Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शेतकरी संपाला वकिलांचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या संपाला आता वकील बांधवांनीही पाठिंबा दर्शविला असून, शेतकरीहिताच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, अशा आशयाचे निवेदन वकील विचार मंचने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.

शेतकरी संपाचा सलग सहावा दिवस असून, त्याचा दैनंदिन जीवनमानावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. नैसर्गिक अरिष्ट आणि तत्सम कारणांमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. आपण जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमुक्ती होईल या आशेने शेतकऱ्यांनी भाजप सरकारच्या हाती सत्ता दिली. परंतु, सरकारने हे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

वकील विचार मंचच्या मागण्या

आंदोलकांवरीले गुन्हे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती द्यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव द्यावा, वृध्द शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या मुलींना मोफत शिक्षण मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जावडेकरांनी साधले सोशल इंजिनीअरिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सामान्य दलित कार्यकर्त्याच्या घरी भोजन करून सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग करणाऱ्या राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकत केंद्रीय मनुष्यबळ विकास व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही नाशिक दौऱ्यात शरद मोरे यांच्या घरी स्नेहभोजन घेतले. बाहुबली नेता पवन पवार यांना पराभूत करून नाशिक महापालिकेत निवडून आलेल्या मोरेंना यानिमित्ताने भाजपने नैतिक बळ तर दिलेच, शिवाय पवन पवार यांना पावन करून घेण्याच्या पापाचे अशा पद्धतीने प्रायश्चित्तही घेतले, असे मानले जात आहे.

प्रकाश जावडेकर यांचे नाशिकशी जुने ऋणानुबंध आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदेचे काम करताना त्यांचे नाशिकशी अनेकदा येणे होत असे. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ते प्रथमच नाशिकला आले. मात्र, परिषदेत काम करणारा कार्यकर्ता शरद मोरे यांच्या प्रभागातूनच प्लास्टिकमुक्त भारत या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ करून व नंतर त्यांच्याच घरी भोजन घेत त्यांनी आगळ्या पद्धतीने हा ऋणानुबंध जपला. शरद मोरे नुकतेच महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. बहुचर्चित बाहुबली नेता पवन पवार याला पराभूत करून मोरे निवडून आले हा त्यातील कळीचा मुद्दा. येथील पोटनिवडणुकीच्या वेळी पवन पवार याला पक्षात घेऊन शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी टीकेचे मोहोळ अंगावर ओढवून घेतले होते. दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनाही त्याची दखल घ्यावी लागल्याने नंतर त्याची हकालपट्टी केली गेली. त्याला पालिकेचे तिकीटही नाकारण्यात आले. त्याच्याविरुद्ध शरद मोरे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उभे करून नंतर पक्षाने मोठीच रिस्क घेतली होती. मात्र, मोरे निवडून आल्याने पवार या दलित नेत्यावर अन्याय केल्याच्या आरोपातून भाजप सहिसलामत बाहेर पडला.

भाजपचे पापक्षालन?

मोरे पूर्वी आयटीआयमध्ये शिक्षक होते. गेल्या पंचवार्षिकला निवडणुकीत उभे राहण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. तेव्हा यश मिळाले नाही. मात्र, नंतर त्यांनी खासगी क्लासेस सुरू केले. नंतर बांधकाम व्यवसायातही रस घेतला. अर्थात, गेली पंचवीस वर्षे ते भाजपशी संबंधित संघटनेत काम करीत होते. मागासवर्गीय समाजाचे असूनही या हिंदुत्ववादी पक्षात त्यांनी दीर्घकाळ मनापासून काम केले. त्याचीच पावती त्यांना नगरसेवकपद मिळण्यात तर झालीच, शिवाय जावडेकरांनी खास आठवण ठेवून त्यांच्या घरचे भोजन घेत सोशल इंजिनीअरिंगही साधून घेतले. पवन पवार याला पावन करून घेत असताना जाणता-अजाणता झालेल्या या कृत्याचे पापक्षालनही यानिमित्ताने भाजपने करून घेतले, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांना छावणीचे रूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य काही कार्यालयांना मंगळवारी छावणीचे रूप प्राप्त झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कार्यालयांबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संप करूनही सरकार मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याने शेतकरी अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारू लागले आहेत. शेतकरी संपापाठोपाठ एक दिवस महाराष्ट्र बंद करण्यात आला. मंगळवारी सरकारी कार्यालयांना टाळे ठोकण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी जाहीर केले होते. त्यानुसार आंदोलक सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्याच्या तयारीत होते. परंतु, असा प्रकार घडू नये तसेच, त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थ‌ित होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय हे आंदोलकांचे हक्काचे ठिकाण आहे. त्यामुळे सातत्याने या कार्यालयाबाहेर विविध संघटनांकडून निदर्शने, आंदोलने होत असतात. सकाळी वकील विचार मंचने येथे आंदोलन केले. विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलने केली जाण्याची शक्यता गृहित धरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच अन्य विविध शाखांबाहेर पोलिस तैनात असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

ओझर कार्यालय लक्ष्य

निफाड तालुक्यात आंदोलक अधिक आक्रमक असल्याचे पहावयास मिळाले. ओझर येथे तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयास गावकरी आणि शेतकऱ्यांनी टाळे ठोकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंडे विक्रीत दुप्पट वाढ

$
0
0

नाशिककर फस्त करतात रोज तीन लाख अंडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भाज्यांचा तुटवडा होत असून, व्हेज खाणाऱ्यांनी उसळीचा तर नॉनव्हेज खाणाऱ्यांनी अंड्यांचा पर्याय स्वीकारला आहे. नाशिक शहरात अंडे विक्रीने जोर धरला असून, चार दिवसात नेहमीपेक्षा अंड्यांच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे.

अंडे व्हेज की नॉनव्हेज? हा वादाचा मुद्दा असला तरी ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ असे मानणाऱ्यांची संख्या नाशिकमध्ये अडीच ते तीन लाख आहे. हेच प्रमाणे हिवाळ्यामध्ये साधारणपणे दुप्पट होत असते. मात्र पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी भाज्यांच्या तुटवड्यामुळे अंड्यांच्या मागणीने जोर धरला आहे. विशेष म्हणजे या एकूण मागणीच्या अवघे ०.५ टक्के इतकेच अंडे नाशिक जिल्ह्यात उत्पादित होतात.

अन्य शहरांच्या आणि लोकसंखेच्या तुलनेत नाशिकमध्ये अंड्यांचा खप चांगला असून, शहरात होलसेलची चार मोठी दुकाने आहेत. त्यापैकी भाभानगरमधील दुकानातून १ ते २ लाख, नाशिकरोडमधून ४५ ते ५० हजार, सिडकोच्या दुकानामधून ५० ते ६० हजार अंड्यांची अंदाजे विक्री होत असते. होलसेल अंड्यांची मागणी आणि पुरवठा पाहून नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटी भाव ठरवते. शहरात जे अंडे येतात ते मुख्यत्वे करून हैदराबाद, विजयवाडा, होस्पेट या ठिकाणाहून येतात. शहराच्या विक्रीच्या तुलनेत नाशिकमध्ये होणारे उत्पादन हे अत्यंत अल्प म्हणजे ०.५ टक्के इतके आहे. रोज या व्यवसायात शहरात सहा ते सात लाखांची उलाढाल होत असते. तर मुंबईत याच व्यवसायाची उलाढाल रोज चारशे कोटी रुपयांची आहे.

गावठी अंड्यांना मोठी मागणी असली तरी नाशिकमध्ये ती दाखल होण्याचे दैनंदिन सरासरी प्रमाणे साधारणपणे सहाशे इतके आहे. मागणी आणि पुरवठ्यातली तफावत मोठी असल्याने इंग्रजी अंड्यांना चहाच्या पाण्यात बुडवून त्याला गावठी अंड्यांसारखा रंग देऊन फसवणूक करण्याचे प्रमाणही मोठे आहे. थंडीत जसा अंड्यांना मागणी वाढते तशीच भाज्यांचे भाव वाढल्यावरही अंडे मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी मांडले.

संपकरी शेतकऱ्यांनी अंड्यांच्या गाड्यांना तरी अजून मज्जाव केला नसल्याने कर्नाटकमधून येणारे अंडे व्यवस्थित व वेळेवर येत आहेत. सध्या अंड्यांना सोन्याचे दिवस असून, मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.

दरात किरकोळ वाढ

१ जून - ३६० रुपये शेकडा, २ जून - ३६५ रुपये शेकडा, ३ जून - ३७० रुपये शेकडा, ४ जून - ३७५ रुपये शेकडा, ५ जून - ३७५ रुपये शेकडा, ६ जून - ३८५ रुपये शेकडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांत, तहसीला ठोकले टाळे

$
0
0

जिल्ह्यात आंदोलनाची धार कायम; जनजीवनावर परिणाम

टीम मटा

महाराष्ट्र बंदनंतर आंदोलनाची पुढची दिशी म्हणून मंगळवारी ‌जिल्ह्यात प्रांत, तहसील व तलाठी कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. सरकार कर्जमाफी देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन करण्यात आले.
कळवणमध्ये निषेध

कळवण : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी कळवण येथे प्रशासकीय इमारतीतील प्रांत कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. नंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्य शासनावर तोंडसुख घेत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी सांगितले, की शेतकरी १९८० नंतर पहिल्यांदा एकत्र आला आहे. या आंदोलनाच नेतृत्व आता नाशिक जिल्ह्याने स्वीकारले असून, शासनाला जाग आणल्याशिवाय स्वस्त बसले जाणार नाही. हे आंदोलन चिघळत जाईल असे कृत्य घडवण्यासाठी आता शासनाने परावृत्त करू नये, असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहन पुन्हा एकदा त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

ठिय्या आंदोलनाप्रसंगी कळवणचे पोलिस निरीक्षक सुजय घाडगे, तहसीलदार कैलास चावडे यांच्यासह शासकीय यंत्रणा आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. या आंदोलनाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, माकपचे तालुका सरचिटणीस हेमंत पाटील, देवराम पगार, चंद्रकांत पवार, अनिल पगार, विलास रौदळ, रामा पाटील, सुनील पगार, मुरलीधर पगार, मोतीराम पगार, अमोल पगार, प्रदीप पगार, आदींसह शेकडो आंदोलनकर्ते शेतकरी उपस्थित होते.

वाखारीतही आंदोलन

मनमाड : शेतकऱ्यांच्या संपाच्या सहाव्या दिवशी मंगळवारी नांदगाव तालुक्यातील, साकोरा तसेच शहरानजीक औरंगाबाद रस्त्यावरील म्हसोबा बारी या ठिकाणी दूध व भाजीपाला नेणारी वाहने शेतकऱ्यांनी अडवली. तसेच, वाखारी तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. कर्जमाफी देण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी वाखारी तलाठी कार्यालयाला टाळे ठोकून संताप व्यक्त केला.

येवल्यात ठिय्या

येवला : शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या तीव्र आंदोलनातील शेतकऱ्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत व शेतकरी संपातील सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्यात या मागणीसाठी विविध पक्षांच्या तालुक्यातील नेते अन् कार्यकर्त्यांसह किसान क्रांती मोर्चाने येवला तहसीलवर कार्यालयावर धडक मारत एक तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी तहसीलच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा देखील यावेळी प्रयत्न केला गेला. दुसरीकडे तालुक्यातील सायगांवमध्ये ‘अर्धनग्न’ मोर्चा काढून भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. येवला तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ठिय्या आंदोलनात शिवसेनेचे नेते संभाजी पवार, तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख, जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे, छगन आहेर, संतु पा. झांबरे आदी सहभागी झाले होते.

सायगांवमध्ये अर्धनग्न मोर्चा

सायगाव येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी काढलेला ‘अर्धनग्न’ मोर्चा चर्चेचा विषय ठरला. भाजप सरकार हे अकार्यक्षम व शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत यावेळी सायगावकरांनी अर्धनग्न मोर्चाद्वारे सरकारचा निषेध केला. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गावातील रोकडोबा पारावर जमलेल्या दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनी ‘आक्रोश’ सभा घेतली. या सभेत भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी यावेळी ‘बोंबाबोंब’ आंदोलन देखील छेडण्यात आले होते.

निफाड येथे शेतकरी आक्रमक

निफाड : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलकांनी निफाड तहसील कार्यालय गेटला टाळे ठोकले. याप्रसंगी हरिश्चंद्र भवर, शिवाजी ढेपले, राजेंद्र बोरगुडे, संपत व्यवहारे यांची भाषणे झाली. यावेळी दत्तात्रय डुकरे, हरिश्चंद्र भवर, राजेंद्र बोरगुडे, शिवाजी ढेपले, बापू कुंदे, किसन कुंदे, सुरेश कापसे, रमेश जाधव, संपत व्यवहारे, कृष्णा नागरे, बाळासाहेब रंधवे, रघुनाथ कुंदे, संदीप गाजरे, दत्तू मोगल आदींसह शेतकरी उपस्थित होते. शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून उगाव येथे मंगळवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवला होता. तसेच, उगाव, कोठुरे या गावात शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चेसाठी बुध्दिजिवी आलेच नाहीत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेपासून तर लोकसभेपर्यंत भाजपाला साथ देणाऱ्या नाशिकमधील बुध्द‌िज‌िवी नागरिकांशी संवाद साधायला मिळणार म्हणून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मंगळवारी अगदी ठरल्या वेळेत अंबडच्या इंज‌िनीअरिंग क्लस्टर येथे हजर झाले. पण कार्यक्रमस्थळी बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती अन् मोजके चेहरे बघून अचंबित झालेल्या जावडेकरांनी अंतर्गत व
र्तुळात नियोजनाबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त करत दीड तासांच्या ‘इंटेलेक्चुअल टॉक’ चे रुपांतर पंधरा मिन‌िटांच्या ‘स्पीच’मध्ये केले अन् निघून गेले.

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीचे औचित्य साधून नाशिकमधील इंटेलेक्चुअल वर्तुळाचा ब्रेन वॉश करण्यासाठी पूर्वतयारीनिशी आलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा ‘इंटेलेक्चुअल टॉक’ स्थानिक कोंडाळ्याच्या ढिसाळ नियोजनामुळे पुरता फसला. मोठ्या अपेक्षेने आलेल्या जावडेकरांचा झालेला अपेक्षाभंग यावेळी लपू शकला नाही. अखेरीस वेळ सावरून नेत जावडेकरांनी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे औपचारीक भाषण देऊन हा कार्यक्रम गुंडाळता घेतला.
जावडेकर यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे इंज‌िनीअरिंग क्लस्टर हा कार्यक्रम शासकीय दौऱ्याप्रमाणे ‘इंटेलेक्चुअल टॉक’ अशा मथळ्याखाली आयोजित करण्यात आला होता. येथे शहराच्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी या हॉलमध्ये उपस्थितांची संख्याही इतकी मर्यादीत होती की बऱ्याचशा खुर्च्या रिक्त होत्या. नाशिक विकासासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांसोबत थेट प्रश्नोत्तरातून चर्चा होईल, अशी अपेक्षा असणाऱ्यांचा मात्र यातून अपेक्षाभंग झाला. केंद्रीय मंत्री आले, त्यांनी व्याख्यान दिले अन् बाय बाय करीत निघून गेले. अशी या कार्यक्रमाची फलश्रुती होण्यास स्थानिक कार्यकर्त्यांचे कोंडाळेच कारणीभूत होते काय, अशीही चर्चा क्लस्टर परिसरात कार्यक्रमाच्या नंतर रंगली होती.
भ्रष्टाचार रोखण्यात सरकारला यश
यावेळी जावडेकर म्हणाले की, मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात जनता कमालीचा भ्रष्टाचार आणि टोकाची महागाई या मुद्द्यांना विशेषत: कंटाळली होती. अवघे तिसरे वर्ष पूर्ण करताना भ्रष्टाचार रोखण्यात यश मिळविण्यापासून तर महागाईदर आटोक्यात आणण्यापर्यंत सरकारने केलेली कामगिरी हे सरकारचे मोठे यश असल्याचे प्रकाश जावडेकर म्हणाले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तळागाळातील ३० कोटी जनतेचे जनधन खाते काढले गेले, देशातील प्रत्येक नागरिकाचे आधारकार्ड काढले गेले आणि बहुतांश जनतेच्या हाती मोबाइल पोहचविले गेले. जनधन खाते, आधार कार्ड आणि मोबाइल या त्रिम‌ितीच्या रचनेवर अखेरच्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचविण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरल्याचा दावाही जावडेकर यांनी केला. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण लिटमस टेस्टमध्ये फेल!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्यानंतरच शहर परिसरात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ढगाळ वातावरण होताच वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणने पावसाळापूर्व केलेल्या नियोजनाचा फोलपणा उघड झाला असून, लिटमस टेस्टमध्ये महावितरण कंपनी फेल झाल्याची भावना व्यक्त होत आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर वीजपुरवठ्याची काय स्थिती राहील, या विचाराने नागरिक धास्तावले आहेत.

गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने शहरात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यावेळी वीजपुरवठा वारंवार खंडित झाला होता. ठिकठिकाणी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याचे दिसून आले. नाशिक शहर मंडळातील सिडको, भद्रकाली, अंबड, सातपूरसह त्र्यंबकेश्वर येथे डिस्क इन्सुलेटरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन या भागातील फिडर ट्रीप झाले होते. काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही पडल्याने तेथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अर्धा ते दीड तासाचा अवधी लागला.

--

गैरसोयीने नागरिक हैराण

मान्सूनपूर्व पावसादरम्यान नाशिक शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. वीजपुरवठा खंडित होण्याचा कालावधीही मोठा होता. त्यानंतरही काही भागात ढगाळ वातावरण झाल्यास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. ढगाळ हवामानामुळे असह्य उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतानाच वीजपुरवठा गायब होत असल्याने सामान्य नागरिकांवर घामाघूम होण्याची वेळ येत आहे.

--

पावसाळापूर्व कामे फोल

मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करून त्यांची अंमलबजावणी महावितरण कंपनीने केली असतानाही किरकोळ पावसाच्या आगमनादरम्यान कित्येक तास वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरण कंपनी लिटमस टेस्टमध्ये फेल झाल्याचे उघड झाले आहे. पावसाळापूर्व कामे फोल ठरल्याचेच यामुळे अधोरेखित झाले असून, निदान मान्सूनच्या आगमनापूर्वी तरी त्यात सुधारणा करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्कालीन कृती आराखडा तयार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिवृष्टी आणि महापुराचा सामना करण्यासाठी पालिकेत आपत्कालीन कक्ष तयार करून चार महिन्यांचा आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच सहा विभागीय कार्यालयातही आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला असून, अतिवृष्टीत पुराखाली येणाऱ्या भागाचे सर्व्हेक्षण केले जात आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी आपत्कालीन विभागात ३५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने गोदावरीसह तिच्या उपनद्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावेळेस खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने महापालिकेत आता २४ तास आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच, मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालयामंध्येही आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीचा सामना कण्यासाठी यावेळेस प्रथमच अग्निशामन विभागाच्या १३० कर्मचाऱ्यांसह सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन कक्षात तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास ८०० कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे हे या आपत्कालीन कक्षाचे प्रमुख राहणार असून, चार उपायुक्त त्यांना सहायक राहणार आहेत. तसेच, सर्व विभागप्रमुख आणि विभागीय अधिकारी या कक्षाचे सदस्य राहणार आहेत. अग्निशामक विभागाने सहा पथके स्थापन केली आहेत.

सोशल मीडियाचा वापर

आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चालू वर्षी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांचे सर्व्हेक्षण केले जात असून, त्याची माहिती गोळा केली जात आहे. नदीकाठावरील नागरिकाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यांना नदीच्या पुराची स्थिती अपडेट केली जाणार आहे. पावसाचा अंदाज, नदीत पाणी सोडण्याची माहिती आणि पुराची स्थिती त्यांना दर तासाला दिली जाणार आहे. त्यासाठी तीन शिफ्टमध्ये काम करण्यासाठी जवळपास साडेतीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर येत्या दोन ते तीन दिवसांत हा आपत्कालीन कक्ष कार्यान्वित होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समित्यांना फटका

$
0
0

कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शेतकरी आंदोलनाचा बाजार समित्यांना मोठा फटका बसला आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाला अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र गेल्या सहा दिवसांत सुमारे १८ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. दिवसरात्र गजबजणाऱ्या बाजार समिती परिसरात सध्या शुकशुकाट बघायला मिळत आहे. पिंपळगाव बसवंत, लासलगाव या मोठ्या बाजार समित्यांमध्ये व्यवहार ठप्प झाले आहेत.

भाजीपाल्यासाठी नाशिक बाजार समिती हे मुख्य विक्रीचे केंद्र आहे. येथून जवळपास पन्नास टक्के भाजीपाला एकट्या मुंबईला पाठविला जातो. त्या खालोखाल गुजरातला ३५ टक्के, पुणे आणि विदर्भात १० टक्के आणि नाशिकच्या स्थानिक भाजीबाजारासाठी पाच टक्के भाजीपाला पाठवतात. पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्रीदेखील बाजार समितीत भाजीपाल्याचे व्यवहार होत असतात.

मापारी, हमालांना चणचण

नाशिक बाजार समितीत ३२५ अडतदार, १२०० व्यापारी आणि २५० पेक्षा जास्त हमाल व मापारी आहेत. या संपामुळे यांचे कामकाज एकदमच बंद झाले आहे. हमाल आणि मापारी हे रोजंदारीवर काम करणारे असल्यामुळे रोज आलेल्या पैशावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. बाजार समिती रोज साधारणतः १२०० ते १५०० टन भाजीपाल्याची आवक होत असते.

हा सर्व भाजीपाला आलेल्या वाहनातून सेलहॉलमध्ये ठेवणे, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला भाजीपाला उचलून तो व्यापाऱ्यांच्या गाळ्यावर पोहचविणे, त्याची पॅकिंग करणे, तो माल वाहनांमध्ये भरणे, मालाचे वजन करणे ही कामे हमाल आणि मापारी करीत असतात.

या कामातून एक हमाल सुमारे २०० ते ४०० रुपये रोजची कमाई करतो. भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर ही कमाई आणखी वाढते. शेतकरी संपाला हमाल, व्यापारी, अडतदार या घटकांनी पाठिंबा दिलेला आहे. असे असले तरी त्यांच्या दैनंदिन व्यवहार एकदमच ठप्प झाल्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे.

सोशल मीडियावर पडसाद

‘ना पक्षासाठी, ना जातीसाठी, ना धर्मासाठी आता लढायचं फक्त आपल्या शेतकऱ्यासाठी... जय जवान जय किसान’, ‘आता नाही म्हणणार १० रुपये भाजीची जुडी ५ ला द्या... आता आपण म्हणायचं तुझी लायकी असेल तर विकते घे नाही तर उपाशी झोप’ असे अनेक मेसेजेस गेल्या पाच दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेत भरले कांदे अन् बटाटे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्हा बँकेच्या पालखेड (ता. निफाड) येथील शाखेत शेतकऱ्यांनी अभिनव आंदोलन केले. पैसे भरण्याच्या चलणावर चक्क भाजी, फळे यांचा उल्लेख करीत क्रेटमधून ते जिल्हा बँकेच्या शाखेत भरले. या अनोख्या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले होते.

काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने कर्जाच्या अजगरी विळख्यात अडकून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या सहा दिवसांपासून संप पुकारला आहे. सातबारा कोरा करावा, कर्जमाफी मिळावी यासाठी कष्टकरी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. निफाड तालुक्यातील मिर्चीचे पालखेड येथे तर शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे. आगामी पीक लागवडीचा काळ पाहता मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना नव्याने कर्जपुरवठा करण्याचे जाहीर केल्यानंतर निफाड तालुक्यातील मिर्चीचे पालखेड येथील शेतकऱ्यांनी येथील एनडीसीसी बँकेत आपल्या खात्यात थेट भरणा पावतीमध्ये पैशांऐवजी एक हजार कांदे, बटाटे, टरबूज, भाजीपाला अशा शेतमालाचे चलन भरत या भरणा पावत्या थेट बँक शाखेत आपल्या कर्जखात्यात जमा केल्या आहेत. चलनात उल्लेख केलेला शेतमाल संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना मोजून त्यांना सुपूर्द केला आहे. सध्य परिस्थितीत शेतमाल विक्री केल्यानंतर उत्पादन खर्च तर सोडा, त्याचा मार्केटला आणण्यासाठी लागणारा खर्चही पदरी पडत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या पदरी पैसाच उरत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्ज भरण्याच्या आवाहनाला मिरचीचे पालखेड येथील शेतकऱ्यांनी अशा अनोख्या पद्धतीने पद्धतीने उत्तर दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याचे लागवडक्षेत्र घटणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नाशिक विभागात गेल्या वर्षी कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन व विक्रमी निर्यात झाली असली तरी गेल्या सहा वर्षांतील २०१२-१३ चा अपवाद वगळता मेट्र‌िक टनाला १३ हजार ६७१ इतका सर्वांत नीचांकी दर मिळाल्याचे डीजीसीआयएसच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे कांद्याची मातीमोल भावात विक्री करावी लागल्याने यंदा नाशिक विभागात कांदा पिकाच्या लागवड क्षेत्रात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

नाशिक विभागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड करण्यात येते. या विभागातील हवामान व जम‌िनीचा पोत या पिकासाठी पोषक असल्याने कांदा उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. नाशिकच्या कांद्याला देशांतर्गत बाजारपेठांसह श्रीलंका, बांग्लादेश, सौदी अरब, दुबई, नेपाळ, युरोपातील काही देशांत मोठी मागणी असते. परंतु, गेल्या पाच-सहा वर्षांपासून कांद्याचे दर ऐनवेळी कोसळत असल्याने कांद्याची बेभरवशाचे पीक अशी नवे ओळख तयार झाली आहे. परिणामी या पिकाच्या लागवडीऐवजी इतर पिकांकडे नाशिक विभागातील शेतकरी वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निर्यातीपेक्षा विभागाचे उत्पादन जास्त
गेल्या वर्षी झालेल्या एकूण निर्यातीपेक्षा केवळ नाशिक विभागातील कांद्याचे उत्पादन जास्त होते. याचा अर्थ सरकारकडून कांद्याच्या निर्यातीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याचे उघड झाले आहे. २०१६-१७ या वर्षी केवळ नाशिक विभागात ५६,०९,७५६.८८ मेट्र‌िक टन इतके कांद्याचे उत्पादन झाले होते. मात्र, या वर्षीची निर्यात ३०,६८,६३४.१४ मेट्र‌िक टन इतकी आहे. निर्यात वाढविण्यासाठी सरकारने पूर्वीच उपाययोजना केल्या असत्या तर मेट्र‌िक टनाला सरासरी जास्त दर मिळाला असता.

मेट्र‌िक टनामागे
९ हजारांचा फटका
गेल्यावर्षी उत्पादन व निर्यातीत विक्रमी वाढ झाली असली तरी मेट्र‌िक टनामागे सुमारे ९ हजार १९ रुपयांचा फटका सहन करावा लागला. परिणामी निर्यातीच्या तुलनेत परकीय चलनातही घट आली. स्थानिक पातळीवर कांदा प्रक्रिया उद्योगांची उभारणी करण्यास सरकारने नियोजन करुन त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावला पाहिजे. शेतकरीही नवीन प्रयोगांच्या प्रतीक्षेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड साहित्यिक डॉ. शिवप्रकाश यांना कुसुमाग्रज पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, कवी, नाटककार, समीक्षक प्रा. डॉ. एच. एस. शिवप्रकाश यांना २०१७ चा मानाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, तर लातूरच्या मेनका धुमाळे यांना बाबूराव बागूल कथालेखन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी मंगळवारी नाशिक येथे केली.

विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात १५ जून रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे प्रमुख पाहुणे, तर कुलगुरू डॉ. वायुनंदन अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे.

विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. डॉ. शिवप्रकाश यांचे इंग्रजी आणि कन्नड भाषेतील साहित्यात मोठे योगदान आहे. त्यांनी नऊ काव्यसंग्रह संपादित केले असून, १५ नाटकांचे लेखन केलेले आहे. याशिवाय त्यांच्या अनेक कवितांचे भारतीय आणि युरोपीय भाषांत अनुवाद, अनेक देशी-विदेशी नामवंत नियतकालिकांतून साहित्य प्रकाशित झालेले आहे.

विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात १५ जून रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. वाङ्मयीन व नाट्यविषयक चर्चासत्रांचे देशभर आयोजन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. साहित्य अकादमीच्या ‘इंडियन लिटरेचर’ या नियतकालिकाचे अनेक वर्षे त्यांनी संपादनही केले आहे. याबरोबरच तीन वर्षे बर्लिनमध्ये टागोर केंद्रात (भारतीय दूतावास) निर्देशक, कवितेसाठी आयोवा विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कविता प्रकल्पात सहा महिने काम, विविध चर्चासत्रांसाठी इंग्लंड, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रिया, पोलंड, तुर्की, बांगलादेश, चीन, थायलंड, जपान, दक्षिण अमेरिका आदी देशांत जाऊन इंग्रजी आणि कन्नड साहित्याचे आदानप्रदान करण्यातसुद्धा डॉ. शिवप्रकाश यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांना आजवर वीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. शिवप्रकाश सातवे मानकरी

विद्यापीठातर्फे डॉ. शिवप्रकाश यांना दिला जाणारा हा सातवा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार असून, यापूर्वी हिंदी साहित्यिक डॉ. विष्णू खरे, नागालँडच्या ज्येष्ठ साहित्यिक तेमसुला आओ, पंजाबी साहित्यिक डॉ. सुरजित पातर, गुजराथी सीतांशू यशश्चंद्र, कन्नड भाषेतील कवी जयंत कैकिनी, हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत देवताले आणि मल्याळी साहित्यिक डॉ. के सच्चिदानंदन या साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले आहे.

बाबूराव बागूल कथालेखन पुरस्कार

याबरोबरच विद्यापीठातर्फे दिला जाणारा २०१६ चा बाबूराव बागूल कथालेखन पुरस्कार लातूर येथील नवोदित कथालेखिका मेनका बाबूराव धुमाळे यांना त्यांच्या ‘कोरडा पाऊस’ या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. जिजामाता कन्या प्रशाला, लातूर येथे सहशिक्षिका म्हणून धुमाळे कार्यरत असून, त्यांना आजवर अंकुर साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा ‘बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार’, ‘चला कवितेच्या बनात’ उदगीरअंतर्गत दिला जाणारा ‘साहित्य साधना पुरस्कार’, ‘साहित्यज्योती कथा पुरस्कार’, नॅशनल बुक ट्रस्ट व राजन गवस संपादित ‘नवकथा लेखनमाला’ या कथासंग्रहात कथेचा समावेश आहे. त्यांनी विविध दिवाळी अंकांतूनही कथालेखन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकला स्पर्धेची बच्चेकंपनीला पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शहरात सध्या विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. या सोहळ्यात बच्चेकंपनीलाही खास स्थान देण्याचे उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोमवारी (दि. १२ जून) सकाळी ९ ते ११ या वेळेत मते लॉन्स, सावरकरनगर येथे होणार आहे.

नाशिक शहराला वा. गो. कुलकर्णींपासून ते शिवाजीराव तुपे आदींपर्यंत प्रसिद्ध व दिग्गज चित्रकारांची परंपरा आहे. या परंपरेला सलाम करून ‘मटा’ने वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शहरात चित्रकलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि लहान कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा होणार आहे.

--

तीन गटांत रंगणार

पाचवी व सहावी (एक गट), सातवी व आठवी (दुसरा गट), नववी व दहावी (तिसरा गट) अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी स्मार्ट सिटी हा विषय देण्यात आला आहे.

--

बक्षिसांची लयलूट

विद्यार्थ्यांना कागद ‘मटा’तर्फे पुरविण्यात येणार असून, इतर साहित्य (पेन्सिल, खोडरबर, रंग) विद्यार्थ्यांनी घरून आणावयाचे आहे. या ठिकाणी चित्र काढण्यासाठी भारतीय बैठकीची व्यवस्था असल्याने बसण्यासाठी छोटी सतरंजी व कागद धरण्यासाठी प्रत्येकाने पॅड आणायचे आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

--

हौशी कलाकारांनी येथे साधावा संपर्क

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइल क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात टाळे ठोक आंदोलन अयशस्वी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी, शेतीमालाला योग्य हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर ठिकठिकाणी संप पुकारला आहे. सोमवारी (दि. ६) संपाच्या सहाव्या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांना टाळे ठोक आंदोलनाचा पवित्रा हाती घेण्यात आला होता.

यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख एम. रामकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाबाहेर चोख बंदोबस्त तैनात केल्याने शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयांना टाळे ठोक आंदोलन यशस्वी झाले नाही. तसेच जिल्हाभरात आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावाही पोलिस प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यातील तालुकास्तरावरील पंचायत समित्या, तहसील कार्यालये, अपर तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यासह अन्य सर्व शासकीय कार्यालयाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त सोमवारी, सकाळी ९ वाजेपासून लावण्यात आल्याने जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले नाही. तसेच कामात कोणताही अडथळा निर्माण झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खबरदार, उपद्रव कराल तर...!

$
0
0

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी संपामुळे उद्भवलेली परिस्थ‌िती हाताबाहेर जाऊ लागल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थ‌िती नियंत्रणात आणता यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने आता जमावबंदी तसेच, शस्त्रबंदीचे हत्यार उपसले आहे. १९ जूनपर्यंत हा जमावबंदी आदेश लागू असणार आहे. या काळात आदेशाचा भंग केल्यास संबंधितांना

कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

कर्जमाफी व तत्सम मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यभर संप पुकारला असून, नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून सरकारविरोधात निषेध केला जात आहे. विरोधाची धार वाढत चालल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कळवण तालुक्यातील दळवट येथे संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. यामध्ये पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्यासह चार कर्मचारी जखमी झाले. सोमवारी महाराष्ट्र बंदवेळी त्र्यंबकेश्वर मार्गावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी जमावबंदी लागू करावी, अशी विनंती पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी ५ ते १९ जून या कालावधीत जमावबंदी तसेच शस्त्रबंदीचे आदेश लागू केले आहेत. या काळात कुठल्याही प्रकारचे हत्यारे, स्फोटक पदार्थ, बाळगण्यास मनाई असणार आहे. याखेरीज कुठल्याही व्यक्तीचे प्रतीकात्मक दहन आणि प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. प्रक्षोभक भाषणे तसेच हावभाव करणे, सोंग आणणे, चिन्हे तसेच फलक लावणे यावरही बंदी असणार आहे. पाचहून अधिक लोकांना एकत्रित जमण्यास, मोर्चा, सभा तसेच मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये मनाई असणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर पुन्हा अंबरदिवा

शेतकरी संपाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या वाहनावर पुन्हा एकदा अंबर दिव्याने जागा पटकावली आहे. शेतकरी संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थ‌ितीची पाहणी करण्यासाठी राधाकृष्णन बी जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देत आहेत. जिल्ह्यात सध्या तणावपूर्ण परिस्थ‌िती असून, या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होत आहे. म्हणूनच सुरक्षेच्या कारणास्तव वाहनावर अंबर दिवा लावण्यात आला असून, आपत्कालिन परिस्थितीत तो लावण्याची परवानगी असल्याचे प्रशासनातील सूत्रांकडून सांग‌ितले जात आहे.

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

शेतकरी संपाचा उद्रेक थांबविण्यासाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आला असला तरी त्या माध्यमातून प्रशासन आणि सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आता समाजातील विविध घटकांकडून होऊ लागला आहे. पाचहून अधिक लोकांना एकत्रित येता येणार नसल्याने सभा तसेच, बैठका घेण्यावरही मर्यादा आल्या आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देण्याची जबाबदारी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता आंदोलने करण्यावरही मर्यादा येणार आहेत. लग्न कार्य, धार्मिक कार्यक्रम, आठवडे बाजार तसेच अंत्ययात्रेमधील जमावाला ही बंदी लागू राहणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वालदेवी’ची पुन्हा गटारगंगा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

दारणेची महत्त्वाची उपनदी असलेल्या वालदेवी नदीपात्रातून रविवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेवेळी मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन करण्यात आले होते. त्यामुळे या पात्राने काहीसा मोकळा श्वास घेतला होता. मात्र, दोन दिवसांतच पुन्हा या नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिका प्रशासन वालदेवीच्या स्वच्छतेसंदर्भात पुरेसे गांभीर्य दाखवीत नसल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

वालदेवी ही दारणा नदीची प्रमुख उपनदी आहे. चेहेडी येथे ही नदी दारणेला मिळते. त्यापूर्वी या नदीचा प्रवाह शहरातून जेथून वाहतो त्या भागात या नदीचे पात्र अक्षरशः गटारगंगा बनले आहे. देवळालीगावासह विहितगाव भागात वालदेवीच्या काठावर अनधिकृत झोपडपट्टीची बेसुमार वाढ होत असल्याने या नदीपात्रातील प्रदूषणात मोठी भर पडत अाहे.

--

गोठे, झोपड्यांचा शाप

वालदेवी नदीच्या काठावर मोठ्या संख्येने अनधिकृत गोठे उभारण्यात आलेले आहेत.या गोठ्यांचे मालक गोठ्यांतील मलमूत्र, कचरा टाकण्यासाठी वालदेवी नदीच्यापात्राचा सर्रास वापर करीत आहेत. त्यामुळे या नदीच्या पात्राला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त होत आहे. अनधिकृत झोपडपट्टीची बेसुमार वाढही वालदेवीच्या स्वच्छतेच्या मुळावर आली आहे. वास्तविक वालदेवीपात्रात देवळालीगावात जिवंत झरे आहेत. परंतु, कचरा आणि गाळाने ते गाडले गेले आहेत.

---

ठोस उपाययोजनांचा अभाव

पाथर्डी, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला, विहितगाव, रोकडोबावाडी, देवळालीगाव, बागुलनगर, गुलाबवाडी हा नाशिक महापालिका हद्दीतील परिसर वालदेवी नदीच्या काठावर आहे. मात्र, या भागातच या नदीच्या पात्रात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. या नदीच्या स्वच्छतेबाबत महापालिकेकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची दिसून येत आहे.

--

मलनिस्सारण केंद्र, नाल्यांचे पाणीही नदीत

पिंपळगाव खांब येथील महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातील घाण पाणीही बऱ्याच वेळा वालदेवी नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे पिंपळगाव खांबजवळ या नदीच्या पात्रातील पाण्याला मोठ्या प्रमाणावर फेस आलेला दिसून येतो. याशिवाय या भागातील विहिरींचे पाणीही प्रदूषित झाले असल्याची बोंब या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे वडनेर, पिंपळगाव खांब, रोकडोबावाडी, विहितगाव, देवळालीगाव, गुलाबवाडी व बागुलनगर या भागातील उघडे नाले व गटारींचे दुर्गंधीयुक्त सर्व पाणी दिवस-रात्र वालदेवी नदीच्या पात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीच्या पात्रात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली असून, काठावरील रहिवासी भागातील नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहे.

--

वालदेवीच्या स्वच्छतेकडे महापालिकेने गोदावरीसारखे लक्ष देणे आवश्यक आहे. अनधिकृत झोपडपट्टी व गोठे या नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत आहेत.

-जगदीश पवार, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आंदोलनावर ‘चिंतन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक दौऱ्यावर आलेले केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी आपल्या व्यस्त दौऱ्यात वेळ काढत नाशिकमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ धुरिणांशी काही काळ गुफ्तगू केले. केंद्र आणि राज्य सरकारबद्दल जनमानसात असलेली प्रतिमा जाणून घेत, जावडेकर यांनी शेती, आरोग्य, शिक्षण या विषयांवरील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. सोबतच सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत काय भूमिका घ्यायची, याचीही चाचपणी त्यांनी ज्येष्ठ नेत्यांसोबत केली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिवसभर नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. आपल्या या व्यस्त दौऱ्यात जावडेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर व जिल्ह्यातील काही वरिष्ठ धुरिणांची भेट घेत, त्यांच्यासोबत विविध विषयांवर मंथन केले. संघाच्या बारा ते पंधरा निवडक प्रतिनिधींशी त्यांनी बंद दरवाजाआड चर्चा करून केंद्र व राज्य सरकारच्या कामकाजाबाबत जनतेमध्ये असलेली प्रतिमा आणि योजनांना मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच सध्या राज्यात कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातही जावडेकर यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी गुफ्तगू केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शक्य नसल्याचे या वेळी सांगण्यात आले असून, या आंदोलनाचे खापर विरोधकांवर फोडण्याचा मंत्र देण्यात आला. शेतकऱ्यांना भरकटवले जात असून, त्या संदर्भात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा सल्ला काही जणांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनासंदर्भात भाजपचा एखादा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्ला‌स्टिकमुक्तीचा नाशकात श्रीगणेशा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक हे विकसित शहर असले तरी स्वच्छतेबाबत इंदूर भारतात प्रथम आले आहे. नाशिकला ‘नंबर वन’ करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. प्लास्टिकमुक्त भारत हे समाज बदलण्याचे आंदोलन आहे. त्याचा शुभारंभ नाशिकमधून झाला आहे. ही नव्या नाशिकची सुरुवात आहे. पंतप्रधान मोदींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केले.

जावडेकर यांनी सकाळी जेलरोडच्या शिवाजी पुतळ्याला पुष्पहार घालून प्रभाग १८ मधील स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्त मोहिमेला प्रारंभ केला. त्यानंतर ते बोलत होते. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश ग‌िते, आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी, वसंत गिते, विजय साने, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, बाजीराव भागवत, सुनील बागूल, कामगार नेते पी. एन. आडके, नगरसेवक प्रा. शरद मोरे, मीरा हाडंगे, दिनकर आढाव, उद्धव निमसे, मीना माळोदे, पंडित आवारे, रंजना बोराडे, कोमल मेहरोलिया, कन्हैय्या साळवे, विशाल संगमनेर, मंदा फड, मुकूंद आढाव, प्रकाश घुगे, सतीश मंडलेचा आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री जावडेकर म्हणाले की, मोदी सरकारची तीन वर्षे ही परिवतर्नकारी आहेत. या काळात देशात साडेतीन कोटी शौचालये बांधण्यात आली, तर एक लाख ७० हजार खेडी हगणदारीमुक्त करण्यात आली. उघड्यावर शौच करणे थांबले. ही नवीन संस्कृती आहे. शहरात प्लास्टिकची समस्या गंभीर झाली आहे. शहरांमध्ये रोज १५ हजार टन प्लास्टिक जमा होते. त्यापैकी फक्त नऊ हजार टन गोळा केले जाते. वर्षाला वीस लाख टन प्लास्टिक तसेच राहते. जनावरे तसे समुद्रातील माशांच्या पोटात ते जाते. पर्यावरणाचीही मोठी हानी होते. त्यामुळे देश प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. त्याचा शुभारंभ नाशिकमधून झाला आहे. हे केवळ प्रशासनाचे काम नाही तर लोकसहभाग महत्वाचा आहे, असेही ते म्हणाले.

कॉँग्रेस-पाकिस्तानची अवस्था सारखीच
कॉँग्रेसची आणि पाकिस्तानची अवस्था एक सारखी असून सारख्या कुरापती काढत देशातील शांततेला गालबोट लावण्याचे काम ही मंडळी करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे कॉँग्रेस तग धरू शकणार नाही व तात्व‌िक चर्चादेखील करू शकणार नाही. यांच्या कांगाव्याचे आमच्या सरकारवर काहीही परिणाम होणार नाहीत. कितीही आघाड्या आल्या तरीही २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षालाच बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारने केलेल्या कामांचा आढावा कार्यकर्त्यांना सागंण्यासाठी कालिदास कलामंदिरात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सरकारने केलेल्या कामाचा अहवाल केंद्रातील मंत्री ९०० ठिकाणी देणार आहेत. यावेळी जावडेकर म्हणाले की, विरोधी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. निवडून आल्यानंतर मोदींची महती कमी होईल असे वाटले होते परंतु ती दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये पंचायत समिती, विधानसभेच्या निवडणुका झाल्या अशा सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने विजय प्राप्त केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सहा महिन्यांनी आढावा घेणार

प्लास्टिकमुक्त अभियानासाठी पुढील सहा महिने नगरसेवक व नागरिकांनी मोहीम राबवावी. त्याचा आढावा घेण्यासाठी आपण सहा महिन्यांनी नाशिकला येणार आहोत, असे सांगून जावडेकर म्हणाले की, नाशिककर सिंगापूर किती स्वच्छ आहे, हे पाहण्यास जातात. मात्र, अशी स्वच्छता ठेवा की परदेशी लोक नाशिक पाहण्यासाठी आले पाहिजे. पुण्यात शाळा, महाविद्यालयांत प्लास्टिकमुक्तीचा प्रयोग आम्ही यशस्वी केला. नाशिकमध्येही हे व्हावे.

बस स्थानकाला ‘सरप्राइज व्हिज‌िट’

जावडेकर यांनी नाशिकरोड बस स्थानकाला सरप्राइज व्हिजीट दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. तेथे जावडेकरांनी दुकानदारांना डस्टब‌िन ठेवण्याचे तसेच प्रवाशांना स्वच्छतेचे आवाहन केले. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, संजय दराडे, ज्ञानेश्वर भोसले, विकास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाळी ४० कर्मचाऱ्यांनी प्रभाग १८ मध्ये स्वच्छता केली. शिवाजी पुतळा, पवारवाडी, मोरे मळा, बालाजी नगर, एकता कॉलनी, वसंत विहार, रेल्वेस्टेशन येथे स्वच्छता केली.

मुक्त विद्यापीठातर्फे जावडेकर यांचा सन्मान
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे नाशिक येथे आले असता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी जावडेकर यांच्याशी शैक्षणिक उपक्रमांसंदर्भात चर्चा झाली. देशातील दूर शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक बदल करण्यात येत असून, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच सर्व विद्यापीठांना पाठविण्यात येणार असल्याचे जावडेकर त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रभारी जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला आवक ४३० क्विंटल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी संपामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. इगतपुरी, घोटी या बाजार समित्यांमध्ये मंगळवारी काही प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली, तर येवला येथील आठवडे बाजार रद्द करण्यात आला. जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा तब्बल ४३० क्विंटल भाजीपाला विकला गेला. घोटीत सर्वाधिक ३८९ क्विंटल, नांदगावात १०, तर मनमाड बाजार समितीमध्ये ३१ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. अन्य १४ बाजार समित्यांमध्ये आवक झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

११३ ट्रक रवाना

मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातून भाजीपाला, तसेच दुधाचे एकूण ११३ ट्रक, टँकर पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. दुधाचे २८ टँकर, भाजीपाल्याचे ५५ ट्रक, अन्य मालवाहतूक करणारे ३० ट्रक मुंबई, धुळ्याकडे रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त-अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्धाची ठिणगी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पालिकेच्या कामकाजाला व रखडलेल्या विकासकामांना गती दिली असली तरी, त्यांच्या कार्यशैलीवर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ‌िसर्स असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. कृष्णा अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत आयुक्त विरुद्ध अधिकारी यांच्यातील शीतयुद्धाला तोंड फुटले आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात अभिषेक कृष्णा यांनी पालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. पदभार हाती घेताच, कृष्णा यांनी पालिकेत रखडलेल्या विकासकामांना गती देत, रिझल्टबेस कामाला सुरुवात केली. बैठकांचा धडाका लावून पारदर्शक कारभाराला चालना दिली. खतप्रकल्प, एनजीटी, भंगार बाजार, कपाट आदी प्रश्न सोडवत त्यातून मार्ग काढला. त्यामुळे पालिकेच्या तुंबलेल्या विकासकामांना चालना मिळाली. कामकाजाला गती देण्यासाठी अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी सोपवत असताना कामांबाबत कठोर भूमिका घेतली. परंतु, आयुक्तांच्या तोंडून काम करुन घेताना कठोर शब्द वापरले जात असल्याचा आरोप अधिकाऱ्यांकडून केला जाऊ लागला. त्यामुळे अनेक दिवसांपासून अधिकारी आणि आयुक्तांमध्ये हा वाद धुमसत होता. या वादाला ऑफिसर्स संघटनेच्या माध्यमातून तोंड फुटले आहे. संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह महापौर रंजना भानसी यांच्याकडे तक्रार करून अधिकारी संघटनेने कैफियत मांडली आहे. आयुक्तांकडून येत असलेल्या अपशब्दांमुळे कामावर परिणाम होत असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष डी. पी. परडे आणि सल्लागार मोहन रानडे यांनी केला आहे.

पत्राच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान आयुक्तांच्या विरोधात देण्यात आलेल्या पत्रावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्याच सह्या नसल्याने पत्राबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेल्या पत्रावर तारीखही टाकण्यात आलेली नाही. संघटनेच्या लेटरहेडवर पत्र देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राची ओसीही नाही. त्यामुळे पत्राच्या सत्यतेबाबतच काही अधिकाऱ्यांकडून प्रश्न विचारले जात असून, पालिकेत असा कोणताही वाद नसल्याचा दावा काही अधिकाऱ्यांनी केला आहे.

महापालिकेत चुकीच्या कामकाजाला थारा दिला जाणार नाही. अधिकाऱ्यांना दिलेले काम वेळेत पूर्ण करता येत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु, काहीजण या कारवाईचे भांडवल करत आहेत. मी कोणतेही अपशब्द वापरत नाही. महापालिका ही माझी कुटुंबसंस्था आहे. मी कोणालाही चुकीची कामे सांगत नाही.
- अभिषेक कृष्णा, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images