Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके दाखल

$
0
0

२९ विषयांची दोन लाख पुस्तके प्राप्त

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारच्या निर्णयानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके दाखल झाली आहेत. आतापर्यंत मोफत पाठ्यपुस्तके धुळे तालुक्यातील पहिली ते आठवीसाठी मंगळवारअखेर २९ विषयांची एकूण दोन लाख ११ हजार ७९० पुस्तके प्राप्त झाली आहेत.

येत्या १५ जूनपूर्वी टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पाठ्यपुस्तके वितरित केले जाणार आहे. याबाबत संबंधित शाळा प्रशासनाला गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र पाठवून पुस्तके घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. ही पाठ्यपुस्तके शहरातील दुधेडिया हायस्कूल येथे गटशिक्षणाधिकारी एस. एन. देवरे, गटसमन्वयक एम. व्ही. बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सहाय्यक संदीप दामोदर, सुनील देवरे, संजय कालमेघ यांना पुस्तके पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव पालिकेचा दुपारपर्यंत लागणार निकाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या ८३ जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून, शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवीत असल्याने कोणाची सत्ता येते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

८३ जागांसाठी ३७३ उमेदवार रिंगणात होते. बुधवारी किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. गेल्या वेळी ६३ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का घसरला असून ५९.५२ टक्के मतदान झाले आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत स्ट्राँगरुममध्ये इव्हीएम मश‌िन आणण्यात आले.

प्रशासकीय तयारी पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्त रवींद्र जगताप व सात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, सर्वच मतमोजणी केंद्रांवर टेबल, ध्वनिक्षेपक, बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारपर्यंत सर्व २१ प्रभातील निकाल येणे अपेक्षित आहे.

अशी होणार मतमोजणी

मतदान केंद्रानुसार एका प्रभासाठी जास्तीत जास्त तीन फेऱ्या होतील. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान १५ टेबल असतील. एका टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक व शिपाई असे तीन कर्मचारी असतील. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण ८५ टेबल व ४८७ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मुस्ल‌िमबहुल पूर्व भागात भाजपने सर्वाधिक मुस्ल‌िम उमेदवार दिले आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत असून, एमआयएम व भाजपचे किती उमेदवार विजयी होतात याकडे लक्ष लागले आहे. पश्चिम भागात शिवसेना-भाजप यांच्यात प्रमुख लढत असून, किती बंडखोर अपक्ष विजयी होतात याबद्दल उस्तुकता कायम आहे. राज्यमंत्री दादा भुसे, आमदार असिफ शेख, मौलाना मुफ्ती, अद्वय हिरे, सुनील गायकवाड, युनिस इसा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वीस महिन्यांनी खुनाचा उलगडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

वाल्मिक नगर येथील संजयनगर भागातील जालिंधर अंबादास उगलमुगले (वय २३) या २०१५ मध्ये बेपत्ता तरुणाचे प्रत्यक्षात अपहरण करून त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाला आहे. इतर प्रकरणांत सध्या कारागृहात असलेल्या सराईत गुन्हेगारांनी त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घोटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेल्या या प्रकरणाचे गूढ २० महिन्यांनंतर उलगडले आहे.

जालिंधर घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेल्याची तक्रार १ ऑक्टोबर २०१५ रोजी पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर तपासात जालिंधर उगलमुगले व्यक्तीचा घातपात झाल्याची संशय व्यक्त केला जात होता. जालिंधरला अविनाश कौलकर व रोहित कडाळे यांच्यासोबत बघितल्याचे निष्पन्न झाले होते. पंचवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून तपास केला. संशयितांनी जालिंधरला वाल्मिकनगर येथून त्याला घेऊन टाकळी परिसरात सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, कुंदन परदेशी, श्याम महाजन यांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर दुसरा आरोपी श्याम महाजन याला अटक करून तपास केला असता, त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने अपहरण केलेल्या जालिंदर उगलमुगले याला कुंदन परदेशी व राकेश कोष्टी यांच्या मदतीने ठार मारून मौजे उभाडे (ता. इगतपुरी) या शिवारात नेऊन त्याच्यावर रॉकेल टाकून पेटवून दिले. या विषयीची खात्री केली असता घोटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद असल्याचे आढळले. या खूनाच्या गुन्ह्यात पुरावा नष्ट करण्याच्या कलमाची वाढ करण्यात आली. इतर आरोपी कुंदन परदेशी व राकेश कोष्टी हे कारागृहात आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे. हा खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास २० महिन्यांचा कालावधी लागला. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भूजबळ, विजयकुमार चव्हाण, पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी हा तपास लावला. तब्बल २० महिने संशयित आरोपींनी या बाबत पोलिसांना खबर लागू दिली नाही. अज्ञात मृतदेह सापडल्याने या घटनेची नोंद घोटी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी शाम महाजन याने इगतपुरी येथील घटनास्थळ दाखवत पंचवटी पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी करीत आहेत.

तरूण मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने जालिंधर ऊर्फ ज्वाल्याचे कुटुंबीय हैरान होते. २० महिन्यांत अनेकदा ज्वाल्याची आई पंचवटी पोलिस स्टेशनला येऊन विचारपूस करीत असे. मुलगा हरवला असल्याची नोंद त्याच्या कुटुंबियांनी केली होती. घटना घडल्याच्या काही दिवसांनी संशयितांना पोलिसांनी पकडले. मात्र, ज्वाल्याच्या खूनाबाबत त्यावेळी उलगडा झाला नव्हता. पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी मात्र, ज्वाल्याचा तपास पूर्ण केला जाण्याची खात्री देऊन आपले काम चोख बजावले. दरम्यान, या घटनेतील मुख्य संशयित शाम महाजन हा पंचवटीतील एका नगरसेविकेचा भाचा असल्याचे सांगितले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार यांची उद्या प्रकट मुलाखत

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशाचे माजी कृषी व संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखात उद्या, रविवार २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता विश्वास लॉन्स येथे होणार आहे. पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी संसदीय कारकिर्दीचा गुणगौरव करतानाच कायदेमंडळातील पाच दशकांच्या कार्याचा वेध घेतला जाणार आहे.

सुप्रसिद्ध लेखक अंबरीश मिश्र, निवेदक सुधीर गाडगीळ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ पवार यांची मुलाखत घेणार आहेत. पवार यांच्या अष्टपैलू कर्तृत्वाचा अभ्यासपूर्ण वेध यावेळी घेतला जाणार आहे. मुलाखत दोन तासांची असेल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक, यांच्यावतीने होणाऱ्या या मुलाखतीत शरद पवार यांचा जाहीर सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.या मुलाखतीस नाशिकमधील विविध क्षेत्रातील एक हजार व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त ज्यांची उपस्थित राहण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांनीही या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेहरा साधर्म्यातून हत्या

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पेठरोडवरील नवनाथनगर येथे गेल्या गुरुवारी झालेल्या किरण निकम या युवकाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रचलेल्या कटात केवळ दिसण्यातील साधर्म्यामुळे तुषार भास्कर साबळे या अल्पवयीन युवकाची हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अशा प्रकारचा कट रचून या गुह्यात सहभागी झालेल्या अक्षय आत्माराम अहिरे (वय २२), अमोल विष्णू गांगुर्डे (वय २६), करण राजू लोट (वय २१) तिघेही राहणार महालक्ष्मी चाळ, वडाळा नाका व नितीन किरण पवार (वय १९) रा. बजरंगवाडी या चार संशयितांना उपनगर पोलिसांनी अटक केली.
दोन गुन्हेगारांच्या टोळीत एकमेकांचा वचपा काढण्याच्या नादात बंड्या मुर्तडक याच्याऐवजी तुषार साबळे याची हत्या झाल्याचे उघड झाले. उपनगर पोलिसांनी मोठ्या शिताफिने या चौघांना ताब्यात घेतले असून, इतर फरार संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केलेले आहेत. या गुह्यात वापरण्यात आलेली एक दुचाकी व झाडलेल्या गोळीचे आवरणही पोलिसांनी जप्त केले आहे.

किरण निकमच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ शेखर निकम व त्याचे फुलेनगर येथील साथीदार बंड्या मुर्तडक याच्या मागावर होते. बंड्या मंगलमूर्ती नगरातील हर्ष अपार्टमेंट येथे आलेला असल्याची खबर अमोल गांगुर्डे (वय २६) रा. महालक्ष्मी चाळ, वडाळा नाका याने शेखरला दिली होती. त्यानुसार शेखर साथीदारांसह गुरुवारी दुपारी चार वाजेच्यादरम्यान हर्ष अपार्टमेंट गाठले. शेखरच्या पाठोपाठ अमोल गांगुर्डे व त्याच्या शेजारी राहणाऱ्या करण लोट व त्याचे दोन साथीदारांनी दुचाकींवरुन हर्ष अपार्टमेंट गाठले. वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने तुषारवर थेट हल्ला चढवला. अक्षय जिन्याने वरच्या मजल्यावर पळाला. त्याच्या मागे तुषार साबळे होता. शेखर निकम व त्याच्या साथीदारांनी पाठमोऱ्या तुषारवर बंड्या मुर्तडक समजून वार केले.

शेखरने झाडली गोळी?
मयत तुषारवर शेखरने गावठी कट्यातून एक गोळी झाडल्याची माहिती उपनगर पोलिसांनी दिली. तुषारच्या छातीच्या डाव्या बाजूकडून घुसलेली व उजव्या बाजूस अडकलेली गोळी शवविच्छेदन अहवालात उघड झाल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले. बंड्या मुर्तडक हा पाच सहा महिन्यांपूर्वी पंचवटीतील एका खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी होता. यावेळी बंड्या मुर्तडक हा मंगलमूर्तीनगरातील हर्ष अपार्टमेंट येथे त्याच्या मित्राकडे आश्रयाला येत असे. ही बाब अमोल गांगुर्डे यास माहीत होती. किरणच्या हत्येनंतर शेखर निकमला अमोल गांगुर्डे व त्याचे साथीदार बंड्या मुर्तडकची माहिती पुरवत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालवा निरीक्षकास लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीसगाव धरणातून पाणी घेऊ देण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच घेणाऱ्या कालवा निरीक्षकास अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने जेरबंद केले. मोहनीराज मुरलीधर कासार, असे संशयित कालवा निरीक्षकाचे नाव आहे. एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची सोनजाम शिवार, ता. दिंडोरी येथे गट क्रमांक ५८१ मध्ये शेतजमीन आहे. शेतीकरीता कायदेशीर परवानगी घेऊन त्यांनी तीसगाव धरणातून पाइपलाइन केली आहे. मात्र, धरणातून पाणी घेण्यासाठी निरीक्षक कासार यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यानुसार, तक्रारदाराने थेट एसीबीकडे गाऱ्हाणे मांडले. एसीबीने पडताळणी करून शुक्रवारी (दि. २६) पिंपळगाव कॉलेजच्या शेजारील प्रमिला लॉन्स येथे सापळा रचला. यावेळी उपस्थित एसीबीच्या पथकाने लागलीच कासार यास जेरबंद केले. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असल्याचा तपास केला
जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांसाठी पालिकेत रंगरंगोटी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी बैठकीसाठी येणार असल्याने महानगरपालिकेने जोरदार तयारी केली जात आहे. या बैठकीच्या निमित्ताने कारंजाची दुरुस्ती, रंगरंगोटी, झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी याबरोबरच पालिकेच्या इमातरीच्या काही भागात रंगरंगोटी करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान नाशिक दत्तक घेण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. आता फडणवीस रविवारी नाशिकमध्ये महानगपालिकेतील अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नेमके कोणते विषय मांडायचे, किती आर्थिक मदतीची मागणी करायची याबाबत मनपाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून नियोजन केले जात आहे. विविध फाइल तयार करण्याबरोबरच प्रशासकीय कामांची सुद्धा तयारी केली जात आहे. या दौ-यातील बैठकीकडून आर्थिक कोंडीत सापडलेल्या महानगरपालिकेला खूप अपेक्षा आहे. त्यामुळे या बैठकीत मुख्यमंत्री काय आश्वासने देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पोलिस आयुक्तालयात गुन्हेगारांची ओळखपरेड!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागील १० दिवसांत विविध गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या तब्बल २० सराईत गुन्हेगारांना आज, शुक्रवारी (दि. २६) पोलिस आयुक्तालयात गुन्हेविषयक बैठक सुरू असताना हजर करण्यात आले. चेन स्नॅचिंग, खून, खूनाचा प्रयत्न, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यात या संशयितांना अटक झाली आहे.

शहरातील १३ पोलिस स्टेशनमार्फत गुन्हे दाखल करण्याची तसेच त्याअनुषंगाने संशयित आरोपींना पकडण्याची कार्यवाही सतत केली जाते. अनेकदा एका पोलिस स्टेशन हद्दीत राहणारे गुन्हेगार दुसऱ्या पोलिस स्टेशन हद्दीत जाऊन गुन्हे करतात. पोलिसांमध्ये प्रत्येक गुन्ह्यानंतर समन्वय असतोच असे नाही. त्याचा फायदा गुन्हेगार घेतात. या पार्श्वभूमीवर आज पोलिस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत चर्चा झाली. सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, क्राइम ब्रॅँचचे अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी हजर होते. गुन्हेगारी करणारे एकत्र येऊन विविध गुन्हे करतात. काही दिवसांनी त्यांच्यात वाद निर्माण झाल्यास एकमेकांचे मुडदे पाडण्यास सुरूवात होते. हा धागा पकडून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सराईत गुन्हेगारांची ओळख परेड करण्याचे ठरवले. बैठकीमध्ये जवळपास २० संशयित आरोपींना हजर करण्यात आले.

संशयितांनी केलेले कृत्य, त्याच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याची यादी, संशयिताचे इतर साथीदार याची माहिती देण्यात आली. सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना संशयितांची ओळख असल्यास त्याचा फायदा गुन्हे उघडकीस आणताना होतो. याच पध्दतीमुळे एका मिसींग केसचा मोठा उलगडा झाला आहे.
- रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काठेगल्लीत होणार उत्साहाचा ‘ब्लास्ट’

$
0
0

मटा ‘हॅप्पी स्ट्रीट्सची उत्सुकता शिगेला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्सुकता, आतुरता, क्रेझ‌िनेस, कल्ला, धम्माल, मस्ती अशा अनेक कन्सेप्टने खच्चून भरलेला तुमच्या हक्काचा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’. ‘महाराष्ट्रा टाइम्स’ तर्फे तुमच्या भेटीला आलेल्या हॅप्पी स्ट्रीटस सीझन-३चे शेवटचे पर्व होतेय काठेगल्लीत. रविवारी २८ मे २०१७ रोजी बनकर चौक, काठे गल्ली येथे तुमच्या आनंदाच्या ब्लास्टमध्ये हॅप्पी स्ट्रीट्स कमालीचा रंगणार आहे. तुमच्या हा बहारदार मोस्ट पॉप्युलर गाण्यांवरचा एनर्जेटिक झुम्बा, हिंदी-मराठी गाण्यांची सुगम मैफल, अबालवृद्धांना एकत्र आणत खेळले जाणारे खेळ अन् अनेक झक्कास असे परफॉर्मन्सेस या सगळ्यांची धम्माल अनुभवायला नाशिककर सज्ज झाले आहेत. त्रिकोणी गार्डन ते बनकर चौक, काठे गल्लीपर्यंत तुम्हाला धमाकेदार सिझन-३ च्या अखेरचा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’चा रमणीय क्षण अनुभवता येणार आहे.

‘हॅप्पी स्ट्रीट्स’वर सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत तुम्हाला मनोरंजनाच्या दुनियेतल्या या भन्नाट उत्सवात सहभागी होता येणार आहे. आठवडाभराच्या टेन्शनमधून फ्री होत अन् स्ट्रेसला बाय बाय म्हणत तुमची संडे मॉर्निंग जल्लोषात, आनंदात, आणि धमाकेदार वातावरणात साजरी करता येणार आहे. खास बात म्हणजे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणीची गरज नाही. रविवारची मस्त मॉर्निंग तुमच्या हक्काच्या रस्त्यावर फुल्ल टू टशनमध्ये कल्ला करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. येत्या रविवारचा काठे गल्लीचा हा खास रस्ता फक्त आणि फक्त तुमच्यासाठी खुला असणार आहे. आनंद, उत्साह, धम्माल, मस्ती, कल्ला, क्रेझ‌िनेस आणि बरचं काही तुम्ही इथे एन्जॉय करू शकतात. ‘मटा’तर्फे आयोजित ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ सिझन-३ चा हा शेवटचा रविवार असल्याने तुम्हाला खूप काही सरप्राईजेस अनुभावयची संधी सुध्दा असणार आहे.

काठे गल्लीत होणाऱ्या ‘हॅप्पी स्ट्रीट्स’मध्ये यूथचा नवा ट्रेंड असलेला झुम्बा पूनम आचार्य व श्रद्धा जोशी यांच्याकडून सादर होणार आहे. सोबतच सिद्धी ठोंबरे हिच्या बॅले डान्सची, तर स्नेहितच्या सोलो डान्सची झलकही या वेळी तुम्हाला अनुभवता येणार आहे. क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल प्रकारातले सुगम संगीत, इस्ट अँड वेस्ट म्युझिक अॅकॅडमीचे नरेंद्र पुली आणि त्यांचे शिष्यगण यांचे गिटारवादन, बासरीवादनाची रवींद्र जोशी यांची मैफल तुम्हाला अनुभवता येणार आहे. नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार रचना आर्ट अॅकॅडमीचे राजू दाणी आणि टीमकडून करून दाखवले जाणार आहेत. वर्ड कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे बारकावे समजावून सांगणार आहेत. ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार हर्षल शिंदे दाखवणार आहे. सोबतच सौरभच्या वन एट वन ग्रुपतर्फे अनोख्या स्टाइल्सचे टेम्पररी टॅटू काढून मिळणार आहेत. विजयराज यांचा मॅजिक शो, ललित महाजन यांचा रॉक बँड, प्रेमदा दांडेकर यांची स्ट्रीट रांगोळी असे अनेक उपक्रम लक्ष वेधून घेणार आहेत.

सोबतच नाशिक पोलिस बँडचा खास नजराणा भेटीला येणार आहे. दंडे ज्वेलर्सचे संचालक मिलिंद दंडे यांच्यातर्फे महिला ढोलपथकदेखील हॅप्पी स्ट्रीट्सवर ढोलवादन करण्यासाठी सज्ज असणार आहे. शंकर कंडेरा यांच्या कराओके सिंगिंगची मौज तुम्हाला अनुभवता येणार आहे. यासोबतच लहानग्यांसाठी बचपन गल्लीचे आकर्षण यंदाही असून भोवरे, टिक्कर, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग असे अनेक गेम्स ड‌िकॅथलॉनकडून असणार आहेत. तुषार संकलेचा यांच्याकडून एक झक्कास सेल्फी पॉइंट असणार आहे. प्रमोद पाटील यांच्याकडून कॅनॉपी स्टॉल इथे असणार आहेत. सुरजित मानचंदा यांच्या आयएनआयएफडीतर्फे काही वैशिष्ट्यपूर्ण चिल्ड्रन अॅक्टिव्हिटी होणार आहेत. श्री शक्ती महिला गटातर्फे कापडी पिशवी वाटप व पर्यावरण संवर्धनाचे प्रबोधनही या वेळी करण्यात येणार आहे. वैष्णवी मोरे याचं कूलिंग आर्ट, रश्मी याचं चिल्ड्रेन सेल्फी पॉइंट, कैलास परदेशी याचं स्ट्रीट पेंटिंग, मोहिनी येवलेकर याचं बॉटल पेंटिंग्ज, रागिनी सिंकर यांची अम्ब्रेला पेंटिंग, विवेक सोहानी याचं केक डिझाइन, स्पार्टन हेल्प सेंटर यांच्याकडून शेतकरी आत्महत्या जीवनावरील चित्र तर महेंद्र कटारिया यांचे व्यायाम प्रात्यक्षिक आणि जगबीरसिंग यांचं समाजप्रबोधन या अँक्टिव्हिटी हॅप्पी स्ट्रीट्सची रंगत आणखी वाढवणार आहेत.

दोन स्पेशल मेसेजेसला मिळणार बक्षीस

नाशिकरोड येथे झालेल्या हॅप्पी स्ट्रीट्समध्ये जैन सोशल ग्रुपतर्फे मदर्स डे साजरा करण्यात आला होता. मदर्स डेनिमित्त फलकावर संदेश लिहिणाऱ्यांमधून बेस्ट मेसेजचे विजेते निवडण्यात आले आहेत. पूजा क्षत्रिय आणि खुशबू मंडोरे या विजेत्यांना रविवारी (२८ मे) काठे गल्लीत होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीट्समध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.


जावेद अली कॉन्सर्टचे पास जिंकण्याची संधी
रविवारी हॅप्पी स्ट्रीट्सवर सहभागी होणाऱ्या नाशिककरांसाठी जावेद अलीच्या लाइव्ह इन कॉन्सर्टचा कपल पास जिंकण्याची संधी ‘मटा’ने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुम्हाला हॅप्पी स्ट्रीट्सवर एका खास ड्रेसमध्ये उपस्थित राहत झक्कास असा डान्स करत उत्साह दाखवून द्यायचा आहे. जमलेल्या सर्व नाशिककरांमधून निवडण्यात आलेल्या बेस्ट ड्रेस, बेस्ट डान्स आणि उत्साही व्यक्तींना जावेद अलीच्या लाइव्ह इन कॉन्सर्टचा पास भेट देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव महापालिका त्रिशंकू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापलिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २८ जागा जिंकल्या. मात्र, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकदा युती-आघाडीचा खेळ पाहायला मिळणार आहे.

शहरातील एकूण २१ प्रभागांतील ८४ जागांपैकी एका जागेवर काँग्रेस उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने ८३ जागांसाठी तब्बल ३७३ उमेदवार रिंगणात होते. मुस्लिमबहुल पूर्व भागात राष्ट्रवादी व जनता दलाच्या युतीचा अपवाद वगळता सर्वच पक्षांनी ही निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यामुळे पूर्व भागात काँग्रेसपुढे राष्ट्रवादी–जनता दल, एमआयएमचे आव्हान होते, तर पश्चिम भागात शिवसेना-भाजपमध्ये थेट लढत होती.

निकालानंतर सर्वाधिक २८ जागा काँग्रेसला मिळाल्या असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी २०, शिवसेना १३, भाजप ९, एमआयएम ७, जनता दल ६, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल झाले आहे. गेल्या निवडणुकीत शून्यावर असलेल्या भाजपकडून या वेळी ५६ उमेदवार रिंगणात होते. यातील विशेष बाब म्हणजे मुस्लिमबहुल पूर्व भागात २९ मुस्लिम उमेदवार देण्यात आले होते. त्यामुळे भाजपकडून मुस्लिम कार्ड चालवण्याची खेळी करण्यात आल्याने पक्षाच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. मात्र मुस्लिमबहुल भागात भाजपचा सपशेल पराभव झाला असून, एकही उमेदवार विजयी झालेला नाही. असे असले तरी पश्चिम भागात पक्षाला नऊ जागांवर विजय मिळाला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीमध्येही चुरशीचा सामना होता. यात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला बहुमत मिळवता आले नसले तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत चार जागा जास्त मिळाल्या आहेत. यात माजी आमदार रशीद शेख, माजी महापौर ताहेरा शेख विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीने या वेळी जनता दलासोबत युती करीत एकूण ६२ जागांवर निवडणूक लढवली होती. यात जनता दलाने १० पैकी ६ जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व कायम ठेवले आहे, तर राष्ट्रवादीचे विद्यमान महापौर हाजी मोह. इब्राहिम पराभूत झाल्याने पक्षाला झटका बसला आहे. एमआयएमदेखील या निवडणुकीत पहिल्यांदाच रिंगणात होता. विद्यमान उपमहापौर युनूस इसा यांच्या नेतृत्वात पक्षाने एकूण ३५ जागांवर उमेदवार दिले होते. प्रभाग २१ मध्ये सर्व चार जागांसह एकूण ७ जागांवर विजय मिळवत मालेगावच्या राजकारणात शिरकाव केला आहे. मात्र, महानगराध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा पराभूत झाल्याने पक्षाला झटका बसला आहे.

पश्चिम भागात एकूण ५ प्रभागांतून २० जागांसाठी शिवसेना– भाजपमध्ये काट्याची लढत पाहायला मिळाली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व भाजप नेते अद्वय हिरे, सुनील गायकवाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेने २६ जागांवर उमेदवार दिले होते. यात १३ जागांवर विजय मिळाला असून, गेल्या वेळच्या तुलनेत दोन जागा वाढल्या आहेत. मात्र राज्यमंत्री भुसे यांचे शालक जयराज पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख संजय दुसाने यांचा पराभव झाल्याने भुसे यांना धक्का बसला आहे. भाजपला मात्र लक्षवेधी यश मिळाले असून, गेल्या वेळी शून्यावर असलेल्या भाजपने तब्बल ९ जागांवर विजय मिळविला आहे. मात्र, मुस्लिम कार्डाची खेळी अपयशी ठरली असून, पराभूत उमेदवारांना मिळालेली मते हीच भाजपसाठी जमेची बाजू म्हणता येईल. या निवडणुकीत सर्वपक्षीयांना बंडखोरीचा फटका बसला होता. तब्बल १०१ अपक्ष बंडखोर रिंगणात होते. मात्र, प्रभाग ३ मध्ये केवळ एक अपक्ष विजयी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समित्यांवर भाजपची पकड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक कोंडीत सापडलेल्या महापालिकेने महासभेत नव्याने गठित केलेल्या तीन समित्यांवर २७ सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली. सत्ताधारी ‌लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा आणत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, या विरोधाला न जुमानता महापौरांसह भाजपच्या सदस्यांनी ५१ पैकी तब्बल ४८ विषय मंजूर करून घेतले. या महासभेत गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणाचा विषयही विरोधकांनी लावून धरला.
राष्ट्रीय दुखवट्यामुळे नऊ दिवसांपूर्वी तहकूब केलेली नाशिक महानगरपालिकेची महासभा शुक्रवारी आरोप -प्रत्यारोप व अधिकारांच्या प्रश्नावरुन वादळी ठरली. या सभेत तब्बल ४८ विषयांना मंजुरी देण्यात आली, तर दोन विषय तहकूब करून एका विषयावर अभिप्राय मागवण्यात आला. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्व पक्षांच्या सदस्यांनी सहभाग नोंदवत विविध विषयांवर चर्चा करत लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणू नका, असा सूर आळवला. पण सभागृहात बहुमताच्या जोरावर भाजपने ही सभा एकतर्फी ओढून नेत विरोधकांवर कुरघोडी केली.
सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात सुरू झालेल्या या सभेत बहुतांश नगरसेवकांनी हजेरी लावत चर्चेत सहभाग घेतला. सुरुवातीला या सभेत नव्याने गठित करण्यात आलेल्या आरोग्य, विधी व शहर सुधार या विषय समितीच्या सदस्यांची नियुक्ती पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार करण्यात आली. यात राष्ट्रवादी व काँग्रेसने आपला विरोध दाखवत नावे न दिल्यामुळे या समित्यांवर भाजप, शिवसेना व मनसेच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी विरोधी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकारांवर गदा येत असल्याचे कारण पुढे करत या समितीच्या अधिकारांबाबत व त्यांच्या आर्थिक तरतुदीबाबत शंका उपस्थित करुन आक्रमकपणे आपली मते मांडली. तब्बल तासाभराच्या चर्चेनंतर महापौरांनी भाजप, शिवसेना व मनसेच्या सदस्यांची नावे घोषित केली. या विषयानंतर विषय पत्रिकेतील ४० ते ९१ विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजुरी देण्यात आली. त्यातील दोन विषय तहकूब तर एक विषय आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला. गोदावरी नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. नासर्डी व वालदेवी नद्यांच्या प्रदूषणाच्या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत नाशिकरोडसह इतर सदस्यांनी आपले परखड मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर आयुक्तांनी या नदीच्या प्रदूषणाबाबत व्ह‌िज‌िट करण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर या विषयावरील चर्चा थांबली.
राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, अपक्ष नगरसेवक गुरुमित बग्गा, माजी महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर, काँग्रेसचे शाहू खैरे, भाजपचे संभाजी मोरुस्कर, दिनकर आढाव, उद्धव निमसे, सत्यभामा गाडेकर, राहुल दिवे, डॉ. हेमलता पाटील, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, सूर्यकांत लवटे, सुहास ढेमसे यांच्यासह सदस्यांनी चर्चेत सहभाग नोंदवत आपले मत मांडले. यावेळी आयुक्त अभिषेक कृष्णा
यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर खडाजंगी
नाशिक : महानगरपालिकेतील प्रशासनात विविध पदे रिक्त असल्यामुळे या पदावर राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मिळणेबाबत महासभेत भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी मांडलेल्या ठरावावर चांगलीच खडाजंगी झाली. या ठरावाचा विषय नगरसचिवांनी वाचल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार व मोरुस्कर यांच्यात शाब्द‌िक चकमकही उडाली. त्यामुळे काही काळ सभागृहात स्तब्धता निर्माण झाली. शेलार यांनी हा ठराव मांडण्यामागे मनपाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे यावे, असा आरोप केल्यामुळे मोरुस्कर भडकले. यावेळी माजी उपमहापौर गुरुमित बग्गासह काही सदस्यांनी महानगरपालिकेचे अधिकारी लायक नाही का, असा प्रश्न उपस्थित केला तर काँग्रेसचे शाहू खैरे यांनी मतदानाची मागणी केली. या विषयावर सभागृहात सदस्य आक्रमक असल्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी हा ठराव अभिप्रायासाठी पाठवण्याचा निर्णय जाहीर केला.

सहाणे यांचा राजीनामा

नाशिकः नाशिक म्युनिसिपल कामगार सेनेच्या बैठकीत शुक्रवारी अॅड. शिवाजी सहाणे यांनी अध्यक्षपदाची राजीनामा दिला. नव्या अध्यक्षनिवडीचा निर्णय उध्दव ठाकरे हे घेणार आहेत. त्यासाठी बैठकीत तसा ठराव केला असून नव्या अध्यक्षासाठी चार सदस्यांची नावे पाठवण्यात आली आहे.
ठाकरे बाहेरगावी असल्यामुळे ते आल्यानंतर यावर निर्णय होणार आहे.गेल्या आठवड्यात नाशिक म्युनिसिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदी स्थायी समितीचे सदस्य प्रव‌ीण तिदमे यांची घोलप यांनी परस्पर निवड केली होती. या निवडीबाबत आपणास विश्वासात घेतलेच गेले नसल्याचे सांगत अॅड. सहाणे यांनी अनभिज्ञता दर्शविली होती. या बैठकीत सूर्यकांत लवटे, प्रवीण तिदमे, प्रशांत दिवे, सत्यभामा गाडेकर यांच्या नावाची नवीन अध्यक्षपदासाठी शिफारस केल्याचा ठराव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीतील जुन्या प्राथमिक शाळा होणार नामशेष

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

देवळालीतील हजारो विद्यार्थिनींना प्राथमिक शिक्षण प्रदान करणारी हौसनरोडवरील मुलींची शाळा, तर आनंदरोडवरील मुलांची शाळा लवकरच नामशेष होणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या प्राथमिक शाळांच्या ब्रिटिशकालीन व संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या वास्तू तोडण्याचे कंत्राटच प्रशासनाच्या वतीने काढण्यात आले आहे. परिणामी अनेक नागरिकांच्या आठवणी या शाळांच्या रूपाने यानिमित्ताने पुसल्या जाणार आहेत.

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, या हेतूने सन १९३० मध्ये आनंदरोडवर, तर १९३३ मध्ये हौसनरोडवर या प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांची उभारणी आली होती. आता बोर्डाने दोन्ही प्राथमिक शाळा एकत्र करून गुरुद्वारारोडवरील कॅन्टोन्मेंट हायस्कूलशेजारी आधुनिक सुविधांयुक्त अशी संयुक्त प्राथमिक शाळा बांधली आहे. सध्या या वास्तूत मराठी व इंग्रजी माध्यमांत वर्ग भरत आहेत.

हौसनरोडवर शॉपिंग कॉम्प्लेक्स

हौसनरोडवरील मुलींच्या शाळेच्या जागेवर भव्य तीनमजली इमारत उभी करून त्यात तळमजला व पहिल्या मजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स, तर दुसऱ्या मजल्यावर सामाजिक सभागृह उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या महसुलात भर पडणार आहे. मात्र, या विकासासाठी जुन्या शाळा नामशेष होणार आहेत.

--


आनंदरोडवर क्रीडा संकुल

आनंदरोडवरील मुलांच्या प्राथमिक शाळेच्या जागी असलेले खेळाचे मैदान आगामी काळात क्रीडा संकुलात रुपांतरित होणार आहे. मात्र, शाळेची वास्तू या कामी अडचणीची ठरत आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलात इनडोअर स्टेडियम, क्रिकेट व फुटबॉल खेळाचे मैदान आदींचा समावेश राहील.


आनंदरोडवर क्रीडा संकुल

आनंदरोडवरील मुलांच्या प्राथमिक शाळेच्या जागी असलेले खेळाचे मैदान आगामी काळात क्रीडा संकुलात रुपांतरित होणार आहे. मात्र, शाळेची वास्तू या कामी अडचणीची ठरत आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलात इनडोअर स्टेडियम, क्रिकेट व फुटबॉल खेळाचे मैदान आदींचा समावेश राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार सीडिंगचा तिढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात काही ठिकाणी ईपीओएस प्रणालीद्वारे रेशनच्या धान्याचे वितरण सुरू झाले असले, तरी असंख्य शिधापत्रिकांचे आधार सीडिंगच झालेले नसल्याने ही यंत्रणा प‍्रभावीपणे राबविण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आधार सीडिंगच्या अपूर्णतेचे खापर रेशन दुकानदारांच्या माथी फोडले जात असून, त्यांना परवाना निलंबनाची भ‌ीती दाखवली जात असल्याचा आरोप होत आहे. परवानाधारकांपुढील या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स फेडरेशनने अन्न व नागरी‌पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

रेशन धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि गतिमानता यावी यासाठी ईपीओएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, ही प्रणाली पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी लाभार्थी कुटुंबांचे आधार सीडिंग होणे आवश्यक आहे. अजूनही अनेक ठिकाणी आधार सीडिंगचे काम १०० टक्के पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ही प्रणाली कार्यक्षमेतेने राबविण्यात अडचणी येत आहेत. परवानाधारक रेशन धान्य दुकानदारांनी लाभार्थी कुटुंबांचे आधार कार्ड जमा न केल्यानेच या अडचणी येत असल्याचा ठपका ठेवत त्या-त्या जिल्ह्यांमधील पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. आधार सीडिंग पूर्ण नसल्याने रेशन दुकानदारांना नोटिसा बजावल्या जात असून, परवाना निलंबनाचा इशाराही दिला जात आहे. संघटनेने याबाबत वारंवार पाठपुरावा केला. रेशन दुकानदारांवर कारवाई होणार नाही, अशी ग्वाही प्रधान सचिवांनी दिली होती. परंतु, राज्यात अशा कारवायांचा बडगा उगारला जात असून, ही कारवाई थांबवावी, अशी मागणी करण्यात

आली आहे. द्वारपोच योजना, परवानाधारकांना कायमस्वरूपी मदतनीस नियुक्ती, कमिशनमध्ये वाढ या मागण्यांचीदेखील पूर्तता करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष गजानन बाबर, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे आदींनी केली आहे.


सरकारविरोधात सरकारलाच साकडे

वेळोवेळी सरकारकडे बाजू मांडूनही परवानाधारकांच्या हिताचा कोणताही निर्णय घेण्यास सरकार तयार नाही. याउलट रेशन दुकानदार संघटनांची दिशाभूल करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने केला आहे. दुकानदारांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत चलन पास करून घेण्याची सक्ती केली जात आहे. अन्यथा चलन पास केले जाणार नाही, तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवू, असे परवानाधारक रेशन दुकानदारांना धमकावले जात आहे. आपण आपल्यामार्फत योग्य तो पर्याय सूचवावा, अशा आशयाचे निवेदन अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांना देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावकरांचा काँग्रेसला हात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापलिका निवडणुकीच्या ८३ जागांचे निकाल शुक्रवारी घोषित झाले. शहरातील एकूण पाच केंद्रावर मतमोजणी करण्यात आली. सकाळी १० वा मतमोजणीला सुरुवात झाली. सर्वच मतमोजणी केंद्रांवर निकालासाठी उमेदवार व समर्थकांची गर्दी झाली होती. सकाळी ११ वाजता त्या त्या मतदान केंद्रांवर निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी व समर्थकांनी जल्लोष केला. पश्चिम भागातील पाच प्रभागात सेना-भाजप तर पूर्व भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम यांच्यात लढत होती.

दुपारी १२ पर्यंत ५० हून अधिक जागांचे निकाल हाती आले होते. मात्र २८ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्याने समर्थकांनी मतदान केंदाराबाहेर एकाच जल्लोष केला. प्रभाग ९ व ११ च्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली होती. दुपारी दोन वाजता अंतिम निकाल हाती आले. यात प्रभाग ९ मध्ये सुनील गायकवाड व प्रभाग ११ मध्ये मदन गायकवाड यांनी आपापल्या प्रभागात विजय मिळविल्याने भाजप कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. राज्यमंत्री भुसे यांचे शालक जयराज पाटील पराभूत झाल्याने सेनेच्या गोटात शांतता पसरली होती.


मातब्बरांना धक्का

या निवडणुकीत बऱ्याच विद्यमान महापौरांसह नगरसेवकांना मतदारांना घरी बसविले. शिवसेना बंडखोर भारत म्हसदे, अर्चना गोऱ्हे, विद्यमान नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेविका मीनाताई काकळीज, नगरसेवक गुलाब पगारे, नरेंद्र सोनावणे, नगरसेवक संजय दुसाने, नगरसेविका विजया काळे, माजी नगरसेविका लक्ष्मीबाई बहिरम, वैशाली जाधव, राज्यमंत्री दादा भुसे यांचे शालक शिवसेना उमेदवार जयराज पाटील, अन्सारी ईश्तीयाक निहाल अहमद, महापौर हाजी मोह. इब्राहीम, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक एमआयएमचे महानगरअध्यक्ष अब्दुल मलिक मोह. युनुस इसा यांना पराभवाला सामोरे जावे लागले.


भाजपला बोनस

गेल्या निवडणुकीत शून्यावर असलेल्या भाजपाकडून यावेळी ५६ उमेदवार रिंगणात होते. यातील विशेष बाब म्हणजे मुस्ल‌िम बहुल पूर्व भागात २९ मुस्ल‌िम उमेदवार देण्यात आले होते. त्यामुळे भाजपकडून मुस्ल‌िम कार्ड चालवण्याची खेळी करण्यात आल्याने पक्षाच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र मुस्ल‌िमबहुल भागात भाजपचा सपशेल पराभव झाला. तेथे एकही उमेदवार विजयी झालेला नाही. मात्र पश्चिम भागात पक्षाला ९ जागांवर विजय मिळाला असून हा बोनस विजय म्हणता येईल. गेल्या निवडणुकीत एकही जागा नसलेल्या भाजपने यावेळी तब्बल ९ जागांवर विजय मिळविल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या दारणा नदीत चार मुलं बुडाली!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिकच्या दारणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली. बुडालेल्या मुलांपैकी दोघांचे मृतदेह हाती आले आहेत, तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. मृतदेह हाती आलेल्या मुलांची ओळख पटली आहे. सुमीत राजेंद्र भालेराव(१५), कल्पेश शरद माळी (१४) अशी त्यांची नावं आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फडणवीस, पवार आज नाशकात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार रविवारी एक दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसभर नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित राहतील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांची रविवारी सायंकाळी प्रकट मुलाखत होणार आहे. त्यामुळे या व्हीआयपी नेत्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण असणार आहे.

फडणवीस यांचे रविवारी सकाळी ९.३० वाजता ओझर विमानतळ येथे आगमन होणार आहे. येथून मोटारीने स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थळ भगूरकडे प्रयाण करणार असून, १० वाजता स्वा. सावरकर जन्मस्थळ भगूर येथे आगमन व स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ११.३० नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचा शतक महोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. फडणवीस नाशिक महापालिकेच्या आढावा बैठकीला दुपारी एक वाजता उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २.३० वाजता विश्रामगृहावर भाजप नगरसेवकांच्या कार्यशाळेला ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर मुंबईकडे प्रयाण करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोटा’लाही मतदारांची पसंती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या ८३ जागांचे निकाल शुक्रवारी घोषित झाले. २८ जागा मिळवीत काँग्रेसला मतदारांनी हात दिला आहे. मात्र शहरातील तब्बल १४ हजार ९३५ मतदारांनी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना नापसंती दर्शवली आहे. मतदान यंत्रावरील नोटा या पर्यायाचा वापर करून आपली नाराजी दाखवून दिली आहे. प्रभाग ८ मधील मतदारांनी सर्वाधिक नोटाचा वापर केला आहे. या प्रभागात तब्बल १ हजार २८७ मते नोटाला पडली आहेत.

निवडणूक आयोगाकडून आता मतदान यंत्रात उमेदवारांच्या नावाच्या शेवटी नोटाचा पर्याय दिला जातो. म्हणजे उमेदवार नापसंत असल्यास मतदारांना नोटा पर्यायाला मतदान करता येते. येथील महापलिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नोटाचा पर्याय मतदारांनी स्वीकारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पालिकेसाठी ५९.५२ टक्के मतदान झाले होते. त्यातील जवळपास ६.४१ टक्के लोकांनी त्यांच्या प्रभागातील एक ही उमेदवार पसंत नसल्याचे नोटाद्वारे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे काही प्रभागात विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकाची मते असलेला उमेदवार यांच्यातील मतांचा फरक नोटाला मिळालेल्या मताइतका आहे. नोटाला मिळालेली मते काही प्रभागात निर्णायक ठरली आहे.

२१ प्रभागात नोटा या पार्याला मते दिली गेली आहेत. नकाराधिकाराचा सर्वाधिक वापर प्रभाग ८ मधील मतदारांनी केला आहे. तब्बल १ हजार २८७ मते नोटाला पडली आहेत. तर प्रभाग १८ मधील मतदारांनी सर्वात कमी म्हणजे ३९६ मते नोटाला दिली आहेत. मतदारांचा नकाराधिकार वापरण्याची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी यापुढे कठोर निकष लावावे लागणार आहेत. हेच येथील महापलिका निवडणुकीत मतदारांनी निवडलेल्या नकाराधिकार मतांवरून दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारीला राजाश्रय!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील गुन्हेगारीच्या नाड्या हातात ठेवणाऱ्या राजकीय पक्षांना विरोधकांना संपविणे सोपे जाते, जुगार, दारू अड्डे यातून बक्कळ पैसाही मिळविता येतो. त्यामुळे गुन्हेगारीला राजाश्रय देण्याचे काम राजकीय पक्षांकडून होताना दिसत आहे. मागील दोन वर्षांत पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थेट खुनासारख्या घटनांत अटक झाली, यातच सारे आले. सराईत गुन्हेगार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे सर्वसामान्यांच्या जिवावर उठले असून, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल ते कसे मोडून काढतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राकेश कोष्टी, कुंदन परदेशी या दोघा सराईत गुन्हेगारांनी जालिंदर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याची २० महिन्यांपूर्वी हत्या केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले. उगलमुगले हादेखील सराईत गुन्हेगार होता. राकेश आणि कुंदन सध्या सेंट्रल जेलमध्ये असून, त्यांनी दिंडोरीरोडवर एका भेळविक्रेत्याचा खून केला होता. या खून प्रकरणानंतर या दोघांसह त्यांचे साथीदार अनेक दिवस बेपत्ता होते. तत्कालीन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी मात्र प्रकरणाचा बारकाईने तपास करीत भाजपचे पदाधिकारी सुनील बागुल यांचा पुतण्या अजय यास अटक केली. खून प्रकरणातील संशयितांना मदत करणे, त्यांना आर्थिक रसद पुरविणे आदी कारणांमुळे बागुलवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच आता खूनप्रकरणी भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी याला अटक झाली. शेट्टीविरोधात यापूर्वी काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे राकेश, कुंदन यांच्यासह इतर संशयितांनी शेट्टीच्या सांगण्यावरूनच खून केल्याचे पुरावे पोलिसांनी शोधून काढले आहेत. भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष बाळासाहेब सानप आपल्याच मतदारसंघातील अशा धक्कादायक घटनांबाबत अनभिज्ञ असल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.

दोन नंबरच्या धंद्यांचे हब!

पंचवटीतील काही झोपटपट्टी भागात सराईत गुन्हेगारांनी बस्तान बसविले आहे. दोन नंबरच्या धंद्यांचे हब म्हणून पंचवटीकडे पाहिले जाते. अगदी अल्पवयीन मुलेही गंभीर गुन्हे सहजतेने करतात. पंचवटीत होतात इतके खून आणि खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे शहराच्या अन्य भागात होत नाहीत. त्यामुळे शहराची शांतता सतत भंग होते. पोलिसांनी दबाव झुगारून आणि मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या आश्वसनाची आठवण ठेवत सराईत गुन्हेगार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे मोडून काढण्याची आवश्यकता प्रतिपादित केली जात आहे.

--

मटा भूमिका
भाजप नगरसेवक हेमंत शेट्टीला खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केल्याने राजकीय गुन्हेगारीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकेकाळी भाजपने छगन भुजबळांना याच मुद्यावरून कोंडीत पकडले होते. पवन पवार काय किंवा हेमंत शेट्टी काय ही भुजबळांचीच देण असताना आज भाजपला त्यांनाच पावन करावेसे वाटले हेच त्यांचे वेगळेपण का? पवन पवारप्रकरणी टीकेचे मोहोळ उठल्यानंतर त्याला उमेदवारी न देण्याचा शहाणपणा दाखविणाऱ्या भाजपने प्रत्यक्षात आणखीही काही गुंडांना पावन करून घेतले होते, हे यानिमित्ताने उघड झाले ते बरे झाले. भाजपचा मुखवटा तरी त्यामुळे गळून पडला.

---

नगरसेवक शेट्टीसह सहा जणांना कोठडी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

वाल्मीकनगर परिसरातील संजयनगर येथील जालिंधर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले (वय २३) याच्या खुनाचा कट रचण्यात भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी याचा हात असल्याचे उघड झाल्याने पंचवटी पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. या खूनप्रकरणी सहा संशयितांवर रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १ जूनपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

ज्वाल्या बेपत्ता असल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पाथरवट लेनमधील तोडफोडीच्या वेळी ताब्यात असलेल्या संशयितांकडून या खुनाचा सुगावा लागला. ज्वाल्या बेपत्ता झाल्याची तक्रार पंचवटी पोलिस ठाण्यात १ ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास करण्यात आली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षकांकडे ज्वाल्याचा घातपात झाला असावा अशा संशय त्याच्या घरच्यांनी व्यक्त केला होता. मात्र, या प्रकरणाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले, तरीही ज्वाल्याच्या घरच्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. पंचवटी पोलिस ठाण्याचा कार्यभार निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सध्या निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.

शेट्टीचा सहभाग उघड

मागील आठवड्यात पाथरवट लेन परिसरात वाल्मीकनगर येथील तरुणांनी वाहनांची तोडफोड केली होती. या तोडफोड प्रकरणात वाल्मीकनगर येथील अविनाश कौलकर आणि रोहित कडाळे या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे तपास करीत असताना ज्वाल्याचे अपहरण आणि हत्येच्या कटातही त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या कटात सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, श्याम महाराज, कुंदन परदेशी हेदेखील सहभागी असल्याचे उघ़ड झाले. ही हत्या कशासाठी करण्यात आली, या मुद्द्यावर चौकशी केली जात असताना नगरसेवक हेमंत शेट्टी याच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.

राजकीय गोटात खळबळ

भाजपचा नगरसेवक हेमंत शेट्टी याला खुनाच्या प्रकरणात अटक झाल्याने ा राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत शेट्टीची पत्नी रुपाली गावंड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. २०१७ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेट्टी याने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या पदरी आज दान!

$
0
0

मुख्यमंत्र्यांकडून आस; पालिकेच्या स्थितीचा घेणार आढावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक विधानाला साद देणाऱ्या नाशिककरांच्या पदरी रविवारी मोठे आर्थिक दान पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारच्या व्यस्त दौऱ्यात महापालिकेच्या मुख्यालयाला भेट देवून पालिकेच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्र्याच्या या भेटीसाठी पालिकाही सज्ज झाली असून, आर्थिक दान पदरात पाडून घेण्यासाठी तब्बल दोन हजार १७३ कोटींची आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा मुख्यमंत्र्या समोर सादर केला जाणार असून, पालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची गळ सत्ताधाऱ्यांकडून केली जाणार आहे. तर मुख्यमंत्र्यांकडूनही मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने नाशिककरांना मतांच्या बदल्यात मोठ दान पावणार आहे.

महापालिका निवडणुकांवेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळेच भाजपची सत्ता महापालिकेत येवू शकली. अडीच महीने झाले तरी दत्तक नाशिकला काहीच मिळाले नव्हते. परंतु, मुख्यमंत्र्यानी आता आपला शब्द पाळण्यास सुरूवात केली आहे. रविवारी मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येत असून, व्यस्त दौऱ्यात त्यांनी महापालिका कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. प्रशासनाने मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली असून, पालिकेला रंगरंगोटी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे सत्ताधाऱ्यांकडून जवळपास दोन हजार १७३ कोटींची मागणी केली जाणार आहे.त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्यात किकवी धरणासाठी ६०० कोटी, रस्ते व सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ९०० कोटी,पाणीपुरवठा विभागासाठी २६८ कोटी,मलनिस्सारण व्यवस्थापनासाठी ३०० कोटी, विद्युत विभागासाठी ३७ कोटी, उद्यान व वृक्षप्राधिकरण १८ कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून, विकासकामांसाठी शासनाच्या निधीवरच अवलंबून रहावे लागणार आहे. सोबतच स्मार्ट सिटीसाठी निधी उभारण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिप्र’चा आजपासून शतकमहोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था १ मे १९१८ ते ३० एप्रिल २०१८ हे वर्ष शतकमहोत्सवी म्हणून साजरे करीत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ व प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये आज, रविवारी (दि. २८) सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. कार्याध्यक्ष महेश दाबक, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, डॉ. नागनाथ गोरवाडकर, श्रीपाद देशपांडे, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, शतकमहोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

दुर्मिळ छायाचित्रांद्वारे आठवणींना उजाळा

संस्थेच्या १९१८ मधील फोटोपासून ते पहिल्या ते पन्नास वर्षांचे इतिहास प्रदर्शन विभागाच्या एका बाजूस राहणार आहे. ६० वर्षे ते १०० वर्षांपर्यंतचा भाग एका बाजूस प्रदर्शित होणार आहे. अमृतमहोत्सवानिमित्त आलेले अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, दत्तोपंत ठेंगडी, पृथ्वीराज कपूर, वसंतराव नाईक यांची छायाचित्रे आहेत. संस्थेचे माजी विद्यार्थी वि. वा. शिरवाडकर, सुप्रसिद्ध नट दत्त भट, लेखक माधव मनोहर, संगीतकार सी. रामचंद, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, क्रिकेटपटू बापू नाडकर्णी, चित्रकार एम. एस. जोशी व चित्रकार शिवाजी तुपे आदींची माहिती प्रदर्शनात आहे. पूर्वीच्या गणवेशांचे कटआउट्सही आहेत. विद्यार्थी त्या गणवेशात फोटो काढू शकतील.


संस्था विस्तार अनुभवण्याची संधी

प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या खेळ खेळण्याच्या जागा, शिक्षा मिळाली ती जागा, शाबासकी मिळाली ती जागा प्रतिकृतीतून पाहावयास मिळतील. संस्था एक दृष्टिक्षेपात किती विस्तारली ते पाहावयास मिळेल. प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर शैक्षणिक दीपमाळेचे दर्शन होईल. त्याद्वारे संस्थेच्या शंभर वर्षांच्या काळात संस्थेचा विस्तार ‘संस्था वटवृक्षात’ बघावयास मिळेल. संस्थेची टप्प्याटप्प्याने प्रगती कशी झाली, त्याचा इतिहास बघायला मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images