Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कचऱ्याची ऑनलाइन नोंद!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खत प्रकल्पावर आणल्या जाणाऱ्या घंटागाड्यांतील कचऱ्याच्या वजनावरून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आता चाप बसणार आहे. प्रशासनाने येत्या १ जूनपासून घंटागाड्यांद्वारे खत प्रकल्पावर वाहून आणण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या वजनाची आता ऑनलाइन नोंद घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली. कोणत्या प्रभागातून दिवसभरात किती कचरा आला, याचीही थेट माहिती महापालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कचऱ्यातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.

स्थायी समितीचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी अनियमित घंटागाड्यांकडे लक्ष वेधत आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रभागातील केरकचरा संकलनासाठी ६ घंटागाड्या नियुक्त असल्या, तरी गाड्या दिसतच नसल्याचा आरोप तिदमे यांनी केला. त्यावर आयुक्त कृष्णा यांनी खुलासा करताना सांगितले, की सर्व घंटागाड्यांवर जीपीआरएस यंत्रणा बसविण्यात आल्याने कोणती घंटागाडी प्रभागात कुठे फिरत आहे, हे आरोग्याधिकाऱ्यांच्या दालनातील नियंत्रण कक्षात प्रत्येक नगरसेवकाला पाहता येणे शक्य आहे. परिणामी घंटागाड्यांच्या संख्येच्या बाबतीत घोटाळा करता येणे आता शक्य नाही. त्यामुळे त्यांनी हा आरोप फेटाळून लावला.

शहरातून संकलित केला जाणारा केरकचरा घंटागाडीद्वारे वाहून नेण्यात आल्यानंतर तेथे अत्याधुनिक वजनकाट्यावर त्याची नोंद घेतली जाते. हा वजनकाटा संगणकीय उपकरणांशी जोडलेला असल्यामुळे कोणत्या प्रभागातील कोणत्या क्रमाकांच्या घंटागाडीने किती कचरा वाहून आणला याची नोंद आता येत्या १ जूनपासून महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागाच्या संगणकावर ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याच्या वजनात भ्रष्टाचार होणे आता अशक्य असल्याचेही आयुक्त कृष्णा यांनी स्पष्ट केले. सोबतच नोंद लगेच होणार असल्याने कचरा वजनात फेरफार करता येणार नाही. त्यामुळे ठेकेदाराचे वेतन देणेही सोपे होणार आहे.

--

ठेकेदारांचं चांगभलं थांबणार!

मानवी हस्तक्षेपामुळे कचऱ्याच्या वजनात भ्रष्टाचार करून ठेकेदारांचे चांगभले करण्याचा डाव काही अधिकाऱ्यांकडून खेळला जात असल्याचा प्रकार मुख्य लेखापरीक्षकांच्या लक्षात आला होता. ही बाब त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कचऱ्याची ऑनलाइन नोंद घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेला जूनचा अल्ट‌िमेटम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक कोंडीत सापडेल्या जिल्हा बँकेची कोंडी आता जिल्हा परिषदेनेही केली आहे. जिल्हा परिषदेची सर्व खाती जिल्हा बँकेत आहेत. पंरतु, गेल्या मह‌िनाभरापासून जिल्हा परिषदेचे चेक बँकेत वटत नसल्यामुळे जिल्हा परिषदेची अडचण वाढली आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसह संचालकांना पाचारण केले होते. त्यात जिल्हा बँकेचे चेक वटण्यासाठी जूनचा अल्ट‌िमेटम देण्यात आला आहे.

जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती बिकट असून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होत नाही. तर नोकरदारांचेही पगार थकले आहेत. जिल्हा परिषदेचे खातेही आता अडचणीत सापडले आहे. गेल्या मह‌िनाभरापासून जिल्हा परिषदेचे सर्व चेक बाऊन्स होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची अडचण वाढली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दराडे यांच्यासह संचालकांना पाचारण केले होते. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेने जिल्हा परिषदेचे चेक तातडीने वटावेत अशी व्यवस्था करावी असे आदेश दिलेत. जूनपर्यंत हा सगळा प्रश्न मार्गी लावावा असे त्यांनी जिल्हा बँकेला फर्मावले आहे.

सोसायट्यांचे आंदोलन

जिल्हा बँकेला कर्जपरतफेड करूनही नव्या खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेने अद्याप नव्याने कर्जवाटप केलेले नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी थेट विविध सहकारी सोसायट्यांच्या अध्यक्षांवर दबाव आणला आहे. सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सदस्यांनी सोमवारी जिल्हा बँकेबाहेर आंदोलन करत, कर्जपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तातडीने कर्जपुरवठा केला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

दोन दिवसांत वेतनकोंडी सोडवा

सिन्नर फाटाः हक्काच्या पगाराचे पैसेही जिल्हा मध्यवर्ती बँकेतून मिळत नसल्याने रडकुंडीस आलेल्या शिक्षकांनी सोमवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करुन जिल्हा बँकेतील वेतन कोंडी सोडविण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांना येत्या दोन दिवसांचा अल्ट‌िमेटम दिला. दोन दिवसांत वेतनकोंडी न सोडविल्यास मुंबईत आझाद मैदानावर शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सोमवारी विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना दिला.

गेल्या चार महिन्यांपासून शिक्षकांना जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील वेतनाच्या खात्यावरुन वेतनाचे पैसे काढणे मुश्किल झाले आहे. याशिवाय या बँकेचे चेकही इतर बँकांकडून स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. परिणामी शिक्षकवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. खात्यावर पुरेसे पैसे असूनही केवळ जिल्हा बँक अडचणीत आली असल्याचा फटका शिक्षकांनाही सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून शिक्षकांचे वेतन राष्ट्र‌ियीकृत बँकेत करण्याची मागणी सर्वच शिक्षक संघटनांनी केली होती. मात्र, अद्याप ती मागणी मान्य झालेली नसल्याचे यावेळी उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनी शिक्षण उपसंचालकांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शिक्षण संचालक, शिक्षण सचिव यांच्याशी दूरध्वनीद्वारे ताबडतोब चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी उशिरा शिक्षकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनात साहेबराव कुटे, आर. डी. निकम, के. के. आहिरे, शशांक मदाने, नीलेश ठाकूर, संग्राम करंजकर, यशवंत ठोके, पुरुषोत्तम ठोके, दशरथ जारस, रोहित गांगुर्डे आदींसह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या कुलगुरूंबाबत नाशिककरांमध्ये उत्सुकता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विकेंद्रीकरणासह विद्यापीठातील विविध प्रश्न, विद्यार्थीकेंद्रित निर्णयांसाठी लोकप्रियता मिळविलेले कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे सोमवारी निवृत्त झाले. डॉ. गाडे व बीसीयूडीचे माजी संचालक डॉ. विश्वास गायकवाड यांचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे. दरम्यान, इतर जबाबदाऱ्यांमुळे डॉ. गायकवाड यांनी या पदावरून तीन महिने अगोदरच निवृत्ती घेतली होती.

डॉ. गाडे यांच्या निवृत्तीनंतर या पदावर कोण विराजमान होणार, याकडे नाशिकच्याही वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासाठीच्या मुलाखतीही पार पडल्या असून, लवकरच याबाबतची घोषणा होणार असल्याने शैक्षणिक वर्तुळात उत्सुकता आहे.

डॉ. गाडे यांच्या कार्यकाळात नाशिकच्या आशा मोठ्या प्रमाणावर पल्लवित झाल्याने त्यांच्या निवृत्ती सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. विद्यापीठाच्या एकूण संख्येचा मोठा भाग असलेल्या नाशिक जिल्ह्यावर डॉ. गाडे यांनी कुलगुरुपदाच्या कार्यकाळातही विशेष लक्ष केंद्रित केले होते. विद्यापीठ विकेंद्रीकरणाबाबत अनुकूल भूमिका घेणाऱ्या या कुलगुरूंच्या कार्यकालातच नाशिक आणि नगर या विद्यापीठाच्या नियोजित कॅम्पसना जमीन अधिग्रहित करता येणे शक्य झाले होते. मात्र, नाशिकच्या दुर्दैवाने पुढील टप्प्यात सरकारद्वारे योग्य आर्थिक तरतूद न झाल्याने पुढील प्रकल्प रेंगाळलेलाच राहिला. याशिवाय विद्यार्थ्यांशी निगडित परीक्षा विभागाच्या समस्या असोत किंवा इतर प्रशासकीय अडचणी, सकारात्मक बाब म्हणजे या कालावधीत नाशिकचे विद्यापीठाशी असणारे नाते अधिक घट्ट झाले आहे.

दरम्यान, त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी बुधवारपासून मुलाखतीही पार पडल्या. दोन दिवसांत ३६ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)मध्ये सकाळी दहा वाजल्यापासून रात्री साडेसात वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मुलाखतींसंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरुपदासाठी योग्य व्यक्तीच्या नावाची शिफारस करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन केली होती. मुलाखतीमध्ये उमेदवाराच्या विषयांशी संबंधित प्रश्न विचारत असल्याची माहिती आहे. शोध समितीकडे सुरुवातीला कुलगुरुपदासाठी ९० अर्ज आले होते. मात्र, त्यानंतर छाननी होऊन ३६ अर्ज पात्र ठरले होते. त्यामुळे आता नव्या कुलगुरूंच्या नावाकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नाशिकशी नाते घट्ट

कुलगुरू डॉ. गाडे यांच्या कार्यकाळात नाशिकशी विद्यापीठाचे नाते पूर्वीपेक्षाही अधिक घट्ट झाले. अर्थात, यामध्ये बीसीयूडी संचालकांच्या रूपाने नाशिककरांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनीही मोलाचे योगदान दिले. विद्यापीठाचे विकेंद्रीकरण, नाशिक कॅम्पसनिर्मितीचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या आदी प्रश्नांवर या कुलगुरूंच्या कार्यकाळात नाशिकलाही समान स्थान मिळाले.

- डॉ. मिलिंद वाघ, माजी सिनेट सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार रंगात मतपत्रिका

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापलिकेच्या ८३ जागांसाठी येत्या २४ मे रोजी मतदान होत असून ही सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहे. एका प्रभागातून ४ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारास ४ मते द्यावी लागणार आहेत. शहरातील बहुतांशी मतदार हा यंत्रमाग कामगार, अशिक्षित मतदार असल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांचा गोंधळ होवू नये म्हणून पालिका प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे.

सोशल मीड‌ियाद्वारे पालिकेकडून मतदारांना याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे. यात प्रत्येक प्रभागात एकूण ४ उमेदवार निवडून द्यावे लागणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदारास ४ मते द्यावी लागणार आहेत. त्यासाठी मतदान केंद्रावर मतदान यंत्रावर (बेलेट युनिटवर) मतदारांना वेगवेगळ्या मतपत्रिका चटकन लक्षात याव्यात यासाठी प्रत्येक प्रभागासाठी पांढरा, फिकट गुलाबी, फिकट पिवळा, फिकट निळा अशा एकूण चार रंगाच्या मतपत्रिका वापरण्यात येणार आहेत. यामुळे चारही प्रभागातील फरक स्पष्टपणे लक्षात येणार आहे. मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान करणे सोपे होणार आहे.

अशा मतपत्रिका

प्रत्येक प्रभागातील ‘अ’ जागेची मतपत्रिका - पांढरा रंग

प्रत्येक प्रभागातील ‘ब’ जागेची मतपत्रिका - फिकट गुलाबी रंग

प्रत्येक प्रभागातील ‘क’ जागेची मतपत्रिका - फिकट पिवळा रंग

प्रत्येक प्रभागातील ‘ड’ जागेची मतपत्रिका - फिकट निळा रंग


नागरिकांना आवाहन

पालिका निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून Cop अर्थात Citizen on Petrol या मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून मतदार उमेदवार व राजकीय पक्षांच्या हालचालीवर नजर ठेवू शकतात. काही गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याचे छायाचित्र काढून या अॅपद्वारे तत्काळ तक्रार नोंदवू शकतात. निवडणूक काळात उमेदवारांकडून मतदारांना पैसे, भेटवस्तू, कुपन, मद्य वाटप होते. तसेच सोशल मीडिया व पेड न्यूजद्वारे प्रभाव पडण्याचा प्रयत्न होतो. याबाबत मतदार तक्रार नोंदवू शकतील. विशेष म्हणजे तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवण्यात येणार असून झालेल्या कारवाईचा अहवाल देखील तक्रारदारास अॅपमार्फत दिसून येईल. पालिकेकडून या अॅपचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाइल प्रकरणाची चौकशी लांबणीवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एमआयडीसीच्या बहुचर्चित फाइल गहाळप्रकरणाची चौकशी सातपूर पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांची तब्येत बिघडल्यामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सोमवारी या प्रकरणात निलंबित भूमापक आर. डी. बकरे यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पण, तपास अधिकारी तीन दिवसांच्या सिक लीव्हवर केल्यामुळे ही चौकशी लांबणीवर पडणार आहे. शनिवारी या प्रकरणात बकरे यांची कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तीन कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्यामुळे त्याची व्याप्ती वाढत आहे.

गेल्या चार दिवसांपासून या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू झाल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. एमआयडीसीने केलेल्या कारवाईचे कागद गहाळ करण्याचे प्रकार अगोदरसुद्धा झाले असले, तरी त्यातील एकही प्रकरण अद्याप बाहेर आलेले नाही. पण, एका प्रकरणात या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सापडला असून, त्यादिशेने आता पोलिसही चौकशी करीत आहेत. भाजपच्या एका नेत्याने या गहाळ प्रकरणात कसून चौकशी करण्यासाठी अर्ज दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांवरही चोहोबाजूंनी दबाव असला, तरी सत्य बाहेर यावे यासाठी ते सविस्तर चौकशी करीत आहेत. सातपूर पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. त्यानंतर एका मुख्य कर्मचाऱ्यांची चौकशी केली. आता पुन्हा तीन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे एकूण सहा जणांच्या चौकशीतून बरेच काही पोलिसांच्या हाती लागणार असणार आहे. पण, तपास अधिकाऱ्यांची तब्येत बिघडल्यामुळे ही चौकशी तीन दिवस लांबणीवर पडली आहे.

---

रॅकेट होणार उघड?

सुरुवातील फाइल गहाळ प्रकरणाची चौकशी एकाच कर्मचाऱ्याभोवती फिरत होती. आता त्यातून अनेक धागेधोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या फाइल प्रकरणाबरोबरच अनेक फायली एमआयडीसीमधून गहाळ झाल्याची चर्चा आता रंगू लागल्यामुळे या प्रकरणातच त्याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे कागद गहाळ करण्याचे हे रॅकेटच उघडकीय येण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती प्राणप्रतिष्ठेला अखेर मुहूर्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गेल्या दोन महिन्यांपासून वादात सापडलेल्या पार्वती माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अखेर आज मुहूर्त लागणार आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवारपासून हा सोहळा सुरू होत असून, शहारातील मेनरोड पालखी मार्गावर सायंकाळी पार्वती मातेच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवारी (दि.१९) होणार आहे. यापूर्वीची मूर्ती खंडित झाल्याने ती मूर्ती बदलण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते.

खंडित झालेली मूर्ती का बदलली जात नाही, या मुद्द्यावरून आखाडा परिषदेचे साधू आक्रमक झाले होते. ३० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत मुहूर्ताच्या तारखा आणि कार्यक्रमाची रुपरेषा निश्च‌ित करण्यात आली. त्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, यज्ञ मंडप उभारण्यात आला आहे. येथे शतचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा देखणा व्हावा यासाठी विश्वस्त मंडळाचा कटाक्ष आहे. देवस्थानतर्फे विविध धार्मिक विधींसह महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. पार्वती मातेची शोभायात्रा पालखी मार्गावरून नेण्यात येईल. कुशावर्तावर पुजाविधी होईल. १७ रोजी प्राणप्रतिष्ठा, धार्मिक विधींचे व शतचंडी यागास प्रारंभ होईल. १९ रोजी प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण होईल. १९ मे ला सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दहा हजार लोक या महाप्रसादाचा लाभ घेतील, असा अंदाज विश्वस्त मंडळाने वर्तविला आहे. मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात येणार आहे, असे देवस्थान न्यासचे अध्यक्ष न्या. पी. के. चिटणीस व विश्वस्त मंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६४४ हेक्टरवर पावसाचा दणका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे २१ घरांचे नुकसान झाले आहे. अंगावर वीज पडून सहा जण जखमी झाले असून, दिंडोरीत एका बैलाचा मृत्यू झाला आहे. चांदवड तालुक्यातील बहादुरी आणि बोराळे या दोन गावांमधील ६४४ हेक्टरवरील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

ऊन आणि उकाडा वाढत असतानाच जिल्ह्यात यंदाही अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस झाल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. १३ मे रोजी नाशिकसह पेठ, निफाड, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे २१ घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये काही घरांचे पत्रे उडाले असून, काही ठिकाणी भिंती पडल्या आहेत, तर सहा जण जखमी झाले आहेत. नाशिक तालुक्यातील देवरगाव येथे कैलास विष्णू मोंढे (वय २०), सोमनाथ नामदेव बेंडकुळे आणि सुनीता सोमनाथ बेंडकुळे शेतातील आंब्याच्या झाडाखाली दोन्ही भाच्यांसह बसले होते. अचानक वीज पडल्याने तिघे भाजले. मोंढे यांच्या छातीवर, तसेच मानेवर मोठ्या दुखापती झाल्या. अशीच घटना त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील वाघेरा येथे घडली. पुंडलिक लक्ष्मण हसन कुटुंबीयांसह पत्र्याच्या घरात बसले होते. अचानक घरावर वीज पडल्याने ते भाजले. त्यांच्या पाठीवर जखमा झाल्या असून, ते उपचार घेत आहेत. तालुक्यातील नांदगाव कोहळी येथे पाच घरांचे, तर आडगाव येथे रमेश चौधरी यांच्या इगतपुरी तालुक्यातील नाळुंगे येथे सहा घरांचे नुकसान झाले आहे. सामनेरे येथे एक मंदिर आणि शाळेचे नुकसान झाले आहे. सुरगाणा तालुक्यातही सहा गावांमध्ये नऊ घरांचे नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील शिंदेपाडा येथे देवराम चौधरी यांच्या बैलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

द्राक्षासह अन्य पिकांचे नुकसान

१३ मे रोजी चांदवड तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. परिणामी, पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. बहादुरी आणि बोराळे या दोन गावांमधील अनुक्रमे ५६९ आणि ७५ अशा एकूण ६४४ हेक्टरवरील पिकांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यापैकी ५७३ हेक्टर क्षेत्र द्राक्षबागांचे आहे. त्या खालोखाल डाळिंब, उन्हाळी बाजरी, कांदा, मिरची, टोमॅटो, काकडी, वाल, शिमला मिरची या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.

चांदवड तालुक्यातील पीकनिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

द्राक्ष ५७३, बाजरी २६, कांदा ८, मिरची ८, टोमॅटो ७, काकडी ५, वाल ८, शिमला मिरची ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी ठेकेदार झालेत मुजोर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची घंटागाडी योजना चांगलीच वादग्रस्त ठरत असून, ठेकेदारांच्या मुजोरीमुळे आता पालिकाही हतबल झाली आहे. महापालिकेने ठेकेदाराला ठोठावलेला दंड पंचवटी आणि सिडकोचा ठेकेदार चक्क घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वजावट करून पालिकेला देत असल्याचा आरोप घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे जी. टी. पेस्ट कंट्रोल कंपनीला ठेका देण्यात आला असतानाही कर्मचाऱ्यांना मात्र उपठेकेदाराकडून निम्मेच वेतन अदा केले जात आहे. त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पालिकेच्याच भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. या नव्या वादामुळे घंटागाडीच्या ठेकेदारीबाबत नव्याने प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महापालिकेने १७६ कोटी रुपयांचा घंटागाडीचा ठेका चार ठेकेदारांना दिला आहे. त्यातील सिडको व पंचवटी प्रभागात जी. टी. पेस्ट कंट्रोल या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. कागदोपत्री ठेकेदाराचे नाव राजेंद्र गायकवाड नमूद असले तरी प्रत्यक्षात त्या ठेकेदाराचा पत्ताच सापडत नसल्याची कैफियत आज घंटागाडी कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांसमोर मांडली. गेल्या चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना निम्म्या वेतनावर गुजराण करावी लागत असल्याची तक्रार अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे करण्यात आली. त्यातून हा नवा वाद समोर आला आहे. घंटागाडी ठेकेदाराने वेतन अदा न केल्यास त्याच्या अनामत रकमेतून वेतन अदा करण्याचे करारात नमूद करण्यात आले आहे. मात्र, असे असतानाही आरोग्य विभागाकडून वेतन अदा होत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. नियमानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे बंधनकारक आहे. वेतन अदा न झाल्यास ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना आहेत. मात्र, याबाबत आरोग्य विभाग गंभीर नसल्याची तक्रार श्रमिक संघटनेचे महादेव खुडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रचाराचा सोशल फंडा ठरतोय प्रभावी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रचार म्हटले की त्यासाठी विविध प्रकारचे साहित्य लागते. यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो, लहान आकराचे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे संदेश मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

शहरातील मोसमपूल, रामसेतू, जुना आग्रा रोड आदी परिसरातील दुकानांवर निवडणूक प्रचारासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी आले आहे. त्यात पक्षाचे झेंडे, खिशाला लावण्याचे बॅच, टोप्या, हातातील दोरे, पोस्टर, टी शर्ट असे साहित्य एकाच छताखाली विक्रीस आहे. हे प्रचार साहित्य आहे. एकीकडे उमेदवारांची प्रचाराची धावपळ सुरू असून, दुसरीकडे कार्यकर्त्यांनी प्रचारसाहित्य घेण्यासाठी गर्दी केली आहे. इच्छुक उमेदवारांनी खास आपल्या नावाचे, छायाचित्र असलेले टी शर्ट, टोप्या छापून घेतल्या आहेत.

प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. प्रचारसाहित्य मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रचारसाहित्य महत्त्वाचे असल्याने जास्ती जास्त हटके आणि लक्षवेधी साहित्य खरेदी करण्याकडे उमेदवारांचा कल आहे.

सोशल मीडियासाठी डिझाइन

निवडणूक प्रचारात सोशल मीड‌ियाचा खुबीने वापर होत आहे. व्हॉट्स अॅप ग्रुप, फेसबुक, ट्वीटर, इ मेल आदी माध्यमांद्वारे प्रचारासाठी लागणारे वेगवेगळे डिझाइनही या दुकानात तयार करून मिळत आहे. उमेदवारांचे फोटो, पक्षातील नेत्यांचे फोटो, चिन्ह, प्रभाग क्रमांक आणि ‘मतदान आम्हालाच’ असे आवाहन असलेले इमेजेस, व्हिडिओ, जि. आय. एफ. तयार करून त्याद्वारे कमी वेळात अनेकांपर्यंत पोहचण्याचा सोशल फंडा मालेगावात सध्या जोरात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉनाक्रायमुळे खातेदार रडवेले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगभरात ‘वॉन्नाक्राय’ या रॅनसमवेअरच्या धुमाकूळामुळे सोमवारी शहरासह जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक एटीएम बंद होते. याअगोदर कॅश शॉर्टेजमुळे एटीएममध्ये खडखडाट असताना रॅनसमवेअर व्हायरस हल्ल्यामुळे एटीएमला ‘दुष्काळात तेरावा’ लागला आहे. नोटाबंदीनंतर तिसऱ्यांदा एटीएममध्ये खडखडाट असल्यामुळे सामान्य ग्राहकांचा संताप वाढत आहे. सोमवारी बऱ्याच ठिकाणी एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. शहरात बहुतांश एटीएमवर ‘आऊट ऑफ कॅश’चे बोर्ड होते. सुरू असलेल्या मोजक्या एटीएमवर प्रचंड गर्दी होती.

सायबर हल्ला होण्याच्या भीतीमुळे एटीएम बंद करण्यात आल्याची चर्चा असली तरी जिल्ह्यात कॅश शॉर्टेजचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या आठ दिवसांपासून एटीएमध्ये पैसे नसल्यामुळे बहुतांश एटीएम अगोदरपासूनच बंद होते. त्यात आता या व्हायरस हल्ल्यामुळे पुन्हा एटीएम किती दिवस बंद राहतात, असा प्रश्न बँक ग्राहकांना पडला आहे. नोटाबंदीनंतर जिल्ह्यातील ९०३ एटीएमपैकी फक्त स्टेट बँकेचेच ७० टक्के एटीएम सुरू होते. त्यानंतर दोन महिन्यांनी ही परिस्थिती सुधारल्यानंतर गेल्या आठ दिवसांत पुन्हा कॅश शॉर्टेजला सामोरे जावे लागत आहे. त्यातून ग्राहक सावरत नाहीत तोच आता रॅनसमवेअरच्या हल्ल्यामुळे संतापात वाढ झाली आहे.


तीन दिवस बंद?

विशेष म्हणजे सोमवारी काही ग्राहकांनी कॅश न काढण्याचा निर्णय घेतला असला तरी एटीएमवर गर्दी कायम होती. स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, देना बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँक व खासगी बँकेच्या एटीएमची स्थिती सारखीच होती. नोटाबंदीनंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. शेती व व्यापाराचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आता पुन्हा हीच स्थिती निर्माण होते की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे. रॅनसमवेअरच्या धुमाकूळामुळे तीन दिवस एटीएम बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याचा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.

सहकारी बँकांच्या एटीएमचा आधार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडला राष्ट्रियीकृत बँकांचे एटीएम एम्प्टी झाले असले तरी सहकारी बॅँकांच्या एटीएमने नागरिकांना तारले आहे.

नाशिकरोडला नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक, बिझनेस बँक, जळगाव जनता बँक यांचे एटीएम आहेत. स्टेट बँकेपासून महाराष्ट्र बॅँकेपर्यंत सर्वच राष्ट्रीय आणि खासगी बँकांना रिझर्व्ह बॅँकेकडून कमी कॅश येत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. एटीएममधून रोकड मिळत असल्याने नागरिकांनी सहकारी बँकांच्या एटीएमकडे मोर्चा वळवला आहे. सहकारी बँकांतही रोकड काढण्यावर मर्यादा असल्याने मर्यादित रकमेवर त्यांना समाधान मानावे लागत आहे. नाशिकरोडला दोन डझनावर एटीएम आहेत. त्यात राष्ट्रियीकृत बँकांची संख्या जास्त आहे. खासगी बॅँकांचीही एटीएम आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून या सर्व बँकांच्या एटीएममध्ये कॅशची तीव्र टंचाई आहे. लोकांना गरजेपुरते पैसे मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नको समर कॅम्प.. हवा स्वतःचा वेळ

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

शाळेचे निकाल नुकतेच जाहीर झालेत अन् उन्हाळ्याच्या सुटीत निकालानंतर महिनाभर विद्यार्थ्यांना अनेक समर कॅम्प्समध्ये पाठविण्यासाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. एकीकडे विद्यार्थी सुटीत फुल टू धम्माल करण्यासाठी कमालीचे प्लॅन्स आखताय, तर बच्चे कंपनी खास ठिकाणी ट्रिपला जाण्यासाठी हट्ट करतेय. मात्र, दुसरीकडे पालक पाल्यांना ऑफबीट नॉलेज मिळवून देण्याच्या तयारीत समर कॅम्पमध्ये पाठवत आहेत. शहरातील अनेक भागांत उन्हाळी शिबिरांचे वारे वाहू लागले आहेत. उन्हाळी शिबिरांना पालकांची पसंती मिळत असली तरी विद्यार्थी मात्र याबाबतीत नाखूश दिसताहेत. किंबहुना वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करून न जमणाऱ्या गोष्टी अवघ्या १५ दिवसांत कशा जमतील, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शहरातील समर कॅम्पमध्ये दहा ते पंधरा दिवसांत व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी स्पीकिंग, डान्स, स्पोर्ट, ट्रेकिंग, योगा आणखी बरंच काही शिकवलं जात आहे. शाळेच्या अन् क्लासेसच्या धकाधकीत व्यस्त असणारा पाल्य पुन्हा आता समर कॅम्पच्या क्लासेसमध्ये बिझी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विद्यार्थी वर्षभर शाळेत व्यक्तिमत्त्वाचे, गणिताचे, नृत्याचे, खेळाचे धडे घेत असतात. मग त्यांना पुन्हा समर कॅम्पमध्ये तेच शिकवायला का पाठवतात, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडियावरही या संदर्भात मेजेसेज व्हायरल होताना दिसताहेत. ‘समर कॅम्पमध्ये मिळणारे हे नॉलेज तितके पुरेसे किंवा परफेक्ट असते का? वर्षानुवर्षे व्यक्तिमत्त्वाचे धडे घेऊन व्यक्तिमत्त्व हवे तसे परफेक्ट होत नाही. मग अवघ्या १५ दिवसांतच व्यक्तिमत्त्वाचा विकास होणार का? सुरुवातीपासूनच कच्चे असलेले मॅथ्स १५ दिवसांतच पक्के होणार का? खेळ, नृत्याचे क्लासेस हे वर्षभर चालतातच. मग १५ दिवसांतच मुलांना यात प्रावीण्य प्राप्त होईल का? शाळेच्या दप्तराचे ओझे वाहून पाठपोट एक झालेल्या पोरांना भर उन्हात शिबिरांना पाठवून आणखी कुपोषित करणार का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर मेसेजमध्ये पाठवले जात आहेत. समर कॅम्पमध्ये इच्छा नसताना विद्यार्थ्यांना जावे लागत असल्याने असाही त्याचा फायदा होत नाही अन् समर कॅम्पमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना एकाच छताखाली शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रत्येकाकडे पुरेसा वेळही देता येत नाही. असे असतानाही पालक मुलांना समर कॅम्पमध्ये पाठवत आहेत. मुलांनी काही तरी वेगळे शिकावे. त्याला सर्व गोष्टी जमायला हव्यात, या चांगल्या भावनेतून पालक जरी समर कॅम्पला मुलांना पाठवत असले तरी विद्यार्थी मात्र याला पुरते वैतागले आहेत. शेजारच्यांचा पाल्य समर कॅम्पला जातो, मग आपलापण जायलाच हवा, त्याला हे जमतं ना, मग आपल्या पाल्यालाही जमायला हवं ही भावना पालकांनी बदलायला हवी. पाल्यांत जे टॅलेंट आहे, त्यासाठी त्याला पुरेसा वेळ खर्च करू द्यायला हवा. व्हर्च्युअल जगतात हरवलेला मामाचा गाव उन्हाळी सुटीत त्याला दाखवून द्यायला हवा, असे प्रबोधन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

समर कॅम्पऐवजी हे करा...

- शाळेच्या धाकामुळे झोप पूर्ण न होणाऱ्या पाल्यांना निवांत सकाळी ८ पर्यंत झोपू द्या.

- १५ दिवसांत २००० खर्च करण्यापेक्षा २०० रुपयांचे कोरे कागद, ओतीव कागद, रंगकांड्या, गोष्टीची पुस्तके, क्ले (माती) इत्यादी आणून, त्यांना त्यातून हवी ती कलाकृती बनवू द्या.

- घरी बिन्धास्त उड्या मारू द्या, खोड्या करू द्या, मनसोक्त बागडू द्या.

- मामाचे, मावशीचे गाव लोप पावत असले तरी चार दिवस त्यांना तिथे अवश्य जाऊ द्या.

- रात्री घराच्या गच्चीवरच का असेना, अंथरुण टाकून रात्रीचं चांदणं न्याहाळू द्या.

पालकांनी आपल्या स्वतःच्या उन्हाळी सुटी आठवून बघायला हवी. तेव्हा केलेल्या त्या धम्माल आठवणी अजूनही स्मरणात आहेत. अशाच आठवणी आपल्या मुलांना अनुभवता यायला हव्यात. त्यांना गावाकडे पाठवायला हवे, तसेच त्यांना सुटीत जे करायचे ते करायला द्यायला हवे. क्लासेसला पाठवून त्यांची सुटीची गंमत हिरावू नये.

- रमा पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडवा पाणी योजनेसाठी नोव्हेंबरचा अल्टिमेटम

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर शहराला पाणीपुरवठा व्हावा यासाठी कडवा धरण स्रोत पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लागावे यासाठी आमदार राजाभाऊ वाजे यांनी नगरव‌िकास विभागच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत विविध समस्यांवर लक्ष वेधले. नोव्हेंबर अखेरपर्यंत ही योजना पूर्णत्वास नेण्यात यावी, अशा सूचना वाजे यांनी सूचना केल्या. म्हैसकर यांनी या योजनेच्या पूर्णत्वासाठी विविध पर्याय सुचविले.

सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेस केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. परंतु याआधीच्या सरकारने योजनेची निविदा २३.९२ टक्के जादा दराने मंजूर केल्याने योजनेची मंजूर किंमत ६२ कोटींवरून ८२.५६ कोटी इतकी झाली. यामुळे संपूर्ण योजनाच अडचणीत आली. त्यातच केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदान ८० टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे. तसेच नगरपालिकेचा हिस्सा दहा टक्क्यांवरून वीस टक्के केल्यामुळे नगरपरिषदेवर १९ कोटी अतिरिक्त भार पडला आहे.

या अडचणीसंदर्भात आमदार वाजे यांनी हिवाळी अधिवेशनातही लक्ष वेधले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनीही या योजनेच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले होते. बैठकीत म्हैसकर यांनी विविध पर्याय सुचविले. नगर परिषदेच्या विविध योजनांतील अखर्चित निधी पाणी पुरवठा योजनेकरिता वळविणे, राज्य शासनाकडून विविध योजनांकरिता मिळालेल्या अनुदानावरील, नगरपरिषदेच्या विविध खात्यांत असलेल्या रकमांवरील व्याज या योजनेसाठी खर्च करणे, असे करूनही निधी कमी पडल्यास शासन यासाठी १५ वर्ष मुदतीच्या परतफेडीवर ५ टक्के व्याजदराने निधी उपलब्ध करून देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट्रलाइज प्रवेशाबाबत पालक अनभिज्ञ

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

शहरात येत्या शैक्षणिक वर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज पद्धतीने राबविणार येणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कॅप राउंडमध्ये जाहीर होणाऱ्या कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. यामुळे प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता दिसून येत आहे.

शहरातील दहावीची परीक्षा दिलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सायन्स, कॉमर्स शाखेत प्रवेश घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये एप्रिल २०१७ पासूनच प्रवेश घेतले आहेत. शहरातील अनेक नामांकित कोचिंग क्लासेसचे वर्गही सुरू झाले आहेत. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये शहरात सेंट्रलाइज पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने जाहीर केलेल्या वेबसाइटवर एकच प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना भरावा लागेल. कॅप राउंडनुसार, शहरातील सर्व कॉलेजेससाठी हा एकच अर्ज दाखल करावा लागेल. यानंतर शासनातर्फे गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून यात विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या कॉलेजमध्येच प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करतांना कॉलेजचा प्राधान्यक्रम दिल्यानंतर यातील कोणत्याही एकाच कॉलेजमध्ये त्याचा प्रवेश निश्चित केला जाईल. पण संबंधित कॉलेज नाशिकच्या दुसऱ्या भागात असेल किंवा त्याच्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसपासून दूर असेल तर सायन्स किंवा कॉमर्स फॅकल्टीच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतले आहेत अशा विद्यार्थ्यांची कसरत होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक क्लासेस पाच ते सात तास लेक्चर्स घेत असल्याने पालक क्लासजवळील नामांकित कॉलेजेमध्ये घेऊन देण्याची दृष्टीने आपल्या पाल्याना सोयिस्कर प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला पाठवितात. यंदाही अनेक पालकांनी त्याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना क्लासेसला पाठविण्यास सुरुवात केली. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदा हवे ते कॉलेज मिळण्याची शक्यता कमी असल्याने पालकांना आणि विद्यार्थ्यांना क्लासेसच्या दृष्टीने कॉलेज निवडणे अवघड होणार आहे.

यंदाच्या अकरावी सेंट्रलाइज प्रवेशाबाबत क्लासेस किंवा कॉलेजेस पालकांना योग्य माहिती देत नसल्याने पालकांमध्ये संभ्रम आहे. क्लासेस मात्र आपली तिजोरी फुल्ल करण्याचा नादात योग्य मार्गदर्शन करणे टाळत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे प्रवेश अर्जात विद्यार्थ्याने दिलेल्या कॉलेजेसच्या प्राधान्यक्रमांनुसार दूर अंतरावरील कॉलेज विद्यार्थ्याला देण्यात आले किंवा क्लासेसच्या वेळेत कॉलेजचा ताळमेळ साधणे शक्य होणार नसेल तर याचा मानसिक त्रास पालक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागू शकतो.

संलग्न कॉलेजेसचे धाबे दणाणणार!

शहरातील अनेक नामांकित प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे नॉन ग्रँट कॉलेजेससोबत संलग्न असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. संबंधित क्लासेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्याला संबंधित संलग्न कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला जातो. विद्यार्थी आणि त्या कॉलेजचा संबंध केवळ परीक्षेपुरताच असतो, असे चित्र शहरात दोन वर्षात तयार झाले आहे. मात्र, सेंट्रलाइज अकरावी प्रवेशामुळे हे सर्व प्रकार थांबणार असून संलग्न कॉलेजेस आणि क्लासेसचे धाबे दणाणणार असल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहाच्या नाण्यांवरून झडताहेत वाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ देवळाली कॅम्प
एक‌ीकडे चलन टंचाई, एटीएममधील खडखडाट यामुळे नाशिककर हैराण झाले असतानाच आता दहा रुपयांची नाणी वटविताना नागरिकांची दमछाक होऊ लागली आहे. व्यवहारात दहा रुपयांची बोगस नाणी आल्याची वार्ता सर्वदूर पसरल्याने ही नाणी स्वीकारण्यास कुणीही तयार नाही. विशेष म्हणजे एका राष्ट्रियीकृत बँकेनेही नाणी स्वीकारण्यास प्रारंभी नकार दिल्याने दोन शेतकऱ्यांनी बँकेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. दहाच्या नाण्यांवरून निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दैनंदिन व्यवहारांमध्ये सध्या चलन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नोटांच्या तुटवड्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असताना पुरेसे चलन केव्हा उपलब्ध होणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. एकीकडे चलन टंचाईच्या झळा सोसवेनाशा होत असताना दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याचा प्रयत्न नागरिकांकडून होऊ लागला आहे. व्यवहारात दहा रुपयांची बनावट नाणी आल्याची आणि त्यामुळे ही नाणी व्यवहारातून बाद ठरणार असल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने लोक आपल्याजवळील नाणी वटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, ही नाणी स्वीकारण्यास छोटे-मोठे व्यावसायिक नकार देत असल्याने नागरिकांमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. याच गोंधळात आता बँकांचीही भर पडू लागली आहे. बँकांकडून ग्राहक दहा रुपयांचे क्वाइन स्वीकारत नसल्याने बँकाही ग्राहकांकडून असे नाणी स्वीकारण्यास नकार देऊ लागल्या आहेत. देवळाली कॅम्पमधील वडनेर रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शिवडे येथील दोन खातेदार शेतकरी गेले. त्यांच्याकडे दहा रुपयांची सात हजार रुपये किमतीची नाणी होती. ही सर्व नाणी एकाच वेळी स्वीकारण्यास बँकेने नकार दिला. त्यामुळे शिवाजी वाघ आणि नामदेव वाघ या दोन शेतकऱ्यांनी बँकेसमोरच आंदोलन सुरू केले. गर्दीची वेळ टाळून भरणा करण्यास येण्याबाबत त्यांना नंतर सांगण्यात आले. बँक प्रशासन दहाच्या नाण्यांचा भरणा स्वीकारत आहे. मात्र, तोच भरणा पुन्हा नागरिकांना वापरण्यासाठी देण्यात यावा, असे रिझर्व बँकेने सांगितले आहे. मात्र, ग्राहक ही नाणी स्वीकारण्यास तयार होत नसल्याने बँकांचीही डोकेदुखी वाढली आहे. संबंधित शेतकऱ्यांची नाणी स्वीकारण्यासाठी त्यांना दुपारी साडेतीननंतर येण्याची विनंती केल्याचा दावा बँक प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
मोजणी यंत्राची गरज
संबंधित बँकेच्या शाखेत क्वाइन मोजणीचे मशीन नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली. तातडीने वेंडिंग मशिन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

आमच्या बँकेत सर्वाधिक ग्राहक ग्रामीण भागातून येतात. त्यांच्याकडून भरणा होणारी नाणी स्वीकारणे आमच्यावर बंधनकारक आहे. मात्र दररोज मोठ्या प्रमाणावर नाणीरुपी चलन ठेवणे जोखमीचे झाले आहे. नागरिकांनीच चलनात अशी नाणी फिरती ठेवल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो.
- एस. के. धुळे, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया
आम्ही १० रुपयांची नाणी बँकेत घेऊन गेलो असता कॅशियरने आधी ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला. नंतर १० रुपयांची केवळ १०० रुपये किमतीची नाणी स्वीकारू असे सांगितले.
- नामदेव वाघ
बाजारात व्यवहार करताना अनेक ठिकाणी ग्राहक, तर काही ठिकाणी दुकानदारही १० रुपयांची नाणी स्वीकारत नाहीत. यामुळे अनेकांच्या मनात या चलनाविषयी संभ्रम निर्माण होतो व यामुळे अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहेत.
-प्रवीण पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मविप्र’साठी येवल्यात फिल्डिंग

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आगामी निवडणुकीचे येवला तालुक्यात वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला संचालक पदावर नजरा ठेवून असलेल्या तालुक्यातील इच्छुकांच्या आशा आकांक्षांना घुमारे फुटले आहेत.

‘मविप्र’ संस्थेची निवडणूक येत्या जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे. येवल्यातून अनेक नावे चर्चेत असली तरी प्रामुख्याने जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता साहेबराव पा. सैद, नेत्रतज्ज्ञ डॉ. शशिकांत गायकवाड, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विश्वासराव आहेर यांच्यासह गेली अनेक वर्षे हे पद भूषविणारे विद्यमान संचालक अंबादास बनकर या चौघांची नावे सध्या आघाडीवर आहेत. या प्रबळ दावेदारांनी गाठीभेटींचा सिलसिला सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घराणेशाहीचा बोलबाला

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

प्रस्थापित राजकीय पक्ष या ना त्या निमित्ताने एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करीत असतात. परंतु या घराणेशाहीपासून आता कोणीच दूर राहिलेले नाही. कधीकाळी काँग्रेस म्हणजे घराणेशाहीचा पक्ष अशी ओळख होती. मात्र आता सर्वच पक्ष घराणेशाहीच्या रंगात न्हाहून निघाले आहेत. येथील महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून, त्यात देखील या घराणेशाहीचाच बोलबाला असल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीत सर्व पक्षांतर्फे नेतेमंडळीने आपली मुले, सुना, पत्नी, भाऊ, जावई यांना निवडणूक रिंगणात उतरव‌िले आहे. राजकीय पक्षांकडून तिकीट मिळवण्यासाठी नेतेमंडळीसोबतची नातीगोती हा देखील महत्त्वाचा निकष ठरला आहे. मुस्ल‌िमबहुल असलेल्या पूर्व भागात आता जनता दलाचा प्रभाव निहाल अहमद यांच्या जाण्याने कमी झाला असला तरी त्यांचे पुत्र नगरसेवक बुलंद इक्बाल यांनी एकहाती किल्ला लढवला आहे. या निवडणुकीत ते स्वतः प्रभाग १२ मधून निवडणूक लढत असून, त्यांच्या विरोधात त्यांचेच बंधू इश्तियाक अहमद समाजवादी पक्षाकडून लढत आहेत. तर बुलंद इक्बाल यांची बहीण शानेहिंद निहाल अहमद या प्रभाग १५ मधून निवडणूक लढत आहेत. निहाल अहमद यांचे पुतणे अतिक कमाल (प्रभाग १५) राष्ट्रवादीकडून या रणधुमाळीत नशीब अजमावत आहेत.

निहाल अहमद यांच्या घराण्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत. स्वतः शेख व त्यांच्या पत्नी माजी महापौर ताहेरा शेख (प्रभाग २०) निवडणूक लढवीत आहेत. या निमित्ताने शेख यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची काँग्रेसची खेळी आहे. त्यामुळे महापौरपदाचे स्वप्न ते पाहत आहेत. त्यांचे पुत्र शेख मो. खालिद शेख व त्यांच्या पत्नी शेख नसरीन बानो. मो. खालिद (प्रभाग २१) निवडणूक लढवीत आहेत. स्थायी समिती सभापती एजाज बेग व त्यांच्या पत्नी यास्मिन बेग प्रभाग १६ मधून निवडणूक रिंगणात आहेत.

घराणेशाहीच्या या परंपरेत एमआयएम मागे राहिलेली नसून, उपमहापौर युनुस इसा यांचा कुटुंब कबिलाच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. स्वतः युनुस इसा (प्रभाग २१), त्यांचे तीनही चिरंजीव विद्यमान नगरसेवक मलिक इसा (प्रभाग १७ व २०), अब्दुल माजित (प्रभाग १८), डॉ. खालिद परवेज (प्रभाग २१) निवडणूक लढवीत आहेत. तसेच युनुस इसा यांच्या सुना तसलीम खालिद परवेज (प्रभाग १७) तर शेख बुशरा अब्दुल माजीद (प्रभाग २०) निवडणूक रिंगणात आहेत.

पश्चिममध्येही गोतावळा

इकडे पश्चिम भागात शिवसेना भाजप देखील याला अपवाद ठरलेले नाहीत. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष नगरसेवक सुनील गायकवाड (प्रभाग ९), त्याचे बंधू नगरसेवक मदन गायकवाड (प्रभाग ११) भाजपची धुरा सांभाळत आहेत. शिवसेनेत प्रवेश केलेले स्वीकृत नगरसेवक सखाराम घोडके (प्रभाग ८) व त्यांच्या कन्या कल्पना वाघ (प्रभाग ११), भोसले कुटुंबातील ज्योती भोसले व त्यांचे दीर अनंत भोसले (प्रभाग ९) निवडणूक लढवीत आहेत. राज्यमंत्री दादा भुसे यांचे शालक जयराज बच्छाव शिवसेनेकडून (प्रभाग ११) निवडणूक रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनारोग्याचा ट्रॅक!

0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

शरणपूररोड परिसरातील वि. वा. शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे या ट्रॅकचाच कचरा झाल्याची स्थिती दिसून येत आहे. या ट्रॅकच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचलेले असून, संपूर्ण पी अॅण्ड टी कॉलनी परिसरच कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या जॉगिंग ट्रॅकलगतच्या काही हॉटेल्समधील ओला व सुका कचरा ट्रॅकच्या पुढील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत टाकला जातो. त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रॅकच्या मागच्या बाजूसदेखील अशीच स्थिती दिसते. अनेक दिवस हा कचरा पडून राहत असल्याने पी अॅण्ड टी कॉलनी परिसरात अस्वच्छतेसह दुर्गंधी पसरली आहे.

--

घंटागाड्यांचा उपयोगच नाही

शरणपूररोड परिसर व पी अॅण्ड टी कॉलनीत दिवसातून दोनहून अधिक घंटागाड्या येतात. परंतु, ट्रॅकमागील कचरा उचलण्यास ते लोक नकार देतात. कॉलनीतील किरकोळ कचराच उचलला जातो. परिसरातील एमराल्ड पार्क हॉटेेलच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेस उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मोकळ्या जागेत हा कचरा पडून असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्याचा स्थानिकांसह रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनाही त्रास होत आहे.

--

लाइट, म्युझिक बंद

जॉगिंग ट्रॅकच्या काही भागात लाइट नाहीत, तसेच जॉगिंग ट्रॅकवर असणारी म्युझिक सिस्टीमदेखील बंद पडलेली आहे. ट्रॅकवर असणाऱ्या ग्रीन जिममधील काही उपकरणांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे पी अॅण्ड टी कॉलनी परिसरातील रहिवाशांककून कचऱ्याच्या समस्येेमुळे व ट्रॅकवरील प्राथमिक सोयींच्या अभावामुळे लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित घटकांनी तातडीने उपाययोजना करण्याची भावना नागरिकांकडूून व्यक्त होत आहे.

--

ट्रॅकच्या मागच्या बाजूस अनेक दिवसांपासून कचरा साचलेला आहे. अनेकदा तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही. सकाळच्या वेळी जॉगिंग करताना या दुर्गंधीचा खूप त्रास होतो. महापालिकेने त्वरित उपाययोजना करावी.

-संतोष शिंदे, स्थानिक रहिवासी

--

कोणतेही हॉटेल असले, तरी त्याच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते याचा आढावा घेणेे महत्त्वाचेे आहे. पण, तसे होत नाही. नगरसेवकांनी या समस्येेप्रश्नी जातीने लक्ष घालायला हवे. शक्य असल्यास अॅप डेव्हलप करावा.

-रोहित केदार, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारीही दणाणताहेत हॉर्न!

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहरात सोमवार हा नो हॉर्न डे म्हणून पाळण्यात येत आहे. मात्र, पंचवटीत रामकुंड परिसरात सोमवारीच सर्वांत जास्त प्रमाणात हॉर्न वाजविले जात असल्याचे आढळून येत आहे. सोमवारी येथे होणाऱ्या भाविकांच्या गर्दीने वाहतुकीची कोंडी होते. कोंडी झालेल्या वाहनांचे चालक जोरजोरात हॉर्न वाजवित असल्याने, तसेच वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे ध्वनी व वायू प्रदूषणाने भाविक त्रस्त होत आहेत.

सोमवारी रामकुंडावर स्नानासाठी आणि कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. विशेषतः सायंकाळी ही गर्दी वाढते, ती रात्री उशिरापर्यंत राहते. दुचाकीवर येणारे भाविक त्यांची वाहने कपालेश्वर मंदिराच्या समोरच्या भागात पार्क करतात. येथील मिठाई दुकानाच्या समोर रिक्षा स्टॅण्ड आहे. त्यामुळे पूर्वेला रिक्षा स्टॅण्ड, उत्तरेला दुचाकी वाहनांचे पार्किंग यांच्यामुळे मालेगाव स्टॅण्ड, इंद्रकुंड, गोदाघाट आणि पुरिया मार्ग येथून येणाऱ्या वाहनांना ये-जा करण्याचा मार्ग अरुंद होतो. त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होते.

ही कोंडी फोडण्यासाठी येथे वाहतूक शाखेचा एकही पोलिस कर्मचारी येथे नसतो. वाहनांच्या लांबवर रांगा लागतात. या वाढलेल्या रांगेतील वाहनचालक जोरजोरात हॉर्न वाजवित असतात. त्यामुळे येथील ध्वनी प्रदूषणाची पातळी इतर दिवसांपेक्षा सोमवारी वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन निदान सोमवारी तरी येथे सायंकाळच्या वेळी वाहनांना बंदी करण्यात यावी. त्यामुळे कर्कश वाजणाऱ्या हॉर्नच्या त्रासातून नागरिकांची सुटका होईल, अशा प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

--

सोमवार हा नो हॉर्न डे म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मात्र, याच दिवशी रामकुंड परिसरात कर्कश हॉर्न वाजविले जातात. येथे वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी नसतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली, की हॉर्न वाजू लागतात.

-सुरेश मानसिंघानी, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्याचा सहा जणांना चावा

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील काकासाहेब नगर (रानवड साखर कारखाना) येथे सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने सहा वर्षाच्या बालिकेसह एकूण सहा जण जखमी झाले. या कुत्र्याने दुभत्या जनावरनांवरही हल्ला केल्याने रानवड कारखाना परिसरात दहशत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यांनी घाबरलेल्या या परिसरात आता भटक्या कुत्र्यांची दहशत असल्याने नागरिक भयभीत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून रानवड कारखान्याने वीज बिल न भरल्याने या ठिकाणचे वीज कनेक्शन बंद आहे. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. सोमवारी रात्री अंधारातच गचाले वस्ती परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने बाहेर झोपलेल्या लोकांना चावा घेतला. पांडू वाघ (वय ७०), मीना वाघ (वय ४०), ताराबाई सोमवंशी (वय ७०), मधुकर गायकवाड (वय २५), सावित्रीबाई चव्हाण (वय ७०), आश्मिन शेख (वय ६) असे या जखमीचे नावे आहेत. या सर्व जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवून त्यांना प्रतिबंधक इंजेक्शन दिले असून उर्वरित तीन इंजेक्शन पालखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिले जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. व्ही. शिंदे यांनी सांगितले

गणपत पवार या शेतकऱ्याच्या जवळपास एक लाख रुपये किमतीच्या बैलांनाही या कुत्र्याने गंभीर जखमी केले. यासह पसिरातील वासरू, बोकड आणि एका गाईलाही कुत्र्यानेे चावा घेतला. दरम्यान जीवघेणा हल्ला करणाऱ्या या पिसाळलेला कुत्र्याला परिसरातील नागरिकांनी पळवून लावले आहे. परिसरात रात्री वीज द्यावी आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ही कुत्री नाशिकची?

रानवड ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक महानगरपालिकेकडून नाशिक शहरात पकडलेली भटकी कुत्री गाडीत भरून ती रानवड परिसरासह अनेक गावांमध्ये सोडले जातात. तिच कुत्री जनावरांवर, नागरिकांवर हल्ला करतात.

नवरदेवही जखमी

मंगळवारी कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमींमधील मधुकर गायकवाड या तरुणाचे बुधवारी (दि.१७) लग्न आहे. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याने तो घाबरला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्याने नियोजित लग्नविधी होणार असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्यातील अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांच्या घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. परिणामी, वीजग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वीजग्राहकांची या गैरसोयीतून सुटका करण्यासाठी खंडित वीजपुरवठा तत्काळ सुरळीत व्हावा, यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी नुकतेच दिले आहेत. जे कर्मचारी मुख्यालयी राहणार नाहीत त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ‘शॉक’ बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images