Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘आता पावसा मातीशी कर लगीन साजरं’

$
0
0

नाशिक ः शब्दांची गुंफण करणाऱ्या कवीचा मोठा सन्मान म्हणजे त्याचे शब्द घराघरात पोहोचणे. ही शब्दरूपी कविता प्रत्येकाच्या ओठी आली की त्याच्या श्रमाचे चीज होते. नाशिकचे प्रसिध्द कवी प्रशांत केंदळे यांनी लिहिलेल्या गीताला असाच सन्मान मिळाला आहे. आगामी ‘धोंडी’ या मराठी चित्रपटातून हे गीत संपूर्ण महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हे गीत प्रशांत केंदळे यांच्याच स्वरात गुंफण्यात आलेले आहे.

‘माझं आभाळ तुला घे...तुझं आभाळ मला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला’ या कवी प्रकाश होळकर यांच्या कवितेने एकेकाळी धूम केली होती. हीच कविता पुढे गीत बनून ‘टिंग्या’ चित्रपटातून आली. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच पुढे महाराष्ट्रातील अनेक कवींनी गीतकार होण्याची वाट चोखाळली. मात्र, त्यात अनेकजण अपयशी ठरले. सांस्कृतिक नाशिकचा ज्यांना वारसा लाभला आहे असे मिलिंद गांधी, विष्णू थोरे यांसारखे कवी मात्र चित्रपटांतून गीतकार म्हणून चमकले. याच कवींच्या पावलावर पाऊल ठेवून नाशिकचे कवी प्रशांत केंदळे ९ जूनला प्रदर्शित होत असलेल्या धोंडी चित्रपटातील गीताच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहेत.

‘आता पावसा
मातीशी कर लगीन साजरं
गुलमोहराचं कुकू
तिच्या भांगामधी भर’

असे त्या गीताचे बोल असून, त्याला स्वरसाजही प्रशांत केंदळे यांचाच आहे. या गीताला चालही प्रशांत यांनीच दिली आहे. त्यांना हे गाणे मिळण्याची कहाणी भावनाशील आहे. कळवणच्या एका कार्यक्रमात शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांनी प्रशांत केंदळे यांच्या स्वरातील ही कविता ऐकली. लगेचच त्यांनी सयाजी शिंदे यांना ती कविता ऐकण्याविषयी सुचविले. प्रशांत यांचा नंबरही दिला. पाचच मिनिटांत प्रशांत यांना सयाजी शिंदे यांचा फोन आला व त्यांनी त्या कवितेची फर्माइश केली. पुढे या कवितेने त्यांच्यावर इतके गारूड केले की ‘धोंडी’ चित्रपटात या कवितेचे गाणे करून घ्यावे, असे त्यांनी दिग्दर्शकाला सुचविले. त्यानुसार चित्रपटाच्या क्लायमॅक्सला हृदयद्रावक प्रसंगी हे गीत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मूळ टाकळी विंचूर येथील असलेले केंदळे वडिलांसोबत नाशिकला आले. कवितेच्या प्रेमात लहानपणापासून असल्याने शब्दांशी खेळण्याचा नाद त्यांना लागला. त्यातूनच ही ‘गुलमोहराचं कुकू’ ही कविता आली असून आतापर्यंत कवितेने खूप दिले असल्याची भावना केंदळे व्यक्त करतात. सध्या ते नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या उंटवाडी माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. शेतकरी संपाची पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ९) ‘धोंडी’ प्रदर्शित होत आहे.

टाकळी विंचूरला असताना दिवस-दिवसभर पावसाची वाट पाहत असायचो. त्यातून ही पावसाची कविता सुचली. आई-वडिलांना खूप कष्ट करताना पाहिले आहे. ते खूप प्रामाणिकपणे आयुष्य जगले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ या कवितेच्या रुपाने माझ्या पदरात पडले आहे. आता ही कविता घरोघर जाणार असल्याचा खूप आनंद आहे.
- प्रशांत केंदळे, कवी-गीतकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांना पोस्टाने दाखले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फीमध्ये भरमसाठ शुल्कवाढ, आरटीई प्रवेशांमध्ये घोळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली केंब्रिज शाळा पुन्हा वादात फसली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नववीतून दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात फी न भरल्याच्या मुद्यावरून शाळा सोडल्याचा दाखलाच टेकविले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेलाही शाळेने जुमानले नसून विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याच्या भूमिकेवर ते अडून राहिले. दरम्यान, संतापलेल्या पालकांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये शाळेविरोधात तक्रार दिली आहे.

शहरातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बेकायदेशीररित्या पालकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत असल्याची प्रकरणे वारंवार समोर येत आहे. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शेकडो पालक याविरोधात लढत आहेत. नुकतेच काही शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र, असे असले तरी पालक व शाळा प्रशासन यांच्यातील जुन्या वादांचे मुद्दे पुन्हा नव्याने समोर उभे राहिले आहेत. त्याचेच चित्र बुधवारी इंदिरानगर येथील केंब्रिज शाळेसमोर दिसून आले. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेने घरचा रस्ता दाखवला. या विरोधात पालक शाळेबाहेर एकत्र जमले होते. माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी शिवनाथ मंडलिक यांनी शाळेला पालकांशी चर्चा करण्याची दिलेली सूचनाही शाळेने झिडकारून लावली.

काय आहे प्रकरण?

नाशिक केंब्रिज शाळेतील बेकायदेशीररित्या फी वाढीविरोधात पालकांचे दीड वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. राज्याच्या विभागीय शुल्क नियमन समितीसमोर सुनावणीस असताना शाळेने हायकोर्टात याबाबत हरकत घेतली आहे. त्यामुळे हा विषय प्रलंबित आहे. असे असतानाही शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांना फी न भरल्याच्या कारणास्तव शाळेबाहेर काढले आहे. तसेच ज्युनिअर व सिनिअर केजीच्या अशा विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याच्या सूचनाही पालकांना दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

फी न भरल्याचा रिमार्क

सिडको : पोस्टाने शाळासोडल्याचे दाखले पोचल्यानंतर संबंधित पालकांना हा प्रकार लक्षात आला. तसेच या पाठविलेल्या दाखल्यांवर फी न भरल्याचा रिमार्क स्पष्टपणे दर्शविण्यात आला आहे. अचानक झालेल्या या प्रकारातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशीच खेळण्याचा प्रकार शाळेकडून सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत त्यांनी इंदिरानगर पोलिसांनाही पत्र दिले आहे. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची अडचण करू नये असे शाळेला बजावले आहे. पालक व शाळा प्रशासनाने फीचा मुद्दा चर्चेतून सोडविण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. मात्र, शाळा व पालक आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. शिक्षण उपसंचालकांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल. शाळेला नोटीसही बजावली आहे.
- नितीन उपासनी, प्रभारी शिक्षणाधिकारी जिप माध्यमिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिहेरी खून कुटुंब कलहातूनच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

कोकणगावमध्ये (ता. दिंडोरी) गत आठवड्यात झालेल्या तिहेरी खूनाच्या घटनेचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. कौटुंबिक कलहाने त्रस्त झालेल्या मोठ्या मुलानेच आई, वडील आणि लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ जगन्नाथ शेळके (२१) आला अटक करण्यात आलीआहे. कोकणगावमध्ये ३० मे रोजी जगन्नाथ शेळके, शोभा जगन्नाथ शेळके आणि हर्षद शेळके यांच्या डोक्यात घाव घालून त्यांचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. पुरेसे पुरावे मिळत नसल्याने पोलिसही सुरुवातीला चक्रावले. चौकशी दरम्यान प्रकरणाची उकल झाली.

यामुळे केले हत्याकांड

शेतीकडे लक्ष देत असूनही वडील सोमनाथला सतत दोष देत. याउलट काहीच काम न करणाऱ्या धाकटा भाऊ हर्षदही कुणी बोलत नसे. याबद्दलचा सोमनाथच्या मनात राग खदखदत होता. हर्षदचे अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर शेळके कुटुंबात वाद सुरू झाले. जगन्नाथ शेळके हे सोमनाथलाही ‘तू दारू पितो, तुझेही अनैतिक सबंध आहेत’, असा आरोप करीत शिवीगाळ करू लागले. यावरून आई वडिलांचे भांडण सुरू होते. त्यावेळी राग अनावर झाल्याने सोमनाथने घरात ट्रॅक्टरच्या टॉपलिंगने वडील, आई व हर्षद या तिघांच्या डोक्यात घाव घालत त्यांची हत्या केल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानंतर सोमनाथ एका हळदीच्या कार्यक्रमाला गेला. तेथून परतल्यानंतर त्याने घटनेबाबत कांगावा केला होता.

पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर नवले, सहाय्यक निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनिरीक्षक मच्छिंद्र रनमाळे, अनिल धुमसे, अरुण पगारे, अमोल घुगे, रामहरी मुंढे, रविंद्र वानखेडे, कैलास देशमुख यांनी हा गुन्हा उघडकीस आला.

समाधानचा यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न

सोमनाथ हा अत्यंत रागीट स्वभावाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काम करूनही आई वडील सतत आपल्यालाच रागावतात याचा राग त्याच्या मनामध्ये धुमसत होता. आंब्याच्या झाडाच्या फांद्या छाटल्याच्या कारणावरून २०१३ मध्ये त्याने किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

रागाच्या भरात खून केल्यानंतर आरोपीने थंड डोक्याने त्याबाबत बनाव रचला. परंतु, या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यात आम्ही यशस्वी झालो. संशयिताने वडील, आई, आणि भावाचा खून केल्याची कबुली दिली आहे.
- अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्युपिटर हॉटेलला लग्न पडले महागात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हळद व लग्नसोहळ्यात ठरल्याप्रमाणे सुविधा न देणे व जास्तीची रक्कम घेऊन सेवेत कमतरता ठेवल्याप्रकरणी पाथर्डी फाट्यावरील मिऊस ज्युपिटर हॉटेलला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दीड लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहे. तसेच अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये वेगळे देण्याचेही आदेश या आदेशात म्हटले आहे. सेवेतील कमतरता व शारिरीक व मानसिक त्रास दिल्याबद्दलचा हा निकाल हॉटेल व्यवसायात मनमानी करणाऱ्यांना चाप बसवणारा आहे.

राजीवनगर येथील लता भगवान चौधरी यांनी याबाबत ग्राहक मंचात तक्रार केली होती. चौधरी यांनी हळदी व लग्न सोहळ्यासाठी मिऊस ज्युपिटर हॉटेलमध्ये दोन दिवसासाठी हॉल, १५ रुम्स बुक केल्या. तसेच चहा, नाष्टा, जेवण कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य, स्टाफ व टॅक्स मिळून साडेचार लाख रुपये अदा केले. यात स्टाफ व चांगल्या सुविधा देण्याचे हॉटेलने सांगितले. पण पहिल्याच दिवशी सकाळी रुम्स उपलब्ध करून न दिल्याने दुसऱ्या हॉटेलमध्ये रुम्सची व्यवस्था करावी लागली. दुपारी चार वाजता हळदीच्या कार्यक्रमाला दिलेला हॉलही अडीच तास उशिरा दिला. सायंकाळी ठरल्याप्रमाणे जेवणाचा मेनू दिला नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर स्टाफ नसल्याने सेवा पुरवू शकत नसल्याचे कारण देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच लग्नाच्या दिवशी ७५ ते १०० नातेवाइकांनाच नाष्टा देण्यात आला. इतर नातेवाइकांना केवळ उपमा व पोहे देण्यात आले. तसेच हॉलमध्ये खुर्च्या, डोकेरेशन किंवा कोणतीही तयारी ठरल्याप्रमाणे केली नाही. जेवण नीट नव्हते, स्टाफही उपलब्ध नव्हता. हॉल सोडतेवेळी लग्नसोहळ्यास अधिक लोक आल्याचे कारण देत अतिरिक्त ७५ हजार रुपयांची मागणी झाली. तेही दिले. पण बिलाची मागणी केल्यानंतर रात्री येण्यास सांगितले. भाऊ बिल घेण्यासाठी रात्री गेल्यानंतर हॉटेल टॅक्स म्हणून दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर वाद घालत भावाला हॉटेलमधून बाहेर काढले. त्यामुळे नाईलास्तव दीड लाखाचा चेकही दिला. त्याबाबत इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू: बच्चू कडू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। नाशिक

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी खळबळ माजवणारे प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर, जसा भगतसिंग यांनी संसदेत बॉम्ब टाकला तसाच आम्हीही वेळ आल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने नाशिकमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी परिषद कार्यक्रमात बोलताना आमदार बच्चू कडू यांनी हे प्रक्षोभक वक्तव्य केले आहे.

सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपू पाहात आहे. शेतकऱ्यांवर सरकार गोळ्या चालवायला लागले आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोठे प्रयत्न केले. 'आसूड' यात्रासारखी आंदोलन केली. मात्र, तरीही सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही. आमच्या अंगात शेतकऱ्यांचे रक्त आहे. आमच्याकडून शेतकऱ्यांसोबत बेईमानी होणार नाही असे म्हणत आमदार कडू यांनी हे खळबळ माजवणारे प्रक्षोभक वक्तव्य केले आहे.

ज्या प्रमाणे शहीद भगतसिंग यांनी बॉम्ब टाकण्याचे कृत्य केले, त्याच प्रमाणे आपणही तसे करू असे म्हटले असल्याचे म्हणत, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे कडू यांनी म्हटले आहे.


कडू मुख्यमंत्र्यांवर हल्ल्याची चिथावणी देत आहेत- भाजप

आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याचा भाजपने निषेध केला आहे. आमदार कडू यांचे वक्तव्य कायद्याला धरून नाही. त्याचे वक्तव्य हे चिथावणी खोर असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करण्याची चिथावणी देत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता शेतकऱ्यांचा कट्टरवादही पाहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांवर दरोडा टाकला. तरीही शेतकऱ्यांवरच दरोड्याचे गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. शेतकऱ्यांवर जुलूम कराल तर वेळ पडल्यास शेतकरी सरकारी मालमत्तांवर दरोडे टाकण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. तलवारी चालवल्यात तर बॉम्ब फेकू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी नाशिकमध्ये दिला. आतापर्यंत सरकारने धर्मवाद पाहीले असतील. आता शेतकऱ्यांचा कट्टरवादही पहा, असा इशाराही कडू यांनी दिला.

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीच्यावतीने आयोजित शेतकरी संघटनांच्या बैठकीत आमदार कडू बोलत होते. नाशिक शहरातील तूपसाखरे लॉन्समध्ये ही बैठक झाली. यावेळी कडू म्हणाले, आम्ही पिक बदलून पाहीले. खते, बियाणे बदलून पाहीले, औषधे फवारणीची पद्धतही बदलली. परंतु शेतकऱ्यांची परिस्थ‌िती काही बदलली नाही. विरोधी पक्षात असताना सोयाबीनला किमान सहा हजार रुपये भाव मिळायलाच हवा अशी मागणी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत होते. परंतु आता त्यांचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा संपला का? तुम्ही खरे शेतकरी कोण हे शोधू, अशी भाषा वापरता मग तेव्हाचे फडणवीस खरे की आताचे, असा सवाल कडू यांनी उपस्थ‌ित केला. जो शेतकरी शेतीमध्ये नांगर घालतो तो सरकारदेखील घालवू शकतो, अशा शब्दात कडू यांनी संताप व्यक्त केला.

स्वामीनाथन आयोग लागू न करण्यासाठी सरकार अनेक कारणे पुढे करत आहे. पण हेच सरकार काम न करणाऱ्या, टेबलखालून पैसे घेणाऱ्यांसह सर्वांनाच सातवा वेतन आयोग कसा लागू करते, असा सवाल कडू यांनी उपस्थ‌ित केला. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या दानवे, हंसराज अहिर, माधव भंडारी यांच्यावरही या शेतकरी मेळाव्यात परखड शब्दांत टीका करण्यात आली. आतापर्यंतचे आंदोलन हा केवळ ट्रेलर होता. १३ जूनपासून खरा पिक्चर सुरू होईल. आंदोलनांद्वारे सरकारचे बारा वाजवू असा इशारा यावेळी देण्यात आला.

पोलिसांनो, शरम वाटू द्या

आमदार कडू यांनी पोलिसांच्या कार्यशैलीचा चांगलाच समाचार घेतला. गावांमध्ये दारूअड्डे सुरू असतात. परंतु ते तुम्हाला दिसत नाहीत. अवैध धंद्यावाल्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना पोलिसांनी मारहाण केली असे कधी ऐकीवात नाही. मात्र, शेतकऱ्यांवर लाठ्या चालविल्या जातात. शेतकऱ्यांवर लाठ्या चालविणे म्हणजे तुमच्या बापावर लाठ्या चालविणे होय. पोलिसांनी याची जरा तरी शरम बाळगावी असे कडू यांनी सुणावले. जेवढे तुमचे पोट वाढले आहे तेवढे या आंदोलनात कमी करू. वेळप्रसंगी पोलिस महासंचालकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यासही शेतकरी मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा पोलिसांना देण्यात आला. पोलिसांना एकाही शेतकऱ्याने मुलगी देऊ नये असा प्रस्ताव सभास्थळावरील गर्दीतून एका शेतकऱ्याने मांडला. त्यावेळी एकच हशा पिकला.

…तर ‘वर्षा’वर भाजीच होणार नाही

शेतकरी बेईमानीने कमावत नाही. तो रक्ताचे पाणी करून अन्नधान्य पिकवितो. शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर मुख्यमंत्र्यांच्या पायाखालची जमीन सरकण्यास वेळ लागणार नाही. मुख्यमंत्र्यांचा बंगला ताब्यात घेण्याची धमक शेतकऱ्यांमध्ये आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणारा भाजीपाला कसा रोखायचा हे आम्हाला माहीत असल्याचे कडू म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटांचा भरणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयसीआयसीआय बँकेच्या कालिका मंदिरजवळील आणि बोधलेनगर येथील शाखेत तब्बल ६७ हजार १०० रुपये किमतीच्या बनावट नोटांचा भरणा करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभराच्या कालावधीत अज्ञात ग्राहकानी या नोटांचा भरणा केला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

विनय प्रभाकर चंद्रात्रे (रा. तांबोळीनगर, हिरावाडीरोड) यांच्या तक्रारीनुसार, आसीआयसीआय बँकेच्या बोधलेनगर आणि कालिका मंदिर शाखेत या बनावट नोटांचा भरणा आढळून आला आहे. १ डिसेंबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान अज्ञात भामट्यांनी ५० रुपयांच्या दोन, शंभराच्या ३५, पाचशेच्या ७७ व एक हजाराच्या २५ बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून बँकेत भरणा केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.

गंगापूररोडला घरफोडी

गंगापूररोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल एक लाख २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करण्यात आला असून, सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब कारभारी आहेर (रा. शीतल अपार्ट. गंगापूररोड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आहेर कुटुंबीय मंगळवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील लॅपटॉप, सोन्याचांदीचे दागिने आणि २२ हजाराची रोकड असा सुमारे एक लाख २२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरराव करीत आहेत.

बेकायदा गॅसभरणा अड्डा उद्‍ध्वस्त

घरगुती वापराचा गॅस वाहनात भरून देणारा अड्डा भद्रकाली पोलिसांनी उद्‍ध्वस्त केला. जुन्या नाशिकमधील पंजाब हॉटेलमागे सुरू असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करीत दोन गॅस सिलिंडर टाक्यांसह गॅस भरण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी अड्डा मालकाविरूध्द भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर एडिसन खान (रा. हरिमंजिल, बागवानपुरा) या संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानने हॉटेल पंजाबच्या पाठीमागे पत्र्याचे शेड उभारून अवैध धंदा सुरू केला होता. या घटनेची माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा मारला. शेडमध्ये दोन गॅस सिलिंडरच्या टाक्या आणि वाहनात गॅस भरणा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले. या प्रकरणी संशयित मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

कोल्हापूरच्या प्रवाशाचा हॉटेलमध्ये मृत्यू

हॉटेल पंचवटीमध्ये थांबलेल्या कोल्हापूर येथील ४४ वर्षीय प्रवाशाचा आकस्मात मृत्यू झाला. सदर प्रवाशाचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अभिनंदन मधुकर गडकरी (रा. महाघररोड) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. गडकरी कामानिमित्त शहरात आले होते. हॉटेल पंचवटी येथे ते १८ मे रोजीपासून थांबले होते. बुधवारी दुपारपर्यंत ते आपल्या रूममधून बाहेर न पडल्याने लॉजिंग व्यवस्थापनाने चौकशी केली. ते रूममध्ये मृतावस्थेत मिळून आले. दुर्धर आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार धात्रक करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

लोहशिंगवे येथील ३० वर्षीय तरुणाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आनंद प्रभाकर मोरे (रा. लोहशिंगवे ता. जि. नाशिक) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आनंदने बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपल्या घरातील छताच्या लोखंडी कडीला ओढणीने गळफास लावून घेतला होता. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यास देवळाली कॅन्टोमेंट हॉस्पिटल दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक ढगे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपीला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

देवळाली गावातील गुलाबवाडी येथे आढळून आलेल्या पिस्तुल व इतर शस्त्रांच्या गुह्यातील फरार आरोपी दिलीप हरिशंकर धाकड (मूळ रा. मध्य प्रदेश) यास नाशिकरोड पोलिसांनी जेरबंद केले आहे.

गुलाबवाडीतील दिलीप हरिशंकर धाकड याच्या घरात काही दिवसांपूर्वी नाशिकरोड पोलिसांना दोन पिस्तूल, दोन जिवंत राउंडसह, कोयता, चाकू अशी शस्त्रे आढळून आली होते. परंतु, दिलीप धाकड हा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. या गुह्याशिवाय गुलाबवाडीतील काही तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी धाकडविरोधात नाशिकरोड रेल्वे पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल होता. नाशिकरोड पोलिस धाकडच्या मागावर होते. तो गुरुवारी दुपारी गुलबवाडी परिसरात आल्याची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक निरीक्षक जगदीश शेलकर यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने धाकडला ताब्यात घेण्यात यश मिळविले. त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाशिकरोड पोलिसांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समितीत भरेकरण्यांची गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या आठव्याही दिवशी सतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला नाही. किरकोळ विक्रीसाठी सकाळी भरेकरण्यांनी भाजीपाला आणला होता. शहरातील भाजीबाजारातील विक्रेत्यांनी तसेच सामान्य ग्राहकांनी हा भाजीपाला खरेदी केला.

गेली आठ दिवस भाजीपाला मिळालेला नसल्याने हा भाजीपाला हातोहात विकला गेला. या भाजीपाल्याला फारसे चढे दर मिळाले नाही. दुपारच्या आणि सायंकाळच्या लिलावसाठी भाजीपाला आला नाही. त्यामुळे नाशिक बाजार समितीतून इतर ठिकाणी भाजीपाला जाऊ शकला नाही. बाजार समितीत सकाळचा अपवाद वगळता गुरुवारी दिवसभर शुकशुकाट दिसून आला. रोज हजारो टन भाजीपाला नाशिक बाजारात येतो. मुंबईला सर्वात जास्त भाजीपाला पाठविणारे मार्केट म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे. येथून सुमारे ५० टक्के भाजीपाला एकट्या मुंबईला पाठविला जातो. त्या खालोखाल गुजरातला ३५ टक्के, पुणे आणि विदर्भात १० टक्के आणि नाशिकच्या स्थानिक भाजीबाजारासाठी ५ टक्के भाजीपाला पाठवतात.

पूरक घटकांची आर्थिक घडी विस्कळीत

पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्रीही बाजार समितीत भाजीपाल्याचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. मात्र, आठ दिवसांपासून बाजार समितीत भाजीपाल्याची आवक ठप्प झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. इतके दिवस बाजार समिती बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आली आहे. त्यामुळे व्यापारी, अडतदार, हमाल, मापारी या पूरक घटकांची आर्थिक घडी विस्कळीत झाली. नाशिक बाजार समितीत ३२५ अडतदार, १२०० व्यापारी आणि २५० पेक्षा जास्त हमाल व मापारी आहेत.आम्ही कोणत्याही क्षणी भाजीपाल्याचे व्यवहार सुरू करण्यास तयार असल्याचे अडतदारांचे म्हणणे आहे.

एका जुडीच्या दहा जुड्या

गुरुवारी शेतकरी थोड्या प्रमाणात भाजीपाला बाजारात घेऊन आले. अनेक भरेकरण्यांनी शेतात जाऊन भाजीपाला खरेदी करून विक्रीस आणला. यात पालेभाज्या जुड्या छोट्या करून विक्रीचा प्रयोग करण्यात आला. त्यात कोथिंबीरच्या एक जुडीच्या दहा जुड्या करण्याचा आणि ती एक जुडी १० रुपये किमतीत विकण्यात येत होती. किरकोळ भाजीपाला विक्री करणाऱ्या मार्केटमध्ये भाजीपाल्याचे सरासरी दर टोमॅटो ५०, वांगी ८०, कारली १००, गिलके ४०, बटाटे ३०, भोपळा ४०, दोडका ५०, काकडी ६०, वाल पापडी ५० रुपये प्रति किलो असे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रॅफाइड कंपनीत कामगाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर एमआयडीसीतील ग्रॅफाइड इंडिया लिमिटेड (कार्बन) कंपनीत पहिल्या शिफ्टमध्ये कामावरील कामगाराच्या अंगावर अवजड मटेरिल पडल्याने जीव गमविण्याची वेळ गुरुवारी आली. सहकारी कामगारांनी जखमी कामगाराला कामगार विमा रुग्णालयात तात्काळ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत सातपूर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

गॅफाइड इंडिया लिमिटड कंपनीत गुरूवारी कंत्राटी पद्धतीने काम करणारे शोभनारायण रामलक्ष्मण प्रजापती (४८) हे पहिल्या शिफ्टमध्ये कामावर गेले. काम करत असतांना अचानक त्यांच्या अंगावर अवजड मटेरियल पडले. या दुर्घटनेत प्रजापती यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना सहकारी कामगारांनी सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्रजापती यांच्या मृत्यूने त्यांच्या नातेवाइकांसह कामगारांनी विमा रुग्णालयात गर्दी केली होती.

कामगारांबाबत नेहमीच होणाऱ्या कंपन्यांमधील अपघाताकडे आरोग्य व सुरक्षा संचलनायाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कामगार विकाम मंचने केला आहे. अनेक कामगार कंपनी काम करत असतांना मोठ्या दुखापतींचा सामना करावा लागतो. यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना न्यायच मिळत नसल्याचे कामगार विकास मंचचे कैलास मोरे यांनी ‘मटा’शी बोलतांना सांगितले. तसेच कामगारांना होणाऱ्या दुखापतीबाबत शासनाच्या आरोग्य व सुरक्षा विभागाला निवेदनही दिले आहे. परंतु, कारवाई करण्यात येईल असेच सांगितले जाते.

एमआयडीसीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना अनेकदा झालेल्या घटनेत प्राण गमविण्याची वेळ आली आहे. याबाबत आरोग्य व सुरक्षा विभागाला निवेदनही दिले होते. मात्र, याकडे नेहमीच दुर्लक्ष केला जात असल्याने कंत्राटी कामगारांना न्याय कोण देणार असा प्रश्न आहे.
- कैलास मोरे, संस्थापक, कामगार विकास मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस कमिटीतर्फे जोडेमार आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मध्य प्रदेशातील शेतकरी कुटुंबांच्या सांत्वनासाठी भेट देण्यास निघालेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पुतळ्यास जोडेमार आंदोलन करण्यात आले.

एम. जी. रोड येथील कमिटीच्या कार्यालय आवारात गुरूवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून न घेता आंदोलकांना चिरडत आहे, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रभारी भाई जगताप, डॉ. उल्हास पाटील, डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, डी. जी. पाटील, हेमलता पाटील, शाहू खैरे, अश्विनी बोरस्ते, बबलू खैरे, रमाकांत म्हात्रे, देवेंद्र महाजन, वत्सला खैरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

जावडेकरांचाही निषेध

दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास आणि नियंत्रण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसची तुलना पाकिस्तानशी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचाही निषेध काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी जावडेकर यांच्याही पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंब्रिजविरोधात पालक आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालक शालेय फी भरत नसल्याचा कारणास्तव केंब्रिज इंग्लिश मीडियम स्कूलमधील ३३ विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हातात टेकवला. या विरोधात आक्रमक भूमिका घेत शाळेवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांनी गुरुवारी सकाळी महापालिका शिक्षणमंडळ गाठले.

शाळेच्या नियमबाह्य कारवायांना ताबडतोब लगाम लावावा, अशी मागणी दीडशे ते दोनशे पालकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्याकडे करत त्यांनाच घेराव घातला. दिवसभर चाललेले हे प्रकरण उपासनी यांनी शाळेला दिलेल्या पत्राने सायंकाळी थांबले.

शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून फी भरलेली नाही. केंब्रिज स्कूल बेकायदेशीर फी घेत आहे, ही भूमिका यामागे पालकांची आहे. तर दुसरीकडे काही पालक फी भरत नाही हे पाहून इतर पालकही फी भरण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शिक्षकांचे पगार करणेही कठीण झाल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शाळेबाहेरचा रस्ता शाळा प्रशासनानी दाखवत त्यांच्या हातात शाळा सोडल्याचे दाखले दिले. अशा नियमबाह्य पद्धतीने शाळेने घेतलेल्या या भूमिकेच्या विरोधात आक्रमक झालेल्या पालकांनी शाळेविरोधात ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी प्रभारी शिक्षणाधिकारी उपासनी यांनी पाच पालकांची समिती तयार करुन त्यांना शाळेशी चर्चा करण्यासाठी पाठवले. मात्र, फी भरा मगच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल या भूमिकेवर शाळा ठाम आहे. त्यामुळे वातावरण चिघळले. पालकांनी शिक्षणमंडळात ठिय्या करत ताबडतोब निर्णय देण्याची मागणी उपासनी यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत बसू देण्याची व त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास शाळा जबाबदार असेल, या आशयाचे पत्र सायंकाळी दिल्यानंतर हे प्रकरण तात्पुरते थांबले.

शाळेला सूचना

शाळेच्या फी निश्चितीबाबतचा प्रश्न विभागीय शुल्क नियामक समितीपुढे प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत फी भरली नाही या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्यांस शाळेबाहेर काढू नये, त्यांना नियमित वर्गात बसू द्यावे व शुल्क नियामक समितीकडून लवकर निर्णय प्राप्त करून घ्याव्यात, अशा सूचना केंब्रिज इंग्लिश शाळेला प्रशासनाने दिल्या आहेत.

पालकांनी २०१६-१७ व २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाची फी भरल्यावरच आम्ही त्यांना बसू देऊ. अनेकदा पालक शाळेत येऊन गोंधळ घालतात. त्याचा इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. शाळेतील महिला कर्मचाऱ्यांनाही अशा वादांचा सामना करावा लागतो. शाळेचे वातावरण खराब होत असल्याने पालकांनी कामकाजात व्यत्यय आणणार नाही, असे हमीपत्र द्यावे.
- सोमू नाडार, मुख्याध्यापक, केंब्रिज स्कूल

शाळा प्रशासनाशी चर्चा करूनही विद्यार्थ्यांना घेण्यास शाळा नकार देत आहे. त्यामुळे शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे दिला आहे. तसेच फी संबंधित बैठक घेऊन विभागीय शुल्क नियामक समितीकडून या प्रकरणाचा निकाल लवकर प्राप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- नितीन उपासनी, प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटीच्या गुन्ह्यात तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनचालकास धमकावून पिकअपसह ६९९ कोंबड्या लुटून नेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. भद्रकालीतील फुले मार्केट येथे पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले.

जफर लतीफ शेख, (२५, रा. भद्रकाली), सुमित जॉर्ज हिवाळे, (२३, रा. शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर) आणि सद्दाम खालील शेख, (२५, रा. वडाळा नाका) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी फिर्यादींच्या ताब्यातील पिकअपमध्ये पोल्ट्री फार्ममधून भरलेल्या ६८८ कोंबड्या (सुमारे दीड टन माल) भिवंडी येथे जात असतांना मुंबई-आग्रा रोडवर वेताळ माथा येथे तीन अज्ञात आरोपींनी त्यांना अडवले. विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर आलेल्या संशयितांनी फिर्यादीस धमकावून त्याचे ताब्यातील पीकअपसह माल जबरदस्तीने लुटून नेला. या प्रकरणी घोटी पोलिस स्टेशनमध्ये ३९२,५०४,३४ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला. याबाबत पोलिस निरीक्षक किशोर नवले यांना माहिती मिळाली. जबरीने चोरून नेलेला माल शहरातील भद्रकाली भागात विक्री करण्यासाठी येणार असल्याने पोलिसांनी सापळा रचून तिघांना फुले मार्केट येथे अटक केली. त्यांच्याकडून ६८८ जिवंत बॉयलर कोंबड्या, एमएच १५ एफव्ही ०३८२ क्रमांकाची पीकअप तसेच एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, हवा बंडू ठाकरे, रवी वानखेडे, शिवाजी जुंद्रे, प्रीतम लोखंडे, संदीप हंडगे, सचिन पिंगळ यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिपाइं जिल्हाध्यक्षपदी पवन पवारची वर्णी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

भाजपमधून गच्छंती झालेले माजी नगरसेवक पवन पवार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची नाशिकरोड येथील ग्रेप सिटी हॉटेल येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत पवन पवार यांच्या नावाचा सर्वानुमते ठराव करण्यात आला. विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यावर राज्याची जबाबदारी देण्यावरही या बैठकीत सहमती झाली.

नाशिकरोड येथे झालेल्या आरपीआय पक्षाच्या पदधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ‘रिपाइं’च्या जिल्हा नेतृत्वात बदलाचे वारे येऊ घातले आहे. या बैठकिस उपस्थित पक्षाचे राष्ट्रीय सचिव शीला गांगुर्डे, राज्य उपाध्यक्ष आनंद गांगुर्डे यांच्यासह जिल्ह्यातील विश्वनाथ काळे, सुनील कांबळे, संजय भालेराव, सुनील वाघ, विनोद जाधव, माधुरी भोळे, ललिता भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा नेतृत्वबदलावर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध घटनांत नेहमीच वादग्रस्त ठरलेले व भाजपमधून गच्छंती झालेले पवन पवार यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीस जिल्हाभरातील विविध तालुक्यांमधील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षण गृहातून दहा मुले पळाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडी रोडवरील मुलांच्या निरीक्षण गृहातून दहा मुलांनी पोबारा केला. यातील आठ मुलांवर गंभीर गुन्हे दाखल असून, दोन मुलांच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. खिडकीचे गज कापून १० मुलांनी धूम ठोकली असून, यामुळे बाल निरीक्षणगृहाच्या सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, फरार मुलांचा शोध घेतला जात आहे.

उंटवाडीरोडवरील निरीक्षण गृहात अनाथ तसेच विविध प्रकारचे गुन्हे नावावर असलेल्या अल्पवयीन मुलांना ठेवले जाते. अर्थात, अनाथ आणि विधी संघर्षित बालकांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाते. बुधवारी सकाळी विधी संघर्षित बालकांच्या रूममधील खिडकीचे गज कापून मुले पसार झाली. यातील आठ मुलांवर बलात्कार, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी, चोरी, घरफोडी अशा प्रकाराचे गुन्हे पंचवटी, अंबड, गंगापूर, उपनगर, मालेगाव इत्यादी पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत. यात आणखी दोन मुलांचा समावेश असून, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. मात्र, त्यांच्या कुटुंबियाचा पत्ता नसल्याने त्यांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान, १४ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांनी हेक्सा ब्लेडच्या मदतीने खिडकीचे गज कापून पोबारा केला. विशेष म्हणजे या मुलांनी पध्दतशीरपणे खिडकीवर कपडे टाकले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर निरीक्षणगृह प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. मात्र, मुलांचा पत्ता लागला नाही. मागील आठवड्यातदेखील एका मुलाने सुरक्षा कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून पळ काढला होता. या दोन्ही घटनांबाबत मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पळ काढलेल्या मुलांचा शोध घेत आहेत.


हेक्सा ब्लेड आलेच कसे?

या मुलांकडे हेक्सा ब्लेड आलेच कसे, असा प्रश्न निरीक्षण गृहाच्या प्रशासनाला पडला आहे. गजांचा आकार आ​णि गज कापण्यासाठी मुलांना मिळणारा वेळ याचा विचार करता, ही मुले काही दिवसांपासून गज कापण्याचा उद्योग करीत असावीत. मात्र, सुरक्षा रक्षकांची कमी संख्या आणि निरीक्षण गृहातील खेळीमेळीचे वातावरण यामुळे मुलांना संधी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

५० मुलांमागे अवघे दोन केअर टेकर

उंटवाडी रोडवरील मुलांच्या निरीक्षण गृहातील ५० मुलांमागे अवघे दोन केअर टेकर आहेत. मुलींसाठी काम करणाऱ्या महिला कर्मचारी कधीच निवृत्त झाल्या असून, सातत्याने पाठपुरावा करूनदेखील येथील रिक्त पदे भरली जात नाहीत. मागील आठवड्यात एका मुलाने निरीक्षणगृहातून पलायन केले. आता १० मुलांनी खिडकीचे गज कापून धूम ठोकली असून, निरीक्षण गृहाच्या सुरक्षेच्या मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

उंटवाडीरोडवरील निरीक्षण गृहात अनाथ आणि विधी संघर्षित बालकांना ठेवण्यात येते. विधी संघर्षित बालकांमध्ये अगदी खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, चोरी, घरफोडी असे कृत्य करणाऱ्या मुलांचा समावेश असतो. या मुलांना चुकलेल्या वाटेवरून मूळ प्रवाहात आणण्यासाठी निरीक्षण गृहाचा मुख्यत्वे वापर होतो. चांगल्या वातावरणात मुलांचे पालन पोषण व्हावे यासाठी निरीक्षण गृहाकडून प्रयत्न केलर जातो. मात्र, अनेक वर्षांपासून निरीक्षण गृहाच्या रिक्त जागाच भरल्या गेलेल्या नाहीत. निवृत्त कर्मचाऱ्यांना सामाजिक संस्थेकडून पैसे दिल्यानंतर केअर टेकर उपलब्ध होतात. बुधवार सकाळपर्यंत निरीक्षण गृहात ५२ मुले होती. त्यातील १० मुलांनी निरीक्षणगृहातून पळ काढला. या ५२ मुलांसाठी चार केअर टेकरच्या जागा मंजूर आहेत. मात्र, आजमितीस निरीक्षणगृहाकडे फक्त दोन केअर टेकर आहेत. त्यातील एक केअरटेकर काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले असून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून विनंती करण्यात आल्याने त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. याबाबत बोलताना निरीक्षण गृहाचे मानद सचिव चंदूलाल शहा यांनी सांगितले की, अनाथ मुले आणि विधी संघर्षीत मुलांना वेगवेगळे ठेवण्यात येते. मुलींसाठी हाच नियम असून, आजमितीस तब्बल ३२ मुली येथे वास्तव्यास आहे. विध‌िसंघर्षित बालकांची संख्या मोठी असते. मुलांना जेवणासाठी तसेच टीव्ही बघण्यासाठी बाहेर सोडले जाते. याचा फायदा घेत काही मुलांनी खिडकीचे गज कापले. मुलांपर्यंत हेक्सा ब्लेड कसे आले, याचाही शोध घेतला जात असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. मुलांसाठी चार केअर टेकरची आवश्यकता असताना फक्त दोनच केअर टेकर आहेत. त्यातील एक सेवानिवृत्त असून, रिक्त जागा भरण्याबाबत शासनाकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे शहा यांनी सांगितले.

मुलींसाठी सारेच आयात

निरीक्षणगृहात ३२ मुली आहेत. त्यांच्यासाठी दोन महिला कर्मचारी व एक स्वयंपाकी अशा तीन जागा मंजूर आहेत. मात्र, सदर कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्या पुन्हा भरल्याच गेल्या नाहीत. सध्या, संस्थेचे पदाधिकारी खासगी महिलांकडून हे काम करून घेत असल्याचे शहा यांनी सांगितले.

पोलिस बंदोबस्त पण उपयोगच नाही

गंभीर गुन्हे नावावर असलेल्या मुलांना निरीक्षण गृहात ठेवण्यात येते. मात्र, सरकार येथे सुरक्षाच देत नसल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. सुरक्षा कर्मचारी नसल्याने पोलिस बंदोबस्त मागितला. पण, एकच पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आला. त्याचा तितकासा फायदा नाही. बुधवारी सकाळी पोलिस मागील बाजूस असताना मुलांनी पुढील बाजूने पळ काढला. कायमस्वरूपी चांगला पोलिस बंदोबस्त पुरवणे, तसेच रिक्त जागा भरणे आवश्यक आहे. यात चालढकल होत असल्यास सरकारने विध‌िसंघर्षित बालकाची रवानगी बालसुधारगृहात करावी, असे चंदूलाल शहा यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बजेटमध्ये वाढीचे संकेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने बजेटला मंजुरी दिल्यानंतर महापौर रंजना भानसी यांच्याकडून बजेटला अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या बजेटमध्ये जवळपास दोनशे कोटींची वाढ होण्याचे सूतोवाच त्यांनी केले असून, वास्तववादी बजेटवर आपला भर राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बजेट दोन हजार कोटींवर स्थिरावणार आहे. दरम्यान, नवनिर्वाचित नगरसेवकांना पाऊण कोटींचा निधी दिला असतानाही दहा, पंचवीस व पन्नास कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर केले गेले आहेत. त्यामुळे प्रशासनही पेचात पडले आहे.

महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला १४१० कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. स्थायी समितीने त्यात ३८९ कोटींच्या कामांचा समावेश करीत ते १७९९ कोटींपर्यंत पोहोचविले होते. आता महासभेकडून मंजूर झालेल्या कामांचा त्यात समावेश होईल. महापौर भानसी यांनी सुमारे दोनशे कोटी रुपयांची भर पडून दोन हजार कोटी रुपयांपर्यंत यंदाचे बजेट पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तिजोरीच्या स्थितीचा अंदाज घेऊन बजेट वास्तववादी राहणार असल्याचे महापौरांनी सांगितले आहे. दुसरीकडे नगरसेवकांना पाऊण कोटींचा निधी दिला असताना त्यांनी अव्वाच्या सव्वा कामांचे प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात केली आहे. अंदाजपत्रक तयार करताना वास्तव परिस्थिती लक्षात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाऊण कोटीऐवजी दहा, पंधरा, वीस कोटींचे प्रस्ताव आल्याने प्रशासन बुचकाळ्यात पडले आहे.

---

कपाटासाठी प्रयत्न

गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक मुद्यावरून कपाटाचा प्रश्न रेंगाळळा आहे. हा प्रश्न सुटल्यास जवळपास दोनशे कोटी रुपये तिजोरीत जमा होणार आहेत. त्यामुळे कपाटाचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. शासनदरबारी पाठपुरावा करून त्या परवानग्या नियमित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाचदेखील त्यांनी केले आहे.

--

वृक्षसंवर्धन समिती रखडली

महापालिकेची निवडणूक होऊन चार महिने उलटले असून, मान्सूनही दाराशी आला आहे. पण, महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती अजूनही रखडल्याची स्थिती आहे. या महत्त्वाच्या समितीचे गठणच झालेले नसल्याने कुठलाही धोकादायक वृक्ष हटविण्याचा आदेश प्रशासन देऊ शकत नाही. या दिरंगाईमुळे जीवितहानी झाल्यास त्याला संपूर्ण प्रशासन व अधिकारी जबाबदार राहतील, अशा आशयाचे पत्र वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य संदीप भवर यांनी आयुक्तांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीची रचना कशी असावी व अशासकीय सदस्य नेमणूक आणि तज्ज्ञ समितीची नेमणूक कशा प्रकारे करावयाची आहे, याचे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यांचे पालन व्हावे, अशी अपेक्षाही या पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या रचनेत लोकप्रतिनिधींची सदस्य संख्या सात असावी व अशासकीय सदस्यांची संख्या त्याच्या एकने कमी असावी, महापालिका आयुक्त पदसिद्ध अध्यक्ष असावेत, असे कायदा सांगतो.

वृक्ष प्राधिकरण समिती गठित करायचा अधिकार महासभेचा आहे. महासभेला फक्त लोक प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे, तसेच अशासकीय सदस्य व तज्ज्ञ समिती नेमणुकीचा अधिकार प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्त तथा अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण समिती यांना आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अशासकीय सदस्य व तज्ज्ञ समिती नेमणूक प्रसारमाध्यमांद्वारे जाहिरात देऊन करावयाची आहे. त्यात महासभा व नगरसचिव आणि वृक्ष प्राधिकरण यांच्यामार्फत अशासकीय सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव महासभेमार्फत करण्यात येऊ नये अन्यथा प्रशासनाला व महासभेला याचे उत्तर उच्च न्यायालयात द्यावे लागेल, असेही या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांना एक रुपयात शुध्द पाणी

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड स्थानकातील रेल्वे प्रवाशांना शुध्द पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्‍ड टुरिझम कार्पोरेशनकडून (आयआरटीसी) नाशिकरोडसह प्रमुख रेल्वेस्थानकांमध्ये अत्याधुनिक वॉटर व्हे‌ण्डिंग मशिन्स बसविण्यात आली आहेत. रेल्वेगाडीत एक लिटरची बाटली वीस रुपयांना मिळते. मात्र, या मशिनमधून पाच रुपयांत तब्बल वीस लिटर शुध्द पाणी मिळत आहे.

किडनीस्टोसह बहुतांश आजार पाण्याच्या माध्यमातून होतात. त्यामुळे शुध्द पाणी मिळण्यासाठी घरीच वाटर प्युरिफायर बसविण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे प्रवाशांना स्थानकातील अऩेक दिवस न धुतलेल्या जलकुभांचे पाणी प्राशन करावे लागते. रेल्वे प्रवासी स्थानिक नसल्याने ते तक्रार करत नाहीत. त्यांची मजबूरी लक्षात घेऊन आयआरटीसीने नाशिकरोडला दोन अत्याधुनिक व्हेन्डिंग मशिन्स बसवली आहेत.

मोहीम सुरू

पश्चिम रेल्वेच्या खार स्थानकात सर्वप्रथम व्हेन्डिंग मशिन बसविण्यात आले. त्यानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या 80 स्थानकात ही मशिन्स कार्यान्वित करण्यात आली असून आणखी 45 मशिन्स लवकरच सुरु केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वेस्थानकात जेथे पाणी उपलब्ध होते तेथे थुंकणे, कचरा टाकणे असे प्रकार होतात. तसेच हे जुलकुंभ नियमित साफ केले जात नाही. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना स्वच्छ पाणी पुरविण्याची जबाबदारी आयआरटीसीवर सोपविण्यात आली आहे.

असे मिळणार पाणी

या वाटर व्हेन्डिंग मशिनमध्ये पैसे टाकल्यानंतर पाणी उपलब्ध होते. एक ग्लास पाण्याची गरज असणा-यांना दोन रुपये मोजावे लागतील. पाच रुपयात प्रवाशांना एक लिटर पाणी मिळते. प्रवाशांकडे रिकाम्या बाटल्या नसल्यास नव्या बाटलीत हे एक लिटर पाणी आठ रुपयाला मिळेल. रेल्वे प्रवासात सध्या कंपन्या सध्या एक लिटर पाणी वीस रुपयांना विकतात. या मशिनमधून तेवढ्याच पैशात पाच लिटर पाणी मिळत आहे. ज्यांना मशिन हॅण्‍डल करता येणार नाही, त्यांच्यासाठी कर्मचारी उपलब्ध आहे. तो सुटे पैसेही देतो आणि रिकामी बाटलीही.

भुसावळ विभागात नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोल, शेगाव, खाटवा येथेही अशी मशिन बसविली आहेत. छोट्या स्थानकांनाही न्याय दिला जात आहे. नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील सात स्थानकांना वॉटर प्युरिफायरच्या सहाय्याने शुध्द पाणी देण्याचा श्रीगणेशा झाला आहे. त्यामध्ये घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव यांचा समावेश आहे. येस बँकेच्या मदतीने हे प्युरिफायर बसविण्यात आले आहेत. बँकेने एक वर्षाची देखभालीची जबाबदारी स्वीकारली आहे. प्युरिफायरला पाचशे लिटरची सिंटेक्सची टाकी जोडण्यात आली आहे.


असे आहेत दर

पाण्याचे प्रमाण- बाटली असल्यास- बाटली नसल्यास

३०० मिली - १ रुपया- २ रुपये

५०० मिली- ३ रुपये- ५ रुपये

एक लिटर- ५ रुपये- ८ रुपये

दोन लिटर- ८ रुपये- १२ रुपये

पाच लिटर- २० रुपये- २५ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पुणतांब्याहून सुरू झालेल्या शेतकरी संपाची धार तीव्र करीत आता सुकाणू समितीने निर्णायक आंदोलनाची हाक दिली आहे. भाजीपाला व दूधकोंडी करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याऐवजी सरकारी यंत्रणेला घेरण्याची रणनीती समितीने आखली आहे. सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा; अन्यथा राज्यभर धरणे व ठिय्या आंदोलनासह, रेल रोको, तसेच नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख शहरांची रसद टप्प्याटप्प्याने तोडण्याचा इशारा सुकाणू समितीने गुरुवारी सरकारला दिला.

शेतकरी संपाची सात दिवसांची डेडलाइन संपल्यानंतर शेतकरी आंदोलनासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीची बैठक गुरुवारी नाशिकमध्ये झाली. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली आहे. सुकाणू समितीने राज्य सरकारला इशारा देतानाच आंदोलनाचे तीन टप्पे निश्चित केले आहेत. पहिल्या टप्प्यात सरकारला चर्चेसाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दोन दिवसांत सरकार ताळ्यावर आले नाही, तर येत्या १२ जून रोजी राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर धरणे आणि ठिय्या आंदोलन, तर १३ तारखेला गनिमी काव्याने राज्यभर रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतरही सरकार बधले नाही तर तिसऱ्या टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करून थेट मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या मोठ्या शहरांची रसद तोडण्याचा निर्धार समितीने केला आहे. सोबतच सरकारमधील मंत्र्यांना कर्जमाफीपर्यंत राज्यात कुठेही सभा घेण्यास मज्जाव करण्याचे आवाहन समितीने केले आहे. त्यामुळे भाजपसह राज्य सरकारची कोंडी अधिकच वाढली आहे.

शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी कोअर कमिटीच्या सदस्यांनी विश्रामगृहावर आंदोलनाची निश्चित दिशा ठरवून ती बैठकीत जाहीर केली. खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, जयंत पाटील, अजित नवले, रघुनाथदादा पाटील, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, शेतकरी नेते माधवराव खंडेराव मोरे, डॉ. गिरधर पाटील यांच्यासह राज्यभरातील शेतकरी नेते या वेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी संबंधित राज्यातील सर्व संघटना बैठकीला उपस्थित होत्या. भाजीपाला व दूधकोंडीने सर्वसामान्य नागरिकच वेठीस धरला गेला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील शेतकरी संप सफल झाला नसल्याने कोअर कमिटीने आता या आंदोलनाची दिशा बदलली आहे. बैठकीत कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, वीज, सिंचन आणि पेन्शनच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

‘तिसरा टप्पा आक्रमक, हिंसक असेल’

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पहिल्या टप्प्यात सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यो दोन दिवसांत सरकारने कुणाशीही चर्चा करावी; पण निर्णय घ्यावा, असे आव्हान देण्यात आले आहे. सरकारने दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तीन टप्प्यांतील या आंदोलनाचा तिसरा टप्पा हिंसक आणि आक्रमक असेल, अशा इशाराही समितीने दिला आहे.

नाशिकसह मुंबईची रसद तोडणार

समितीने तयार केलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणाही या वेळी करण्यात आली असून, सरकारची लाडकी असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या बड्या लाडक्या शहरांची रसद तोडण्याचा इशारा दिला आहे. मुंबई शहराची रसद तोडली तर सरकार ठिकाणावर येईल, अशी सूचना आमदार जयंत पाटील यांनी केली. दूध, भाजीपाला बंदीसोबतच नाशिक व रायगडमधून होणारा मुंबईचा पाणीपुरवठा तोडण्याचा थेट इशाराच या बैठकीत देण्यात आला आहे. त्यानंतर एक तर सरकार असेल; नाही सातबारा कोरा असेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

मंत्र्यांना गावबंदी

सरकारी यंत्रणेला वेठीस धरण्यासोबतच सुकाणू समितीने भाजपचीही कोंडी करण्याचा निर्धार केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना शेतकरी गावांमध्ये फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. गावांमध्ये सभा घेण्यासाठी आलेल्या भाजपच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना कर्जमाफीचा जाब विचारा, असे सांगून सभा न होऊ देण्याचा इशाराच दिला आहे. त्यामुळे सरकारसोबतच भाजपचीही कोंडी केली जाणार आहे.

आत्महत्या न होण्याची हमी घेऊ

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा खरा आणि खोटा असा भेदाभेद चालवला आहे. त्यावरही बैठकीत टीकास्र सोडण्यात आले असून, कर्जमाफी दिली तर आत्महत्या थांबतील काय, असे सांगणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांनाही सडेतोड उत्तरे देण्यात आली आहेत. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, याची हमी आम्ही घेतो; पहिले कर्जमाफ करा, असा प्रस्ताव सरकारला दिला. संभाजी बिग्रेडने कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याचे हमीपत्र आम्ही भरून देऊ, असा दावा केला.

‘कोणाचीही मदत घेऊ’

सुकाणू समितीच्या बैठकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीवर काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांना स्टेजवर जाण्यास विरोध करण्यात आला. त्यावर समितीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करत, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आमच्या सोबत जो येईल त्याला आम्ही सोबत घेऊ, असे शेट्टींसह कडू यांनी सांगितले. सरकारविरोधात जो असेल तो आमच्यासोबत असेल, अशी भूमिका नेत्यांनी स्पष्ट केली.

महिलेचा गोंधळ

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आयोजित केलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत मुंबईच्या कल्पना इनामदार या महिलेने गोंधळ घालत गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. माईकचा ताबा घेत, शेतकरी संप राजकारणविरहित असल्याचे सांगितले जात असताना खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू व्यासपीठावर कसे, असा प्रश्न या महिलेने विचारला. त्यामुळे एकच गोंधळ उडला. पोलिस आणि कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलेला घेराव घालत व्यासपीठाबाहेर नेले. भाजपच्या इशाऱ्यानेच ही महिला आल्याचा आरोप सभेतील नेत्यांनी या वेळी केला.

चर्चेचे दरवाजे उघड

राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर सुकाणू समितीने सरकारसाठी चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. सरकारला वाटत असेल त्यांच्याशी चर्चा करा; पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असे आवाहन या समितीने केले आहे.

अशी सुकाणू समितीची रणनीती

पहिला टप्पा ः सरकारला निर्णयासाठी दोन दिवसांची मुदत

दुसरा टप्पा ः १२ जूनला धरणे, ठिय्या, १३ जूनला रेल रोको

तिसरा टप्पा ः मुंबई, पुणे, नागपुरातील रसदकोंडीचा इशारा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस आला धावून; पूल गेला वाहून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि. ७ ) जूनला धुळ्यात पावसाने दमदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला होता. त्याचा फटका शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चारपदरी कामाला बसून, इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळील पूल वाहून गेला. यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका वगळता शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातदेखील पावसाचे आगमन झाल्याने जिल्ह्यात सरासरी २१.५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

धुळे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने सात जूनला हजेरी लावत तालुक्यातील कुसूंबा, मोराणे, नेर, उडाणे, मेहेरगाव, निमडाळे याठिकाणी चांगलाच दणका दिला. तर बुधवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसाचा फटका महामार्ग क्रमांक सहाला बसला असून, नवीन होणाऱ्या महामार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणी जुने पूल पाडून नवीन बांधण्यात येत आहेत. त्यांना या पावसाच्या पाण्यामुळे क्षती पोहोचली आहे. प्रशासनाकडून पूलावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

वाहतुकीची कोंडी

या पावसाने जिल्ह्यातील काही ठिकाणी महामार्गावरील रस्ते वाहून गेल्याने मध्यरात्रीपासून वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांच्या मदतीने ही कोंडी सोडविण्यात आली. तर सुरतकडून येणारी वाहणे कुसूंबा, मेहेरगाव मार्गे वळविण्यात आली आहेत. अवजड वाहनधारकांना मात्र गुरुवारी दुपारपर्यंत नंतर मार्ग काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २१.५ मिलीमीटर पावसाची नोंद प्रशासनाने केली असून, त्यात सर्वाधिक शिरपूर तालुक्यात ३७ मिलीमीटर, धुळे शहर व तालुका ३४ मिलीमीटर, शिंदखेडा १५ मिलीमीटर, साक्री तालुका शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर उद्या अनुभवणार ‘कलासंगम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या ‘कलासंगम’ला (आर्ट फेस्ट) अवघे २४ तास उरले असून, नाशिककर नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, संगीत, वारली या कलांचा संगम पाहण्याची संधी नाशिककरांना ‘मटा’ने उपलब्ध करुन दिली आहे.

नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त १० व ११ जून रोजी सकाळी १० वाजेपासून मविप्र आर्किटेक्ट कॉलेज, प्रसाद मंगलकार्यालयाजवळ या कलासंगमाचे (आर्ट फेस्ट) आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्रसिध्द व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित रहाणार आहेत.

नाशिकचे नामवंत शिल्पकार नीलेश ढेरे, यतीन पंडित, श्रेयस गर्गे, भूषण कोंबडे यात सहभागी होणार असून, ११ ते १ याकालवधीत त्यांची प्रात्यक्षिके पहायला मिळणार आहेत. दुपारी १ वाजेपासून चित्रकारांच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात होणार आहे. यात संजय दुर्गावाड, बाळ नगरकर, कैलास परदेशी हे चित्रकार सहभागी होणार आहेत. दुपारी ३ ते ४ या कालावधीत प्रभाकर झळके हे आपल्या कुंचल्याने कार्टून्सची मजा दाखवणार आहेत. त्यानंतर श्रध्दा कारळे या ४ ते ५ या कालावधीत वारली पेंटिंग सादर करणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता प्रफुल्ल सावंत हे लॅण्‍डस्केप पेंटिंग, तर राजेश सावंत हे क्रिएटिव्ह पेंटिंग सादर करतील. संध्याकाळी ६ वाजता प्रसाद पवार, समीर बोंदार्डे, संजय अमृतकर हे फोटोग्राफीविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. संध्याकाळी ६.३० वाजता नंदू गवांदे हे कॅलिग्राफी सादर करणार आहेत. नाशिककरांनी या आर्ट फेस्टला अवर्जून हजेरी लावावी, असे आवाहन ‘मटा’च्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मविप्रच्या आर्किटेक्ट कॉलेज आणि तेथील स्टाफने बहुमोल सहाय्य केले आहे.

नवनवीन प्रयोग मिळणार पहायला

नाशिकमधील परफॉर्मिंग आर्ट सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा व नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा उपक्रमाचा उद्देश आहे. दुसऱ्या दिवशी ( ११ जून) हौशी कलाकारांसाठी सकाळी १० ते ४ या कालावधीत व्यासपीठ खुले राहणार असून, त्यात आपली कला सादर करता येणार आहे. याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता नाशिकमधील प्रख्यात नृत्यांगना रेखा नाडगौडा, सुमुखी अथनी आणि कीर्ती भवाळकर नृत्य सादर करणार आहेत. नितीन वारे आणि नितीन पवार यांचे शिष्य तबलावादन करणार असून तबल्यातील कायदे, पलटे, चक्रदार, परण, तिहाई असे विविध प्रकार सादर करणार आहेत. यात सोलो व सहवादन या दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे. संध्याकाळी ६.१५ ते ६.४५ याकालावधीत बासरीवादक मोहनी उपासनी यांचे शिष्य बासरीवादन करणार आहेत. ७ ते ७.३० या कालावधीत अष्टूरकर आणि ग्रुप सतारवादन करणार आहेत. ७.४५ ते ८.४५ या कालावधीत तीनही नृत्यांगना व त्यांच्या शिष्य आपली कला पेश करणार आहेत. रात्री ९ ते ९.३० याकालावधीत नरेंद्र पुली आणि त्यांचे शिष्य गिटारवादन करणार आहेत.

झुंबा वर्कशॉप

महिलांसाठी झुम्बा वर्कशॉप होणार असून, या वर्कशॉपमध्ये नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन ठेवण्यात आले आहे. हे वर्कशॉप १३ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ याकालावधीत अखिल भारतीय मध्यवर्ती ब्राह्मण संस्था हॉल, पाण्याच्या टाकीजवळ येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images