Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘महेश’,‘कर्मचारी’साठी मतदान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मराठा हायस्कूल येथे रविवारी शांततेत मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी फेम थिएटरच्या मागे असलेल्या सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयात होणार आहे. १४ हजार ६० सभासद असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी समता पॅनल व विरोधी गटाच्या सहकार पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. मतदानाननंतर दोन्ही पॅनलने विजयाचा दावा केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पोलिस व शिक्षक सोडून इतर सर्वच खात्यांतील वर्ग १ ते ४ या सर्वच स्तरातील कर्मचारी या बँकेचे सभासद असल्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी सर्व सरकारी कार्यालयांत जोरदार प्रचार करुन रंगत वाढवली होती. या निवडणुकीत सत्ताधारी समता पॅनलचे विद्यमान संचालक सहकार पॅनलकडे गेल्यामुळे मतदारांचाही गोंधळ उडाला. सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यासाठी २८ बूथ व १६० कर्मचारी तैनात होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिजीत देशपांडे व सहाय्यक अधिकारी म्हणून आर. आर. मोरे यांनी काम बघितले.

‘महेश’साठी ३७ टक्के मतदान
आडगाव ः दोन दशकांपासून सहकार क्षेत्रात परिचित असणाऱ्या महेश बँकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मतदान झाले असून, ६४५८ मतदारांपैकी २४२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महेश्वरी बालाजी मंदिर ट्रस्ट येथे सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
या निवडणुकीत १५ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १० जागांसाठी ११ उमेद्वार रिंगणात आहेत. एन. टी. प्रवर्गाची एक जागा रिक्त आहे. नाशिक, नाशिकरोड, सिन्नर आणि मालेगाव या ठिकाणी मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळच्या सुमारास मतदारांची गर्दी पहायला मिळाली. पण त्यानंतर मात्र वेग मंदावला. एकूण निवडणूक प्रक्रियेसाठी ७ केंद्रांवर ७० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अजय गुजराथी यांनी दिली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. आर. शिंदे यांनी कामकाज बघितले. सोमवारी सकाळी ८ वाजता श्री महेश्वरी बालाजी मंदिर ट्रस्ट, अभोणकर लेन, रविवार पेठ, येथे मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक संघटनेचा मागण्यांसाठी मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारने फेब्रुवारीच्या शासन निर्णयात बदल करावा तसेच यावर्षी सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने रविवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

प्राथमिक शिक्षक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यावेळी राज्य प्राथमिक शिक्षण संघटना समन्वय समितीने शासनाशी अनेकवेळा चर्चा केली. मात्र आश्वासनाशिवाय काही ठोस निर्णय झाला नाही. म्हणून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरातदेखील शिक्षक समितीने मोर्चा शहरातील कामगार कल्याण भवनापासून जुने जिल्हा रुग्णालयामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. यावेळी मोर्चेकरांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, शाळांच्या विद्युत बिलाची तरतूद करून ऑनलाइन करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात यावी, पटसंख्येची अट न ठेवता अंश निर्देशकांची पदे प्रत्येक शाळेत भरण्यात यावी, पती-पत्नी व एकल शिक्षकांना समान न्याय मिळावा, या मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला होता. मोर्चात समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, रवींद्र खैरनार, भगवंत बोरसे, गमन पाटील, शरद सूर्यवंशी, उमराव बोरसे, मनोहर सोनवणे, अनिल तोरवणे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् प्रवाशाला मिळाले जीवनदान

$
0
0

रेल्वे पोलिस आणि सुरक्षा दलाची तत्परता

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यात योग्य समन्वय असला की रेल्वे प्रवाशाचे मौल्यवान प्राणही वाचतात याचा प्रत्यय नाशिकरोडला आला. हृदयविकाराचा झटका आलेल्या रेल्वे प्रवाशाचे प्राण या दोन्ही दलांच्या समन्वयामुळे वाचले. त्याला जीवनदान मिळाले. प्रवाशांनी या दोन्ही दलांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

संतोष काळूराम मंदोरे (३८, मखमलाबाद, नाशिक) हे जळगावहून नाशिकला गीतांजली एक्स्प्रेसने येत होते. त्यांच्यासमवेत पत्नी निता होती. प्रवासादरम्यान मंदोरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. सहप्रवाशांनी नाशिकरोड रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधला. नाशिकरोड पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाने राज्य सरकारच्या १०८ क्रमांकाच्या दूरध्वनीवर संपर्क साधून रुग्णवाहिका आणि डॉक्टर तयार ठेवत मदत कार्याची व्यवस्था केली होती. सायंकाळी पाचला गीतांजली एक्सप्रेस नाशिकरोडला

येताच जवानांनी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून मंदोरे यांना खुर्चीवर बसवले. त्यांना रेल्वे रुळ ओलांडून कुली व कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आणले. तेथून रुग्णवाहिकेत बसवून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

--------------------

रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवणे हे आमचे कर्तव्यच आहे. प्रवाशांना काही समस्या आल्यास त्यांनी दलाशी आवर्जून संपर्क साधावा. मदत करायला आम्ही तत्पर आहोत.

- नितीन पवार,

सहाय्यक निरीक्षक, लोहमार्ग पोलिस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महामंडळांनाही कर्जमाफी द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता महामंडळेही कर्जमाफीच्या मागणीसाठी सरसावली आहेत. थकीत कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीयांसाठी सरकारने अण्णा भाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, चर्मकार उद्योग महामंडळ, शबरी महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ आदी महामंडळांच्या माध्यमातून गरजूंना कर्जवाटप करण्यात आले. कर्जाची वेळेवर परतफेड झाली नाही. त्यामुळे महामंडळ कर्जबाजारी झाले. महामंडळांना पुन्हा आर्थिक उभारी देण्यासाठी कर्जमाफी द्यावी, अशी मागणी अध्यक्ष गमाजी घोडे, सुभाष रणखांबे, विठ्ठल कांबळे आदींनी केली आहे.

मातंग समाजाला जातीचे दाखले स्थानिक पातळीवर द्यावेत, अण्णा भाऊ महामंडळाद्वारे बंद पडलेली एनएसएफडीसी कर्ज प्रकरणे सुरू करण्यात यावीत, लहूजी साळवे आयोगाच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, लहूजी साळवे व अण्णा भाऊ साठे जयंतीन‌िमित्त सरकारी सुटी जाहीर करावी, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे दोन हजार रुपये कोटी भागभांडवल वाढविण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर किशोर शिरसाठ, रवी डोंगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करचुकवेगिरीला जीएसटीमुळे चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्याकडे टॅक्स चुकवेगिरीचे प्रमाण अधिक असून, जीएसटीमुळे अशा चोरीला आणि काळ्या पैशालाही आळा बसेल, असा विश्वास चार्टर्ड अकाउंटंट जे. के. मित्तल यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केला.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)तर्फे ‘जीएसटी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात मित्तल बोलत होते. कालिदास कलामंदिरात झालेल्या या चर्चासत्रासाठी उद्योग, व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थ‌ित होते. एक जुलै २०१७ पासून प्रस्तावित असलेल्या जीएसटीबद्दलचे समज- गैरसमज दूर व्हावेत आणि जीएसटी करप्रणाली म्हणजे नेमके काय हे लक्षात यावे हा या चर्चासत्राच्या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.

या वेळी मित्तल म्हणाले, ती वेगवेगळे कर भरण्यापेक्षा अनेक करांना जीएसटीच्या माध्यमातून एका सूत्रात बांधण्यात आले आहे. त्यामुळे करप्रणालीमध्ये सुसूत्रता आणि सुटसुटीतपणा येण्यास मदत होईल. आपलेच लोक अन्य देशांत गेले की तेथे आकारण्यात येणारा कर विनातक्रार भरतात. मात्र, आपल्याकडे कर भरायचा म्हटले, की विरोध सुरू होतो. ज्यांना कर चुकवायचा असतो तेच जीएसटीला विरोध करीत असावेत, अशी टीका या वेळी मित्तल यांन‌ी केली. टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी वेळ घेतला जात असल्याने त्यामध्ये अनियमिततेला वाव मिळत असे. जीएसटी ही नवीन प्रणाली रुळण्यास वेळ लागेल. या प‍्रणालीचे दीर्घकालीन फायदे असून, प्रामाणिक करदात्यांना चिंतेचे कारण नाही, असे ते म्हणाले. देशाच्या प्रगतीसाठी जीएसटीचे स्वागत करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

प्रत्येक गोष्टीला चांगल्या व वाईट अशा दोन्ही बाजू असतात. जीएसटी प्रणालीमध्येदेखील काही त्रुटी असू शकतात. मात्र, अंमलबजावणीनंतरच या त्रुटी लक्षात येतील. जीएसटीमुळे करसंकलन मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे भविष्यात कराचे दर कमी होऊ शकतील, अशी शक्यता त्यांनी या वेळी व्यक्त केली. काळा पैसा रोखण्यास जीएसटीमुळे मदत होईल, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या लपंडावाने हरसूल अंधारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

हरसूल भागात विजेच्या लपंडावामुळे अनेक गावांना चार दिवस अंधारात राहावे लागले. अनेक गावातील विजेचे खांब गंजले असून, ते पडण्याच्या स्थितीत आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील महावितरण कंपनीकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी हरसूल येथे आयोजित बैठकीत महावितरणचे उपअभियंता नवासरे यांना धारेवर धरले. विजेच्या अपघातातून होणाऱ्या जीवितहानीबद्दल हत्येचे गुन्हे अधिकाऱ्यांवर दाखल करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

बैठकीप्रसंगी ग्रामस्थांनी हरसूल येथे वायरमन मद्याच्या नशेत काम करतात, अशी तक्रार केली. यावेळी आठ दिवसांत गंजलेल्या विजेच्या पोलांचे सर्वेक्षण करून पोल बदलण्याचे आदेश उपसभापती रवींद्र भोये यांनी दिले. हरसूल गटातील गावांना जोडणारे रस्ते दुरुस्त करण्याबरोबरच प्रत्येकाला शुध्द पाणी, आरोग्याच्या सुविधा, वीज आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांनी गावकऱ्यांना मदत करावी, अन्यथा तक्रार आल्यास कारवाई करणार असल्याचे माळेकरांनी सांगितले.

आरोग्य केंद्राचीही दैना

हरसूल आरोग्य उपकेंद्र तयार होऊन पाच वर्षे झाली. मात्र याठिकाणी कर्मचारीच नाही. तसेच, आरोग्य उपकेंद्रांची उडालेली दैना, आरोग्यसेवक, सेविका यांची सतत असलेली गैरहजरी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असलेले दुर्लक्ष यामुळे आरोग्य व्यवस्थेची हेळसांड होत आहे. सारस्ते येथे मलेरियाने एका व्यक्तींची मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांना याची माहिती नव्हती. नागरिकांच्या तक्रारीनंतर अरुण चव्हाण या आरोग्य सेवकाची चौकशी करून बदली करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावविकासाला खीळ घालू नका

$
0
0

आमदार अनिल कदम यांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ग्रामपंचायत स्तरावर गावात विकासकामे मार्गी लावण्यासाठी ग्रामसेवक, कर्मचारी महत्त्वाचा घटक असतो. मात्र काहीवेळा कर्मचारीवर्ग गावाच्या विकासात खीळ घालण्याचे काम करतात. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा निफाडचे आमदार अनिल कदम यांनी दिला आहे.

निफाड येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षेतेखाली उगाव गटाची आढावा बैठक झाली. या बैठकीस आमदार अनिल कदम, गटविकास अधिकारी वैशाली रसाळ, पंचायत समिती सभापती पंडित आहेर, सदस्य सोमनाथ पानगव्हाणे, शिवा सुरासे आदींसह शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, पाटबंधारे, पशुसंवर्धन आदींसह उगाव गटाच्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

या आढावा बैठकीत चौदाव्या वित अयोगाच्या निधीबाबत संभ्रम, बंद ट्रान्सफार्मर, थकीत वीज बिलामुळे कट झालेले कनेक्शन, सरपंच-ग्रामसेवकांतील समन्वयाचा अभाव यासह शासनाच्या पीकविम्याचा लाभ, शिवार रस्यांचे प्रश्न यावर सरपंचांनी व्यथा मांडल्या. यावेळी ग्रामसेवकांनी आपल्या गावांच्या विकासाचे प्रस्ताव तातडीने तयार करून द्यावेत, त्यामुळे या कामांचा पाठपुरावा करता येईल, असे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले. नैताळे, रानवड साखर कारखाना वसाहत, काथरगावचे वीजकनेक्शन तातडीने जोडावे, असे आदेश आमदार अनिल कदम यांनी वीज वितरण अभियंत्यांना दिले.

या बैठकीत अधिकाऱ्यांनी सरपंचांनी मांडलेल्या तक्रारींचे उत्तर दिले. बैठकीस खंडू बोडके, संदीप तासकर, उपनगराध्यक्ष जावेद शेख, नगरसेवक मुकुंद होळकर, रामभाऊ पडोळ, रावसाहेब गोळे, संपत डुंबरे, रवि शिंदे, सुधीर कराड, करीम शेख, कैलास क्षीरसागर, शिवाजी तळेकर, संजय बोरगुडे, रामनाथ सानप, प्रमोद क्षीरसागर, लाला कातकाडे, आशिष मोगल, संदीप जेऊघाले, गणपत क्षीरसागर, तुकाराम पिठे आदींसह विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी करणार मॉलसंस्कृतीशी स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयटी युगात मॉलसंस्कृतीशी बरोबरी साधण्यासाठी व्यापाऱ्यांसाठी कॉम्प्युटर अकाउंटिंग, व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे प्रशिक्षण वर्गांचे आयोजन दि नाशिक रिटेल क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनद्वारे केले जाईल, अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी नुकतेच केले.

संघटनेतर्फे व्यापारी बांधवांसाठी प्रथमच संगीतसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम झाला. त्या वेळी कापडिया बोलत होते. ते म्हणाले, मॉलसंस्कृतीला तोंड देण्यासाठी व्यापाऱ्यांनाही काळानुरूप बदलावे लागेल. म्हणूनच संघटनेच्या सभासदांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, मुंबई, पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांची त्यासाठी मदत घेण्यात येणार आहे. दुकानांमधील कर्मचाऱ्यांसाठी विक्रीव्यवस्थापन, आदर्श वागणूक आदींबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, गणवेश, पुस्तके, पुरविण्याचा मानस या वेळी व्यक्त करण्यात आला. या वेळी सारेगम फेम राहुल सक्सेना आणि अमोल पाळेकर यांच्या सुरेल गीतमैफलीचा आनंद उपस्थ‌ितांनी घेतला. नरेश पारख, नितीन वसानी, संपत काबरा, प्रसाद चौधरी, सतीश शहा आदींनी सहकार्य केले. चेतना सांखला यांन‌ी सूत्रसंचालन केले. सोमेश्वर काबरा यांन‌ी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निराशा अन् संताप!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारत- पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी तब्बल दहा वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन स्पर्धेच्या फायनलमध्ये...त्यात सुटीचा दिवस असल्याने मॅचची अधिकच उत्सुकता... दोन दिवस आधीपासूनच भारताच्या बाजूने सोशल मीडियावर पसरत असलेले जोक्स.. या सर्व पार्श्वभूमीवर टीव्हीसमोर ठाण मांडून बसलेल्या क्रिकेट रसिकांना आज ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ अनुभवायला मिळणार अशी खात्रीच होती. पाकिस्तानने तब्बल ३३८ धावांचा डोंगर उभा केल्याने मॅच अटीतटीचीच होणार असे कयास बांधले जात असतानाच, भारतीय फलंदाजांनी सपशेल हाराकिरी केली आणि क्रिकेटरसिकांच्या आनंदावर विरजण पडले. पहिल्या तेरा षटकांतच अर्धा संघ तंबूत परतल्याने आधी उत्साह, उत्सुकता आणि आनंदाची जागा निराशा आणि नंतर संतापाने घेतली.

आयसीसी चॅम्पियन स्पर्धेचा अंतिम सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी झाला. हा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ अनुभवण्यासाठी संपूर्ण शहरात अघोषित संचारबंदीचे वातावरण होते. भारत पाकिस्तान मॅचची चर्चा आदल्या दिवसापासूनच होती. रविवारी मॅच आल्याने क्रिकेटवेड्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. शहरातील क्रिकेटप्रेमींनी मॅचचा आस्वाद घेण्यासाठी आधीपासून तयारी केली होती. अनेकांनी मॅच सुरू होताच टीव्हीपुढे ठाण मांडले. काही मित्र मंडळांनी खास मोठा पडदा लावून परिसरातील सर्वांना मॅचचा आनंद घेता येईल, अशी व्यवस्था केली होती. भारत जिंकणारच, यावर पैजा लागल्या जात होत्या. फक्त, किती धावांनी पाकिस्तानला गारद केले जाते, याबाबतीत चर्चा होत होती. मात्र, पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. सलामीला आलेल्या अझर अली आणि फकर झमानने पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागिदारी रचली. बाबर आझम, मोहम्मद हाफीज आणि इमादने जलद खेळी करत पाक संघाला ३३८ इतकी मोठी धावसंख्या उभारून दिली. भारतासाठी हे आव्हान मोठे आहे, याची कल्पना क्रिकेटरसिकांना होतीच. मात्र, भारताचे रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, धोनी हे भरवशाचे खेळाडू एकामागोमाग एक पहिल्या तेरा षटकांतच तंबूत परतले. त्यामुळे आधी उत्सुकता, उत्साहाची जागा नंतर ‌निराशा आणि संतापाने घेतली. अनेकांनी १५ षटकांनंतर चॅनल बदलून टाकले तर काहींनी टीव्ही बंद करून घराबाहेर पडणे पसंत केले.

दुपारपासून सामसूम

दुपारपासून शहरात सामसूम होती. रस्त्यावर नागरिक व वाहनेही अत्यंत तुरळक प्रमाणात दिसत होती. अनेक व्यावसायिकांची दुकाने उघडी होती. परंतु, तेदेखील मॅचचा आनंद घेण्यात मश्गुल होते. मात्र, सायंकाळी चित्र बदलल्यानंतर बाजारात वर्दळ वाढली.

फटाक्यांचे करायचे काय?

भारत-पाकिस्तान मॅच म्हटली की फटाक्यांची आतषबाजी आलीच. भारत जिंकणारच, या खात्रीमुळे तरुणवर्गाने विजयाचा जल्लोष करण्यासाठी फटाके आणून ठेवले होते. मॅच संपल्यानंतर या फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार होती. पण, भारतीय संघाची वाईट अवस्था झाल्याने आणलेल्या फटाक्यांचे करायचे काय, असा प्रश्न तरुणांना पडला. काहींनी मॅच सुरू असतानाच फटाके वाजवून टाकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्वारकासाठी पर्यायांची चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शनिवारी सदर ठिकाणी पाहणी केली. लवकरच नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाचे (न्हाई) अधिकाऱ्यांसमवेत वाहतूक पोलिस या संबंधी चर्चा करणार असून, आठ ते दहा दिवसांत नवीन पद्धतीने वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
द्वारका येथील सबवेचा वापर होत नाही. त्यामुळे पुढील अनिश्चित काळापर्यंत द्वारका सबवेला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी टाळे ठोकले. तत्पूर्वी येथील व्यावसायिकांना रस्त्यावर पार्क होणाऱ्या वाहनांबाबत नोटिसादेखील बजावण्यात आल्या होत्या. सर्व्हिस रोडचा वापर करीत द्वारका सर्कलचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी करून पाहिला. मात्र, त्यालाही यश मिळाले नाही. उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर द्वारका सर्कल येथील वाहतुकीचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना राबवण्यात प्रशासनाला अद्याप यश मिळालेले नाही. हायवे सर्व्हिसरोडसह छोटे मोठे मिळून १२ ते १२ रस्ते द्वारका सर्कल येथे मिळतात. वाहनांना फिरण्यासाठी पुरेसे ‘टर्निंग रेड‌यिस’ उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक प्रश्न बिकट बनतो. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सांगितले की, द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ठोस उपायांची गरज आहे. मात्र, तेथे काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी दूर होणे अशक्य असल्याने उपलब्ध पर्यांयांची सातत्याने चाचपणी केली जाते. सध्या, आम्ही या ठिकाणी पाहणी करून द्वारका सर्कलचा वापर बंद करण्याचे नियोजन असल्याचे सिंगल म्हणाले.
असा आहे पर्याय
नाशिककडून नाशिकरोडकडे जाणारी वाहने हायवेने थेट औरंगाबादरोडच्या दिशेने पुढे न्यायची. तसेच जिथे टर्निंग रेड‌यिस मिळेल तेथून ती पुन्हा वळवायची. यामुळे द्वारका सर्कलवरील वाहने एकमेकांना क्रॉस होणार नाही. नाशिकरोडकडून येणारी वाहने आणि हायवेवरून शहराकडे येणाऱ्या वाहनांचा देखील विचार करण्यात येतो आहे. ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा सुरू असून, सात ते आठ दिवसांत काही ठिकाणी किरकोळ बदल केले जातील.

प्रायोग‌कि तत्त्वावर हा बदल आहे. यासंबंधी काही बैठका झाल्या असून, शनिवारी सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. दपर्यायी रस्त्यांचा वापर योग्य झाल्यास भविष्यात याच पध्दतीने वाहतूक नियंत्र‌ति केली जाईल.- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेज चोकअपची डोकेदुखी

$
0
0

सातपूरला चेंबरमध्ये दारूच्या बाटल्या; प्लास्टिक कचऱ्याने कर्मचारी हैराण

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगार वस्ती असलेल्या सातपूर भागात महापालिकेने सांडपाणी वाहून जाण्याकरीता ड्रेनेजची व्यवस्था उभारली आहे. परंतु, वाढलेल्या घरकुलांमुळे ड्रेनेज चोकअपची समस्या ही मोठी डोकेदुखी बनली आहे. त्यातच सांडपाणी वाहून जाणाऱ्या लाइनीत नको त्या वस्तू टाकल्या जात असल्याने ड्रेनेज सतत चोकअप होत असतात.

महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या स्वारबाबा नगर व काळे नगरच्या मध्यभागी ड्रेनेजच्या चेंबरमध्ये दारूच्या शेकडो बॉटल कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहेत. सांडपाणी वाहून जाणाऱ्या ड्रेनेजमध्ये अशाप्रकारे घाण, कचरा टाकणे चुकीचे आहे. नेहमीच ड्रेनेजच्या समस्या सातपूर भागात वाढल्याने कर्मचारीही परेशान झाले आहेत. नागरिकांनीदेखील सांडपाण्याच्या ड्रेनेजमध्ये घाण, कचरा टाकू नये, असे आवाहन ड्रेनेज विभागाने केले आहे.

पहिल्याच जोरदार पावसात नाशिककरांची दैना केली होती. सांडपाण्याच्या लाइनीदेखील अनेक ठिकाणी ओव्हरफ्लो झाल्याने चेंबरमधून पाणी रस्त्यावर वाहत होते. वाढत्या लोकवस्तीत महापालिकेने ठिकठिकाणी सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु, अनेक भागात ड्रेनेजच्या वस्तू टाकल्या जात असल्याने ड्रेनेज चोकअपची समस्या वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदारांना पीओएस मशिनचे वाटप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील रेशन दुकानांचा काळाबाजार रोखण्यासाठी सर्वच दुकानांमध्ये पीओएस मशिन बसविण्यात येत आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांसाठीही पीओएस मशीन उपलब्ध झाले असून धुळे तालुक्यासह शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील रेशन दुकानदारांना हे मशिन वाटप करण्यात आले आहेत.

जिल्हा पुरवठा विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन दुकान धारकांना पीओएस मशीन वितरित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरुडे, प्रमोद भामरे, तहसीलदार अमोल मोरे, संदीप भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या वेळी रेशन दुकानधारकांनी पीओएस मशिनचा वापर कसा करावा, याविषयी ध्वनिफितीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

धुळे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील ५५ हजार लाभार्थी सदस्यांनी आपले आधार क्रमांक सादर केलेले नाहीत. त्यांना आधार सादर करण्यासाठी दि. ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर जर आधार क्रमांक शिधापत्रिकेची जोडला गेला नाही तर लाभार्थ्यांना स्वस्त धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर गिरवणार मॅनेजमेंटचे धडे

$
0
0

नाशिक ः एरवी, स्टेथोस्कोप हाती घेऊन रुग्णांच्या हृदयाचे ठोके मोजणारे डॉक्टर्स आता नव्याने व्यावसायिक वर्तुळात पाऊल टाकण्याअगोदर व्यवस्थापनशास्त्राचे धडेही गिरविणार आहेत. गेल्या वर्षी पदवीदान सोहळ्यात विद्यापीठाने घोषित केलेले तीन नवे अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत. यात ‘एमबीए इन हेल्थकेअर अॅडमिन‌िस्ट्रेशन’ या नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.

सन २०१६ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात नवीन तीन अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. यंदा २०१७-२०१८ पासून ‘मास्टर ऑफ बिझनेस अडमिन‌िस्ट्रेशन इन हेल्थकेअर’ ‘मास्टर ऑफ पब्ल‌िक हेल्थ’ (न्युट्र‌िशन) आणि ‘मास्टर ऑफ सायन्स इन फार्मा मेडिस‌िन्स’ या तीन नव्या अभ्यासक्रमांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे.

‘हेल्थकेअर’ या क्षेत्राकडे वेगाने विस्तारणारे सेवाक्षेत्र म्हणून बघितले जात आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकावरचे हे सेवा क्षेत्र आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या विपणण पध्दतींमुळे या क्षेत्राची वेगवान प्रगती होत असल्याचे आरोग्य विद्यापीठाच्या एका अहवालात म्हटले आहे. तर हेल्थकेअर विभागासाठी व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने या अहवालात म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले, हेल्थकेअर क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छ‌िणाऱ्या युवकांसाठी या विषयातील एमबीए हा चांगला पर्याय या अभ्यसाक्रमाच्या निमित्ताने समोर आला आहे. विद्यापीठाच्या नाशिक मुख्यालयासह पुणे आणि ठाणे येथील विभागीय केंद्रांच्या हद्दीत हा अभ्यासक्रम चालविला जाईल. या अभ्यसक्रमासाठी एकूण ९० जागा उपलब्ध आहेत. आरोग्य विज्ञान विषयातील पदवीधरांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बीएएएलपी हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए इन हेल्थकेअरसाठी प्रवेश घेता येणार आहे. याशिवाय बीएससी नर्सिंगच्या पात्रतेनंतरही प्रवेश देण्यात येतील.

यातील ‘मास्टर्स इन पब्ल‌िक हेल्थ (न्युट्र‌िशन)’ हा दोन वर्षीय अभ्यासक्रम केवळ पुण्यातील केंद्रात चालविला जाईल. ‘युनिसेफ’ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यापीठासोबत या विषयाचा अभ्यासक्रम बनविला आहे. तर मास्टर्स इन सायन्स (फार्मा मेडिस‌िन्स) मध्ये औषधनिर्माण शास्त्र विषयातील शोध, विकास, मूल्यमापन, नोंदणी नियंत्रण आदी कंगोरे अभ्यासले जाणार आहेत.


प्रवेशाचे वेळापत्रक

- ऑनलाइन अर्जाची मुदत : ३० जून

- हार्ड कॉपी जमा करणे : ७ जुलै

- अर्जांची छाननी : १० ते १५ जुलै

- सीईटीसाठी प्रवेशपत्र : १७ ते २१ जुलै

- सीईटी परीक्षा : ३० जुलै सकाळी ११ वाजता

- गुणवत्ता यादी प्रकाशन : १० ऑगस्ट

- समुपदेशन आणि प्रवेश : १८ ते २२ ऑगस्ट

- अभ्यासक्रमासाठी रिपोर्टिंग : २८ ऑगस्ट

- वर्गांना सुरुवात : १ सप्टेंबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरेंच्या दौऱ्यामुळे आंदोलनाला येणार धार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने कर्जमाफी केल्यानंतर थंडावलेल्या शेतकरी आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याने पुन्हा धार येणार आहे.

पुणतांब्याच्या सुकाणू समितीने राज्य सरकारशी परस्परबोलणी करून निर्णय घेतल्यानंतर आंदोलनाचे केंद्र नाशिक झाले होते. शेतकऱ्यांचे हे आंदोलन फसले असे वाटत असतानाच नाशिकच्या शेतकऱ्यांनी त्यात जीव ओतत आंदोलनाला निर्णायक स्थितीत नेले. मात्र, सरकारने केलेल्या घोषणेनंतर आता शेतकऱ्यांची घुसमट स्पष्ट समोर येऊ लागली आहे. निफाडला रविवारी शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या प्रस्तावाची होळी करून संघर्ष स्पष्ट केला, तर दहा हजारांच्या कर्जावर सरकारने लादलेल्या निकषाचीही सर्वांनी खिल्ली उडवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या २५ जून रोजीच्या दौऱ्यामुळे थंड झालेले हे आंदोलन पुन्हा उचल खाणार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा असला तरी शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी या दौऱ्यातून समोर येणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात शिवसेना आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

निफाडमध्ये भाकरीपेक्षा भोकरच जड म्हणत शेतकऱ्यांनी जिल्हाभर कर्ज निकषावर जागृती करण्याची घोषणा केली आहे. दहा हजारांचे कर्जही सरकारला तत्काळ देता आले नाही. या कर्जासाठी लावलेल्या निकषामुळे अवघ्या २० हजार शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहे. खरिपाची पेरणी सुरू झाली आहे. त्यामुळे सरकारने केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे शेतकरी सांगत असून, प्रत्यक्ष कर्जमाफी मिळणेही या हंगामात अवघड असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे सरकारचे निकष व पवित्रा कर्जमाफी न मिळून देणे असाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची घुसमट झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा पिंपळगाव, निफाड, येवला येथून आहे. या भागातील शेतकरी अगोदरच संतापले आहेत. त्यामुळे त्यांच्या थंड आंदोलनाला आता ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे धार येणार आहे.

‘समृद्धी’बाधिता शेतकऱ्यांचाही संताप

एकीकडे कर्जमाफीवरून शेतकऱ्यांचा रोष आहे, तर दुसरीकडे समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेले शेतकरी सरकारवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे या दौऱ्यात उद्धव ठाकरे कोपरगाव येथे या शेतकऱ्यांनासुद्धा भेटणार आहे. त्यातही शेतकऱ्यांचा सरकारविरोधात असलेला संताप पुन्हा समोर येणार असून, त्याला शिवसेनेची साथ मिळण्याची शक्यता आहे.

ठाकरेंचा नाशिक ते पुणतांबा दौरा

नाशिक ः शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ जून रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते समृद्धी मार्गातील बाधित शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. नाशिक ते पुणतांबा असा हा दौरा असून, सकाळी नऊ वाजता त्यांचे ओझर विमानतळ येथे आगमन होणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे यांचा हा जिल्हा दौरा आहे. ठाकरे यांचे सकाळी ९ वाजता ओझर विमानतळावर आगमन, १० वाजता पिंपळगाव बसवंत, १०.४५ निफाड, ११.३० वाजता नैताळे, १२.४५ वाजता विंचूर, १ वाजता येवला, १.४५ पिंपळगाव नाका, २.३० कोपरगाव (जंगली महाराज आश्रमाजवळ समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांची भेट), २.४५ वाजता शिर्डी (भोजन), ४ वाजता पुणतांबा, ५.३० वाजता संभाजीनगरकडे प्रयाण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुगंधाने दरवळली रमजानची बाजारपेठ!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

रमजान महिन्यात शहरातील अत्तर बाजारात रोजेदारांना नमाजीआधी शरीराला लावण्यासाठी अत्तर व डोळ्यांत घालण्यासाठी सुरमा लागत असतो. रमजान महिन्यामुळे या साहित्याच्या विक्रीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. जुन्या नाशकातील दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अत्तरे व सुरमा खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने विक्रेत्यांमध्येही उत्साह आहे.
बाजारात शेकडो प्रकारची अत्तरे ग्राहकांच्या बजेटनुसार उपलब्ध आहेत. याशिवाय आकर्षक अशा बाटल्यांमध्ये हे अत्तर असल्याने ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. जुन्या नाशिक भागातील चौक मंडई येथील विक्रेत्यांनी सांगितले की, शहरात मद्रास, हैदराबाद, मुंबई, सौदी अरेबिया आदी भागांतून अत्तर विक्रीसाठी आणण्यात येते. यामध्ये मजमुआ, व्हाईट ऊद, देहनूल ऊद, जन्नतूल फिरदौस, फसली गुलाब या प्रकारच्या अत्तरांची जास्त मागणी आहे.
इस्लाम धर्मानुसार अल्लाह तालाच्या आदेशानुसार पवित्र नमाज अदा करताना आपल्या डोळ्यांमध्ये सुरमा लावण्याबाबत सांगण्यात आले आहे. या सुरमाचेदेखील नाशिकमध्ये साधारण १५ ते २० प्रकार उपलब्ध आहेत. सिन्नर, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांसह परराज्यांमधून व अरब राष्ट्रांमधूनदेखील सुरमा विक्रीसाठी आणला जातो.

सुरम्याचे प्रकार
९, १३, २४ असे नंबर असलेल्या सुरम्यांसह खोजाती, अस्माह साधा, ममेरा, उत्तम ब्लॅक, खास व्हाइट, रेड स्मिथ, डिलक्स असे प्रकार उपलब्ध आहेत. सध्या बदामाचे तेल मिक्स असलेला सुरमा अधिक पसंत केला जात आहे. महिलांमध्ये मुमताज, डिलक्स, कामत आदी सुरमा प्रसिद्ध आहे.
या अत्तरांना मागणी
हीना, रुहे गुलाब, मोगरा, चार्ली, फंटाशिआ, असिल, जन्नतूल नईम, रतलाम, सिगार, उद, हायवॉक, रसासी, हयाशा, रॉयल ब्लू, अल रियाब, राशा, मदिना, मक्का अशी अत्तरे बाजारात विक्रीसाठी आले आहेत. ग्राहकांना अनेक पर्याय आहेत.

शहरात रमजान महिन्यात अत्तरांना विशेष मागणी आहे. इतर इस्लामिक साहित्याशिवाय अत्तरांची विक्री चांगल्या प्रकारे होते. काही जणांकडून महागड्या अत्तरांना मागणी असल्याने ते विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
- मुबीन अत्तार,
अत्तर विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विभागातील ३४ टक्के कुटुंबे शौचालयाविना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने देशभर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून निधी दिला जात आहे. २०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसारच्या वैयक्तिक शौचालयांची सुविधा असलेल्या नाशिक विभागातील कुटुंबांची टक्केवारी पाच वर्षांत ३४.६७ वरून ६५.६० टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. असे असले तरी विभागातील तब्बल ३४.४० टक्के कुटुंबांकडे आजच्या आधुनिक काळातही शौचालय नसल्याचे वास्तव आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्यात येत आहे. २०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार विभागातील २२ लाख ६ हजार २१ कुटुंबांपैकी केवळ ७ लाख ६४ हजार ९२४ अर्थात ३४.६७ टक्के कुटुंबांकडेच वैयक्तिक शौचालयांची सुविधा होती. त्यानंतर मार्च २०१६ पर्यंत त्यात १६.५७ टक्के कुटुंबांची भर पडली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षाच्या कालावधीत आणखी ३ लाख ४९ हजार ९८३ कुटुंबांना या योजनेतून वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध झाल्याने आता विभागातील वैयक्तिक शौचालयांची सुविधा असलेल्या कुटुंबांची टक्केवारी ६५.६० इतकी झाली आहे. या एकाच वर्षात १४.३६ टक्के कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

नगर-नाशिक आघाडीवर

विभागातील नगर जिल्ह्यातील ६ लाख ४३ हजार ८०४ कुटुंबांपैकी ४ लाख ९४ हजार १४३ म्हणजेच ७६.७५ टक्के कुटुंबांकडे, तर नाशिक जिल्ह्यातील ५ लाख ३५ हजार ५२ कुटुंबांपैकी ३ लाख ८० हजार ६८२ कुटुंबांकडे अर्थात ७१.१५ टक्के कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध झालेली आहे.

खान्देश पिछाडीवर

धुळे जिल्ह्यातील ५२ टक्के, जळगावमधील ५६.५९ टक्के, तर नंदुरबारमधील ५८.१९ टक्के कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीत ही तिन्ही जिल्हे पिछाडीवर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायगाव, पांजरवाडीला तडाखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

वरुणराजाने यंदाच्या पावसाळयात सुरुवातीलाच येवला तालुक्याच्या पदरात दमदार पावसाचं दान टाकलं असलं तरी दुसऱ्या बाजूला शुक्रवारी रात्री पावसासोबत आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला. तालुक्याच्या पूर्व भागातील सायगाव, पांजरवाडी आदी गावांना या सुसाट वाऱ्याचा सर्वाधिक तडाखा दिल्याचे चित्र आता समोर आलं आहे. या परिसरातील काही मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली. काही ठिकाणी महावितरणचे विजेचे पोल तिरपे होताना तारा तुटून खाली पडल्या, तर अनेकांच्या घराची तसेच कांदा चाळीची पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले.

पांजरवाडी येथील गणपत रघुनाथ देवरे यांचे राहते घर पूर्ण उद्ध्वस्त झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला. कुशिराम गायकवाड, चंद्रभान गायकवाड, तुकाराम गायकवाड, झेल्याबाई गायकवाड, अरुण भालेराव, गुलाब जेजुरकर आदींच्या घरांचे देखील या वादळी वाऱ्यात मोठे नुकसान झाले आहे. अशोक ढाकणे, दिलीप जेजूरकर, रत्नाकर भालेराव आदी शेतकऱ्यांच्या कांद्याचे या पावसात नुकसान झाले. तालुक्यातील अंदरसूल येथील एका शेतकऱ्याच्या पोल्ट्रीचे पत्रे तर जोरदार वाऱ्याने हवेत उडून जात परिसरातील एका विजेच्या तारांवरच लटकले गेले होते. पत्रे वीजतारांना चिकटताच जोरदार आवाज होत वीजपुरवठा खंडित झाला होता. सुदैवाने याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

महावितरणलाही जोराचा झटका

जोरदार वादळी वाऱ्याने येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील जनतेला मोठा फटका देताना महावितरण वीज कंपनीला देखील जोराचा झटका दिला. उत्तरपूर्व भागातील कंपनीचे अनेक ठिकाणचे वीजवाहिनीचे असंख्य पोल या फटक्यात कुठे आडवे झाले, तर कुठे अक्षरशः तुटून पडल्याचे चित्र शनिवारी पाहणीदरम्यान पुढे आले. येवला अर्बन उपविभागांतर्गत येणाऱ्या तालुक्याच्या पूर्व व उत्तर ग्रामीण भागातील ३३ केव्ही भारम उच्चदाब वीजवाहिनीचे ६ पोल, ११ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीचे १५ पोल, तसेच अनेक ठिकाणचे लघुदाब वीजवाहिनीचे ५२ पेक्षा अधिक पोल काही ठिकाणी आडवे व काही ठिकाणी तुटले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर परिसरात उद्या योगाचा जागर

$
0
0

टीम मटा

संयुक्त राष्ट्रातर्फे दि. २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. नाशिक शहरातही त्यानिमित्त बुधवारी (दि. २१) ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात सर्वमान्यांसह मान्यवर सहभागी होणार आहेत.

--

आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकार

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढाकाराने अांतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यांतर्गत १०८ देशांमध्ये आणि देशातील १०८ शहरांमध्ये त्या-त्या ठिकाणच्या प्रसिद्ध स्थळांसमोर सूर्यनमस्कार घालून उगवत्या सूर्याला वंदन करण्यात येणार आहे. त्यात देशभरातील २१ तुरुंगांतील कैदीही सहभागी होतील. आर्ट ऑफ लिव्हिंग योगाचे कमलेश बारवाल म्हणाले, की देशातील भव्य सोहळ्यासाठी सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी एक महिन्याचे ‘योगदान’ हे योग शिबिर ५०० हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आले असून, त्याची सांगताही बुधवारी होईल.

--

‘नाशिक योग’तर्फे योगाभ्यास

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे नाशिक योग विद्या केंद्रातर्फे नाशिककरांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सकाळी ६.४५ वाजता होणाऱ्या या विनामूल्य योगाभ्यासासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे. सोबत स्वत:चे मॅट, आसन आणावे. योगरत्न गुरुवर्य कीर्तिकुमार औरंगाबादकर मार्गदर्शन करणार आहेत, असे कळविण्यात आले आहे.

--

मोफत योग प्रशिक्षण

योग विद्या धामची पंचवटी शाखा व टोटल हेल्थ सोल्युशनतर्फे मोफत योग प्रशिक्षण शिबिर होणार आहे. सकाळी ६.३० ते ७.३० पर्यंत प्रभात फेरी होईल. ७.३० ते ८.३० योगासने, प्राणायाम, ओंकार साधना व योगाविषयी मार्गदर्शन होईल. माहितीसाठी ९७३०५५८८८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

--

भालेकर मैदानावर शिबिर

हजारो वर्षांपासून आरोग्याचा मंत्र देणाऱ्या योगाविषयी माहिती देण्यासाठी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट व पतंजली प्रतिष्ठानतर्फे बी. डी. भालेकर मैदानावर पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत योग शिबिर होईल. माहितीसाठी ०२५३-२५०७००१-२-४-५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

--

खुटवडनगरला योग शिबिर

लाडशाखीय वाणी मित्रमंडळ, सन्मित्र मंडळ आणि संस्कारवाणीतर्फे सकाळी ६ ते ८.३० या वेळेत माहेरघर कार्यालय, सीटू भवनजवळ, आयटीआय पुलापुढे, खुटवडनगर येथे योग शिबिर होणार आहे. या शिबिरात सर्वांना प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांना सहभागी हाेण्याचे अावाहन करण्यात आले आहे.

--

देवळालीत योग प्रात्यक्षिके

देवळाली कॅम्प ः कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे छावणी परिषद हायस्कूल येथे सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान योग्य प्रात्यक्षिके होणार आहेत. आमदार योगेश घोलप, बोर्डाचे उपाध्यक्ष दिनकर आढाव, नगरसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार आदी उपस्थित राहतील. अण्णाज ग्रुपतर्फे खंडेराव टेकडी येथे डॉ. चेतन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिक होईल. देवळालीकरांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णाची फसवणूक; डॉक्टरांना आर्थिक दंड

$
0
0

धुळे ग्राहक तक्रार निवारण मंचाचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील सुशिलाबाई मोहन पोलादे या महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून झालेल्या खर्चाच्या व नुकसानापोटी शहरातील निरामय हॉस्पिटलमधील डॉ. विपूल बाफना व डॉ. माधुरी बाफना यांना दोन लाख साठ हजार रुपये दंड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने केला आहे.तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करून तीस दिवसांच्या आत रकमेची पूर्तता करावी, असेही डॉक्टरांना आदेश देण्यात आले आहे.

गेल्या सात-आठ वर्षांपासून या तक्रारीविषयी अनेक चौकशी व पत्रव्यवहार, आंदोलने मात्र पोलादे यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली. या तक्रारबाबत ग्राहक मंचाने दोन्ही बाजू समजून घेत सुशिलाबाई पोलादे यांना वैद्यकीय खर्चापोटी दोन लाख साठ हजार रुपये दंड डॉ. विपुल बाफना व डॉ माधुरी बाफना यांनी तक्रारदारास द्यावे, असा आदेश जारी केला आहे.

काय आहे प्रकरण?

या घटनेत सुशिलाबाई पोलादे यांना पोटदुखीची त्रास होऊ लागल्याने आणि गॅसस्ट्रीस असल्याचे निदान झाल्यानंतर सन २००८ मध्ये निरामय हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी टेस्ट केल्यावर सुशिलाबाई यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली. टप्प्याटप्प्याने चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेल्याने त्यांना धुळ्यातील आस्था हॉस्पिटलनंतर मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुंबईत त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर पोलादे यांनी या सर्व प्रकरणात डॉक्टर बाफना यांच्याविरुद्ध नोटीस पाठवून झालेला खर्च व नुकसान भरपाईची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार चषक कबड्डी लीगचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या आमदार चषक कबड्डी लीगचे आयोजन २७ ते ३० जूनदरम्यान पंचवटीतील स्व. मीनाताई ठाकरे बंदिस्त सभागृहात करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा कबड्डी संघटना व क्रीडा प्रबोधिनी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील पहिल्या अव्वल १६ संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. या संघांची चार गटांत विभागणी करण्यात येणार आहे. प्रथम साखळी पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने सामने खेळविण्यात येणार आहेत. हे सामने दररोज सायंकाळी ५ ते ९ दरम्यान मॅटवर प्रकाशझोतात खेळविले जाणर आहेत.
विजेत्या संघास ३१ हजार रुपये रोख व चषक, उपविजेत्या संघास २१ हजार रुपये रोख व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक विजेत्या संघास प्रत्येकी ११ हजार रुपये रोख व चषक अशी सांघिक पारितोषिके व स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट खेळाडूस ५ हजार रुपये रोख व चषक, स्पर्धेतील पकड व चढाईपटूस प्रत्येकी तीन हजार रुपये रोख व चषक अशी वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत.
या स्पर्धेतून राज्य स्पर्धेसाठी पुरुष गटाच्या संभाव्य २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्याचप्रमाणे के. व्ही. एन. नाईक नाशिक कबड्डी प्रीमियर लीगसाठीसुद्धा संभाव्य खेळाडूंची निवड या स्पर्धेतून केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी दिली. निमंत्रित केलेल्या संघांनी आपली प्रवेशिका २२ जूनपर्यंत संघटनेकडे द्यायची आहे. अधिक माहितीसाठी मोहन गायकवाड (मो. ९४२३१८४९५२), विलास पाटील (मो. ९५६१७१०७३१), शरद पाटील (मो. ९९२२४२०२१७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आमदार जयंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीचे अध्यक्ष नगरसेवक मच्छिंद्र सानप, रुची कुंभारकर, पंचवटी विभागाच्या सभापती प्रियांका माने, राज्य संघटनेचे सहसचिव प्रकाश बोराडे, आंतरराष्ट्रीय पंच सतीश सूर्यवंशी, पंच मंडळाचे अध्यक्ष अनिल अहिरे, सचिव राजेंद्र निकुंभ, विजय बनसोडे, गौरव पाटील, भारती जगताप आदी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images