Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पहिला दिवस नवलाईचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँडचा गजर, वर्गशिक्षिकांनी केलेले औक्षण, गुलाबाच्या फुलाने झालेले स्वागत, पहिल्याच दिवशी हातात मिळालेली नवी कोरी पुस्तके अन् हा दिवस आणखी आनंदी करायला मिळालेला गोड खाऊ.. अशा चैतन्यमयी वातावरण शहरातील शाळा दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्यानंतर गुरुवारी, १५ जूनला उघडल्या. सुट्ट्यांमुळे शांत असलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजून गेल्या. नव्यानेच शाळेत गेलेल्या चिमुकल्यांना मात्र रडू कोसळले.
मोठ्या सुट्टीनंतर शाळा सुरू होणार असल्याने शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने आदल्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली होती. परिसरात पताका लावण्यात आल्या होत्या. शाळेच्या अंगणात रांगोळ्या काढण्यात आल्या. तसेच फळेही सजवण्यात आले होते. शाळा स्वच्छ करुन चकाचक करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आनंददायी करण्यासाठी शिक्षकांनी जोरदार तयारी केली होती. सुटीमध्ये अनेक शाळांनी रंगरंगोटीची कामेही पूर्ण केली होती. त्यामुळे आपली नव्या रंगांमधील शाळा पाहून तर विद्यार्थीवर्ग एकदम आनंदात होता.
नव्यानेच शाळेत घातलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेच्या पहिल्या दिवशी आवर्जुन उपस्थित होते. आपल्या मुलाचा, मुलीचा शाळेतील पहिल्या दिवसाचे साक्षीदार आपण व्हावे, या इच्छेने पालकांनी हजेरी लावली होती. तर पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांना सोडून एकटे जायचे असल्याने चिमुकल्यांना रडू कोसळले. कधी एकदा शाळेतून बाहेर पडू याची वाट पाहत त्यांनी शाळेचा पहिला दिवस पूर्ण केला. पहिलाच दिवस असल्याने सकाळ व दुपार सत्र दोन्ही शाळा अर्धा वेळच सुरू होत्या. आजपासून (१६ जून) अभ्यासक्रमाला नियमित सुरुवात होणार आहे.

पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस चालना देण्यासाठी पहिल्याच दिवशी त्यांच्या हाती पुस्तक देण्याचे नियोजन आखण्यात आले होते. त्यानुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके देण्यात आली. मुख्याध्यापकांनी प्रातिनिधीक स्वरुपात काही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमात पुस्तके दिली. त्यानंतर वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. याशिवाय, यशस्वी शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी मार्गदर्शनही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरांकडून प्रशासनाची पाठराखण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळापूर्व कामांमध्ये प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बुधवारी शहर वेठीस धरले गेले असताना, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मात्र गुरुवारी प्रशासनाची पाठराखण केली. पावसामुळे शहरातील काही भागांत बिकट परिस्थिती ओढावली असताना गुरुवारी महापौरांनी अधिकाऱ्यांची बैठक घेवून या स्थितीचे खापर प्लास्टिक पिशव्या आणि पावसाळी गटार योजनेच्या वहनक्षमतेवर फोडले. भाजपचे गटनेते आणि सभागृहनेते नाले सफाईचे काम केले नसल्याचा आरोप करत असताना महापौर रंजना भानसी यांनी मात्र प्रशासनाला काम झाल्याची पावती दिली. त्यामुळे पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महापौरांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बुधवारी दोन तास चाललेल्या मुसळधार पावसाने शहराची चांगलीच धूळधाण उडाली. पावसाळापूर्व कामे पालिकेने केली नसल्याने शहरातील सखल भागासह जुने नाशिक, सराफ बाजार व पंचवटीतल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबून पुरासारखी स्थिती निर्माण झाली होती. दुकाने आणि घरांमध्ये पाणी घुसल्याने लाखोंचे नुकसान झाले. विशेष म्हणजे पालिकेने चारशे कोटी रुपये तयार करून उभारलेली पावसाळी गटार योजनाही कूचकामी ठरली आहे. शहरात निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील आणि गटनेता संभाजी मोरुस्कर, शहर अभियंता यू. बी. पवार, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वप्रथम पावसाळी गटार योजनेबाबत जाब विचारण्यात आला. तो यू. बी. पवार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलने टोलवला.
पावसाळी गटाराची वहन क्षमता ही तासाला २७.५० मिलिमीटर पाऊस वाहून नेण्याची आहे. प्रत्यक्षात बुधवारी ९२ मिलिमीटर पाऊस झाल्याने पाणी साचल्याचा दावा पवार यांनी केला. तर गटारींमध्ये व चेंबर्सवर प्लास्टिक पिशव्या अडकल्याने पाणी रस्त्यावरच तुंबल्याचा जावईशोध पवारांनी लावला. आरोग्य विभागाकडून पिशव्या उचलण्याचे काम सुरू असल्याचा दावाही यावेळी आरोग्य विभागाने केला. अधिकाऱ्यांच्या या उत्तराला महापौरांनीही मम म्हणत प्रशासनाला एक प्रकारे क्लिनचीट देऊन टाकली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दिनकर पाटील यांनी नियोजन नसल्याने जनतेचे हाल होत असल्याचा आरोप केला. पदाधिकारी प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत असताना महापौर अधिकाऱ्यांची पाठराखण करत असल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावले. पंधरा दिवसांपूर्वीच आपण नालेसफाई करण्याचे आदेश दिल्याचा दावा करीत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रशासन काम करत आहे ना, असा जप त्यांनी बैठकीत केला. बैठकीनंतर नुकसान झालेल्या सराफ बाजाराची पाहणी करून सोपस्कारही पार पाडले.

पदाधिकाऱ्यांमध्येच विसंवाद
सभागृहनेते दिनकर पाटील आणि गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी बैठकीतच नालेसफाई केली गेली नसल्याचा दावा केला. त्यावर यू. बी. पवार यांनी कामांचे फोटो दाखवतो असे सांगत पावसाळीपूर्व कामे केल्याचा दावा केला. उपमहापौर प्रथमेश गिते यांनीही परिस्थिती वाईट असल्याचे मान्य केले. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी मात्र कामे झाल्याचा दाखला देत, प्रशासनाला क्लिनचीट देऊन टाकली. त्यामुळे गटनेते व सभागृहनेतेही तोंडघशी पडले. महापौरांच्या या पावित्र्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या.

नालेसफाईचे गौडबंगाल
शहरात दरवर्षी पावसाळापूर्व कामे करण्यासाठी जाहीर निविदा काढून काम दिले जाते. यावेळी मात्र या प्रक्रियेला फाटा देण्यात आला. जवळपास तीने ते चार कोटींच्या कामांची प्रभागानुसार विभागणी करण्यात आली. आयुक्तांच्या अधिकारांमध्ये थेट प्रभागानुसार ठेका देण्यात आला. त्यामुळे ३१ ठेकेदार नियुक्त करण्यात आले. चार महिने सफाईचे काम सुरू राहणार असल्याचा दावा पवार यांनी केला. मात्र, प्रत्यक्षात शहरात कुठेच काम झाले नसल्याचा दावा सत्ताधारी नगरसेवक करत असताना प्रशासनाकडून मात्र काम झाल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे पावसाळापूर्व नालेसफाईच्या गौडबंगालाचे गूढ वाढले आहे.

नैसर्गिक नाल्यांवर मौन
पावसाळी गटार योजनेची वहन क्षमता नसली तरी, शहरातील नैसर्गिक नाल्यांचे काय झाले, असा प्रश्न विचारल्यावर महापौरांसह अधिकाऱ्यांचीही बोलती बंद झाली. अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवरच बांधकाम झाले आहे. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. नैसर्गिक नाले बंद झाल्याने आणि अवैध बांधकामामुळे पावसाचे पाणी गटारीत जाण्याऐवजी थेट रस्त्यावरच येऊन तुंबले. यावर महापौरांसह अधिकाऱ्यांनी मौन बाळगत प्लास्टिक व वहन क्षमतेची जपमाळ कायम ठेवली. विशेष म्हणजे शहरात किती नैसर्गिक नाले आहेत, याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध नव्हती.
पावसाळापूर्व कामांत भ्रष्टाचाराचा आरोप
पहिल्याच पावसात शहराचा तलाव झाला असताना, महापौरांकडून केली जाणारी प्रशासनाची भलामण संशयास्पद असून, पावसाळापूर्व कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. मे महिन्यातच पावसाळापूर्व कामे होणे अपेक्षित असतानाही ते झाले नसल्याचा दावा करत, या कामांची आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी बोरस्ते यांनी केली. पावसाळी पाण्याचा प्रश्नही प्रशासन सोडवू शकत नसल्याने सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील नाल्यांची सफाई पारदर्शक न झाल्याचा आरोप करत, महासभेत लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली.
बुधवारी शहरात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेली स्थिती सत्ताधारी व प्रशासन हाताळण्यास अपयशी ठरल्यामुळे शिवसेनेने गुरुवारी भाजपची कोंडी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपवर हल्लाबोल केला. पहिल्याच पावसात भाजपच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडल्याचे ते म्हणाले. पावसाळापूर्व कामे मे महिन्यातच होणे अपेक्षित होते. परंतु, ऐनवेळी ३१ प्रभागांत काम वाटून देण्यात आले. नालेसफाई, चेंबर्स दुरुस्तीसह स्वच्छतेचे विषय स्थायी समितीवर येऊन मंजूर केले गेले नाहीत. याउलट भूसंपादनासारखे मलिद्याचे विषय वारंवार स्थायीवर का आणले जातात, यावर त्यांनी आक्षेप घेतला. शहराचा तलाव होण्याची गोम यात असल्याचे सांगून स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना प्रशासन पावसाळी पाण्याचाही प्रश्न सोडवू शकत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याचा जाब प्रशासनाला विचाणार असल्याचे ते म्हणाले.

नालेसफाई ‘पारदर्शक’
यावेळी बोरस्ते यांनी भाजपच्या कारभारावर बोट ठेवले. शहराचा पहिल्याच पावसात तलाव झाला असताना प्रशासनाने नालेसफाई व स्वच्छता पारदर्शक झाली तर नाही ना, असा चिमटा काढला. प्रशासनावर अंकुश नसणे हे सत्ताधारी भाजपचे अपयश असून, भाजपचे आमदार नागरिकांना मदत करण्याऐवजी प्रशासनातील अधिकाऱ्यांना घेऊन फिरत होते असा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या या ‘पारदर्शक’ कारभाराचा जाब आपण विचारणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीची तक्रार
पावसाळापूर्व कामांवरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन शहरात तातडीने नालेसफाई व स्वच्छता करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार व नगरसेवकांनी पावसाळापूर्व कामे झालीच नसल्याचा आरोप करत तातडीने पावसाळी गटार योजनेची तपासणी आणि नालेसफाई मोहीम हाती घेण्याची मागणी केली. पावसाची तीव्रता जास्त असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे कारण आयुक्तांनी दिल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

तीन दिवसांत नालेसफाई करा
पहिल्याच पावसात शहराची दैना उडाल्यानंतर व प्रशासनाच्या कामावर चौफेर टीका झाल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. पावसाची तीव्रता जास्त असली तरी, सर्व परिस्थितीला पालिकाच जबाबदार असल्याची कबुली आयुक्तांनी दिली. तीन दिवसांत शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई तातडीने करण्याचे फर्मान त्यांनी काढले. दरम्यान, पावसाळी गटार योजनेवर अतिक्रमण झाले असून ते तातडीने काढण्याचे निर्देशही दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पहिल्या पावसात कचरा वाहून येत असल्याने चेंबर्स ब्लॉक होत असले तरी, परिस्थितीची जबाबदारी पालिकेची असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. हॉकर्स, गाळेधारकांमुळे पाणी अडवले जात असल्याने हे अतिक्रमण तातडीने काढण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रितपणे काम करून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले.

आयुक्तांना ठेवले अंधारात
सार्वजनिक बांधकाम विभागाने यावेळेस नालेसफाईचे एकत्रित काम देण्याऐवजी प्रभागानुसार काम दिले आहे. विभागाच्या या प्रकारावर आयुक्तांनीही संताप व्यक्त केला असून, असे उद्योग का करतात असा जाब विभागाला विचारला आहे. या सर्व कामांचे केंद्रीकरण करण्याऐवजी प्रभागानुसार वाटणी केल्यावरुन त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅप ओळखणार स्वभाव

$
0
0

नाशिक ः नात्या-गोत्यांपासून तर सामाजिक आणि व्यावसायिक संबंधांवर प्रभाव टाकणाऱ्या मानवी स्वभावाचे सूक्ष्म विश्लेषण करणारे अनोखे अॅप नाशिकच्या वेदांशू पाटील या युवकाने विकसित केले आहे. ‘डिज‌िटल हॅण्ड रायटिं अँड ड्रॉईंग अॅनालिसीस’ असे या अॅपचे नाव आहे. माणसाच्या व्यावहारिक यशाचा समतोल साधण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणार असल्याचा वेदांशू याचा दावा आहे.

वेदांशू पाटील हा मूळचा अमळनेर येथील रहिवासी आहे. सध्या तो नाशिकमध्ये वास्तव्यास असून बिझनोफेअर्स या संस्थेचा तो संचालक आहे. सिंगापूरमधून त्याने व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील ‘इंटरनॅशनल इन्स्ट‌िट्यूट ऑफ ग्राफालॉजी’ या संस्थेतून त्याने ग्राफालॉजी या विषयाचा डिप्लोमा केला. या शिक्षणातून अक्षरविश्लेषणाच्या जडलेल्या छंदातून त्याने या अॅपची निर्मिती केली आहे.

मानवी स्वभावाचे गूढ कंगोरेही केवळ त्याच्या अक्षरातून उलगडले जाऊ शकतात. शास्त्राधारित अक्षर विश्लेषणातून माणसाच्या भूत, भविष्य अन् वर्तमान काळाविषयीही आडाखे बांधता येतात. या शास्त्राला कुठलाही पारलौकीक किंवा अध्यात्मिक विषयाचा आधार नसून केवळ अक्षर विश्लेषणाच्या तंत्रावर अन् संशोधनावर हे अॅप काम करते अशी माहितीही वेदांशू याने दिली. करिअरची दिशा, व्यवहार, मैत्री, राजकीय संबंध आदी आव्हानात्म प्रश्नांवर अक्षर विश्लेषणाव्दारे तोडगा काढता येऊ शकतो, असाही त्याचा दावा आहे.

डिज‌िटल फिल्म फेस्ट‌िव्हल भरविणार

अनोख्या अॅपच्या निर्मितीसोबतच वेदांशू वेगळ्या स्वप्नासाठी प्रयत्नरत आहे. अनेकदा सृजनात्मक कलाकृती व कलावंतांना योग्य व्यासपीठ न मिळाल्याने त्यांची कला जगासमोर येत नाही. या कलावंतांना ग्लोबल व्यासपीठ देण्यासाठी डिज‌िटल फिल्म फेस्ट‌िव्हल भरविण्याचा वेदांशू पाटील याचा प्रयत्न आहे. यासाठी त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व नेत्या सुप्रीया सुळे यांनाही या फेस्ट‌िव्हलच्या आयोजनासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीव्हीचा रिमोट न दिल्याने पत्नीची दगडाने ठेचून हत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | नाशिक

टेलिव्हिजन पाहण्याचं वेड माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतं याचं अंगावर काटा आणणारं प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलं आहे. टीव्हीचा रिमोट मागितल्यावर तो न दिल्याने पतीने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिकच्या सिडको भागात दत्तनगर येथे राहणाऱ्या शोभा पांडूरंग मनवत्कर (३२) या महिला घरी टीव्ही पाहात असताना तिच्या पतीने तिच्याकडून रिमोट मागितला. मात्र, शोभा यांनी नकार दिल्यानंतर झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिच्या हत्या केली. धक्कादायक गोष्ट अशी की घटना घडली त्यावेळी त्यांच्या तीन मुली घरातच होत्या. अंबड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला असून पहाटे चार वाजत्या सुमारास ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ फोटो हटविण्यासाठी १४५ पोर्नसाइट्चा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रेमाचे आमिष दाखवत मुलींचे अश्लिल फोटो काढून ते पोर्नसाइट्सवर अपलोड करणाऱ्या संशयित आरोपीचे आणखी कारनामे समोर आले आहे. संशयिताने पीडीत तरुणीचे फोटो तब्बल १४५ पोर्नसाइट्सवर अपलोड केल्याचे पोलिसांनी शोधून काढले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोर्टात अर्ज सादर केला असून, सदर फोटो काढून टाकण्यासाठी इंडियन कम्प्युटर इर्मजन्सी रिसपॉन्स टीमची (सीईआरटी-इन) पोलिस मदत घेणार आहेत.

अक्षय श्रीपाद राव (२७, रा. खोडेनगर, आठवण हॉटेलजवळ, इंदिरानगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. बीसीएसचे शिक्षण घेतलेला राव आयटी कंपनीत कामास आहे. त्याचे आईवडील दुबई येथे असून, तो एकटाच नाशिकमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वी २५ वर्षीय तरुणीस विवाहाचे आमिष दाखवून घरी बोलावून तिचे फोटो छायाचित्रे काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रावला १३ जून रोजी अटक झाली होती. अटकेनंतर कोर्टाने त्यास १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, गुरूवारी (दि.१५) आणखी एका तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला. मूळ नाशिकची ही तरुणी मुंबईत नोकरी करते. एमबीएचे शिक्षण घेतलेल्या या तरुणीशी अक्षयने प्रेमसंबंध प्रस्थापित करीत लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. या दरम्याने त्याने मुलीचे अश्लिल फोटो काढले. परंतु नंतर दोघांत वाद झाला. लग्नास अक्षयने नकार दिल्याने त्या तरुणीने नाशिक सोडले. मात्र, अक्षय सतत फोन करून तिला पुन्हा घरी बोलवत होता. स्पष्ट नकार दिल्यानंतर अक्षयने आपल्याकडील तरुणीचे फोटो तब्बल १४५ पोर्नसाइट्सवर अपलोड केले. याची कुणकुण संबंधित तरुणीपर्यंत पोहचली. त्यातच पहिल्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अक्षयचा लॅपटॉप, मोबाइल आणि इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले. त्यातही अनेक गंभीर बाबी स्पष्ट झाल्या.

याबाबत सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले, की संशयिताच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार होती. तत्पुर्वीच आणखी एक तरुणीची तक्रार समोर आली. त्यानुसार, अक्षयच्या पोलिस कोठडीची वाढ करण्याची विनंती कोर्टाकडे केली. कोर्टाने अक्षयच्या कोठडीत सोमवारपर्यंत (दि. १९) वाढ केली आहे. संशयिताने सदर फोटो १४५ पोर्नसाइट्वर प्रसिध्द केले. आणखी शोध घेतला जात आहे. या पोर्नसाइट्सच्या संख्येत वाढ होऊ शकते.

कोर्टाचा आदेश अन् ‘सीईआरटी’ची मध्यस्थी
जगभरात पोर्नसाइट्ची संख्या लक्षावधी आहे. त्यावरील मजकूर हटवण्यासाठी स्थानिक कोर्टाचा आदेश महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीकोनातून पोलिसांनी कोर्टात अर्ज केला आहे. कोर्टाचा आदेश मिळाल्यानंतर तक्रारीची एक प्रत सोबत जोडून ती माहिती इंडियन कम्प्युटर इर्मजन्सी रिसपॉन्स टीमकडे (सीईआरटी-इन) पाठवण्यात येईल. ही संस्था माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अख्यात्यारित येते. कोर्टाच्या आदेशानुसार नोडल एजन्सी म्हणून सदर संस्था संबंधित वेबसाइट्सवरील फोटो किंवा व्हिडिओ काढून टाकण्याचे व्हर्चुअल आदेश संबंधित वेबसाइट्सला देते. दोन देशातील सामजस्य करारानुसार या संस्थेचे आदेश पाळले जातात.

संशयिताने संबंधित तरुणीचे जाणीवपूर्वक फोटो पोर्नसाइट्सवर टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसते. अशा प्रकारे त्याने आणखी कोणाची फसवणूक केल्याची शक्यता नाकरता येत नाही. असे असल्यास संबंधितांनी त्वरित सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधवा.
- अनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांना’ भोवणार ‘मानव विकास’ गैरव्यवहार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिमागास भागाचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मानव विकास कार्यक्रमात निधीचा गैरवापर केल्यास त्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा मानव विकास विभागाचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी दिली आहे. निधीचा गैरवापर करणाऱ्या मुख्याध्यापक आणि सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य, शिक्षण व उत्पन्नवाढीचा निर्देशांक वाढावा यासाठी जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, कळवण, दिंडोरी, बागलाण, नांदगाव या आठ तालुक्याची निवड केली. या कार्यक्रमातंर्गत आतापर्यंत ५६ बसेस व तीन वर्षात १३ हजार ९० मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे. तसेच आरोग्य व शैक्षणिक निर्देशांक वाढावा यासाठी नऊ योजनाही राबवल्या जात असून २०१६-१७ मध्ये यासाठी १८ कोटी २४ लाख रुपये खर्च करण्यात आले. या कार्यक्रमातंर्गत येणाऱ्या निधीतून तीन महिन्यात इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रक येथे अंगणवाडी बांधकामात अपहार केल्यामुळे सरपंचाविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील ४९ पात्र लाभार्थी मुलींना संस्थेच्या आडमुठेपणामुळे निधी वितरित करता न आल्यामुळे येथील मुख्याध्यापकावर कारवाई केली आहे. अशाच पध्दतीची कारवाई या योजनेच्या निधीत केल्यास किंवा त्याच्या वितरणात दुर्लक्ष केल्यास केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये वितरित केला जाणारा हा निधी त्याच कामावर व्हावा व त्यात गैरव्यवहार होऊ नये याची काळजी संबंधितांनी घ्यावी; अन्यथा त्याविरूध्द कडक कारवाई करणार आहे. या कार्यक्रमातंर्गत गर्भवती मातांची व बालकांची आरोग्य तपासणी करणे, दारिद्र्य रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरीचे वाटप करणे, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये सुरु असलेल्या अभ्यासिकांसाठी आवर्ती खर्च देणे, बालभवन विज्ञान केंद्रासाठी आवर्ती खर्च देणे, कस्तुरबा गांधी बालिका योजनेची व्याप्ती १० पर्यंत वाढवणे, आठवी ते बारावी पर्यंत गरजू मुलींना सायकल वाटप करणे, बससेवा सुविधा देणे, बीजभांडवल म्हणून अर्थसहाय्य करणे या योजनांचा समावेश आहे. या योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्या यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मागास भागातील मानव विकास निर्देशांक वाढावा यासाठी मानव विकास कार्यक्रम राबवला जातो. काही ठिकाणी या कार्यक्रमाचा निधीचा गैरवापर होतो. त्यात अद्यापपर्यंत एक प्रकरण समोर आले आहे. निधीचा गैरवापर केल्यास कडक कारवाई केली जाईल.

- प्रतापराव पाटील,
जिल्हा नियोजन अधिकारी, मानव विकास


तीन वर्षात सायकलसाठी वाटप केलेला निधी

शैक्षणिक वर्ष......शाळांची संख्या....लाभार्थी मुलींची संख्या.....वितरित निधी (लाखात)
२०१३-१४................२०८...........४,८५१......................१४५.५३
२०१५-१६................२०४...........३,९०१......................११७.०३
२०१६-१७................१९३...........४,३३८......................१३१.६१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदनचोरांची टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको/ देवळाली कॅम्प

पाथर्डीगाव परिसरात गस्त घालत असताना इंडिका कारमधून संशयितरित्या पळ काढणाऱ्या पाच जणांना इंदिरानगर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे जेरबंद केले. संबंधित पाचही जणांनी इंदिरानगरमधील विरोज सोसायटीसह देवळाली कॅम्पमधील लीलावती सॅनेटोरियममधील चंदनाच्या झाडांची तोड केली.

सेामनाथ मधुकर कुर्हाडे, सचिन मधुकर कुर्हाडे, गणेश भानुदास कुर्हाडे, कैलास भानुदास कुर्हाडे आणि अनिल अशोक कुर्हाडे अशी अटक करण्यात आलेल्या पाच संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विराज सोसायटीतील सिक्युरिटी संजय बाबुलाल भावसार आणि मोहनभाई गोहल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनुक्रमे इंदिरानगर आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची मध्यरात्रीच्या सुमारास पाथर्डी गाव-पाथर्डी रस्त्यावर गस्त सुरू होती. याचवेळी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कार (एमएच १६ एबी १६२३) संशयितरित्या जात असल्याचे पोलिसांना आढळले. त्यांनी कार अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कारचा वेग वाढवत भरधाव वेगाने निघून जाण्याची घाई केली. पोलिसांनीही पाठलाग करीत कार थांबविली. यावेळी कारमधील पाचही जणांनी गाडी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी मुसक्या आवळत त्यांना इंदिरानगर पोलिस ठाण्यात आणले. कारची तपासणी केली असता गाडीत पिस्तुलसह, दोन कुऱ्हाडी आणि झाडे कापण्याच्या करवती आढळून आल्या. संशयित पाचही आरोपींनी चंदनाच्या झाडाची कत्तल करून चोरी केल्याचे समोर आले.

सिक्युरिटी गार्डला मारहाण

विराज सोसायटीतील सिक्युरिटी संजय बाबुलाल भावसार यांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित पाचही जणांना विराज सोसायटीत चंदनाच्या झाडाची कत्तल करीत असल्याचे भावसार यांनी बघितले होते. त्यांनी झाड तोडण्यास मज्जाव केला. मात्र, संशयितांनी भावसार यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील आठशे रुपये काढून घेतले आणि इंडिका गाडीतून पळ काढला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

देवळालीवासीयांची सक्रियता

देवळाली कॅम्प : लामरोड भागातील लीलावती सॅनेटोरियममध्ये मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चंदनाचे झाड तोडले जात असल्याचे स्थानिक रहिवासी मंगेश शिंदोडे, नेताजी धुर्जड यांना आढळले. त्यांना याबाबत देवळाली कॅम्प पोलिसांना तातडीने कळविले. पोलिस ठाण्यात रात्रपाळीवर असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय राठोड, पोलिस हवालदार महेंद्र साबरेकर, गणपत मुठाळ, पोलिस शिपाई हांडोरे, सातपुते आदींनी चंदनचोरांचा पाठलाग केला. देवळाली कॅम्प पोलिसांच्या तावडीतून सुटू पाहणारे चंदनचोर अखेर इंदिरानगर पोलिसांच्या तावडीत सापडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगीचे दर्शन ४ दिवस राहणार बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर भगवती मंदिर परिसरात संरक्षक जाळीत अडकलेल्या दगडांना बाजूला करण्यासाठी रेस्क्यू टीम मंगळवापर्यंत येणार आहे. त्यामुळे बुधवार (दि. २०)पासून सलग चार दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेंज यांनी दिली. उत्तराखंडच्या टीमसह स्पेनहून काही तंत्रज्ञ या कामासाठी येणार आहेत.

सोमवारी (दि. १२) सप्तशृंग गडावर भगवती मंदिर परिसरात पावसाच्या आगमनापूर्वी दरड कोसळली. संरक्षक जाळ्या बसविलेल्या असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर १३ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध‌िकारी आणि मेकॅबरी कंपनीचे संचालक यांनी परिस्थितीची पाहणी केली होती. कोसळलेल्या दगडांना बाजुला काढण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार असून, या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा लागणार आहे. या कामात कुठलाही धोका पोहोचू नये म्हणून २१ पासून सलग चार दिवस सप्तशृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवावे लागणार आहे. याबाबत देवस्थान प्रशासन व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. उत्तराखंड येथून रेस्क्यू टीम निघाली असून, मंगळवारपर्यंत ही टीम कळवण येथे पोहोचणार आहे. त्यानंतर कामाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मंदिर ट्रस्टला मंदिर सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत कुठलीही सूचना मिळालेली नाही.

उत्तराखंड येथील टीम मंगळवारपर्यंत आली तर बुधवारपासून दगड बाजूला करण्यात येतील. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येईल. चार ते पाच दिवस हे काम सुरू राहू शकते.
- सुरेंद्र कंकरेंज, कार्यकारी अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बागलाणमध्ये पेरणीला वेग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरासह तालुक्यात गत सप्ताहापासून दमदार पाऊस सुरू असल्याने यंदा खरिपाच्या पेरण्या वेळेवर होण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे बी-बियाणे, खते आदींच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ओस पडलेल्या बाजारपेठा फुलल्या आहेत. दरम्यान, परिसरात मका, सोयाबीन लागवडीला प्रारंभ झाला आहे.

मृग नक्षत्रास सुरुवात होवून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतरही पावसास प्रारंभ न झाल्यासने यंदाही पेरण्यांना उशीर होतो की काय, अशी चिंता सतावत होती. गत शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत. गतवर्षी मृग व आद्रा नक्षत्र कोरडी गेल्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना तब्बल महिनाभर लांबल्या होत्या. कोरडवाहू क्षेत्रावरील पिकांची लागवड उश‌िरा झाली होती. पेरण्या उशिराने झाल्यामुळे साहजिकच खरिप पिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. मगृ नक्षत्रास प्रारंभ झाल्यानंतर पावसाने डोळे वटारल्याचा परिणाम बाजारपेठेत स्पष्ट दिसत होता. बी-बियाणे खरेदीसाठी शेतकरी येत नसल्याने विक्रेतेही हतबल झाले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. यामुळे ओस पडलेल्या बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. मूग, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजारी आदी पिकांचे बियाणे, त्यासाठी लागणारी खते, पेरणीसाठी मोगे, घरे, गोठे, कडब्यांच्या गंज्या झाकण्यासाठी प्लास्टिकच्या ताडपत्र्या, लोखंडी पत्रे आदी खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.

सोयाबीन, मकाला अधिक पसंती

सोयाबीननंतर मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. गेल्या हंगामात मक्याला समाधानकारक भाव मिळाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी मका लागवडीकडे वळला आहे. मका पेरणीस आणि त्यानंतर मजुरीही कमी लागते. त्यामुळे यंदा तालुक्यात मक्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

सटाण्यात मात्र पाणीटंचाई

नगरपालिकेकडून चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा उद्भव विहिरी आटल्याने तब्बल सात दिवसांआड होऊ लागला आहे. शहरातील मध्यवर्ती भागात जेमतेम हंडाभर पाणी येत असल्याने ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेगोंडा येथील गिरणा नदीपात्रात विहीर आहे. मात्र सध्या नदीपात्र कोरडेठाक आहे. नदीपात्रात चणकापूर धरणातील आवर्तन संपुष्टात आले आहे. तर पुनदचे एकमेव आवर्तन शहरवासीयांनी मे अखेरीस घेतल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. शहरातील आरमनदीपात्र देखील कोरडेठाक झाले आहे. केळझर धरणातील आवर्तन संपुष्टात येवून धरण कोरडेठाक झाले आहे. त्यात शहरातील नदीपात्रातील विहिरींमधील उद्भवदेखील बंद झाल्याने शहराला पाणीपुरठा करणारे सर्व स्त्रोत ठप्प झाले आहेत. शहरावर पावसाळ्यात पाणीटंचाईचे ढग घोंगावत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर पुन्हा शहरात दिसू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीने भाववाढीला निमंत्रणच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने जीएसटी कायदा लागू केल्यानंतर त्यात कापड व्यावसायिकांचाही समावेश केल्यामुळे कापड व्यापारी प्रचंड नाराज आहे. मुंबई, सुरत, बंगळुरूसह देशातील इतर ठिकाणी कापड व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात बंद करून आपला संताप व्यक्त केल्यानंतर नाशिकमध्येही त्याचे पडसाद उमटले आहेत. या कराविरुद्ध गुरुवारी नाशिकच्या रिटेल कापड व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले, तर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

आतापर्यंत कापड, साडी, चादर, ब्लँकेट, टॉवेल या सर्वसामान्यांच्या वस्तूंसाठी विक्रीकर व व्हॅट नव्हता; पण सरकारने आता त्यांना जीएसटी लावण्याची अधिसूचना काढली आहे. त्यामुळे सरकारने भाववाढीस निमंत्रण दिल्याचा आरोपही या कापड विक्रेत्यांनी केला आहे. जीएसटीमुळे कापड व्यापाऱ्यांना नवीन फॉर्म भरणे, रिटर्न भरणे, अशा किचकट बाबींना सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या मालांची वेगवेगळी जंत्री ठेवणे, विक्रीची बिलेसुद्धा वेगवेगळी बनविणे, रिटर्नसुद्धा वेगवेगळे भरणे या सर्व गोष्टी किचकट असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या विरोधात नाशिक रिटेल क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यावर अध्यक्ष दिग्विजय कापडिया, नरेश पारख, रामेश्वर राजू, सतीश शहा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हौस पुरवा गाडीची!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मात्र जुन्या वाहनांमधून फिरताना रुबाबाचा फिल येत नसल्याचे चित्र आहे. स्थायी समिती सभापती, सभागृह नेता आणि प्रभाग समित्यांच्या सभापतींकडे असलेल्या जुन्या गाड्या बदलून नव्या गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. महापौरांनीही आपल्या लाडक्या पदाधिकाऱ्यांची हौस तत्काळ पूर्ण केली आहे.


नव्याने निवडून आलेल्या दहा पदाधिकाऱ्यांसाठी दहा नव्या गाड्या खरेदीचे फर्मान महापौरांनी काढले असून, त्यावर तब्बल पाऊण कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. विशेष म्हणजे स्थायी समिती सभापती आणि सभागृहनेत्यांसाठी ‘मारुती सियाझ’ ही महागडी कार खरेदी केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारच्या महासभेत ठेवण्यात आला असून, त्यात उपसभापतींसाठी वाहने खरेदीच्या धोरणात्मक विषयावरही चर्चा केली जाणार आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती डामडोल असून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी गेल्या मह‌िन्यात चक्क ठेवी मोडाव्या लागल्या आहेत. चालू वर्षाच्या बजेटमध्ये भाडवली कामांसाठी केवळ १३० कोटींचा निधी शिल्लक असून, त्यातूनच शहर विकासाची कामे करायची आहेत. तर जीएसटीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी थेट बजेटमध्ये तरतूद करावी लागत आहे. अशा बिकट समयी पालिकेतील खर्चाला ब्रेक लावून काटकसरीचे धोरण सत्ताधाऱ्यांनी स्वीकारणे अपेक्षित आहे. परंतु, भाजपच्या धुरीणांनी पालिकेत सध्या नगरसेवकांचे पुनर्वसन करण्याची स्पर्धा सुरू केली आहे. पालिकेत विविध समित्या अस्तित्वात असताना शहर सुधार, विधी व आरोग्य या तीन नव्या समित्या तयार केल्या आहेत.

स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, चार प्रभाग समिती सभापती, मह‌िला व बालकल्याण समिती सभापती यांच्याकडे सध्या जुनी वाहने आहेत. परंतु, या वाहनांचा रुबाब जनतेवर पडत नाही. त्यामुळे या सर्वांसाठी नवी वाहने खरेदी केली जात आहेत. स्थायी समिती सभापती व सभागृहनेत्यांसाठी मारुती सियाझ ही गाडी खरेदी केली जाणार आहे, तर उर्वरीत आठ जणांसाठी स्विफ्ट डिझायर ही कार खरेदी केली जाणार आहे. या सर्व वाहनांच्या खरेदीवर तब्बल ७४ लाख १ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

जुनी वाहने अधिकाऱ्यांना
सध्या सात पदाधिकाऱ्यांकडे पालिकेच्याच जुन्या गाड्या आहेत. परंतु, या गाड्यांचा वीट आल्याने नव्या गाड्या खरेदी केल्या जात आहेत. नव्या गाड्या पदाधिकाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर जुन्या गाड्या मात्र अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांकडे असलेल्या गाड्यांचे काय करणार, हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे. वाहनखरेदीची लगीनघाई चर्चेचा विषय बनली आहे.

उपसभापतींनाही वाहने
घटनात्मकदृष्ट्या पालिकेतील विषय समित्यांच्या उपसभापतींना कोणतेही अधिकार नसतात. परंतु, अधिकार नसले तरी या उपसभापतींनाही वाहने पुरवण्याचा हट्ट सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाकडे धरला आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावच सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दार्जिलिंगमधील तणावाचा नाशिककरांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) सुरू केलेले आंदोलन आता चिघळत चालले असून, या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. या आंदोलनाचा फटका पर्यटकांना बसला असून, नाशिकमधील पर्यटक माघारी आले आहेत. या ठिकाणी विविध राज्यांतून आलेले किमान दहा हजारांवर यात्रेकरू अडकले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरातील एका पर्यटन व्यवसाय करणाऱ्या कंपनीने नाशिकहून पर्यटकांना नेले होते. मात्र, वातावरणातील अस्थिरतेमुळे अर्धे लोक परतले आहेत व अर्धे लोक परतीच्या मार्गावर आहेत. गंगटोकपासून सहल रद्द करावी लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिकमधील पर्यटक स्वप्ना लिमये म्हणाल्या, की मुलांना सुटी असल्याने आम्ही शहरातील एका प्रथितयश ट्रॅव्हल कंपनीतर्फे बुकिंग केले. ठरल्या वेळेनुसार प्रवास व्यवस्थित सुरू झाला. नाशिकहून कोलकाता- जलपैगुडी- गंगटोक- दार्जिलिंग असा प्रवासाचा मार्ग होता. मात्र, गंगटोक येथे पोहोचल्यानंतर पुढे दंगलीचे वातावरण असल्याचे समजले. त्यामुळे गंगटोकपासून दार्जिलिंगपर्यंत जाता आले नाही. या ठिकाणी ट्रॅव्हल कंपनीतर्फे छोट्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, दंगलीचे वातावरण असल्याने दार्जिलिंगवरून येणाऱ्या गाड्या गंगटोककडे आल्याच नाहीत. त्यामुळे सर्वच पर्यटकांना माघारी फिरावे लागले. या ठिकाणी निदर्शक आणि पोलिसांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली, तर अनेक ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये या आंदोलनाच्या प्रमुखाशी संबंधित संकुलांमधून शस्त्रे हस्तगत करण्यात आली. त्याचप्रमाणे ऐन सुटीच्या मोसमांत हिंसाचार उसळल्याने त्याची झळ पर्यटन उद्योगालाही सहन करावी लागत आहे. गुरुवारीही आंदोलकांची निमलष्करी दलासमवेत चकमक झडली आणि तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिसांनीही दगडफेकीनेच त्याला प्रत्युत्तर दिले. आमच्याबरोबरच्या काही पर्यटकांनी कलिम्पाँग येथे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका तासातच त्यांना माघारी यावे लागले. या आंदोलनाचे लोण पसरत असून, जलपैगुडीपर्यंत पोहोचले आहे. सुदैवाने आम्ही यातून बाहेर पडलो. मात्र, काही राज्यांचे प्रवासी आजही दार्जिलिंगमध्ये अडकले आहेत. अनेकांना जेवणाचे हाल आहेत. आम्हीसुद्धा हॉटेलमध्ये फक्त डाळभात खाऊन राहिलो. भारत सरकारने अडकलेल्या प्रवाशांसाठी कोलकत्याहून दिल्लीसाठी दोन विमानांची व्यवस्था केली होती. तरीही रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी आहे. लोक मिळेल त्या वाहनाने आपल्या सहली अर्धवट सोडून येत आहेत. सहलीचे पैसे वाया गेले, याचे दुःख नाही. जीव वाचला हे सर्वांत महत्त्वाचे आहे. आम्ही दिलेले पैसे तर परत मिळणार नाही, परंतु इतक्या लांब जाऊन केवळ दंगलीमुळे दार्जिलिंग पाहता आले नाही ही मोठी रुखरुख आहे.

नाशिकच्या ट्रॅव्हल कंपन्यांचे पर्यटक दार्जिलिंगमध्ये अडकले आहेत का, हे जाणून घेण्यासाठी ट्रॅव्हल असोसिएशनची नुकतीच बैठक झाली. ज्यांच्याकडून पर्यटक दार्जिलिंगला गेले होते, त्यातील काही पर्यटक परतीच्या मार्गावर आहेत, तर काही शहरात पोहोचले आहेत. शहरातील सर्व पर्यटक सुखरूप आहेत.

- दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर सफाई ठेक्यात मिलिभगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शहरातील ३७ प्रभागांपैकी २२ प्रभागांमध्ये साफसफाईचे ठेके दिले आहे. परंतु त्या प्रभागांमध्ये स्वच्छता होतांना दिसत नाही. तरीदेखील प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. सफाईच्या ठेक्यात प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची मिलीभगत आहे. त्यामुळेच प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जळगाव फर्स्टचे डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच जळगाव फर्स्टतर्फे १८ जूनरोजी स्वच्छता महाअभियान सर्वेक्षण ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

साफसफाई करण्यासाठी २२ प्रभागांमध्ये सफाईचे ठेके दिले असून, १५ प्रभागांमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करतात. दरमहा जवळपास दीड कोटी रुपये खर्च करुनही स्वच्छता होतांना दिसत नाही. ठेके दिलेल्या प्रभागांमध्येच स्वच्छतेच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यामुळे साफसफाईची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जळगाव फर्स्टतर्फे १८ जून रोजी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत शहर स्वच्छता महाअभियान सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सहा भाग करण्यात आले असून व्हॉटस् अॅपवर तक्रारी नोंदविता येणार असल्याची माहिती डॉ. राधेश्याम चौधरी यांनी दिली. तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘स्मार्ट जळगाव’ अॅप तयार केले आहे. यावर तक्रारी करुनही निराकरण होत नाही. त्यामुळे अॅप कुचकामी असल्याचेही चौधरी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरी जीवनशैलीच्या ओझ्याखालचे ‘बैल मेलाय’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे मटा सन्मान नामांकनप्राप्त, आविष्कार मुंबईनिर्मित ‘बैल मेलाय’ या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी सादर करण्यात आला.

किशोर व संजीवनी हे निमशहरी भागातले इंजिनीअर झालेले एक तरुण जोडपे आहे. किशोर मूळचा कोल्हापूरचा, पण पुण्यात शिकलेला, तर संजीवनी पंढरपूरची; सोलापुरात शिक्षण घेतलेली. दोघांच्याही घरात शिक्षित अशी ही पहिलीच पिढी. मुंबईत जावे, चांगली नोकरी मिळवावी, मॉडर्न जगावे अशी दोघांची मनीषा. त्यामुळे मुंबईत नोकरी आणि स्थायिक होतात. ग्रामीण भागातून थेट मुंबईसारख्या महानगरीत आल्याने त्यांच्यात आपण गावंढळ असल्याचा न्यूनगंड असतोच. तो घालवण्यासाठी ते मुंबईची सो कॉल्ड ‘मॉडर्न’ जीवनशैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. मॉडर्न होण्यासाठी मग बोलण्यात इंग्रजी शब्दांची पेरणी, सुटीच्या दिवशी मॉलमध्ये शॉपिंग, सिनेमा, हॉटेलिंग वगैरे गोष्टी करतात. उच्चभ्रू स्त्रिया दारू पितात. मॉडर्न व्हायचे तर दारू प्यावी, असे संजीवनीचे म्हणणे आहे. मात्र, किशोरला मात्र तिचे दारू पिणे मान्य नाही. संजीवनीने तिच्या बॉसबरोबर फ्लर्ट करणेही त्याला आवडत नाही. अशात एक भविष्यवेत्ता त्यांच्याकडे येतो. आधी ते त्याला आपला भविष्यावर विश्वास नाही म्हणून ते घालवून देतात; पण तो त्यांच्याशी गोड गोड बोलत त्यांच्या भविष्यासंबंधीची काही भाकिते वर्तवतो. त्याने त्यांची उत्सुकता चाळवते. बढती, पगारवाढ, आलिशान घर, हायफाय जीवनशैली, परदेशयोग, मुलेबाळे यासंबंधीची त्याची भाकिते ऐकून एकीकडे त्यांना बरेही वाटते आणि त्यातून त्यांच्यात भांडणेही लागतात. आपल्यापेक्षा संजीवनी वरचढ होणार म्हटल्यावर किशोरची पुरुषी वृत्ती डोके वर काढते. तो त्या भविष्यवेत्त्याला हाकलून देतो. तरीही तो पुन्हा पुन्हा येत राहतो. त्यांच्या आयुष्यात भविष्यात घडणाऱ्या घटना- घडामोडींबद्दल सांगत राहतो. भविष्यकथनाने ते कधी सुखावतात, तर कधी त्यांच्यात भांडणे होऊन ते परस्परांचा द्वेषही करतात. अशा आशयाची ही कथा होती.

नाटकाचे लेखन युगंधर देशपांडे यांचे, तर दिग्दर्शन ललित प्रभाकर यांचे आहे. नाटकात विकास पाटील, आरती वडगबाळकर व रोशन गुजर यांनी भूमिका साकारल्या. नाटकाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश बँकेची प्रथमच होणार निवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महेश को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापनेनंतर प्रथमच निवडणूक होत आहे. केवळ एका व्यक्तीच्या विरोधामुळे ही निवडणूक होत आहे. आतापर्यंत सर्व संचालक बिनविरोध निवडून जात असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक मानली जात आहे.

दहा जणांचे पॅनल विरुद्ध १ जण अशी ही लढत होत आहे. सत्तारूढ संचालकांमध्ये एकमत होऊ न शकल्यानेच ही निवडणूक लागली असल्याचे एकमेव विरोधी उमेदवार देवेंद्र भुतडा यांचे मत आहे. या संचालकांच्या हट्टामुळे बँकेचे २० ते २५ लाख रुपये विनाकारण निवडणुकीत खर्च होणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ठराविक सभासदांच्या फायद्यासाठी सामान्य सभासदांना जास्त टक्क्याने कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे सभासद असलेले तरुण उद्योजक नाइलाजाने इतर बँकांचा दरवाजा ठोठावत आहेत. आज बँकेला २० वर्षे पूर्ण झाली; परंतु बँकेला स्वत:चे एटीएम मशीन घेता आलेले नाही, तर नेट बँकिंग सुविधा कधी मिळणार? अशा अप्रगतशील संचालक मंडळाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी निवडणूक हाच पर्याय असल्याचे पत्रक भुतडा यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाहुबली महापालिका

$
0
0

...म्हणे एका दिवसात उचलला ४६ टन प्लास्टिक कचरा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात प्लास्टिक पिशव्यांमुळेच बुधवारी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाल्याचा जावईशोध सार्वजनिक बांधकाम विभागाने लावल्यानंतर त्यावर पांघरून घालण्यासाठी आरोग्य विभागाने थेट अकलेचे तारे तोडले आहेत. बांधकाम विभागाची भविष्यवाणी खोटी ठरू नये, यासाठी नाले व पाइप लाइनवरील चेंबर्सवरून तब्बल ४६ टन प्लास्टिक कचरा गोळा केल्याचा अजब दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र, या दाव्याला पुष्टी देणारा पुरावा मात्र आरोग्य विभागाला सादर करता न आल्याने कचरा गोळा केला, पण कुणी नाही पाहिला अशी स्थिती अनुभवयास आली आहे.

शहरात बुधवारी (१४ जून) झालेल्या दोन तास पावसाने अर्धे शहर जलमय झाले होते. या स्थितीला शहरातील प्लास्टिक कचरा आणि अतिपाऊस कारणीभूत असल्याचा जावईशोध महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी लावला होता. त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्यानंतर या दाव्याच्या पुष्टीसाठी बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाने नवी टूम सोडली. महापौर व आयुक्तांसमोर आपला दावा कमकुवत होऊ नये, यासाठी थेट प्लास्टिक कचऱ्याची आकडेवारीच फुगवण्यात आली. आरोग्य विभागाने एका दिवसात शहरातील नाले व पावसाळी गटार योजना आणि ड्रेनेज पाइपवर असलेल्या चेम्बर्सवरून तब्बल ४६.५० टन प्लास्टिक कचरा गोळा केल्याचा अजब दावा केला आहे. आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी त २५ कर्मचाऱ्यांनी एवढा प्लास्टिक कचरा गोळा केल्याची आवई उठवली आहे. संपूर्ण नाशिककरांच्या घरातून जरी प्लास्टिक पिशव्या जमा केल्यात तरी, एवढा कचरा गोळा होणार नाही. तरीही आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाने एका रात्रीत बाहुबली कामगिरी करीत महापालिकाच कशी नाशिकची तारणहार आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या दाव्याची पुष्टी करणारा पुरावा अधिकाऱ्यांकडे मागितल्यावर अधिकारीच निरुत्तर झाले. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले तर कुणी डोक्याला हात लावला. बांधकाम विभागाच्या मदतीसाठी धावलेल्या आरोग्य विभागाच्या या मिलीजुलीची चर्चा मात्र पालिकावर्तुळात रंगली आहे.

...तर एका एकरवर ढीग

एकाच दिवशी एवढा कचरा कसा गोळा केला असा उलट प्रश्न अधिकाऱ्यांना केल्यावर प्लास्टिक कचरा हा ओला असल्याने त्याचे वजन वाढल्याची नवी शक्कल त्यांनी लढवली. कचरा गोळा केल्याचे पुरावे मागितल्यावर कचरा खतप्रकल्पावर गेल्याचा दावा करण्यात आला. पालिकेतील अधिकाऱ्यांच्या मते ४६ टन प्लास्टिक कचरा एका ठिकाणी साठवला तर एक एकरवर ढीग तयार झाला असता. परंतु, असा कोणताही ढिग खत प्रकल्पावर जमा झालेला नाही. केवळ एकमेकांना वाचवविण्याचा हा प्रयोग प्रशासनाच्या अंगलट येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामरोजगार सेवक वर्षभरापासून मानधनाविना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रोजगार हमी योजनेत बेरोजगारांच्या रोजगारांची नोंदी ठेवणाऱ्या १०४५ ग्रामरोजगार सेवकांचे वर्षभराचे ६१ लाख ८३ हजार रुपये मानधन सरकारने न दिल्याने या सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दुपारी दोन वाजेपासून सुरू झालेले हे आंदोलन तब्बल तीन तास सुरू होते. आंदोलनाची तीव्रता बघताच निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मध्यस्थी करून नागपूर येथील रोजगार हमी योजनेच्या आयुक्तांची संपर्क साधला. त्यानंतर दोन दिवसांत मानधनाचे पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात सुरू झाले. उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण यांनी अगोदर आंदोलकांची समजूत घातली. मात्र, मानधन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आंदोलकांशी संवाद साधला. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, २५ जूनपर्यंत पैसे न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला.

गावपातळीवर रोजगार हमी योजनेतील रोजगारांची नोंदी ठेवण्यापासून त्यांचे मस्टर भरण्यापर्यंतचे काम हे सेवक मानधनावर करतात. त्यामुळे या सेवकांचे मानधन सरकारने वेळेवर देणे गरजेचे असताना त्यांना जुलै २०१६ पासून मानधन देणेच बंद केले. त्यामुळे या ग्रामरोजगार सेवकांचा संताप होता. त्यांनी याअगोदर अनेक निवेदने दिली. त्यानंतर त्यांनी रोहयोमंत्री यांची भेट घेतली; पण त्याची दखल न घेतल्यामुळे त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच आंदोलन करण्याचा निर्धार केला. आंदोलनात बाळासाहेब कदम, तुकाराम देशमुख, रमेश महाले, काशिनाथ गायकवाड, गुलाब चौधरी, दत्तात्रेय चव्हाण, अनिल बिचकुल, हट्टेसिंग धाडिवाल, विजय गायकवाड यांच्यासह ग्रामरोजगार सेवकांनी सहभाग घेतला.

कर्मचाऱ्याची कानउघडणी

रोजगार हमी योजनेत हे आंदोलन सुरू असताना उपजिल्हाधिकारी सुरेखा सोनवणे यांनी शिपायामार्फत संबंधित लिपिकाला माहिती घेऊन बोलावण्यास सांगितले. मात्र, लिपिकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला थारा न देता मग्रुरी दाखवत न जाणेच पसंत केल्यामुळे आंदोलकांचा पारा आणखीच वाढला. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याची चांगलीच कानउघडणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाही अकरावी, बारावी प्रवेश ऑफलाइनच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये इयत्ता ११ वी, १२ वीमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार होती. मात्र ऑनलाइन प्रक्रिया ही राज्यातील सहा जिल्ह्यांमध्येच सुरू आहे, त्यानुसार यंदाही जळगावसह जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइनच होणार असल्याचे शुक्रवारी झालेल्या बैठकीत नाशिक येथील सहाय्यक शिक्षण संचालक दिलीप गोविंद यांनी सांगितले.

शैक्षणिक सर्वच कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याने बऱ्याच शैक्षणिक संस्था ऑनलाइन सुरू होण्याची वाट पाहत होती. मात्र शुक्रवारी रोजी झालेल्या एम. जे. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियाबाबतच्या कार्यशाळेत ऑनलाइन प्रक्रियेत फक्त पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशी सहा शहरेच सध्या मोडत आहे. जळगावसह बाकी शहरामध्ये ऑफलाइन पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे सांगितले. बैठकीप्रसंगी व्यासपीठावर नाशिक येथील सहाय्यक शिक्षण संचालक दिलीप गोविंद, सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक ए. बी. बागुल, जि. प. उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर. एल. माळी, उपप्राचार्य पी. डी. भोळे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड उपस्थित होते.

प्रवेशासाठी मार्गदर्शन करावे

जळगाव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील याची व्यवस्था करण्यात यावी तसेच वाढीव प्रवेशासंदर्भात मंजुरी घेऊन जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन केंद्र उघडावे आणि तेथे प्रवेश संबंधी सर्व माहिती देण्यात यईल, तसेच प्रवेशाबाबत प्रत्येक फेरीनिहाय रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध करावे. क्षमतेपेक्षा जादा प्रवेश होतील तेथे प्राचार्यांनी किती विद्यार्थी जास्त आहेत याची यादी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून प्रवेशाची कार्यवाही करावी, विज्ञान शाखेसाठी ३५ टक्के गुण आवश्यक आहे. जातीच्या प्रमाणपत्रासाठी प्रवेश अर्ज नाकारू नयेत, अशा अनेक सूचना उपस्थित मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक यावेळी देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटचारीवर होणार पूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

मागील आठवड्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने शहरात दाणादाण उडविली. काही भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होवून नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी शुक्रवारी काही भागांची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. दरम्यान, अंबरझरी पाटचारीवर दोन छोटे पूल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करून जलसंपदा विभागाकडे सादर करण्याची तसेच सम्राट कॉलनी, एकनाथ नगरात गटारी बांधण्याची सूचना देखील आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली.

मनपा आयुक्तांनी मान्सूनपूर्व नालेसफाई करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी आणि प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार नालेसफाई झाल्याचा दावा करून अधिकाऱ्यांनी तसा अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता. परंतु मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शहरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नालेसफाईबाबत आणि स्वच्छतेबाबत साशंकता निर्माण झाली होती. दस्तुरखुद्द महापौर नितीन लढ्ढा आणि नगरसेवक कैलास सोनवणे यांनीही नालेसफाईबाबत आयुक्तांना पत्र देवून तक्रार केली होती. त्या अनुषंगाने शहरातील चारही प्रभांगामध्ये दोन दिवस अधिकाऱ्यांसह पाहणी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार कानळदा रोडवरील लक्ष्मीनगर, न्यू. बी. जे.मार्केट, सम्राट कॉलनी, रामेश्वर कॉलनी, एकनाथ नगरमधील अंबरझरा पाटचारी या भागात आयुक्त जीवन सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी प्रभारी शहर अभियंता सुनील भोळे, प्रभाग अधिकारी उदय पाटील, सुशील साळुंखे, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, अग्निशमन अधिकारी वसंत कोळी, अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक एच. एम. खान यांच्यासह त्या-त्या भागातील आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

भराव करण्याची सूचना

मुळसधार पावसामुळे लक्ष्मीनगरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. सकल भाग असल्यामुळे या भागात भराव करण्याची सूचना आयुक्तांनी केली.

इस्ट‌मिेट तयार करण्याचे आदेश

सम्राट कॉलनीत पाणी साचत असल्यामुळे गटारीचे तत्काळ इस्टीमेट तयार करण्याचे आदेश आयुक्त जीवन सोनवणे यांनी बांधकाम विभागाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गम भागापर्यंत साधणार क्रीडाविकास

$
0
0

नाशिक जिल्ह्यात असलेली क्रीडाविषयक सर्व पेंडिंग कामे तातडीने निकाली काढून नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या क्रीडांगणांचा नाशिक महापालिकेच्या सहकार्याने विकास केला जाईल. ज्या दुर्गम भागात खेळाडूंपर्यंत सरकारी सुविधा पोहोचत नाहीत, अशा ठिकाणी खेळाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी व्यक्त केला. क्रीडाविषयक संकल्पना त्यांनी ‘मटा’शी टॉकटाइमच्या माध्यमातून शेअर केल्या.

--

-शहराच्या दृष्टीने तुमच्या कोणत्या संकल्पना आहेत?

-माझा जन्म नाशिक जिल्ह्यातील पेठ येथेच झाला. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण नाशकातच झाले. गेली अनेक वर्षे कामानिमित्त बाहेरगावी होतो. ज्या शहराने मला खूप काही दिले, त्या शहरात जाऊन काही तरी ठोस करावे, अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती आता फलद्रूप झाली आहे. अनेक संकल्पना आहेत. माझी नाशिकची कारकीर्द नाशिककरांना निश्चित काहीतरी वेगळे देऊन जाईल, अशी ग्वाही देतो.

--

-कोणत्या कामापासून सुरुवात करणार?

-नाशिक जिल्हा हा खेळाडूंची खाण आहे. शहराप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक चांगले खेळाडू आहेत. त्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर आगामी ऑलिंपिकमध्ये नाशिक जिल्ह्यातील एक तरी खेळाडू चमकेल, अशी आशा आहे. त्यासाठी टॅलेंट सर्च कॅम्पचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक तालुका क्रीडा संकुले तयार झाली असून, कार्यान्वित होण्यास अडचणी आल्या आहेत. अशा क्रीडा संकुलांच्या अडचणी तातडीने सोडवून खेळाडूंना ती उपलब्ध करून दिली जातील. जी क्रीडा संकुले बंद आहेत, त्या क्रीडा संकुलांच्या समितीची बैठक आयोजित करून त्यांच्या अडचणी दूर केल्या जातील. त्र्यंबकेश्वर येथे अॅडव्हेंचर स्पोर्ट सेंटरच्या कामाची माहिती घेऊन त्यालगत असलेले क्रीडा संकुल तातडीने कसे कार्यान्वित होईल, याकडे लक्ष दिले जाईल.

--

-खेळाडूंना अर्थिक मदत मिळवून देण्याबाबत...

-आदिवासी भागातील अनेक खेळाडूंचा खेळ चांगला असतो. त्यांना खेळाबरोबरच सकस आहाराचीदेखील आवश्यकता असते. केवळ पैशाअभावी ते आहार घेऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे स्पर्धेला जाण्यासाठी पैसेदेखील नसतात. अशा खेळाडूंना थेट अार्थिक साहाय्य कसे मिळेल, यासाठी जिल्हा नियोजन विभागातर्फे मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे काही खासगी कंपन्यांशी बोलून त्यांच्या सीएसआर अॅक्टिव्हिटीमधून फंड देता येतील का, याविषयीदेखील चर्चा करणार आहोत. त्यामुळे अनेक खेळाडूंचे जीवनमान उंचावेल व नाशिक शहरातून कविता राऊतसारखे जास्तीत जास्त खेळाडू तयार होतील.

--

-बोगस क्रीडा संस्थांवर कारवाई करणार का?

-बोगस क्रीडा संस्था ही क्रीडा क्षेत्राला लागलेली कीड आहे. अनेक संस्थांनी विविध खेळांच्या एकापेक्षा अनेक संस्था उघडल्या आहेत. या संस्था धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर्ड केल्या जात असल्याने त्यावर आम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नाही. मात्र, अशा संस्थांच्या कारभाराला बळी पडू नये यासाठी लवकरच क्रीडाशिक्षक व पालक यांचाशी चर्चा करण्यात येणार आहे. कोणत्याही संस्थेत प्रवेश घेताना ती संस्था मान्यताप्राप्त आहे की नाही, याची पालकांनी खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. काही शंका असल्यास आमच्या कार्यालयाकडून माहिती करून घ्यावी. अनेक संस्था पालकांना आपला मुलगा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळेल, असे खोटे अाश्वासन देतात. पालकांनी झटपट यशाच्या मागे न लागता अधिकृत संस्थेतर्फेच आपला पाल्य खेळेल याची दक्षता घ्यावी.

--

-शहराच्या बाबतीत काही योजना?

-नक्कीच आहेत. जिल्ह्याचा क्रीडाविकास साधताना शहराकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. नाशिक शहरात महापालिकेने आरक्षित केलेले अनेक भूखंड पडून आहेत, त्यावर काही होत नाही. कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड झाले आहेत. अशा भूखंडांवर केंद्र सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमांतर्गत काम केले जाणार आहे. हे भूखंड स्थानिक नागरिकांच्या ताब्यात देऊन त्यांचा विकास केला जाणार आहे. याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन या उपक्रमाबाबत माहिती दिली जाणार आहे.

--

-शिवाजी स्टेडियमची दुरुस्ती होणार का?

-शिवाजी स्टेडियमचा काही भाग व्यावसायिकांनी खराब केला आहे. त्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. याबाबत व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे भिंतीवर तारेचे कुंपण टाकले जाणार आहे, ज्यामुळे ग्राउंडमध्ये कचरा होणार नाही.

--

-क्रीडा विभाग लोकाभिमुख होण्यासंदर्भात...

-राज्य सरकारच्या धोरणानुसार जास्तीत जास्त लोकांचा सहभाग क्रीडा विभागात कसा वाढेल, त्यात नागरिक सहभागी कसे होतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक निर्णय घेताना त्या खेळाच्या तज्ज्ञांना बरोबर घेऊन निर्णय घेतले जाणार आहेत. सध्या नवीन खेळ आले आहेत. ज्या खेळांना मान्यता आहे, अशाच खेळांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील. जुन्या संस्थांच्या प्रगतीसाठी विशेष लक्ष दिले जाईल.

शब्दांकन : फणिंद्र मंडलिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images