Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दिवसभरात चार शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

$
0
0

शेतकरी आत्महत्येचा आकडा ५३ वर

टीम मटा

कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चांदवड तालुक्यात दोन, तर मालेगाव व बागलाण तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. कर्जबाजारीपणामुळे बोराळे (ता. चांदवड) गावातील एका शेतकऱ्याने वीज प्रवाहाची तार पकडून, तर वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथील एका शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून आत्महत्या केली.

चांदवड तालुक्यात २० जून रोजी एका शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले. त्याचा अहवाल २१ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला. शिऊर येथील कचरू पुंजा आहेर (वय ६५) यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मुलाच्या नावे विविध कार्यकारी सोसायटीचे तीन लाखांचे कर्ज आहे. बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे हरिश्चंद्र वसंत आहिरे या शेतकऱ्याने बुधवारी सकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिली. या शेतकऱ्यावर देखील कर्ज असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

वीज तार पकडून आत्महत्या

मनमाड : चांदवड तालुक्यातील बोराळे येथील ३२ वर्षीय तरूण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून वीज प्रवाहाची तार हातात पकडून मंगळवारी (दि. २०) रात्री आत्महत्या केली. आप्पासाहेब खंडेराव जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आप्पासाहेब जाधव यांच्यावर बोराळे येथील विविध विकास सोसायटीचे सन २०१० पासून ५० हजार रुपयांचे कर्ज होते. सततच्या नापिकीनंतर थकबाकी वसुलीसाठी सोसायटीने जप्तीची नोटीस पाठवल्याने जाधव हादरून गेले होते. या चिंतेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. वडनेर भैरव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

वडनेर खाकुर्डीत स्वतःचीच रचली चिता

वडनेर खाकुर्डी येथील वयोवृद्ध शेतकऱ्याने स्वतःची चिता रचून मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. सुपडू भिका पवार असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर सावकारी तसेच हात उसनवारीचे दोन लाख रुपये व पत्नी सखुबाई सुपडू पवार हिच्या नावे सोसायटीचे ८० हजार रुपयांचे सन २०१२ पासूनचे कर्ज होते. या कर्जबाजारीपणाला कंटाळून सुपडू पवार यांनी घराच्या पाठीमागे स्वतःची चिता रचून व अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. दरम्यान, ही घटना गावातीलच एका तरुणाने बघितल्याने त्याने आरडाओरड केल्याने समोर आली. मात्र तोपर्यंत सुपडू पवार (वय ७५) हे ८० ते ९० टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंब्रिजमध्ये आरटीई पुन्हा राबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हक्क योजनेमध्ये घोळ केल्याप्रकरणी अखेर केंब्र‌जि शाळा व्यवस्थापनाने मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, तरीही ‘आरटीई’ प्रक्रिया नव्याने राबवावी या मागणीवर पालक मात्र ठामच आहेत.
नाशिक केंब्र‌जि स्कूलमध्ये झालेल्या आरटीई प्रवेशांतर्गत घोळानंतर महिनाभरापासून धुमसणाऱ्या वादावर अखेरीस तोडगा निघाला. शाळेच्या विश्वस्तांनी याप्रकरणी चौकशी करत दोषारोपांचा ठपका ठेवलेल्या मुख्याध्यापकांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, यामुळे हा प्रश्न संपेलच अशी चिन्हे नाहीत. या निलंबनाच्या कारवाईने काही प्रमाणात पालकांचा रोष शांत होणार असला, तरीही वादात सापडलेली आरटीई प्रक्रिया नव्याने पुन्हा राबविण्यात यावी, अशी पालकांची मागणी आहे. यासाठी मनपा प्रशासनाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडेही पालकांनी हा प्रस्ताव मांडला आहे.
पालकांच्या जागरूकतेमुळे हे प्रकरण उजेडात आल्यानंतर शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीच्या चौकशीदरम्यानही शाळेची बाजू दोषी असल्याचे अधोरेख‌ति झाले. याप्रकरणी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना शाळेला केल्या होत्या. यानुसार शालेय व्यवस्थापनानेही अंतर्गत चौकशी करत सद्यःस्थितीत मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
सन २०१६- २०१७ च्या आरटीईअंतर्गत प्रवेशातील ८९ विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या आरटीई अंतर्गत सुमारे ५८ विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यापैकी बहुतांश प्रवेशांसाठी बोगस कागदपत्रांचा वापर झाला असल्याचीही बाब पालकांच्या आरोपातून समोर आली होती. दरम्यान, मुख्याध्यापक सोमू नादेर यांच्यावर शालेय व्यवस्थापनाने केलेल्या कारवाईची माहिती मनपाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना शाळेच्या वतीने पत्रान्वये कळविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे उघड झालेला शाळांचा बनावटपणा शोधण्यासाठी आता मनपा शिक्षण समितीच्या वतीने सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे.
फेरप्रक्रिया हवीच
शिक्षण विभागासोबतच शाळेनेही या प्रकरणाची गांभीर्याने घेतलेल्या दखल भूमिकेबाबत पालकांनी या कारवाईचे स्वागत केले असले, तरीही फेरप्रक्रियेशिवाय हे प्रकरण थांबणार नाही, असाही इशारा पालकांनी दिला आहे. आरटीईचे प्रवेशे पारदर्शी नसल्याचे पालकांचे म्हणणे असून, या शाळेमध्ये आरटीईची प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी, या मागणीवर पालक ठाम आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगाच्या माध्यमातून होतो परिपूर्ण व्यायाम

$
0
0

धुळे : चांगले आरोग्य उत्तम वरदान आहे. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायामात परिपूर्ण योग व्यायाम आहे. तसेच प्रत्येकाने योग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.

बुधवारी (दि. २१) जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा पोलिस कवायत मैदानावर विश्व योग दिन संयोजन समिती व जिल्हा प्रशासनातर्फे सकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी मंत्री डॉ. भामरे बोलत होते. प्रसंगी महापौर कल्पना महाले, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण, महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, चंद्रकांत केले, रवी बेलपाठक, अनुप अग्रवाल, संदीप बेडसे, ओमप्रकाश खंडेलवाल, राजेश वाणी, संतोष अग्रवाल आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ. भामरे म्हणाले, योग विद्येस तीन हजार वर्षांची परंपरा असून, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत योगविद्या पोहोचली आहे. योगाच्या माध्यमातून शरीर व मनाचा सर्वांगीण व्यायाम होतो. त्यामुळे योग जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. नियमितपणे योगाभ्यास केला पाहिजे. त्यामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहण्यास मदत होईल, असेही मंत्री डॉ. भामरे यांनी नमूद केले. यावेळी उदघाटन सोहळ्यानंतर योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. त्यात उपस्थित सर्व मान्यवर सहभागी झाले होते. याशिवाय नागरिक, प्रशिक्षणार्थी पोलिस, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जितेंद्र भामरे यांनी योग प्रात्यक्षिकांचे संचलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतप्त महिला धडकल्या पालिकेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनीत देशी-विदेशी दारू किरकोळ विक्रीचे दुकान सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे परिसरातील महिलांनी सटाणा पालिकेवर मोर्चा काढला. मद्य विक्री दुकानासाठी सटाणा शहरात कोठेही परवानगी देऊ नये अशी मागणी करून मुख्याधिकारी हेमलता डगळे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांना खडे बोल सुनावले आहेत. या मोर्चात नगराध्यक्ष मोरे यांच्या पत्नीही सहभागी झाल्या होत्या.

इंद्रप्रस्थ कॉलनीत देशी-विदेशी दारू किरकोळ विक्रीबाबत पालिकेने ना हारकत दाखल्यासाठी वर्तमानपत्राद्वारे हरकती मागविल्या असता या परिसरातील वास्तव्यास असणाऱ्या महिलांनी यावर आक्षेप घेतला आहे.

दरम्यान पालिका प्रशासनाने प्रशासकीय कामकाज म्हणून हरकती मागविल्या असून, पालिकेतील नगरसेवक, नगरसेविकांचा मद्य विक्रीला विरोध असेल, असा शब्द नगराध्यक्ष मोरे यांनी मोर्चेकऱ्यांना दिल्यानंतर महिलांनी समाधान व्यक्त केले.

राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्याआत मद्य विक्री दुकाने थाटण्यास न्यायालयाने बंदी घातल्यामुळे शहरातील सर्वच दारू दुकाने व बार बंद आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नव्याने दुकान थाटण्यासाठी पालिकेकडे मालेगाव येथील किरण पाटील यांनी मागणी केली होती. या अनुषंगाने पालिकेने स्थानिक वृत्तपत्रात ना हाकरत दाखल मागण्यासाठी जाहीर नोटीस प्रकाशित केली होती.

त्यामुळे या परिसरात वास्तव्यास असलेले नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगीता मोरे, उपनगराध्यक्ष निर्मला भदाणे, नगरसेविका डॉ. विद्या सोनवणे, अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे यांच्यासह परिसरातील महिला व पुरुषांनी पालिकेवर मोर्चा काढला. महिलांनी मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच संपूर्ण सटाणा शहरात मद्य विक्री दुकाने थाटण्यास सबंधित महिलांनी तीव्र आक्षेप घेत पालिका प्रशासनाला एकमुखी ठराव करण्याची सूचना केली. उषा सोनवणे, प्रमिला सोनवणे, साधना खैरनार आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठ दिसणार निर्मळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीतील स्वच्छतेसोबतच महापालिकेने नदीच्या काठावरील परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. गोदावरीत प्रदूषण रोखण्यासाठी ५० सुरक्षारक्षकांची नियुक्ती केल्यानंतर गोदाकाठाच्या ५० मीटर परिसरातील स्वच्छतेसाठी स्वतंत्रपणे ६५ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. होळकर पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंतच्या स्वच्छतेची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी तीन गस्तीपथकेही स्थापन करण्यात येणार असून, त्यांना दंड करण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत.

हायकोर्टाने फटकारल्यानंतर महापालिकेने गोदावरीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे. गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना आधीच करण्यात आली आहे. सोबतच गोदावरीत अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ५० सुरक्षा कर्मचारी नियुक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रदूषण करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नदीपात्रात गाड्या धुणे, कपडे धुणाऱ्यांसह निर्माल्य टाकण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. आता काठावरील परिसरही स्वच्छ राहण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. नदीकाठचा ५० मीटर दोन्ही बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे ६५ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांकडून दोन पाळीत नदीकाठावरील परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांसोबतच चार मुकादम आणि चार स्वच्छता निरीक्षकही नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्याकडे फक्त गोदाकाठावरील स्वच्छतेचे काम दिले जाणार आहे.

तीन गस्तीपथके

गोदाकाठावर अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तीन गस्तीपथके स्थापन करण्यात येणार आहेत. चार सुरक्षा कर्मचारी आणि एक पालिकेचा कर्मचारी त्यात असेल. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

फक्त २८ जणांवर कारवाई

गोदावरी पात्रात प्रदूषण करणाऱ्या २८ जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. नदीपात्रात गाड्या धुणे, कपडे धुणे आणि कचरा टाकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

गुणवत्ता दररोज तपासणार

नाशिक ः गोदावरीच्या स्वच्छतेसोबतच महापालिकेने आता गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी गंगेच्या धर्तीवर गुणवत्ता तपासणी यंत्र बसवण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या सल्ल्यानुसार प्रदूषण नियंत्रणासाठी गोदावरीच्या पाण्याच्या दररोज नऊ प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. या तपासण्यांतून पाण्यातील प्रदूषणाची पातळी दररोज तपासली जाणार आहे. पाण्याचा बीओडी कमी करण्यासंदर्भातील उपाययोजना केल्या जाणार आहेत. या यंत्रखरेदीच्या निविदा दोन दिवसांत काढल्या जाणार असून, दोन मह‌िन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाण्याची प्रदूषण पातळी आता रोज समजणार आहे.

गोदावरी नदीच्या अस्वच्छतेसोबत गोदावरीचे पाणीप्रदूषण हा पालिकेसमोरचा गंभीर विषय आहे. गोदावरीच्या प्रदूषणावरून पर्यावरणप्रेमींनी थेट हायकोर्टात धाव घेतली होती. गोदावरीच्या पाण्याचा बीओडी हा सर्वसाधारणपणे १० च्या आत असणे आवश्यक असतांना तो ३०च्या वर गेला होता. त्यामुळे हायकोर्टाने महापालिकेसह सरकारला फटकारले होते. म्हणून पालिकेने गोदावरीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केले आहे. गोदावरी नदीतील अस्वच्छता कमी करण्यासह पाणी प्रदूषणाची पातळी कायम राखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता रोज तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एक गुणवत्ता तपासणी यंत्र (रिव्हर वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग मशीन) खरेदी केले जाणार आहे.

या गुणवत्ता तपासणी यंत्रात विविध प्रकारच्या नऊ तपासण्या केल्या जाणार आहेत. त्यात पाण्याचा बीओडी तपासणे, रासायनिक द्रव्यांचे प्रमाण, टोटल सस्पेंड क्वॉलिटी, रंग, तापमान, ऑईल आणि ग्रीस, अमोनियम नायट्रोजनचे प्रमाण, ऑक्स‌िजनचे प्रमाण यांचा समावेश आहे. यासाठी निविदा काढल्या जाणार असून, दोन महिन्यांत या यंत्राची खरेदी केली जाणार आहे. गोदावरीच्या आठ किलोमीटर परिसराचा अभ्यास करून एका निश्चित ठिकाणी हे यंत्र बसवले जाणार आहे. त्या ठिकाणी गोदावरीच्या पाण्यातील प्रदूषणाची पातळी दररोज समजणार आहे. इतर ठिकाणचेही पाणी आणून त्याची प्रदूषण पातळी तपासता येणार असल्याने या यंत्राचा गोदावरीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा होणार आहे.


गंगा पॅटर्न

गंगा नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाची ओरड झाल्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाचा अभ्यास करण्यासह उपाययोजनांसाठी गंगेत गुणवत्ता तपासणी यंत्र बसवले होते. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने गंगा नदीत दहा ठिकाणी अशी यंत्रे बसवली आहेत. त्याचा अभ्यास करून गंगेच्या पाण्याची प्रदूषण पातळी कमी करून बीओडी कमी करण्यात यश आले आहे. त्यामुळे हाच पॅटर्न गोदावरीसाठीही वापरला जाणार असून, गोदावरीच्या प्रदूषण पातळी रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची वेतनप्रतीक्षा संपणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गेल्या चार-पाच महिन्यांपासून स्वतःच्या हक्काच्या वेतनापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा येत्या आठवड्यात संपणार आहे. त्यासाठी आयडीबीआय बँकेमध्ये शिक्षकांची खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील मुख्याध्यापक व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे संयुक्त खाते तयार करण्याची प्रक्रिया बुधवारी राबविण्यात आली. रावसाहेब थोरात सभागृहात दोन सत्रांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. आयडीबीआय बँकेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
एनडीसीसी बँकेत वर्षानुवर्षे खाते असलेल्या शिक्षकांना गेल्या काही महिन्यात वेतन न मिळण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले. बँक हप्ते, आजारपण अशा अनेक बाबींचा सामना त्यांना करावा लागला. त्यामुळे लवकरात लवकर खाते राष्ट्र‌यिीकृत बँकेतच उघडावे, अशी मागणी त्यांनी विविध आंदोलने, मोर्चा यातून केली होती. या मागणीला यश येत आयडीबीआय बँकेत शिक्षकांचे खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या बँकेच्या शाखा तालुक्यात, ग्रामीण भागात नसल्याने शिक्षकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, बँकेकडून मिळत असलेल्या जादा सुविधा व बँक कर्मचाऱ्यांचे सहाय्य यामुळे शिक्षकांनी या बँकेला हिरवा कंदिल दाखवला आहे. बुधवारी पहिल्या सत्रात नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, सिन्नर या तालुक्यांमधील तर दुसऱ्या सत्रात मालेगाव, येवला, चांदवड, देवळा, निफाड, बागलाण, कळवण येथील मुख्याध्यापकांचा यात समावेश होता. मुख्याध्यापकांनंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खातेप्रक्रिया शाळांमध्ये राबविली जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी नितीन उपासणी, एस. जी. मंडलिक, आर. सी. पाटील, गणेश फुलसुंदर, सुनिता धनगर हे शिक्षण विभागातील अधिकारी तर आयडीबीआय बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक अखिलेश मिश्रा, विभागीय अधिकारी चंद्रशेखर जाधव, गंगापूर रोड शाखा प्रमुख हर्षद बरजे, शाखा प्रबंधक नीलेश जाधव उपस्थित होते.
या सुविधांचा लाभ
झिरो बॅलेन्स अकाऊंट, पाच लाख रुपयांचा मोफत विमा संरक्षण, निव्वळ वेतनाच्या पाच पट ओव्हरड्राफ्ट सुविधा, एका कुटुंबातील सदस्यांसाठी झिरो बॅलेन्स अकाऊंट, मोफत आंतरराष्ट्रीय गोल्ड एटीएम डेबिट कार्ड, रोख रक्कम काढणे आणि खरेदीची मर्यादा ७५ हजार रुपये प्रतिदिन, दरमहा आयडीबीआय बँक एटीएमव्यतिरिक्त इतर बँक एटीएमवर २५ व्यवहार विनामूल्य, दरमहा मोफत अमर्यादित मागणी ड्राफ्ट, दरमहा २० मोफत आरटीजीएस/ एनइएफटी, कोणत्याही आयडीबीआयच्या शाखेत बँकिंग सुविधा.

नाराज शिक्षक संघटनांची आज वाघ शाळेत बैठक
आयडीबीआय बँकेत खाते उघडण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने या प्रक्रियेला निराशेची किनार आहे. या संदर्भातील आक्षेप नोंदविण्यासाठी शहर व जिल्ह्यातील काही शिक्षक संघटनांनी आज (२२ जून) सकाळी ११ वाजता वाघ गुरूजी शाळेमध्ये बैठक आयोजित केली आहे.
जिल्हाभरातून सुमारे १८ हजार शिक्षकांची खाती आयडीबीआयच्या नाशिकमधील गंगापूर रोड शाखेत उघडावीत, असे फर्मान बँकेने काढले आहे. अगोदरच एसबीआय किंवा महाराष्ट्र बँक या राष्ट्रीय बँका अपेक्षित असताना ही खाती आयडीबीआयमध्ये हलविण्यात आल्याने बहुतांश शिक्षकांमध्ये नाराजी आहे. जास्त सेवा देणारी बँक देण्याऐवजी जास्त शाखा असणाऱ्या बँकेची गरज शिक्षकांमधून बोलून दाखविली जात आहे. या नाराजीत आणखी भर म्हणून शिक्षकांची ही नवीन खाती काढण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अगोदरच्या टप्प्यात मुख्याध्यापकांचे खाते उघडण्यात येत असून या पाठोपाठ इतरांच्या खात्यांसाठी शाळेतूनच अर्ज भरून घेतले जाणार आहेत. अनेक अवांतर कामांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उपयोग शासनाकडून केला जातो. या टप्प्यात चार महिन्यांपासून शिक्षकांचेच वेतन अडकल्याने ते हवालदिल झाले आहेत. या स्थितीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून बँकेने ही खाती उघडण्यासाठी मदत घेतल्यास सहकार्याची तयारी शिक्षक संघटनांनी दाखविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायखेडा पुलाच्या दोन्ही बाजूला कमान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील गोदाकाठची ४० ते ५० गावे जोडणाऱ्या आणि सिन्नर व पुणे जाण्यासाठी सोईचा मार्ग असलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीवरील धोकादायक पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पुलावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी दोन्ही बाजूला कमान बांधण्यात येत आहे. सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश पाटील यांनी सांगितले.

गोदावरीच्या महापुरामुळे अनेकदा या पुलावरून पाणी जात असल्याने पावसाळ्यात वाहतूक बंद करण्याची वेळ येते. पुलाजवळून अवैध वाळू उपसा केला जात असल्यामुळे या पुलाच्या पिलरचा पाया खचला होता. त्यामुळे या पुलाचे ९ पैकी ३ गाळे हे तरंगत्या अवस्थेत आहे. नवीन पुलासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे पुलाच्या दुरुस्तीसाठी सरकारने साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आहेत.

अवजड वाहनधारकांना नाशिककडे जाण्यासाठी करंजगाव-कोठुरे, नायगाव, हिवरगावमार्गे पर्यायी व्यवस्था आहे. मात्र यामुळे १५ ते २० किलोमीटरचा फेरा वाढणार आहे. सध्या पावसाळा सुरू असून, सालाबादाप्रमाणे गोदावरीला पूर आला, तर दुरुस्तीकामात खोळंबाही होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगीचे दर्शन ‘ऑफलाइन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तालुक्यातील श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील भगवती मंदिराभोवतीच्या जाळ्यांमध्ये अडकलेले दरडीचे दगड बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्पेन व उत्तराखंड येथून आलेली यंत्रणा हे काम करीत आहे. प्रशासनातर्फे बुधवारपासून (दि. २१) २७ जूनपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गड प्रशासनाने गेल्या चार वर्षांपासून सुरू केलेले ऑनलाइन दर्शनाची सेवाही सध्या बंद असल्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला आहे. तसेच दरड बाजूला करण्याचे काम ३ ते ४ दिवसातच मार्गी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१२ जून रोजी सप्तशृंग गडावर भगवती मंदिर परीसरात व उतरत्या पायरीच्या बाजूला दरड कोसळली होती. दरडीचे दगड सुरक्षेसाठी बसविलेल्या संरक्षक जाळ्यांमध्ये अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, मेकॅबरी कंपनीच्या तंत्रज्ज्ञांनी घटना स्थळाची पाहणी करून पडलेली दरड उतरविण्यासाठी तातडीने काम हाती घेतले आहे.

सगळ्यांनी पुढाकार घ्यावा

राज्याच्या पर्यटन विभागाने गडावरील दरड प्रतिबंधात्मक जाळीच्या संपूर्ण कामासाठी पुढाकार घ्यावा. आपत्ती व्यवस्थापन विभाग व देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून का होईना गडावरील हा धोका कायमस्वरूपी टळावा म्हणून हा प्रश्न मार्गी लागायला हवा. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका जास्त असतो, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

पहिल्या पायरीजवळ भाविकांसाठी सुविधा

देशाच्या कानाकोपऱ्यातूल येणाऱ्या भाविकांचा हिरमोड होऊ नये म्हणून गडाच्या पहिल्या पायरीजवळ सप्तशृंगी मातेची दुसरी मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. तसेच मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेजही या सभामंडपात दाखविण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांना भगवतीचे डिजिटल दर्शन या काळात घडत आहे.

आणखी जाळ्या बसव‌िणे गरजेचे

सप्तशृंग गडावर संरक्षक जाळीत अडकलेल्या दगडांना काढण्याचे काम सुरू आहे. सातत्याने पडणाऱ्या दरडी व संभाव्य धोका याचा गांभीर्याने विचार झाल्यामुळे संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या. मात्र मंदिर परिसराचा १८ हजार ५०० स्केअर मीटर भागातच या जाळ्या बसव‌िल्या आहेत. मात्र अन्य भागात दरड कोसळल्यास काय होणार? ही भीती अजूनही कायम आहे. अद्यापही मंदिरावरील काही भाग व परतीचा मार्ग असा एकूण २८ हजार स्केअर मीटरच्या भागात जाळ्या बसवायला हव्यात, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

भाविकांचा हिरमोड

सप्तशृंग गड देवस्थानने आपल्या वेबसाइटवर भगवतीचे थेट लाइव्ह दर्शनाची सोय केलेली होती. अनेक भाविकांनी या वेबसाईटला भेट देवून ऑनलाइन दर्शन घेतले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची लीज लाइनअभावी ही सेवाही सध्या बंद आहे. यामुळे अनेक भावि‌क निराश होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माया-मीरा संघाची आघाडी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा ब्रीज अससोसिएशन आणि मित्र विहार क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ब्रीज स्पर्धेत गोल्ड ट्रॉफीमध्ये माया मीरा संघ तर सिल्व्हर ट्रॉफीमध्ये बोरिवली स्पोर्ट्स आघाडीवर आहेत.

या स्पर्धेच्या अंतिम दिवशी अनुक्रमे गोल्ड ट्रॉफी, सिल्व्हर ट्रॉफी आणि आय. एम. पी. पेअर्स ट्रॉफी या तीनही गटांचे अंतिम सामने खेळविले गेले. यामध्ये गोल्ड ट्रॉफी गटात माया मीरा विरुद्ध समाधान संघ यांच्यात सुरू असलेल्या अंतिम सामन्याच्या मध्यंतरापर्यंच्या स्थितीनुसार सुकोमल दास, प्रणब रॉय, सायंतान कुशारी, सागणिक रॉय आणि बाजं मंडळ यांचा समावेश असलेल्या माया मीरा संघाने पहिल्या दिवसासारखाच खेळ करून समाधान संघावर ९८ विरुद्ध ३९ अशा ५९ गुणांची आघाडी घेऊन या स्पर्धेच्या विजेतेपदाकडे सकारात्मक पाऊल टाकले आहे. तर सिल्व्हर ट्रॉफीच्या बोरिवली स्पोर्टस क्लब आणि अमोल संघ यांच्यात सुरू असलेल्या अंतिम लढतीत चांगली चुरस बघायला मिळत आहे. मध्यंतरानंतर या दोन संघात केवळ सहा गुणांचा फरक आहे. बोरिवली स्पोर्ट्स क्लबने ४९ गुण मिळविले असून अमोल संघाकडे ४३ गुण जमा झाले आहेत.
याआधी गोल्ड ट्रॉफी गटाच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात माया मीरा संघाने आपल्या खेळात सातत्य राखत या उपांत्य लढतीतही मँगो संघावर ८३ गुणांची आघाडी घेऊन पराभूत केले आणि अंतिम फेरीसाठी आपले स्थान पक्के केले होते. तर या गटाच्या समाधान संघ आणि श्री राधेय संघ यांच्यात झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पहिल्या सत्रात चांगलीच चुरस बघायला मिळाली. दुसऱ्या सत्रात मात्र समाधान संघाने जोमाने खेळ करून या सत्रात आघाडी घेत शेवटी हा सामना २० गुणांनी जिंकून या गटाच्या अंतिम फेरीसाठी आपले स्थान पक्के केले. सिल्व्हर ट्रॉफी या गटाच्या चार डावाच्या १४ बोर्डच्या इंडियन ऑइल आणि बोरिवली स्पोर्ट्स क्लब यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या बोरिवली स्पोर्ट्स क्लबने जोमाने खेळ करून हा सामना १४ गुणांनी जिंकून अंतिम फ्री घालण्यात यश मिळविले. या गटाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमोल संघाने अग्रेसर संघाला २९ गुणांनी मात देत या गटाच्या अंत‌मि फेरीत प्रवेश केला होता.
या स्पर्धेच्या आय. एम. पी. पेअर्स गटाच्या स्पर्धेचे अंतिम सामने सकाळी ९ वाजेपासून सुरू झाला. मध्यंतरानंतरच्या स्थितीनुसार या गटात संदीप ठाकराल आणि विवेक भांड या जोडीने सहज सुंदर खेळ करून आघाडी घेत आपले आव्हान उभे केले आहे.
या स्पर्धेदरम्यान गोल्ड ट्रॉफी, सिल्व्हर ट्रॉफी जे आणि आय. एम. पी. पेअर्स या तीनही गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या संघामध्ये पाच ते आठ क्रमांकासाठी सामने खेळविले गेले. आणि या पाच ते आठ क्रमांक मिळविणाऱ्या संघांना आणि खेळाडूंना प्रमुख पाहुणे सूर्या रेड्डी, विनोद कपूर, हेमंत पांडे, श्री राजगोपाल आदींच्या पारितोषिके देण्यात आली.
यामध्ये गोल्ड ट्रॉफी गटात हेमंत जलानी, मा. शारदा, पोद्दार हौसिंग संघ आणि कोजितो संघ यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे सिल्व्हर ट्रॉफी गटात ज्युपिटर संघ, बोरिवली क्लब, त्वेम संघ आणि रहारा या चार संघांचा समावेश होता. तर आय. एम. पी. पेअर्स गटाच्या पाच ते आठ पेअर्समध्ये परिमल आणि एस. कृष्णन, एस. जी. सुर्वे आणि सहकारी, विनोद गुप्ता आणि आर. कृष्णन, सूर्या रेड्डी आणि विनय यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग प्रात्यक्षिकांनी जिल्हाभरात चैतन्य

$
0
0

टीम मटा, नाशिक

जिल्हाभरातील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांतर्फे योगासनांच्या प्रात्यक्षिकांसह विविध उपक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक संस्थांसह अन्य ठिकाणीही चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

मनमाड परिसर

छत्रे विद्यालयातर्फे महर्षी वाल्मीक क्रीडांगणावर प्रात्यक्षिके झाली. संस्थेचे पदाधिकारी दिनेश धारवाडकर, प्रसाद पंचवाघ, नाना कुलकर्णी, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे, उपमुख्याध्यापक आर. एन. थोरात, एस. व्ही. देशपांडे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला जोशी आदींच्या प्रमुख उपस्थितीत योग प्रशिक्षक सुनील ढमाले यांनी हजारो विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे धडे दिले. परिसरात अन्य संस्थांतर्फेही विविध उपक्रम झाले.

मालेगाव परिसर

मालेगाव ः मालेगाव शहर व परिसरात प्रात्यक्षिकांसह विविध उपक्रम झाले. पतंजली योग समितीतर्फे राधाकृष्ण मंदिर, टीव्ही सेंटर, मालेगाव कॅम्प येथे तीन दिवसीय योग शिबिर झाले. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, लायन्स क्लबच्या महिला सदस्या, आश्रमशाळा, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, बालविद्यानिकेतन शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संस्था, स्वामी विवेकानंद केंद्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेविका, योग विद्याधाम, क्रीडाभारती, योग्य साधक यांनी उपक्रमात सहभाग घेतला. अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, वन परिक्षेत्र अधिकारी कांबळे, विक्रीकर निरीक्षक मुळे उपस्थित होते. येथील र. वी. शाह विद्यालय, उज्ज्वल प्राथमिक विद्यालय व शिशुविहार, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, लिटल एंजल स्कूल, काकाणी विद्यालय, ल. रा. काबरा विद्यालय, गो. य. पाटील विद्यालय आदी शाळा, संस्थांमध्ये विविध उपक्रम झाले.

सटाणा, चांदवड, नांदगावला उत्साह

सटाणा ः येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे योग प्रात्यक्षिके सादर झाली. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी योगाचे महत्त्व विशद केले. राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी प्रा. तुषार खैरनार, डी. बी. ह्याळीज, सुभेदार नामदेव गुरव आदी उपस्थित होते. सटाणा परिसरात अन्य संस्थांतर्फेही विविध उपक्रम झाले.

चांदवड ः नेमिनाथ जैन संस्थेचे के. बी. जैन अभियांत्रिकी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे योगशिक्षक ए. बी. येवला यांनी योगासन प्रात्यक्षिके सादर केली. प्राचार्य डॉ महादेव कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय योग विद्या धाम चांदवड शाखा व स्वामी समर्थ अाध्यात्मिक केंद्रातर्फेही कार्यक्रम झाला. चांदवड परिसरातील नागरिकांना मोफत योग प्रशिक्षण देण्यात आले.

नांदगाव ः मविप्रच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रीडाशिक्षक प्रा. दिनेश उकिर्डे व प्रा. बी. पी. शिंदे यांनी योगाविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. आय. पटेल, उपप्राचार्य प्रा. संंजय मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. आर. टी. देवरे आणि सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

महादेवपूर शाळा

येथील जिल्हा परिषद शाळेत योग दिनानिमित्त विशेष कार्यक्र झाला. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे मुलांना लहानपणीच योगाभ्यासाचा सराव व्हावा, या उद्देशाने मान्यवरांनी मार्गदर्शनपर माहिती विशद केली.

जि. प. शाळा, शिगवे बहुला

देवळाली कॅम्प ः शिगवे बहुला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या योग प्रात्यक्षिकांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रारंभी शाळेचे क्रीडाशिक्षक संजय बोरसे यांनी मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. मुख्याध्यापिका कल्पना साळवे, बाळासाहेब टोचे, कैलास शेवाळे, माधवी साळुंखे, रत्नमाला बैरागी, संजय बोरसे आदी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा निर्यातीने मोडला विक्रम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा निफाड

मागील सात वर्षांच्या कांदा निर्यातीचा विक्रम मोडीत निघाला असून, जिल्ह्यातून प्रथमच देशातील कांदा निर्यातीमध्ये पहिल्यांदा ३५ लाख मेट्रिक टनांचा निर्यातीचा ऐतिहासिक असा विक्रम झाला आहे. जिल्ह्यातून प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होत असूनही कांदा उत्पादकांची झोळी रितीच राहत आहे. उत्पादन जास्त झाल्यामुळे दर कोसळतात त्यामुळे शेतकऱ्याला भाव मिळत नाही.

एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत देशाने ३५ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला आहे. निर्यातीचा हा आकडा 2015-16 च्या आर्थिक वर्षाच्या निर्यातीच्या तिप्पट आहे. नॅशनल अॅग्र‌िकल्चर को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९-१० आर्थिक वर्षात १८.७३ लाख मेट्र‌िक टन इतका कांदा निर्यात झाला होता.

या देशांत होते कांदा निर्यात

बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, कतार, कुवेत, मोरिशस, सौदी अरेबिया, बेहरिन, ओमान, व्हियेतनाम, सोशल रिपब्लिक, मालदीव, युनायटेड किंगडम, रियुनियन, थायलंड, ब्रुनेई, रशिया, ग्रीस, हाँगकाँग, पाकिस्तान, इटली, नेदरलँड, सेशल्स, कोमोरेझ, फ्रान्स, केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस् आदी देशांसह एकूण ७६ देशांना कांदा निर्यात केला जातो.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरपट्टी वसुलीत दुपटीने वाढ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने चालू वर्षात घरपट्टीची बिले वेळेत नागरिकांना पोहचवल्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत घसघशीत वाढ झाली आहे. पालिकेने सुरू केलेल्या सवलत योजनेचाही चांगला फायदा पालिकेला झाला असून, तीन मह‌िन्यांत पालिकेच्या तिजोरीत घरपट्टीपोटी ३५ कोटी ६४ लाख, तर पाणीपट्टीतून ५ कोटी १० लाख जमा झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत घरपट्टीची वसुली दुपटीने वाढली असून, पाणीपट्टीत एक कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत तिमाहीतच ४० कोटींची भर पडली आहे.

महापालिकेने चालू वर्षी घरपट्टीचे ११० कोटी तर पाणीपट्टीतून ५० कोटीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या वसुलीसाठी पालिका सरसावली असून, चालू वर्षी घरपट्टीच्या बिलाचे वेळेत वाटप करण्यात आले आहे. शहरातील मालमत्तांची संख्या ही चार लाखांच्या वर, तर नळ कनेक्श्नची संख्या ही दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या वर्षी निवडणूक कामांमुळे घरपट्टीची बिले नागरिकांना वेळेत मिळाली नाहीत. त्यामुळे वसुलीवर परिणाम झाला होता. परंतु, चालू वर्षी घरपट्टीची बिले नागरिकांना वेळेत पाठविण्यात आली. तसेच पालिकेने ग्राहकांसाठी सुरू केलेल्या सवलत योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पालिकेने एप्रिलमध्ये मालमत्ता कर भरल्यास ५, मेमध्ये भरल्यास ३ आणि जूनमध्ये भरल्यास २ टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

विकासकामांना आधार

चालू तिमाहीत २१ तारखेपर्यंत घरपट्टीतून पालिकेच्या तिजोरीत तब्बल ३५ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत १७ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले होते. यावर्षी वसुली दुपटीने वाढली आहे. चालू तिमाहीत पाणीपट्टीतून पालिकेच्या तिजोरीत ५ कोटी १० लाख रुपये जमा झालेत. गेल्या वर्षी चार कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे यावर्षी एक कोटी रुपये अधिक वसुली झाली आहे. पहिल्या तिमाहीत पालिकेच्या तिजोरीत जवळपास चाळीस कोटी रुपये जमा झाल्याने विकासकामांना मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान, पाणीपट्टी बिलांचे आऊटसोर्सिग करण्याचा विचार प्रशासनाने पुन्हा सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा घसरला अवघा सव्वा रुपये किलो

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी उन्हाळ कांद्याला १२५ रुपये प्रति क्विंटल म्हणजे सव्वा रुपये ‌किलो असा भाव मिळाला. या हंगामातील हा सर्वात नीचांकी दर आहे.

सोमठाण येथील भिका संपत पगार या शेतकऱ्याचा १२५ रुपये प्रति क्विंटलने म्हणजे १ रुपया २५ पैसे किलो या दराने विक्री झाला. या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. विक्रीसाठी आलेल्या २३ हजार क्विंटल विक्री झालेल्या कांद्याला कमाल ६५४ रुपये, किमान १२५ रुपये, तर सरासरी ५३४ रुपये इतका प्रति क्विंटल भाव मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाऊचा डबा होणार चविष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या चिमुकल्यांना दररोज डब्यात काय द्यावं, हा प्रश्न आता मिटणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या वतीने ‘आरोग्यदायी आणि चविष्ट खाऊचा डबा’ या अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वैविध्यपूर्ण, रुचकर आणि चिमुरड्यांना आवडणारे पदार्थ या कार्यशाळेत शिकायला मिळणार आहेत.

सकाळी लवकर उठून रोज पोळी भाजी किंवा फक्त पौष्टिक खाऊ देण्याचा शाळेचा नियम असला, तरी तोचतोचपणा मुलांसाठी कंटाळवाणा ठरतो. अशात मुलांच्या डब्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयांच्या मदतीला आला आहे. २५ जून रोजी ‘कल्चर क्लब’च्या वतीने आरोग्यदायी आणि चविष्ट खाऊचा डबा या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय.

येत्या २५ जून रोजी संध्याकाळी ३ ते ५ यावेळेत ही कार्यशाळा होणार असून, प्रिया करंदीकर यामध्ये खाऊचा पौष्टिक डबा बनवायला शिकवणार आहेत. ही कार्यशाळा सगळ्यांसाठी खुली असून, त्यासाठी प्रवेशमूल्य आहे. कल्चर क्लबच्या सदस्यांना प्रवेशमूल्यामध्ये सवलत मिळेल. कल्चर क्लबच्या सदस्यांना २०० रुपये तर सदस्य नसलेल्यांना ४०० रुपये प्रवेश मूल्य आकारले जाईल. अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था, पी. अँड टी. कॉलनी, हॉटेल सिब्बलजवळ, त्र्यंबक रोड येथे ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४ किंवा ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पांझरा चौपाटीचे अतिक्रमण जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या काही वर्षांपासून धुळे शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या पांझरा चौपाटीवरील स्टॉलचे अतिक्रमण गाजत होते. याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकाही दाखल केली होती. त्यावर मंगळवारी (दि. २०) दुपारी कामकाज होऊन हे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. यावर प्रशासनाने लगेचच मंगळवारी मध्यरात्रीपासून पोलिस बंदोबस्तात स्टॉल हटविण्याची मोहीम सुरू केली. पांझरा नदीकाठावर आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या चौपाटीबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यापैकी ललीत वारुडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कामकाज होऊन कारवाईचे निर्देश मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

आमदार गोटे यांच्या प्रयत्नाने पांझरा नदीकिनारी चौपाटीजवळ खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सुमारे पन्नासहून अधिक स्टॉल उभारले होते. यातून बेरोजगारांना रोजगार मिळत होता. मात्र ही चौपाटी महापालिकेने बगीचासाठी आरक्षित केलेल्या जागेवर असल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आल्याने चौपाटी काढण्याचे आदेश झाले होते. त्यानंतर स्थगिती आदेश प्रशासनाला प्राप्त झाला होता. मात्र यावर पुन्हा औरंगाबाद खंडपीठात मंगळवारी न्यायालयाने चौपाटीवरील अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे रात्रीतून जिल्हा प्रशासनाने कारवाईला सुरुवात करीत सकाळी चौपाटीवरील अतिक्रमण जमीनदोस्त केले. ही कारवाई अपर तहसीलदार ज्योती देवरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे, मनपा उपायुक्त रवींद्र जाधव, अतिक्रमण निर्मूलन पथकातील नंदकुमार बैसाणे, मनपा बांधकाम अभियंता कैलास शिंदे व कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शहरातील पांझरा नदीकिनारी उभारण्यात आलेल्या चौपाटीवरील स्टॉल संदर्भात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयाचा आपण आदर करतो. मात्र चौपाटीवरील सर्व स्टॉल शासकीय जागेत असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे चौपाटीला लागून असलेल्या नानासाहेब उत्तमराव पाटील स्मारकाच्या जागेवर सर्व स्टॉल हलविण्यात येतील. या स्मारक समितीचा मी पदाधिकारी असून, ही जागा खासगी आहे.

- अनिल गोटे,

आमदार धुळे शहर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेच्या ४५ सुविधा आता ऑनलाइन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांना विविध प्रकराच्या सुविधा एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी महापालिकेने १९ नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. या सुविधा केंद्रांनंतर पारदर्शक कारभाराच्या दिशेने पाल‌िकेने आणखी एक पाऊल टाकले आहे. जुलैपासून नागरिकांना महापालिकेकडून मिळणाऱ्या जवळपास ४५ नागरी सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. विविध करभरण्यासह, जन्म-मृत्यूचे दाखले, हॉस्प‌िटल परवाने, डॉग लायसन्ससह नगररचना विभागाच्या परवानग्यांसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. या परवानग्यांसाठी पालिकेचे उंबरठे झिजवण्याची आता आवश्यकता राहणार नाही. मुख्यमंत्र्याच्या हस्ते १ जुलैपासून या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर भरणा, विविध कर वसुली, नळजोडणी, डॉग लायसन्स, जन्म-मृत्यूचे दाखले, भोगवटा प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, बांधकाम परवानग्या, अग्निशमन दल परवाने, हॉस्प‌िटल्स नूतनीकरण दाखले अशा विविध प्रकारच्या ४५ सेवा दिल्या जातात. या प्रमाणपत्रांसाठी कागदपत्रे मुख्यालय किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी नागरिकांना या कार्यालयामंध्ये हेलपाटे मारावे लागतात. त्यातच या सेवांसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पैसे माग‌ितले जातात. त्यामुळे भ्रष्टाचारालाही वाव मिळतो. पारदर्शक कारभारासाठी नागरिक आणि महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील संवाद कमी करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी शहरात येस बँकेच्या मदतीने १९ नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. त्यातून नागरिकांना एकाच छताखाली दाखले व परवानग्या दिल्या जात आहे. या केंद्रांना चागंला प्रतिसाद मिळत असून, जवळपास ७० हजार नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पारदर्शक कारभारासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.

जलद सेवा मिळणार

नागरिकांना दाखला मिळवण्यासाठी व अर्ज करण्यासाठी या केंद्रामध्ये यावे लागते. परंतु, आता अर्ज करण्यासह पैसे भरण्याचीही सुविधा ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे जलद सेवा मिळणार आहे. तसेच नगररचना, वैद्यकीय, आरोग्य विभागातील प्रमाणपत्रांसाठी पैशांची देवाणघेवाण होते. आता थेट संवादच होणार नसल्याने भ्रष्टाचारालाही चाप बसणार आहे.


पारदर्शक व गत‌िमान कारभारासाठी पालिकेचा कारभार डिज‌िटल करण्यात येणार आहे. ४५ सुविधा ऑनलाइन मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांसह पालिकेचाही फायदा होणार आहे.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीबी रुग्णाला आता औषधांसाठी अलार्म!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरात टीबीचा (क्षयरोग) पेशंट असला तर कुटुंबाला त्याच्या औषधोपचाराची चांगलीच काळजी घ्यावी लागते. रुग्णाला मोफत औषधोपचार मिळत असला तरी औषधोपचाराचे नियमित सेवन होत नसल्याने रुग्णांना प्रसंगी जीवही गमावावा लागतो. मात्र, नाशिक महापालिका आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून या रुग्णांच्या उपचार पद्धतीसाठी नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. या आयसीटी टूल सॉफ्टवेअरमुळे टीबीच्या रुग्णाला औषधोपचार थेट अलार्म घरबसल्या मिळणार आहे. सोबतच डॉट उपचारपद्धतीसाठी हे सॉफ्टवेअर अतिशय गुणकारी ठरणार असून, राज्यातील हा पहिलाच पायलट प्रोजेक्ट आहे. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास हा पॅटर्न देशभर लागू केला जाणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने टीबीच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी रुग्णांना मोफत औषधोपचार पद्धतीसाठी डॉट प्रोग्राम सुरू केला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी टीबीचा रुग्ण शोधून त्यावर उपचार करतात. सध्या हा औषधोपचार दिवसाआड केला जात आहे. मात्र, आता हा औषधोपचार दररोज करण्यात येणार आहे, तसेच रुग्णाला औषधांचे सेवन किती प्रमाणात कशा प्रकारे करायचे, यासाठी एका सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येत आहे. टीसीएस आणि महापालिकेच्या संयुक्त उपक्रमातून आयसीटी टूल सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून, यात थेट रुग्णांची परिपूर्ण माहिती ऑनलाइन साठवून थेट रुग्णाला औषधांसाठी अलार्म पाठविला जाणार आहे. त्यामुळे रुग्णाला वेळेवर औषधे घेता येणार असून, कोणती औषधे घ्यायची, याचीही माहिती पाठवली जाणार आहे. या सॉफ्टवेअरचे संशोधन अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर नाशिक शहरात सुरू केली जाणार आहे. सध्या शहरात दोन हजार टीबीचे पेशंट असून, त्यांच्यावर या सॉफ्टवेअरच्या मदतीने उपचार केले जाणार आहेत.

केंद्रीय पथकाची भेट

दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील टीबी रुग्णांसाठी आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या पाहणीसाठी केंद्राचे एक पथक दोन दिवसांच्या नाशिकच्या दौऱ्यावर आहे. या पथकाने गुरुवारी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला भेट देऊन टीबीच्या उपचारपद्धतीचा आढावा घेतला असून, पालिकेच्या कामकाजाला शाबासकीचे प्रशस्तिपत्र दिले आहे. पालिकेने झटपट निदानासाठी खरेदी केलेल्या सीबी नेट यंत्राचीही दखल पथकाने घेतली आहे. डॉट्स प्रोव्हायडर यांच्या उपक्रमाचीही दखल पथकाने घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक नगराध्यक्षांचा राजीनामा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विजया दीपक लढ्ढा यांनी गुरुवारी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. शहराच्या विकास आराखड्यास आडकाठी होऊ नये म्हणून राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यासमवेत नगरसेवक संतोष कदम, धनंजय तुंगार, यशवंत भोये, स्वप्नील शेलार, नवनाथ कोठुळे, दीपक लढ्ढा कायकर्ते उपस्थित होते. विजया लढ्ढा यांच्या राजीनाम्याने उद्या शुक्रवारी त्र्यंबक नगरपालिकेत होणाऱ्या अविश्वास ठरावची सभा निरर्थक ठरणार असून, अविश्वास ठराव आणून शह देणाऱ्या विरोधकांचे मनसुबे फोल ठरले आहेत.

१७ जून रोजी नगरपरिषदेच्या १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन नगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष सभेची मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी, २३ जुलैला प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवली होती. मात्र अविश्वास ठरावाच्या आधीच लढ्ढा यांनी राजीनामा दिल्याने आता सभेचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नगराध्यक्षा भाजप असून, त्यांच्या विरोधातील नगरसेवकांचे गटनेते देखील भाजपचेच आहेत.

शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत निष्कारण वाद उपस्थित केले. माझ्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने आराखड्यात फेरबदल केल्याचे खोटे आरोप केले. विकासास आडकाठी नको म्हणून मी राजीनामा दिला आहे.

- विजया लढ्ढा, नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गानतंत्र’ला सप्तसुरांचा साज

$
0
0

पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर

वर्ल्ड म्युझिक डेनिमित्त महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे झालेली ‘गानतंत्र’ ही अनोखी स्पर्धा चांगलीच रंगली. नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले सर्वच स्पर्धकांचा उत्साह वाढविणारा ठरला. या अनोख्या स्पर्धेचा हा वृत्तांत...

या अनोख्या स्पर्धेची अंतिम फेरी बुधवारी (दि. २१) सायंकाळी ६ वाजता सेंट्रल मॉल, त्र्यंबक नाका येथे रंगली. त्यातील एकापेक्षा एक बहारदार गाण्यांनी नाशिककरांची सायंकाळ सूरमयी झाली. गोलमाल सिनेमातील ‘आनेवाला पल’ या गाण्याला प्रारंभ होताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. उदय कुलकर्णी यांच्या या गाण्याने स्पर्धेचा प्रारंभ झाला. त्यानंतर अनुजा ओढेकर यांच्या ‘सारा जमाना हसीनों का दिवाना’ या रिमिक्स व्हर्जनमधील गाण्याने प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला. स्मिता जोशी यांनी सुरेश भट यांची ‘रंगूनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ ही गझल सादर केली. अंतिम फेरीतील दहा स्पर्धकांनी त्यानंतर क्रमाक्रमाने गाणी सादर केली. यावेळी स्पर्धकांना मिरॅकी बँडची साथसंगत मिळाली.

सर्व स्पर्धकांच्या सादरीकरणानंतर परीक्षकांनी चार स्पर्धकांना पुन्हा एकदा गाण्याची संधी दिली. चार जणांच्या या मुखड्यानेही कार्यक्रमात आणखी रंगत आणली. त्यानंतर परीक्षकांनी सर्वांना उत्सुकता लागून राहिलेला स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला. गायिका सोनाली कुलकर्णी-वर्मा यांनी या अनोख्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. उदय कुलकर्णी यांनी द्वितीय, अनुष्का शहाणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला, तर निशांत भोसले यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. त्यानंतर प्रेक्षकांच्या फर्माइशनंतर गानतंत्र स्पर्धेच्या विजेत्या सोनाली कुलकर्णी यांनी ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ हे गाणे सादर केले. त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रथम तीन विजेत्यांना नंतर प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

---

परीक्षक म्हणतात...

शास्त्रीय संगीताला पर्याय नाही

प्रथमतः गानतंत्र स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन. सर्वांनीच उत्तम गाणे गायले, त्यामुळे विजेता निवडणे खरच खूप अवघड वाटत होते. प्रत्येक परीक्षकाचा स्वतंत्र अँगल असतो. पण, आम्ही मात्र एकमतानंतरच विजेते निवडले. गाणे गाताना स्केल आणि कोड्स यांचे महत्त्व ओळखून सराव केला पाहिजे. अन्य स्पर्धकांनी बक्षीस मिळाले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नये. शास्त्रीय संगीत प्रत्येकाने शिकले पाहिजे. शास्त्रीय संगीताला पर्याय नाही. गानतंत्र स्पर्धा पुढील वर्षीही आयोजित करावी, असे मला वाटते. सर्व विजेत्यांना व अंतिम फेरीत सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

-प्रा. अविराज तायडे, शास्त्रीय गायक

--

शास्त्रीय गायनातून अभ्यास गरजेचा

शास्त्रीय गायनातून स्वरांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शास्त्रीय संगीताचा जास्तीत जास्त अभ्यास केला, तरच सुगम संगीताची वाटचाल सुसह्य होते. कुठलीही कला आत्मसात करण्यासाठी मेहनत आवश्यक असते. शास्त्रीय संगीताचेही तसेच आहे. शास्त्रीय संगीत शिकताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबने आयोजित केलेली गानतंत्र ही स्पर्धा खरोखरच अप्रतिम होती. स्पर्धेतील विजेत्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

-रागिणी कामतीकर, गायिका

--

नवीन टॅलेंट ऐकायला मिळाले

अंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी उत्तम परफॉर्मन्स दिला. या स्पर्धेतून नवीन टॅलेंट पाहायला व ऐकायला मिळाले. उपस्थित प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसादही वाखाणण्याजोगा होता. ‘मटा’ने ‘गानतंत्र’सारखी स्पर्धा आयोजित करून युवा गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उत्तम प्रयत्न केला. ‘मटा’सोबत यापुढेही असे उपक्रम करायला आवडेल. स्पर्धकांच्या परफॉर्मन्सचे रेकॉर्डिंग मी यूट्यूबवरदेखील टाकणार आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व ‘महाराष्ट्र टाइम्स’ला विशेष धन्यवाद!

-श्रीकांत नायर, प्रोग्रॅमिंग हेड, रेडिओ मिर्ची

--

गाणे मोजके व छान असावे

नाशिक शहरात सांस्कृतिक जडणघडण बळकट करण्याचे काम ‘महाराष्ट्र टाइम्स’ करीत आहे. केवळ बातम्या न देता नाशिककरांची सांस्कृतिक भूक भागवण्याचे कामही ‘मटा’ करीत आहे. उद्योग क्षेत्र असो वा राजकारण असो, सर्वच क्षेत्रांतील बातम्या निष्पक्ष पद्धतीने देण्याचा प्रयत्न ‘मटा’ने नेहमीच केला आहे. गाण्याच्या स्पर्धेला इतका प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. पण, स्पर्धेतील दोनशे एन्ट्रीज बघून आश्चर्य वाटले. गाणे मोजके व छान असायला हवे. जास्त हरकती न घेता पट्टी व सूर एकत्र ठेवत गाणे सादर केले पाहिजे.

-संजय गिते, संगीतकार तथा गायक

---

‘गानतंत्र’चे विजेते असे...

सोनाली कुलकर्णी-वर्मा (प्रथम क्रमांक)

उदय कुलकर्णी (द्वितीय क्रमांक)

अनुष्का शहाणे (तृतीय क्रमांक)

निशांत भोसले (उत्तेजनार्थ)

---

उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्पर्धकांच्या सुरावटींचा उपस्थित प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. चीअर अप आणि टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण सेंट्रल मॉल दणाणला होता. गाण्यातील मुखड्यालाही उपस्थित रसिक दाद देत होते. नाशिककरांच्या सुरेल गायनाचा आस्वाद घेण्यासाठी यावेळी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केली होती. सेंट्रल मॉलचा पुढील पोर्च प्रेक्षकांनी तुडुंब भरला होता. ग्राहकही थांबून कार्यक्रमाचा आनंद घेत होते.

--

स्पर्धकांच्या गीतांना दाद

उदय कुलकर्णी, अनुजा ओढेकर, स्मिता जोशी यांच्यानंतर चंद्रशेखर देशपांडे यांनी ‘फुलों के रंग से, दिल की कलम सेे’, निशांत भोसले यांनी ‘मोह मोह के धागे’, ऋषिकेश सोनार यांनी ‘चंदा म्होरे’ ही गीते सादर केली. मनीषा पांडे यांनी ‘सँवार लू’ तर श्रेया पिसोळकर यांनी ‘ओ सजना बरखा बहार आयी’ हे परख सिनेमातील गाणे सादर केले. ‘रोलिंग इन दी डीप’ या अनुष्का शहाणे यांनी गायलेल्या इंग्लिश गीताला सर्वांनीच दाद दिली. स्पर्धेच्या विजेत्या सोनाली कुलकर्णी-वर्मा यांनी सादर केलेल्या मुसाफिर सिनेमातील ‘जिंदगी में कोई कभी आये ना रब्बा’ या गाण्यालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

--

२०० ते अंतिम ३...

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबने ‘गानतंत्र’ स्पर्धेसाठी इमेलद्वारे एन्ट्रीज पाठविण्याचे आवाहन केल्यानंतर तब्बल २०० इच्छुकांनी आपल्या एन्ट्री पाठवल्या. या सर्व एन्ट्रीजचे गायक निशांत गिते व सुमंत यांनी परीक्षण करून २० जणांची निवड केली. त्यानंतर या २० जणांचा स्डुडिओ राउंड १९ जूनला रेडिओ मिर्चीच्या स्टुडिओत पार पडला. या २० जणांमधून परीक्षक अविराज तायडे, श्रीकांत नायर व संजय गिते यांनी अंतिम फेरीसाठी १० जणांची निवड केली. याच १० स्पर्धकांतून मग अंतिम ३ विजेते निवडले गेले. अशाप्रकारे गानतंत्र स्पर्धेचा २०० ते अंतिम ३ असा प्रवास पार पडला.

---

विजेत्यांना रेकॉर्डिंगची संधी

परीक्षक संजय गिते हे विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या स्डुडिओत गाणे रेकॉर्ड करून देण्याची संधी देणार आहेत.

त्याचप्रमाणे श्रीकांत नायर हे स्पर्धकांच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग ‘यूट्यूब’वर टाकणार आहेत. त्यामुळे या अनोख्या स्पर्धेद्वारे नवोदितांना आणखी व्यासपीठ खुले झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारक महापालिकेच्या रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टी वसुलीसोबतच आता पालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे थकलेले भाडे वसुलीवरही लक्ष केंद्रीत केले आहे. दोन हजार गाळ्यांपैकी ११७४ गाळेधारकांकडे भाडे थकले असून, त्यांच्याकडून चार कोटी ९ लाखांचे भाडे येणे बाकी आहे. महासभेने पारित केलेल्या वाढीव रेडिरेकनर दराप्रमाणे गाळेधारकांना थकबाकीच्या नोट‌िसा देण्यात आल्या आहेत. त्यांनी थकबाकी भरली नाही तर थेट गाळा जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पश्चिम विभागात बुधवारी १३० गाळेधारकांकडून ३५ लाखांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपायुक्त रोहीदास बहीरम यांनी दिली आहे.

महापालिकेच्या मालकीचे शहरात जवळपास दोन हजार गाळे आहेत. या गाळ्यांना नव्याने रेडिरेकनर दरानुसार भाडेआकारणी करण्यात आली आहे. परंतु ही भाडेवाढ जास्तीची असल्याचे सांगून ती भरण्यास गाळेधारकांनी नकार दिला होता. पालिकेने आता वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. दोन हजार गाळ्यांपैकी ११७४ गाळेधारकांकडे चार कोटी ९ लाखांची थकबाकी आहे. त्यात ५० हजाराच्या खाली थकबाकी असलेल्या गाळेधारकांची संख्या ३८६ असून त्यांच्याकडून १७ लाख ६३ हजारांची थकबाकी आहे. तर ७८८ गाळेधारकांकडे ५० हजाराच्यावर थकबाकी असून ही रक्कम ३ कोटी ९१ लाख ८० हजार एवढी आहे. वाढीव रेडिरेकनरप्रमाणे गाळेधारकांना थकबाकीच्या नोट‌िसा देण्यात आल्या असून, थकबाकी भरली नाही तर थेट गाळा जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. बुधवारी पश्चिम विभागात ही वसुली मोहीम राबविण्यात आली. १३० गाळेधारकांकडून ३५ लाख ६४ हजाराची रक्कम जप्त वसूल करण्यात आली. तसेच तीन गाळेही जप्त करण्यात आले. गुरुवारी पंचवटीत ११ गाळेधारकांकडून ९ लाख १० हजाराची वसुली करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images