भागावा यासाठी त्याच्या खात्यात पैसे जमा केले जात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आदिवासी विभागातील न्या. एम. जी. गायकवाड समितीच्या चौकशी अहवालातील दोषींवरील कारवाईसंदर्भात बोलताना सावरा यांनी समितीने दिलेला अहवाल अजूनही सीलबंद आहे. हा सीलबंद अहवाल उघड करण्याची परवानगी आम्ही मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही. या समितीने जवळपास ७३ कोटींचा भ्रष्टाचार शोधून काढला असून, माजी मंत्री डॉ. गावितांसह चार अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर ठपका ठेवला आहे. त्यामुळे अहवाल उघड झाल्यास डॉ. गावितांसह सर्व अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याने डॉ. गावितांचे राजकीय भवितव्यही पणाला लागणार आहे.

नोकरभरती विधी विभागाकडे

दरम्यान, आदिवासी विकास महामंडळातील तीनशे कोटींच्या नोकरभरती घोटाळ्याची चौकशीही पूर्ण झाली असून, या चौकशी अहवालाची छाननी करण्यासाठी हा अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सावरा यांनी दिली आहे. या विभागाच्या अभिप्रायानंतर यातील दोषींवरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे महामंडळाच्या नोकरभरती घोटाळ्यातील तत्कालीन बड्या अधिकाऱ्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीच या घोटाळ्याची तक्रार केली होती. तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवलेंनी या प्रकरणी चौकशी केली असून, दोषींवरील कारवाईची प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्मा स्मारक टाकणार कात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील हुतात्मा स्मारकाच्या दुरवस्थेसंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल तयार केला असून, येथील कामांची पाहणीदेखील केली आहे. येथील दुरुस्तीच्या कामांसाठी टेंडर काढण्यात आले असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांनी दिली. हुतात्मा स्मारकाची दुर्दशा झाल्याच्या आशयाचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार स्वातंत्र्यसैनिक संघटनेने पुढाकार घेत नाशिक महापालिकेला निवेदन दिले होते. या ठिकाणी ज्या उणिवा आहेत किंवा जी दुरुस्ती करायची आहे, त्याबद्दलची माहिती महापालिकेचे अधिकारी यू. बी. पवार व गांगुर्डे यांना कळ‍विली होती. त्यानुसार या दोन अधिकाऱ्यांसह पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून काम करण्याला मान्यता दिली आहे.

स्मारकाच्या मुख्य इमारतीबरोबरच परिसराचाही विकास केला जाणार आहे. या ठिकाणचे वायरिंग जुने झालेले आहे. परिणामी अभ्यासाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना व कार्यक्रमासाठी येणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याकरिता जुनाट झालेले वायरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बाहेरील बाजूस असलेले पेव्हर ब्लॉक काही ठिकाणी खाली-वर झाले आहेत. त्यांचेदेखील सपाटीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी फरशा उखडल्या आहेत. काही फरशांना तडे गेले आहेत. त्या फरशा दुरुस्त करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दरवाज व खिडक्या जीर्ण झाले आहेत. ते तातडीने बदलण्यीच गरज असून, काही ठिकाणी दुरुस्ती करावी लागणार आहे. हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे टॉयलेटचेही काम हाती घेण्यात आले आहे. त्याचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपायुक्तांसह अधीक्षकांची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि विविध कर वसुलीच्या कामांत अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, स्थायी समिती सदस्यांनी विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम आणि सहायक अधीक्षक सुरेश आहेर यांची चौकशी करून निलंबन करण्यात यावे, अशी मागणी केली. अतिक्रमण काढणे, अनधिकृत होर्डिंग काढणे, जाहिरात कर वसुली करणे आदींमध्ये दोघांनी हयगय केल्याचा ठपका सदस्यांनी पत्रात ठेवला आहे. त्यामुळे सभापतींनी दोघांच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती नियुक्त केली. या समिताला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्थायीच्या सर्व पंधरा सदस्यांनी सभापती शिवाजी गांगुर्डे यांना पत्र देवून बहिरम व आहेर यांची चौकशी व निलंबनाची मागणी केली. शहरात अनधिकृत जाहिरात फलक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. जाहीरात कर वसुलीतही भ्रष्टाचार केला जात आहे. अतिक्रमणाला अभय दिला जात आहे. तसेच घरकूल योजनेतही घोळ असल्याचे आरोप करण्यात आला. बहिरम व आहेर यांनी आर्थिक अनियम‌ितता करत कोट्यवधींची माया जमविल्याचा आरोपही सदस्यांनी केला आहे. कारवाई झाली नाही तर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सदस्यांनी दिला आहे.

तीन महिन्यांत निकाल?

बहिरम यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी सदस्यांच्या भावना तीव्र असल्याने गांगुर्डे यांनी त्यांच्यासह आहेर यांची चौकशी करण्याची घोषणा केली. दोघांच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. संबंधित समितीत मुख्य लेखापरिक्षक महेश बच्छाव, सदस्य शशिकांत जाधव, सूर्यकांत लवटे, जगदीश पाटील, मुशीर सैय्यद, डी. जी. सूर्यवंशी, मुकेश शहाणे यांचा समावेश आहे. ही समिती तीन महिन्यांत चौकशी करून स्थायी समितीला अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे बहिरम आणि आहेर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका बजेट फुगवले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदतीचे हात वर केलेले असतानाही सत्ताधारी भाजपने कोटीच्या कोटी उड्डाने घेण्याचे सुरूच ठेवले आहे. प्रशासनाने सादर केलेल्या बजेटमध्ये स्थायी समितीने ३८९ कोटींची वाढ सुचवल्याने बजेट १७९९ कोटींवर पोहचले होते. महासभेनेही त्यात ३७४ कोटींची वाढ केल्याने बजेट दोन हजार कोटींचा टप्पा ओलांडून २ हजार १७३ कोटींवर पोहचले आहे. त्यात शासनाकडून तीनशे कोटींच्या मदतीची अपेक्षा करण्यात आली आहे. या बजेटच्या अंमलबजावणीचे खडतर आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या बजेटचा महासभेचा ठराव नगरसचिव विभागाला प्राप्त झाला आहे. प्रशासनाने स्थायी समितीला १४१० कोटींचे व सहा कोटी शिलकी बजेट सादर केले होते. स्थायी समितीने यात ३८९ कोटींचा वाढ केली होती. महापौरांनी बजेटचा सादर केलेल्या ठरावात ३७४ कोटींची वाढ केली.

असे वाढले बजेट

खेडे विकासासाठी दहा कोटी, महापौर निधी पाच कोटी, उपमहापौर निधी तीन कोटी, स्थायी समिती सभापती तीन कोटी, सभागृहनेता दोन कोटी आणि विरोधी पक्षनेत्यासाठी एक कोटींचा निधी गृहीत धरण्यात आली आहे.
0000

जिल्हा बँकेच्या २१ संचालकांना नोटिसा
नोकरभरती, सीसीटीव्ही खरेदीप्रकरण भोवणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही कोट्यवधी रुपयांचे सीसीटीव्ही व तिजोऱ्या खरेदी तसेच नोकरभरती केल्याचे प्रकरण आता अध्यक्षासंह संचालकांच्या अंगलट आले आहे. ही खरेदी आणि नोकरभरती प्रकरणात जिल्हा बँकेचे आर्थिक नुकसान झाले म्हणून सहकार कायदा अधिनियम १९६० च्या कलम ८८ नुसार अध्यक्षांसह सर्व संचालकाना जिल्हा उपनिबंधकाना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. येत्या १० जुलै रोजी संचालकांच्या नोटिंसावर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह संचालकांच्या अडचणी वाढणार आहेत.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बेकायदेशीर कामकाजप्रकरणी सहकार विभागाकडे

अनेक तक्रारी झाल्या आहेत. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह संचालकांनी जवळपास चारशे कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती केली आहे. सोबतच कोट्यवधी रुपयांची सीसीटीव्ही खरेदी आणि तिजोरी खरेदी केल्या आहेत. यासाठी सहकार विभागाच्या नियमांचीही पायमल्ली केल्याच्या तक्रारी सहकार विभागाकडे झाल्या आहेत. त्यानुसार या संचालकांनी चौकशीही करण्यात आली असून, त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी या संचालकांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सर्व संचालकांना जबाबदार धरण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांना येत्या १० जुलैपर्यंत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या संचालकांच्या अडचणीत भर पडली आहे. या आधी नोटाबदली प्रकरणात काही संचालक चौकशीच्या फेऱ्यात आले होते. त्यातून सही सलामत सुटले असतानाच आता थेट ८८ नुसार अपात्रतेच्या नोटिसा मिळाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कठोर कारवाई करा

जिल्हा बँकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळाने गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी विविध खरेद्यांमध्ये रस घेतला होता. सीसीटीव्ही, तिजोऱ्या खरेदीची आवश्यकता नसताना त्या खरेदी करण्यात आल्यात. तर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची क्षमता नसतांना आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी त्यांनी लावली होती. त्यामुळे जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी बँक डबघाईस गेली. त्यामुळे या

बँकेच्या संचालकांना अपात्र ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अविश्वास’ची नामुष्की टळली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी अविश्वास ठरावापूर्वीच राजीनामा दिल्याने शुक्रवारी झालेली विशेष सभा कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव न मांडता तहकूब करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षपद रिक्त झाले असून, सध्या उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव हे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळणार असल्याचे समजते. लढ्ढा यांनी राजीनामा दिला नसला तरी आज अविश्वास ठराव दाखल करणारच होतो, असे विरोधी गटाने यावेळी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून डीपीच्या घोळामुळे त्र्यंबकेश्वर नगरपरषिदेच्या कारभारावर बोट ठेवण्यात आले होते. त्यामुळे शहराच्या विकासाच्या आड येणार नाही असे सांगून गुरुवारी दुपारी विजया लढ्ढा यांनी नाशिक येथे उपजिल्हाधिकारी शश‌िकांत मंगरूळे यांच्याकडे राजीनामा दिला होता. मात्र अविश्वास ठरावाची सभा पूर्वनियोज‌ीत दिवशीच होईल, असे प्रशासनाने तेव्हाच स्पष्ट केले होते. त्यानुसार त्र्यंबक नगरपरिषद कार्यालयात शुक्रवारी मोठा पोल‌िस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपालिका परिसरात ११ वाजून ४० मिनीटांनी अज्ञातस्थळी रवाना असलेले १३ नगरसेवक वाहनाने पोहोचल्यानंतर सभेला सुरुवात झाली.

पालिकेच्या सभागृहात बारा वाजता प्रांताधिकारी राहुल पाटील, नायब तहसीलदार मोहन कनोजे आणि मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांनी सभा सुरू केली. सभेस गटनेते योगेश तुंगार, रवींद्र सोनवणे, तृप्ती धारणे, अनघा फडके, अभिजीत काण्णव, यशोदा अडसरे, अलका शिरसाठ, अंजनाबाई कडलग, सिंधू मधे, आशा झांबाड, रवींद्र गमे, शकुंतला वाटाणे, स्वीकृत सदस्य माधुरी जोशी, राहुल फडके उपस्थित होते.

विजया लढ्ढा आणि त्यांच्या समर्थक गटातील धनंजय तुंगार, संतोष कदम, यशवंत भोये हे चार सदस्य अनुपस्थित होते. दरम्यान सभा सुरू होताच पिठासन अधिकारी राहुल पाटील यांनी सभा ज्या उद्देशने बोलावण्यात आली आहे त्या नगराध्यक्षांनी आधीच राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूरही झाल्यामुळे ही सभा कोणतीही चर्चा अथवा प्रस्ताव न मांडता आणि मतदान न घेता संपली, असे जाहीर केले.

आम्ही लढाई जिंकलो...

सभागृहातून बाहेर आल्यानंतर गटनेते योगेश तुंगार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. नगराध्यक्षांनी राजीनामा दिला नसता तरी देखील १३ नगरसेवकांनी एकजुटीने अविश्वास प्रस्ताव पूर्ण केला होता. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावेच लागले असते. आम्ही त्यांना नेतृत्त्व दिले, मात्र त्यांनी शहर विकास आराखड्यात स्वतःच्या मर्जीने बदल केले. त्यांचे पती दीपक लढ्ढा कामकाजात हस्तक्षेप करीत होते. त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा मागीतला. त्याला सुरुवातीला त्यांनी नकार दिला. मात्र नगरसेवक एकत्र झाल्यावर त्यांनी अविश्वासाची नामुष्की टाळण्यासाठी राजीनामा दिला. भ्रष्ट कारभाराविरूध्द आमची लढाई होती. ती आम्ही जिंकली आहे, असे योगेशे तुंगार म्हणाले.

तुप्ती धारणे यांच्या नावाची चर्चा

नगराध्यक्षपद रिक्त झाल्याने उपनगराध्यक्ष अभिजीत काण्णव हे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळणार असल्याचे समजते. अर्थात लवकरच नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. भावी नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या तृप्ती धारणे यांचे नाव चर्चेत आहे. सर्वच नगरसेवकांचा त्यांना पाठींबा राहील असे दिसते.

...यांच्याकडून राजीनाम्यासाठी दबाव

नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडण्यापासून ते त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात गटनेते योगेश तुंगार यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष शांताराम बागुल, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख नितीन पवार, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, शिवसेनेचे कल्पेश कदम, संजय हरळे, काँग्रेस शहराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, पहिलवान पिंटू काळे आदींसह राजकीय सामाज‌िक वर्तुळातील अनेकांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑलिम्पिक सप्ताहानिमित्त धावले विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे एक किमी अंतराची ‘ऑलिम्पिक डे रन’ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौर रंजना भानसी व अर्जुन पुरस्कारप्राप्त ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत, डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते ऑलिम्पिक स्पर्धांचे जनक बॅरन पिअर द कुबर्टिन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संस्थेने मराठीत तयार केलेल्या ऑलिम्पिक गीताची धून वाजवून ऑलिम्पिक ध्वजारोहण करण्यात आले.
‘वर्ल्ड ऑलिम्पिक डे रन’ला संस्थेचे सर्वोत्कृष्ट खेळाडू सागर गाढवे, निकीता संभेराव, पायल पळसकर, हर्षल शार्दूल, गौरव लांबे, प्राजक्ता बोडके, स्नेहल विधाते, शरयू पाटील, अंजली मुर्तडक यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करुन सुरुवात करण्यात आली. यावेळी मविप्र मॅरेथॉन चौक ते व्ही. एन. नाईक चौक व पुन्हा मविप्र मॅरेथॉन चौक असा एक किमी अंतराची रन करण्यात आली. यामध्ये नाशिक जिल्हा स्केटिंग, रोईंग, अॅथलेट‌िक्स, कॅनोइंग, हँडबॉल, आर्चरी, योग असोसिएशन, सॉफ्टबॉल तसेच संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी, शिक्षक, खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
यानिमित्त ऑलिम्पिकविषयी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक होरायझन अॅकेडमीच्या ओम लवांड याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय रुचिता आहिरराव तर तृतीय क्रमांक जनता विद्यालयाच्या हर्ष गुंजाळ याने मिळवला. या कार्यक्रमाला महापौर रंजना भानसी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, मविप्रच्या सरचिटणीस नील‌िमा पवार, आमदार जयंत जाधव, माजी महापौर अशोक मुर्तडक, अजय बोरस्ते, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य अशोक दुधारे आदी उपस्थित होते.

आठवडाभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
क्रीडा साधना संस्था, कै. के. एन. डी. मंडळ आणि नाशिक क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त क्रीडा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सलग ११ वे वर्ष होते.
नाशिकच्या प्राचीन आणि प्रसिद्ध काळाराम मंदिरापासून क्रीडा रॅलीला सुरुवात झाली. ऑलिम्पियन कविता राऊत हिच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
ही रॅली पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, टिळक रोड आणि महात्मा गांधी रोडमार्गे यशवंत व्यायाम शाळा येथे समाप्त करण्यात आली. यशवंत व्यायाम शाळेत रॅलीचे स्वागत नाशिकमधील छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक साहेबराव पाटील, छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू स्नेहल विधाते आणि यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या वतीने करण्यात आले. यानंतर सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद खरे यांनी केले. ऑलिम्पिक सप्ताहाचा हा उपक्रम गेल्या ११ वर्षांपासून राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. जयप्रकाश दुबळे म्हणाले, की अशा उपक्रमांमुळे दर्जेदार खेळाडू तयार होण्यास मदत होते. यासाठी शासनाचेही संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी साहेबराव पाटील यांनीही मार्गर्दर्शन केले. सूत्रसंचलन अशोक दुधारे यांनी केले.
३० जून रोजी दुपारी चार वाजता या सर्व स्पर्धांचा एकत्रित पारितोषिक वितरण समारंभ कालिका मंदिर हॉल येथे होणार आहे. या समारंभासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक समितीचे पदाधिकारी उपास्थित राहणार आहेत, अशी माहिती या सप्ताहाचे समन्व्ययक नितीन हिंगमिरे यांनी दिली. यावेळी क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, आनंद खरे, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, नितीन हिंगमिरे, राजू शिंदे, कुणाल अहिरे, विक्रम दुधारे, चिन्मय देशपांडे, मकरंद सुखात्मे आदी उपस्थित होते.

मराठा हायस्कूलचे ३५० खेळाडू धावले
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. आधुनिक ऑलिम्पिकचे जनक बॅरन पियर दि कुबर्टिन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून शाळेत ‘वर्ल्ड ऑलिंपिक डे’चे ध्वज लावून वातावरणनिर्मिती करण्यात आली. तसेच शाळेतील सर्वच खेळांतील सुमारे ३५० खेळाडूंनी एक किमी सद्भावना ऑलिम्पिक दौड यातही सहभाग घेतला.
याप्रसंगी शाळेच्या क्रीडा विभागाच्या वतीने घोषवाक्य, ऑलिम्पिक पोस्टर्स, स्टिकर्स, प्रकल्प स्पर्धा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयाच्या मुख्य कार्यक्रमात ऑलिम्पिक दिवसाचे महत्त्व व आधुनिक ऑलिम्पिकचे जनक बॅरन पियर दि कुबर्टिन यांच्या योगदिनाविषयीची माहिती क्रीडा विभागाचे प्रमुख सोपान वाटपाडे यांनी दिली. ते म्हणाले की, २३ जून १९८४ रोजी पॅरीस येथे दिडशे देशांच्या प्रतिनिधींसमोर बॅरन पियर दि कुबर्टिन यांनी आपली योजना मांडली व सन १८९६ च्या अथेन्सच्या ऑलिंपिक स्पर्धेच्या रुपाने आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाले. म्हणून २३ जून हा दिवस संपूर्ण जगात जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून संपूर्ण साजरा केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिंदी पासपोर्टची छपाई ना‌शिकला

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
केवळ इंग्रजीमध्येच छापला जाणारा पासपोर्ट आता राष्ट्रभाषा हिंदीतही उपलब्ध होणार आहे. पासपोर्ट छपाई फक्त नाशिक प्रेसमध्ये होते. वर्षाला दीड कोटी इंग्रजी पासपोर्ट छपाई करणाऱ्या नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसलाच हिंदीतील पासपोर्ट छपाईचे काम दिले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘मटा’ला दिली आहे. ई-पासपोर्टचीही छपाईही लवकरच होणार आहे.
पासपोर्टमधील व्यक्त‌िगत माहिती ही इंग्रजीतच छापली जाते. अनेक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत परराष्ट्र मंत्रालयाकडे तक्रारी केल्या होत्या. अरब देशांचे पासपोर्ट हे अरबी भाषेत आहेत. जर्मनी आणि रशिया देखील त्यांच्या भाषेतच पासपोर्ट छापतात. त्यामुळे भारतातही हिंदीत पासपोर्ट हवा अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे.
आठ वर्षांखालील मुले आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठांना पासपोर्ट फीमध्ये दहा टक्के सवलत देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणीही केली जाणार आहे. अधिकृत ओळखपत्र आणि भविष्यातील गरज म्हणून पासपोर्ट काढण्याकडे कल वाढतच आहे.
आता हिंदीतही पासपोर्ट तयार होणार आहे. ई-पासपोर्टही येथे छापला जाणार आहे. त्यामुळे नाशिकच्या प्रेसकडे पासपोर्ट छपाईचे काम वाढणार आहे.
पासपोर्ट मिळणे सोपे पासपोर्ट देताना पोलिस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्यामध्ये भरपूर वेळ जातो. चंडिगढ, गुजरात, गोवा राज्यात आठवडाभरात व्हेरिफिकेशन होते. महाराष्ट्रात मात्र वेळ लागतो. अन्य अनेक अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी सरकारने तत्काळ पासपोर्ट देण्याचे ठरवले आहे. अर्जदाराने आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्राची साक्षांकित प्रत आणि त्यासोबत आपल्याविरुध्द कोणतीही गुन्हेगारी स्वरुपाची तक्रार नसल्याचे स्वतःच्या सहीचे पत्र दिल्यास तत्काळ पासपोर्ट दिला जाणार आहे.

हिंदीमध्ये पासपोर्ट छपाईचे आदेश दिले असल्यास तो येथील प्रेस कामगारांवर सरकारने दाखवलेला मोठा विश्वास आहे. नवीन आव्हान स्वीकारण्यास आमचे मेहनती कामगार तयार आहेत. या आधीही कामगारांनी त्यांची गुणवत्ता सिध्द केली आहे.
- जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेरेस, बेसमेंटच्या अनधिकृत वापराचे सर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची खाली तिजोरी भरण्यासाठी स्थायी समितीने हालचाली सुरू केल्या असून, उत्पन्न वाढविण्यासाठी शहरातील खासगी व व्यावसायिक इमारतींच्या टेरेस व बेसमेंटच्या वापराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित जागा वापराचे सर्वेक्षण दीड मह‌िन्यात करून स्थायी समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. या सर्वेक्षणामुळे या इमारतींवरील टेरेस आणि बेसमेंटचा अनधिकृत वापर समोर येणार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून उत्पन्न वाढविता येणार आहे.

शहरातील खासगी व व्यावसायिक इमारतींच्या बेसमेंट आणि टेरेसचा अनधिकृत वापर केला जात आहे. अनेक ठिकाणी हॉटेल्स, पार्किंग, व्यावसायिक गाळे अनधिकृतपणे थाटण्यात आली आहेत. यापासून स्थानिक इमारतधारकांना उत्पन्न मिळत असले तरी, पालिकेला मात्र कोणताही कर मिळत नाही. स्थानिक रहिवाशांच्या मालकीच्या इमारती असल्या तरी, त्याच्या वापरावर पालिकेकडून कर आकारला जात असून, त्यावर उत्पन्न मिळते. परंतु, शहरात अनधिकृतपणे टेरेस आणि बेसमेंट वापर सुरू असून, त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून पालिकेला मुकावे लागत आहे. या सर्वांकडून कर वसूल केल्यास पालिकेच्या तिजोरीत लाखोंची भर पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या मह‌िन्यात पालिकेला उत्पन्नाचे अधिकाधिक स्रोत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थायी समितीनेही पावले उचलत जास्तीत जास्त उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शुक्रवारच्या स्थायी समिती बैठकीत सभापती गांगुर्डे यांनी शहरातील बेसमेंट आणि टेरेसच्या वापराची माहिती नगररचना विभागाला विचारली.परंतु, नगररचना विभागाकडे अशी माहितीच उपलब्ध नव्हती. त्यामुळे सभापतींनी शहरातील सर्व खासगी व व्यावसायिक इमारतींच्या बेसमेंट आणि टेरेसचा वापर कशासाठी केला जात आहे, याबाबतचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या टेरेस आणि बेसमेंटचा वापर सध्या कशासाठी सुरू केला जात आहे, त्यासंदर्भातील परवानगी तिथे होती काय, याबाबतचा अहवाल स्थायी समितीला सादर करावा, असे निर्देश त्यांनी नगररचना विभागाला दिले आहेत.


मोबाइल टॉवरही रडारवर

टेरेस आणि बेसमेंटच्या अनधिकृत वापरासोबतच मोठ्या प्रमाणावर इमारतींवर अनधिकृतपणे मोबाइल टॉवर उभे करण्यात आले आहेत. या टॉवर कंपन्यांकडून पालिकेला कर भरण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या मोबाइल कंपन्यांकडूनही कर वसुली करून उत्पन्न वाढविण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत.

मुदतवाढीला ब्रेक

स्थायी समितीवर वारंवार येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावांना सदस्यांनी शुक्रवारी ब्रेक लावला. भूसंपादन विषयाला मंजुरी देतानाच, जवळपास ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. यासंदर्भातील सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत. त्यात वैद्यकीय विभागातील आरोग्य व कुटूंब कल्याण समितीत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या ३३ कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शाळांना घरघर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव येथील महापालिका शाळा क्रमांक ६९ व ७० मधील दुरवस्थेचे ग्रहण कायम असून, पाणी, शाळेत स्वच्छतागृह, नियमित साफसफाईचा अभाव आदी मूलभूत सुविधांची वानवा दिसून येत आहे. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरणाऱ्या या शाळेच्या वर्षभरापासून असलेल्या स्थितीवरून प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड होत असून, शिक्षण समिती व महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी. पालकांकडून करण्यात येत आहे.

महापालिकेच्या या शाळेला विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे शाळेत आल्यावर मुलांचा उत्साह वाढण्याऐवजी निरुत्साह वाढत आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराशेजारीच मोठ्याप्रमाणात कचरा पडलेला असतो. शाळेतील विद्यार्थ्यांची मूलभूत गरज असलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झालेली आहे. त्याची नियमित स्वच्छता होत नसल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना साथीचे आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वच्छतागृहाच्या खिडक्यादेखील तुटलेल्या आहेत.

शाळेच्या जुन्या इमारतीचीही मोठी दुरवस्था झाली आहे. दरवाजे, पत्रे तुटलेले आहेत. त्यामुळे पाऊस आला, तर विद्यार्थ्यांना वर्गात बसणे अवघड होत आहे. शाळेच्या मैदानावरही कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नियमित साफसफाई होत नसल्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन शहरातील महापालिका शाळांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व पालकांनी केली आहे.

पावसाळ्यात मैदानावर तळे

शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात चढ असल्यामुळे गावातील संपूर्ण पाणी शाळेच्या आवारात जमा होते. त्यामुळे शाळेच्या मैदानात कायम पाणी साचलेले असते. परिणामी डासांचादेखील त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथे विद्यार्थ्यांच्या कमरेपर्यंत पाणी साचले होते. यंदाही अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

आवारात ट्री गार्डचे भंगार

शाळेच्या आवारात मोठ्याप्रमाणात ट्री गार्डच्या लोखंडी जाळ्या पडलेल्या आहेत. बऱ्याचदा विद्यार्थीदेखील त्या ठिकाणी खेळत असतात. नकळतपणे धक्का लागल्यास दुखापत होऊ शकते. शिवाय शाळेत अनेकदा गैरप्रकार घडतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूंचा गैरवापर केल्यास मोठा अपघात होण्याचीदेखील भीती वाढली आहे.

या शाळेतील स्वच्छतागृहासह आवारदेखील स्वच्छ राहील, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. पावसाळ्यात गावातील संपूर्ण पाणी उताराने शाळेच्या आवारात जमा होते. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

-संदीप लभडे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’साठी नाशिक सज्ज

$
0
0

देशभरात १ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीसाठी नाशिकच्या कामटवाडे येथील सेंट्रल एक्साइज, सर्व्हिस टॅक्स व कस्टम कार्यालय सज्ज झाले आहे. या कार्यालयात सॉफ्टवेअर अपडेट करण्यापासून विविध साहित्य शिफ्टिंगचीही तयारी सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी जीएसटीची ट्रेनिंग, विविध क्षेत्रातील व्यापारी, उद्योजकांची कार्यशाळाही या कार्यालयात सुरू आहेत. नाशिकमध्ये असलेल्या कार्यालयात एका आयुक्तांसोबत दोन अधिकचे आयुक्त असतील. त्यात एक ऑड‌िट व दुसरे अपील विभाग सांभाळणार आहेत.

प्रस्तावित वस्तू व सेवाकराच्या तरतुदी जिल्हा आणि ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यासह जीएसटीचे कार्यालयही सज्ज करण्याचीही तयारी सुरू आहे. नाशिकमध्ये सेंट्रल एक्साइज ऑफिसमध्ये फाइलींचे गठ्ठे, संगणक, झेरॉक्स मशिनसह रॅकचे शिफ्टिंगचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. १ जुलैपर्यंत सर्व कर्मचारी या नव्या दालनात जबाबदारी स्वीकारतील. कामटवाडा येथे सेंट्रल एक्साइजचे कार्यालय असून, त्यात ४० दालने आहेत. त्यातील सर्व कार्यालय बदलले आहेत. या कार्यालयात आयुक्तासह विविध अधिकारी व ३११ कर्मचारी आहेत. त्याचबरोबर अपील आयुक्त व ४१ कर्मचारी याच इमारतीत काम करणार आहेत. त्यामुळे आता ३५२ कर्मचारी व दोन आयुक्त या कार्यालयात काम करणार आहेत. त्याचबरोबर गडकरी चौकात इन्कम टॅक्स ऑफिसजवळ असलेल्या कार्यालयात आता ऑडिटचे आयुक्त बसतील. त्यांच्याकडे १८१ कर्मचाऱ्यांचा ताफा असेल.

असे आहेत आयुक्त

g जीएसटीसाठी केंद्रीय वस्तू व सेवाकर आयुक्त-राजपाल शर्मा

g ऑड‌िट आयुक्त - श्रीकांत पाटील

g अपील आयुक्त - मनोज कृष्णा

जीएसटीसाठी गेल्या काही दिवसांपासून आम्ही जनजागृती करून कार्यशाळा घेत आहोत. त्याचप्रमाणे कार्यालयतही आमची तयारी सुरू असून, कर्मचाऱ्यांनाही ट्रेनिंग दिले जात आहे. १ जुलैला आमचे कार्यालय जीएसटीसाठी सज्ज असणार आहे.

-राजपाल शर्मा, आयुक्त सेंट्रल एक्साइज, सर्व्हिस टॅक्स व

कस्टम ऑफिस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

$
0
0

राज्य सरकारची कर्जमाफी; जिल्ह्यातील सुमारे ६८० कोटींचे कर्ज होणार माफ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याने नाशिक जिल्हा बँकेच्या सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांचे ६८० कोटी रुपयांच्या आसपास कर्ज माफ होणार आहे. दीड लाखापर्यंत ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ९१ हजार ३३६ आहे. त्यांच्याकडे ५०० कोटी ५४ लाख थकीत रक्कम असून, ती सर्व माफ होणार आहे.

त्याचप्रमाणे दीड लाखाच्यावर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त त्यातून दीड लाख मिळणार आहे. त्याची संख्याही मोठी आहे. जिल्हा बँकेबरोबरच राष्ट्रीयीकृत व इतर बँकेतून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना २५ हजार रुपये मिळणार असून, त्याचा आकडा अद्याप आलेला नाही.

सरकारच्या कर्जमाफीचा २०१६ - २०१७ या आर्थिक वर्षात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.

जिल्हा बँकेने या काळात तब्बल १,७१९ कोटी १८ लाख रुपये कर्ज वाटप केले. ते एकूण उद्दिष्टांपैकी ३४२ कोटींनी जास्त होते. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार असून, यामुळे ९० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्जदेखील माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांना २५ हजार रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. जे शेतकरी ३० जूनपर्यंत कर्ज

भरतील त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे.

सरकारने २०१७ पर्यंत जर सरसकट कर्जमाफी केली असती तर जिल्ह्यातील अल्प, मध्यम, बहुभूधारक अशा जिल्हा बँकेच्या ३ लाख ६० शेतकरी सभासदांना फायदा झाला असता. पण सरकारने जून २०१६ पर्यंतच ही कर्जमाफी केल्याने सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांनाच तो

मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीतील अमरधामला समस्यांचा विळखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गणेशवाडीच्या दक्षिणेला बांधण्यात आलेल्या पंचवटी अमरधामची दुरवस्था वर्षानंतरही कायम आहे. वर्षभरात या अमरधाममध्ये कोणत्याच प्रकारची सुविधा देण्यात आली नाही. तसेच येथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न झालेला नाही. चोरीला गेलेल्या लोखंडी जाळ्या, प्रवेशद्वाराजवळ साचलेला कचऱ्याचा ढिगारा, पाणी वाहून नेण्यासाठी बांधलेल्या गटारी तुंबलेल्या, ढापे गंजलेले अशा विविध समस्यांनी पंचवटी अमरधामला ग्रासले आहे.

पंचवटी अमरधाममध्ये असलेल्या नऊ बेडपैकी पहिल्या आणि नवव्या बेडच्या जवळच्या लोखंडी जाळ्या भुरट्या चोरट्यानी चोरून नेल्या आहेत. या जाळ्या पुन्हा बसविण्याची तसदी घेण्यात आली नाही. चौथ्या बेडच्या जवळच्या पायऱ्यांच्या फरशा उखडून निघाल्या आहेत. प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचा ढिगारा नित्याचा झाला आहे. पाण्याच्या टाकीलगत असलेल्या गटारीतही कचरा आणि प्लास्टिक पिशव्या साचल्याने पाणी तुंबले आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
अमरधाममध्ये अत्यंविधीप्रसंगी अनेक लोकप्रतिनिधी येत असतात. त्यांचेही या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या समस्या वर्षभरानंतरही तशाच आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुंदीकरणात ‘खासगी’ अडथळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालक व रहिवाशांनी गंगापूररोड रुंदीकरणाची मागणी केली होती. यानंतर रस्त्यात येणाऱ्या वृक्षांचा अडथळा महापालिकेने न्यायालयाच्या आदेशावरून दूर केला होता. परंतु आता रस्ता रुंदीकरणात खासगी शिक्षण संस्थेच्या जागेचा अडथळा आला आहे. याबाबत महापालिकेने वेळोवेळी खासगी संस्थेला रस्त्यासाठी जागा देण्याबाबत पाठपुरावाही केला होता. खासगी संस्थेने मात्र रस्त्यासाठी जागाच दिली नसल्याने अरूंद रस्त्यावरून वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका आयुक्तांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी गंगापूररोडवरील रहिवाशांनी केली आहे.

उद्योजक, व्यावसायीक, सरकारी अधिकाऱ्यांसह अनेकांची आवड गंगापूररोडला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत झपाट्याने गंगापूररोडची लोकवस्ती वाढली आहे. वाढत्या लोकवस्ती गंगापूररोडचा रस्ता रुंदीकरणा करण्यात यावा, अशी सातत्याने मागणी केली जात होती. परंतु रस्त्यात येणाऱ्या वृक्षांच्या अडथळ्यांमुळे रस्ता रुंदीकरण होऊन देखील वाहनचालकांना वृक्षांच्या अडथळा सहन करावा लागत होता. यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने रस्त्यात येणाऱ्या वृक्षांचा अडथळा दूर केला खरा. परंतु अनेक ठिकाणी रुंदीकरणासाठी जागाच खासगी मालकांनी दिल्या नसल्याने महापालिकेचे अडचण झाली आहे. यात एका नामांकीत शिक्षण संस्थेने रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिली असताना रस्त्यासाठी मात्र जागाच दिली नसल्याने अरूंद रस्त्यावरून वाहनचालकांना कसरत करून वाहने चालविण्याची वेळ आली आहे.

रहदारीवर परिणाम

गंगापूर रोडवर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडते. रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळे आल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक ठिकाणी खासगी जागांचे हस्तांतरण अजून बाकी आहे. त्यामुळे या भागात रस्त्याच्या कडेला असलेली वाहने आणि रस्त्यावरील वाहनांमुळे रोजच वाहतूक कोंडी होते.

दुभाजक टाकण्यात अडथळे

बेंडकुळे मळ्यापासून गंगापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठीही खासगी मालकांनी जागा न दिल्याने दुभाजक टाकण्यात अडथळे आले. यामुळे नेहमीच रहदारी असलेल्या गंगापूररोडवर वाहनचालकांना कसरतीचा सामना करण्याची वेळ येत आहे. महापालिका आयुक्तांनी खासगी जागा मालकांची स्वतंत्र बैठक घेत रस्ता रुंदिकरणासाठी जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांसह रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायकलवारीचे पंढरपुराकडे प्रस्थान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्टच्या पंढरपूर सायकलवारीने शुक्रवारी सकाळी विठूनामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान केले. भरत सोनवणे व रामचंद्र गावित हे त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तिनाथांच्या चरणी माथा टेकवून भगवा ध्वज नाशिकला घेऊन आले. त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी भगवा झेंडा दाखविल्यानंतर गोल्फ क्लब मैदानावरून सायकलिस्ट पंढरपूरकडे रवाना झाले.

यावर्षी प्रथमच वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज, रविवारी (दि. २५) रोजी सायकलचा रिंगण सोहळा रंगणार आहे. पंढरपूरजवळच्या खेडलेकर महाराज आश्रमाच्या मैदानात हा सोहळा होणार असून, तो अनुभवण्याची उत्सुकता वारीमध्ये सहभागी सायकलिस्टमध्ये दिसून आली. वारीचे संकल्पक आयपीएस अधिकारी हरीश बैजल आपल्या दोन मुलांसह वारीत सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई येथील एसीपी रवींद्र क्षीरसागर, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसीपी वाल्मीक पाटील, ठाणे शहर येथील एसीपी कन्हय्या थोरात, ठाणे आरटीओचे नीलेश धोटे यात सहभागी झाले आहेत. अहमदनगर, पुणे, मुंबईसारख्या महानगरांतूनही सायकलिस्ट वारीमध्ये सहभागी होणार आहेत. या वारीत सहभागी झालेल्या साडेचारशेहून अधिक सायकलिस्ट वारकऱ्यांना विठ्ठलभेटीची आस लागली आहे. त्यामुळे ३८ अंश तापमानातही सर्व सायकलिस्टने उत्साहात सायकलवारीचा पहिला टप्पा पार केला. लोणी गावाजवळील अतिशय जुन्या अशा २० ते ३० वडाच्या झाडांजवळ नंदनवनात विश्रांती घेताना सायकलिस्टचा सर्व थकवा निघून गेल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली.

--

सिन्नरमध्ये जोरदार स्वागत

सिन्नर सायकलिस्टने पंढरपूर सायकलवारीचे सिन्नरमध्ये जोरदार स्वागत केले. दांडेकर कॉलेजच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी यांनी सिन्नर शहरातून सहाव्या सायकलवारीसाठी सहभागी झालेल्या सायकालिस्टचे स्वागत केले. पुढच्या वर्षी होणाऱ्या वारीसाठी सिन्नर शहरातून शंभरहून अधिक सायकलिस्टने सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, नगराध्यक्ष किरण डांंगळे, दांडेकर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सोनखासकर, नगरसेवक रामभाऊ लोणारे, वारीत सहभागी झालेले सिन्नर सायकलिस्टचे अध्यक्ष डॉ. संदीप मोरे, मुकेश चव्हाणके आदी उपस्थित होते.

--

सायकलवारी टेंभुर्णीत...

सायकलवारी शनिवारी दुसऱ्या दिवशी टेंभुर्णीत पोहोचली आहे. या वारीच्या अखेच्या टप्प्यात पंढरपूरच्या खेडलेकर महाराज पटांगणात सायकल रिंगण सोहळा रंगणार आहे. पहिल्यांदाच होणाऱ्या या सायकल रिंगण सोहळ्यात सुमारे ४०० सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. त्यात ५० लहान मुलांचा समावेश राहणार आहे. या सर्वांना रिंगण सोहळ्याची अनुभूती घेण्याची संधी मिळणार आहे. सोहळ्याची तयारी ​​करण्यासाठी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी आणि त्यांची कृती स​​मिती प्रयत्न करीत आहे.​​ पर्यावरणरक्षणाचा संदेश देत सायकलवारीत सहभागी लहान मुलांनी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांत स्वच्छता व पर्यावरणाबाबत जनजागृती केली.

--

यंदाची प्रमुख वैशिष्ट्ये

-खेडलेकर महाराज पटांगणात रंगणार सायकल रिंगण

- ‘शून्य कचरा, शून्य प्लास्टिक’ची अंमलबजावणी

-वय वर्षे ८ पासून ७० वर्षीय वारकरी सहभागी

-मुंबई, पुणे, ठाणे शहरातून येणार सायकलिस्ट वारकरी

-वैद्यकीय व्यवस्था सेवेस राहणार तत्पर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाऊचा डबा बनवा ‘पौष्टिक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळा नवीन वर्षासह नुकत्याच सुरू झाल्या असून, चिमुकल्यांना रोज डब्यात काय द्यायचे, हा प्रश्नदेखील नव्याने त्यांच्या आईसमोर उभा राहिला आहे. हा प्रश्न मिटविण्यासाठी व चविष्ट, पण आरोग्यदायी खाऊच मुलांना मिळावा यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ‘आरोग्यदायी आणि चविष्ट खाऊचा डबा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पौष्टिक पिझ्झा, स्पिनॅच रोज, नॅचोज असे चिमुकल्यांच्या आवडीचे वेगवेगळे, पण पौष्टिक पदार्थ व शाळेच्या डब्यात देता येतील असे पदार्थ शिकण्याची संधी आज, रविवारी (दि. २५) मिळणार आहे. वैविध्यपूर्ण, रुचकर आणि चिमुकल्यांना आवडणारे पदार्थ या कार्यशाळेत शिकविले जाणार आहेत.

ही कार्यशाळा दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार असून, प्रिया करंदीकर यामध्ये खाऊचा पौष्टिक डबा बनवायला शिकविणार आहेत. कल्चर कल्ब सदस्यांना २०० रुपये, तर इतरांना ४०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पी अॅण्ड टी कॉलनी, हॉटेल सिबलजवळ, त्र्यंबकरोड ही कार्यशाळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदिवानही करणार कॅशलेस व्यवहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांना कॅशलेस व्यवहार करता यावेत यासाठी लवकरच स्मार्ट कार्ड योजना राबविली जाणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी दिली. एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या या योजनेमुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील ३२०७ बंदिवानांना कॅशलेस व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे.

डिजिटल इंडिया हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. या योजनेद्वारे नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. याच उद्देशाने नाशिकरोड कारागृहातील सर्व बंदिवानांना एचडीएफसी बँकेचे स्मार्ट कार्ड लवकरच देण्याचे नियोजन कारागृह प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ३०८७ पुरुष व १२० महिला बंदी आहेत.

--

कँटीनमध्ये कॅशलेस खरेदी

या अभिनव योजनेमुळे मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांना दरमहा अडीच हजार रुपयांपर्यंतची खरेदी कारागृह कँटीनमध्ये करता येणार आहे. कार्ड स्वाइप करून बंदिवान खरेदी करू शकतील. या सुविधेसाठी प्रत्येक बंदिवानांकडून वार्षिक दीडशे रुपये कर आकारणी केली जाणार आहे. शासनाच्या निर्देशांनुसार ही योजना राबविली जात आहे.

--

वेळेची होणार बचत

कारागृहातील बंदिवानांना खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे मिळविण्यासाठी सध्या अत्यंत क्लिष्ट अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. फोन करण्यासाठी पाच रुपये मिळविण्यासाठीदेखील बंदिवानांचा व प्रशासनाचा मोठा वेळ खर्च होत असे. परंतु, कॅशलेस सुविधेमुळे आता वेळेची बचत होणार आहे.

--

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सर्व बंदिवानांना कॅशलेस व्यवहार करता यावेत यासाठी त्यांना स्मार्ट कार्ड देण्याची शासनाची योजना आहे. या योजनेमुळे बंदिवानांसह प्रशासनाच्या वेळेच्या बचतीसह प्रशासकीय मनुष्यबळाचीही बचत होण्यास मदत होईल.

-राजकुमार साळी, अधीक्षक, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंग‍ळेंचा फैसला मंगळवारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात १३ संचालकांनी अविश्वास ठरावाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. सहकार कायद्यानुसार पंधरा दिवसाच्या आत बाजार समितीची सभा बोलावून सभापतींची निवड करावी लागणार आहे, असे असले तरी मंगळवार (दि. २७) रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे बाजार समितीच्या संचालकांच्या संदर्भात सुनावणी होणार आहे. त्यात काय निर्णय होईल, संचालक मंडळ बरखास्त होईल की नाही, पुन्हा निवडणुका होतील काय, अशा चर्चांना उधाण आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम हडप करण्याच्या आरोपामुळे अडचणीत असलेल्या पिंगळे यांचे बाजार समितीचे सत्तास्थान आता हा ठराव मंजूर झाल्यास हातातून जाणार आहे. मासिक सभांमध्ये विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा न करता अन्य विषय इतिवृत्तात घुसविण्यात आल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. बाजार समितीच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. स्वतःच्या प्रसिध्दीसाठी जाहिरातींवर बाजार समितीच्या पैशांची उधळपट्टी केली आहे. बाजार समितीवरील १२१ कोटी रुपयांच्या कर्जांपैकी राज्य सरकारी बँकेने सामोपचार परतफेड योजनेत ४४ कोटी रुपये माफ केले होते. त्यामुळे ७७ कोटी रुपये ३० जून २०१४ पर्यंत भरणे आवश्यक होते. पण, ही रक्कम फेडण्यास चालढकल केल्याने ४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले असे संचालक म्हणणे असल्याने अविश्वास ठराव आणण्यासाठी १३ संचालकांनी विशेष सभा बोलावण्याची विनंती केली आहे.बाजार समितीच्या या घडामोडींकडे सत्ताधारी स्थानिक आमदारांनी लक्ष घातल्याची चर्चा होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगीदेवी मंदिर आजपासून खुले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

संरक्षक जाळीत दगड अडकल्याने सप्तशृंग गडावरील (ता. कळवण) येथील श्री सप्तशृंगदेवी मंदिर २१ जूनपासून बंद करण्यात आले होते. हे दगड काढण्याचे काम पूर्ण झाले असून, मंदिर रविवारपासून (२५ जून) पूर्ववत खुले होणार आहे. मात्र, हे मंदिर पहाटे साडेपाच ते रात्री साडेनऊपर्यंतच खुले राहणार आहे.

मंदिर खुले करण्याबाबतचे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी व देवस्थानला पाठविले आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या शक्तिपीठाची महती असलेल्या सप्तशृंगीदेवी मंदिर परिसरात १२ जून रोजी लहान-मोठे अनेक दगड कोसळले होते. मात्र, संरक्षक जाळीत हे दगड अडकल्यामुळे धोका टळला. अद्याप दुसऱ्या टप्प्यातील थांबलेले संरक्षक जाळीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे. जाळीत अडकलेल्या एका दगडाचे वजन अडीच टन होते, तर एक दगड ७०० किलो वजनाचा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images