Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मुक्त विद्यापीठाच्या २३ मे पासून परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी. ए., बी. कॉम सह अन्य विविध शिक्षणक्रमांच्या अंतिम लेखी परीक्षा २३ मेपासून सुरू होणार आहे. राज्यात ७७८ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होतील.

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेस सुमारे ५ लाख ७७ हजार ४१३ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. यामध्ये बी. ए., बी.कॉम. या पदवीसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी या माध्यमातून, बी. ए. ग्राहक, एम. कॉम., बी. एस्सी., एम. एल. टी., बी. लिब., एम. ए. (शिक्षणशास्त्र), रुग्णसहायक, बी. एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग्ज सायन्स), बी. एस्सी. (इंडस्ट्रीयल सायन्स) तसेच बी. एस्सी. (ड्रग सायन्स), बी. ए. (पब्लिक सर्व्हिसेस) व बी. ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आदी पदवी / पदविका व प्रमाणपत्र या शिक्षणक्रमांच्या परीक्षा सुरू होत आहेत.

विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर प्रवेश पत्र उपलब्ध आहेत. हे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यावे. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी आपल्या विभागातील विभागीय केंद्र किंवा आपल्या नोंदणीकृत अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्हसरुळला टवाळखोरांचा धुडगूस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पाथरवट लेनमध्ये रात्रीच्या सुमारास वाल्मिकनगर येथील गुंडांनी धारधार हत्यारे घेऊन दहशत माजविण्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोच, म्हसरुळ-मखमलाबाद लिंक रोडवरील चाणक्यपुरी येथे तीस-चाळीस जणांच्या टोळक्याकडून दहशत माजविण्याचा प्रकार मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून, चौथा फरार संशयित प्रवीण काकड हा आयुक्तालयात कार्यरत पोलिसाचा मुलगा आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसरुळ परिसरातील चाणक्यपुरी येथे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून काही तरुण आले. त्यांच्या हातात कोयता होता. त्यांनी चाणक्यपुरीच्या गेटवर मोठमोठ्याने आवाज करीत, शिवीगाळ करीत परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आपसात मारामाऱ्या व भांडणांमुळे परिसरात घबराट पसरली होती. दरम्यान, हा गोंधळ सुरू असतानाच गस्त पथकाचे वाहन तेथून जात होते. हे वाहन पाहताच त्यातील काहींनी पळ काढला. काही तरुणांनी समोर असलेल्या कृष्‍णस्तुती अपार्टमेंटसमोर पार्क केलेल्या एका कारवर भलामोठा दगड टाकून मागची काच फोडली. पोलिसांना पाहताच संशयिताने अंधारात धूम ठोकली.
यावेळी नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर आणखी तीन पोलिस गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत काहींनी ‌पोलिसांच्या हातातून निसटून पळ काढला. पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून काहींना पकडले. त्यातील शांतीदूत लोखंडे (वय २०, रा. एसटी वर्कशॉप, पेठ रोड), पुष्पक कैलास शिंगाडे (वय २२, रा. शिवदर्शन अपार्टमेंट, आरटीओ वजनकाट्यामागे, पेठरोड), अक्षय प्रकाश वाघ (वय २०, रा. साईसिध्दी अपार्टमेंट, एसटी वर्कशॉपजवळ, पेठरोड) या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील प्रवीण काकड (रा. आर्यकृष्ण अपार्टमेंट, शिवाजीनगर, म्हसरुळ) हा संशय‌ित फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणांच्या विरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असलेला संशय‌ित हा पोलिसाचा मुलगा असून सदर पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहे.

पंचवटी परिसरात सलग दोन दिवस अशा प्रकारच्या दहशत निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे पंचवटीकरांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. विविध भागात वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांची नागरिकांनी धास्ती घेतली आहे. पंचवटी परिसरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांपुढे आव्हान ठरू लागली आहे.

पोलिसपुत्र फरार कसा?
संशयित प्रवीण काकड यास पोलिसांनी सर्वप्रथम पकडून व्हॅनमध्ये बसविले होते. त्याने पोलिसांशी अरेरावी केल्याने यावेळी त्याला गाडीतच पोलिसांनी जोरदार चोप दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आपण पोलिसाचा मुलगा असल्याचे तो वारंवार सांगत होता. तथापि, त्याला न जुमानता पोलिसांनी त्याची गठडी वळली. असे असताना गाडीत बसवून नेल्यानंतर हा संशयित फरार कसा झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाल्मिकनगरात सापडली हत्यारे

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
पाथरवट लेन येथे वाल्मिकनगरमधील टोळक्याने धुमाकूळ घातल्याच्या घटनेनंतर संशयितांना ताब्यात घेत पोलिसांनी बुधवारी पुन्हा झडती घेतली. यात आठ ते दहा घातक हत्यारे सापडली. धुमाकूळ घालताना या हत्यारांचा सं‌शयितांनी वापर केला होता.
वाल्मिकनगर येथील या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून लाठ्या काठ्या, तलवार, कोयते, चोपर आदींचा वापर करून दहशत माजविण्याचा सोमवारी (दि. १५) रात्री प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (दि. १६) सहा संशयितांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी वापरलेली हत्यारे कुठे लपवून ठेवली त्याची माहिती दिली. पोलिसांनी बुधवारीही वाल्मीकनगर परिसराची झाडाझडती घेतली. कुष्ठरोग्यांच्या दवाखान्याच्या पत्र्याच्या शेडवर ही हत्यारे लपविण्यात आली होती. यात तलवार, कोयते, चोपर, चाकू आदींचा सामवेश होता. याच हत्यारांचा वापर करीत टोळक्याने दहशत माजविली होती. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ, आडगांव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी वाल्मिकनगरची झाडाझडती घेतली.

पोलिस ‘झगड्या’च्या मागावर

दोन गटांतील आपापसातील वादाची सामान्य नागरिकांना झळ पोहचली. या घटनेस जबाबदार असणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक लाटे उर्फ झगड्या याच्या शोधार्थ खास पोलिस पथक तयार करण्यात आले आहे. पोलिस झगड्याचा कसून शोध घेत आहेत. मंगळवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास झगड्या गोदाघाटावर असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस आल्याची चाहूल लागताच झगड्याने तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला; परंतु झगड्या पसार होण्यात यशस्वी झाला.

भाजप नगरसेवकास नोटीस

या प्रकरणी भाजपच्या एका नगरसेवकाने घटनेतील संशयितांना मदत केल्याचे पाथरवट लेनमधील पीडित नागरिकांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी ‘त्या’ लोकप्रतिनिधीची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. संशयितांना मदत करणे आणि त्यांना लपविण्यास सहकार्य करणे, अशा आशयाची नोटीस दिल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. वेळप्रसंगी या प्रकरणातील दोन्ही गटातील मुख्य संशयितांवर ‘मोक्का’न्वये कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

दोन गटांतील हाणामारीत सात जखमी

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
विवाहसोहळा उरकल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा व मद्याच्या बाटल्यांविषयी सोसायटी चेअरमनकडे तक्रार केल्याच्या रागातून जेलरोडवरील पवारवाडीतील भारतभूषणनगर येथे दोन गटांतील हाणामारीत सातजण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
दोन्ही गटांतील प्रक्षुब्ध जमावाने एकमेकांवर दगडफेक केल्याने काही घरांचे नुकसान झाले, तर काहींची डोकी फुटली. या घटनेमुळे भारतभूषणनगरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यातील काही युवकांकडे तलवारीसारखी घातक शस्त्रेही असल्याचे फिर्यादी मंगल वाघचौरे यांनी सांगितले. .
पवारवाडीतील भारतभूषण नगरातील समाजमंदिरात परवा एक विवाहसमारंभ झाला होता. हा विवाहसमारंभ आटोपल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा व मद्याच्या बाटल्या पडून होत्या. या कचऱ्याविषयी स्थानिक नागरिक शशिकांत विठ्ठल वाघचौरे यांनी सोसायटीचे चेअरमन मिलिंद गांगुर्डे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यातून बुधवारी सकाळी वाद झाला. यानंतर सकाळी साडेअकराच्या दरम्यान शशिकांत वाघचौरे यांना त्यांच्या राहत्या घरी मारहाण करण्यात आली. त्यामुळे शशिकांत वाघचौरे व मंगल वाघचौरे यांनी नाशिकरोड पोलिसांत बुधवारी सकाळी तक्रार दाखल केली. हे दोघे पती-पत्नी आपल्याकडील अॅक्ट‌िवा दुचाकीवरुन घराकडे जात असताना भारतभूषण नगरात रस्त्यावर दबा धरुन बसलेल्या तरुणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर काठ्यांनी हल्ला केला. त्यांच्या गाडीचेही नुकसान केले. यावेळी दोन्ही गटाचे समर्थक जमा झाले व तुफान दगडफेक करुन परिसरातील घरांचेही नुकसान केले. या दगडफेकीत सातजण जखमी झाले. यातील काहीजण डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या हाणामारी व दगडफेकीच्या घटनेप्रकरणी दोन्हीही गटांनी परस्परविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मंगल शशिकांत वाघचौरे यांनी बंटी जगताप, नीलेश जगताप, सचिन जगताप व बेबी जगताप यांच्या विरोधात तर बेबी जगताप यांनी शशिकांत वाघचौरे व सुधीर वाघचौरे यांच्याविरोधात मारहाण करुन धमकवल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

बिटको रुग्णालयात तणाव

या हाणामारीत दोन्ही गटांतील शशिकांत विठठल वाघचौरे (५४), मंगल वाघचौरे (४६), निसर्ग माणिक वाघमारे(२७), सुधीर शशिकांत वाघचौरे (२०), विशाल अशोक गांगुर्डे(२२), दिनेश जगताप (३१) व बेबी विनायक जगताप (४७) या जखमींना दुपारी अडीचच्या सुमारास पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन लोकवाणी यांनी उपचार केले. यावेळी दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आल्याने बिटको रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या प्रकाराची नाशिकरोड पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राठोड आपल्या पथकासह बिटको रुग्णालयात पोहचले व दहशत माजविणाऱ्या युवकांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिस पथक बघून बिटको रुग्णालयातील जमावाने पोबारा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध

$
0
0

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांमधून निधी आणून विकासपर्व सुरू केले आहे. राज्यात आलेली विदेशी गुंतवणूक, तसेच नगरविकास विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या शहर विकासाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १७) येथे जाहीर सभेत बोलताना दिली.

येथील पांझरा नदीच्या दोन्ही काठावरील रस्ते, हत्ती डोहाजवळील ब्रीज कम बंधारा, कालिका माता मंदिर ते जयहिंद शाळा रस्त्यावर तळफरशी पूल, पारोळा रोड पोलीस चौकी बांधकाम, हॉकर्स करीता ओट्यांचे बांधकाम या कामांचे लोकार्पण

बुधवारी (दि. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेकरण्यात आले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राच्या माध्यमातून रस्ते आणि रेल्वे विकासासाठी मोठ्याप्रमाणावर निधी मिळाला आहे. त्यातूनही चांगले बदल घडतांना दिसत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘शहरविकासाला आवश्यक मदत देऊ’

धुळे शहराचा विकास करतांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया व घन कचरा व्यवस्थापन या बाबींवर लक्ष केंद्रित करा. यासाठी लागणारा आवश्यक तेवढा सर्व निधी आपण देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शहरात सफारी गार्डनच्या उभारणीसाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल कौतूक करुन त्यासाठी लागणारी सर्व मदत देऊ असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्रातही मोठी प्रगती साध्य केली आहे. गेल्या दोन वर्षांत देशात आलेल्या विदेशी गुंतवणूकीपैकी ५० टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली आहे.

त्यातील काही गुंतवणूक धुळे जिल्ह्यात वळवून या जिल्ह्यातील लोकांना रोजगारासाठी संधी प्राप्त व्हावी यासाठी निश्चित प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अनुप अग्रवाल यांनी केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनिल गोटे यांचीही समयोचित भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन सैय्यद वाहिद अली यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी एकाच छत्राखाली सर्व सोईसुविधा देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे बुधवारी (दि. १७) लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. धुळ्यात येताना काँग्रेसच्या शाम सनेर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर कल्पना महाले, आमदार अनिल गोटे, डी. एस. अहिरे, समाज कल्याण आयुक्त पियुष सिंह आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नूतन इमारतीस भेट देऊन माहिती घेतली. उद्‍घाटन प्रसंगी बोलतांना राज्यमंत्री बडोले यांनी इमारत अतिशय सुंदर आणि सुसज्ज असून मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी विविध विभाग एकाच ठिकाणी आल्याने नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सामाजिक न्याय भवनाची इमारत उभारण्यासाठी ६ कोटी ५५ लाख एवढा खर्च झाला आहे. या इमारतीत विविध महामंडळांची कार्यालये, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे कार्यालय, म्युझियम, वाचनालय, सभागृह, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आदी विविध कार्यालये आणि सुविधा आहेत. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतीर्थ येथे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.


शिवसैनिकांकडून अडवणूक

शिंदखेडा येथील भगवा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याजवळ येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजीनामा कधी घेणार, याबाबत चर्चा करायची असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना तेथेच रोखून ताब्यात घेतले. यामध्ये उपजिल्हाप्रमुख शाना सोनवणे, विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील, नंदकिशोर पाटील, गिरीश पाटील, कपिल सूर्यवंशी, आकाश चौधरी, कल्पेश पाटील यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अधिवेशनातून सरकारविरोधी एल्गार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि राज्य सरकारचे या आत्महत्येकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे शिवसेना आक्रमक झाली असून राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पहिले कृषी अधिवेशन शुक्रवारी (दि. १९) नाशिकमध्ये होणार आहे.

अधिवेशानला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच उपस्थित राहणार असल्याने शिवसेनेने हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेत्यांची बैठक घेत बुधवारी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठीचे अधिवेशन यशस्वी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

देसाई आणि राऊत यांनी बुधवारी पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी संपर्कप्रमुख अजय चौधरी, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह सर्व जिल्हांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने सरकारविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मी कर्जमुक्त होणारचं, गर्जतो शेतकरी’ अशी गर्जना या अधिवेनात शिवसेनेच्या वतीने केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना एक वैचारिक अधिष्ठान लाभावे, यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे विनायकदादा पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

अधिवेशनातून थेट सरकारलाच आव्हान दिले जाणार आहे. या अधिवेशनासाठी शिवसेनेच सर्व मंत्री, खासदार आणि आमदार सहभागी घेणार आहे. त्यामुळे या अधिवेशाच्या तयारीचा आढावाही यावेळ देसाई आणि राऊत यांनी घेतला आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटपही करण्यात आले असून कोणत्याही परिस्थितीत हे अधिवेशन यशस्वी करा, असे आवाहन यावेळी नेत्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनगावच्या जवानाचा उत्तराखंडमध्ये बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

भारतीय सैन्य दलात ७७ बटालियनमध्ये शिपाईपदावर कार्यरत असणाऱ्या सोनगाव (ता. निफाड) येथील मयूर शांताराम पंडित (वय २६) या जवानाचा उत्तराखंडमधील कोसी नदीत बुडून मृत्यू झाला. आज, (दि. १८) मयूरचे पार्थिव सोनगाव येथे आणून त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

उत्तराखंड येथे सैन्य दलाच्या कॅम्पसोबत मयूर सेवेत होता. आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी (दि.१५ मे) दुपारी चौसली गावाजवळ कॅम्पसाठी जागा शोधण्यासाठी तो गेला होता. या दरम्यान जवळच असणाऱ्या कोसी नदीवर तो सहकाऱ्यांसमवेत गेला असता पाय घसरल्याने तो नदीत पडला. त्यावेळी त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पोलिस, एनसीसी व सेनेच्या जवान घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मयूरला बाहेर काढले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

मयूर विवाहित असून, त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दहा महिन्यांचा मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे. त्याचा एक भाऊदेखील भारतीय सैन्य दलात आहे. या दुर्दैवी घटनेने पंडित कुटुंबीयांसह सोनगाव गावावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप, एमआयएमने वाढवली चुरस

$
0
0

काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल पुढे आव्हान

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेसाठी येत्या २४ मे रोजी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असली तरी भाजप व एमआयएम या दोन्ही पक्षांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. मतदार या दोन्ही पक्षांच्या पदरात कितपत यश टाकतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गेल्या निवडणुकीत चर्चेतदेखील नसलेल्या भाजपने पश्चिम भागात शिवसेना, तर पूर्वभागात काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांपुढे आव्हान उभे केले आहे. भाजपकडून सर्वच जागा लढवल्या जातील असा दावा केला जात होता. मात्र मुलाखतीनंतर ७७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. छाननी व माघारीनंतर भाजपचे ५६ शिलेदार रिंगणात आहेत. त्यामुळे उमेदवार देण्यात भाजप दुसरा क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. यात लक्षवेधी बाब म्हणजे मुस्लिमबहुल पूर्वभागात एकूण २९ उमेदवार दिले असून, महिलांची संख्या लक्षणीय आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत मालेगाव विकास आघाडीद्वारे नगरसेवक सुनील गायकवाड यांनी शहरात राजकीय वर्चस्व निर्माण केले होते. मात्र ते भाजपवासी झाल्याने पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अद्वय हिरे यांच्या नेतृत्वात भाजपला घवघवीत यश मिळाल्याने पक्षाचा उत्साह दुणावला आहे. शहरातदेखील आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. अर्थात गेल्याकाही दिवसांपूर्वी भाजपचा गृहकलह चव्हाट्यावर आला होता. तसेच, बंडखोरी झाल्याने याचा फटका पक्षाला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. असे असले तरी मुस्लिमबहुल पूर्वभागात पक्षाला किती यश मिळते याकडे लक्ष लागले आहे. तिकडे हिंदूबहुल पश्चिम भागात सेना-भाजप अशी थेट लढत असून, निवडणुकीच्या तोंडावर सेनेतील अनेक मातब्बरांना उमेदवारी देऊन सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला आहे. सेनेकडून मात्र पक्षाची ताकद असलेल्या प्रभागातूनच उमेदवार देण्यात आले असल्याने २६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे सेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व भाजपचे अद्वय हिरे असा पारंपरिक राजकीय संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

एमआयएमचे आव्हान

भाजपसोबतच पूर्वभागात ३५ जागांवर आपले उमेदवार देऊन एमआयएमने प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल या पक्षांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. मागील निवडणुकीत शहर विकास आघाडी स्थापन करून उपमहापौर युनूस इसा व माजी महापौर नगरसेवक अब्दुल मलिक इसा यांनी पालिकेच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावली होती. कालांतराने या पिता-पुत्रांनी एमआयएमचा झेंडा हाती घेतल्याने पक्षाला आयतीच ताकद मिळाली आहे. एमआयएममुळे काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख व विद्यमान आमदार आसिफ शेख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अर्थात एमआयएमने उमेदवार देतांना घराणेशाहीलाच प्राधान्य दिले असून, युनूस इसा यांच्या कुटुंबातीलच सहा सदस्य निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापूर रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक

$
0
0

गोदाप्रेमी समितीचे जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीच्या महापुराची तीव्रता शहरात कमी करण्यासाठी गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने उपाययोजना सुचविल्या असून युद्धपातळीवर त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी जलसंपदा मंत्री गिरीश्‍ा महाजन यांच्याकडे केली आहे.

गतवर्षी २ ऑगस्ट रोजी गोदावरी नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे गोदाकाठच्या परिसरातील रहिवाशांना संकटाचा सामना करावा लागला. पुढील महिनाभरात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असून पूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. अशा उपाययोजना सूचविण्यासाठी जानी तसेच आमदार बाळासाहेब सानप यांसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाजन यांची मुंबईत नुकतीच भेट घेतली.

पूर परिस्थितीत गंगापूर धरणातून ४२ हजार ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात आला. परंतु, अहिल्यादेवी होळकर पुलाखालून अंदाजे ७५ हजार क्युसेस पाण्याच्या विसर्ग सुरू होता. अंदाजे ३२ हजार ५०० क्युसेस अतिरिक्त पाणी नदीतून वाहात होते. शहरातील तुंबलेल्या गटारींचे पाणी त्यामध्ये मिसळत होते, असा दावा जानी यांनी केला आहे. महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच काही तातडीच्या उपाययोजना युद्धपातळीवर करणे आवश्यक असल्याचे निवेदनातून सूचविण्यात आले आहे.

गोदावरीचे पात्र लोवेस्ट पॉईंटला (नीचांक बिंदू) आहे. त्यामुळे शहरातील पावसाळी पाणी, नैसर्गिक नाल्याचे पाणी, पावसाळी गटाराचे पाणी उतारावरून थेट नदीपात्रात येते. परिणामी पुराची तीव्रता वाढते. शहरी पावसाळी पाण्याचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून शोष खड्डे तयार केल्यास वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविता येईल. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. याकामी गोदाप्रेमी संस्था व नदी तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता बस्ते विनामोबदला काम करण्यास तयार आहेत. निवेदन प्राप्त झाल्यानंतर महाजन यांनी ‘ओएसडी’ यांना याबाबत अभ्यास करण्याचे आदेश दिले. सदर प्रसंगी देवांग जानी, आमदार बाळासाहेब सानप, कविता कर्डक, मधुबाला भोरे, पद्ममाकर पाटील, कल्पना पांडे, सचिन डोंगरे, बाळासाहेब राऊत, अतुल शेवाळे, किशोर गरड उपस्थित होते.

गाळमुक्त करा धरण

मेरी संस्थेच्या २००२ च्या अहवालानुसार गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला होता. गेल्या १५ वर्षांत तो अधिकच वाढला आहे. साचलेल्या गाळाचे प्रमाण पहाता गतवर्षी काढलेल्या गाळाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार उपक्रमांतर्गत गंगापूर धरणातील गाळ युद्धपातळीवर काढल्यास धरणाच्या जल साठवणूक क्षमतेत वृद्धी होऊन महापुराची तीव्रता कमी होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पाणी साठवण क्षमता वाढवा

अहिल्यादेवी होळकर पूल ते आनंदवल्लीपर्यंतच्या गोदापात्रात अनेक वर्षांपासून गाळ साचून पाणी साठवण क्षमता खाली गेली आहे. हा गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता वाढेल. ग्राउंड वॉटर रिचार्ज प्रक्रियेला चालना मिळून नदी जवळच्या परिसरातील भूजल पातळी वाढेल. नदीपात्रातून रस्त्यावर आणि रस्त्यावरून नागरिकांच्या घरात जाणाऱ्या पाण्याची मात्रा कमी होण्यास मदत होईल, असे मत निवेदनात मांडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जानेवारीपर्यंत धुळे जिल्हा हागणदारीमुक्त करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या २६ जानेवारी २०१८ पर्यंत धुळे जिल्हा हागणदारी मुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिंदखेडा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोहयो मंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, नरेगांतर्गत विहिरी या योजना महत्त्वाकांक्षी योजना असून, त्यावर अधिक भर देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्याने येत्या २६ जानेवारी २०१८ पर्यंत ग्रामीण आणि नागरी भागात शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट साध्य केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात ‘डिजिटल शाळा’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दलही त्यांनी अभिनंदन केले. राज्यात ४० हजार शाळा ‘डिजिटल’ झाल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ग्राम सडक योजनेच्या कामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याचे तसेच कामांचा दर्जा उत्तम राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. सुरवाडे-जांबफळ प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील दोन-तीन तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो, याकरिता केंद्राकडे निधीची मागणी करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

साळवेला विकासकामांची पाहणी

मुख्यमंत्र्यांनी साळवे येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन तेथील डिजिटल शाळा उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्थी रोहिदास वाघ आणि सिताबाई वाघ यांच्या घरांना भेट देऊन संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जलयुक्त शिवार अभियानातील नाला खोलीकरण कामाची पाहणी केली. तसेच साळवे-शिंदखेडा मार्गावरील दरखेडा येथील रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेसही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन लाभार्थी नटराज भटा पाटील यांच्याशी संवाद साधला आणि पिकाची माहिती घेतली.

नंदुरबारला पारंपरिकतेने स्वागत

फडणवीस यांनी अमृत पाडवी यांच्या घराला भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी पाडवी कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने तीरकमान आणि शिबली (फुलांचा गुच्छ असलेली टोपली) देऊन स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदिवासींच्या पारंपरिक नृत्याने स्वागत करण्यात आले. याचबरोबरच मुख्यमंत्र्यांचे हस्ते डोंगरी विकास योजनेंतर्गत मोलगी येथे बांधण्यात आलेल्या सभागृहाचेही उद्घाटन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भगदरी ते चिकपाणी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

मार्च २०१८ अखेर पाड्यांचे विद्युतीकरण

सातपुड्यातील सर्वच महसूल गाव व पाड्यांचे विद्युतीकरण मार्च २०१८ अखेर करण्यात येणार आहे. प्रसंगी त्यासाठी मध्यप्रदेशातून वीज विकत घेतली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘मॉडेल गाव’ भगदरी येथे विविध विकासकामांची पाहणी केल्यानंतर मोलगी येथे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या टाकीचे राजकारण

$
0
0

एकीकडे भांडण, दुसरीकडे टाकीलाच विरोध; नागरिकांची कोंडी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेत शहरवासीयांनी मुबलक पाणी देण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. परंतु, सातपूर कॉलनीत मंजूर पाण्याच्या टाकीवरील राजकारणावर पडदा कोण टाकणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे सातपूर भागात आजही पिण्याच्या पाण्यासाठी भांडण होतात तर दुसरीकडे मंजूर असलेल्या पाण्याच्या टाकीलाच विरोध होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे ज्या सातपूर गावाच्या जागेवर सातपूरला लोकवस्ती वसली आहे, त्याच गावातील मळे परिसरात रोजच टँकरने पाणी पुरवठा होत असतो.

सातपूर कॉलनीच्या आठ हजार वस्तीत शिवनेरी उद्यान उभारण्यात येत असलेल्या वीस लक्ष लिटरच्या पाण्याच्या टाकीला विरोध होत असल्याने टाकी बांधावी कुठे, असाही प्रश्न महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासमोर उभा राहिला आहे. नगरसेवकांमध्येच एकमत होत नसल्याने केवळ राजकारण म्हणून विरोध केला जात असल्याचा आरोप नगरसेवक सलिम शेख यांनी केला आहे.

कामगारवस्ती असलेल्या सातपूर कॉलनीत म्हाडाने कमी पैशांत कामगारांसाठी तब्बल तीन हजार घरकुले उभारली आहेत. कालांतराने लहान असलेल्या घरकुलांचे रुपांतर मोठ्या घरांमध्ये झाले आहेत. त्यातच ज्याला वाटेल त्याप्रमाणे घरांचे बांधकामेही करण्यात आली आहेत. यामुळे सहाजिक वाढलेल्या घरांमुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा रहिवाशांना सहन करावा लागत आहे. यासाठी नगरसेवक शेख यांनी वीस लक्ष लिटर पाण्याची टाकी मंजूर केली होती. ही मंजूर पाण्याची टाकी मध्यभागी करून शिवनेरी उद्यानात पाण्याची टाकीचे कामही सुरू करण्यात आले. मात्र अचानक दुसऱ्या नगरसेवकाने काही रहिवाशांना हाताशी धरत पाण्याच्या टाकीचे काम बंद केल्याचा आरोप नगरसेवक शेख यांनी ‘मटा’शी बोलताना केला.

दरम्यान, वाढलेली लोकवस्ती पहाता पाण्याची टाकी होणे अंत्यत गरजेचे आहे. यात केवळ राजकारण होत असल्याने पाण्याच्या टाकीला विलंब होत आहे. सातपूर गावातील मळे परिसरात आजही टँकरने पाणीपुरवठा केला असताना पाण्याच्या टाकीला विरोध कशासाठी, असा सवाल सुज्ञ रहिवाशांनी उपस्थित केला आहे. तरी, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच यात लक्ष घालत पाण्याच्या टाकीचे काम सुरू करावे, अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.

बंद कारंज्याच्या जागेवर टाकी

सातपूर कॉलनीतील शिवनेरी उद्यानातील बंद असलेल्या कारंज्याच्या जागेवर पाण्याची टाकीचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, काही ठराविक रहिवाशांच्या विरोधामुळे हे काम बंद झाले आहे. कारंज्याच्या जागेवर टाकी होणार असल्याने उद्यानाला त्याचा कुठलाच त्रास होणार नसल्याने विरोध करणे चुकीचे असल्याचेही नगरसेवक शेख यांनी सांगितले.

सातपूर कॉलनीत पाण्याची टाकी मंजूर करून काम सुरूही करण्यात आले होते. परंतु, काही जणांनी पाण्याच्या टाकी उभारण्यावरच राजकारण केल्याने काम बंद पाडले आहे. यामुळे भविष्यात सातपूर कॉलनीतील रहिवाशांना पाण्यासाठी भांडण करण्याची वेळ येणार आहे.

-सलिम शेख, नगरसेवक प्रभाग ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून सातपुड्यातील कुपोषणावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आमदार डॉ. विजयकुमार गावित, के. सी. पाडवी, उदेसिंग पाडवी, चंद्रकांत रघुवंशी, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे आदी उपस्थित होते.

पोषण पुनर्वसन केंद्रांत (एनआरसी) कुपोषित बालकांवर पंधरा दिवस उपचार केल्यानंतर बाळाच्या औषधोपचारावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम विकसित करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पोषण आहार योजनेंतर्गत गरोदर माता व स्तनदा मातांना आहार वेळेत पोहोचेल यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. नंदुरबार जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियानात चांगले काम झाले असून, ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत उद्दिष्टांपेक्षा जास्त काम केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर अजूनही शेततळ्यांसाठी शेतकऱ्यांची मागणी असल्याने त्यानुसार जेथे जागा उपलब्ध असेल, तेथे शेततळ्यांना मंजुरी देण्यात यावी. त्यासाठी लागणारा वाढीव निधी शासन तत्काळ उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर जिल्ह्यात अटल सोलर कृषीपंपाचे उद्दिष्ट दोनशेपर्यंत वाढवून त्यासाठीदेखील निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न करावे

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात शौचालयांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती हागणदारीमुक्त कराव्यात. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) धडगाव नगरपंचायत लवकरात लवकरच हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी अक्कलकुवा, धडगाव या तालुक्यात उत्पादित होणाऱ्या आंब्यावर प्रक्रिया करून आमचुराचा ब्रँड तयार करण्यात यावा. जेणेकरून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा तालुकानिहाय व योजनानिहाय आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको हॉस्पिटलचे काम जोरात

$
0
0

सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सुरुवातीपासूनच विविध अडथळ्यांची शर्यत पार कराव्या लागलेल्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी बिटको हॉस्पिटलची भव्य वास्तू अखेरीस आकाराला आली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हे बहुप्रतीक्षित रुग्णालय नागरिकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. दोन बेसमेंट व ग्राऊंड फ्लोअरशिवाय तीन मजले असलेल्या या सुसज्ज अशा हॉस्पिटलसाठी सुमारे ५५ कोटी रुपये खर्च आला असून नागरिकांना याठिकाणी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

मुंबईच्या पटेल इंजिनीअरिंग प्रा. लि. या कंपनीने या रुग्णालयाची वास्तू उभारली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या तीन महिन्यांत उर्वरित कामही पूर्ण होणार असल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापकीय तंत्रज्ञांनी दिली. सध्या आयसीयू, प्लंबिंग, फायर सेफ्टी, रंगकाम अशी कामे झालेली आहेत. तर लँड स्केपिंग, रस्ते, प्रवेशद्वार ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामासाठी १० तंत्रज्ञ व १५० कामगार मेहनत घेत आहेत.

सिंहस्थाचा मुहूर्त हुकला

रुग्णालयाचे काम गेल्या वर्षीच्या सिंहस्थापूर्वी पूर्ण होऊन हे रुग्णालय भाविकांसाठी खुले होणे आवश्यक होते. मात्र कामाला अडथळ्यांचे ग्रहण लागल्याने रुग्णालय सिंहस्थ उलटून वर्षभरापेक्षा मोठा कालावधी उलटला तरी पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचा मुहूर्त हुकला होता. या रुग्णालयाच्या जागेवर सुमारे १०० मोठी झाडे होती. त्यांचा अडथळा लवकर दूर झाला नव्हता. शिवाय जुन्या इमारती, सार्वजनिक स्वच्छतागृहे, व्यायामशाळा इमारत आदी अडथळे निर्माण झाले होते. त्यातच वर्षभराचा कालावधी गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा विधिमंडळावर धडक मोर्चा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने आता भाजप विरोधात थेट दोन हात करण्यासह आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारविरोधात थेट नाशिकमधून रणशिंग फुंकले जाणार आहे. इशारे आणि आव्हान देवूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे ऐकत नसल्याने शेतकरी कर्जमुक्तीसाठी जुलैमध्ये विधिमंडळावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेच्यावतीने १९ मे रोजी कृषी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या आढाव्यासाठी देसाई आणि राऊत नाशिकमध्ये आले होते. या कृषी अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधिवेशनाची भूमिका स्पष्ट करताना देसाई म्हणाले, की शेतक-यांना गेल्या दोन वर्षांपासूनचे पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही. शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचलेला नाही. तुरीचा विषय गंभीर झाला आहे. त्यामुळे तुरीच्या विषयासंदर्भात शिवसेनेने दक्षता पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, या पथकांमार्फत या तक्रारींची चौकशी केली जाईल आणि याप्रश्‍नी सरकारला जाब विचारला जाईल. यापूर्वीही शिवसेनेने शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नावर आंदोलन

छेडले आहे. आता शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने सरकारविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसा योजनेसाठी निधी देणार

$
0
0

शिंदखेड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यासाठी फलदायी ठरणारी सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करणार, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या योजनेसंदर्भात केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याशी राज्य सरकारमार्फत चर्चा करण्याचे सांगून या योजनेसाठी केंद्राकडून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचेही सूतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. याबाबत पाठपुरावा करून तातडीने योजनेचे काम कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करणार, असेही आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिले.

जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात बुधवारी (दि. १७) दुपारी ३ वाजता जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख आदी उपस्थित होते. या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, पंतप्रधान आवास योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, तूर खरेदी, स्वच्छता अभियान, पीक कर्ज आदी विषयांचा आढावा घेतला.

जिल्ह्यासाठी महत्त्वाची योजना

या बैठकीत लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने यांनी उपसा सिंचन योजनांची माहिती दिली. जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रकाशा-बुराई व सुलवाडे-जामफळ उपसा योजना या महत्त्वाकांक्षी असल्याचे सांगत या योजनांसाठी सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्याने त्या रखडल्या आहेत. सुलवाडे-जामफळ योजनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, असे सांगितले. डॉ. भामरे यांनी मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरल्यास ही उपसा योजना मार्गी लागू शकते. या योजनेसाठी राज्य सरकारने ५० टक्के निधी वळविल्यास ती मार्गी लागू शकते, असे सूचित केले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

पीपीटीद्वारे सादरीकरण

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीत डॉक्यूमेंटरीच्या साहाय्याने अवर्षणग्रस्त शिंदखेडा तालुक्याची स्थिती मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देण्यात आली. या डॉक्यूमेंटरीत शिंदखेड्याचे पर्जन्यमान नद्यांची स्थिती, बुराई बारमाही योजना, सुलवाडे जामफळ योजना या संदर्भातील माहिती दाखविण्यात आली.

मुख्यमंत्री हा कोणत्याही पक्षाचा नसतो. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धुळे नगरीत त्यांचे स्वागतच आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी जाहीर केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी महापौर मोहन नवले, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, बाळू आगलावे, नवाब बेग, गुशलन उदासी, गणेश जाधव, संजय वाल्हे, वाल्मिक जाधव, राजकुमार बोरसे, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


राष्ट्रवादीचे आंदोलन मागे; पोलिसांचे आश्वासन

गेल्या पंधरा दिवसांपासून राष्ट्रवादी आणि आमदार अनिल गोटे यांच्यातील वादाला बुधवारी (दि. १७) पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत संबंधितांना व्यासपीठावर थारा नसेलच, असे स्पष्ट आश्वासन पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर राष्ट्रवादीने सभा उधळण्याचे आंदोलन स्थगित केले आहे. तसेच गद्दारासह संबंधितांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील जिल्हा पोलिसप्रमुख एम. रामकुमार यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी राष्ट्रवादीकडून मनोहर टॉकीजजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शिवरायांच्या जयघोषाच्या घोषणा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदास्वच्छतेसाठी पूर्णवेळ सफाई कर्मचारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीत अस्वच्छता करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी महापालिकेने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केल्यानंतर आता नदीच्या स्वच्छतेसाठी पूर्णवेळ सफाई कर्मचारी देण्याची तयारी सुरू केली आहे. गोदावरीच्या दोन्ही बाजूंकडील १९ किलोमीटरच्या स्वच्छतेसाठी ६० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. गोदावरी संवर्धन कक्षाच्याअंतर्गत हे सफाई कर्मचारी तैनात राहणार आहे. सोबतच एक विभागीय स्वच्छता निरीक्षक आणि दोन स्वच्छता निरीक्षकांचीही स्वच्छतेवर निगराणी राहणार आहे. काही दिवसांनंतर स्वच्छतेसाठी दोन पाळ्यांत कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
हायकोर्टाने गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात फटकारल्यानंतर महापालिकेने गोदास्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. गोदावरीची स्वच्छता आणि देखरेखीसाठी पालिकेत स्वतंत्र गोदावरी संवर्धन कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ गोदावरी नदीत प्रदूषण करणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाईसाठी ४० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तरीही गोदावरीच्या अस्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. गोदावरीच्या आसपासचा परिसर स्वच्छतेसाठी नियुक्त केलेले सफाई कर्मचारीही स्वच्छतेवर लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. महापौर रंजना भानसी यांनी केलेल्या पाहणीत ३४ पैकी १८ सफाई कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आता गोदावरीच्या स्वच्छतेसाठीच पूर्णवेळ सफाई कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ६० कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. नाशिक शहरातून तब्बल साडेआठ किलोमीटर नदीचा प्रवाह आहे. त्यामुळे दोन्ही काठांवर मिळून ६० कर्मचारी नियुक्त राहणार असून, नदीकाठापासून ५० मीटरच्या परिसरात स्वच्छतेची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र विभागीय स्वच्छता निरीक्षकासह दोन स्वच्छता निरीक्षकही नियुक्त करण्यात येणार आहे. गोदावरी संवर्धन कक्षाअंतर्गत हे कर्मचारी काम करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात आणखी ५० असे जवळपास ११० सफाई कर्मचारी नियुक्त केले जाणार असून, ते दोन पाळीत काम करणार आहेत. त्यामुळे नदीकाठावरील अस्वच्छताही दूर होण्यास मदत होणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कश्यपी धरणग्रस्तांच्या नोकऱ्या धोक्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कश्यपी धरणातील प्रकल्पबाधितांना आता महापालिकेच्या सेवेत समावून घेण्यास थेट राज्य सरकारनेच नकार दिला आहे. तसेच महापालिकेत भरती झालेल्या ६० पैकी २४ प्रकल्पबाधितांची नोकरीही धोक्यात आली आहे. महापालिकेने भरती करून घेतलेल्या २४ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन केली असून, या समितीला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कश्यपी धरणग्रस्तांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.

कश्यपी धरणामुळे विस्थापित झालेल्या ६० कुटुंबियांना महापालिकेच्या सेवेत समावून घेण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळेस ६० पैकी २४ प्रकल्पबाधितांना सेवेत समावून घेण्यात आले. परंतु, उर्वरित ३६ लोकांना अद्याप सेवेत समावून घेतलेले नाही. कश्यपी धरण आता जलसंपदाकडे हस्तांतरीत झाले असल्याने पालिकेने या सर्वांना नोकरी नाकारली आहे. त्यामुळे या प्रकल्पबाधितांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून, नोकरीत समावून घेण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. या प्रकल्पबाधितांच्या संदर्भात मुंबईत सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात सन २००९ पासून शासनाने सरळसेवेने भरती बंद केल्याने उर्वरित लोकांना घेता येणार नसल्याचा निर्वाळा समितीने दिला. जलसंपदा विभागाकडे यासंदर्भातील माहिती मागवण्यात आली. परंतु, जलसंपदाकडे माहिती उपलब्ध नसल्याने या समितीने उपसमिती नियुक्त करून या कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा हे या उसमितीचे अध्यक्ष राहणार असून जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता या समितीचे सदस्य राहणार आहे.या कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी झाली याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सायबर हल्ला आणि आपण’ या विषयावर उद्या ‘मटा संवाद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

गेल्या आठवड्यात जगभरात झालेल्या ‘वॉनाक्राय’ या रॅम्सवेअर व्हायरसच्या हल्ल्याने चांगलाच गोंधळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर अशा आधुनिक प्रकारच्या हल्ल्यांपासून समाज सुरक्षित रहावा, यासाठी ‘सायबर हल्ला आणि आपण’ या विषयावर ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या वतीने शुक्रवार दि. १९ रोजी ‘मटा संवाद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डननजीक राका कॉलनीतील वैराज कलादालन येथे सायंकाळी ६ वाजता आयटी तज्ज्ञ व इएसडीएस या जगविख्यात सॉफ्टवेअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
व्हेन्यू पार्टनर म्हणून आर्किटेक्चर्स आणि इंजिनीअर्स असोसिएशन यांचाही या उपक्रमाच्या आयोजनात सहभाग आहे.

कॉम्प्युटरशिवाय दैनंदिन जीवन जगणे हे एकविसाव्या शतकात जगणाऱ्या प्रत्येक नागरीकासाठी कल्पनेतली बाब होऊन बसली आहे. मानवाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा डाटा या ऑनलाइन यंत्रणेत सध्या प्रविष्ट आहे. वैयक्तिक जीवनापासून तर शासकीय नोंदींपर्यंत हा डाटा कॉम्प्युटरमध्ये समाविष्ट आहे. हे हेरून सायबर हल्लेखोरांनी जगभरातील विविध देशांना वेठीस धरले आहे. यास भारतासारखा देश अन् महाराष्ट्रासारखे राज्यही अपवाद राह‌िलेले नाही. रॅम्सवेअर व्हायरसने कल्याण महापालिकेसारख्या नाशिकनजीकच्या संस्थांनाही लक्ष्य केल्याच्या घटना पुढे आल्या. तर, या कालावधीत एटीएममधून पैसे काढणे किंवा कुठलाही ऑनलाइन व्यवहार करणे कसे धोकादायक आहे, असे सांगणारे अनेक संदेशही सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने नाशिककरही गोंधळात आहेत.

सायबर हल्ला म्हणजे नेमके काय, हे हल्लेखोर कसे अन् कशासाठी काम करतात, याचे लक्ष्य कोण ठरू शकते, यापासून बचावासाठी आपण काय काळजी घ्यावी, अशा सायबर हल्ल्यांशी निगडीत अनेक प्रश्नांची उत्तरे ‘मटा संवाद’च्या व्यासपीठावर आयटी उद्योजक पीयूष सोमाणी हे देणार आहेत.
अनेकदा आपल्या कामाची महत्त्वाची माहिती ज्या सॉफ्टवेअरच्या भरवशावर आहे ती अद्ययावत न करणे, माहितीच्या रक्षणासाठी आवश्यक असे अँटि-व्हायरस न वापरणे, दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती हे मानवी स्वभावातील दोषही या ई-दरोडेखोरांनी नेमके हेरले आहेत. यासारख्या महत्वाच्या बाबींवरही या उपक्रमातून प्रकाशझोत टाकला जाणार आहे.

कॉम्प्युटरशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक नागरीकासह आयटी विषयाचे विद्यार्थी, या क्षेत्रातील व्यावसायिक, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन अधिक सजग बनावे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावला पुन्हा शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

जातेगाव येथील तुकाराम रंगनाथ सोनवणे (वय ४९) यांनी ट्रॅक्टर व शेत तळ्यासाठी काढलेले कर्ज फेडता न आल्याने निराश होऊन मंगळवारी विद्युत प्रवाहाची तार हातात धरून आपली जीवनयात्रा संपवली.

तुकाराम सोनवणे हे कर्जाच्या ओझ्याने अस्वस्थ होते. त्यांच्या व परिवारातील सदस्यांच्या नावावर ट्रँक्टरचे एचडीएफसी बँक, जातेगाव विविध कार्यकारी सोसायटी, तसेच बँक ऑफ इंडियाचे कर्ज व शेततळ्यासाठी घेतलेले खासगी कर्ज असे सुमारे बारा लाख रुपये कर्ज असल्याचे सांगितले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैवविविधता समितीची भर

$
0
0

महासभेत आज प्रस्ताव; १४ सदस्यांची नियुक्ती केली जाणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरण समतोलासाठी केंद्र शासनाच्या कायद्यानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने जैव विविधता व्यवस्थापन समितीचे गठन केले जाणार आहे. गुरूवारी (दि. १८) होत असलेल्या महासभेत जादा विषयात या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने सादर केला जाणार आहे. या समितीत एकूण १४ सदस्य नियुक्त केले जाणार असून त्यात नगरसेवकांसह वनस्पतीतज्ज्ञ, पक्षीतज्ज्ञ, प्राणीतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ, जैव विविधता तज्ज्ञ आदी सात तज्ज्ञ सदस्यांचाही समावेश असणार आहे.

केंद्र शासनाच्या जैव विविधता कायद्यानुसार महापालिका स्तरावरील जैव विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. जैव विविधता कायद्यान्वये १४ सदस्यीय व्यवस्थापन समिती स्थापन करणे गरजेचे आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवकांमधून सहा सदस्य निवडले जाणार असून, एक सदस्य प्रशासकीय अधिकारी असणार आहे. नगरसेवकांच्या सहा जागांमध्ये दोन जागा महिलांसाठी, तर दोन जागा एससी-एसटी सदस्यांकरीता आरक्षित असून, मनपाच्या कायम आस्थापनेवरील एक प्रशासकीय अधिकारी सदस्यपदी नियुक्त केला जाईल. या समितीवर शहरातील आठ आमदार, एक खासदार निमंत्रित सदस्य म्हणूनही नियुक्त केले जाणार आहेत. या समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असणार आहे. यासाठी नगरसेवकांमधून सदस्य नियुक्तीसाठी प्रशासनाच्या वतीने उद्या(दि.१८) होत असलेल्या महासभेवर जादा विषयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यायामशाळा इमारतीत अभ्यासिकेची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेने सहा वर्षांपूर्वी चेहेडी पंपींग येथे बांधलेली व्यायामशाळेची इमारत धूळ खात पडून आहे. या इमारतीत वापर अभ्यासिका सुरू करावी, अशी युवावर्गाकडून मागणी करण्यात आली आहे.

चेहेडी पंपींग परिसरात लोकसंख्या वाढली आहे. नवीन इमारती येथे उभारल्या जात आहेत. येथे महापालिकेने बांधलेली वास्तू सहा वर्षांपासून विनावापर आहे. तक्रार करूनदेखील पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याची नागरिकांची तक्रार आहे. याची दखल घेत सहा महिन्यांपूर्वी आयुक्तांनी या वास्तूची पाहणी केली. परंतु, याबाबत आजपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ही वास्तू अभ्यासिका म्हणून घोषित करून सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

निधीचा अपव्यय

सहा वर्षांपूर्वी व्यायामशाळा म्हणून ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत त्यात व्यायाम साहित्य नाही. नवीन नगरसेवक आल्यानंतर नागरिकांनी त्यांना भेटून व्यायामशाळेऐवजी अभ्यासिका सुरू करण्याची विनंती केली. तरीही, उपयोग झालेला नाही. आयुक्तांनी भेट दिली तेव्हा अभ्यासिका सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, तेही हवेत विरले आहे. त्यामुळे या इमारतीसाठी खर्च निधी वाया जाण्याची भीती आहे. इमारतीशेजारीच स्वच्छतागृहाचा वापर मात्र सुरू आहे.

चावी कोणाकडे

या इमारतीची पाहणी करण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या नाशिकरोड कार्यालयात चावीची मागणी केली. तेव्हा त्यांनी चावी आपल्याकडे नसून, नगरसेवकाकडे असल्याचे सांगितले. नगरसेवकांना भेटल्यावर त्यांनी चावी आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे इमारत कोणाच्या ताब्यात आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अभ्यासासाठी येथील विद्यार्थी अटल ज्ञान संकुल व अन्यत्र जातात. त्यामुळे व्यायामशाळेत अभ्यासिका सुरू केली तर त्यांना उपयोग होईल. जाण्यायेण्याचा वेळ व त्रास वाचेल.

प्रसाद घुमरे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images