Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

फुल-फळझाडांकडे वळताहेत पावलं

0
0

पावसाळ्यात वृक्षरोपणासाठी वळली नर्सरीकडे पावले

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

निसर्गाचा सुंदर अविष्कार घडविणारा पावसाळा सुरू झाल्यामुळे नागरिकांची पावले नर्सरीकडे वळू लागली आहेत. विविध फुले आणि फळझाडांनी परसबाग सजविण्याकडे कल असला तरी औषधी वनस्पतींना सर्वात जास्त मागणी असल्याची माहिती औरंगाबाद रोडवरील ग्रीन अर्थ नर्सरीचे संचालक मुकेश छेडा यांनी ‘मटा’ला दिली.

पावसाळा सुरू झाल्यावर निसर्ग मोहिनी घालतो. व्यवसाय व संसाराच्या रहाटगाडग्यात प्रत्येकाला निसर्गात मुशाफिरी करण्याचा आनंद लुटता येत नाही. त्यामुळे घरीच उपलब्ध जागेत निसर्ग फुलविण्याची हौस भागवून घेतली जाते. त्यासाठी नाशिक रोड, सातपूर, औरंगाबाद रोड, म्हसरूळ, सिडको, नाशिकमधील नर्सरीकडे पावले वळत आहेत.

औषधी वनस्पतींना मागणी

विविध आजारांवर उपयुक्त औषधी झाडे घेण्याकडे कल वाढला आहे. सर्दी खोकल्यावरील मोह व अडुळसा, स्मरणशक्ती वाढवणारी ब्रम्ही, वजन कमी करणारी अश्वगंधा, मधुमेहावरील सप्तपर्णी, इन्सुलिन व रुई या झाडांना मागणी आहे. जखम व अस्लर बरी करणारी बकुळ, कर्करोगावर उपयुक्त सीताफळ व गुंज, दंतरोग, पोट व उष्णता विकारावरील कवठ, ताप व सूजेवर उपयुक्त निरगुडी, मलेरिया व कोंडा कमी करणारी शिकेकाई, रक्त शुद्ध करणारा कढिपत्ता आदी वनस्पती घेण्यावर भर आहे. शेतकरी बांधव बांधावर लावण्यासाठी पेरू, आंबा, चिकू, नारळ, साधा व सीडलेस लिंबू, नारळ, डाळिंब ही झाडे नर्सरीमधून घेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजपासून ‌किलबिलणार शाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन महिन्यांपासून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शांत असलेल्या शाळा आजपासून पुन्हा गजबजणार आहेत. प्राथमिक व माध्यमिक दोन्ही विभागांच्या सर्व शाळा आजपासून (१५ जून) सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना शाळा आनंददायी वाटावी यासाठी शाळा प्रवेशोत्सव, पुस्तक वाटप असे उपक्रम शाळांमध्ये राबविले जाणार आहेत. तब्बल दोन महिन्यांच्या सुटीनंतर शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही कमालीची उत्सुकता आहे.
एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा संपल्यानंतर शाळा बंद होत्या. केवळ कार्यालयीन कामकाजाशी निगडीत व्यक्तीच शाळेत असत. मात्र, शाळेत जीव येतो तो विद्यार्थ्यांमुळे. विद्यार्थ्यांशी निगडीत दंगामस्ती, अभ्यास, परीक्षा, खेळ, मैत्री, शिक्षा या सर्वांमुळे शाळा जिवंत वाटत असते. याच शाळा उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मात्र अगदी सुन्या वाटतात. सुट्टीची मजा संपवून आता विद्यार्थ्यांनाही शाळेची ओढ लागली आहे. नवे शैक्षणिक वर्ग, नवा वर्ग, नवा अभ्यासक्रम, नवे वर्गशिक्षक, वेळापत्रक अशा विविध बाबी जाणून घेण्यासाठी विद्यार्थीवर्ग उत्सुक आहे. अनेकांनी त्यासाठी मोठी तयारी केली आहे. शालेय साहित्याची खरेदी हा त्यातील मुख्य भाग. नवीन वर्षात शूज, स्टेशनरी, कंपास, टिफीन बॉक्स या सर्व वस्तूही नवीन असाव्यात, या भावनेने विद्यार्थ्यांनी त्या खरेदी केल्या आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांची खरेदी करणे बाकी होते त्यांनी बुधवारपर्यंत ही खरेदी पूर्ण केली.

प्रवेशोत्सवाने स्वागत

गेल्या दोन वर्षांपासून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाने करण्यात येते. शाळेचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्यात हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थी शाळेत येताच त्यांना प्रसन्न वाटावे यासाठी शाळा सजावटीवर भर देण्यात येत आहे. यासाठी शाळा परिसर स्वच्छ करणे, सडा टाकणे, रांगोळी, फुलापानांची तोरणे, पताका बांधून वर्ग खोल्या सुशोभित करणे अशी तयारी शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी करण्यात आली. तसेच आज, शाळेच्या पहिल्या दिवशी माध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांसाठी गोड पदार्थांचा समावेशही करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ध्या तासात जुने नाशिक जलमय!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात गंगेवरील आठवडे बाजाराचे मोठे नुकसान झाले. अर्ध्या तासातच अनेक विक्रेत्यांचा भाजीपाला वाहून गेला, तर पावसापासून बचावासाठी थांबलेल्या ग्राहकांची प्रचंड कोंडी झाली. वीर सावरकर पथ, मधली होळी, बडी दर्गा, मोदकेश्वर मंदिर, भद्रकालीकडे जाणारे सर्वच रस्ते प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे जलमय झाल्याचे चित्र होते. या सर्वच रस्त्यांवर कंबरेएवढे पाणी साचल्याने ग्राहकांना घराकडे परतणेही शक्य झाले नाही. अवघ्या अर्ध्या तासात जुने नाशिक पाण्याखाली गेल्याची स्थिती पाहायला मिळाली.

शहरात बुधवारी तब्बल दीड तास मुसळधार पाऊस झाला. पूर्वीच्या काळी नऊ टेकड्यांवर वसलेल्या जुन्या नाशिकची दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने कोंडी केली. आज बुधवारचा आठवडे बाजार असल्याने नेहमीपेक्षा या परिसरात प्रचंड गर्दी होती. शंकराचार्य अधोक्षानंद यांचेही रामकुंडावर आगमन झाल्याने गर्दी आणखी वाढली. दुपारी साडेचारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ग्राहकांसह विक्रेत्यांची प्रचंड धावपळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी पावसापासून बचावासाठी उभारलेल्या मांडवाखाली ग्राहकांनी आसरा घेतला. काही वेळात पाऊस थांबेल या आशेवर थांबलेल्या विक्रेत्यांचे अंदाज फोल ठरवत पावसाने तब्बल दीड तास हजेरी लावली. त्यामुळे रामकुंडावर चारही बाजूने येणाऱ्या पाण्याचे लोंढे वाढत गेले. काही वेळातच गुडघाभर पाणी साचले. पाण्याचा वेगही प्रचंड असल्याने भाजीपाला पाण्याने भिजला. अनेकांचा भाजीपाला वाहून गेला. लहान विक्रेत्यांना भाजीपाला आवरता घेता आला, पण मोठ्या विक्रेत्यांना ते शक्य झाले नाही.

ग्राहकांची कोंडी

गंगेवरील आठवडे बाजारात वाढत्या पाण्याच्या भीतीने ग्राहकांनी भरपावसातच घराकडे परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, अर्ध्या तासात पावसाने सर्वच मार्ग बंद केल्याचे चित्र होते. वीर सावरकर मार्गाने मेनरोड, महात्मा गांधी रस्त्याकडे जाण्याचा मार्ग जलमय झाला होता. वीर सावरकर पथावर कंबरेच्या वर पाणी साचले होते. मात्र, पाण्याची सर्वाधिक पातळी दहीपुलावर पाहायला मिळाली. तेथील वाहतूक काही वेळाकरिता थांबली होती. अनेकांनी उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांचे फक्त आरसे दिसत होते. वीर सावरकर पथावरील ही स्थिती पाहिल्यानंतर अनेकांनी बडी दर्गा, मोदकेश्वर मंदिर, भद्रकाली, मधल्या होळीमार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेही पाण्याचे प्रचंड लोंढे वाहत असल्याचे चित्र होते. परिसरातील काही तरुणांनी खबरदारी म्हणून दुचाकी वाहने आडवी लावून मार्ग बंद केला होता. मात्र, ही आडवी लावलेली वाहनेही काही वेळाने पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजीपाला खरेदीसाठी दुचाकीने आलेल्या महिलांची मोठी तारांबळ उडाली. बाहेर पडताच न आल्याने अनेक महिलांमध्ये भीतीने ग्रासले होते. आसराची वेस, डांगर उतार (डिंगर आळी), मेन रोडचा उतार, दहीपूल, नेहरू चौक, सराफ बाजाराबरोबरच मालेगाव स्टँड, कपालेश्वराजवळचा भाग, सरदार चौकाचा भाग येथे प्रचंड पाणी साचले होते.

आपत्ती व्यवस्थापन कागदावरच

महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा मार्ग, तसेच भुयारी मार्गांचे काम हाती घेतल्याचे भासवले होते. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात जुन्या नाशिक परिसरात गंभीर स्थिती उद््भवत आली आहे. यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याची खंत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. या परिसरातील नैसर्गिक नाले बुजल्याने पाण्याची वितरण व्यवस्थाच खुंटली असून, महापालिकेने यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन निव्वळ कागदावरच असते. प्रत्यक्षात या विभागाचा शहराला काहीही उपयोग होत नसल्याचा संताप नागरिकांनी केला.


गोदावरी नदीला शेकडो नाले, झरे, ओहोळ येऊन मिळतात. काळाच्या ओघात ते गडप झाले आहेत. परिसरातील बहुतांश नैसर्गिक नाले बुजले आहेत. पाण्याचा मार्ग बंद झाल्याने येथे कंबरेएवढे पाणी साचणे नवीन नाही. मात्र हे संकट आणखी गडद होत जाणार आहे.

- प्रशांत परदेशी, रहिवासी, जुने नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकर्स झोनला अखेर मुहूर्त!

0
0

पंधरा दिवसांत प्रत्येक विभागात दोन झोन होणार कार्यरत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बहुप्रतीक्षित अशा हॉकर्स झोनची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत मंगळवारी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन येत्या पंधरा दिवसांत त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक विभागात दोन-दोन झोन तयार करण्याचे आदेश त्यांनी दिल्याने अखेरीस हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीला मुहूर्त मिळाला आहे. या अंमलबजावणीमुळे जवळपास साडेनऊ हजार हॉकर्सधारकांना हक्काची जागा मिळणार आहे. दरम्यान, नाशिकरोडचे अतिक्रमण हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने शहरात हॉकर्स झोनची अंमलबजावणी सुरू केली आहे. यापूर्वीच हॉकर्स व नो हॉकर्स झोनची निश्चिती करण्यात आली असून शहरात हॉकर्स झोन अंतर्गत जवळपास ९ हजार ५०० हॉकर्स धारकांची नोंद झाली आहे. हॉकर्स झोन आराखडा तयार झाला असला तरी त्याची अंमलबजावणी रखडली होती. परंतु, मंगळवारी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी विभागीय अधिकाऱ्यांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याचा आढावा घेतला.

तसेच येत्या पंधरा दिवसांत या हॉकर्स झोनची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. सहा विभागांत पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दोन हॉकर्स झोन उभे करण्याचे आदेश त्यांनी दिले. या सर्वांची यापूर्वीच ऑनलाइन नोंदणी झाली असल्याने त्यांना जागावाटप केले जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर बसणारे हॉकर्स हक्काच्या जागी बसणार असल्याने रस्तेही मोकळे श्वास घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टनेसची पोलखोल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीकडे झेपावणाऱ्या नाशिक शहराची मुसळधार पावसाने बुधवारी अवघ्या दोन तासात वाताहत केली. दोन तास धो-धो कोसळणाऱ्या पावसाने महापालिकेच्या पावसाळी गटार योजनेचाही बोजवारा उडवला. जुने नाशिक, पंचवटीचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला. विशेष म्हणजे पावसाळापूर्व कामे केल्याचा पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दाव्याचीही पोलखोल झाली आहे.

सराफ बाजारात तर पुराची स्थिती निर्माण होऊन दुकाने आणि घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील सखल भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने वाहतुकीचाही बोजवारा उडाला. दरम्यान, महावितरण कंपनीच्या कामाचीही पोलखोल झाली असून, ऐन पावसात सिग्नल यंत्रणाही कोलमडल्याने जवळपास दोन तास शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती.

शहरात दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. धो धो बसरणाऱ्या पावसाने अर्धा तासातच रौद्र रुप धारण केले. त्यामुळे नागरिकांची तांराबळ उडाली. महापालिकेने पावसाळापूर्व कामे केवळ कागदावर केल्याने आणि पावसाळी गटार योजनाही भ्रष्टाचारात अडकल्याने त्याचा फटका नाशिककरांना बुधवारी सहन करावा लागला. दोन तास चाललेल्या पावसामुळे अर्धे शहर जलमय झाले. जुने नाशिक आणि पंचवटीतल्या गल्ल्यांमध्ये अक्षरशः महापुरासारखी स्थिती निर्माण झाली. सराफ बाजारात दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी घुसल्याने पालिकेच्या कामकाजाचे वाभाडे निघाले आहेत. शहरात अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडल्याने वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. तर वीज गायब झाल्याने आणि सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने द्वारका, नाशिकरोड, त्र्यंबकरोड, सीबीएस, शाल‌िमार येथे वाहतुकीची कोंडी झाली. जवळपास दीड ते दोन तास वाहतूक यंत्रणा ठप्प झाले होते. कॉलेजरोड, गंगापूररोड, अशोक स्तंभ, घारपुरे घाटासह ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. शहरातील मैदानांवरही पाणी साचले.

दीडशे कर्मचारी कामाला

शहर जलमय झाल्यानंतर नागरिकांच्या रोषाचा अंदाज आल्यानंतर पालिकेची यंत्रणा खडबडून जागे झाली. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून रात्रभर शहरात युद्धपातळीवर मोहीम राबवली जाणार आहे. नाले सफाईसह तुंबलेल्या भागातून पाणी काढण्यासाठी टँकरही लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचा आरोप

शहरात पावसाळापूर्व कामे केल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता. परंतु, अशा प्रकारची कामे झालीच नसून केवळ कागदावर ब‌िले काढल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला होता. पंधरा दिवसांपूर्वीच हे निवेदन आयुक्तांना देण्यात आले होते. परंतु, त्याची दखल घेतली गेली नसल्यानेच ही स्थिती ओढावल्याचा आरोप रंजन ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि अधिकारी केवळ कागदावर शहराची कामे रंगवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जेलरोड पुन्हा अंधारात

नाशिकरोड ः नाशिकरोडला बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कॅनॉल रोडजवळील वीजेच्या डीपीचा कंडक्टर तुटल्याने वीजपुरवठा तीन तास खंड‌ित झाला. गेल्या तीन दिवसांपासून जेलरोडला व‌िजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक आणि व्यावसायिक वैतागले आहेत. दरम्यान, जेलरोडच्या काही भागात सायंकाळी पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळेही नागरिकांची गैरसोय झाली. सायंकाळी साडेआठच्या सुमारास तो पूर्ववत झाला. जोरदार पावसामुळे नाशिकरोडच्या देवीचौकातील सराफ बाजारात पाणी साचले. व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले.

ढाप्यांचे पाणी रस्त्यावर

पंचवटी ः बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने चांगलीच फजिती उडविली. जोरदार पावसाने पंचवटी परिसरातील अनेक भागातील भुयारी गटारींचे ढापे पाण्याने उघडले गेले व त्यातून पाणी बाहेर पडून ते रस्त्याने वाहू लागले. रस्त्यांमध्ये चौकात पाणी साचल्याने वाहनांना अडथळा निर्माण झाला. वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

सराफ बाजाराजवळील सरस्वती नाल्यात क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्याने सराफ बाजार, फुल बाजारात पाणी शिरले. अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेकांची धांदल उडाली. पाण्यात अनेक वाहने बुडाली. रामकुंड येथील अरुणा नदीचा प्रवाह खंडित झालेल्या भागात इंद्रकुंडाकडून येणारा प्रवाहाचा जोर वाढल्याने तेथील ढाप्यातून पाणी रामकुंडाच्या दिशेने जोराने वाहू लागले. त्यामुळे रामकुंड पार्किंगमधील वाहने अडकून पडली. जुना आडगाव नाका, नांदूर नाका या परिसरात पाण्याचे तळे साचल्याने बराच वेळ वाहने अडकून पडली होती.

रामसेतू पूलाजवळ सरस्वती नाल्याचे जोराने वाहून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तेथील टपऱ्या मूळ जागेवरून पुढे ढकलल्या गेल्या. दुचाकीस्वारांना या पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढणे कठीण झाले. फुलेनगर परिसरातील झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने येथील रहिवाशांचे हाल झाले. पावसानंतर विद्युत पुरवठा खंड‌ित झाल्याने त्यात आणखी भर पडली.

सिडकोत मुसळधार

सिडकोः बुधवारी सायंकाळी अचानक सिडको व इंदिरानगर परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिक सुखावले आहेत. मात्र, सिडकोसह इंदिरानगर भागातील रस्ते या पहिल्याच पावसात जलमय झाल्याचे दिसत होते. या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर नेहमीप्रमाणे पावसाचे आगमन होताच विद्युत पुरवठा खंड‌ित झाला होता.

यंदा उन्हाच्या तडाख्याने नागरिक चांगलेच हैराण झाले होते. पावसाची आतुरतेने नागरिक वाट पाहत होते. परंतु जून महिना अर्धा संपूनही पावसाचे समाधानकारक पाऊस झाला नव्हता. बुधवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून सिडकोवासियांना सुखद धक्‍का दिला. या पावसामुळे सिडको व इंदिरानगरमधील रस्ते जलमय झाले होते. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने रस्त्यातून वाट काढणेसुद्धा अवघड झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने किंवा रस्त्यात खड्डे असल्याने या रस्त्यातून वाट काढणे नागरिकांना अवघड झाले होते.


नैसर्गिक नालेच झाले गायब

सातपूर ः बुधवारी झालेल्या पावसाने सर्वांनचीच दाणादाण उडविली. रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यातून वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. सातपूर भागात असलेले अनेक ठिकाणचे नैसर्गिक नालेच गायब झाल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यांवर येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. एबीबी सर्कलवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर त्र्यंबकेश्वर रोडवर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने रस्त्यांवर तळे साचले होते. महापालिकेच्या बांधकाम व ड्रेनेज विभागाच्या वतीने रस्त्यांवर साचलेले पाणी वाहते करण्यात आले. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी योग्य सोयच करण्यात आली नसल्याने पाणी रस्त्यांवरूनच वाहत होते. मुसळधार झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरले होते. त्यातच नैर्संगिक नाले अनेक ठिकाणी बुजविण्यात आल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी अभ्यास समितीची मात्रा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याकरिता शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा. शहर स्वच्छतेच्या दिशेन एक पाऊल टाकत लवकरच लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या समन्वयातून स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर स्वच्छता अभ्यास समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली.

येथील पालिका सभागृहात आयुक्त धायगुडे यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. प्रभाग क्र ९च्या नगरसेविका अॅड. ज्योती दीपक भोसले यांच्या समवेत प्रभागातील प्रा. मनोरमा कांबळे, रंजना थोरात, रुबीना शेख, शबीना शेख, शिल्पा देशमुख, मोनाली पाटील, सपना राठी, सोनीया अग्रवाल, पाठक सर आदी उपस्थित होते.

या अभ्यास समिती अंतर्गत संपूर्ण शहरातील घनकचरा निर्मुलनावर प्रक्रिया, सांडपाणी प्रक्रिया, हगणदारी मुक्त शहर अशा प्रकारे नियोजन करणे, घनकचऱ्यावर आराखडा बनविण्यास सूचना करणे व नागरिकांचे प्रबोधन करणे याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. त्या अनुषंगाने ज्या नागरिकांना व सामाजिक संस्‍थांना या समितीत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपले नाव उपायुक्‍त (कर) यांच्याकडे द्यावे, असे आवाहन आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले.

प्रभाग ९ ची निवड

शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभ्यास समिती स्थापन करण्यात येणार असून प्रभाग क्र ९ ची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे. या बैठकीत या प्रभागासाठीची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रभागातील स्वच्छता, हगणदारी मुक्त प्रभाग करणे, कचऱ्याचे वर्गीकरण व प्रक्रिया करणे इत्यादी कामे करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ टक्के लोकांच्या मुखात कर्करोगसदृश व्रण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात ज्या १० हजार जणांची दंतचिकित्सा तपासणी केली गेली, त्याबाबतचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, तो अत्यंत धक्कादायक आहे. तपासणी केलेल्यांपैकी ५० टक्के लोकांमध्ये अत्यंत धोकादायक असे मौखिक व्रण आढळले असून, कर्करोग जडण्याची शक्यता असलेले व्रण तब्बल १८ टक्के लोकांमध्ये आढळले आहेत.

राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ यांच्या सहकार्यातून कुंभमेळा दक्षता प्रकल्पांतर्गत ही तपासणी करण्यात आली. इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) या देशातील मौखिक आरोग्याच्या क्षेत्रात महत्वपूर्ण काम करणाऱ्या संस्थेने नाशिक येथील एमजीव्ही डेंटल कॉलेजच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. दंतचिकित्सा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि दंतचिकित्सा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात सक्रीय सहभाग घेतला.

भाविक आणि साधू अशा सर्वांच्याच चाचण्या करण्यात आल्या. त्यातील साधारण ८० टक्के लोकांमध्ये तंबाखू, चरस किंवा गांजा सेवनासारख्या वाईट सवयी आढळून आल्या. त्यातील कित्येकांमध्ये दातांचे रोग आढळले असून, दातांची दुर्गंधी आणि कीड यांचे प्रमाण खूप मोठे असल्याची माहिती आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी दिली. त्याशिवाय हिरड्यांमधून रक्त येणे, कॅल्क्यूलस आणि पिरिओडोंटल पॉकेटस निर्माण होण्यासारखे प्रकारही आढळून आले आहेत. कित्येक मुलांना दातांच्या दुर्गधींनी ग्रासल्याचे तर काहींच्या दातांचे आकार ओबड-धोबड झाल्याचे लक्षात आले. तब्बल ५० टक्के लोकांच्या मौखिक आरोग्यात दोष असल्याचे दिसून आले. त्यांना वेळीच उपचार घेण्याचा सल्लाही देण्यात आला.

तोंडातील पोकळी आणि कीड यांच्यातील लाल आणि सफेद जखमा ज्या रुग्णामध्ये आढळल्या त्यांच्यावर या समुपदेशनात विशेष भर देण्यात आला. त्यांना तत्काळ तंबाखू आणि सुपारी सोडण्याचा सल्ला देण्यात आला. अनेक रुग्णांच्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक खाद्यपदार्थांचाही अभाव होता. या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रोगांची लागण होण्याची शक्यता होती. त्यांना आरोग्यपूर्ण आहार घेण्याचा तसेच प्रक्रियायुक्त व गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला देण्यात आला.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात मौखिक आरोग्याच्या बाबतीतील जागरुकता ही अगदी १० टक्के एवढी आहे. ज्या रुग्णांची तपासणी केली गेली, त्यातील तब्बल ७० टक्के रुग्णांच्या तोंडात व्रण आढळले आहेत. त्यात लायकन प्ल‌िनस आणि कॅण्डिडायस‌िस म्हणजे धोकादायक चट्टे आणि पुरळ यांचे प्रमाण मोठे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांकडून ‘हजेरी’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुख्यालयात थांबण्याचे आदेश काढल्यानंतर आयुक्तांनी आता बायोमेट्र‌कि हजेरीकडे मोर्चा वळवला आहे. पालिकेत बसविलेल्या बायोमेट्र‌कि हजेरीची तपासणीच होत नसल्याचे समोर आल्याने आता विभाग प्रमुखांना दरमहा बायोमेट्र‌कि हजेरीची तपासणी करण्याचे आदेश आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहेत. तसेच फिल्डवर असलेले सफाई कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर व अधिकाऱ्यांसाठी आता आधारबेस हजेरी सुरू केली जाणार आहे. यासाठी एका कन्सलटंट कंपनीची नियुक्ती केली असून, चार महिन्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला आळा बसणार आहे.

महापालिकेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्यासाठी बायोमेट्र‌कि हजेरीची सिस्ट‌मि लावण्यात आली आहे. परंतु या बायोमेट्र‌कि हजेरीची तपासणीच होत नसल्याचे आयुक्तांच्या पाहणीत समोर आले आहे. तसेच महापालिकेत कार्यरत कर्मचारी व अधिकारी हे दुपारच्या वेळेस जेवनासाठी घरी जात जातात आणि उशिरा येतात. त्यामुळे आयुक्तांनी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत कार्यालयात हजेरी सक्तीची केली आहे. सोबतच आता बायोमेट्र‌कि हजेरीची नियमीत तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या तपासणी अनियमीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. सोबतच दरमहा बायोमेट्र‌किची तपासणी करण्याचे फर्मानही त्यांनी काढले आहे.

पालिका व विभागीय कार्यालयांसोबतच फिल्डवर मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी काम करतात. सफाई कर्मचारी, डॉक्टर, शिक्षक यांच्यासाठी आधारबेस हजेरी सुरू केली जाणार आहे. त्यात त्यांचे लोकेशन नियम‌तिपणे समजणार आहे. त्यासाठी एका कन्सल्टंट कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यात या आधारबेस हजेरीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे. या हजेरीमुळे कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा समोर येणार आहे.

सफाई कर्मचाऱ्यांनाही होणार सक्ती

महापालिकेत व विभागीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी सक्तीची केली असली तरी सफाई कर्मचारी मात्र बायोमेट्र‌कि हजेरीसह सेल्फी अटेंडन्सला विरोध करीत आहे. परंतु आयुक्तांनी आता या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनाही आधारबेस ऑनलाइन हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेमके किती सफाई कर्मचारी काम करतात याचा आकडा समोर येणार आहे. शेडवरच कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे.

कितपत यश?

महापालिकेतील कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी याआधीही अनेक उपाय करण्यात आले आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांनी दबावतंत्राचा वापर करून हजेरीला विरोध केला आहे. या आधी शहरातील सर्वच सफाई कर्मचारींसह, फिल्डवरील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन हजेरीची सक्ती केली होती. मात्र अवघ्या काही दिवसांतच त्या नियमांना केराची टोपला दाखविण्यात आली होती. त्यामुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी कितपत होते याकडे लक्ष लागले आहे.

खरे कर्मचारी कळणार!

शहरात अनेक सफाई कर्मचारी वेळेवर त्यांच्या कामाच्या ठिकाणी नसतात. कधीकधी त्यांच्या जागेवर वेगळाच व्यक्ती काम करत असतो, असे अनेक प्रकार याआधी अघडकीस आले आहेत. या बायोमेट्रिक हजेरीमुळे खरा कर्मचारी कोण आणि तो कुठे काम करतोय हे समोर येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोंदणी विलंबाचा गुन्हेगारांना फायदा!

0
0

दिलीप सांगळे, मटा सिटिझन रिपोर्टर

सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून होणारी नवीन वाहनांची नोंदणी ही अतिशय विलंबाने होत असल्याने नवीन वाहनांना रजिस्ट्रेशन नंबर उशिरा मिळतो. तोपर्यंत ती वाहने विक्रेत्याने दिलेले पिवळे स्टिकर लावून सर्रास वापरली जातात.

अशा नवीन गाडीला रजिस्ट्रेशन नंबर नसल्याने त्या वाहनांचा वापर गैरकामांसाठी होतो. त्यात चेन, मंगळसूत्र पळविणाऱ्या गुन्हेगारांकडून या वाहनांचा वापर करण्यात येतो. मध्यंतरी शहरात अशी विना नंबरची गाडी १००० रुपये तासाने भाड्याने घेऊन चेन स्नॅचिंग केल्याची घटना झाल्याचे वृत्तपत्रात वाचले होते. मी स्वत: गेल्या महिन्यात नवीन दुचाकी घेतली.

परंतु, मला वाहन घ्यायला महिना उलटला अद्याप त्या नवीन वाहनाला नोंदणी विभागाकडून रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला नाही. तेव्हा परिवहन कार्यालयाने या समस्येबाबत तातडीने सुधारणा करणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून शहरातील गुन्हेगार वृत्तीचे समाजकंटक या वाहन नोंदणी विलंबाचा गैरफायदा

घेणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज अपघात टाळण्यासाठी दक्षता घ्या

0
0

महावितरण मुख्य अभियंता कुमठेकरांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, नाशिक रोड

पावसाळ्यात विजेमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढते. नागरिकांनी दक्षता घ्यावी, वीज सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

पावसाळ्यात वीज तारा तुटणे, खांब वाकणे किंवा पडणे, डीपी स्ट्रक्चर वाकणे किंवा पडणे, वीज तारांवर झाड पडणे असे प्रकार होतात. तुटलेल्या विजेच्या तारा, वीज खांब, स्टे वायर, वितरण रोहित्र आदींसह वीजपुरवठा यंत्रणेतील कोणत्याही उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते. नागरिकांनी अशा तारांना स्पर्श करणे टाळावे व संबंधित लाइनमन अथवा महावितरणच्या नजिकच्या कार्यालयास कळवावे, असेही कुमठेकर यांनी सांगितले.

वादळी पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेतात. तो खंडित झाल्यास नागरिकांनी महत्त्वाच्या कारणाशिवाय तत्काळ संबंधित उपकेंद्रास संपर्क करणे टाळावे. या वेळेत उपकेंद्रचालक संबंधित लाइनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतो. पावसाळ्यात झालेल्या नुकसानानंतर त्यांच्यात दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत पुरवठा चालू किंवा बंद करण्यासंदर्भात सूचनांचे आदानप्रदान सुरू असते. एखादा ग्राहक उपकेंद्रचालकास घटना किंवा धोक्याबाबत सूचना देण्याचा प्रयत्न करीत असतो.

अपघाताची कारणे

घरातील पाण्याच्या अर्थिंगविरहित वीज मोटारीला स्पर्श, कपडे वाळत घालण्यासाठी वीज खांब अथवा वीज प्रवाहित होईल, अशा ठिकाणी बांधलेली विद्युत संवाहक तार (कापडी वा विद्युत रोधक दोरी वापरावी), घरातील लोखंडी खिडकी, दरवाजा, ग्रिल, फ्रिज, कुलर, मिक्सर इस्त्री, गिझर आदी विद्युत उपकरणे, शेतात ओल्या हाताने मोटार चालू करताना, तुटलेल्या वीज तारेच्या स्पर्शाने, मोटारीसाठी वापरलेल्या आवरणरहीत वायरचा स्पर्श, वाहनाच्या टपावर, मालवाहू ट्रक किंवा ट्रॅक्टरवर बसल्याने विद्युततारांना स्पर्श ही अपघाताची प्रमुख कारणे असून याबाबत काळजी घेणेही आवश्यक आहे.

वीज तारांखाली थांबू नये

जनावरे, गुरे-ढोरे विजेच्या खांबास तसेच विजेच्या खांबाजवळ अथवा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. शेतीपंपाला वीजपुरवठा करणारी व अर्थिंगची वायर ही अखंड असावी. पाऊस चालू असताना विजेचा पंप चालू अथवा बंद करणे टाळावे. पाऊस चालू असताना रोहित्र, खांबाजवळ किंवा वीज तारांखाली थांबू नये, असेही आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदावर पेग घटले; पोटात मात्र रिचले!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सुप्रीम कोर्टाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री सुरू करण्यास बंदी घातल्यानंतर जिल्ह्यात देशी, विदेशी दारू, बिअर व वाइन विक्रीत घट झाली आहे. या बंदीनंतर दोन महिन्याचे आकडे समोर आले असून, त्यात देशी दारुत १५ टक्के, विदेशी दारुत २३ टक्के, बिअरमध्ये ३३ तर वाइनमध्ये अवघा एक टक्का घट झाली आहे. विशेष म्हणजे एकीकडे लायसन्स असलेल्या दुकानातून ही घट असली तरी अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जूनमध्ये तब्बल ७७ गुन्हे दाखल करुन ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यातील १११६ पैकी तब्बल ७६३ मद्यविक्री दुकाने बंद झाल्यामुळे ३५३ दुकानाच्या विक्रीत एप्रिल व मेमध्ये ही घट झाली आहे. वाइन विक्रीत एप्रिलमध्ये वाढ झाली होती. पण दोन्ही महिन्यांच्या आकडेवारीनंतर फक्त एक टक्का घट झाली आहे. राज्यात सरकारचा वर्षाला किमान १० हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे बोलले जात असून, जिल्ह्यातही त्यात घट झाली आहे. दारू दुकाने सुरू व्हावीत यासाठी सरकारने अनेक नियम शिथील केले आहेत. त्याचप्रमाणे नाशिक शहरातही अनेक दुकाने सुरू करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे पुढील काळात या विक्रीत वाढ होणार आहे.

बिअर व वाइनला फटका

देशी, विदेशी दारुबरोबरच मे महिन्यात बिअरच्या विक्रीतही २७ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी १५ लाख ५७ हजार ५०२ लिटर बिअर विकली गेली ती यावर्षातील या महिन्यात ११ लाख ४० हजार ८१२ लिटर विकली गेली. त्यात ४ लाख १६ हजार ६८० लिटरने घट झाली आहे. एप्रिलमध्ये वाइन विक्रीत वाढ झाली होती. पण मे महिन्यात १३ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी ४१ हजार ६०५ लिटर विक्री झाली होती. पण यावर्षात ३६ हजार १६४ लिटर विक्री झाली आहे.

एप्रिलमध्ये वाइनविक्रीत वाढ

जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये १६ लाख ६६ हजार ७९८ लिटर देशी दारुची विक्री झाली होती. या वर्षात एप्रिलमध्ये १३ लाख ८० हजार ८१२ लिटर झाली आहे. विदेशी दारू गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ७ लाख ४२ हजार ७० लिटर विकली गेली होती. या वर्षी एप्रिलमध्ये ती ५ लाख १५ हजार ९९९ लिटर विकली गेली आहे. गेल्या एप्रिलमध्ये १४ लाख ६४ हजार १६५ लिटर बिअर विकली गेली. तिची विक्री यंदाच्या एप्रिलमध्ये ८ लाख ९६ हजार ८३८ लिटर इतकी झाली. तसेच वाइनची गेल्या वर्षी ४२ हजार ६८ लिटरची विक्री झाली होती. ती यावर्षी ४७ हजार ३०६ लिटर झाली आहे.

मेमध्ये देशी, विदेशी विक्रीत घट

जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात मेमध्ये १६ लाख ४९ हजार ९७३ लिटर देशी दारुची विक्री झाली होती. आता तीच या वर्षात मेमध्ये १४ लाख ५१ हजार १४७ लिटर झाली आहे. यात १२ टक्के घट झाली असून, त्याचा आकडा १ लाख ९८ हजार ८२६ लिटर आहे. विदेशी दारू गेल्या वर्षी मे महिन्यात ७ लाख ५१ हजार ५४९ लिटर विकली गेली या वर्षात हाच आकडा ६ लाख २८ हजार ६२६ लिटर होता. त्यात १६.३६ टक्के घट झाली असून मे महिन्यात १ लाख २२ हजार ९२३ लिटरने त्यात घट झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा काँग्रेसला ‘हात’

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी पार पडली. महापौरपदी काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके यांची निवड झाली आहे. सत्तास्थापनेसाठी काँग्रेस व शिवसेनेने युती केल्याने भिवंडी पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे.

बुधवारी महापालिका सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेना व काँग्रेस एकत्र आल्याने तसेच एमआयएमने तटस्थ राहण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेसला सत्तास्थापनेत यश आले आहे. प्रारंभी महापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. महापौर पदासाठी काँग्रेसचे रशीद शेख, ताहेरा शेख तर राष्ट्रवादीचे नबी अहमद, जनता दलाचे बुलंद इकबाल हे रिंगणात होते. ताहेर शेख व बुलंद इकबाल यांनी माघार घेतली. मात्र काँग्रेसचे रशीद शेख व राष्ट्रवादीचे नबी अहमद यांचा अर्ज कायम राहिल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात रशीद शेख याना ४१ मते तर नबी अहमद यांना ३४ मते मिळाल्याने शेख यांचा सात मतांनी विजय झाल्याने ते महापौरपदी विराजमान झाले. यानंतर उपमहापौर पदासाठीची निवड पार पडली. उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे सखाराम घोडके, भाजपचे सुनील गायकवाड, मालेगाव महागठबंधन आघाडीचे अन्सारी मन्सूर शब्बीर अहमद हे रिंगणात होते. दरम्यान भाजपचे सुनील गायकवाड यांनी माघार घेतल्याने घोडके व आघाडीचे अहमद यांच्यात मतदान झाले. यात घोडके यांना ४१ तर अन्सारी अहमद यांना २७ मते मिळाल्याने घोडके यांचा १४ मतांनी विजय झाला.

पालिकेबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

दरम्यान, पालिकेच्या आवारात काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांनी गर्दी केली. यावेळी पालिकेच्या महाद्वारावर काँग्रेस व शिवसेनेचा ध्वज एकत्र फडकत होतो. महापौर रशीद शेख व उपमहापौर सखाराम घोडके यांनी महापालिका प्रवेशद्वाराजवळ येवून हात उंचावून समर्थकांचे आभार मानले. यावेळी काँग्रेस व सेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात शेख व घोडके यांची मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका परिसरात अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, शहर उप-अधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे यांच्या नेतृत्त्वाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काँग्रेसच्या कोट्यातून संधी

पालिकेच्या इतिहास पहिल्यांदाच काँग्रेस व सेना यांच्यात युती झाल्याने शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. काँग्रेसने देखील सत्तेत कमबॅक केले आहे. एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने काँग्रेस-सेनेचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. आगामी काळात याची परतफेड म्हणून एमआयएमचे महानगराध्यक्ष माजी नगरसेवक अब्दुल मलिक यांना काँग्रेस कोट्यातून स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जावू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची दैना!

0
0

दोन तासांत ९२ मि.मी. पाऊस; सखल भाग जलमय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरवासीयांना ज्याची प्रतीक्षा होती असा धो धो पाऊस बुधवारी कोसळला. विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या पावसाने नागरिकांचे प्रचंड हाल केलेच, त्याचबरोबर गतवर्षीच्या पुराच्या आठवणीदेखील ताज्या केल्या. सखल भागात पाणी शिरल्याने पावसापुढे महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले. गोदाघाटावरील बुधवारचा बाजार तसेच सराफ बाजारातील व्यावसायिकांची या पावसाने दाणादाण उडवली. बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने जोरदार बॅटिंग केली असून, बळीराजा सुखावला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दमदार हजेरी लावणारा आणि काही तालुक्यांमध्ये जूनची सरासरी पहिल्या पंधरवड्यातच ओलांडणारा पाऊस अखेर बुधवारी दुपारनंतर शहरातही बरसला. विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या पावसाने सर्वांनाच धडकी भरवली. तब्बल दोन तास पावसाने धुव्वाधार बॅटिंग करीत नाशिककरांची धांदल उडवली. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले. यामुळे रिक्षाच उपलब्ध होत नसल्याने त्र्यंबकेश्वर मार्गे सिडको, सातपूरपर्यंत होणारी प्रवासी वाहतुकीसह शहरातील अनेक भागातील वाहतूक सुमारे दोन तासाहून अधिक काळ ठप्प झाली.

शहरात पाच ठिकाणी झाडे पडल्याने त्याचाही परिणाम वाहतुकीवर झाला. सराफ बाजार तसेच गंगेवरील भाजीबाजारात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे काही ठिकाणी वाहने वाहून जाण्याचे प्रकार घडले, तर बुधवारच्या बाजारातील विक्रेत्यांचा भाजीपालाही पावसात वाहून गेला. मेनरोडसह मुख्य बाजारातील अनेक रस्ते या पावसात पाण्याखाली गेले. त्यामुळे नागरिकांना, नोकरदारवर्गाला घराकडे परतणेही मुश्क‌िल झाले. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत १६ मि.मी. पाऊस पडला. दोन तासांत ९२ मि.मी पावसाची नोंद झाल्याची माह‌िती जिल्हाधिकारी प्रशासनाने दिली.

दीडशे कर्मचारी कामाला

शहर जलमय झाल्यानंतर नागरिकांच्या रोषाचा अंदाज आल्यानंतर पालिकेची यंत्रणा खडबडून जागे झाली. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केले असून, रात्रभर शहरात युद्धपातळीवर मोहीम राबवली जाणार आहे. नाले सफाईसह तुंबलेल्या भागातून पाणी काढण्यासाठी टँकरही लावण्यात आले आहेत.

जिल्ह्यातही जोरदार हजेरी

शहरात पावसाने दैना उडवली असताना ग्रामीण भागात अनेक ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावली. चांदवड तालुक्यात सुमारे दोन तास पाऊस पडला. मालेगाव, सटाणा, निफाड तालुक्यांमध्येही तासभर दमदार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, हिरवे स्वप्न फुलण्याची आशा व्यक्त होऊ लागली आहे.


२४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत नाशिकसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर त्यास तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ प्रभागात होणार कचरा विलगीकरण

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात घनकचरा विलगीकरणासह खत प्रकल्पावरील कामांमध्ये सुधारणा झाल्याचा दावा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केला आहे. घनकरचा विलगीकरणाची अमंलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाने नऊ प्रभांगाची निवड केली असून, जून अखेरपर्यंत या प्रभागांमध्ये शंभर टक्के कचरा विलगीकरण होणार असल्याचा दावाही कृष्णा यांनी केला आहे. सोबतच डेब्र‌जि उचलण्यासाठी प्रत्येक विभागात एक घंटागाडी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांग‌तिले.

महापालिकेच्या वतीने शहरात सध्या घनकचरा विलगीकरण मोहीम राबवली जात आहे. त्या अंतर्गत नागरिकांना ओला व सुका कचरा दोन डस्‍‍्टबीनमध्ये देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घंटागाड्यांमध्येही तशी सुविधा करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत कचरा विलगीकरणासाठी नऊ प्रभागांची निवड करण्यात आली असून, त्याचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. प्रभागांमध्ये जून अखेरपर्यंत शंभर टक्के कचरा विलगीकरण केले जाणार आहे. शहरात साचणारे डेब्रिजचे ढीग नष्ट करण्यासाठी पालिकेच्या सहा विभागांमध्ये आता प्रत्येकी एक घंटागाडी दिली जाणार आहे. या गाड्या डेब्रिज खतप्रकल्पावर टाकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाने सरकारला फटकारले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांतील दयनीय स्थिती सुधारण्याचे वारंवार आदेश देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे हाय कोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी असलेला निधी नोकरशहांना सोडवत नसल्याचे खडेबोलही सुनावले. आश्रमशाळांमध्ये मृत्यू झालेल्या मुलांच्या पालकांना भरपाई देण्यासाठी निधी नसल्यावरून कानउघाडणी करत दोन आठवड्यात खुलासा करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

आमश्रशाळांमध्ये मृत्यू पावलेल्या मुलांच्या पालकांना भरपाई मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तळपे यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मुलांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दशकात सर्पदंश, विंचूदंश, ताप आणि किरकोळ आजारांनी ७९३ मुलांचा मृत्यू झाल्याची बाब यावेळी अॅड. उदय वारूंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची गंभीर दखल घेत आश्रमशाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी असलेला पैसा नोकरशहांना सोडवतच नसल्याचा टोला न्यायालयाने हाणला. थंड पाण्याने अंघोळ घेतल्यामुळे, अन्नातून विषबाधेमुळे, स्पर्शदंश आदी कारणांमुळे मुलांचा मृत्यू होत असल्याचे सहनच केले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने सुनावले. मरण पावलेल्या ३४० मुलांच्या पालकांना भरपाई देण्यासाठी शासनाजवळ पैसा नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. त्यावर न्यायाधीशांनी सरकारच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले. तसेच राज्य सरकारला दोन आठवड्यांत प्रतिसाद देण्यास सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार तालुक्यांत सरासरी ओलांडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात जूनच्या सुरूवातीलाच मान्सूनपूर्व आणि पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील चार तालुक्यांत जून महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर उर्वरित तालुक्यांमध्ये जूनच्या सरासरीच्या ७० टक्के पर्जन्यमान झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

सन २०१३ चा अपवाद वगळता गत पाच वर्षांमध्ये पावसाला जिल्ह्यात सरासरी गाठता आली नाही. अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये तर मागील पाचही वर्षी सरासरी पाऊस पडू शकला नाही. जिल्ह्यात २०१४ मध्ये केवळ ७९ टक्के तर २०१५ मध्ये अवघा ६१ टक्के पाऊस झाला. सलग दोन वर्षे पाऊस कमी झाल्याने गतवर्षी जिल्हावासीयांना दुष्काळी परिस्थ‌तिीचा सामना करावा लागला. गतवर्षी मात्र पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. १०२ टक्के पावसाची नोंद झाल्याने पाणी उपलब्धतेची चिंता मिटली. मध्यम व मोठ्या २३ धरणांपैकी १६ धरणे शंभर टक्के तर सहा धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली.

यंदाही जूनच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १५५ मिलीमीटर एवढे आहे. येत्या आठवड्याभरात पर्जन्यमान वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्चर्यम; ९५ टक्के स्कूलबसची तपासणी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन महिन्यांच्या सुटीनंतर आजपासून (१५ जून) शाळा पुन्हा गजबजणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेसाठी वाहन तपासणी सक्तीची केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार १० वाहनांपैकी ९५५ वाहनांची तपासणी झाली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मे महिन्यात सक्तीने तपासणी करावी, असे आदेश महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागातर्फे जिल्ह्यातील आरटीओला दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात स्वतंत्र्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील १ हजार १० वाहनांपैकी ९५५ वाहनांची तपासणी झाली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. यातील ५५ वाहनमालकांनी फिटनेस तपासणी केली नसल्याचे उघडकीस झाले आहे. या ५५ वाहनांना रस्त्यावर फिरण्याची परवानगी देण्यात येणार नसून, अशा वाहनांचे फिटनेस परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात १०१० शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने आहेत. या वाहनमालकांना सांगून १ ते ३१ मे या कालावधीत महिन्यात स्वतंत्र्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ९५ टक्के बसेस आणि व्हॅन्सची तपासणी करण्यात आली आहे.

तपासणीसाठी आलेल्या वाहनांची वेग चाचणी, ब्रेकची तपासणी, आपत्कालीन मार्ग आहे की नाही, प्रथमोपचार पेटी आहे की नाही हेही तपासण्यात आले.

- भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षांवर अविश्वास?

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेत सत्तांतराचे नाट्य सुरू झाले असून, नगरसेवकांचा एक गट अज्ञातस्थळी रवाना झाला आहे. नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांच्यावर अविश्वास दाखल करण्याच्या वावड्या खऱ्या ठरतात की काय, याबद्दल तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. गतकाही दिवसांत सत्तेत असलेल्या भाजपात पडलेली दरी सांधण्यात जिल्हा नेत्यांना अपयश आल्याचे दिसत आहे. जे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे भाजपचे गटनेते योगेश तुंगार यांचा दावा आहे.

त्र्यंबक नगरपालिकेत काही दिवसांपासून अशांतता निर्माण झाली आहे. नगराध्यक्षांच्या पतीने हस्तक्षेप केला म्हणून मुख्याधिकारी चेतन केरूरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारूप शहर विकास योजनेचा ठराव रद्द करण्या बरोबरच विजया लढ्ढा यांना अपात्र करावे असा अर्ज केला. तो अर्जच या संघर्षाची नांदी ठरली. तेव्हाच लढ्ढा यांचे सदस्यत्त्वही रद्द करा असे पत्र १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते.

दरम्यान, वादग्रस्त ठराव रद्द झाला. मात्र डीपीचा प्रवास थांबल्याने शहरात नाराजी निर्माण झाली. लढ्ढा यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायचा, २०१२ मध्ये भाजपच्या चिन्हावर बिनविरोध निवडलेल्या तृप्ती धारणे यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्षपदाची संधी द्यायची, असा एक सूर नाराज नगरसेवकांनी लावून धरला आहे.विशेष म्हणजे धारणे यांना नगराध्यक्ष करण्यासाठी १७ पैकी १३ नगरसेवक राजी असल्याचे सांगण्यात येत आहे. नोव्हेंबरमध्ये पालिकेची निवडणूक होत आहे. थेट नगराध्यक्ष आणि ते देखील सर्वसाधारण आरक्षण आल्याने अनेकांनी तयारी केली आहे.

आपल्यासोबत १७ पैकी १३ नगरसेवक आहेत. नगराध्यक्ष आमच्या नगरसेवकांना विश्वासात घेत नाही. वरिष्ठही यात लक्ष घालत नाही. त्यामुळे नगरसेवकांचा एक गट तयार करून दबाव टाकण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले.

- योगेश तुंगार, भाजप गटनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून लॅपटॉप चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेहमीच वर्दळ असलेल्या गडकरी चौकात पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरी केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन काशिनाथ पाचपाटील (रा. रामदास कॉलनी, कॅनडा कॉर्नर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. पाचपाटील यांचे सल्लागार सोमवारी (दि. १२) दुपारी गडकरी चौकातील एलआयसी कार्यालय परिसरात गेले होते. एलआयसीसमोर अल्टो कार (एमएच १५ एफएफ २८५६) पार्क करून ते काही अंतरावर कामानिमित्त गेले असता चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी कारची मागील काच फोडून गाडीत बॅकसीटवर ठेवलेला लॅपटॉप, ऑफिसची कागदपत्र तसेच डाटा कार्ड असा सुमारे २१ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक प्रणिता पवार करीत आहेत.

विवाहितेवर बलात्कार

पती-पत्नीची बदनामी करण्याची धमकी देत ३९ वर्षीय विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिसांनी अमळनेर येथील संशयिताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
संजय विश्वास पाटील (४० रा. आरके ‍नगर, अमळनेर, जि. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. पंचवटी परिसरात राहणाऱ्या विवाहिते महिलेच्या तक्रारीनुसार, पतीसह मुलांना जीवे ठार मारण्याबरोबरच पती-पत्नीची समाजात बदनामी करण्याची धमकी देत, संशयिताने हे कृत्य केले. फेब्रुवारी २०१६ ते मार्च २०१७ या काळात संशयिताने महिलेस बळजबरीने मेहर सिग्नल, हिरवाडी तसेच चाळीसगाव आणि शिर्डी येथील लॉजवर घेऊन जात वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.

प्लॉट बळकावण्याचा महिलेचा प्रयत्न

बनावट कागदपत्राच्या आधारे साठेखत तयार करून मुंबई येथील वृध्देचा भूखंड बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेविरोधात अंबड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शशिकला विलास डोईफोडे (६८, रा. मनीषनगर, अंधेरी, मुंबई) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. डोईफोडे यांचा अंबड एमआयडीसीतील चुंचाळे शिवारात सर्व्हे क्रमांक ६१-२ अ मंजूर ले-आऊटमधील प्लॉट नं. १ हा स्व मालकीचा आहे. संशयित ज्योती कैलास पानपाटील (रा. दत्तनगर, चुंचाळे-अंबड) या संशयित महिलेने सदर प्लॉट बळकाविण्यासाठी ७ एप्रिल रोजी बनावट कागदपत्रांच्या आधारे साठेखत (करारनामा) तयार केले. तसेच तो खरा असल्याचे भासावून डोईफोडे यांची फसवणूक केली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.


दोन चोरटे गजाआड

घरफोडी करण्याच्या इराद्याने अंधारात लपून बसलेल्या गंगापूर गावातील दोघा संशयितांना सरकारवाडा पोलिसांच्या गस्तीपथकाने जेरबंद केले. रविवार कारंजा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सचिन रमेश जाधव (रा. पेठ गल्ली, गंगापूर गाव) आणि गोकुळ विठ्ठल निंबाळकर (रा. क्रांती चौक, गंगापूर गाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. बुधवारी मध्यरात्री दोघे संशयित रविवार कारंजा परिसरातील संभाजी गार्डन आणि सुंदर नारायण मंदिरालगत संशयास्पद मिळून आले. सरकारवाडा पोलिसांचे पथक रात्री गस्त घालीत असताना ते त्यांच्या नजरेस पडले. पोलिसांनी लागलीच दोघांना ताब्यात घेतले. घरफोडी करण्याच्या इराद्याने लपल्याची त्यांनी कबूली दिली असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी कारचालकाने चार जणांना उडविले

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मद्यधुंद कारचालकांने विविध ठिकाणी चार जणांना धडक देऊन जखमी केल्याची घटना जेलरोड परिसरात बुधवारी रात्री घडली. युवकांनी पाठलाग करून चालकाला पकडून उपनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

योगेश संजय पाडोळे (मंगल मूर्तीनगर, जेलरोड) हा कोहिनूर वाघमारे (लोखंडेमळा,जेलरोड) या मित्रासह बुधवारी (दि. १४) रात्री आठच्या सुमारास क्वालिस कारने (एमएच १५ ए ३२४७) जात होता. नारायणबापूनगर चौकात कारने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. नागरिकांनी आरडाओरड केल्याने कारचालकाने कारडा कन्स्ट्रक्शनच्या दिशेने गाडी पळवली. तेथे एका इमारतीसमोर चारचाकी वाहनाला धडक दिली. दोन अपघातानंतरही पाडोळेची मद्याची धुंदी उतरली नव्हती. त्याने माजी नगरसेवक संपत शेलार यांच्या घरासमोर जया जाधव (५५, चंपानगरी) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र (३२) यांना जोरदार धडक दिली. यात जया जाधव गंभीर जखमी झाल्या. शेलारमळा येथे नागरिकांनी कारचा पाठलाग सुरू केला. जेलरोडची टाकी ओलांडून पवारवाडीच्या दिशेने पाडोळेने कार नेली. म्हाडाच्या इमारतीजवळ झाडावर गाडी आदळल्यानंतर पाडोळे व त्याचा मित्र वाघमारे मक्याच्या शेतात धावले. युवकांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images