Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फरार कावळे अखेर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक तालुका पोलिस स्टेशनमधून धूम ठोकणाऱ्या संशयितास पोलिसांनी सांगली येथून अटक केली. कैदी पार्टीची नजर चुकवत संशयित आरोपीने महिनाभरापूर्वी पोलिस स्टेशनमधूनच धूम ठोकली होती. पोलिसांनी सतत त्याचा माग काढत मंगरूळ (जि. सांगली) येथे त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी दोन पोलिस कर्मचारी निलंबित झाले आहेत.

संभाजी विलास कावळे (वय २३, रा. औदुंबर प्लाझा, औदुंबरनगर, अंबड लिंकरोड, मूळ कोल्हापूर) असे या संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लाखलगाव परिसरातील गौरव पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीस गजाआड केले होते. त्यात कावळेचा सहभाग होता. पोलिस तपासात या टोळीतील गुन्हेगारांनी दरोड्यासह दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली होती. शहर पोलिसांनी सर्व गुन्ह्यांमधील एकूण सात लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल संशयितांकडून जप्त केला होता. यानंतर सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कावळेने मातोरी (ता. जि.नाशिक) येथील एका घरफोडीची कबुली दिल्याने त्यास न्यायालयीन प्रक्रिया पार पाडत नाशिक तालुका पोलिसांनी १५ मे रोजी ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याने त्यास तालुका पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. मात्र, संध्याकाळच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवत कावळेने धूम ठोकली. हातातील बेडी सफाईदारपणे काढून पोलिस स्टेशनच्या पाठीमागे धाव घेत त्याने भूमिअभिलेख कार्यालयाच्या भिंतीवरून उडी मारली. यानंतर पोलिसांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडत नव्हता. या घटनेची गंभीर दखल घेत तत्कालीन अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, संशयिताच्या मागावर असलेल्या पोलिसांना तो सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, रविवारी पोलिसांनी मंगरूळ गाठून सापळा लावून त्यास जेरबंद केले. ही कारवाई निरीक्षक बी. बी. ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक के. एम. कमलाकर, पोलिस हवालदार जयेश भाबड, योगेश शिंदे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौकशी समितीचे पुनर्गठण करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पावसाळापूर्व कामे झाली नसल्याचा दाखला खुद्द सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच दिला असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र या कामांच्या चौकशीऐवजी भुयारी गटार योजनेच्या चौकशीची मागणी केली. पावसाळी गटार योजनेची चौकशी समिती पुनर्गठीत करून त्यातील त्रुटी शोधा आणि भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केली. यात जवळपास दीड हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

सोमवारच्या महासभेत पावसाळापूर्व कामांमधील त्रुटी, पावसाळी गटार योजनेचा उडालेला बोजवारा, प्लास्ट‌िक वेळेत न उचलणे, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण व भद्रकालीत चुकीच्या पद्धतीने उभारलेले सिव्हरेज पंपिंग स्टेशन यामुळे शहरात पाणी साचल्याचा आरोप विरोधकांनी करत सत्ताधारी भाजपची कोंडी केली.परंतु, विरोधकांच्या आक्रमणामुळे पिछाडीवर गेलेल्या भाजपच्या नगरसेवकांकडून बचावाचा केविलवाणा प्रयत्न केला. पूर्व पावसाळी कामांमुळे प्रशासनाचे पितळ उघडे पडले, असा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. प्रभागनिहाय ठेके का दिले व कार्यारंभ आदेश का दिले नाहीत, असा सवाल करून प्रशासनाच्या त्रुटींवर बोरस्तेंनी बोट ठेवले. तसेच पावसामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. कॉंग्रेसचे गटनेते शाहु खैरे यांनी सदोष पावसाळी गटार योजना, सदोष रस्ते व भद्रकालीमध्ये चुकीच्या पध्दतीने सिव्हरेंज पंपिंग उभारण्यात आल्याने शहर पाण्याखाली गेल्याचा आरोप केला.

काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी तर थेट प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शहरात अठरापैकी तीनच नैसर्गिक नाले शिल्लक राहिल्याचा आरोप केला. पाऊस सुरू असताना अग्निशमन दलाचे अधिकारी जागेवर नव्हते1 पावसाळी गटार योजनेचा खर्च वाया गेला. शहरातील पंपिंग पूर्ण क्षमेतेने चालत नसल्याचा आरोपही डॉ. पाटील यांनी केला. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोडी कमी होती की, काय दिनकर पाटील यांनी भाजपसह विरोधकांवर हल्लाबोल केला. पावसाळी भुयार गटार योजनेत विरोधकातील काही नेत्यांनी गोलमाल केल्याचा आरोप करत या कामांच्या चौकशीसाठी यापूर्वी नियुक्त झालेली चौकशी समिती पुनर्गठित करण्याची मागणी त्यांनी केली.

भाजपच्या अडचणी वाढणार

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असले तरी त्यांच्याकडे अभ्यासू नगरसेवकांची संख्या कमी आहे.भाजकडे बहुमत असले तरी, विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यची क्षमता आहे. आतापर्यंत महासभेत सत्ताधारी व विरोधकांचे खेळीमेळीचे चित्र दिसत होते. परंतु, सोमवारी महापौरांनी चर्चा करण्याऐवजी सभा गुंडाळल्याने विरोधक नाराज झाले आहेत. त्यामुळे पुढच्या सभेत महापौर कसे कामकाज करतात ते पाहू, असा इशारा विरोधकांनी दिल्याने भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलगीकरणाचाच ‘कचरा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेकडून घरोघरच्या कचरा संकलनासाठी अभिनव अशी घंटागाडीची योजना शहरात राबविली जात आहे. त्याद्वारे कचरा विलगीकरण करणेदेखील नुकतेच बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, बहुसंख्य नागरिकांकडून एकत्रितच कचरा टाकला जात असल्याने शहरात कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांच्या कर्मचाऱ्यांना ओला व सुका कचरा संकलित करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अगोदर असा कचरा टाकणाऱ्यांचे ओला व सुका कचरा वेगळा करून टाकावा याबाबत पुरेसे प्रबोधन करावे, अशी मागणी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने नवीन घंटागाड्या नेमल्या आहेत. आधीच शहरातील अरुंद रस्त्यांवरून कचरा संकलन करण्यासाठी अनेकदा घंटागाडीचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच आता ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करावा लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुका कचरा वेगळा संकलित करण्यासाठी नुकताच घंटागाड्यांत जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला. सातपूर विभागातील अनेक घंटागाड्यांत अशा जाळ्याही बसविण्यात आल्या आहेत. परंतु, अनेक नागरिकांकडून घंटागाड्यांत एकत्रितच कचरा टाकण्यात येत असल्याने सुका कचऱ्यासाठी लावण्यात आलेल्या या जाळ्यांचा खर्च वाया गेल्याचे दिसून येत आहे. या जाळ्यांमुळे अगोदरच लहान असलेल्या घंटागाड्या आणखी अपुऱ्या पडत आहेत. या जाळ्यांमुळे अडचणींत वाढ झाल्याचे घंटागाडी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

-

प्रकल्पावर मात्र एकत्रित संकलन!

घंटागाडीमार्फत ओला व सुका कचरा संकलित केल्यावरही खत प्रकल्पावर तो एकत्रितच घेतला जातो. त्यामुळे ओला व सुका कचरा संकलन करून महापालिका नेमके काय साध्य करते, असा सवालही उपस्थित केला जात आहे. घंटागाड्यांद्वारे घरोघरी कचरा संकलन करण्याचे काम केले जात असताना बहुसंख्य नागरिकांकडून एकत्रितच कचरा दिला जात असल्याने महापालिकेने अगोदर या समस्यांवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनर किलिंग प्रकरणी आरोपीस फाशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जातीबाहेर लग्न केले, म्हणून गर्भवतीचा जीव घेणाऱ्या बापास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी सोमवारी (दि. १९) फाशीची शिक्षा सुनावली. दुर्मिळातील दुर्मीळ घटना असे निरीक्षण नोंदवत या कृत्याला देहदंडाची शिक्षाच होऊ शकते, असे कोर्टाने स्पष्ट केले. ऑनर किलिंग प्रकरणात नाशिक कोर्टाने प्रथमच फाशीची शिक्षा सुनावली असून, या ऐतिहासिक निर्णयाने जातीच्या नावावर विष पेरणाऱ्यांना बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकनाथ किसन कुंभारकर (रा. मोरे मळा, पंचवटी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ‘ऑनर किलिंग’चा हा धक्कादायक प्रकार २८ जून २०१३ रोजी गंगापूर रोडवरील सावरकर हॉस्पिटलजवळ घडला होता. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या प्रमिलाचा गळा घोटल्यानंतर कुंभारकरला कोणताही पस्तावा नव्हता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी लागलीच कुंभारकरला अटक करून गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांनी केला. सरकारी पक्षातर्फे अॅड. पौर्णिमा नाईक यांनी १० साक्षीदार व इतर पुरावे कोर्टासमोर सादर केले. त्यात रिक्षाचालक, तसेच फिर्यादी आणि डॉ. अनंत पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तपास पथकाने कोर्टासमोर भक्कम पुरावे सादर केले. कुंभारकरने अत्यंत शांत डोक्याने कट रचून मुलीसह तिच्या गर्भातील अर्भकाचा खून केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायाधीश घोडके यांनी कुंभारकरला हत्येप्रकरणी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

जातीबाहेरील मुलाशी लग्न केले म्हणून गर्भवतीचा जीव घेणाऱ्या बापास जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. १९) फाशीची शिक्षा सुनावली. नाशिक जिल्हा कोर्टाने ऑनर किलिंग प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी, असे अॅड. पौर्णिमा नाईक यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, २००७ मध्ये साटोटे हत्याकांडात चौघांना फाशीची शिक्षा झाली होती. मात्र, हे हत्याकांड दरोड्यादरम्यान झाले होते. कुंभारकरचे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर त्याच्याच जातीतील एकाने मुलीला मारू की आत्महत्या करू, अशी फिर्याद पोलिसांसमोर मांडली. जातपंचायतीच्या दाहकतेचा हा प्रकार ‘मटा’ने समोर आणल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय सर्वच प्रमुख जातपंचायतींनी घेतला असून, कोर्टाच्या या निकालाने या प्रकाराला चाप बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अशी झाली होती हत्या

प्रमिला कुंभारकर (वय १८) हिने बुलडाण्यातील दीपक कांबळे याच्याशी प्रेमविवाह केला होता. ती महात्मानगर परिसरातील एका बिल्डिंग साइटवर आपल्या पतीसोबत राहत होती. या विवाहास कुंभारकरचा विरोध होता. मुलीने आंतरजातीय लग्न केल्याने कुंभारकर संतप्त झाले होते. त्यातच प्रमिलाला दिवस गेल्याने कुंभारकरच्या संतापात आणखी भर पडली. हा विषय कायमचा संपवायचा म्हणून त्याने २८ जून २०१३ रोजी मनाशी खूणगाठ बांधत पहाटे त्याच्या घराजवळ राहणारा प्रमोद आहेर या रिक्षाचालकास सोबत घेतले. नातेवाइकाची तब्येत बरोबर नसल्याने मुलीला घेऊन यायचे, असा बनाव त्याने रचला. रिक्षा घेऊन तो प्रमिलाकडे गेला. ‘तुझी आई सीरिअस असून, तू लवकर चल’ असा निरोप कुंभारकरने दिल्याने प्रमिला त्याच्यासोबत निघाली. वडिलांवर विश्वास असल्याने तिने पतीला बरोबर घेतले नाही. मात्र, काळ बनून आलेल्या बापाच्या मनात वेगळाच विचार घोंगावत होता. कुंभारकरने रिक्षा गंगापूररोडवरील सावरकर हॉस्पिटलजवळ नेण्यास सांगितले. तेथे पोहोचल्यानंतर रिक्षाचालक आहेर याला ‘हॉस्पिटलमध्ये प्रमिलाचे मामा असून, त्यांना घेऊन ये’ असे सांगितले. त्यानुसार आहेर हॉस्पिटलमध्ये घुसताच कुंभारकरने आपल्याकडील नॉयलॉन दोरी काढून प्रमिलाचा गळा आवळण्यास सुरुवात केली. नववा महिना सुरू असलेल्या प्रमिलाचा प्रतिकार निष्प्रभ ठरला. हा प्रकार सुरू असताना रिक्षाचालक आहेर परत आला. त्यांनी कुंभारकरला विरोध केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.

अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय समोर आला. सर्व साक्षीदारांनी भक्कमपणे बाजू मांडली. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, तसेच कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्याआधारे कोर्टाने दुर्मिळातील दुर्मीळ घटना असे स्पष्ट करीत आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली.

- पौर्णिमा नाईक, सरकारी वकील

दुर्मिळ असा निर्णय कोर्टाने दिला असून, याचा चांगला परिणाम दिसून येईल. फाशीची शिक्षा देताना शक्यतो देशविघातक कृत्यांकडे पाहिले जाते. ऑनर किलिंग हा प्रकार तितकाच घृणास्पद होता, हे कोर्टाच्या निकालावरून स्पष्ट होते. पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास केला.

- डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

या प्रकरणात सुरुवातीपासून प्रसारमाध्यमांनी चांगले काम केले. यामुळे एक सामाजिक दबाव निर्माण झाला होता. त्यातूनच पुढे जातपंचायत मूठमाती अभियान सुरू झाले. हजारो पीडितांना न्याय मिळाला. कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेमुळे प्रमिलाला न्याय मिळाल्याची भावना असून, ही लढाई पुढे सुरूच राहील.

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गानतंत्र’ची अंतिम फेरी उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्ल्ड म्युझिक डेनिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गानतंत्र’ या स्पर्धेस नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी उद्या दि. २१ रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी ई-मेलद्वारे गाणी मागविण्यात आली होती.
सोमवारी (१९ जून) रोजी या स्पर्धेचा स्टुडिओ राउंड ‘रेडिओ मिर्ची’च्या स्टुडिओत झाला. यावेळी २० पैकी १० स्पर्धक निवडण्यात आले. प्रसिध्द संगीतकार आणि गायक संजय गीते, शास्त्रीय गायक प्रा. अविराज तायडे तसेच रेडिओ मिर्चीचे प्रोग्रामिंग हेड श्रीकांत नायर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्टुडिओ राऊंडमधून निवडलेल्या १० स्पर्धकांची उद्या दि. २१ रोजी सेंट्रल मॉल येथे संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या अंतिम फेरी होईल. अंतिम फेरीत स्पर्धकांची ‘अनप्लग्ड कॉन्सर्ट’ होईल. अंतिम तीन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे ‘रेडिओ मिर्ची’ हे म्युझिक पार्टनर आहेत. सांग‌ीतिक वारशाला अभिवादन आणि आतापर्यंत लोकांच्या कानापर्यंत न पोहोचलेल्या उत्तमोत्तम आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या स्पर्धेमागे उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या श्रीमूर्तींचे बहरिनमध्ये योगधडे

$
0
0

नाशिक ः तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून बहारिनमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या योगा इन्स्ट‌ट्यिूटच्या माध्यमातून आखाती देशास योगाचे धडे देण्यासाठी नाशिकमधील योगशिक्षक डॉ. श्रीमूर्ती यांची निवड झाली आहे. या कार्यासाठी देशभरातून केवळ तीन योगशिक्षकांना ही संधी मिळाली आहे. यातील डॉ. श्रीमूर्ती हे नाशिकचे तर उर्वरित दोघांपैकी एक जण पश्चिम बंगाल आणि दुसरे बिहारमधील रहिवासी आहेत.

चेन्नईतील १३६.१ योगा सेंटरच्या माध्यमातून यावेळी ते एक वर्षासाठी बहारीन मध्यपूर्वेकडील पार्शियन आखातीमधील छोट्याशा व्दीपावर वसलेल्या देशात जाणार आहेत. तेथील राजधानी मनामा येथे ते वास्तव्यास असतील. मुळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिखलीचे रहिवासी असणारे ज्ञानोबा लाड तथा डॉ. श्रीमूर्ती यांनी योगाभ्यासात पुढे जाण्यासाठी अत्यंत खडतर परिस्थितीशी दोन हात केले आहेत. आई-वडिलांना शेती कामात मदत करत होमिओपॅथीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ डॉक्टर म्हणून रूग्णांना सेवा दिली. मात्र योगाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. डॉ. श्रीमूर्ती यांनी बिहार स्कूल ऑफ योगामधून ‘अप्लाईड योगा’ (व्यवहारातील योगशास्त्र) या विषयात एम.एससी. पदवी मिळविली. यानंतर दीड वर्ष कतार या आखाती देशातील नागरिकांना योग शिकविल्यानंतर मालदीव बेटावरही हे कार्य त्यांनी केले. नाशिकमध्ये स्थिर होत त्यांनी नाशिककरांना योगाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. ते पुढील आठवड्यात बहरिनमध्ये जाणार आहेत. ते तेथे वर्षभर सेवा देतील.

बुधवारी (२१ जून) बहारिनमधील योग इन्स्ट‌ट्यिूटचे उद‌्घाटन होणार आहे.

या निमित्ताने ‘मटा’शी बोलताना डॉ. श्रीमूर्ती म्हणाले , ‘मुस्लीमबहूल देश आणि योग या विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे. त्या देशांमधील नागरिक योगाला स्वीकारून या शास्त्रात अचंबित करणारी प्रगती करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकरांचा बिबट्याने पाडला फडशा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील तामसवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन मेंढ्याचे कोकरू ठार झाल्याची घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील हिवरगाव येथील मेंढपाळ साईनाथ करू ढेपले हे आपल्या मेंढ्या चारण्यासाठी तालुक्यातील तामसवाडी परिसरात आले आहेत. त्यांचा मुक्काम तामसवाडी येथील शेतकरी शंकर नामदेव शिंदे यांच्या शेतात होता. रविवारी रात्री बिबट्याने या मेंढ्यांच्या कळपातील तीन कोकरांवर हल्ला केला. मेंढ्याचा आरडाओरडा ऐकून ढेपले कुटुंबीयांनी लाठ्या काठ्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केला. मात्र बिबट्या फरार झाला. त्यांना काही अंतरावर तीन कोकरू मृतावस्थेत पडलेले आढळले. ही घटना वन विभागाला कळवण्यात आल्यानंतर येवला विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी सहाकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाची ‘पोलखोल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

गेल्या आठवड्यात अभोणा परिसरात झालेल्या पावसाने आदिवासी बांधकाम विभागाने केलेल्या कामचलाऊ ‘कामकाजा’ची पोलखोल केली आहे. बांधकाम विभागाने भूमिगत गटारी बनवून पावसाचे पाणी जाण्यास कुठलीही सोय न केल्याने अभोणा-कळवण रोडला जोडणारा महत्त्वाच्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या पावसात रस्त्याचे नाले झाल्यासारखी स्थिती झाली होती.

या पुलाच्या दोनी बाजुचा भराव पाण्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे आधीच कमकुवत असलेला पूल सध्या अधिकच धोकेदायक झाला आहे. उरलेल्या अडीच महिन्याच्या पावसाळ्यात या पुलाची काय अवस्थ होईल, यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या १५ दिवसांपासून पावसाळा सुरू झाला आहे. पहिल्याच पावसात या पुलाचे ‘बांधकाम’ उघडकीस आले आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत का पूल तग धरणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित

होत आहे.

अभोणासह पाश्चिम पट्ट्यातील आदिवासींना संपूर्ण ‘कसमादेना’ला जोडणारा हा एकमेव पूल असल्याने त्याचे महत्त्व अजुनच वाढले आहे. पुलाला काही नुकसान झाल्यास पाश्चिम पट्ट्यातील गावांचा कळवणशी संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर पुलाची लवकर डागडुजी करून पावसाचे पाणी रस्त्यावर न येता नाल्यात जाण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीस्वारास दोघांनी लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालमत्तेच्या वादातून दोघांनी एकास रस्त्यात अडवून लुटले. ही घटना टिळकपथ भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कृष्णल उत्तम कोथमिरे (वय २७, रा. भद्रकाली टॅक्सीस्टॅण्ड, शेलार हॉटेलमागे) या युवकाच्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लुटीचा प्रकार घडला. कामावरून घराकडे परतत असताना सिडकोतील बडदेनगर भागात राहणारा अमित संजय कोथमिरे (वय २५) आणि त्याचा साथीदार अभिजीत साळुंके या दोघांनी कृष्णलला रस्त्यात थांबवले. संजय आणि कृष्णल यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू आहे. त्याच वादातून दोघा संशयितांनी जगन्नाथ हॉटेल परिसरातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमशेजारी अडवले. तसेच, शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी संशयितांनी मारहाण करीत बळजबरीने कृष्णलच्या खिशातील मोबाइल व रोकड असा सुमारे नऊ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लांडे करीत आहेत.

डीजीपीनगरला चेन स्नॅचिंग

स्पीड ब्रेकरमुळे दुचाकीचा वेग कमी केल्याचा फटका महिलेला बसला. दुचाकीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेल्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत तोडून नेली. ही घटना नाशिक-पुणे हायवेजवळील डीजीपीनगर भागात विघ्नहर गणेश मंदिराजवळ घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता जगदीश कुलथे (रा. सप्तशृंगीनगर, जेलरोड) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रविवारी सकाळी कुलथे आपल्या मुलीस सोबत घेऊन डीजीपीनगर भागात गेल्या होत्या. दहा वाजेच्या सुमारास काम आटोपून त्या घराकडे परतत असताना चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला. विघ्नहर गणेश मंदिरासमोर कुलथे यांनी दुचाकीचा वेग कमी केला. यावेळी स्पीडब्रेकरवर पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या पल्सरस्वारांनी याचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपये किमतीची सोन्याचे पोत ओरबाडून नेली. कुलथे यांनी आराडाओरड करीत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव वेगात चोरटे निघून गेले. चेन स्नॅचर्सवर नजर ठेवण्यासाठी येथे नेहमी पोलिस बंदोबस्त तैनात असतो. चेन स्नॅचिंग झाली त्यावेळी मात्र येथे बंदोबस्त नव्हता. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

पाइप चोरीचा प्रयत्न

औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातून अ‍ॅल्युमिनीअम पाइप चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी दोघांविरुध्द सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल नेत्रापाल राठोड व अरुण लक्ष्मणदेव पंडित (रा. दोघे संभाजीचौक, नानावली) अशी संशयितांची नावे आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीतील सारडा बंगल्यासमोरील सह्याद्री इंडस्ट्रीजमध्ये ही घटना घडली. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोघा संशयितांनी कारखान्यातील अ‍ॅल्युमिनीअम सेक्शनचे पाइप चोरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अमित शरद विसपुते यांनी तक्रार दाखल केली असून, अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.

पंचवटीत तरुणीची आत्महत्या

पंचवटीतील सुकेनकर लेन भागात राहणाऱ्या २५ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हर्षा प्रशांत जैन (रा. वसंत अपार्टमेंट, सुकेनकरलेन) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हर्षाने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.

युवकाचा मृत्यू

झाडावरून पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना महामार्गावरील स्प्लेंडर हॉल परिसरात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय गंगाराम पवार (वय २८, रा. भगतसिंगनगर, इंदिरानगर) असे झाडावरून पडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी विजय आपल्या घरामागील झाडावरून पडल्याने गंभीर झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक हादगे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला मिळणार जिल्हा क्रीडा संकुल

$
0
0

नाशिकः विभागीय क्रीडा संकुल, एकलव्य क्रीडा प्रबोध‌िनी, सय्यद पिंप्री येथील तालुका क्रीडा संकुल यांच्याबरोबरच नाशिक जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला बुस्ट देण्यासाठी नाशिक येथील शिवाजी स्टेड‌ियमच्या जागेवर जिल्हा क्रीडा संकुलाचे काम प्रस्तावित आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक झाली. त्यात संकुलाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून, प्रशासकीय पूर्तता होताच या कामाला सुरुवात होणार आहे.

याबाबत जिल्हा क्रीडा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात आठ कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला. नाशिक शहरातील खेळाडूंना हक्काचे स्टेड‌ियम नाही. त्यासाठी शहरात एखादे स्टेड‌ियम असावे, या विचाराने तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी स्टेड‌ियमचा आराखडा तयार केला होता. या आराखड्यात खेळाडूंना लागणाऱ्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात अशी तजवीज करण्यात आली आहे. हा आराखडा प्रत्यक्षात यावा यासाठी सध्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक हेदेखील प्रयत्न करीत आहेत.

शहराच्या मध्यवस्तीत असलेले शिवाजी स्टेड‌ियम अत्यंत जीर्ण झाले आहे. मुळातच ही जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची असल्याने या ठिकाणी वापराला व दुरुस्तीला मर्यादा येतात. या ठिकाणी स्टेड‌ियम झाल्यास खेळाडूंना हक्काची जागा मिळेल व अनेक खेळ एकाच छताखाली सुरू होतील. आजही या जागेत कबड्डी, खोखो, नेमबाजी, फुटबॉल अशा खेळांचे सामने आयोजित केले जातात. परंतु या ठिकाणी पुरेशा सुविधा नसल्याने महिला खेळाडूंचे हाल होतात. तांत्रिक बाबतीतही अनेक तडजोडी कराव्या लागतात. नव्याने होणाऱ्या स्टेड‌ियममध्ये इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही खेळांचा विचार करण्यात आला आहे. यातील तांत्रिक अडचणी दूर कशा होतील याचा प्रामुख्याने विचार केला आहे. या कामात ग्राऊंड तयार करणे, इनडोअर हॉलचे काम करणे, डॉर्मेटरी हॉल व वसत‌िगृहाच्या १२२ खोल्यांचे काम करणे, कार्यालय इमारत व सुसज्ज अशा स्टेजचे काम करणे, पार्किंग ग्राऊंड तयार करणे, प्रेक्षक गॅलरी तयार करणे, फर्निचर व इतर कामे करणे इत्यादींचा समावेश आहे. ज्या जिल्ह्यामध्ये विभागीय क्रीडा संकुल आहे, अशा ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल देण्यात येत नाही. परंतु, नुकतेच नागपूरला विशेष बाब म्हणून जिल्हा क्रीडा संकुल देण्यात आले. निवडणुकीच्या आधी नाशिकला जे काही हवे असेल, ते मी देण्यास कटीबध्द असेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या सभेत दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर हे स्टेड‌ियम होत असल्याची चर्चा खेळाडूंमध्ये होती.

सध्याच्या छत्रपती स्टेड‌ियमवर विशेष बाब म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रशासकीय पूर्तता झाल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होईल.

- रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक

खेळाचे मैदान-१ कोटी ९७ लाख ३६ हजार ३५३ रुपये

इनडोअर हॉल- १ कोटी ३७ लाख १५ हजार ६२५ रुपये

वसत‌िगृह- २ कोटी ४१ लाख ३९ हजार ५०० रुपये

ऑफिस बिल्डिंग- ४३ लाख ८९ हजार रुपये

अंतर्गत पार्किंग - ४९ लाख ८० हजार रुपये

गॅलरी- ४७ लाख ८८ हजार रुपये

फर्निचर- ७५ लाख रुपये

अतिरिक्त खर्च - ३८ लाख ७ हजार ९२४ रुपये

एकूण प्रस्तावित खर्च- ७ कोटी ९९ लाख ६६ हजार ४०१ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलचोरी भोवली

$
0
0

नाशिक-चांदवड महामार्गावरील दोन पेट्रोलपंपांवर कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोलपंपाच्या मशिनमधील पल्सरमध्ये टेम्परिंग व शोल्डरिंग करून त्यातील आयसी पार्टच्या सहाय्याने प्रत्येकी पाच लिटरमागे २०० मिली पेट्रोलची चोरी करण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात उघडकीस आला आहे. राज्य गुन्हे शाखेने नाशिक-चांदवड महामार्गावरील दोन पेट्रोलपंपावर सोमवारी कारवाई करून हे पेट्रोलपंप सील केले. राज्यभर अशा चोरींचा पर्दाफाश केला जात आहे. भिवंडी, ठाणेसह इतर जिल्ह्यातही असे प्रकार उघडकीस आले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलपंपावर चिप आणि रिमोटच्या सहाय्याने होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल चोरीचे कनेक्शन उघडकीस आल्यानंतर राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. त्यानंतर वैधमापन शास्त्र विभागाचे अपर पोलिस महासंचालक तथा नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी राज्यभर मोहीम उघडली होती. त्यात राज्यातील १६३६ पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या तपासणीत ११,४१८ पंपाची तपासणी करण्यात आली. तसेच २५२ पंपांद्वारे कमी-जास्त प्रमाणात वितरण होत असल्याचे आढळून आले होते. नाशिक विभागामध्ये ३२२ वितरकांची चौकशी करून २००० पंप तपासण्यात आले होते. यामध्ये दोन पंप दोषी आढळल्यामुळे बंद करण्यात आले. दोघा वितरकांविरोधात खटला दाखल केला गेला. या कारवाईनंतर पुन्हा महिनाभरानंतर दोन पंपावर कारवाई करण्यात आली. पण पेट्रोलपंपावर होणाऱ्या चोरीचे प्रमाण कमी झाले नाही.

गुन्हे शाखेच्या पथकांनी राज्यभरात पेट्रोलपंपावर धाडी टाकण्यास सुरुवात केली. नाशिकमध्ये विविध कंपन्यांचे ३६० पेट्रोलपंप आहेत. यावर त्यांची करडी नजर असणार आहे. गुन्हे शाखेला पेट्रोलपंप हेराफेरी करणारा म्होरक्या हाती लागला असून, त्यामुळे राज्यातील किती पेट्रोलपंपांवर हा चोरीचा प्रकार चालतो याची माहिती त्यांच्या हाती आली आहे. या चोरीच्या प्रकाराबरोबरच हेराफेरी करण्याचे अनेक प्रकार असून, त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

वैद्यमापन विभाग करतो काय?

वैद्यमापन शास्त्र विभागाने नाशिक विभागामध्ये ३२२ वितरकांची चौकशी करून २००० पंप तपासले होते. त्यात दोन पंप दोषी आढळले. त्यानंतर पुन्हा महिनाभरानंतर दोन पंपावर कारवाई करण्यात आली. पण, त्यानंतर ही तपासणी व कारवाईची प्रक्रिया थंडावली व पेट्रोलपंपावर पुन्हा चोरीचे प्रकार घडू लागले.

एका लिटरमागे तीन ते चार रुपये

प्रत्येकी पाच लिटरमागे २०० मिली पेट्रोलची चोरी केली जात आहे. त्यामुळे एका लिटरमागे ही चोरी ४० मिली असून, त्याची किमत तीन ते चार रुपये आहे. त्यामुळे एक हजार लिटर पेट्रोल विकणाऱ्या पेट्रोलपंपाची रोजची कमाई ३० ते ४० हजार रुपये आहे. हीच कमाई महिन्याला १० ते १२ लाख रुपये आहे. त्यात रॉकेलमिश्रित प्रकार असला तर ती कमाई कितीतरी मोठी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एएमसीएच्या सहसचिवपदी शोभराज खोंडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी नागपूरचे आमदार डॉ. परिणय फुके, सचिवपदी संजय केडगे, तर सहसचिवपदी नंदुरबार येथील शोभराज खोंडे यांची निवड झाली. संघटनेची पुणे येथे नुकतीच निवडणूक झाली.

संघटनेवर कार्याध्यक्षपदी औरंगाबादचे विजय देशपांडे, उपाध्यक्षपदी मुंबईचे प्रफुल्ल झवेरी, तर कोशाध्यक्षपदी पुण्याचे राजेंद्र कोंडे यांची निवड झाली. शोभराज खोंडे २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय पंच परिक्षा उत्तीर्ण झाले, तर शालेय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे ते दोन वेळा प्रशिक्षक होते. त्यांच्या निवडीबद्दल नंदुरबार जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे अध्यक्ष बळवंत निकुंभ यांनी त्यांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहात टेलिमेडिसिन!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी टेलिमेडिसिनची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बंदिवानांच्या आजाराचे ऑनलाइन निदान करणाऱ्या टेलिमेडिसिनच्या मात्रेने यापुढे बंदिवानांच्या बड्या रुग्णालयांतील ‘पाहुणचारा’ला ब्रेक लागणार आहे.

कारागृहातील काही बंदिवान कारागृहातून स्वतःची सुटका करवून घेण्यासाठी प्रकृतिअस्वास्थ्याचा बहाणा करून सिव्हिल रुग्णालयात ‘पाहुणचार’ घेत असत. काही बंदिवान तर वारंवार आजारांचा बहाणा करून रुग्णालयातील आरामास चटावले होते. परंतु, आता बंदिवानांच्या या सवयीवर शासनाने टेलिमेडीसीनचा उतारा शोधला आहे. या उताऱ्याची मात्रा वापरण्यासाठी नाशिकचे सिव्हिल रुग्णालय, मुंबईचे जे. जे. रुग्णालय ऑनलाइन पद्धतीने नाशिकरोड कारागृहाला जोडण्यात आले आहे.

--

बहाण्यांना लागणार चाप

टेलिमेडिसिन उपचारपद्धतीत नाशिकरोड कारागृह रुग्णालयातील डॉक्टर्स ऑनलाइन पद्धतीने बंदिवानांच्या आरोग्यविषयक तक्रारी सिव्हिलसह जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांपुढे मांडणार आहेत. याशिवाय संबंधित डॉक्टर्स थेट बंदिवानाशी बोलून त्यांची आरोग्यविषयक माहिती घेणार आहेत. त्यातून संबंधित तज्ज्ञ डॉक्टर्स बंदिवानांवर उपचार करणार आहेत. या सुविधेमुळे आता बंदिवानांना वैद्यकीय उपचारांसाठी कारागृहाबाहेर न्यावे लागणार नाही. परिणामी त्यांच्या बहाण्यांना आता चाप बसणार आहे.

--

धोका झाला दूर

कारागृहात रुग्णालय असले, तरी काही बंदिवान बाहेरील रुग्णालयात जाण्याची संधी शोधण्यासाठी आजाराचे बहाणे करीत असत, तर काही बंदिवानांना खरोखरच बाहेरील रुग्णालयात उपचारांसाठी न्यावे लागत असे. परंतु, आता टेलिमेडिसिनच्या सुविधेमुळे बंदिवानांना कारागृहाबाहेर नेण्याचा धोका दूर झाला आहे. ज्या विकारांवर उपाय होणार नाहीत, अशा परिस्थितीत डॉक्टरांनाच कारागृहात बोलावले जाणार असल्याने बंदिवानांचा रुग्णालयांतील पाहुणचार आता इतिहासजमा होणार आहे.

--

गैरमार्ग होणार बंद

आजाराच्या बहाण्याने जिल्हा रुग्णालयात उचारासाठी आलेल्या बंदिवानाला काही दिवसांसाठी दाखल करण्याची गरज आहे की नाही, याचा निर्णय स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरच अवलंबून असे. त्यामुळे सकारात्मक अहवाल मिळविण्याकामी गैरमार्गाचा होणारा वापरही आता बंद होणार आहे.

--

गृह खात्याच्या माध्यमातून नाशिकरोड कारागृहात बंदिवानांवर वैद्यकीय उपचारांसाठी टेलिमेडिसिन सेंटर कार्यान्वित झाले आहे. या सेंटरमुळे बंदिवानांना वैद्यकीय उपचारांसाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्याची गरज राहणार नाही.

-राजकुमार साळी, अधीक्षक, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २२ जुलै रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७चे आयोजन करण्यात आले आहे. २२ जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापने, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्यास १५ जूनपासून सुरू झाले असून, ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेशपत्राची ऑनलाइन प्रिंट १० ते २२ जुलै या कालावधीत काढता येणार आहे. या परीक्षेचा पेपर १, २२ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ याचदिवशी दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव ढेरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

अर्जासाठी वेबसाइटवर

या परीक्षेसंबंधी सर्व शासन निर्णय, माहिती, सूचना तसेच ऑनलाइन अर्ज भरणे, अर्ज स्वीकृती, परीक्षेची वेळ व यांसारखी इतर सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mahatet.in आणि www.mscepune.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता व्हर्च्युअल ड्रेसिंगद्वारे निवडा कपडे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महिलांच्या चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे बसविल्याच्या घटना वारंवार समोर येतात. असे प्रकार टाळण्यासाठी महावीर एज्युकेशन सोसायटीच्या संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनींनी ‘व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम युझिंग कायनेट’ हा प्रकल्प तयार केला आहे.
या सॉफ्टवेअरच्या वापराने मॉल असो किंवा शॉप, चेंजिंग रूममध्ये महिलांची सुरक्षा अबाधित राहिल, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
संघवी कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनीरिंगच्या प्राजक्ता जगताप, कांचन मते, शीतल भोळे या विद्यार्थिनींनी ‘व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम युझिंग कायनेट’ या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. महिला महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करू शकतात, ही भावना या विद्यार्थिनींनी यावेळी व्यक्त केली.

असे काम करते सॉफ्टवेअर

हे सॉफ्टवेअर डॉट नेट लँग्वेजमध्ये तयार करण्यात आले आहे. यासाठी केवळ २० हजार रुपये खर्च आला असून सर्वप्रथम हे कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केले जाते. त्यानंतर कॉम्प्युटरला कायनेट डिव्हाइस एक्स बॉक्स ३६० हा सेन्सर जोडावा लागतो. व्हर्च्युअल ट्रायल करताना सेन्सर समोर जाऊन व्हर्च्युअल इमेज घेतली जाते. सॉफ्टवेअरद्वारे पसंत केलेल्या वेअरेबल प्रॉडक्टसचे आभासी चित्र आपल्याला स्क्रीनवर दिसू लागते. प्रकल्पातील विद्यार्थिनींना प्रा. बाजीराव शिरोळे, प्रा. शीतल मोरे, विभागप्रमुख पुष्पेंदू बिश्वास, प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींनी या प्रकल्पाच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बकरे यांना चौकशीसाठी नोटीस

$
0
0

महिना उलटूनही कारवाई नाही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एमआयडीसीच्या बहुचर्चित फाइल गहाळ प्रकरणात सातपूर पोलिसांनी निलंबित भूमापक आर. डी. बकरे यांना हजर राहण्याची नोटीस काढली आहे. या प्रकरणात बकरे यांनी जबाब पोस्टाने पाठवल्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी ही नोटीस आहे. या प्रकरणात तक्रार देऊन महिना उटल्यानंतरही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

फाइल गहाळ प्रकरणात एका उद्योजकासह, तत्कालीन मोठे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळे हे प्रकरण कसे मिटेल यासाठी काहींचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाची महिनाभरापूर्वी एमआयडीसीने तक्रार केल्यानंतर काही जणांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यामुळे यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असे वाटत असताना अचानक या प्रकरणाची चौकशी संथ झाली. त्यामुळे याबाबत एमआयडीसीत उलटसुलट चर्चेलाही उधाण आले होते. पण पोलिसांनी पुन्हा बकरे यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. बकरे यांची बदली नांदेड येथे केली असून, ते निलंबित आहेत. एमआयडीसीची ही फाइल गहाळ करण्यामागे कोणाचा हात होता याचा पोलिस शोध घेत असून, या जबाबानंतर त्याला उलगडा होणार आहे.

व्हिजिटर्सच्या चेअरवर फाइल

या प्रकरणात शिपाई बाळू पारधी यांचा याअगोदर जबाब पोलिसांनी घेतला आहे. त्यात व्ह‌िजिटर्सच्या चेअरवर ही फाइल २६ एप्रिल रोजी मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. सर्व व्ह‌िजिटर निघून गेल्यानंतर ती फाइल खुर्चीवर होती. त्यामुळे व्ह‌िजिटरची ही फाइल असेल म्हणून ती बाजूला ठेवण्यात आली. त्यानंतर सलग सुट्या आल्यामुळे २ मे रोजी ही फाइल व्हिजिटरची नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वर्तमानपत्राचे रॅपर व सेलोटेप लावलेल्या या फाइलचे कव्हर काढल्यानंतर ही गहाळ फाइल असल्याचे लक्षात आल्याचे पारधी यांनी सांगितले. एमआयडीसीने केलेल्या तक्रारीला जुळणारा हा जबाब असल्यामुळे त्यात नवीन काहीच नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंडाची रक्कम भरा, ‘अभय’ मिळवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत नळकनेक्शन दंड भरून नियम‌ति करण्यासह पाणी पुरवठ्यांतील त्रुटी सुधारून महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी महासभेने प्रशासनाच्या अभय योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेतंर्गत अनधिकृत नळकनेक्शन धारकांना अर्जाद्वारे दंड भरून कनेक्शन नियम‌ति करता येणार आहे. कनेक्शन अधिकृत कण्यासाठी संबंधिताना एक हजार ते दोन हजारापर्यंत कर भरावा लागणार आहे. आता कनेक्शन नियम‌ति केले नाही तर पाच ते दहा हजाराचा दंड आकारला जाणार आहे. या योजनेमुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

शहरातील पाणीपुरवठा योजनेत मोठ्या त्रुटी असून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळकनेक्शन आहेत. शहरातील मिळकतींची संख्या चार लाखाच्या आसपास असतांना नळकनेक्शनधारकांची संख्या पावणेदोन लाख आहे. त्यामुळे ग्वाल्हेर महापालिकेच्या धर्तीवर महापौर रंजना भानसी यांनी अभय योजनेचा पॅटर्न अमलात आणण्याचा निर्णय घेतला होता. शंभर रुपये भरून नळ कनेक्शन अधिकृत करून घेतल्याने पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली व पाणी गळतीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा तेथील करण्यात आला होता. अशीच योजना नाशिकमध्ये लागू करण्याचा निर्णय भानसी यांनी घेतला होता. त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. शहरात सहा विभागांमध्ये विभागिय अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंतांमार्फत योजना राबविली जाणार आहे. योजनेची घोषणा वर्तमानपत्रातून जाहिरातींद्वारे केली जाणार आहे. जाहीर नोटीस निघाल्यानंतर तीस दिवसांमध्ये अनाधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रचलित दर तक्का जाहीर केला आहे. घरगुत अर्धा इंची नळकनेक्शनसाठी एक हजार, तर बिगर घरगुतीसाठी दोन हजार रुपये दर निश्चित केला आहे. पाऊण इंची कनेक्शनसाठी घरगुती दीड हजार तर बिगर घरगुती दर तीन हजार रुपये आहे. महापालिकेकडे प्रचलित दरानुसार पैसे भरल्यानंतर ते नळ कनेक्शन अधिकृत केले जाणार आहे.

महिनाभराचा अल्ट‌मिेटम

पालिकेने यासाठी महिनाभराचा अल्ट‌मिेटम दिला आहे. त्यानंतर अनाधिकृत नळकनेक्शन शोधण्यासाठी मोहीम राबणार आहे. त्यात पाणी वापरापोटी दंड वसुल केला जाणार आहे. अर्धा इंची नळ कनेक्शनसाठी घरगुती पाच हजार रुपये तर बिगर घरगुतीसाठी दहा हजार रुपये आकारणी केली जाणार आहे. सोबतच तेवढीच रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. पाऊण इंची कनेक्शनसाठी सात हजार रुपये, घरगुती तर बिगर घरगुतीसाठी पंधरा हजार रुपये, एक इंची साठी दहा हजार रुपये, घरगुती तर बिगर घरगुतीसाठी वीस हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट बारकोडद्वारे दाखल्यांचे वितरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेतू कार्यालयाकडून वितरीत होणाऱ्या दाखल्यांवर बनावट बारकोड टाकून अफरातफर केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार देवळा सेतू कार्यालयात उघडकीस आला आहे. दाखले वितरणात‌ील अनियमिततेबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने जिल्ह्यातील एकूण चार सेतू कार्यालयांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. शहरातील एका महा ई सेवा केंद्रावरही अशा प्रकारच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले असून, शैक्षणिक प्रवेशाकरिता विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. दाखले वितरणाचे काम त्या त्या तालुक्यांमधील सेतू कार्यालये आणि महा ई सेवा केंद्रांकडून केले जाते. ग्रामीण भागात टेरासॉफ्ट कंपनीला, तर शहरात गुजरात इन्फोटेक कंपनीला हे काम दिले आहे. दाखले वितरण प्रणालीमध्ये सावळा गोंधळ असल्याचे यापूर्वी देखील अनेकदा उघडकीस आले आहे. आता थेट बारकोडच बनावट तयार करून दाखले वितरीत होत असल्याचा धक्कादायक प्रकार देवळा तालुक्यात उघडकीस आला आहे. निर्धारीत बारकोड असल्यास संबंधित प्रत्येक दाखल्याचे ३३ रुपये शुल्क सरकारच्या तिजोरीत जमा होते. परंतु, बारकोडच बनावट असल्याने हे शुल्क थेट संबंधित सेतूचालकाला मिळत होते, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली. तहसीलदारांमार्फत प्राथमिक चौकशी झाल्यानंतर संबंधितांस ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

निफाड, नाशिक येथील सेतू कार्यालयांमध्ये देखील दाखले व‌ितरणात अनियिमितता आढळून आली आहे. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनाही प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इगतपुरी येथील सेतू कार्यालयास २५ हजारांचा तर, शहरातील एका महा ई सेवा केंद्रास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

देवळा सेतू कार्यालयात अलीकडेच बनावट बारकोट बनविल्याचा प्रकार पुढे आला. संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली असून, कामकाजात सुधारणा न केल्यास त्याचे केंद्र कायमचे रद्द केले जाईल. दाखल्यांचे वेळेत वितरण होत नाही म्हणून अन्य सेतू केंद्रांवरही कारवाई केली असून, अन्य सेतू केंद्रांनाही हा इशारा आहे.

- शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडले जाणार चामरलेणीचे गूढ!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

म्हसरूळमधील नाशिकच्या उत्तरेला त्रिकोणाकार डोंगर म्हणजे चामरलेणी. चामरलेणी ही जैन लेणी आहेत. ही लेणी अकराव्या शतकात कोरली गेली आहेत. जैनांच्या पवित्र तीर्थस्थानांमध्ये या लेणीचा समावेश असून, लेणीचा इतिहास अन् जैन परंपरेतील एक मानबिंदू असलेल्या या स्थळाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे येत्या रविवारी (दि. २५) सकाळी ८.३० वाजता हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चामरलेणी व लेणीच्या पायथ्याचे दुर्मिळ मूर्ती संग्रहालयदेखील पाहता येणार आहे.

नाशिक परिसरात अनेक जैन लेणी आहेत. नाशिकवरील जैन धर्माचा प्रभाव या लेणी दाखवून देतात. यातील चामरलेणी साधारण हजार वर्षांपूर्वी साकारल्या गेल्या आहेत. चामरलेणीत तीन गुहा आणि एक मंदिर आहे. पहिल्या गुहेत पार्श्वनाथ भगवानांच्या तीन मूर्ती आहेत. मूलनायक भगवान महावीर स्वामींचीही मूर्ती आहे. गुहेच्या बाहेर भगवान नेमीनाथ, चंद्रप्रभ आणि आदिनाथ यांच्या मूर्ती आहेत. दुसऱ्या गुहेत शांतिनाथ, कुंथूनाथ आणि अरहनाथ यांच्यासह तीन चोविसी भगवानांच्या सुबक मूर्ती आहेत. तिसऱ्या गुहेत अकरा फूट उंचीची भगवान पार्श्वनाथांची पद्मासनातील अप्रतिम मूर्ती आहे. शेजारी मंदिरातही अनेक सुंदर मूर्ती आहेत. ही लेणी दक्षिणेतला राजा चामराज याने साकारली आहेत, म्हणूनच या लेणीस चामरलेणी म्हणतात. बलभद्रांच्या काळात गजकुमार नावाचे मुनीराज या ठिकाणाहून मोक्षास गेल्याची म्हटले जाते. त्यामुळे या ठिकाणाला गजपंथही म्हटले जाते. लेणीशी संबंधित अनेक अाख्यायिका व जैन धर्माचे वेगवेगळे पैलू यावेळी ज्येष्ठ लेखक डॉ. जी. बी. शहा यांच्याकडून अनुभवता येणार आहेत.

चामरलेणीच्या पायथ्याशी बेलोरकर गुरुजींच्या प्रयत्नांतून साकारलेले जैन मंदिर व विविध दुर्मिळ मूर्ती व शिल्पांनी सजलेले संग्रहालयदेखील पाहण्याची संधी यावेळी मिळणार आहे. या संग्रहालयात चोवीस तीर्थंकरांच्या बारीक कलाकुसरीच्या मूर्ती, कच्च्या पाचूच्या दगडातील मूर्ती, कन्नड शिलालेखांसहितच्या दाक्षिणात्य मूर्ती, गारगोटीसारख्या दगडावरच्या मूर्ती, हस्तलिखिते, पोथ्या व ब्राँझ धातूच्या विविध मूर्ती असून, ‘मटा हेरिटेज वॉक’मध्ये असा सर्व संग्रह पाहण्याची संधी मिळणार आहे.


चामरलेणीचा वॉक असा

नाशिक-पेठ रस्त्याने सीबीएसपासून आठ किलोमीटवर उजव्या हाताला चामरलेणीकडे जाणारा रस्ता लागतो. रस्त्यात बोरगड एअर फोर्स स्टेशनचा फलक आहे. मुख्य रस्त्यावरून दीड किलोमीटरवर आपण चामरलेणीच्या पायथ्याशी पोहोचतो. सकाळी ८.३० वाजता मंदिराजवळ सर्वांनी एकत्रित जमायचे असून, तेथून चामरलेणी पाहण्यासाठी जायचे आहे. ११ वाजता हा वॉक संपेल.

नावनोंदणी आवश्यक

चामर लेणीच्या मटा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी रमेश पडवळ यांच्या ८३८००९८१०७ या क्रमांकावर एसएमएस अथवा व्हॉटस् अॅपवर आपले नाव व आपल्यासोबत येणाऱ्यांची संख्या कळवायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळापूर्व कामांच्या भ्रष्टाचाराला अभय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही, विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधाऱ्यांनी गुडघे टेकले. सोमवारी पावसाळीपूर्व कामांवरील लक्षवेधीवरून महापौरांना महासभा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. पावसाळीपूर्व कामांवरून विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधीला सभागृहनेते दिनकर पाटील यांनी फाटे फोडत थेट पावसाळी गटार योजनेवरून विरोधकांवरच आरोप केले. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी खुलाशाची मागणी करत गोंधळ घातला. आमच्यावर झालेल्या आरोपांना उत्तरे देवू देण्याची मागणी करण्यावरून विरोधक आक्रमक झाल्याने महापौरांनी आमने-सामने चर्चा होऊ देण्याऐवजी थेट महासभाच गुंडाळण्याचा मार्ग पत्करला. त्यामुळे विरोधकांनी महासभेतच ‘सत्ताधाऱ्यांचा निषेध’, ‘दादागिरी नही चलेगी’, ‘महापौरांचा निषेध’ अशी घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे साडेचार तास पावसाळीपूर्व कामांवरून सुरू असलेली चर्चा फोल ठरली. त्यामुळे पावसाळीपूर्व कामांतील भ्रष्टाचाराला आपोआपच अभय मिळाले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या कारभारावरच संशय निर्माण झाला आहे.

गेल्या बुधवारी नाशिक शहरात दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अर्धे नाशिक जलमय झाले होते. पावसाळी गटार योजनेचे अपयश आणि शहरात पावसाळापूर्व कामे झाले नसल्यामुळे पहिल्याच पावसात नागरिकांची दैना उडाल्याचा आरोप केला जात होता. त्यासंदर्भात सोमवारच्या महासभेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी लक्षवेधी दाखल केली होती. ही लक्षवेधी चर्चेला घेण्यावरूनही सभागृहात गदारोळ झाला. महापौर रंजना भानसी यांनी विषयपत्रिकेवरील विषय प्रथम संपल्यानंतर लक्षवेधी दाखल करून चर्चा करू असे सांग‌ितले. त्यावरून विरोधक पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी महापौरांच्या समोर वेलमध्ये धाव घेतली. बराच वेळ गदारोळ सुरू राहिल्यानंतर महापौरांनी नमते घेत, लक्षवेधी दाखल करून घेत चर्चेला सुरुवात केली. विरोधकांनी पावसाळापूर्व कामांवरून सत्ताधाऱ्यांना घेरत, पावसाळी गटार योजनेच्या अपयशावर बोट ठेवले. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनीही पावसाळी पूर्व कामांवर शंका उपस्थित केली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आरोपीच्या पिंजऱ्यात अडकला.

साडेचार तास पावसाळापूर्व कामे आणि पावसाळी गटार योजनेतील भ्रष्टाचारावर चर्चा सुरू असताना सभागृहनेते दिनकर पाटील यांनी विषयाला कलाटणी दिली. पावसाळी गटार योजनेतील भ्रष्टाचाराची लक्षवेधी ही २८ मे २०११ रोजीच्या महासभेत अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, संभाजी मोरुस्कर, डॉ. हेमलता पाटील यांनी लावली. या लक्षवेधीमुळे तत्कालिन अधीक्षक अभियंता सुनील खुने निलंबित झाले. परंतु, ज्यांनी लक्षवेधी मांडली त्यांनीच खुनेंना परत घेण्यासाठी प्रयत्न केलेत, असे सांगत एवढा चमत्कार कसा झाला, असा थेट आरोप केला. बोरस्ते, डॉ. पाटील,मोरुस्कर, बडगुजर यांनी पावसाळी गटार योजनेच्या भ्रष्टाचारात थेट सेटींग केल्याचा अप्रत्यक्ष आरोप पाटील यांनी केल्याने विरोधक आक्रमक झालेत. त्यामुळे बोरस्ते, बडगुजर, डॉ. पाटील यांनी आपल्याला खुलासा सादर करू द्या, अशी मागणी केली. परंतु, महापौरांनी आधी प्रशासनाचे स्पष्ट‌ीकरण घेऊ द्या, असा आग्रह केला. त्यावरून सभागृहात विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. महापौरांनीही प्रशासनाला पाठ‌िशी घालण्याची आणि पावसाळापू्र्व कामांना क्लिनचीट देण्याची योग्य वेळ असल्याचे संधी साधत सभा गुंडाळली. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images