Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मेंटेनन्समुळे उद्या पाणीपुरवठा नाही

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणावरील पंप‌िंग स्टेशन येथील महावितरण कंपनीची एक्सप्रेस फिडर लाइनची देखभाल-दुरुस्ती व पाणीपुरवठ्याची विविध ठिकाणची कामे केली जाणार आहेत. या कामासाठी शनिवार १० जून रोजी वीज पुरवठा सकाळी १० ते रात्री ७ पर्यंत बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे शनिवारचा संपूर्ण नाशिक शहराचा (नाशिकरोडसह) दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल, असे पत्रक नाशिक महानगरपालिकेने प्रसिध्दीस दिले आहे.

यात शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रास पाणी पुरवठा करणाऱ्या पंपसेट्सचे व्हॉल्व दुरुस्ती करणे, ३३ केव्ही सबस्टेशनमधील दुरुस्ती, चेहेडी पंप‌िंग स्टेशन येथील उर्ध्ववाहिनीची दुरुस्ती, कालिका पंपिंग स्टेशनमधील नवीन पॅनलची व केबलची जोडणी, कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्ती, गंगापूर डॅम पंपिंग स्टेशन येथील ९०० म‌िमी व्यासाच्या रायझिंग मेनवरील व्हॉल्वची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यापारी बँकेसाठी आज माघारीची मुदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची आज (दि. ९) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतरच निवडणूक रिंगणात किती उमेदवार व किती पॅनल उभे ठाकतात, हे स्पष्ट होणार आहे.

निवडणूक २५ जूनला असली तर उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे.

२१ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले होते. या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवारांनी सहकार आयुक्तांकडे दाखल केलेले अपिल फेटाळण्यात आले. सहकार व श्रीव्यापारी पॅनलच्या काही उमेदवारांची नावे निश्‍चित झाली आहेत. मात्र, अद्याप काही उमेदवारांबाबत निर्णय घेण्याचे बाकी आहे. श्रीव्यापारी पॅनलतर्फे काही विद्यमान संचालकांची नावे निश्‍चित झाली असून, तेथेही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. सत्तारूढ सहकारकडून सत्ता ताब्यात घेण्यासाठी श्रीव्यापारी पॅनलने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सहकार पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे करत असून, त्यांना शाम चाफळकर, रामदास सदाफुले, सुधाकर जाधव, मनोहर कोरडे, सुरेश गायकवाड, डॉ. प्रशांत भुतडा आदींची साथ मिळत आहे. श्रीव्यापारी पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे शहराचे लक्ष लागले आहे. आजी-माजी जिल्हाप्रमुखच एकमेकांविरुध्द उभे ठाकल्याने शिवसैनिक गोंधळात पडले आहे. प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. सहकार पॅनलने काल कोटमगाव, सामनगाव तसेच नाशिकरोडच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. श्रीव्यापारी पॅनलचे संभाव्य उमेदवार हेमंत गायकवाड, राजीव टर्ले, विलास पेखळे, सतीश मंडलेचा, सुदाम ताजनपुरे, अनिल ताजनपुरे, प्रकाश गोहाड, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, चंद्रकांत विसपुते, शांताराम घंटे, योगेश नागरे, शिरीष लवटे, शाम गोहाड, विक्रम खरोटे आदींनी जेलरोड परिसरात दौरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचे पुढचे दिवस वाईट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लुटुपुटूच्या लढाया खूप झाल्या. आता आंदोलन असे करा की दिल्ली खडबडून जागी झाली पाहीजे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी नाशिकमध्ये केले. जेवढा शेतकऱ्यांना त्रास द्याल तेवढे सरकारचे पुढचे दिवस वाईट जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

शेट्टी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तुम्ही पक्षात इनकमिंगचा विचार करत आहात. परंतु, पक्षात आता काळे कुत्रे देखील येणार नाही. शेतकरी हितासाठी आयुष्यभर झटणाऱ्या माधवराव मोरे यांच्या शाळेतील आम्ही विद्यार्थी आहोत. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन उभे करण्यात आले. परंतु पोलिसांना हाताशी धरून सरकारने शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करणारे दमतात की, शेतकरी हे आता तुम्ही बघाच असा इशारा शेट्टी यांनी सरकारला दिला. आंदोलनात शेतकरी कोण आणि गुंड कोण हे आम्हाला माहीत असल्याचे वक्तव्य अल‌िकडेच मुख्यमंत्र्यांनी केले. आता तुम्हाला आम्ही गुंड दिसू लागलो का, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थ‌ित केला. गुन्हे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावून घ्यायचे आणि त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणायचा असा सरकारचा डाव असल्याचा आरोप शेट्टी यांन‌ी केला. तुम्ही इनकमिंगचा विचार करताय. परंतु पक्षातून आऊटगोईंग सुरू झाले आहे.

आंदोलकांच्या कुंडल्या आपल्याकडे असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा शेट्टी यांनी समाचार घेतला. मी कोल्हापूरच्या कुस्तीतला माणूस आहे. पहिले माझीच कुंडली बाहेर काढा. शेतकऱ्यांची चळवळ मोडण्याचा विचार केलात तर सरकारचे काही खरे नाही असा इशाराही त्यांनी आला.

मोदींना ‘स्वामीनाथन’ कळलाच नाही

गुजरातमध्ये अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी राज्यात कृषीक्षेत्राने प्रगती केल्याचे निवडणुकीपूर्वी सांगत होते. शेतकऱ्यांना शेती व्यवसायात स्थ‌िरस्थावर करू, असे आश्वासन मोदी यांनी निवडणूकीपुर्वी दिले. त्यांनी हे आश्वासन पाळले असते तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज नसते. देशाची अवस्था ‘मर जवान मर किसान’ अशी असल्याबद्दल शेट्ट‌ी यांनी खंत व्यक्त केली. मोदींना स्वामीनाथन आयोग समजलाच नसल्याची टीका यावेळी करण्यात आली.

गोळ्या झाडल्या तर थडग्यात घालू

सभेच्या सुरुवातीलाच आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि मध्यप्रदेशतील गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्प्ट झाले नाही. परंतु त्यांचे कर्ज दुप्पट झाले आहे. शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तर शेतकरी तुम्हाला थडग्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

भाजपचा प्रचार केल्याचा पश्चाताप

ज्या हातांनी तुम्हाला सत्ता दिली. ती सत्ता घालविण्याची ताकद मनगटात असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. भाजपचे सरकार सत्तेवर यावे यासाठी प्रचार केल्याचा पश्चाताप होतो आहे अशी जाहीर कबूली शेट्टी यांनी या सभेत दिली. शेतकऱ्यांना आतापर्यंत सर्वांनी वापरून घेतले. परंतु आता शेतकऱ्यांना पाठींबा दर्शविणाऱ्या सर्वांची मदत घेतली जाईल असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. २०१९ पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असेल किंवा सरकार पडलेले असेल. सरकारला लाल किल्ला विसरण्यास भाग पाडू, असा यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतिराजांच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींचे वटपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जरीची साडी, नाकात नथ, केसांत माळलेला गजरा, बांगड्या अशी आभुषणे परिधान करीत शहरातील सुवासिनींनी गुरुवारी मनोभावे वटपौर्णिमा साजरी केली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी कामना करीत पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींनी यावेळी प्रार्थना केली. शहरभरात ठिकठिकाणी सुवासिनींनी वटपूजन केले.

वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला दीर्घायुष्य असते तसेच पतीला दीर्घायुष्य लाभो व जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी प्रार्थना करीत वडाचे पूजन केले जाते. त्यामुळेच या सणाला महिलांच्या दृष्टीने विशेष महत्त्व असते. गुरुवारी नववधूंमध्ये तर या सणाविषयी अधिक उत्सुकता दिसून आली. एकमेकींच्या कपाळाला हळद-कुंकू लावत आंब्याचे वाण देऊन महिलावर्गाने हा सण साजरा केला.

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी या सणाच्या पूर्वसंध्येपासून, तर गुरुवारी सकाळीदेखील बाजारात सुवासिनींची लगबग होती. यंदा पौर्णिमा दुपारी ४.३० वाजेनंतर लागल्याने पूजा केव्हा करावी, याबाबत अनेकांच्या मनात संदिग्धता होती. परंतु, गुरुवारी वटपौर्णिमा साजरा करण्याला अनेकींनी प्राधान्य दिले. वडाच्या झाडाला वंदन करून त्यापुढे पान, सुपारी, फुले ठेवून पूजा करण्यात आली. आंबे व इतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

---

देवळालीत उत्साह

देवळाली कॅम्प : देवळाली परिसरात महिलांकडून वटपौर्णिमेनिमित्त अखंड सौभाग्यासाठी एकमेकींना हळदी-कुंकू लावून व ओटी भरून वटपूजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील महिलांत या सणाचा उत्साह दिसून आला.

देवळालीतील लामरोड परिसरात अनेक वटवृक्ष असून, अखंड सौभाग्यासह सात जन्मांच्या नात्यासाठी या वटवृक्षांना सात फेऱ्या मारत सुताचा धागा गुंडाळून महिलावर्गाकडून पूजन करण्यात आले.

---

सिडकोत वृक्ष लागवडीचा संकल्प

सिडको ः येथील श्रीराम मंदिरात महिलांनी अखंड सौभाग्यासह सात जन्मांच्या नात्यासाठी वटवृक्षाचे पूजन करून वृक्ष लागवडीचा संकल्प केला. विशेष म्हणजे यावेळी सर्व महिलांनी पौरोहित्य केले.

परिसरात ठिकठिकाणी वटपूजन झाले. उत्तमनगर येथील श्रीराम महिला मंडळाच्या सदस्यांनी विजया उपासनी यांच्या पौरोहित्याखाली वटपूजन केले. वृक्षांच्या घटणाऱ्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी झाडे लावा, झाडे जगवाचा संकल्प केला.

--

धार्मिक सण साजरे करण्यामागे निसर्गाचेही रक्षण केले जाते. आम्ही वटपौर्णिमा आधुनिक पद्धतीने साजरी करून वृक्षरोपणाचा संदेश दिला.

-विजया उपासनी, महिला पुरोहित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या रजिस्ट्रेशन नंबरने भुर्दंड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुझुकी मोटरसायकलच्या आरटीआे रजिस्ट्रेशनमध्ये दुसऱ्याचा गाडीचा चेसिस, इंजिन नंबर व उत्पादन तारीख आरसी बुकमध्ये आल्याने संबंधित शोरूमविरोधात ग्राहक न्यायमंचात तक्रार करणाऱ्या नवनाथ खरपुडे यांना दिलासा मिळाला आहे. या दुचाकी गाडीची रजिस्ट्रेशनची जबाबदारी स्पीड मशिन इंडिया या सुझुकी मोटरसायकलच्या संचालकांनी घेतली होती. पण, त्यांनी वारंवार चूक दुरुस्त करण्याची मागणी करूनही टाळाटाळ केल्यामुळे या संचालकांना दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

खरपुडे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सुझुकी कंपनीचे जीएस १५० हे वाहन स्पीड मशिन इंडियामधून विकत घेतले. त्यांनी वाहन आरटीआे रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानुसार १५ दिवसांनी त्यांनी आरटीआे रजिस्ट्रेशन केल्याचे आरसी बुक दिले. मात्र, या आरसी बुकमध्ये चेसिस, इंजिन नंबर वेगळा होता, तर उत्पादन तारीख वाहन विक्री केल्यानंतरची नमूद करण्यात आली होती. सदर चूक वाहनाच्या कर्जफेडीनंतर दुरुस्त करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यानंतर संपूर्ण कर्ज परतफेड केल्यानंतर कार्यवाही केली नाही. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस करून सेवा देण्यात कमतरता केली.

या तक्रारीवर न्यायमंचात बाजू मांडतांना स्पीड मशिनतर्फे सांगण्यात आले, की चूक करून देण्यास आम्ही सदैव तयार आहोत. आम्ही सेवा देण्यास कमी केलेली नाही.

---

असा दिला निकाल

न्यायमंचाने निकाल देताना म्हटले, की प्रत्यक्ष वाहन विक्री करण्यात आलेल्या व ताब्यात देण्यात आलेल्या वाहनाचा चेसिस व इंजिन नंबर, तसेच रंग, उत्पादन तारीख वेगळी आहे. झालेली चूक तत्काळ दुरुस्त करून देणे आवश्यक होते. मात्र, सेवा देण्यात कमतरता केली आहे. त्यामुळे स्पीड मशिनने आरसी बुकमध्ये स्वखर्चाने आरटीआेकडून दुरुस्ती करून द्यावी. त्याचप्रमाणे सात हजार रुपये शारिरिक त्रासापोटी व अर्जाचा खर्च तीन हजार रुपये द्यावेत. न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी हा निकाल दिला. खरपुडे यांच्यातर्फे अॅड. के. एस. शेळके यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना, भाजप आमदारांचा कर्जमाफी ठरावाला नकार

$
0
0

धुळे जिल्हा नियोजन बैठकीत आमदारांत शाब्दिक चकमक

म.टा.वृत्तसेवा,धुळे

शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात यावा, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. मात्र यावेळी भाजपचे आमदार अनिल गोटे व आमदार कुणाल पाटील यांच्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी कुसूंब्याला ट्रामा केअर सेंटरची जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी उभारण्यात यावी यावरूनही माजी आमदार प्रा,शरद पाटील व जिल्हा परिषद शिक्षण सभापती मधुकर गर्दे यांच्यातही जोरदार वाद झाला. या प्रकारामुळे बैठक दीड तासात गुंडाळण्यात आली.

धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. ७) झालेल्या नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला. यावेळी कर्जमाफीचा एक ओळीचा ठराव करण्यात यावा, अशी मागणी विरोधी आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, मधुकर गर्दे करीत असताना भाजप व सेना पक्षांतील सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हाती घेऊन शिवसेना जिल्हाभरात आंदोलने करीत आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार दादा भुसे, भाजपचे आमदार जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे यांनी या ठरावाला नकार दर्शविला. त्यामुळे हा सरकारचा ढोंगीपणा असल्याचे विरोधकांनी यावेळी सांगितले.

बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, आमदार डी. एस. अहिरे, आमदार कुणाल पाटील, आमदार काशिराम पावरा समितीचे सदस्य व जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कोणताच निर्णय नाही

या सभेला सुरुवात झाल्यानंतर आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठराव करण्याची मागणी केली असता यावेळी पालकमंत्री भुसे व रावल यांनी हा विषय मुख्यमंत्री घेऊन तडीस तेच लावतील, असे सांगितले. तर आमदार गोटे यांनी अक्कलपाडा प्रकल्प, शहर पाणी पुरवठा योजना, तसेच शहरातील अतिसंवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह अन्य विषयांवर चर्चा होऊन बैठक गुंडाळली. या सभेत महत्त्वपूर्ण कोणताही निर्णय झाला नसला तरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी आमदार कुणाल पाटील यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

कोट००

जिल्हा नियोजनाच्या बैठकीत शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवसेना आणि भाजपच्याच मंत्र्यांकडून याला नकार मिळाल्याने सरकारचा ढोंगीपणा समोर आला आहे. ते फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांना शेतकऱ्यांविषयी कोणतीही कळकळ नाही.

कुणाल पाटील ग्रामीण आमदार, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही जलआंदोलन सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सरकारने दोन दिवसांत योग्य तो निर्णय न घेतल्यास आम्ही दोन दिवसांनंतर अन्नत्याग करू आणि वेळ आल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला. या शेतकऱ्यांनी बुधवारपासून (दि. ७) साहूर गावालगत तापी नदीपात्रात आंदोलन सुरू केले आहे. बुधवारची रात्र आणि आता गुरुवारी सलग दोन दिवस आंदोलन सुरू असून, हे आंदोलनकर्ते तापी नदीच्या पात्रातून मागे हटण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयातून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत जलआंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारक नूतनीकरण वादात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हुतात्मा स्मारकाला अवकळा आली असून, तातडीने या ठिकाणच्या दुरुस्तीला सुरुवात करावी, अशी मागणी जोर धरत होती. याची दखल घेऊन महापालिकेने या स्मारकाच्या दुरुस्ती कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र, हे काम स्वातंत्र्यसैनिकांना अंधारात ठेवून केले जात असल्याचा थेट आरोप ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांनी केला आहे. त्यामुळे हे काम वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आणि प्रेरणा देणारा साक्षीदार म्हणून हुतात्मा स्मारक ओळखले जाते. याच स्मारकाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने निविदा काढली आहे. ७ लाख ४६ हजार ११८ रुपये खर्चून या ठिकाणी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. मात्र, या कामाबाबत हुदलीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हुतात्मा स्मारकात स्वच्छतेसाठी केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. स्मारकाचे आवार मोठे आणि कर्मचाऱ्यांची संख्या एक असल्याने त्याच्या कामावर ताण पडतो. त्यामुळे हवी तशी स्वच्छता होत नाही. याबाबत महापालिकेत अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु, याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही.

या ठिकाणी दुरुस्ती करण्याची तयारी काही आमदारांनी दर्शविली होती. परंतु, त्याकडे पुन्हा दुर्लक्ष होत आहे. एका आमदारांनी या ठिकाणचे झाडे तोडून इमारत बांधण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, स्वातंत्र्यसैनिकांच्या संस्थेने झाडे तोडण्याला मनाई केल्याने हे प्रकरण थांबवावे लागले होते. या ठिकाणची दुरुस्ती हवी आहे. परंतु, येथील झाडाझुडपांना हात लावू, नये असे स्वातंत्र्यसैनिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने या ठिकाणची नुकतीच पाहणी केली. परंतु, स्वातंत्र्यसैनिकांना विश्वासात घेतले नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. आमच्या गरजेनुसार या ठिकाणी काम होणे आवश्यक आहे, असे हुदलीकर यांनी सांगितले.

--

अशी आहे सद्यस्थिती

या स्मारकाचे काम १९८० मध्ये करण्यात आले. याचा पाया मातीत असल्याने इमारत खचत आहे. अनेकदा काम करूनदेखील पाया मजबूत नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणच्या फरशा उखडल्या असून, पावसाळ्यात जमिनीखालून पाणी वर येते. सर्व स्मारकाची वायरिंग उखडली असून, बहुतांश लाइटचे पॉइंट बिनकामाचे झाले आहेत. या वायरिंगमुळे शॉक लागून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरिता येथील वायरिंगचे काम तातडीने करणे गरजेचे आहे. दरवाजांसह त्यांच्या फ्रेमही खराब झाल्या आहेत, तेदेखील बदलणे गरजेचे आहे.

--

महापालिका काही तरी काम करणार असल्याचे ऐकिवात आले आहे. याबाबत आमच्याशी संपर्क साधलेला नाही. आम्हाला विचारल्यास डागडुजी न करता सगळे काम करा, असा सल्ला आम्ही देणार आहोत.

-वसंतराव हुदलीकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात काँग्रेस-शिवसेना युतीचे संकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक येत्या १४ जून रोजी होत असून, गुरुवारी काँग्रेसकडून नगरसेवक रशीद शेख तर शिवसेनेकडून सखाराम घोडके यांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, निकालानंतर त्रिशंकू स्थिती झालेल्या पालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू असतांना काँग्रेस व शिवसेनेची युती होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

८४ नगरसेवक असलेल्या महापालिकेत निकालानंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेस २८ जागा जिंकत मोठा पक्ष ठरला. तर राष्ट्रवादी जनता दल आघाडीलादेखील २६ जागांवर विजय मिळाला. एक अपक्षही राष्ट्रवादीच्याच गोटात गेल्याने त्यांचे संख्याबळ २७ झाले. शिवसेनेला १३, भाजप ९ आणि एमआयएमला ७ जागा मिळाल्या. त्रिशंकू स्थितीत असलेल्या पालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना व एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस व राष्ट्रवादीकडून सत्तेसाठी सेनेला सोबत घेण्याबाबत बोलणी सुरू असून, शिवसेनेला उपमहापौर पद हवे असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी काँग्रेसकडून माजी आमदार तथा नगरसेवक रशीद शेख यांनी महापौरपदासाठी दोन अर्ज दाखल केले. त्यापैकी एका अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे नगरसेवक नारायण शिंदे तर अनुमोदक म्हणून गटनेते नीलेश आहेर यांची नावे आहेत. सेनेकडून उपमहापौरपदासाठी नगरसेवक घोडके यांनी देखील दोन अर्ज दाखल केले असून, त्यापैकी एका अर्जावर काँग्रेस नगरसेवक अन्सारी मो. अस्लम खालिद अहमद सूचक तर फकीर मो. शेख सादिक अनुमोदक म्हणून नावे आहेत. यावरून पालिकेच्या सत्ताकारनात काँग्रेस-शिवसेना युतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीनेदेखील महापौरपदाची आशा सोडली नसून, नगरसेवक नाबी अह. अहमदुल्ला यांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान सत्तेसाठी ४३ नगरसेवकांची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास ४१ इतके संख्याबळ होते. त्यामुळे त्यांना सत्तेसाठी एमआयएमला विश्वासात घ्यावे लागेल. एमआयएमचे सात नगरसेवक असून, त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास काँग्रेसचा महापौर व सेनेचा उपमहापौर होणे निश्चित मानले जात आहे.

एमआयएमला स्वीकृत नगरसेवक?

८४ नगरसेवक असलेल्या महापालिकेत ५ स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. या मध्ये सहगुनकाच्या आधारे काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे (मालेगाव महागठबंधन आघाडी) दोन, शिवसेनेचे एक याप्रमाणे स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. राष्ट्रवादी व जनता दलाच्या आघाडीमुळे भाजपचे स्वीकृत नगरसेवक पद जाण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसची सत्ता स्थापन व्हावी यासाठी एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्यास त्यामोबदल्यात त्यांना काँग्रेसच्या कोट्यातून एक स्वीकृत नगरसेवक पद दिले जाऊ शकते.

गटनेत्यांची निवड

महापौर निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्षांनी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी केली असून, राष्ट्रवादी व जनता दल यांनी एकत्र येत मालेगाव महागठबंधन आघाडी स्थापन करून गटनोंदणी केली आहे. गटनोंदणी नंतर आघाडीच्या गटनेतेपदी जनता दलाचे बुलंद इक्बाल यांची निवड करण्यात आली. काँग्रेसने माजी महापौर ताहेरा शेख, शिवसेनेने नीलेश आहेर, एमआयएमने डॉ. खालिद परवेज, भाजपने सुनील गायकवाड यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडा टाकणाऱ्या तीन जणांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मेरी-दिंडोरी रोडवर सहा जणांचे टोळके दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती गुरुवारी (दि. ८) पहाटेच्या सुमारास पंचवटी पोलिसांना मिळाली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, अन्य तीन जण फरार झाले. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मेरी-दिंडोरी रोडवरील मातोश्री निवासजवळ तलाठी कॉलनीच्या मागील मोकळ्या मैदानात गुरुवारी पहाटेच्या सुमारास काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी त्वरित गस्तीवरील पोलिसांनी ही माहिती कळविली. त्यांनी ताबडतोब या ठिकाणी धाव घेत गणेश गौतम गायकवाड (१९), सागर गमपत बोडके (१९) आणि मदन मारुती पवार (३२) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टॉपर, कालडी दांडा, नायलॉन दोरी, मिरची पूड आदी साहित्य मिळून आले. सुनील उर्फ गटऱ्या गायकवाड, दीपक उर्फ दव वळवी आणि सागर शिंदे हे तीन जण पळून गेले.

हे सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारी होते. यातील काही जणांवर या आधीचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस हवालदार गवळी यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक देवरे पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्यांचे सत्र शहरात थांबेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पंचवटीसह सातपूर व सिडको परिसरात चार घरफोड्या झाल्या असून यात चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरी केला आहे. या प्र्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पेठरोड भागातील दुर्गानगर परिसरात राहणारे ज्ञानेश्व रामराव गुंजाळ (रा. शिवराष्ट्र सोसायटी) यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. ३१) गुंजाळ कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, साड्या, कॅमेरा व लॅपटॉप असा सुमारे ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक वाघचौरे करीत आहेत.

घरफोडीची दुसरी घटना सिडकोतील गणेश चौक परिसरात घडली. यात चोरट्यांनी ५७ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरी केला. कैलास शिवराम गुरव (रा. एमएसईबी मागे, गणेशचौक) यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी सकाळी गुरव कुटुंबीय घराबाहेर गेले होते. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा कापून त्यांच्या घरात प्रवेश केला. तसेच, कपाटातील सोन्याचे दागिणे, रोकड व मोबाइल असा ऐवज चोरी केला. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.

टीव्ही, मिक्सरची चोरी

सातपूर : सातपूर कॉलनीतील शिवनेरी गार्डन भागात राहणारे भाऊसाहेब शिवराम चव्हाण हे बुधवारी रात्री पाळीसाठी कामावर गेले होते. चोरट्यांनी त्यांचे व शेजारी राहणाऱ्या विशाल आहेर यांच्या बंद घरांचा कडीकोयंडा तोडला.
चोरट्यांनी चव्हाण यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ३१ हजाराचा तर आहेर यांच्या घरातून एलईडी टीव्ही, मिक्सर आणि रोकड असा हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
सातपूर कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका कंत्राटी कामगारांच्या घरातही चोरी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, घरात काहीच न सापडल्याने चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त करीत पळ काढला. तसेच सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयाच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनतळावरून आयशर गाडीही चोरट्यांनी पळविली असल्याची तक्रारी रतन पवार यांनी सातपूर पोलिसात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वटपूजेनंतर ओरबडले महिलेचे मंगळसूत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करून घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना नारायणबापू चौकात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा मधूकर कोकाटे (रा. रवीनारायणी रो हाऊस, श्रीरामनगर, जेलरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सीमा कोकाटे वा त्यांच्या जाऊबाई गुरूवारी (दि. ८) दुपारी वटपौर्णिमेनिमित्त नारायणबापू चौकात गेल्या होत्या. साडे तीन वाजेच्या सुमारास पूजा आटोपून घराकडे परतत असताना चोरट्यांनी संधी साधली. टाकळीरोडने घराकडे पायी परतत असताना लाल रंगाच्या दुचाकीवर समोरून दोन चोरटे आले. त्याच्यापैकी एकाने कोकाटे यांच्या गळ्यातील ७५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तोडले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

घरासमोरून गायींची चोरी

घरासमोर बांधलेल्या गायी चोरीला गेल्याची घटना वंजारवाडी (ता. जि. नाशिक) येथे घडली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदू पुंजा शिंदे (रा. राममंदिररोड, वंजारवाडी) यांच्या तक्रारीनुसार, शिंदे यांच्या प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीच्या दोन गायी बुधवारी रात्री त्यांच्या घरासमोर बांधलेल्या असतांना चोरी केल्या.

महिलेस धमकी

महिलेच्या फोटोचा वापर करीत बनावट फेसबुक अकाउंट सुरू करून महिलेस बदनामीची धमकी देणाऱ्या विकी श्रीवास्तव या संशयिताविरूध्द सायबर पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर रोडवरील गुलमोहर कॉलनीत राहणाऱ्या २० वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपीने पीडीत महिलेच्या छायाचित्राचा गैरवापर करीत फेसबुकवर बनावट अकाउंट सुरू केले. काही दिवसातच हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. त्यानुसार पीडीत महिलेने संशयिताशी संपर्क साधला. मात्र, संशयिताने पीडीत महिलेला धमकी दिली. भेटण्यास यावे; अन्यथा पतीस सोशल मीडियाद्वारे तुझे फोटो पाठविले जातील, अशी धमकी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार खेळणारे २३ जण ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

वाल्मिकनगर येथे अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या २३ जणांना पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. गुरुवारी (दि. ८) रात्रीच्या साडेदहा वाजेच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. त्यात ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले.

वाल्मिकनगर येथील क्षीरसागर कॉलनीतील एका खोलीत काही दिवासंपासून अवैधरित्या जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस मुख्यालयास मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आपल्या सोबत सरकारी लवाजमा न घेता खासगी रिक्षाने या ठिकाणी येऊन छापा टाकला. त्यांनी सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक (गुन्हे) आनंद वाघ यांना बोलावून घेतले. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ३७ हजार रोख रकमेसह ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या छाप्यात बाळू पाटील, सतीश पाटील, मधुकर मोरे, बबलू थापा, मोहम्मद अन्सारी, संदीपकुमार प्रदीपसिंह, मोहन सोनवणे, दीपक पवार, राजू वाघमारे, राज बोंडे, नीलेश मलहा, राकेश पवार, उदय पाटील, गिरीश धोंगडे, दत्तात्रय मोरे, योगेश रणमाळे, दीपक पवार, किरण राजगुरू, मंहेश बैरागी या २३ जुगारींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस हवालदार प्रवीण कोकाटे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शाळेजवळ जुगार
नाशिक : महापालिका शाळेच्या आवारात जुगार खेळणाऱ्या चौघा तरूणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळा गणपत जाधव, मोहसीन शब्बीर शेख, सिराज रफिक शेख व कलाल रफिक शेख (रा. सर्व पंचशीलनगर, गंजमाळ) अशी संशयितांची नावे आहेत. पंचशीलनगर येथील महापालिका शाळा क्रमांक सहाच्या आवारात काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना बुधवारी रात्री मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी रात्री साडेदहा वाजता शाळेच्या आवारात छापा टाकला. यावेळी संशयित जुगार खेळत होते. संशयितांकडून जुगाराचे साहित्य व ६६० रुपये हस्तगत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोधासाठी मलेशियाकडे धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बिटकॉईन या इंटरनेटवरील व्हर्चुअल करन्सीचे शहरात जाळे पसरवणाऱ्या व्हिएतनामच्या नागरिकांकडे मलेशियन पासपोर्ट सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी मलेशियन दूतावासाला पत्र देऊन चौकशी पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील सर्व संशयितांना जामीन मंजूर झाला. ते सायबर पोलिस स्टेशनला हजेरी लावत आहेत.

बिटकॉईन या इंटरनेटवरील व्हर्चुअल चलनाच्या वापरावर भारतात बंदी आहे. मात्र, परदेशात अनैतिक धंद्यासाठी सदर चलनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ड्रग्ज, हत्यारे खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये या चलनाचा विशेष वापर होतो. राज्याच्या पुणे, नागपूर, शिर्डी, औरंगाबाद या शहरांसह नाशिकमध्ये बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीस उद्युक्त करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी गेल्याच महिन्यात अटक करण्यात आली. संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यात, वेगवेगळे आमीष दाखवून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जात असल्याचे समोर आले. भारतात या चलनाच्या वापरावर बंदी असताना संशयितांनी सदर उद्योग केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिस कोठडी संपल्यानंतर संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या, सर्व संशयितांची जामिनावर सुटका झाली असून, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सायबर पोलिस स्टेशनला हजेरी लावत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी स्पष्ट केले. निशेद महादेवजी वासनिक (२९, रा. नागपूर), रोमजी बिन अहमद (मलेशिया), आशिष शंकर शहारे (२८, कोपरगाव, जि. नगर), दिलीप प्रेमदास बनसोड (२९, पाथर्डी फाटा), कुलदीप लखू देसले (३८, रा. खुटवडनगर, नाशिक) यांचा समावेश आहे. यातील रोमजी अहमद हा व्हिएतनाम येथील रहिवाशी आहे. मात्र, त्याच्याकडे मलेशिया देशाचा पासपोर्ट सापडला. मलेशिया व व्हिएतनाम शेजारी राष्ट्र आहेत. भारत आणि नेपाळ देशाप्रमाणे दोन्ही देशांमध्ये व्यवहार होतात. मात्र, या प्रकरणी कुठलीही कमी राहू नये, म्हणून मलेशियन दूतावासाला संपर्क केला आहे. स्थानिक तपास पूर्ण झाल्याने लवकरच संशयितांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीनांचे गुन्हे बेफाम!

$
0
0

नाशिक : अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत वर्षागणीक धक्कादायक वाढ होत असून, विधी संघर्षित बालकांची संख्या नियंत्रित आणण्यासाठी ठोस उपाय होत नाही. मागील फक्त सात वर्षात तब्बल एक हजार ४७० मुले विविध गुन्हे करून निरीक्षणगृहात दाखल झाले आहेत. मागील १७ वर्षांचा विचार करता हा आकडा दोन हजार ७१३ इतका होतो.

उंटवाडी रोडवरील मुलांच्या निरीक्षण गृहात १९९९ पासून विविध गुन्हे दाखल असलेल्या अल्पवयीन मुलांना ठेवण्यात येते. कोर्टाने जामीन देईपर्यंत विधी संघर्षित मुले निरीक्षणगृहात राहतात. एखाद्या मुलाचा गुन्हा सिध्द झाल्यास त्याची रवानगी ब्रोस्टल स्कूलमध्ये होते. निरीक्षण गृहात दरवर्षी दाखल होणाऱ्या मुलांची संख्या लक्षणीय वाढते आहे. १९९९-२००० या वर्षात निरीक्षणगृहात ५३ विधी संघर्षित मुले आली होती. २००४-२००५ मध्ये प्रथमच हा आकडा १०० पर्यंत पोहचला. यानंतर, विधी संघर्षित मुलांची संख्येचा वाढलेला सेनेक्स पुन्हा खाली उतरलाच नाही. २०११-२०१२ या वर्षात शहरातील गुन्हेगारी प्रचंड फोफावली होती. अर्थात याचा थेट परिणाम अल्पवयीन मुलांच्या संख्येवर झाला. या वर्षात निरीक्षणगृहात तब्बल ३०० मुले दाखल झाली होती. २०१६-२०१७ या गत वर्षात हा आकडा २१६ इतका राहिला. निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, सुरक्षा व्यवस्थेत अल्पवयीन म्हणून मिळणारी सूट तसेच कायद्याचा धाकच नसल्याचा उलटा परिणाम होतो आहे. नुकतेच निरीक्षणगृहातील १० मुले खिडकीचे गज कापून पळून गेले. यातील आठ मुलांवर बलात्कार, घरफोडी, चोरी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल होते. या मुलांबरोबर दोन अनाथ मुलेही गेली असून, त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. फक्त संगतीमुळे ही मुले निरीक्षणगृहातून पळून गेली आहेत. २०१०-२०११ ते २०१६-२०१७ या सात वर्षाच्या काळात तब्बल एक हजार ४७१ अल्पवयीन मुले विविध गुन्ह्यांमुळे निरीक्षण गृहात दाखल झाले.

याबाबत बालकांच्या निरीक्षण गृहाचे मानद सचिव चंदूलाल शहा यांनी सांगितले, की विधि संघर्षित बालकांची वाढलेली संख्या ही चिंतेची बाब आहे. विशेषतः १६ ते १८ वयोगटातील मुले गुन्हेगारीमध्ये सहजतेने सक्रिय होत आहे. अनेक मुले तर चार-चार वेळा निरीक्षणगृहात दाखल झाले आहेत. कमी वय असल्याने आम्हाला काही होणार नाही, याची जाणीव मुलांना असते. किंबहुना ते तसे बोलून दाखवितात. अशा मुलांची रवानगी ब्रोस्टल स्कूलमध्ये व्हायला हवी. राज्यातील सर्वच निरीक्षणगृहांची ही परिस्थिती आहे. मंजूर पदे भरली जात नाही, सरकारने याची दखल घेणे अपेक्षित असल्याचे मत शहा यांनी व्यक्त केले.

सरासरी सात वर्षातच

१९९९-२००० ते २००९-२०१० या १० वर्षात विविध गुन्हे केले म्हणून निरीक्षण गृहात एक हजार २४२ मुले दाखल झाली होती. यानंतर मात्र अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते. २०१०-२०११ ते २०१६-२०१७ या सात वर्षांत तब्बल एक हजार ४७० विधी संघर्षित मुले निरीक्षणगृहात आली. तुलनात्मकदृष्ट्या विधी संघर्षित मुलांची संख्या काही वर्षात वाढल्याची दिसते. ही बाब गृह मंत्रालय, महिला व बालकल्याण विभाग किती गांर्भीयाने घेते याकडे समाजसेवी संघटनांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोरंगण घाटामध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या तोरंगण घाटात चांदवड तालुक्यातील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रामदास पुंडलिक वाघ (३९, रा. तांगडी शिरूर, ता. चांदवड) असे तरुणाचे नाव आहे. वाघ हे वीज विभागात कार्यरत असल्याचे आढळून आले आहे.

प्रथमदर्शनी अपघात वाटावा अशी परिस्थती आढळली असली तरी पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास परिसरात वास्तव्यास असलेला होमगार्ड जवान त्र्यंबककडे येत होता. त्याला तोरंगण घाटात रस्त्याच्या कडेस मोटारसायकल (एमएच १५ डीटी ८५३१) आणि एक व्यक्ती आढळली. संबंधित जवानाने तातडीने त्र्यंबक पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तपासणी केली असता मृतदेहाच्या खिशात आढळून आलेल्या वीज बिलावर वाघ नाव आढळून आले. याबाबत चांदवडला चौकशी केल्यावर संबंधिताचे नाव स्पष्ट झाले.

वाहनाचा धक्का लागल्याने रामदासचा अपघाती मृत्यू झाला अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात आला होता. मात्र, नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करतांना त्याच्या गळ्यावर खुणा आढळून आल्याने घातपात संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान रामदासच्या कुटुंबीयांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर, उपनिरीक्षक सुरेश चौधरी, कैलास आकुले, दीपक पाटील आदी तपास करीत आहेत.

विदेशी मद्यसाठा जप्त

मालेगाव : संगमेश्वर भागातील मारुती मंदिरासमोर अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कारचालकाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज बाळासाहेब बोरसे (रा. सटाणा नाका) असे संबंधित कारचालकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता कारमधून (एमएच १५ इ बी ३८१०) अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करताना आढळून आल्याने वाहनचालक बोरसे याला १५ हजार ९२० रुपयांच्या मद्याच्या बाटल्या आणि स्विफ्ट कार असा एकूण ३ लाख १५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमालसह अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारी करिअर गायडन्स

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

‘महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस’ उपक्रमांतर्गत ‘इंजिनीअरिंग क्षेत्रातील करिअरसंधी’ या विषयावर मंगळवार (दि. १३) करिअर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सकाळी ११ वाजता सेमिनार होईल.

बारावीच्या निकालानंतर सीइटी आणि जेईईच्या गुणांनुसार इंजिनीअरिंगसाठीचे प्रवेश सुरू झाले आहेत. इंजिनीअरिंगकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल आहे. सोबतच दहावीनंतरही डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तसेच सध्या अभियांत्रिकी शाखेतून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्लेमसेंट उपलब्ध होत आहेत. याच अनुषंगाने ‘महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस’ उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ‘प्लॅनेट कॅम्पस’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रातील करिअरसंधी, प्लेसमेंट, अभ्यासक्रम याविषयी माहिती दिली जाते. सध्या इंजिनीअरिंगच्या कॅप राउंडची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यभरातून सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी सीईटीची परीक्षा दिली आहे. जेईई देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील लाखातच आहे. या दृष्टीकोनातून इंजिनीअरिंगकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. सध्याच्या प्लेसमेंट्समध्ये सर्वाधिक नोकरीच्या संधी या इंजिनीअर्ससाठी असल्याचे दिसत आहे. देशाच्या बाहेरही चांगल्या पॅकेजच्या संधी इंजिनीअर्ससाठी मिळत आहेत. या सर्व करिअरसंधीची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी तसेच त्यांच्या मनातील शंकाचे निरसन व्हावे, यासाठी ‘मटा प्लॅनेट कॅम्पस’ उपक्रमांतर्गत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मंगळवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता सेमिनार हॉलमध्ये ‘इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. सी. कुलकर्णी तसेच इंजिनीअरिंग एआरसी सेंटरचे अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सेमिनार मोफत असणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या सेमिनारमध्ये करिअरबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने दाणादाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाने देवळाली परिसरात शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. तब्बल दोन तास कोसळलेल्या पावसामुळे महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्यांवर चिखल निर्माण होऊन अनेक ठिकाणी डबकी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे दिसून आले. नागरिकांना रस्त्यावरून चालणेदेखील कठीण झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने देवळालीवासीयांच्या जिवाची काहिली होत होती. त्यातच पाऊस हजेरी लावणार, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. सकाळी अकरा वाजेपर्यंत तरी पावसाचे कुठलेही वातावरण नसताना अचानक दुपारी बाराच्या सुमारास काळ्याकुट्ट मेघांनी गर्दी केली. सुमारे दोन तास पावसाने हजेरी लावत दाणादाण उडवून दिली. देवळालीतील प्रमुख रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. शहरातील सतीश कॉम्प्लेक्स, संसरी नाका, रेस्ट कॅम्परोड, लामरोड, मेन स्ट्रीट, आनंदरोड, बनात चाळ परिसरात पाण्याचे लोट वाहत होते. नंतर अनेक ठिकाणी डबकी साचली होती.

दरम्यान, या पावसामुळे शिगवे बहुला, संसरी, भगूर आदींसह ग्रामीण भागातील शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले असून, खरीप हंगामाबद्दलच्या आशा शेतकऱ्यांमध्ये पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे पावसात सातत्य राहिल्यास बियाणे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड उडण्याची शक्यता आहे.

मुरूम पसरविला की दगड?

लामरोड परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर भूमिगत गटारींचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असताना नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मुरूम टाकण्यात आला आहे. त्यात मुरमापेक्षा दगडच अधिक असल्याने नागरिकांना मार्ग काढणे जिकिरीचे बनले होते. प्रशासनाने तत्काळ योग्य दर्जाचा मुरूम टाकून नागरिकांची पावसाळ्यात होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध, भाजीपाल्याची जिल्ह्यात वाहतूक सुरळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी संपामुळे जिल्ह्यात निर्माण झालेला तणाव निवळला असून, आता पोलिस बंदोबस्ताशिवाय भाजीपाला आणि दुधाची वाहतूक जिल्ह्यात सुरळीत सुरू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सुरक्षित मालवाहतुकीसाठी पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी एकही मागणी शुक्रवारी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शेतकरी संपामुळे गेले काही दिवस नाशिकमध्ये तणावाची परिस्थ‌िती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल वाहतुकीसाठी रस्त्यावर येताच तो आंदोलकांचे लक्ष्य ठरत होता. परिणामी बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक कमी होऊन दर वाढले. दुधाचे टँकरही मार्गातच अडविण्यात आल्याने वाहतूकदारांमध्ये दहशतीचे वातावरण होते. परिणामी या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक काही दिवस ठप्प झाली होती. जीवनमानावर त्याचा परिणाम होऊ लागल्याने वेळेप्रसगी पोलिस बंदोबस्तात शेतमाल, दूध आणण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने दर्शव‌ली. शेतकरी, वाहतूकदारांचा माल बंदोबस्तात शहरात आणि जिल्ह्याबाहेर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. गेले तीन-चार दिवस गुजरात, मुंबई, मध्य प्रदेश इतकेच नव्हे तर नाशिक शहरात येणाऱ्या शेतमालाला पोलिस बंदोबस्त देण्यात आला. लोकांकडूनही त्यासाठी पोलिस बंदोबस्त मागितला जात होता. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजीपाला येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यवहार पूर्वपदावर आले असून, भाजीपाला अथवा दुधाच्या एकाही वाहनाला पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला नाही.

जिल्ह्यातील परिस्थ‌िती पूर्वपदावर आली असून, भाजीपाल्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी एकाही शेतकऱ्याने अथवा वाहतूकदाराने मालाच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली नाही.

- रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी लेट झाल्याने प्रवाशांचा उद्रेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
पंचवटी एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी मुंबईला जाताना कसारा घाटात थांबवून मंगला एक्सप्रेसला पुढे काढल्यामुळे संतप्त प्रवाशांनी कसारा स्थानकात स्टेशनमास्तरांना घेराव घातला. विशेष म्हणजे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा नाशिकच्या दौऱ्यावर असतानाच हे आंदोलन घडूनही त्यांनी दखल घेतली नसल्याचे प्रवाशांचा आरोप आहे.
पंचवटी एक्सप्रेस ही नाशिककरांची आवडती रेल्वेगाडी आहे. पासधारक, मुंबईला अप-डाऊन करणारे नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक या गाडीलाच प्राधान्य देतात. त्यामुळे या गाडीला वर्षभर चांगला प्रतिसाद असतो. ही इंटरसिटी दर्जाची गाडी असल्याने रेल्वेने वेळेत सोडणे सक्तीचे आहे. तरीही काही महिन्यांपासून पंचवटी या ना त्या कारणाने रोज लेट होत आहे.

का उडाला भडका?
पंचवटी एक्सप्रेस गुरुवारी सायंकाळी नाशिकला येत असताना इगतपुरीजवळ इंजिन फेल झाल्याने ४० मिन‌िटे लेट झाली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून मुंबईला जाताना नाशिकरोड स्थानकात पंचवटी गाडी थांबवून बंगालच्या दुरांतो एक्सप्रेसला पुढे चाल दिली जाते. त्यामुळे मुंबईला जाणारे नोकरदार लेट होत असल्याने त्यांना अडचणी येत आहेत. शुक्रवारी पंचवटी एक्सप्रेस सकाळी नऊच्या सुमारास कसारा घाटात येताच अचानक थांबली. मंगला एक्सप्रेसला पुढे जाण्यासाठी गाडी थांबविण्यात आल्याचे समजताच प्रवाशांनी कसारा स्थानकात पंचवटीची चेन खेचून स्थानकप्रमुखांना गाठले. तेथे त्यांना १५ मिन‌िटे घेराव घालून कडक शब्दांत जाब विचारला. गाडी वेळेत सोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर प्रवाशी शांत झाले.

राजकारण नको
पंचवटीबाबत गाडीबाबत कायम राजकारण होते, असा या गाडीतील प्रवाशांचा आरोप आहे. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री होत्या तेव्हापासून त्यांच्या आवडीची दुरांतो एक्सप्रेस पंचवटीच्या आधी सोडली जात आहे. नाशिकरोड स्थानकात पंचवटी सकाळी सव्वासातला येते. मात्र, आल्यावर गाडीत पाणी भरले जाते. त्यामुळेही गाडी लेट होते. वास्तविक पाणी भरण्याचे काम मनमाडला होत असते. भुसावळ विभागाचे डीआरएम म्हणून आर. के. यादव यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. ते आल्यापासून गाडी लेट होत आहे. याआधीचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता असताना गाडी वेळेत धावत होती. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आज गीतांजलीने नाशिक दौऱ्यावर येत होते आणि कसाऱ्यात पंचवटीचे प्रवाशी आंदोलन करत होते. शर्मा यांनी पंचवटी लेट का होते, याची दखल नंतर तरी घ्यायला हवी होती असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

पंचवटी काही दिवसांपासून लेट होत आहे. वर्षभरापूर्वी आम्ही आंदोलन केले तेव्हा ही गाडी वेळेत धावत होती. तेव्हाचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी दखल घेतली होती. आता नवीन डीआरएम आले आहेत. आंदोलन केल्यानंतरच न्याय मिळणार असेल तर तेही करू.
- राजू फोकणे,
रेल्वे सल्लागार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images