Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्हा नियोजनचा पालकमंत्र्यांकडून आढावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन आराखड्यातून मंजूर करावयाच्या कामांचे प्रस्ताव ३१ मेपर्यंत सादर करा असे आदेश देवूनही बहुतांश यंत्रणांनी या आदेशाला केराची टोपली दाखविली. प्रस्ताव सादर करण्यास यंत्रणा उदासिन असून ३ जून रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक होणार आहे.

मागील आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेसाठी ३१९ कोटी, आदिवासी उपाययोजनांसाठी ४६४ कोटी तर अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी ८४ कोटी रुपयांच्या आराखडयास मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सर्वसाधारण क्षेत्रासाठी ९९.९६ टक्के, आदिवासी उपाययोजनेचा ९७ टक्के, तर अनुसूचित जाती उपाययोजनेचा १०० टक्के निधी खर्च झाला. पदवीधर मतदारसंघ निवडणूक, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कामे रखडल्याचे सांगितले जात होते. आचारसंहीता संपताच प्रस्ताव सादर करून मान्यता घेण्यासाठी विविध यंत्रणांनी घाई केली. यंदा असे होऊ नये यासाठी ३१ मे २०१७ पर्यंत सर्वच विभागांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश देण्यात आले. यंदा सुमारे ९०० कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. मात्र अद्याप यंत्रणांनी आपल्या कामांचे प्रस्तावच सादर केले नसल्याची माहिती योगेश चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे आरक्षण कार्यालयात चोरी

0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

येथील रेल्वे स्थानकातील रेल्वे आरक्षण कार्यालयातून दुपारी एक लाख रुपयांची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य पर्यवेक्षक केशव पराते यांनी लोहमार्ग पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी मनमाड रेल्वे आरक्षण कार्यालयात ते व त्यांचे सहकारी एच. डी. ठाकूर हे टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक लाख ६ हजार रुपये आणि कॅश मेमो ठेवून फ्रेश होण्यासाठी गेले. यावेळी कार्यालयात खिडकीवर ड्युटी करत असलेल्या एस. एच. के. जैन यांनी सहकारी एस. के. जयस्वाल यांना आवाज देऊन कोणीतरी अनोळखी इसम कार्यालयात येऊन ड्रॉवर मधील रक्कम घेऊन पळत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीचा जयस्वाल यांनी पाठलाग केला. मात्र ती व्यक्ती रिक्षा स्टँडच्या दिशेने पळून गेली. या व्यक्तीने एक लाखाहून आधिक रक्कम चोरून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

झाडावरून पडल्याने मुलाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील बारीमाळ या हरसूल ठाणापाडा भागातील गावात आंबे तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या मुलाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. मुळवड प्राथम‌िक आरोग्य केंद्रात वेळीच औषोधोपचार न मिळाल्याने मुलाचा जीव गेला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

बारीमाळ येथील भगवान नानू आहेर (वय १६) हा सुटीत गावी आला होता. मंगळवारी दुपारी दोनच्या दरम्यान तो मित्रांसोबत आंबे तोडण्यासाठी झाडावर चढला. त्याचा तोल गेल्याने तो २५ फुटावरून खाली पडला. मित्रांनी त्याला मूळवड आरोग्य केंद्रात दाखल केले.

मूळवड केंद्राकडून सहकार्य नाही?

भगवान नानू आहेरवर मूळवड आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कुठलेही उपचार न करता त्याला हरसूल येथील रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तसेच तेथील रुग्णवाहिकेची चावीही चालक बाहेर घेऊन गेल्याने गैरसोय झाली. वेळेवर उपचार न मिळाल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात येईपर्यंत भगवानचा मृत्यू झाला, असा आरोप करत नातेवाईकांनी शव ताब्यात घेण्यास नकार दिला. तहसीलदार महेंद्र पवार यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. वैद्यकीय उपचार वेळवर न मिळाल्याने यापूर्वी तालुक्यातील तीन नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात लवकरच सफारी गार्डन

0
0

आमदार अनिल गोटेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुख्यमंत्र्यांनी धुळ्यात येऊन पांझराच्या पात्रात घेतलेल्या सभेत धुळेकरांना दिलेला शब्द पाळला असून, लवकरच शहरालगत अडीचशे एकर जमिनीवर सफारी गार्डन होणार आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. ते आपल्या जन्मदिनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या गार्डनचे काम किसान ट्रस्टच्या माध्यमातून केले जाणार असून, येत्या दोन महिन्यांत कामाची सुरुवात होणार आहे. तसेच वर्षभरानंतर धुळेकरांसाठी सफारी गार्डन खुले होईल, अशी माहितीही आमदार गोटे यांनी दिली.

हे गार्डन २५० एकरांवर होणार असून, त्यासाठी पर्यावरण खात्यापासून वन्यजीव संरक्षण कायद्यापर्यंतच्या सर्व बाबींचा विचार, अभ्यास करून सफारी गार्डनचे काम सुरू केले जाणार आहे. सफारी गार्डनसाठीच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जवळपास पाच वर्षे लागणार आहेत. पर्यावरण खात्यापासून प्राणी आणण्यापर्यंत कामासाठी ज्या परवानग्या लागतात त्यालाच अनेक वर्ष जातील म्हणून प्रथम पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी, निर्माण करण्यासाठी किसान ट्रस्ट भाडेतत्त्वावर ३० वर्षांच्या करारावर जागा आपल्या ताब्यात घेणार आहे, अशी माहिती आमदार गोटे यांनी दिली. वाघ, सिंह, पोपट यांच्यासह जे प्राणी वन्यजीव कायद्यात येतात ते वगळता इतर प्राणी, पक्षी सफारी गार्डनमध्ये आणले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटकॉइनचे व्हिएतनाम कनेक्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बिटकॉइन या इंटरनेटवरील व्हर्चुअल करन्सीचे व्हिएतनाम कनेक्शन समोर आले आहे. व्हिएटनाम आणि मलेशिया शेजारी राष्ट्र असून, या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढली आहे. दरम्यान, गुरूवारी (दि.२५) सर्व संशयितांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी नाशिकरोड येथील सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली.

बिटकॉइन या इंटरनेटवरील व्हर्चुअल चलनाच्या वापरावर भारतात बंदी आहे. मात्र, परदेशात अनैतिक कामांसाठी सदर चलनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ड्रग्ज, हत्यारे खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये या चलनाचा विशेष वापर होता. राज्याच्या पुणे, नागपूर, शिर्डी, औरंगाबाद या शहरांसह नाशिकमध्ये बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीस उद्युक्त करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी नुकतेच अटक केली. संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरूवारी संपल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यात निशेद महादेवजी वासनिक (२९, रा. वसिम प्राईड, सोसा. आराधनानगर, दिघोरी-खार्बीरोड, नागपूर), रोमजी बिन अहमद (जलान ईदाह-२, तमन सेताजी ईदाह, केदाह, मलेशिया), आशिष शंकर शहारे (२८, द्वारावती रेसिडन्सी, कोपरगाव, जि. अहमदनगर), दिलीप प्रेमदास बनसोड (२९, फाळके प्राईड अपार्ट. पाथर्डी फाटा), कुलदिप लखू देसले (३८, रा. सुरेश बापू प्लाझा, खुटवडनगर, नाशिक) यांचा समावेश आहे. यातील रोमजी अहमद हा मलेशिया येथील रहिवाशी आहे. तो www.futurebit.com या वेबसाइटच्या मदतीने राज्यात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करीत होता. future bit ही कंपनी व्हिएतनाम येथे काम करते.

शिर्डीत चौकशीसत्र
मलेशिया आणि व्हिएतनाम शेजारी राष्ट्र असून, या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असल्याचे सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले. या टोळीने नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अनेक बैठका घेऊन गुंतवणुकदारांना गुंतवणुकीसाठी उद्युक्त केले. शहर पोलिस सध्या शिर्डी येथे चौकशी करीत असल्याने आणखी काही नवीन बाबी समोर येऊ शकतात, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ विवाहाच्या निमंत्रणाचा ‘निष्कर्ष’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विवाहाचे निमंत्रण मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरू शहर-ए-खतीब यांच्याकडून आले होते. सामाजिक सलोखा महत्त्वपूर्ण असून, त्याच दृष्टीकोनातून उपस्थिती लावण्यात आली, अशी भूमिका विवाहासाठी उपस्थिती लावणाऱ्या पोलिसांनी मांडली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, ‘निमंत्रणाचा निष्कर्ष’ महत्त्वाचा असल्याचे चौकशी अहवालानुसार स्पष्ट होते.
शहरातील भद्रकाली परिसर संवेदनशील मानला जातो. हिंदू-मुस्लिम बहुल परिसरात कायम शांतता टिकावी म्हणून पोलिस प्रयत्नशील असतात. दोन्ही समाजाच्या प्रमुख नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना तसेच धर्मगुरूना पोलिस सोबत घेतात. भद्रकाली पोलिस स्टेशन तसेच वरिष्ठ अधिकारीही हेच धोरण कायम राबवतात. १९ मे रोजी पार पडलेल्या विवाहासाठी पोलिसांनी याकडे लक्ष दिले. शहर-ए-खतीब यांच्या पुतण्याचा विवाह असल्याने पोलिसांना निमंत्रण होते. पालकमंत्र्यासह आमदार-खासदारही विवाहसोहळ्याला उपस्थित होते. पोलिसांपैकी काही मंत्र्यांच्या बंदोबस्तामुळे विवाहस्थळी पोहचले होते. विवाह झाल्यानंतर दोन दिवसांनी हा विवाह दाऊदच्या एका पुतणीशी झाल्याचे समोर आले. याची तक्रार पोलिस आयुक्तांपर्यंत पोहचल्याने त्यांनी चौकशी सुरू केली. याबाबत सूत्रांनी सांगितले, की अनेकदा पोलिस सर्वसामान्यांशी मिसळण्याचा प्रयत्न करतात. पोलिस सर्वसामान्यांपर्यंत पोहचले तरच संवाद सुरू राहू शकतो. शहर-ए-खतीब यांच्या पुतण्याच्या लग्नासाठी मोठ्या संख्येने सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते. हा विवाह लपून-छपून झाला असता तर आरोपांमध्ये तथ्य असते. मात्र, तसे काहीही नाही.

निमंत्रण शहर-ए-खतीब यांच्याकडून
सामाजिक तसेच पोलिसांच्या दृष्टीकोनातून काही बाबी जाणीवपूर्वक केल्या जातात. मात्र, या प्रकरणात पराचा कावळा करून आरोप केले जात आहेत. यामुळे पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संबंधित पोलिस अधिकाऱ्याने केला. विवाहाचे निमंत्रण शहर-ए-खतीब यांच्याकडून आले होते. त्यांच्या निमंत्रणाचा आदर म्हणून विवाहला हजेरी लावली असल्याचे त्या पोलिसाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपाली गणोरे यांच्यावर अंत्यसंस्कार

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
मुंबईतील खार पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी दीपाली यांची वाकोला येथील घरा चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि. २३) पहाटे उघडकीस आली. गणोरे परिवार भगूर येथील रहिवासी आहेत. त्यामुळे भगूरवरही गुरुवारी शोककळा पसरली.
मुंबईमध्ये कोणी नातेवाईक नसल्याने पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी दीपाली यांच्यावर गुरुवारी सांयकाळी अत्यंत शोकाकूल वातावरणात दारणा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुंबई येथून विविध पदांवर कार्यरत असलेले पोलिस अधिकारी उपस्थित होते. दीपाली यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर ज्ञानेश्वर गणोरे यांनी दीपाली यांना शिक्षणाला प्रोत्साहन दिले. दीपाली यांना ब्रिटनमधील लंडन येथून एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते, अशी माहिती गणारे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि क्रीडा क्षेत्रातील नामांकित गोरखनाथ बलकवडे यांनी दिली. दीपाली यांच्या अस्थी विसर्जनासाठी रामकुंडावर नेण्यात आल्या. गणोरे परिवाराची भगूरशी नाळ जोडलेली आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती उत्सव समितीचे सदस्य असलेले ज्ञानेश्वर गणोरे यांचे येथील नूतन विद्यामंदिरात शिक्षण झाले. गणोरे यांचा कब्बडी व कुस्तीमध्ये नावाजलेले खेळाडू म्हणून नावलौकिक होता. एमपीएसी परीक्षेत प्रथम वर्ग श्रेणीत ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर पीटीसीच्या परीक्षेतही त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मुंबईतील शीना बोरा हत्याप्रकरणातील तपासाचा छडा ज्ञानेश्वर गणोरे यांनीच लावला आहे. आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.

भगूरशी नाळ जुळलेली
अत्यंत सुस्वभावी व्यक्तीसोबत असा प्रकार घडल्याने अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली. काही वर्षांपासून गणोरे यांचे कामानिमित्त परगावी अधिक वास्तव्य होते. दरवर्षी २८ मे रोजी सावरकर जयंतीच्या निमित्ताने ते भगूरला भेट देत. स्वा. सावरकर यांच्या जन्मस्थळी सर्व मित्र परिवारासह अभिवादन करायला येत असल्याची आठवणही भगूरवासीयांनी सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पित्याच्या बाराव्या दिनी तरुणावर काळाचा घाला

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहर आणि तालुक्यात उन्हाने प्रचंड कहर केला आहे. तालुक्यातील तळवाडे येथील एका २२ वर्षीय तरुणाचा उन्हाचा त्रास होऊन उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समजते. वडिलांच्या तेराव्याच्या आदल्या दिवशीच त्याच्यावर मृत्यूने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.
चेतन अशोक देशमुख (२२) असे उष्माघातात बळी गेलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि. २४) दुपारी त्याचा मृत्यू झाला. गावात दुपारी तीन वाजता भोवळ आल्याने चेतन जमिनीवर कोसळला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला लगेचच उपचारासाठी लखमापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चेतनच्या वडिल अशोक उत्तमराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या तेराव्याचा विधी गुरुवारी (‌दि. २५) होता. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी उन्हात धावपळ गेल्याने चेतनला उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. शहर व तालुक्यात उन्हाने कहर केला आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्यने सकाळी नऊ वाजेनंतरच घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. वडिलांच्या तेराव्याच्या आदल्या दिवशीच चेतनचा असा आकस्मित दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. चेतन कॉलेजला शिकत होता. त्याच्यामागे आई, दोन भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. या प्रकरणी सरकारवाडा व पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शहरात स्ट्रीट क्राइम रोखण्यासाठी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

राजीवनगर येथील अहिल्याबाई दिगंबर साळवे या रविवारी (दि. २१) आपल्या मुलीसमवेत बाहेरगावी जाण्यासाठी ठक्कर बाजार बस स्थानकात गेल्या. दुपारी बारा वाजेच्या सुमारास मायलेकी बसमध्ये बसत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मुलगी ज्योतीच्या गळ्यातील २८ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून नेले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार राठोड करीत आहेत.
चेन स्नॅचिंगची दुसरी घटना हिरावाडी परिसरात घडली. सुरेखा सोमनाथ जाधव (रा. शिवकृपानगर, हिरावाडीरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव या शुक्रवारी (दि. १९) सकाळी १० वाजेच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर उभ्या असतांना लाल रंगाच्या पल्सरवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची पोत ओरबाडून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडणीसाठी व्यावसायिकास मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
खूनाच्या गुन्ह्यात नुकताच बाहेर आलो असून, दोन हजार रुपये दे; अन्यथा हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी देत घड्याळ विक्रेत्यास बेदम मारहाण करणाऱ्या दोघा सराईत संशयितांना भद्रकाली पोलिसांना अटक केली. घटनेनंतर अवघ्या काही वेळातच दोघे संशयित जेरबंद झाले.
समीर दत्तात्रेय व्यवहारे (२६ रा. रामवाडी) आणि मुकेश रघुनाथ डुकरे (रा. शिंगाडा तलाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जोगेंद्र रघुनंदन प्रसाद शहा (५५) यांच्या तक्रारीनुसार, शहा यांचे शालिमार चौकातील मर्चंट चेंबर्स येथे बॉस कलेक्शन नावाचे घड्याळ विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. शहा बुधवारी (दि. २४) सायंकाळी आपल्या दुकानात बसलेले असताना संशयित दुकानात घुसले. तसेच, शहा यांच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. ‘खूनाच्या गुन्ह्यात नुकताच सुटलो असून, लवकर पैसे दे; नाहीतर हातपाय तोडेल’ अशी धमकी दोघांनी शहा यांना दिली. शहा यांनी पैसे देण्यास नकार देताच संशयितांनी शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर, त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच भद्रकालीचे उपनिरीक्षक शांताराम चव्हाण शहा यांच्या दुकानावर आले. सर्व माहिती घेऊन त्यांनी रात्री उशिरा दोघा संशयितांना अटक केली. दरम्यान, दोघेही संशयित सराईत गुन्हेगार आहे. समीर व्यवहारे हा सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या एका खूनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

सिडकोत घरफोडी
सिडकोतील पाटीलनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू धनू कांकरीया (रा. पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक) यांच्या तक्ररीनुसार, कांकरीया कुटुंबीय सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्याने बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच, कपाटात ठेवलेली ३७ हजार ५०० रुपयांची रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

प्रेमप्रकरणातून मारहाण
प्रेम प्रकरणातून इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणास टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना पाथर्डी शिवारातील धोंगडे मळ्यात घडली. मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राहुल नामदेव गोवर्धने (२६ रा. सांजेगाव) या तरुणाने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राहुल त्याचा मावस भाऊ पांडुरंग धोंगडे यांच्या शेतात जात असताना मंगळवारी (दि. २३) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. राहुल पायी जात असतांना पिंपळगाव खांब येथील धनाजी महाले याच्या समवेत स्विफ्ट डिझायर (एमएच १५ ४९९९) व पॅशन (एमएच १५ ५७००) या दुचाकीवर आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने, तुझा आते भाऊ शाम शिंदे हा आमच्या मेव्हणीस घेऊन आल्याची कुरापत काढून राहुलला लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेख करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉमर्स संधीची उद्या मिळणार माहिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अल्पावधीतच वेगाने पसरत असलेल्या वाणिज्य शाखेतही करिअच्या भरपूर संधी दडल्या आहेत. या वाटांची माहिती करून देण्यासाठीच शनिवारी (दि. २७) करिअर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी सेमिनार खुला आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स कॅम्पस प्लॅनेट’ उपक्रमांतर्गत ‘कॉमर्स शाखेतील करिअरच्या संधी’ या विषयावर करिअर गाइडन्स सेमिनार होणार आहे. सीएमसीएस कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये दुपारी १२ वाजता हा सेमिनार होणार आहे. वाणिज्य शाखेतून करिअरच्या कोणत्या संधी आहेत? अकरावी-बारावी सोबतच कॉमर्स शाखेतून आणखी काय करता येऊ शकते, कॉमर्स शाखेत बीकॉम, एमकॉम सोबत आणखी कोणत्या पदवी घेता येते तसेच बीबीए, एमबीए, मॅनेजमेंट, सीए, सीएस, आयसीडब्लूए यासाठी कॉमर्स शाखेतला अभ्यास कसा करावा यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. ‘मटा कॅम्पस प्लॅनेट’ उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या करिअर मार्गदर्शन सेमिनार अंतर्गत ‘कॉमर्स शाखेतील करिअर संधी’ या विषयावर विषयतज्ज्ञ विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. कॉमर्स शाखेतून कोणकोणत्या वाटा उपलब्ध होतात यासोबतच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन यावेळी केले जाईल. गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्रा शेजारी मविप्रच्या सीएमसीएस कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये शनिवारी दुपारी १२ वाजता हा सेमिनार होईल. कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी हा करिअर गाइडन्स सेमिनार मोलाचा ठरणार आहे. प्रा. प्रशांत कदम (सीए) व प्रा. श्रीमाळी हे कॉमर्स शाखेतील विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांसोबत वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी याविषयावर संवाध साधणार आहेत.

फ्रेंच सेमिनार आज
एचपीटी आरवायके कॉलेजमध्ये शुक्रवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता ‘फ्रेंच विषयातील करिअर संधी’ या विषयावर प्रा. सुमन कुलकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असून सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करिअर वाटांची कवाडे खुली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
‘करिअरची निवड कशी करावी?’ इथपासून तर ‘इच्छुक विद्याशाखेसाठी अर्ज कसा भरावा?’ इथपर्यंतच्या अनेक शंकांची उत्तरे विद्यार्थ्यांना एकाच मंचावर देण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस आणि महात्मा गांधी विद्यामंदिर यांच्या वतीने शुक्रवारपासून (दि. २६) करिअर मेळाव्याचे आयोजन केले आहे.
औरंगाबाद रोडवरील पंचवटी कॉलेजमध्ये सकाळी १० वाजता या करिअर मेळाव्याचे उद्‍घाटन होऊन दिवसभरात तीन सत्र पार पडणार आहेत. सकाळी १० वाजता या उपक्रमाचे उद्‍घाटन होईल. यावेळी संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे , महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे , संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे. या सत्रानंतर सकाळी १०.३० वाजता ‘डिफेन्समधील करिअर’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. यानंतर दुसऱ्या सत्रात सकाळी ११ वाजता ‘बारावीनंतर पुढे काय?’ याबाबत प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे मार्गदर्शन करतील. तर दुपारी १२.१० वाजता होणाऱ्या सत्रात ‘करिअरचा पर्याय नेमका कसा निवडावा?’ या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थेच्या आवारात सकाळी ९ ते १० या वेळेत नोंदणी करण्यात येईल.

बीडीएस, हेल्थ केअरबाबत उद्या मार्गदर्शन
पंचवटी कॉलेजमध्ये शनिवारी (दि. २७) दिवसभरात तीन सत्र पार पडतील. यामध्ये बीडीएस आणि एमडीएस प्रवेश प्रक्रिया, हेल्थकेअर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांनंतरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले जाईल. सकाळी ९ ते १० या वेळेत नोंदणी झाल्यानंतर सकाळी १० ते ११ या वेळेत ‘बीडीएस आणि एमडीएस प्रवेश प्रक्रिया’ या विषयावर सत्र होईल. यात केबीएच डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. भावसार मार्गदर्शन करतील. यानंतर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत ‘बारावीनंतर हेल्थ केअर अभ्यासक्रमातील संधी’ या विषयावर प्राचार्य डॉ. तांबे तर दुपारी १२.१० ते १.१० या वेळेत चालणाऱ्या तिसऱ्या सत्रात मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. रुपाली खैरे या मार्गदर्शन करणार आहेत. यानंतरचे सत्र २ आणि ३ जून रोजी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कामगारांचा तिढा सुटेना

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सेवेत कायम करणे, समान काम-समान वेतन या व इतर मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या वीज उद्योग कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी पुकारलेले कामबंद आंदोलन काल चौथ्या दिवशीही सुरू होते. व्यवस्थापकीय संचालक व कृती समितीचे राज्य प्रतिनिधी यांच्यात बुधवारी मुंबईत झालेली चर्चा फिस्कटल्याने या कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेतले नाही.
नाशिकरोड येथील महावितरण परिमंडळाच्या विद्युतभवन या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर व एकलहरे येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथे मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर वीज कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने २२ मेपासून विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरू होते. राज्यभरातून ३२ हजार कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
बुधवारी मुंबईत महानिर्मिती व्यवस्थापनाशी संपकरी कामगारांच्या प्रतिनिधींशी झालेली चर्चा फिस्कटली. सेवेत कायम करणे व समान काम-समान वेतन या मागण्यांवर संपकरी कामगार संघटना प्रतिनिधी लेखी करार करण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने ही चर्चा फिस्कटली. त्यामुळे कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. महावितरणच्या विद्युतभवन येथे संपकरी कामगारांनी काल जोरदार घोषणाबाजी केली. एकलहरे येथेही तीनशेपेक्षा जास्त कामगारांनी घोषणाबाजी केली. ऊर्जा सचिवांकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत कामबंद आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अशोक घेगडमल यांनी सांगितले. या ठिकाणी नाशिकरोड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

कंत्राटी वीज कामगार प्रतिन‌िधी व महानिर्मिती प्रशासनातील चर्चा फिस्कटली आहे. येत्या एक महिन्यात कामगारांच्या मागण्या शासनस्तरावर मांडण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. त्यावर एकमत न झाल्याने संप सुरू आहे.
- उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, वीज निर्मिती केंद्र, एकलहरे

महावितरणच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याने ठेकेदार व महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कामगारांना दमबाजी केली जात आहे.
-अरुण म्हस्के,
राज्य सरचिटणीस, कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रेप पार्क रिसॉर्ट’ डिसेंबर अखेर पूर्ण होणार

0
0

Gautam.Sancheti
@timesgroup.com
Tweet : @sanchetigMT

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक मेगा प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या गंगापूर धरणावरील ग्रेप पार्क रिसोर्टचे रखडलेले काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. केवळ या कामाचे फिनिशिंगचे काम बाकी असून, येत्या डिसेंबरपर्यंत ते पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना गंगापूर धरणावर मनसोक्त राहण्याचा आनंद घेता येणार आहे. या रिसॉर्टमध्ये चार ट्रिन्व व्हिला बंगल्यात १२ लक्झरी सूट तर दुसऱ्या इमारतीत २८ लक्झरी सूट या असणार आहेत. त्याबरोबरच स्विमिंग पूल व रेस्टॉरंटसह येथे बिझनेस सेंटर, कॉफी शॉप आदी सुविधा असणार आहेत. एकीकडे वाइन फेस्ट‌िवल व विविध कार्यक्रमांमुळे पर्यटक वाढले असताना त्यांना पर्यटन विकास महामंडळाचे हे रिसॉर्ट आकर्षित करणारे आहे.
तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ मेगा प्रकल्पात बोट क्लब, अॅडव्हेंचर पार्क व ग्रेप पार्क रिसॉर्टची कामे रखडल्यामुळे नाशिकला नवीन पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली नाही. केवळ धार्मिक स्थळांसाठी येणारे पर्यटकच येथे मोठ्या प्रमाणात आले. आता या मेगा प्रकल्पामुळे ही संख्या दुपटीने वाढणार आहे. ही रखडलेली कामे मार्च २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यातील बोटक्लबचे काम पूर्ण होऊनही राज्य शासनाने हिरवा कंद‌िल न दिल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना याचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे पर्यटनाच्या कामाकडे झालेले दुर्लक्षही संताप वाढवणारेच ठरले. आता या मेगा प्रोजेक्टची उर्वरीत दोन्ही कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. नव्या वर्षात मेगा प्रकल्प नागरिकांसाठी खुला होणार आहे.
भारतातील पहिले मातीचे धरण म्हणून गंगापूर धरण ओळखले जाते. येथेच धरणाच्या बाजूस पर्यटकांच्या सोयीसाठी हे ग्रेप पार्क तयार झाले आहे. सुला वाइन, सोमेश्वरसह इतर ठिकाणी पर्यटनाला येणाऱ्यांसाठी हे ग्रेप पार्क रेस्टॉरंट आकर्षणाचे केंद्र असणार आहे. या ग्रेप पार्क रिसॉर्टसाठी प्रादेशिक पर्यटन योजना व केंद्रीय सहाय्यता निधीतून २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याअंतर्गत अंतर्गत रस्तेही बनवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सर्व सोयीसुविधांची येथे व्यवस्था असणार आहे. अतिक्रमणामुळे या रिसॉर्टचे काम रखडल्याचे बोलले जात असले तरी त्याला बराच उशीर झाला आहे.

ग्रेप पार्क रिसॉर्टचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता फिन‌िशिंगचे काम पूर्ण करुन हे रिसॉर्ट सुरू केले जाणार आहे. येथे स्विमिंग पूल, ट्रिन्व व्हिला, रेस्टॉरंट व २८ कक्ष असणार आहेत.
- नितीन मुंडावरे, प्रादेशिक अधिकारी, एमटीडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवड, नांदगावमध्ये शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शेतकरी संपावर जाण्याची तयारीला वेग आलेला असतानाच बुधवारी चांदवड आणि नांदगाव तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. नांदगाव तालुक्यात साकोरा येथे तर चांदवड तालुक्यात दरेगाव येथे शेतकरी आत्म‌हत्या झाली. या शेतकरी आत्म‌‌हत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील समाधान पुंडलिक आहिरे या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या कारणांचा पोल‌िस शोध घेत आहेत. समाधान आहिरे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. समाधानची पत्नी व मुले लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले असताना हा प्रकार घडला. मयत समाधानची भावजई सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान घरी आली

असता सदर प्रकार उघडकीस आला.

नांदगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येची मालिका सुरूच आहे. बुधवारी साकोरा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. साकोरा येथील अशोक चिमा बोरसे यांनी बुधवारी सकाळी राहत्या घरात कोंडून घेऊन नंतर स्वतःला पेटवून घेतले. अशोक बोरसे हे जास्त प्रमाणात भाजल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

बँकेची कर्जवसुलीची नोटीस मिळताच त्यांनी आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. बोरसे यांनी स्वतःला पेटवून घेतल्याचे लक्षात येताच उपचारासाठी तातडीने त्यांना दवाखान्यात नेतांनाच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या २० दिवसात नांदगाव तालुक्यात झालेली ही पाचवी शेतकरी आत्महत्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंदऊर्जेने काठोकाठ उजळणार काठे गल्ली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांच्या धम्माल मस्तीचा आणि आतुरतेचा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ रविवार, २८ मे २०१७ रोजी बनकर चौक, काठे गल्ली येथे रंगणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या उपक्रमात हिंदी, मराठी गाण्यांवरचा एनर्जेटिक झुम्बा, पॉप्युलर गाण्यांची सदाबहार मैफल, प्रत्येकाचा उत्साह वाढवणारे खेळ अन् अनेक बहारदार परफॉर्मन्सेस या सगळ्यांची मौज तुम्हाला अनुभवता येणार आहे. त्रिकोणी गार्डन ते बनकर चौक, काठे गल्लीपर्यंत तुम्हाला धमाकेदार सिझन-३ च्या अखेरचा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’चा अविस्मरणीय क्षण अनुभवता येणार आहे.

‘हॅप्पी स्ट्रीट्स’वर सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत बच्चेकंपनी, तरुणाई आणि अबालवृद्धांना आनंदाच्या बहारदार उत्सवात सहभागी होता येणार आहे. आठवडाभराच्या टेन्शन आणि स्ट्रेसमधून मुक्त होत तुमची संडे मॉर्निंग उत्साहात, आनंदात, जल्लोषाच्या वातावरणात साजरी करता येणार आहे. यासाठी ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ ही मनोरंजनात्मक अस्सल मेजवानी फुल टू धम्माल ठरणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणीची गरज नाही. तुम्हाला आलेला कामाचा क्षीण, रोजची धावपळ हे सगळं टाळून रविवारची आल्हाददायक सकाळ हक्काच्या रस्त्यावर टशनमध्ये एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. काठे गल्लीच्या या हॅप्पी रस्त्यावरील विविध अँक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होत तुम्ही धम्माल मस्ती करत मनोरंजनाची अविस्मरणीय लयलूट करू शकतात. येत्या रविवारचा काठे गल्लीचा रस्ता फक्त आणि फक्त तुमच्या जल्लोषासाठी अन् आनंदासाठी खुला असणार आहे. ‘मटा’तर्फे आयोजित ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ सिझन-३ चा हा शेवटचा रविवार असल्याने तुम्हाला कल्ला, धम्माल अन् मस्ती करण्याची संधी असणार आहे.

काठे गल्लीत होणाऱ्या ‘हॅप्पी स्ट्रीट्स’मध्ये यूथचा नवा ट्रेंड असलेला झुम्बा पूनम आचार्य व श्रद्धा जोशी यांच्याकडून सादर होणार आहे. सोबतच सिद्धी ठोंबरे हिच्या बॅले डान्सची, तर स्नेहितच्या सोलो डान्सची झलकही या वेळी तुम्हाला अनुभवता येणार आहे. इंड‌ियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल प्रकारातले सुगम संगीत, इस्ट अँड वेस्ट म्युझिक अॅकॅडमीचे नरेंद्र पुली आणि त्यांचे शिष्यगण यांचे गिटारवादन, बासरीवादनाची रवींद्र जोशी यांची मैफल तुम्हाला अनुभवता येणार आहे. नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार रचना आर्ट अॅकॅडमीचे राजू दाणी आणि टीमकडून करून दाखवले जाणार आहेत. वर्ड कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे बारकावे समजावून सांगणार आहेत. ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार हर्षल शिंदे दाखवणार आहे. सोबतच सौरभच्या वन एट वन ग्रुपतर्फे अनोख्या स्टाइल्सचे टेम्पररी टॅटू काढून मिळणार आहेत. विजयराज यांचा मॅजिक शो, ललित महाजन यांचा रॉक बँड, प्रेमदा दांडेकर यांची स्ट्रीट रांगोळी असे अनेक उपक्रम लक्ष वेधून घेणार आहेत.

सोबतच नाशिक पोलिस बँडचा खास नजराणा भेटीला येणार आहे. दंडे ज्वेलर्सचे संचालक मिलिंद दंडे यांच्यातर्फे महिला ढोलपथकदेखील हॅप्पी स्ट्रीट्सवर ढोलवादन करण्यासाठी सज्ज असणार आहे. शंकर कंडेरा यांच्या कराओके सिंगिंगची मौज तुम्हाला अनुभवता येणार आहे. यासोबतच लहानग्यांसाठी बचपन गल्लीचे आकर्षण यंदाही असून भोवरे, टिक्कर, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग असे अनेक गेम्स डेकॅथलॉनकडून असणार आहेत. तुषार संकलेचा यांच्याकडून एक झक्कास सेल्फी पॉइंट असणार आहे. प्रमोद पाटील यांच्याकडून कॅनॉपी स्टॉल इथे असणार आहेत. सुरजित मानचंदा यांच्या आयएनआयएफडीतर्फे काही वैशिष्ट्यपूर्ण चिल्ड्रन अॅक्टिव्हिटी होणार आहेत. श्री शक्ती महिला गटातर्फे कापडी पिशवी वाटप व पर्यावरण संवर्धनाचे प्रबोधनही या वेळी करण्यात येणार आहे. वैष्णवी मोरे याचं कूलिंग आर्ट, रश्मी याचं चिल्ड्रेन सेल्फी पॉइंट, कैलास परदेशी याचं स्ट्रीट पेंटिंग, मोहिनी येवलेकर याचं बॉटल पेंटिंग्ज, रागिनी सिंकर यांची अम्ब्रेला पेंटिंग, विवेक सोहानी याचं केक डिझाइन, स्पार्टन हेल्प सेंटर यांच्याकडून शेतकरी आत्महत्या जीवनावरील चित्र तर महेंद्र कटारिया यांचे व्यायाम प्रात्यक्षिक आणि जगबीरसिंग यांचं समाजप्रबोधन या अँक्टिव्हिटी हॅप्पी स्ट्रीट्सची रंगत आणखी वाढवणार आहेत.

व्हा बेस्ट अन् भेटा जावेद अलीला...

रविवारी हॅप्पी स्ट्रीट्सवर सहभागी होणाऱ्या नाशिककरांसाठी जावेद अलीच्या लाइव्ह इन कॉन्सर्टचा कपल पास जिंकण्याची संधी ‘मटा’ने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुम्हाला हॅप्पी स्ट्रीट्सवर एका खास ड्रेसमध्ये उपस्थित राहत झक्कास असा डान्स करत उत्साह दाखवून द्यायचा आहे. जमलेल्या सर्व नाशिककरांमधून निवडण्यात आलेल्या बेस्ट ड्रेस, बेस्ट डान्स आणि उत्साही व्यक्तींना जावेद अलीच्या लाइव्ह इन कॉन्सर्टचा पास भेट देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दगडफेकीच्या दोषींवर कारवाईसाठी निवेदन

0
0

धुळ्यात सर्वपक्षीयांकडून आयुक्तांच्या घरावरील घटनेचा निषेध

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांच्या निवासस्थानावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करीत या प्रकाराचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी गुरुवारी (दि. २४) शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था तसेच महापालिका आणि विविध शासकीय कर्मचारी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महापौर कल्पना महाले यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या निवासस्थानावर १९ मे रोजी रात्री काही समाजकंटकांनी अंधाराचा फायदा घेत दगडफेक केली होती. त्या घटनेनंतर शहरासह महापालिका वर्तुळात त्याचे तीव्र पडसाद उमटले. चांगल्या अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा आणि धुळे शहराला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचे म्हणून त्याचा सर्वस्तरातून निषेध सुरू झाला. यामुळे गुरुवारी, सकाळी ११ वाजता शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सिटीजन फोरम यासह शहरातील विविध सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थांच्या संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महापौर कल्पना महाले, बालकल्याण सभापती इंदूताई वाघ, माजी महापौर जयश्री अहिरराव, रवी बेलपाठक, निरंजन भतवाल, हेमंत मदाने, योगेंद्र जुनागडे, अॅड. शामकांत पाटील, अॅड. चंद्रकांत येशीराव, रतनचंद शहा, आप्पा खताळ यांच्यासह समाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे वरातीमागून घोडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सातपूर विभागातील गंगापूर गाव येथील कै. वसंतराव कानेटकर उद्यानात अनेक गंभीर समस्या कित्येक महिन्यांपासून जैसे थे आहेत. या उद्यानाचे सुशोभीकरण करून पर्यटक व नाशिककरांसाठी त्याला पुन्हा ऊर्जितावस्था द्यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र, त्याएेवजी येथे उपाहारगृह सुरू करण्याचा घाट महापालिकेकडून घातला जात आहे. पण, मुळातच उद्यानाची दुरवस्था झाल्याने नाशिककर तेथे जाणे टाळतात. त्यामुळे आधी येथे सुधारणा करणे अपेक्षित असताना उपाहारगृहासाठी टेंडर काढण्यात आल्याने अनेकांनी अाश्चर्य व्यक्त केले आहे.

या उद्यानातील मोडकी खेळणी, कचरा, अस्वच्छता,मद्यपी, टवाळखोरांचा वावर आदी बाबींकडे दुर्लक्ष करीत महापालिकेने आपले लक्ष चक्क आर्थिक फायद्याकडे केंद्रित केले आहे. कानेटकर उद्यानाचे सुशोभीकरण करण्याऐवजी तेथील उपाहारगृह चालवायला देण्याचे टेंडर देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन उद्यानाचे सुशोभीकरण व नाशिककरांच्या आनंदापेक्षा आर्थिक फायद्याला प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे.

अनेक समस्या जैसे थे

कानेटकर उद्यानात गेल्या अनेक महिन्यांपासून तुटलेली खेळणी, जळालेला कचरा, वाढलेले गवत, जीर्ण झालेले बांधकाम, वाळलेली झाडे, बंद कारंजा, फुटलेल्या काचा, मद्यपींचा वावर, अस्वच्छेतेचे साम्राज्य अशा अनेक समस्या जैसे थे आहेत. उद्यानातील या दयनीय अवस्थेमुळे नाशिककर व पर्यटकदेखील या उद्यानात जाणे टाळत आहेत. डागडुजी व सुशोभीकरण करीत हे उद्यान सुस्थितीत आणण्याची मागणी वारंवार होत आहे. पण, महापालिकेकडून मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याची स्थिती आहे.

आनंदापेक्षा करावर डोळा

नागरिकांच्या मागणीकडे दुर्लतक्ष करीत कानेटकर उद्यानातील उपाहारगृहाचे टेंडर देण्याची जाहिरात महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उपाहारगृह गाळा क्रमांक १ व २ हे प्रत्येकी एक व्यक्ती किंवा संस्था यांना स्वतंत्ररीत्या मासिक जागा लायसन्स फी व इतर कर/फी भरण्याच्या तत्त्वावर देण्यात येणार आहे. ३१ मार्च २०३० पर्यंत हे कंत्राट राहणार आहे, असे जाहिरातीत म्हटले आहे. पालिकेचे उपायुक्त (विविध कर) व अतिरिक्त आयुक्त-२ यांच्या नावे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. mahatenders.gov.in या वेबसाइटवरही ही जाहिरात अपलोड करण्यात आली आहे. या जाहिरातीवरून नाशिककरांच्या आनंदापेक्षा महापालिकेचा व्यवसाय करावर डोळा असल्याचे दिसून येत आहे.


उपाहारगृह चालणार कसे?

वसंतराव कानेटकर उद्यानाची दुरवस्था बघता तेथे जाणे नाशिककर टाळताना दिसतात. अशा परिस्थितीत तेथे उपाहारगृहाचे कंत्राट देण्याचे घाटत आहे. मात्र, जर ग्राहकच नसतील, तर तेथील उपाहारगृह चालणार तरी कसे आणि उपाहारगृह सुरू करूनही नफा न झाल्यास महापालिकेला कर कोठून उपलब्ध होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्रतेची टांगती तलवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नियमभंग करून केलेले बांधकाम व अतिक्रमणांच्या कारणास्तव देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विद्यमान उपाध्यक्षांसह तीन नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. पद वाचविण्यासाठी संबंधित नगरसेवकांनी थेट संरक्षण राज्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे. भारतीय जनता पक्षात नव्यानेच दाखल झालेली ही मंडळी असल्याने पक्षीय पातळीवरही हा विषय वरिष्ठांकडे उपस्थित केला गेला आहे.

या गंभीर प्रकरणात नगरसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्र, तर बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर प्रदीप कौल मात्र त्यांच्या विरोधात दिसत असल्याने संभ्रम वाढला आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्याप्रमाणे कुठलीही परवानगी न घेता बांधकाम केल्यास कॅन्टोन्मेंट कायदा २४७ व २४८ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. ठराविक मुदतीत मंजुरीसाठी कागदपत्रे न आल्यास कलम ३२० प्रमाणे नोटीस बजावत केलेले बांधकाम पाडण्यात येऊ शकते. संबंधित जर बोर्डाचे लोकप्रतिनिधी असतील, तर त्यांना पदावरून पदमुक्त करण्याचे अधिकार बोर्डासह अध्यक्षांना आहेत.

उपाध्यक्षांवर आरोप

बोर्डाचे विद्यमान उपाध्यक्ष दिनकर आढाव यांनी सध्या राहत असलेले घर बांधताना प्रशासनाची दिशाभूल करून आराखडा मंजूर केल्याचा आरोप दस्तुरखुद्द बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर प्रदीप कौल यांचा आहे. कौल यांनी या प्रकरणी आढाव यांना कॅन्टोन्मेंट अॅक्ट २४७ व २४८ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तथापि, आपले घर योग्य पद्धतीने बांधले असल्याचा दावा आढाव यांनी केला आहे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी मात्र सदर घराची मोजणी केली असता कुठल्याही प्रकारचा एफएसआय भंग झाला नसल्याचे सांगितले. बोर्डाचे अध्यक्ष व प्रशासनप्रमुखांमध्येच संभ्रम असल्याचा फायदा आढावांना मिळत आहे.

माजी उपाध्यक्षांवरही आक्षेप

बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी आपल्या आईच्या नावावर असलेल्या जागेत रेस्ट कॅम्परोडवरील रेसिडेन्शियल झोनमध्ये कमर्शिअल बांधकाम करीत तेथे चार गाळे व एक हॉल बिनशेती प्लॉटवर बांधला, असा आक्षेप आहे. बांधकामानंतर सदर जागा बिनशेती करण्यात आली. याशिवाय हिल रेंज परिसरात त्यांच्या भावाच्या नावाने असलेल्या बंगल्यात व राहत्या घरातील बांधकामातदेखील वापरलेल्या एफएसआय चुकीच्या पद्धतीने दर्शविण्यात आल्याचा आक्षेप आहे. याबाबतही ब्रिगेडिअर कौल यांनी आक्षेप नोंदविला आहे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार हे योग्य मोजणी करण्यात आल्याचे सांगत आहेत.

धिवरेंवर बदलाचा आरोप

नगरसेविका प्रभावती धिवरे यांनी नियमानुसार बांधकाम केले. पण, नंतर त्यात बदल केल्याचा आक्षेप आहे. अर्थात, नंतर त्यांनी त्यात बदल करीत नवीन प्लॅन टाकत मंजुरी घेतली. याबाबत पुढील कार्यवाहीसाठी संरक्षण विभागाच्या दक्षिण विभागीय कार्यालयाकडे तो प्लॅन मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगितले जाते.

बांधकाम समितीचा घाट

पारदर्शक कारभारासाठी अध्यक्षांनी बोर्डातील बांधकाम समिती व अर्थ समिती बरखास्त केली होती. कारण, बांधकाम समित्यांच्या आडून बिल्डर व खासगी भूधारकांना बांधकामाच्या परवानग्या मिळविण्याकामी त्रास दिला जात असल्याचे अध्यक्षांनी सांगितले होते. मात्र, बिल्डरांशी असलेले आर्थिक हितसंबंध खराब होऊ नयेत म्हणून अध्यक्षांच्या सूचनेचा अव्हेर करीत नियमाने मतदान घेण्यात येऊन बांधकाम समिती पुन्हा स्थापन करण्याचा घाट बोर्डाच्या बैठकीत घालण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह एक नगरसेविका वगळता सर्वच नगरसेवकांनी याबाबत आग्रही भूमिका मांडली होती.


कारवाई फक्त कागदावर

देवळालीत एकूण ७६७ (जी केवळ प्रशासनाला माहिती आहे.) अनधिकृत बांधकामे असून, त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. देवळाली परिसरातील नागरी भागात असलेल्या बांधकामांना परवानग्या देण्याचे अधिकार २००६ च्या कायद्यानुसार फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असल्याने या भागात अशी अनधिकृत बांधकामे सर्रास सुरू असून, यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. कारवाही केल्याबाबत केवळ कागद रंगविले जातात, प्रत्यक्षात बांधकाम मात्र जागेवरच जैसे थे असते, असे आढळून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सशस्‍त्र टोळक्याकडून भरवस्तीत अल्पवयीनाची हत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

विवाह सोहळ्यासाठी आत्याकडे आलेल्या कसारा येथील तुषार भास्कर साबळे (वय १६) या अल्पवयीन मुलाची वीस ते पंचवीस जणांच्या सशस्त्र टोळक्याने भरवस्तीत हत्या केली. जेलरोडच्या मंगलमूर्तीनगर येथील हर्ष अपार्टमेंट येथे गुरुवारी (दि. २५) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
तोंडाला स्कार्फ बांधून चारचाकी तीन वाहनांतून आलेल्या या हल्लेखोरांनी चाकू अथवा कोयत्यासारख्या हत्याराने तुषारच्या डोके, मान व पाठीवर वार केल्याने तुषार जागीच गतप्राण झाला. दिवसाढवळ्या भरवस्तीत अशा प्रकारचे हत्याकांड झाल्याने संपूर्ण नाशिकरोड शहर हादरले. विशेष म्हणजे या हल्लेखोरांनी या घटनेनंतर पळून जातांना त्यांच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबारही केला. नाशिकरोडमध्ये तीन दिवसांत अशाप्रकारची दुसरी घटना घडली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोसावीनगर येथे राहणाऱ्या बाळू सुधीर गांगुर्डे यांच्याकडे तुषार भास्कर साबळे (रा. पंचशीलनगर, कसारा) हा दोन दिवसांनी असलेल्या विवाह सोहळ्यासाठी दोन दिवसांपूर्वीच नाशिकला आलेला होता. कसारा येथील बी. एच. अग्रवाल या हायस्कूलमधून तुषारने मार्च २०१७ची इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली होती. काल गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास बाळू सुधीर गांगुर्डे यांचा भाचा अक्षय भाऊसाहेब जाधव (रा. हर्ष अपार्टमेंट, मंगलमूर्तीनगर, जेलरोड) याच्यासोबत चित्रपट बघण्यासाठी अक्षयच्या घरी गेला होता. हर्ष अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अक्षय जाधवने आपली दुचाकी पार्क करुन जिन्याने वरच्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटच्या दिशेने गेला. याचवेळी मागे राहिलेल्या तुषारला दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गाठले व त्याच्यावर शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. त्याने जीव वाचविण्यासाठी अक्षयचे घर माहिती नसल्याने मोकळ्या जागेत धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी त्याला गाठून त्याची हत्या केली. यावेळी काही हल्लेखोरांनी हर्ष अपार्टमेंटमध्ये घुसून इतर फ्लॅटच्या बाहेरून कड्याही लावल्या. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अक्षय जाधव मात्र आपल्या फ्लॅटमध्ये लपल्याने अक्षय हल्लेखोरांच्या हाती लागला नाही. अवघ्या काही मिनिटांत तुषारची हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला व आपल्या तिन्ही चाराचाकींतून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस उपायुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, उपनगरचे पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन, नाशिकरोडचे पंढरीनाथ ढोकणे, गुन्हे शाखेचे नारायण न्याहळदे आदी पोलिस आधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तत्काळ तपास सुरू केला. यावेळी तुषारबरोबर असलेल्या अक्षय जाधवची पोलिसांनी कसून चौकशी केली व त्याला ताब्यात घेतले.

माझा पोरगा मला दाखवा..

तुषारची हत्या झाल्याचे समजताच तुषारची आई सुनीता साबळे व वडील भास्कर साबळे काही वेळातच कसाऱ्याहून नाशिकरोडला आले. बिटको रुग्णालयात आल्यावर त्याच्या आईवड‌िलांनी टाहो फोडला. माझा पोरगा मला दाखवा. माझं लहान पोरगं आहे. लहान पोरावर कोणी वार करतं का? त्याच्यावर वार होत असताना नाशिकचे पोलिस काय करीत होते? असा आर्त सवाल या माउलीने यावेळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना केला. तुषारच्या नातेवाईकांनी बिटको रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. बिटकोत आणण्यापूर्वी तुषारला जयरामभाई रुग्णालयात दाखल केले होते.

टार्गेट चुकले?

तुषारचा हकनाक बळी गेल्याची यावेळी चर्चा होती. या हत्याकांडाच्या घटनाक्रमातून हल्लेखोरांचे टार्गेट दुसरेच असण्याची शंका येते. तसे नसते तर हल्लेखोर हर्ष अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर गेलेच नसते. अक्षय जाधव याची आई संगीता जाधव यांनीही हल्लेखोर वरच्या मजल्यावर येऊन आपल्याला धमकावून गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे हल्लेखोरांचे टार्गेट चुकले तर नाही, याचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी अमरधामला मरणकळा

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भुरट्या चोरांनी गायब केलेल्या लोखंडी जाळ्या, साफसाफाईअभावी फैलावलेली अस्वच्छता, नामफलकाची निखळून पडलेली अक्षरे, फुटलेल्या फरशा, लिकेज झालेल्या पाण्याच्या पाइपलाइन, चोकअप झालेल्या गटारी अादी समस्यांमुळे पंचवटी अमरधामला जणू मरणकळाच आल्याची स्थिती सध्या दिसून येत आहे. डागडुजीअभावी आलेली ही स्थिती दूर करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गणेशवाडीच्या उताराला गोदातीरावर उभारण्यात आलेल्या पंचवटी अमरधाममध्ये अगदी अलीकडच्या काळापर्यंत पुरेशा सुविधा उपलब्ध होत्या. मात्र, येथील देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या त्याला अवकळा आली आहे. या अमरधामच्या प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे ढीग दिसतात.

--

नामफलकाची दुरवस्था

प्रवेश केल्यानंतर आतमध्ये जाताना उत्तरेला कार्यालयासाठी खोली बांधण्यात आलेली आहे. त्यावर ‘नाशिक महापालिका पंचवटी अमरधाम’ असा नामफलक लावण्यात आलेला आहे. त्याची अनेक अक्षरे निखळली आहेत. या खोलीत अडगळीचे साहित्य पडलेले आहे. अनेक वर्षांपासून या खोलीची स्वच्छता केली नसल्याची स्थिती आहे.

--

बेडच्या जाळ्या गायब

अंत्यविधीसाठीच्या पहिल्या डेथ बेडजवळच्या उत्तरेच्या जाळ्या भुरट्या चोरट्यांनी गायब केल्या आहेत. त्याचप्रमाणे पूर्वेला असलेल्या जाळ्याही गायब झालेल्या आहेत. बेडजवळची एक पाण्याच्या पाइपलाइन गंज चढल्याने लीक झालेली आहे. त्यातून पाण्याचा पाझर सुरू आहे. बेडकडे जाण्याच्या पायऱ्यांवरच्या फरशा निखळलेल्या आहेत.

--

ड्रेनेजमध्ये पालापाचोळा

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ड्रेनेजचे ढापे निघालेले आहेत. या ड्रेनेजलाइनमध्ये प्लास्टिकचा कचरा, झाडांचा पालापाचोळा साचलेला आहे. हा कचरा साफ केला नाही, तर पावसाळ्यात या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. प्रवेशद्वारापासून जवळच पाण्याची मोठी टाकी बसविण्यात आलेली आहे. या टाकीच्या नळातून निघणारे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यात कचरा, घाण साचलेली आहे. पावसाळ्यापूर्वी येथील नाल्यांची स्वच्छता होणे गरजेचे बनले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images