Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

असुरक्षिततेचा मालधक्का!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

रेल्वे व वेअर हाउसला वर्षाकाठी लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या रेल्वे मालधक्क्यासह येथील शेकडो माथाडी कामगार आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. करोडो रुपयांच्या मालाची ने-आण या मालधक्क्यावरून होत असूनही येथील सुरक्षाव्यवस्था मात्र रामभरोसे आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकाला लागूनच रेल्वे मालधक्का आहे. येथे सिमेंटसारखा दररोज लाखो टन माल उतरवला जातो. या मालधक्क्यावर सध्या दिवसा २५०, तर रात्रपाळीत १०० माथाडी कामगार काम करतात. परंतु, या मालधक्क्याच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले असल्याचे चित्र सध्या दिसून येते.

रेल्वे मालधक्क्याची संरक्षक भिंत अनेक ठिकाणी ढासळली आहे. त्यामुळे मालधक्क्यावर अनधिकृत व्यक्तींचा वावर वाढला असून, चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. भटकी जनावरे थेट रेल्वे ट्रॅकवर येत आहेत. प्रवासीही या मार्गाने ये-जा करीत आहेत. पूर्वेला संरक्षक भिंतच नसल्याने चेहेडी रस्त्याने पायी येणारे प्रवासी व सायकलस्वार थेट रेल्वे रूळ ओळांडून येतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे.

--

इन-आऊट एकाच मार्गाने

मालधक्क्यावर दररोज शेकडो ट्रक येतात. या गाड्यांसाठी इन व आउटसाठी एकच मार्ग आहे. बाहेर पडणाऱ्या लोडेड गाड्या देवळालीगाव राजवाड्यातील रहिवासी भागातून जातात. त्यामुळे येथे अनेकदा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. बाहेर जाण्यासाठीचा रस्ता वेगळा असावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अद्याप प्रलंबित आहे.

--

कामगारांचे हाल

येथील कामगारांना कोणत्याही स्वरुपाच्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे मालधक्क्यावर दोन स्वच्छतागृहे आहेत. परंतु, त्यापैकी एक २००६ पासून बंदच आहे, तर दुसऱ्याची पडझड झाली आहे. त्यामुळे येथील माथाडी कामगारांना शौचविधीसाठी उघड्यावरच जावे लागते. या मालधक्क्यावर सुमारे ७०० परवानाधारक माथाडी कामगार आहेत. मात्र, त्यांच्या आरोग्यासाठी येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. साधी प्रथमोपचार पेटीदेखील येथे उपलब्ध नाही. काम करताना कामगार जखमी झाल्यास त्यांना स्वखर्चाने उपचारांसाठी बाहेर जावे लागते. रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांसाठीचे विश्रांतिगृह २००६ पासून बंद आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना वेअर हाउसमधील सिमेंटच्या धुळीतच विश्रांती घ्यावी लागते. परिणामी या कामगारांना श्वसनविषयक विकार जडले आहेत.

----

रेल्वेकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने आंध्रप्रदेशसह महाराष्ट्रातील चंद्रपूर व भादली येथून रस्तामार्गे सिमेंटची वाहतूक वाढली आहे.

-शिवनारायण सोमाणी, कार्टिंग एजंट

--

रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांना आरोग्य व सुरक्षाविषयक कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. मात्र, पगारातून माथाडी बोर्ड ३५ टक्के लेव्ही कपात करते.

-रामबाबा पठारे, जिल्हा संपर्कप्रमुख, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन जिल्हा सहकारी बँकेऐवजी राष्ट्रीयीकृत बँकेतून व्हावे व त्यासंबंधित प्रक्रिया लवकरात लवकरात पूर्ण व्हावी, या मागणीसाठी येथील शिक्षकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सोमवारी भेट घेतली. रिझर्व्ह बँकेचे निकष व निष्कर्षानुसार येत्या काही दिवसांत राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत वेतन सुरू करण्याचा निर्णय होईल, अशी ग्वाही शिक्षणमंत्री तावडे यांनी शिक्षकांना यावेळी दिली.

नोटाबंदीनंतर जिल्ह्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नाशिक जिल्हा बँकेतून वेळेवर होत नाही. यामुळे अस्वस्थ झालेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलने करूनदेखील जिल्हा सहकारी बँकेऐवजी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत वेतन मिळण्यासंदर्भात निर्णायक कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले आहे. त्याबरोबरच पक्षीय राजकारण व निवडणुकीतील यशापयशाचे मोजमाप लावले जात असल्याने सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची भूमिका शिक्षकांनी मांडली. त्यांचे विमा, भविष्यनिर्वाह निधी, आयकर, गृहकर्ज आदी विषय प्रलंबित राहून त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी झाले असून, लवकरात लवकर या प्रकरणी निष्कर्ष निघणे अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याविषयाचा विचार करून डीडीएफचे कार्यक्षम कार्यकर्ते शशांक मदाने यांनी सर्व संघटना व पक्षरहीत शिक्षक, शिक्षकेतर वेतन संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. तसेच या समितीच्या माध्यमातून प्रसंगी न्याय मागण्याचा मानस व्यक्त केला आहे. यावेळी संघटनेचे सतीश नाडगौडा, मिलिंद जोशी, अरुण जाधव, किशोर ठाकूर, इस्कूचे सूर्यभान जगताप, टीडीएफ नेते शशांक मदाने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड बसस्थानकातून शहर बससेवेच्या फेऱ्यांत अचानक मोठी कपात करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच लालपरीच्या गैरहजेरीने असंख्य रिक्षाचालकांचे चांगलेच फावले असून, त्यांच्याकडून प्रवाशांची सर्रास आर्थिक लूट होत आहे. हजारो पासधारकांना तर दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी यासंदर्भात तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा प्रवासीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

--

या मार्गांवर बसतोय फटका

शहर बसेसच्या तोट्यात चालणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने गेल्या आठवड्यात घेतला. त्यामुळे नाशिकरोड बस स्थानकातून अंबड, सातपूर, म्हसरूळ, इंदिरानगर, श्रमिकनगर, उत्तमनगर, विजयनगर, महात्मानगर, निमाणी, शालिमार अशा प्रमुख मार्गांवरील काही फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी या मार्गांवरील बसफेऱ्यांची संख्या कमी झाल्याने दररोजच्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. या निर्णयामुळे शेकडो प्रवाशांवर नाईलाजाने खासगी प्रवासी वाहनांचा वापर करण्याची नामुष्की ओढावली आहे.

--

पासधारकांची गैरसोय

शहर बससेवेच्या फेऱ्या कमी करण्यात आल्याचा सर्वांत जास्त फटका मासिक पासधारकांना सहन करावा लागत आहे. नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड येथून नाशिकला अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या प्रवाशांना कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस उपलब्ध होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अशा पासधारकांना दुप्पट आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

--

रिक्षाचालकांची मुजोरी

शहर बससेवेच्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय रिक्षाचालकांच्या चांगलाच पथ्थ्यावर पडला आहे. ज्या मार्गावरील बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत, अश मार्गांवरील रिक्षाचालक प्रवाशांकडून दुपटीने भाडे वसूल करताना दिसून येत आहेत. काही रिक्षाचालक थेट बसस्थानकात शिरून प्रवासी पळवत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. नवीन प्रवाशांकडून जास्त भाडे उकळत आहेत. परिणामी प्रवासी त्रस्त झाले आहेत.

--

भुसावळ, तपोवन, पंचवटी व गोदावरी या गाड्या येतात, तेव्हा बसस्थानकातून बस उपलब्ध होत नाहीत. बसफेऱ्या कमी केल्यामुळे पासधारकांची परवड होत असून, रिक्षाने प्रवास करावा लागत असल्याने दुप्पट भुर्दंड सहन करावा लागत आहे.

-दीपक सिनकर, शहर बस पासधारक

--

नाशिकरोड रेल्वे व बसस्थानक भागातील रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जात आहे. प्रत्येक रिक्षात प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. बस उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने सारे सहन करावे लागत आहे.

-एस. डी. गरुड, प्रवासी

---

रेल्वे स्थानकापासूनचे बस व रिक्षा भाडे (रुपयांत)

थांबा - शहर बस भाडे - रिक्षा भाडे

निमाणी १७ ३०

शालिमार १४ २०

श्रमिकनगर ३१ ५०

सातपूर २४ ५०

अंबड ३१ ५०

इंदिरानगर १४ ५०

उत्तमनगर ३१ ५०

एकलहरे १४ २०

म्हसरूळ २७ ५०

पाथर्डी ३१ ५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिबळपटूंनी पटावरच अभ्यास करावा

$
0
0

ऑल इंड‌िया चेस फेडरेशनशी संलग्न असलेल्या ऑल मराठी चेस असोसिएशनचे सहसचिव छत्रपती पुरस्कारप्राप्त बुद्धिबळ खेळाडू जयंत गोखले यांनी नुकतीच नाशिकला भेट दिली. गोखले हे फिडे प्रशिक्षक असून, आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती आकांक्षा हगवणे हिला त्यांनी प्रशिक्षित केलेले आहे. गोखले यांनी नुकतीच नाशिकमध्ये आयोजित केलेल्या बुध्दिबळाच्या प्रशिक्षण वर्गाला भेट दिली. या वर्गात त्यांनी नाशिकच्या बुध्दिबळपटूंशी संवाद साधला व काही टिप्स दिल्या. त्यांच्याशी केलेली बातचीत..

बुध्दिबळासाठी नाशिकमध्ये टॅलेंट आहे का?
- नक्कीच टॅलेंट आहे. आज विद‌ितसारखा खेळाडूने नाशिकचे नाव जगात पोहचवले आहे. खरे सांगायचे झाल्यास नाशिकमध्ये अनेक टॅलेंटेड खेळाडू आहेत, अनेक चांगले प्रशिक्षक आहेत. थोडे चॅनलाइज होण्याची गरज आहे, असे मला वाटते. आज मुंबई-पुण्यामध्येही खेळाडू आहेत. कदाच‌ित नाशिकसारखे त्यांच्याकडे टॅलेंट नसलेही. परंतु, ते आज चॅनलाइज पध्दतीने नियोजनबध्द खेळत आहेत. यासाठी नियोजन हे जास्त महत्वाचे आहे, असे वाटते. सरावासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याची गरज आहे.
आदिवासी भागातील खेळाडूंसाठी काही योजना आहेत का?
- आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. फिडे रेटिंग स्पर्धा घेतल्यास एएमसीए निश्चित त्यासाठी मदत करेल. अशी स्पर्धा एखादी जिल्हा संघटना घेणार असेल तर तिचे स्वागतच असेल. एएमसीएकडून जेवढ्या
सुविधा देता येतील तेवढ्या देण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. चेस बोर्ड,
चेस क्लॉक आदींबाबत संघटना नेहमीच मदत करेल. बाकी स्थानिक
पातळीवर आम्ही जाऊ शकत नाही.
तेथे जिल्हा संघटनांनी पोहचणे गरजेचे आहे.
सॉफ्टवेअर्सचा वापर कितपत करावा?
- शक्यतो खेळाडूंनी पटावरच अभ्यास करावा. तांत्रिक साधनांचा खूपच कमी वापर करायला हवा. कारण शिकायचं खेळाडूंनाच आहे. कारण तंत्रज्ञान तुम्हाला एखादी चाल सुचवू शकेल. पण त्या चालीमागचा हेतू सांगणार नाही. त्याचं विश्लेषण तुम्हाला पटावरच करावं लागणार आहे. त्यामुळे पटावर जास्तीत-जास्त सराव करावा. जगात कितीही सॉफ्टवेअर आली असली तरीही आज जे जगज्जेते म्हणून खेळत आहे, त्यांनी पटावरच जास्तीत जास्त सराव केला आहे. उगाच खर्च करुन काही उपयोग नाही. आपल्यापेक्षा सरस खेळणाऱ्याशी केळ करावा.
करिअरबाबत पालकांनी काय निर्णय घ्यायला हवा?
- सर्वांत प्रथम म्हणजे पालकांनी मुलांचा कल ओळखणे आवश्यक आहे. उगाच मुलांवर बुद्धिबळ लादणे योग्य होणार नाही. राहिला करिअरचा प्रश्न, बुद्धिबळात करिअर करता येते. मात्र, त्यासाठी बुद्धिबळाचे योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. थोडक्यात म्हणजे बुद्धिबळाचा सराव कसा करावा. कोणत्या स्पर्धा खेळाव्यात आदींचे मार्गदर्शन घ्यावे. पालकांनी मुलांवर कोणताही दबाव आणू नये. त्यांना त्यांच्या पद्धतीने खेळू द्यावे. उणिवा काय असतील त्या प्रशिक्षक सोडवेल. पालकांनी फक्त त्याला प्रोत्साहन द्यावे. मुलांना खरंतर जास्तीत जास्त अधिकृत स्पर्धा खेळवाव्यात. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाची एक प्रकारे यातून चाचणी होते.
छत्रपती पुरस्कारात समावेशासाठी एएमसीए प्रयत्न करणार का?
- प्रयत्न सुरूही झाले आहेत. क्रीडामंत्र्यांच्या सचिवांकडे याबाबतचा प्रस्तावही गेला आहे. त्यावर लवकरच म‌िटिंग होणार आहे. आम्हाला आशा आहे, की लवकरच बुद्धिबळाचा छत्रपती क्रीडा पुरस्कारांत समावेश होईल. राज्यात अनेक खेळाडू आहेत. त्यांना छत्रपती पुरस्कार मिळालयला हवा. परंतु, सरकारच्या नियमापुढे काहीच करू शकतच नाही
एआयसीएफच्या संलग्नत्वानंतर एएमसीएची ध्येयधोरणे काय?
- कसे आहे की आधीच्या संघटनेबाबत एआयसीएफला काही उण‌िवा जाणवल्या. त्या वादात मला जायचे नाही. मात्र, एआयसीएफ हीच बुद्धिबळाची शिखर संघटना असून, ही संघटना फिडेशी संलग्न आहे. या अधिकृत संघटनेने एएमसीएला मान्यता दिल्याने संघटनेने महाराष्ट्रातील स्पर्धा, प्रशिक्षण, बुद्धिबळाचा प्रचार व प्रसार या सर्वच पातळीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हा संघटनांची नव्याने उभारणी सुरू केली असून, बुद्धिबळाचा विकास करणाऱ्या समविचारी लोकांना त्यात सहभागी करून घेतले आहे. शिखर संघटनेच्या मान्यतेनेच हे सर्व निर्णय होत असल्याने नव्या संघटना अधिकृत संघटना म्हणूनच काम करणार आहेत. त्याबाबत खेळाडूंच्या मनात कोणतीही शंका असणार नाही. संघटनात्मक पायाभरणी एएमसीएने प्राधान्याने हाती घेतली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोणती संघटना अधिकृत आहे?
- नाशिक जिल्ह्यात आम्ही अनिल देवधर, मिलिंद कुलकर्णी, सुधीर पगार आदींच्या कार्यकारिणीला मान्यता दिली असून, त्यांच्याच संघटनेला आम्ही संलग्नत्व दिले आहे. त्यामुळे या कार्यकारिणीची संघटना ज्या स्पर्धा आयोजित करेल त्यालाच एएमसीए आणि एआयसीएफची मान्यता असेल. अन्य कुणी दावा करीत असेल तर तो चुकीचा असेल.
संलग्नत्वामुळे मुलांना कसा फायदा मिळेल?
- ज्या संघटनेला शिखर संघटनेची संलग्नता असते ती अधिकृत संघटना असते हे पालकांनी, खेळाडूंनी नेहमी लक्षात ठेवावे. जिल्हा संघटनांना संलग्नता नसेल तर अशी संघटना दात, नखे नसलेल्या वाघासारखी असते. अशी संघटना काय कामाची, जी संघटना खेळाडूंसाठी अधिकृत स्पर्धाच घेऊ शकत नाही. म्हणूनच संघटनेला संलग्नतेचं महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचं (फिडे) भारतीय बुद्धिबळ महासंघाला (एआयसीएफ), एआयसीएफची जिल्हा संघटनांना आणि जिल्हा संघटनांची तालुका संघटनांना मान्यता असेल तरच खेळाडूंना क्रीडागुण, शासनाची रोख बक्षिसे, एसटी, रेल्वे प्रवासात सवलत आदी सुविधा पुरवता येतात.(शब्दांकन : फणिंद्र मंडलिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकसाठी मिळणार ५० हजार शिधापत्रिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्ह्यासाठी केशरी आणि पिवळ्या रंगाच्या ५० हजार शिधापत्रिका मिळणार आहेत. या शिधापत्रिका पुरविण्यास सरकारला तब्बल दोन वर्षांनी मुहूर्त गवसला आहे. आठ दिवसांत या शिधापत्रिका प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सोमवारी दिली.
रेशन वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याचे प्रयत्न राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाकडून सुरू आहेत. एकीकडे त्यासाठी नवनवीन उपाययोजनांची अंमलबजावणी होत असताना नवीन शिधापत्रिकांसाठी शेकडो लाभार्थी दोन वर्षांपासून वेटिंगवर होते. परंतु, वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे आता नवीन शिधापत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती नरके यांनी दिली. सातत्याने होत असलेल्या वापरामुळे अनेक कुटुंबांच्या शिधापत्रिका जीर्ण झाल्या आहेत. काहींच्या फाटल्या आहेत. मात्र, नवीन शिधापत्रिकांचा तुटवडा असल्याने नागरिकांना जुन्याच शिधापत्रिकांवर काम चालवावे लागत होते. इतकेच नव्हे तर नव्याने केशरी किंवा पिवळ्या शिधापत्रिकेस पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या हातावर पांढऱ्या शिधापत्रिका टेकवून त्यावरच लाभ द्यावा, असा शिक्का मारण्याची नामुष्की जिल्हा पुरवठा विभागावर ओढवली होती. नवीन शिधापत्रिकेबाबत ग्राहकांकडून वारंवार होणाऱ्या विचारणेमुळे रेशन दुकानदार तसेच पुरवठा विभागातील कर्मचारीही त्रस्त झाले होते. या सर्वांनाही आता दिलासा ‌मिळाला आहे.

एक लाख नवीन शिधापत्रिकांची मागणी केली होती. मुंबई येथील प्रिटींग प्रेसकडून येत्या आठ दिवसांत ५० हजार शिधापत्रिका मिळतील. त्यांचे वाटप तहसील कार्यालयांना केले जाईल. शिधापत्रिका कुणाला द्यावी याचा निर्णय तहसीलदार घेतील.
- सरिता नरके,
जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेला सर्वतोपरी मदत करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेने शक्य तेवढा मदतीचा हात द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. जिल्हा बँक हजारो शेतकऱ्यांची आधारस्तंभ असल्याने सहकारमंत्र्यांनी त्यांच्या अडचणी दूर करण्यात व्यक्तिश: लक्ष घालावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्याने या बँकेमागील शुक्लकाष्ट संपण्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेची आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे. जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी फोडावी, यासाठी अनेक दिवसांपासून सर्वच स्तरांवर पाठपुरावा सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे स्थानिक आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि डॉ. राहुल आहेर यांच्यासह खासदार हरिश्चंद्र चव्हाण, परवेझ कोकणी, माजी आमदार शिरीष कोतवाल, चेअरमन नरेंद्र दराडे आदींनी पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. हा विषय निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आज विशेष बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला पालकमंत्री महाजन व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह स्थानिक आमदार, बँकेच्या संचालक मंडळावरील पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या अडचणींबाबत अध्यक्ष दराडे यांनी माहिती दिली. बँकेला कर्ज पुनर्गठनाचा निधी द्यावा, तसेच आर्थिक मदत करावी, अशी विनंती करण्यात आली. पुनर्गठनाचा रखडलेला निधी द्यावा, तसेच ठेवींवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम जिल्हा बँक करीत असून, या बँकेला सर्वतोपरी मदत करा, असे आदेश त्यांनी राज्य सहकारी बँकेला दिले. सहकारमंत्र्यांनी प्राधान्याने या बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी व्यक्तिश: लक्ष घालावे, असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यावर स्थायीत चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या वर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने यंदा पाण्याचे संकट तुलनेने जाणवले नसले तरीही काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे शहरात कृत्रिमपण्‍ाे विस्कळीत पाणीपुरवठा होतो आहे , या मुद्द्याकडे सोमवारच्या स्थायी सभेत सदस्यांनी लक्ष वेधले. यावेळी सभापतींनी चुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कानपिचक्या देत कामास लागण्याच्या सूचना केल्या. दोषी आढळणाऱ्या चुकार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यंदा गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीही शहरातील काही भागात पाण्याच्या नियोजित वेळा पाळल्या जात नाहीत किंवा होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. धरणात पाणी उपलब्ध असताना हे प्रकार केवळ व्हॉल्व्हमन किंवा अधिकारी वर्गाच्या उदासीनतेमुळे होत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधल्यानंतर या संदर्भात लवकर सुधारणा करण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

शहराच्या विविध भागांमध्ये व्हॉल्वमनकडूनही कामचुकारपणा होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आहेत. या संदर्भातही लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन स्थायीच्या सभेत सभापतींनी दिले. जबाबदारीत हलगर्जीपणा करणाऱ्या व्हॉल्वमनची बदली करू किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असा इशाराही सभापतींनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतींना झाली घाई; सत्कारमूर्तीही सत्कार घेई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

म्युनिसिपल कर्मचारी-कामगार या शिवसेनेच्या अंगीकृत संघटनाध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण तिदमे यांची लागलेली वर्णी अधिकृत की अनधिकृत याबद्दल वादाला तोंड फुटले असताना सोमवारी (दि. २२) स्थायी समितीच्या सभेत सभापतींच्या हस्ते तिदमे यांचा या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. या निवडीबाबत अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी असताना स्थायी समितीने सत्काराच्या माध्यमातून दुजोरा देत या निवडीला समितीचेही पाठबळ असल्याचा सुप्त संदेशच एकप्रकारे देऊ केल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.

म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेना ही महापालिकेतील सर्वात मोठी संघटना म्हणून परिचित आहे. काही कालावधीसाठी या संघटनेच्या अध्यक्षपदावर अॅड. शिवाजी सहाणे कार्यरत होते. त्यांना परस्पर हटवून नगरसेवक प्रवीण तिदमे यांची नियुक्ती माजी मंत्री बबन घोलप यांनी केल्यानंतर अशी नियुक्ती झालेली नसून नव्या अध्यक्षांची नियुक्ती लवकरच करू, अशी भूमिका त्यावेळी अॅड. सहाणे यांनी मांडली होती. तिदमे यांच्या निवडीमागे एचएएलमध्ये कामगार संघटनेच्या कामाचा अनुभव असल्याचे कारण सांगितले जाते. मात्र, या नियुक्तीसाठी अगोदर बैठक बोलावून त्यात प्रस्ताव सादर केले जातात. यातून पदाधिकारी नव्या अध्यक्षांची नियुक्ती करतात. गेल्या आठवड्यात सोमवारी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे अचानक सूत्रे सोपविण्यात आल्याने संघटनेत तो चर्चेचा विषय ठरला होता. तिदमेंची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा सहाणेंनी त्यावेळी केला होता. यामागे शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाचीही चर्चा होती. याप्रकरणी शुक्रवारी (दि. २६) अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौदा धरणांनी गाठला तळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील २४ पैकी १४ धरणांनी तळ गाठला असून, त्यापैकी सहा धरणे पूर्णत: कोरडीठाक पडली आहेत. उर्वरित नऊ धरणांमध्ये अवघे पाच ते सात टक्केच पाणी शिल्लक आहे. महिनाभरात सर्व धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा २९ टक्क्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत घटला आहे. दैनंदिन गरज भागविण्यासाठी होणारा पाण्याचा वापर आणि आरक्षित पाणी सोडण्यात आल्याने पाणीसाठा कमी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात गंगापूर, पालखेड आणि गिरणा या तीन धरण समूहांमध्ये मिळून २४ धरणे आहेत. ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. परंतु, सद्यस्थितीत धरणांत १० हजार ९४० दशलक्ष घनफूट एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गत महिन्यात हाच पाणीसाठा १९ हजार २०२ दशलक्ष घनफुटांवर होता. मात्र गेल्या महिनाभरात तो तब्बल आठ हजार २६२ दशलक्ष घनफुटाने कमी झाला असून, एकूण उपलब्ध पाणीसाठाही २९ टक्क्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

गत महिन्यात जिल्ह्यातील केवळ आठ धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला होता. एकाच महिन्यात अशा धरणांच्या संख्येत सुमारे दुपटीने वाढ झाली आहे. त्यामध्ये आळंदी, करंजवण, ओझरखेड, तिसगाव, भावली, मुकणे आणि वालदेवी या धरणांची भर पडली आहे.

निफाड, येवला, नांदगाव तालुक्यांसाठी आरक्षित पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर नगर जिल्ह्यासाठी देखील नाशिकमधील धरणांमधून त्यांच्या हक्काचे पाणी सोडण्यात आले. यामुळे पाणीसाठा झपाट्याने खालावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


गंगापूर धरणात ३२ टक्के पाणी

शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये सद्यस्थितीत ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी सद्यस्थितीत २५ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. गंगापूर धरणाची पाणी साठवण क्षमता पाच हजार ६३० दशलक्ष घनफूट असून, आजमितीस त्यामध्ये एक हजार ८२३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणाला सहायक ठरणाऱ्या गौतमी गोदावरी आणि आळंदी धरणांनी तळ गाठला असला तरी गंगापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना चिंता करण्याचे कारण नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या जयेशला फेसबुककडून बक्षीस

$
0
0

पोस्टच्या सोल्यूशनमुळेे साडेसहा लाखांचे इनाम

कॉलेज क्लब रिपोर्टर

तुम्ही फेसबुकवर टाकलेली एखादी पोस्ट किंवा फोटो कुणी अनोळखी व्यक्तीने डिलीट केला तर? होय असे जर घडले तर तुम्ही नक्कीच चिंतातूर व्हाल. पण आता या प्रश्नावर तोडगा निघाला असून लवकरच नव्या बदलांसह फेसबुक नवीन अपडेटही आणणार आहे. या अपडेटला कारण ठरला आहे ते नाशिकचा जयेश बापू अहिरे. फेसबुकवर दुसऱ्याची पोस्ट डिलीट किंवा एडिट करता येते हे जयेशनं फेसबुकला पटवून देत त्यावर उपायही सुचवला. यानुसार आता अन्य कुणालाही आपली फेसबुकवरील पोस्ट किंवा फोटो डिलीट करता येणार नाही.

सोशल मीडियाची व्याप्ती व वापर दिवसेंदिवस वाढत असून, नेट सिक्युरिटी हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. याच नेट सिक्युरिटीवर टेस्टिंग करत असताना नाशिकच्या जयेश बापू अहिरे याने फेसबुकमधील त्रुटी शोधून काढल्या. त्याच्या या कामगिरीसाठी फेसबुककडून त्याला दहा हजार डॉलर म्हणजे तब्बल साडेसहा लाख रूपयांचे बक्षिस मिळाले. जयेशवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. फेसबुकसह अनेक सोशल साइटमध्ये आढळणाऱ्या त्रुटींमुळे युझरचा डाटा असुरक्षित होण्याची भीती असते. याच विषयावर जयेश एकेदिवशी टेस्टिंग करत असताना त्याला ही त्रुटी आढळून आली. आपण फेसबुकवर अपलोड केलेली पोस्ट किंवा फोटो आपली परवानगी न घेता एडिट किंवा डिलीट करता येतो ही बाब जयेशने फेसबुकला इमेलद्वारे कळवली. पण यावर फेसबुककडून त्याला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर जयेशने टेस्टिंग अकाऊंटची पोस्ट बदलून त्याचा व्हिडीओ शूट करून फेसबुकला पाठवला. यावर फेसबुकने जयेशकडून सोल्यूशन मागवून पुन्हा टेस्टिंग केल्यावर कुठलाही प्रॉब्लेम आला नाही व फेसबुकला त्याच्यावर विश्वास बसला. यानंतर त्याला फेसबुकने साडे सहा लाखांचे बक्षिस देण्याचा इमेल पाठवला व काही दिवसांपूर्वीच त्याच्या बँक अकाऊंटमध्ये बक्षिसाची रक्कम जमादेखील झाली आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात

जयेश नाशिकच्या डिजीपीनगरमध्ये राहत असून, सध्या तो पुण्यातील कॉलेजमध्ये कम्प्यूटर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडिल एका कंपनीत काम करतात तर आई शिवणकाम करून घराला हातभार लावते. जयेशच्या या अनोख्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पूर्वी कुणीही कुणाची पोस्ट डिलीट व एडिट करू शकत होते. आता मात्र नवीन अपडेटनंतर हे करता येणार नाही. बक्षिस मिळाल्याचा आनंद आहे पण हे सगळं आई-वडिलांशिवाय शक्य नव्हते.

- जयेश अहिरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅटट्रिक, की परिवर्तन?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडची अर्थवाहिनी असलेल्या नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक २५ जूनला होत आहे. सत्ताधारी सहकार पॅनलचे पारडे सध्या जड आहे. मात्र, विरोधकांनीही परिवर्तन करण्याचा जिद्द धरली आहे. सत्ता कोणाची येणार याचे उत्तर २६ जूनला मिळणार आहे. सत्तासंघर्षात बँकेच्या प्रगती आणि स्थैर्याला सर्व नेत्यांनी प्राधान्य द्यावे, अशी सभासदांची अपेक्षा आहे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे

बँकेची मालेगावची सत्ताविसावी शाखा निवडणुकीनंतर उघडली जाणार आहे. बहुतांश शाखा तोट्यात असताना आणखी शाखा कशाला, असा विरोधकांचा सवाल आहे. सत्ताधाऱ्यांचे उत्तर असे, की बँकेची प्रगती समाधानकारक असल्यानेच रिझर्व्ह बँकेने शाखा उघडण्यास परवानगी दिली आहे. सर्वे करूनच शाखा उघडल्या आहेत. जेलरोड शाखेचा व्यवसाय शंभर कोटींचा आहे. शाखा उघडल्या नाहीत, तर हा व्यवसाय स्पर्धकांकडे जाईल. तोट्यातील शाखा आणि वाढलेला कर्मचारी खर्च यामुळे बॅँकेची प्रगती खुंटली आहे, असाही विरोधकांचा आरोप आहे. त्यावर सत्ताधाऱ्यांचे म्हणणे असे, की बँकेकडे आज पावणेपाचशे कोटींच्या ठेवी आहेत. बँकेला मिळालेले तेरा पुरस्कार, बँकेने सुरू केलेले डेटा सेंटर, तेरा एटीएम, बारा हजार जणांना झालेले डेबिट कार्डचे वाटप, कोअर बँकिंग हा प्रगतीचा पुरावा आहे. नोटाबंदीतही बॅँकेने चांगले काम केले. विरोधकांचा तिसरा आरोप असा, की खोटी आकडेवारी सादर करून सत्ताधाऱ्यांनी रिझर्व्ह बॅँकेची दिशाभूल केली. सत्ताधाऱ्यांचे उत्तर असे, की रिझर्व्ह बॅँकेला आयकराची सर्व माहिती दिली जाते. पारदर्शक कारभारामुळेच रिझर्व्ह बॅँकेने नवीन शाखांना परवानगी दिली. २००६ मध्ये आम्ही सत्ता हाती घेतली, तेव्हा १६५ कोटींच्या ठेवी १११ कोटींवर आल्या होत्या. एनपीए ४२ टक्के होता. वाईटपणा घेत आम्ही वसुली करून बॅँक वाचवली. एनपीए शून्यावर आणला. मागील निवडणुकीत ५४ हजार सभासद होते. आम्ही ही संख्या ६५ हजारांवर नेली. यावरून सभासदांचा विश्वास सिद्ध होतो.

सहकारमध्ये जोश

बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार पॅनलने सलग दोन टर्म सत्ता मिळविल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. २०१२ मध्ये त्यांचे २२ पैकी १६ संचालक विजयी झाले होते. यंदा नवीन नियमानुसार २१ संचालक असतील. सोळाही संचालकांचे योगदान चांगले असल्याने त्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय सहकारने घेतला आहे. उर्वरित पाच जागांसाठी इच्छुकांतून निवड करण्याची कसोटी लागणार आहे. त्यामुळे पॅनलची ताकद वाढणार असली, तरी अन्य इच्छुकांची गोची झाली आहे.

विरोधकांचाही जोर

विरोधी श्री व्यापारी पॅनलनेही यंदा जोर धरला आहे. त्याचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अशोक सातभाई करीत आहेत. गेल्या वेळी या पॅनलला २२ पैकी सहा जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये विद्यमान संचालक सातभाई, सतीश मंडलेचा, हेमंत गायकवाड, सुनील आडके, राजीव टर्ले, जयश्री गायकवाड यांचा समावेश आहे. या संचालकांनी एकत्र येत यंदा लढत देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या पॅनलकडून नगरसेवक रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, प्रकाश गोहाड, मुकुंद आढाव, दिनकर पाळदे, गुंडाप्पा देवकर, अनिता करंजकर, चंद्रकांत विसपुते, राजन बच्चूमल, विक्रम कोठुळे, सुदाम ताजनपुरे, सुभाष पाटोळे आदी इच्छुक आहेत.

तिसरेही पॅनल?

परिवर्तनाच्या जिद्दीने तिसरे पॅनल बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजाभाऊ जाधव, जयप्रकाश गायकवाड, मुन्ना अन्सारी, वसंत अरिंगळे, नामदेव आढाव यांनीही पॅनलसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणूक लढविण्यासाठी बँकेत एक लाखाची मुदतठेव आणि पंधरा हजारांचे शेअर्स असणे ही अट घालण्यात आली आहे. या अटीची कल्पना नसल्यामुळे नवोदितांची अडचण झाली आहे. अर्ज भरण्यास १९ मेपासून सुरुवात झाली असून, २३ मे अंतिम मुदत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन’ला पालिकेचे सहकार्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

मुंबईत ३० व ३१ मे रोजी परळी येथील नेहरू सेंटरमध्ये होणाऱ्या औद्योगिक प्रदर्शनात निमाकडून ‘मेक इन नाशिक’साठी स्टॉल्स उभारले जाणार आहेत. यात भाजपच्या स्थानिक नेत्यांनीदेखील पुढाकर घेत ‘मेक इन नाशिक’साठी ब्रॅण्डिंग सुरू केले आहे. निमाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत महापौर रंजना भानसी यांनी नाशिकला उद्योगवाढीसाठी महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे सांगितले. नगरसेवक दिनकर पाटील यांनी शहरात ठिकठिकाणी ‘मेक इन नाशिक’ला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर फलक लावणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपचे काही निवडक नगरसेवक व निमाचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर भानसी यांनी आपल्या भाषणात नाशिकच्या विकासासाठी महापालिकेतील सर्वच नगरसेवक सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच ‘मेक इन नाशिक’साठी महापालिकेकडून सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे सांगितले. याबाबत महापालिका आयुक्तांना माहितीदेखील देण्यात आली आहे. तसेच सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या कारखान्यांना स्वतंत्र सांडपाण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निधी मागितला असल्याचेही महापौर भानसी म्हणाल्या. नगरसेविका कोमल मेहरोलीया यांनी तरुणांसाठी नवीन नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘मेक इन नाशिक’ संकल्पना प्रत्यक्षात आमलात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी नगरसेवक म्हणून नक्कीच मदतीचा हात पुढे करणार असल्याचे मेहरोल‌िया म्हणाल्या. निमाचे मानद सरचिटणीस अॅड. उदय खरोटे यांनी प्रास्ताविकात खासदार व आमदारांनी ‘मेक इन नाशिक’साठी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले. याप्रसंगी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकरआदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनधारकांना फटका

$
0
0

जिल्हा बँकेमुळे पैशाची चणचण

कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक जिल्हा बँकेच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचा फटका पेन्शनधारकांनाही बसत आहे. जानेवारीपासून बँकेने पेन्शनधारकांचे पैसे खात्यात जमा केलेले नाहीत. बँकेच्या या कारभारामुळे वयोवृद्धांना बँकेत खेटा घालाव्या लागत आहेत. तसेच याचा मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. यामुळे लवकरात लवकर आमचे निवृत्तिवेतन खात्यात जमा करावे, अशी मागणी पेन्शनधारकांनी केली आहे.

नोटाबंदी व थकलेल्या कर्जामुळे बँक आर्थिक संकटात सापडली आहे. याचा फटका आता पेन्शनधारकांनाही बसत आहे. जिल्हा परिषदेचे निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पेन्शन खाते नाशिक जिल्हा बँकेत आहे. जिल्हा परिषदेने बँकेत पैसे दिले वर्ग केले असल्याचा दावा करूनही पेन्शनधारकांच्या पदरी मात्र निराशा पडत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पेन्शन न झाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेत पैसे नसल्याने पेन्शनधारकांना निवृत्तिवेतन दिले जात नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच, दर दहा ते पंधरा दिवसांनी निवृत्तांना बोलावले जात आहे. यामुळे हक्काच्या पैशांसाठी आता पेन्शनधारकांना खेटा घालाव्या लागत आहे.

जिल्हा बँक प्रशासन व सरकारनेही याकडे लक्ष देत पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून एकांकिका स्पर्धा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील नाट्यचळवळीला बळ देणाऱ्या कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला आज, मंगळवार (दि. २३)पासून प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ वाजता ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, सकाळी ८.३० वाजेपासूनच एकांकिका सुरू होतील. २३ ते २५ मे यादरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे.

आज होणाऱ्या एकांकिका

महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या स्पर्धेचा प्रारंभ सुधीर कुलकर्णी लिखित स्थलांतर या एकांकिकेने होईल. त्यानंतर श्रीराम वाघमारे लिखित परिवर्तन, सर्वेश चोरघे लिखित तिच्या मुलाची आई, यतिन माझिरे लिखित थेंबाचे टपाल, भगवान हिरे लिखित क्रॉनिक डार्क, अंतआरंभ, जयंत पवार लिखित विठाबाईचा कावळा, रामचंद्र खाटमोडे लिखित झिम पोरी झिम, किरण ऐले लिखित विंडचीटर, तसेच प्रसाद दाणी लिखित मैं वारी जावा या एकांकिका सादर होणार आहेत.

--

बुधवार, गुरुवारच्या एकांकिका

बुधवारी (दि. २४) एका लेखकाचा मृत्यू, पेनफ्रेंड, अर्धवट गोष्ट, भानगड पाहावी करून, दर्दपोरा, खाके पिके, एव्हरी डे इज संडे, उदकशांत, इथे नाव ठेवायला जागा नाही, युग्मक या एकांकिका होणार आहे. गुरुवारी (दि. २५) हमसफर, कुस्ती, शतकानुशतके, ब्रेन, गोंद्या आणि कमूचा फार्स आणि १२ किलोमीटर या एकांकिका सादर होणार आहेत.

--

राज्यातील २६ संघांचा सहभाग

या स्पर्धेत राज्यभरातून २६ संघ सहभागी झाले आहेत. नाशिकसह पुणे, मुंबई, ठाणे, अहमदनगर, चिपळूण, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २५) सायंकाळी ७.३० वाजता पारितोषिक वितरण होणार आहे. स्पर्धेत विजयी संघांना भरघोस बक्षिसे दिली जाणार असून, स्पर्धेत बाजी मारणाऱ्या प्रथम संघास २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय २१ हजार व तृतीय क्रमांकास १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. कार्यक्रमात नाट्य शिबिरार्थी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाऊदच्या पुतणीच्या विवाहाने पोलिस अडचणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिस आयुक्तांकडे सोशल मीडियाद्वारे तक्रार करण्यात आली होती. मात्र, या विवाह सोहळ्यास आमदार, खासदारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. फक्त पोलिसांचीच चौकशी का, असा प्रश्न पोलिसांकडून उपस्थित केला जातो आहे.

मुस्लिम धर्मगुरूच्या पुतण्याचा विवाह सोहळा शुक्रवारी पार पडला. सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा विवाह दाऊदच्या पुतणीबरोबर झाला असून, विवाहप्रसंगी अनेक बुकी, तसेच संशयास्पद व्यक्ती हजर असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. विवाहासाठी १५ ते २० वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची, तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती संशयास्पद असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. दरम्यान, या प्रकरणी चौकशी सुरू केली असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मुस्लिम धर्मगुरूच्या पुतण्याचा हा विवाह होता. त्याबाबत त्यांनी स्वतः भद्रकाली पोलिस स्टेशनला, तसेच इतर अधिकाऱ्यांना लग्नपत्रिका देऊन विवाह सोहळ्याला हजेरी लावण्याची विनंती केली होती. भद्रकालीसारख्या संवेदनशील पोलिस स्टेशनसाठी ही बाब महत्त्वाची असल्याने पोलिस अधिकारी, तसेच कर्मचारी सवडीने विवाहस्थळी पोहोचले.

पोलिसांविरुद्धच तक्रार का?

विवाह सोहळ्यासाठी आमदार, खासदार, नगरसेवक, तसेच इतर प्रतिष्ठित उपस्थित होते. त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. मात्र, पोलिसांविरोधात जाणीवपूर्वक तक्रार करण्यात आल्याचा दावा संबंधित पोलिसांकडून करण्यात येतो आहे. दाऊद इब्राहीमचे नातेवाईक ठिकठिकाणी राहतात. नाशिकमध्ये एक कुटुंब पूर्वीपासून राहते. वास्तविक विवाहाचे निमंत्रण शहर-ए-खतीब यांच्याकडून आले होते. त्यांच्या निमंत्रणाचा आदर म्हणून विवाहाला हजेरी लावली असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महा खो-खो चॅम्पियनश‌िप उद्यापासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२८व्या किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघांची घोषणा राज्य असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी नुकतीच केली आहे. राज्याच्या दोन्ही संघांचे नेतृत्व पुणेकर सांभाळणार असून, किशोर संघाचा कप्तान शुभम थोरात तर किशोरी संघाचे कर्णधारपद साक्षी करे भूषवणार आहेत. २४ ते २८ मे दरम्यान नाशिक येथे या स्पर्धा होणार आहेत.
गेल्या वर्षी भुवनेश्वर, ओदिशा येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अजिंक्यपद पटकावले होते. यंदाही या स्पर्धेविषयी मोठी उत्सुकता खेळाडूंमध्ये आहे. २८व्या या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणारे महाराष्ट्राचे संघ खालील प्रमाणे आहेत.
किशोर संघ : शुभम थोरात (कर्णधार), साहिल चिखले, शुभम खळदकर, सौरभ अहिर, नागेष चोरलेकर, गणेश जाधव, धीरज भावे, नरेंद्र कातकडे, चंदू चावरे, मनोज चौधरी, आदित्य धिमधिमे, रामजी कश्यप, प्रशिक्षक आनंद पवार, व्यवस्थापक दीपक रावरे.
किशोरी संघ :
साक्षी करे (कर्णधार), ऋतिका राठोड, साक्षी वसावे, ऋृतुजा सुराडकर, मयुरी पवार, रित‌िका मगदूम, वैभवी गायकवाड, गौरी शिंदे, साक्षी वाफेलकर, साक्षी सरजीने, वैष्णवी पालवे, अश्विनी निषाद, प्रशिक्षक अविनाश करवंदे, व्यवस्थापिका तेजस्विनी बाहेती.

भारतात प्रथमच डोममध्ये खोखो स्पर्धा

आडगाव : स्पर्धेसाठी प्रथमच २१० बाय ९० फूट डोम उभारण्यात येत आहे. मातीतील खेळ डोममध्ये खेळण्याची सुरुवातदेखील नाशिकमध्ये प्रथमच होत आहे. सहभागी खेळाडूला वैज्ञानिक खेळणी भेट म्हणून दिली जाणार आहे. खेळाडूंना पाणी,प्रदूषण आणि स्वच्छता याचे गांभीर्य समजण्यासाठी दि. २३ रोजी सायंकाळी ७ वाजता गंगाघाटावर जलप्रत‌िज्ञा दिली जाणार आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून ३३ राज्यांचे मुला-मुलींचे ६० संघ सहभागी होणार आहे. ८४० खेळाडू, ४० पंच, १०० पदाधिकारी असे एकूण ९८० लोकांची निवास-भोजन व्यवस्था संघटना करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी वीज कामगार बेमुदत संपावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
महानिर्मिती, महावितरण व महापारेषण या वीज उद्योगातील तिन्ही वीज कंपन्यांतील वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर नेमलेल्या रानडे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास शासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवार (दि. २२) सकाळपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी या कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सोमवारपासून या तिन्ही कंपन्यांच्या राज्यभरातील कंत्राटी वीज कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वीज कंपनीत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांना समान काम, समान वेतन देऊन कंपनीत कायम करावे, कायम होईपर्यंत मनोज रानडे समितीच्या शिफारशींनुसार पूर्वाश्रमीच्या वीज मंडळातील रोजंदारी कामगार पध्दती लागू करावी, कंत्राटी कामगारांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करावी व कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, कंपनी परिपत्रकांतील आदेशांचे पालन न करणारे अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी या कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने एकलहरे येथे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सुमारे तीनशे वीज कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी आंदोलनस्थळी जाऊ बंदोनबस्ताबाबत पोलिसांना सूचना दिल्या.

वीज निर्मितीवर परिणाम नाही

कंत्राटी वीज कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले असले तरी सोमवारी या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे तिन्ही संच पूर्ण क्षमतेने सुरू होते. त्यामुळे वीज निर्मितीवर या आंदोलनाचा पहिल्या दिवशी कोणताही परिणाम झाला नसल्याचे महानिर्मितीच्या वतीने सांगण्यात आले. परिणामी वीज सेवेवरही या आंदोलनाचा काही परिणाम दिसून आला नाही.

इमर्जन्सी कामे ठप्प?

या संपामुळे वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता महानिर्मितीच्या सूत्रांनी नाकारली असली, तरी आंदोलक कामगारांनी मात्र सोमवारी सायंकाळी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी वीज निर्मितीच्या बॉयलर युनिटमध्ये कामगार नसल्याने अडचण निर्माण झाल्याचा दावा केला. या विभागात काम करणाऱ्या कामगारांनी कामावर येण्यासाठी फोनवर गळ घातल्याचेही त्यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या संपामुळे महानिर्मितीची सर्व इमर्जन्सी कामे ठप्प पडली असल्याचा दावा आंदोलक कामगारांनी केला आहे. याशिवाय बॉयलर युनिटमध्ये सोमवारी सायंकाळी कामगारांचा तुटवडा निर्माण झाल्याने या विभागातील कामगारांनी कामावर येण्यासाठी महानिर्मितीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी विनंती केल्याचा दावा रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे अशोक घेगडमल यांनी केला. कोलमेल सेक्शनमध्येही कंत्राटी कामगारच काम करीत होते. त्यामुळे या सेक्शनमध्येही कामगारांची उणिव निर्माण झाल्याचा दावा कंत्राटी कामगारांनी केला आहे. या सेक्शनमध्ये लिकेज काढणे, मेंटनन्स करणे आदी कामे कंत्राटी कामगारांवरच सोपविलेली असतात. त्यासाठी ऐनवेळी मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी वीज निर्मितीचा एखादा संच ठप्प पडण्याची शक्यता आंदोलन करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी वर्तविली आहे.

सामान्यांवर परिणाम...

कंत्राटी कामगारांच्या संपामुळे एखादा वीज संच बंद पडला तर ऐनवेळी भारनियमनाची समस्या उद्भवू शकते. उन्हाळा असल्यामुळे सध्या वीजेची मागणी जास्त आहे. ऐन उन्हाळ्यात भारनियमन झाल्यास त्याचा सामान्यांसह उद्योग-व्यवसायांनाही फटका बसू शकतो.

वीज कंपन्यांत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची गेल्या अनेक वर्षांपासून दिशाभूल केली जात आहे. सर्व कंत्राटी वीज कामगारांना सेवेत कायम करुन समान वेतन मिळाले पाहिजे.
- अशोक घेगडमल, सरचिटणीस,
रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन, एकलहरे शाखा

कंत्राटी कामगारांच्या सर्व मूळ पाचही मागण्या या स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीतील नसून त्या कंपनीच्या मुख्य प्रशासकीय व शासनाशी संबंधित आहेत. नियमाप्रमाणे त्यांना ठेकेदारामार्फत वेतन मिळते. त्यात दर सहा महिन्यांनी होणारे बदलही कामगारांना कळविले जातात.
-उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, औष्णिक वीज निर्मिती केंद्र, एकलहरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रोन कॅमेऱ्यांचा ‘वॉच’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापलिकेसाठी उद्या (दि.२४) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात व शांततेत पार पडावी यासाठी पोल‌िस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरारातील ११४ इमारतींमध्ये एकूण ५१६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, यातील २५३ केंद्र संवेदनशील आहेत. या संवेदनशील केंद्रावर अतिरिक्त पोल‌िस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सतराशे पोल‌िस कर्मचारी, अधिकारी व ५०० होमगार्ड मतदानाच्या दिवशी बंदोबस्तासाठी तैनात राहतील. या संपूर्ण प्रक्रियेवर चार ड्रोन कॅमेरे नजर ठेवणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

येथील शहर पोल‌िस मुख्यालय आवारात सोमवारी बंदोबस्तासाठी ठिकठिकाणाहून पोल‌िस कर्मचारी दाखल झाले. त्यांच्यासाठी जेवण तसेच सावलीची व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी शहरातून सशस्त्र पोल‌िस संचलन करण्यात आले. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोल‌िस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच चार ड्रोन केमेरे मतदान केंद्रावर लक्ष ठेवणार आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर महिला पोल‌िस कर्मचारी तैनात राहतील. मतदान केंद्रांपासून शंभर मीटर दरम्यान बॅरीकेटिंग असणार आहे. यासाठी खास त्र्यंबकेश्वर येथून बॅरीकेट आणण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी शहराच्या प्रवेशद्वारांवर ९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. तेथे वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. या बंदोबस्ताशिवाय तीन एसआरपीएस व तीन आरसीपीच्या तुकड्या तैनात असतील. तसेच ५०० होमगार्डही बंदोबस्तात असतील. मतदारांनी निर्भय होवून मतदान करावे, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे.

फिरते पथक तैनात

शहरातील मतदान केंद्रांवर फिरते पथक लक्ष ठेवून असणार आहे. मतदान केंद्र असलेल्या १० इमारतींचा एक विभाग असणार आहे. यात बंदोबस्तासाठी ४ फिरते पथक असतील. या पथकात मोटारसायकल पथक, सहायक पोलिस निरीक्षकांचे पथक, पोल‌िस निरीक्षक पथक, पोलिस उपअधीक्षकांचे पथक लक्ष ठेवणार आहे.

असा असेल बंदोबस्त

१ हजार ७००

पोल‌िस कर्मचारी अधिकारी

५०० होमगार्ड

१५० सहाय्यक पोल‌िस निरीक्षक

४० पोल‌िस निरीक्षक

१३ पोल‌िस उप-अधीक्षक

४ फिरते पथक

३ एसआरपीएफ टीम

३ आरसीपी

४ ड्रोन कॅमेरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग चारमध्ये अजब युती!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राजकारणात कुणीही कुणाचे कायम मित्र नसते किंवा शत्रू नसते, असे म्हटले जाते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देखील तालुक्यात सत्तेसाठी भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवारास पाठिंबा देत पंचायत समितीत सत्ता स्थापन केली होती. तर त्या आधी बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या प्रसाद हिरे यांना पाठिंबा देत सत्ता कायम राखली होती. सत्ताकारणासाठीच्या या अजबगजब युतीचा पायंडा आता येथील महापालिकेच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळत आहे. येथील प्रभाग चार मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मतांचा जोगवा मागण्यासाठी युती केली आहे. याबाबतचे होर्डिंग प्रभाग चार मध्ये झळकत असून हे होर्डिंग चर्चेचा विषय ठरले आहेत.

येथील पालिका राजकारणाचा इतिहास हा अशाच अभद्र युतीचा राहिला आहे. मागील निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणारे काँग्रेस व तिसरा महाज सत्तेसाठी मात्र एकत्र आले होते. तर अडीच वर्षांनंतर महाजने राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केला होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत सत्तेसाठी अभद्र युतीचा खेळ सुरू होता. आताच्या निवडणुकीतदेखील याची झलक पहायला मिळते आहे. प्रभाग चारमध्ये काँग्रेसने चारही जागांवर उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी, भाजपने तीन-तीन उमेदवार दिले आहेत. याच प्रभागात ‘क’ मध्ये शिवसेनेचे उद्धव दरेकर उमेदवारी करीत असून ‘ड’ मध्ये राष्ट्रवादीचे अलताफ बेग मजीद उमेदवारी करीत आहेत. सेना-राष्ट्रवादीच्या या दोन्ही उमेदवारांनी युती करीत प्रभाग चारसाठी शिवसेना-राष्ट्रवादीचे पॅनल बनवले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या या उघड युतीचे होर्डिंग प्रभागात लागले असून, त्यावर ‘शिवसेना व राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार’ असे स्पष्ट नमूद केले आहे.

सत्तासमीकरणासाठी जुळवाजुळव?

या निवडणुकीत एकही पक्षाने सर्व जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळणार नाही, अशी शक्यता जाणकार व्यक्त करतात. सत्तेसाठीची ४३ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी युतीच्या पर्यायाबाबत विचार करावा लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आत्तापासूनच निवडणुकीनंतरच्या सत्तासमीकरणाची जुळवाजुळाव सुरू केल्याचे संकेत या युतीद्वारे दिसून येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ता द्या, गोमांस बंदी उठवतो: भाजप

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मालेगाव

तिहेरी तलाक आणि गोमांस विक्रीविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या भाजपने मालेगावात मात्र 'वेगळा'च नारा देत महापालिका निवडणुकीतील मतांच्या बेगमीसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करायला सुरूवात केली आहे. 'मालेगाव महापालिकेत सत्ता द्या, गोमांसावरील बंदी उठविण्यात येईल,' असं आश्वासन देऊन भाजपनं त्यांच्या मूळ भूमिकेलाच हरताळ फासल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मालेगाव महापालिकेचा प्रचार शिगेला पोहचला असून महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना काही ना काही आश्वासने द्यायला सुरूवात केली आहे. भाजपने मात्र या सर्वांवर कडी केली असून पक्षाच्या भूमिकांना हरताळच फासला आहे. मालेगावमधील बहुसंख्य मुस्लीम जनतेचं गोमांस हेच प्रमुख अन्न आहे. त्यामुळेच या भागातील भाजपच्या बहुतांश उमेदवारांनी पक्षाची गोमांस बंदीची भूमिका बासनात गुंडाळली आहे. तसंच, ‘सत्तेत आल्यास गोमांस बंदी उठवू’, असं आश्वासनं येथील भाजपचे उमेदवार देत आहेत.

तिहेरी तलाकही अमान्य

भाजपच्या तिकिटावर लढत असलेल्या शेख अख्तर यांनी तिहेरी तलाक हा मुस्लिमांचा मुलभूत अधिकार असल्याचं म्हटलं आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने जरी तिहेरी तलाकविरोधात निकाल दिला तरी, आम्ही तो मान्य करणार नाही,’ असंदेखील अख्तर यांनी म्हटलं आहे.

निवडणूक प्रचार सभेत महाराष्ट्र भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी जास्तीत जास्त मुस्लिमांनी भाजपमध्ये सामील होण्यासाठी आवाहन केलं. मात्र, सिद्दीकी बोलत असताना भाजपचे मालदा येथील उमेदवार शेख अख्तर यांनी त्यांचं बोलणं रोखत तोंडी तलाकसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अमान्य असून, तिहेरी तलाक मूलभूत अधिकार असल्याचं वक्तव्यं केलं. त्यामुळे तिहेरी तलाक आणि गोमांस विरोध या मुद्द्यांवर भाजप सोयीची भूमिका घेत असल्याचं स्पष्ट होत आहे. २०१२ च्या मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकण्यात यश आलं नव्हतं. त्यामुळे यंदा भाजपने ८४ जागा असलेल्या महापालिकेतील ५६ जागांपैकी २७ जागांवर मुस्लिम उमेदवार दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images