Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आता आम्हाला दिसतात बातम्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घर, ऑफिस, तसेच परिसरात आम्हाला आता अनेक बातम्या दिसू लागल्या आहेत. मटा सिटिझन रिपोर्टर या अॅपमुळेच हे शक्य झाले आहे. आम्ही पाठविलेल्या बातम्यांची तातडीने दखल घेतली जात असल्याने त्याचा मोठा आनंद होत आहे, अशी भावना मटा सिटिझन रिपोर्टर्सने व्यक्त केली.

दर आठवड्याप्रमाणेच यंदाही मटा सिटिझन रिपोर्टर्सला सन्मानित करण्यात आले. टाइम्स ग्रुपने मटा सिटिझन रिपोर्टर हे नावीन्यपूर्ण शस्त्रच सर्वसामान्यांच्या हाती दिले आहे. या अॅपद्वारे सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी, समस्या अगदी सहजच मांडता येतात. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप विनामूल्य उपलब्ध असून, ते नाशिकमध्ये अतिशय लोकप्रिय झाले आहे. या अॅपद्वारे दररोज शेकडो नाशिककर त्यांच्या समस्या, अडचणी, तक्रारी पाठवतात. फोटोसह वृत्त पाठविण्याची, मराठीत लिहिण्याची, तसेच एकापेक्षा अधिक फोटो पाठविण्याची सुविधा त्यात उपलब्ध आहे. तसेच, प्रसिद्ध झालेले वृत्त ऑनलाइन पेजवर पाहण्याचा अनोखा पर्यायही आहे. या अॅपद्वारे पाठविलेल्या समस्या दररोज नाशिक प्लस या पुरवणीत

प्रसिद्ध केल्या जातात. या आठवड्याला सुयश देशमुख, नेहा वाघमारे, गिरीश पवार आणि भगवान महाले या सिटिझन रिपोर्टर्सना ‘मटा’च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

--

अशोक स्तंभ परिसरातील कचऱ्याचा विषय मी पाठविला होता. त्याची तातडीने दखल घेण्यात आली आणि स्वच्छता झाली.

- सुयश देशमुख

बोरगड परिसरात मोबाइल नेटवर्कची मोठी समस्या आहे, याबाबतची समस्या मी पाठविली होती. या भागात नेटवर्क नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.- भगवान महाले

जेलरोडला आमच्या घराच्या परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर होता. अॅपद्वारे मी तो पाठविला. तो तत्काळ प्रसिद्ध झाला आणि कचरा उलण्यात आला. ‘मटा’चे आभार. - नेहा वाघमारे

त्र्यंबकरोडच्या दुरवस्थेची समस्या मी पाठविली होती. त्याची दखल घेऊन रस्ता सुधारण्यात आला. हे ‘मटा’चेच यश आहे. - गिरीश पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाल्यांवरील अतिक्रमणे रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पावसाळी गटार योजनेसह शहरातील नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आणि बांधकामे झाल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारच्या पावसाने त्याचा प्रत्यय आला. या पावसात शहराची दाणादाण उडाली होती. त्यामुळे पावसाळी गटार योजनेच्या उगमावर आणि नाल्यांवरील अतिक्रमणे आयुक्तांनी रडारवर घेतली आहेत. नैसर्गिक नाले मोकळे करण्यासह अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करून नाले नियमित प्रवाही करण्यासाठी पालिका मोठी मोहीम हाती घेणार असल्याचे संकेत आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहेत. त्यामुळे पालिकेच्या या अतिक्रमणविरोधी मोहिमेकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

शहरात बुधवारी दोन तासांत झालेल्या पावसामुळे अर्धे नाशिक जलमय झाले होते. पावसाळी गटार योजनाही कुचकामी ठरली होती. रस्त्यांवरच पाणी जमा झाल्याने ते नदीपात्रात जाण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. पावसाळी गटार योजनेच्या सुरुवातीच्या ठिकाणी आणि चेंबर्सवरच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. नैसर्गिक नाल्यांवरही बिल्डरांनी अतिक्रमण करून थेट इमारतीच उभ्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी नाल्यांवरच झोपड्या उभ्या राहिल्याने वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीच्या दिशेने शहरातील पाणी वाहून नेणारे नालेच अतिक्रमणामुळे बंद झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे शहरात बुधवारची स्थिती ओढवल्याचा निष्कर्ष आयुक्तांनी काढला आहे.

नैसर्गिक नाले, गटार योजनेवरील अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीमच आखण्याचे आदेश आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. नाल्यांवर कच्चे असो वा पक्के बांधकाम, ते जमीनदोस्त करून नाला प्रवाहित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नाला वळविण्यात आला असेल तो सरळ करून प्रवाह नियमित करण्याचे फर्मान काढले आहेत. झोपडपट्ट्यांसह हातगाडी, गाळे यांचेही अतिक्रमण तातडीने काढा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. शहरात पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही अतिक्रमण मोहीम राबवून नाले व गटार योजना अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेशच त्यांनी काढले आहेत.

नाल्यांवरच इमारती

शहरातील नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊन तेथे टोलेजंग इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी इमारतींसाठी नाल्यांचाच मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नदीपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ही अतिक्रमणे रडारवर घ्यावीत, अशी मागणी नागरिकांसह नगरसेवकांकडून केली जात आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या कामांवर हातोडा चालवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांच्या ड्रेसचा प्रश्न मार्गी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेस, रेनकोट, गमबूटचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ड्रेस खरेदी अंतिम झाली असून, रेनकोट आणि गमबूटसाठी ठेकेदारांचे सॅम्पल टेस्टिंगसाठी मुंबईला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसह तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना महिनाभरात या तिन्ही वस्तू मिळणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सुविधांसाठी सुरू असलेला वनवास अखेर संपणार आहे.

महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसह तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना विविध सुविधांसह ड्रेस पालिकेकडून पुरविले जातात. महापालिकेत सध्या १७२४ सफाई कामगार, ३०९ स्वच्छता मुकादम, ३८ स्वच्छता निरीक्षक, १२ स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत. या सर्वांना पावसाळ्याच्या तोंडावर आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिकेकडून अत्यावश्यक सुरक्षेच्या सुविधा दिल्या जातात. त्यात ड्रेस, रेनकोट, स्वेटर, गमबूट, मास्क व ग्लोव्हजचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना या सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली तयार केली असून, दर तीन वर्षांनी या सुविधा कर्मचाऱ्यांना नव्याने देणे अपेक्षित आहे. मात्र, पाच वर्षांपासून महापालिकेने या वस्तूंची खरेदीच केली नसल्याने कर्मचाऱ्यांना या सुविधा मिळालेल्या नाहीत. या संदर्भातले वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्याची दखल घेत, कर्मचाऱ्यांना ड्रेससह रेनकोट, गमबूट उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांसह पालिकेतील जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना ड्रेस देण्यासाठी प्रक्रिया राबवली होती. मात्र, कधी रोख रक्कम, तर कधी कपडे देण्याचा प्रस्ताव महासभा आणि स्थायी समितीत फिरला. अखेरीस महासभेने ड्रेससाठी कापड देण्याचा प्रस्ताव पारित केला होता. त्यानंतर निविदाप्रक्रिया राबवण्यात आली. त्यात कर्मचाऱ्यांना शर्ट व पँट देण्याचा निर्णय झाला आहे. महिलांसाठी साडीचे सॅम्पल लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, लॅबमध्ये हे सॅम्पल फेल गेल्याने आता नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना ड्रेस आणि महिलांच्या साडीसाठी जवळपास एक कोटीचा खर्च येणार आहे. महिनाभरात सर्व कर्मचाऱ्यांच्या ड्रेस व साड्या मिळणार असल्याने ड्रेसचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गमबूट आणि रेनकोटचे सॅम्पल टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर तातडीने खरेदीचे आदेश दिले जाणार असून, महिनाभरात गमबूटसह रेनकोटही कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी कार्यालयास मिळेना जागा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराची निवड केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत होऊन आता नऊ मह‌िने लोटले तरी, स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी अद्याप जागा सापडली नाही. प्रशासनाने कंपनीच्या कार्यालयासाठी महापालिकेतच जागा सुचवली होती. मात्र, अध्यक्षांनी त्याला नकार दिला आहे. पालिकेसारखाच कंपनीचा कारभार होण्याचा धोका असल्याने स्वतंत्र ठिकाणी कार्यालय असावे, अशी त्यांची इच्छा असल्याने प्रशासनाकडून तीन जागांवर अभ्यास सुरू आहे. येत्या २२ तारखेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नाशिकचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाला होता. नाशिकच्या निवडीनंतर स्मार्ट सिटीचा कारभार हाकण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीचे स्वतंत्र कार्यालय, तसेच कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी असणार आहेत. स्मार्ट सिटीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या असून, येत्या २२ रोजी चौथी बैठक होत आहे. या बैठकीत स्मार्ट सिटीच्या कार्यालयावरही चर्चा केली जाणार आहे. प्रशासनाकडून महापालिकेच्या मुख्यालयातच जागा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू होती. परंतु, अध्यक्षांनी पालिकेच्या कामकाजाची सावली स्मार्ट सिटीच्या कामकाजावर पडू नये, अशी भूमिका घेतली आहे. कंपनीने अन्यत्र जागा शोधण्याचे फर्मान काढले आहे.
तीन जागांचा विचार
सध्या प्रशासनाकडून तीन जागांवर विचार सुरू आहे. यात गोल्फ क्लबच्या शेजारील पालिकेची जागा, दुसरी तारांगणाची तर पंड‌ित कॉलनीतल्या नाशिक पश्चिम कार्यालयाच्या इमारतीमधील जागा अशा तीन ठिकाणांचा विचार केला जात आहे. यापैकी एका जागेची निवड केली जाऊन तेथे कार्यालयाची उभारणी केली जाईल. त्यानंतरच स्मार्ट सिटीच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाले बुजले, शहर थिजले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहरात बुधवारी झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने सारेच रस्ते जलमय झाले होते. शहरातील सराफ बाजारासह एबीबी सर्कल, सिटी सेंटर मॉल सिग्नल व त्र्यंबकेश्वररोडवर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने मोठे नुकसान होऊन वाहतुकीचा खेळखंडाेबा झाल्याने शहरच थिजल्याचे दिसून आले. पावसाचे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक नाले व अन्य स्रोतच नाहिसे झाल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने असे नैसर्गिक स्रोत मोकळे करावेत, तसेच नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ अनेकांवर आली होती. त्यातच सखल भागात पावसाचे पाणी घरात शिरल्याने त्याचा त्रासही रहिवाशांना सहन करावा लागला. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले स्रोत गेले कुठे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नैसर्गिक नाल्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे केली गेल्याने नालेच गायब झाले आहेत. साहजिकच यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप येत असल्याची स्थिती दिसून येत आहे.

पाइपलाइनमध्ये ‘हरवला’ नैसर्गिक नाला

शहरातील अनेक ठिकाणचे नैसर्गिक स्रोत गायब झाले आहेत. एबीबी सर्कलला लागून असलेला नैसर्गिक नालाही दिसेनासा झाला आहे. एकीकडे नैसर्गिक नाला मोठा असल्याचे दिसते. परंतु, दुसऱ्या बाजूला १० इंची पाइपलाइनमध्ये नालाच गायब झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे साहजिकच पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच नसल्याने रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होत आहे. सिटी सेंटर मॉलजवळ व त्र्यंबकेश्वररोडवर पाणी वाहून जाण्याची सुविधाच नसल्याने वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ अनेकांवर आली. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने पावसाळी नाले केले. परंतु, त्यात पाणी वाहून जाण्याची योग्य सुविधा करण्यात आलेली नाही. त्यातच नैसर्गिक नालेही अनेक ठिकाणी बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी रस्त्यांवर साचत असून, यावर उपाय करावेत.

-उमेश पवार, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्तेश्वर’च्या नशिबी अद्याप वनवासच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
प्रभू रामचंद्रांनी पिता दशरथ यांचा दशक्रियाविधी रामगया कुंडावर केल्याने या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच रामकुंडाच्या अवतीभवती एकूण २४ कुंड असून, त्यांनाही तितकेच महत्त्व आहे. पैकी रोकडोबा मंदिराच्या समोरील मुक्तेश्वर नामक कुंडदेखील अत्यंत पवित्र स्थान असून, ते दुर्लक्षित राह‌िले आहे. अद्याप या कुंडाच्या नशिबी वनवासच असून, या कुंडाला कधी कीर्ती लाभणार या प्रतिक्षेत भाविक आहेत.
मुक्तेश्वर कुंड मोरेश्वर विनायक दीक्षित यांनी १७८८ मध्ये बांधलेले आहे. त्यानंतर १८२८ मध्ये त्यांच्या चिरंज‌ीवांनी याचे महात्म्य वाढविण्याचा प्रयत्न केला. या कुंडामध्ये कोटीतीर्थ व मेघातीर्थ येते. गोदावरी नदीच्या तीरावर अनेक प्राचीन कुंड आहेत. पैकी रामकुंड, लक्ष्मणकुंड हे सर्वांनाच परिचित आहे. सध्या गोदेच्या काठावर होत असलेले दशक्रिया विधी कार्यक्रम अस्थ‌िविसर्जनासाठी अर्थात पूर्णत्वाच्या कार्यभागासाठी रामकुंडातच येतात. लक्ष्मणकुंडाचाही महिमा याचप्रमाणे आहे. या कुंडांबरोबच प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याचे श्राध्द केले ते रामगया कुंडदेखील नारोशंकर मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे. याच कुंडांच्या जोडीचे अत्यंत महत्त्वाचे असलेले कुंड म्हणजे मुक्तेश्वर. या ठिकाणी पूजा अर्चना केल्याने पितरांना मुक्ती लाभते अशी आख्यायिका आहे. परंतु, या कुंडाची माहितीच कुणाला नसल्याने येथपर्यंत कुणीही पोहोचत नाही. त्यामुळे ते कीर्तिपासून वंचित राह‌िले आहे.
कुरूक्षेत्र विश्व विद्यालयाचे इतिहास संशोधन व पुरातत्त्व विभागाचे अध्यक्ष डॉ. हरी अनंत फडके हे नाशिकस्थित झाले असता २००३ मध्ये त्यांनी एक अभिनव कल्पना मांडली होती. गोदावरीचा मूळ उगम आणि गोदावरीच्या त‌िरावरील प्राचीन त‌िर्थांची स्थान निश्चिती करण्याची ही कल्पना होती. अवघा पन्नास हजार रुपये खर्च होता. परंतु, संबंधितांनी नकार दिल्याने ही कल्पना मूर्त रूपात येऊ शकली नाही. ही स्थाननिश्चिती नसल्याने अनेक कुंड अद्याप दुर्लक्ष‌ित राहिलेले आहेत.

मुक्तेश्वर कुंडाची एक विशेषता म्हणजे त्याची स्थाननिश्चिती आहे. या ठिकाणी प्रदोष असताना पूजाही केली जाते. परंतु, अशी पूजा नित्य व्हावी अशी अपेक्षा आहे. या कुंडाचे पुनरूज्जीवन झाल्यास अधिक उत्तम.
-देवेन्द्रनाथ पंड्या,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गानतंत्र’साठी आज अखेरची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्ल्ड म्युझिक डे (दि. २१ जून)निमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गानतंत्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज, शनिवारी (दि. १७) रात्री ११ वाजेपर्यंत आपले गाणे ई-मेलद्वारे पाठविण्याची शेवटची संधी आहे.

ही स्पर्धा आहे वाचकांमधील गायकांसाठी. तुम्ही बाथरूम सिंगर असाल किंवा गृहिणी... गाणं हे तुमच्या-आमच्या सर्वांच्याच मनात येत असते. कुणी गुणगुणते, तर कुणी कट्ट्यावरच्या मित्रांमध्ये ही हौस भागवते. ‘गानतंत्र’च्या निमित्ताने तुमच्यातील गायकाला सर्वांसमोर आणण्याची ही नामी संधी आहे.

आपल्याकडील सांग‌ीतिक वारशाला अभिवादन हा तर या स्पर्धेमागचा हेतू आहेच; त्याशिवायही आतापर्यंत लोकांच्या कानापर्यंत न पोहोचलेल्या उत्तमोत्तम आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही उद्देश यामागे आहे. आपला आवाज उत्तम असूनही आपल्याला केवळ चांगले व्यासपीठ न मिळाल्यामुळे आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचता आले नाही, अशी खंत वाटणाऱ्या सर्वांसाठी ‘गानतंत्र’ ही स्पर्धा आहे.

आपला आवाज मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचावा आणि उत्तमोत्तम तज्ज्ञांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळावे, अशी इच्छा असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांनी स्वतःच्या आवाजातील एकच गाणे रेकॉर्ड करून mtgaantantra.nsk@gmail.com या ई-मेलवर पाठवायचे आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ई-मेलवर ध्वनिमुद्रण पाठवण्याची अंतिम तारीख १७ जून आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. ध्वनिमुद्रण एमपी ३ व एमपी ४ या फॉर्ममध्येच असावे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २० गायकांना १९ जून रोजी स्टुड‌िओत गाण्याची संधी मिळणार आहे. त्यातून निवडलेल्या १० स्पर्धकांना २१ जून रोजी होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे रेड‌िओ मिर्ची हे म्युझिक पार्टनर आहेत. स्पर्धेचे परीक्षण प्रथितयश गायक आणि गायिका करणार आहेत. यातील विजेत्या गायकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या गाण्यासाठी भाषेचे बंधन नाही. दरम्यान, ‘महाराष्ट्र टाइम्स’ कल्चर क्लब सभासदत्वाचे नूतनीकरण करण्यासाठी किंवा नव्याने सभासद होण्याची संधीही उपलब्ध आहे.

--

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्येयासक्त अभ्यासाने यश

$
0
0

दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविताना अभ्यासात सातत्य असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेत मिळविण्याच्या गुणांचे टार्गेट कायम समोर ठेवून अभ्यास केल्यास यश नक्की मिळते, असे मत नाशिकच्या स्कॉलर्सनी महाराष्ट्र टाइम्स आयोजित राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये व्यक्त केले. दहावी, बारावी आणि जेईई या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही यावेळी भावना व्यक्त केल्या. अभ्यासाचे वेळापत्रक कसे आखले, फोकस कायम राखण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले, तसेच त्यांच्या ध्येयप्राप्तीचे रहस्य काय, हे या चर्चेतून जाणून घेण्यात आले.

--


काठीण्यपातळी जाणून केला अभ्यास

सुरुवातीपासून अभ्यास केला, तर कुठल्याही क्षेत्रातला अभ्यास अवघड वाटत नाही. मी सुरुवातीला तीन ते चार तास अभ्यास करायचो. त्यानंतर रोज आठ ते दहा तास अभ्यासाला सुरुवात केली. खरे तर अभ्यास रोज केला पाहिजे. परीक्षा आली म्हणून अभ्यास करणेे योग्य नाही. आपल्या मेंदूमध्ये आपण एकाच वेळी पाच गोष्टी लक्षात ठेवू शकतो किंवा त्याबद्दल आकलन करू शकतो. मी माझ्या अभ्यासाच्या वेळी हेच तत्त्व समोर ठेवून अभ्यास केला. त्यामुळे आज मी हे यश संपादन करू शकलो. जेईई मेन्सनंतर पुढील परीक्षेत यश मिळविणेे अवघड होते. परीक्षेेची काठीण्यपातळी अधिक असल्याने त्यासाठी सतत अभ्यास करणेे आणि मेहनत घेणेे याला पर्याय नाही, हे ओळखून अभ्यास केला. मला मित्रांचीही खूप मदत झाली.

- निखिल चव्हाणके (जेईई अॅडव्हान्स)

--


मेहनत घेतल्यास यशप्राप्ती नक्की

परीक्षेवेळी अभ्यास करण्यापेक्षा रोजरोजचा रोज अभ्यास कधीही सोयीस्कर असतो. सात दिवस एखादा टॉपिक सतत वाचल्यास व महिनाभराने त्याचा पुन्हा सराव केल्यास तो कायमस्वरूपी लक्षात राहतो. दिवसभर अभ्यास करताना काही वेळ ब्रेक घेणे खूप महत्त्वाचे आहे. या ब्रेकमध्ये मेडिटेशन, व्यायाम आणि अवांतर वाचन या गोष्टी करायला हव्यात. त्यामुळे आपल्यातली तल्लखता जोपासायला मदत होते, तसेच आपली ब्रेन पॉवर आणखी बळकट होते. आपल्याला जे ध्येय साध्य करायचे आहे ते कायम आपल्यासमोर असायला हवे, यासाठी एक चार्ट आपल्या स्टडी बोर्डसमोर असावा. अभ्यास करताना स्वतःच्या नोट्स काढणे, तसेच आपल्याला लक्षात राहतील या स्वरूपात सूत्र, पॉइंट्सची आखणी करून घ्यावी. मी सर्वाधिक भर सॅम्पल पेपर सोडविण्यावर दिला. त्यातून मी कुठे कमी पडत आहे, हे समजत होते. - तन्वी चव्हाण (दहावी, ९९.४० टक्के, एसएससी बोर्ड)

--


वेळच्या वेळी अभ्यास गरजेचा

शाळेत जे काही शिकविले त्या थिअरी मी रोजच्या रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे वाचायचो. रोजचा अभ्यास वेळच्या वेळी केल्याने अभ्यासाचा जास्त ताण माझ्यावर कधीच आला नाही. मी कायम क्वॉलिटी स्टडीला प्राधान्य द्यायचो. थोडा वेळ अभ्यास करा, पण तो असा करा की कायमस्वरूपी लक्षात राहील. अभ्यासाच्या वेळी आपला स्वतःवर ताबा असायला हवा. आपले मन इतर कुठेतरी भरकट असताना अभ्यासाचे पुस्तक वाचणे गैर आहे. अभ्यासावेळी शांत चित्ताने सराव करणेच महत्त्वाचे आहे. दहवीच्या पूर्वपरीक्षेला मी अभ्यास न करता जायचो. मला जे काही येत आहे, ते लिहून घरी आल्यावर जे अवघड वाटले त्याचा सराव करायचो. आपण कायम स्वतःचे परीक्षण करायला हवे. त्यामुळे चूक सुधारण्याची संधी मिळते. परीक्षा कोणत्याही स्वरूपाची असली, तरी त्याकडे परीक्षा म्हणूनच बघायला हवे.

- राहुल डालकरी (दहावी, ९८ टक्के, आयसीएसई बोर्ड)

--


अभ्यासाबाबत मुलांवर बंधन नको

मी कधीही माझ्या मुलीवर अभ्यासासाठी दबाव टाकला नाही. मुलांना सततच्या अभ्यासानंतर थोडा विरंगुळाही आवश्यक असतो. बोर्डाची परीक्षा आहे त्यामुळे तू सतत अभ्यास करायला पाहिजे, अशा प्रकारचा दबाव मी कधीच तिच्यावर टाकला नाही. मुलांना त्यांच्या कलेने अभ्यास करू द्यावा. माझी मुलगी तर गाणेे एेकत गणिते सोडवायची. त्यामुळे मुलांवर अभ्यास करताना बंधन घालणेे योग्य नाही. परीक्षेेच्या शेवटी दोन महिने अनेक तास अभ्यास करण्यापेक्षा दररोज दोन तास पूर्ण एकाग्रतेने केलेल्या अभ्यासाचा फायदा होतो. मुख्य म्हणजे मुले अभ्यास करीत असताना घरातील वातावरणदेखील प्रसन्न असावे लागते. शेवटी मुलांनी घेतलेली मेहनतच त्यांना उपयोगी पडते. मात्र, त्यासाठी पालकांनी त्यांना प्रेरित करणे गरजेचे ठरते.

- अविनाश चव्हाण, पालक

--


अभ्यासाच्या प्लॅनिंगसाठी पालकांनी घ्यावा पुढाकार

विद्यार्थ्यांनी कायम फोकस असायला हवे. पालकांनी विद्यार्थ्यांना सतत अभ्यास कर, असे सांगणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवाच. पण, त्यासोबतच खेळ, व्यायाम करीत आपले छंद जोपासायला हवे. पालकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीचे प्लॅनिंग करून द्यायला हवे. कोणत्याही गोष्टी प्लॅनिंग नसेल, तर कधीच साध्य करता येत नाहीत. विद्यार्थ्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासूनच एकाग्रचित्ताने अभ्यास केल्यास परीक्षेच्या अगोदर सराव केला नाही, तरी ते चांगले गुण प्राप्त करू शकतात. मात्र, त्यासाठी सततचा सराव असणे महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमाचे व्यवस्थित विभाजन नंतर सराव केल्यास चांगले यश मिळविणे अगदी सोपे आहे.

- ज्ञानेश्वर डालकरी, पालक

--


लक्षवेधी मुद्दे ...

➤ पाठ्यपुस्तकांसोबतच अवांतर वाचन महत्त्वाचे.

➤ नियोजनबद्ध अभ्यासासाठी सुरुवातीपासूनच अभ्यासाचे वेळापत्रक बनवावे.

➤ रोजचा रोज अभ्यास करून रविवारी महिन्याच्या शेवटी सराव करावा.

➤ सेल्फ स्टडी व सेल्फ नोट्सवर भर द्यावा.

➤ सराव पेपर सोडवून आपण कुठे कमी पडत आहोत याचे परीक्षण करावे.

➤ विषय शिक्षकांकडून अडलेले टॉपिक, थिअरी समजून घ्याव्यात.

➤ आपल्याला समजेल अशा बोलीभाषेत किंवा कथेच्या रूपात नोट्स काढाव्यात.

➤ अभ्यासासोबतच रोज व्यायाम, मेडिटेशन, छंद जोपासणेही महत्त्वाचे आहे.

➤ आत्मविश्वास, आत्मपरीक्षण, चिकाटी, मेहनत, फोकस, पालकांचा विश्वास हेच यशप्राप्तीचे गमक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरटीओ’त अधिकाऱ्यांशी मद्यधुंद एजंटची हुज्जत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जळगाव

येथील उपप्रादेशिक परिवहन विभागातील परिवहन अधिकाऱ्यांशी मद्यधुंद एजंटनी हुज्जत घालून शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान परिवहन अधिकारी यांनी एजंटसह दलालांना कार्यालयाबाहेर काढून प्रवेशद्वार बंद करून घेतल्याने काही वेळासाठी आवारात गोंधळ निर्माण झाला होता.

आरटीओ कार्यालयात दलालाचा वावर पुन्हा वाढला आहे. दलाल ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी देखील अधिक पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी गणेश नामक एजंटने मद्यधुंद अवस्थेत परिवहन अधिकाऱ्यांच्या दालनात हुज्जत घातली. यावेळी परिवहन अधिकारी पाटील यांनी त्या एजंटला बाहेर जाण्यास सांगितले असता, त्याने पाटील यांना शिवीगाळ केली. दरम्यान परिवहन अधिकाऱ्यांनी एजंटसह सर्व दलालांना कार्यालयबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वार बंद केले. या प्रकारामुळे परिसरात काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता.

अधिक पैसे घेतात..

पाटील यांनी दलाल ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अधिक पैसे घेतात. तसेच परिवहन कार्यालयात दलालांचा वावर वाढत असल्याने वाहन चालविण्याची चाचणी घेण्यासाठी अडचणी येत असल्याने सर्व अधिकृत एजंट व दलाला कार्याबाहेर जाण्यास सांगितले आहे.

दलालांपासून सावध रहा

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी दलाल जास्त पैसे घेतात अशा तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांनी ड्राईव्हिंग स्कूल व महाऑनलाईनवरून फार्म भरावे तसेच दलालांपासून सावध राहावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळी गटार योजनेवरून वादंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या बैठकीत शहरातील काही भागांत साचलेल्या पाण्यावरून वादळी चर्चा झाली. पावसाळी गटार योजनेसह मलनिस्सारण केंद्र आणि नालेसफाईवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. आदेश देऊनही नालेसफाई का झाली नाही, असा सवाल सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी प्रशासनाला केला. मात्र, अधिकाऱ्यांना उत्तरेच देता न आल्याने प्रभागातर्फे येत्या महासभेत थेट लक्षवेधी लावली जाणार आहे. प्रभागाच्या वतीने लक्षवेधी लावण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम प्रभागाची बैठक झाली. त्यात प्रभाग क्र. ७, १२ व १३ मध्ये पावसामुळे उद््भवलेल्या स्थितीवर वादळी चर्चा झाली. प्रभाग समितीच्या बैठकीतच पावसाळीपूर्व कामे करण्याचे आदेश दिले होते. तरीही कामे झाली नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरस्वती नाला साफ केला नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा ठपका ठेवण्यात आला, तसेच एसटीपी प्लँटच्या स्थितीची माहितीच अधिकाऱ्यांना देता आली नाही. पावसाळी गटार योजनेवरही वादळी चर्चा झाली. मात्र, अधिकारी याबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे सभापतींसह नगरसेवक चांगलेच संतप्त झाले. अधिकारी उत्तरे देऊ न शकल्याने प्रभागाच्या वतीने या विषयावर महासभेत लक्षवेधी उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारच्या महासभेत प्रभाग समितीच्या वतीने लक्षवेधी दिली जाणार असून, प्रभागाकडून लक्षवेधी देण्याची पालिका इतिहासातील ही पहिलीच घटना असेल. प्रशासनातील अधिकारी सभापतींना दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोप सभापती डॉ. पाटील यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलशुद्धीकरणाची सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेला योग्य पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु, ज्या जलनगरीतून शहराला हा पाणीपुरवठा केला जातो त्याठिकाणी सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे. यामुळे जलशुद्धीकरण केंद्र रामभरोसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर सुरक्षारक्षकांची नेमणूकच नाही, तरी त्याठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणुकीची गरज आहे. भविष्यात माथेफिरू व्यक्तीने काही घातपात केल्यास त्याच जबाबदार कोण, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून नाशिक पालिकेची ओळख आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा महापालिकेकडून केला जात असला तरी ज्या ठिकाणाहून शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्या ठिकाणच्या सुरक्षेचे काय हा खरा सवाल आहे. शिवाजीनगरमध्ये जलनगरी म्हणून ओळख असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर दुपारच्यावेळी फेरफटका मारल्यास तेथे एकही कर्मचारी अथवा अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून येते. अशावेळी गंगापूर धरणातून पंप करून जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्यात माथेफिरू व्यक्तीने काही केल्यास त्याचा नाहक त्रास शहरवासीयांना होऊ शकतो.

संरक्षक जाळ्या लावणे आवश्यक

या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. तसेच कामावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाहेरील व्यक्तींना जलशुद्धीकरण केंद्रावर येण्यास मज्जाव घालण्याची मागणी होत आहे. जलनगरीच्या बाजूला असलेल्या वनविभागाच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्यावर पाणी फिल्टर होत असते. नेमके त्याचठिकाणी सहजपणे प्रवेश करेल अशी जागा ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्राच्या सर्वच बाजूंनी संरक्षक जाळ्या बसवल्या पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरच्या वारीत सायकलचे रिंगण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंढरपूरच्या वारीमध्ये सर्वांत देखणा सोहळा कोणता असेल, तर तो रिंगणाचा. हजारो वारकरी एकत्र येऊन वारीमध्ये रिंगण घालतात. नाचू कीर्तनाचे रंगी म्हणत विठोबा-रखुमाईचा गजर करीत वारकरी हा सोहळा अनुभवतात. पारंपरिक चालत आलेले रिंगण डोळे भरून पाहण्याच्या या सुखद सोहळ्याचा आनंद यंदा द्विगुणित होणार असून, नाशिक सायकलिस्टतर्फे वारीमध्ये सायकल रिंगण घालण्यात येणार आहे.

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत सायकलवारीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकलवारीच्या नावनोंदणीकरिता नाशिकमधील सायकलप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीच्या वारीमध्ये खेडकलेकर महाराज मैदानावर सायकलचे रिंगण घालण्यात येणार असून, असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. पंढरपूरपासून अलीकडे दोन किलोमीटर असलेल्या या ठिकाणचे हे सर्व क्षण अनुभवण्यासाठी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलिस्टमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवार, दि. २३ जून रोजी सकाळी ६ वाजता गोल्फ क्लब ग्राउंड येथून पंढरपूर सायकलवारीला प्रारंभ होणार आहे. झीरो प्लास्टिक, झीरो वेस्टेज या घोषवाक्याने वारी सुरू होणार असून, मुंबईहून वाल्मीक पाटील, नीलेश धोटे, कन्हय्या थोरात, रवींद्र क्षीरसागर हे पोलिस अधिकारी सहभागी होणार अाहेत. नाशिकहून अंबडचे पीआय मधुकर कड सहभागी होणार आहेत. ज्यांना महिनाभर पायी चालणे शक्य नाही अशांसाठी ही सायकलवारी आहे. वारीत सिन्नर, औरंगाबाद, जळगाव, तसेच मालेगावहूनही सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. पंढरपूर सायकलवारीचे हे सहावे वर्ष असून, यंदाच्या वर्षी सायकलवारीसाठी ५०० हून अधिक सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. वारीच्या एक आठवडा आधी २७५ जणांची नोंदणी झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे.

यंदा गतवर्षीपेक्षा अनेक सुविधा सुधारित स्वरूपात देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, संपूर्ण वारीदरम्यान दोन अॅम्ब्युलन्स, ४ डॉक्टर्स आपत्कालीन परिस्थितीत सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी या सायकलवारीत सहभागी होऊन वारीचा एक वेगळ्या प्रकारे आनंद लुटावा, असे आवाहन नाशिक सायकलिस्टतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला जसपालसिंग बिदी, मिलिंद धोपावकर, श्रीकांत जोशी, तुकाराम नवले, सोफिया कपाडिया, शैलेश राजहंस, कविता नारंग, किशोर काळे, योगेश्वर कोठावदे, योगेश शिंदे उपस्थित होते.

--

येथे करावी नावनोंदणी

जुना गंगापूर नाका येथील शिवशक्ती सायकल्स, लुथरा एजन्सी, गंगापूररोड, भांड सायकल्स, इंदिरानगर या ठिकाणी नाशिक सायकलिस्टतर्फे पंढरपूर सायकलवारीसाठी नावनोंदणी अर्ज उपलब्ध आहेत. वारीसाठी नावनोंदणी करणाऱ्या सायकलप्रेमींना वॉटर बॉटल, सरप्राइज गिफ्ट, सायकलचे पंक्चर किट अशी वेगवेगळी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

--

असा असेल सायकलवारीचा मार्ग

सायकलवारीचा मार्ग नाशिक- सिन्नर-नांदूरशिंगोटे-तळेगाव दिघी-नानज-कोल्हार-राहुरी-अहमदनगर-रुईछत्तीसी-चापडगाव- माही जळगाव-करमाळा-टेंभुर्णी-पंढरपूर असा राहणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच २३ जून रोजी सकाळी ६ वाजता पालखी निघून सायंकाळपर्यंत अहमदनगर शहरात पोहोचणार आहे. नगर शहरात मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी २४ जून रोजी टेंभुर्णी येथे मुक्काम करण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी २५ जून रविवारी सकाळी विठुरायाचे दर्शन घेण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरची संख्या घटली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात धावणाऱ्या टँकरची संख्या १५ ने कमी झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे ही संख्या घटली असून, येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या वर्षात नाशिक शहरामध्ये पाण्याची तीव्रता नव्हती. पण, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही तीव्रता पुन्हा जाणवली. तलाव, विहिरी, बंधारे आणि हातपंप अशा जलस्रोतांमधील पाणी आटल्याने जिल्हावासीयांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली होती. पाण्याच्या या भीषण दुर्भिक्षापासून रहिवाशांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावे आणि वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था केली होती. पावसाने असेच सातत्य राखले, तर जिल्हा टँकरमुक्त होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या पावसाने मात्र अद्यापपर्यंत धरणाची पातळी किंचितशी वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यात वाढ झाल्यास सर्वांना दिलासा मिळणार आहे.

--


अशी आहे स्थिती

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानंतरही उन्हाळ्यात मात्र काही ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. त्यामुळे ११३ गावे व १३३ वाड्यांत ७४ टँकर सुरू करण्यात आले होते. आता त्यात घट होणार आहे. या टँकरच्या संख्येत घट झाल्यामुळे सध्या ८७ गावे व ८१ वाड्यांवर पाणीपुरवठा केला जाणार आहे. टँकर कमी झालेल्या तालुक्यांत त्र्यंबकेश्वर ५, येवला १, मालेगाव २, नांदगाव ३, चांदवड २, बागलाण २,सुरगाणा १ ,देवळा १ यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळीपूर्व कामे गाजणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शहरात पहिल्याच पावसामुळे नाशिककरांची उडालेली दैना सत्ताधाऱ्यांची कोंडी ठरणार आहे. पावसाळी पूर्व कामे होवून शहरात ठिकठिकाणी साचलेल्या पाणी आलेल्या पूरस्थितीचे भांडवल आता विरोधकांकडून केले जाणार असून, या कामांवरून सोमवारची महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. पावसाळी गटार योजनेसह पावसाळी पूर्व कामांबाबत महासभेत लक्षवेधी सादर करण्याची रणनिती शिवसेनेसह काँग्रेसकडून आखली जात आहे. सोबतच विकासकामांवरूनही सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची तयारी विरोधकाकडून केली जात असल्याने सोमवारची महासभा सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीची ठरणार आहे.

गेल्या बुधवारी दोन तास चाललेल्या पावसाने शहराची दैना झाली होती. पावसाळी पूर्व कामे झालीच नसल्याने जुने नाशिक, सराफ बाजार, भद्रकाली, पंचवटी भागांसह सखल भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे अनेक भागात तलावसदृश्य तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यातच महापौर रंजना भानसी यांनी या सगळ्या प्रकरणावर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी प्रशासनालाची पाठराखण केली होती. त्यामुळे या सगळ्या प्रकाराबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादीने पावसाळी पूर्व कामे करण्याची मागणी अगोदरच केली होती. परंतु प्रशासनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. पावसाळी पूर्व कामे झाली असती तर ही परिस्थिती ओढावली नसती, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची कोंडी करण्याची संधी विरोधकांना चालून आली आहे.

काँग्रेसने घेतली बैठक

सोमवारच्या महासभेत काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून पावसाळी पूर्व कामांवरून लक्षवेधी मांडण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसने शनिवारी नगरसेवकांची बैठक घेवून रणनिती ठरवली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनीही भाजपला घाम फोडण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. पावसाळी पूर्व कामांसह पावसाळी गटार योजनेच्या अपयशावरही चर्चा करण्याची मागणी सेनेकडून केली जाणार आहे. पावसाळी पूर्व कामांवरून सत्ताधारी भाजपमध्येच मतभेद आहेत. महापौर वगळता अन्य नेत्यांनी ही कामे झाली नसल्याचा दावा केला आहे. विरोधकांकडून हेच भांडवल करून भाजपची कोंडी केली जाणार आहे. त्यामुळे सोमवारची सभा वादळी ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

अजमेर सौंदाणे रोडवरील लक्ष्मणवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी नितीन वामनराव सूर्यवंशी (वय ४८) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शनिवारी (दि. १७) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नितीन सूर्यवंशी यांची अजमेर सौंदाणे रोडवरील लक्ष्मणवाडी शिवारात दोन एकर शेती आहे. या शेतीवर देना बँकेचे एक लाख २८ हजार रुपये पीककर्ज आहे. तसेच, खासगी सावकारी व हात उसनवार यांची देखील मोठी रक्कम असून, ती देणे अशक्यप्राय असल्याने नितीन सूर्यवंशी यांनी शेतात विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदूरची पुरातन बारव जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबाद रोडवर नांदूर येथे असलेल्या बारवाची दुरवस्था झाली आहे. या बारवाचे पाणी एकेकाळी परिसरातील नागरिकांचे नव्हे तर वाटसरूंची तृष्णा भागविण्याचे काम करीत होते. त्या पाण्याचा उपसा थांबल्याने पाण्याला दुर्गंधी पसरली आहे. बारवाच्या परिसराची स्वच्छता ठेवल्यास आजही येथील पाणी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी उपयोगात आणता येऊ शकेल.

गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या परिस्थितीतही या बारवाचे पाणी कमी झालेले नव्हते. याठिकाणी पाणी काढून आणण्यासाठी दगडी पायऱ्या असल्यामुळे सहजपणे हे पाणी काढता येऊ शकते. अहिल्यादेवी होळकरांच्या काळात या बारवाचे बांधकाम करण्यात आलेल्या ज्येष्ठ सांगतात. दगड आणि विटांच्या बांधकाम असलेल्या ही बारव आजही अस्तित्व टिकवून आहे.

प्रशासनाने लक्ष द्यावे

अशा ऐतिहासिक बारवकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष योग्य नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. त्यामुळे तातडीने तिच्याकडे लक्ष दिले तर हे पाणी वापरात येईल. बारवात प्लास्टिक, विटा, दगड पडलेले असतात. यामुळे या पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पिंपळ वृक्ष वाढल्याने बांधकामाला तडे जाण्याचीशक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८७ वर्षांनंतर होणार जिल्ह्याची पुनर्मोजणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाशिक जिल्ह्याची पुनर्मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. ब्रिट‌िशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १९३० साली जिल्ह्याची मोजणी केली होती. त्यानंतर तब्बल ८७ वर्षानंतर ही मोजणी होणार आहे. यात सॅटेलाईट यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या चतुःसिमांची पुनर्मोजणी बरोबरच शेती व रहिवासी क्षेत्र आणि इतर गोष्टींची माहिती घेण्यात येणार आहे.

राज्य शासनाने संपूर्ण राज्याची पुनर्मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सुरुवातीला महसूल विभागातील जिल्ह्याची निवड करण्यात आली असून त्यात नाशिकचा समावेश आहे. नाशिक प्रमाणेच पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांचीही पुनर्मोजणी होणार आहे. या पुनर्मोजणीत सॅटेलाईट पद्धतीने करण्यात येणार असल्यामुळे त्यात अचुकताही येणार आहे. या मोजणीमुळे जिल्ह्याच्या चतुसीमांची मोजणी करतानाच जिल्ह्यात झालेल्या बदलांची नोंद घेतली जाणार आहे. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण व औद्योगीकरण यामुळे मूळ धारण जमिनीचे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण होवून जमिनीचे मोठ्या प्रमाणावर पोटविभाजन झाल्याने प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात मेळ राहिलेला नाही. तो आता सुकर होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हद्दीचे वाद सोडवण्यासाठी व सिमा मोजणीचे काम सोपे होण्यासाठी ही पुनर्मोजणी उपयोगी पडणार आहे.

या मोजणीमध्ये जिल्ह्यातील वाढलेले रहिवास क्षेत्र, शेती (बागायती, जिरायती, कोरडवाहू क्षेत्र) तसेच धरणे, महत्त्वाची

स्थळे, वनक्षेत्र यांची माहिती घेतली जाणार आहे. ब्रिटीशकाळापासून जिल्ह्यांच्या ठरलेल्या क्षेत्राफळांनुसारच कामकाज सुरू असल्यामुळे त्यात अनेक त्रुटी होत्या. गेल्या काही वर्षांत सर्वच जिल्ह्यांचा झपाट्याने विकास झाला आहे. त्यामुळे या पुनर्मोजणीचा सर्वांनाच फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्किटेक्टच्या पत्राने नवे वादळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाचे तत्कालीन कार्यवाह यांच्यावर असलेला अनियमिततेचा ठपका, त्यामुळे त्यांच्यावर संस्थेने केलेली कारवाई, त्यानंतर झालेल्या निवडणुका हा धुरळा खाली बसतो न बसतो तोच अनियमित कामाची पाहणी करणारे आर्किटेक्ट अनिल चोरडिया यांनी आजी-माजी कार्यकारी सदस्यांना २५ प्रश्न असलेली प्रश्नावली पत्र पाठवले असून त्यामुळे मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक वाचनालयाच्या कामात अनियमितता झाली असल्याने माजी कार्यवाह यांच्यावर पदच्युत होण्याची कारवाई झाली होती. त्यांच्यासमवेत अर्थ सचिव व कार्याध्यक्षांनादेखील कारवाईला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आणि त्यांना सावानाची निवडणूक लढवता आली नाही. यानंतर नवी कार्यकारिणी आली. सावानाचे काम सुरू झाले; मात्र पत्रापत्रीचे शुक्लकाष्ठ अद्याप संपले नसल्याचे पुन्हा एकदा आर्किटेक्ट चोरडिया यांच्या पत्राने समोर आले आहे. त्यांनी आजी व माजी कार्यकारी सदस्यांना २५ प्रश्न असलेले पत्र पाठवले असून, त्याचे उत्तर लेखी स्वरूपात द्यावे, असे लिहिले आहे. वीस जून रोजी दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीपूर्वी तीन दिवस अगोदर उत्तर द्यावे, असे पत्रात नमूद केलेले असून, आर्किटेक्ट चोरडिया यांनी सावानाच्या लेटरहेडवर ते पत्र पाठवले आहे. त्यामुळे ते संस्थेचे म्हणणे आहे की काय, असा प्रतिप्रश्न काही कार्यकारी सदस्यांनी केला असून, आर्किटेक्ट चोरडिया यांना मीटिंग घेण्याचा अधिकार आहे काय, असा सवालही या पत्रावरून उपस्थित झाला आहे.

आर्किटेक्ट चोरडिया यांनी ६ जून रोजी हे पत्र पाठवले असून त्यावर जावक क्रमांकही आहे. या पत्रात नूतनीकरण कामासंबंधी आपणास कसे माहीत झाले, नूतनीकरण करणे गरजेचे होते काय, नूतनीकरणामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग होता काय, ही कामे करण्याबाबत झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत आपली उपस्थिती होती काय, यासह २५ प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, त्यांची उत्तरे लिखित स्वरूपात मागविण्यात आली आहेत. यावर माजी कार्यकारी सदस्य रमेश जुन्नरे यांनी कडाडून विरोध केला असून, आर्किटेक्ट चोरडिया यांना मीटिंग बोलावण्याचे अधिकार कोणी दिले, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे पत्रापत्रीचे हे प्रकरण आता कोणत्या स्तराला जाते हे २० जून रोजीच समजणार आहे.

अनियमितता व आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या सूचनेनुसार आर्किटेक्ट अनिल चोरडिया यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी तपशीलवार चौकशी करण्यासाठी हे पत्र दिलेले आहे. सर्वांची बाजू ऐकून घेणे हे नैसर्गिक न्यायतत्त्वाला धरून आहे. कायदेशीर काम करीत असताना सर्वांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

- श्रीकांत बेणी, प्रमुख कार्यवाह, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावच्या लॅपटॉपमधील त्या फोटोंचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलींचे अश्लील फोटोग्राफ्स पोर्न साइट्सवर टाकणारा अक्षय श्रीपाद राव (वय २७, रा. खोडेनगर, इंदिरानगर) या संशयित आरोपीच्या लॅपटॉपमध्ये आणखी सहापेक्षा अधिक मुलींचे फोटो पोलिसांनी शोधून काढले आहेत. हे फोटोग्राफ्स संशयिताने इंटरनेटवरून डाउनलोड केले आहेत की या मुली संशयिताच्या परिचयाच्या आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, संशयिताच्या कामाच्या ठिकाणावरील लॅपटॉप, तसेच काही सायबर कॅफेमधील कम्प्युटरमधील डेटाही पोलिस तपासणार आहेत.

अक्षयने काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंधात आलेल्या दोन मुलींचे फोटोग्राफ्स सोशल साइट्ससह पोर्न साइट्सवर टाकले होते. याच प्रकरणात सायबर पोलिसांनी अक्षयला अटक केली असून, तो १९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहे. संशयिताने पीडित तरुणीचे फोटो तब्बल १४५ पोर्न साइट्सवर अपलोड केले असून, आणखी काही साइट्स शोधण्याचे काम सुरू असल्याचे सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले. दरम्यान, संशयित अक्षयच्या लॅपटॉपमध्ये सहापेक्षा अधिक मुलींचे आक्षेपार्ह फोटोग्राफ्स सापडले आहेत. मात्र, या मुली अनोळखी असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. हे फोटोग्राफ्स संशयिताच्या ओळखीतील मुलींचे आहेत काय, याचा तपास सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. इंटरनेटवरील फोटोही सहजतेने डाऊनलोड करता येतात. त्यामुळे दोन्ही बाजू पोलिस तपासणार आहेत. दरम्यान, संशयित आरोपी एका आयटी कंपनीत कामास आहे. पीडित तरुणींचे फोटो अपलोड करण्यात, तसेच त्यांचे फोटो जतन करून ठेवण्यासाठी कंपनीच्या कम्प्युटरचा वापर केला गेला आहे काय, याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, अक्षय कधी कधी सायबर कॅफेतील कम्प्युटरचा वापर करीत होता, असे तपासात समोर आले आहे. या दृष्टिकोनातून संशयित राहतो त्या परिसरातील काही सायबर कॅफेमधील कम्प्युटरचा डेटाही तपासला जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

कोर्टाच्या आदेशाकडे लक्ष

संशयिताने पोर्न साइटवर अपलोड केलेले फोटोग्राफ्स काढून टाकण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज सादर केला आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर सायबर विभागाच्या पोलिस महानिरीक्षक कार्यालयामार्फत कोर्ट आदेशासह तक्रारीची एक प्रत इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडे (सीईआरटी-इन) पाठवण्यात येणार आहे. ही कमिटी माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अख्यात्यारीत येते. दरम्यान, या प्रकरणी शनिवारी सायंकाळपर्यंत कोर्टाचा आदेश झाला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार, पगारे चौकशीच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भ्रष्ट व गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी चौकशीचा दणका दिला असताना अजूनही काही विद्यमान बडे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. भाजपच्या एका कार्यकर्त्याने शहर अभियंता यू. बी. पवार आणि अधीक्षक अभियंता गौतम पगारे यांनी सिंहस्थात भ्रष्टाचार करून अवैध संपती जमा केल्याची तक्रार थेट पीएमओ पोर्टलवर केली आहे. पीएमओ कार्यालयाने या तक्रारीची दखल घेत या तक्रारीची तपासणी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. प्रशासनानेही या तक्रारीची गंभीर दखल घेत छाननी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पवार आणि पगार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत.

महापालिकेतील घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर सध्या संक्रांत आली असून, अनेक निवृत्त तसेच विद्यमान अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. गेल्या आठवड्यातच महापालिकेतील २०२ कोटींच्या एलईडी घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता नारायण आगरकर दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. रुग्णालये, हॉस्पिटल्ससंदर्भातील शासन आदेश दडवून ठेवल्याप्रकरणी अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांचीही चौकशी लावण्यात आली आहे. सोबतच खतप्रकल्पावरील ६० कोटींच्या यंत्र खरेदी घोटाळ्याप्रकरणी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांचीही चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असतानाच महापालिकेत पीएमओ कार्यालयाचा आणखी एक लेटरबाँब पडला आहे.

नाशिकमधील भाजप कार्यकर्ता नरेश नाईक यांनी शहर अभियंता यू. बी. पवार आणि अधीक्षक अभियंता गौतम पगारे यांनी सिंहस्थात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप केला असून, त्यासंदर्भातील तक्रार पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर केली आहे. पीएमओ कार्यालयाने त्याची दखल घेत यासंदर्भातील तथ्य तपासण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. या तक्रारीत पवार आणि पगारे यांनी कोट्यवधींची माया जमविल्याचा आरोप केला आहे. पगारे यांनी त्रिमूर्ती चौक व सपना थिएटरजवळ दोन बंगले घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पवार यांचेही शहरातील उच्चभ्रू वस्तीत प्लॉट्स असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या तक्रारींची छाननी सुरू केली आहे. तक्रारदाराची पार्श्वभूमी आणि केलेले आरोप तपासले जाणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवार आणि पगारे यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.

--

साधुग्राम ठेक्याचा वाद

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात साधुग्रामचा ठेका हा वादात सापडला होता .हा ठेका मिळवण्यासाठी राजकीय वाद चव्हाट्यावर आला होता. या वादातूनच ही तक्रार झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जवळपास ९० कोटींचा हा ठेका देताना गोंधळ केल्याचा आरोप सिंहस्थ काळातच झाला होता. ९० कोटी खर्चूनही साधू-संतांना पायाभूत सुविधा मिळत नव्हत्या, तर लोकप्रतिनिधींचीही या ठेक्याबाबत ओरड होती. परंतु, राजकीय दबावातून ही तक्रार दुर्लक्षित झाली. मात्र, आता थेट पीएमओ कार्यालयाकडे तक्रार झाल्याने या कामांची फाइल चौकशीसाठी बाहेर येण्याची शक्यता आहे.

--


संबंधित कार्यकर्त्याने पीएमओ कार्यालयाच्या पीजी पोर्टलवर तक्रार केली आहे. या तक्रारीची छाननी केली जाणार असून, त्याची तपासणी केल्यानंतर पोर्टलला त्यांसदर्भातला तपशील कळविला जाईल.

-अभिषेक कृष्णा, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images