Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सरकारवाड्यात उलगडले पेशवाईचे अंतरंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा सरकारवाडा वाडासंस्कृती अन् काष्ठशिल्पांच्या कलाकृतीचे शहराचा इतिहास, राजकीय, सामाजिक चळवळींचे प्रतिक आहे. ही वास्तू पेशवाईची शान दाखविते. पुण्यासाठी शनिवारवाड्याचे जसे महत्त्व आहे तसेच नाशिकसाठी सरकारवाड्याचे असायला हवे यासाठी नाशिककरांनी लोकचळवळ उभारत सरकारवाड्यासाठी लढाही दिला अन् आज या लढ्याला यश येऊ लागले आहे. हे पाहताना नाशिककर अंतर्मुख तर झालेच, पण गेल्या अनेक वर्षांपासून ज्या वाड्याबद्दल फक्त ऐकले जाते अथवा लांबून त्यांच्या पाहण्याचाच योग येतो, त्या वास्तूत ‘मटा हेरिटेज वॉक’निमित्त पेशवाईचे अंतरंगही उलगडून पाहता आले.

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे रविवारी आयोजित केलेल्या हेरिटेज वॉकमध्ये दोनशेहून अधिक नाशिककरांनी सहभाग घेतला होता. सकाळी साडेआठ वाजता वॉकमध्ये सहभागी झालेल्या अबालवृद्धांना सरकारवाड्याची इत्थंभूत माहिती करून देण्यासाठी ८५ वर्षांचे चिरतरुण अण्णा बेळे उपस्थित होते. खणखणीत आवाज अन् सरकारवाडा पुन्हा उभा रहावा, या तळमळीने त्यांच्या टीमने केलेले प्रयत्न अण्णांनी विषद केले. एवढेच नव्हे तर सरकारवाड्याचा इतिहास, काष्ठशिल्पांच्या वैशिष्ट्यांसह बारीकसारीक माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. हा संवाद थक्क करणारा होता. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी अण्णांच्या व त्यांच्या टीमचे कौतुक केले. त्यानंतर पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे यांनी पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात सरकारवाडा आल्यापासून पुन्हा नव्याने त्याची उभारणी कशा पद्धतीने झाली, लाकूडकाम, कारागीर, सरकारवाड्यातील दरबार हॉल याची माहिती देत भविष्यात कोठे काय काय करण्याची त्यांची कल्पना आहे हे देखील सांगितले. यावेळी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सहायक पुरातत्त्ववेत्ता अमोल गोटे, जतन सहायक रमेश कुलकर्णी, वास्तू विशारद कासार पाटील, सचिन पगारे, किशोर बच्छाव, सुनील गोराडे यांनीही उपस्थितांना सरकारवाडा फिरवून दाखवित मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्याला अवकाळी, गारपिटीचा तडाखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात सटाणा, देवळा, नांदगाव, चांदवड, सिन्नर, येवला आणि निफाड या तालुक्यांना रविवारी वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस गारपिटीचा तडाखा बसला. काही ठिकाणी हलकासा शिडकावा झाला असला तरी सटाण्यासह आणखी काही ठिकाणी वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज अंगावर पडून कळवण आणि देवळ्यात प्रत्येकी चार आणि सटाण्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला, तर देवळा तालुक्यात सात जण जखमी झाले.

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना रविवारी पावसाची काहीशी चाहूल लागली होती. मात्र, तो धुव्वाधार बरसेल याचा अंदाज नसल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सटाणा तालुक्यात अवकाळीबरोबरच गारपिटीचाही तडाखा बसला. अवघ्या दहा मिनिटांत गारांचा खच साचला होता. नामपूर, कन्धाने परिसरात गारपिटीमुळे कांदा, डाळिंब, टोमॅटो, पपईसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. करंजाड, पिंगळवाड, निताणे, आसखेडा, वनोली, वीरगाव येथे शेती पाण्याखाली गेली. कोटबेल येथे दोन शेळ्या ठार झाल्या तर एका गावात घराचे पत्रे उडाले.

निफाड तालुक्यातील चितेगाव, चेहेडी, खेरवाडी या भागात वादळी वाऱ्यासह गारा पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे, तसेच चाळींमध्ये साठविलेल्या कांद्याचेही मोठे नुकसान झाले. द्राक्षबागांनाही पावसाचा फटका बसला. लासलगाव, विंचूर परिसरात कांदा, डाळिंब, उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उगाव, शिवडी, वनसगाव या तालुक्याच्या उत्तर पट्ट्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. देवळ्यातही धुव्वाधार पाऊस झाला असून, नुकसानीचा नेमका अंदाज येऊ शकलेला नाही. चांदवड शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली. मनमाडमध्ये दुपारी तीननंतर वादळी वाऱ्याने विक्रेते व ग्राहकांची धांदल उडवली. येवला शहर व तालुक्यात सव्वाचारच्या सुमारास काही ठिकाणी पाच मिनिटे पावसाचा हलकासा शिडकावा झाला. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे ढगाळ वातावरणामुळे धाबे दणाणले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

नाशिकमध्ये हलक्या सरी

शहरात दुपारपासून ढगाळ वातावरण होते. इंदिरानगर, सिडको परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर सायंकाळनंतर गारठा वाढला. पावसाच्या शक्यतेमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. उष्म्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले.

देवळ्यात तीन बालकांसह सात जखमी

देवळा तालुक्यात झिरे पिंपळे येथे वीज अंगावर पडून एकनाथ यशवंत सोनवणे हा तरुण जखमी झाला. याच गावात प्रमिला हिरामण आहेर (वय ३५), कुणाल हेमंत आहेर (७), कल्याणी हेमंत आहेर (५), माऊ दीपक आहेर (४) या एकाच कुटुंबातील चार घरांची भिंत अंगावर पडून जखमी झाले. तालुक्यात माधुरी पवार (२५) आणि सीमा सचिन जाधव (३५) यादेखील जखमी झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाश्‍ाा रस्त्याचे अडले घोडे!

$
0
0

सटाणावासीयांची पुन्हा कोंडी

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातून जाणारा विंचूर-शहादा-प्रकाशा राज्य महामार्ग क्र. ७ हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ जी म्हणून घोषित करण्यात आल्याची अधिसूचना नुकतीच करण्यात आली. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित सटाणा शहर बाह्यवळण रस्त्याच्या कामाची पुढील कार्यवाही आता पुन्हा लांबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत या रस्त्याचे काम होणार असल्याने या रस्त्यावर अद्याप किती जणांचा बळी जाणार, असा सवाल सटाणावासियांनी केला आहे. यामुळे ‘घरचेच झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे’, अशी अवस्था सटाणा शहरवासीयांची झाली आहे.

सटाणा शहरातून जाणारा राज्य महामार्ग क्र. ७ हा गुजरात राज्याला जोडणारा अत्यंत जवळचा रस्ता आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत असते, त्यामुळे अनेकदा लहान मोठ्या स्वरूपांचे अपघात होवून अनेकांना मृत्यू झाला आहे. इतकेच नव्हे तर गत वर्षभरात तब्बल दोनवेळा ऐन मध्यवर्ती शहरात राज्य महामार्गावर गॅसचे टँकर उलटून मोठा प्रसंग ओढावल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर सटाणा शहराला पूर्व व पश्चिम बाजूकडून वळण रस्ता व्हावा, यासाठी शहरातील अनेकवेळा विविध संघटनांनी सनदशीर मार्गाने आंदोलनेही केलेली आहेत. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तत्कालीन आमदार संजय चव्हाण, विद्यमान आमदार दीपिका चव्हाण, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी वेळोवेळी उच्चस्तरीय बैठका घेऊन बाह्यवळण रस्त्यांच्या कामास गती देण्याची भूमिका घेतली होती. सरकारने त्या वळण रस्त्यांच्या कामास मंजुरीदेखील दिली मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाल्याने आता सटाणा शहरातील हा महत्त्वाचा रस्ता अडगळीत सापडला आहे.

बायपासचे स्वप्न भंगले

उपरोक्त राज्य महामार्ग क्र. ७ ला मध्यप्रदेश व कर्नाटक राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ जी खेतीया (मध्यप्रदेश), शहादा, प्रकाशा, नंदुरबार, विसरवाडी, साक्री, सटाणा, देवळा, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, शिर्डी, अहमदनगर, दौंड, फलटण, विटा, तासगाव, मिरज व चिकोडी (कर्नाटक) या राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला आहे. बाह्यवळण रस्त्यांच्या कामास गती मिळण्यासाठी आमदार दीपीका चव्हाण यांनी गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचना मांडून अंदाजपत्रकात कामाचा समावेश न झाल्याबाबत विचारणा केली होती. या उत्तरादखल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारत सरकारच्या दि. ३ जानेवारी २०१७ रोजीचे अधिसूचनेची प्रत आमदार चव्हाण यांना दिली. यामुळे सटाणा शहरवासियांचे बायपासचे स्वप्न आता भंगले असून, किंबहुना राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याने शहरवासीयांना केंद्राकडे पाठपुरावा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपूर्ण कर्जमाफीसाठी आज लाक्षणिक उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सत्तेवर येताच शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याची घोषणा करणाऱ्या युती सरकारने घोषणेची पूर्तता करीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, यासह ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे बंद असलेले काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी आज (दि. १) लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. शासन व शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कळवण तहसीलदार कार्यालयात फडकणाऱ्या तिरंगा झेंड्याखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार हे उपोषण करणार आहेत.

गेली ४ वर्षे सतत शेतकरी हा दुष्काळाशी सामना करत आहे. त्याची कांदा, टोमॅटो, भाजीपाला व इतर शेत पिके कवडीमोल भावाने विकले जात असल्याने तो मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारला शेतकरी बांधवांशी काही देणेघेणे नसून, संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. शेतमालाला भाव द्यावा. ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्प ही एकमेव मोठी सिंचन योजना असून, ४५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या या प्रकल्पातून पाण्याची गळती होत असल्याने केवळ ३० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे दुरुस्ती व सुधारणा काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी या परिसरातील आदिवासी, शेतकरी व सर्वसामान्य जनतेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.

उपोषणाला ओतूर व परिसरातील शेतकरी बांधव, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकाच्या नावाने खोटी तक्रार

$
0
0

पोलिसांकडून तपास सुरू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लेटरपॅडची झेरॉक्स व खोटी सहीचा वापर केल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीविरुध्द सातपूर पोलिस स्थानकात उद्योजक सुभाषचंद्र छोरिया यांनी तक्रार केली आहे. अश्वमेध पॅकर्स या कंपनीविरुध्द एमआयडीसीमध्ये छोरिया यांनी तक्रार केलेली नसताना त्यांच्या नावाने तक्रार केल्यामुळे या उद्योगामागे कोण आहे, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

एमआयडीसीत होणाऱ्या गैर उद्योगामुळे अनेक तक्रारी होत असताना ही खोटी तक्रार करण्यात आल्यामुळे त्याबाबतचे गुढ वाढले आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीनेही या तक्रारीवरून अश्वमेध पॅकर्सला नोटीस पाठवली तर त्या तक्रारीची माहिती छोरिया यांना दिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. कोणीतरी हा खोडसाळपणा केला असला तरी त्यामागे नेमका उद्देश काय आहे, याबाबत शोध घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसीमध्ये तक्रार वॉर सुरू आहे. त्यामुळे एकमेकांविरुध्द तक्रार करून परस्पर काटा काढण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तक्रार कोणी केली याची शहनिशा करणे सुध्दा महत्त्वाचे आहे.

अश्वमेध पॅकर्स व छोरिया यांच्यात कोणताही वाद नाही. असे असताना छोरिया यांनी आपली तक्रार का केली याची विचारणा त्यांनी केल्यानंतर या गोंधळात वाढ झाली. छोरिया यांनी तक्रार केली नसल्याचे जेव्हा अश्वमधे पॅकर्संना कळाले तेव्हा त्यांनीही हा खोडसाळपणा कोणी केला याचा शोध घेणे सुरू केले आहे. अशाच प्रकारच्या आठ ते दहा तक्रारी केल्याचाही संशय असून, त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतल्यानंतरच त्यामागाचा उद्देश स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किमान वेतनापासून आजही ‘ते’ वंचितच!

$
0
0

नामदेव पवार, सातपूर

संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीसाठी कामगारांनी रक्त सांडलेले असून, राज्याच्या प्रगतीतही त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. परंतु, अशा कामगारांची जाण नसलेल्या शासकीय यंत्रणेने मात्र आजही त्यांना किमान वेतनापासून वंचितच ठेवल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे शासकीय व निमशासकीय कार्यालयांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांसह खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची अशी पिळवणूक होताना दिसते. असंघटित कामगारांसाठी तर किमान वेतनाची तरतूदच शासनाने केली नसल्याने आजही असे कामगार वाऱ्यावर आहेत. आज, सोमवारी (दि. १ मे) जागतिक कामगार दिन साजरा होत असताना अशा कामगारांना न्याय मिळणार तरी केव्हा, असा सवाल आपसूक उपस्थित होत आहे.

गेल्या काही वर्षांत कामगार संघटना व कामगारांच्या गळचेपीचेच धोरण राबविले जात असल्याने कामगार देशोधडीला लागण्याच्या मार्गावर असल्याची स्थिती आहे. जगात सर्वांत मोठी शक्ती म्हणून कामगारवर्गाकडे पाहिले जाते. परंतु, त्याच शक्तीला आजही किमान वेतनासाठी रस्त्यावर उतरत आंदोलने करावी लागत आहेत. विशेष म्हणजे देशात असंघटित कामगारांची संख्या तब्बल ९३ टक्के आहे. यात केवळ ७ टक्केच कामगारांना कायद्याचे संरक्षण असल्याने कामगारांची होरपळ कधी थांबणार, असा प्रश्न या घटकांकडून उपस्थित केला जात आहे.

केंद्रात व राज्यात मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्रचा नारा दिल्यावरही कामगारांची होरपळच सुरू असल्याचे चित्र आहे. यापूर्वी एखाद्या आस्थापनेत किमान २० पेक्षा अधिक कामगार असतील, तर कायदा लागू होत असे. परंतु, नवीन कायद्यानुसार ४९ कामगार आस्थापनेत असतील, तर त्यांना कामगार कायद्याचे नियमच लागू होत नाहीत. नवीन नियमानुसार कारखाना मालकाला २९९ कामगार असलेल्या कारखान्यात काही अडचण भासल्यास कधीही कारखाना बंद करण्याची मुभा देण्यात आली आहे. मोजक्याच कारखान्यांत तीनशेहून अधिक कामगारांची संख्या असते. परिणामी कामगारांचेच नुकसान होत आहे. त्यामुळे उद्योजकांसाठी पोषक वातावरण तयार करून कामगारवर्गाला त्रास देण्याचे धोरण स्वीकारले जात असल्याचा आरोप होत आहे.

--

कंत्राटी कामगार वाऱ्यावर

नोकरभरतीअभावी शासकीय व निमशासकीय कार्यालयांत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कायम कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा मिळतात, परंतु त्याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना मात्र सुविधांपासून वंचितच राहावे लागत आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करूनदेखील कंत्राटी कामगारांना किमान वेतनही दिले जात नसल्याची स्थिती आहे.

--

शिक्षण क्षेत्रालाही फटका

ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या असंख्य शिक्षकांसह शिक्षकेतर कामगारांनाही किमान वेतनापासून वंचितच राहावे लागत आहे. खासगी शिक्षण संस्थेत ज्ञानदानाचे काम करणाऱ्यांसह इतरानी साधा आवाज उठविणेही गुन्हा ठरताना दिसतो. आठ तासांहून अधिक काम करूनदेखील किमान वेतनही मिळत नसल्याने खासगी संस्थांवर अंकुश ठेवणारे शासकीय विभाग नेमके करतात तरी काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

--

असंघटितांना वाली कोण?

देशातील सर्वांत मोठी कामगारांची संख्या असंघटित क्षेत्रात आहे. मिळेल ते काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाने स्वतंत्र मंडळाची स्थापनादेखील केली होती. परंतु, मंडळाकडे असंघटित कामगारांची माहिती घेण्यासाठी कर्मचारीच नसल्याने असंघटित कामगारांना वाली कोण, असा सवाल उपस्थित होतो. कारवाईमुळे कामगार संघटनांची धारही बोथट होत आहे. भविष्यात कामगार चळवळ टिकविण्यासाठी कामगारांवर मोठा लढा उभा करण्याची वेळ येणार हेच यातून अधोरेखित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४० शॉर्ट फिल्म्सचे नाशकात स्क्रीनिंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पर्यावरण, प्रदूषण व अंधश्रध्दा यांच्याविषयी जागृती व्हावी, यासाठी चित्रपटसृष्टीचा वापर करुन पर्यावरणसृष्टी वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी नाशिकमध्ये तब्बल १४० शॉर्टफिल्म्सचे ‌स्क्रीनिंग केले जात आहे. यासाठी महर्षी चित्रपट संस्थेने पुढाकार घेऊन तब्बल २५ जिल्ह्यांत आवाहन केल्यानंतर या शॉर्ट फिल्म्स आल्या आहेत. यातून तीन उत्कृष्ट फिल्मची निवड करुन त्यानंतर त्या उत्तर महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत दाखवल्या जाणार आहेत.
रविवारी या फिल्मच्या स्क्रीनिंग करताना छोटेखानी कार्यक्रमही पार पडला. त्यात करमणूक विभागाचे उपायुक्त प्रकाश वाघमोडे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील हे उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुकही केले. या फिल्म्समध्ये उत्कृष्ट शॉर्टफिल्म या चित्रपटगृहात दाखवण्याचा मनोदयही वाघमोडे यांनी बोलून दाखवला. महर्षी चित्रपट संस्थेचे अध्यक्ष सचिन बरेलीकर, सचिव कृष्णकुमार व विश्वस्त निशिकांत पगारे यांनी या सर्व उपक्रमाचे संयोजन केले.

दोन ते तीस मिन‌िटापर्यंतच्या या शॉर्ट फिल्म्समध्ये अनेक तरुणांनी आपली कल्पकता वापरली आहे. त्याचे परीक्षण चार दिवस शाल‌िमार येथील महात्मा फुले कलादालनात होणार आहे. त्यासाठी परीक्षक म्हणून ‘१९४२ः अ लव्ह स्टोरी’ या हिंदी चित्रपटाचे आर्ट डायरेक्टर तुषार गुप्ते व कादर खान यांचे सहाय्यक शिवकुमार हे काम करणार आहेत. चित्रपट हे माध्यम थेट परिणाम करणारे आहे. त्यामुळे पर्यावरणावर काम करणाऱ्यांनी हा मार्ग निवडला आहे. या फिल्म्सचा वापर करुनच व्हॉटसअॅप, यू ट्यूबसह इतर माध्यमांतून त्या पोस्ट केल्या जाण्याचाही मनोदय या संस्थेचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल ‘मारणारे’ पंप रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्राहकांना पेट्रोल देताना मापात पाप करणाऱ्या दोन पेट्रोल पंपांवर नाशिक वैधमापन विभागाने कारवाई केल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या दोन पंपांपैकी एक पेट्रोलपंप येवला तालुक्यातील राजापूर येथील असून, दुसरा नगर जिल्ह्यातील नेवासा येथील आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलपंपांतून पेट्रोल देताना पेट्रोल ‘मारले’ जात असल्याच्या तक्रारी होत्या.

महिनाभरापूर्वीच नाशिक विभागामध्ये ३२२ वितरकांची तपासणी करुन दोन हजार पंप तपासले होते. यामध्ये दोन पंप कमी वितरणामुळे बंद करुन त्यांच्याविरोधातखटला नोंदविण्यात आला. ९९ पंपांतील दोषांमुळे ते नोटीस देऊन बंद करण्यात आले होते. पण त्यानंतरही पेट्रोल कमी होत असल्याच्या तक्रारी असल्यामुळे ग्राहकही आता धास्तावले आहेत. ग्राहकांची नजर चुकवून त्यांना पेट्रोल देणे, त्याचबरोबर मापात पाप करण्याचे प्रकार अगोदरपासून काही ठिकाणी सुरूच आहेत. पण त्यावर तात्पुरती कारवाई केली जाते. त्यानंतर पुन्हा हा धंदा सुरू असतो. त्यामुळे यावर कायम नजर राहील यासाठी वैधमापन यंत्रणेने पथक तयार करावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या या चोरीची कुणकुण राज्यातही लागली होती. त्यामुळे महिनाभरापूर्वीच राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोल‌िस महासंचालक तथा नियंत्रक वैधमापन शास्त्र अमिताभ गुप्ता यांनी यंत्रणेतील संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यात राज्यातील १६३६ पेट्रोल, डिझेल वितरकांच्या तपासणीत ११ हजार ४१८ पंपांची तपासणी करण्यात आली. त्यात २५२ पंपांद्वारे कमी- जास्त वितरण होत असल्याचे आढळल्याने अनुसूची १० नुसार नोटीस देऊन बंद करण्यात आले. नंतर त्याची पुनर्पडताळणी व मुद्रांकन केल्यानंतर वापरास खुले करण्यात आले. या तपासणीत उल्लंघनाबाबत १७ खटले नोंदविण्यात आले.

उत्तर प्रदेशातील घटनेने सतर्कता

उत्तर प्रदेशात इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवून पेट्रोलमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांची चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. या क्लृप्तीमुळे दरवर्षी ग्राहकांना २५० कोटी रुपयांचा चुना लावला जात असल्याची बाब पुढे आल्यामुळे पेट्रोल पंपांवरील हे माप आता संशयाच्या भोवऱ्यात आहे. उत्तर प्रदेश एसटीएफने सात पेट्रोल पंपांवर धाडी घातल्या. या सर्व ठिकाणी पेट्रोलचोरीसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसवण्यात आल्याचे आढळले. ग्राहक डिस्पेन्सरमध्ये पाहून त्यातल्या मोजमापानुसार पेट्रोलचे पैसे भरतात. पण प्रत्यक्षात येथे दिसणाऱ्या आकड्यांपेक्षा गाडीत पेट्रोल १० ते १५ टक्के कमी भरले जाते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. असेच चौकशीपथक कायमस्वरुपी महाराष्ट्रातसुध्दा नियुक्त करण्याची मागणी आता पुढे येत आहे.

येथे करावी तक्रार

ग्राहकांनी वितरणाबाबत शंका असल्यास अचूक वितरणाची खात्री करण्यासाठी पंपावर उपलब्ध असलेल्या ५ ल‌िटर प्रमाणित मापाद्वारे तपासणी करावी. विधीग्राह्य त्रुटींपेक्षा म्हणजे २५ मिलीपेक्षा कमी वितरण होत असल्याचे निदर्शनास आल्यास याबाबत ग्राहकांनी क्षेत्रिय वैधमापन शास्त्र विभागाशी संपर्क साधावा किंवा यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र.०२२-२२८८६६६६ असून ई-मेल dclmms_complaints@yahoo.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हाळ कांदा सापडला संकटात

$
0
0

गतवर्षीच्या तुलनेत बाजारभावात सरासरी अडीचशे रुपयांची घसरण

म.टा. वृत्तसेवा, येवला

लाल कांद्याने दगा दिल्यानंतर आता महत्त्वाचा ‘उन्हाळ’कांद्यानेदेखील उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. लाल कांद्याच्या तुलनेत अधिक काळ तग धरू शकणारा उन्हाळ कांदा तरी श्रम अन् घामापोटी अधिकचे दोन पैसे हाती टेकवेल, ही बळीराजाची अपेक्षा सध्या उन्हाळ कांद्यास मिळणाऱ्या कवडीमोल बाजारभावामुळे अक्षरशः फोल ठरली आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत तर नुकत्याच संपलेल्या आठवड्यात उन्हाळ कांदा बाजारभावाचा आलेख दिवसागणिक खाली येत असल्याचे चित्र दिसून आले. यंदाच्या एप्रिलमध्ये उन्हाळ कांद्याला मिळणारा बाजारभाव बघता गतवर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत उन्हाळ कांदा बाजारभावात प्रतिक्विंटल सरासरी तब्बल २५० रुपयांनी घसरण झाली आहे. परिणामी उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

संकटामागून संकटांची मालिका आजवर नशिबी आलेल्या शेतकऱ्यांच्या समोरच शेतीमाल ढासळत्या बाजारभावाचे संकट अन् त्यातून पदरी पडणार दु:ख यंदाही काही कमी होताना दिसत नाही. यंदाही नेहमीच वांधा करणारा कांदा याबाबतीत मागे नाही. कांद्याच्या बाजारभावाने उत्पादक शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत ढकलले असून, गतवर्षी झालेल्या दमदार पाऊस व पुढे निसर्गाची साथ लाभताना तालुक्यातील शेतकरी एका बाजूला तीनचार वर्षांतील दुष्काळाच्या कचाट्यातून बाहेर पडला. कांदा उत्पादन व उत्पादकतेत वाढ झाल्याचे समाधान चेहऱ्यावर दिसले, मात्र हे समाधान पुढे कांदा बाजार समितीत आणल्यावर मिळणाऱ्या कवडीमोल बाजारभावामुळे क्षणभंगुर ठरले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या महिनाभरात उन्हाळ कांदा बाजारभावाचा आलेख हा खाली खाली येत गेल्याने शेतकऱ्यांच्या माथी दिसणाऱ्या निराशेपोटी आठ्या दिवसागणिक वाढतच आहेत. मुख्य बाजार आवारात गेल्या आठवड्यात एकूण ४०,३१२ क्विंटल कांदा आवक होताना उन्हाळ कांद्याला किमान २०० ते कमाल ५८० (सरासरी ४५०) रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तर समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात एकूण १३,५४६ क्विंटल इतकी कांदा आवक होताना येथे उन्हाळ कांदा बाजारभाव किमान अवघे १५० ते कमाल ५५५ (सरासरी ४००) रुपये एवढे होते. मागील वर्षी याच एप्रिल महिन्यात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० ते कमाल ८३६ (सरासरी ६५०) रुपये असा बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे गतवर्षीचा बाजारभाव बघता सध्याचा बाजारभाव बळीराजाला निराशेच्या गर्तेत ढकलणारा आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साहित्य जीवनशैलीचा अविभाज्य अंग’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

साहित्य हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग असून, अविभाज्य अंग आहे. मानवी संस्कृतीचं दिशादर्शनच साहित्यातून यापूर्वीही होत होते व यापुढेही मानवी संस्कृतीचे अस्तित्व असेपर्यंत होतच राहणार आहे, असा सूर घोटीत राज्यस्तरीय साहित्य संमेलनात उमटला. त्यामुळेच साहित्यिक चळवळीकडे गांभीर्याने पाहण्याची व या चळवळीस बळ देण्याची नितांत गरज आहे, असे आवाहनही यावेळी मान्यवरांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, नाशिक व कला क्रीडा साहित्य व संस्कृती संवर्धन मंडळ, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने घोटीत शनिवारी (दि. २९) एकदिवसीय सहाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर नीलेश खरे, संमेलनाध्यक्ष देविदास खडताळे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, स्वागताध्यक्ष गोरख बोडके, साहित्यिक दशरथ यादव, पांडुरंग वारुंगसे, जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर, ज्ञानेश्वर लहाने, संदीप किर्वे उपस्थित होते.

संमेलनाध्यक्ष खडताळे यांनी साहित्यिक चळवळीची गरज प्रतिपादित केली तर सहा वर्षांच्या साहित्यिक प्रवासाचा आढावा जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांनी घेतला. सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी तर आभार संजय कान्हव यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यायाविरुद्ध लढणारा सच्चा कॉम्रेड

$
0
0

विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीचे आंदोलन असो किंवा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठीचे आंदोलन असो, प्रत्येक आंदोलनात नाशिककरांची बाजू हिरिरीने मांडणारे नाव म्हणजे कॉम्रेड श्रीधर देशपांडे. गेली चाळीस वर्षे सातत्याने विविध आंदोलनांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम कॉम्रेड देशपांडे करीत आहेत. वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील त्यांचा अन्यायाविरुद्धचा लढा आजही सुरू आहे.

कॉम्रेड देशपांडे यांचा जन्म शहरातील हुंडीवाला लेन येथे झाला. त्यांचे वडील त्या काळचे विमा प्रतिनिधी होते. ज्या काळात लोकांना विमा हा शब्द माहिती नव्हता, त्या काळात त्यांनी विमा काढण्याचे काम केले. नाशिककरांना विमा काढण्याची सवय त्यांनी लावली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांना लोक विमामहर्षी म्हणत असत. सहा भाऊ आणि एक बहीण असे कुटुंब असलेल्या कॉम्रेड देशपांडे यांचे आयुष्य गरिबीत गेले. त्यांचे शालेय शिक्षण पेठे विद्यालयात झाले. शिक्षणात व खेळात अग्रेसर असल्याने इंटरसायन्स होताच त्यांना पेठे विद्यालयात शिक्षकाची नोकरी लागली. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी एचपीटी कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली व ते एलआयसीत रुजू झाले. हाच काळ त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. एलआयसीमध्ये नोकरी करत असताना त्यांचा संबंध ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉइज युनियनशी आला. तेथे त्यांनी युनियनच्या कामाला सुरुवात केली. काही काळानंतर युनियनमध्ये फूट पडत असल्याचे लक्षात येताच कामगारांचे प्रबोधन करून ही युनियन अबाधित ठेवली. युनियनचे काम करीत असताना कॉम्रेड नाना मालुसरे, सुनील मेहता, गोदाताई परुळेकर आदींशी संबंध आला. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे विचार अगदी घट्ट होत गेले. त्यांच्या कामाचा अभ्यास पाहून त्यांना अखिल भारतीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. एलआयसीच्या कामातही ते अग्रभागी होते. त्यांच्या कामाचा आवाका पाहून एलआयसीने त्यांना क्लास वन अधिकारीपदाची ऑफर दिली. परंतु, युनियनच्या कामाला प्राधान्य द्यायचा निर्णय घेतल्याने त्यांनी प्रमोशनला नकार दिला व पूर्ण वेळ युनियनच्या कार्याला वाहून घेतले. कॉम्रेड मालुसरेंच्या सान्निध्यात असल्याने एचएएल, नोट प्रेस, एलआयसी, पोस्ट यांच्या युनियनच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. याचदरम्यान त्यांनी नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल, सुरगाणा आदी दुर्गम भागात किसान सभेच्या कामाला सुरुवात केली.

१९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी एलआयसीच्या कामगारांना बोनस द्यायचा नाही, असा पवित्रा घेतला. त्यावेळीदेखील त्यांनी या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये सरकारला बोनस देणे भाग पाडले. आणीबाणीच्या काळात अनेक तात्पुरत्या कामगारांकडून काम करवून घेतले जायचे. काम झाल्यानंतर त्यांना घरी बसावे लागत होते. अशा असंख्य तात्पुरत्या कामगारांना कायम करण्याचे काम कॉम्रेड देशपांडे यांच्या प्रयत्नातून झाले. पहिला देशव्यापी भारत बंद १९८० मध्ये झाला. या आंदोलनात कॉम्रेड देशपांडे यांची भूमिका मोलाची होती. याच काळात चक्काजाम आंदोलन होऊन

सरकारला जेरीस आणले गेले. बापू उपाध्यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची एक कमिटी तयार करण्यात आली. त्यात कॉम्रेड देशपांडे यांचा समावेश होता.

१९७६ मध्ये सीटूची स्थापना झाली, त्यावेळी त्यांनी पूर्ण वेळ या कार्याला वाहून घेतले. ‘सीटू’च्या कामात डॉ. डी. एल. कराडांबरोबर काम करताना कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. शिक्षण बाजारीकरण मंचच्या माध्यमातून शिक्षण संस्थांकडून पालकांची होणारी पिळवणूक थांबविण्याचे काम त्यांनी सुरू केले. आज ते या विभागाचे

अध्यक्ष आहेत. प्रणव मुखर्जी, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, ए. के. अॅन्टोनी यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांना भेटून कामगारांचे असंख्य प्रश्न त्यांनी मार्गी लावले. आपल्या या कार्यात पत्नी, तसेच मुलगा हेमंत यांचा सिंहाचा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले. जोपर्यंत हातपाय चालतात, तोपर्यंत हे काम करतच राहणार, असे ते म्हणतात.

--

नाशिककरांनो, लिहिते व्हा!

ज्येष्ठ नागरिक म्हटले, की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टिव्हनेस असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण, अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृद्ध असतात, त्यांचे मन मात्र तरुणच असते. त्यांच्या कामातून, समाजसेवेतून किंवा अन्य अॅक्टिव्हिटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचे हे व्यासपीठ म्हणजे आमचा ‘यंग सीनिअर्स’ कॉलम. चला तर मग, तुम्ही जर असे यंग सीनिअर असाल, तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असे कोणी असेल, तर त्यांचे नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, ना‌शिक.

समन्वय : फणिंद्र मंडलिक- ९४२३१७४४९५.

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर ‘यंग सीनिअर्स’ उल्लेख करावा.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णा बेळेंच्या मेहनतीचे कौतुक

$
0
0

अण्णा बेळेंच्या मेहनतीचे कौतुक

सरकारवाडा पुन्हा उभा राहावा, यासाठी लोकचळवळ उभारणारे अण्णा बेळे सरकारवाड्याबरोबर हेरिटेज वॉकचे मुख्य आकर्षण होते. अण्णांना ऐकताना नाशिककर हरखून गेले होते. अण्णा सरकारवाड्यासाठी लढले नसते, तर ही वास्तूही काळाच्या पडद्याआड गेली असती. अण्णांनी सांगितलेले अनुभव अंगावर काटा आणत होते. नाशिक शहराचा वारसा वाचवायचा असेल, तर एकत्रित येऊन लढण्याशिवाय पर्याय नसल्याचे अण्णांनी सांगितले. सरकारवाड्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार पंकज भुजबळ, माजी आमदार ए. टी. पवार, माजी नगरसेवक रमेश शिंदे यांनी वेळोवेळी मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.

--

अधिकाऱ्यांच्या कष्टाचे फळ

पुरातत्त्व विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी सरकारवाड्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. यात माजी अधिकारी शंकर साठे हेही एक. ‘मटा’च्या हेरिटेज वॉकसाठी ते आवर्जुन उपस्थित होते. यावेळी त्यांनी केलेल्या कामाचे अनुभव सर्वांशी शेअर केले. पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक श्रीकांत घारपुरे व त्यांच्या टीमकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे नाशिककरांनी कौतुक केले.

--

कामासाठी निधीची मात्र कमतरता

सरकारवाडा पुन्हा साकारला जात असताना तो अ‌नेक अडचणींनाही सामोरा जात आहे. सरकारवाड्यासमोरचा विद्युत पोल व डीपी गेली अनेक वर्षांपासून सरकारवाड्याच्या सौंदर्यात अडथळा ठरत आहे. तो काढण्यासाठी वीजपुरवठा विभागाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही यश आलेले नाही. वाड्याभोवतीची अतिक्रमणे, तसेच वाड्यासमोरील दोन झाडे धोकादायक झाली असून, ती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मात्र, त्याकडेही महापालिका दुर्लक्ष करीत आहे. सरकारवाड्याच्या हद्दीत पोलिसांचे जुने कार्यालय आहे, तेही हलविण्याची गरज आहे. या सर्वांबरोबरच सरकारवाड्याच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी आता संपल्याने काम बंद पडण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी, तसेच जिल्हाधिकारी व महापालिकेने सरकारवाड्याच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी मागणी होत आहे.

--

मुख्यमंत्र्यांकडून निधीची अपेक्षा...

सरकारवाडा नाशिकचे वारसास्थळ आहे. हा वाडा वाईट अवस्थेतून जात असताना अण्णा बेळे व त्यांच्या टीमने उभी केलेल्या लोकचळवळीमुळे हा वाडा पुन्हा नव्याने उभा राहत आहे. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी कष्टाने वाड्याच्या पुनरूज्जीवनासाठी धडपडत आहेत. मात्र या कामासाठी आवश्यक असलेला निधी राज्य सरकारकडून पुरेसा मिळालेला नाही, तो मिळाल्यास ही वास्तू लवकरच चालताबोलता इतिहास सांगू लागेल. मुख्यमंत्र्यांनी नाशिकचे पालकत्व घेतले आहे. त्यांनी वाड्याला भेट देऊन पालकत्वाची भूमिका पार पाडावी व निधीची पूर्तता करावी, अशी मागणी अण्णा बेळे, कृष्णा नागरे यांनी नाशिककरांतर्फे केली आहे. पेशवाईची शान याचि डोळा याचि देही पाहताना ‘महाराष्ट्र टाइम्स’मुळे सरकारवाडा पाहता आला, अशी भावनाही नाशिककरांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील तरुणांना लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुण्याहून आलेल्या तरुणाचा मोबाइल आणि रोकड दोन संशयितांनी हिसकावून नेला. शनिवारी मध्यरात्री शालिमारला हा प्रकार घडला. गंगाधर राजेंद्र परडे (वय २९, रा. फ्लॅट क्रमांक १०१, गोल्डन ड्रिम्स, गोंधळेनगर, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पहाटे पावणेचारच्या सुमारास ते पुण्याहून नाशिकमध्ये आले. त्यावेळी दोन संशयितांनी त्यांना अडविले. त्यांच्याकडील मोबाइल व रोख रक्कम असा १३ हजारांचा मुद्देमाल हिसकावून नेला. भद्रकाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पूर्ववैमनस्यातून मारहाण

दीड महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून दोन तरुणांना चौघा संशयितांनी बेदम मारहाण केली. सातपूर परिसरातील श्रमिकनगरध्ये शुक्रवारी (दि. २८) रात्री ही घटना घडली. रेणुका माता चौकातील जिजाई रो-हाऊसमधील रहिवासी समाधान जाधव हे रात्री साडेनऊच्या सुमारास मित्र शाहरूख शाह समवेत वास्तूनगरकडून पिंपळगाव बहुलाकडे मोटरसायकलवरून चालले होते. संशयित निखिल भावले, गुलाब, भावड्या व आणखी एकाने पवार संकुलजवळ थांबविले. जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांना दांडके, दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

भावावर चाकूने वार

जुन्या भांडणाची कुरापत काढून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार केले. शनिवारी (दि. २९) आगरटाकळी येथील नंदिनी पुलावर हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र वसंत धुमाळ (रा. आगरटाकळी) हे प्लंबिगच्या कामासाठी मोटरसायकलवरून चालले होते. नंदिनी पुलावरून नाशिककडे जाताना त्यांचा मोठा भाऊ शंकर धुमाळ याने त्यांना अडविले. जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत चाकूने गळ्यावर वार केले. रवींद्र धुमाळ यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू विक्रीविरोधात त्र्यंबकेश्वरमध्ये मोहीम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नाशिक ग्रामीण पोलिसांनी तळेगाव (अंजनेरी) येथे धाड टाकून गावठी दारूची भट्टी उद्‍ध्वस्त करीत हजारो रुपयांचे साहित्य जप्त केले. तसेच, त्र्यंबकेश्वर-अंबोली रस्त्यावर ठिकठिकाणी धाडी टाकत अवैध देशी दारू व्रिकी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

महामार्गालगत दारू दुकाने बंद झाल्याने अवैध दारू व्रिकीस जोर वाढल्याने पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. रविवारी स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक गिरी यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव, पोलिस हवालदार दिवटे, पोलिस शिपाई लगड आदींच्या पथकाने तळेगाव वाढोली आणि

त्र्यंबकेश्वर अंबोली रस्ता या भागात धडक मोहीम राबवली.

नाशिक तालुका पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी दूरध्वनीवरून त्र्यंबक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव ते वाढोली रस्त्यालगत गावठी दारूची भट्टी लावल्याची माहिती कळविल्यानंतर ही मोहीम आखण्यात आली. पोलीस पथक घटनास्‍थळी पोहोचले असता १५ लिटरचे २१ डबे भरलेले रसायण, १० लिटर तयार दारू भरलेले कॅन, पत्र्याचे डबे, ड्रम असे १५ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्र्यंबकेश्वर-अंबोली रस्त्यावर कृष्णा हॉटेलच्या बाजूस जांभळाच्या झाडाआड देशीदारू विक्री करीत असलेला पिंटू शिवाजी गायकवाड (वय २८, वेळुंजे) यास १४ देशीदारूच्या बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. अंबोली शिवारात अवैध दारू विकी करीत असलेला यादव पांडुरंग नवले (वय ५८, रा. वखारीचा पाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) यास अंबई शिवारात १५ देशीदारू बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरुध्‍द त्र्यंबक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव चौफुलीवरील अपघातात दोन जण जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव चौफुलीवर दोन कंटेनर आणि स्विफ्ट कार यांच्यात रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अपघात झाला. कंटेनरच्या धडकेत रस्त्यावर ऑइल पसरल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. या अपघातात स्विफ्ट कार व दोन्ही कंटेनरचे नुकसान झाले असून, दोन जण जखमी झाले आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव चौफुलीवर कंटनेर (एमएच ४६ एएफ ३६७०, डीएन ०९ पी ९१९९) आणि ‌स्विफ्ट कार (एमएच १५, डीएम ७७७४) यांच्यात रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले. कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने ऑइल रस्त्यावर पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच आडगाव पोलिस व अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहायाने रस्त्यावर पसरलेल्या ऑइलवर माती पसरविण्यात आली. दोन्ही कंटेनर ओझरकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसीपी अतुल झेंडे, बजबळे यांची बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) आणि पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) दर्जाच्या ९६ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश रविवारी निघाले. शहरातील दोन एसीपींसह महाराष्ट्र पोलिस अकादमीतील आठ आणि नाशिक ग्रामीणमधील एका डीवायएसपीची बदली करण्यात आली आहे.

परिमंडळ दोनचे एसीपी अतुल झेंडे यांची नाशिक ग्रामीणमध्ये डीवायएसपी म्हणून बदली झाली आहे. वाहतूक शाखेचे एसीपी जयंत बजबळे यांची पालघर विरार येथे डीवायएसपी म्हणून बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये कार्यरत कुंडलिक निगडे यांची पुण्यात, तर नम्रता अलकनुरे (राज्य गुप्त वार्ता, मुंबई), शकुंतला मैत्री, मिलिंद खेतले (मुंबई), मेघा कमलाकर (रायगड), अनिलकुमार लंभाते (खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र), राजेंद्रकुमार शेंडे (कोल्हापूर), दत्तात्रय निघोट (मुरबाड, ठाणे ग्रामीण) यांचा बदली झालेल्या अधिकाऱ्यांत समावेश आहे. नाशिक ग्रामीणमधील गजानन राजमाने यांची उस्मानाबाद येथे बदली झाली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयात संगमनेरचे डीवायएसपी अजय देवरे बदलून येणार आहेत.

बुरडेंच्या जागी कोण?

महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक म्हणून नियुक्ती जाहीर झालेल्या प्रशांत बुरडे यांची आता मुंबईचे सहआयुक्त म्हणून बदली करण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक नवल बजाज यांची कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून तर, कोकणचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांची अकादमीचे संचालक म्हणून नियुक्ती जाहीर झाली होती. मात्र बुरडे यांची आता मुंबईच्या सहआयुक्तपदी बदली केल्याचे समजते. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अकादमीत संचालक म्हणून कोण येणार याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबारला लवकरच वैद्यकीय कॉलेज

$
0
0

महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; पहिल्या दिवशी विक्रमी गर्दीचा अंदाज

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहरात लवकरच शासकीय वैद्यकीय कॉलेज कार्यान्वित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे महाआरोग्य शिबिर ऐतिहासिक असून, नंदुरबार जिल्ह्यातील या शिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राज्याकडून वीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येत असून, केंद्राच्या माध्यमातून पन्नास खाटांचे रुग्णालयदेखील सुरू होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे आदिवासी जिल्ह्यातील नागरिकांना आता मुंबई, पुण्यात उपचार घेण्यासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

खान्देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, तसेच आदिवासी भागातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी दि. ३० एप्रिल ते २ मेपर्यंत तीनदिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मोदी मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद््घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघूवंशी, माजी वैद्यकीय मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदयसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले की, राज्यात आतापर्यंत झालेल्या महाआरोग्य शिबीरांपैकी नंदुरबार शहरातील आरोग्य शिबिर हे ऐतिहासिक झाले आहे. शिबिरात ज्या रुग्णांनी तपासणी केली आहे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक, मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरातील डॉक्टरांची आवश्यकता असल्यास सरकारकडून मोफत उपचार देऊन बरे केले जाईल. नंदुरबार जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या नागरिकांनी महाशिबीरात तपासणीसाठी हजेरी लावली आहे. या जिल्ह्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘संख्यात्मक आणि गुणात्मक आघाड्यांवर सर्वोत्तम’

खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य शिबिर हे संख्यात्मक आणि गुणात्मक या आघाड्यावर सर्वोत्तम ठरल्याचा दावा वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘मटा’शी बोलताना केला. त्यांनी सांगितले की, महाआरोग्य शिबिरात सकाळपासूनच गर्दी झालेली दिसून आली. आतापर्यंत राज्यात वीस जिल्ह्यांमध्ये असे शिबिरे घेण्यात आली मात्र सर्वात जास्त्‍ा प्रतिसाद हा सातपुडा भागातील लोकांनी दिला आहे. रविवारी (दि. ३०) सकाळी अकरा वाजेपर्यंत शिबिरात एक लाखांहून अधिक नागरिकांनी तपासणीसाठी हजेरी लावली. तर दोन लाख रुग्णांपेक्षा जास्त तपासणीसाठी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे गर्दीचा अंदाज लावणे कठीण होत आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याशेजारी असलेल्या गुजरात आणि मध्यप्रदेशातूनदेखील हजारो नागरिक शिबिरात तपासणीसाठी आले होते.

रुग्ण तपासणीचे नऊ डोम

याप्रसंगी २० प्रमुख आजारांबरोबरच ‘आयुष’मधील उपचार येथे असल्याने रुग्णांना आपल्या गरजेनुसार उपचार घेण्यासाठी त्या-त्या डोममध्ये गर्दी करत होते. आयुषसाठी असलेल्या डोममध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आदी वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहून रुग्णांना उपचार करत होते. यासाठी कर्मवीर व्यं. ता. रणधीर आयुर्वेद कॉलेज, शिरपूर, श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक कॉलेज आणि आर. डी. चोरडिया हॉस्पिटल, चांदवड (नाशिक) येथील डॉक्टर उपस्थित होते. प्रत्येक डोममध्ये प्रामुख्याने ग्रंथीविकार, मेंदुविकार, मनोविकारर, बीएमडी (हाडाचाठिसूळपणा) श्वसनविकार, हृद्यविकार, कर्करोग त्वचाविकार, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, मॅमोग्राफी, कान-नाक-घसा यासह शस्त्रक्रियासाठीच्या विविध आजारांसाठीच्या तपासणी करण्यात येत होत्या. यासाठी मुंबई मधील टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट, केईएम, जे. जे. हॉस्पिटल, हिंदुजा, लीलावती, पुणे, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव येथील नामांकित डॉक्टर, विविध जिल्हा रुग्णालयांची वैद्यकिय तज्ज्ञांचे पथक हजर राहून उपचार करत होते. कोट्यवधी रुपयांची औषधे कंपन्या व रुग्णालयांनी

उपलब्ध केल्याचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सांगितले. शस्त्रक्रिया नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे व त्याद्वारे कोणत्याही गंभीर व मोठ्या आजारांची निश्चिती झालेल्या रुग्णांची नोंद घेऊन त्याचा संगणकीय डाटा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दंतरुग्णांसाठी मोबाइल व्हॅन

येथील दंतरोग कॉलेज, धुळे, जिल्हा रुग्णालय धुळे, एसएमबीटी डेन्टल हॉस्पिटल संगमनेर (अहमदनगर) यांचे पथक दंत रुग्णांसाठी सज्ज होते. त्यासाठी विश्वास पाटील ओरल हेल्थ मोबाइल युनिट हजर होते. येथील ३ मोबाइल व्हॅनमधील दंत चिकित्सायंत्रणेद्वारे जवळपास २८ डेन्टीस्टचे पथक तात्काळ तपासणी व उपचार करत होते. याचबरोबर नेत्ररुग्ण तपासणीची व रुग्णांना मोफत चष्मा देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…तर कदाचित स्वराज्य घडलेच नसते!

$
0
0

शिवव्याख्याते सचिन मदगे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, येवला

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. अचूक वेळ पाळली गेली नसती तर कदाचित स्वराज्य घडलेच नसते, असे प्रतिपादन शिवव्याख्याते सचिन मदगे यांनी केले. लोक पर्यटनाला गोव्यात जातात. गोव्यातील किनारा, त्यावरील परदेशी पाहुणे पाहतात, मात्र गोव्यातील बार पाहण्यापेक्षा फोंडा किल्ला, स्वत: शिवरायांनी जीर्णोद्धार केलेले नार्व्यातील सप्तकोटेश्वराचे शिवाचे मंदिर पहावे, मग तुम्हास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे विविध पैलू दिसतील, असेही ते म्हणाले.

संदीप महिंद गुरुजी यांच्या प्रेरणेतून येवला तालुक्यातील कातरणी येथे सुरू असलेल्या ‘श्रीशिवभारत आख्यान’ या शिवचरित्र सप्ताहाच्या सहाव्या दिवसाचे ‘गोव्यातील शिवराय व त्यांचे ५५ किल्ले’ या विषयावरील पुष्प गुंफताना सचिन मदगे बोलत होते. जगात प्रसिद्ध असलेले गोवा राज्य इतिहासापासून कोसो दूर असले तरी गोवा राज्यातील राजांच्या आगमनाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गोवा सरकार पूर्ण वर्ष ‘शिवजागरण वर्ष’ म्हणून साजरे करणार आहे. त्यामुळे महाराजांचे फोटो लावलेल्या गाड्या बार, डान्सबार बाहेर उभ्या असतात, असे चित्र कुठेही दिसू नये. संकटाच्या वेळी आठवणारे एकमेव चरित्र राजेंचेच आहे. छत्रपती नसते तर आज सामाजिक आणि राजकीय परिस्थिती वेगळी असती, असेही मदगे यांनी यावेळी सांगितले.

पहिले नौदल महाराजांनी उभे केले, आरमार बांधणीसाठी लुई हा पोर्तूगीज आणला. मात्र त्याला संभाव्य धोक्यांची जाणीव तत्कालीन पोर्तूगीजांच्या अधिकाऱ्यांनी करून दिल्याने तो लुई पळून गेला, तरी आरमार उभे राहिले. महाराजांनी आपले बिनीचे शिलेदार या युद्धनौका बनवताना त्या लुईच्या हाताखाली कामाला दिले होते. पुढे त्यांनीच युध्दनौका बांधल्या अन् याच युद्धनौका पोर्तुगीजांना भारी पडल्या. पोर्तुगीज लिहितात, महाराज युद्धकाळापेक्षा शांततेच्या काळात अधिक धोकादायक वाटतात. घोषणा देऊन महाराज कळत नाहीत, आज्ञापत्र वाचा, चरित्र वाचा, असे आवाहनही यावेळी मदगे यांनी केले.

जीवनात वेळेला महत्त्व आहे. महाराज वेळ फार काटेकोरपणे पाळायचे. शाहिस्तेखानाची बोटे छाटणे, आग्र्याहून सुटका, संभाजी महाराजांचे दिलेरखानाला सोडणे, ही वेळ पाळल्याचीच लक्षणे आहेत, असेही मदगे म्हणाले. यावेळी राजस्थानचे इंद्रप्रकाश दहिया, राजीव कलीता, हरियाणाचे सुरजीतसिंह दभडे, माजी आमदार संजय पवार, संभाजीराजे पवार, संजय बनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत कदम, नारायण गुंजाळ व गोरख अहिरे यांनी केले. या कथेसाठी अमोल दायमा, सौरभ कान्हेकर, विजय खैरे, सुमित मोहोळ, सागर शिंदे आदींनी संगीत साथ दिली. आख्यानातील कथाप्रसंग सादर करण्यासाठी नरेंद्र लाड, वंदेबुवा, समीर पारटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ वक्तव्यावरून ‘सोशल’ गदारोळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

‘आरक्षणामुळे देशातील ब्राह्मण मुलं परदेशात जातात’, असे वक्तव्य पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात नुकतेच केले. त्यानंतर सोशल मीडियामध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत.

मुक्ता टिळक यांच्या या विधानाचा भारिप बहुजन महासंघ, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी निषेध केला आहे. टिळक यांचे विधान खोडसळपणाचे असून त्यातून समाजात तेढ निर्माण होईल, असे मत काही जणांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे, ब्राह्मण संघाने टिळक यांचे समर्थन केले आहे. टिळक यांनीही आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ मीडियाने लावल्याचे म्हटले आहे.

आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यावरून राज्यभरात मराठा, मुस्लिम, ओबीसी आदी समाजांनी मोर्चेही काढले. हे वातावरण शांत होत असतानाच टिळक यांच्या टिपणीनंतर मंथन सुरू झाले. टिळक यांच्या म्हणण्याचा आशय असा होता की, आरक्षण असल्यामुळे ब्राह्मण मुलांना भारतात रोजगार मिळत नाही. त्यांना परदेशात रोजगारासाठी जावे लागते. त्यावरच सोशल मीडियातून टीका झाली. भारतीय प्रशासन सेवेतील एकूणपैकी किती व्यक्ती ब्राह्मण समाजातील आहेत? एकूण मंत्र्यांपैकी किती मंत्री या समाजाचे आहेत? सरकारी संस्थांच्या एकूण अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी किती ब्राह्मण आहेत? आदी प्रश्न भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश डबरासे यांनी उपस्थित केले आहेत. तर आरक्षण वादी मंचने म्हटले आहे, की देशात आरक्षण राहणारच. टिळक यांनी पुणे महापालिकेच्या महापौरपदाचा राजीनामा देऊन खुशाल परदेशात जावे. तसेच त्यांनी ‘Arctic Home of Vedas’ हे पुस्तक वाचावे. त्यात ‘ब्राह्मण भारतात परदेशीच आहेत’, असे म्हटले आहे.

लोकमान्य टिळकांनी कुणबी, तेली, तांबोळी यांना संसदेत प्रतिनिधित्व देण्यावरच प्रश्न उपस्थित केला होता, असे मत संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी मांडले आहे. मुक्ता टिळक यांनी या वक्तव्यातून आरक्षणाला छुपा विरोध केला आहे. आरक्षणाला विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध. हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. लोकमान्य टिळकांच्या मनातील सल महापौर टिळक यांनी बोलून दाखवली. त्यांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही टिळक यांच्यावर व्हिडिओच्याच माध्यमातून टीका केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ जणांना चावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महानगरपालिकेच्या निष्क्र‌िय कारभारामुळे उत्तमनगर परिसरात महाराष्ट्र दिनीच एका पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडून परिसरातील सुमारे पंधरा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. यात एका दीडवर्षीय बालकाचा समावेश आहे. यातील तिघा जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परिसरातील नागरिकांनी तब्बल सहा तास त्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला. ते हाती लागल्यानंतर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, सिडको विभागात वाढलेल्या या मोकाट जनावरांच्या व कुत्र्यांच्या प्रश्नाकडे ना नगरसेवकांचे लक्ष आहे, ना प्रशासनाचे. अशा प्रकारात एखाद्याचा जीव जाण्याची तर वाईट नगरसेवक व प्रशासन पाहत नाही ना, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सिडकोतील उत्तमनगर व राजरत्ननगर परिसरात सोमवारी एका कुत्र्याने मोठा धुमाकूळ घातला. अवघ्या सतरा महिन्यांची चेतना अशोक पाटील ही मुलगी, तिच्या दहावर्षीय चुलत बहिणीच्या कडेवर असताना अचानकपणे या कुत्र्याने चेतना ह‌िच्या पायाला चावा घेऊन त‌िला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेतनाच्या बहिणीने न डगमगता चेतनाची त्या कुत्र्यांपासून सुटका केली. यावेळी आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन या कुत्र्याला पळवून लावले. त्यानंतर या कुत्र्याने याठिकाणाहून पळ काढत परिसरातील प्राजक्ता प्रकाश कांबळे (वय ५ वर्ष), रोहित निंबा पाटील (७ वर्ष), हेमंत चंद्रहर्ष दोंदे (६ वर्ष), सोहम सचिन वाघ (४ वर्ष) यांना चावा घेवून गंभीर जखमी केले. या पिसाळलेल्या कुत्र्याने हाताला, पायाला अशा विविध ठिकाणी चावे घेतले असून, अन्य दहा बालकांनाही याच कुत्र्याने जखमी केल्याचे नागरिकांनी सांगितले. या कुत्र्याच्या चाव्यामुळे एखाद्याचा जीव सुद्धा जाण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात या कुत्र्याबद्दल प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अखेरीस परिसरातील नागरिकांनी नगरसेविका रत्नमाला राणे यांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी व भूषण राणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सिडको विभागात अशा प्रकारे अनेक मोकाट कुत्रे धुमाकूळ घालीत असून, यापुढे असे प्रकार होणार नाही यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

दहा वर्षांच्या अंकिताचे धाडस

अवघ्या सतरा महिन्यांची चेतना तिची दहावर्षीय चुलत बहीण अंकिता हिच्या कडेवर होती. यावेळी अचानकपणे या कुत्र्याने येऊन चेतना ह‌िच्या पायाला चावा घेऊन त‌िला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंकिताने अजिबात न घाबरता चेतनाला घट्ट पकडून ठेवले. यावेळी अंकिताने घाबरून चेतनाला सोडून दिले असते, तर कुत्र्याने तिला आणखी जखमी केले असते. यावेळी आसपासच्या लोकांनी धाव घेऊन त्या चेतनाची त्या कुत्र्यांपासून सुटका केली. त्यामुळे या चिमुकलीच्या धाडसाचेही कौतुक होत आहे.


नागरिकांची शोध मोहीम

राणे यांनी तातडीने महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोलवले. मात्र, तो कुत्रा सापडत नव्हता. नागरिकांनीही या कुत्र्याला पकडण्याचा संकल्पच केल्याने सुमारे दीड ते दोन हजार नागरिक अक्षरशः रस्त्यावर उतरून त्याचा शोध घेत होते. शेवटी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुत्र्यास पकडण्यात यश आले. कुत्रे पकडण्यासाठी हातात मिळेल ते दांडके, स्टम्‍प यांसारख्या वस्तू घेऊन नागरिक फिरत असल्याने याठिकाणी काही हाणामारीचा प्रकार झाला असावा असा संशय सुरुवातीला येत होता. अखेरीस त्या कुत्र्याला पकडल्यानंतर नगरसेविका राणे यांनी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे हे कुत्रे सुपूर्द केले.



चेतना व तिची चुलत बहीण अंकिता घराखाली खेळत होते. चेतना अंकिताच्या कडेवर असताना अचानक हे पिसाळलेले कुत्रे आले आणि चेतनला त्याच्याकडे ओढू लागले. अंकिताने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुत्र्याच्या जबड्यातून चेतनाचा पाय ओढण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. ही बाब नागरिकांच्या लक्षात आली आणि त्यांनी चेतनच्या पायाला कुत्र्याच्या जबड्यातून बाहेर काढले.

- अशोक पाटील, चेतनाचे वडील


सध्या सुट्टीचे दिवस असल्याने रोहित घराजवळ खेळत होता. अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्यावर हल्ला केला आणि त्याच्या पायाला चावा घेतला. रोहितच्या ओरडण्याने नागरिकांनी येऊन रोहितचा पाय कुत्र्याच्या जबड्यातून सोडविला. अशा मोकाट कुत्र्यांचा प्रशासनाने बंदोबस्त केला पाहिजे.

- रुपाली पाटील, रोहितची आई


सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेल्या या प्रकारावर अखेरीस पाच वाजेच्या सुमारास पडदा पडला. नागरिकांनी एकत्र येवून या कुत्र्यास पकडले. त्याने किमान सतरा ते अठरा लहानमुलांसह नागरिकांना चावा घेतल्याचे नागरिकांच्याच वतीने सांगण्यात आले आहे. कुत्र्याला पकडण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी वेळेवर धावून आले होते. मात्र ते सापडत नव्हते. प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी.

- भूषण राणे.

मटा भूमिका

पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एकाचवेळी तब्बल सतरा ते अठरा जणांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची घटना ही महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. बेवारस वा भटक्या कुत्र्यांचा विषय हा तसा सर्वव्यापी चिंतेचा बनला आहे. प्राणीमात्रांवर दया करणे वेगळे अन् सरसकट कोणत्याही भटक्या वा पिसाळलेल्या जनावरांना संरक्षण देणे वेगळे. दुर्दैवाने अलिकडे हे फॅडही जोमात आहे. भूतदयेच्या नावाखाली ही जमातही शेफारली असून त्याचा फटका बालगोपाळांना असा बसतो आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम पालिका नित्यनेमाने राबिवत असतानाही ही संख्या कमी होण्याऐवजी वाढतेय याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतेय. प्रशासनाने याबाबत अधिक दक्ष राहून या प्रकारांना आळा घालण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images