Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डीजीपीनगरची टपालसेवा ठप्प

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गालगत गांधीनगर पोस्ट ऑफिसच्या अखत्यारित असलेल्या डीजीपीनगर क्रमांक एक परिसरातली टपालसेवा महिनाभरापासून ठप्प आहे. मोबाइल आणि बिलांव्यतिरिक्त अन्य कोणतीही पत्रे, पाकिटे, नियतकालिके मिळत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.

डीजीपीनगर पसिररात नाशिकरोडहून द्वारकेकडे जाणाऱ्या मार्गावरील आंबेडकरनगर आणि शिवाजीनगरसमोरील भाग येतो. सुमारे तीन हजारपेक्षा अधिक घरे म्हणजे १० हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती तेथे आहे. या परिसरात नोकरदार कुटुंबीयांसह अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचे वास्तव्य आहे. या भागात ज्येष्ठ नागरिक संघही कार्यरत आहेत. परिसरात अभ्यासिकाही आहे. तेथे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धा परीक्षा, तसेच अन्य नियतकालिकांसाठी वार्षिक वर्गणी जमा केलेली आहे. त्यामुळे दर आठवड्याला किंवा दरमहा मासिके येणे अपेक्षित आहे. मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही मासिकांचे वाटप केले जात नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी गांधीनगर पोस्ट ऑफिसला वारंवार कळविले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकलेला नाही, असेही नागरिकांनी सांगितले.

मनुष्यबळाचे दुखणे

डीजीपीनगर क्रमांक एकमधील काही ज्येष्ठ नागरिकांसह स्थानिकांनी टपाल मिळत नसल्याची तक्रार गांधीनगर पोस्ट ऑफिसकडे केली. ‘आम्ही कोणतेही टपाल शिल्लक ठेवत नाही. सर्व टपालांचे वेळेत वाटप केले जाते’, असा दावा पोस्टातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरुवातीला केला. मात्र, वार्षिक वर्गणी भरल्याच्या पावत्या आणि नियतकालिके मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पोस्ट कर्मचाऱ्यांनी नमते घेतले. त्यांनी आपल्याकडे कमी मनुष्यबळ असल्याचे कारण पुढे करीत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

टपाल जाते तरी कोठे?

डीजीपीनगरमधील वाटप करण्यासाठी जमा होणारे टपाल स्थानिक रहिवाशांपर्यंत पोहोचत नाही. मग असे टपाल जाते तरी कोठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण, टपाल घेण्यासाठी गांधीनगर पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतरही मिळत नाही. नागरिकांचे महत्त्वाचे टपाल थेट कचऱ्यात जाते का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेस कामगारांना सातव्या आयोगाची ऑर्डर हाती

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मजदूर संघास प्रेस महामंडळाच्या व्यवस्थापनाकडून सातव्या वेतन आयोगाची ऑर्डर शुक्रवारी मिळाली. त्यामुळे प्रेस कामगारांना आयोग मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने कामगारांनी फटाक्यांची आत‌षबाजी करत दिवाळी साजरी केली.
आयोगाचे पे-स्केल मासिक वेतनात लागू व्हावे आणि अॅरिअर्स त्वरित मिळावा म्हणून मजदूर संघ, दोन्ही प्रेसचे व्यवस्थापन यांची बैठक होणार आहे. अॅरिअर्सची तारीख नोटीस बोर्डावर लवकरच लावण्यात येणार आहे.
प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी लढ्याला मोठे यश मिळाल्याचे सांगत याचे सर्व श्रेय कामगारांना दिले. सातवा वेतन आयोग मिळावा म्हणून केंद्रीय अर्थमंत्री, अर्थसचिव व प्रेस व्यवस्थापनाबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्याला आता यश आले आहे. गोडसे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १६ मार्च २०१७ च्या महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाबाबत चर्चा होऊन तो मंजूर करण्यात आला. बैठकीचे पक्के इतिवृत्त तयार झाले होते. मात्र, त्यावर सर्व संचालकांच्या सह्या होण्यास वेळ लागला. त्यातच एक संचालक परदेशात गेल्याने विलंब झाला. ते परदेशातून आल्याने त्यांची स्वाक्षरी झाली आणि महामंडळाने सातवा वेतन आयोग मजदूर संघाला लागू केल्याची ऑर्डर पाठवली.
भत्ते जैसे थे
केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाचे भत्ते अद्याप जाहीर न केल्याने ओव्हरटाइम, इन्सेंटिव्ह्जसह सर्व अलाउन्सेस मागीलप्रमाणेच सुरू राहतील. नवीन अलाउन्सेस केंद्र सरकारने देशातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केल्यानंतर, तसेच महामंडळाच्या संचालक बोर्डाने अधिकृत मान्यता दिल्यानंतर ते बदल महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांसाठी उद्या हॅपी स्ट्रीटची ‘ट्रीट’!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोजच्या धावपळीतून येणारे टेन्शन उद्या (७ मे) महाराष्ट्र टाइम्सच्या ‘हॅपी स्ट्रीट’मधून खल्लास होणार आहे. अनेक दिवसांपासून नाशिककरांना या इव्हेंटची उत्सुकता असून, उद्या शमणार आहे. ढोल, ड्रॅगन डान्स, हास्य क्लब, रांगोळी, बासरीवादन अशी मनोरंजनाची मोठी मेजवानीच हॅपी स्ट्रीटमधून मिळणार आहे.

नाशिककरांना रीलॅक्सेशन देण्यासाठी ‘मटा’मार्फत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांचा भाग असलेला ‘हॅपी स्ट्रीट्स’ तुम्हाला देणार आहे धमाल करण्याची अनोखी संधी. सेलिब्र‌िटींच्या खास उपस्थितीत ‘हॅपी स्ट्रीट्स’चा शुभारंभ होणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ रविवारी सकाळी ७.३० ते ९.३० यावेळेत कॉलेजरोडवर उपस्थित राहायचं आहे. टेन्शन, तणाव आणि धावपळ हे टाळून तुम्हाला रस्त्यावर एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ यानिमित्त देणार आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या विविध अॅक्टिव्ह‌िटीजमध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंद लुटू शकता. यावेळेत मॉडेल कॉलनी सर्कल ते बिग बझार सर्कल दरम्यानचा रस्ता फक्त आणि फक्त तुमचा असणार आहे. मॉडेल कॉलनी सर्कलजवळ झुंबा, सेलिब्र‌िटी इंटरअॅक्शन तसेच तेसच ड्रॅगन डान्स होणार आहे. डॉन बॉस्को सर्कलवर हास्यक्लब, एचपीटी कॉलेज गेट ते बीवायके कॉलेज गेट यादरम्यान शिल्पकला, परफॉर्मिंग आर्ट आणि पेंटिंग एग्झिबिशन असणार आहे. विजू सर्कलला ढोल पथक तर एसके रेनबो कलर लॅब ते पंचम हॉटेल या भागात ‘बचपन गली’ असणार आहे. बिग बझार सर्कलला रांगोळी स्पर्धा, बासरी वादन तसेच गिटार वादन होणार आहे.

‘बचपन गली’चे आकर्षण

बचपन गलीमध्ये लहान मुलांचे गेम्स व मॅस्कॉट्सही असणार आहेत. ज्या मुलांना स्केटिंगची आवड आहे त्यांनी स्केटिंग घेऊन यावे. कॉलेजरोडवर होणाऱ्या हॅपी स्ट्रीट मध्ये राजू दाणी आणि ग्रुपतर्फे, नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटींग, कॅनव्हास पेंटींग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटींग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहे. या वेळी उपस्थितांना हे प्रकार करुन घेता येतील. यावेळचे खास आकर्षण राहुल आंबेकर यांचा रॉक बॅण्ड शो होणार आहे. यावेळी इंड‌ियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल प्रकार सादर केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाइल सापडली, वसुली कधी?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातील गहाळ झालेली फाइल तब्बल सहा महिन्यानंतर परत सापडली आहे. यामागे फौजदारी कारवाईचे बालंट टाळण्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे. एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील-भामरे यांनी फाइल गहाळ झाल्यानंतर कडक भूमिका घेत एका अधिकाऱ्याचे निलंबन तर दुसऱ्याची बदली केली. त्यानंतर प्रशासन व गैर उद्योग करणाऱ्या उद्योजकांमध्ये भीती निर्माण झाली आणि या भीतीतूनच ही फाइल सापडली आहे.

एमआयडीसी सर्व्हेअर आर. डी. बकरे यांच्यावर निलंबनाची, तर सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक एन. एस. मांडवडे यांची औरंगाबाद येथे बदली केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्यात ताठर भूमिका प्रादेशिक अधिकाऱ्यांनी घेवून साफसफाई करण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनही ढिसाळ झाले होते. पण फाइल गहाळ प्रकरणात अगोदर पोलिसी खाक्या व नंतर निलंबनाची कारवाईची शिफारस केल्यानंतर हे प्रकरण गंभीर होत गेले. ही फाइल सापडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून, त्याची चौकशी होणार आहे. त्यामागे नेमके काय कारण आहे याचाही शोध आता घेतला जणार आहे. यातील किती कागदपत्रे गायब झाली, ती चोरण्यामागे कोणाचा हात होता, याबाबतही विचारणा करण्यात येणार आहे.


दीड कोटींचे काय?

सातपूर ः अचानक गहाळ झालेली फाइल आलीच कशी, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. तसेच फाइल गहाळ प्रकरणातील कागदपत्रे मिळाली, परंतु दीड कोटींची वसुली कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा चढला...!

0
0

नाशिकचे कमाल तापमान ४१, तर मालेगावचे ४४ अंशांपार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उष्णतेच्या तडाख्याने उत्तर महाराष्ट्रासह राज्य होरपळून निघाले आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगावचे कमाल तापमान ४४ अंशांवर गेले आहे, तर नाशिकमध्येही पारा चाळीशी पार गेला आहे. नाशिकचे कमाल तापमान ४१ अंश, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. राज्यात सर्वा‌धिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४५.२ अंश इतकी झाली.

पंधरा दिवसांपूर्वी नाशिकचा पारा चाळीस अंशाभोवती फिरत होता, तर जिल्ह्यात मालेगाव येथे १८ ‌एप्रिल रोजी उच्चांकी ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून मालेगावचे तापमान पुन्हा वाढले असून, शुक्रवारी पारा ४४ अंशांवर जाऊन पोहोचला. या महिन्यातील तापमानाचा हा उच्चांक आहे. पाऱ्याने पुन्हा एकदा दाहकता दाखवून दिल्याने नागरिकांना उष्म्याने हैराण करून सोडले.

गेल्या आठवड्यात उष्णतेचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, गुरुवारपासून पुन्हा वातावरणात आमूलाग्र बदल जाणवण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या उष्णतेच्या लाटेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. वाढलेल्या उष्णतेने रस्त्यावर शुकशुकट पसरला असून, अनेक नागरिक तर दुपारनंतरच कामे करण्यावर भर देत आहेत. मागील आठवड्यात ३६ अंश सेल्सिअस असलेले तापमान शुक्रवारी ४१ अंश सेल्सिअसवर पोहचले. त्यामुळे नागरिक घरातच रहाणे पसंत करीत आहेत. सकाळी वातावरणात चांगला गारवा असतो. दुपारी बारानंतर मात्र कडक उन्हाने जीव कासावीस होत आहे.

खबरदारीचे आवाहन

कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असतानाच व्हायरल फिव्हर आणि घसादुखीच्या पेशंटमध्ये वाढ झाली आहे. सर्दी, ताप आणि खोकला ही व्हायरल फिव्हरची लक्षणे मुलांमध्ये दिसू लागली असून, तापाच्या पेशंटमध्ये वाढ झाली आहे. दुपारच्या उन्हात फिरल्याने अनेक नागरिकांना जुलाब, उलट्या, ताप, खोकल्याचा त्रास होत आहे. नागरिकांनी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

हे ध्यानात ठेवा

जंक फूड, कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम हे पदार्थ टाळा. घरात तयार केलेले फळांचे ज्यूस, नारळ पाणी आणि माठातील पाणी भरपूर प्या. उन्हात फिरताना तोंडाला आणि डोक्याला फडके बांधा. कलिंगड, ताडगोळे ही उन्हाळ्यात येणारी फळे खा. शक्य असल्यास थंड पाण्याने आंघोळ करा. घाम येतो म्हणून पावडर लावू नका; त्याऐवजी ओल्या कपड्याने अंग पुसा. रात्री शक्यतो पातळ आणि पचायला हलक्या पदार्थांचे सेवन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंजारवाडीचा ओंकार जाणार वॉशिंग्टनला

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

अमेरिकन फॉरेन सर्व्हिसेसच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील वंजारवाडी येथे राहणाऱ्या ओंकार भीमराव मुसळे या विद्यार्थ्याची एक वर्षाकरिता अमेरिकेतील शिक्षणासाठी निवड झाली आहे.
भारत सरकार व अमेरिकन सरकार यांच्या माध्यमातून दरवर्षी संस्कृतीची देवाणघेवाण होण्यासाठी इंटरकल्चर प्रोग्रामच्या माध्यमातून ठराविक विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत असते. यावर्षी महाराष्ट्राच्या मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या शहरांमधून शेकडो विद्यार्थ्यांनी यासाठी परीक्षा दिल्या होत्या. त्यापैकी केवळ ३६ मुलांची निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातून अशा पद्धतीने निवड करण्यात आलेला ओंकार हा सहावा विद्यार्थी ठरला आहे. यासाठी एक समिती विविध शाळांमध्ये भेट देत अंगी नम्रता, बोलणे समोरच्याला पटवून देण्याची पद्धत, स्पष्टवक्तेपणा, संवाद कौशल्य, कष्टातील सातत्य आदी निकष तपासले जातात. नुकताच १० वीची परीक्षा दिलेल्या ओंकारची निवड या समितीद्वारे करण्यात आली. अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. मधील रहिवासी असलेले ‘जेनीत स्नायडर’( होस्ट फॅमिली ) यांनी त्याचे वर्षभरासाठी पालकत्व स्वीकारले आहे. तो तेथे शिक्षण देखील घेणार आहे. त्याला अमेरिकेत शिकविण्यात येणाऱ्या ३६० पैकी ७ विषयांची निवड करून तेथे एक वर्ष तो आपले शिक्षणदेखील चालू ठेवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीविरोधात शेतकरी आ‌क्रमक

0
0

अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच त्यांच्या जमिनी खरेदीची नोटीस सिन्नर आणि इगतपुरीच्या प्रांताधिकाऱ्यांनी काढली आहे. या नोटीसमुळे शेतकऱ्यांची बदनामी आणि मानहानी झाली असून, आम्ही या अधिकाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत, अशी माहिती समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीने दिली.

इगतपुरी आणि सिन्नर येथील प्रांताधिकाऱ्यांनी तीन आणि चार मे रोजी काही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द केली. समृद्धी महामार्गाला शेतकरी विरोध करीत असतानाही खासगी क्षेत्रातील जमिनी खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्यासाठी जमीनमालक आणि हितसंबंधी व्यक्तिंकडून हरकती आणि सूचना या जाहिरातीद्वारे मागविण्यात आल्या आहेत.

यापूर्वी लँड पुलिंग अॅक्टला विरोध करूनही लेखी हरकती नोंदविलेल्या असताना पुन्हा सरकारने नोटीस काढून शेतकऱ्यांना धमकाविण्याचा प्रयत्न केला आहे. महामार्गाबाबतच्या पहिल्या अधिसूचनेमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महामार्ग करीत आहोत असे म्हटले होते. कोणत्या शेतकऱ्यांनी महामार्ग मागितला असा खुलासा शेतकरी संघर्ष समितीने करण्यास सांगितले. मात्र अद्याप हा खुलासा करण्यात आला नाही. हरकती नोंदविणाऱ्या १० जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची आकडेवारी देखील अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. एकीकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्राधिकरणचे अधिकारी राधेश्याम मोपूलवार शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन पर्यायी मार्गाबाबत चर्चा करतात. तर दुसऱ्या बाजूला थेट विक्री व वाटाघाटीची नोटीस प्रसिध्द करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.

उच्च न्यायालयात जाणार!

शेतकरी संघर्ष समितीची बैठक शुक्रवारी आयटक कामगार केंद्रात झाली. बैठकीत खरेदी विक्रीच्या नोटिसीला हरकती नोंदविण्याचे निश्चित करण्यात आले. या नोटिसीनंतर शेतकऱ्यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास प्रशासकीय अधिकारी आणि सरकार जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. सरकारच्या अशा भूमिकेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राजू देसले, अॅड. रतनकुमार इचम, कचरू पाटील, सोमनाथ वाघ, भास्कर गुंजाळ आदींनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांकडूनच नाशिकचा‘कचरा’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील स्वच्छ शहरांच्या सर्व्हेक्षणात नाशिकचा क्रमांक हा १५१ वा लागला असून, समितीने शहराला केवळ ११०६ गुणांकन दिल्यानेच नाशिकने स्वच्छतेत गटांगळी खाल्ली आहे. सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाने स्वच्छतेसंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता, शहराची पाहणी आणि नागरिकांचे फिडबॅक या तीन निकषांवर गुणांकन दिले होते. यात दहा हजार नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मते जाणून घेतली. आरोग्य विभागाच्या तसेच घंटागाडी योजनेच्या सुमार दर्जामुळे यात पालिकेला ६०० पैकी केवळ २७७ गुण मिळाल्यानेच नाशिकचा स्वच्छतेत ‘कचरा’ झाला आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिकचा क्रमांक ३१ वरुन १५१ पर्यंत घसरला आहे. पाचशे शहरांच्या या स्पर्धेत नाशिकची कामगिरी अगदीच सुमार ठरली. त्यामुळे आता पालिकेच्या स्वच्छतेच्या बाबतीतील उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहराच्या आरोग्यावर दरवर्षी जवळपास शंभर कोटींच्या आसपास खर्च केला जात असतानाही पालिकेची कामगिरी यथातथा ठरली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या क्षमतेचीही तपासणी करण्याची गरज आहे. पाचशे शहरांच्या यादीत नाशिकला केवळ ११०६ गुण मिळाले आहेत. दोन हजार गुणांपैकी नाशिक जेमतेम काठावरच पास झाले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाचे कामकाज सुधारण्यासह स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.
तीन निकषांवर सर्वेक्षण
केंद्र सरकारने या शहरांचा दर्जा तपासण्यासाठी तीन निकष ठरवले होते. पहिला स्वच्छतेसंदर्भात केलेल्या उपाययोजनांचे कागदोपत्री पुरावे, दुसरे शहराची प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी आणि तिसरा सर्वात महत्वाचा नागरिकांची मते. यात पहिल्या निकषात पालिकेला ९०० पैकी ५३५ गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या निकषात ५०० पैकी २९१ गुण मिळाले आहेत. नागरिकांच्या फिडबॅकमध्ये पालिकेला निम्म्यापेक्षा कमी गुण मिळाले आहेत. पथकाकडे नाशिक महापालिकेने दहा हजार नागरिकांचे फोन नंबर दिले होते. या नागरिकांना महापालिकेच्या स्वच्छता उपायजोजनांची माहिती विचारण्यात आली. यासाठी ६०० गुण होते. प्रत्यक्षात पालिकेला केवळ २७७ गुण मिळाल्याने पालिकेचा क्रमांक घसरला आहे. नागरिकांनीच पालिकेच्या स्वच्छतेसंदर्भातील उपाययोजनांना नापास ठरविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिठाई दुकान आगीत भस्मसात

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शहरातील विंचूर रोडवरील ‘ममता स्वीट्स’ दुकानाला शुक्रवारी पहाटे आग लागली. येवला व मनमाड नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांनी दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळव‌िले. या आगीत संपूर्ण दुकान खाक होवून यात सहा लाखांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

जनता विदयालयासमोरील हिंमतभाई मेढतीया (रा. गुजरात) यांचे ममता स्वीट्स या दुकानास शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातील किमती फर्निचरसह मिठाई व इतर माल आगीत जळून खाक झाला. दुकानाच्या खालील मजल्यावर एका कोपऱ्यात लागलेल्या आगीने पेट घेतला. उष्णता जाणवल्याने दुकानाच्या वरच्या मजल्यावर झोपलेले कर्मचारी खडबडून जागे झाले. हे सर्व कर्मचारी सुखरूप बाहेर पडतानाच घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी सहाय्यक पोल‌िस निरीक्षक विश्वास निंबाळकर यांनी माहिती दिली. येवला व मनमाड येथील पालिकेच्या अग्निशमनचे बंब पहाटे सव्वाचारच्या सुमारास दाखल झाले. तोपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता. सकाळी पावणेसहाला ही आग आटोक्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोडशेडिंगने हाल बेहाल...

0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्यातील बहुतांश वीजनिर्मिती संच बंद पडल्याने विजेच्या उपलब्धतेत मोठी घट निर्माण झाली आहे. परिणामी संपूर्ण राज्यासह जिल्हावासीयांवर भडकलेल्या तापमानाच्या कालावधीतच लोडशेडिंगचे चटके सहन करण्याची वेळ आली आहे. नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक उन्हाच्या झळांसोबतच महावितरणच्या लोडशेडिंगमुळे घामाघूम झाले आहेत.


मागणी-निर्मिती तफावत

संपूर्ण राज्यात तापमानात वाढ होत असल्याने विजेच्या मागणीने अचानक मोठी उसळी घेतली आहे. विजेचा वापर वाढल्याने राज्याला सुमारे १८,००० ते १८,५०० मेगावॅट विजेची गरज निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल दोन हजार मेगावॅट विजेची मागणी वाढली आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश वीजनिर्मिती केंद्रांतील वीजनिर्मिती संच बंद पडल्याने राज्यात तब्बल ३००० मेगावॅट इतका तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीत मात्र दररोज वाढ होत असताना उपलब्धतेत वाढ होत नसल्याने महावितरणकडून राज्यभरात १५०० मेगावॅटचे तात्पुरते भारनियमन केले जात आहे. विजेच्या पुरेशा उपलब्धतेअभावी नाशिक शहरासह व जिल्ह्याला या लोडशेडिंगचे चटके सहन करावे लागत आहेत.


पिकांची होरपळ

राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणमार्फत नाशिक शहरात काही भागात दोन तासांचे, तर जिल्ह्यात तब्बल आठ तासांचे लोडशेडिंग केले जात आहे. त्याशिवाय तेथे नियोजित लोडशेडिंगही सुरू आहे. जिल्ह्याला दररोज ९०० ते १००० मेगावॅट विजेची गरज असते. परंतु, विजेच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात आठ तासांपेक्षा जास्त कालावधीचे लोडशेडिंग होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरीही कासावीस झाले आहेत. पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने पिकांचीही होरपळ सुरू झाली आहे. रात्रीच्या वेळी तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना अंधारातच पिकांना पाणी द्यावे लागत आहे.


येथे ठप्प झालीय वीजनिर्मिती

महानिर्मितीचा कोराडी केंद्रातील संच क्रमांक १०, खापरखेडा संच क्रमांक २, परळी संच क्रमांक ८ याशिवाय अदानी संच क्रमांक १, रतन इंडियाचे संच क्रमांक ४ व ५ तांत्रिक कारणांमुळे बंद पडले असल्याने या ठिकाणी वीजनिर्मिती कमी होत आहे. याशिवाय देखभाल व दुरुस्तीकामी चंद्रपूर संच क्रमांक ७, कोराडी संच क्रमांक ६ केंद्राकडून मिळणारा सिपत संच क्रमांक १ व तारापूर संच क्रमांक ४ हे संच अगोदरच बंद करण्यात आलेले आहेत. नाशिकच्या एकलहरे वीजनिर्मिती केंद्रातील पाच संचांपैकी १४० मेगावॅटचे दोन संच काही वर्षांपूर्वीच बंद झालेले आहेत. उर्वरित ३ संचांपैकी २१० मेगावॅटचे दोन संच सुरू आहेत. महावितरणकडून विजेची मागणी वाढल्यास तिसरा संच सुरू केला जातो. गेल्या आठवड्यात हा तिसरा संच सुरू केल्याची माहिती महानिर्मितीचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडला विवाहितेचा बाळासह जळून मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील ननावे येथील विवाहित महिलेचा व तिच्या चार महिन्यांच्या बाळाचा शुक्रवारी राहत्या घरात जळून मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे, की घातपात याचा पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसांनी विवाहितेचा पती, सासू, सासरे व नणंद यांच्या विरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चांदवड तालुक्यातील ननावे येथील विवाहिता अर्चना ज्ञानेश्वर आहेर (वय २५) व तिचा अवघ्या चार महिन्यांचा मुलगा प्रणव यांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत शुक्रवारी दुपारी राहत्या घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आहेर कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. ते घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच, अर्चनाच्या वडिलांना कळवले. स्वतः पोलिस ठाण्यात त्यांनी धाव घेतली. मात्र, अर्चनाचे वडील मधुकर ठाकरे (रा. गणूर) यांच्यासह अर्चनाच्या माहेरच्या मंडळींनी हा घातपाताचा प्रकार असून, अर्चना व प्रणव यांना पतीसह सासरच्या मंडळींनी जाळून मारल्याचा आरोप करीत आक्रमक भूमिका घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज खंडित करणे बेकायदेशीरच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालखेड कालव्यातून सोडलेल्या पाण्याची चोरी होऊ नये यासाठी बेकायदेशीरित्या वीज पुरवठा खंड‌ित करून निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच जनावरांचे पाणी मिळावे म्हणून दिवसातून किमान चार तास अखंड‌ित विद्युत पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी आमदार अनिल कदम यांनी केली आहे.

येवला, मनमाड नगर परिषद, मनमाड रेल्वे, लासलगाव, निफाडमधील काही प्रासंगिक गावांना दरवर्षी पालखेड कालव्यामधून पाणी आरक्षित केले जाते. हे पाणी सोडण्यात आले असून ते चोरीस जाऊ नये यासाठी प्रशासनाने या कालव्याच्या मार्गावरील गावांमधील विद्युत पुरवठा खंड‌ित केला आहे. परंतु पालखेड डाव्या आवर्तनाचे कारण देऊन खंड‌ित केलेला विद्युत पुरवठा बेकायदेशीर आहे. हा विद्युत पुरवठा तत्काळ पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यासाठी आमदार कदम यांनी शेतकऱ्यांसह शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. विद्युत अधिनियम २००३ प्रमाणे नियमित विज बिल भरणा करत असलेल्या ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंड‌ित करता येत नाही. तरीही निफाड उपविभागात सहा आणि पिंपळगाव उपविभागात चार फिडरचा विद्युत पुरवठा खंड‌ित केला असून ही बाब पूर्णत: बेकायदेशीर आहे, असे कदम आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. विद्युत पुरवठा खंड‌ित करण्यापूर्वी संबंध‌ित ग्राहकाला लेखी नोटीस देणे बंधनकारक असते. मात्र शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देताच पुरवठा खंड‌ित केल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. विद्युत मोटारी तीन फेजच्या असतात. सिंगल फेजवर त्या चालू शकत नाहीत. असे असतानाही ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी सिंगल फेजींग विद्युत पुरवठा खंड‌ित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शनिवारी येवला, मनमाडचे आवर्तन बंद करण्यात येणार असून, निफाड तालुक्यातील काही प्रासंगिक गावांसाठी आवर्तन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त पदे भरा; अन्यथा आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

येथील ट्रॉमा केअर युनिट सुरू करून ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत अशी मागणी आमदार दीप‌िका चव्हाण यांनी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे केली आहे.

सटाणा राष्ट्रीय महामार्गावरील शहर आहे. या महामार्गावर सतत अपघात होत असतात. त्यामुळे शासनाने या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरला मान्यता दिली. गत आठ वर्षांपासून या सेंटरची सुसज्ज इमारत तयार आहे. त्यासठी लागणारे संपूर्ण उपकरणेही आहेत. मात्र पदे न भरल्यामुळे इमारत व वैद्यकिय उपकरणे पडून आहेत. ट्रॉमा केअर सेंटरमधील वैद्यकिय अधिकाऱ्यांची तीन पदे, अस्थिरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वाहन चालक, परिसेविका, सपाई कामगार अशी पदे मंजून आहेत. मात्र यातील एकही पद न भरल्यामुळे हे सेंटर बंद आहे. ट्रॉमा केअर सोबतच सटाणा ग्रामीण रुग्णालयाचे तब्बल दहा वर्षांपासून वैद्यकिय अधीक्षक व वैद्यकिय अधिकारी हे पद रिक्त आहेत. वैद्यकिय अधीक्षक, वैद्यकिय अधिकारी (३), वाहन चालक, शिपाई, सपाई कामागर, कक्ष सेवक ही पदे रिक्त आहेत. ही पदे न भरल्यास आंदोलनाचा चव्हाण यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुसुमाग्रज’मध्ये आज ‘पार्कातल्या कविता’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई, ठाणे, पुणे येथील प्रयोग गाजवून ‘पार्कातल्या कविता’ या आगळ्यावेगळ्या काव्य मैफलीचा सहावा प्रयोग शनिवारी गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुळात एखादी कविता ही त्या कवीकडून सादर होताना ऐकणे हा रसिकांना मुग्ध करणारा अनुभव असतो. हाच अनुभव नाशिककरांना शनिवारी मिळणार आहे.

‘पार्कातल्या कविता’ या बहारदार काव्य मैफलीची संकल्पना स्वरूपा सामंत आणि विजय उतेकर यांची आहे. निसर्गाच्या सानिध्यात अतिशय अनौपचारिक पद्धतीने रंगणारी ही काव्य मैफिल निवडक कवींच्या काव्य सादरीकरणाने खुलणार आहे. नाशिकमधील प्रयोगात कमलाकर देसले, प्राजक्त देशमुख, सुप्रिया जाधव, प्रथमेश पाठक, जयश्री कुलकर्णी, सत्यजित पाटील, नीलेश गायधनी, अभिजित शिंदे, आकाश कंकाल, प्रशांत केंदाळे, तुकाराम धांडे तसेच संतोष वाटपाडे हे कवी स्वरचित दोन दोन रचना सादर करतील. या व्यतिरिक्त या कार्यक्रमात एका ज्येष्ठ कवीच्या साहित्यिक प्रवासाबद्दल माहिती देऊन त्यांच्या दोन रचना सादर केल्या जातात. गझलउन्मेष पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गझलकार सदानंद बेंद्रे सूत्रसंचालन करणार आहेत. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडखोरी टाळण्यासाठी दुपारनंतरच एबी फॉर्म

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज (दि. ६) शेवटची मुदत असून, काँग्रेसचा अपवाद वगळता एकही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. एका प्रभागात प्रत्येकी चार जागा असून, इच्छुकांची गर्दी झाल्याने सर्वच पक्षांना बंडखोरीची भीती असल्याने कुणाची उमेदवारी फायनल आणि कुणाचा पत्ता कट? याबाबत सर्वच पक्षांमध्ये सस्पेन्स कायम आहे. शनिवारी दुपारपर्यंत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आधीच आपल्या ५५ उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. मात्र त्यातही कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. शहराच्या पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दल यांची युती झाली असून, या भागातील ६४ पैकी ४८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर १६ जागा जनता दल लढविणार आहे. मात्र कोणत्या जागा कुणाला द्यायच्या याबाबत संभ्रम कायम आहे. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने युतीबाबत नाराज असलेल्या उमेदवारांकडून बंडखोरी होवू शकते.

पश्चिममध्ये सेना-भाजपमध्ये लढत

पश्चिम भागात शिवसेना व भाजप यांच्यात लढत असून, दोन्ही पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नाही. शिवसेनेची शुकवारी रात्री उशिरा बैठक होणार असून, त्यात अंतिम निर्णय घेण्यात येईल. निश्चित उमेदवारांना शनिवारी एबी फॉर्म वाटप करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना २४ जागांवर उमेदवार देणार असून, सर्वच प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार निश्चित करताना पक्षाची दमछाक होणार आहे. बंडखोरांना थांबवण्याचे मोठे सेनेसमोर आव्हान आहे. तर भाजपकडून ८० हून अधिक जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. तसेच सर्वच राजकीय पक्षातील मातब्बर उमेदवारांना आपल्या गोटात ओढण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेला शह देण्यासाठी ही खेळी केली जात आहे. पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी मुस्ल‌िम महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यामुळे पूर्व भागातून देखील भाजप उमेदवार देणार आहे. याचा फटका काँग्रेससह अन्य पक्षांना बसू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालखेडचे पाणी पेटले...

0
0

सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांकडून अंदरसूलला ‘चक्का जाम’

म. टा. वृत्तसेवा, येवला

पालखेड पाटबंधारे विभागाच्या वतीने सोडण्यात आलेल्या आवर्तनातून तालुक्यातील अंदरसूलसह कोळगंगा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी अंदरसूल येथील नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावर संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी ‘चक्का जाम’ आंदोलन केले. तळपत्या उन्हाची पर्वा न करता सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, परिसरातील ग्रामस्थांनी तब्बल तीन तास रस्त्यावर ठाण मांडले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलक मागणीवर ठाम असल्यामुळे अखेर पोलिसांनी त्यांना पोल‌िस व्हॅनमध्ये टाकत मार्ग मोकळा केला.

पालखेड पाटबंधारे विभागाच्या वतीने पालखेड डाव्या कालव्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सध्या निफाड तालुक्यासह येवला शहर, येवला तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मनमाड नगरपालिका तसेच येवला तालुक्यातील काही गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने येवला तालुक्यातील पाणी आरक्षण करताना यंदा तालुक्यातील अनेक गावे वगळल्याने गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. वगळण्यात आलेल्या गावांमध्ये अंदरसूलसह परिसरातील कोळगंगा नदीवरील बंधारे असलेल्या गावांचा समावेश आहे. या गावातील संतप्त नागरिकांनी या आवर्तनातून अंदरसूलसह कोळगंगा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी काही दिवस पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाची दारे झिजवूनही त्यांच्या पदरी घोर निराशा पडली.

या सरकारचं करायचं काय…

अंदरसूलसह परिसरातील संतप्त जनता शनिवारी (दि. ६) रस्त्यावर उतरली. सकाळी साडेनऊच्या सुमारास अंदरसूल येथून जाणाऱ्या नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावर ठिय्या दिला. ‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘हक्काचं पाणी मिळालेच पाहिजे’, ‘कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय हटणार नाही’, ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं-वर पाय’, अशा जोरदार घोषणा देत जवळपास तीनशेच्या वर आंदोलकांनी महामार्गावर ठाण मांडले. जोपर्यंत पाणी सोडले जात नाही अथवा लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

प्रांताधिकारीही परतले…

आंदोलकांची आक्रमकता अन् वाढत जाणारी संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून तालुका पोल‌िस स्टेशनचे निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्यासह इतर दोन पोल‌िस अधिकारी तसेच ३० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आंदोलनस्थळी हजर होता. आंदोलनस्थळावरून हटण्याची पोलिसांची विनंती धुडकावून लावत आंदोलक भूमिकेवर ठाम राहिले. साडेअकराच्या सुमारास येवला प्रांताधिकारी वासंती माळी व निवासी नायब तहसीलदार सविता पठारे यांनी आंदोलन थांबविण्याची विनंती केली. मात्र त्यांनाही आल्या पावली माघारी फिरावे लागले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख झुंजारराव देशमुख, बाजार समिती संचालक मकरंद सोनवणे, पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत, रिपाइंचे संजय पगारे, अरुण काळे, जि. प. चे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अमोल सोनवणे, वाल्मिक शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.

पालकमंत्र्यांना आत्मीयता नाही…

चालू आवर्तनातून पाणी न दिल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच पालकमंत्र्यांना येवला तालुक्याबद्दल कुठलीही आत्मीयता नसल्याचे त्यांच्या भूमिकेवरून दिसत असल्याचा टोलाही आंदोलकांनी लगावला. आंदोलक मागे हटत नसल्यामुळे पावणेतीन तासानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आंदोलकांना तालुका पोल‌िस ठाण्यात आणून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

दुसरीकडेही आंदोलन

महामार्गावरील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, त्याचवेळी शेकडो संतप्त युवा आंदोलकांनी दुसऱ्या बाजूला गावातील दुर्गामाता मंदिरासमोर याच राज्य महामार्गावर गनिमी कावा वापरून आंदोलन सुरू केले. या आंदोलकांनी राज्य महामार्गावर टायर पेटवून ‘चक्का जाम’ केला. याठिकाणीही काही आंदोलकांना ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.

त्या गावांवर अन्याय

या कालव्यामार्फत गेल्या ३६ वर्षांपासून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून कोळगंगा नदीवरील बंधारे भरून दिले जात होते. यावर्षी मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक कोळगंगेसहीत १३ गावांचे आरक्षण रद्द केले. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळेच या या गावांना आरक्षणामधून वगळण्यात आल्याचा आरोप या भागातील ग्रामस्थांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोडल सेंटरसाठी प्रयत्न’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थिदशेत करिअर घडविण्याकडे विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष देणे आवश्यक असून, करिअर निवडताना योग्य दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. नाशिकमध्ये इतर ठिकाणांहूनदेखील विद्यार्थी शिक्षणासाठी, रोजगारासाठी येत असून, अशांसाठी रोजगाराचे, स्वयंरोजगाराचे नोडल सेंटर करता येईल का, यासाठी प्रशासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले.

कुसुमाग्रज स्मारकात ‘एक्सप्लोर २०१७’ या दोनदिवसीय शैक्षणिक प्रदर्शनाचे व सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. ते म्हणाले, की विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन मिळावे यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. केवळ जिल्हास्तरावर नाही, तर तालुका स्तरावरदेखील असे उपक्रम कशा पद्धतीने पोहोचवले जातील, यासाठीदेखील प्रशासन प्रयत्न करेल.

करिअर कॉर्नरचे संस्थापक ऋषिकेश हुंबे यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ इंजिनीअरिंग व मेडिकल याच क्षेत्रांकडे न बघता आर्टस, कॉमर्स, सायन्स या पारंपरिक शाखांमध्येही किती नानाविध प्रकारच्या करिअरच्या संधी आहेत, हे जाणून घेतले पाहिजे. या क्षेत्रांमध्ये दोनशेहून जास्त करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. याबरोबरच डिझाइन, फॅशन, अॅनिमेशन यामधील संधी, या अभ्यासक्रमांची भविष्यातील स्थिती यावरदेखील त्यांनी मार्गदर्शन केले. इंजिनीअरिंग, डिझाइन, मॅनेजमेंट, लॉ, मेडिकल यातील सखोल माहितीही त्यांनी दिली.

समीर पारकर यांनी डिझाइन करिअरमधील संधी या विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाइन या क्षेत्रासाठी मोठ्या संधी असल्याचे ते म्हणाले. आजच्या काळात नोकरी सुरक्षित असेल, अशा क्षेत्राकडे विद्यार्थी, पालकांचा कल दिसतो. डिझाइन क्षेत्रातही ही सुरक्षितता असल्याचे ते म्हणाले. याशिवाय, नाशिक हे शहर सगळ्या क्षेत्रांत विकास करीत असताना डिझाइनमध्येही येथे विकास घडावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

--

पदवीनंतरच्या करिअरवर आज मार्गदर्शन

आज, रविवारी (दि. ७ मे) सकाळी पदवीनंतरचे करिअर, डिझाइन करिअरमधील संधी, सिव्हिल सव्हिर्सेस यातील करिअरविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार असून, हे सेमिनार सर्वांसाठी विनामूल्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस शिक्षक भरतीसाठी मोठी आर्थिक उलाढाल?

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून ५४ शिक्षक मान्यता दिल्याप्रकरणी धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील रवींद्र भटू बेडसे या लिपिकास नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी निलंबित केले. या कारवाईमुळे धुळे जि. प. मध्ये मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो. या प्रकरणात गैरमार्गाने शिक्षक मान्यतेसाठी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेत कार्यरत जी. के. पाडवी व डॉ. राहुल चौधरी या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये कार्यरत ५४ शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिल्याची तक्रार तत्कालीन आमदार अनिल गोटे यांनी लिपिक रवींद्र बेडसे याच्याविरोधात राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. शिक्षण खात्याने नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी यासाठी बेडसे याच्यावर निलंबनाची कारवाई झाली.

विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या या धडक कारवाईमुळे शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. धुळे जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बोगस वैयक्तिक मान्यतेचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाई आढावा बैठकीत अधिकारी धारेवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यात पाणीपुरवठ्याच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही अनेक गावांपर्यंत पाण्याचे टँकर पोहोचलेले नाहीत, पाणीप्रश्नाबाबत नागरिकांच्या समस्या प्रशासकीय अधिकार समजून घेत नाहीत, टंचाई आराखड्याबाबत अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित करत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना येथील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे आणि उपाध्यक्षा नयना गावित यांनी त्र्यंबक पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व खात्यांच्या कारभाराबाबत आढावा बैठक घेतली. ब्रह्माव्हॅली कॅम्पसमध्ये शुक्रवारी (दि.५) ही आढावा बैठक झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, यतीन पगार, गटविकसाधिकारी मधुकर मुरकुटे, सभापती ज्योती राऊत, उपसभापती रवींद्र भोये, जि. प. सदस्या मनिषा पवार, रुपांजली माळेकर, शकुंतला डगळे, रमेश बरफ, पं. स. सदस्य देवराम मौळे, अलका झोले, मनाबाई भस्मे उपस्थित होते.

अध्यक्षा सांगळे म्हणाले, यापुढे टंचाई आराखडा तयार करताना भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सूक्ष्म कृती आराखडा तयार करावा, असे सांगूनही पंचायत समितीचे अधिकारी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करीत नाहीत. पाणीटंचाई बाबत तालुक्यातील सरपंच, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची दखल प्रशासनाने घ्यावी. त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी दुर्गम आहे.

शासकीय सेवा सवलतीपासून आदिवासी बांधवांना तुम्ही वंचित ठेऊ नका, असेही त्यांनी सांगितले. रूपांजली माळेकर यांनी हरसूल, ठाणापाडाच्या भूगर्भात पाणी कमी आहे. त्यामुळे या भागात मध्यम स्वरुपाचे प्रकल्प, पाझर तलाव निर्माण करून पाणीपुरवठा योजना राबव‌िल्यास टंचाई दूर होईल असे मत मांडले. बाफनविहीर येथील भारत निर्माण योजनेतील कामांचे अद्याप ऑड‌िटच झाले नसल्याची तक्रार सरपंच दळवी यांनी केली. वाघेरा येथील आश्रम शाळेत स्थानिकांना प्राधान्य न देता गुजरात हद्दीवरील गावातील मुलांना प्रवेश दिला जातो, असे सरपंच जयराम मोंढे यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी यांना संबंधित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास अगोदर स्थानिकांना प्रवेश देण्याबाबत कळवावे, असे सांगितले. हागदारी मुक्त गाव यावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल तोरंगण (त्र्यंबक) येथील ग्रामसेवकाचा सत्कार करण्यात आला.

तहसीलदार गैरहजर

आढावा बैठकीस तहसीलदारांसह त्यांच्या कार्यालयाचे प्रतिनिधीही उपस्थित नव्हते. याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंताही या बैठकीस गैरहजर होते. बैठकीसाठी उपमुख्य अधिकारी (ग्रामपंचायत ) राजेंद्र पाटील, सी. डी. वाघमारे, पशुधन अधिकारी डॉ. प्रशांत फलक आदी उपस्थित होते.

गावित यांनी उपस्थित केले प्रश्न

उपाध्यक्षा नयना गावित यांनी पाणीटंचाईबाबत गांभीर्य न बाळगणाऱ्यांच्या कारभारवर बोट ठेवले. टंचाईग्रस्त वाड्या-पाड्यांवर टँकर देताना चढावामुळे टँकर वर जात नाही, अशी अडचण प्रशासन मांडते. मग अशावेळी त्या गावांना तुम्ही पाणी कसे देता, असा सवाल गावित यांनी उपस्थित केला. या संपूर्ण आढावा बैठकीत उपाध्यक्ष नयना गावित यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. विनायक माळेकर, प्रकाश नंदनवरे, सरपंच जयराम मोंढे आदींसह जि. प. सदस्या रुपांजली माळेकर यांनी चर्चेत सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा नगरपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध!

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा नगरपंचायतीच्या प्रभाग १४ मधील एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी यमुनाबाई धनाजी आहेर यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्याने एकाच कुटुंबातील दोघींचेच (सासू-सून) उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा परिषदेचे माजी सभापती केदा आहेर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आहेर नगरसेविका पदासाठी आई आणि भावजयी यापैकी कुणाला संधी देतात हे माघारीनंतर (दि.११) कळणार आहे. पोटनिवडणुकीसाठी मूलकनबाई तानाजी आहेर, जोत्स्ना संजय आहेर, यमुनाबाई धनाजी आहेर असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्जाची छानणी होऊन यमुनाबाई आहेर यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. आहेर यांच्या मातोश्री मूलकनबाई आहेर व भावजयी जोत्स्ना आहेर यांचेच अर्ज शिल्लक आहेत.

बागलाणमध्ये पोटनिवडणूक

सटाणा : बागलाण तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका २१ मे रोजी होणार असल्याची माहिती तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी दिली. अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. आनंदपूर, आखतवाडे, खामलोण, अलियाबाद, अंबापूर, विसापूर, बोरदैवत, निताणे, करंजाड, भिलवड, दसवेल, तुंगणदिगर, भडाणे, वाडीपिसोळ, शेवरे, मोरकुरे, भवाडे, नवेगाव, मुळाणे, मळगाव खुर्द, मोराणे सांडस, बिजोरसे, इजमाने, जोरण, निकवेल, कपालेश्वर, करंजखेड, सुराणे, कऱ्हे, कोळीपाडा, वायगाव, किकवारी खुर्द, तळवाडे दिगर, लखमापूर, यशवंतनगर आदी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images