Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आवक घटल्याने दरात दुप्पट वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गेले आठ दिवस शेतकरी संपामुळे ठप्प पडलेले बाजार समितीतील व्यवहार शुक्रवारी (दि. ९) सुरळीत सुरू झाले. मात्र, संपाविषयी अजूनही ठोस निर्णय झालेला नसल्यामुळे शेतकरी संभ्रमावस्‍थेत आहेत. संपाच्या आठ दिवसांनंतर भाजीपाल्याची प्रचंड आवक होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नेहमीच्या तुलनेत केवळ पंचवीस टक्केच भाजीपाला दुपारच्या लिलावात विक्रीस आला. त्यामुळे भाजीपाल्याच्या आठ दिवसांपूर्वीच्या भावात दुप्पटीने वाढ झाली.

शेतकरी संप सुरू करण्याचे निश्चित झाल्यामुळे ३१ मे रोजी भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली होती. त्यामुळे दर कमी झाले होते. त्याउलट परिस्थिती शुक्रवारी (दि. ९) बघायला मिळाली. मागणी प्रचंड असताना भाजीपाल्याची आवक कमी असल्यामुळे बाजारभाव वाढले. नाशिक बाजार समितीत रोज साधारणतः १२०० ते १५०० टन भाजीपाल्याची आवक होत असते. त्यात १००० टन फळभाज्या असतात. शुक्रवारच्या लिलावात केवळ ४०० टन फळभाज्या विक्रीस आल्या. यामुळे दरवाढ झाली. शेतकरी संप सुरूच असल्याने भाजीपाला विक्रीसाठी आणावा की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमावस्‍थेत आहेत. याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. यामुळे दरही वाढले आहेत.

शिवार खरेदीवर व्यापाऱ्यांचा भर

शेतकरी संपाच्या काळात बाहेरील बाजारपेठेत भाजीपाला पाठविण्याची काही व्यापाऱ्यांनी तयारी ठेवली होती. यामुळे त्यांनी शिवार खरेदीवर भर दिलेला आहे. गावोगावी थेट शेतीवर जाऊन शेतमाल खरेदी करून तो बाहेरीत बाजारपेठेत पाठविला जात असल्यामुळे बाजार समितीत लिलाव सुरू होऊनही भाजीपाल्याची फारशी आवक होऊ शकली नाही.

लिलाव आजही सुरू राहणार

नाशिक बाजार समितीत शनिवारी फळभाज्यांचे लिलाव बंद असतात. मात्र गेली आठ दिवस संपामुळे बंद असल्यामुळे आज (दि. १०) भाजीपाल्याचे लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि आडतदार यांनी घेतला असल्यामुळे शनिवारी लिलाव सुरू राहणार आहेत. यामुळे आज आवक वाढण्याची शक्यता असून, दर आवाक्यात येऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीए’तर्फे जीएसटी सहाय्यता केंद्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वस्तू व सेवाकर अर्थात, जीएसटी येत्या १ जुलैपासून लागू होत आहे. ही करप्रणाली सामान्य व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी नाशिकच्या सीए शाखेने मोफत जीएसटी सहाय्यता केंद्राची स्थापना केली आहे.

जीएसटी सहाय्यता केंद्र गुरुवार (दि. ८)पासून सुरू झाले असून, ते ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक सप्ताहातील गुरुवारी, शुक्रवारी व शनिवारी सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान हे सहाय्यता केंद्र सुरू राहणार आहे. सीए शाखेच्या आयसीएआय भवन, अशोका मार्ग, अशोका शाळेच्या मागे, पखालरोड येथील कार्यालयात हे सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले अाहे. नाशिक सीए शाखेचे जीएसटीवरील तज्ज्ञ सीए सहाय्यता केंद्रात येणाऱ्या व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या केंद्रात सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना जीएसटीविषयक आवश्यक माहिती मिळेल. जीएसटीअंतर्गत करावी लागणारी नोंदणी किती उलाढाल झाल्यावर करायची? ही नोंदणी सर्व व्यापाऱ्यांना गरजेचीच कशी आहे? या आणि इतर शंका व प्रश्नांबाबत केंद्राच्या माध्यमातून मदत करण्यात येईल. या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक सीए शाखेचे अध्यक्ष विकास हासे, शाखेचे सचिव रोहन वसंत आंधळे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


माहितीफलकाचे अनावरण

सहाय्यता केंद्राचे मुख्य समन्वयक म्हणून सीए पीयूष चांडक यांच्याकडे जबाबदारी आहे. दरम्यान, या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या केंद्राच्या विक्रीकर भवन, पाथर्डी फाटा येथील माहितीफलकाचे अनावरण विक्रीकर सहआयुक्त हेमलाल बाखरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विक्रीकर विभागाचे सर्व विक्रीकर उपायुक्त, तसेच सीए शाखेकडून राजेंद्र शेटे व पीयूष चांडक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वडपाडा’ जलस्वयंपूर्णतेच्या वाटेवर...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे काही गावांचा पाणीप्रश्न हाती घेऊन ते टँकरमुक्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत पेठ तालुक्यातील वडपाडा गाव जलस्वयंपूर्णतेच्या वाटेवर असून, ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांतून पाण्याचा प्रश्न संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

सोशल मीडियावर दुष्काळासंदर्भात जनजागृती करून त्यानुसार मागील वर्षी तोरंगण, गढईपाडा, शेवखंडी, खोटारेपाडा आणि फणसपाडा या गावांना पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यात फोरमच्या टीमला यश आले होते.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माळेगावचा पाणीप्रश्न एप्रिल २०१७ मध्ये सोडविण्यात आला. याचदरम्यान पेठ तालुक्यातील वडपाडा या गावाचे रहिवासी फोरमच्या टीमला भेटले आणि त्यांच्या गावाची समस्या कथन केली. त्यांची समस्या समजून घेऊन गावाला भेट दिल्यांनतर लक्षात आले, की गाव एका टेकडीवर आहे. गावाच्या जवळपास जानेवारीनंतर पाणी उपलब्ध असणारी एकही विहीर नाही. एकमेव पर्याय म्हणजे नाल्यांमध्ये झरे करून तासन् तास हंडाभर पाण्यासाठी वाट बघणे, दोन-तीन किलोमीटरवरील विहिरींवरून डोक्यावर पाणी आणणे किंवा टँकरने पाणीपुरवठा करणे. टँकर हे सरकारच्या कृपेवर सुरू होत असल्याने जिवावर उदार होऊन अन्य पर्यायांचा वापर करणे गावाच्या पाचवीला पुजले होते.

टेकडीच्या खाली दोन किलोमीटरवरील विहिरीला बारमाही पाणीही असते. पण, इतक्या खोलवरून टेकडीवर पाणी आणणे अशक्य बाब होती. गावात स्टोरेज टाकी बांधली, तर गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविणे शक्य होईल. हे जाणी फोरमने पाच लाख रुपये खर्चाचा अंदाज बांधला. यातील गावातील पाण्याची टाकी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून बांधण्याचे आणि पाइपलाइनसाठी श्रमदानातून चाऱ्या खोदण्याचे ठरवले. सोशल नेटवर्किंग फोरमने वीजपंप, पाइप्स, विजेची उपकरणे व अन्य साहित्य पुरविण्याची जबाबदारी घेतली. गावकऱ्यांनी गावात ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. पाइपलाइनसाठी चाऱ्या खोदून तयार आहेत आणि पाइपही गावात पोहोचले आहेत. या आठवड्यात पाइपची जोडणी करून येत्या ८ ते १० दिवसांत गावातील टाकीत पाणी पडून फोरमतर्फे सातवे गाव जलस्वयंपूर्ण होणार आहे. या उपक्रमाचे लोकार्पण गावातीलच ज्येष्ठ महिलांच्या हस्ते होणार आहे.


उपक्रमातील योगदान

अध्यक्ष प्रमोद गायकवाड, इंजिनीअर प्रशांत बच्छाव, डॉ. पंकज भदाणे, रामदास शिंदे, अॅड. गुलाब आहेर, स्पार्टन हेल्प सेंटर, सचिन शेळके, राजेश बक्षी-कतार, संदीप बत्तासे आणि वडपाडातील सर्व अबालवृद्ध.

पाणी प्रकल्पाचे आश्रयदाते

दिवंगत मातोश्रींच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिक अशोक एकनाथ कदम यांनी वडपाडा उपक्रमासाठी भरीव मदत केली. स्पार्टन हेल्प सेंटर या तरुणांच्या संस्थेने वीजपंप घेऊन दिला. याशिवाय परफेक्ट डेव्हलपर्स, फेसबुकवरील तरुण, तसेच व्हॉट्सअॅपवर स्थापन झालेल्या पाणी या ग्रुपच्या सदस्यांनीही पाइप घेण्यासाठी भरघोस मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानपानाच्या साडीने मोडला संसार!

$
0
0

नवरीला सोडून जाणाऱ्या नवरदेवासह १० जणांवर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकलुती एक मुलगी. लग्नात काही कमी पडायला नको म्हणून तिच्या वडिलांनी हात उसने पैसे उभे करून लग्नाची जय्यत तयारी केली. पाहुण्या मंडळीच्या साक्षीने लग्न लागले. संध्याकाळच्या सुमारास मानपानाचा विषय उभा राहिला अन् होत्याचे नव्हते झाले. मानात मिळालेल्या साड्या चांगल्या नसल्याचे कारण पुढे करीत सासरच्यांनी चक्क पाच लाख रुपये मागितले. शब्दाला शब्द वाढत गेला अन् नवरीला सोडून नवरदेव एकटाच परत गेला. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

धीरज नागेश अहिरे, असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पांडुरंग किसन आहेर यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. नाशिकरोड परिसरातील एका शाळेत क्लर्क म्हणून काम करणाऱ्या आहेर यांना दोन मुले आणि एकच मुलगी. मुलीसाठी स्थळ पाहत असताना त्यांना जवळच्या नातेवाईकांनी मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील नागेश केदा अहिरे यांच्या धीरज या मुलाचे स्थळ दाखवले. ठाण्यात काम करणारा धीरज कल्याणला भावाकडे राहतो. मुली योग्य स्थळ वाटल्याने अधिक चौकशी न करता आहेर यांनी लग्नाची बोलणी केली. सासरच्यांनी दोन लाख रुपये रोकड आणि दोन तोळे सोने असा हुंडा घेतला. २४ एप्रिल रोजी दिमाखात साखरपुडादेखील झाला. ३१ मे रोजी औरंगाबादरोडवरील गोदावरी लॉन्स येथे विवाह ठरला. विधीपूर्वक सर्व पार पडले. विवाह आटोपल्यानंतर मुलीची पाठवणी करण्यापूर्वी आहेर कुटुंबीयांनी अहिरे कुटुंबातील महिलांना मानपान देण्यास सुरुवात केली. मात्र, इतक्या हलक्या साड्या नकोत, असे म्हणत सासरच्या महिलांनी वाद सुरू केला. नवरा मुलगा धीरज यांच्यासह इतर व्यक्तींनी शिवीगाळ सुरू केली. आहेर कुटुंबातील काही तरुणांनी त्यास विरोध केला. वाद वाढल्याने पांडुरंग आहेर यांनी मुलासह त्याच्या कुटुंबीयांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीला सासरी पाठवयचे असल्यास पाच लाख रुपये देण्याची मागणी अहिरे यांनी केली. या दरम्यान, मुलीची आई तसेच वडील चक्कर येऊन पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या धावपळीत सासरच्या मंडळींनी पोलिस स्टेशन गाठून तिथून घराकडे धूम ठोकली. दोन दिवसांनी नुकसानभरपाई देण्याची तयारी सासरच्यांनी दाखवली. मात्र, नंतर ही मागणीदेखील फेटाळून लावण्यात आली.

दोघांना अटक; इतरांचा शोध सुरू

आडगाव पोलिसांनी धीरज अहिरे, नागेश अहिरे, पुष्पा अहिरे, दीपक अहिरे यांच्यासह केशव कुऱ्हाडे, प्रतिभा कुऱ्हाडे, भिका दयाराम अहिरे, ज्योती अहिरे, कैलास पातळे, भाग्यश्री पातळे यांच्याविरोधात फसवणूक, मारहाण, हुंडाबंदी अधिनियमातील कलम तीननुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आज पाणीपुरवठा नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरण पंप‌िंग स्टेशन येथील महावितरणक कंपनीच्या एक्सप्रेस फिडर लाइनच्या दुरुस्तीसह विविध कामांमुळे आज शनिवारी (दि. १०) दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. शिवाय रविवारी सकाळचा पाणीपुरवठाही कमी दाबाने होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
एक्सप्रेस फिडरच्या देखभाल व दुरुस्तीसह शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या पंपसेट्सचे व्हॉल्व दुरुस्ती करणे, ३३ केव्ही सबस्टेशनमधील दुरुस्ती करणे, चेहेडी पंपिंग स्टेशन येथील उर्ध्ववाहिनीची दुरुस्ती, कालिका पंपिंग स्टेशनमधील नवीन पॅनलची व केबलची जोडणी, कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्ती, गंगापूर डॅम पंपिंग स्टेशन येथील नऊशे म‌िमी व्यासाच्या रायझिंग मेनवरील व्हॉल्वची दुरुस्ती आदी कामे पाणीपुरवठा विभागाकडून शनिवारी केली जाणार आहेत. त्यामुळे शनिवारचा महावितरण कंपनीचा वीज पुरवठा सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारचा दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर केंब्रिजवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शाळेतील विद्यार्थ्यांनी फी भरली नसल्याचे कारण दाखवून थेट दीडशे विद्यार्थ्यांच्या घरी दाखले पाठविल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी मनपा आयुक्तांची भेट घेऊन केंब्रिज शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार देवयानी फरांदे यांनी शाळेला भेट देऊन प्रशासनाशी चर्चा केली. मात्र, यावेळी शाळेचे ट्रस्टी भारती रामचंद्रन यांचे पुत्र राहुल रामचंद्रन यांनी थेट आमदारांनाच अरेरावी केल्याने शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आमदार फरांदे यांनी दिला. इंदिरानगर पोल‌िस ठाण्यात ट्रस्टी भारती रामचंद्रन, राहुल रामचंद्रन आणि मुख्याध्यापिका सोनू नादेर यांच्यावर महाराष्ट्र ‌शिक्षण श्ुल्क कायद्यान्वये व शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केली म्हण्ून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी केंब्रिज स्कूलच्या वतीने सुमारे दीडशे विद्यार्थ्यांचे दाखले फी न भरल्याने पोस्टाने घरपोच पाठवले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी या विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी सतीश सोनवणे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, शाम बडोदे यांनीही शाळेच्या ठिकाणी जाऊन भेट दिली. यावेळी प्रशासनाच्या वतीने उडावाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी थेट मनपा आयुक्तांच्या दालनात धाव घेतली. यावेळी भाजपचे गटनेते दिनकर पाटील यांनी मध्यस्थी करुन या पालकांची समस्या सोडविण्याची मागणी केली. आयुक्तांनीही शाळेला पत्र दिलेले असताना शाळेने चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबद्दल चौकशीचे आदेश दिले. मात्र, यावेळीही समाधान न झाल्याने पालकांनी नाराजी व्यक्त करुन याबाबतची माहिती आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांना दिली. त्यानुसार या दोन्ही आमदारांनी शाळेत येण्याचे मान्य केल्याने पालकांनी पुन्हा शाळेकडे मोर्चा वळविला. यावेळी शाळेच्या विश्वस्तांनी अरेरावी केली. आमदार फरांदे शाळेत आल्यानंतर शाळेला कुलूप लावण्यात आले होते. यानंतर फरांदे यांनी शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. यावेळी आमदारांसमोरही प्रशासनाने उद्धट वर्तन केल्याने फरांदे यांनी पोल‌िसांना प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याने प्रशासनावर बालक हक्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासही सांगितले.

सोमवारी बैठक
शाळेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह सोमवारी बैठक घेऊन त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

पोलिस आयुक्तांशी चर्चा
शाळा नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ करीत असल्याच्या तक्रारीसह आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांच्यासह पालकांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेऊन चर्चा केली. यावर सिंगल यांनी कोणकोणत्या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांचे शोषण झाले आहे, याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल घेण्याविषयी पालकांना सांगितले आहे. सोमवारीही विद्यार्थ्यांना बाहेर ठेवले तर आम्ही वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना बसवू अशी भूमिका आमदारांनी यावेळी मांडली.

विश्वस्ताच्या मुलाची मुजोरी

आमदार देवयानी फरांदे यांनी शाळेला भेट दिल्यानंतर शाळेच्या विश्वस्ताच्या मुलाने लोकप्रतिनिधी व आमदारांना अरेरावीची भाषा वापरली. यामुळे संतप्त झालेल्या आमदार फरांदे यांनी थेट इंदिरानगरचे वरिष्ठ पोल‌िस निरीक्षक फुलदास भोये यांना या मुलावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याचे आदेश दिले.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या विधानाबाबत संभ्रम

मनपा शिक्षणमंडळाचे प्रशासनाधिकारी व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या विधानात संदिग्धता आढळून येत असल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत. पालक, शाळा प्रशासन, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्याशी याप्रकरणी चर्चा करताना ते वेगवेगळी विधाने करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत होर्डिंग्ज रडारवर

$
0
0

खासगी जागांवरील १५८ होर्डिंगधारकांना नोटिसा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत होर्डिंग्जसोबत खासगी जागांवर उभ्या राहिलेल्या बेकायदेशीर होर्डिंगविरोधात महापालिकेने उशिरा का होईना कारवाईला सुरुवात केली आहे. शहरातील तब्बल १५८ ठिकाणी खासगी जागेवरील होर्डिंगधारकांना अतिक्रमण विभागाने नोटिसा पाठविण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. दरम्यान, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनाही शेवटची संधी पालिकेने दिली असून, त्यानंतर अनधिकृत बांधकाम काढले नाही तर कारवाईचा इशारा दिला आहे.

महापालिकेला जाहिरात करातून मोठे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मात्र अनधिकृत होर्डिंग आणि बॅनरबाजीमुळे त्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. शहरात परवानगी घेऊन होर्डिंग व बॅनर लावण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे पालिकेने जाहिरात कर बुडविणाऱ्या होर्डिंग व बॅनरबाजी विरोधात कारवाईचे अस्र उगारले आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या सूचनेनुसार पालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंगसंदर्भात नुकतेच सर्व्हेक्षण केले आहे. खासगी जागेवर मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य विनापरवाना होर्डिंग उभारण्यात आल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाने हे सर्व होर्डिंग रडारवर घेतले आहेत. या सर्व १५८ होर्डिंगच्या जागामालकांना तसेच होर्डिंग लावणाऱ्यांना नोटिसा काढल्या आहेत. दंडात्मक कारवाईचा इशारा महिनाभरापूर्वीच दिला होता. तातडीने दंड भरून होर्डिंग नियमित केले नाही तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.

शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने एबीबी सर्कलवरील मोठ्या होर्डिंगवर कारवाई केली. त्याज सहा ट्रक लोखंड व गर्डर जप्त करण्यात आले. शहरातील नदीकाठावर मध्यवस्तीच्या अनेक ठिकाणी धोकेदायक होर्डिंग उभे असून, त्यांच्यावर तातडीने कारवाईची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेने सरसकट या होर्डिंगवर कारवाईची मोहीम सुरू करणे अपेक्षित आहे. परंतु, केवळ एका होर्डिंगवर कारवाई करून पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मात्र कारवाईचे सोपस्कार पार पाडले आहेत.

अभय किती वेळा देणार?

शहरातील खासगी जागेवर अनधिकृतपणे होर्डिंग उभे करून पालिकेचा महसूल बुडवला जातो. त्यामुळे पालिकेने या सर्वांना नोटिसा देऊन कारवाई करण्याचे सोपस्कार अनेकदा पार पाडले आहेत. परंतु, दरवेळेस एखाद्या होर्डिंगवर कारवाई करून इतरांना मात्र अभय दिले जाते. त्यामुळे शुक्रवारी सुरू झालेली कारवाई एका होर्डिंगपुरती न थांबता सर्व होर्डिंगवर करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अनधिकृत बांधकामांनाही इशारा

बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पार्किंग व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांना त्यांची बेकायदेशीर व अतिक्रमित असलेली बांधकामे काढून घेण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहीर आवाहनाव्दारे सूचना दिलेल्या आहेत. ज्या नागरिक, व्यावसायिक व विक्रेत्यांनी त्यांची अतिक्रमणे काढून घेतलेली नाहीत, त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे केलेली असल्यास त्यांनी ती काढून घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावात आठ ‌दिवसांत १२० मि.मी. पाऊस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यात यंदा १ ते ९ जून या काळात तब्बल १२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. या कालावधीतील हा गेल्या चार वर्षांतला सर्वात जास्त पाऊस आहे. १२० मि.मी. एवढा पाऊस या आधी जूनच्या पहिल्या आठवड्यात कधीही झाला नसल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या नांदगावमध्ये यंदा पावसाने मेहेरनजर केली असून, जूनमध्येच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करीत दिलासा दिला आहे. गेल्या वर्षी ९ जूनपर्यंत पावसाने हजेरी लावलेली नव्हती. निरंक नोंद दिसून येते. त्या तुलनेत यंदा जोरदार पाऊस झाला असून, पेरणीसाठी उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात आज शिवसंपर्क अभियान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आधार देण्यासाठी शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाला उत्तर महाराष्ट्रात शनिवार (दि. १०जून) पासून नाशिकमधून सुरुवात होत आहे. शनिवारी जिल्ह्यात घोटी येथून या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होत असल्याची माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. खासदार संजय राऊत आणि संपर्क प्रमुख अजय चौधरी या नेत्यांच्या उपस्थितीत या संपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची पीकपद्धती, त्यावरील समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. सोबतच नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी राऊत चर्चा करणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील शिवसंपर्क अभियानाची सुरुवात शनिवारी नाशिकमधून होत आहे. ग्रामविकास मंत्री दादा भुसे, खासदार संजय राऊत, आमदार अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय कंरजकर यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता घोटी येथून या अभियानाची सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

$
0
0

जिल्ह्यात ४६ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना सातत्याने वाढत असून, चालू वर्षात आतापर्यंत तब्बल ४६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यंदा नांदगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असून, नऊ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

राज्यात दररोज कोठे ना कोठे शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत. कर्जबाजारीपणा हे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण असले तरी निसर्गाचे दृष्टचक्र, नापिकी आणि कर्जवसुलीसाठी बँकांचा तगादा ही देखील शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमागील महत्त्वाची कारणे ठरत आहेत.

जानेवारी २०१७ ते जूनचा पहिला आठवडा या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. गतवर्षी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या निफाडमध्ये झाल्या होत्या. यंदा मात्र कोरडवाहू शेती अधिक असलेल्या नांदगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात गेल्या सव्वापाच महिन्यांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यात सात शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे. निफाड तालुक्यात अजूनही आत्महत्यांचे लोन कमी होऊ शकलले नाही. तालुक्यात सहा आत्महत्या झाल्या असून, त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जिल्ह्यात चालू वर्षातील महिला शेतकरी आत्महत्येची ही पहिली घटना ठरली आहे. सुरगाण्यासारख्या आदिवासीबहुल तालुक्यातही यंदा कित्येक वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी आत्महत्येची घटना घडली आहे. गेल्या सव्वापाच महिन्यांत सर्वाधिक १६ आत्महत्यांच्या घटना मे महिन्यात घडल्या. म्हणजेच दिवसाआड आत्महत्येची एक घटना घडली आहे. ११ घटना एप्र‌लि महिन्यात घडल्याची माहिती ज‌ल्हिा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

२६ कुटुंब मदतीस पात्र

जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त ४६ शेतकरी कुटुंबांपैकी २६ कुटुंब मदतीस पात्र ठरले आहेत. त्यांना सरकारच्या धोरणांनुसार एक लाखांची मदत दिली जाणार आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटनांपैकी ११ घटनांचे प्रस्ताव मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. व्यक्तिगत कारणांमधून या आत्महत्या झाल्याचे निष्कर्ष प्रशासनाने नोंदविले आहेत. शेतकरी आत्महत्येच्या नऊ प्रकरणांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवड; चुरस वाढली

$
0
0

चार अर्ज दाखल; १४ जूनला निवडणूक

म. टा. वृतसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक येत्या १४ जून रोजी होत आहे. अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी शेवटची मुदत होती. अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी-जनता दल आघाडीचे बुलंद इकबाल व काँग्रेसच्या ताहेरा शेख यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. उपमहापौरपदासाठी भाजपचे सुनील गायकवाड, राष्ट्रवादी-जनता दलचे अन्सारी मन्सूर शब्बीर अहमद यांनी अर्ज दाखल केला आहे.

गुरुवारी महापौरपदासाठी काँग्रेसचे रशीद शेख, राष्ट्रवादीचे नबी अहमदुल्ला यांनी तर सेनेचे सखाराम घोडके यांनी अर्ज दाखल केले होते. महापालिकेची त्रिशंकू स्थिती झाली असल्याने काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेत सत्तास्थापनेची तयारी सुरू केली आहे. मात्र अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी व भाजपने अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे. निवडणूक निकालानंतर काँग्रेसला २८, राष्ट्रवादी-जनता दल आघाडीला २७ जागा मिळाल्या. यामुळे एमआयएम व शिवसेनेच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, शिवसेनेला सोबत घेतल्याने काँग्रेसची सत्ता स्थापन होणे निश्चित मानले जात आहे.

शिवसेनेला पदाची संधी

मालेगाव महापालिकेच्या इतिहासात शिवसेनेला पहिल्यांदाच सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळत आहे. अर्थात महापालिकेच्या राजकारणाचा अस्थिर इतिहास पाहता अखेरच्या क्षणी राजकीय घडामोडी कशा घडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ‌शिवसेनेने १३ जागा मिळाल्या आहेत.

महापौरपदाचे उमेदवार

काँग्रेस - रशीद शेख, ताहेरा रशीद शेख, राष्ट्रवादी-जद आघाडी - नबी अहमदुल्ला, बुलंद इक्बाल

उपमहापौरपदाचे उमेदवार

शिवसेना - सखाराम घोडके, भाजप - सुनील गायकवाड, राष्ट्रवादी - अन्सारी मन्सूर शब्बीर अहमद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीएसटी’पूर्वीच वाहन विक्रेत्यांकडून सवलती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटी करप्रणाली लागू होणार अाहे. परिणामी सध्याच्या करप्रणालीअंतर्गत एक्साइज, व्हॅट, सेल्स टॅक्स, रस्ते कर, मोटर वाहन कर, नोंदणी शुल्क अशा प्रकारचे सर्व कर एकत्रितपणे जीएसटीद्वारे आकारले जाणार आहेत. त्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ किंवा घटदेखील होणार असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर असंख्य विक्रेत्यांनी जीएसटी लागू होण्यापूर्वीच उत्पादित वाहनांवर सवलत देऊन जास्तीत जास्त माल विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

विक्रेत्यांकडे याबाबत विचारणा केली असता, जीएसटीमुळे किमतीमध्ये निश्चित कितपत घट अथवा वाढ होईल याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. काही विक्रेत्यांनी मात्र आज आम्ही सवलतीच्या दरात वाहनांची विक्री करीत आहोत. पण, आज ग्राहकांनी बुकिंग केले आणि वस्तूंच्या किमती वाढल्या, तरी आम्ही त्यांच्याकडून बुकिंगच्या वेळी निश्चित केलेल्या किमतीतच वस्तू देऊ अथवा वस्तूची किंमत कमी झाली, तर त्याला त्यावेळी निर्धारित केलेल्या किमतीत वस्तू देऊ. त्यामुळे या कालावधीत वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा तोटा होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर १५ लाख रुपयांच्या आतील वाहनांच्या किमतीत २ ते ४ टक्के फरक पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या कारच्या किमतीत वाढ होईल, अशी शक्यता असल्यामुळे जीएसटीची अंमलबजावणी होण्याआधी बुकिंग करण्याच्या उद्देशाने अनेकांकडून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर लक्झरी कारच्या किमतीत घट होणार आहे. त्यामुळे या महिन्यात लक्झरी कारच्या विक्रीतदेखील थोड्याफार प्रमाणात घट होईल, अशा प्रकारची चर्चा संबंधित वर्तुळात सुरू आहे.

---

पंधरा लाखांच्या आतील वाहनांच्या किमती वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अनेक डिस्काउंट ऑफर्सदेखील सुरू आहेत. परिणामी रोज नवीन ग्राहक येत आहेत. त्यामुळे या महिन्यात निश्चित विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.

-आनंद करंजकर, विक्रेता

---

‘जीएसटी’बाबत अजून संपूर्ण माहिती समजलेली नाही. मात्र, सध्या वाहन विक्रीवर सवलती मिळत असल्याने आम्ही वाहनांची चौकशी करण्यासाठी आलो आहोत. जीएसटीप्रमाणेच सरकारने संपूर्ण देशात इंधनदर एकच राहील याचे नियोजन करावे.

-समीर वेलदे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगचे ‘पझल’ सुटणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने ठेवलेल्या रोटरी पार्किंगच्या प्रस्तावाला प्रतिसाद मिळाला नसल्याने प्रशासनाने आता रोटरीऐवजी पझल पार्किंगचा प्रस्ताव ठेवला आहे. शहरातील मोक्याच्या सात जागांवर ही पार्किंग होणार असून, त्यात जवळपास तीनशे गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि महापालिकेच्या मुख्य कार्यालयांमध्ये पझल पार्किंगला प्राधान्य दिले जाणार आहे. पझल पार्किंगसाठी राज्य सरकार पाच कोटी रुपये देणार आहे.

शहराचा सर्वाधिक गंभीर प्रश्न हा वाहतूक व पार्किंगचा आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, भद्रकाली, अशोक स्तंभ, मेनरोड आदी ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला आहे. पार्किंगसाठी ठिकाणच नसल्याने येथे रस्त्यावरच वाहने लावली जातात. सर्वसामान्यांना येथून वाट काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतुकीच्या कटकटीतून नाशिककरांची सुटका करण्यासाठी शहरात १२ ठिकाणी १४ रोटरी पार्किंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या एका पार्किंगमध्ये १४ कार बसू शकणार होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका मुख्यालय, अशोक स्तंभ, शालिमार, रविवार कारंजा या वर्दळीच्या ठिकाणी ही पार्किंग स्टेशन्स उभारली जाणार होती. या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. तीनदा राबविलेल्या निविदा प्रक्रियेत एकाही कंपनीने रस दाखवला नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महापालिका कार्यालय, जिल्हा न्यायालय आवारात पझल पार्किंग करण्यात येणार आहे. याशिवाय सातपूर, नवीन नाशिक, नाशिक रोड, गंगापूर रोड आदी सात ठिकाणीही पझल पार्किंग होणार आहे. यासाठी महापा‌लिका आणि राज्य सरकार प्रत्येकी पाच कोटी रुपये देणार आहे. त्यानुसार शहरात प्रत्येक ठिकाणी ३० ते ४५ गाड्या पार्क होऊ शकतील. यामुळे एकूण तीनशे वाहनांच्या पार्किंगची सोय लागून, वाहतुकीचा अडथळा काही प्रमाणात कमी करण्याचा महापालिकेचा मानस आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात अन्य ठिकाणीदेखील पझल पार्किंग करण्याचा महापालिका विचार करीत आहे. या पार्किंग सिस्टिममुळे आपोआपच शहाराच्या सुशोभिकरणातही भर पडणार आहे.

-

असे असेल पार्किंग

रोटरी पार्किंगमध्ये एका मजल्यावर तीनच वाहने बसतात. परंतु, पझल पार्किंगमध्ये एका मजल्यावर १५ वाहने बसू शकतात. रोटरी पार्किंग ही सात मजली असते, तर पझल पार्किंग ही तीन मजलीच असते. एका लोखंडी सांगाड्यावर १५ वाहने बसू शकतात. यात विशिष्ट पध्दतीने वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वाहनेही पार्क होऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० गुंठे शेतीत १२ लाखांचे उत्पन्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या तीस गुंठे शेतीला गोपालनाची जोड देऊन नामदेव मोळे या शेतकऱ्याने मोठा आदर्श निर्माण केला आहे. सेंद्रिय गूळ, दूध, दुग्धजन्य पदार्थ, गांडूळ खत, गोमूत्र यांच्या विक्रीतून शेतीला जोडधंदा साकारण्याचा मोळे यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. आज (दि. १०) मोळे नाशिकला येणार असून, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

घरपण (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील नामदेव मोळे हे केवळ ३० गुंठे जमीन असलेले शेतकरी. परंतु, उपलब्ध जमीन आणि गीर गाईच्या संगोपनातून त्यांनी ही प्रगती साधली आहे. सेंद्रिय गूळ निर्मिती, दूध विक्री त्याबरोबरीने गांडूळ खत आणि गोमूत्र विक्रीतून त्यांनी गावातच उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील शेती ही लहान लहान तुकड्यांत विभागलेली, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची जमीनधारणा ही तशी कमी आहे. गेल्या काही वर्षांत परिसरातील ऊस कारखान्यांमुळे बरेचसे शेतकरी पारंपरिक भात पिकाऐवजी ऊस शेतीकडे वळले असताना प्रतिकूल परिस्थितीत हा यशस्वी प्रयोग त्यांनी राबवून महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे. पुण्यातून त्यांनी एक भाकड गीर गाय आणून तिच्यावर उपचार म्हणून गाईचेच पंचगव्य देऊन तिला गाभण ठेवल्याचा प्रवास उपस्थितांना या कार्यक्रमात ऐकता येईल.

मोळे आज नाशकात

शेतकरी नामदेव मोळे यांचे नाशिककर आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी १० जून रोजी सायंकाळी ७ वाजता इंदिरानगर येथे बापू बंगल्याजवळ विवेकानंद सांस्कृतिक मंडळाच्या सभागृहात 'प्रबोधन आणि प्रकट मुलाखतीचे' आयोजन करण्यात आले आहे. 'अल्प खर्चात फायद्याच्या शेतीचा मूलमंत्र' घ्यावा, असे आवाहन जनकल्याण समितीचे कार्यवाह मदन भंदुरे, भीमराव गारे, योगिनी चंद्रात्रे यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक, नामदेव मोळे यांच्या कार्य-कर्तृत्वाचे विविध अंग उपस्थितांसमोर उलगडून दाखविणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'घटिका भरत आली; जुलैमध्ये भूकंप'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | नाशिक

'आपली लढाई आपल्या मित्रपक्षासोबतच आहे. ते आपल्याला संपवण्यासाठी चाली खेळताहेत. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जुलै महिन्यात मोठी लढाई आहे. त्यासाठी सज्ज राहा,' असं आवाहन करतानाच, 'घटिका भरत आलीय. जुलैमध्ये राजकीय भूकंप होईल,' असा सूचक इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज दिला.

शिवसेनेच्या संपर्क अभियानाला मार्गदर्शन करताना ते नाशिकमध्ये बोलत होते. शेतकरी आंदोलन आणि समृद्धी महामार्गासाठी होणाऱ्या भूमी संपादनाच्या मुद्द्यांवरून राऊत यांनी भाजपवर चौफेर टीका केली. 'समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडून त्या उद्योजकांच्या खिशात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचा घास घेणारा भूमी अधिग्रहण कायदा शिवसेनेच्या विरोधामुळं थांबला आहे. समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही हा उद्धव ठाकरेंचा शब्द आहे', असं राऊत म्हणाले.

'गेल्या तीन वर्षांत साडेचार हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ज्यांच्या राज्यात आत्महत्या होतात, ते सरकार काय कामाचं,' असा सवाल त्यांनी केला. 'कर्जमुक्तीचे शिवसेनेचे अर्ज घराघरांत पोहोचवा, असं आवाहन शिवसैनिकांना करतानाच, 'आम्हाला सरसकट कर्जमाफी हवीय,' अशी ठाम मागणीही त्यांनी केली.

उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत दिवाकर रावते हे सहभागी होतील. ते मंत्री असल्यानं बैठकीत सहभागी होऊन पक्षाची ठाम भूमिका मांडतील,' असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुलैत राजकीय भूकंप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात सत्ता बदलण्याची ताकद फक्त शिवसेनेतच आहे. त्यामुळे आपली लढाई आपल्या मित्रपक्षासोबतच असून, ते आपल्याला संपवण्यासाठी चाली खेळताहेत. या सरकारची घटिका भरत आली आहे. येत्या जुलैमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल,' असा सूचक इशारा खासदार संजय राऊत यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार ढ निघाल्याचा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

नाशिकमध्ये शिवसंपर्क अभियानासाठी खासदार राऊत, संपर्कमंत्री अजय चौधरी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांशी बोलतांना राऊत यांनी राज्यातील आगामी भूकंपाचे संकेतच दिलेत. राऊत यांनी मुख्यमंत्र्यासह भाजपवरच हल्ला चढवला. गेल्या तीन वर्षांत साडेचार हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ज्यांच्या राज्यात आत्महत्या होतात, ते सरकार काय कामाचं,' असा सवाल त्यांनी केला. कर्जमुक्तीचे शिवसेनेचे अर्ज घराघरात पोहोचवा. भाजपला शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यात, सोडविण्यात अजिबात रस नाही. त्यांना शेतकऱ्यांमध्येच फूट पाडायची आहे.

जुलै महिन्यात महाराष्ट्रात भूकंप होईल, असा इशारा देवून राऊत यांनी मध्यावधी निवडणुकांबाबत सुचक इशाराच दिला आहे.

शिवसेना जनतेच्या प्रश्‍नावर कोणत्याही संघर्षाला घाबरत नाही. शिवसैनीक त्यासाठी तयारच असतो. त्यामुळे राजकीय वातावरण कोणत्या दिशेने जात आहे, काय काय घडामोडी घडत आहेत, याकडे आमचे लक्ष आहेच. शासनाने जो मंत्रीगट जाहीर केला त्यात शिवसेनेचें मत्री दिवाकर रावते यांच्याही समावेश आहे. ते त्या गटात

सहभागी होतील. मात्र, अंतिम भूमिका शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उत्तर महाराष्ट्राने शिवसेनेला साथ दिली तर राज्यात सत्तांतर होवू शकते असा दावाही त्यांनी केला.

सरकारवर ओढलेे ताशेरे

राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या कारभाराचेही वाभाडे काढलेत. भाजपचे सरकार सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर ‘ढ’ निघाले असून, त्यांचा केवळ अभ्यास सुरू असतो. परिक्षा उलटून गेली तरी यांचा अभ्यासच सुरू आहे. शिवसेना अजून रस्त्यावर उतरली नाही. उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरतील तेव्हा भाजपचे मंत्री कार्यालयाबाहेर पडू शकणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-औरंगाबाद हायवे ‘पाण्यात’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

परिसरात सोनेवाडी, कोळवाडी या गावांमध्ये शुक्रवारी पाऊस झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट नाशिक-औरंगाबाद महामार्गावर आल्याने तब्बल साडेतीन तास हा मार्ग बंद होता. शेकडो वाहने यामुळे अडकून पडली होती. निफाड पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने दुभाजक तोडल्यानंतर रात्री ११ वाजता महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

या महामार्गावर आचोळा नाला आहे. निफाड शहराच्या वरच्या भागात पाऊस झाल्यानंतर ते पाणी या नाल्यात वाहत येते. या मार्गाचे चौपदरीकरणानंतर त्यावर पूलही बांधण्यात आला आहे. तरीही पहिल्याच पावसात थेट महामार्गावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. महामार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांनी जुने ओढे, नाले बुजवून त्याच ठिकाणी बंगले बांधले. त्यामुळे पुर्वापार चालत आलेले ओहोळ-नाले बंद झाले. त्यामुळे पाणी निघायला जागा नसल्याने ते थेट रस्त्यावर येते. काही ठिकाणी अक्षरशः कंबरेइतके पाणी साचल्याने नाशिक आणि औरंगाबादकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

निफाडचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे आणि शहरातील तरुणांनी भर पावसात शिवरें फाट्याजवळ परिश्रम घेत रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत केली. जेसीबीच्या साहाय्याने शिवरे फाटा, सानप वस्तीजवळील दुभाजक तोडल्यानंतर रस्त्यावरील पाणी ओरसले. हा महामार्ग बांधकाम विभागाच्या बीओटी विभागाकडे आहे. याची जबाबदारी असणारे संबंध‌ति अभियंता हे कधीही इकडे फिरकत नाही. या मार्गावर पिंपळस फाटा ते बोकडदरे दरम्यान अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याचे टेंडर निघूनही काम सुरू नाही. पर्यायाने हा महामार्ग खड्ड्यांवा महामार्ग झाला आहे. पहिल्याच पावसात ३ ते ४ तास हा मार्ग बंद पडला होता.

प्रवाशांचे प्रचंड हाल

महामार्ग बंद झाल्याने महामार्गाच्या दुतर्फा तीन ते चार किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मूसळधार पाऊसही सुरू असल्याने वाहनांमधील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चेकंपनी ‘चितारणार’ स्मार्ट सिटी...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चिमुरड्यांना स्वतःची चित्रकला चितारता यावी या उद्देशाने ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे चित्रकला स्पर्धा रंगणार आहे. सोमवारी (दि. १२) सकाळी ९ ते ११ या वेळेत ही स्पर्धा मते लॉन्स, सावरकरनगर येथे होईल.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शहरात सध्या विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. या सोहळ्यात बच्चेकंपनीलाही खास स्थान देण्याचे उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकला कलाकृतींचा मोठा वारसा आहे. वा. गो. कुलकर्णींपासून ते शिवाजीराव तुपे अशा अनेक दिग्गज चित्रकारांची परंपरा नाशिकला आहे. त्यापाठोपाठ आता अनेक कलाकृतींत नाशिकचे कलाकार स्वतःला सिद्ध करत आहेत. शहरातल्या प्रत्येक कलाकारात स्तुत्य कलागुण दडले आहेत. विशेष म्हणजे, नाशिकच्या लहानग्यांमध्ये कलाकुसरीचे कमालीचे टॅलेंट बघायला मिळते. याचदृष्टीने शहरात चित्रकलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि लहान कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी ‘मटा’ने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी ‘स्मार्ट सिटी’ ही थीम ठेवण्यात आली असून, शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी आपले कलागुण इथे रेखाटणार आहेत. आपल्या कल्पनेतून स्मार्ट सिटी कशी असावी याचे चित्र बच्चेकंपनी साकारणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत कुंचल्याच्या साहाय्याने रंगांची उधळण करीत चित्रे रेखाटता येणार आहेत. त्यासाठी कोणतीही नावनोंदणी किंवा प्रवेश शुल्क नाही.

कलाकरांनी साधावा संपर्क

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइल क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा.

बक्षिसांची होणार लयलूट

‘स्मार्ट सिटी’ हा विषय असलेली ही स्पर्धा पाचवी व सहावी (एक गट), सातवी व आठवी (दुसरा गट), नववी व दहावी (तिसरा गट) अशा तीन गटांत होणार आहे. विद्यार्थ्यांना कागद ‘मटा’तर्फे पुरविण्यात येणार असून, इतर साहित्य (पेन्सिल, खोडरबर, रंग) विद्यार्थ्यांनी घरून आणावयाचे आहे. या ठिकाणी चित्र काढण्यासाठी भारतीय बैठकीची व्यवस्था असल्याने बसण्यासाठी छोटी सतरंजी व कागद धरण्यासाठी प्रत्येकाने पॅड आणायचे आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

--

‘कलासंगम’मध्ये आज वादन, नृत्य

मविप्रच्या आर्किटेक्ट कॉलेजमध्ये आयोजित कलासंगम मटा आर्ट फेस्टमध्ये आज, रविवारी ( दि. ११) हौशी कलाकारांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत आपली कला सादर करता येणार आहे. शिल्पकार यतिन पंडित सकाळी ११ वाजता स्क्रॅब कला सादर करतील. सायंकाळी ५ वाजता नृत्यांगना रेखा नाडगौडा, सुमुखी अथनी आणि कीर्ती भवाळकर नृत्य सादर करतील. नितीन वारे व नितीन पवार यांचे शिष्य तबलावादन करतील. ६.१५ ते ६.४५ या कालावधीत मोहन उपासनी यांचे शिष्य बासरीवादन करतील. ७ ते ७.३० या कालावधीत अष्टुरकर आणि ग्रुपचे सतारवादन होईल. ७.४५ ते ८.४५ या कालावधीत तीनही नृत्यांगना व त्यांच्या शिष्या कला सादर करतील. रात्री ९ ते ९.३० या कालावधीत नरेंद्र पुली व त्यांचे शिष्य गिटारवादन करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत विदेशी सिगारेटचा साठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंदी घालण्यात आलेल्या विदेशी कंपन्यांच्या सिगारेटचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. सिडकोतील एका व्यावसायिकाच्या गोडावूनवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई येथील पथकाने ही कारवाई केली. या ठिकाणी सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चेतन गोविंद मुसळे (रा. ओमनगर, लक्ष्मी स्विटच्या बाजूला, सिडको) या व्यावसायिकाविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे दिवेश जितेंद्र गुप्ता (रा. अल्पाभुवन बोरीवली, मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. गुप्ता यांनी मुसळे विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. सिडकोतील शिवशक्तीचौकातील एका गोडावूनमध्ये अवैधरित्या विदेशी सिगारेटचा साठा करण्यात आल्याची माहिती या पथकास मिळाली होती. पथकाने शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गोडावूनवर छापा टाकला असता सुमारे दोन लाख २४ हजार २५० रुपये किमतीचा विविध विदेशी कंपनीच्या साठा हाती लागला. विदेशी कंपन्यांच्या सिगारेट पॉकीटवर आरोग्यास हानी होण्याबाबत कोणताही इशारा नसतो. केंद्र सरकारने या संबंधी कायदा केला असून, विदेशी कंपन्याकडून त्याचे पालन होत नसल्याने ही कारवाई केली जाते. घटनेचा अधिक तपास हवालदार मते करीत आहेत.

दागिने लांबविले

घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरणीने लाखाचे दागिणे लंपास केल्याची घटना गंगापूररोड परिसरात घडली. या प्रकरणी उषा खांडेकर (रा. शिवाजीनगर) या महिलेविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासऱ्याकडून जावयास मारहाण

नाशिक ः कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची पोलिसात तक्रार दिल्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या सासऱ्याने जावयास मारहाण केली. ही घटना सावरकरनगर भागात घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शक्ती मधूकर टर्ले (रा. पंचवटी कारंजा) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. टर्ले यांच्या तक्रारीनुसार, टर्ले पती पत्नीत रविवारी वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामुळे टर्ले यांनी आपल्या पत्नीविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, याचा राग आल्याने सासरे त्र्यंबक अंबुजी शेळके (रा. मेहरधाम, पंचवटी) यांनी आपल्या जावयास गंगापूर पोलिस स्टेशनजवळील स्प्रिंग फिल्ड टॉवर परिसरात गाठले. मुलीविरोधात पोलिसांकडे तक्रार का दिली याचा जाब विचारत शेळके यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचे टर्ले यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तरुणाची आत्महत्या

सिडकोतील पाटीलनगर भागात ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोकूळ सुदाम पाटील (रा. ओंकार चौक, पाटीलनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई दंड भरण्यास टाळाटाळ!

$
0
0

८० टक्के वाहनचालकांकडून इतर पर्यायांची निवड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ई चलन सुरू झाल्यापासून वाहतूक पोलिसांनी तब्बल ४५९ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. मात्र, यातील फक्त ८६ वाहनचालकांनी लागलीच कार्डद्वारे पेमेंट केले. उर्वरित तब्बल ३७३ वाहनचालकांनी इतर पर्यायांनी दंडाची रक्कम भरण्यास प्राधान्य दर्शवले. या वाहनचालकांनी वेळेत पैसे जमा केले नाही, तर सदर प्रकरण कोर्टात पाठविण्यात येणार आहे. मात्र, यामुळे तांत्रिक कामाचा ताण वाढण्याची शक्यता वाहतूक पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

वाहतूक पोलिसांकडून पूर्वी दंडात्मक कारवाई करताना पावती फाडली जाई. मात्र, यामुळे भ्रष्टाचार करण्यास वाव मिळत होता. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ई चलन पध्दती सुरू करण्यात आली. २ जून रोजी ई चलन प्रक्रियेचा औपचारिक शुभारंभ झाला. या पध्दतीमुळे पावती पुस्तक इतिहास जमा करण्यात आले. त्याऐवजी पोलिसांकडे स्वाइप मशिन्स देण्यात आले. बेशिस्त वाहनचालकाकडून दंड वसूल करताना ई पध्दतीचा वापर सुरू झाला. या बाबत बोलताना सूत्रांनी सांगितले, की जागेवर दंड भरण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे विपूल प्रमाणात स्वाइप मशिन्स उपलब्ध आहेत. मात्र, वाहनचालक जागेवर कार्ड वापरून दंड देण्यास इच्छुक नसल्याचे दिसते. ई चलन पध्दतीनुसार वाहतूक विभागाने पहिल्याच दिवशी ८१ वाहनचालकांवर कारवाई केली होती. आता हा आकडा ४५९ पर्यंत पोहचला आहे. मात्र, कारवाई झालेल्या वाहनचालकांपैकी फक्त ७७ जणांनी जागेवर दंड भरला.

उर्वरित ३७३ वाहनचालकांच्या वाहनांचे फोटोग्राफ्स पुरावे म्हणून घेण्यात आले आहेत. शिवाय, वाहनचालकाचे लायसन्स किंवा आधारकार्ड जमा करण्यात येते. मात्र, या वाहनचालकांकडून आठ दिवसांच्या आत दंडाची रक्कम वसूल करणे, ही तारेवरची कसरत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते. जागेवर कार्डद्वारे दंड भरू न शकणारे वाहनचालक व्होडोफोन कंपनीच्या आउटलेटमध्येही दंडाची रक्कम जमा करू शकतात. दंड झालेल्या वाहनचालकाच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठवण्यात येते. ही लिंक ओपन करून वाहनचालक ऑनलाइन पध्दतीने दंडाची रक्कम भरू शकतो. याशिवाय वाहनचालक प्रत्यक्ष वाहतूक शाखेत दंडाची रक्कम जमा करू शकतो. ई चलन पध्दतीमुळे मुंबईत हजारो वाहनचालकांचे फावल्याचे दिसते.

शेवटी कोर्टाचा पर्याय

वाहनचालकास कोर्टात पाठवण्याची तरतूद पोलिस वापरू शकतात. मात्र, त्यामुळे कामांचा ताण वाढू शकतो, असा दावा केला जात आहे. या घडामोडींचा आढावा घेऊन वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे वाहतूक शाखेचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images